चष्मा : दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे एक साधन.

वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात. चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो. आजच्या चष्म्याच्या आकर्षक, उपयुक्त आणि टिकाऊ स्वरूपात व त्याच्या पूर्वीच्या स्वरूपात महदंतर घडून आलेले आहे.

इतिहास : काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ.स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत असावेत. वयस्कर लोक अशा भिंगाचा लाभ घेतात असा पहिला उल्लेख माईसनर यांनी केलेला सापडतो. १२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन (१२१४–९४) यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो. 

आ. १. चष्म्यांचे विविध प्रकार : (१) इ. स. १३५२, इटालियन, शिंगापासून तयार केलेला व मध्ये रिव्हेटने जोडलेला (२) इ.स. १५८३, जर्मन, शिंग व चामडे यांपासून तयार केलेला (३) सतरावे शतक, जर्मन, भिंगे चौकटीत घट्ट रहावीत म्हणून दोर्‍याने घट्ट बांधलेली जड पितळी तारेची चौकट (४) इ.स. १६७५, इंग्लिश, तुकडे जोडून तयार केलेली व थोडीशी वाकविता येणारी चौकट (५) अठराव्या शतकाच्या शेवटच्या चतुर्थातील, स्वीडिश, पोलादी चौकट (६) अठरावे शतक, चिनी, पांढऱ्या धातूची हलकी चौकट (७) इ. स. सु. १८३०, मूठ असलेला आणि कासवाचे कवच व सोने यांचा तयार केलेला (८) एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातील, अमेरिकन (९) इ.स. १८००, इंग्लिश, बिजागरी सांधे, जादा प्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी हिरव्या रेशमी नागमोडी पडद्याची योजना (१०) इ.स. १८१९-३८, फ्रेंच, कासवाचे कवच व चांदी यापासून बनविलेला (११) एकोणिसावे शतक, अमेरिकन, सोन्याच्या चौकटीत व स्प्रिंगच्या साहाय्याने नाकावर घट्ट बसणारा (पिन्स-नेझ) (१२) इ.स. १९१४, अमेरिकन (१३) इ.स. १९३१, इंग्लिश, घडी करता येणारा (१४) इ.स. १९३३, अमेरिकन, भिंगाभोवती चौकट नसलेला व इतर भाग सोन्याचे बनविलेला (१५) इ.स. १९५४, अमेरिकन, प्लॅस्टिकची चौकट असलेला (१६, १७, १८, १९) उन्हाळी चष्यांचे (गॉगल्सचे) काही प्रकार.


फार पूर्वीपासून काचेची भिंगे वापरात असावीत. प्रथम बहिर्वक्र भिंगे तयार करण्यात आल्यामुळे वयस्कर लोकांना त्यांचा लाभ मिळाला. पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला.

काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली. चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७–३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणीसारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग (मोनोकोल) वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा (पिन्स-नेझ) १८४० पासून प्रचारात आला. चष्म्यांचे विविध प्रकार आ. १ मध्ये दिलेले आहेत.

आ. २. स्पर्श-भिंगे : (अ) निरनिराळ्या आकारांची स्पर्श-भिंगे, (आ) स्पर्श-भिंग बसविण्याची पद्धत.

प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श-भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श-भिंगाचा संरक्षक व चष्म्यासारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले. डोळ्यावर चष्मा न वापरता या भिंगांनी चष्म्याप्रमाणे काम होत असले तरी अद्याप चष्म्याइतका त्यांचा प्रसार झाला नाही. याचे कारण ही भिंगे वापरण्यात अनेक अडचणी येतात हे असावे. काही प्रकारची भिंगे मिठाच्या पाण्याने भरून घेऊन डोळ्यावर बसवावी लागतात. तीन-चार तासांनी हे पाणी कमी झाले म्हणजे ती काढून पुन्हा मिठाचे पाणी भरून बसवावी लागतात. काही भिंगे केवळ बुबुळावर बसतात. डोळ्यात अश्रू आले असताना, पोहताना, खेळताना किंवा वेगवान वाहनावरून जाताना अशी भिंगे सरकतात त्यामुळे ती सतत वापरणे कठीण जाते.

भारतात स्पर्श-भिंगे तयार करणारे तीन चार कारखाने असले, तरी नेहमीच्या चष्म्यापेक्षा ही भिंगे फारच महाग पडतात. स्पर्श-भिंगांचे निरनिराळे आकार व ते बसविण्याची पद्धत आ. २ मध्ये दाखविली आहेत.

आ. ३. दीर्घदृष्टिदोष : (अ) किरण नेत्रपटलाच्या मागे केंद्रभूत होतात, (आ) बहिर्गोल भिंगामुळे किरण नेत्रपटलावर केंद्रीभूत होतात.

दृष्टिदोष : विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो (यामुळेच चष्म्याला चाळिशी म्हणतात). याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. अमूक दृष्टिदोष अमूक वयातच उत्पन्न होतो, असे म्हणता येत नाही [→ डोळा नेत्रवैद्यक]. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.

गोलीय भिंगे : नेत्र-अनुकूलन (निरनिराळ्या अंतरांवरील वस्तू स्पष्टपणे दिसण्यासाठी डोळ्यातील भिंगाची बहिर्वक्रता कमी जास्त होणे व भिंगाद्वारे किरणांचे एकत्रीकरण होणे) सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे (धन शक्तीची, १ मी. मध्ये मोजलेल्या केंद्रांतराच्या व्यस्तांकाला भिंगाची शक्ती म्हणतात) वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात.

दीर्घदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी कमी असल्यामुळे प्रतिमा नेत्रपटलाच्या मागे पडते. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात. एरवी त्या अस्पष्ट दिसतात. जवळच्या वस्तूवरून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे अपसरण होऊन ते केंद्राभिसारी व्हावयासाठी अनुकूलन जास्त लागते. धन शक्तीचे भिंग हा दोष दूर करते (आ. ३).

लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात (आ. ४).

आ. ४. लघुदृष्टिदोष : (अ) किरण नेत्रपटलाच्या पुढे केंद्रीभूत होतात, (आ) अंतर्गोल भिंगामुळे किरण नेत्रपटलावर केंद्रीभूत होतात.

चित्याकृती भिंगे : दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. डोळ्याच्या उदग्र (उभ्या) आणि क्षैतिज (आडव्या) याम्योत्तरांच्या वक्रता भिन्न असल्यामुळे प्रणमन शक्ती (प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना त्याच्या दिशेत होणारा बदल) निरनिराळ्या याम्योत्तरांत निरनिराळी आढळते. महत्तम आणि लघुतम प्रणमन शक्ती एकमेकांस काटकोनात असलेल्या याम्योत्तरांत आढळते. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते. या भिंगाची शक्ती एकाच दिशेला असते. चष्म्याच्या चौकटीत चित्याकृती भिंग योग्य त्या अक्षावरच बसविलेले असेल, तरच त्याचा उपयोग होतो.


लोलक-बहुकोनी भिंगे : कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.

द्विकेंद्री भिंगे : लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १७९४ साली बेंजामिन फ्रॅंक्लिन यांनी प्रथम द्विकेंद्री भिंगे वापरली व त्याचे वर्णनही केले. त्यांनी दोन अर्धवर्तुळाकृती भिन्न भिन्न भिंगे प्रत्येक डोळ्यापुढे (जरुरीप्रमाणे) ठेवलेली होती. त्यानंतर १०० वर्षांनी दोन भिंगे एकत्र चिकटवून वापरावयास प्रारंभ झाला.

आ. ५. द्विकेंद्री व त्रिकेंद्री भिंगांचे चष्मे

१९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. मोठ्या भिंगांच्या एका भागात जो दुसऱ्या लहान भिंगाचा मिलाफ करतात त्याचा प्रणमनांक जास्त असतो. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते. या लहान भागाचा आकार २४ मिमी.पर्यंत ठेवता येतो.

अखंड काचेत दोन विभाग पाडून जरूरीप्रमाणे हिशेब करून त्याचे घासकाम करून द्विकेंद्री भिंगे तयार करतात (आ. ५).

त्रिकेंद्री भिंगे : यात लांबच, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे (भिंगाच्या प्रमुख अक्षावरील ज्या बिंदूतून जाणाऱ्या किरणाच्या आपाती व बाहेर पडण्याच्या दिशा समांतर असतात अशा बिंदूला प्रकाशीय केंद्र म्हणतात) मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.

साहित्य आणि आकार : पूर्वी भिंगासाठी क्वार्ट्‌झचा उपयोग करीत असत, तथापि आता प्रकाशीय काचांची भिंगे तयार करतात. या काचेतील घटक व त्यांचे प्रमाण जरूरीप्रमाणे निरनिराळे असते आणि तीत रेषा किंवा बुडबुडे राहणार नाहीत याची अतिशय खबरदारी घेतात. काचेप्रमाणे प्लॅस्टिकची भिंगेही वापरतात. त्यांचे वजन काचेच्या निम्मे असते, परंतु त्या भिंगांवर सहज ओरखाडे उठतात. चष्म्याची भिंगे सहज फुटू नयेत म्हणून दोन काचांच्या मध्ये प्लॅस्टिकचे पातळ पटल बसवून नव्या पद्धतीची भिंगे तयार करतात. भिंगांच्या दोन्ही बाजूंवर सारखीच वक्रता येईल असे घासकाम करतात किंवा एक बाजू बहिर्वक्र आणि दुसरी अंतर्वक्र असलेलीही भिंगे तयार करतात.

चष्म्याच्या चौकटी पूर्वी भिंगांच्या, कासवाच्या कवचाच्या किंवा धातूच्या करीत. आता मुख्यतः प्लॅस्टिकच्या बनवितात. त्यांना आकर्षक रंग आणि आकार देतात. चौकटीची ताकद वाढावी म्हणून काही प्रमाणात तिच्या आतल्या भागात धातूच्या तारा वा पट्ट्या वापरतात.

डोळ्यांपासून भिंगांचे अंतर, दोन डोळ्यांमधील अंतर, प्रकाशीय केंद्रांची उंची, पुढच्या भागाचा कोन, द्विकेंद्रांची उंची, द्विकेंद्री वा त्रिकेंद्री भिंगांतील भागांचे स्थान इ. गोष्टींचा विचार करूनच चौकट निवडणे उपयुक्त ठरते.

विशेष प्रकार : उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारणापासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) प्रारणापासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, त्याचप्रमाणे चकाकीपासून संरक्षण करण्यासाठी, उष्ण कटिबंधामध्ये, बर्फमय प्रदेशात, समुद्रकिनाऱ्यावर, कारखान्यातील क्रियांसाठी किंवा विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. काही प्रकारांत कानशिलांच्या बाजूनेही आडोसा असतो. काळ्या भिंगांचे, एकमार्गी (एका बाजूने आरशासारखा परावर्तक पृष्ठभाग असलेल्या व ज्यांतून काही प्रमाणात प्रकाश पलीकडे जाऊ शकतो अशा काचांचे) चष्मे सौम्य उन्हात किंवा घरात वापरल्याने डोळ्यांना इजा व्हावयाचा संभव असतो. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.

दूरदर्शकाचे (दुर्बिणीचे) गुणधर्म असलेले चष्मे लघुदृष्टीसाठी किंवा दृष्टीशी संबंधित असलेल्या काही भागांना रोग झाला असेल तेव्हा वापरतात. या चष्म्यात दोन किंवा अधिक भिंगे वापरून लहान आकाराचा गॅलिलीयन दूरदर्शकच तयार केलेला असतो.

प्रायोगिक अवस्थेतील चष्मे :(१) अंधांसाठी चष्मा :विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगांऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत्‌ (प्रकाशीय ऊर्जेचे विद्युत्‌प्रवाहात रूपांतर करणाऱ्या) घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदूपर्यंत पोहोचते. तीन प्रकाशविद्युत्‌ घटकांमुळे चष्मा अवजड होत असल्याने पारदर्शक रंगीत वर्तुळखंडात एक फिरती चकती बसवून तिच्या मागे एकच प्रकाशविद्युत्‌ घटक बसविण्याची योजना करण्यात आलेली आहे. त्यातून मिळणाऱ्या मिश्र संकेतांचे इलेक्ट्रॉनीय पद्धतीने पृथक्करण झाल्यानंतर रंगाचे ज्ञान होते. रंग संकेतांची योजना करून रस्ते व पादचारी मार्ग आखले, तर अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.

(२) अंतरानुसार भिंगाचे केंद्रांतर बदलणारा चष्मा :द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटनमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.

ही भिंगे पोकळ असून तीन पदर एकमेकांना जोडून तयार केलेली असतात. सर्वांत वरचा पदर कमी वक्रपृष्ठभागी असतो. मधला पदर पॉलिव्हिनिल ब्युटिराल नावाच्या प्लॅस्टिकचा असतो. मागचा पदर अतिशय पातळ असतो. भिंगातील पदरांच्या मधल्या पोकळीत पारदर्शक द्रव पदार्थ सोडला म्हणजे भिंगाची वक्रता कमी जास्त करता येते. चष्म्याच्या काडीतून असा द्रव सोडण्याची व्यवस्था या चष्म्यात केलेली आहे, याकरिता चष्म्याच्या चौकटीत एक नळी आणि दट्ट्या बसविलेली असतात. भिंगातील लवचिक पदराच्या बदलत्या वक्रतेमुळेच कोणत्याही अंतरावरील दृश्य स्पष्ट दिसू शकते.


भारतीय उद्योग : भारतात १९६६ पर्यंत चष्म्याच्या सर्व प्रकारच्या मजबूत, टिकाऊ आणि दिखाऊ चौकटी आयात कराव्या लागत होत्या. पण १९६६ पासून भारतात या विविध प्रकारच्या चौकटी तयार होऊ लागल्या असून परदेशातही निर्यात होऊ लागल्या आहेत. १९७०-७१ मधील या चौकटींच्या निर्यातीचे उत्पन्न ३३·५० लाख रु. असून ते १९६६–७० मधील उत्पन्नापेक्षा तिपटीने आहे. १९७१-७२ मधील तेच उत्पन्न ४२ लाख रुपयांच्या घरात गेले. शंभराहून अधिक लघुउद्योग केंद्रांत चष्म्याच्या प्लॅस्टिकच्या चौकटी तयार होत आहेत. काही मोठ्या कारखान्यांत विविध प्रकारच्या ठेवणीच्या, आकर्षक, परदेशातील चोखंदळ लोकांनाही पसंत पडतील अशा चष्म्याच्या चौकटी दररोज १२० डझन तयार करण्यात येत आहेत. ह्या चौकटी तयार करण्यासाठी लागणारे प्रमुख कच्चे द्रव्य म्हणजे प्लॅस्टिक–विशेषतः सेल्युलोज नायट्रेटांचे व सेल्युलोज ॲसिटेटाचे पत्रे–होय. चौकटी पूर्ण धातूच्या किंवा प्लॅस्टिकच्या निरनिराळ्या रंगातील विविध छटांत तयार करण्यात येतात. चौकट पूर्ण धातूची करण्यासाठी किंवा प्लॅस्टिकमध्ये घालण्यासाठी रोल्डगोल्ड व ॲल्युमिनियम यांचा उपयोग करतात. भारतातील काही प्रगत आणि आघाडीवर असलेल्या कारखान्यांत चौकटी तयार करण्याची यंत्रे बनविण्यात आली आहेत. त्यांच्या व काही परदेशी यंत्रांच्या साहाय्याने चौकटी, त्यांतील लहान बिजागऱ्या, रिव्हेट, पिना, प्रतिबलित तारा व सजावटीचे प्रकार तयार होत आहेत.

परदेशात आधुनिक, लोकप्रिय असलेल्या चौकटीकडे लक्ष ठेवून तशा प्रकारचे उत्पादन करण्याकडे भारतीय कारखानदारांनी यश मिळविले आहे. यामुळे इंग्लंड, पश्चिम जर्मनी, रशिया, स्वित्झर्लंड आणि इतर यूरोपीय देश, तसेच दक्षिण व पूर्व आफ्रिका या देशांत हा माल निर्यात होत आहे.

पहा : डोळा नेत्रवैद्यक भिंग.

संदर्भ : 1. Corson, R. Fashions in Eyeglasses, London, 1967.

           2. Emsley, H. H. Visual Optics, London, 1946.

           3. Emsley, H. H. Swaine, H. H. Opthalmic Lenses, London, 1946. 

गोखले, श्री. पु. टोळे, मा. ग.