कुऱ्हाड: झाडे तोडण्याचे, लाकूड फोडण्याचे, तासण्याचे किंवा ढलप्या काढण्याचे फार पुरातन कालापासून वापरात असलेले एक साधन. रोमन कालात आणि नंतरही कित्येक शतके निरनिराळ्या आकाराच्या एकधारी किंवा दुधारी कुऱ्हाडींचा युद्धातील एक शस्त्र म्हणून उपयोग करण्यात येत असे. भारतात कुऱ्हाडीचा (परशूचा) वापर होत असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. काही पुरातन देवदेवतांच्या मूर्तींच्या हातात परशू असलेला आढळतो. शेतकऱ्याच्या आवश्यक अवजारांपैकी कुऱ्हाड हे एक महत्त्वाचे व हरकामी साधन आहे.

फार पुरातन कालापासून कुऱ्हाडीचा अनेक तऱ्हेने उपयोग केला जात असल्यामुळे तिच्यात काही दैवी गुण आहेत, त्याचप्रमाणे रोग बरे करण्याचेही सामर्थ्य तिच्यात आहे अशा काही समजुती लोकात रूढ होत्या.

इतिहासपूर्व कालातील अश्मयुगात आदिमानव कच्चे मांस तोडण्यासाठी, कातडी मांसापासून वेगळी करण्यासाठी गारगोटीसारख्या कठीण दगडाची एका टोकास निमुळती असलेली कुऱ्हाड वापरीत असत. ह्या कुऱ्हाडीवजा दगडास दांडा नसे, ती कुऱ्हाड हातांनीच धरून कोणतीही वस्तू तोडण्याचे, कुटण्याचे किंवा तासण्याचे काम करीत असत. अश्मयुगाच्या अखेरी अखेरीस लाकडी दांड्याच्या एका टोकाला भोक पाडून त्यात कुऱ्हाडवजा दगड घट्ट बसवून कुऱ्हाडी वापरत. ब्राँझ युगात दगडाऐवजी काशाच्या कुऱ्हाडी बनविण्यात आल्या. काशाच्या जाड तुकड्याची एक बाजू चपटी करून ती धारदार करत व दुसऱ्या जाड भागात भोक पाडून त्यात लाकडी दांडा बसवीत. निरनिराळ्या धातूंच्या शोधानंतर कुऱ्हाड लोखंडाची बनविण्यात येऊ लागली. पुढे लोखंडाऐवजी पोलाद वापरण्यात येऊ लागले व कुऱ्हाडीला निरनिराळे आकार देण्यात येऊ लागले. दुधारी कुऱ्हाडीत दोन्ही निमुळत्या आणि चपट्या बाजूंना धारदार पाती ठेवून मधल्या जाड भागातील भोकातून कठीण लाकडाचा किंवा धातूचा दांडा बसवीत असत.

अश्मयुगीन ते आतापर्यंत वापरात असलेल्या विविध कुऱ्हाडी : (१) पुराणाश्मयुगीन फ्लिंटची कुऱ्हाड, (२) नवाश्मयुगातील दगडी कुऱ्हाड, (३) विसाव्या शतकातील ऑस्ट्रेलियातील रानटी लोकांची कुऱ्हाड, (४) इ. स. पू. २०००-१३०० काळातील ईजिप्तमधील युद्ध-कुऱ्हाड (ब्राँझयुगीन), (५) रोमन कारागिरी दाखविणारी इ. स. पू. तिसऱ्या शतकातील ब्राँझयुगीन कुऱ्हाड, (६) स्वित्झर्लंडमधील ला टीनी संस्कृती दाखविणारी तोंड असलेली व लाकडी दांडायुक्त कुऱ्हाड, (७) सातव्या शतकातील उत्तर फ्रान्समधूल युद्ध-कुऱ्हाड, (८) व्हायकिंग पद्धतीची कुऱ्हाड, (९) वसाहतीच्या काळातील रुंद पात्याची अमेरिकन कुऱ्हाड, (१०) आधुनिक दुधारी पोलादी कुऱ्हाड, (११) प्रचलित भारतीय कुऱ्हाड : (अ) फांद्या तोडण्याची कुऱ्हाड, (आ) लाकूड फोडण्याची कुऱ्हाड, (इ) फरशी (परशू), (ई) वाकस (सुताराची कुऱ्हाड)

पूर्वीच्या हातघाईच्या लढाईत रुंद व धारदाक पात्याची कुऱ्हाड म्हणजे एक प्रभावी हत्यार असे, तसेच अधिकारदर्शक चिन्ह म्हणूनही कुऱ्हाडीचा उपयोग करीत असत. त्यामुळे त्याकाळी कुऱ्हाडीला लष्करी व शासकीय महत्त्व प्राप्त झालेले होते.

कुऱ्हाडीचे बहुविध उपयोग आहेत. गरजेनुसार तिच्या आकारात व जडपणात बदल करतात. झाडे तोडण्यासाठी वापरावयाची कुऱ्हाड हलकी, लांब व बाकदार पात्याची असते, तर लाकूड फोडण्यास वापरावयाची कुऱ्हाड जड, लांब व आखूड पात्याची असते व पात्याची धार दांड्याला समांतर असते. लाकूड तासण्यासाठी किंवा छिलण्यासाठी लागणारी सुताराची कुऱ्हाड (वाकस) रुंद पात्याची, हलकी व पात्याची धार दांड्याला लंब अशी असते. तिने लाकूड तासता येते पण फोडता किंवा तोडता येत नाही. कुऱ्हाडीने झाड तोडणे ही एक कला आहे. काही देशांत अजूनही झाडे तोडण्याच्या स्पर्धा खेळल्या जातात.

टोळे, मा. ग.