रेशीम : वस्त्रनिर्मितीमधील एक महत्वाचा प्राणिज तंतू. (बॉम्बिक्स मोरी) या शास्त्रीय नावाच्या आणि तुतीच्या पानांवर जगणाऱ्या रेशमाच्या किड्याच्या कोशावरणापासून मिळविण्यात येणाऱ्या तंतूला सामान्यपणे रेशीम म्हणतात. या किड्याच्या बाँबिसिडी या कुलातील याच्याशी नातेसंबंध असणाऱ्या काही अन्य किड्यांच्या कोशावरणापासूनही रेशीम मिळते. कोशावस्था ते प्रौढ (पतंग) अवस्था असे रूपांतर होताना हा किडा (सुरवंट) या कोशावरणात बंदिस्त असतो व त्यामुळे त्याचे रक्षण होते. यांच्याशिवाय कोळ्यासारखे संदिपाद (सांधेयुक्त पाय असलेले) प्राणी, काही इतर कीटक, लेसविंग, शेलफिश इ. प्राणीही रेशमासारखे तंतू निर्माण करतात. कोशावरणाशिवाय अंड्याची पेटिका, जाळे किंवा अन्य संरचना तयार करण्यासाठी हे तंतू वापरले जातात. आधाराला धरून वर-खाली हालचाल करण्यासाठी, भक्ष्य पकडण्यासाठी, संरक्षणासाठी अथवा डिंभाभोवती (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील अशा पूर्व-अवस्थेभोवती) संरक्षक कोशावरण बनविण्यासाठी अशी संरचना तंतू कातून तयार केली जाते. मात्र हे तंतू रेशमाच्या किड्यापासून मिळणाऱ्या तंतूच्या दर्जाचे नसतात. दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणात मध्य ठरविण्यात त्यांचा उपयोग होतो. मात्र हे तंतू चिकट, ताठर, ठिसूळ असून ते मिळविण्याची तंत्रे गुंतागुंतीची आहेत. शिवाय ते मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकत नाहीत. यांमुळे त्यांचा वस्त्र विणण्यासाठी उपयोग करता येत नाही. मृदुकाय प्राण्यांपैकी शेलफिश या प्राण्याकडून स्त्रवला जाणारा तंतू रेशमासारखा असतो. त्याला बायसस, सी किंवा पिन्ना रेशीम म्हणतात. रेशीमसदृश अशा धाग्यांमध्ये व नैसर्गिक तंतूंमध्ये खऱ्या रेशमाचा तंतू सर्वांत लांब असतो. तो मऊ, चमकदार, चिवट, आर्द्रताशोषक, लवचिक, सुंदर आणि अविद्राव्य ( न विरघळणारा) असतो. तो मुख्यत्वे फायब्रोइन या प्रथिनाचा बनलेला असतो. डिंभावस्थेतील सुरवंटाच्या दोन ग्रंथींमधील दाट प्रवाही पदार्थ सूक्ष्म छिद्रांमधून बाहेर रेटला जातो व सुतासारखे दोन धागे कातले जातात. अशा तऱ्हेने स्त्रवलेले प्रवाही प्रथिन हवेत उघडे पडल्यावर लगेचच कठीण व घनरूप होते आणि अखंड धागा तयार होत जातो. हा धागा शरीराभोवती गुंडाळला जाऊन कोशावरण तयार होते. बाहेर पडल्या पडल्या धागा बराच पारदर्शक असतो व नंतर तो अपारदर्शक बनतो. रेशमासारखे गुणधर्म असणारे काही कृत्रिम तंतू तयार करण्यात आलेले आहेत. तथापि रेशमाचे महत्त्व टिकून राहिले आहे. 

रेशमाच्या किड्याच्या संवर्धनामध्ये (पालनामध्ये) त्याचे प्रजनन व संगोपन या गोष्टी येतात, तर रेशीम उद्योगात (उत्पादनात) रेशमाच्या संस्करणाविषयीचे सर्व टप्पे येतात. प्रत्यक्ष कोशावरणातून रेशमाचा धागा मिळविण्यापासून ते विणलेल्या रेशमी कापडावरच्या अंतिम संस्करणापर्यंतचे सर्व टप्पे या उद्योगात येतात. 

इतिहास : सुमारे ५,००० वर्षांपासून माणसाला रेशीम माहीत आहे मात्र ही माहिती दंतकथा व परीकथा यांतून मिळते. त्यामुळे रेशमाचा शोध नेमका केव्हा व कोणी लावला हे नक्की सांगता येत नाही. रेशमाच्या किड्यांचे संगोपन व रेशीमनिर्मिती इतिहासपूर्व काळातच सुरू झाल्याचे मानतात. सर्वसाधारणपणे या किड्यांचे संवर्धन प्रथम चीनमध्ये करण्यात आल्याचे मानले जाते. काहींच्या मते याची सुरुवात भारतात झाली असावी. 

एका दंतकथेनुसार इ. स. पू. २६४० च्या सुमारास चिनी सम्राट हुआंग-ती यांनी आपल्या पत्‍नीला म्हणजे सी लिंग शी हिला बागेतील तुतीच्या झाडांचे नुकसान कोण करीत आहे, ते शोधून काढण्यास सांगितले. तेव्हा सम्राज्ञीला पांढरे किडे तुतीची पाने खात असल्याचे आणि स्वतःभोवती चमकदार कोशावरण तयार करीत असल्याचे आढळले. सहजच तिने एका कोशावरण गरम पाण्यात टाकले व ती त्याच्याशी खेळत बसली. तेव्हा त्याच्यापासून कोळीष्टकासारखी नाजूक गुंतवळ वेगळी झाल्याचे तिच्या लक्षात आले. कोशावरणासह ती गुंतवळ तिने बाहेर काढली असता कोशावरणातून नाजूक, बारीक तंतू उलगडला जात असल्याचे तिला दिसून आले. अशा तऱ्हेने रेशमाचा शोध लागला, असे म्हणतात. नंतर तिने तुतीच्या वनात असे हजारो किडे वाढविण्याचे ठरविले. तिने कोशावरणावरील रेशीम सुटे करून उलगडण्याचे तंत्रही शोधून काढले. असे अनेक तंतू एकत्रित करून कापड विणण्यायोग्य जाड धागा गुंडाळण्यासाठी तिने एक रीळही तयार केले. शिवाय रेशमी कापड विणण्याचा पहिला माग तिनेच तयार केल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे. या सर्व गोष्टींत किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही परंतु रेशमाचा वापर प्रथम चीनमध्ये करण्यात आला, असे मानले जाते. शांग घराण्याच्या कारकीर्दीत ( इ. स. पू. १०२७ ते इ. स. १५२३) या उद्योगाची चीनमध्ये चांगलीच भरभराट झाली होती, हे नक्की. सम्राज्ञीचे पाहून राजघरण्यातील व घरंदाज लोक ही कामे करू लागली. रेशमापासून सुंदर व टिकावू वस्त्र विणता येते हे लक्षात आल्यावर त्याचे महत्त्व वाढत गेले आणि केवळ त्यासाठीच किड्यांचे संवर्धन करण्यात येऊ लागले. वस्तुविनिमयासाठी तेव्हा चीनमध्ये रेशमाचा वापर होत असे, तसेच त्याची निर्यातही होत असे. 


रेशीमनिर्मितीच्या या पद्धतीविषयी चीनमध्ये अत्यंत गुप्तता पाळण्यात येई व गुप्ततेचा भंग करणाऱ्याला बदनामीलाच नव्हे, तर मृत्युदंडालाही सामोरे जावे लागे. अशा तऱ्हेने जवळजवळ तीन हजार वर्षे चीनने या बाबतीत गुप्तता पाळली व त्यामुळे या उद्योगात त्याची मक्तेदारी टिकून राहिली. 

भारतातील रेशीम उद्योगाविषयीचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्‌मयातून आढळतात. मात्र हे उल्लेख मुख्यत्वे रेशमाचे कपडे तयार करणे व रेशमी कापड विणणे यांविषयीचे आहेत. शिवाय धार्मिक व इतर महत्वाच्या कार्याच्या वेळी राजघराण्यातील लोक व ब्रह्मवृंद रेशमी कपडे वापरीत असल्याचे उल्लेखही आढळतात. एका दंतकथेनुसार इ. स. पू. १४० च्या सुमारास एका चिनी राजकन्येने तुतीच्या बिया व रेशमाच्या किड्यांची अंडी आपल्या शिरोभूषणाच्या अस्तरात लपवून दक्षिण चीनमधील व भारताच्या सीमेलगतच्या खोतान या गावी आणली होती. येथून भारतात या उद्योगाचा प्रवेश झाला असावा, असे काहींचे मत आहे. तेथून तो प्रथम गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या खोऱ्यात पसरला व तेथून पुढे पश्चिमेकडे (उदा., पर्शिया, अरबस्तान, तुर्कस्तान) पसरत गेला असण्याची शक्यता आहे. तेथून पुढे आठव्या शतकात हा व्यवसाय स्पेन, सिसिली (इटली) आणि आफ्रिकेचा उत्तर किनारा येथे पसरला, असे मानतात. इ. स. ३०० च्या सुमारास जपानी-कोरियन हस्तकांमार्फत ही कला जवळजवळ चोरूनच जपानमध्ये आणली. हे कोरियन चार चिनी मुली घेऊन जपानला आले. या मुलींनी प्रथम राजघराण्यातील  व नंतर सामान्य लोकांना रेशीम निर्मितीची कला शिकविली. अशा तऱ्हेने रेशीम उद्योगाचा जपानमधील पाया घालण्याचे काम केल्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ ओसाका प्रांतातील सेत्तसू येथे एक मंदिर उभारण्यात आले.

 बायबलच्या जुन्या करारात रेशमाचा उल्लेख दोनदा आला आहे. ॲरिस्टॉटल यांच्या Historia animulium या पुस्तकात रेशमाच्या किड्याचे जीवनचक्र, रेशीम उलगडून त्याची कताई करणे वगैरेंविषयीची माहिती दिलेली आहे. थोरले प्लिनी यांनाही रेशमाच्या किड्याचे असेच वर्णन केलेले आढळते. अभिजात वाङ्‌मयातूनही रेशमी कापडाचे उल्लेख आढळतात. मात्र ते तयार करण्याविषयीची त्यातील वर्णन चुकीची आणि काहीशी काल्पनिक आहेत. खरे तर इ. स. च्या सुरुवातीपासून रेशमाची आयात रोमला होत होती. अगदी प्रथम त्याची किंमत सोन्याएवढी होती. रेशमी कपडे मुख्यत्वे स्त्रियाच वापरीत आणि रेशमी कपडे वापरणे हे पुरुष बायकीपणाचे लक्षण समजत. अशा तऱ्हेने पाश्चात्त्य जगात रेशीम वस्त्रे माहीत होऊन शेकडो वर्षे उलटली, तरी रेशीम कसे मिळते हे तेथील लोकांना नेमकेपणे माहीत झाले नव्हते. हा चीनने राखलेल्या गुप्ततेचा परिणाम होता. त्यामुळे रेशमाविषयी वेगवेगळ्या समजुती होत्या. उदाहरणार्थ रेशीम ही झाडावर वाढणारी लोकर आहे. काही वृक्षांपासून वा अंतर्सालीपासून मिळणारा तंतू म्हणजे रेशीम होय. रुईच्या प्रजातीतील काही वनस्पती, सावर व शाल्मली या वनस्पतींपासून मिळणाऱ्या चमकदार तंतूपासून रेशीम तयार केले जाते. काही लोकांना मात्र कोळी वा पतंगासारखे कीटक रेशीम काततात, असे वाटत होते. दरम्यान चीनचा या देशांबरोबरचा रेशमाचा व्यापार भरभराटीला आला होता. पर्शियन व्यापारी रेशीम उंटावर लादून आणीत असत. ते प्रथम दमास्कसला व तेथून रोमन साम्राज्यात नेले जाई. अशा तऱ्हेने रेशमाच्या विणकामाचा व्यवसाय दुसऱ्या शतकात ईजिप्त, सिरिया व पॅलेस्टाइन येथे आणि चवथ्या शतकात पर्शिया येथे भरभराटीला आला होता. रोमन सम्राट स्टिनियन यांना यात आपली मक्तेदारी निर्माण करायची होती म्हणून त्यांनी पर्शिया टाळून कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) मार्गे रेशीम आणण्याचा मार्ग शोधून काढला. नंतर त्यांनी दोघा साधूंमार्फत रेशमाच्या किड्याची अंडी (व तुतीच्या बिया) चोरून आणविल्या. त्या साधूंनी ही अंडी हातातील बांबूच्या पोकळ काट्यांतून लपवून आणली. अशा तऱ्हेने रेशमाचा किडा पाश्चात्त्यांनी प्रथम इ.स. ५५० साली पाहिला. एकोणिसाव्या शतकापर्यंत यूरोपातील रेशमाच्या किड्यांच्या सर्व प्रकारांचे पूर्वज हेच किडे होते. 

नंतरच्या काही शतकांत रेशमाच्या किड्यांचे संवर्धन व कोशावरणापासून रेशीम काढणे या कला पुष्कळांना अवगत झाल्या. तसेच यांविषयीची तंत्रे व प्रक्रिया यांच्यात सुधारणा होत गेल्या. आठव्या व नवव्या शतकांत या कलांचा प्रसार स्पेन, सिसिली, पोर्तुगाल उत्तर आफ्रिका या भागांत झाला. अशा तऱ्हेने मध्ययुगात यूरोपच्या पश्चिम भागात हे दोन्ही व्यवसाय चांगलेच वाढले होते. या काळात बायझंटिन रेशीम जगभर प्रसिद्ध झाले. सेनाधिकाऱ्यांनी मध्य पूर्वेतून रेशमाविषयीची अरबांची कलाकुसर व रंगही यूरोपात आणले. मूर लोकांनी सिसिली व स्पेनचा काही भाग जिंकून घेऊन तेथे रेशमाच्या उद्योगाची घडी नीट बसविली. अकराव्या शतकात नॉर्मन लोकांनी सिसिली जिंकून घेतले व राजे रॉजर पहिले यांनी तेथील रेशमाची प्रत सुधारून त्याचे उत्पादनही वाढविले. अशा प्रकारे बाराव्या शतकात इटली हे या उद्योगाचे केंद्र बनले. याच सुमारास रेशमाच्या किड्यांचे संवर्धन व रेशीम काढणे या फायदेशीर व्यवसायाला फ्लॉरेन्स, जिनीव्हा, मिलान व व्हेनीस येथील अमीरउमरावांनी प्रोत्साहन दिले व राजाश्रयामुळे ही शहरे रेशीम उद्योगाची मोठी केंद्रे बनली. फ्रान्समध्ये १४८० साली रेशमी कापड विणण्यास सुरुवात झाली व १५२० साली रेशमाच्या किड्यांचे संवर्धन करण्यात येऊ लागले. त्यासाठी मिलान येथून अंडी आणण्यात आली होती. नंतर तुतीच्या झाडांच्या लागवडीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली व फ्रेंच लोकांना या किड्यांच्या संवर्धनासाठी प्रवृत्त केले. अशा तऱ्हेने १६८५ पर्यंत राजाश्रय लाभल्याने या व्यवसायाची तेथे चांगलीच भरभराट झाली. मात्र फ्रेंच राज्यक्रांतीनंतर हा व्यवसाय नष्ट झाला व येथील विणकर इंग्‍लंडला निघून गेले. मात्र नेपोलियन व तदनंतरच्या काळात फ्रान्समध्ये रेशमाच्या किड्यांचे पुन्हा संवर्धन करण्यात येऊ लागले. 


आ. १. रेशमाच्या किड्याचे जीवनचक्र इंग्‍लंडमध्ये चौदाव्या शतकात रेशीमनिर्मितीला सुरुवात झाली व सोळाव्या शतकात या उद्योगाला गती प्राप्त झाली. १६८९ नंतर फ्रेंच विणकर तेथे आल्याने धंदा आणखी वाढला व १७१८ नंतर येथील व्यवसाय चांगलाच वाढला. मात्र विविध प्रकारचे उपाय योजूनही हा तेथील महत्त्वाचा उद्योग झाला नाही आणि १८६० नंतर त्याला उतरती कळा लागली. यांशिवाय यूरोपात स्वित्झर्लंड व जर्मनी येथे हा व्यवसाय एकोणिसाव्या शतकात भरभराटीला आला तर मध्य युगात बेल्जियम व हॉलंडमध्ये सुरू झालेला हा उद्योग एकोणिसाव्या शतकातही सुस्थितीत होता. रशियात १८९० साली या उद्योगाला राजाश्रय मिळाल्याने त्याने तेथे मूळ धरले. अमेरिकेत रेशमी  कापडाची पहिली गिरणी १८१० साली सुरू झाली व एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तेथे या उद्योगाचा विकास झपाट्याने झाला कारण सरकारने त्याला आर्थिक संरक्षण दिले होते. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास चीनमधील जादा कच्चे रेशीम जगभर जाऊ लागले तसेच भारत व जपानही अशा  रेशमाची निर्यात करीत होते. जपानची ही निर्यात १८५७ पासून वाढत जाऊन नंतर तो एक प्रमुख निर्यातदार देश बनला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ग्रीस, स्पेन, ब्राझील, रशिया वगैरे देशांतील या उद्योगात वाढ झाली. विसाव्या शतकात कृत्रिम तंतूमुळे रेशमाच्या मागणीवर परिणाम झाला असला, तरी आधुनिकीकरणाच्या प्रयत्‍नामुळे या उद्योगाचे महत्व टिकून राहिले. १९८०-९० या दशकात जपान, चीन, भारत, रशिया व द. कोरिया हे कच्च्या रेशमाचे मुख्य निर्यातदार देश असून जपान, अमेरिका, इटली, भारत, चीन, फ्रान्स, द. कोरिया, स्वित्झर्लंड, प.जर्मनी व ब्रिटन या देशांत मुख्यत्वे कच्च्या रेशमाचा वापर केला जातो. चीनमध्येही मुख्यत्वे कच्च्या रेशमाचा वापर केला जातो. चीनचा शँटुंग प्रांत व थायलंड तसेच काही प्रमाणात रशिया, भारत हे जंगली रेशमाच्या उत्पादनात अग्रभागी असलेले देश होत.

  

रेशमाचे किडे : कापड तयार करण्यासाठी वापरता येऊ शकेल असा रेशमी धाग्याचे कोशावरण तयार करणाऱ्या सुरवंटाला रेशमाचा किडा म्हणतात. रेशमाच्या किड्यांचे जंगली व संवर्धित असे दोन प्रकार आहेत. यांपैकी तुतीच्या पानांवर वाढविण्यात येणाऱ्या संवर्धित प्रकारांतील बॉ. मोरी नावाची जाती व्यापकपणे आढळणारी असून बहुतेक रेशीम या जातीपासून मिळत असल्याने ती महत्वाची आहे. हिचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाणही आहेत. हिच्याशिवाय बॉम्बिसिडी कुलातील काही इतर जातींचेही संवर्धन करण्यात येते. साग, ऐन, ओक, एरंड, इ. जंगली झाडांच्या पानांवर उपजीविका करणाऱ्या जंगली रेशमाच्या किड्यांच्या अनेक जाती आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या रेशमाला टसर, एरी, मुगा वगैरे नावे आहेत. 

आ. २. रेशमाचा पतंग : (१) नर, (२) मादी, (३) नर-मादीचे मीलन.

रेशमाचा किडा हा विविध प्रकारच्या पतंगांच्या जीवनचक्रातील चार अवस्थांपैकी दुसरी अवस्था आहे. अंडे, अळी अथवा सुरवंट (रेशमाचा किडा), कोश आणि पतंग या त्या चार अवस्था आहेत. पैकी सुरवंट स्वसंरक्षणार्थ स्वतःभोवती कोशावरण तयार करून तिसऱ्या म्हणजे कोशावस्थेत जातो व या कोशावरणापासून रेशीम मिळते. ‘कोश’ ही संज्ञा कोशावरण आणि आतील सुरवंट यांना मिळूनही सर्वसाधारण व्यवहारात वापरण्यात येते.

 संवर्धित किडे : बॉ. मोरी ही जाती कीटकांच्या लेपिडॉप्टेरा गणातील बॉम्बिसिडी कुलातील आहे. या कुलातील बॉम्बिक्स हे प्रजातिवाचक नाम आणि ज्या तुतीच्या झाडाच्या पानांवर हा किडा जगतो त्या झाडाच्या मोरस या प्रजातीवरून (मोरी) याचे शास्त्रीय नाव पडले आहे. या जातीचा पतंग राखाडी, पांढऱ्या रंगाचा, जाड शरीराचा व बळकट पायांचा असतो. नराची लांबी सु. १.२५ सेंमी. व मादीची याहून थोडी जास्त असते. मादी नरापेक्षा थोडी जाडही असते. याचे पंख आखूड व दुर्बळ असून ते पसरलेले असताना त्यांचा व्याप  ५ सेमी.पर्यंत असतो. पंखांची पुढची जोडी किंचीत वाकडी असते व मागची जोडी शरीराच्या मागील टोकापर्यंत गेलेली नसते. पंख रुंद, पांढरट असून त्यांवर शिरा असतात. 

प्रत्येक निरोगी अंडे उबवल्यावर त्यातून सु. ३ मिमी. लांबीचा काळा सुरवंट बाहेर पडतो. याची २०-२२ दिवस काळजीपूर्वक वाढ करावी लागते व चांगली निगा ठेवावी लागते. या काळात त्याला प्रचंड भूक लागते. त्याला दिवसातून चार ते पाच वेळा तुतीच्या पानांचे तुकडे भरविण्यात येतात व यामुळे त्याची झपाट्याने वाढ होते. २५-३० दिवसांत चार वेळा निर्मोचन होऊन (कात टाकून) त्याची पूर्ण वाढ होते. मग त्याची भूक मंदावते. तेव्हा त्याची लांबी ९ सेंमी.पर्यंत असते. त्याची त्वचा मऊ व रंग पिवळसर आणि काहीसा पारदर्शक असतो. नंतर त्याच्या शरीराचे आकारमान कमी होऊन तो जवळजवळ पारदर्शक दिसू लागतो. उदर भागातील पायांच्या आधारे उभा रहाण्याची सतत धडपड करू लागतो. कोशावरण कातायला सज्‍ज झाल्याचे हे लक्षण असते. मग त्याला कोशावरण तयार करण्यासाठी काटकी अथवा पेंढा यासारखे आधारद्रव्य पुरविले जाते. आधुनिक तंत्राप्रमाणे आधारद्रव्य म्हणून बांबूच्या चंद्रिका किंवा प्लॅस्टिकच्या जाळ्या यांसारखे पदार्थ पुरवितात.


 बॉ. मोरी जातीतील सुरवंटाची लांबी ७.५-९ सेमी. असून यांच्या कुलातील इतर  जातींतली सुरवंटांच्या मानाने हा सडपातळ असतो. याचे दुसरे वक्षीय वलय  उंचवट्यासारखे असते आणि आठव्या उदरवलयावर शिंग सदृश रचना असते, तिला  पुच्छशृंग म्हणतात.  

आ. ३. सुरवंट : (अ) बाह्यरूप, (१) शीर्ष, (२) वक्ष, (३) उदर, (४) शिंग, (५) छद्मपाद, (६) उदरपाद, (७) श्वसन रंध्रे, (८) संघानिक पाद (आ) अंतर्गत रचना : (१) ग्रसिका, (२) मध्य रेशीम ग्रंथी, (३) पश्च रेशीम ग्रंथी, (४) गुदांत्र, (५) अग्र रेशीम ग्रंथी.रेशीमनिर्मिणाऱ्या ग्रंथी  सर्व शरीरभर पसरलेल्या  असतात. पैकी पश्च रेशीम  ग्रंथी दोन लांबट  नलिकासदृश कोशांची  बनलेली असते. तिच्यात  फायब्रोइन नावाचे प्रथिन निर्माण होत असते. तेथून  ते दोन मध्य रेशीम ग्रंथीमध्ये येते. या ग्रंथी  इंग्रजी एस (S) अक्षराच्या  आकारासारख्या  असतात. त्यांत  फायब्रोइन पक्व होते (मुरते). दोन अग्र रेशीम ग्रंथी डोक्यालगत एकत्र आलेल्या असतात. या ग्रंथीच्या जबड्याखालील ओठालगतच्या छिद्रयुक्त अवयवामधून फायब्रोइनाचा स्त्राव बाहेर पडून रेशमाचे दोन तंतू कातले जातात. या अवयवाला तनित्र म्हणतात. पुढच्या टोकाशी असणाऱ्या दुसऱ्या ग्रंथीतून चिकट स्त्राव स्त्रवतो. या स्त्रावात मेणासारखा चिकट पदार्थ असतो. रेशमात साधारणपणे ७५ टक्क्यांपर्यंत फायब्रोइन, २० टक्क्यांपर्यंत सेरिसीन, ३ टक्के मेण व १ ते २ टक्के इतर द्रव्ये असतात. फायब्रोइनाचा दाट व नितळ स्त्राव तनित्रातून बाहेर पडताना त्यात सेरिसिनाचा स्त्राव मिसळला जातो. हवेच्या संपर्कात येताच फायब्रोइन घट्ट व कठीण होते आणि सेरिसिनाने दोन्ही तंतू चिकटले जाऊन दुहेरी धागा तयार होतो. किडा शरीराची हालचाल करीत राहिल्याने हा धागा त्याच्या शरीराभोवती इंग्रजी आठच्या (8) आकाराप्रमाणे लपेटला जातो. २४ तासांत किडा वा बाह्य जाळ्यात दिसेनासा होतो. तीन ते पाच दिवसांत कोशावरण पूर्ण तयार होते. कोशावरण तयार होताना किड्याचे शरीर बारीक होत जाते व कोशावरणाची लांबी सुरवंटांच्या लांबीपेक्षा कमी होते.

आ. ४. (अ) रेशीम निर्मिणारी ग्रंथी (आ) तनित्राचे बाह्यरूप.

अशा तऱ्हेने तयार झालेले कोशावरण सामान्यतः अंडाकार व टणक असते. कधीकधी याचा मधला भाग संकोचला जाऊन कोशावरण वाटाण्याच्या शेंगेप्रमाणे दिसते. जाती व लिंग यांनुसार कोशावरणाचे आकार व आकारमाने वेगवेगळी असतात. त्यांची लांबी १५ ते २५ मिमी. व व्यास १० ते २० मिमी. आणि वजन २.२ ग्रॅ.पर्यंत असते. सर्वसाधारणपणे कोशावरणावर ६००-६१५ मी. धागा असतो. एक बार, दुबार, बहुबार आणि संकरित जातीनुसार कोशाचे वजन, लांबी, रुंदी व धाग्याची लांबीकमी अधिक असते. बहुबार जातीचे कोश कमी दर्जाचे तर एकबार जातीचे खूपच दर्जेदार असतात. दुबार व संकरित जाती प्रचलित असून त्यांपासून मिळणारा धागा सरासरी ६०० मी. आणि जास्तीत जास्त ९०० मी. असतो. 

आ. ५. रेशमाच्या किड्याच्या कोशावरणाचा छेद : (१) कोशावरण, (२) आतील किडा.

पूर्ण वाढ झालेली अळी कोशावरण करण्यास योग्य झाल्यापासून (चंद्रिकेवर सोडल्यापासून) दहाव्या दिवशी पतंग बाहेर येतात. यासाठी पतंग क्षारधर्मी (अम्‍लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार करणारा) द्राव सोडून तेथील तंतू त्यात विरघळवितो आणि इतर धागे बाजूला सारून तो बाहेर पडतो. यामुळे कोशावरणातील घागा सलगपणे व सहजपणे उलगडून काढता येत नाही, म्हणून याचे जीवनचक्र येथेच संपविण्यात येते. त्याकरिता उकळत्या पाण्यात कोशावरण टाकून किडा गुदमरून मारण्यात येतो याचा नाजुक धाग्यावर मात्र अनिष्ट परिणाम होत नाही. औद्योगिक दृष्ट्या उष्ण हवा किंवा वाफ वापरून कोशगत किडे मारतात. नंतर कोश नीट सुकवितात आणि गरजेनुसार धागा काढण्यासाठी वापरतात. 

रेशीमनिर्मितीच्या दृष्टीने पतंगाच्या चारही अवस्था महत्त्वाच्या असतात. त्यामुळे चांगली निवडक कोशावरणे वेगळी काढून ठेवतात व त्यांची पूर्ण वाढ होऊ देतात. त्यांतून बाहेर पडणाऱ्या नर-मादीचे तीन तासांच्या आतच मीलन होते. मीलनक्षमता जास्तीत जास्त दोन दिवस राहते. मात्र नर शीतकपाटात ठेवावे लागतात. तांत्रिक कारणासाठी माद्या अशा ठेवीत नाहीत. माद्या शीतकपाटात ठेवल्यास पुढील पिढ्यांच्या विणीच्या काळाच्या चक्रांवर अनिष्ट परिणाम होतो. मादी एका वेळेस २०० ते ५०० अंडी घालते. मादी तदनंतर लवकरच मरते. पतंग काही खात नाही. रेशमाची उत्पादकता व प्रत बहुबार जातीपेक्षा दुबार जातीत अधिक आहे. मात्र त्याची वीण वर्षातून दोनदाच होते. सुप्तावस्थेतील अंड्यांवर हायड्रोक्लोरिक अम्‍लाची प्रक्रिया करून अंडी वर्षातून चारपेक्षाही अधिक वेळा उबवली जातील, अशी योजना करतात. त्यामुळे दुबार जातीचे गुणधर्म व अनेक वेळा संगोपन व संवर्धन शक्य होते.  


बॉ. मोरी जातीतील अंडी टाचणीच्या माथ्याएवढी असून २०,००० अंड्यांचे वजन १७ ग्रॅ. भरते. एवढ्या दर्जेदार अंड्यांचे वजन जास्तीत जास्त २० ग्रॅ. भरते म्हणजे एका अंड्याचे सरासरी वजन १ मिग्रॅ. (०.८५ ते १ मिग्रॅ.) एवढे इष्ट मानतात. ०.६२५ मिग्रॅ. पेक्षा कमी वजनाची अंडी दर्जेदार मानीत नाहीत. तसेच १ किग्रॅ. कोशावरणे तयार होण्यासाठी २० ते २५ किग्रॅ. तुतीची पाने किड्यांना भरवावी लागतात. 

बॉ. मोरी शिवाय या कुलातील तुतीच्या पानांवर जगणाऱ्या सहा जातींचे संवर्धन भारतात करतात. बॉ. टेक्स्टॉर या बंगालमधील जातीचे पतंग मोठे असून हिची कोशावरणे तलम (मऊ) असतात. बॉ. सायनेन्सिसच्या वर्षातून अनेक पिढ्या निर्माण होऊ शकतात पण कोशावरणे छोटी असतात. बॉ. क्रोएसी, बॉ. फॉर्‌च्युनॅटसबॉ. ॲरॅक्युनॅन्सिस या जातींच्याही वर्षांतून अनेक पिढ्या निर्माण होऊ शकतात. यांच्या कोशावरणांवरील धागा उलगडणे सोपे असते. यांशिवाय बॉम्बिक्स प्रजातीच्या अनेक जाती असल्या, तरी रेशीमनिर्मितीसाठी त्यांचे संवर्धन करीत नाहीत. 

जगात इतरत्र संवर्धित करण्यात येणाऱ्या काही कमी महत्त्वाच्या जातींची माहिती पुढे दिली असून त्या जंगली जातींचे संवर्धन करण्यात येते त्यांची माहिती जंगली किडे या उपशीर्षकाखाली दिलेली आहे. महारुख व एरंडाच्या पानांवर जगणाऱ्या ऐलँथस किड्याचे (फिलोसॅमिया सिंथिया) कोशावरण सैलसर असून त्याचा रंग नारिंगी व पांढरा असतो. ते सहजपणे उलगडून रिळावर काढून घेता येत नसल्याने पिंजून त्याचा धागा काततात. यूरोप, आफ्रिका व पूर्व अमेरिका येथे हिचे संवर्धन करतात. सिरियन किडा (पॅचिपासा ओट्‍स) यूरोपातील प्रमुख जाती असून हिच्यापासून थोडेच रेशीम मिळते. अमेरिकेत कित्येक जातींचे संवर्धन करण्यात येते मात्र तेथील रेशमाची गुणवत्ता चीनच्या मानाने कमी दर्जाची असते व ते महागही पडते. सेरोपिया पतंग (सॅमिया सेकोपिया) हा उत्तर अमेरिकेतील सर्वांत मोठा सर्वत्र आढळणारा पतंग आहे. याची कोशावरणे मोठी व रेशीम बळकट असते. ग्‍लोव्हर किडा (सॅ. ग्‍लोव्हरी) असाच असून तो पौर्वात्य देशांत आढळत नाही. प्रोमेथिया पतंग (कॅलोसॅमिया प्रोमॅथी) सामान्यतः पूर्व अमेरिकेत आढळतो. फिलोसॅमिया सिंथिया जातीचे तसेच पॉलिफेमस (टिलिया पॉलिफेमस) आणि जो (ऑटोमेरिस जो) या पतंगांचे रेशीम काहीसे चिनी रेशमासारखे असते मात्र याचे तंतू बरेच चिकटलेले असतात. 

जंगली किडे : अनेक जंगली पतंगांचे सुरवंटही रेशमाची कोशावरणे तयार करतात. या पतंगांचा जीवनक्रमही थोड्याफार फरकाने वरीलप्रमाणे असतो. मात्र त्यांच्या विविध अवस्थांचा कालावधी वेगवेगळा असतो. हे किडे ऐन, साल, ओक, एरंड वगैरे वृक्षांच्या पानांवर जगतात. त्यांच्या अंड्यांचा व कोशावरणांचा आकार व आकारमाने वेगवेगळी असतात. यांच्यापासून मिळणारे रेशीम वरील रेशमापेक्षा भरड व ओबडधोबड म्हणजे एकसारखी जाडी नसलेले व काहीसे रुंद असते. त्याच्या पृष्ठभागावर लांबीच्या दिशेत बारीक नागमोडी रेषा वा खुणा असतात. त्यामुळे त्याच्या देखणेपणात भर पडून त्याची किंमत वाढते. 

ज्या भागांत असे जंगली किडे मोठ्या प्रमाणावर आढळतात तेथे हा उद्योग महत्वाचा ठरतो. जगातील रेशामाच्या एकूण उत्पादनातील जंगली रेशमाचा वाटा १-२ टक्के आहे. या किड्यांचे टसर, एरी व मुगा हे मुख्य प्रकार आहेत. 

टसर : याच्या सॅटरनिडी कुलातील पुढील तीन मुख्य जाती आहेत. 

(१) अँथेरीआ पर्नी : (पेरिनी). हा किडा मूळचा उत्तर चीनमधील असून त्यामुळे याला चिनी टसर किडा असेही म्हणतात. तो मुख्यत्वे चीन व भारतात आढळतो. तो ओक वृक्षांच्या पानांवर जगतो व ही झाडे सु. २ मी. उंचीएवढी छाटून त्यांवर त्यांची वाढ होऊ देतात. अंडी घातल्यापासून ४५ दिवसांत मोठी, करडसर तपकिरी कोशावरणे तयार होतात व तदनंतर १५ दिवसांनी पतंग बाहेर पडतो. पूर्ण वाढ झालेल्या किड्याची लांबी २ सेंमी.पर्यंत असते व रंग हिरवा असतो. पावसळ्यात अधिक प्रमाणात व वसंत ऋतूतही कोशावरणे मिळतात. त्यांचा प्रकार व गुणवत्ता ही जमीन व हवामानानुसार बदलतात. सामान्यतः किडा आत असतानाच कोशावरणावरील रेशीम उलगडून काढण्यात येते. या वेळी सभोवतालचे वातावरण उष्ण व दमट ठेवतात. टसर धाग्यात कॅल्शियमयुक्त पदार्थ असल्याने त्यावर उकळत्या सोडियम कार्बोनेटाची प्रक्रिया करून तो सुटा केला जातो. असा धागा सहजपणे गुंडाळता येतो. हा धागा सर्वसाधारणपणे आठ पदरी गुंडाळतात. हे रेशीम बदामी व फिकट तपकिरी रंगाचे असल्याने त्याचे विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करणे अवघड असते. हे कमी चमकदार असून बहुतकरून हे इतर तंतूंच्या जोडीने संमिश्ररूपात दोरे व वस्त्रे यांसाठी वापरतात. 


(२) . मायलिटा : या जंगली किड्याची खाद्य झाडे ५० पेक्षा जास्त आहेत. पैकी ऐन व अर्जुन ही प्रमुख असून इतर सर्व (उदा., बोर) दुय्यम आहेत. या किड्याची भारतात जोपासना करण्यात येते. याचे कोशावरण मोठे (लांबी ५ सेंमी. व्यास २.३ सेंमी.) व घट्ट असून याचे रेशीम रुपेरी पिवळसर, तपकिरी, हिरवट असते. 

(३) यामामाई : (जपान ओक सिल्क मॉथ). अर्जुन, बोर, ओक व फायकस प्रजातीतील (उदा., वड, अंजीर) वृक्षांच्या पानांवर जगणारा हा किडा मूळचा जपानमधील आहे. याचा सुरवंट हिरवट रंगाचा असून कोशावरण मोठे व चकचकीत हिरवे (क्वचित राखी, पिवळसर किंवा करडे) असते. याच्यापासून मिळणारे रेशीम हलक्या दर्जाचे असते व ते रंगविणे वा त्याचे विरंजन करणे ही कामे सहजपणे करता येत नाहीत. हे हिरवट रेशीम चीन व जपानमध्ये भरतकामासाठी वापरतात. यूरोपात या किड्यांचे संवर्धन करण्यात यश मिळाले नाही.  

मुगा : . आसामेन्सिस हा मूळचा आसाममधील किडा ॲचिलस बॉम्बिसिना, लिट्‌शिया पॉलिअँथा व टेट्रांथेरा मोनोपेटाला या वृक्षांच्या पानांवर जगतो. ही जाती आशियात फक्त आसामात जंगली अवस्थेत आढळते व हिचे संवर्धनही करतात. मात्र संवर्धनामध्ये सुरवंट झाडावरच वाढू देतात. वर्षातून पाच वेळा याची कोशावरणे मिळतात. ती ५ सेंमी. लांब व २ सेंमी. व्यासाची, अंबर रंगाची, तलम व तीन स्तरयुक्त असतात. यापासून मिळणारे रेशीम सोनेरी असल्याने त्याचा जरीऐवजी वापर करतात. सायरंगी मुगा आणि मेझानकुरी किडे लिट्‌शिया क्युबेबा या वृक्षावर वाढतात. यापासून मौल्यवान रेशीम मिळते. 

एरी : (फिलोसॅमिया रिसिनी). या एरंडाच्या पानांवर जगणाऱ्या जंगली किड्याचे संवर्धनही करतात. एरंडाशिवाय हेटेरोपॅनॅक्स फ्रॅग्रॅन्स इ. वृक्षावरही यांची जोपासना करतात. याची कोशावरणे ४ सेंमी. व २ सेंमी. व्यासाची असून ती वर्षातून ५-६ वेळा मिळतात. पानांवर कोशावरणाचा रंग सायरंगी ते लाल असा आढळतो. याच्यावरील धागा उलगडता येत नसल्याने तो लोकर वा कापसाप्रमाणे कातून तयार करतात. 

यांशिवाय सर्व प्रकारच्या पानांवर जगणारी ॲटॅकस ॲटलास ही जंगली जाती भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, चीन व जपान येथे वाढविण्यात येते. तसेच ॲ. रिसिनीॲ. एडवर्डसी या जातींपासूनही एरी रेशीम मिळते. 

 

संवर्धन : पाने भरविणे, अंडी उबवून सुरवंट वाढविणे आणि रेशीम मिळविण्यासाठी व प्रजोत्पादनासाठी कोशावरणांची निवड करणे हे संवर्धनातील महत्वाचे टप्पे आहेत. 

 

अन्न पुरवठा : रेशमाच्या किड्यांची जोपासना करण्यासाठी पुरेशी पाने लागतात. सामान्यतः यासाठी तुतीची पाने वापरतात. तुतीची लागवड वृक्ष वा झुडूप या प्रकारे करतात. भारतात फक्त काश्मीरमध्येच वृक्ष पद्धतीचा अवलंब करतात, इतरत्र झुडपेच वाढवितात. याचे बागायती व जिरायती प्रकार होतात. बागायती पद्धतीत खड्डे व रांग पद्धत आहे. महाराष्ट्रात बागायती तुतीचा अवलंब केला असून रांग व खड्डे यामधील सोयीस्कर पद्धत स्वीकारली आहे. सऱ्या पाडून वरब्यांवर सु. १ × १ मी. अंतरावर कांड्या लावतात. जमिनीच्या मगदुरानुसार अंतर ठरवितात. थोड्या हलक्या जमिनीसाठी ०.६० × ०.६० मी. अंतर वापरतात. तुतीच्या निरनिराळ्या जातींपैकी अधिकतर एम-५ किंवा के-२ (कन्वा-२) ही सोयीची आहे. ही जाती मोरस इंडिका प्रकार आसामेन्सिस व प्रकार फिलिपीन्स मिळविण्याचे व पुढे निवड पद्धतीने विकसित केले आहे. ही जाती केंद्रीय रेशीम मंडळाने संशोधित व प्रमाणित केली आहे. तुतीची झाडे सामान्यपणे उतरत्या व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत लावतात. यामुळे उत्तम प्रकारचा पाला मिळतो. तसेच झाडाला सर्व बाजूंस फांद्या फुटाव्यात म्हणून झाडांमध्ये ४-६ ते १२ मी. अंतर ठेवतात. यासाठी तुतीच्या झाडांची लागवड इसवी सनापूर्वीपासून करण्यात येत असून या झाडांच्या मूळ जातीत बरेच बदल झालेले आहेत. जमीन, झाडाचे वय व स्थिती या गोष्टी पाल्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. जपानमध्ये झाडांची छाटणी करतात. त्यामुळे पाला जास्त मिळतो व पाने खुडण्यासाठी शिडीची गरज पडत नाही. भारतात आणि यूरोपमध्ये मुख्यत्वे तुतीची मोरस इंडिका ही जाती लावतात. हिच्या पानांवर वाढलेल्या किड्यांपासून अधिक बळकट रेशीम मिळते व ते वापरायला फायदेशीर ठरते. [⟶ तुती]. 


तुतीशिवाय कुड्रेमिया ट्रायलोबा, मॅक्ल्युरा पामीफेरा, फायकस ऑरेंक्युलेटा इ. वृक्षांची पाने वापरून पहाण्यात आली. मात्र बॉ. मोरी या किड्यांना ती विशेष आवडत नाहीत व काही अपायकारकही ठरतात. या पतंगाचे जीवनचक्र तुतीला येणाऱ्या पालवीशी निगडित असल्याचेही दिसून आले आहे. रेशमाच्या किड्यासाठीचे कृत्रिम अन्न तयार करण्याचे प्रयत्‍न जपानमध्ये करण्यात येत आहेत.

अंडी उबविणे व सुरवंटाची जोपासना : उष्ण प्रदेशांत अंडी नैसर्गिक रीतीने उबविली जातात. मात्र इतरत्र उबविण्यासाठी त्यांना कृत्रिम रीतीने ऊब द्यावी लागते. तुतीच्या झाडाला पालवी येण्याच्या वेळी अंड्यातून अळी (सुरवंट) बाहेर पडावी अशा प्रकारे अंडी उबवितात. उन्हाळ्याच्या प्रारंभी मादीने श्लेष्मल (चिकट) द्रवाने पृष्ठभागी राहतील अशा खास प्रकारच्या कागदावर अंडी घातलेली असतात. त्यांची तपासणी करून निर्दोष व निरोगी अंडी शीतगृहात (१०से. ला) साठवितात. सामान्यतः वसंत ऋतूच्या प्रारंभी अंडी उबवण यंत्रात ठेवावी लागतात. 

रेशमी अळ्या एकबार, बहुबार व दुबार असतात. बहुबार जातीच्या अळ्या वर्षातून ४ ते ६ वेळा व दुबार २ वेळा तर एकबार एकच वेळा जीवनचक्र पुरे करतात. अर्थात अंड्यांत सुप्तावस्था असते. अंडी शीतनिष्क्रियतेत साठवावी लागतात. ती दुबार जातीसाठी सु. ३ महिन्यांपर्यंत शीतपेटीत ठेवतात. एकबार जातीची अंडी ६ ते ७ महिने शीतपेटीत ठेवतात. ही पद्धत योग्य वेळी अंडी उबविण्यासाठी स्थिर तापमान पद्धती व वर्धित तापमान पद्धतीचा अवलंब करतात.

एकबार, बहुबार अंडी उबविण्यासाठी २५ से. पेक्षा तापमान कमी नसावे. अंडी आपल्या गरजेप्रमाणे जरूर तेव्हा उबवावीत यासाठी त्याची सुप्तावस्था भंग करावी लागते. त्यासाठी हायड्रोक्लोरिक अम्‍लाची प्रक्रिया करतात. तिचे थंड व उष्ण अम्‍ल प्रक्रिया असे प्रकार आहेत. ती शीतकरणानंतर किंवा शीतकरणाशिवायही करतात. अल्पकाळ शीतकरण व दीर्घ शीतकरण असे याचे प्रकार पडतात. या प्रक्रियेमुळे सुप्तावस्था भंग झाल्यामुळे दुबार जातीची अंडीदेखील बहुबार जातीप्रमाणे वागतात. त्यामुळे वर्षात अनेक जीवनचक्रे होतात पण प्रत दुबाराप्रमाणे वरचढ राहते.

४०,००० अळ्या किंवा १०० अंडीपुंजास (एका मादीच्या सर्व अंड्यांस अंडीपुंज म्हणतात) ७५० ते ८०० किग्रॅ. पाला लागतो. साधारणपणे एका अंडीपुंजास ७.५ ते ८ किग्रॅ. पाला लागतो म्हणजेच एका अळीस सु. २० ते २२ ग्रॅम पाला सर्व अळी अवस्थेत लागतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी वजनाने १०,००० पट व आकाराने ९० पट होते. साहजिकच वाढत जाणाऱ्या अळीस योग्य प्रमाणात जागा द्यावी लागते. 

सुरवंटाची जोपासना अगदी काळजीपूर्वक म्हणजे तान्ह्या मुलाप्रमाणे करतात. तसेच त्यांची चांगली निगा राखावी लागते. यासाठी त्यांची खोली स्वच्छ, निर्जंतुक, पांढरा रंग दिलेली व हवा खेळती राहील अशी असावी लागते. 

संगोपनाच्या विविध पद्धती आहेत तथापि मंचपद्धत अधिक प्रचलित आहे. मंचावर (मांडणीवर) २० ट्रे (तबके) ठेवता येतात. मंच सु. २ मी. उंच, सु. ८ मी. लांब व ०.६ ते ०.७५ मी. रुंद असतो. त्यावर ९०×६०×७.५ सेंमी. आकाराची लाकडी खोकी किंवा बांबूची सोयीस्कर आकाराची शिवरी ठेवतात. छोट्या सुरवंटाना आर्द्रता व तापमान जास्त लागते यासाठी आर्द्रता रहावी म्हणून मेण कागदाचा वापर करतात तसेच स्पंजाचे भिजविलेले तुकडे वापरतात. अळ्यांची भूक वाढत जाते. सुरुवातीस कोवळी, नंतर मध्यम व शेवटी जून पाने लागतात. 

अळी अवस्था एकूण २३ ते २६ दिवसांची असते. रोज चार वेळा आहार द्यावा लागतो. या काळात अळी चार वेळा कात टाकते. कात टाकण्यास २४ तास लागतात दुसरी कात १८ तासांत व चौथी कात ३० तासांत टाकली जाते. कात किती वेळा टाकली जाते त्याप्रमाणे प्रकार ठरतात. तथापि चार वेळा कात टाकणाऱ्या अळ्याच सामान्यपणे प्रचलित आहेत. अळी अवस्था या कातीमुळे उप-अवस्थांत विभागली जाते. अळी अवस्थेच्या त्यामुळे पाच उप-अवस्था होतात. किड्याचे आकारमान जवळजवळ ७० पट वाढून तो ८ सेंमी. लांब व २.५ सेंमी. जाड होतो. त्याच्या शरीराचे डोके, वक्ष ३ वलये, उदर ११ वलये हे भाग असून पैकी ९, १० व ११ वलये एकत्र झालेली असतात. पायांच्या तीन जोड्या असतात. अशा प्रकारे पूर्ण वाढ झालेला किडा कोशावरणासाठी रेशीम कातायला सज्‍ज होतो. 


कोशावरणे :  सुरवंट शरीराचा पुढचा भाग उंचावून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हलवू लागतो तेव्हा तो रेशीम कातून कोशावरण निर्माण करायला सज्‍ज झाल्याचे लक्षात येते. असा एकच सुरवंट ५-६.२५ सेंमी. रुंदीच्या तबकात हळुवारपणे ठेवतात. अशी तबके एका चौकटीत ठेवतात आणि ही चौकट पहिले साठ तास हळुवारपणे फिरविली जाते. या वेळी खोलीतील तापमान सु. २३से. व आर्द्रता सु. ७० टक्के ठेवतात. सुरवंटाला कोशावरण तयार करण्यासाठी आधार मिळावा म्हणून या तबकांत विशिष्ट प्रकारच्या काटक्या किंवा ज्याभोवती कोशावरण तयार करता येईल असे पदार्थ ठेवतात. कोशावरण तयार करण्यासाठी प्रत्येक अळीस ७.५ ×७.५ × ७.५ सेंमी. जागा लागते. आधारद्रव्याच्या अनेक प्रकारांपैकी बांबू चंद्रिकांचा अधिक वापर होतो. बांबूच्या चौकोनी तट्ट्यावर ७.५ सेंमी. रुंदीची पट्टी गुंफून चंद्रिका बनवितात. दर सु. ०.१० चौ.मी. मध्ये ४० ते ५० अळ्या सोडतात. सुरवंट एका काटकीभोवती रेशमाचे जाळे तयार करतो. नंतर डोक्याची विशिष्ट प्रकारे हालचाल करून इंग्रजी आठ (8) आकड्याच्या रूपात या जाळ्यावर रेशीम गुंडाळले जाते. अशा तऱ्हेने कोशावरणाचे थर तयार होतात. सर्वसाधारणपणे तीन दिवसांच्या आत कोशावरण पूर्ण होते. तदनंतर सात दिवसांनी सुरवंट पतंगावस्थेत जातो. चंद्रिकेवरून कोशावरणे सहाव्या दिवशी काढतात. पुनर्उत्पत्तीसाठी चौथ्या दिवशीच कोशावरणे काढावी लागतात. कोशाचे प्रौढ पतंगात रूपांतर होऊन तो कोशावरण भेदून बाहेर पडतो आणि रेशमाचा धागा अनेक ठिकाणी तुटून रेशीम सलगपणे उलगडून काढणे शक्य होत नाही.  

सुरवंटांची गर्दी झाली, तर दोन वा अधिक कोशावरणे एकमेकांना चिकटतात किंवा दोन सुरवंट एकच कोशावरण तयार करतात. अशा जोड कोशावरणांपासून (ड्रुपियन) मिळणाऱ्या रेशमाला मागणी असते. मात्र त्यांवरील धाग्यांची सरमिसळ व गुंतागुंत झालेली असल्याने ती नेहमीच्या पद्धतीने उलगडता येत नाही. जपानमध्ये ५ ते ९ टक्के एवढी जोड कोशावरणे मिळतात. सामान्यतः यांपासून मिळणारा धागा भरड असून त्याच्या कापडाचा पोत वैशिष्ट्यपूर्ण असतो म्हणजे कापडावर गाठी दिसतात वा ते पिळवटल्यासारखे दिसते, त्यामुळे त्याला विशिष्ट कापडांसाठी (उदा., शँटुंग) कधीकधी मागणी असते.  

जोड कोशावरणे व पुढील प्रजननासाठी लागणारी कोशावरणे वेगळी काढून ठेवतात. तसेच रेशीम काढण्याच्या दृष्टीने इतर कोशावरणांची गुणवत्ता, आकारमान व रंग यांच्यानुसार निवड व विभागणी करतात. कोशावरणाला इजा पोचू न देता आतील सुरवंट मारतात त्यामुळे त्याचे पतंगात रूपांतर होण्याची अवस्था टाळली जाते. अगदी पूर्वी कडक उन्हात ठेवून कोशावरणातील सुरवंट मारीत मात्र ही पद्धती खात्रीशीर नाही. नंतर वाफेने गुदमरवून सुरवंट मारीत असत मात्र ही पद्धती महागडी व वेळखाऊ (२ महिन्यांपर्यंत काळ) आहे. नंतर गरम हवेने सुरवंट गुदमरवून मारण्याची पद्धती वापरात आली. वाफेने अळ्या लवकर मारता येतात पण नंतर कोशावरणे सुकवावी लागतात. व त्यासाठी वेळ जातो. ही सर्वांत सुरक्षित व्यवहार्य आणि व्यापकपणे वापरली जाणारी पद्धती आहे. या पद्धतीत विटांची आणि सिमेंट काँक्रीटची भट्टी वापरतात. या भट्टीत फिरत्या आठ पट्ट्यांची मालिका बसविलेली असते. या भट्टीतील तापमान माथ्यापासून (सु. ९९से.) तळाकडे (सु. ६० सें.) कमी होत गेलेले असते. भट्टीच्या माथ्यावरील द्वारातून टाकलेली कोशावरणे फिरत्या पट्ट्यांवरून ७ ते ८ तासांत तळाकडे जातात. या काळात सुरवंट मरतो व कोशावरण कोरडे होऊन धागा उलगडण्यासाठी लगेच वापरता येऊ शकते. ही जपानी पद्धत होय. याउलट चढत्या तापमानाची पद्धती ही इटालियन पद्धत आहे. जपानी पद्धत अधिक श्रेयस्कर आहे.  

रेशमाच्या किड्यांच्या पुनरुत्पादनासाठी लागणाऱ्या कोशावरणांची निवड काळजीपूर्वक करतात. निरोगी व उत्तम कोशावरणे निवडून वेगळी ठेवतात. त्यासाठी काही नियम व दंडक घालून देण्यात आलेले असून ते काटेकोरपणे पाळण्यात येतात. यामुळे रोगट संतती निर्माण होण्याचे टळते. रोगट पतंग व अंडी नष्ट करतात. एक निरोगी मादी सैलसर विणीच्या तलम, हलक्या सुती कापडाच्या (चीझ क्लॉथ) ८X८ सेंमी. तुकड्यावर अंडी घालते. यासाठी खास खोली असते. नंतर काही माद्या मारून त्यांची सूक्ष्मदर्शकीय तपासणी करतात आणि त्या निरोगी असल्याची खातरजमा करतात. अंड्यांचीही तपासणी करून निरोगी अंडी शेतकऱ्यांना पुरविण्यात येतात. निरोगी अंडी मिळविणे, संकरण करून प्रजनन करणे आणि रेशमाच्या किड्याच्या नव्या वाणांची (प्रकारांची) निर्मिती करणे यांकरिता वरील कामे काळजीपूर्वक करण्यात येतात. 


रेशमाच्या किड्यांचे रोग व उपद्रवकारक जीव : या किड्यांचे संवर्धन सु. ३,००० वर्षांपासून केवळ रेशमासाठी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि संवर्धनाच्या ठिकाणची स्वच्छता यांकडे दुर्लक्ष झाले. परिणामी किडे रोगराईला सहज बळी पडू लागले. कधीकधी या रोगांच्या उग्र साथी येऊन बहुसंख्य किडे व पतंग नष्ट होत. रेशमाचे किडे व पतंग यांना होणाऱ्या काही महत्वाच्या रोगांची माहिती थोडक्यात येथे दिली आहे.  

मिरी रोग :  (पेब्राइन). हा भयानक रोग किड्यांना परजीवी म्हणजे अन्य जीवांवर जगणाऱ्या नोसेमा बॉम्बिसिस नावाच्या आदिजीवामुळे (प्रोटोझोआमुळे) होतो. खावयास दिलेल्या, विशेषतः कच्च्या पाल्यातून याची लागण होते. भूक मंदावणे, हालचाल बंद होणे, डोके लोंबत रहाणे, पंख खुरटणे इ. लक्षणे असणाऱ्या या रोगामुळे रेशीमनिर्मितीत व किड्याच्या वाढीत अनियमितपणा येतो. मिरी रोगामुळे सुरवंटाच्या शरीरावर हळूहळू अनियमित आकाराचे काळे ठिपके दिसू लागतात. सुरवंट अशक्त व कोशावरण सैल होते आणि पतंग दुर्बळ निपजतात. मादी अंडी कमी देते. हा रोग आनुवंशिक, स्पर्शजन्य व सांसर्गिक आहे. तुतीची योग्य प्रकारची पाने वापरणे, रोगमुक्त अंडी प्रजननासाठी वापरणे, खोलीचे तापमान योग्य तेवढे ठेवणे, रसायने (उदा., चुना किंवा रेशीम कीट औषधाचा वापर करणे) वापरणे, तसेच वातावरण निर्जंतुक व स्वच्छ ठेवणे वगैरे उपाय योजून रोगाचे नियंत्रण करून त्याची तीव्रता कमी करतात.  

हा रोग झालेल्या किड्याच्या रक्तात व ऊतकांत (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांत) कॉर्नीलियन कणिका (कॉर्नीलिया या शास्त्रज्ञांनी शोधल्यावरून पडलेले नाव) असतात. १८६५ साली लूई पाश्चर यांनी या रोगाचे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी ह्या कणिका पाहिल्या व हे रोगाचे लक्षण नसून त्याचे रोगास कारणीभूत असलेले परजीवी असल्याचे दाखवून दिले. त्यांनी याला कणिका रोग (कॉरप्युस्कल डिसीज) हे नाव दिले. आनुवंशिक रीतीने, संसर्गाने किंवा या कणिका असलेली पाने खाल्‍ल्याने याचा प्रसार होतो, असेही त्यांनी दाखविले. मात्र अजूनही रेशमाच्या किड्यांचा हा सर्वांत घातक रोग आहे.  

मस्कारडीन : कवकांमुळे (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींमूळे) होणारा हा घातक रोग स्पर्शजन्य व सांसर्गिक आहे. कवकाच्या जातीनुसार या रोगाचे विविध प्रकार आढळतात. कवकाचे बीजाणू (प्रजोत्पादक घटक) एका किड्यातून दुसऱ्याकडे जातात व त्याच्या त्वचेत घुसून तेथे कणिका निर्माण करतात. या रोगामुळे किड्याचे आयुर्मान घटते व सामान्यपणे लक्षणे दिसल्यानंतर २०-३० तासांत किडा मरतो. रोगग्रस्त किडे अलग ठेवणे व रोगनाशक द्रव्य फवारणे हे याच्या नियंत्रणाचे उपाय होत. मात्र पुष्कळ वर्षांत या रोगाची साथ आलेली आहे. अतिशय दमट वातावरण रोगाची लागण होण्यास कारणीभूत होते.

फ्‍लॅचेरी : सूक्ष्मजंतूंमुळे हा आतड्याचा सांसर्गिक रोग होतो. रोगकारक सूक्ष्मजंतू व लक्षणे यांनुसार याचे विविध प्रकार होतात. या सर्व प्रकारांत मेलेले किडे मऊ व कुजलेले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. किड्यांना हगवण होऊन ते दुर्बळ होतात. पाने भरविण्याच्या मुख्य काळात हा रोग होण्याची शक्यता असते व अनिष्ट प्रकारची पाने खाण्यात आल्याने तो होतो. आंबलेली पाने न भरविणे, तसेच स्वच्छता, निरोगी वायुविजन (हवा खेळती ठेवणे) व योग्य तेवढी आर्द्रता राखणे हे यावरील उपाय आहेत. या रोगास मराठीत काजळी असे नाव आहे. 

ग्रासेरी :  सुरवंटांना होणारा हा व्हायरसजन्य रोग भयानक आहे. प्रौढावस्था काहीशी रोगप्रतिकारक्षम असते. उपासमार, ओली पाने खाण्यात येणे, अनियमित तापमान व आर्द्रता, तापमानात अचानकपणे होणारे बदल, रसायनांचे सान्निध्य इ. कारणांनी हा रोग होतो. यामुळे सुरवंटाची त्वचा काहीशी नाजूक व चमकदार होणे, शरीर फुगून पिवळे होणे, वसा कोशिकांचा नाश होणे, पू तयार होणे, इ. या रोगाची लक्षणे आहेत. शरीराखालील व दोन वलयांमधील भागांस सूज येते. कोशावरण ज्या रंगाचे असते त्या रंगाचा पू तयार होतो. अळी बांबूच्या काडीप्रमाणे दिसते. वरील रोगकारक कारणे टाळणे, योग्य प्रकारचे वायुवीजन राखणे, निर्जंतुकीकरण वगैरे उपायांनी या रोगाला आळा घालता येतो. यास कावीळ म्हणातात. तसेच न्यूक्लिअर पॉलिहेड्रॉसिस हेही नाव आहे. 


यांशिवाय गॅटीन व इतर सूक्ष्मजंतुजन्य रोगही रेशमाच्या किड्याला होतात पण ते गौण आहेत. तसेच यांना ऊझी माशी, खार, मुंगी, पाल, उंदीर, पक्षी इ. प्राण्यांपासून उपद्रव पोहोचू शकतो. 

रेशमाचे गुणधर्म : रेशीम हा सर्वांत बळकट नैसर्गिक तंतू आहे. काही प्रकारच्या पोलादी तारांच्या मानानेही तो अधिक बळकट आहे. तो अतिशय लवचिक आहे. तसेच विशेष आर्द्रताशोषक असल्याने त्यावर रंग अधिक गडद व समृद्धपणे बसतो. अशा प्रकारे रेशमाचे कापड वजनाने हलके, उबदार, चमकदार, उंची व आकर्षक दिसते. रेशमाचे काही रासायनिक व भौतिक गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत. 

 

रासायनिक : रेशीम हे मुख्यत्वे फायब्रोइन (७० ते ८० टक्के) व सेरिसीन (२० ते ३० टक्के) या दोन प्रथिनांचे बनलेले असून यांशिवाय त्यात मेणे, रंगद्रव्य, राख इ. अल्प प्रमाणात असतात. सामान्यपणे फायब्रोइनाचे दोन तंतू सेरिसिनाने चिकटविले जाऊन रेशमाचा धागा बनलेला असतो. फायब्रोइन हे उभयधर्मी कलिल (अम्‍लीय व क्षारीय गुणधर्म दाखविणारे व अतिसूक्ष्म कण ज्यात लोंबकळत आहेत असे मिश्रण) आहे. क्ष-किरणांद्वारे याची स्फटिकीय रचना उघड होते. वीज व उष्णता यांचे ते मंदवाहक असून अल्कोहॉल, बेंझीन इ. कार्बनी विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) व पाणी यांत ते विरघळत नाही. मात्र यांमध्ये ते किंचित फुगते. थंड  आणि संहत (विद्रावातील प्रमाण अधिक असलेली) खनिजे अम्‍ले, दाहक क्षार (अल्कली) व अमोनियायुक्त कॉपर ऑक्साइड यांच्यात ते विरघळते. मात्र या विद्रावाचे ⇨उदासिनीकरण केल्यास ते साक्याच्या व काहीशा बदललेल्या रूपात त्यांतून बाहेर पडते.

सेरिसीन हे प्रथिन फायब्रोइनापेक्षा रासायनिक दृष्ट्या अधिक क्रियाशील आहे. गरम पाणी, अम्‍ल किंवा क्षार विद्रावाद्वारे हे फायब्रोइनापासून वेगळे काढता येते. 

गरम ॲसिटिक व फॉर्मिक अम्‍लांचा तसेच ऑक्झॅलिक, सायट्रिक, टार्टारिक इ. कार्बनी अम्‍लांचा रेशमावर सावकाश परिणाम होतो. काही रसायनांत घालून तापविले असता रेशीम विरघळते, तर काहींत त्याचा रंग बदलतो.

भौतिक : कच्चे रेशीम पिवळसर रंगाचे व काहीसे मंद चकाकी असलेले असते. मात्र त्यातील चिकट पदार्थ काढून टाकल्यास ते चमकदार , मऊ व पांढरट दिसते. सूक्ष्मदर्शकाखाली रेशमाचा धागा भरड, खडबडीत पृष्ठाचा दिसतो. त्यातील सेरिसिनाच्या थरावर घड्या, तडे पडून तो ओबडधोबड झालेला दिसतो. ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावत असलेल्या) प्रकाशात पाहिल्यास तो वर्णविलास दाखवितो. रेशमाचा काटच्छेद सामान्यतः काहीसा त्रिकोणी दिसतो. सर्व नैसर्गिक तंतूंमध्ये रेशमाचे ताणबल सर्वाधिक (दर चौ. सेंमी. ला ४,४९५ किग्रॅ.) आहे. मर्यादित ताणाखाली याची स्थितिस्थापकता २० टक्के असते म्हणजे ताणले असता रेशमाची लांबी / वाढते व ताण काढून घेतल्यावर त्याची लांबी पहिल्याइतकी होते आणि त्याची तन्यता दर डेनियरला ३.७५ ग्रॅ. असते (‘डेनियर’ याचे स्पष्टीकरण ‘सूत’ या नोंदीत पहावे). कच्च्या रेशमाचे वि. गु. १.३३ तर प्रक्रिया केलेल्या पक्क्या रेशमाचे वि.गु. १.२५-१.२७ एवढे असते. रेशमाचा धागा दाबला असता एक प्रकारचा आवाज येतो. रेशमाची जलशोषणक्षमता ३० टक्के आहे म्हणजे ते स्वतःच्या वजनाच्या ३० टक्के वजनाएवढे पाणी शोषून घेते. मात्र तरीही ते स्पर्शाला ओलसर लागत नाही. रेशमाचा ज्वलनांक १४० से. असून ११० से. तापमानाला १५ मिनिटे उकळल्यास ते पिवळट होते आणि १६७ से. ला त्याचे अपघटन होते (घटक द्रव्ये अलग होतात). ज्वालेत धरल्यास रेशीम वितळून त्याची गुठळी बनते व जळते. ज्योतीबाहेर काढल्यास विझून मागे राख रहाते. रेशीम जळताना केस वा पीस जाळल्यासारखा वास येतो व त्यामुळे ते वनस्पतिज तंतूंपेक्षा वेगळे ओळखू येते. 


रेशमाची शोषणक्षमता लोकरीपेक्षा जास्त असल्याने लोकरीपेक्षा कमी तापमानाला यावर रंग बसतो. परिणामी रेशमाला गडद व आकर्षक रंग देता येतात. अशा प्रकारे काही रासायनिक परीक्षा व सूक्ष्मदर्शकीय निरीक्षण यांच्याद्वारे लोकर तसेच वनस्पतिज तंतू यांपासून रेशीम वेगळे ओळखू येते. 

जंगली रेशमाचा धागा अधिक भरड व चापट असतो. त्यात उभे स्तर दिसतात. यांत्रिक वा रासायनिक क्रिया करताना कधीकधी  या स्तरांना अनुसरून धागा फाटतो. यातील फायब्रोइन वरीलसारखेच असते मात्र रासायनिक प्रक्रियेला त्याच्याकडून कमी विरोध होतो.

धागा व कापड निर्मिती : यामध्ये कोशावरणातील तंतू उलगडून चातीवर वा रिळावर गुंडाळणे, कातीव रेशीम तयार करणे, धाग्याला पीळ देणे, कापड विणणे व अंतिम संस्करण करणे या प्रक्रिया येतात. 

उलगडून धागा गुंडाळणे : (रिलिंग).  सुरवंटासह कोशावरणाचे वजन ०.४ ते २ ग्रॅ असते व यापैकी रेशमाचे वजन / असते. १ किग्रॅ. वजनाच्या कच्च्या रेशमाकरिता सु. ८ ते १२ किग्रॅ. कोशावरणे लागतात. सामान्यतः कोशावरणातील / रेशीम उलगडून रिळावर गुंडाळता येते व त्याची लांबी ५०० ते १,२०० मी. असू शकते. कोशावरणावरचा सुरुवातीचा आणि अखेरचा धागा बारीक असतो व बळकट नसतो. त्यामुळे तो टाकाऊ ठरतो. सामान्यतः मध्यभागाकडे तो अधिक जाड व बळकट होत जातो. कोशावरणातील धागा सुटा करून तो गुंडाळणे ही रेशीम उद्योगातील वैशिष्ट्यपूर्ण व महत्वाची प्रक्रिया आहे. रेशमाचे तंतू बारीक असतात. त्यामुळे ते हाताळणे अवघड असते, म्हणून एकावेळी अनेक (३-१०) तंतू एकत्रित गुंडाळून हव्या त्या जाडीचे रेशीम व त्याच्या लडी तयार करतात. हे काम ज्या गिरणीत चालते तिला फिलेचर म्हणतात. हे काम नाजूक स्वरूपाचे असून त्यासाठी कौशल्याची व दक्षतेची गरज असते. अशा कुशल कारागिरांचे प्रशिक्षण पिढ्यान् पिढ्या वंशपरंपरेने होत आलेले दिसते. पुष्कळ ठिकाणी हे काम यंत्राद्वारे स्वयंचलित पद्धतीनेही केले जाते. 

रेशमाची अंतिम गुणवत्ता लक्षात घेऊन रंग, आकार, आकारमान व पोत यांनुसार कोशावरणांची वर्गवारी केलेली असते. तसेच भोके पडलेली, गुंडाळता न येणारी व जोड कोशावरणे बाजूस काढून ठेवलेली असतात. उलगडावयाची कोशावरणे १०-१२ मिनिटे पाण्यात उकळतात. यामुळे चिकट सेरिसीन मऊ होते. या टप्प्यात फक्त एकच टक्का सेरिसीन निघून जाते व उरलेल्या सेरिसिनाच्या संरक्षक थराने पुढील प्रक्रियांमध्ये नाजूक धाग्याची खराबी होत नाही. 

ज्या कामासाठी रेशीम वापरायचे असेल त्यानुसार धाग्याची जाडी म्हणजे किती कोशावरणांतील तंतू एकत्र करावयाचे ते ठरवितात. पाण्यात तरंगत असणाऱ्या आवश्यक तेवढ्या कोशावरणांवरील तंतू एकत्र करतात. ते पोर्सलिनाच्या मण्यांमधून (सुईच्या नेढ्यासारख्या बारीक गोलसर छिद्रांतून) व कप्पीवरून नेऊन वर ओढले जातात आणि रिळावर किंवा चातीवर गुंडाळले जातात. अशा तऱ्हेने सेरिसिनाने चिकटलेला एकसंध व गोलसर असा अखंड धागा गुंडाळला जातो. चातीवर धागा जलदपणे गुंडाळला जात असताना कामगार धाग्याची जाडी एकसारखी राहील यावर बारीक लक्ष ठेवतो. एका कोशावरणावरील धागा संपला की, तो नवीन कोशावरणाचा धागा धावत्या धाग्याला जोडतो. अशा प्रकारे कोशावरणांची संख्या नियंत्रित करून तो धाग्याची जाडी एकसारखी राखतो. या कामगाराची धागा जोडण्याची कुशलता विलक्षण असते. गुंडाळलेल्या अशा उपयुक्त धाग्याची सलग लांबी सामान्यपणे ३०० ते ७०० मी. असते व त्याला कच्चे रेशीम म्हणतात. 

रीळ वा चात्या यांच्यावरील रेशमाच्या आवश्यक त्या लांबीच्या, वजनाच्या व परिघाच्या लडी तयार करतात. अशा १५-३० लडींचे लहान जुडगे (२.३ ते ४-६ किग्रॅ.) (वा पट्‌ट्या) बनवितात. या सु. ३० जुडग्यांच्या गाठी (५० ते ६५ किग्रॅ.) बांधतात. सामान्यतः गाठींच्या रूपातच कच्‍च्या रेशमाचा व्यापार होतो. जपान, चीन, उ. व द. कोरिया, भारत, रशिया व ब्राझील हे कच्चे रेशीम निर्मिणारे प्रमुख देश आहेत.  


कातीव रेशीम : पतंग बाहेर पडून भोके पडलेली व खराब झालेली कोशावरणे, कोशावरणांचे प्रारंभीचे व अखेरीचे निस्तेज व ओबडधोबड रेशीम गुंडाळताना व इतर प्रक्रिया करताना तुटलेले रेशमाचे तुकडे व गुंडाळता न येणारा कोशावरणाचा भाग या सर्वांना उर्वरित रेशीम म्हणतात. असे रेशीम पिंजून, विंचरून व कातून बनविण्यात येणाऱ्या धाग्याला कातीव रेशीम म्हणतात. भारत व इतर पौर्वात्य देशांत असे रेशीम हातांनी विंचरून त्यापासून चरख्यावर रेशीम कातण्यात येते. इतर देशांत याच्या कताई यंत्राचा शोध लागण्यापूर्वी हे नष्ट करीत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अशा रेशमाचे २० टक्के चिकट पदार्थयुक्त व चिकट पदार्थरहित असे प्रकार मानीत. आता तसा भेद करीत नाहीत. 

कातीव रेशीम हे शुद्ध रेशीमच असते. काही रेशमी, सुती व लोकरी वस्त्रांमध्ये भरण धागा म्हणून याचा वापर होतो. असे कापड सदरे, पोलकी वगैरेंसाठी वापरतात. रेशमी ट्‌वीड तसेच शिलाईचे व भरतकामाचे दोरे बनविण्यासाठीही कातीव रेशीम वापरतात. कातीव रेशमावर संस्करण केल्यावर मागे रहाणाऱ्या आखूड तंतूंना नॉइल म्हणतात. त्यांचा इतर तंतूंच्या बरोबर वापर करतात किंवा त्यांच्यापासून जाडाभरडा धागा काततात. अशा धाग्यांचे विणलेले एक प्रकारचे कापड तोफेच्या दारूसाठी पिशव्या बनविण्याकरिता वापरीत कारण रेशीम हा प्रथिनाचा तंतू असल्याने जळाल्यावर याच्या राखेची काळसर, मऊ गोळी बनते व ती तोफेच्या नळीतून सहजपणे काढून टाकता येते. परिणामी मागे राख राहून तोफेची यंत्रणा बिघडण्याचे भय उरत नाही. अशा आखूड तंतूंचे कापड इतर कापड शोभिवंत करण्यासाठीही वापरतात. 

 

पीळ देणे : उलगडून गुंडाळलेले कच्चे रेशीम कोशावरणावरील रेशमापेक्षा अधिक बळकट असले, तरी चांगले कापड विणण्याच्या दृष्टीने ते पुरेसे बळकट आणि एकसारखे नसते म्हणून त्याला पीळ देऊन धागा एकसारख्या जाडीचा व अधिक बळकट करण्यात येतो. यासाठी कच्‍च्या रेशमाच्या एका धाग्याला अधिक पीळ देतात किंवा अनेक धागे, एकत्रित करून त्यांना आवश्यक तसा उलट वा सुलट पीळ देतात. कोणते कापड विणायचे आहे त्यानुसार धाग्यांची संख्या व पिळाचे प्रमाण ठरवितात. प्रत्येक पिळाला फेरा म्हणतात व ठराविक लांबीत (उदा., १ सेंमी. मध्ये) जेवढे जास्त फेरे तेवढी धाग्याची आकसण्याची क्षमता अधिक असते.

रंग, लांबी आणि वजन यांनुसार कच्‍च्या रेशमाच्या लडी वेगळ्या केलेल्या असतात. अशा लडी साबणाच्या तेलयुक्त गरम  पाण्यात सु. ८ तास भिजवितात. धाग्यावरचे चिकट सेरिसीन मऊ झाल्याने धागा सहज वळतो व प्रक्रिया करताना सहजपणे हाताळता येतो. अशा लडी पाण्यातून काढून वाळवितात आणि धागे सुटे करतात. नंतर लडी फाळक्यांवर (रिळांवर) घालतात व त्यांवरून चात्यांवर गुंडाळतात. 

जुळवून घेणे, दोन वा अधिक धागे एकत्र करून त्यांना एका इंचात (१ इंच = सु. २.५ सेंमी) किमान पाच फेरे येतील इतका पीळ देणे आणि पीळ दिलेल्या धाग्याच्या लडी, शंकू वा कांड्या तयार करणे हे प्रक्रियेतील चार टप्पे आहेत. सुधारित यंत्रात सहा पदरी धाग्याला पीळ देता येतो व त्यात मिनिटाला १,८०० फेरे या वेगाने १३/१५  डेनियरचे सूत तयार होते. अशा २,८६,२०० मी. इतक्या लांब धाग्याचे वजन जवळजवळ अर्धा किग्रॅ. भरते. पीळ दिलेल्या धाग्याचा व्यास एकसारखा होण्यासाठी कधीकधी धागा रुळांमधून नेण्यात येतो. नंतर त्याची तपासणी करून लडी व लडींच्या गाठी तयार करतात. 

सैलसर पीळ दिलेल्या ट्रॅम धागा, असे अनेक धागे एकत्रित करून पीळ दिलेला ऑर्गनाइझ धागा आणि पीळ दिलेला क्रेप धागा हे रेशमाच्या कापडासाठी वापरले जाणारे धाग्यांचे तीन मुख्य प्रकार आहेत. 

ट्रॅम प्रकारात दोन वा अधिक धागे एकत्र करून दर इंचात थोडेच फेरे येतील अशा तऱ्हेने पीळ देतात. बाणा (विणकामातील आडवा धागा) वा भर म्हणून असा धागा वापरतात. 


कमी पीळ दिलेले दोन वा अधिक धागे एकत्रित करून त्याला उलट दिशेने दर इंचास दोन फेरे वा दुप्पट पीळ देतात. अशा धाग्याच्या लडीचा चिकट पदार्थ काढून टाकून त्यांचा ताणा (विणकामातील उभा धागा) म्हणून उपयोग करतात. 

दर इंचास ४० ते ८० फेरे एवढा पीळ दिलेल्या धाग्याला क्रेप म्हणतात. शिफॉनसारख्या कापडात त्याचा भर वा ताणा म्हणून उपयोग करतात. तसेच कच्‍च्या रेशमाबरोबर पीळ न देता याचा ताणा वापरून क्रेपसारखे अपारदर्शक कापड बनवितात. या धाग्याला सुलट वा उलट पीळ देतात. भर अथवा ताणा म्हणून याचा प्रत्येक पिळाचा धागा कापडात एकाआड एक असा येतो. चिकटपणा घालविण्याच्या प्रक्रियेत सुटे झालेले दोन धागे विरुद्ध दिशांनी ओढून कापडाला क्रेप परिणाम आणतात. यामुळे धागे आकसून कापडही  आकसते. ओळखता यावेत म्हणून उलट व सुलट पिळाचे धागे अलग रंगांचे वापरतात. चिकट पदार्थ काढून टाकतात हे कच्चे रंग निघून जाऊन त्यावर रंजनक्रिया करणे सुलभ होते. 

शिलाईसाठी वापरण्यात येणारा रेशमी धागाही पीळ देण्याच्या प्रक्रियेने तयार करतात. अर्थात  यावर अन्य क्रियाही करतात. यासाठी वेगळी यंत्रसामग्री वापरतात. असा दोरा तयार करताना काळजी घेतात. प्रक्रिया नाजूक रीतीने करण्यात येते आणि दोऱ्यामध्ये गाठी रहाणार नाहीत याची दक्षता घेतात. [⟶ दोरा-२]. 

कापडनिर्मिती : रेशमाचा धागा मागावर वा सुयांनी विणून रेशमी कापड तयार करतात. 

मागावर विणलेले कापड : पीळ दिलेल्या वा न दिलेल्या रेशमाच्या लडी, चात्या, शंकू वगैरेंचा ताणा व बाणा यांसाठी उपयोग करतात. रेशमी कापड विणण्यासाठी वापरण्यात येणारे माग सुती वा लोकरी कापडासाठी वापरण्यात येणाऱ्या मागांसारखे असतात. बहुतेक देशांत यंत्रमाग अधिक प्रमाणात वापरण्यात येतात पण हातमागही वापरले जातात. जकार्ड मागावर सुंदर नक्षीकाम व आकृतिबंध विणता येतात व रेशमी कापडासाठी बहुधा हेच माग वापरले जातात. रेशमाच्या कापडाचे विणकाम नाजूक असल्याने ते काळजीपूर्वक करावे लागते. मागावर कच्चे रेशमी कापड तसेच साड्या, पैठण्या, कद, पीतांबर वगैरे वस्त्रेही विणण्यात येतात. [⟶ विणकाम]. 

सुयांनी करावयाचे विणकाम : याचे ट्रायकॉट व मिलानीझ असे दोन प्रकार आहेत आणि हातांनी वा यंत्राने ते करतात. दर्शनी भागावर नाजूक उभे फास व मागील बाजूवर फुलीसारखी  रेषांकित नक्षी हे ट्रायकॉट प्रकारचे वैशिष्ट्य असून यामुळे कापड पट्टेदार दिसते. मिलानीझ प्रकारात धागा तिरक्या दिशेत जातो व अधूनमधून तो आत जाऊन वर आलेला असतो. दर्शनी भागावर लांबट उंचवटे तर मागील बाजूवर चौकटीच्या आकाराची नक्षी हे या कापडाचे वैशिष्ट्य आहे. यावर छपाईही करतात. दोन्ही प्रकारचे कापड स्त्रियांची वस्त्रे व होजियरी यांसाठी वापरतात. [⟶ होजियरी]. 

संस्करण : रेशमी धाग्यावर अथवा कापडावर पुढील प्रकारची संस्करणे करतात : चिकट पदार्थ काढून टाकणे, रंगविणे, छपाई आणि अंतिम संस्करण. पैकी पहिली दोन संस्करणे वस्त्राच्या प्रकारानुसार विणण्यापूर्वी वा नंतर म्हणजे लडी किंवा कापड यांवर तर अखेरची संस्करणे कापडावर करतात.

 

चिकट पदार्थ काढून टाकणे : पीळ दिल्यावरही रेशमावर पुष्कळ सेरिसीन राहिलेले असते. रंगविण्यापूर्वी व अंतिम संस्करणापूर्वी रेशमावरील हा डिंकसदृश चिकट पदार्थ काढून टाकणे आवश्यक असते. यासाठी पाण्यामध्ये उदासीन (अम्‍लीय वा क्षारीय नसलेल्या) साबणाचा एक टक्का विद्राव करून त्यात रेशमाच्या लडी बुडवून ठेवतात. या विद्रावाचे तापमान उकळबिंदूपेक्षा थोडे कमी ठेवतात आणि लडी अधूनमधून फिरवितात. कापडही याच रीतीने उकळतात. एका तासानंतर याच्या निम्‍मा साबण असलेल्या दुसऱ्या विद्रावात लडी वा कापड टाकतात. या दुसऱ्या विद्रावाच्या कुंडातून काढलेल्या लडी वा कापड ⇨ केंद्रोत्सारणाने सुकवितात. या सर्व प्रक्रिया करताना नाजूक रेशीम खराब होऊ नये म्हणून लडी वा कापड जास्त खळबळविले जाणार नाही अशी काळजी घेतात. योग्य प्रकारे ही क्रिया केलेल्या रेशमाचे २० ते २७ टक्के वजन चिकट पदार्थ निघून गेल्याने घटते. सेरिसीन निघून गेल्याने रेशमाला त्याचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होते म्हणजे रेशमाला मोत्याप्रमाणे मंद रूपेरी चमक व तलम मऊसूत पोत प्राप्त होतो. अशा रेशमाच्या धाग्यावरून प्रकाशाचे परावर्तन होऊ लागल्याने त्याला एक प्रकारची झळाळी येते. कधीकधी हायड्रोजन पेरॉक्साइडाने रेशमाचे विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करतात. 


 रेशमाच्या वजनातील घट भरून काढण्यासाठी व कापडाचा पोत घट्ट होण्यासाठी क्वचित कथिल व शिसे यांच्या संयुगांनी संस्करण करण्यात येते. या प्रक्रियेस भारणी म्हणतात. मुळ वजनापेक्षा भारणीनंतरचे वजन जास्त असल्यास प्रभारणी, तेवढेच राहिल्यास समभारणी व कमी झाल्यास अवभारणी असे म्हणतात. मात्र यामुळे रेशमाची किंमत कमी होते व याचे कापड अधिक सहज फाटते. यूरोपात व जपानमध्ये अशा तऱ्हेने ठराविक मर्यादेपर्यंत जड केलेले रेशीम अल्प प्रमाणात तयार करण्यात येते. मात्र किती प्रमाणात असे वजन वाढले आहे ते कापडावर निर्देशित करावे लागते [⟶ कापडावरील अंतिम संस्करण].

 रंजनक्रिया : रेशमाला रंजकद्रव्यांची विशेष आसक्ती असते व त्यामुळे रेशीम वा कापड रंगविण्याचे काम कुशलतापूर्वक करावे लागते. ही क्रियासुद्धा वस्त्राच्या प्रकारानुसार रेशमावर वा त्याच्या कापडावर करतात. याविषयीचे कौशल्य वंशपरंपरा चालत आलेले असते व ते त्या त्या रंगाऱ्याचे वैशिष्ट्य ठरते. रेशीम क्षारधर्मी (बिस्मार्क ब्राउन), अम्‍लधर्मी (मेटॅनीन यलो) आणि उदासीन रंजकद्रव्यांनी रंगवितात. त्यासाठी वनस्पतिज रंगद्रव्येही वापरतात. तथापि ज्यांच्यासाठी रंगबंधकाची गरज असते अशी रंजकद्रव्ये रेशमाच्या रंगणासाठी सहसा वापरीत नाहीत. [⟶ रंजनक्रिया]. 

 

छपाई : पहिल्या महायुद्धानंतर काही काळपर्यंत रेशमी कापडावर हातछपाई किंवा ठसा छपाई करीत. ही छपाई अतिशय कुशलतेने करावी लागते आणि अजूनही ती थोड्या प्रमाणात केली जाते. इतर कापडांसाठी वापरल्या जाणाऱ्या छपाईच्या सर्वसाधारण पद्धतीच रेशमी कापडासाठीही वापरतात. जाळी (स्क्रीन) छपाईने ठसा छपाईचा परिणाम साधता येतो मात्र ती अधिक महाग पडते. हिच्यात प्रत्येक रंगासाठी वेगळी जाळी वापरतात. हिच्याद्वारे विविधता असलेले नक्षीकाम करता येते व अधिक भडक रंग देता येतात. तसेच या छपाईत कितीही रंग वापरता येऊ शकतात मात्र रूळ छपाईपेक्षा हिला अधिक वेळ लागत असल्याने सामान्यपणे ठराविक नक्षीकाम थोड्या प्रमाणात करायचे असल्यास ही पद्धत वापरतात. 

तांब्याच्या कोरीव नक्षीदार रुळांनी रेशमी कापडावर छपाई करतात. या पद्धतीतही नक्षीतील प्रत्येक रंगासाठी वेगळा रूळ असतो. एकरंगीपासून दहा रंगांपर्यंतची नक्षी हिने छापता येते. नक्षी दोन तऱ्हांनी छापली जाते म्हणजे सरळ नक्षी उमटविली जाते किंवा छपाईनंतर नक्षी व रंग रासायनिक विक्रियेद्वारे विकसित केले जातात. [⟶ कापड छपाई]. 

अंतिम संस्करण : रंगविलेल्या आणि छापलेल्या रेशमी कापडावर अंतिम संस्करण केल्यास अथवा शेवटचा हात फिरविल्यास त्याला तलमपणा, नरमपणा व विशिष्ट प्रकारची झळाळी प्राप्त होते. अंतिम संस्करण केल्याने चुण्या पडणे, घामाचे वा पाण्याचे डाग पडणे यांसारख्या कापड खराब करणाऱ्या गोष्टींपासून कापडाचे रक्षण होते. अत्यल्प प्रमाणातील स्टार्च, सल्फॉनीकृत तेले, ग्‍लिसरीन, रेझीन आणि विविध प्रकारची कार्बनी संयुगे यांचा स्वतंत्रपणे वा एकत्रितपणे अंतिम संस्करणासाठी वापर करण्यात येतो. यामुळे कापड मऊसूत व वेधक होऊन त्याला अपेक्षित असा रेशमी स्पर्श व दिमाख प्राप्त होतो. अंतिम संस्करणामुळे कापडावर सुरकुत्या रहात नाहीत, ते आकसत नाही व त्याचा पन्हा एकसारखा रहातो. रेशमाचा धागा मुळातच बळकट आणि लवचिक असल्याने अंतिम संस्करणात रेशमी कापड कुशलतेने हाताळण्यात पुरेसा अवसर मिळतो. [⟶ कापडावरील अंतिम संस्करण]. 

 

कापडाचे प्रकार : रेशमी कापडाचे अनेक प्रकार व उपप्रकार असून ते फार पूर्वीपासून तयार करण्यात येत आहेत. पैकी टफेटा, सॅटीन, शिफॉन, क्रेप, क्रेप द शिने, शॅटुंग, सुरा, ऑर्गन्झा व फाइली हे अधिक प्रमाणात वापरात असलेले लोकप्रिय प्रकार आहेत. हे प्रकार धागा रंगवून, कापड रंगवून अथवा या दोन्ही प्रकारे तयार केले जातात. 

यांव्यतिरिक्त भारतात साडी, धोतर, कद, पैठणी, पीतांबर, टाय व मफलर कापड, शर्ट व सूट यांचे कापड, भरतकाम केलेले कापड, शाली, गालिचे, ब्रोकेड इ. विविध प्रकारचे कापड किंवा वस्त्रे तयार करण्यात येतात. [⟶ गालिचे पैठणी वस्त्रे शाल साडी]. 


जागतिक उद्योग : बऱ्याच देशांत रेशमाचे उत्पादन होते. १९७८ पर्यंत यामध्ये जपानचा व तदनंतर चीनचा पहिला क्रमांक होता. १९७८ साली जपानचे उत्पादन जगाच्या ५५ टक्के होते आणि तदनंतर चीन, रशिया, भारत व द. कोरिया हे या उत्पादनातील अग्रेसर देश होते. रेशमाच्या जागतिक उत्पादनात पुढीलप्रमाणे वाढ होत गेली : १९६० साली सु. ३१,००० १९७० साली ४१,००० व १९८० साली सु. ६४,१०० टन. १९८५ मध्ये ५६,७२७ टन उत्पादन झाले व त्यापैकी चीनमध्ये ३३,००० टन झाले. आंतरराष्ट्रीय व्यापारात कच्च्या रेशमाचे स्थान महत्वाचे आहे. मात्र एकूण जागतिक कापड उद्योगात रेशमी कापडाचा वाटा ०.२ टक्का एवढाच आहे. रेशमी कापड हे अजूनही श्रीमंतीचे तसेच पोशाखाचे सौंदर्य, सुबकपणा व आकर्षकता यांचे प्रतीक मानले जाते. काही कृत्रिम तंतूंमध्येही रेशमाची गुणवत्ता आणण्यात यश आले असून होजियरीत नायलॉनने रेशमाची जागा काबीज केली आहे. तथापि, रेशमाचे कित्येक गुण नायलॉनमध्ये आढळत नाहीत. ‘मुगा’ रेशमाच्या बाबतीत भारताची मक्तेदारी आहे व त्याची निर्यातही होते. जागतिक रेशमाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या देशांचे उत्पादन कोष्टक क्र. १ मध्ये दिलेले आहे. 

  

               कोष्टक क्र. १. रेशमाचे जागतिक उत्पादन (टनांमध्ये) 

देश 

१९६० 

१९७० 

१९८० 

१९८२ 

जपान 

चीन 

रशिया 

भारत 

द. कोरिया

ब्राझील

इतर 

१८,०४८ 

७,००० 

२,१५८ 

१,१५४  

४७०

—-

२,३४० 

२०,५१५ 

११,१२४ 

३,००० 

२,२५८  

३,०२६

२५९ 

५०८ 

१६,१५५ 

३५,३६४ 

३,६०४ 

२,६२५  

३,४२२

१,००० 

१,९३८ 

१३,००० 

३८,४०० 

३,७०० 

२,६५०  

१,९७८

१,२०० 

२,२२६ 

एकूण 

३१,१७० 

४१,००० 

६४,१०८ 

६३,१५४ 

जपानच्या उत्पादनापैकी सु. ७०% रेशीम देशातच वापरले जाते व इतर निर्यात होते. जपाननंतर रेशमाचा वापर करणारे प्रमुख देश म्हणजे स्वित्झर्लंड, इटली, फ्रान्स, प.जर्मनी हे होत. रेशमाचा प्रतिवर्षी दरडोई वापर पुढीलप्रमाणे होतो : जपान २१७ ग्रॅ., स्वित्झर्लंड ३०.५ ग्रॅ., इटली, फ्रान्स व प. जर्मनी प्रत्येकी १५.३ ग्रॅ., अमेरिकेची संयुक्त संस्थाने ७ ग्रॅ. व द. अमेरिकेत १-२ ग्रॅ. यांशिवाय इतर देशांत व भारतात दरवर्षी, दरडोई होणारा रेशमाचा वापर नगण्य आहे. 

रेशमाच्या निर्यातीच्या बाबतीत प्रगत राष्ट्रांपेक्षा विकसनशील देश आघाडीवर आहेत. उदाहरणार्थ १९८० साली प्रगत राष्ट्रांची निर्यात विकसनशील राष्ट्रांच्या निर्यातीच्या केवळ ११.१ टक्केच होती. निर्यातीत चीन आघाडीवर असून त्यापाठोपाठ द. कोरियाचा क्रमांक लागतो. रेशमाच्या आयातीमध्ये जपान अग्रेसर असून त्यापाठोपाठ अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, प. जर्मनी, फ्रान्स, चीन व स्वित्झर्लंड यांचा क्रमांक लागतो. भारताची रेशमाची आयात १९८० नंतर जवळजवळ स्थिर राहिली आहे. कोष्टक क्र.२ मध्ये जगातील रेशमाच्या आयाती-निर्यातीविषयीची आकडेवारी दिली आहे. 

भारतीय उद्योग : भारतात रेशीम उद्योग फार पुरातन काळापासून चालू आहे. रामायण, महाभारत इ. प्राचीन संस्कृत  ग्रंथांत रेशमाचा उल्लेख कौशिकम्‌ (कोशावरणापासून तयार करण्यात आलेले), चीनांशुक ह्या नावानी केलेला आढळतो. भारतातून रेशमी वस्त्रांची निर्यात यूरोप, मध्य-पूर्व आशिया, ईजिप्त इ. प्रदेशांत होत असे. रोमन साम्राज्य, यूरोप, मध्य-पूर्व आशिया, ईजिप्त हा प्रदेश भारतीय रेशमी वस्त्रांसाठी मोठी बाजारपेठ होती. रेशमाचे भरतकाम, विणकाम ही भारताची खास वैशिष्ट्ये असून भारतीय कारागीर त्यात खूपच वाकबगार होते. तसेच ह्या उद्योगाला राजाश्रय मिळाल्याने उद्योगास स्थैर्य प्राप्त झाले व त्यांची प्रगतीही झाली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय रेशीम जगात मौल्यवान व किंमती समजण्यात येई. या काळापर्यंत प्रतिवर्षी सु. १० लाख किग्रॅ. रेशीम व रेशमी वस्त्रे भारतातून निर्यात होत असत. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. १८७५ मध्ये आलेल्या मिरी रोगामुळे भारताच्या रेशीम उद्योगाची प्रचंड पिछेहाट झाली पण त्यातील कला मात्र पिढ्यान्‌पिढ्या कुटुंबात चालू राहिली. आजही बंगाली साडी, काश्मीर व म्हैसूर येथील रेशीम, बनारसी ब्रोकेड, सुरतेचे रेशमावरील जरीकाम  व कलाबुतकाम जगप्रसिद्ध आहे.


 चढ-उतार होऊन १९२० मध्ये रेशीम उद्योगाला पुनर्जीवन मिळाले पुढे १९३१ च्या महामंदीमुळे रेशीम उद्योग जगतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली. शेवटी १९३४ मध्ये त्या वेळच्या सरकारने दिलेल्या जकात माफीमुळे उद्योगाला संरक्षण मिळाले. तथापि १९३९ पर्यंत हा उद्योग जवळजवळ मृतावस्थेतच व नामशेष होण्याच्या मार्गावर होता. दुसऱ्या महायुद्धाने मात्र या उद्योगास बरेच उत्तेजन मिळाले. देशातील रेशमाचे सर्व उत्पादन संरक्षण खात्याने हवाई छत्र्यांसाठी खरेदी केले. जकात आयोगाने या उद्योगापुढील अडचणींचा अभ्यास करून त्याविषयीचे अहवाल शासनाला १९३८, १९४८, १९५१, १९५३, १९५८, १९६३ व १९६९ या साली दिले होते. त्यांनुसार आधी १९७५ पर्यंत व नंतर पुढेही उद्योगाला जकातविषयक संरक्षण देण्यात आले. 

इ. स. १९४५ मध्ये रेशीम विकास संचालनालयाची स्थापना झाली. उद्योगाच्या विकासासाठी मदत करणे व केंद्र सरकारच्या योजना राबविणे ही त्याची प्रमुख कार्ये होती. पुढे त्याचे केंद्रीय रेशीम मंडळात रूपांतर झाले (या मंडळासंबंधीची माहिती पुढे दिलेली आहे. 

पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीसच केंद्रीय रेशीम मंडळाला स्थैर्य प्राप्त झाल्याने या उद्योगाची झपाट्याने प्रगती झाली. रेशीम कृषिप्रधान व उद्योगप्रधान आहे. पहिली पंचवार्षिक योजना (१९५१-५६) ही सामान्यतः उद्योगप्रधान होती. त्यामुळे रेशीम उद्योगाची म्हणावी तशी प्रगती होऊ शकली नाही. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९५६-६१) या उद्योगासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या काळात कच्च्या रेशमाचे उत्पादन १.३७३ कोटी किग्रॅ. (१९५६) वरून १.४९९ कोटी किग्रॅ. (१९६१) इतके वाढले. कोशावरणापासून धागा वेगळा गुंडाळण्यासाठी पारंपारिक चरख्याऐवजी गुंडाळणी यंत्राचा (कॉटेज बेसीनचा) वापर करण्यात आल्याने रेशमाची गुणवत्ता सुधारली. आता तुती रेशीम चरख्यावर, सुधारित गुंडाळणी यंत्रावर आणि फिलेचर यंत्रावर तर बिगर सुती रेशीम प्रामुख्याने चरख्यावर गुंडाळले जाते. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९६१-६६) केंद्रीय रेशीम मंडळ व राज्य सरकारे यांनी कोशावरणे आणि कच्चे रेशीम यांबाबतच्या सहकारी संस्थांना  प्रोत्साहन देण्याकडे जास्त लक्ष पुरविले. त्यामुळे रेशीम गुंडाळणाऱ्याला योग्य मोबदला मिळू लागला व कच्च्या रेशमाच्या वाढत्या भरमसाठ किंमतीला आळा बसला. निरोगी बीज पुरवठा, तसेच तुतीसाठी खत-सिंचन योजनांचा पाठपुरावा करून तुतीच्या पानांची योग्य तऱ्हेने वाढ होण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले. गुंडाळणी यंत्राचा वापर करण्याने याला आणखी प्रोत्साहन मिळाले. तुती रेशमाचे उत्पादन वाढले व ३० लाखांपर्यंत कामगारांना अर्धवेळ रोजगार मिळू लागला. १९६६-६७ ते १९६८-६९ या तीन एकवार्षिक योजनांत मंडळाने टसर कोशावरणांच्या घसरत्या किंमती रोखून धरण्यासाठी अनेक उपाय योजले. चौथ्या पंचवार्षिक योजनेत (१९६९-७४) रेशमाचे उत्पादन वाढवून वा किंमती कमी करून देशापुरते पुरेसे उत्पादन करण्याचे कार्यक्रम योजले होते. या काळात जादा ४ लाख लोकांना रोजगार मिळाला. या योजनेअखेरीस रेशीम उत्पादन २·८९ कोटी किग्रॅ. झाले व निर्यात १२·१७ कोटी रुपयांची झाली. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या (१९७४-७८) अखेरीस कच्च्या रेशमाचे उत्पादन ३·६९३ कोटी किग्रॅ. झाले व निर्यात ३३·०६ कोटी रुपयांची झाली. सहाव्या योजनेत रेशमासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद केली होती व उत्पादन लक्ष्य सालीना ७५ लाख किग्रॅ. ठरविण्यात आले होते. १९८०-८१ च्या सुधारित योजनेत हे लक्ष्य ९० लाख किग्रॅ. ठेवण्यात आले व निर्यात १०० कोटी रुपयांची होईल, तर उद्योगात आणखी २१·५ लाख लोकांना रोजंदारी मिळेल, असे ठरविण्यात आले होते. तसेच तुती, एरी व मुगा यांच्याकरिता वेगवेगळ्या प्रशिक्षण व संशोधनात्मक संस्था काढण्यात आल्या.

कोष्टक क्र. २. रेशमाच्या जागतिक आयात-निर्यातीची आकडेवारी (वजन टनांत व किंमत हजार डॉलरमध्ये)

 

देश 

आयात 

निर्यात 

१९७८ 

१९७९ 

१९८० 

१९७८ 

१९७९ 

१९८० 

वजन 

किंमत 

वजन 

किंमत 

वजन 

किंमत 

वजन 

किंमत 

वजन 

किंमत 

वजन 

किंमत 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

९०२

८,६५७ 

 

७०९

११,०४६ 

 

४७७ 

६,८०७ 

 

चीन 

१३१ 

३,०१७ 

२९८ 

९,२४७ 

४०० 

१३,००० 

१२,२७८ 

२,४२,०५५

१२,०७८ 

२,९३,७१३

८,१५० 

२,१२,०००

हाँगकाँग 

५६९ 

१५,२१६ 

४५८ 

१०,३१५ 

३८३ 

९,४४९ 

४१९ 

१८,६९० 

१८४ 

४,८०४ 

१८४ 

४,३२४ 

भारत 

१५८ 

३,१४१ 

१८० 

३,७०० 

१८० 

४,००० 

१,६७० 

५,०८३ 

१,००० 

३,००० 

४५० 

१,८०० 

जपान 

११,९५५ 

२,७३,७८७ 

८,७५४ 

२,३६,८५० 

६,२१७ 

१,५९,६१५ 

१,७४५ 

९,३०३ 

९७९ 

७,५०५ 

५१७ 

२,६५१ 

सिंगापूर 

४८ 

८२१ 

१४४ 

४,२६३ 

१७३ 

५,७३६ 

२२ 

३६२ 

९३ 

२,९५७ 

८७ 

२,८५९ 

थायलंड 

८५ 

१,३१४ 

१३२ 

१,९५५ 

१०० 

१,८०० 

– 

– 

– 

– 

– 

– 

फ्रान्स 

१,४५० 

२३,८६२ 

१,११२ 

२४,४८८ 

८४५ 

२१,४६३ 

– 

– 

– 

– 

– 

– 

प. जर्मनी 

१,२७२ 

१०,८४४ 

९००

११,५३१ 

७१२ 

७,८२९ 

२६० 

१,५६२ 

३२१ 

२,८७० 

४३९ 

२,९५० 

इटली 

६,२५६ 

८०,८३६ 

६,८१८ 

१,३५,४८२ 

३,९६८ 

८२,७६४ 

११० 

१,२३० 

८१ 

२,३२२ 

९६ 

३,१२४ 

स्वित्झर्लंड 

५१८ 

९,५४४ 

४८५ 

९,९२४ 

४७३ 

९,९४० 

१५८ 

२,६९० 

९४ 

२,३०८ 

११० 

२,७८१ 

ब्रिटन 

४३२ 

३,८६५ 

३०७ 

४,१९७ 

१३६ 

४,५५५ 

– 

– 

– 

– 

– 

– 

रशिया 

– 

– 

– 

२,२०७ 

७,५६२ 

२,०७९ 

१०,४२० 

१,९१४ 

७,०५३ 

द. कोरिया 

 – 

– 

– 

२,४९९ 

६६,९४२ 

१,०६० 

४२,२१० 

६४६ 

२०,१९० 

बल्गेरिया 

– 

– 

– 

२३५

२,३५० 

४१७ 

५,००० 

१८५ 

२,२५० 

ब्राझील 

– 

– 

– 

३८१ 

१,२३५

३६६ 

१,२५६ 

९५० 

४,५०० 

उ. कोरिया

– 

– 

– 

९०० 

१३,००० 

६५०

११,००० 

९५० 

१७,५०० 


रेशीम उद्योग ही राज्य सरकारांच्या अखत्यारीतील बाब असून ती याविषयीचे विकास कार्यक्रम अंमलात आणतात. सुरवंटाच्या खाद्य वनस्पतींची वाढ व रेशमाच्या किड्यांचे संवर्धन ह्यांबाबतचे कार्यक्रम राज्यस्तरावर चालविले जातात. संगोपन, धागा गुंडाळणे व कताई यांत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येते. कोशावरणे व कच्चे रेशीम यांच्या बाजारपेठांबाबत सुधारणा इ. बाबींकडे लक्ष दिले जाते. कर्नाटक राज्य या उद्योगात भारतात सर्वांत आघाडीवर आहे.

कर्नाटक राज्याच्या तुती रेशीम उत्पादनात भारतात पहिला क्रमांक लागतो. या राज्यात सु. ६४ रेशीम केंद्रे असून त्यांपैकी ११ केंद्रे ही म्हैसूरच्या आसपास आहेत. तेथे किड्यांच्या संकराबद्दल प्रयोग केले जात आहेत. यांशिवाय तुतीची वाढ करणे, शेतकऱ्यांना रेशमाबद्दल सप्रयोग माहिती देणे व शिकविणे, धागा गुंडाळणी इ. कामेही येथे केली जातात. तसेच राज्यात सरकारी ८० निरोगी बीज केंद्रे (ग्रेनेज) व खाजगी ८३० केंद्रे आहेत. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून कोशावरणे विकत घेऊन १६० कोटी निरोगी अंडी उपलब्ध करून देण्यात येतात व त्यांपासून ३·२ कोटी  किग्रॅ. कोशावरणे तयार होतात. बहुबारी व दुबारी संकरज अंड्यांची गुणात्मक वसंख्यात्मक दृष्ट्या पैदास ह्या केंद्रांत करतात. ८० सरकारी केंद्रांपैकी फक्त चारच केंद्रे सुसज्‍ज असून त्यांत दुबारी संकरजांचे उत्पादन केले जाते. भारतातील तुती रेशीम उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन कर्नाटक राज्यात होते. त्यानंतर प. बंगाल, जम्मू व काश्मीर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र यांचा क्रम लागतो. तथापि महाराष्ट्राचे उत्पादन विचारात घेण्याइतपत नाही. बिगर तुती उत्पादनात टसर रेशीम महत्त्वाचे आहे. त्यात बिहार, मध्य प्रदेश, ओरिसा, प. बंगाल, आसाम असा क्रम लागतो. आसाम, प. बंगाल व केरळ येथे एरीचे उत्पादन होते, तर मुगा रेशमाबाबत भारताची मक्तेदारी असून ते फक्त आसामात तयार होते. उर्वरित रेशीम भारतातून निर्यात केले जाते. कोष्टक क्र. ३ भारतातील कच्च्या रेशमाचे उत्पादन, कोष्टक क्र. ४ मध्ये राज्यवार रेशमाचे उत्पादन, तर कोष्टक क्र. ५ मध्ये रेशमी वस्तूंची निर्यात दिली आहे.

कोष्टक क्र. ३. भारतातील कच्च्या रेशमाचे उत्पादन (टनांत)

 

तुती रेशीम 

बिगर तुती रेशीम 

एकूण 

 

फिलेचर 

सुधारित यंत्र 

चरखा 

ड्रुपियन 

एकूण 

टसर 

एरी 

मुगा 

एकूण 

१९७०-७१ 

१९७५-७६ 

१९८०-८१ 

१९८१-८२ 

१९८२-८३ 

२०० 

२४० 

— 

— 

— 

४६५ 

९३६ 

— 

— 

— 

१,६०७ 

१,३१२ 

— 

— 

— 

४७ 

५२ 

— 

— 

—  

२,३१९ 

२,५४१ 

४,५९३ 

४,८०१ 

५,४८८ 

३७१ 

३६० 

३६५ 

२५७ 

— 

१६१ 

१२३ 

१३५ 

१४७ 

— 

६३ 

४३ 

४८ 

४४ 

— 

५९५ 

५२६ 

४४८ 

४४८ 

४८९ 

 

२,९१४ 

३,०६७ 

५,०४१ 

५,२०९ 

५,९७७ 


कोष्टक क्र. ४. भारतातील राज्यवर रेशीम उत्पादन (टनांत)

 

राज्य 

१९८०-८१ 

 

१९८१-८२ 

तुती 

टसर 

एरी 

मुगा 

 

तुती 

टसर 

एरी 

मुगा 

आंध्र प्रदेश 

आसाम 

बिहार 

हिमाचल प्रदेश 

जम्मू व काश्मीर 

कर्नाटक 

मणिपूर 

तमिळनाडू 

पं. बंगाल 

उत्तर प्रदेश 

मध्य प्रदेश 

इतर 

७९७ 

७ 

१ 

१ 

७६ 

२,८७८ 

५ 

४६७ 

३५५ 

५ 

— 

१ 

१ 

— 

१६८ 

— 

— 

— 

२० 

— 

९ 

— 

६५ 

२ 

— 

११० 

८ 

— 

— 

— 

९ 

— 

७ 

— 

— 

१ 

— 

४८ 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

 

५९४ 

११ 

७ 

२ 

७६ 

३,००० 

५ 

५३० 

५ 

५ 

— 

१ 

१ 

— 

१७० 

— 

— 

— 

२० 

— 

११ 

— 

५३ 

२ 

— 

११६ 

१३ 

— 

— 

— 

९ 

— 

८ 

— 

— 

१ 

— 

४४ 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

— 

एकूण 

४,५९३ 

२६५ 

१३५ 

४८ 

 

४,८०१ 

२५७ 

१४७ 

४४ 

कोष्टक क्र. ५. भारतातून वस्त्रे, रेशमी वस्तू इत्यादींची होणारी निर्यात

(परिणाम लक्ष चौ.मी. मध्ये व किंमत लक्ष रुपयांस)

 

१९७० -७१ 

१९७५-७६ 

१९८०-८१ 

१९८१-८२ 

 

परिमाण 

किंमत 

परिमाण 

किंमत 

परिमाण 

किंमत 

परिमाण 

किंमत 

साड्या 

मफलर / स्टोल

वस्त्रप्रावरणाचे कापड 

तयार कपडे 

गालिचे 

 

इतर 

६·०२ 

३४·३२ 

११·५४ 

 

२·३७ 

— 

 

१·२६ 

१०९·३३ 

४४८·४७ 

२२५·५४ 

 

६२·४१ 

उपलब्ध नाही 

४०·८० 

१४·५० 

२६·३५ 

९·१० 

 

३·१७ 

— 

 

०·४३ 

४६०·१३ 

४७७·२० 

२७४·४० 

 

९५·५१ 

नगण्य 

 

४९·३० 

— 

— 

— 

 

— 

— 

 

— 

१,०३८·८१ 

५८६·२२ 

१,२१८·३६ 

 

६१७·५४ 

९२२·९२ 

 

२८७·७५ 

— 

— 

— 

 

— 

— 

 

— 

१,२४१·७५ 

६०१·४५ 

२,०४६·०९ 

 

७९५·८८ 

१,१४०·४० 

 

३०५·२६ 

एकूण 

५५·५१ 

८८६·४० 

५२·८६ 

१,४०८·०५ 

— 

४,६७१·६० 

— 

६,१३०·५३

 


 भारतात कच्च्या रेशमाची आयात करण्यात येते. आयातीची आकडेवारी कोष्टक क्र. ६ मध्ये दिली आहे.

कोष्टक क्र. ६ भारतात होणारी कच्च्या रेशमाची आयात 

वर्षे 

वजन (टन) 

किंमत (लक्ष रूपये) 

१९७७-७८

१९७८-७९

१९७९-८०

१९८०-८१

१९८१-८२

१९८१-८३

१६२

१७६

३६६

४०४

१९३

२५१

२६५·००

२८४·७७

५५५·४१

६५४·००

३९१·००

५५४·००

मानकीकरण व गुणवत्ता नियंत्रण : भारतीय मानक संस्थेने कच्च्या रेशमाच्या प्रतवारीसाठी व परीक्षणासाठी आयएस २,९३८ ते २,९४८ अशी मानके ठरविली आहेत. सर्व कच्च्या रेशमांची वर्ग -१, वर्ग-२ आणि वर्ग-३ अशी प्रतवारी करण्यात आली आहे. यांची परत उपवर्गवारी केली आहे.

भारतातील रेशमाची गुणवत्ता ते चरख्यांवर गुंडाळण्यात येत असल्याने किमान आहे. भारतीय रेशीम एकसंध व एकसारखे नसून त्याची जाडी अनियमित असून त्यातील चिकट पदार्थाचा जास्त नाश झालेला असतो आणि ते कमी जास्त चमक असलेले  असते, अशा तक्रारी आल्या आहेत. फिलेचर रेशीमही नीचतम गुणवत्तेचे असून ते आंतरराष्ट्रीय मानकाच्या कमीत कमी गुणवत्तेच्या जवळही येऊ शकत नाही. हे सर्व दोष कमी गुणवत्तेची कोशावरणे, गुंडाळण्याची अकार्यक्षम प्रक्रिया व अपुरे गुणवत्ता नियंत्रण यांमुळे उद्‌भवतात. गुणवत्ता नियंत्रण आणि परीक्षण यांसाठी म्हैसूर व कलकत्ता येथे केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

केंद्रीय रेशीम मंडळ : १९४५ मध्ये सरकारने रेशीम विकास संचालनालयाची स्थापना केली. तसेच उद्योगाची वाढ होण्यासाठीच्या विकास कार्यक्रमांबद्दल सल्ला देण्यासाठी एक मंडळ नियुक्त केले. या मंडळाच्या सूचनेनुसार सर्व भारतभर या उद्योगाला चालना मिळावी म्हणून १९४९ मध्ये केंद्रीय रेशीम मंडळाची स्थापना करण्यात आली. हे एक स्वायत्त मंडळ असून त्याचे मुख्य कार्यालय बंगलोर येथे आहे.  मंडळाची अकरा विभागीय कार्यालये असून ती बंगलोर, कलकत्ता, नवी दिल्ली, श्रीनगर, मुंबई, भुवनेश्वर, कानपूर, हैद्रराबाद, मद्रास, गौहाती व माल्डा येथे आहेत. ही सर्व कार्यालये केंद्र व राज्य सरकारच्या रेशीम कार्यक्रमात सुसूत्रता आणण्याचे काम करतात. हे मंडळ विकास कार्यक्रम आपल्या व्यवस्थापनाखाली व देखरेखीखाली किंवा राज्य सरकारच्या अधिकृत संस्थांमार्फत राबवते. हे मंडळ राज्य सरकारांना पुढील कार्यक्रमांसाठी अनुदान देते : तुतीच्या लागवडीस प्रोत्साहन देणे रेशमाच्या किड्यांचे संवर्धन व रेशीम गुंडाळणे सहकारी तत्त्वांचा वापर व बाजारपेठांचा विकास शिक्षण व प्रशिक्षण गुंडाळण्याची साधने टसर-मुगा-एरी रेशीम उद्योगाचा विकास संशोधन व सेवा केंद्रे आयात व निर्यात यांबद्दल सरकारला सल्ला देणे इत्यादी.

या रेशीम मंडळाची पुढील चार महत्त्वाची कामे आहेत : (१) उद्योगाचा विकास करणे (२) आर्थिक, तांत्रिका व शास्त्रीय संशोधन हाती घेणे, त्याला मदत करणे व प्रोत्साहन देणे (३) आकडेवारी गोळा करणे आणि (४) आयात-निर्यातीबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे. संशोधन, पदव्युत्तर शिक्षण, किड्यांचे संवर्धन, आयात-निर्यात, मालाची तपासणी व वाटप, मानकीकरण आणि गुणवत्ता नियंत्रण ही कामेही मंडळ करते.


 तुती रेशमाविषयीच्या संशोधनासाठी म्हैसूर व बेऱ्हामपूर येथे केंद्रीय संशोधन व प्रशिक्षण संस्था कालिंपाँग (प. बंगाल), बंगलोर, कोलेगल (कर्नाटक), कुन्नूर (तमिळनाडू), पंचकोटराज (जि. पुरूलिया, प. बंगाल), पाम्पोरे (काश्मीर), साबूर (भागलपूर, बिहार), टिटाबार (आसाम), रांची (बिहार), काशीपूर (प. बंगाल) येथे विभागीय संशोधन केंद्रे आणि मृगूर (कर्नाटक), माजरा (उत्तर प्रदेश), अंबारी फल्काटा (जि. जलपैगुरी, पं बंगाल), सिमलीगुडा (ओरिसा), माल्डा (प. बंगाल) येथे उपकेंद्रे आहेत. कोशिकावरणानंतरच्या रेशमावरील प्रक्रियांसंबंधीच्या संशोधनासाठी बंगलोर येथे सेंट्रल सिल्क टेक्नॉलॉजीकल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेत रेशमाचा धागा गुंडाळणे व कताई, कच्‍च्या रेशमाचे परीक्षण व प्रतवारी, आर्द्र प्रक्रिया, रेशमाचे विणकाम आणि रेशीम वस्त्र अभियांत्रिकी यांविषयी संशोधन करण्यात येते. टसर रेशमाकरिता भीमताल (उत्तर प्रदेश), बाटोटे (जम्मू व काश्मीर), इंफाळ (मणिपूर) व रांची येथे विभागीय संशोधन केंद्रे आहेत. मुगा रेशमाकरिता मिरजा (आसाम) येथे व एरी रेशमाकरिता नाँगपोह (आसाम) येथे विभागीय संशोधन केंद्रे आहेत. यांशिवाय अनेक विस्तार केंद्रे असून ती केंद्रीय व विभागीय संस्थांशी संलग्‍न आहेत.

मंडळाने तुती रेशमासाठी पाम्पोरे (काश्मीर) व कुन्नूर (तमिळनाडू) आणि टसरसाठी रायगढ (मध्य प्रदेश) येथे अंडी उत्पादन केंद्रे उभारली आहेत. निरोगी अंडी उत्पादनासाठी कर्नाटकात ११, प. बंगाल, तमिळनाडू व आंध्र प्रदेश येथे प्रत्येकी एक अशी एकूण १४ केंद्रे उभारली आहेत. ह्या केंद्रांतून ५ लाख निरोगी, सुधारित व संकरित अंडी मिळतात. श्रीनगर येथे सेंट्रल सिल्क कंडिशनिंग अँड टेस्टिंग हाऊस ही नवीन संस्था कलकत्ता व बंगलोर येथे असलेल्या संस्थांशिवाय स्थापन केली आहे. ही केंद्रे वा संस्था त्या त्या राज्याकडून चालविली जातात.

माल अन्यत्र पाठविण्यापूर्वी त्याची तपासणी करणे आणि योग्य असल्यास त्यावर शिक्का मारणे यांसाठी मंडळाने विभागीय कार्यालयात व विभागीय विकास कार्यालयात तसेच भागलपूर (बिहार) व वाराणसी येथे व्यवस्था केलेली आहे.

म्हैसूर व बेऱ्हमपूर येथे तुती रेशमासंबंधीचा आणि रांची येथे टसरसाठी १५ महिन्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. ह्यांशिवाय अल्प मुदतीचे काही अभ्यासक्रम ह्या केंद्रांतर्फे चालविले जातात. श्रीनगर, चन्नपटण (कर्नाटक), भागलपूर आणि टिटाबार येथे राज्य सरकारांची प्रशिक्षण केंद्रे आहेत. सिल्क अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च ॲसोसिएशन (सास्मिरा मुंबई) व इंडियन नॅचरल सिल्क ॲसोसिएशन (मुंबई) या संस्थांचे पदविका अभ्यासक्रम आहेत.

भारत-स्वित्झर्लंड सहकार्य कार्यक्रमानुसार रेशीम मंडळाने इंटरनॅशनल सेंटर फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च इन ट्रॉपिकल सेरिकल्चर ही संस्था उष्ण कटिबंधीय रेशीम उद्योगासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी म्हैसूर येथे स्थापन केली आहे. आशिया खंडातील विकसनशील राष्ट्रांसाठी हा १२ महिन्यांचा प्रगत शिक्षणक्रम ऑक्टोबर १९८० मध्ये सुरू झाला.

केंद्रीय रेशीम मंडळ हे इंटरनॅशनल सिल्क ॲसोसिएशन, लीआँ (फ्रान्स) आणि द इंटरनॅशनल सेरिकल्चरल कमिशन, लां मालाटिएरे (फ्रान्स) ह्या रेशीम उद्योगांसंबंधीच्या दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे पूर्ण सभासद आहेत.

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पूर्वीपासून रेशमी वस्त्रे तयार करण्यात येत आहेत. पैठण, येवले, औरंगाबाद इ. ठिकाणची वस्त्रे प्रसिद्ध आहेत. मात्र त्यासाठी लागणारे रेशीम महाराष्ट्रात तयार होत नाही, ते मुख्यत्वे कर्नाटकातून आणतात. वस्त्रांसाठी लागणारे रेशीम विशेषतः बंगलोरहून खरेदी केले जाते.


 जमीन, हवामान, पाऊस इ. नैसर्गिक बाबतींत महाराष्ट्रात ठिकठिकाणी फार मोठा फरक आढळून येतो. यामुळे महाराष्ट्रात हा उद्योग किफायतशीर ठरणार नाही, असा अंदाज तज्ञांनी केला होता. मात्र आधुनिक तंत्रज्ञानानुसार तापमान व आर्द्रता यांचे नियंत्रण करून हा उद्योग जगात कोठेही यशस्वी करणे शक्य होते, असे आढळून आले आहे. हे लक्षात घेता महाराष्ट्रात हा उद्योग फायदेशीरपणे करणे शक्य आहे असे आढळले. सुदैवाने रेशमाच्या किड्यांना (विशेषतः तुती, टसर व एरी किड्यांसाठी) आवश्यक असणाऱ्या खाद्य वनस्पती महाराष्ट्रात मुबलक आहेत.

मुंबई राज्य ग्रामोद्योग समितीने १९५२ मध्ये महाबळेश्वर येथे मधुमक्षिका केंद्र सुरू केले. या केंद्रात संशोधन प्रयोगशाळा आहे. तिचा फायदा घेऊन उत्सुकतेपोटी रेशमाच्या किड्यांच्या उपलब्ध वाणांचे संगोपन व नवीन वाण निर्माण करणे यांवर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले व त्यात यशही संपादन केले. या यशामुळे १९५८ मध्ये पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. रेशीम उद्योग ग्रामीण भागात कुटिरोद्योग म्हणून यशस्वी होऊ शकेल, याकडे प्रथम लक्ष देण्यात आले. तसेच किड्यांवर संशोधन करून वाई-१,-२,-३,-४ इ. नवीन सुधारित वाण शोधून काढले. संकरित वाण निर्माण करण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत वापरून पूर्णपणे नवीन व सुधारित संकरित असे वरील वाण तयार केले गेले. तसेच मुगा जातीवर संशोधन करण्यात आले आहे.

पाचगणी येथील प्रयोग यशस्वी झाल्यावर वाई येथे संशोधन सुरू करण्यात आले. ह्या दोन केंद्रांत हवामान, पाऊस, जमीन इ. बाबतींत बराच फरक आहे. दोन्ही ठिकाणचे प्रयोग यशस्वी झाले. प्रयोगशाळेचे निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाई व सांगली येथे प्रत्यक्ष प्रयोग करण्यात आले. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन रेशमाची पैदास करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. सिंचनाची सोय नसलेल्या अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून एक योजना केंद्रीय रेशीम मंडळाला १९६४ मध्ये सादर करण्यात आली. यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठीची योजना महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात आली. १९७६ मध्ये ही योजना मंजूर होऊन राज्य रेशीम मंडळाची पुणे येथे १९८० मध्ये स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांनी निर्माण केलेली कोशावरणे खादी ग्रामोद्योग मंडळ योग्य किंमतीला विकत घेते.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ विविध केंद्रांतर्फे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना रेशमासंबंधी तांत्रिक व आर्थिक सहाय्य करते. अल्पभूधारकांना अनुदान देते. अनुसूचित जाती-जमातींतील शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून आर्थिक सहाय्य करते. खाजगी क्षेत्रातही शेतकऱ्यांनी व आदिवासींनी याचा फायदा घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात टसर रेशीम, तर धुळे जिल्ह्यात तुती रेशीम यांबाबत आदिवासी लोकांनी जास्त लाभ घेतला आहे. खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे सिंधुदुर्ग (आंबोली), रत्‍नागिरी, कोल्हापूर (तुळेरान), नासिक (गंगापूर) येथे रेशमाची पैदास करण्यात येते. पुणे जिल्ह्यात तुतीच्या लागवडीचे प्रयत्‍न चालू आहेत. पुणे येथे केंद्रीय प्रशिक्षण संस्था आहे. तेथे अधिकारी वर्गास प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सोय केली जाते. पाचगणी येथे संशोधन केंद्र चालू आहे. तुतीचे बेणे पुरविणे व निरोगी अंडीपुंज पुरविणे ही कामे पुणे कार्यालयातर्फे चालतात. १९८६ मध्ये आंबोलीजवळ अंडीनिर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले आहे. औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, परभणी, नांदेड ह्या भागांतही रेशीम उद्योगाचा कार्यक्रम चालू आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या ग्रामोद्योग या नियतकालिकात महाराष्ट्रातील रेशीम उद्योगासंबंधी माहिती प्रसिद्ध होते.

पहा : कापड उद्योग तंतु, नैसर्गिक रेशीमकाम वस्त्रे.

संदर्भ : 1. Carboni, P. Trans., Walter, K. Silk : Biology, Chemistry, Technology, London, 1952.

            2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, 1973.

            3. Editors of American Fabrics Magazines, Encyclopaedia of Textiles, Englewood Cliffs, N. J. 1960.

            4. Gaddum, P. W. Silk, 1964.

            5. Hallen, N. Saddler, J. Textiles, New York, 1968.

            6. Leggett, W. F. The Story of Silk, New York, 1949.

            7. Mauersberger, H. R. Ed., Mathew’s Textile Fibres, New York, 1964.

            8. Ullal, S. R. Narasimhanna, M. N. Handbook of Practical Sericulture, Bombay, 1978.

कंटक सु. मं. मिठारी, भू. चिं. ठाकूर, अ. ना.


रेशमाच्या कोशांचे प्रकार : एरी, तुती, टसर व मुगा.शिबिरीवरील (स्टँडवरील) रेशमाच्या किड्यांचे संगोपन.रेशमाचे कोश शिजविणे.रेशमाच्या किड्याच्या जीवनावस्था : अंडी, अळ्या (सुरवंट), कोश व पतंगरेशमाच्या किड्याच्या सोळा दिवस वयाच्या अळ्याबांबूच्या चंद्रिकेवर तयार केलेले कोश.रेशमांच्या सुताची लडी.रि-रिलिंग यंत्रावर धागा गुंडाळणे.रेशमाच्या सुताला पीळ देणे

रिलिंग यंत्रावर कोशापासून रेशीम धागा काढणे.


रेशमाच्या सुताची लड तयार करणे.

रेशमाच्या कोशांची साठवणूक.हातमागावर रेशमी कापड विणणेरेशमी खणनारायण पेठ गर्भ रेशमी टेंपल साडी-काठ.