कौले : ऊन व पाऊस यांच्या त्रासापासून घराचे रक्षण करण्यासाठी छपरावर बसविण्याच्या आच्छादनाचे पन्हळी घटक. कौले ही दगडाची, काचेची, धातूची किंवा मातीची बनवितात. उत्तम प्रकारची कौले, उत्तम विटा तयार करण्यास वापरीत असलेल्या पिवळसर मातीची तयार करतात. परंतु मध्यम आणि कनिष्ठ प्रकारची कौले कोणत्याही सामान्य चिकणमातीपासून बनविता येतात. सामान्यतः कौलांना झिलई करीत नाहीत.  

इतिहास : हेलेनिक संस्कृतीच्या (इ. स. पू. तिसऱ्‍या ते पहिल्या शतकाच्या) आधी भूमध्य समुद्राच्या काठच्या प्रदेशात कौलांचा वापर होता याबद्दल पुरावा मिळत नाही. ग्रीक वास्तुशिल्पाच्या इतिहास काळात त्यांच्या देवळांच्या छपरांवरील कौले कायम स्वरूपाची राहिली. कौले घालण्याची ग्रीक पद्धत म्हणजे उभट कडा असलेली सपाट कौले प्रथम छपरावर घालीत व त्यावर तसलीच कौले पालथी घालीत. काही ग्रीक देवळांत संगमरवरी कौले वापरली होती. बासाई येथील देवळावर (इ. स. पू. पाचवे शतक) अशी कौले बसविली होती. रोमन काळात स्पॅनिश पद्धतीची व सपाट कौले वापरत. ही सर्व कौले विविध रंगांची, मातीची व भाजलेली होती. रोमन कालीन स्मारकरूपी इमारतीवरील कौले काशाची होती. मध्ययुगीन काळात चकचकीत व रंगीत कौलांचा वापर मध्य व दक्षिण यूरोपात केला जात असे. काहीवेळा अशा कौलांवर मिनाकामही करीत. 

पूर्वेकडील चीन-जपानसारख्या देशांतील कौले पाश्चात्त्य पद्धतीसारखीच पण रचनेच्या दृष्टीने थोडाफार फरक असलेली आढळतात. चिनी कौले ही गोल, कलाकुसरीची आणि चकचकीत आढळतात. सामान्य घरांवरील कौले काळसर असत. जपानी कौले चिनी कौलांसारखीच असत, पण ती सर्वसाधारणपणे रंगीत नसत. त्यांच्यावर कलापूर्ण नक्षीकामही केलेले असे. भारतीय कौलांसंबंधी ऐतिहासिक माहिती फारशी उपलब्ध नाही. 

निर्मिती व प्रकार : निसर्गात सापडणारी कोणत्याही एका प्रकारची माती कौले करण्यासाठी समाधानकारक काम देत नाही. बहुतेक ठिकाणी जवळपासच्या भागात मुबलक प्रमाणात मिळणारी पिवळी माती कुटून, चाळून घेतात व तीमध्ये काही प्रमाणात दुसऱ्या जातीची माती, लीद, राख व बारीक वाळू मिसळून मिश्रण तयार करतात. या मिश्रणात पाणी घालून त्याचा घट्टसा चिखल करतात व तो पक्क्या हौदात भरून पायाने चांगला तुडवतात आणि एकजीव करतात व नंतर काही दिवस तसाच मुरू देतात. मुरलेल्या व साधारण घट्ट झालेल्या ओलसर मातीचे लहान आकाराचे गोळे करून ठेवतात व त्यांपासून निरनिराळ्या पद्धतींनी कच्ची कौले तयार करतात. कच्ची कौले सावलीच्या जागेत चांगली सुकवितात व नंतर भट्टीमध्ये रचून भाजतात म्हणजे ती कौले कठीण होतात आणि त्यांच्यावर चकचकीत लालसर रंग चढतो. मातीच्या कौलांचे अनेक प्रकार पहावयास मिळतात. त्यांतील मुख्य प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. आ. १ (उ) मध्ये संगमरवरी दगडातून घडविलेल्या कौलांचा नमुना दाखविला आहे. 

आ.१. कौलांचे प्रकार : (अ) नळीचे कौल, (आ) चपटे कौल, (इ) स्पॅनिश कौल, (ई) चुन्यामध्ये बसविण्याची जुन्या यूरोपीय पद्धतीची कौले, (उ) संगमरवरी दगडाची कौले, (ऊ) मंगलोरी कौल.

नळीच्या कौलाची घडण आ. १ (अ) मध्ये दाखविली आहे. अशी कौले तयार करण्यासाठी कुंभाराच्या फिरत्या चाकावर ओलसर मातीचा गोळा ठेवून तो पाणी लावून दोन्ही हातांनी हळूहळू दाबत जाऊन त्यापासून निमुळत्या आकाराची उभट नळी तयार करतात. ही नळी चाकावरून कापून बाहेर काढतात. ही नळी बरोबर मधोमध उभी चिरली म्हणजे तीपासून दोन कच्ची कौले मिळतात. ज्या ठिकाणी चांगली माती मिळत नाही तेथे आ. १ (आ) मध्ये दाखविल्याप्रमाणे चपट्या जातीची कौले तयार करतात. अशी कौले तयार करताना ठराविक आकाराचा चिखलाचा गोळा साध्या लाकडी पाटावर थोडी कोरडी राख पसरून त्यावर थापतात आणि पाहिजे त्याप्रमाणे साधा सारख्या जाडीचा तुकडा तयार करतात. नंतर त्या तुकड्याच्या दोन लांबट काठांवरील चिखल वळवून त्यामधून कौलांचे काठ घडवितात व नंतर कौलाच्या पुढच्या भागावर थोडीशी गोलाई देतात म्हणजे चपटे कच्चे कौल तयार होते. आ. १ (इ) आणि (ई) मध्ये दाखविलेली कौले तयार करण्यासाठी लाकडापासून बनविलेले मुद्रासंच वापरतात. त्यामुळे या प्रकारची कौले अगदी एकसारखी व सफाईदार होतात. आ. १ (इ) मध्ये दाखविलेली कौले यूरोपीय देशांत फार प्राचीन काळापासून वापरात आहेत. आ. १ (ई) मध्ये दाखविलेली कौले चीन आणि जपान या देशांतही यूरोपीय देशांप्रमाणेच बऱ्याच वर्षांपासून वापरात आहेत. आ. १ (उ) मध्ये दाखविलेली कौले संगमरवरी दगडापासून घडवून बनविलेली आहेत. ती किंमतीने फार महाग पडतात परंतु ती फार शोभिवंत असल्याने काही श्रीमंत व हौशी माणसे अजूनही तशी कौले वापरतात. आ. १ (ऊ) मध्ये मंगलोरी कौलाची रचना दाखविली आहे. आ. १ (अ) पासून (इ) पर्यंत दाखविलेली कौले हलकी व नाजूक जातीची आहेत. ती छपरावर अंथरलेल्या चटईवर ठेवतात. परंतु पुढे मोठ्या जोराच्या वाऱ्याने किंवा वानरांच्या उपद्रवामुळे सहज विसकटतात व तुटतात. असे होऊ नये म्हणून चांगल्या इमारतीवरच्या कौलांना बांधकामातील चुन्याचा आधार देतात.  


आकृती १ (ऊ) मध्ये दाखविलेले मंगलोरी कौल चांगले जाड आणि बरेच कठीण असते. ते बनविण्यासाठी उत्तम प्रकारचे मातीचे मिश्रण वापरतात व आकार देण्यासाठी फार मोठ्या दाबावर काम करणारा धातूचा मुद्रासंच वापरतात. या प्रकारची कच्ची कौले भाजण्यासाठी खास प्रकारच्या भट्ट्या वापरतात. मंगलोरी कौले इतर प्रकारच्या कौलांपेक्षा पुष्कळच घट्ट व मजबूत असतात आणि त्यांचा आकार अगदी ठराविक असल्याने ती छपरावर उत्तम प्रकारे जुळवून बसविता येतात. अशा कौलांवर वानरे नाचली किंवा एखादा माणूस जपून चालत गेला, तरी कौले तुटत नाहीत किंवा विसकटतही नाहीत. त्यामुळे या प्रकारची कौले आता सर्वमान्य होत आहेत आणि त्यांचा वापर झपाट्याने वाढत आहे. मंगलोरी कौलांचे आकारमानही आता जवळ जवळ अगदी ठरल्यासारखे झालेले आहे आणि तेच आकारमान मानक समजण्यात येते. मानक मंगलोरी कौलाचे आकारमान ३१८ मिमी. X २१० मिमी. असते व त्याची जाडी १ सेंमी. असते. ४०० मंगलोरी कौलांचे वजन जवळजवळ एक टन होते आणि १० चौ. मी. छपराचे क्षेत्र झाकण्यासाठी १६० कौले वापरावी लागतात. ही कौले छपरावर नीट जुळवून बसविण्यासाठी सु. ३२० मिमी. अंतरावर चौकोनी छेदाच्या लाकडी आधारपट्ट्या बसवाव्या लागतात. 

अलाहाबादी कौले चपटी असून त्यांवरील पालथी कौले अर्धगोलाकार असतात. कधीकधी ती अर्धषट्‍कोनी असतात. 

मातीच्या कौलामधून प्रकाश आरपार जात नाही.ज्या घरात छपरामधून थोडा प्रकाश घ्यावा लागतो, तेथे मंगलोरी कौलाच्या आकाराची काचेची कौले बसवितात. काचेचे कौल तयार करण्यासाठी ठराविक आकारमानाचा गरम काचेचा गोळा धातूच्या मुद्रेमध्ये मोठ्या यंत्राने दाबतात. मुद्रेतून काढून घेतलेल्या काचेच्या कौलावर तापानुशीतन (तापवून हळूहळू थंड करण्याची) प्रक्रिया करतात, परंतु ते कौल पुन्हा भाजण्याची जरूर नसते. 

छपराच्या पाखावर साधी कौले बसविल्यानंतर पाखांचा जोड म्हणजे मेंढ्याची फट स्वतंत्र प्रकारच्या कौलांनी झाकावी लागते. या कामाकरिता वापरीत असलेल्या मातीच्या पन्हळी कौलांचा एक प्रकार आ. २ मध्ये दाखविला आहे.  

काही मंगलोरी जातीची कौले वायुवीजनास (हवा खेळती ठेवण्यास) मदत करण्यासाठी वापरतात. त्यांचा एकंदर आकार साध्या मंगलोरी कौलाप्रमाणेच असतो (आ. ३). त्यांच्या मधल्या भागात एक तिरप्या  टोपीसारखा वर आलेला पोकळ भाग असतो. त्यामधून वारा खेळू शकतो, परंतु पावसाचे पाणी आत जाऊ शकत नाही. या प्रकारची एक-दोन कौले कौलांच्या प्रत्येक रांगेत बसविली म्हणजे खालच्या घरातील हवा नैसर्गिक रीतीने खेळण्यास चांगली मदत होते.  

विशेष महत्त्वाच्या इमारतीवर शोभा आणण्यासाठी मेंढ्यांच्या कोपऱ्‍यांवर चित्रविचित्र आकृत्यांची कौले बसविण्याची पूर्वी पद्धत होती. अशी विशेष प्रकारची कौले बनविण्यासाठी चित्रे तयार करणारे कुंभार असत. 

मोठ्या प्रमाणावर कौले तयार करण्यासाठी प्रथम मातीचे पाण्यातील मिश्रण निरनिराळ्या प्रकारच्या चक्क्यांमध्ये चांगले मळून तयार करतात. चक्कीमधून बाहेर पडणारे मिश्रण लांब, अखंड फितीसारखे असते व त्याचे यांत्रिक रीत्या वा हातांनी प्रमाणभूत लांबीइतके तुकडे तयार करतात. या तुकड्यांपैकी काही तुकड्यांपासून हातांनी गुंतागुंतीच्या अभिकल्पाची (डिझाइनची) कौले तयार करतात. तथापि बहुतेक तुकडे हातदाबयंत्राने वा फिरत्या स्वयंचलित दाबयंत्राने दाबून योग्य आकाराची कौले तयार करतात.  

आ.२. छपराच्या मेंढ्यावर बसविण्याचे कौल

कौले वाळविणे हा त्यांच्या निर्मितीतील महत्त्वाचा टप्पा आहे. कारण ती जास्त वाळविल्यास त्यांना भेगा पडतात व त्यांचा आकार बिघडून जातो आणि ती कमी वाळविल्यास त्यांची गुणवत्ता कमी होते. भेगा पडून व आकार बिघडून अनेक कौले वाया जातात. काही कारखान्यांत कौलांना आकार देण्यापूर्वी मातीच्या मिश्रणात थोडी वाळू टाकतात. रूडकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्सिट्यूट या संस्थेने मद्रासजवळील एका कारखान्यात चाचण्या घेऊन असे दाखविले आहे की, मातीच्या मिश्रणात थोडे अमोनियम क्लोराइड

आ. ३. वायुवीजनक्षम कौल

(नवसागर) मिसळल्यास कौलांचे आकार बिघडल्यामुळे होणारे नुकसान १५% नी कमी करता येते. बऱ्याच कारखान्यांत मोठ्या छपरी पडव्यांत लाकडी मांडण्यांवर कौले वाळविण्यात येतात. आधुनिक कारखान्यांत कौले वाळविण्यासाठी वाफेचा उपयोग करणाऱ्या यांत्रिक शुष्कक उपकरणांचा किंवा भट्ट्यांमधून बाहेर पडणाऱ्या निरुपयोगी वायूंचा उपयोग करतात. वाळविलेली कौले खंडित किंवा हाउफमान भट्टीसारख्या अखंडित भट्टीत सु. ९०० सें. पेक्षा अधिक तापमानात भाजण्यात येतात. कौले तयार करणाऱ्या आधुनिक कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री भारतात अनेक ठिकाणी तयार करण्यात येते. 


बसविण्याच्या पद्धती : पूर्वी चांगल्या इमारतीवर कौले बसविण्यापूर्वी छपराचा भाग चांगला सपाट करीत. यासाठी जलरोधी कापड किंवा चुन्याचा थर देत व त्यावर कौले दाबून बसवीत. फार उतार असलेल्या छपरावरील कौले घसरू नयेत म्हणून आधारासाठी तांब्याचे लांब खिळे छपराच्या खालील लाकडात ठोकीत असत. हल्ली कौले बसविताना प्रथम वाशांवर आडवे चिवे किंवा लाकडी पट्ट्या मारतात. अशा पट्ट्यांवरून कौले खाली पडू नयेत म्हणून दोन पट्ट्यांमधील अंतर कौलाच्या लांबीपेक्षा कमी असते किंवा तूरकाडी, भाताचा पेंढा इ. अंथरतात. प्रथम त्यावर कौले अंथरतात आणि मग आ. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे त्यावर कौले पालथी घालतात. मंगलोरी कौले पट्ट्यांच्या आधारांनी एकमेकांना चिकटून बसवितात. कौलांचे आकारमान, निर्मिती व कौले बसविण्याच्या पद्धती यांसंबंधी भारतीय मानक संस्थेने विविध मानके प्रसिद्ध केली आहेत. उदा., मंगलोरी कौले ६५४ – १९६२, २८५८ – १९६४, ४११२ – १९६७ इत्यादी. 

भारतीय उद्योग : अनेक शतके भारतात नळीची कौलेच प्रचारात होती. या कौलांची निर्मिती कुटिरोद्योग म्हणूनच केली जात असे व ही निर्मिती स्थानिक मागणीवर अवलंबून असे. कौलांचा संघटित स्वरूपातील पहिला कारखाना १८६५ मध्ये मंगलोर येथे जर्मन धर्मप्रसारकांनी काढला. या धर्मप्रसारकांनी यूरोपात त्यावेळी लोकप्रिय असलेल्या एका फ्रेंच अभिकल्पात स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ते बदल करून एक नवीन प्रकारचे कौल बनविले व या कौलालाच पुढे ‘मंगलोरी कौल’ हे लोकप्रिय नाव मिळाले. लौकरच मंगलोर आणि त्याच्या आसपास या प्रकारची कौले तयार करणारे अनेक कारखाने निघाले. या कौलांच्या वाढत्या मागणीमुळे कालिकत, त्रिचूर, अलवाये, क्विलॉन व पालघाट या केरळातील जिल्ह्यांत तसेच तमिळनाडू, महाराष्ट्र (रत्नागिरी जिल्हा) व गुजरात या राज्यांत अनेक ठिकाणी कारखाने निघाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारताच्या पूर्व भागात राणीगंज आणि अलाहाबाद प्रकारच्या कौलांची निर्मिती थोड्या प्रमाणात सुरू झाली.

आ.४. कौले बसविण्याच्या पद्धती : (अ) देसी कौलांकरिता वापरावयाची पद्धती, (आ) मंगलोरी कौलांकरिता वापरावयाची पद्धती.

या उद्योगाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या तीन दशकांत झपाट्याने वाढ झाली, परंतु पहिल्या महायुद्धकाळात व त्यानंतरच्या काळात या उद्योगाला उतरती कळा लागली. दुसऱ्या महायुद्धामध्ये व त्यानंतरच्या काळात या उद्योगाला पुन्हा ऊर्जितावस्था आली, परंतु १९५६ नंतर मागणीमध्ये हळूहळू घट झाल्यामुळे उत्पादन कमी होऊ लागले. निर्मितीचा वाढता खर्च, ॲस्बेस्टस पत्र्यांसारख्या इतर छपरी सामानांची स्पर्धा, लाकडी आधारपट्ट्या बसविण्याचा वाढता खर्च इ. कारणांमुळे  कौलांची मागणी बरीच खाली आलेली आहे. १९६० साली ५ मोठे कारखाने व ३०० लहान कारखाने कौले तयार करण्याच्या कामी गुंतले होते, तर १९६५ साली त्यांची संख्या अनुक्रमे ७ व ३४४ होती. १९७३ मध्ये लहान कारखान्यांची संख्या ३२२ होती.

पहा : छप्पर.

संदर्भ : 1. C. I. S. R. The Wealth of India, Industrial Products, Vol. VIII, New Delhi, 1973.

     2. Govt. of Maharashtra, P. W. D. Handbook, Vol. I, Bombay, 1960.

ओक, वा. रा.