दिवे : तेल, तूप, चरबी, दगडी कोळशाचा अथवा अन्य वायू इ. जळणारे पदार्थ साठवून ठेवून वा न साठविता, वातीच्या साहाय्याने वा वातीशिवायही जाळून प्रकाश (व उष्णताही) देणाऱ्‍या साधनाला दिवा असे सामान्यतः म्हटले जाते. ‘दिवाʼ हा शब्द विद्युत् ऊर्जेवर चालणाऱ्‍या व प्रकाश देणाऱ्‍या साधनांकरिताही वापरण्यात येतो. (या दिव्यांचे वर्णन ‘विद्युत् दिवेʼ या स्वतंत्र नोंदीत दिले आहे.) मेणबत्त्या तेलाचे व वायूचे दिवे इत्यादींच्या ज्योतींचे संरक्षण करणायाकरिता वापरण्यात येणाऱ्‍या साधनाला ‘कंदीलʼ असे म्हणतात. जळत्या लाकडाचा ओंडका, चूड, मशाल, काकडा, पणती, दिवटी, हंडी, समई, लामणदिवा (साखळीचा), ओळणी, नीरांजन, टमरेल, चिमणी, हरिकेन कंदील, टेबल दिवा, किटसन दिवा, पेट्रोमॅक्स, विजेचा फुग्याचा (प्रदिप्त) दिवा, विजेचा नळीचा दिवा (फ्ल्युओरेसंट ट्युब), प्रज्योत (आर्क) दिवा, हातात धरावयाची विजेरी इ. दिव्यांचे अनेक बहुविध प्रकार आहेत.

दिव्यांना प्रसंगनिष्ठ अशीही काही नावे आहेत. हिंदूंमधील काही विशेष दिव्यांची नावे खाली दिली आहेत. दिवाळीच्या दिवसात आकाशात उंच लटकणाऱ्‍या दिव्याला ⇨ आकाशदिवा म्हणतात. तो पितरांना प्रकाश देतो. अशी समजूत आहे. लग्नकार्यात एक ओळणीचा दिवा रोवळीत ठेवतात, त्याला शकुन दिवा असे नाव आहे. करवल्या तो दिवा हातात धरून वधुवरांच्या मागे उभ्या राहतात. अमावास्येला पिठाचे दिवे करून त्यांची पूजा करतात. मंगळागौरीच्या पूजेत व लग्नातील ऐरणी दानातही पिठाचे दिवे वापरतात. या दिव्यांना पिष्टदीप म्हणतात. देवपूजेच्या प्रसंगी वा कोणत्याही मंगल विधीत एक दिवा साक्षी म्हणून ठेवतात, त्याला स्थापित दीप म्हणतात. शंकराच्या देवळात अखंड तेवत राहणारा एक दिवा ठेवलेला असतो, त्याला नंदादीप म्हणतात.

प्रकार : दिव्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्‍या ज्वलनशील पदार्थांनुसार किंवा प्रकाश मिळविण्यासाठी वापरलेल्या ऊर्जेनुसार दिव्यांचे पुढील तीन प्रमुख प्रकार पडतात : (१) तेलदिवे, (२) वायुदिवे व (३) विद्युत् दिवे. (१) तेलाच्या दिव्यात वापरण्यात येणाऱ्‍या तेलाच्या प्रकारानुसार त्याचे वनस्पतीजन्य तेल, प्राणिजन्य वसा (चरबी) व खनिज तेल यांवर चालणारे दिवे असे आणखी वर्गीकरण होते. तसेच वातीच्या साहाय्याने जळणारे व तेलाची वाफ करून ती वायुजाळीच्या (गॅस मँटलच्या) साहाय्याने जाळणारे असेही त्यांचे वर्गीकरण करता येते. (२) दगडी कोळशापासून कोक तयार करताना मिळणारा कोल गॅस, नैसर्गिक वायू (खनिज इंधन वायू) आणि खनिज तेलाच्या शुद्धिकरणानंतर मिळणारा द्रवीकृत खनिज तेल वायू (एल. पी. जी.) आणि गोबर वायू हे वायुजाळीच्या साहाय्याने जाळून प्रकाश देणारे वायुदिवे होत. (३) विद्युत् शक्तीवर चालणारे दिवे याचे फुग्याच्या आकाराचा (बल्ब) नलिका, पाऱ्‍याच्या वाफेचा इ. अनेक प्रकार आहेत.[ ⟶ विद्युत् दिवे].

इतिहास : तेलाचे दिवे : दिव्याचा प्रथम शोध अश्मयुगात इ. स. पु. सु. ७०००० वर्षांपूर्वी लागला. हा दिवा दगडात खोदलेला असून खोलगट केलेल्या भागात प्राणिजन्य चरबी घालीत व शेवाळे वा तत्सम भिजणारा पदार्थ त्यात घालून तो पेटवीत. अशा स्वरूपाचे दिवे अलास्कातील एस्किमो लोक व अल्यूशन बेटातील लोक अद्यापही वापरतात. अशा प्रकारचा पुराश्मयुगातील एक ओबडधोबड दिवा ल मूस्ट्ये येथे १९२८ साली सापडला.

भूमध्यसमुद्र काठच्या भागातील प्रदेशात आणि पूर्वेकडील देशांत शिंपल्याचे दिवे वापरीत असत. पुढे ॲलॅबॅस्टर (एक प्रकारचे मऊ खनिज), माती व धातू यांच्या पात्रांना शिंपल्यासारखा आकार देऊन त्यांचे दिवे वापरात आले. अशा आकाराचे मातीचे दिवे पॅलेस्टाइन पर्शिया, एड्रिॲटीक व भूमध्य समुद्रातील बेटांत उत्खननामध्ये सापडले आहेत. मेसोपोटेमियामधील (हल्लीच्या इराकमधील) उत्खननामध्ये इ. स. पु. ८००० च्या सुमाराचे वातीसाठी चोच असलेले मातीचे दिवे (पणत्या) सापडले आहेत. ईजिप्त व चीन या देशांत प्राचीन काळी बशीच्या आकाराचे मातीचे किंवा काशाचे दिवे वापरत असत. काही वेळा अशा दिव्यांच्या मध्यभागी वात धरून ठेवण्यासाठी काट्याच्या आकाराचा उंचवटा असे, तर काही दिव्यांत वात ठेवण्यासाठी खाच असून त्यातून आलेली वात दिव्यांच्या कडेवर येऊन जळेल अशी योजना होती. या प्रकारचे दिवे आफ्रिकेत सर्रास प्रचारात होते. या दिव्याचा प्रसार पूर्व आशियात झाला व तेथून तो पॅसिफिक महासागरापलीकडील प्रदेशात गेला असावा, कारण अलास्का व मेक्सिको येथील उत्खननांत असे दिवे सापडले आहेत. ईजिप्त व इराणमध्ये इ. स. पु. २७०० वर्षांपूर्वीचे तांब्याचे व काशाचे दिवे अनेक वेळा सापडले आहेत. इ. स. पू. १००० वर्षांपर्यंत दिव्यात फारशी सुधारणा झाली नव्हती तोपर्यंत एखाद्या वनस्पतीची काडी किंवा तंतू बशीसारख्या पसरट भांड्यात घेतलेल्या (द. यूरोपात) ऑलिव्ह तेलात किंवा अन्य टणक सालीच्या फळांपासून काढलेल्या तेलात ठेवून दिवा तयार करीत असत. त्यानंतर इ. स. पू . चार–पाचशे वर्षांपासून घरोघरी तेलाचे दिवे वापरण्यास सुरुवात झाली.


इ. स. पू. २००० च्या सुमारास चीनमध्ये दिव्याचा वापर सुरू झाला असावा. एका लहान धारकात (पात्रात) मेणबत्ती ठेवण्यात येत असे व घडी करता येईल अशा कागदी वा रेशमी कंदिलात ती ठेवीत. असे कंदील जपान आणि चीनमध्ये बऱ्‍याच काळापर्यंत फारसा बदल न होता वापरात होते. हे कंदील दंडगोलाकार वा गोलाकार असत. अद्यापिही अशा तऱ्‍हेचे दिवे तेथे मिळतात.

इ. स. पू. सातव्या शतकापर्यंत ग्रीसमध्ये मशाली व अग्निपात्रेवापरीत असत. तेथे प्रथम वापरात आलेले दिवे त्या काळच्या ईजिप्तमधील दिव्यासारखेच होते. नंतर एक वा अनेक भोके असलेल्या पेल्यासारख्या आकारचा मातीचा दिवा ग्रीसमध्ये वापरात आला. या भोकांतून वाती बाहेर काढण्यात येत. दिव्याच्या वरच्या बाजूला एक गोलाकार भोक असून त्यातून दिव्यात ज्वलनशील पदार्थ घालता येत असे. तसेच दिवा उचलून नेण्यासाठी एक मूठ असे. या दिव्यांना उष्णतारोधी लाल वा काळ्या रंगाची झिलई देण्यात येई. काशाचे दिवे बाळगणे हे श्रीमंतीचे लक्षण समजले जाते. काशाच्या सामान्य दिव्याला बोटे ठेवण्यासाठी कडे व आंगठा ठेवण्यासाठी वरती चंद्रकोरीच्या आकाराची मूठ असे. काशाचे टांगते दिवेही तेथे लोकप्रिय होते.

रोमन लोकांनी भाजलेल्या मृदेचे (टेरा कोटाचे) दिवे तयार करण्याची पद्धत शोधून काढली. या पद्धतीत दिव्याचे दोन भाग प्रथम तयार करून मग ते एकत्र जोडून एकसंध दिवा तयार करीत. अशा दिव्यावर नक्षीकाम करण्यात येई. चकाकणाऱ्‍या व साध्या दिव्यांना दोन किंवा अधिक चोची पाडीत असत. धातूचेही दिवे वरील पद्धतीने तयार करीत पण त्यांचे आकार बरेच गुंतागुंतीचे, सामान्यतः प्राण्यांच्या वा वनस्पतींच्या आकाराचे असत अशा स्वरूपाचे मोठ्या आकारमानाचे दिवे सार्वजनिक व करमणुकीच्या ठिकाणी इ. स. पहिल्या शतकापर्यंत वापरले जात होते. या शतकात रोमन लोकांनी पहिला शिंगाचा कंदील (दिव्यातील ज्योतीचे वाऱ्‍यापासून रक्षण करण्याची योजना असलेला दिवा) तयार केला. तो नळकांड्याच्या आकाराचा व विभागलेल्या माथ्याचा होता.

मध्ययुगातील दिव्यांसंबंधीच्या प्रगतीविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. रोमन लोकांच्या बंदिस्त स्वरूपाच्या दिव्यांच्या मानाने या काळातील दिव्यांचा दर्जा कमी होता. दिवे उघडे व बशीच्या आकाराचेच असत. त्यांतील वाती बुचाच्या वा लाकडाच्या साहाय्याने तरंगत ठेवलेल्या असत. अशा प्रकारच्या दिव्यांपैकी तांबड्या काचेचे आणि शोभिवंत पितळी धारकावरील देवळाच्या गाभाऱ्‍यातील दिवे अद्यापही यूरोपातील काही चर्चमध्ये वेदीसमोर टांगलेले आढळतात. अशा दिव्यात राईचे (कोल्झा) तेल वापरीत असत. याच काळातील ज्यू लोक वापरीत असलेला ‘खानुकाʼ (ज्यू लोकांच्या एका उत्सवावरून पडलेले नाव Hanukkah) दिवा भारतातील पंचारती दिव्यासारखा होता.

इस्लामी राष्ट्रांतील मशिदींमध्ये असणारे दिवे बायझंटीन प्रकारचे असून ते टांगते असत. हे दिवे भोके असलेल्या व नक्षीदार अशा पितळी वा काशाच्या आवरणात ठेवलेले असल्यामुळे खालच्या बाजूने भरपूर प्रकाश मिळे. इ. स. सु. १२५० नंतर तेथे काचेचे दिवे वापरात आले.

सतराव्या शतकात मध्यपूर्व भागात व जर्मनीत दिव्याचा उपयोग कालमापनासाठी करीत असत. हा दिवा मेणबत्तीच्या आकाराचा असून वरच्या बाजूला तेलाने भरलेली एक बाटली असे व तिच्यावर तासदर्शक आकडे कोरलेले असत. या बाटलीतील तेल खाली असलेल्या एका लहान बाटलीत पडे. या बाटलीतील एका वातीद्वारे तेल जळत असे आणि त्यानुसार वरच्या बाटलीतील तेलसाठा कमी होई व त्यावरून काल मोजणे शक्य होई.


एखाद्या घन पदार्थाचा काठीसारखा लांब बारीक तुकडा पेटवल्यावर जर प्रकाश देणारी ज्वाला त्याला सतत येत रहात असेल, तर त्या तुकड्याला बत्ती म्हणतात. तागाच्या जोख्यांची वा माडाच्या पात्यांची चूड ही बत्तीच आहे. बत्ती सुवाह्य असते पण ती एकाच जागीही वापरता येते. बत्तीच्या अस्तित्वासंबंधी भारतातील प्राचीन पुरावे अद्याप तरी उपलब्ध नाहीत.

युरोपीय इतिहासावरून बत्तीचा उपयोग व धंदा इसवी सनाच्या आरंभापर्यंत मागे जातो. युरोपीय लोक जेव्हा आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना तेथील आदिवासी लोक उजेडासाठी तेलबिया बशीसारख्या मातीच्या भांड्यात जाळताना आढळले. झाडाच्या बारीक फांदीत या बिया खोवून हे लोक त्यांचीही बत्ती करीत. इ. स.१०० च्या सुमारास ग्रीक आणि रोमन लोकांच्या बत्त्या फ्लॅक्सच्या दोऱ्‍यांना डांबर किंवा मेण लावून केलेल्या असत. काहींच्या मते फिनिशियन लोकच इ. स. ४०० च्या सुमारास मेणाच्या बत्त्या वापरणारे पहिले होत. अशा प्रकारे यूरोपात बत्तीची सुरुवात झाल्यानंतरसुद्धा कित्येक शतके–सु. तेथील मध्ययुगाच्या अखेरपर्यंतही (चौदाव्या शतकाच्या अखेरपर्यंत)–घरातून सामान्यतः तेलाचे दिवेच वापरणे चालू राहिले व बत्तीचा उपयोग पुष्कळच तुरळक होत होता. पण नंतर सोळा ते अठराव्या शतकांत गरीब व मध्यम वर्गांतील लोक उजेडासाठी बत्त्याच जास्त कररून वापरीत होते. अगदी सुरुवातीच्या बत्त्या रश झाडाच्या जोरव्या चरबीत बुडवून त्यांच्या करीत. नंतर या कामासाठी हलक्या लाकडाचे तुकडे चरबी किंवा मधमाश्यांच्या पोळ्यांचे मेण यात बुडवून वापरण्यात येऊ लागले. अठराव्या शतकात देवमासे पकडण्याच्या उद्योगाला जोर आल्यानंतर स्पर्मासेटी (वसातिमी म्हणजे स्पर्मव्हेल या माशाच्या शिरांतील तेलामधील घन पदार्थ) हा पदार्थ जास्त वापरात येऊ लागला. स्पर्मासेटी बत्तीची ज्वाला बिनधुराची आणि निश्चल अशी असते. म्हणून मग ती कृत्रिम प्रकाशाच्या मापनाचे एकक म्हणून पुढे वापरात आली.[⟶ प्रकाशमापन]. १८२३ मध्ये स्टिअरीन या रसायनाचे अलगीकरण व १८५०–६० च्या दरम्यान खनिज तेलापासून काढण्यात आलेले मेण (पॅराफीन) यांमुळे बत्त्यांची बनावट सुधारली. सांप्रतही बत्त्या पॅराफीन मेणाच्याच करतात. ख्रिस्ती धार्मिक विधीत मेणबत्त्यांना मोठे महत्त्व आहे. पण हिंदू धर्मात मेणबत्तीला स्थानच नाही. [  ⟶ मेणबत्ती ].

एड्रिॲटिक समुद्राच्या किनाऱ्‍यावर सापडलेल्या खनिज तेलाचा दिव्यांसाठी उपयोग केला जातो, असा इ. स. ५० मधील रोमन शास्त्रज्ञ थोरले प्लिनी याचा उल्लेख सापडतो. दिव्यांसाठी खनिज तेलाचा उपयोग केल्याचा हा पहिलाच निर्देश आहे. जपानी इतिहासात इ. स. ६१५ च्या सुमारास पेटत्या पाण्याचा उल्लेख आढळतो. ‘बाकू (द. रशिया) येथील खाणीत सापडलेल्या तेलाचा प्रकाशाकरिता समाधानकारक पद्धतीने उपयोग करता येतो’ हा मार्को पोलो यांचा तेराव्या शतकातील दिव्यासाठी खनिज तेलाच्या केलेला उपयोगाचा त्यानंतरचा लिखित पुरावा आहे. हे तेल मूळ अपरिष्कृत स्वरूपात असल्यामुळे बरेच दाट असे, त्यामुळे उभ्या वातीतून ते सहजपणे वर चढत नसे. ही अडचण दूर करण्यासाठी इ. स. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात हिरो या ॲलेक्झांड्रियाच्या शास्त्रज्ञांनी हवेवर मिठाच्या दाट विद्रावाचा दाब देऊन या दाबित हवेने तेल वातीतून वरवर चढत जाणारा एक दिवा तयार केला होता. १४९० साली लिओनार्दो दा व्हींची यांनी लांबट तोंडाची काचेची चिमणी पाण्याने भरलेल्या काचेच्या गोलात बसवून पाहिली तेव्हा ज्योत संथपणाने पेटली, शिवाय पाण्याने भरलेल्या गोलाचा भिंगासारखा उपयोग होऊन रात्री वाचन करण्याइतका प्रखर प्रकाश मिळू लागला. चौदा ते सतरा या शतकांच्या दरम्यान अनेक प्रकारचे दिवे बनविण्यात आले, पण प्रकाशनाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने त्यांत सुधारणा झाली नव्हती. यात्रेकरूंचा बेटी नावाचा धातूचा दिवा या सुमारास प्रचारात आला. तो ओळण्याच्या दिव्यासारखा होता. त्यात माशाचे तेल वापरीत असत.

इ. स. १७८४ साली एमे अरगँड या स्विस भौतिकीविज्ञांनी एका दिव्याचे एकस्व (पेटंट) घेतले. त्यात दिव्याच्या तळातून वर आलेली एक पत्र्याची नळी होती. नळीभोवती वातीची नळी ठेवून दिव्याच्या बाहेरून एक दुसरी पत्र्याची नळी बसविली होती. ज्योतीच्या वर पत्र्याची चिमणी होती. चिमणीमुळे ज्योतीला नियमितपणाने हवेचा पुरवठा होत असे. दिव्याला काचेची चिमणी बसविली म्हणजे ज्योतीची थरथर कमी होते ही गोष्ट अपघातानेच अरगँड यांच्या साहाय्यकाच्या ध्यानात आली. कृत्रिम प्रकाश मिळविण्याच्या प्रयत्नांचा विचार केला, तर अरगँड दिव्यावरील चिमणीचा शोध हा या वेळेपर्यंतचा सर्वांत मोठा शोध होता. १८०० मध्ये बेर्त्रां जी. कार्सेल यांनी अरगँड दिव्यात घड्याळी पंप बसवून त्या पंपाने वातीत दाट तेल सतत वर चढत राहील अशी व्यवस्था केली. या सुधारणेनंतर अरगँड दिवा हा प्रकाशमापनाचे प्रमाण म्हणून गणला जात असे. बेंजामिन फ्रॅंकलिन यांना एकमेकांशेजारी थोड्याच अंतरावर ठेवलेल्या दोन ज्योती एका ज्योतीच्या दोन दिव्यांपेक्षा जास्त प्रकाश देतात असे आढळून आले.


इ. स. १८५०–५१ मध्ये जेम्स यंग यांनी दगडी कोळशाच्या ऊर्ध्वपातनाने काढलेले केरोसिनसदृश तेल वापरणारे दिव्यांचे पुष्कळ प्रकार प्रचारात आले व हे तेल दिव्यांना पूर्वीपेक्षा जास्त चांगले असल्याचे वाटू लागले परंतु एडविन एल्. ट्रेक यांनी १८५९ मध्ये केरोसिनचा शोध लावल्यावर तेच तेल प्रकाश देणाऱ्‍या दिव्यांसाठी जास्त चांगले व स्वस्त इंधन आहे असे दिसून आले. त्यानंतर दाट तेलाचे दिवे एकदम मागे पडले. पुढील वीस वर्षांत नव्या नव्या सुधारणा अंतर्भूत असलेली अशी दिव्यांची प्रतिवर्षी सरासरीने ८० एकस्वे देण्यात येत होती. या काळातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जोसेफ हिंक्स यांचा १८६५ मधील डुप्लेक्स ज्वालक व वेल्स यांचा १८६८ मधील उज्ज्वाला (फ्लेअर) पद्धतीचा दिवा. यात केरोसिनच्या बाष्पात दाबित हवेच्या साहाय्याने केरोसिनचा फवारा सोडलेला असे आणि त्यामुळे दिव्याला दीप्तिमान ज्योत येई. आणखी एक उल्लेखनीय प्रकार म्हणजे सु. १८८५ मधील आर्थर किटसन यांचा दिवा, याला प्लॅटीनमाची वायुजाळी असून ती दाबित हवेखालील केरोसिनच्या बाष्पाच्या ज्वलनाने प्रदीप्त होऊन प्रकाश देई. हे दिवे भारतातही विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत वापरात होते. यानंतरची महत्त्वाची सुधारणा म्हणजे सु. १९२९ पासून भारतात प्रस्तृत झालेले युरोपिय पेट्रोमॅक्स दिवे. यात प्लॅटिनमाच्या ऐवजी सी. ए. फोन वेल्सबाख यांनी शोधून काढलेली वेल्सबाख वायुजाळी वापरली जात होती. पण लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या भागात विणलेली पट्टीवात, ती वरखाली करण्याला दंतचक्र असलेली चावी, भोकाचा ज्वालक धारक आणि काचेची चिमणी असलेले केरोसिनाचे दिवे जगभर दिसू लागले, ही होय.

वायूचे दिवे : ख्रिस्तपूर्व अनेक शतके चिनी लोक नैसर्गिक वायूचा प्रकाशासाठी उपयोग करीत असत. ५००–५५० मी. खाली असलेला वायू बांबूच्या नळकांड्यांतून वर आणून सेचवान प्रांतात त्याचा मिठाच्या खाणीतून आणि घरातून उजेडासाठी उपयोग करीत असत. ईजिप्त व इराणमध्येही जमिनीला केव्हा केव्हा भेगा पडून त्यांतून ज्वलनशील वायू बाहेर येई पण त्याचा उजेडासाठी उपयोग करीत की नाही हे ज्ञात नाही. १७९२ साली विल्यम मर्‌डॉक यांनी इंग्लंडमध्ये आपल्या राहत्या घरी उजेडासाठी विस्तृत प्रमाणात दगडी कोळशाच्या वायूचा उपयोग केला. त्यांनी हा वायू मोठ्या लोखंडी बकपात्रात तयार करून तो २२ मी. लांब नळातून उपयोगासाठी वाहून नेला होता. १७९८ साली मर्‌डॉक यांनी बर्मिंगहॅममधील एका कारखान्यात या कोळशाच्या वायूच्या दिव्यांनी प्रकाश योजना केली. यानंतर जवळजवळच्या दुकानांतून ते दिव्यासाठी वायू पुरवू लागले परंतु हा वायू वापरणे धोकादायक व अव्यवहार्य आहे, अशी त्याच्या बद्दल ओरड झाल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ शकला नाही. त्यानंतर १८०७ साली एफ्. ए. विंझर या जर्मन गृहस्थांनी लंडन शहरातच दगडी कोळशाच्या वायूचा यशस्वी रीतीने उपयोग करून दाखविला आणि वायूविषयी पसरलेले गैरसमज दूर केले. त्यामुळे विंझर यांना वायूचा प्रकाशासाठी उपयोग करण्याच्या कल्पनेचे जनक म्हणतात.

वायुदिव्यांचा प्रसार लंडनमध्ये १८१३ पासून व पॅरिसमध्ये १८१८ पासून झाला व लगोलग यूरोप खंडातील प्रमुख शहरांत वायूचे दिवे दिसू लागण्यास सुरुवात झाली पण या दिव्यात जाळी नसून बन्सन ज्वालक [ ⟶ ज्वालक] असे. अमेरिकेत १८०६ साली न्यूपोर्ट (ऱ्‍होड आयलंड) येथील डेव्हिड मेलव्हिन यांनी आपल्या घरात आणि घरासमोर रस्त्यावर वायूचे दिवे लावले. फिलाडेल्फियातील न्यू थिएटरमध्ये १८१६ साली प्रथमच वायूचा प्रकाशासाठी उपयोग करण्यात आला.

इ. स. १८२०–८० या साठ वर्षांच्या काळात अनेक प्रकारच्या सुधारणा करून ज्वालक तयार करण्यात आले. यात मुख्यतः मत्स्यपुच्छ (फिशटेल) ज्वालक प्रमुख होते. १८५५ साली बन्सक ज्वालक आणि १८७९ साली सग-अरगँड ज्वालक (विल्यम सग व अरगँड यांच्या नावाने ओळखण्यात येणारा) यांचे शोध लागले. वेल्सबाख यांनी दहा वर्षे प्रयोग करून वायुजाळी तयार केली आणि १८८७ च्या फेब्रुवारी महिन्यात लंडन येथे आपली प्रकाश पद्धती प्रथम सादर केली. त्यानंतर १९०० सालापासून निर्ज्योत परंतु प्रदीप्त जाळीच्याद्वारे मिळणारा वायूचा प्रकाश यूरोप–अमेरीकेत रूढ झाला. या जाळ्या तयार करण्यासाठी सिरीया व थोरिया ह्या ऑक्साइडांचा वापर करतात. यांच्या विद्रावात सुती दोरा भिजवून वाळवितात व तो जळल्यावर फक्त ऑक्साइडे राहतात [ ⟶ वायुजाळी].


ॲसिटिलीन वायू १८३६ सालापासून ठाऊक असला, तरी १८९३ साली आंरी ग्वासां यांनी तो तयार करून त्याचा उपयोगही करून दाखवला. कॅल्शियम कार्बाइड पाण्यात टाकले की, ॲसिटीलीन वायू तयार होतो आणि तो पेटविला म्हणजे प्रखर प्रकाशही मिळतो असे टॉमस एल्. विल्सन यांनी त्याच वेळी अमेरिकेत दाखविले. १९०९ साली अमेरिकेतील २९० गावांत या वायूचा प्रकाशाकरिता उपयोग करण्यात येत होता.

यूलिउस पिंट्श या जर्मन शास्त्रज्ञांनी रेल्वेच्या रस्त्यातील दिव्यांना म्हणून पिंट्श वायू शोधून काढला. यूरोपात हा शेल खडक वा खनिज तेलापासून काढण्यात आला होता. हा वायू अनेक वर्षे वापरात होता. तो दीपगृहे आगबोटींवरही वापरीत असत. अमेरीकेत तो १८६६ साली प्रसृत करण्यात आला. विजेच्या साहाय्याने प्रकाशयोजना करावयाची कल्पना रूढ झाल्यानंतर हळूहळू वायू वापरण्याचे प्रमाण कमीकमी होत गेले. अमेरिकेत १९११ पासून वायूची जागा विजेने घेण्यास सुरुवात झाली पण यूरोपात तो पुढे आणखी काही वर्षे तग धरून राहिला.

भारत : भारतात अग्नीचे व पर्यायाने प्रकाशाचे ज्ञान माणसाला बऱ्‍याच काळापासून असावे असे दिसते. सतत धगधगणारे यज्ञकुंड त्या काळात माणसाचा मोठा आधार असे. त्यामुळे श्वापदांचा व दैत्यांचा त्रास कमी होत असे. या आधाराच्या भावनेतूनच आर्यांनी अग्नीला देवता कल्पिले होते. ऋग्वेदात अग्नीला महत्त्व दिलेले आढळते. त्यात इंद्रानंतर अग्नीलाच स्थान दिले आहे. अग्नीचा शोध भृगू राजाने लावला असे वेदात म्हटले आहे. रामायणमहाभारत या प्राचीन ग्रंथात दिव्यांचा उल्लेख असून तेथे काही ठिकाणी ते सोन्याचे व रत्नांचे असल्याचे म्हटले आहे. अतिप्राचीन दिव्यांच्या आकारा–प्रकारांविषयी काही तपशील उपलब्ध नाही पण मोहें–जो–दडो येथे टांगण्याचे मातीचे दिवे सापडले आहेत. ते इ. स. पू. ३७०० ते ३५०० या काळातील आहेत. तसेच तेथील उत्खननात हमरस्त्यांच्या टोकांना असलेले दिव्यांचे खांबही सापडले आहेत.

ही सिंधू संस्कृती लोप पावल्यावर इ. स. सु. १५०० पर्यंतच्या काळातील माहिती अजून उपलब्ध झालेली नाही पण सोळाव्या–सतराव्या शतकांपासूनचे दिवे दक्षिण भारतात पाहावयास मिळतात. हे पितळ किंवा कासे या धातूंचे केलेले असून त्यांवर नक्षीही कोरलेली आहे. नक्षीकाम बहुधा पुराणातील प्रसंग दाखविणारे किंवा तत्कालीन रूढी चित्रित करणारे आहे. दिव्यांच्या आकारांचे प्रकारही बरेच असून त्यांत २५० पणत्यांचेही प्रकार आहेत. नीरांजन, समई, ओळण्याचा दिवा व पंचारती हे भारतीय दिव्यांचे खास प्रकार म्हणून सांगता येतील. यांपैकी पहिले दोन एकाच जागी ठेवायचे, तिसरा टांगून ठेवायचा किंवा हातातून फिरविण्याचा आणि चौथा (पाच वातींचा) विशेष प्रसंगी ओवाळण्याचा असे आहेत. हे सर्व पितळेचे पण तिसऱ्‍याशिवाय लहान आकारात चांदीचे आणि राजेरजवाड्यांकडे सोन्याचेही असत.

उत्तर भारतातील दिव्यांवर मोगल काळाचा अधिक परिणाम झालेला दिसतो. हे दिवे पितळेचे असून त्यांवर भौमितिक आकृत्या कापून तयार केलेल्या असत. अशा दिव्यांच्या वरच्या भागाला मनोऱ्‍याचा अथवा घुमटासारखा आकार असे. असा दिवा पेटविल्यावर त्यावरील कोरलेल्या आकृत्यांची शोभिवंत सावली जमिनीवर व भिंतीवर पडते.

दिव्यांचे वर्णन : दिव्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या इंधनाच्या स्वरूपानुसार दिव्यांचे जे तीन प्रमुख वर्ग पडतात त्यांनुसार पुढे त्यांचे वर्णन केलेले आहे.

तेलाचे दिवे : या दिव्यांत वनस्पतिजन्य तेले, प्राणिजन्य तेले व खनिज तेल वापरण्यात येतात. तेलाच्या दिव्यांच्या महत्त्वाच्या प्रकारांचे वर्णन पुढील प्रमाणे आहे.


मशाल: सु. अर्धा मी. लांब काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेल्या दिव्याचा एक प्रकार. चिंध्या गुंडाळलेले टोक तेलात बुडवून पेटवितात. चुडी, टेंभा, पोत, दिवटी, पलिता, काकडा, हिलाल इ. नावांनीही मशाल ओळखली जाते. मशाल विझविण्यासाठी ती पाण्यात वा मातीच्या ढिगात खुपसतात. योग्य त्या सोयी करून मशाल भिंतीवरही लावता येते. पूर्वी प्रकाशासाठी व संदेश पाठविण्यासाठी मशालीचा उपयोग करीत. भारतात एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंत मशालीचा सर्रास वापर करण्यात येई. अद्यापिही भारतात तिचा उपयोग भुत्ये लोक गोंधळासारख्या धार्मिक प्रसंगी करतात. ऑलिंपिक सामन्यांच्या वेळेची ज्योत पेटविण्यासाठी मशालीचा उपयोग करण्यात येतो.

पणती : ही मातीची करतात. हिचा आकार खोलगट बशीसारखा पण लहान असून वात ठेवण्यासाठी तिला चोचीसारखा आकार असतो. तेल खोलगट भागात घालतात. पणती लहानमोठ्या कोनाड्यात वा विशिष्ट आकाराच्या ठाणवईवर (स्टॅंडवर) ठेवता येते. भारतात अद्यापिही पणतीचा वापर त्रिपुरी पौर्णिमा, दीपावली इ. उत्सव प्रसंगी करण्यात येतो. काही प्रसंगी नदीत सोडावयाचे पणतीच्या आकारांचे पानांचे दिवे करतात. तसेच हल्ली मेण आणि वात घालून केलेल्या पत्र्याच्या तयार पणत्या मिळतात.

नीरांजन : हा लहान आकाराच्या दिव्याचा एक प्रकार आहे. याचा आकार डमरूसारखा असून बुडाचा भाग तेल वा तूप ठेवण्याच्या भागापेक्षा मोठा असतो. बहुतेक नीरांजनांमध्ये वरचा व खालचा भाग सारख्या आकाराचे असतात पण काहींमध्ये वरचा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. वरच्या भागात वात, तेल अथवा तूप घालतात व जळण्यासाठी वातीचे टोक कड़ेवर ठेवतात. नीरंजने चांदी, पितळ, अगंज (स्टेनलेस) पोलाद, तांबे इ. धातूंची करतात. काही नीरांजनांत २५० पर्यंत वाती घालण्यात येतात. पाच वाती असलेल्या नीरांजनास ‘पंचारती’ असे म्हणतात. अनेक वाती असलेली नीरांजने धरण्यासाठी त्यांना विविध आकारांच्या मुठी असतात. नीरांजनाचे उपयोग धार्मिक उत्सवाच्या वेळी, पूजेच्या वेळी, औक्षणइ. प्रसंगी करण्यात येतो [⟶ नीरांजन].

समई : पूर्वी घरांमध्ये व देवळांमध्ये प्रकाशासाठी समईचा वापर करीत. हल्ली तिचा उपयोग फक्त देवघरात व देवळात करण्यात येतो. पार्शियन भाषेतील ‘सम’ या शब्दापासून समई हा शब्द आला असावा. समईमध्ये तेल वा वाती ठेवण्याकरिता वरच्या भागात एक उथळ व गोलाकार भाग असून त्याचा मधला भाग उंच असतो व कडेला वाती ठेवण्यासाठी चोचीसारखे आकार असतात त्यामुळे समईत एकाच वेळी अनेक वाती जाळता येतात. समईचा खालचा भाग वरच्याएवढा गोलाकार असून तो जड असतो. वरचा व खालचा गोलाकार भाग एका विशिष्ट आकाराच्या व वरती निमुळत्या होत गेलेल्या दंडाकार भागाने जोडलेले असतात. काही समया अखंड असतात, तर काहींचे वर वर्णन केल्याप्रमाणे तीन सुटे भाग होतात. समईची उंची सामन्यतः सु. ०·५० मी असते. पितळ, चांदी, अगंज पोलाद इ. धातूंच्या समया बनवितात. हल्ली विजेचे दिवे बसविलेल्या लहान आकारमानाच्या प्लॅस्टिकच्या आणि लाकडाच्या समयाही मिळतात. काही समयांना दंडाकार भागापासूनचा खालचा सर्व भाग नसतो. त्याऐवजी वरच्या भागाच्या मध्यभागी साखळी असून ती टांगता येते, यांना टांगते दिवे असे म्हणतात. ‘लामण दिवा’ हा यांपैकीच एक टांगता दिवा होय. किडे इत्यादींपासून समईंच्या ज्योतींचे संरक्षण करण्यासाठी वरच्या भागावर झाकण ठेवता येते. विविध आकाराच्या सुशोभित समया तयार करण्यात येतात.

कंदील : वारा, पाऊस आणि इतर अडचणींपासून ज्योतीचे संरक्षण होईल, अशी कंदिलाची रचना असते. तो सुवाह्य असतो आणि टांगताही येतो. इतर प्रकारचे केरोसिनाचे दिवे आणि कंदील यांच्या अभिकल्पात व रचनेत फरक असतो. इतर दिवे जोराच्या वाऱ्‍याने विझतात, पण कंदील वादळी वाऱ्‍यानेही विझत नाही. विशिष्ट प्रकारच्या कामासाठी विशिष्ट प्रकारच्या चिमण्या असलेले कंदील तयार करण्यात येतात. फक्त नेमक्या एकाच ठिकाणी प्रकाश हवा असेल, तर तेवढेच एक भोक असलेले कंदील तयार करतात. दीपगृहाच्या कंदिलात लोलकांचा व भिंगाचा वापर करतात, त्यामुळे प्रकाशाचे केंद्रण होवून त्याची तीव्रता वाढते. चिनी आणि जपानी कंदील रंगीत कागद वापरून सुशोभित करतात. घडीचे कंदील दंडगोलाकार वा गोलाकार असतात, वापरावयाचे नसतील तेव्हा या कंदिलांची घडी घालता येते.


रोमन लोक कंदील वापरत असत त्या कंदिलाचे काही नमुने पाँपेई आणि हर्क्युलॅनिअम या शहरी सापडले आहेत. मध्ययुगीन काळात काशाचे जे कंदील वापरीत असत त्यांचे नमुने लंडनच्या संग्रहालयात पाहावयास मिळतात. अभ्रक, शिंगे, नकली चामड्यासारखा कागद, तेल कागद अशा अनेक वस्तू कंदिलाच्या आवरणासाठी व इतर भागांसाठी लोखंड, सोने, चांदी किंवा कथिल वापरीत असत. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला सुयोग्य कंदील घरात वापरले जात. जिने, सभागृहे, घरातील वाटा अशा ठिकाणी वारा लागून दिवे विझून जाण्याची भीती असते म्हणून या जागी कंदील वापरण्यात येत. टांगता येणाऱ्‍या किंवा भिंतीला अडकविता येणाऱ्‍या दिव्यांच्या लाकडाच्या धातूंच्या चौकटी अठराव्या शतकापासून प्रचारात आल्या. बैलाच्या डोळ्याच्या आकाराची फुगीर काच असलेले कंदील यूरोपात अठराव्या शतकात लोकप्रिय होते. हे दिवे तेराव्या शतकापासून प्रचारात होते. अशा दिव्यातून शोधक दिव्याप्रमाणे प्रकाश पडे. रेल्वे, बोटी इत्यांदीमध्ये धोक्याची सूचना देण्यासाठी जे कंदील वापरतात त्यांमध्ये जोराच्या वाऱ्‍यांपासून दिव्यांचे संरक्षण करण्याची व्यवस्था केलेली असते.

कंदिलाची रचना पुढीलप्रमाणे असते :खाली तेलाची टाकी असूनतिच्या व रच्या बाजूच्या पत्र्याला मधोमध एक भोक असते. या भोकावर ज्वालक बसताे. वातपट्टी वरखाली (ज्योत मोठी वा लहान) करणाऱ्‍यासाठी ज्वालकाला दंतचक्र बसविलेली एक चावी असते. टाकीच्या कडेला तेल भरण्यासाठी भोक व ते बंद करण्याचे झाकण असते. टाकीला दोन पोकळ खांबल्या दोन्ही बाजूंनी असतात व त्यांची खालची तोंडे वळवून ज्वालकाशी आणलेली असतात ज्वालकावर एक भोक असलेली तबकडी असून तिच्यावर कंदिलाची काच (चिमणी) बसते. वरच्या बाजूला खांबल्यांची टोके वळवून ती एका नळकांड्याला जोडलेली असतात. या भागाच्या आत थोडी सूट राखून दुसरा एक नळीचा तुकडा असून तो काचेच्या वरच्या तोंडावर बसतो व त्याच्या बाहेरील स्प्रिंगमुळे तिला दाबून धरतो. या नळीला वर झाकण असते. कंदील धरण्यासाठी खांबल्यांना तारेची एक कडी लावलेली असते. आतील धूर व गरम वायू जाण्यासाठी आतील नळाला बाजूला गाळे असतात. काच बसणाऱ्‍या तबकडीला बारीक भोके असल्याने जोराचा वारा सुटला असला, तरी कंदिलात येणाऱ्‍या हवेचा दाब तिच्या विसरणाने (रेणू एकमेकांत मिसळण्याच्या क्रियेने) कमी होतो व म्हणून कंदील विझत नाही.

विजेच्या प्रसारामुळे प्रगत देशांत विसाव्या शतकांत कंदिलाचा वापर कमी झालेला आहे. पण अविकसीत व विकसनशील (भारतातही) देशांतही तो अजून बराच वापरात आहे. दुरुस्ती चालू असलेल्या ठिकाणी रस्त्यावर सूचनार्थ, रेल्वेवर आणि निर्जन भागातील लष्करी छावण्यांत कंदीलच वापरावे लागतात.

कोळशाच्या आणि इतर खाणींत उद्‌भवणाऱ्‍या ज्वालाग्राही वायूचा दिव्याच्या गरम निष्कासाने प्रज्वर होऊन स्फोट होणार नाही असा एक कंदील हंफ्री डेव्ही यांनी तयार केला होता, हा कंदील ‘डेव्ही संरक्षक दिवा’ या नावानेच प्रसिद्ध आहे. यात काचेच्या चिमणीऐवजी तारेच्या बारीक भोकांच्या जाळीचे दोन एकात एक बसणारे (व्यासात अल्पसा फरक असणारे) दंडगोल असतात. अशा जाळीतून निघणारा गरम वायू स्फोट घडविण्यास असमर्थ असतो. कारण जाळीमुळे बाहेरच्या स्फोटक वायूचे तापमान प्रज्वलनांकापर्यंत पोहोचू शकत नाही. जाळीच्या छिद्रांची मापे अनुभवाने ठरविण्यात आली आहेत.

कंदिलाच्या बनावटीत त्याच्या काचेशिवाय सामान्यतः नरम पोलादाची चादर (पातळ पत्रा), पोलादी तार आणि पितळेची चादर हा कच्चा माल लागतो. पोलादी चादरी योग्य जातीच्या, कथिल (वा जस्त) चढविलेल्या २८ आणि ३० अंकांच्या (जाडी दर्शविणाऱ्‍या अंकाच्या, गेजच्या) असतात. पितळेच्या चादरीचे दंतचक्र करतात व ती १८–१९ अंकी असते.


पत्र्यातून निरनिराळ्या भागांसाठी कोरा कापून घेणे, त्यांना दाबयंत्राचा आकार देणे, भोके पाडणे, कडा सारख्या करणे व वाकवणे, छाप मारणे, वेगवेगळे भाग एकत्र बसविणे व कंदील उभा करणे या कंदिलाच्या बनावटीतील मुख्य क्रिया (जवळजवळ या अनुक्रमाने) असतात. काच उचलण्याची तरफ, चावी, काचेचा रक्षक, तिला दाबून धरणारी स्प्रिंग व कंदिलाची कडी हे भाग तारेचे असतात. जोडणी झाल्यावर टाकी गळत नाही ना व इतर सर्व भागांची हालचाल व्यवस्थित होते का याचे परीक्षण करण्यात येते. मग सफाई, रंग किंवा इतर लेपन या गोष्टी केल्या की, कंदील तयार होतो.

पेट्रोमॅक्स दिवे : (गॅसबत्ती) पेट्रोमॅक्स दिवा हा हवेचा दाब दिलेल्या तेलाचा दिवा आहे. दिव्याच्या खाली तेलाची टाकी, तीत हवा भरावयाचा पंप, हवा सोडण्याची चावी व टाकीतील हवेचा दाब मोजयण्याचा दाबमापक या गोष्टी असतात. टाकी हवाबंद करण्यासाठी आत वायसर घातलेले, आट्याचे व टाकीत तेल भरावयाचे एक झाकण असते. टाकीतून बाहेर आलेली ज्वालकाची नळी तापविण्यासाठी जे स्पिरिट ओतावे लागते त्यासाठी नळीच्या भोवती एक बसकट वाटी असते. टाकीतल्या दाबामुळे केरोसीन स्पिरिटने तापविलेल्या नळीतून एका अत्यंत बारीक छिद्रातून बाहेर पडते. बाहेर पडताच या तेलाचे बाष्प बनते. तेथून ते मिश्रकाच्या नळीत शिरते पण शिरताना आपल्या बरोबर बाहेरील हवाही खेचते व त्यांचे मिश्रण बनून ते वायुजाळीत येते. तेथे त्याचे प्रज्वल होऊन ते जाळीला प्रदीप्त करते व या प्रदीप्त जाळीपासून प्रकाश उत्पन्न होतो. हा वायू (वाफ–हवा मिश्रण) सतत जळत राहिल्यामुळे तेलाचे बाष्प करण्यासाठी लागणारी उष्णता वर उल्लेखिलेल्या ज्वलकाच्या नळीला सतत दिली जात राहते. दिव्यातील ज्वलीत गरम वायू आणि धूर वरील भोकातून बाहेर पडून जातो. बाजूला काच दिवा उचलायला कडी आणि केरोसीन बाहेर पडण्याचे सूक्ष्म छिद्र साफ करण्यासाठी टोकाला सूची असलेली एक दांडी यासहीत दिव्याची रचना पूर्ण होते. टाकीतील हवा सोडून वा तेलचा प्रवाह बंद करून दिवा विझविता येतो. या दिव्याचा ४०० कँडेला इतका प्रखर प्रकाश पडतो.

या दिव्याच्या बनावटीत उच्च ताणबलाच्या नरम पोलादाच्या चादरी व तारा, पितळेच्या सळ्या व पट्ट्या, कासे व बिडाचे ओतीव भाग इ. कच्चा माल लागतो. दिव्यात वेगवेगळे सु. सत्तर भाग असतात. दिवे बनविताना पत्राकाने करावयाचे भाग आणि यंत्रणादी इतर क्रियांनी करावयाचे भाग असे क्रियांचे दोन विभाग पाडण्यात येतात. लेथ, चक्रीकर्तन (मिलिंग) यंत्र, छिद्रण यंत्र, स्पिनिंग यंत्र, रधित्र (शेपर), शाणन यंत्र, वितळजोड, वेल्डींग-संच, रंग व मुलामा देण्याची सामग्री वगैरे साहित्य असलेला कारखानाच असावा लागतो. शिवाय काच, वायुजाळी यांसारखे काही तयार भाग बाहेरून घ्यावे लागतात.

तेलाची टाकी, ज्वालक हे भाग तयार झाल्यानंतर त्याचे परीक्षण करुन ते चांगले असल्याबद्दल खात्री करुन घेतात. इतर भागांची चाचणी करुन सर्व भाग जोडतात व मग तयार झालेल्या दिव्याचे सर्व दृष्टींनी परीक्षण करतात.

इतर दिवे : टांगा, बग्गी, सायकली इ. वाहनांना लावावयाच्या तेलदिव्यांत तसेच रेल्वे, बोटी इ. ठिकाणी वापरण्यात येणाऱ्‍या दिव्यांत दिवा खालच्या भागात असून तो तीन बाजूंनी बंद असतो आणि पुढच्या भागाला फुगीर काच असते. त्यामुळे प्रकाश मोठ्या भागावर एकत्रितपणे पडू शकतो. वरच्या बाजूला कंदिलाप्रमाणे धूर जाण्यासाठी भोकाची जाळी वा पोकळी असते व खालून हवा आत येण्याची सोय असते. वाहनांच्या दिव्यात काही वेळा मेणबत्तीचा वापर करतात. असे दिवे अद्यापिही वापरले जातात. टांगा–बग्गीला लावलेला दिवा एका ठिकाणीच स्थिर असतो, तर सायकलचा दिवा स्प्रिंगेच्या सहाय्याने तरता ठेवता येतो. टेबलावरचे संपूर्ण काचेचे दिवे, भिंतीवरचे दिवे, चिमण्या हे तेलदिव्यांचे आणखी काही प्रकार.


वायूदिवे : नैसर्गिक वायू, कोल गॅस, गोबर वायू इ. वायू नुसतेच जाळून मिळणाऱ्‍या ऊर्जेत दृश्य वर्णपटामध्ये असणारा अंश कमी असतो. अशा वायूंपासून मिळणाऱ्‍या सर्व ऊर्जेचे दृश्य वर्णपटामध्ये रूपांतर करण्यासाठी वायुजाळीचा उपयोग करण्यात येतो. असे वायू ज्वालकातून दाबाखाली वायुजाळीच्या साहाय्याने जाळतात. वायुजाळीत असलेले कार्बनी पदार्थ प्रथम जळाल्यानंतर उरलेल्या सिरिया व थोरीया या ऑक्साइडांना मूळ जाळीचा आकार येतो आणि तो आकार गरम वायूमुळे तापतो व प्रकाश मिळतो. जाळीला प्राप्त झालेला हा आकार मुद्दाम बदलणे इष्ट नसते. सिरिया व थोरिया यांना आलेला आकार दबल्यास वा वायूचा दाब कमी केल्यास मिळणारा प्रकाश मंद स्वरूपाचा मिळतो. विद्युत् दिव्यांच्या वापरामुळे वायुदिव्यांचा वापर कमी झाला आहे. यूरोपीय राष्ट्रांत वायुदिव्यांचा उपयोग रात्री रस्त्यांवर प्रकाशासाठी व घरातील प्रकाशासाठी करण्यात येत आहे. भारतात सध्या गोबर वायूचा उपयोग प्रकाशासाठी काही प्रमाणात करण्यात येतो.

विजेचे दिवे : विजेचा दिवा ही आता सर्वांच्या माहितीतली गोष्ट झालेली आहे. घरातल्या उजेडासाठी प्रदीप्त (काचेच्या फुग्यांचे) दिवे अथवा नळीचे अनुस्फुरक दिवे, औद्योगिक वा संशोधन कार्यात वापरण्यात येणारे प्रज्योत दिवे, छायचित्रे घेण्यासाठी वापरण्यात येणारे स्फुर दीप[⟶ छायाचित्रण], जाहिरातींच्या नळ्यांचे निऑन दिवे, विस्तार दीप (फ्लड लाइट), विमानतळ व रेल्वे इ. ठिकाणी वापरण्यात येणारे झोत दिवे इ. विजेच्या दिव्यांचे अनेक प्रकार आहेत. प्रदीप्त दिव्यात निर्वात आणि अक्रिय (सहजासहजी रासायनिक विक्रिय न होणारा) वायू भरलेले आणि आत फक्त निऑन वायू असलेले अगदी मंद प्रकाशाचे असे उपप्रकार आहेत [ ⟶ विद्युत् दिवे].

हंड्या व झुंबरे :हंडी : अर्धगोल तळ आणि त्यावर पिंपाच्या आकाराचा वरून उघडा भाग असलेल्या काचेच्या पात्राला हंडी म्हणतात. एकूण सु ४०–५० सेंमी उंच व ३०–३६ सेंमी. व्यास असलेले काचेचे भांडे छताला साखळ्यांनी टांगून त्यात पणती ठेवली की, हंडी तयार होते. केरोसिन तेल भारतात रूढ होईपर्यंत म्हणजे एकोणिसाव्या शतकापर्यंत श्रीमंत लोकांच्या व राजेरजवाड्यांच्या मोठाल्या दिवाणखान्यात अशा हंड्या रूढ होत्या. देवळांच्या सभामंडपांत हंड्यांचा वापर करीत असत. हंड्यांकरिता निरनिराळ्या रंगाच्या अगर साध्या पारदर्शक काचा वापरीत असत. तसेच दोन हंड्यांच्या मध्ये विविध रंगाचे काचेचे गोल प्रकाशाच्या परावर्तनासाठी आणि शोभा वाढविण्यासाठी टांगण्याची पद्धत रूढ झाली. हंडीच्या मुख्य फायदा म्हणजे जोराचा वारा आला, तरी तिच्यातील दिवा विझत नाही. हा हंडीचा तांत्रिक फायदा आहे. एखाद्या जागेत बऱ्‍याच हंड्या लावल्या की, हंड्यांमुळे त्याजागेला बरीच शोभा येते. शेवटी शेवटी या हंड्यात पणत्याच्या ऐवजी मेणबत्त्या लावण्यात येऊ लागल्या होत्या.

झुंबरे : राजेरजवाडे आणि श्रीमंत लोक यांच्या दिवाणखान्यात वा मोठाल्या सभागृहांत प्रकाशासाठी व जागेला शोभा आणण्याकरिता एकाच दांड्याला अनेक फांद्या काढून त्यांवर दिवे ठेवून झुंबर करतात आणि ते छताला टांगतात. शोभा वाढावी म्हणून निरनिराळ्या आकारांच्या व स्वरूपांच्या दांड्या लावून त्यांवर दिवे बसवितात. दिवे लहान हंड्याच्या स्वरूपातही असतात. व त्यांचे रंगही अनेक असतात. त्यांच्या रचनेला एखादा नियमित व सममित आकार असतो. झुंबरे भारतात व यूरोपातील देशांतही प्रचलित होती आणि अद्यापिही काही ठिकाणी वापरात आहेत.

इसवी सनाच्या चौथ्या शतकापांसून ख्रिस्ती देवळात अनेक मेणबत्त्या झुंबरे बसवीत असत. रोमच्या सेंट पीटर चर्चला दिलेल्या आठव्या शतकातील झुंबरात १,३७० बत्त्यांची सोय आहे. जर्मनीच्या मंत्र्याला फ्रेड्रिक बार्बारोसा यांनी एक झुंबर आहेर म्हणून दिले होत, त्याचा व्यास चार मी. आहे. दुसरे एक झुंबर हिल्डसहाइमच्या देवळात असून त्याचा व्यास सहा मी. आहे, त्यात ७२ मेणबत्त्या लावता येतात. अकराव्या आणि बाराव्या शतकातील झुंबरे भव्य आहेत. यांतील पुष्कळ झुंबरे मेणबत्त्यांसाठीच असली. तरी काही तेलाच्या दिव्यांचीही आहेत. ही झुंबरे लोखंड, तांबे, चांदी आणि सोने या धातूंची बनविलेली असून त्यांतील कलाकुसरीचे काम एनॅमलाने केलेले आहे. यांतील काही झुंबरे लाकडी आहेत. चौदाव्या शतकातील झुंबरे बहुधा काशाची करीत. याच काळात जर्मनीत झुंबरे तयार करताना प्राण्यांच्या शिंगांचा उपयोग करीत असत.


अठराव्या शतकात तेलाचे संपूर्ण ज्वलन करता येऊ लागल्यामुळे या काळातील झुंबरांना लोंबणारे दिवे लावलेले आढळतात. यात स्फटिकांचा उपयोग केलेला आहे. जास्त किंमती झुंबरांना चिनी मातीच्या फुलांनी मढविण्यात येई. हा प्रकार पुढे इतका लोकप्रिय झाला की, चिनी मातीची फुले तयार करावयाच्या धंद्याला पॅरिसमध्ये विशेष महत्त्व आले. घरातही झुंबरे वापरीत पण ती साधी व लहान असत.

एकोणिसाव्या शतकात काशावर सोन्याचा मुलामा असलेल्या चौकटी आणि स्फटिकांची कलाकुसर केलेली झुंबरे प्रचारात आली. आधुनिक झुंबरात कोरीव कलाकुलर कमी झालेली असली, तरी विविध आकारांवर मुलामा चढवून ती आकर्षक करतात. यांत विजेचे दिवे लावण्याची सोय असते. भारतातील काही मोठ्या आणि श्रीमंत माणसांच्या दिवाणखान्यांत अद्यापिही जुन्या पद्धतीची झुंबरे पहावयास मिळतात. [ ⟶ हंड्या व झुंबरे].

दीपच्छादन : (लँप शेड). एकोणिसाव्या शतकात केरोसिनाच्या दिव्यांचा प्रसार होईपर्यंत दीपच्छादनाची कल्पना अस्तित्वात नव्हती. केरोसिनाच्या दिव्याचा अभिकल्प व त्याची रचना त्या शतकाच्या अखेरीस पूर्णावस्थेला पोहोचली आणि चांगले कार्यक्षम दिवे बनविण्यात येऊ लागल्यावर टेबलावर वाचनासाठी वापरण्याचे विशेष प्रकारचे दिवे तयार करण्यात आले. यांचा उजेड वर न जाता शक्य तितका खाली यावा म्हणून या हेतूने त्यांच्यावर दीपच्छादन बसविण्यात येऊ लागले. ही दीपच्छादने वरून दुधी काचेची, अर्धगोल आकाराची पण मध्ये चिमणीसाठी भोक असलेली व खालच्या बाजूने साधी काच असलेली अशी असत. टांगायच्या दिव्यांना वर एक तबकडी बसवीत व तिला खालच्या बाजूने पांढरा तैलरंग लावत. भारतात अजूनही मिरवणूकीत पेट्रोमॅक्स दिवे डोक्यावर घेऊन वापरतात, त्यांचा प्रकाश खाली यावा म्हणून त्यांना वर तबकडीची दीपच्छादने ठेवतात. अशा तऱ्‍हेची दीपच्छादने रस्त्त्यावरील वायूच्या दिव्यांनाही बसवीत असत. दीपच्छादने मूलतः उपयुक्ततेच्या दृष्टीने तयार झाली. ती शोभेची वस्तू होऊ शकेल किंवा तिने घराच्या सजावटीत भर घालता येईल, ही कल्पना त्या वेळी उदयाला आली नव्हती.

इ. स. १८८० नंतर विजेच्या दिव्याचा प्रसार होऊ लागला. हे दिवे प्रदीप्त तंतूच्या जातीचे होते व त्यांची प्रकाशन शक्ती केरोसिनाच्या दिव्याच्या मानाने बरीच जास्त होती. सुरुवातीला हे दिवे छतापासून लोंबते ठेवण्यात येत व प्रकाश शक्य तितका खाली यावा यासाठी त्यांना लोखंडी पातळ चादरीच्या शंकूच्या आकाराची दीपच्छादने बसविण्यात येऊ लागले. पुढे भिंतीवरचे, वाचनाच्या टेबलावरचे वगैरे दिव्याचे प्रकार सुरू झाल्यावर दीपच्छादनाकडे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचे लक्ष वळले आणि त्यांच्या असे लक्षात आले की, दीपच्छादनाने फक्त प्रकाश परावर्तित करून न घेता त्याचा इतर प्रकारेही उपयोग करून घेता येइल आणि शिवाय ते स्वतःही घरातील एक शोभेची वस्तू ठरून घराच्या सजावटीतही भर घालील. दीपच्छादनाप्रमाने खुद्द दिव्याच्या धारकाच्या–घोड्याच्या–वगैरेंच्या आकारालाही आधुनिक काळात महत्त्व आले आहे.

प्रकाशनियमनाच्या बाबतीत दीपच्छादनाचा उपयोग प्रकाश परावर्तित करणे, त्याचे विसरण करणे (सर्वत्र सारख्या प्रमाणात पसरविणे), अप्रत्यक्ष प्रकाशन साधने, रंगीत प्रकाश देणे इ. गोष्टींसाठी करण्यात येतो. मात्र हे प्रदीप्त तंतूच्या दिव्यांनाच लागू आहे. अनुस्फुरक (नळीच्या) दीपच्छादनासाठी दिव्यांना फक्त परावर्तक दीपच्छादनेच बसवितात दीपच्छादनासाठी काच, प्लॅस्टीक, पोर्सलिन, धातू तसेच पुठ्ठा, प्लॅस्टीक कापड व कृत्रिम रेशमाचे कापड हे पदार्थ वापरतात.

दीपच्छादनासाठी वापरण्यात येणारीकाच अर्थातच साधी पारदर्शक नसते. ती दुधी, रंगीत, अर्धदुधी, फिकट, रंगीत साधी, फिकटरंगीत अर्धपारदर्शक वगैरे प्रकारची असते. भोके असलेले प्लॅस्टिकच्या चादरीचे तुकडे प्रकाशाच्या विसरणासाठी किंवा प्रकाशाची तीव्रता बरीचशी कमी करण्यासाठी वापरतात. पोर्सलीन व धातू यांचा उपयोग दिवा दिसूच नये यासाठी होतो, तसेच पुठ्ठयाचा त्याच्या जाडीनुसार प्रकाश बंद करण्यासाठी होतो. प्लॅस्टिक व रेशमी कापडातून प्रकाश काही प्रमाणात पार होतो आणि जास्त प्रमाणात पण त्यांच्या रंगानुसार परावर्तित होतो. काही भाग उष्णतेच्या रूपात कापडात जिरून जातो.


दीपच्छादनांचे आकार अनंत आहेत. त्यांत पूर्ण गोल, अर्धगोल, लंबगोल, वर्तुळाकृती, घंटा आणि होडी यांच्यासारखे, चौरस, आयती (पेटीसाखे), बशीसारखे, लघुकोनी किंवा बृहत्कोनी, शंकूसारखे इ. आकार सर्वसाधारणपणे असतात.

प्रकाशन : प्रकाशनाचे तीन प्रकार आहेत–प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि अर्धप्रत्यक्ष. प्रत्यक्ष प्रकाशन पद्धतीत दिव्याचा प्रकाश देणारा (तंतूचा) काही भाग उघडा असून डोळ्यांना दिसू शकणारा असतो. अप्रत्यक्ष पद्धतीत दिव्याच्या जमिनीकडील भागाच्या खाली पोर्सलिनाचे किंवा धातूचे मोठे व पसरट दीपच्छादन असते आणि दिवा दीपच्छादनाच्या बाहेरून माणसाला दिसत नाही. दिव्याचा उजेड (पांढऱ्‍या) छतावर पडतो व तेथून तो परावर्तित होऊन जमिनीकडे मंद आणि विसरित रूपात येतो. अर्धप्रत्यक्ष पद्धतीत दिवा भिंतीला किंवा टेबलावर असतो पण त्याचे दीपच्छादन अशा तऱ्‍हेच्या काचेचे केलेले असते की, त्याच्यातून प्रत्यक्ष दिवा तर दिसणार नाही पण प्रकाश मात्र मंद आणि विसरित स्वरूपात खोलीभर पडेल. खास वाचनासाठी वापरावयाच्या दिव्यांची व त्यावरील दीपच्छादनाची अशी रचना असते की, दिवा वाचणाराला तर दिसणार नाही पण त्याचा प्रकाश मात्र पुस्तकावर, चांगला पडेल.

एखाद्या मोठ्या खोलीत जर जास्त दिवे असतील, तर प्रथम त्यांची जागा अशी ठरवतात की, सर्व खोलीभर प्रकाशाची तीव्रता सारखी राहील आणि त्या सर्वांना एकाच तऱ्‍हेचे व एकाच रंगाचे दीपच्छादन वापरतात. जर मध्यभागी एक मोठा दिवा व बाजूला लहान असतील, तर त्या मुख्य दिव्याला जास्त उठावदार दीपच्छादन बसवितात.

रस्त्यांच्या प्रकाशनासाठी आता सर्वत्र (व भारतातही) नळीचे दिवे वापरतात. त्यांना मागच्या बाजूने परावर्तकवजा चादरीचे, पांढरा रंग लावलेले, पेटीच्या आकाराचे दीपच्छादन वापरतात. काही ठिकाणी नळीला पुढच्या बाजूने संरक्षक आवरण म्हणून ही प्लॅस्टिकचे इंग्रजी U अक्षराच्या आकाराचे दीपच्छादन वापरतात. मात्र याच्यामुळे रस्त्यावर पडणारा प्रकाश मंद होतो [ ⟶ प्रदीपन अभियांत्रिकी].

धार्मिक महत्त्व : सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा हिंदू धर्मात पवित्र व शुभ मानलेला आहे. तो हातातून पडून विझला, तर ते अशुभ चिन्ह मानले जाते. देवपूजा तसेच कोणतेही दैंनदिन व पैतृक धर्मकृत्य करण्याच्या वेळी दिवा आवश्यक असतो. दीपदान हे पुण्यप्रद कृत्य मानले जाते. संध्याकाळी दिवा लावल्यावर त्याला नमस्कार करतात. दिव्यात तेल वा तूप ह्या शिवाय इतर पदार्थ वापरू नयेत आणि त्यातील वात विशिष्ट प्रकाराची असावी, असे पुराणांत सांगितले आहे. महाराष्ट्रातील बऱ्‍याच देवळांसमोर दिवे लावण्यासाठी दीपमाळ उभारलेली आढळते [ ⟶ दीपमाळ–१]. त्रिपुरी पौर्णिमा, दीपावली इ. दीपोत्सव हिंदू लोक करतात. हिंदू लोकांत एखादी व्यक्ती ज्या जागी मृत झाली, त्या जागेवर दिवा लावून झाकून ठेवतात. त्या दिव्याच्या आसपास जी चिन्हे उमटतात, त्यांवरून ती व्यक्ती कोणत्या योनीत गेली आहे हे समजते, असे मानले जाते. नृत्यातही दिवे वापरले जातात. हातात, तोंडात वा डोक्यावर पेटत्या समया, मशाली, पणत्या इ. घेऊन दीपनृत्य करतात. विविध शुभप्रसंगी औक्षण करण्याची प्रथा हिंदू लोकांत आहे.

रानटी टोळ्यांतही दिव्याला धार्मिक महत्त्व आहे. जपान, चीन, ईजिप्त इ. देशांत प्राचीन काळापासून दिव्याला धार्मिक व सामाजिक महत्त्व असल्याचे दिसून येते.


हिंदू धर्माप्रमाणेच ज्यू व ख्रिस्ती धर्मामध्ये दिव्याला विशिष्ट स्थान आहे. रात्रीच्या प्राथनेच्या वेळी दिवा असणे आवश्यक असते. इ. स चौथ्या शतकापासून बाप्तिस्मा देताना व दफन करताना दिवे लावण्याची प्रथा सुरू झाली. बाप्तिस्म्यानंतर मेणबत्त्या नेण्याची सूचक प्रथा रोमन कॅथॉलिक पंथात आजही आहे. विविध सणांच्या वेळी दिवे लावण्यात येतात.

मुस्लिम समाजात विविध प्रसंगी दिव्यांचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग करण्यात येतो. मुलांच्या जन्मानंतर करण्यात येणाऱ्‍या ‘पट्टीʼ या विधीत पिठाचा दिवा एका थाळीत रात्रभर लावतात. गुरुदक्षिणा म्हणून गुरूला शुक्रवारी चिरागीसाठी द्रव्यदान करण्याची प्रथा आहे, तर वधु–वराचे अरिष्ट टळावे म्हणून लग्नापूर्वी वराला ज्या नावेवर किंवा इतर वाहनावर बसवितात त्याच्या टोकावर पिठाचा दिवा लावण्याची रूढी आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती मृत झालेल्या जागी व जेथे तिला आंघोळ घालतात, त्या ठिकाणी एकोणचाळिसाव्या दिवशी किंवा ३९ दिवस तसेच दर गुरूवारी व शुक्रवारी कबरीवरील कोनाड्यातही ‘चिरागʼ लावतात. कधीकधी तिसऱ्‍या, दहाव्या आणि चाळिसाव्या दिवशीही कबरीवर दिवा लावतात. भारतात मोहरमप्रसंगी गुजरातेत शियापंथीय स्त्रिया लाकडी उखळावर किंवा पालथ्या घागरीवर दिवा लावून शोक करतात. मोहरमनंतर बारहवफा या महिन्यात मशीद, दर्गे इ. धार्मिक स्थानी दिव्यांची रोषणाई करण्यात येते. रब्बि–उल–आखर (ग्यारहवी) या महिन्याच्या ११ तारखेस शेख अब्दुल जीलानी या अवलियाच्या स्मरणार्थ घरात ११ दिवे लावण्याची प्रथा आहे.

भारतीय उद्योग­­ : कंदील आणि पेट्रोमॅक्सचे उत्पादन मोठ्या कारखान्यांतून करण्यात येते. इतर प्रकारच्या दिव्यांचे उत्पादन लघुउद्योग व कुटिरोद्योग म्हणून केले जाते.

ओगलेवाडी येथील ओगले ग्लास वर्क्स लि. हा भारतातील हरिकेन कंदील तयार करणारा पहिला कारखाना १९२६ मध्ये सुरू झाला. त्यांनंतर दहा वर्षानी आगरपारा (प. बंगाल) येथे ओरिएंटल मेटल इंडस्ट्रिज हा कारखाना सुरू झाला. या कारखान्यांना प्रारंभापासूनच परदेशी मालाबरोबर स्पर्धा करावी लागल्यामुळे त्यांत क्षमतेपेक्षा कमी उत्पादन होई. दुसऱ्‍या महायुद्धात आयात घटल्याने हे कारखाने भरभराटीस आले तसेच नवीन कारखाने निघाले. १९४६ मध्ये एकूण आठ कारखाने होते व त्यांत १७·५२ लक्ष कंदील तयार झाले. यानंतर आणखी चार कारखाने निघाले व १९४९ च्या सुमारास सर्व कारखान्यांची उत्पादनक्षमता ३० लाख नगांची झाली. यानंतर आणखी दोन नवीन कारखाने निघाले, तथापि १९५९ मध्ये नऊ कारखान्यांत सु. ४० लाख नगांचे उत्पादन झाले. कंदीलच्या उत्पादनास १९४७ पासून संरक्षण देण्यात आले होते १९५८ मध्ये हे काढून घेण्यात आले आहे.

पेट्रोमॅक्स दिवे बनविण्याचा सी.एच्. पोची अँड सन्स हा पहिला कारखाना १९३७ मध्ये मुंबई येथे सुरू झाला. यांनंतर कलकत्ता येथे आणखी चार कारखाने निघाले. दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात या दिव्यांच्या निर्मितीस उत्तेजन मिळून १९४१–४२ मध्ये मुंबई येथे आणखी तीन कारखाने निघाले. महायुद्धानंतर झालेल्या आयातीमुळे भारतातील निर्मिती कमी झाली. १९४९ पासून आयातीवर नियंत्रण आल्यामुळे त्याच्या निर्मितीस उत्तेजन मिळू लागले तथापि त्यांची आयात चालू होती. १९५२-५३ मध्ये ९७·४% आयात आणि १९५३-५४ मध्ये ७१·४% आयात प. जर्मनीतून व उरलेली आयात इंग्लंड, हाँगकाँग, स्वीडन, इटली व स्वित्झर्लंडहून झाली. १९५८ पासून कंदील व पेट्रोमॅक्स यांच्या आयातीवरील नियंत्रणे उठविण्यात आली. १९५९ मध्ये एकूण आठ कारखांन्यातून पेट्रोमॅक्स उत्पादन होत होते.


             भारतातील कंदिलांचे व पेट्रोमॅक्स दिव्यांचे उत्पादन (आकडे हजारात) 

 

कंदील 

पेट्रोमॅक्स दिवे 

वर्ष 

उत्पादन

क्षमता 

प्रत्यक्ष

उत्पादन 

उत्पादन

क्षमता 

प्रत्यक्ष

उत्पादन 

१९५१ 

१९५६ 

१९६१ 

१९६६ 

१९६९ 

१९७३ 

४,२६० 

४,०४३ 

४,४२३ 

६,५६४ 

३,१२० 

३,१२० 

३,९७७ 

५,१७९ 

५,५३९ 

५,१३५ 

४,०७० 

२,३९० 

८६ 

९४ 

१८६ 

१८८ 

१२५ 

८९ 

६३ 

८४ 

१४५ 

६४ 

८० 

६५ 

कंदील व पेट्रोमॅक्सशिवाय इतर प्रकारचे तेलाचे दिवे अगदी लहान कारखान्यांत विशेषतः कुटिरोद्योग म्हणून तयार होतात. त्यांच्या उत्पादनांच्या आकडेवारी उपलब्ध नाही. तसेच काचेच्या व धातूंच्या  काही दिव्यांची आयात व निर्यात करण्यात येते.

गोखले, श्री. पु. ओगले, कृ. ह.

दिव्यातील कलाकत्मकता : प्राचीन काळी दिवा म्हणून तेलासाठी खळगा असलेले खोलगट दगडी भांडे व वातीसाठी गवताची वा तंतूंची दोरी यांचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. पुढे मात्र उत्तरोत्तर दिव्याच्या आकाराप्रकारात व त्याच्या बनावटीसाठी लागण्याऱ्‍या साधन–सामग्रीतही विविध प्रकारचे बदल होत गेले. प्राचीन ग्रीक मंदिरांतील झगझगीत दिवट्या (इ. स. पु. ७००) किंवा रोममधील संपुटसदृश दीपपात्रे (इ. स. पु चौथे शतक) ही त्याचीच साक्ष देतात.

पश्चिमी समाजात प्राचीन काळच्या खापराच्या दिव्यावर कलाकुसर करण्यात येई व वरील भागात उष्णतारोधक आच्छादन आणि खालील भागावर दिवा तयार करणाऱ्‍याचे शिक्का उठविलेला असे. खापरानंतर काशाचे दिवे प्रचारात आले. त्यांवरही खूपच नक्षीकाम केलेले असे. तो तयार करण्याची एक प्रमाणित पद्धती होती. तिच्यामध्ये दिव्याला एक मूठ व त्याला कडी व खाली पंज्यासारखा किंवा चंद्रकोरीसारखा भाग असे. त्यामुळे दिवा हातात धरणे सोयीचे होई. ज्योतीचे वाऱ्‍यापासून रक्षण व्हावे म्हणून दिव्याला एक आच्छादनही असे. असे दिवे अथेन्समधील उघड्या जागेत लावण्यात येत. अथेन्समध्येच (इ. स. पू. ४००) रात्रंदिवस तेवणारा एक सुवर्णदीपही होता. त्याच्या वाती कापसाच्या असून त्यात वर्षातून एकदाच तेल घालण्यात येई. असाच दुसरा एक दीप काशाचा असून ते एक मोठे शिल्पच होते. त्याचा आकार ताडवृक्षाचा असून पानांचा उपयोग प्रकाशपरिवर्तनासाठी व खोलगट देठांचा वापर वातीला तेल पुरवण्याकडे होत असे. या दिव्यात दरवर्षी एका विशिष्ट दिवशीच तेल घालण्यात येई. त्यामुळे कालगणना करणे सोईचे पडे.


इटलीमधील कॉर्तोना येथेही प्राचीन काळचा एक टांगता दिवा १८४० मध्ये सापडला. त्याचा आकार गोल आणि वातींसाठी त्याला सोळा चोची आहेत. त्यावरील कलाकुसर अत्यंत कल्पनारम्य व मनोवेधक आहे. तीत आळीपाळीने ‘साइरिनʼ ही जलदेवता व ‘सॅटरʼ ही ग्रीक–रोमन वनदेवता यांच्या प्रतिमा उठविलेल्या असून त्या जोडीतील चोचींच्या मधोमध नदिदेवतेचे डोके व तळाशी मेडूसाचा विस्तृत मुखवटा आणि त्याभोवती पशूंचा एक पट्टाच कोरलेला दिसून येतो.

डचांची दीपपात्रे (सु.१७ वे शतक)ही बहुधा ठोकून ठोकून घडवलेली वा ओतीव स्वरुपाची लोखंडी असत. त्यांना ते ‘बेटी लॅम्पʼ म्हणजे ‘उत्तम दीपʼ असे संबोधीत. त्यांचा आकार भारतीय दिवटीशी जुळतामिळता दिसतो. त्यातच पुढे सुधारणा होऊन उघडझाप करणारी बिजागरीची झडप त्यांच्या तेलपात्रावर बसविण्यात आली. या दिव्याचा प्रसार यात्रेकरूंमार्फत त्या काळी अमेरिकेमध्येही झाला होता.

मध्युगीन काळात दीपपात्रासाठी पक्वमृदेप्रमाणेच कासे, रूपे, सुवर्ण यांचाही वापर होऊ लागला तसेच दिव्यांना वैचित्र्यपूर्ण आकार देण्यात येऊ लागले. बहुधा राक्षस, मानवी पाय, डॉल्फिन मासा, तरंगते जहाज, पंखांचा घोडा असे विविध कल्पित आकार त्याला मिळू लागले. त्याचबरोबर पुराणकथांतील कल्पना वा क्रॉस यांचाही वापर दीपपात्र आणि त्याच्या मुठी यांकडे होऊ लागला.

पश्चिमी प्रबोधन काळात इटलीमध्ये अभिजात कलात्मक दिव्यांची निर्मिती होऊ लागली होती. या दिव्यांची ज्योत एका काचेच्या नळांकाड्यांतून तेवत होती. इंग्लंडच्या एलिझाबेथजवळ रूपेरी मुलामाचा व स्फटिकयुक्त असा एक शोभिवंत दीप होता, तर पॅरिसमधील ज्यूलनच्या हमामखान्यातही असाच एक कलापूर्ण दीप होता, असे उल्लेख आढळतात.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रॉकेलचा वापर सुरू झाल्यावर मूळच्या दीपपात्रात बरेच बदल घडून आले व साधा कंदील प्रचारात आला, तर एकोणिसाव्या शतकाच्या काचेच्या दिव्यांनी ते स्थान घेतले. त्यातूनच दिव्यांच्या व्हेनिशियन हंड्या व झुंबरे पुढे आली.

इ. स. १८७९ मध्ये विजेचा शोध लागल्यावर विद्युत् दीप अस्तित्वात आला. त्यामुळे तर वातावरणनिर्मितीसाठी दिव्यांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर सुरू झाला. गृहशोभनाकडेही दिव्यांचा उपयोग होऊ लागल्यामुळे त्यांच्या आकारप्रकारात विविधता आली. या विद्युत् दिपांच्या टोपी वा दीप–छादन (शेड) म्हणजे त्यांच्या सुशोभनात भर घालणारी एक बाबच ठरली. त्यामुळे या टोप्या वा दीप–छादने (शेड) निरनिराळ्या प्रकारांची शोभिवंत करण्याकडे कल होऊ लागला. कधी त्या मेणकागद, तेलकागद, प्लॅस्टिक, रेशीम इ. वस्तूंच्या केलेल्या असत, तर कधी त्या धातूच्या नक्षीदार वा लाक्षारसयुक्त वा ताम्रपत्राच्या करण्यात येत. या मऊ कापडी टोपीच्या वरील अथवा खालील भागावर नागमोडी टाका मारून किंवा वेणी वा गोफ गुंफून तिचे सौंदर्य वाढविण्यात येई. पण दिवठाण (स्टँड) मात्र साधाच ठेवण्यात येई परंतु दोन्हींवर नक्षीकाम केले, तर मात्र ते एकाच प्रकारचे राखून त्यात सुसंगती ठेवण्यात येई. यात उत्तरोत्तर बऱ्‍याच सुधारणा झाल्या असून सुशोभनाचे तंत्र विकसित करण्यात आले. आहे. कधीकधी जुन्या टाकाऊ वस्तूपासूंनही घरगुती दिवठाणे कलात्मक रीतीने तयार करण्यात येतात. त्यासाठी कधी जुन्या पद्धतीच्या काचेच्या बाटल्या, लाकडी ठोकळे, चिनीमातीची पुष्पपात्रे, प्राचीन पितळी दिवे, मेणबत्त्यांच्या नळ्या, प्रबोधन कालीन लाकडी कलापूर्ण वस्तू हे सर्व आजच्या दिव्याच्या दिवठाणांचे सौंदर्यवर्धन करणाऱ्‍या बाबी ठरल्या आहेत.

आफ्रिका वा अतिपूर्वेकडील दिव्यांचे कलात्मक स्वरूप भारतीय दिव्यांसारखेच होते. प्राचीन मेसोपोटेमियन सस्कृंतीत (इ. स. पू. २५००) मात्र वातीसाठी पन्हळ असे. ती ॲलबास्टर या पांढऱ्‍या दगडाची वा कासे अथवा सोने या धातूंची तयार केलेली असे.

चिनी दिव्यांचे स्वरूप एखाद्या नळकांड्यासारखे असून त्यावर परंपरागत नक्षीकाम केलेले आढळते. तसेच ते टांगता येतील अशी त्यात सोय असे. त्याना पुष्कळदा गोडेंही लावलेले असत.


इस्लामी देशांतही सुरुवातीच्या काळात तरंगत्या वातीचे दिवे असत. या दिव्यांची वात काचेच्या दिवट्यांत तरंगत ठेवीत. पुढे त्यात प्रगती होत गेली. या काचेच्या दिव्यांना कासे वा पितळ या धातूंचा पत्रा लावून त्यांचा प्रकाश खाली पाडण्यात येऊ लागला.तेराव्या–चौदाव्या शतकांत दीपपात्रेही काचेऐवजी धातूंची तयार करण्यात येऊ लागली. मात्र ते फक्त वरच्या बाजूलाच उजेड फेकत असत. धातूंच्या या दीपपात्रांवर छाप काढलेले असून कधी त्यांवर कोफ्तगारी केलेली असे तर कधी अतिमोहक रंगीत मीनाकाम केलेले असे. अशा दिव्यांचा आकार मात्र सर्वसाधारण दिव्यांपेक्षा थोडा मोठा असे. त्यांतही पुन्हा विविधता आणण्यात येई. इस्तबूंल येथील हॅगिओ सोफिया या मुळच्या चर्च असलेल्या, पण पुढे मशीद केलेल्या वास्तूतील दीपमंडळ फार प्रसिद्ध आहे.

भारतीय दिव्यातील कलात्मकता :प्राचीन काळी भारतातदेखील दिव्याची तेल–वात ठेवण्यासाठी खोलगट दगड, शिंप वा नारळाची करवंटी यांचा उपयोग करण्यात येई. त्यांनंतर खापराची पणती प्रचारात आली. या पणतीला ज्योत ठेवण्यासाठी एक चोच केलेली असे. त्यामुळे तिचा आकार अर्ध्यपात्रासारखा वाटे. पुढे पणतीच्या आकारप्रकारात खूपच विविधता आली. त्यानंतरच्या काळात धातूंची दीपपात्रे वापरात आली. ती उंचावर ठेवण्यासाठी दगडी वा लाकडी दिवठाण प्रचारात आले. ते कधी गोल तर कधी चौकोनी आकाराचे असे. उत्तरोत्तर त्यातही कलाकुसर येत गेली व दिवठाण हे दिव्याचाच एक भाग बनले. यातूनच समईची उत्क्रांती झाली. पुढे तर दीपवृक्ष, अर्चनादीप, नीरांजन, फुलवात, पंचारती, नंदादीप, दीपलक्ष्मी, लामणदिवा, आकाशदीप असे दिव्यांचे विविध प्रकार अस्तित्वात आले व ते सर्व कलात्मक पद्धतीने घडविण्यात येऊ लागले. त्यांतील कलाकुसर मनोवेधक पण सांकेतिक स्वरूपाची असे.

भारतीय दिव्यांची घडण विविध संप्रदायांशी परंपरेने जोडलेली दिसते. उदा. शैवसंप्रदायी दीपपात्रे शाळुंका, नंदी, नाग, कीर्तीमुख यांच्या आकारांची, तर वैष्णवसंप्रदायी दीपपात्रे शंख, चंद्र, गदा, पद्म, गरुड व गजलक्ष्मी यांच्या प्रतिकृतीसारखी असतात. गाणपत्य संप्रदायी दीपपात्रांत गणपती, गज, मूषक, सर्प, शिवलिंग, ऋद्धिसिद्धी इत्यादींच्या प्रतिकृतींचा वापर केलेला आढळतो तर सूर्योपासकांची दीपपात्रे ओरिसातील कोनारकच्या सूर्यमंदिरसारखी असतात. शाक्तांच्या दीपपात्रांना कालभैरव, कल्पांतभैरव, काली आणि भैरवी यांचे आकार दिलेला असतात. यांखेरीज हिंदू पुराणकल्पनांप्रमाणे त्या त्या दैवताची आवड व भक्तांची भावना यांना अनुसरूंनही दीपपात्रांचे आकार घडविण्यात येतात. बहुधा हंस हा गतिमान प्रकाशांचे द्योतक असल्यामुळेदीपपात्रांच्या टोकांवर हंसाकृती बसविण्याची प्रथा रूढ आहे. तथापि हंसाकृतीप्रमाणेच मयूराकृतींनी व अश्वाकृतींनी युक्त दिवेही आढळतात.

या सांप्रदायिक घडणीप्रमाणेच भारतातील विविध प्रदेशांतील दिव्यांच्या रूपांतील प्रादेशिकतेचा ठसाही उमटलेला दिसून येतो. उदा. केरळमधील विशिष्ट उंचीच्या कथकला समया. त्यांचा उपयोग कथकली नृत्याच्या वेळी करण्यात येत असल्यामुळे त्यांचा प्रकाश नर्तकाच्या चेहऱ्‍यावर पडेल इतक्या त्या उंच असत. ‘वांचीदीपʼ प्रकारात दिव्यांच्या दांड्याच्या टोकावर नौकासद्दश एक थाळी असून त्यात एका वेळी पाच वाती तेवतील अशा चोची असतात.

धातूंचे दिवे ओतीव असून ते मृदु–मेण पद्धतीने पितळ, ब्राँझ वा कासे या धातूपासून बनविलेले असतात. त्यामुळे त्यांना चकाकी फार असते. या दिव्यांचे आकार आणि उपयोग यांवरून त्यांचे चार गट पाडता येतात : (१) जमिनीवरील उभे दिवे, (२) टांगते दिवे, (३) भिंतीला अडकविलेले दिवे आणि (४) हातदिवे. पैकी जमिनीवरील उभ्या दिव्यांच्या प्रकारात प्राधान्याने समई, वृक्षदीप, स्तंभदीप व दीपलक्ष्मी इत्यादींचा समावेश होतो. समईचा उपयोग मुख्यतः घराची ओटी अथवा देवळाचा गाभारा किंवा सभामंडप प्रकाशित करण्याकडे होतो. समईचे प्रकारही अनेक आहेत. काही समयांत अनेक वातींची योजना असून ज्योतींचे पतंगापासून रक्षण व्हावे म्हणून समईवर नक्षीदार झाकण केलेले असते आणि ते कधी मोर, कधी हत्ती वा नागाच्या आकाराने सुशोभित केलेले असते तर काही समयांच्या दांड्यावरील कलाकुसर उच्च दर्जाची असून त्यांच्या टोकांवर कोणस्तुपसदृश मंदिराकृती, चार कोपऱ्‍यांवर चार सिंह, चार तारांकित दीप, गणेशदीप वा हंस, मोर, शेष, कमल, अथवा कलशाकृती उभविलेल्या असतात. काहींच्या दीपपात्राला लोंबत्या कुडंलाकार कड्यांची योजना केलेली आढळते. गुरुशिष्य दीप हाही समयीचाच एक प्रकार असून तिच्या दांड्याच्या टोकावर मोर आणि दोन बांजूना दोन दीपपात्रे अडकविलेली असतात. या समईचा वापर प्राचीन काळी गुरुकुलात करण्यात येई. यांखेरीज एकाच दांड्याला उत्तरोत्तर लहान होत गेलेली नऊ ज्योतींची पाच दीपपात्रे, चहूबाजूंना चार वक्राकार आकडे व त्यांच्या टोकावर चार ज्योती आणि चार दिशांना चार दीपपात्रयुक्त आकडे आणि त्यांवर नृत्य करणारे मोर अशा विविध स्वरूपाची कलाकृती असलेल्या समयाही आढळतात. या समयांची उंची आणि रुंदी कमी–अधिक प्रकारची असून त्यांचे वजन सु. २ किग्रॅ. पासून सु, ४५ किग्रॅ. पर्यंत असू शकते.


स्त्रीचा घाटदार आकार हे दीपलक्ष्मी या प्रकाराच्या दिव्यांचे खास वैशिष्ट्य आहे. ही दीपलक्ष्मी कधी उभी असते व तिच्या दोन्ही हातांत दीपपात्रे असतात, तर कधी तिच्या एका हातात दीपपात्र असते व दुसऱ्‍या हाताने ती दीपपात्रात तेल सोडीत असते. अशाच एका दीपलक्ष्मीत एका हातात दीपपात्र घेतलेली व दुसऱ्‍या हाताने नृत्यमुद्रा दाखविणारी दीपलक्ष्मी आढळते. यांखेरीज गजारूढ, कमलासनाधिष्ठित, सिंहमुखी पक्ष्यांवर उभी असलेली आणि स्तंभांवर पोपट असलेली, दोन बाजूंना दोन हत्ती असलेली अशा विविध कलात्मक दीपलक्ष्मींचे प्रकार आढळून येतात. अशा दीपलक्ष्मींचे उंची सु. १८ सेंमी. पासून सु २ मी. आढळते.

दीपस्तंभ हा प्रकारही समयीच्याच वर्गात मोडतो. हे दीपस्तंभ, लाकडी, पितळेचे वा देवालयासमोरील दगडांत कोरलेले आढळतात. दीपवृक्षाला अनेक फांद्या असून त्यांच्या टोकावर खोलगट दीपपात्रे ठेवलेली असतात आणि दांड्यावर शिरोभागी पुष्पाकृती, हंसाकृती वा मयूराकृती असते. या दीपवृक्षांचे बहुधा दोन प्रकार आढळतात. एक अश्वत्थ (पिंपळ) वृक्षासारख्या अनेक पसरट फांद्यांचा आणि दुसरा शंक्वाकृती वृक्षासारखा निमुळता होत जाणारा.

सर्व दिव्यांचा उपयोग प्रकाशासाठीच होत असला, तरी मोगलकालीन जहरदीपाचा उपयोग मात्र अन्नातील विष शोधण्याकडे होई. हा जहरदीप जहरमोहरा दगडाचा बनविलेला असून एखादा पदार्थ विषारी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याच्या दांड्याच्या टोकावरील वाटीमध्ये तो टाकण्यात येई. पदार्थ विषारी असल्यास वाटीच्या दगडाच्या रंगात बदल होत असे.

टांगत्या दिव्यांच्या प्रकारात मुख्यतः लामणदिव्यांचा समावेश होतो. या दिव्याचा आकार कमलपत्रसदृश असून त्यात अनेक वाती लावता येतात. तसेच त्याची साखळी मनोवेधक असते. लामणदिवा हा महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. टांगत्या दिव्यांतही वक्राकार गतीने तेल पुरविणाऱ्‍या स्त्रीच्या आकृतचा वापर केलेला आढळतो. कीर्तिमुखदीप, वैष्णवदीप, मयूरदीप, हसंदीप, शंखदीप, कपोतदीप, कमलदीप, हस्तिदीप, कमानदीप, शुकदीप, असे विविध कलात्मक प्रकार यांत आहेत. अशाच एका लांडोरीचा आकार असलेल्या दिव्याचा साखळीमध्ये सुरावटीची योजना आढळते. एका दिव्यात शिवशक्तिसंयोग, तर दुसऱ्‍या एका दिव्यात उलटी उडी घेतलेल्या नृत्यांगनेचा घाट दिसून येतो.

मोगलकालीन टांगत्या दिव्यांचे स्वरूप मात्र याहून वेगळे होते. ते बहुधा पितळेचे केलेले असत व त्यांच्या वरील भागावर मीनार वा घुमटाकृती असून दिव्याच्या चारही बाजूंवर भौमितिक नक्षी असे त्यामुळे त्यांच्या जाळीदार छायाप्रकाश मनोवेधक दिसे. अशाच एका दिव्यात जलाशयातील राजमहालाचा आकृतिबंध आढळतो. शिबिरप्रसंगी अकबराच्या तंबूवर सु.३७ मी. कळकाला एक आकाशदिवा टांगलेला असे. विविध आकांराचे आकाशदिवे दिवाळी, नाताळ इ. सणांत वापरले जातात [⟶ आकाशदिवा]. वृंदावनदीप हाही टांगत्या दिव्याचाच एक प्रकार आहे. कलात्मक जाळीच्या पिंजऱ्‍यांमध्ये एक पणती ठेवून तो तुळशीवृंदावनाजवळ टांगण्यात येतो. त्यामुळे दिवा हवेने विझत नाही व छायाप्रकाशही नक्षीदार पडतो. पूर्वीच्या काळी राजप्रासादासमोर गणेशदीप टांगण्याची प्रथा होती. त्याचा उपयोग अंगण प्रकाशित करण्याकडे होत असे.

भिंतीला अडकविण्यात येणाऱ्‍या दिव्यांचा उपयोग मुख्यतः घरगुती वापरासाठी करण्याचा प्रघात आहे. प्राचीन काळी घराच्या प्रत्येक दानलातून वा देवळातील सभामंडपापासून प्रकाशासाठी या दिव्यांचा वापर करण्यात येई. हे दिवे ठेवण्यासाठी जो कोनाडा असे तोही अलंकृत करण्यात येई व त्यांत ठेवण्यात येणारे दिवे हत्ती, अश्व वा वृषभ यांच्या रूपातील असत. अशाच एका गजलक्ष्मी दिव्याची जडणघडण मोठी आकर्षक दिसते. समोरील भागात चोच असलेले दीपपात्र व त्यावर दोन पोपट आणि मागील बाजूस प्रभावळीमध्ये बसलेली गजलक्ष्मी असे त्याचे स्वरूप आहे, तर कीर्तीमुखदीपात एका बैठकीवर हत्ती व हत्तीच्या पाठीवर दीपपात्र आणि मुठीवर कीर्तीमुख अशी घडण आहे.


हातात धरावयाच्यादीपप्रकारात मुख्यतः आरती, नीरांजन, अर्चनादीप व फुलवात इत्यादींचा समावेश होतो. त्यांपैकी आरतीदींपाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यांत घाटांचे वैचित्र्य, कलाकुसर व प्रतीकात्मकता इ. विशेष आढळतात. आरतीची मूठ बहुधा वक्राकार असून कधी ती नागाच्या व कधी मोराच्या आकाराची असते. यांतील पंचारतीचा प्रकार अधिक आकर्षक असतो. अशाच एका पंचारतीत पाच सुवासिनींनी आपल्या हातात पाच आरत्या घेतल्या असून त्यांच्या मागे एक घोडेस्वार (खंडोबा) आहे. यातच कधी काकड आरती, धूपआरती व पंचारती यांचे संमिश्र घाट पाहावयास मिळतात. एका मयूर धूपारतीत पुढील बाजूस पाच ज्योती व मध्यभागी धूप आणि शेंड्यावर सुगंधी ज्योत पाजळण्याची व्यवस्था आहे, तर दुसऱ्‍या एका पंचारतीत अग्रभागी हनुमान असून त्याच्या मागील बाजूस असलेल्या पुंगळ्यातून वाती उजळता येतात आणि एका शेषाकार पंचारतीत टोकाला एक मार्गदर्शक वात व खालील बाजूस पाच वातींसाठी पाच चोची केल्या असून त्यांवर पाच नागांनी आपल्या फणा धरलेल्या आहेत. दुसऱ्‍या एका शेषाकार पंचारतीत भिन्न भागी शेषाचा फणा व त्यांच्यावरील भागी पाच पुंगळ्यांतून पाच वाती खोवण्याची किमया दाखविली आहे. एका दीपारतीतून तर एका वेळी २५१ ज्योती प्रज्वलित करता येतात. नेपाळमधील सूर्यदीपात मास व संवत्सर प्रतीकरूपाने दाखविलेले आहेत. हा दीप म्हणजे सूर्याचा रथ असून त्याचे सप्तरवारू म्हणजे सप्तवार आणि त्याखालील बारा घोडे म्हणजे वर्षाचे बारा महिने होत.

याखेरीज हाती धरावयाच्या उंच मशालीही कलापूर्ण पद्धतीने घडविलेल्या दिसून येतात. नारळाचा आकार असलेल्या दिवटीत टोकाला वात व आत तेल भरलेले असून तिचा उपयोग दूत वा नोकरचाकर करीत, तर घरावर लावण्यासाठी लाकडी कलापुर्ण घोडीवर दीपपात्र ठेवलेले असे आणि एका लांब सळाकीला वर दिवटी लावलेली असून तिचा उपयोग शिबिर–दीप म्हणून होई. मृत व्यक्तीची प्रतिमा असलेला प्रतिदीप व एका ओळीत नऊ वादक असलेली वाद्यवृंद–दीप असेही दिव्यांचे प्रकार आढळतात. अशा कलात्मक दिव्यांचे नमुने पुण्याच्या राजा केळकर वस्तुसग्रंहालयात आहेत.

जोशी, चंद्रहास

संदर्भ : 1. Boast, W. B. Illumination Engineering, New York, 1953.

           2. Cotton, Principles of Illumination, New York, 1961.

           3. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Vol. V, New Delhi, 1960.

           4. Kelkar, D. G. Lamps of India, Delhi. 1961.

            5. O’Dea, W. T. The Social History of Lighting, New York,1958.


काष्ठशिल्पावरील दीपपात्र, २० सेंमी., गुजरात, १८ वे शतक.मयूर धूपदीपारती २५ सेंमी., आंध्रप्रदेश, १८ वे शतक.गजलक्ष्मी, आंध्रप्रदेश, १७ वे शतक

गणेशदीप, नेपाळ, १८ वे शतक.कमलदीप, नेपाळ, १७ वे शतक.वैष्णवदीप, द. भारत, १७ वे शतक.स्थानिक बनावटीचा टांगता दिवा, ओरीसा