पूतिरोधके: (अँटिसेप्टिक्स). मानवी किंवा इतर प्राण्यांच्या शरीरावर किंवा शरीरात आक्रमण करू शकणाऱ्या रोगकारक सूक्ष्मजंतूंचा वा सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्बनी व अकार्बनी रासायनिक पदार्थाला, तो पूतिभवनास (पू तयार होण्यास) विरोध करीत असल्यामुळे ‘पूतिरोधक’म्हणतात. एखादे पूतिरोधक अल्प संहतीत (प्रमाण कमी असताना) सूक्ष्मजंतूंच्या वाढीस प्रतिबंध करू शकेल आणि अती संहती असताना त्यांचा संपूर्ण नाशही करू शकेल. एकच पदार्थ पूतिरोधक आणि जंतुनाशक (डिसइन्फेक्टंट) असू शकतो परंतु या संज्ञा समानार्थी वाटत असूनही निरनिराळ्या आहेत [→ जंतुनाशके]. मानवासहित सर्व प्राण्यांच्या जिवंत ऊतकावर (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहावर) तसेच जिवंत वनस्पतीवर सूक्ष्मजंतूंची वाढ रोखण्याकरिता किंवा त्यांचा नाश करण्याकरिता जे रासायनिक किंवा भौतिक पदार्थ वापरतात त्यांनाच पूतिरोधके म्हणतात. शस्त्रक्रियेत लागणारी हत्यारे, मलमपट्टी वगैरे साधने, रुग्णालयातील भिंती, खाटा वगैरे अचेतन पदार्थांवरील सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याकरिता जे पदार्थ वापरतात त्यांना ‘जंतुनाशके’ म्हणतात. सामान्यतः पूतिरोधके त्वचेवर लावावयाची, तसेच मुखगुहा, घसा, नाक, योनिमार्ग या शरीरभागांवरील श्लेष्मकलेवर (बुळबुळीत पातळ पटलावर) लावावयाची औषधे असतात. यामुळे पूतिरोधकांचा उल्लेख पुष्कळ वेळा ‘स्थानीय पूतिरोधके’ असा करतात.

प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, उदा., पेनिसिलीन [→पेनिसिलीन] आणि रासायनी चिकित्सात्मक औषधे, उदा., सल्फानामाइडे, यांच्यामध्येही सूक्ष्मजंतूंची वाढ रोखण्याचा गुणधर्म असतो परंतु हे पदार्थ तोंडाने किंवा अंतःक्षेपणाद्वारे (इंजेक्शनाद्वारे) बहुतांशी वापरले जात असल्यामुळे तसेच त्यांचा स्थानीय परिणामाकरिता अत्यल्प वापर होत असल्यामुळे त्यांचा समावेश पूतिरोधकांत केला जात नाही.

गुणधर्मांच्या बाबतीत जंतुनाशकांचे पूतिरोधकांशी पुष्कळसे साम्य असल्यामुळे दैनंदिन भाषेत या संज्ञांची वारंवार अदलाबदल होते. तथापि दोन्हीमधील फरक वरीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. सर्व पूतिरोधकांचा उपयोग जंतुनाशके म्हणून करणे शक्य असले, तरी सर्व जंतुनाशकांचा पूतिरोधक म्हणून वापर करता येत नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशांतून जंतुनाशक, पूतिरोधक, स्वच्छताकारक (सॅनिटायझर), बीजाणुनाशक (नीच दर्जाच्या सजीवांच्या सूक्ष्म प्रजोत्पादक घटकांचा नाश करणारे पदार्थ) इ. संबंधित संज्ञांच्या कायदेशीर व्याख्याच ठरविण्यात आलेल्या आहेत.

इतिहास : पूतिरोधक ही संज्ञा प्रथम किण्वन (आंबणे किंवा कुजणे), पूतिभवन आणि संक्रामण (रोगकारक सूक्ष्मजीवांच्या शरीरावरील आक्रमणामुळे होणारी ऊतकांची प्रतिक्रिया) यांना कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतू व बुरशींचा परिणाम रोखणाऱ्या पदार्थांकरिता वापरण्यात आली. पूतिरोधक गुणधर्माचा उपयोग इतिहासपूर्व काळापासून करण्यात येत असावा. अन्न परिरक्षणाकरिता खारवणे, धुरी देणे, मसाला घालणे या कृती म्हणजे पूतिरोधनाचाच भाग होता. प्राचीन ईजिप्शियन लोक बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारी) तेले, डिंक आणि मसाल्यांचा उपयोग शुष्कशव (ममी) तयार करण्याकरिता करीत. ग्रीक लोक जखमांवर लावण्याकरिता द्राक्षमद्य आणि शिर्का (व्हिनेगार) वापरीत. मध्ययुगीन काळात प्लेगच्या [→ प्लेग] प्रादुर्भावात यूरोपातील रोग्यांच्या घरातून सीडार किंवा जूनिपर वृक्षांची लाकडे जाळून धूर उत्पन्न करीत. पर्शियन लोकांना पाणी उकळून ते चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात साठवून परिरक्षित करण्याचे माहीत होते.

कार्‌बॉलिक अम्लाच्या विद्रावाचा फवारा उडविण्याचे लिस्टर यांचे उपकरण : (१) कार्‌बॉलिक अम्लयुक्त वाफेचा फवारा, (२) वाफ तयार होणारे पात्र, (३) उष्णतादायी साधन, (४) कार्‌बॉलिक अम्ल असलेले काचपात्र.

आधुनिक काळात पूतिरोधनाचा प्रथम उपयोग दोन निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे केला. अमेरिकेत ओ. डब्ल्यू. होम्स (१८०९–९४) आणि व्हिएन्ना येथे आय्. पी. सिमेलव्हाईस (१८१८–६५) यांचे लक्ष प्रसूतिपूतिज्वरामुळे (बाळंतरोगामुळे) होणाऱ्या भरमसाट मृत्यूसंख्येकडे गेले. दोन्ही ठिकाणी या घटनेस सारखेच कारण घडले होते. संसर्गजन्य रोगाने मृत्यू पावलेल्या रोग्याची शवपरीक्षा करणाऱ्या


वैद्याला, परीक्षा चालू असताना झालेली जखम दूषित होण्यामुळे मृत्यू आला. या घटनेमुळे संसर्ग प्रत्यक्ष वाहून नेला जात असावा असे या दोघाही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले व प्रसूती करणाऱ्या वैद्यांच्या हातामधून येणारा काही तरी पदार्थ प्रसूतिपूतिज्वरास कारणीभूत असावा असे त्यांना वाटले. सिमेलव्हाईस यांनी प्रसूतीस मदत करणाऱ्या प्रत्येकाने आपले हात कॅल्शियम क्लोराइडाच्या विद्रावाने धुण्याची सक्ती केली. त्यामुळे या रोगातील मृत्युसंख्येचे प्रमाण ९.९% वरून १.२७% पर्यंत घटले. आश्चर्य असे की, या दोघा शास्त्रज्ञांना तत्कालीन समव्यावसायिकांनी बराच विरोध केला होता.

लूई पाश्चर या सुप्रसिद्ध फ्रेंच शास्त्रज्ञांनी सूक्ष्मजंतूंचा आणि रोगाचा संबंध प्रथम दाखवून दिला. जोसेफ लिस्टर या इंग्रज शस्त्रक्रियाविशारदांनी पूतिरोधनाचे तत्त्व प्रतिपादन केले. शस्त्रक्रियेकरिता मुद्दाम केलेल्या किंवा अनपेक्षित जखमा सूक्ष्मजंतुसंसर्गामुळे दूषित होतात हे लक्षात येताच त्यांनी त्या धुण्याकरिता कार्‌बॉलिक अम्लाचा विरल विद्राव वापरला. जखमांवर बांधावयाच्या पट्ट्या या विद्रावात भिजवून वापरणे सुरू केले. याशिवाय शस्त्रक्रियागृहातून त्याच विद्रावाचा धुक्यासारखा फवारा उडविणेही त्यांनी सुरू केले. या सर्व उपायांमुळे शस्त्रक्रियेनंतर जखमेत पू झाल्यामुळे होणाऱ्या मृत्यू प्रमाणात बरीच घट झाली. अशा प्रकारे पूतिरोधी शस्त्रक्रियेचा पाया लिस्टर यांनी घातला.

पूतिरोधनाचे तत्त्व पटल्यानंतर नव्या रासायनिक आणि भौतिक साधनांचा सातत्याने शोध लागत गेला.

गुणधर्म : आदर्श पूतिरोधकात पुढील गुणधर्म असावे लागतात : (१) सर्व प्रकारच्या सूक्ष्मजंतूंचा वा सूक्ष्मजीवांचा नाश करण्याची किंवा त्यांची वाढ रोखण्याची क्षमता त्यात असावी. (२) परिणाम जास्त काळ टिकावा. (३) वापरण्यास सोपे असावे. (४) ते अदाहक (त्वचादाह उत्पन्न न करणारे) तसेच असंवेदनशील (न जाणवणारे) असावे. (५) अल्कोहॉल, साबण यांसारख्या पदार्थांमुळे तसेच रक्त, मृत ऊतक वगैरेंच्या सान्निध्यात पूतिरोधक अकार्यक्षम होता कामा नये.

बऱ्याच रासायनिक पदार्थांमध्ये सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याचा गुणधर्म असतो परंतु त्यांपैकी थोडीच रसायने पूतिरोधक म्हणून वापरता येतात. कारण बहुसंख्य रसायने कोशिकांतील (पेशींतील) जीवद्रव्यावर (जीवनास आवश्यक असणाऱ्या मूलभूत जटिल द्रव्यावर) विषारी परिणाम करतात. जास्त सहंत रसायने सूक्ष्मजंतूंना तसेच शरीर कोशिकांनाही मारक असतात. जखमा किंवा त्वचा दूषित व खराब होऊ नये म्हणून मुख्यत्वेकरून पूतिरोधके वापरतात. या ठिकाणी हे नमूद करावयास हवे की, कोणतेही पूतिरोधक शरीराची त्वचा पूर्णपणे निर्जंतुक करण्यास असमर्थ असते.

क्रियाशीलता : पूतिरोधकाच्या क्रियाशीलतेवर पुढील गोष्टींचा परिणाम होतो : (१) आर्द्रता, (२) ऑक्सिजन, (३) बाह्य पदार्थ, (४) पृष्ठताण, (५) संहती, (६) अल्पराशीय क्रियाशीलता, (७) तापमान आणि (८) अम्लता किंवा क्षारता (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म).

आर्द्रता : काही सूक्ष्मजंतूंचे बीजाणू पुष्कळ काळपर्यंत, विशेषेकरून आर्द्रतेच्या अभावी, सुप्तावस्थेत राहू शकतात. आर्द्रता व अनुकूल परिस्थिती निर्माण होताच या बिजाणूंचे क्रियाशील सूक्ष्मजंतूंत रूपांतर होते. जलद संशीतन आणि पाठोपाठ जलद शुष्कीकरण केल्यास सूक्ष्मजंतूही सुप्तावस्थेत काही काळ राहू शकतात. योग्य तापमान, योग्य आर्द्रता आणि योग्य संवर्धन माध्यमात हेच सूक्ष्मजंतू पुन्हा कार्यशील बनू शकतात. वरील कारणामुळे पूतिरोधके आर्द्रतेच्या सान्निध्यात, विशेषेकरून प्रत्यक्ष पाण्याच्या सान्निध्यात अधिक परिणामकारी बनतात.

ऑक्सिजन : ऑक्सिजीवी सूक्ष्मजंतूंची वाढ मुक्त ऑक्सिजनाच्या अस्तित्वातच होते, तर अनॉक्सिजीवी सूक्ष्मजंतू ऑक्सिजनामुळे नाश पावतात. काही पूतिरोधके ऊतकाच्या सान्निध्यात ऑक्सिजन उत्पन्न करतात व म्हणून ती अनॉक्सिजीवी सूक्ष्मजंतूंचा नाश करू शकतात.

बाह्य पदार्थ : क्लथित (साखळलेले) रक्त व इजा झालेले ऊतक पूतिरोधकांच्या क्रियाशीलतेत व्यत्यय आणतात. याशिवाय तेल, ग्रीज, कचरा, कापडाचे तुकडे जखमेत राहिल्यास पूतिरोधके अकार्यक्षम होतात म्हणून जखम शक्य तेवढी स्वच्छ करावी लागते.

पृष्ठताण : संश्लेषित (कृत्रिम रीत्या तयार केलेला) साबण व प्रक्षालके (डिटर्जंट्‌स) यांमध्ये सूक्ष्मजंतुरोधनाचा गुणधर्म अत्यल्प प्रमाणात असतो परंतु त्यांच्यामध्ये पृष्ठताण कमी करण्याचा जो गुणधर्म आहे त्याचा उपयोग त्वचा, खाण्या-पिण्याची भांडी वगैरेंवरील सूक्ष्मजंतू केवळ यांत्रिक रीतीने काढून टाकण्याकरिता करतात. काही रासायनिक संयुगांच्या पृष्ठताण कमी करण्याच्या गुणधर्माचा उपयोग ती इतर पूतिरोधकांत मिसळून पूतिरोधनाचा परिणाम अधिक खोल भागात शिरण्याकरिता करतात. डोळ्यात घालावयाची पूतिरोधके थेंब, मलमे अशा स्वरूपाची असतात.

संहती : पूतिरोधकांची अनुकूलतम सहंती सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यास पुरेशी असून ऊतकातील कोशिकांना इजा न करणारी असावी लागते. संहती कमीजास्त होण्याचे पूतिरोधकाच्या क्रियाशीलतेत बिघाड उत्पन्न होतो. उदा., ७०% संहतीचे एथिल अल्कोहॉल उत्तम पूतिरोधक असते परंतु त्याची संहती ६०% पर्यंत कमी झाल्यास किंवा ९०% पर्यंत वाढल्यास त्याची कार्यशीलता अनिश्चित असते.

अल्पराशीय क्रियाशीलता : काही धातूंच्या, विशेषेकरून चांदीच्या, अत्यल्प प्रमाणात असूनही सूक्ष्मजंतूंचा नाश करण्याच्या किंवा त्यांची वाढ रोखण्याच्या गुणधर्माला ‘अल्पराशीय क्रियाशीलता’ म्हणतात. तांबे व पारा या धातूंमध्येही हा गुणधर्म आहे. या गुणधर्माचा उपयोग मलमे, डोळ्यात घालावयाचे थेंब वगैरे बनविण्याकरिता करतात. त्वचेवरील सूक्ष्मजंतूंची वाढ रोखण्याकरिता सिल्व्हर नायट्रेटाचा विद्राव वापरतात.

तापमान : त्वचेवर किंवा श्लेष्मकलेवर वापरावयाच्या पूतिरोधकांच्या बाबतीत तापमानाला फारसे महत्व नसले, तरी सूक्ष्मजंतूंच्या आणि कवकांच्या [बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींच्या → कवकसंसर्ग रोग] बीजाणूंचा नाश करण्याकरिता विशिष्ट तापमानाची गरज असते. दंतवैद्यांना आणि शस्त्रक्रियाविशारदांना लागणारी हत्यारे विशिष्ट तापमान असलेल्या जंतुनाशकाच्या विद्रावात बुडवावी लागतात. येथे हेही लक्षात ठेवावयास हवे की, हत्यारे काही तासपर्यंत उकळत्या विद्रावात ठेवूनही सर्व बीजाणू नाश पावण्याची खात्री नसते.

अम्लता किंवा क्षारता : पूतिरोधकाची कार्यक्षमता त्याच्या pH मूल्याप्रमाणे बदलू शकते [→ पीएच मूल्य]. पूतिरोधकाची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) व पायसीकरण [→ पायस] pH मूल्यावर अवलंबून असते. ज्या पात्रात पूतिरोधक साठवले असेल त्यावर पूतिरोधकाच्या अम्लतेचा वा क्षारतेचा क्षादक (हळूहळू झिजून जाण्याचा) परिणाम होऊ शकतो. तसेच शरीरातील ऊतकांवरही दुष्परिणाम होतो. पूतिरोधकाचे pH मूल्य शरीराच्या pH मूल्याएवढे (७.३५ – ७.४) असणे योग्य असते.

पूतिरोधकांची क्रियाशीलता अजमावण्याकरिता आज कोणतीही विशिष्ट परीक्षा उपलब्ध नाही. अनेक निकष वापरूनच ती ठरविता येते. त्याकरिता प्रयोगशाळेत जिवंत प्राण्यांवर तसेच काचपात्रातील ऊतकावर प्रयोग करावे लागतात. पूतिरोधकांची त्वचेवरील क्रियाशीलता अजमावण्याकरिता ज्या परिस्थितीत ती वापरावयाची असतात त्याच परिस्थितीत प्रयोगशाळेत वापरून बघतात. ऊतक विषाक्तता (ऊतकावरील विषारी दुष्परिणाम) अजमावण्याकरिता पूतिरोधकांचा कोंबडीच्या पिलाच्या हृदयाच्या तुकड्यावरील ऊतकावर प्रयोग करून बघतात. अशा परीक्षेत फिनॉलाची (कार्‌बॉलिक अम्लाची) ऊतक विषाक्तता आयोडिनापेक्षा दुप्पट असल्याचे तसेच आयोडिन अत्यल्प प्रमाणात हानिकारक असल्याचे आढळले आहे.

नव्या पूतिरोधकांची क्रियाशीलता ठरविण्यासाठी एस्‌. रिडेल आणि जे. एफ्‌. ए. वॉकर या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या पद्धतीचा अवलंब करतात. प्रमाणित सूक्ष्मजंतू १ : ९० या प्रमाणाच्या फिनॉल विद्रावात १० मिनिटे ठेवून ते सर्व नाश पावतात किंवा नाही हे बघतात. अशीच क्रिया नव्या पूतिरोधकाच्या ठराविक विद्रावात करून बघतात व दोहोंची तुलना करतात. त्यावरून त्या पूतिरोधकाचा ‘रिडेल-वॉकर गुणांक’ किंवा ‘फिनॉल गुणांक’ ठरवितात. बहुसंख्य आधुनिक पूतिरोधकांचा हा गुणांक ५०० ते १,००० आढळला आहे. म्हणजेच त्यांची क्रियाशीलता फिनॉलपेक्षा ५०० ते १,००० पटींनी अधिक आहे. [→ आमापन, जैव].


खालील कोष्टकात काही पूतिरोधकांची त्वचेवरील सूक्ष्मजंतूंच्या संख्येचे लघुकरण करण्याची ( संख्या कमी करण्याची) क्षमता दर्शविली आहे.

विविध पूतिरोधके व त्यांची सूक्ष्मजंतू लघुकरणक्षमता 

पूतिरोधक

त्वचेवर लावण्याचा काळ

सूक्ष्मजंतू लघुकरणक्षमता

७ % टिंक्चर आयोडीन

५ % जलीय आयोडीन

२ % टिंक्चर आयोडीन

१ % टिंक्चर आयोडीन

७० % अल्कोहॉल

०.१% टिंक्चर झेफिरान

२० सेकंद

२ मिनिटे

२ मिनिटे

,,

,,

,,

१००%

९९.५%

९७.५%

९४.५%

८८%

८५%

विविध पूतिरोधके व त्यांची सूक्ष्मजंतू लघुकरणक्षमता (पुढे चालू) 

पूतिरोधके

त्वचेवर लावण्याचा काळ

सूक्ष्मजंतू लघुकरणक्षमता

५०%अल्कोहॉल-१०%

ॲसिटोन 

०.५% टिंक्चर मेटाफेन

०.१%टिंक्चर मरक्रेसीन

२ मिनिटे

,,

,,

७०%

६८%

६०%

वर्गीकरण : पूतिरोधकांचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारांनी करता येते. त्यांपैकी एक प्रकार येथे दिला आहे. पूतिरोधकांचे दोन प्रमुख वर्ग म्हणजे : (१) भौतिक आणि (२) रासायनिक.

भौतिक पूतिरोधके : (अ) निरनिराळ्या प्रकारची उष्णता, उदा., शुष्क आणि आर्द्र. शुष्क प्रकारात प्रत्यक्ष ज्योतीत धरणे, भस्मीकरण व गरम पेटीतील उष्ण हवा यांचा समावेश होतो. आर्द्र प्रकारात ⇨पाश्चरीकरण, पाण्यात उकळणे आणि वाफ यांचा समावेश होतो. (आ) निरनिराळ्या प्रकारच्या निस्यंदकांचा (गाळण्यांचा) उपयोग करून मोठे कण व सूक्ष्मजंतुविरहित विद्राव मिळविणे. आधुनिक काळातील पटल निस्यंदक (सेल्युलोज एस्टराच्या पातळ थरांपासून तयार केलेले व एकसारखी सूक्ष्म छिद्रे असलेले निस्यंदक) उत्तम व कार्यक्षम ठरले आहेत. (इ) प्रारण उपचार – यामध्ये अवरक्त आणि जंबुपार किरण (वर्णपटातील अनुक्रमे तांबड्या रंगाच्या अलीकडील व जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य किरण), कोबाल्टापासून मिळणारे गॅमा किरण [→ किरणोत्सर्ग] यांचा समावेश होतो.

रासायनिक पूतिरोधके : यांचे पुढील  उपवर्ग करता येतात : (अ) जीवद्रव्यनाशक विषे, (आ) ऑक्सिडीकारके [→ ऑक्सिडीभवन], (इ) पृष्ठक्रियाकारके, (ई) पूतिरोधक रंजके, (उ) इतर पूतिरोधके.

(अ)  जीवद्रव्यनाशक विषे : काही रासायनिक पदार्थ कोशिकांच्या जीवद्रव्यावर विषारी परिणाम करतात. काहींचा विषारी परिणाम विशिष्ट सूक्ष्मजंतूंच्याच जीवद्रव्यावर होतो. उदा., हिवतापावरील (मलेरियावरील) औषधे [→ हिवताप] हिवतापास कारणीभूत असणाऱ्या परजीवींच्या (दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या सजीवांच्या) जीवद्रव्यावर विषारी परिणाम करतात. काही पूतिरोधके सूक्ष्मजंतूंच्या जीवद्रव्यावर तसेच पोषकाच्या (परजीवी ज्यावर उपजीविका करतो त्याच्या) कोशिकांतील जीवद्रव्यावरही विषारी परिणाम करतात. बहुसंख्य पूतिरोधके असा दुहेरी परिणाम करीत असल्यामुळे ती फार काळजीपूर्वक वापरावी लागतात. पारा, चांदी, आयोडीन, क्लोरीन, फिनॉल, क्रेसॉल यांपासून बनविलेल्या पूतिरोधकांचा समावेश या उपवर्गात करतात.

(आ) ऑक्सिडीकारके : जे रासायनिक पदार्थ ऊतकांच्या सान्निध्यात ऑक्सिजन उत्पन्न करतात त्यांचा समावेश यात होतो. हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम परबोरेट व पोटॅशियम आणि झिंक परमँगॅनेट या उपवर्गात मोडतात.

(इ) पृष्ठक्रियाकारके : विद्रावाचा पृष्ठताण कमी करण्याचा गुणधर्म असलेल्या पदार्थांचा यात समावेश होतो. या पदार्थांत प्रक्षालकांचाही समावेश होतो. साबण, सोडियम लॉरिल सल्फेट, सोडियम सेस्टोस्टिअरिल सल्फेट, बेंझाल्कोनियम क्लोराइड, सेट्रिमाइट (सीटॅव्हलॉन), सोडियम एन-डोडेसिल ॲलॅनेट वगैरेंचा या उपवर्गात समावेश होतो. [→ पृष्ठक्रियाकारके].

(ई) पूतिरोधक रंजके : प्राचीन काळापासून रंजकांचा अन्नपदार्थ, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांतून उपयोग केला जात आहे. नैसर्गिक रंजकांऐवजी आधुनिक काळात अधिक स्थायी असणाऱ्या संश्लेषित

रंजकांचा पूतिरोधके म्हणून ⇨ रासायनी चिकित्सेतील औषधे आणि केवळ रंजके म्हणून उपयोग केला जातो. महत्वाच्या पूतिरोधक रंजकांमध्ये क्रिस्टल व्हायोलेट (मेडिसिनल जेन्‌शियन व्हायोलेट), ब्रिलियंट ग्रीन, मिथिलीन ब्ल्यू, ॲक्रिफ्लाविन आणि प्रोफ्लाविन यांचा समावेश होतो.

(उ) इतर पूतिरोधके : यांमध्ये पुढील पदार्थांचा समावेश होतो. (१) अम्ले : बोरिक अम्ल, क्रोमिक अम्ल, बेंझोइक अम्ल, सॅलिसिलिक अम्ल, मँडेलिक अम्ल आणि नॅलिडिक्सिक अम्ल. (२) क्षारीय पदार्थ : सोडियम व पोटॅशियम हायड्रॉक्साइडे. (३) अल्कोहॉले : एथॅनॉल आणि आयसोप्रोपिल अल्कोहॉल [→ अल्कोहॉल]. (४) आल्डिहाइडे : फॉर्माल्डिहाइड, मिथेनामीन आणि ग्लुटेराल्डिहाइड [→ आल्डिहाइडे]. (५) वायू : एथिलीन ऑक्साइड.

संदर्भ : 1. Krantz, J. C. Carr, C. J. Pharmacological Principles of Medical Practice, Calcutta, 1965.

2. Satoskar, R. S. Bhandarkar, S. D. Pharmacology and Pharmacotherapeutics, Bombay, 1978.

भालेराव, य. त्र्यं. मिठारी, भू . चिं.