पृष्ठक्रियाकारके : (सरफॅक्टन्ट्स). जी कार्बनी संयुगे एखाद्या विद्रावकात (ज्यात पदार्थ विरघळतो त्या द्रवात) अल्प प्रमाणात विरघळलेली असली, तरी द्रवाच्या पृष्ठभागाच्या गुणधर्मामध्ये (उदा., पृष्ठताण) ठळक बदल घडवितात. त्यांना ही संज्ञा लावतात; उदा., साबण. साबण पाण्यात थोडाच विरघळला, तरी पाण्याचा पृष्ठताण पुष्कळ कमी होतो. बहुतेक सर्व उद्योगात आणि घरगुती व्यवहारात पृष्ठक्रियाकारके वापरली जातात.

इतिहास : साबण हा सर्वांत जुना पृष्ठक्रियाकारक होय [⟶ साबण]. त्यानंतर १८५० मध्ये सल्फेटीकरण (संयुगामध्ये OSO2OH हा गट बसविण्याची क्रिया) केलेले ऑलिव्ह तेल बनविण्यात आले व वस्त्रोद्योगातील काही प्रक्रिया सोप्या व्हाव्या यासाठी त्याचा पृष्ठक्रियाकारक म्हणून उपयोग होऊ लागला. एरंडेल जास्त स्वस्त असल्यामुळे सल्फेटीकरण केलेले एरंडेल ‘सल्फॉनीकरण केलेले एरंडेल’ (सल्फोनेटेड कॅस्टर ऑइल; टर्की रेड ऑइल) या नावाने त्याऐवजी वापरण्यात आले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीत नैसर्गिक तेले व चरबी यांची चणचण निर्माण झाली आणि साबण व तत्सम पृष्ठक्रियाकारके बनविणे अशक्यप्राय झाले. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जर्मनीने ‘नेकाल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पृष्ठक्रियाकारकांपैकी पहिले संयुग १९१७ मध्ये, तेले व चरबी न वापरता बनविले. साबणाऐवजी हे उपयोगी पडेल अशी अपेक्षा होती. तथापि धुलाईसाठी ते फारसे समाधानकारक नव्हते. परंतु अफेनद (ज्यामध्ये साबणाचा फेस होत नाही असे) पाणी व अम्ल विद्राव यांमध्ये ते काही औद्योगिक प्रकियांसाठी वापरता येते, असे दिसून आले. हा एक मोठा फायदा होता, कारण साबण याप्रकारे वापरता येत नाही.

पहिल्या महायुद्धानंतर प्रक्षालनाचा (वस्तू निर्मळ करण्याचा) गुण असेल आणि अफेनद पाण्यातही वापरता येतील असे पदार्थ बनविण्यासंबंधी जे संशोधन झाले त्यामुळे नवनवीन व विविध गुणधर्माची पृष्ठक्रियाकारके अस्तित्वात आली [⟶ प्रक्षालके]. प्रथमत: ही संयुगे जेव्हा यांत्रिक धुलाईत वापरण्यात आली त्या वेळी त्यांपासून बनणारा फेस अनिष्ट आहे असा अनुभव आला. त्याचप्रमाणे जीवरासायनिक विक्रियांनी फेसाचे विघटन होत नसल्यामुळे जलप्रदूषण होई. काही पृष्ठक्रियाकारकांत असलेले हे दोष नंतर दूर करण्यात आले असून आज अनेक उपयुक्त पृष्ठक्रियाकारके मोठ्या प्रमाणावर बनविण्यात येत आहेत.

रेणूंचे संरचनास्वरूप : पृष्ठक्रियाकारकाच्या रेणूमध्ये परस्परविरोधी गुणधर्म असेलेले अणुगट एकत्र उपस्थित असतात. त्यांपैकी एक अणुगट पाण्यात विरघळण्यास अनुकूल पण तेले व जलेतर पदार्थांत विरघळण्यास प्रतिकूल असतो आणि दुसरा त्याच्याविरूद्ध म्हणजे जलविद्राव्यतेस प्रतिकूल पण तेले व तत्सम पदार्थांत विरघळण्यास अनुकूल असा असतो. जलविद्राव्यतेस अनुकूल असलेल्या गटांना जलस्नेही (किंवा वसाद्वेषी) आणि प्रतिकूल असलेल्या गटांना जलद्वेषी (किंवा वसास्नेही) म्हणतात. त्यांचा उल्लेख अनुक्रमे ध्रवीय व अध्रुवीय असाही केला जातो. पृष्ठक्रियाकारकांची विद्राव्यता निरनिराळ्या विद्रावकांत वेगवेगळी असू शकते परंतु विद्राव्यतादायी गट असा उल्लेख जेव्हा करतात, तेव्हा तो त्याच्या पाण्यातील विद्राव्यतेस अनुलक्षून असतो. संयुगाची पृष्ठक्रियाक्षमता त्यातील गटांच्या घटना, त्यांचे विद्राव्यताविषयक गुणधर्म, रेणूतील त्यांची स्थाने व त्यांची सापेक्ष आकारमाने यांवर अवलंबून असते. जलस्नेही व जलद्वेषी गुणधर्माचे अनेक गट ज्ञात आहेत. त्यामुळे शेकडो पृष्ठक्रियाकारके संश्लेषणाने (साध्या रेणूपासून किंवा अणूंपासून रासायनिक विक्रियांनी इष्ट संयुग बनविण्याच्या क्रियेने) बनविणे शक्य आहे. रेणूच्या संरचनेचा पृष्ठक्रियाकारकाच्या गुणधर्मांवर किती आणि कसा परिणाम होतो याविषयी संपूर्ण ज्ञान अजून झालेले नाही तथापि त्यांच्या परस्पर संबंधाबद्दल जी माहिती आज उपलब्ध आहे तिचा उपयोग इष्ट गुणधर्मांच्या पृष्ठक्रियाकारकांचे संश्लेषण करण्यास मार्गदर्शक होतो.

गुणधर्म : पृष्ठक्रियाकारकाच्या विद्रावाची संहती (ग्रॅम-रेणूत मोजलेली प्रतिलिटर संख्या)  काही विशिष्ट संहतीपेक्षा जास्त झाली म्हणजे त्याचे रेणू एकत्र येऊन समुदायाच्या रूपात राहतात. अशा समुदायाला रेणुचय (मिसेल) म्हणतात. ज्या कमीत कमी संहतीस ते अस्तित्वात येतात त्या संहतीला ‘सीमान्त रेणुचय संहती’ (सीरेसं; Critical Micelle Concentration, CMC) म्हणतात. पृष्ठक्रियाकारकांचे गुणधर्म व त्यांच्या संहती यांचे आलेख काढले असता ‘सीमान्त रेणुचय संहती’ पर्यंत ते रेषीय पद्धतीने बदलत जातात व ‘सीरेसं’ मूल्याला आलेख-रेषेत विकार येतो. पृष्ठक्रियाकारकांच्या जलीय विद्रावाची ‘सीरेसं’ मूल्ये त्यांच्या संरचना व परिसर यांवर अवलंबून असतात. तथापि अनेक धनायनी (धन विद्युत आग्राकडे आकर्षित होणारे ऋण विद्युत् भारित अणुगट ज्याच्या विद्रावात असतात अशा) पृष्ठक्रियाकारकांची ‘सीरेसं’ मूल्ये कोठी तापमानास (सर्वसाधारण तापमानास) १०-२ ग्रॅम-रेणू/लि. या संहतीच्या आसपास आणि आयनहीन [ज्यांत विद्युत् भारित अणुगट नसतात अशा] पृष्ठक्रियाकारकांची १०-४ ग्रॅम-रेणू/लि. याच्या जवळपास असतात.

रेणुचयाचे आकारमान हे एका रेणुचयात असलेल्या रेणूंच्या संख्येने दर्शवितात. त्याला रेणुचय-रेणुभार किंवा समुदाय अंक म्हणतात. सोडियम डोडेसिल बेंझीन सल्फोनेट या पृष्ठक्रियाकारकाचा रेणुचय-रेणुभार १,०००—१,७०० व सोडियम डाय-ऑक्टिल सल्फोसक्सिनेटाचा ७,२०० आहे. विरल विद्रावात लहान रेणुचयाच्या आकृती गोल व गोलाभ दंडगोल असतात. आयनी रेणुचयांसाठी एकपटलमय, द्विपटलमय व शलाकेसारख्या आकृतीही सुचविल्या गेल्या आहेत. बहुधा, काही परिस्थितीत या सर्व आकृती अस्तित्वात राहत असाव्या आणि ती परिस्थिती बदलली की, त्यांचे एकमेकींत रूपांतर होत असावे. दोन अथवा अधिक प्रकारच्या पृष्ठक्रियाकारकांच्या मिश्रणात सामान्यत: मिश्र रेणुचय निर्माण होतात. तापमान, विद्रावक व उपस्थित विद्युत् विच्छेद्य (विद्युत् प्रवाहाने ज्यांचे विघटन होते असे) पदार्थ यांमध्ये फरक पडला, तर रेणुचयांच्या गुणधर्मांतही बदल होतो.

आ. १. द्रवाच्या पृष्ठभागात व इतरत्र होणारे पृष्ठक्रियाकारकाच्या रेणूंचे वितरण.

पाण्यात न विरघळणारे कित्येक पदार्थ पृष्ठक्रियाकारकांच्या विद्रावात विरघळतात. या गुणधर्माला विद्राव्यीकरण म्हणतात आणि त्याचे स्पष्टीकरण पुढे दिल्याप्रमाणे केले जाते. पृष्ठक्रियाकारकांच्या रेणूंचे जलीय माध्यमात जेव्हा रेणूचय बनतात त्या वेळी त्या रेणूंची जलस्नेही टोके बाहेर म्हणजे माध्यमाकडे येतील अशी रचना बनते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध दिशेला, ज्या ठिकाणी जलद्वेषी टोकांचे अस्तित्व असते तेथे जलद्वेषी पदार्थांना अनुकूल असे क्षेत्र तयार होते. पाण्यात न विरघळणारा पदार्थ विद्रावात मिसळला म्हणजे तो या क्षेत्रात सामावला जातो व त्यामुळे विरघळतो.

द्रवाच्या गुणधर्मावर होणारा पृष्ठक्रियाकारकांचा परिणाम : द्रवांचे पृष्ठभाग जणू काही एखाद्या ताणलेल्या पातळ पापुद्यासारखे असून त्यांची प्रवृत्ती आकुंचन पावण्याची असते. यामुळे पृष्ठभागावर पडणाऱ्या ताणाला ⇨ पृष्ठताण असे म्हणतात.

आ. २. सोडियम डोडेसिल सल्फेटाचा निरनिराळ्या तापमानाला काढलेले आलेख.

एखादे पृष्ठक्रियाकारक पाण्यात विरघळले म्हणजे त्याचे रेणू पाण्यात सर्वत्र सम प्रमाणात विखुरले जात नाहीत. त्यांपैकी बरेचसे त्यांच्या पृष्ठभागात व थोडे त्याच्या अंतर्भागात राहतात. कारण पृष्ठभागात गेल्याने रेणूंची जलस्नेही टोके पाण्याकडे व जलद्वेषी पाण्यापासून दूर म्हणजेच हवेत राहतील अशी रचना करणे साध्य होते. अशा तऱ्हेने पृष्ठभागात असणाऱ्या रेणूंची संख्या अंतर्भागातील रेणूंपेक्षा जास्त झाल्यामुळे पाण्याचा पृष्ठताण कमी होतो

द्रवात पृष्ठक्रियाकारके मिसळून त्याचे प्रमाण क्रमाक्रमाने वाढवीत गेले व त्या वेळी असणाऱ्या पृष्ठताणाचे मूल्यमापन केले, तर असे आढळते की, पृष्ठताण कमाकमी होत जाऊन पृष्ठक्रियाकारकाच्या एका ठकाविक संहतीला तो सर्वांत कमी होतो आणि त्यानंतर संहती वाढविली, तर पृष्ठताणाचे मूल्य अल्प प्रमाणात वाढते. प्रत्यक्ष कोणत्या संहतीला पृष्ठताण सर्वांत कमी होईल व त्याचे मूल्य किती असेल हे त्या त्या पृष्ठक्रियाकारकाचे रासायनिक संघटन, संहती आणि तापमान यांवर अवलंबून असते (आ.२).

दोन अविद्राव्य द्रवांचा किंवा घन व द्रव यांचा एकमेकांशी संपर्क येतो तेव्हा त्यांच्या समान पृष्ठावर जो ताण असतो त्याला आंतरपृष्ठीय ताण म्हणतात. आंतरपृष्ठीय ताण (γAB) व त्या त्या द्रवाचे पृष्ठताण (γA) व (γB) यांचा परस्परसंबंध पुढील समीकरणाने व्यक्त होतो,

दोन्ही द्रव एकमेकांत संपूर्णपणे अविद्राव्य असतील, तर हे समीकरण सर्वस्वी लागू पडते. द्रवांपैकी एक जलेतर असून त्यात ध्रुवीय गट (OH, COOH इ.) असेल आणि दुसरा द्रव पाणी असेल, तर γAB चे मूल्य या सूत्रानुसार येणाऱ्या मूल्यापेक्षा कमी येते.

दोन अविद्राव्य द्रवांपैकी एकात एखादे पृष्ठक्रियाकारक विरघळविले, तर त्याचा पृष्ठताण कमी होईल व त्यामुळे आंतरराष्ट्रीय ताणाचे मूल्यही कमी होईल. उदा., पाण्याचा पृष्ठताण २०° से. तापमानास ७२.८ डाइन/सेंमी. व पॅराफीन तेलाचा ३० डाइन/सेंमी. आहे. हे दोन्ही द्रव मिसळले, तर आंतरपृष्ठीय ताणाचे मूल्य वरील समीकरणाप्रमाणे ७२.८ – ३० = ४२.८ डाइन/सेंमी. येते. पाण्यात साबण मिसळला, तर त्याचा पृष्ठताण सु. ३० डाइन/सेंमी. होतो. त्यामुळे साबण मिसळलेले पाणी व पॅराफीन तेल यांचा आंतरपृष्ठीय ताण जवळजवळ शून्य होईल व त्यामुळे ती एकमेकांत सहज मिसळू शकतील.

आ. ३. सोडियम डोडेसिल सल्फेट व झायलीन यांच्यातील आंतरपृष्ठीय ताण व सोडियम डोडेसिल सल्फेटाची संहती यांचे निरनिराळ्या तापमानाला काढलेले आलेख.

पृष्ठताणाप्रमाणेच आंतरपृष्ठीय ताणावर होणारा पृष्ठक्रियाकारकाचा परिणाम हा त्याची संघटना, संहती व तापमान यांवर अवलंबून असतो (आ.३). संहती क्रमाक्रमाने वाढवावी तसतसा आंतरपृष्ठीय ताण कमीकमी होत जाऊन एका ठराविक संहतीस तो सर्वांत कमी होतो. त्यानंतर संहती वाढविली, तर तो थोड्या प्रमाणात वाढतो. तापमान वाढविले व इतर परिस्थिती तशीच कायम ठेवली, तर आंतरपृष्ठीय ताणाचे मूल्य सर्वांत कमी होण्यासाठी लागणारी पृष्ठक्रियाकारकांची संहतीही वाढते.

घन पदार्थांच्या पृष्ठावर द्रवाचा थेंब (उदा., पाण्याचा) सोडला, तर तो पसरत नाही. त्याचा कमी जास्त गोलाकार बिंदू बनतो. या ठिकाणी द्रवाचा पृष्ठताण, घन पदार्थांचा पृष्ठताण व त्यांचा आंतरपृष्ठीय ताण यांमध्ये समतोल झालेला असतो. द्रवबिंदूचा घनाच्या पृष्ठाशी जेथे संपर्क किंवा स्पर्श होतो त्या ठिकाणी द्रवास स्पर्शिका (स्पर्शरेषा) काढली, तर तिच्या घनाच्या पृष्ठाशी द्रवाच्या अंतर्भागाकडे जो कोन होतो त्याला स्पर्शकोन म्हणतात.

आ. ४. घन-द्रव आंतरपृष्ठाजवळ समतोल अवस्था : (अ) अंशत: आर्द्रीकरण; (आ) आर्द्रीकरणाचा अभाव : γS घनाचा पृष्ठताण, γL द्रवाचा पृष्ठताण, γSL घन-द्रव यांतील आंतरपृष्ठीय ताण, ɵ स्पर्शकोन.

स्पर्शकोन, आंतरपृष्ठीय ताण आणि त्या द्रव आणि घन पदार्थांचे पृष्ठताण यांचा संबंध पुढीलप्रमाणे असतो.

येथे γSL = आंतरपृष्ठीय ताण, γS = घनाचा पृष्ठताण, γL = द्रवाचा पृष्ठताण आणि θ = स्पर्शकोन आहेत.

स्पर्शकोन ९०° पेक्षा कमी असेल, तर त्या द्रवाने घनाचा पृष्ठभाग अंशतः आर्द्र (ओला) होईल; तो ९०° पेक्षा जास्त असेल, तर तो आर्द्र होणार नाही.

ए. द्यूप्रे यांनी दोन द्रवांमधील आसंजन कार्य (आंतरपृष्ठाचे क्षेत्रफळ एक एकक इतके वाढविण्यास लागणारी ऊर्जा; आसंजन म्हणजे विजातीय रेणूंचे परस्परांतील आकर्षण) आणि द्रवांचे पृष्ठताण यांचा संबंध पुढीलप्रमाणे असतो असे १८६९ मध्ये दाखविले.

येथे WL1L2 = आसंजन कार्य, γL1 = एका द्रवाचा पृष्ठाताण, γL2 = दुसऱ्या द्रवाचा पृष्ठताण, γL1L2 = त्यांचा आंतरपृष्ठीय ताण आहेत.

यावरून हे दिसून येईल की, त्या द्रवांमधील आंतरपृष्ठीय ताण कमी असेल, तर ते द्रव पदार्थ एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी लागणारी ऊर्जा जास्त असते म्हणजेच त्यांचे आसंजन जास्त बळकट असते.

द्यूप्रे यांचे समीकरण द्रव पदार्थ व त्यात अविद्राव्य असलेला घन पदार्थ यांच्या संपर्कासही लागू पडते, म्हणून अशा ठिकाणी या समीकरणाचे रूप पुढीलप्रमाणे होईल.

येथे WSL = आसंजन कार्य (घन व द्रव यांमधील), γS = घनाचा पृष्ठताण, γL = द्रवाचा पृष्ठताण व γSL= आंतरपृष्ठीय ताण आहेत. आता γSL याचे मूल्य समी. (२) वरून घेऊन ते समी. (४) मध्ये घालून दोन्ही समीकरणे एकत्र केली, तर WSL चे मूल्य पुढीलप्रमाणे येईल.

 स्पर्शकोनाचे (θ चे) मूल्य 0° असेल तेव्हा cos θ चे मूल्य १ येईल व त्या वेळी WSL = 2γL येईल म्हणजेच त्या घन पदार्थाचे द्रवाबद्दलचे आकर्षण द्रवाच्या स्वतःच्या आकर्षणाइतके होईल आणि त्यामुळे घन पदार्थ द्रवाने पूर्णपणे ओला होऊ शकेल. आ. ५ मध्ये दाखविलेला द्रवबिंदू आणि घनाचे पृष्ठ यांच्या स्पर्शक्षेत्राची मर्यादा रेषा वर्तुळाकार आहे.

आ. ५. द्रवबिंदू, व घन पदार्थ यांचा संपर्क : (अ) बाजूने दिसणारे दृश्य : (१) घन पदार्थ, (२) द्रवबिंदू, (३) वायू (हवा); (आ) वरून दिसणारे दृश्य : (१) स्पर्शवर्तुळ.

घन पदार्थांच्या प्रतलात येथे दोन आंतरपृष्ठे आहेत : (१) द्रव-घन यांचे व (२) घन-वायू (हवा) यांचे. द्रव-घन या आंतरपृष्ठाची आपले क्षेत्र कमी करण्याची प्रवृत्ती Xl या सदिशांनी (दिशा व महत्ता दर्शविणाऱ्या रेषांनी) दर्शविता येते. हे सदिश घनपृष्ठाशी समांतर असून स्पर्शवर्तुळाच्या मध्यबिंदूंच्या दिशेने कार्य करीत आहेत. घन-वायू या आंतरपृष्ठाशी, आपले क्षेत्र कमी करण्याची प्रवृत्ती व दिशा XS या सदिशांनी दर्शविता येते. हे क्षेत्र कमी करणे म्हणजे त्या जागी घन-द्रव आंतरपृष्ठ प्रस्थापित करणे होय. द्रवबिंदूला स्पर्श रेषांच्या स्वरूपात असलेले सदिश Xa हे द्रव-वायू आंतरपृष्ठाची द्रवबिंदूचा आकार गोलाकार व किमान ऊर्जा असलेला असा ठेवण्याची प्रवृत्ती दर्शवितात. समतोलावस्थेत पुढील समीकरण लागू पडते.

θ चे मूल्य 0° असेल त्या वेळी cos θ चे मूल्य १ येईल व त्या वेळी हे समीकरण XS = Xl + Xa असे होईल. परंतू प्रत्यक्षात θ चे मूल्य 0° असेल तेव्हा XS चे मूल्य Xl + Xa पेक्षा जास्त असते म्हणून समतोल निर्माण होत नाही आणि द्रव पदार्थ घन पदार्थावर सतत पसरत रहातो. θ चे मूल्य ९०° किंवा त्यापेक्षा जास्त असेल तेव्हा घनाचा पृष्ठभाग ओला होत नाही, कारण त्या वेळी घन-द्रव यांतील आसंजन अतिशय कमी होते.

एखाद्या घन पदार्थाच्या किंवा द्रव पदार्थाच्या पृष्ठावर द्रवाचे विस्तारण (पसरण्याची क्रिया) झाले म्हणजे त्या समूहाच्या मुक्त पृष्ठऊर्जेत जी घट होते तिला विस्तारण गुणांक म्हणतात. विस्तारणामुळे एकंदर पृष्ठ-ऊर्जा कमी होते याचा अर्थ, येथे असमान रेणूमध्ये असणारे अकर्षण हे समान रेणूमध्ये असणाऱ्या आकर्षणापेक्षा जास्त असते. S या घनपृष्ठावर L या द्रवाचे विस्तारण झाल्यामुळे ऊर्जेत होणारी घट Φ या चिन्हाने दर्शविली, तर तिचा घनाचा पृष्ठताण (γS), द्रवाच्या पृष्ठताण (γL) व त्यांचा आंतरपृष्ठीय ताण (γSL) यांच्याशी पुढीप्रमाणे संबंध असतो.

जेव्हा द्रव पदार्थ घन पदार्थाच्या पृष्ठभागावर पसरतो तेव्हा एकंदर समूहाच्या ऊर्जेत पडणारी घट ही आसंजन ऊर्जा वजा संसंजन ऊर्जा इतकी असते. संसंजन ऊर्जा म्हणजे त्या द्रव पदार्थाचा एक एकक छेद असलेला स्तंभ अलग करून एकक छेदाच्या पृष्ठभागाचे दोन पृष्ठभाग निर्माण करण्यास लागणारी ऊर्जा होय.Φ चे मूल्य घन (+) असेल, तर त्या द्रवाचे घनावर विस्तारण होईल आणि हे मूल्य जितके मोठे तितके विस्तारण जास्त होईल. द्रव-द्रव समूहाचा विस्तारण गुणांक वरील समीकरणात, त्या त्या द्रवांचे पृष्ठताण व त्यांमधील आंतरपृष्ठीय ताण घातले म्हणजे पुढीलप्रमाणे व्यक्त होतो.

Φ चे मूल्य जितके जास्त तितकी विस्तारण क्रिया सोपी असते.

 

पृष्ठक्रियाकारकांची कार्ये व विविध क्षेत्रांतील उपयोग : आर्द्रीकरण (पृष्ठभाग ओला करणे), विसरण (घन पदार्थांचे सूक्ष्म कण द्रवात तरंगत ठेवणे), पायसीकरण (एका द्रवाचे सूक्ष्म बिंदू दुसऱ्या द्रवात लोंबकळत्या स्थितीत ठेवणे), प्रक्षालन, फेनन (फेस उत्पन्न करणे), पायसभेदन (पायसाचे घटक मोकळे करणे), फेन-नाश (फेस नाहीसा करणे), क्षरणविरोध (धातूची झीज होण्यास प्रतिबंध करणे), वंगणक्रिया, स्थिर विद्युत् रोध इ. कार्ये पृष्ठक्रियाकारकांच्या उपयोगाने सुलभ होतात. वरील विशिष्ट कामासाठी उपयोगी अशा बाजारात मिळणाऱ्या वस्तू केवळ एका किंवा अधिक पृष्ठक्रियाकारकांच्याच बनविलेल्या नसतात. त्यांमध्ये इतर पदार्थांही मिसळलेले असतात. त्यांच्या योगाने पृष्ठक्रियाकारकांच्या कार्यास अनुकूल परिस्थिती मिळते व त्यांच्या काही गुणांत भरही पडते. अशा पदार्थांना संवर्धके (बिल्डर्स) म्हणतात. [⟶ प्रक्षालके].

काही पृष्ठकारके क्षरणविरोधी आहेत; उदा., मेदाम्लांची [वसाम्लांची; ⟶ वसाम्ले] लवणे, ती चांदीच्या पृष्ठभागाचे क्षरण होऊ देत नाहीत. क्षरणविरोधी नसलेली पृष्ठक्रियाकारके अप्रत्यक्षपणे क्षरणविरोधात उपयोगी पडतात. क्षरणविरोध करण्यासाठी वापरलेल्या पदार्थाचे वस्तूच्या पृष्ठावर समान वितरण व अभिशोषण होण्यास ती मदत करतात; उदा., फॉस्फोरिक अम्ल व त्याची लवणे.

ॲसिटेट रेयॉन, नायलॉन, ॲक्रिलिक इ. कृत्रिम तंतूवर निर्माण झालेला स्थिरविद्युत् भार, ते विद्युत निरोधी असल्यामुळे साठून राहतो. त्यामुळे त्यापासून बनविलेले कपडे अंगाला चिकटतात, त्यांचे सुटे तंतू उभे राहतात, तर कित्येकदा त्यांना स्पर्श केल्यास ठिणगी पडण्याचाही संभव असतो. हा दोष नाहीसा व्हावा म्हणून तंतूवर ज्या प्रक्रिया करतात त्यांमध्ये काही पृष्ठक्रियाकारके वापरतात. त्यांच्या योगाने तंतूंच्या पृष्ठाची विद्युत् संवाहकता वाढते. काही पृष्ठक्रियाकारके वातावरणातील आर्द्रतेचे शोषण करतात व पृष्ठाला विद्युत् वाहक बनवितात आणि त्यामुळे स्थिरविद्युत् भार साठत नाही.

पृष्ठक्रियाकारी वस्तूंचा उपयोग मुख्यत: स्वच्छतेकरिता घरोघरी व अनेक औद्योगिक क्षेत्रांत केला जातो. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

घरगुती उपयोग : कपडे व इतर वस्त्रे, काचेच्या व चिनी मातीच्या वस्तू, स्वयंपाकाची भांडी, जमिनीची फरशी इ. स्वच्छ करण्यासाठी साबण व इतर पृष्ठक्रियाकारके घरोघरी वापरली जातात. नुसत्या पाण्यापेक्षा पृष्ठक्रियाकारकमिश्रित पाणी वस्तूच्या पृष्ठभागावर जास्त सुलभतेने पसरते व त्याला ओले करते. त्याचप्रमाणे पृष्ठभागाला चिकटलेला मळ सुटा करून तो पाण्यात तरंगत ठेवण्याचे कार्यही पृष्ठक्रियाकारकामुळेच साध्य होते. तेलाचे सूक्ष्मकण पायसीकरणामुळेच पृष्ठभागापासून निघून येतात व तेलकट पृष्ठभाग स्वच्छ होतो. एका ठिकाणचा सुटलेला मळ दुसऱ्या ठिकाणी बसू शकत नाही तो या क्रियांमुळेच. पाश्चात्त्य देशांत घरगुती धुलाईसाठी यंत्रे वापरली जातात. वस्त्रांच्या व भांड्याकुड्यांच्या यांत्रिक धुलाईसाठी वापरावयाची प्रक्षालके फेस न होणारी असावी लागतात. काही प्रक्षालकांमुळे यंत्रांच्या धातूचे क्षरण होण्याचाही संभव असतो. म्हणून अशा प्रक्षालकांमध्ये क्षरणविरोधी पृष्ठक्रियाकारके मिसळलेली असतात.

जमिनीवर आंथरलेले गालिचे जागच्या जागी स्वच्छ करण्याचाही प्रघात आहे. त्यासाठी एका पद्धतीत लाकडाचा भुसा किंवा अभिशोषक मृत्तिका व प्रक्षालकाचा विद्राव यांपासून बनविलेले मिश्रण गालिचावर पसरतात व पृष्ठाला चांगले चोळतात आणि नंतर निर्वात कचरा चोषकाने [व्हॅक्यूम क्लीनरने; ⟶ गृहपोयोगी उपकरणे] ते काढून घेतात. मिश्रणातील पृष्ठक्रियाकारकामुळे गालिच्याला चिकटून बसलेला मळ निघून येतो. दुसऱ्या एका पद्धतीत फेस होणाऱ्या प्रक्षालकाचा दाट विद्राव गालिच्याच्या पृष्ठावर कुंचल्याने चोळतात. त्यामुळे जो फेस होतो त्यात मळाचे कण गुरफटून निघून येतात. तो निर्वात चोषकाने काढून घेतात. गालिचा वाळला म्हणजे त्याला लागून राहिलेल्या विद्रावकाची पूड सुटी होते. ती निर्वात चोषकाने काढून टाकली म्हणजे गालिचा स्वच्छ होतो. साबण अशा ठिकाणी उपयोगी पडत नाही कारण तो धुवून काढावा लागतो तसे येथे करता येत नाही. सल्फेटीकरण किंवा सल्फॉनीकरण केलेली धनायनी पृष्ठक्रियाकारके यासाठी समाधानकारक ठरतात.

जमिनीसाठी वापरलेली अस्फाल्टीची लादी व प्लॅस्टिकच्या फरश्या (टाईल्स) अथवा आंथरलेले लिनोलियम स्वच्छ करण्यासाठी योग्य घटक असलेले प्रक्षालक-मिश्रण वापरावे लागते. खिडक्यांच्या तावदानाच्या काचा, आरसे, मोटारींचे पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी योग्य पृष्ठक्रियाकारक-मिश्रणे बनविण्यात आली आहेत.

औद्योगिक धुलाई : औद्योगिक धुलाईमध्ये केवळ मोठ्या प्रमाणावर केलेल्या धुलाईचाच समावेश होतो असे नाही. गिरण्या, कारखाने इत्यादींमध्ये यंत्रांशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वस्त्रे, इस्पितळातील रोग्यांचे कपडे इ. हलक्या धुलाईने स्वच्छ न होणाऱ्या वस्त्रांची धुलाईही त्यात येते. ही धुलाई समाधानकारक व्हावी म्हणून पृष्ठक्रियाकारकांची विशेष प्रकारची मिश्रणे उपयोगी पडतात. [⟶ धुलाई].

वस्त्रोद्योग : वस्त्रोद्योगात कच्च्या लोकरीवर असणारी चरबी काढून टाकण्यासाठी, लोकरीचे वस्त्र विणताना धाग्याला लावलेली वंगण तेले धुवून काढण्यासाठी आणि कच्च्या कापसात असलेली मेणे व पेक्टिने काढून टाकण्यासाठी ही धुलाई करावी लागते. त्यासाठी पृष्ठक्रियाकारकांपासून बनविलेली मिश्रणे वापरली जातात. त्याचप्रमाणे वस्त्र विणताना ताग्याला लावलेली खळ आणि छपाईनंतर चिकटून राहिलेले अनावश्यक रंगमिश्रण पृष्ठक्रियाकारकांनी धुवून काढले जाते.

वस्त्रोद्योगातील अनेक ओल्या प्रक्रियांमध्ये पृष्ठक्रियाकारके फार महत्त्वाची ठरतात. उदा., तंतू किंवा वस्त्रे रंगविताना रंग सर्वत्र सम प्रमाणात बसावा म्हणून, मर्सरीकरणात धागे किंवा वस्त्रे लवकर आर्द्र व्हावे यासाठी, धागे विणण्यापूर्वी वंगण म्हणून त्यांना लावावयाच्या तेलाचे स्थिर पायस बनविण्यासाठी इ. विविध कार्यांकरिता पृष्ठक्रियाकारके उपयोगी पडतात. [⟶ कापड उद्योग; कापड छपाई].

दूधपुरवठा व डबाबंद खाद्यपदार्थ : दूधपुरवठा केंद्रातील पात्रे, यंत्रसामग्री, बाटल्या इत्यादींची सफाई काळजीपूर्वक करावी लागते; त्याचप्रमाणे फळे किंवा त्यांपासून बनविलेले खाद्यपदार्थ डब्यांत भरून हवाबंद करण्याचा व तत्सम खाद्यपेये तयार करण्याच्या कारखान्यात खाद्यपदार्थ यंत्रसामग्री, खाद्यपदार्थ भरावयाचे डबे इ. वस्तूंची सफाई करावी लागते. सफाई करावयाची वस्तू, तिचे स्वरूप व गुणधर्म आणि सफाई करण्याची क्रिया यांना अनुसरून जी वेगवेगळ्या प्रकारची पृष्ठक्रियाकारके व मिश्रणे आवश्यक असतात ती आता उपलब्ध झाल्यामुळे फार सोय झाली आहे.

खाद्यपदार्थ निर्मिती : खाद्यपेयांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करताना पिठामध्ये तेल सर्वत्र सारखे मिसळले जावे, पावाला पडणारी छिद्रे एकासारखी व इष्ट त्या आकारमानाची व्हावी, आइसक्रीममध्ये गुठळ्या व बर्फाचे खडे न बनता ते सर्वत्र सारखे मुलायम व्हावे, पाण्यात न विरघळणाऱ्या स्वादांचे पायसीकरण करता यावे इ. कार्यांसाठी पृष्ठक्रियाकारके वापरली जातात.

औषधे व सौंदर्यप्रसाधने : औषधांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी पृष्ठक्रियाकारके उपयोगी पडतात. पोटात घेण्याच्या औषधात वापरावयाची औषधी द्रव्ये पाण्यात अविद्राव्य असल्यास पृष्ठक्रियाकारके वापरून विद्राव्यीकरणाने किंवा पायसीकरणाने द्रवरूपात आणली जातात. कातडीला लावावयाची मलमे बनवितानाही औषधी द्रव्याचे पायसीकरण किंवा विसरण करण्यासाठी जशी पृष्ठक्रियाकारके लागतात तशीच ती मलम कातडीवर सुलभतेने पसरावे व त्यातील औषधी द्रव्य सम प्रमाणात आतपर्यंत पोचावे यासाठीही लागतात. अंतःक्षेपणासाठी (इंजेक्शनासाठी) औषधी द्रव्यांची विसरणेही पृष्ठक्रियाकारके वापरूनच बनविता येतात. सौंदर्यप्रसाधनांत वापरली जाणारी क्रीम्स, शँपू (केस धुण्यासाठी वापरण्यात येणारी मिश्रणे) तसेच दंतधावने, दाढीचे साबण इत्यादींमध्ये अनेक पृष्ठक्रियाकारके वापरावी लागतात.

वाहने : आगगाडी डब्यांची व तत्सम वाहनांची दैनंदिन साफसफाई करताना त्याचप्रमाणे डबे पुन्हा रंगविण्यापूर्वी जुने रंग काढून टाकण्यासाठी व धातुविलेपन करण्यापूर्वी पृष्ठभाग निर्मल करण्याच्या कामी पृष्ठक्रियाकारके फार महत्त्वाची कामगिरी बजावतात.

धातू उद्योग : विद्युत् धातुविलेपनाच्या प्रक्रियेत विलेपन करावयाचा धातूचा पृष्ठभाग अत्यंत निर्मल करावा लागतो. त्यासाठी धातुपृष्ठावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून पृष्ठक्रियाकारकांचा उपयोग केला जातो. धातूपासून वस्तू बनविण्याच्या कृतीत म्हणजे कापणे, कातणे, घासणे, भोके पडणे, आकार देणे, तार काढणे इ. प्रक्रियांमध्ये हत्यारांचा वापर करताना उत्पन्न होणारी उष्णता काढून घेतली जावी, पृष्ठभागाचे क्षरण होऊ नये यासाठी आणि अनिष्ट घर्षण टाळावे (वंगण) यांसाठी करावयाच्या योजनांत तेल व पाणी यांची पायसे वापरली जातात. त्यामध्ये पायसीकारके म्हणून पृष्ठक्रियाकारके वापरली जातात.

फेन-प्लवन प्रक्रिया : धातुके (कच्च्या स्वरूपातील धातू) खणून काढल्यावर धातुक आणि त्याबरोबर निरुपयोगी खडक, माती इ. पदार्थांचे कमी करुन धातुकाचे प्रमाण उच्च आहे असे मिश्रण मिळविण्यासाठी आधुनिक काळात फेन-प्लवन प्रक्रियेचा (फेसाच्या साहाय्याने मिश्रणातील घटक अलग करण्याच्या प्रक्रियेचा) वापर जास्त करण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये खणून काढलेल्या मिश्रणाचे बारीक चूर्ण करुन ते प्लवन-कोठीमध्ये (मिश्रण ढवळण्याची व त्यातून हवा प्रवाहित करण्याची सोय असलेल्या टाकीत) भरतात व त्यात पाणी व प्लवनकारक पदार्थ मिसळून मिश्रण चांगले ढवळतात व त्याच वेळी त्यातून हवेचा प्रवाह जाऊ देतात. त्यानंतर मिश्रणाच्या पृष्ठावर फेस तरंगू लागतो. या फेसाबरोबर धातुक मिश्रणातील एक घटक धातुक अथवा खडकाचे चूर्ण वर येतो. दुसरा घटक वर येत नाही, खालीच राहोत. त्यामुळे फेस काढून घेतला म्हणजे त्याबरोबर मिश्रणातील एक घटक निघून येतो. यामध्ये दुसरा घटक मुळीच नसतो असे नाही पण त्याचे प्रमाण मूळ मिश्रणातील प्रमाणापेक्षा खूपच कमी असते आणि त्यामुळे धातुकाचे संहत (जास्त प्रमाण असलेले) मिश्रण मिळते. या प्रक्रियेत वापरलेला प्लवनकारक पदार्थ हे एक मिश्रण असते; त्यामध्ये प्रवर्तक, अनुकूलक व फेनकारक असे तीन घटक असतात.

खणून काढलेल्या मिश्रणाचे दोन्ही घटक म्हणजेच धातुक व खडक हे दोन्ही मुळात जलस्नेही असतात. प्रवर्तक संयुगाच्या विवेचक क्रियेने त्यांपैकी कोणत्यातरी एका घटकाचा पृष्ठभाग जलद्वेषी बनतो. जलद्वेषी पृष्ठाच्या सभोवार फेसाचा घट्ट वेढा पडतो व त्यामुळे तो घटक फेसाबरोबर जलीय मिश्रणाच्या पृष्ठावर तरंगत राहतो व काढून घेता येतो. जलस्नेही पृष्ठभाग असलेल्या घटकाला फेस चिकटून राहत नाही, त्यामुळे तो घटक तसाच मागे राहतो. अनेक पृष्ठक्रियाकारके प्रवर्तक म्हणून उपयोगी पडतात. पण पृष्ठक्रियाकारकाचा गुण नसलेली काही द्रव्येही (उदा., थोड्या कार्बन अणूंची शृंखला असलेल्या अल्कोहॉलांची झँथेटे) सामान्यतः वापरली जातात. कित्येकदा खनिजतेलेही यासाठी वापरतात. ती मात्र एखादे पायसीकारक वापरून पायसरूप करून घ्यावी लागतात. प्रवर्तकाचे कार्य विशिष्ट pH [⟶ पीएच मूल्य] असले म्हणजे कार्यक्षमतेने होते. अशी अनुकूल परिस्थिती मिळावी यासाठी अम्ले अथवा क्षारके (अम्लांशी विक्रिया झाल्यास लवणे देणारी संयुगे) अनुकूलक म्हणून वापरतात. प्लवन क्रियेसाठी आवश्यक असलेल्या फेसाचे बुडबुडे खनिजाच्या सान्निध्यात फुटणार नाहीत, योग्य काळ टिकतील आणि अखेरीस सहज नाहीसे करता येतील असे असावे लागतात. ही उद्दिष्टे फॅटी अल्कोहॉलाची सल्फेटे, अल्किल अरिल सल्फोनेटे इ. पृष्ठक्रियाकारके वापरल्याने साध्य होतात. तथापि व्यवहारात फेनकारक म्हणून पाइन ऑइल, क्रेसॉल, C5 ते C8 कार्बन अणूंची शृंखला असलेली अल्कोहॉले इ. इतर पदार्थही वापरले जातात.[⟶ प्लवन].

कृषी उद्योग : कृषिक्षेत्रात जी पीडकनाशके वापरतात ती पाण्यात अविद्राव्य असतील, तर पायसीकारक वापरून पायसरूपात फवारली म्हणजेच परिणामकारक होतात. जलविद्राव्य असतील, तर पिकावर ती चांगली पसरावी म्हणून जलीय विद्रावात आर्द्रीकारक मिसळणे श्रेयस्कर असते. कीटकांच्या अंगावर असणारे मेणचट आवरण काही पृष्ठक्रियाकारकांच्या क्रियेने निघून जाते व त्यामुळे त्यांचे मिश्रण असलेले पीडकनाशक कीटकांच्या शरीरात चांगल्या तऱ्हेने भिनते, म्हणून त्यांचाही उपयोग केला जातो. कीटकनाशकाचा थर पाण्याच्या पृष्ठावर सर्वत्र सारखा पसरण्यासाठीही पृष्ठक्रियाकारकाचा मिश्रणात अंतर्भाव करावा लागतो.

झाडावरून काढलेल्या फळांचा उपयोग करण्यापूर्वी त्यांच्या पृष्ठभागावर राहिलेला कीटकनाशकाचा थर धुवून काढावा लागतो. त्याकरिता पृष्ठक्रियाकारके उपयोगी पडतात.

प्लॅस्टिक उद्योग : प्लॅस्टिकांच्या निर्मितीत एका किंवा अधिक एकवारिकांचे पायस बनवून ⇨ बहुवारिकीकरण घडवावे लागते. बहुवारिकीकरणाने जो चीक (लॅटेक्स) बनतो तो टिकण्यासाठीही पृष्ठक्रियाकारके वापरली जातात.

बहुवारिकीकरण संधारणाच्या (द्रवात लोंबकळत्या स्थितीत सर्वत्र विखुरलेल्या सूक्ष्म कणांच्या) अवस्थेतही घडविले जाते व त्यासाठी संधारण साहाय्यक म्हणून पृष्ठक्रियाकारकांचा उपयोग केला जातो. नैसर्गिक रबराचा चीक किंवा कृत्रिम रबराचा चीक संहत करण्याच्या एक प्रक्रियेत चिकात पृष्ठक्रियाकारक मिसळतात व मिश्रण संथ राहू देतात. काही वेळाने संहत चीक वरच्या थरात जमा होतो तो वेगळा करतात. रबराच्या काही वस्तू बनविताना त्यात काजळी (कार्बन ब्लॅक) मिसळावी लागते. त्यासाठी पृष्ठक्रियाकारक वापरून बनविलेले त्यांचे संधारण उपयोगी पडते. फेनरूप रबर बनवितानाही फेनकारक म्हणून पृष्ठक्रियाकारके वापरली जातात.

रंगलेप : रंगलेपांच्या (पेंट्सच्या) निर्मितीत रंगद्रव्य इष्ट त्या वाहकात संधारित करावे लागते. रंगद्रव्याचे सूक्ष्म कण एकमेकांपासून वेगळे रहावे, एकत्र होऊन ते तळाशी बसू नयेत, त्याचप्रमाणे एकापेक्षा अधिक रंगद्रव्ये एकत्र वापरली असल्यास त्यांचे वितरण सर्वत्र सारखे रहावे यासाठी पृष्ठक्रियाकारके उपयोगी पडतात.

खनिज तेल उद्योग : खनिज तेलाची विहीर खोदताना फिरत्या छिद्रकाच्या (ड्रिलच्या) सभोवार एक प्रकारचे दाट, चिखलासारखे द्रवमिश्रण वापरावे लागते, त्याला छिद्रण पंक (ड्रिलिंग मड) म्हणतात. खडकाला भोक पाडताना सुटे झालेले खडकाचे तुकडे वाहून नेणे, छिद्रक थंड ठेवणे, कूपाच्या भिंतींना आधार देणे आणि खडकातून द्रव पदार्थ अथवा वायू जोराने बाहेर पडू लागले, तर त्यांना थोपविणे ही महत्त्वाची कामे ते बजावते. हे मिश्रण यथायोग्य बनविण्यासाठी पृष्ठक्रियाकारके उपयोगी पडतात. तेलाची खाण जुनी होऊ लागली म्हणजे तीमधून निघणाऱ्या तेलाचे प्रमाणही कमी होऊ लागते. हे प्रमाण वाढावे म्हणून तळाशी असलेल्या खडकाला व वाळूला चिकटून राहिलेले तेल सुटे करुन घेतात. त्यासाठी पृष्ठक्रियाकारकांची जलीय मिश्रणे वापरतात. त्यांच्या योगाने खडक ओले होतात व त्यांना चिकटलेले तेल बाहेर पडते. याशिवाय खनिज तेलांच्या पायसांचे भंजन करून तेल मोकळे करण्यासाठीही पृष्ठक्रियाकारके वापरली जातात. [⟶ खनिज तेल].

रासायनिक उद्योग : कित्येक रासायनिक उद्योगांत विक्रिया सुकर व्हाव्या यासाठी विक्रिया घटकांची पायसे किंवा सांधारणे बनवावी लागतात. त्यासाठी तसेच काही ठिकाणी उत्प्रेरके (रासायनिक विक्रियेची त्वरा बदलणारे पण विक्रियेच्या शेवटी तसेच राहणारे पदार्थ) म्हणून उदा., मेदांचे (स्निग्ध पदार्थांचे) जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने घटक अलग करण्याची क्रिया) करणाऱ्या ट्विचेल विक्रियाकारकात पृष्ठक्रियाकारके उपयोगी पडतात.

महत्त्वाच्या उद्योगधंद्यांतील काही ठळक उदाहरणेच वर दिली आहेत; पण पृष्ठक्रियाकारकांचे उपयोग इतके विविध आहेत की, बहुतेक सर्व उद्योगधंद्यांत कोठेना कोठे तरी पृष्ठक्रियाकारके लागतात असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही.

वर्गीकरण : पृष्ठक्रियाकारकांचे वर्गीकरण त्यांच्या रेणूंमध्ये असणाऱ्या जलद्वेषी अणुगटाच्या गुणधर्मानुसार (१) धनायनी, (२) ऋणायनी, (३) आयनहीन व (४) उभयधर्मी असे केले जाते. धनायनी वर्गाच्या संयुगांच्या जलीय विद्रावात, जलद्वेषी गटावर ऋण विद्युत् भार असतो व ऋणयनी गटातील अशा गटावर धन विद्युत् भार असतो. आयनहीन गटामधील संयुगांचे आयनीभवन होत नाही उभयधर्मी पृष्ठक्रियाकारकांच्या रेणूमध्ये धन व ऋण विद्युत् भार असलेले गट असतात.

धनायनी पृष्ठक्रियाकारके : (अ) कार्बॉक्सिलेटे : साबण हे पृष्ठक्रियाकारक या वर्गात मोडते [⟶ साबण]. नऊपासून एकवीसपर्यंत कार्बन अणू असलेल्या ⇨ कार‌्बॉक्सिलिक अम्लांच्या सोडियम, पोटॅशियम आणि अमाइन लवणांना ही संज्ञा लावतात. अफेनद (साबणाचा फेस न होणारे यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची बायकार्बोनेटे व सल्फेटे विरघळलेली असतात) पाणी व अम्ल विद्राव यांमध्ये साबण वापरता येत नाही. स्नानाकरिता व इतर अनेक ठिकाणी पाणी फेनद किंवा थोडे अफेनद असेल, तर साबण अजूनही पसंत केला जातो. ॲमिनो गट असलेल्या कारबॉक्सिलिक अम्लांपासून ⇨ ॲसिलीकरणाने जी N – ॲसिल अम्ले मिळतात त्यांची सोडियम लवणे विशेष प्रकारची पृष्ठक्रियाकारके म्हणून उपयोगी पडतात. उदा., सोडियम N – लॉरॉइलसार्कोसिनेट (सूत्र १) दंतधावनात वापरतात.

सूत्र १. सोडियम N – लॉरॉइलसार्कोसिनेट

हे फेस उत्पन्न करणारे असून ग्लुकोजाचे लॅक्टिक अम्लात रूपांतर करणारी जी एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिनयुक्त संयुगे) तोंडात असतात त्यांना ते निष्किय बनविते.

(आ) सल्फोनेटे : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अल्कीन सल्फोनेटांचा प्रसार झाला. परंतु त्यानंतर अल्किल बेंझीन सल्फोनेट वर्गाच्या संयुगांनी त्यांची जागा घेतली. कारण ती तयार करणे स्वस्त असून गुणधर्मात अल्कीन सल्फोनेटापेक्षा सरस असतात असे दिसून आले. बारा कार्बन अणूंची सरळ शृंखला असलेले या वर्गाचे संयुग, डोडेसिल बेंझीन सल्फोनेट, फार मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याची क्षार धातूंची (सोडियम, पोटॅशियम, लिथियम इ. धातूंची) लवणे जीवरासायनिक विक्रियांनी अपघटन पावतात (रेणूचे तुकडे होतात) त्यामुळे जलप्रदुषण होत नाही. ती pH मूल्याच्या पूर्ण पल्ल्यात पाण्यात पुरेशी विद्राव्य असून टिकाऊ असल्यामुळे अफेनद पाण्यातही वापरता येतात. यांची पृष्ठक्रियाकारक शक्ती उच्च असल्यामुळे इतर पदार्थांशी मिश्र करुन त्याचे गुणवर्धन करता येते. त्यांचा रंग फिका असून त्यांना दुर्गंध नसतो. प्रक्षालके, पायसीकारके, तसेच फेनोत्पादन यांसाठी ती वापरली जातात.

(१) पेट्रोलियम सल्फोनेटे : खनिज तेलाच्या परिष्करण प्रक्रियेत वर्णहीन व ⇨ ऑक्सिडीभवन होणार नाही अशी विविध वंगण तेले बनविण्याच्या कृतीत वाफाळ सल्फ्यूरिक अम्लाची किंवा SO3 वायूची विक्रिया विशिष्ट तेल खंडावर करावी लागते. या प्रक्रियेत जो सल्फॉनिक अम्लांचा भाग खाली राहतो त्यापासून दोन प्रकारची सल्फोनेटे वेगळी करतात. पहिल्या प्रकारची जल-विद्राव्य व दुसऱ्या प्रकारची तैल-विद्राव्य असतात. तैल-विद्राव्य असतात. तैल-विद्राव्य सल्फोनेटांना ‘मॅहॉगनी साबण’ असेही म्हणतात. आर्द्रीकरण, प्रक्षालन, विसरण, पायसीकरण, विद्राव्यीकरण व क्षरणविरोध यांसाठी ती उपयोगी पडतात.

(२) डाय-अल्किल सल्फोसक्सिनेटे : सोडियम डाय — (२ एथिल हेक्झिल) सल्फोसक्सिनेट हे अशा पृष्ठक्रियाकारकांचे एक उदाहरण आहे. अशा प्रकारची संयुगे बनविण्याची क्रिया दोन टप्प्यांत घडवून आणतात. प्रथम मॅलेइक अँनहायड्राइडावर इष्ट अल्कोहॉलाची विक्रिया करुन मॅलेइक अम्लाचे डाय-एस्टर बनवितात व नंतर त्यावर सोडियम बायसल्फेटाची विक्रिया करून सोडियम डाय-अल्किल सल्फोसक्सिनेट मिळवितात (सूत्र २).

ही पांढऱ्या, मेणचट व गंधहीन घनरुपात किंवा वर्णहीन व संहत विद्रावांच्या रूपात विकली जातात.

यांची पृष्ठक्रियाकारक शक्ती उच्च असते. आर्द्रीकरण व विद्राव्यीकरण यांसाठी ती उपयोगी पडतात. जलीय विच्छेदन होण्याचा संभव असल्यामुळे ती अम्ल व क्षारीय विद्रावात मात्र वापरता येत नाहीत.

सूत्र २. सोडियम डाय-अल्किल सल्फोसक्सिनेट मिळविएयाची विक्रिया

(३) नॅप्थॅलीन सलफोनेटे : नॅप्थॅलीन सल्फॉनिक अम्ल, टेट्राहायड्रो नॅप्थॅलीन सल्फॉनिक अम्ल, अल्किलीकृत नॅप्थॅलीन सल्फॉनिक अम्ल आणि फॉर्माल्डिहाइड व नॅप्थॅलीन यांची विक्रिया होऊन मिळणाऱ्या संयुगांपासून मिळणारे सल्फॉनिक अम्ल यांच्या लवणांचा या प्रकारात समावेश होतो. अम्ल व क्षारीय विद्रावांत यांचे जलीय विच्छेदन होत नाही. अफेनद पाण्याचा, तसेच प्रबल ऑक्सिडीकारकांचा यावर परिणाम होत नाही. संधारण साहाय्यके, स्थिरकारके, आर्द्रींकारके व विद्राव्यीकारके म्हणून ही अनेक ठिकाणी उपयोगी पडतात.

(४) अल्किल-ॲसिल-ॲमिनो सल्फॉनिक अम्ल अनुजात : २ — ॲमिनोएथेन सल्फॉनिक अम्लातील (टॉरिनातील) नायट्रोजन अणूला इष्ट ती कार्बन संख्या असलेले अल्किल गट [⟶ अल्किलीकरण] आणि ॲसिल गट जोडले [⟶ ॲसिलीकरण], तर जी संयुगे मिळतात ती पृष्ठक्रियाकारके असून त्यांच्या अंगी अनेक गुण असतात. ती अफेनद पाण्यात वापरता येतात, जीवरासायनिक विक्रियांनी त्यांचे अपघटन होते आणि वापर करताना अम्ले व क्षारके यांच्या ज्या संहती असतात त्या संहतीना ती टिकतात. अल्किल व ॲसिल गट यांची निवड करून आर्द्रींकरणाचा किंवा प्रक्षालनाचा गुण प्रकर्षाने असेल अशी संयुगे बनविता येतात. सोडियम N—ओलेइल—N—मिथिलटॉरेट (सूत्र ३) हे एक अशा तऱ्हेचे प्रक्षालक आहे. उत्पादन पुरेसे स्वस्त होत नसल्यामुळे यांचा उपयोग विशिष्ट कामापुरताच मर्यादित आहे.

सूत्र ३. सोडियम N – ओलेइल – N – मिथिलटॉरेट

(५) मेदाम्लांची सल्फोएस्टरे : एथिलीन ऑक्साइडापासून सोडियम बायसल्फाइटाच्या विक्रियेने मिळणाऱ्या सोडियम इसेथायोनेटावर मेदाम्लाची किंवा ॲसिल क्लोराइडाची विक्रिया घडविली, तर मेदाम्लाचे बीटा सल्फोएस्टर मिळते (सूत्र ४). ही संयुगे अफेनद पाण्यात प्रक्षालके म्हणून वापरता येतात. जलीय विच्छेदन होण्याची शक्यता असल्यामुळे यांचा प्रसार मर्यादित असला, तरी कित्येक ठिकाणी ती उपयुक्त ठरली आहेत. उदा., ओलेइक अम्लापासून मिळणारे एस्टर उदासीन (अम्लीय वा क्षारीय गुणधर्म नसलेल्या) व सौम्य क्षारीय विद्रावात प्रक्षालक म्हणून वापरले जाते.

सूत्र ४. मेदाम्लाचे बीटा सल्फोएस्टर मिळविण्याची विक्रिया 

(६) ओलेफीन सल्फोनेट : चौदा ते अठरा कार्बन अणूंची साखळी असलेली १ — ओलेफिने [⟶ ॲलिफॅटिक संयुगे] आता मुलबक व स्वस्त झाली आहेत. त्यांचे सल्फॉनीकरण केल्याने मिळणारी संयुगे पृष्ठक्रियाकारके म्हणून रेषीय (शाखारहित साखळी असलेल्या) अल्किल बेंझीन सल्फोनेटापेक्षा काही बाबतींत सरस असतात, असे दिसून आले आहे; परंतु किंमत आणि उपयोग या दृष्टींनी त्यांची व्यवहार्यता अजून ठरलेली नाही.

(इ) सल्फेटे : (१) अल्किल सल्फेटे : सल्फेटामध्ये असणारा C—O—S हा गट सल्फोनेटामधील C—S गटापेक्षा जास्त सुलभतेने जलीय विच्छेदन होणारा आहे. त्यामुळे सल्फेट वर्गाच्या पृष्ठक्रियाकारकांच्या उपयोगावर काही मर्यादा पडतात.

प्राथमिक अल्कोहॉल-सल्फेटे बनविण्यासाठी प्रथम वसाम्लांचे ⇨क्षपण करून बारा ते चौदा कार्बन अणू असलेली प्राथमिक अल्कोहॉले [⟶अल्कोहॉल] बनवावी लागतात. यांचे प्रक्षालन गुणधर्म त्या त्या रेणुभारांच्या वसाम्लापासून बनविलेल्या साबणासारखेच असतात. अफेनद पाण्यातही ही वापरता येतात. तथापि प्राथमिक अल्कोहॉले बनविण्याची प्रचलित प्रक्रिया खर्चाची असल्यामुळे त्यांचा प्रसार मर्यादित आहे.

सोडियम लॉरिल सल्फेट हे जमिनीवर अंथरण्याचे गालिचे धुण्यासाठी, शँपूत आणि दंतधावनात वापरले जाते. विपुल फेस होणे हा अल्किल सल्फेटांचा एक महत्त्वाचा गुण आहे. बहुवारिकीरकरण क्रिया घडविताना पायसीकारक किंवा विसरण-साहाय्यक म्हणून ही उपयोगी पडतात.

(२) सल्फेटीकरण केलेली तेले व मेदे : ज्यांच्या घटक अम्लात एक द्विबंध किंवा एक द्विबंध आणि हायड्रॉक्सी गट आहे अशा तेलांचे व मेदांचे सल्फेटीकरण सल्फ्यूरिक अम्लाने सुलभतेने घडविता येते. ऑलिव्ह तेलात एक द्विबंध आणि एरंडेलात एक द्विबंध व एक हायड्रॉक्सी गट आहे. या तेलांपासून बनविलेली सल्फेटे पूर्वीपासून वस्त्रोद्योगात आर्द्रीकारके म्हणून वापरण्यात आहेत. पायसीकारके व प्रक्षालके म्हणूनही यांपैकी काही वापरता येतात.

वरील अम्लांच्या एथिल, प्रोपिल इ. कमी रेणुभाराच्या एस्टरांचे सल्फेटीकरण केल्याने मिळणारी सल्फेट मिश्रणे उच्च आर्द्रींकारके, पायसीकारके व प्रक्षालके म्हणून उपयोगी पडतात. वस्त्रोद्योगातील किर बॉयलिंग (रंजनक्रिया किंवा विरंजन-रंग घालविण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी ज्यात वाफ निर्माण करण्यात येते अशा उपकरणात करण्यात येणारी प्रक्रिया) व अखंड विरंजन या प्रक्रियांत ती वापरली जातात.

(३) एथॉक्सीकरण (संयुगात एथॉक्सी गट —C2H5O— घालणे) व सल्फेटीकरण केलेली अल्किल फिनॉले : प्रोपिलिनाचे त्रिवारिक व चतुर्वारिक (प्रोपिलीन हे एकक अनुक्रमे तीन व चार वेळा, एकापुढे एक जोडल्याने बनणारी संयुगे) वापरून फिनॉलापासून नोनिल व डोडेसिल फिनॉल ही संयुगे बनवितात. त्यांमध्ये ऑर्थो व पॅरा समघटकाचे [⟶ समघटकता] मिश्रण असते. एथिलीन ऑक्साइडाची विक्रिया त्यांवर केली म्हणजे जे पदार्थ बनतात त्यांचे सल्फेटीकरण केले असता अफेनद पाण्यात वापरता येतील अशी प्रक्षालके मिळतात. ही गंधहीन व वर्णहीन असतात आणि ३०-६०% कार्यक्षम संयुग असलेल्या जलीय विद्रावाच्या रूपात मिळतात. ही विपुल फेसाळणारी असून प्रबल आर्द्रीकारक, पायसीकारक व संधारण साहाय्यक म्हणून उपयोगी पडतात.

सल्फेटीकरण करण्यासाठी ॲमिडो सफ्यूरिक अम्ल (H2N—SO3H) वापरतात. त्यामुळे प्रथम अमोनियम लवण तयार होते. त्यावर दाहक (कॉस्टिक) सोड्याची विक्रिया करून सोडियम लवण मिळवितात.

(४) एथॉक्सीकरण व सल्फेटीकरण केलेली अल्कोहॉले : केवळ सल्फेटीकरण केलेल्या अल्कोहॉलांपेक्षा एथॉक्सीकरण व सल्फेटीकरण केलेली अल्कोहॉले अनेक दृष्टींनी सरस असतात. ती अफेनद पाण्यातही विपुल फेसाळणारी असून पाण्यात जास्त विरघळतात. त्वचा व डोळे यांवर त्यांचा अनिष्ट परिणाम होत नाही. शिवाय ती स्वस्त असतात. भरपूर फेस देणारी प्रक्षालके, पायसीकारके, आर्द्रीकारके, व संधारण साहाय्यके म्हणून तू उपयोगी पडतात.

(ई) फॉस्फेट एस्टरे : कित्येक अल्किल ऑर्थोफॉस्फेट व अल्किल पॉलिफॉस्फेटे पृष्ठक्रियाकारके म्हणून उपयोगी पडतात. उदा., डाय (२—एथिल हेक्झिल) ऑर्थोफॉस्फेट क्षारीय विद्रावात टिकणारे असून आद्रींकारक, पायसीकारक म्हणून उपयोगी पडते. (२—एथिल हेक्झिल)5Na5(P3O10)2 हे पॉलिफॉस्फेट वस्त्रोद्योग व धातूंच्या वस्तू बनविण्याच्या प्रक्रियांत आद्रीकारक, पायसीकारक आणि संधारण साहाय्यक म्हणून वापरले जाते.

ऋणायनी पृष्ठक्रियाकारके : या वर्गाच्या संयुगांतील जलद्वेषी गट अँमिनो नायट्रोजन किंवा चतुर्थक नायट्रोजन अणुयुक्त असतो.

सूत्र ५. N – ९ – ऑक्टाडेसिनिल ट्रायमिथिलीन डाय-अमाइन

सूत्र ६. हेप्टाडेसिल – २ – इमिडॅझोलीन

ॲलिफॅटिक वर्गाची [⟶ ॲलिफॅटिक संयुगे] कित्येक मोनोडाय- व पॉलि-अमाइने आणि राळेपासून (रोझिनापासून) मिळणारी अमाइने प्लवकारके, क्षरणविरोधके व विसरण साहाय्यके म्हणून मुख्यतः उपयोगी पडतात. याशिवाय लांब कार्बन शृंखला असलेल्या गटांनी प्रतिष्ठापित झालेली अमाइने (उदा., N — ९ — ऑक्टाडेसिनिल ट्रायमिथिलीन डाय-अमाइन सूत्र ५) आणि वलयी संरचनांची अशी संयुगे (उदा., हेप्टाडेसिल — २ — इमिडॅझोलीन; सूत्र ६) पृष्ठक्रियाकारके म्हणून वापरली जातात.

अमाइन ऑक्साइडे : हायड्रोजन पेरॉक्साइडाने तृतीयक अमाइनांचे [⟶  अमाइने] ऑक्सिडीकरण केले म्हणजे अमाइन ऑक्साइडे बनतात (सूत्र ७). ही संयुगे आद्रींकारके व पायसीकारके म्हणून, त्याचप्रमाणे सुती कापडासाठी प्रक्षालके म्हणून वापरली जातात. यांच्या योगाने वस्त्राला मृदुपणा येतो. याशिवाय ती धातुविलेपनासाठी वापरण्याच्या मिश्रणात आणि वस्त्रोद्योगातील काही प्रक्रियांत उपयोगी पडतात.

सूत्र ७. अमाइन ऑक्साइड मिळविण्याची विक्रिया

पॉलिऑक्सिएथीलन अमाइने : अमाइनांच्या एथॉक्सीरणाने मिळणारी या वर्गाची संयुगे अम्ल आणि उदासीन विद्रावात पायसीकारके, आद्रीकारके, विसरण साहाय्यके व क्षरणविरोधके म्हणून वापरली जातात.

हायड्रॉक्सिएथिल गट (—CH2—CH2—OH) व लांब कार्बन शृंखला असलेले अल्किल गट यांनी प्रतिष्ठापन झालेली इमिडॅझोलीन संयुगे (सूत्र ८) आर्द्रींकारके पायसीकारके, क्षरणविरोधक व प्रक्षालके म्हणून उपयोगी पडतात.

सूत्र ८ प्रतिष्ठापित इमिडॅझोलीन संयुगे

एथिलीन डाय-अमाइनापासून मिळणारी ईथर व एस्टर वर्गाची संयुगे : ईथर वर्गाच्या संयुगांची सामान्य संरचना सूत्र ९ मध्ये दिल्याप्रमाणे असते.

सूत्र ९. एथिलीन डय-अमाइनापासून मिळणाऱ्या ईथरांची सामान्य संरचना

यामधील x व y यांची मूल्ये ४ ते १०० असतात. पायसीकारके, विसरण साहाय्यके, पायसभेदके व फेननाशके म्हणून यांचा उपयोग केला जातो.

या वर्गाची एस्टरे बनविण्यासाठी एथिलीन डाय-अमाइन व एथिलीन डाय-अमाइन व एथिलीन ऑक्साइड यांच्या विक्रियेने प्रथम हायड्रॉक्सी संयुगे बनवितात व नंतर त्यांचे ⇨ एस्टरीकरण  करतात.

अमाइड गटयुक्त अमाइने : दोन किंवा अधिक ॲमिनो गट असलेली अमाइने आणि लांब कार्बन शृंखला असलेली अम्ले यांच्या विक्रियेने मिळणाऱ्या संयुगात अमाइड व अमाइन दोन्ही गट असू शकतात. उदा., स्टिअरीक अम्ल व N- डायमिथिल अँमिनो प्रोपिल अमाइन यांपासून मिळणारे संयुग                             CH3(CH2)16.CO.NH.CH2.CH2.CH2.N.(CH3)2. अशा संयुगाचा क्षरणविरोध व खनिज तेल उत्पादनात पायसभेदन करण्यासाठी वापरण्याच्या मिश्रणात उपयोग केला जातो.

चतुर्थक अनोनियम लवणे : यांची सामान्य संरचना सूत्र १० मधील प्रमाणे दाखविता येते.

सूत्र १०. चतुर्थक अमोनियम लवणांची सामान्य संरचना

यामध्ये R हा लांब कार्बन शृंखलायुक्त गट असून R’, R” व R”‘ हे मिथिल, एथिल, बेंझिल इ. गट व X हा CI, Br, I मूलके असतात. सामान्यत: बेंझिल गट एकच असतो. उदा., अल्किल बेंझिल डायमिथिल अमोनियम क्लोराइड (सूत्र ११). R च्या जागी वेगवेगळे गट असलेली अशी सुयंगे विसरण साहाय्यके, पायसभेदके व आर्द्रीकारके उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे कित्येकांच्या अंगी जंतुनाश करण्याचाही गुण आढळतो.

सूत्र ११. अल्किल बेंझिल डायमिथिल अमोनियम क्लोराइड

वरील सामान्य संरचनेत N.R’R”R”‘ याऐवजी एक पिरिडिल गट ठेवला, तर बनणारे संयुग याच वर्गात पडते. सूत्र १२ मध्ये दर्शविलेल्या संरचनेची अल्किल पिरिडीनियम हॅलाइडे विसरण साहाय्यके, आर्द्रीकारके व पायसीकारके म्हणून उपयोगी पडतात. ती जंतुनाशके म्हणूनही वापरली जातात.

सूत्र १२. अल्किल पिरिडिनियम हॅलाइड

आयहीन पृष्ठक्रियाकारके : या वर्गाच्या संयुगांचे आयनीभवन होत नाही. कारबॉक्सी, हायड्रॉक्सी किंवा हायड्रोजन अणू असलेले असलेले ॲमिडो किंवा अँमिनो गट ज्यामध्ये आहेत अशा जलद्वेषी संयुगापासून एथिलीन ऑक्साइडाच्या विक्रियेने या वर्गाची अनेक पृष्ठक्रियाकारके बनविता येतात. त्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम मेथॉक्साइड यासारखे क्षारकीय उत्प्रेरक वापरले जातात. अल्कोहॉले, फिनॉले किंवा कारबॉक्सिलिक अम्ले यांतील हायड्रॉक्सी गटातील हायड्रोजनाशी प्रथम एका एथिलीन ऑक्साइड रेणूची विक्रिया होऊन हायड्रॉक्सी गट असलेले संयुग प्रथम तयार होते. नंतर एथिलीन ऑक्साइडचा दुसरा रेणू या संयुगामध्ये असणाऱ्या हायड्रॉक्सी गटाशी विक्रिया घडवितो आणि ही प्रक्रिया चालू ठेवून आवश्यकतेप्रमाणे पन्नास किंवा जास्त एथॅनॉक्सी गट असलेली संयुगे बनविता येतात (सूत्र १३).

सूत्र १३. हायड्रॉक्सी गट असलेल्या संयुगापासून एथॅनॉक्सी गट असलेले संयुग तयार करण्याची विक्रिया

एथॅनॉक्सी गटांची संख्या नियंत्रित करून इष्ट गुणधर्म असलेले पृष्ठक्रियाकारके बनविता येतात. सामान्यत: या वर्गाची पृष्ठक्रियाकारके द्रवरूप किंवा कमी तापमानास वितळणाऱ्या मेणासारख्या घन पदार्थांच्या रूपात असतात. अल्किल अरिल सल्फोनेटे या धनायनी पृष्ठक्रियाकारकांच्या खालोखाल यांचे उत्पादन केले जाते.

एथॉक्सीकरण केलेली अल्किल फिनॉले : ऑक्टिल नोनिल व डोडेसिल फिनॉले आणि एथिलीन ऑक्साइड यांच्या विक्रियांनी अनेक पृष्ठक्रियाकारके मिळतात. शाखा असलेल्या कार्बन शृंखलायुक्त संयुगे ही रेषीय कार्बन शृंखला असलेल्या संरचनांच्या संयुगांइतक्या सुलभतेने जीवरासायनिक विक्रियांनी अपघटन पावत नाहीत. पॉलिऑक्सिएथिलिनाच्या प्रमाणानुसार पृष्ठक्रियाकारक गुणधर्मात फरक पडतो. हे प्रमाण २० ते ४०% असलेली संयुगे फेननाशके, प्रक्षालके आणि खनिज तेलाच्या उत्पादनात विसरण साहाय्यके म्हणून उपयोगी पडतात; ४० ते ६० % प्रमाण असलेली तैल-विद्राव्य प्रक्षालके, पायसीकारके व विसरण साहाय्यके; ६० ते ७०% प्रमाण असलेली वस्त्रोद्योगातील प्रक्रियांत साहाय्यके व प्रक्षालके म्हणून आणि ८० ते ९५ % प्रमाण असलेली व्हिनिल ॲसिटेट व ॲक्रिलेट वर्गाच्या प्लॅस्टिक उत्पादनात, पायसीबहुवारिकीकरणात [⟶ बहुवारिकीकरण] वापरली जातात.

एथॉक्सीकरणासाठी वापरावयाच्या फिनॉलात एक, दोन अथवा अनेक अल्किल गटही असतात आणि कार्बन शृंखलांतील एकंदर कार्बन अणूंची संख्या ५ ते १८ असते. डाय ॲमिल फिनॉल, पॅरा तृतीयक (टर्शरी) ऑक्टिल फिनॉल व नोनिल फिनॉल ही संयुगे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

ग्लिसरॉल एस्टरे : नैसर्गिक मेदे व ग्लिसरीन यांची विक्रिया क्षारीय उत्प्रेरकांच्या उपस्थितीत घडविण्यास ग्लिसरिनातील एक वा दोन हायड्रॉक्सी गटांचे मेदाम्लांनी एस्टरीकरण होऊन पृष्ठक्रियाकारके बनतात. त्यांपैकी कित्येक पायसीकारके, विसरण साहाय्यके, वंगणे व विद्राव्यीकारके म्हणून खाद्यपेये, सौंदर्यप्रसाधने व औषधे यांच्या उत्पादनात वापरली जातात.

मेदाम्लांची पॉलिऑक्सिएथिलीन एस्टरे : मेदाम्ले आणि एथिलीन ऑक्साइड यांची, क्षारीय उत्प्रेरक वापरून किंवा एथिलीन ग्लायकॉल व मेदाम्ले आणि अम्लधर्मी उत्प्रेरक वापरून, विक्रिया घडविल्याने अशी एस्टरे बनतात. यांच्या जलीय विद्रावांचा फार फेस होत नाही. ही मुख्यत: पायसीकारके म्हणून, त्याचप्रमाणे वस्त्रोद्योगातील प्रक्रियांत तंतूंना वंगणे म्हणून, स्थिरविद्युत् रोधी म्हणून आणि वस्त्राला मृदुपणा यावा यांसाठी वापरली जातात. उष्ण अम्ल व क्षारीय विद्रावात (एस्टर गटाचे जलीय विच्छेदन होण्याची शक्यता असल्यामुळे) ही वापरता येत नाहीत.

रोझीन व टॉल तेल यांमध्ये असणाऱ्या अम्लापासून बनविलेल्या पॉलिऑक्सिएथिलीन एस्टरांचा फेस फारसा होत नाही. शिवाय त्यांचे पृष्ठक्रियाकारी गुणधर्म उष्ण अम्ल आणि क्षारीय विद्रावात टिकतात. यामुळे ती घरगुती स्वयंचलित यांत्रिक धुलाई व औद्योगिक प्रक्षालन प्रक्रिया यांमध्ये वापरली जातात.

ॲनहायड्रोसॉर्बिटॉल एस्टरे : अम्लधर्मी उत्प्रेरक वापरून वेगवेगळी मेदाम्ले व ॲनहायड्रोसॉर्बिटॉल यांची यांची विक्रिया घडविली, तर त्या त्या अम्लांची ॲनहायड्रोसॉर्बिटॉल एस्टरे बनतात. या विक्रियेत एस्टरीकरणाबरोबरच सॉर्बिटॉलामधील दोन हायड्रॉक्सी गटांपासून अंतर्गत ईथरेही बनतात [⟶ ईथर—१]. सॉर्बिटान हे अशा अंतर्गत ईथरांचे मिश्रण आहे. त्यापासून बनलेली मोनो, डाय व ट्राय ओलिएटे आणि पामिटेटे वसास्नेही (मेदस्नेही) असून ती पायसीकारके, विद्राव्यीकारके व तंतु-वंगणे म्हणून उपयोगी पडतात. या वर्गाची कित्येक संयुगे खाद्यपेये व औषधे यांमध्ये पायसीकारके व विद्राव्यीकारके म्हणून वापरली जातात. त्याचप्रमाणे कृत्रिम तंतूंच्या निर्मिती व वस्त्रोद्योगातील प्रक्रियांमध्ये स्थिरविद्युत् रोधक, मृदुकारके व पायसाकारके म्हणून उपयोगी पडतात.

या एस्टरांचे एस्थॉक्सीकरण केल्याने जास्त जलस्नेही पृष्ठक्रियाकारके बनतात.

एथिलीन ग्लायकॉल, डायएथिलीन ग्लायकॉल व १:२ प्रोपेन डायॉल यांबरोबर विक्रिया करून बनविलेली मेदाम्लांची एस्टरे मुख्यतः सौंदर्यप्रसाधनांमध्ये पायसीकारके, ⇨ प्लॅस्टिकीकारके व अपार्यीकारके (अपारदर्शकता आणणारे पदार्थ) म्हणून वापरली जातात.

एथॉक्सीकरण केलेली तेले, मेणे व मेदे : क्षारीय उप्रेरक वापरून एरंडेलाचे एथॉक्सीकरण केले असता, वजनी ६० ते ७०% पॉलिऑक्सिएथिलिनाचा भाग असलेली जलविद्राव्य एस्टरे मिळतात. ती पायसीकारके, विसरण साहाय्यके, वंगणे म्हणून आणि वस्त्रोद्योग, चर्मोद्योग व कागद निर्मिती या उद्योगांत अंत्यरूपण साहाय्यके म्हणून वापरली जातात.

कच्च्या (असंस्कारित) लोकरीच्या चरबीपासून लॅनोलीन अल्कोहॉले बनवितात. शुद्ध लॅनोलीन अल्कोहॉलाच्या एथॉक्सीकरणाने मिळणारी संयुगे सौंदर्यप्रसाधनामध्ये पायसीकारके म्हणून मुख्यत: वापरली जातात.

मेदाम्लांची एथॅनॉल अमाइडे : मेदाम्ले व डाय-एथॅनॉल अमाइन (प्रमाण १ : २ ग्रॅम-रेणूभार) आणि मेदाम्लाचे मिथिल एस्टर व डाय-एथॅनॉल अमाइन (प्रमाण १ : १ ग्रॅम-रेणूभार) यांच्या विक्रियांनी अनुक्रमे नियमित स्वरूपाची (रेग्युलर) मेदी अमाइडे व ‘सुपर’ अमाइडे मिळतात.

यांचा उपयोग फेस टिकाऊ करण्यासाठी आणि प्रक्षालके म्हणून, त्याचप्रमाणे प्रक्षालन विद्राव दाट करण्यासाठी केला जातो. क्षरणविरोध, आर्द्रीकरण व पायसीकरण हे गुणही त्यामध्ये आहेत. कोरड्या धुलाईत प्रक्षालके म्हणूनही ती वापरली जातात.

लॉरिक, स्टिअरिक इ. ऑअम्लांची मोनोएथॅनॉल अमाइडे व मोनोआयसोप्रोपेनॉल अमाइडेही वरीलप्रमाणे उपयोगी पडतात.

प्रोपिलीन ऑक्साइडापासून मिळणारी संयुगे : प्रोपिलीन ऑक्साइड (१ : २ एपॉक्सीप्रोपेन) व प्रोपिलीन ग्लायकॉल यांची विक्रिया होऊ पॉलिऑक्सी प्रोपिलिने मिळतात. त्यांचे एथॉक्सिकरण केल्याने जी संयुगे मिळतात त्यांची पृष्ठक्रियाकारी शक्ती फारशी नसते तथापि त्यांचा फेस इतर पृष्ठक्रियाकारकांपेक्षा कमी होतो, तसेच ती बिनविषारी असतात, म्हणून फेस अनिष्ट असेल अशा ठिकाणी (उदा., कित्येक सौंदर्यप्रसाधने व औषधे) यांमध्ये पायसीकारके, विसरण साहाय्यके, प्रक्षालके व विद्राव्यीकारके म्हणून यांचा उपयोग होतो.

इतर संयुगे : कार्बनी सिलिकोनांचे ऑक्सिअल्किलीकरण करून मिळणारी पॉलिसिलोक्झेन पॉलिऑक्सि-अल्किलीन सहबहुवारिके [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके] जलविद्राव्य व तैल-विद्राव्य अशा दोन प्रकारची असतात. यूरेथेनांचा फेस बनविताना पायसीकारक व फेन नियंत्रक म्हणून त्यांपैकी काहींचा उपयोग होतो.

उभयधर्मी पृष्ठक्रियाकारके : अम्लधर्मी व क्षारधर्मी असे दोन्ही प्रकारचे जलस्नेही गट एकत्र असलेली ही काही थोडी पृष्ठक्रियाकारके आहेत. उदा., N—लॉरिल—३ इमिनोडायप्रोपिओनेट डायसोडियम लवण (सूत्र १४) आणि N—हायड्रॉक्सिएथिल—N—स्टिअरॲमिडोग्लायसीन सोडियम लवण (सूत्र १५).

प्रक्षालके, पायसीकारके, आर्द्रीकारके, स्थिरविद्युत् रोधके, फेनकारके आणि वस्त्रमृदुकारके म्हणून ती वापरली जातात.

पृष्ठक्रियाकारके वापरण्यातील सुरक्षितता : धनायनी व आयनहीन पृष्ठक्रियाकारके मानवाला बिनविषारी व ऋणायनी किंचित विषारी आहेत असे सामान्यपणे म्हणता येते. तथापि यावरून कोणतेही पृष्ठक्रियाकारक हमखास तसे असेलच असे मात्र सांगता येत नाही. म्हणून कोणतेही नवे पृष्ठक्रियाकारक व ते वापरून बनविलेली मिश्रणे बाजारात ठेवण्यापूर्वी त्यांची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी केली जाते व ती वापरताना कोणती दक्षता घ्यावी, त्याच्या सूचना ग्राहकांना दिल्या जातात. खाद्य-पेये, औषधे व सौंदर्यप्रसाधने यांच्याशी संबंध असलेल्या पृष्ठक्रियाकारकांविषयी विशेष खबरदारी घेतली जाईल, अशी शासकीय यंत्रणा आहे. [⟶ औषध व सौंदर्यप्रसाधन अधिनियम].

सूत्र १४. N–लॉरिल–३–इमिनोडायप्रोपिओनेट डायसोडियम लवण

सूत्र १५. N–हायड्रॉक्सिएथिल–N–स्टिअरमिडोग्लायसीन सोडियम लवण

आतापर्यंतच्या पाहणीवरून पृष्ठक्रियाकारकांमुळे मानवाच्या परिसरावर हानिकारक परिणाम झालेला नाही, असे दिसून आले आहे.

प्रक्रिया व सामग्री : पृष्ठक्रियाकारके तयार करताना ज्या प्रमुख प्रक्रिया वापरतात त्यांत सल्फॉनीकरण, सल्फेटीकरण, एथॉक्सीकरण, एस्टरीकरण, वगैरे प्रक्रियांचा समावेश होतो.

सल्फॉनीकरण करण्याच्या दोन पद्धतींपैकी अखंड पद्धतीत सल्फर ट्रायॉक्साईड अथवा ओलियम (वाफाळ सल्फ्यूरिक अम्ल) वापरण्यात येते. खंडित पद्धतीत ओलियम अथवा सल्फ्यूरिक अम्ल) वापरण्यात येते. एथॉक्सीकरण करण्याकरिता एथिलीन ऑक्साइडाचा उपयोग करतात. एथिलीन ऑक्साइडाचा साठा ५° से. पेक्षा कमी तापमानात ठेवावा लागतो व या कारणाकरिता खास व्यवस्थेची गरज असते. ह्याशिवाय रासायनिक कारखान्यांत लागणारी नेहमीची सामग्री उदा., गाळण्याची सामग्री, ऊर्ध्वपातनाची (वाफ करून व मग ती थंड करून घटक अलग करण्याच्या क्रियेची) सामग्री, रासायनिक विक्रिया घडविण्याची पात्रे इ. साधने, तसेच फवारा निर्द्रवीकारक, मिश्रणे तयार करण्याची विविध सामग्री व इतर नेहमी लागणारी उपकरणे यांची आवश्यकता असते.

भारतीय उद्योग : दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपूर्वी (साधारणपणे १९५६-५७ पर्यंत) संश्लिष्ट पृष्ठक्रियाकारके भारतात तयार होत नव्हती. १९५६ च्या सुमारास अहुरा केमिकल्स कंपनी, मुंबई व स्वस्तिक ऑइल मिल्स, मुंबई यांनी प्रक्षालकांचे उत्पादन सुरू केले. अहुरा केमिकल्स कंपनीने आयात केलेल्या अल्किलेट, मेदी अल्कोहॉल व पॉलिएथिलीन ग्लायकॉल यांपासून औद्योगिक धनायनी व आयनहीन प्रक्षालके तयार करण्यास सुरुवात केली. त्यांत क्रियाशील पदार्थ ४०% असत. स्वस्तिक ऑइल मिल्सने घरगुती वापराची प्रक्षालके (उदा.,अल्किल अरिल सल्फोनेट) आयात केलेल्या अल्किलेटा पासून तयार करावयास सुरुवात केली.

भारतात १९६१ साली ७,३१५ टन प्रक्षालकांचे उत्पादन करणे शक्य झाले. १९६५ सालापर्यंत प्रगती सावकाश होत होती व तेव्हा उत्पादन ११,००० टन होते. १९६८-१९६९ पर्यंत म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस कच्च्या मालाच्या आयातीसंबंधीच्या शासनाच्या उदार धोरणामुळे उत्पादन ३०,००० टनांवर गेले.

सध्या भारतात १२ मोठे व सु. २४ लहान कारखाने घरगुती अथवा औद्योगिक प्रक्षालकांचे उत्पादन करीत आहेत. १९७१ मध्ये उत्पादनक्षमता ४८,००० टनांची होती. वर उल्लेख केलेल्या मोठ्या कारखान्यांव्यतिरिक्त टाटा ऑइल मिल्स कंपनी लि., हायको प्रोडक्ट्स प्रा. लि. व सरफॅक्टन्ट प्रा. लि. हे कारखाने मुंबईत, दाई-ईंची करकरीया प्रा. लि. हा पुण्यास आणि कुसुम प्रॉडक्ट्स लि. हा कारखाना रिश्रा (प. बंगाल) येथे आहे.

पुढे दिलेल्या उद्देशांमुळे ह्या उद्योगाला प्रोत्साहन मिळाले आहे. (१) खाद्य तेलांचा वापर साबण करण्याकरिता कमी कमी होत जावा. (२) टॅलो व पाम तेलासारख्या कठीण मेदे व तेले यांची आयात कमी व्हावी. (३) ग्राहकांना साबणाऐवजी जास्त सोईस्कर प्रक्षालके उपलब्ध व्हावीत.

बडोद्याला इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. मध्ये आता या उद्योगासाठी लागणारी अल्किलेटे तयार होत असून आयातीवर फारसे अवलंबून राहावे लागणार नाही व त्यामुळे प्रक्षालकांचे उत्पादन ह्या पुढे वाढत जाईल, असे दिसते.

डोडेसिल बेंझिनाच्या (मिश्र अल्किल-अरिल संयुगे सोडून) आयातीचे आकडे कोष्टक क्र.२ मध्ये दिले आहेत.

१९७८ सालच्या अखेरपर्यंतच्या (संश्लिष्ट) प्रलक्षकांची मागणी २.२७ लक्ष टन व १९८० पर्यंत ती ३ लक्ष टन इतकी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १९७७ सालची उत्पादनक्षमता अंदाजे १.५५ लक्ष टन होती. उत्पादनवाढीकरिता शासनाने जास्त परवाने देऊन मागणीप्रमाणे पुरवठा वाढवण्यास उत्तेजन दिले आहे व त्यामुळे उत्पादनात ६०,००० टनांची भर पडेल, असा अंदाज आहे.

जम्मू व काश्मीरमध्ये हिंदुस्थान लिव्हर लि. ने दोन कोटींचा प्रकल्प सुरू केला असून प्रक्षालकांचे उत्पादनही सुरू झाले आहे. दोन वर्षात संपूर्ण स्वदेशी सामग्रीने सुरू झाले झालेल्या या प्रकल्पात दरवर्षी १०,००० टन प्रक्षालके तयार होतील असा अंदाज आहे.

नव्या प्रकल्पांपैकी आंध्र प्रदेश, कर्नाटक व हरियाणा या राज्यांत सुरू होणाऱ्या तीन प्रकल्पांची प्रगती उल्लेखनीय आहे. (१) डिटर्जंट्स इंडिया, हा कोडूर येथे आंध्र प्रदेशमध्ये सुरू होत असून त्याची उत्पादनक्षमता १०,००० टन आहे. (२) हरियाणा डिटर्जंट्स, हा मोहिंदरगड जिल्ह्यात धारूहेरा येथे चालू होत आहे. त्याची उत्पादनक्षमता १०,००० टन असून त्यांपैकी ६,५०० टन पावडर व ३,५०० टन वड्यांचे उत्पादन होईल. (३) १०,००० टन क्षमता एक प्रकल्प कर्नाटकात मंगलोर जिल्ह्यात बोलूर येथे सुरू होत असून त्याच्या उत्पादनक्षमतेपैकी ५४% क्षमता वड्यांच्या उत्पादनाकरिता वापरण्यात येणार आहे.

कच्चा माल : ह्या उद्योगात लागणारा मुख्य कच्चा माल अल्किलेट म्हणजे डोडेसिल बेंझीन हे अंदाजे एका टनास रू. २,५०० या दराने येते व प्रतिवर्षी जवळजवळ ३०,००० टन लागते, कारण त्यापासून प्रत्यक्ष वापरात आलेली प्रक्षालके (गुणवर्धक मिसळलेली) सु. दोन लाख टन बनविली जातात.

दुसरा पदार्थ सोडियम ट्रायपॉलिफॉस्फेट (एस. टी. पी. पी.) याच्या उत्पादनाची सुरुवात ऑल्ब्राइट, मोरारजी अँड पंडित प्रा. लि., मुंबई या कारखान्याने केली व त्याच्या पाठोपाठ स्टार केमिकल्स, मुंबई या कारखान्यानेही उत्पादन सुरू केले. १९६८ साली याचे उत्पादन ३,९०० टन झाले व त्याची किंमत १ कोटी ३० लाख रूपये होती. १९७० मध्ये उत्पादनक्षमता १३,५०० टन व उत्पादन ९,१३६ टन झाले होते. ऑल्ब्राइट, मोरारजी अँड पंडित प्रा. लि. या कारखान्याने उत्पादनक्षमता वाढवून या पदार्थांची वाढती मागणी पुरवण्याची एक योजना आखली आहे.

तिसरा पदार्थ सोडियम सल्फाइट. भारतात पाच कारखाने हा पदार्थ तयार करतात व १९७१ साली त्यांची उत्पादनक्षमता २,२०० टनांची व उत्पादन १,१०० टनांचे होते.

चौथा पदार्थ म्हणजे एथिलिन ऑक्साइड. याचे उत्पादन नॅशनल ऑरगॅनिक केमिकल इंडस्ट्रिज लि., मुंबई या कारखान्यात होते. १९७१ मध्ये त्याची उत्पादनक्षमता १२,००० टन व उत्पादन ५,११२ टन होते. पाचवा पदार्थ एथॅनॉल अमाइन. पी. के. वेलू अँड कं. प्रा. लि., मुंबई व इंडिया कार्बन लि., कलकत्ता हे याचे उत्पादन करतात. सहावा पदार्थ मेदी अल्कोहॉल. हा पदार्थ तयार करण्याच्या योजना आहेत. यांशिवाय सोडियम मेटासिलिकेट, कारबॉक्सी मिथिल सेल्युलोज, प्रकाशकीय विरंजके [⟶ विरंजन] व सोडियम परबोरेट हे पदार्थ लागतात व ते सर्व पदार्थ देशात उपलब्ध आहेत.

पहा : प्रक्षालके; साबण.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, 1973.

2. Durham, K., Ed. Surface Activity and Detergency, London, 1961.

3. Levitt, B. Oils, Detergents and Maintaince Speciallities, Vol. 2, New York, 1967.

4. Mark, H. F.; McKetta, J. J.; Othmer, D. F. Kirkothmer Encyclopedia of Chemical Technology, Vol. 19, New York, 1970.

5. McCutcheon, J. W. Synthetic Detergents, New York, 1950.

6. Niven, W. W. Fundamentals of Detergency, New York, 1950.

7. Oispow, L. I. Surface Chemistry, Theory and Industrial Applications, New York, 1962.

8. Schick, M. J. Non-ionic Surfactants, New York, 1967.

9. Schwartz, A. M.; Perry, J. W. Surface Active Agents – their chemistry and Technology, 2 Vols., New York, 1949.

पानसरे, व. स.; केळकर, गो. रा.