तपकीर : तंबाखूची पाने, देठ, शिरा व खाण्यालायक नसलेल्या तंबाखूवर काही प्रक्रिया करून नाकाने ओढण्यासाठी किंवा दंतमंजनासारखे वापरण्यासाठी तयार केलेल्या चूर्णाला तपकीर किंवा नस म्हणतात.

इतिहास : अमेरिकेतील आदिवासींनी तपकीर प्रथम प्रचारात आणली असावी. तिचा प्रसार स्पेनमध्ये १६२० पासून सुरू झाला व त्यांनतर यूरोप खंड व ब्रिटनमध्ये पसरला. भारतात तिचा शिरकाव पोर्तुगीजांबरोबर झाला असावा. नेपोलियन, सॅम्युएल जॉन्सन, चौथे जॉर्ज इ. प्रसिद्ध व्यक्ती तपकिरीच्या भोक्त्या होत्या. तपकीर ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या व आकारांच्या (काही अतिशय मौल्यवानही) डब्या विविध कालावधीत प्रचारात आल्या होत्या.

कच्चा माल व प्रकार : उंची तपकिरीसाठी तंबाखूची निवडक पाने व देठ वापरतात. सामान्य बाजारी प्रतीसाठी जाड पाने, शिरा व खाण्यास निरुपयोगी असलेली तंबाखू उपयोगात आणतात. ओली व कोरडी असे तपकिरीचे दोन प्रकार आहेत. ओल्या तपकिरीलाच राप्पी असेही इंग्रजी नाव आहे.

बनविण्याच्या कृती : राप्पी बनविण्याच्या फ्रेंच पद्धतीमध्ये तंबाखूची पाने व देठ मिठाच्या पाण्याने ओले करून दाबतात व गठ्ठे बनवितात. नंतर त्यांचे तुकडे करून ते उघड्या खोल्यांमध्ये ५–६ महिने ठेवतात. त्यामुळे तंबाखू आंबू लागते. या प्रक्रियेत उष्णता निर्माण होते व तापमान कित्येकदा ६०° सें. इतके चढते. त्यानंतर ते तुकडे हवारहित अवस्थेत दळतात. हेतू हा की, त्यांना प्राप्त झालेला विशिष्ट वास दळताना उडून जाऊ नये. नंतर हे चूर्ण ओलसर करून लाकडी बंद कोठ्यांत भरतात व तेथे सु. ४९°–५४° से. तापमानास १० महिने राहू देतात. या अवधीत आंबण्याची क्रिया पुन्हा होते आणि तपकीर कडक होते. नंतर एका मोठ्या कोठीत ती एक महिना मुरवितात व विक्रीस काढतात.

आंबविण्यामुळे तंबाखूतील मॅलिक, सायट्रिक इ. कार्बनी अम्ले आणि जवळजवळ /  निकोटीन नाश पावते. शिल्लक राहिलेले निकोटीन, अमोनिया व इतर द्रव्ये यांच्यामुळे तपकिरीला इष्ट असलेला झोंबणारा, उग्र आणि विशिष्ट वास प्राप्त होतो.

तंबाखू आंबविण्याच्या दुसऱ्या काही कृतींत चुन्याची निवळी किंवा काकवीयुक्त पाणी यांनी पाने भिजविण्याची पद्धत आहे.

मद्रासी काळी तपकीर बनविताना तंबाखूच्या पानांचे चूर्ण (१०० ग्रॅ.) घेऊन ते गायीचे तूप व बदामाचे तेल (प्रत्येकी १० ग्रॅ.) यांच्या मिश्रणात तळतात. निवल्यावर त्यात कळीचा चुना (१० ग्रॅ.) घालून मिश्रण खलून वस्त्रगाळ करतात.

कोरड्या तपकिरीचे आयरिश, स्कॉच, गोड तपकीर इ. प्रकार आहेत. या तपकिरीत कळीच्या चुन्याची भेसळ केली जाते. त्यामुळे ती नाक कोरडे करणारी व नाकात झोंबणारी बनते. या तपकिरी बनविण्याच्या काही प्रकियांतही आंबविण्याचा अंतर्भाव आहे. एका कृतीत तंबाखूची पाने प्रथम उन्हात वाळवून चुरा करतात आणि तो लोखंडी पात्रात घेऊन व भिजवून ३-४ दिवस तसाच राहू देतात. त्यामुळे तो आंबतो. नंतर तो उन्हात वाळवून दळतात व वस्त्रातून गाळतात.


दुसऱ्या एका कृतीत तंबाखूच्या काड्या घेऊन त्यांत आठपट पाणी घालतात व आटवून त्याचा अष्टमांश काढा बनवितात. तंबाखूच्या पानांना या काढ्याची ५–७ पुटे देऊन ती वाळवितात व नंतर दळून तपकीर बनवितात.

तपकीर सुवासिक करण्यासाठी कस्तुरी, लवंग, गुलाब, लव्हेंडर, बर्गमाँट, जॅस्मीन (जाई, जुई, चमेली इ.) मेंथॉल इ. सुवासिक द्रव्ये वापरतात.

भारतीय उत्पादन व खप : तमिळनाडू, गुजरात, पंजाब व उ. प्रदेश या राज्यांत मुख्यतः तपकीर बनते. मद्रासमध्ये शंभरापेक्षा जास्त कारखाने असून त्यांचे वार्षिक उत्पादन २,००० टनांच्या जवळपास आहे.

तपकिरीचा खप भारतात तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओरिसा आणि प. बंगाल या राज्यांत विशेष होतो. तपकिरीची निर्यात अल्प आहे. १९७३–७४ साली केनियाला झालेली ३·६ टनांची निर्यात ही सर्वांत अधिक होय.

तपकिरीचे व्यसन मुख्यत्वे खेडुतांत आढळते. शहरवासियांमध्ये कलकत्त्याच्या नागरिकांचा क्रमांक पहिला लागतो. दंतमंजनासारखी हिरड्यांवर तपकीर चोळण्याचाही प्रघात आहे. रायचूर, विजापूर, बेल्लारी आणि आंध्र प्रदेशातील कुर्नूल या भागांत तो विशेष दिसून येतो. याकरिता हलक्या प्रतीची तपकीर वापरतात.

तपकीर ओढण्याचा परिणाम : तपकीर ओढल्याने शिंका येतात आणि नाकातील श्लेष्म्याचा स्राव होऊ लागतो. नाक चोंदले असता तपकीर ओढणे हा एक तात्पुरता इलाजही समजला जातो परंतु त्याचे व्यसन लागण्याचा संभव असतो. तपकीर ओढण्याचे व्यसन धूम्रपानापेक्षा कमी हानिकारक आहे.

पहा : तंबाखू

संदर्भ : Indian Central Tobacco Committee, Indian Tobacco, Madras, 1960.

मिठारी, भू. चिं.