प्रशीतन : (रेफ्रिजरेशन). एखाद्या बंदिस्त जागेचे किंवा भागाचे भोवतालच्या परिसरातील तापमानापेक्षा कमी तापमान करून ते तसेच कमी राखण्याच्या प्रक्रियेला प्रशीतन असे म्हणतात. ⇨ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे थंड साठ्यापासून उष्ण साठ्याकडे उष्णतेचे संक्रमण सर्वस्वी बाहेरून पुरविलेल्या कार्याच्या मदतीनेच होऊ शकते. उष्ण साठ्याकडून थंड साठ्याकडे मात्र उष्णतेचे संक्रमण होण्यास बाहेरील कार्याची मदत लागत नाही. प्रशीतन प्रक्रियेमध्ये थंड केलेल्या जागेतील उष्णता शोषून घेऊन बाहेरील उष्ण परिसरात ती टाकणे जरूर असते. वर उल्लेखिलेल्या ऊष्मागतिकीच्या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे प्रशीतन प्रक्रियेमध्ये सर्व बाहेरील ऊर्जा पुरविणे जरूर असते. वर उल्लेखिलेल्या उष्मागतिकीच्या दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे प्रशीतन प्रक्रियेमध्ये सर्व बाहेरील ऊर्जा पुरविणे जरूर असते. भोवतालच्या परिसराचे तापमान थंड केलेले जागेपेक्षा जास्त असल्यामुळे प्रशीतन केलेल्या जागेच्या भोवती सभोवती उष्णता-निरोधकाचे वेष्टन असणे जरूर असते.

 

इतिहास : इ. स. १८०६ मध्ये फ्रेडरिक ट्यूडर यांनी जहाजातून नैसर्गिक बर्फ मध्य अमेरिकेतील मार्तीनीक बेटातील सेंट पीएर या बंदरात आणला. ही घटना प्रशीतनाची सुरुवात म्हणता येईल. त्यानंतर त्यांनी बर्फाच्या वखारी बांधल्या व उष्णता-निरोधक लाकडाच्या भुशाच्या साहाय्याने त्यानी बर्फाचा संग्रह करून निरनिराळ्या देशांना बर्फ पुरविण्याचा धंदा सुरु केला. अशा रीतीने त्यांनी लोकांमध्ये बर्फ वापरण्याची सवय निर्माण केली. 

मोगल अमदानीत हिमालयातून बर्फ आणवून त्याचा मद्य थंड करण्याकडे उपयोग करीत असत. त्याही पूर्वी इ.स.पू. १००० च्या चिनी काव्यात बर्फाच्या घराचा उल्लेख आढळतो. ईजिप्तमधील लोक पोकळ भिंती असलेली तळघरे बांधीत व भिंतींतील पोकळीत नैसर्गिक बर्फ भरून शीतगृहे तयार करीत असत. भारतीय व ईजिप्तमधील लोक मातीची सच्छिद्र भांडी गार हवेवर ठेवून त्यांच्या साहाय्याने पेये थंड करीत असते. ग्रीक, रोमन व चिनी लोकही याच पद्धती वापरीत असत. कृत्रिम पद्धतीने प्रथम १८७६ च्या सुमाराला मोठ्या प्रमाणावर बर्फ तयार करण्यात आला. [⟶बर्फ]. 

पहिली प्रशीतन यंत्रे १८३४ मध्ये एल्. डब्ल्यू. राइट, जे. पर्किन्स व पी. स्माइथ यांनी एकाच वेळी पण निरनिराळ्या ठिकाणी तयार करण्यास प्रारंभ केला. राइट यांचे यंत्र हवा-संपीडनाच्या (दाबण्याच्या) तत्त्वावर आधारलेले होते व ते पाण्यापासून बर्फ तयार करण्यासाठी वापरण्यात येत होते. बाकीच्या दोघांची यंत्रे अनुक्रमे बाष्पनशील द्रवाचे प्रसरण व संपीडित हवा या तत्त्वांवर आधारलेली होती. १८४९ मध्ये अमेरिकेतील जॉन गॉरी यांनी थंड हवा प्रशीतन यंत्र शोधून काढले व त्याचा गोठविलेल्या मांसाच्या धंद्यात प्रथमच व्यापारी प्रमाणावर उपयोग करण्यात आला. कालांतराने वरील तत्त्वांवरच आधारलेली कित्येक नवीन यंत्रे बाजारात आली तसेच या तत्त्वांचा बर्फाच्या उत्पादनाखेरीज इतर उत्पादन क्षेत्रांत हळूहळू विस्तार करण्यात आला. या यंत्रात हवेच्या ऐवजी इतर वायूंचा इच्छित नीच तापमान मिळविण्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमोनिया वायू या कामासाठी १८७४ मध्ये वापरण्यात आला. अल्कोहॉलयुक्त पेये व पॅराफीन यांच्या उत्पादनात उपयोगी पडेल असे प्रशीतन संयंत्र ऑस्ट्रेलियातील जेम्स हॅरिसन यांनी तयार केले. १८६७ मध्ये अमेरिकेत प्रशीतित रेल्वे डब्यांचा उपयोग करण्यात आला. हॅरिसन व टी. एस्. मार्ट यांनी ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला गोठवलेले मांस प्रशीतन यंत्रे बसविलेल्या जहाजांतून पाठविण्याचा प्रयत्न केला परंतु वाटेतच ही यंत्रे बंद पडल्याने हा प्रयत्न फसला. त्यानंतर १८७७ मध्ये अमोनिया-संपीडन पद्धतीची प्रशीतन यंत्रे बसविलेल्या जहाजातून गोठविलेले मांस पाठविण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे यशस्वी झाला. 

हल्ली प्रशीतनाचा एक स्वतंत्र उद्योगच झाला आहे. प्रशीतनाचा उपयोग अन्नपदार्थ चांगल्या स्थितीत टिकवून व साठवून ठेवण्यासाठी, निरनिराळ्या उद्योगधंद्यांत ⇨वातानुकूलन करण्यासाठी व घरगुती कामासाठी इतक्या विस्तृत प्रमाणावर केला जातो की, आधुनिक जीवनाचे प्रशीतन हे एक महत्त्वाचे अंग बनले आहे. 

प्रक्रिया : सुरुवातीच्या काळात प्रशीतन बर्फाच्या साहाय्याने करीत असत. या पद्धतीत एका उष्णता-निरोधक पेटीत बर्फ ठेवीत असत. तो बर्फ पेटीतील उष्णता शोषून घेत असे व त्यामुळे पेटीतील तापमान कमी होत असे. या पद्धतीत बर्फाच्या वितळबिंदूपेक्षा तापमान कमी करता येत नाही व प्रशीतन प्रक्रियेच्या वेगावर नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणून नंतर प्रचारात आलेल्या यांत्रिक प्रशीतन पद्धतीमध्ये द्रवाच्या बाष्पीभवन क्रियेचा उपयोग प्रशीतनात केला गेला व आजही केला जात आहे. द्रवाचे बाष्पीभवन होत असताना त्यास उष्णतेची जरूरी असते व ती उष्णता तो द्रव आजूबाजूच्या परिसरातून शोषून घेतो. रोजच्या व्यवहारात वापरात असलेल्या मातीच्या सच्छिद्र भांड्यातील पाण्याचे बाष्पीभवन होत असताना त्यासाठी लागणारी उष्णता भांड्यातील पाण्यातूनच शोषली जात असल्यामुळे त्यातील पाणी थंड होते. आधुनिक प्रशीतन पद्धतीतही बाष्पीभवनाच्या या गुणधर्माचा उपयोग केलेला आहे. 

यांत्रिक प्रशीतन प्रक्रिया :द्रव व द्रवाचे बाष्प यांचा उपयोग करतात म्हणून प्रशीतनाचा विचार करण्यापूर्वी द्रव व बाष्प यांचे गुणधर्म समजावून घेणे आवश्यक आहे. द्रव तापविल्यास त्याचे तापमान वाढत जाते. एका विशिष्ट तापमानाला बाष्पीभवन सुरु होते व संपूर्ण द्रवाचे बाष्पीभवन होईपर्यंत तापमान वाढत नाही. तापमान वाढत नसल्यामुळे बाष्पीभवनाला लागणाऱ्या या उष्णतेला‘सुप्त उष्णता’ म्हणतात व या स्थिर तापमानाला ‘संपृक्तता तापमान’ म्हणतात. संपृक्तता तापमान द्रवावरील दाबावर अवलंबून असते. दाब वाढविल्यास संपृक्तता तापमान वाढते व दाब कमी केल्यास ते कमी होते. बाष्पीभवन पूर्ण झाल्यावर दाब कायम ठेवून उष्णता दिल्यास तापमान वाढू लागते व बाष्प ‘अधितापित’ होते. याविरुद्ध क्रिया उष्णता काढून घेतल्यास होते. प्रथमतः अधितापित बाष्पाचे तापमान कमी होते. संपृक्तता तापमान आल्यावर संपूर्ण बाष्पाचे द्रवीभवन होईपर्यंत तापमान स्थिर राहते. बाष्पातील सुप्त उष्णता काढून घेतल्यावर सर्व बाष्पाचा द्रव होतो. त्यानंतर उष्णता काढून घेतल्यास द्रवाचे तापमान कमी होते. द्रवाचे तापमान स्थिर ठेवून त्यावरील दाब कमी केल्यास बाष्पीभवन होते. कारण कमी दाबाला संबंधित संपृक्तता तापमान कमी असते व द्रवाचे तापमान त्याहून जास्तअसते. बाष्पीभवनाकरिता लागणारी सुप्त उष्णता, बाहेरून न पुरविल्यास, ही लागणारी उष्णता द्रवामधून किंवा आजूबाजूच्या परिसरातून घेतली जाते. परिसर उष्णता-निरोधकाने वेष्टित व बंदिस्त असेल, तर त्याचे तापमान कमी होते. या गुणधर्माचा प्रशीतनामध्ये उपयोग केलेला असतो. प्रशीतनाकरिता वापरलेल्या द्रवाला किंवा बाष्पाला प्रशीतनक म्हणतात. 


आधुनिक यांत्रिक प्रशीतन पद्धती साधारणपणे पुढील दोन प्रकारच्या असतात : (१) बाष्प-संपीडन पद्धती (संपीडन म्हणजे दाब देऊन आकारमान लहान करणे) व (२) बाष्प-शोषण पद्धती. या दोन्ही पद्धतींचे विवरण रेखाकृतींच्या साहाय्याने खाली केलेले आहे.  

 

बाष्प-संपीडन पद्धती : या पद्धतीतील मुख्य विभाग आ. १ मध्ये दाखविले आहेत व या विभागांचे वर्णन खाली दिले आहे. 

(१) द्रव प्रशीतनक टाकी :या टाकीमध्ये प्रशीतनक द्रवरूपात साठविला जातो. (२) द्रव नलिका : टाकीमधून नियंत्रक झडपेकडे प्रशीतनक या नलिकेतून नेला जातो. (३) प्रशीतनक नियंत्रक झडप : टाकीतून बाष्पकारकाकडे जाणाऱ्या प्रशीतनकाच्या पुरवठ्याचे नियंत्रण या झडपेमुळे होते, तसेच द्रवावरील दाब कमी करण्यासाठी झडपेचा उपयोग करतात. (४) बाष्पकारक : हा धातूच्या नळीचा बनविलेला असतो. नळीची वेटोळी प्रशीतन करावयाच्या जागेच्या भोवताली बसविलेली असतात. बाष्पकारकातील दाब द्रव प्रशीतनकाच्या टाकीपेक्षा कमी असतो. प्रशीतनक बाष्परुपात असतो. (५) शोषण नलिका : बाष्पकारक व संपीडक यांना जोडणारी नळी. या नळीमध्ये प्रशीतनक बाष्परूपात असतो व त्यावरील दाब कमी असतो.

आ. १. बाष्प-संपीडन पद्धती : (१) द्रव प्रशीतनक टाकी, (२) द्रव नलिका, (३) प्रशीतनक नियंत्रक झडप, (४) बाष्पकारक, (५) शोषण नलिका, (६) संपीडक, (७) उष्ण नलिका, (८) संघनक, (९) प्रशीतित भाग, (१०) उष्णता-निरोधक

बाष्पाचे तापमान हे संपृक्तता तापमानाइतके किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असू शकते. (६) संपीडक : कमी दाबाचा बाष्परूप प्रशीतनक शोषून घेऊन त्यावरील दाब वाढविण्याचे कार्य संपीडकाचे असते. संपीडक विद्युत् चलित्र (मोटर) किंवा वाफ अथवा तेल यावर चालणारे एंजिन यांच्या साहाय्याने चालविला जातो. प्रशीतन प्रक्रियेत लागणारी बाहेरची ऊर्जा या ठिकाणी दिली जाते. (७) उष्ण नलिका : ह्या नलिकेत प्रशीतनक बाष्प जास्त दाबाचे व जास्त तापमानाचे असते. (८) संघनक : यात बाष्परूप प्रशीतनकामधून उष्णता काढून घेऊन त्याचे द्रवात रूपांतर करण्याचे कार्य होते. संघनकात धातूच्या नळीची वेटोळी वापरतात व ही वेटोळी हवेच्या वा पाण्याच्या प्रवाहाच्या साहाय्याने थंड केली जातात. संघनकातून उष्णता परिसरात टाकली जाते. म्हणजे बाष्परूप प्रशीतनकाचे तापमान परिसरीय तापमानापेक्षा जास्त पाहिजे, तसेच प्रशीतनकाचे द्रवात रूपांतर करण्यास संघनकातील दाबाला संबंधित संपृक्तता तापमान परिसरीय तापमानापेक्षा जास्त पाहिजे. 

यांत्रिक प्रशीतन प्रक्रियेमध्ये प्रशीतनकात होणारे बदल आवर्ती असतात व प्रत्येक आवर्तनात उष्णता काढून घेतली जाते. अमोनिया प्रशीतनक म्हणून वापरून त्यात प्रशीतन प्रक्रियेत कसकसे बदल होतात त्याचे वर्णन येथे केले आहे. या प्रक्रियेत निर्जल अमोनिया वापरतात. द्रव अमोनिया टाकीमध्ये १४·८४ किग्रॅ./सेंमी. या दाबाखाली साठविलेला आहे असे समजू. त्याचे तापमान ३८° से. आहे. टाकीमधून द्रव अमोनिया नियंत्रक झडपेमध्ये जातो त्या ठिकाणी त्यावरील दाब २·७० किग्रॅ./सेंमी. इतका कमी केला जातो. या नवीन दाबाला संबंधित संपृक्तता तापमान – १२° से. असते. बाष्पीभवनाला लागणारी सुप्त उष्णता प्रशीतन करावयाच्या भागातून घेतली जाऊन त्याचे तापमान साधारण – ९° से.पर्यंत होईल. संपीडकामध्ये बाष्परूप अमोनियावरील दाब वाढवून पुन्हा १४·८४ किग्रॅ./सेंमी. पर्यंत केला जातो. बाष्परूप अमोनियाचे संपीडकामधून बाहेर पडतानाचे तापमान साधारण ११०° से.पर्यंत असेल. परिसरातील हवेच्या साहाय्याने किंवा पाण्याच्या साहाय्याने संघनकात बाष्परूप अमोनियातील उष्णता काढून घेऊन त्याचे ३८° से. तापमान द्रवरुप अमोनियात रुपांतर केले जाते. संघनकातून द्रव अमोनिया परत टाकीमध्ये येतो व अशा तऱ्हेने आवर्तन पूर्ण होते. प्रत्येक आवर्तनात याच क्रिया घडतात व प्रशीतन करावयाच्या भागातील उष्णता काढून घेतली जाते. त्यामुळे प्रशीतित भागाचे तापमान परिसरीय तापमानापेक्षा कमी ठेवता येते. प्रशीतनकावर रासायनिक विक्रिया न होता किंवा त्याच्या राशीत घट न येता तो पुनःपुन्हा वापरला जातो. या प्रक्रियेची कार्यक्षमता वाढविण्याकरिता टाकी व नियंत्रक झडप यांच्या मधे एक उपसंघनक वापरतात. टाकीतून नियंत्रक झडपेकडे जाणाऱ्या द्रव अमोनियाचे तापमान संपृक्तता तापमानापेक्षा म्हणजे ३८° से. पेक्षा कमी केले जाते. त्याकरिता बाष्पकारकातून बाहेत येणारा बाष्परुप अमोनिया प्रथम उपसंघनकामध्ये द्रव अमोनिया थंड करण्याकरिता वापरतात व त्यानंतर तो संपीडकाच्या शोषण नलिकेत जातो. बाष्परूप अमोनियाचे तापमान – ९° से. असते व द्रव अमोनियाचे तापमान ३८° से. असल्यामुळे द्रव अमोनियाचे तापमान कमी करता येते. अशा तऱ्हेने संपृक्तता तापमानापेक्षा कमी तापमान असलेला द्रव अमोनिया वापरून कार्यक्षमतेत ५% पर्यंत वाढ होऊ शकते. प्रशीतित भागामध्ये तापनियंत्रकांचा उपयोग करून प्रशीतनकाच्या नियंत्रण झडपेची उघडझाप करता येते किंवा संपीडक बंद किंवा चालू करता येतो. प्रशीतनकाचा प्रवाह कमी झाल्यास प्रशीतित जागेचे तापमान वाढते व जास्त झाल्यास तापमान कमी होते. संपीडक बंद झाल्यास प्रशीतनकाचा प्रवाह बंद होतो व प्रशीतित जागेचे तापमान वाढते. संपीडक चालू असताना तापमान कमी होते. अशा तऱ्हेने प्रशीतित जागेचे तापमान पाहिजे त्या मर्यादेत स्थिर ठेवता येते. 

बाष्प-संपीडन पद्धतीत वापरण्यात येणारे संपीडक दोन प्रकारचे असतात : (१) पश्चाग्र गतीचा (दट्ट्या सिलिंडरात मागेपुढे होणारा) व (२) घूर्णक (परिभ्रमी) गतीचा. संपीडकाचा प्रदान दाब व शोषण दाब यांचे गुणोत्तर जास्त असल्यास अनेक टप्प्यांमध्ये दाब वाढविला जातो. त्यामुळे संपीडनाला लागणारी कार्यशक्ती कमी लागते व एकूण प्रशीतन प्रक्रियेची कार्यक्षमता वाढते. संपीडक चालविण्याकरिता विद्युत् चलित्र, वाफ टरबाइन किंवा तेलावर चालणारे एंजिन यांचा उपयोग करतात. घरगुती प्रशीतकामध्ये साधारणतः ९० वॉट शक्तीचे विद्युत् चलित्र वापरतात. मोठ्यात मोठा संपीडक चालविण्याकरिता ३,००० किवॉ. शक्तीचे चलित्र लागते. लहान संपीडकाच्या बाबतीत संपीडक वचलित्र एकाच पेटीत सीलबंद केलेले असते. मोठ्या संपीडकाच्या बाबतीत संपीडक आणि चलित्र अलग असतात. [⟶ संपीडक]. 


 बाष्प-शोषण पद्धती : स्वीडनमधील बाल्टझर फोन प्लॅटेन व कार्ल मुंटर्स या दोन अभियंत्यांनी १९२५ मध्ये केलेल्या संशोधनावर आधारलेल्या बाष्प-शोषण पद्धतीवर चालणारा घरगुती प्रशीतक ‘इलेक्ट्रोलक्स’ या 

आ. २. बाष्प-शोषण पद्धती : (१) द्रव प्रशीतनक टाकी, (२) उष्णता-विनिमयक, (३) प्रशीतनक नियंत्रक झडप, (४) बाष्पकारक, (५) प्रशीतनक शोषक, (६) पंप, (७) उष्णता-विनिमयक, (८) बाष्पजनक, (९) द्रावक तापक, (१०) वाफ विलगीकारक, (११) संघनक.

नावाने प्रथम तयार करण्यात आला. या पद्धतीतील मुख्य विभाग रेखाचित्ररूपाने आ. २ मध्ये दाखविले आहेत व या विभागांचे वर्णन खाली दिले आहे.

(१) द्रव प्रशीतनक टाकी : ही प्रशीतनक द्रव स्वरूपात साठविण्याकरिता वापरतात. (२) उष्णता-विनियमक : (दोन द्रायू–द्रव किंवा वायू–एकमेंकापासून अलग ठेवून अधिक तापमानाच्या द्रायूतील उष्णतेने कमी तापमानाच्या द्रायूला तापविण्याचे साधन). हा दंडगोलाकार बंद टाकी व त्यात बसविलेली धातूच्या नळ्यांची वेटोळी अशा तऱ्हेने बनविलेला असतो. धातूच्या नळ्यांच्या वेटोळ्यांतून द्रव प्रशीतनक असतो व या वेटोळ्यांच्या बाहेरील बाजूस टाकीत बाष्परूप प्रशीतनक असतो. बाष्पकारकातील बाष्परूप प्रशीतनकाचे तापमान टाकीतून येणाऱ्या द्रव प्रशीतनकाच्या तापमानापेक्षा कमी असते. त्यामुळे द्रव प्रशीतनकाचे तापमान संपृक्तता तापमानापेक्षा कमी होते व कार्यक्षमतेत वाढ होते. (३) प्रशीतनक नियंत्रक झडप : या झडपेमुळे बाष्पकारकात जाणाऱ्या द्रव प्रशीतनकाचे नियंत्रण केले जाते, तसेच त्यावरील दाब कमी केला जातो. (४) बाष्पकारक : द्रव प्रशीतनकावरील दाब कमी झाल्यामुळे प्रशीतनकाचे बाषीभवन होते. या बाष्पकारकाची रचना व कार्य बाष्प-संपीडन पद्धतीतील बाष्पकारकासारखीच असते. या ठिकाणी परिसरातील उष्णता काढून घेतली जाते. (५) प्रशीतनक शोषक : याची रचना बंद टाकीसारखी असते. बाष्परूप प्रशीतनक या टाकीत असलेल्या द्रवात शोषिला जातो आणि प्रशीतनकाचे प्रबल (शोषलेल्या प्रशीतनकाचे प्रमाण उच्च असलेले) द्रावण तयार होते. शोषण क्रियेमध्ये उष्णता उत्पन्न होते म्हणून द्रावण थंड करण्याकरिता धातूच्या नळीची वेटोळी शोषकात बसविलेली असतात व त्यांतून पाणी खेळते ठेवलेले असते. (६) पंप : शोषकातील द्रावण तापकात टाकण्याकरिता व त्यावरील दाब वाढविण्याकरिता हा वापरतात. (७) उष्णता-विनिमयक : याची रचना (२) मध्ये दर्शविलेल्या उष्णता-विनिमयकासारखीच असते. नळ्यांमधून प्रबल द्रावण असते व बाहेरच्या बाजूने तापकातून येणारे दुर्बल (शोषलेल्या प्रशीतनकाचे प्रमाण कमी असलेले) द्रावण असते. दुर्बल द्रावण प्रबल द्रावणापेक्षा जास्त उष्ण असल्यामुळे प्रबल द्रावणाचे तापमान वाढते. म्हणून तापकात द्यावी लागणारी उष्णता तेवढीच कमी लागते. (८) बाष्पजनक : यात दंडगोलाकृती टाकीमध्ये धातूच्या नळीची वेटोळी असतात. प्रबल द्रावण वाफेच्या साहाय्याने यात तापविले जाते व द्रावणातील प्रशीतनकाचे बाष्प बनते. दुर्बल द्रावण टाकीमध्ये राहते. नळीच्या वेटोळ्यांमधून वाफ खेळती ठेवतात व त्यामुळे द्रावणाला उष्णता मिळते. (९) द्रावण तापक : प्रबल द्रावणाचा प्रवाह वरून खाली येत असतो व तापकातील बाष्परूप प्रशीतनक खालून वरती जात असतो. त्यामुळे प्रबल द्रावण तापते व बाष्परूप प्रशीतनक थंड होतो. (१०) वाफ विलगीकारक : याची रचना उष्णता-विनिमयकासारखीच असते. नळ्यांमधून बाष्परूप प्रशीतनक व बाहेर खेळते पाणी असते. बाष्परूप प्रशीतनक थंड केला जातो व त्यातील पाण्याची वाफ संघनित (पाण्यात रुपांतरित) होते. त्यामुळे प्रशीतनकाचे निर्जलीकरण होते. (११) संघनक : याची रचना व कार्य बाष्प-संपीडनातील संघनकाप्रमाणेच असते.  

बाष्प-शोषण पद्धतीमध्ये दोन द्रव वापरतात. एक द्रव प्रशीतनक म्हणून व दुसरा द्रव शोषक म्हणून वापरतात. बहुतांशी अमोनिया प्रशीतनक व पाणी शोषक म्हणून वापरतात. अमोनिया व पाणी ह्या द्रवांचा उपयोग करून बाष्प-शोषण पद्धतीमध्ये प्रशीतन पुढीलप्रमाणे होते एका प्रारूपिक (नमुनेदार) प्रशीतन प्रक्रियेतील विविध विभागांतील दाब व तापमान उदाहरणादाखल दिले आहेत. ज्या टाकीमध्ये द्रव अमोनिया साठविलेला असतो तेथील दाब १२ किग्रॅ./सेंमी. व तापमान ३१° से. असते. द्रव अमोनिया उष्णता-विनिमयकमधून (२) थंड होऊन प्रशीतनक नियंत्रक झडपेकडे (३) जातो त्या ठिकाणी त्यावरील दाब २·४३ किग्रॅ./सेंमी. पर्यंत कमी केला जातो. बाष्पकारकातून बाष्पीभवनाकरिता लागणारी उष्णता काढून घेतली जाते. बाष्पकारक उष्णता-निरोशकाने वेष्टित व बंदिस्त जागेत असतो. त्यामुळे त्या बंदिस्त जागेतील तापमान–२३° से. पर्यंत कमी होते. बाष्परूप अमोनिया उष्णता-विनिमयकामधून प्रशीतनक शोषकामध्ये (५) जातो. त्यामध्ये तापकामधून आलेले दुर्बल द्रावण असते. बाष्परूप अमोनिया दुर्बल द्रावणात शोषून घेतला जातो व अमोनियाचे पाण्यामध्ये प्रबल द्रावण बनते. प्रबल द्रावण पंपाच्या साहाय्याने उष्णता-विनिमयक (७) व द्रावण तापक (९) यांमधून प्रशीतनक बाष्पजनकामध्ये (८) जातो. उष्णता-विनिमयकामध्ये प्रबल द्रावणाचे तापमान वाढते. प्रशीतनक बाष्पजनकामध्ये प्रबल द्रावण वरून खाली येत असते. बाष्पजनकातील द्रावण वाफेच्या साहाय्याने तापविल्यामुळे त्यातील अमोनिया बाष्परूपात वर जात असतो. अशा तऱ्हेने प्रबल द्रावण व बाष्परूप अमोनिया यांचे मिश्रण होऊन द्रावण तापते व बाष्प थंड होते. अमोनियाचे बाष्पीभवन होत असताना त्याबरोबर पाण्याची वाफही होत असते. वर दिलेल्या प्रक्रियेत पाण्याच्या वाफेचे संघनन होते. बाष्पजनकामध्ये द्रावणातील अमोनियाचे बाष्प निघून गेल्यावर दुर्बल द्रावण शिल्लक राहते. हे दुर्बल द्रावण (७) या उष्णता-विनिमयकामधून प्रशीतनक शोषकामध्ये परत जाते. बाष्पजनकामध्ये दाब १२ किग्रॅ./सेंमी. व तापमान ९४° से. इतके असते. यांत्रिक प्रशीतन प्रक्रियेला बाहेरुन द्यावी लागणारी उष्णता किंवा ऊर्जा बाष्पजनकामध्ये दिली जाते. कारखान्यातील प्रक्रियेतील उप-उत्पादन म्हणून उपलब्ध असलेली वाफ साधारणपणे द्रावण तापविण्यास वापरतात. विजेचा किंवा तेलाचा उपयोगही द्रावण तापविण्यासाठी करतात. बाष्पजनकामधून बाष्परूप अमोनिया वाफ विलगीकारकात जातो. ह्या ठिकाणी खेळत्या पाण्याच्या साहाय्याने बाष्परूप अमोनिया थंड केला जातो. त्यात बाष्पजनकामधून आलेली पाण्याची वाफ संघनित होते व बाष्पजनकामध्ये परत जाते. वाफ विलगीकारकातून बाहेत पडणारा  बाष्परूप अमोनिया जवळजवळ निर्जल असतो. निर्जल बाष्परूप अमोनिया संघनकामध्ये पाण्याच्या किंवा हवेच्या साहाय्याने थंड केला जातो. त्यातील उष्णता काढून घेतल्यामुळे तो द्रवरूप बनतो. संघनकामधून द्रव अमोनिया टाकीमध्ये परत येतो त्या वेळी त्यावरील दाब व तापमान पूर्ववत म्हणजे १२ किग्रॅ./सेंमी. व ३१° से. झालेले असतात. अशा प्रकारे प्रक्रियेचे आवर्तन पूर्ण होते. ह्या प्रक्रियेतही प्रशीतनकाच्या राशीत घट होत नाही किंवा त्यावर रासायनिक विक्रियाही होत नाही. बाष्प-संपीडन पद्धतीतील संपीडकापेक्षा बाष्प-शोषण पद्धतीतील पंप हा लहान आकारमानाचा असतो. याचे कारण संपीडकात बाषरूप प्रशीतनकाचा दाब वाढवावयाचा असतो, तर पंपामध्ये द्रवाचा दाब वाढवावयाचा असतो आणि बाष्पाचे घनफळ द्रवाच्या घनफळापेक्षा कितीतरी पटींनी मोठे असते.


बाष्प-संपीडन किंवा बाष्प-शोषण या पद्धतीत प्रशीतनकाच्या द्रव व बाष्प या दोन अवस्थांचा उपयोग प्रशीतन प्रक्रियेमध्ये केलेला आहे परंतु नुसती हवा वापरून तिच्या एका अवस्थेचाच उपयोग प्रशीतन करण्याकरिता करता येतो. विमानातील माणसे बसण्याची जागा वातानुकूलित करण्याकरिता याचा उपयोग करतात. [→ वातानुकूलन].

ऊष्माविद्युत्प्रशीतन:दोन भिन्न धातूंच्या तारांची दोन्ही टोके एकमेकांस जोडून एका संधीतून विद्युत् प्रवाह सुरू केल्यास दुसऱ्या संधीपाशी उष्णता शोषून घेतली जाते. या आविष्काराचा शोध जे. सी. ए. पेल्त्ये (१७८५-१८४५) या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी लावला म्हणून त्याला ‘पेल्त्ये परिणाम’ म्हणतात. [→ विद्युत्]. १९४० सालापर्यंत या परिणामाचा उपयोग फक्त तपयुग्मे बनविण्याकरिता करीत असत. अर्धसंवाहक (ज्यांची विद्युत् संवाहकता धातू व निरोधक यांच्या दरम्यान असते अशा) पदार्थांत पेल्त्ये परिणाम प्रकर्षाने दिसून येतो. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रशीतन करण्यासाठी या परिणामाचा उपयोग करण्यासंबंधी संशोधन झाले व तदनुसार १९६३ साली घरगुती प्रशीतक तयार केला गेला. अशा प्रकारची काही विशिष्ट प्रशीतक उपकरणेही तयार करण्यात आली आहेत.

नीच तापमान प्रशीतन : आधुनिक काळात अती नीच तापमानाचा उपयोग बऱ्याच प्रक्रियांत करतात. सर्वसाधारण प्रशीतनात –७०° से. च्या खालील तापमानाची जरूरी लागत नाही परंतु ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, हीलियम इ. वायूंचा द्रवरूपात विविध उत्पादन प्रक्रिया तसेच क्षेपणास्त्रे, रॉकेट यांमध्ये उपयोग करण्यात येत आहे. याकरिता हे वायू द्रवरूपात मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. नीच तापमानाच्या मर्यादा नेेहमीच्या तापमानापेक्षा खूपच कमी असतात. −२७३°·१६ से. हे तापमान भौतिकीय निरपेक्ष शून्य असे मानतात. तेथून तापमान मोजल्यास बर्फाचे तापमान २७३°·१६ केल्व्हिन असे होते. ह्या तापक्रमावर ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन व हीलियम यांचे उकळबिंदू अनुक्रमे ९०° के., ७७° के., २०° के. व ४°·२ के. इतके आहेत. इतक्या कमी तापमानाला प्रशीतन करण्याच्या पद्धती नेहमीच्या पद्धतींपेक्षा निराळ्या असतात. [→ नीच तापमान भौतिकी केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम].

कार्यक्षमता:एखाद्या प्रशीतन पद्धतीची कार्यक्षमता तिच्यातील प्रशीतनकाच्या दर मिनिटाला उष्णता काढून घेण्याच्या क्षमतेवरून ठरवितात. एक टन (ब्रिटिश) प्रशीतनकाची उष्णता काढून घेण्याची क्षमता दर मिनिटाला २०० बी. टीएच. यू. [ब्रिटिश थर्मल युनिट → उष्णता] इतकी असते. मेट्रिक पद्धती प्रशीतनकाची दर मिनिटास उष्णता काढून घेण्याची क्षमता किलोकॅलरीमध्ये मोजतात. निरनिराळ्या प्रशीतन पद्धतींची सापेक्ष कार्यक्षमता ठरविण्याकरिता कार्यमान गुणांक वापरतात. कार्यमान गुणांक पुढील सूत्राने काढता येतो.

कार्यमान गुणांक =

प्रशीतित भागातून काढून घेतलेली उष्णता

प्रशीतन प्रक्रियेत सर्वस्वी बाहेरून दिलेली उष्णता

प्रतीशनकद्रव्ये:ही द्रव्ये वस्तूतून उष्णता काढून घेत असल्यामुळे त्यांत काही विशिष्ट भौतिक, रासायनिक व ऊष्मागतिकीय गुणधर्म असणे आवश्यक आहे. प्रशीतनाच्या निरनिराळयाा उपयोगांनुसार निरनिराळे गुणधर्म अपेक्षित असल्याने सर्व दृष्टीने आदर्श असे प्रशीतनक द्रव उपलब्ध नाही. प्रशीतनक द्रव्याची निवड करताना सुरक्षिततेचा विचार करणे आवश्यक आहे. म्हणून ते रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय (म्हणजे इतर पदार्थांशी रासायनिक विक्रिया न होणारे) असणे व विषारी नसणे जरूरीचे आहे. तसेच त्यांचा संपीडकातील वंगणावर व साठवलेल्या अंन्नपदार्थांवर दुष्परिणाम होता कामा नये. त्याचप्रमाणे प्रशीतनक द्रव्ये ज्वालाग्राही व स्फोटक असू नयेत. वरील सर्व सुरक्षिततेच्या गुणधर्मांबरोबर त्यांच्या उपयोगाचा आर्थिक दृष्ट्याही विचार करावा लागतो. त्यासाठी द्रव्याची सुप्त उष्णता जास्त असणे आवश्यक असून विशिष्ट उष्णता द्रव अवस्थेत कमी व वायू अवस्थेत जास्त असली पाहिजे. तथापि प्रशीतन यंत्राचे आकारमान, वजन व किंमत ही कमी राखण्यासाठी काही अपेक्षित गुणधर्मांकडे दुर्लक्ष करावे लागते.

सुरुवातीच्या काळात अमोनिया व कार्बन डाय-ऑक्साइड या प्रशीतनक द्रव्यांचा जास्त प्रमाणात उपयोग होत असे. नंतरच्या काळात सल्फर डाय-ऑक्साइड व मिथिल क्लोराइड (CH3Cl) या द्रव्यांचा उपयोग केला गेला. मिथिलीन क्लोराइड (CH2Cl2) याचा उपयोग प्रामुख्याने घूर्णक प्रकारच्या संपीडकाचा उपयोग करणाऱ्या प्रशीतन रचनेत करतात. १९३० सालाच्या सुमारास आणि त्यानंतरही काही काळ सल्फर डाय-ऑक्साइडाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत असे परंतु हल्ली अमोनिया सोडून व उल्लेख केलेल्या इतर द्रव्यांचा उपयोग करीत नाहीत. अमोनिया विषारी असला तरी त्याची सुप्त उष्णता जास्त असल्यामुळे अजूनही विशेषत: बर्फाच्या कारखान्यात अमोनिया वापरला जातो. हल्ली घरगुती प्रशीतकासाठी, वातानुकूलनासाठी व इतर अनेक प्रशीतन यंत्रांत फ्ल्युओरिनेटेड हायड्रोकार्बनाची संयुगे वापरली जातात. त्यांची व्यापारी नावे ⇨   फ्रिऑन व जेनेट्रॉन अशी आहेत : (१) फ्रिऑन-११ किंवा जेनेट्रॉन-११ (CCl3F), (२) फ्रिऑन-१२ किंवा जेनेट्रॉन-१२ (CCl2F2), (३) फ्रिऑन-१३ (CClF3), (४) फ्रिऑन-१४ (CF4), (५) फ्रिऑन-११४ (C2Cl2F4) वगैरे.

उपयोग:घरगुतीप्रशीतक : बाष्प-संपीडन व बाष्प-शोषण या दोन्ही पद्धती घरगुती प्रशीतकांत वापरतात. उद्योगधंद्यामध्ये वापरात येणाऱ्या प्रशीतकांपेक्षा घरगुती प्रशीतकांचे आकारमान लहान असते. म्हणून घरगुती प्रशीतकाच्या बाबतीत त्याची कार्यक्षमता कमी करूनही जास्तीत जास्त सोपी यंत्ररचना व देखभाल करण्यास सुलभ असा प्रशीतक बनविण्याची प्रवृत्ती असते. घरगुती प्रशीतक ६५ लिटरपासून ४०० लिटरपर्यंत आकारमानाचे असतात.

बाष्प-संपीडन पद्धती: या पद्धतीवर चालणारे घरगुती प्रशीतक जास्त प्रमाणात वापरात आहेत. बाष्प-संपीडन पद्धतीवर चालणारा घरगुती प्रशीतक आ. ३ मध्ये दाखविला आहे, आ. ३ व आ. १ यांतील विविध विभागांचे साम्य दिसून येईल.


आ. ३. बाष्प-संपीडन पद्धतीचा घरगुती प्रशीतक : (१) संघनक, (२) नियंत्रक झडप, (३) बाष्पकारक, (४) संपीडक, (५) तापमान नियंत्रक, (६) उष्णता-निरोधक.

(१) संघनक : लहान आकारमानाच्या तांब्याच्या नळीचे वेटोळे संघनकाकरिता वापरलेले असते. उष्णता काढून घेण्याकरिता नळीचे बाहेरील क्षेत्र वाढविण्यासाठी नळीला बाहेरून कंगोरे असतात. घरगुती प्रशीतकाच्या मागच्या बाजूस पाहिल्यास संघनकाच्या नळीचे वेटोळे दिसते. संघनकापैकी खालच्या बाजूचा नळीचा एखादा वेढा द्रव प्रशीतनकाची टाकी म्हणून वापरला जातो. या प्रशीतकामध्ये ‘आर-१२’ या नावाचे प्रशीतनक द्रव्य वापरतात. त्याचे रासायनिक नाव डायक्लोरोडायफ्ल्युओरोमिथेन (CCl2F2) आणि व्यापारी नावे फ्रिऑन-१२, जेनेट्रॉन-१२ व मॅफ्रॉन-१२ अशी आहेत. (२) नियंत्रक झडप : प्रशीतकाचे आकारमान लहान असल्यामुळे या रचनेत नेहमीसारखी झडप असत नाही. त्याएेवजी केशनलिका वापरतात. केशनलिकेचे वेज अर्धा ते एक मिमी. इतके लहान असते. त्यामुळे तिच्यातून द्रव जात असता त्यातील दाब कमी कमी होत जातो. केशनलिकेची लांबी अशा तऱ्हेने ठेवतात, की केशनलिकेतील शेवटचा दाब बाष्पकारकातील दाबाबरोबर येईल. बाष्पकारकात जाणाऱ्या प्रशीतनकाचे परिमाण बदलता येत नाही परंतु घरगुती वापराच्या प्रशीतकात परिमाण बदलण्याचा प्रसंगच येत नाही. (३) बाष्पकारक : प्रशीतकाच्या आतील भागात वरच्या बाजूला दार असलेला भाग असतो. त्या ठिकाणी बाष्पकारकाच्या नळीची वेटोळी असतात. बाष्पकारकात बर्फ तयार होऊ शकतो. प्रशीतकाच्या इतर भागांत तो होत नाही. प्रशीतकाच्या खालच्या भागात बाष्पकारक भागापेक्षा तापमान जास्त असते. त्यामुळे प्रशीतकाच्या आतील हवा फिरत राहते. (४) संपीडक : हा प्रशीतक पेटीच्या बाहेर आणि तळाला बसविलेला असतो. संपीडक व विद्युत् चलित्र एका अक्षावर बसविलेले असतात व ते पत्र्याच्या डब्यात अवात-मुद्रित (बाहेरील हवा आत शिरणार नाही अशा प्रकारे बंदिस्त) केेलेले असतात. संपीडक व विद्युत् चलित्र यांची देखभाल करावी लागत नाही व त्यांना वंगणसुद्धा घालावे लागत नाही. (५) तापमान नियंत्रक : यात भाता व केशनलिका यांचा उपयोग केलेला असतो. तापमान नियंत्रकाची तबकडी फिरवून बाष्पकारकातील तापमान विशिष्ट मर्यादेत कमीजास्त करता येते. संपीडक बंद किंवा चालू करून तापमानाचे नियंत्रण होते म्हणून संपीडक सर्व वेळ चालू ठेवलेला नसतो. प्रशीतकाच्या आतील हवेत पाण्याचे बाष्प असते तसेच आत ठेवलेल्या पदार्थांतील पाण्याचा अंश हवेत मिसळत असतो. प्रत्येक वेळी प्रशीतकाचे दार उघडल्यावर बाहेरील हवा आत जाते व अशा तऱ्हेने आतील वातावरणात पाण्याचे बाष्प शिरते. बाष्पकारकामध्ये तापमान पाण्याच्या घनीभवनाच्या बिंदूपेक्षा कमी असल्यामुळे बाष्पकारकातील नळीच्या वेटोळ्यांवर व पत्र्यावर बर्फ जमा होत राहतो. बर्फाची जाडी जास्त झाल्यास त्याचा थर उष्णता-निरोधकाचे कार्य करतो व त्यामुळे प्रशीतकाच्या आतील भागातील उष्णता काढून घेण्याचे कार्य मंदावते. तसेच संपीडक चलित्राचा कार्यभार वाढतो. म्हणून नियमितपणे बाष्पकारकातील बर्फ वितळवून टाकावा लागतो. त्याकरिता तापमान नियंत्रकाची तबकडी हे कार्य दर्शविणाऱ्या D (Defrost) या अक्षरावर ठेवावी लागते किवा बर्फ वितळेपर्यंत प्रशीतक बंद ठेवावा लागतो. काही प्रशीतकांत बाष्पकारकातील बर्फ वितळविण्याकरिता स्वयंचलित व्यवस्थाही असते. (६) उष्णता-निरोधक : बाहेरील उष्णता प्रशीतकात जाऊ नये म्हणून त्याच्या सर्व बाजूंनी व दाराला उष्णता-निरोधक द्रव्य बसविलेले असते. प्रशीतकाची पेटी दुहेरी पत्र्याची केलेली असून त्यांच्यामधील जागेमध्ये काचलोकर (तंतुरूप काचेचा पांढऱ्या लोकरीसारखा पदार्थ) भरलेली असते. बाहेरच्या बाजूला पोलादाचा पत्रा असतो. व आतल्या बाजूला पोलादाचा किंवा प्लॅस्टिकचा पत्रा असतो. दार उघडल्यावर प्रशीतकाच्या आत उजेड पडण्याकरिता विजेचा दिवा असतो. दार बंद केल्यावर दिवा आपोआप बंद होतो.

बाष्प-शोषणपद्धती: या पद्धतीवर चालणारा घरगुती प्रशीतक आ. ४ मध्ये दाखविला आहे.

आ. ४. बाष्प-शोषण पद्धतीचा घरगुती प्रशीतक : (१) संघनक, (२) नियंत्रक झडप, (३) बाष्पकारक, (४) शोषक, (५) पंप, (६) उष्णता-विनिमयक, (७) बाष्पजनक,(१) संघनक : याची रचना व कार्य बाष्प-संपीडन पद्धतीप्रमाणेच असते. या प्रशीतकात द्रव अमोनिया प्रशीतनक म्हणून वापरण्यात येतो. (२) नियंत्रक झडप : यामध्ये द्रव प्रशीतनकावरील दाब फक्त कमी होतो, त्याच्या परिमाणाचे नियंत्रण होत नाही. झडपेएेवजी दुसरी पर्यायी व्यवस्थाही असते. द्रव अमोनिया बाष्पकारकात शिरताना त्यात हायड्रोजन वायू मिसळतात. बाष्पकारकातील दाब व संघनकातील दाब सारखाच असतो परंतु हायड्रोजन मिसळल्यामुळे जॉन डाल्टन यांच्या आंशिक दाबाच्या नियमाप्रमाणे (‘वायुमिश्रणातील एखाद्या वायूचा दाब हा त्या वायूने त्याच तापमानाला मिश्रणातील एकूण वायूंच्या घनफळाइतके घनफळ व्यापल्यास त्याच्या होणाऱ्या दाबाइतका असतो’ या नियमाप्रमाणे) अमोनियाचा आंशिक दाब कमी होतो. त्यामुळे अमोनियाचे बाष्पीभवन होऊन बाष्पकारकातील जागा थंड होते. (३) बाष्पकारक : याची रचना व कार्य बाष्प-संपीडन पद्धतीप्रमाणेच असते. (४) शोषक : यात बाष्परूप अमोनिया

पाण्यामध्ये शोषून घेतला जातो परंतु हायड्रोजन शोषला जात नाही. अमोनियाचे प्रबल द्रावण बनते व हायड्रोजन पाण्यात विरघळत नसल्यामुळे हायड्रोजन टाकीत परत जातो (हायड्रोजन टाकी आकृतीत दाखविलेली नाही). (५) पंप : शोषकामधून द्रावण बाष्पजनकामध्ये घालण्याकरिता पंपाचा उपयोग करतात. (६) उष्णता-विनिमयक : हा बहुधा दोन निरनिराळ्या आकारमानांच्या नळ्या एकमेकींत बसवून बनवितात. लहान नळीतून प्रबल द्रावण व दोन नळ्यांच्या मधील कंकणाकृती जागेतून दुर्बल द्रावण असते. त्यामुळे प्रबल द्रावण तापते व दुर्बल द्रावण थंड होते. दुर्बल द्रावण शोषकात परत जाते. (७) बाष्पजनक : यातही दोन निरनिराळ्या आकारमानांच्या नळ्या समाईक अक्षावर बसवून कंकणाकृती जागा तयार केली जाते. कंकणाकृती जागा दोन्ही बाजूीं बंद करतात. प्रबल द्रावण कंकणाकृती जागेत असते. द्रावण आत येण्याकरिता आणि बाष्प बाहेर जाण्याकरिता मार्ग ठेवलेले असतात. बाष्पजनकामध्ये लागणारी उष्णता देण्याकरिता विद्युत् वा इंधन वायूची वा घासलेटाची ज्योत वापरतात. बाष्पजनकामध्ये उष्णता देण्यात आल्यामुळे प्रबल द्रावणामधून बाष्परूप अमोनिया बाहेर पडतो. बाकी राहिलेले दुर्बल द्रावण शोषकामध्ये परत येते. बाष्पकारक व संघनक यांमधील नळीच्या काही भागाचा वाफ विलगीकारक म्हणून उपयोग होतो. बाहेरील हवेमुळे नळी थंड होते व बाष्परूप अमोनियामध्ये असलेली पाण्याची वाफ संघनित होते व बाष्पजनकात परत येते. निर्जल बाष्परूप अमोनिया संघनकात जातो व तेथे त्याचे द्रवात रूपांतर होते. आकृतीत दाखविलेल्या विविध भागांच्या सापेक्ष स्थानांमध्ये योग्य बदल केल्यास पंप वापरणे टाळता येते. अशा तऱ्हेने या घरगुती प्रशीतकात एकही फिरणारा भाग राहत नाही व त्यामुळे त्यात कोणत्याही तऱ्हेचा आवाज येत नाही. विद्युत् पुरवठा नसलेल्या ठिकाणीही तो वापरणे शक्य होते कारण विद्युत् तापक काढून त्याएेवजी ज्योतीची व्यवस्था करण्यात अडचण पडत नाही.


परिवहनउद्योगधंद्यातीलप्रशीतन: खाद्यपदार्थ, फळे, भाज्या, दूध वगैरे नाशवंत पदार्थांचे परिवहन करण्याकरिता प्रशीतकांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. परिवहनाकरिता मोटारगाड्या, रेल्वेचे डबे, विमाने व जहाजे यांचा उपयोग होत असल्याने या वाहनांत प्रशीतनक यंत्रणा असावी लागते. मोटारगाड्यांमध्ये परिवहनाचे अंतर फार नसल्यास पदार्थाचे प्रथमच जास्त प्रशीतन करतात म्हणजे प्रवासात त्याचे तापमान वाढले, तरी पदार्थ खराब होत नाहीत. बर्फाच्या लाद्या किंवा चुरा मोटारगाडीच्या मागल्या बाजूच्या लहान भागात ठेवतात व आतील हवा खेळती ठेवून मोटारगाडीच्या आतील तापमान इच्छित तापमानाइतके ठेवता येते. प्रवास लांबचा असेल, तर वाटेवरच्या गावातून बर्फ घेऊन बर्फाचा साठा कायम ठेवता येतो. भारतात दुग्धव्यवसायात मोटारगाडीमध्ये दुधाच्या बरण्यांवर बर्फाच्या लाद्या ठेवून प्रशीतन करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहे. मोटारगाड्यांत बाष्प-संपीडन तत्त्वावर आधारित यांत्रिक प्रशीतन पद्धतीही वापरतात. त्यामध्ये मोटारगाडीच्या एंजिनावर किंवा तेलावर चालणारे स्वतंत्र एंजिन वापरून संपीडक चालवतात. भारतात मांसाचे पदार्थ, अंडी, दूध यांच्या वाहतुकीकरिता अशा मोटारगाड्यांचा वापर सुरु झाला आहे. द्रव नायट्रोजन किंवा शुष्क बर्फ (घन कार्बन डाय-ऑक्साइड) याच्या वाहनांच्या प्रशीतनात उपयोग करतात. रेल्वेच्या डब्यांकरिता वरीलप्रमाणेच व्यवस्था असते. मच्छिमारीकरिता वापरण्यात येणाऱ्या पडावात मासे थंड ठेवण्याकरिता बर्फाचा उपयोग करतात. जेव्हा मोठ्या जहाजाचा मच्छीमारीकरिता उपयोग करतात तेव्हा जहाजात यांत्रिक प्रशीतन पद्धती वापरतात कारण अशा जहाजात माशांचा नुसता साठाच केलेला नसतो, तर त्यांवर प्रक्रियाही करतात. अशी जहाजे समुद्रात बरेच दिवस राहत असल्यामुळे खाद्यपदार्थांचा साठा सुरक्षित ठेवण्याकरिताही प्रशीतन आवश्यक असते. मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या मालवाहू जहाजावर विविध पदार्थांकरिता अलग अलग प्रशीतित भांडारे असावी लागतात व त्याकरिता यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर लागते.

वैद्यकीय उपयोग : वैद्यकीय व्यवसायातील शास्त्रज्ञांनी फार पूर्वीपासून प्रशीतनाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांसंबंधी प्रयोग केले आहेत. जॉन गॉरी यांनी १८४४ पूर्वीच कृत्रिम रीत्या बर्फ बनवून तो पीतज्वराच्या रुग्णांसाठी वापरला, तसेच काही इतर प्रकारच्या ज्वरांत बर्फाचे व शीतगृहाचे फायदे सिद्ध केले. शस्त्रक्रियेत तर प्रशीतनाचे फारच महत्त्व आहे. हात किंवा पाय बधिर करणे प्रशीतनाने सुलभ जाते कारण कमी तापमान असताना शरीरातील चयापचयाची (सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींची) क्रिया मंद गतीने होत असल्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाला धक्का बसत नाही. तसेच जखमांतून होणारा रक्तस्रावही कमी तापमानात लवकर थांबतो. शीत स्थितीत शरीराचे काही अवयव काही काळ व्यवस्थित राहतात व नंतर ते शरीरास जोडल्यास पुन्हा कार्य करू शकतात. काही औषधे कमी तापमानात न ठेवल्यास त्यांचे औषधी गुणधर्म कमी होतात. त्यासाठी अशी औषधे प्रशीतकात ठेवणे जरूरीचे असते. वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय संशोधन संस्था, रुग्णालये अशा ठिकाणी विविध प्रकारची प्रशीतन व्यवस्था करावी लागते. विविध उपयोगांकरिता विविध प्रकारची प्रशीतन व्यवस्था करावी लागते. विविध उपयोगांकरिता विविध तापमानांची प्रशीतित उपकरणे लागतात. उदा., रक्त, रक्तद्रव (पेशीविरहित रक्ताचा द्रवभाग), व्हायरस, रोगप्रतिबंधक लसी, विकृत डोळ्यांत प्रतिरोपणाकरिता वापरण्यात येणारी डोळ्यांची स्वच्छमंडले (बुबुळांच्या पुढचे पारदर्शक भाग), ऊतके (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचे समूह), रेत इत्यादींचा सुस्थितीत साठा करण्याकरिता प्रशीतनाची आवश्यकता असते.

अन्नवअन्नपदार्थांचासाठा:मानवाच्या जीवनाला अन्न हे अत्यावश्यक असल्याने ते साठवून ठेवणे व जरूरीच्या वेळी ते वापरण्यास मिळणे महत्त्वाचे आहे. अन्नपदार्थ खराब न होण्यासाठी ते वाळवून, खारवून किंवा मसाल्यात ठेवण्याची पद्धत पुरातन कालापासून वापरली गेली असून व अजूनही वापरात आहे. हल्ली मोठ्या प्रमाणावर प्रशीतनाने अन्नपदार्थ साठवले जातात. अर्थात अन्नपदार्थांचा प्रकार, साठवण्याचा काळ, वापरण्याची पद्धत या बाबींनुसार अन्नपदार्थांचे साठवण केले जाते.

अन्नपदार्थ साठवताना ते खराब होऊ नयेत या अपेक्षेबरोबरच ते नुसते खाण्यायोग्य असून भागत नाही, तर त्या अन्नपदार्थांचा आकार, रंग, चव, त्यांतील जीवनसत्त्वे वगैरे गोष्टी जशाच्या तशा राहिल्या पाहिजेत. वास्तविक कमी तापमानाला अन्नपदार्थ खराब किंवा दूषित करणारे जीवाणू नष्ट होत नाहीत. तथापि एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन पदार्थ) व सूक्ष्मजीव यांचे कार्य मात्र शीतावस्थेत मंदावते व अन्नपदार्थ बराच काळ टिकतात. प्रत्येक पदार्थ योग्य अशा तापमानाला साठवला पाहिजे, तसेच तो ठेवण्यापूर्वी स्वच्छ केला पाहिजे. काही पदार्थ प्रशीतन यंत्रात जसेच्या तसे ठेवल्यास त्यांतील जलांश कमी होऊन त्यांचा आकार बदलतो व ते वाळल्यासारखे दिसतात आणि त्यांच्या चवीतही फरक पडतो. यासाठी असे पदार्थ बंद पिशव्यांत ठेवून मग ते थंड करावे लागतात.

काही पदार्थ जास्त तापमानाला टिकत नाहीत व त्यामुळे ते उकळून त्यांतील जलांश घालवून वाळवता येत नाहीत, असे पदार्थ अलीकडे प्रशीतन प्रक्रियेने वाळवणे शक्य झाले आहे. या प्रक्रियेला ‘निर्वात-प्रशीतन निर्जलीकरण’ असे म्हणतात. सध्या ह्या प्रक्रियेचा उपयोग औषधी शास्त्रापुरता जरी मर्यादित असला, तरी कोणत्याही पदार्थासाठी या पद्धतीचा उपयोग होऊ शकेल. या पद्धतीत कोरडा करण्याचा पदार्थ प्रथम प्रशीतन प्रक्रियेने थंड करून गोठवतात व नंतर निर्वात पंपाने त्यातील बाष्प काढतात. रक्तद्रव व पेनिसिलीन या पद्धतीने वाळवतात.


बर्फबनवणे:खाद्यपदार्थ थंड करण्यासाठी, दवाखान्यात, कारखान्यातून काही प्रक्रिया होण्यासाठी किंवा इतर अनेक कारणांसाठी हल्ली प्रशीतन यंत्र प्रत्यक्ष न वापरता तयार बर्फ वापरतात. हा बर्फ मोठ्या प्रमाणावर कारखान्यात बनविला जातो. अशा कारखान्यात मिठाचा विद्राव अंदाजे – १०° से. या तापमानाला साधारणत: अमोनियाच्या बाष्पीभवनाने थंड करतात. या विद्रावात पाणी भरलेली चौकोनी पात्रे ठेवून या विद्रावामार्फत पाण्यातील उष्णता काढून घेतली गेल्याने पाणी गोठते व बर्फ बनतो. [→ बर्फ].

इतरकाहीउपयोग:रासायनिक कारखान्यात अनेक क्रिया विशिष्ट तापमानालाच घडतात म्हणून अशा क्रियेत भाग घेणारी रसायने थंड करावी लागतात. सरकीचे तेल शीत अवस्थेत टाकीत साठवल्याने त्यातील स्टिअरीन तळाशी बसते आणि तेल व स्टिअरीन वेगळे करता येते. निरनिराळ्या वायूंचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रशीतनाने त्यांचे द्रवीकरण करतात व अशुद्ध वायू त्यांच्या द्रवीकरणानुसार वेगळे काढतात. [→ वायूंचे द्रवीकरण]. दारूगोळ्याच्या कारखान्यात लागणारे नायट्रोबेंझीन हे कमी तापमानालाच बनवावे लागत असल्याने ते बनविताना प्रशीतन प्रक्रिया आवश्यक असते.

कृत्रिम रबराच्या कारखान्यात प्रशीतन यंत्राच्या साहाय्याने ब्युटाडाइन, स्टायरीन वगैरे पदार्थ कमी तापमानालाच साठवावे लागतात. तसेच खनिज तेल परिष्करणाच्या कारखान्यातसुद्धा प्रशीतन प्रक्रिया आवश्यक असते.

औद्योगिक उत्पादन क्षेत्रात दोन सुट्या भागांची जुळणी करण्याकरिता प्रशीतनाचा उपयोग करतात. एखादे चाक आसावर बसवावयाचे असल्यास आस प्रशीतीत केल्यास त्याचे आकारमान कमी होते व तो चाकाच्या भोकामध्ये बसू शकतो. नेहमीच्या तापमानाला आसाचे आकारमान पूर्ववत होते व त्यामुळे आस व चाक यांची आकुंचन जुळणी होते. पोलादाला स्थैर्य व चिवटपणा आणण्याकरिता त्याचे द्रुत शीतन करतात व त्यासाठी वापरलेला द्रव थंड करण्याकरिता प्रशीतन प्रक्रिया वापरतात. ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंचे सुटे भाग वातावरणातील तापमानाला कालांतराने कठीण होतात परंतु प्रशीतित जागेमध्ये ते साठविल्यास त्यांचे मूळ गुणधर्म टिकतात. काँक्रीटचे मोठमोठे बंधारे बांधताना प्रशीतित काँक्रीटचा वापर करतात. सिमेंटचा बलसंयोग होताना उष्णता निर्माण होते व त्यामुळे काँक्रीटमध्ये चिरा पडतात. तसेच एका वेळी जास्त जाडीचा थर घालता येत नाही परंतु प्रशीतीत काँक्रीटचा उपयोग केल्यास काँक्रीटला चिरा पडत नाहीत. महाराष्ट्रात कोयनेवरील धरण बांधताना प्रशीतीत काँक्रीटचा वापर केला होता. दलदलीच्या जागी पाया खोदावयाचा असल्यास त्यासाठीही प्रशीतन करून आजूबाजूचा परिसर गोठवून पाया खोदण्याचे व भरण्याचे काम केले जाते.

आधुनिक यंत्रसामग्रीचा अत्यंत नीच तापमानाला उपयोग करणे आवश्यक असते. उदा., आर्क्टिक किंवा अंटार्क्टिक प्रदेशात वापरावी लागणारी यंत्रे, द्रव ऑक्सिजन, नायट्रोजन वा हीलियम साठविण्याकरिता वापरावयाची धातूची धारकपात्रे. अशा नीच तापमानाला यंत्रे निकामी होऊ नयेत म्हणून यंत्राच्या सुट्या भागांची किंवा सबंध यंत्राची  ⇨वातविवरात चाचणी घेतली जाते. अशा वेळी वातविवरात कृत्रिम वातावरण निर्माण केले जाते. त्या ठिकाणी –१९०° से. पर्यंत तापमान मिळविण्यासाठी प्रशीतन योजना करावी लागते.

भारतातीलप्रशीतनउद्योग: मोगल अमदानीत दूरवरून नैसर्गिक बर्फ आणून त्याचा मद्य थंड करण्यासाठी उपयोग करीत असत, याचा उल्लेख मागे केलाच आहे.

कलकत्त्यात १८९२ साली परदेशी यंत्रसामग्री आणून पहिले शीतगृह तयार करण्यात आले. पहिल्या महायुद्धात लष्करासाठी लागणाऱ्या नाशवंत पदार्थांसाठी अशा शीतगृहांची फारच जरूरी वाटू लागली. तथापि १९३० नंतर व्होल्टाज लि., लाइटफूट रेफ्रिजरेशन कंपनी आणि इंडस्ट्रिअल एअर कंट्रोल प्रा. लि. या काही मोठ्या कंपन्यांनी आयात केलेल्या शीतगृहसामग्रीच्या पुरवठ्यासाठी मुंबईमध्ये दुकाने काढली. दुसऱ्या महायुद्धात प्रशीतनाच्या निरनिराळ्या उपयोगांसाठी (उदा., दारूगोळ्याच्या साठ्यासाठी, अन्नपदार्थांसाठी, रक्तद्रवासाठी) अशा उपकरणांची प्रकर्षाने जरूरी वाटू लागली. त्यामुळे भारतात व्यापार करणाऱ्या उपरिनिर्ष्टि कंंपन्यांबरोबरच इतर अनेक कंपन्यांनी डायरेक्टोरेट जनरल ऑफ डिस्पोझल यांनी पुरवलेल्या वातानुकूलन व शीतगृहांकरिता लागणाऱ्या सामग्रीच्या निरनिराळ्या घटकांतून येथेच लहान प्रमाणात निर्मिती करण्यास सुरुवात केली. युद्धानंतर या कंपन्यांनी मुंबई व कलकत्ता येथे या उद्योगासाठी कायम स्वरूपाचे कारखाने सुरू केले. १९५१ सालापासून प्रशीतन व वातानुकूलनाची साधनसामग्री देशातच तयार होऊ लागली. १९५१ मध्ये घरगुती कामासाठीच उपयोगी पडणारे सु. ६०० प्रशीतक तयार करण्यात आले, तसेच परिवहनास लागणाऱ्या प्रशीतनासाठी लागणाऱ्या सामग्रीची निर्मिती लहान प्रमाणावर सुरू केली. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस म्हणजे १९५६ च्या सुमारास शीतगृहाची धारणक्षमता सु. ७७·१४५ टनांपर्यंत झाली होती. पहिल्या योजनेच्या अखेर भारतात याबाबत झालेली निर्मिती पुढीलप्रमाणे होती : घरगुती प्रशीतक ५२५ नग, खोल्यांतील वातानुकूलक २,१२२ नग आणि पाणी थंड करणारी यंत्रे ६९१ नग. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस सर्व प्रकारच्या प्रशीतनाची साधनसामग्री तयार करणारे १४ कारखाने निघाले या कारखान्यांची १३,६०० नग घरगुती प्रशीतक, ३७२ नग व्यापारी प्रशीतक २०,४७० नग खोल्यांचे वातानुकूलक व ३,९०० नग जलशीतक (पाणी थंड करणारी यंत्रे) तयार केली. घरगुती व व्यापारी प्रशीतकांच्या निर्मितीत देशी माल ९५% होता आणि खोल्यांच्या वातानुकूलकांपैकी ७८%  होता. १९६० च्या अखेरीस शीतगृहांची धारणक्षमता ३,०५,५१३ टनांपर्यंत पोहोचली. तिसऱ्या योजनेत प्रशीतनाच्या निरनिराळ्या प्रकारच्या यंत्रांची निर्मिती पुढीलप्रमाणे आयोजित केली होती : ५०,००० घरगुती प्रशीतक, ६,००० व्यापारी प्रशीतक आणि २०,००० जलशीतक. औद्योगिक प्रशीतन क्षेत्रात १८·६ कोटी रुपये किंमतीची सामग्री तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. परिवहनाच्या बाबतीत २० प्रशीतित डब्यांचे लक्ष्य ठरविण्यात आले. शीतगृहांच्या निर्मितीसाठी १७५ नवे परवाने दिले गेले त्यांपैकी १४० परवाने नवीन शीतगृहांसाठी व ३५ परवाने जुन्या शीतगृहांच्या वाढीसाठी होते. तिसऱ्या योजनेच्या अखेर मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे २१ व लहान प्रमाणावर उत्पादन करणारे अनेक कारखाने निघाले. शीतगृहांसाठी ६,८२,१०० टनांपर्यंत पल्ला गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.


 ऑगस्ट १९६७ साली शीतगृहांची संख्या ७६७ होती व त्यांची एकूण क्षमता ८,६६,४७० टनांपेक्षाही जास्त होती. यांपैकी सु. ६०% शीतगृहे प्रत्येकी १,००० टन क्षमतेची, २३% १,००० ते २,००० टन क्षमतेची व १७% २,००० टनांपेक्षा जास्त क्षमतेची होती. या शीतगृहांपैकी ६१ शीतगृहे केवळ गोठविलेल्या माशांसाठी, ३० दुग्ध पदार्थांसाठी, १२९ बहुउद्देशीय साठवणीसाठी व उरलेली बटाट्यांसाठी वापरली जात होती.

भारतात १९७० साली प्रशीतन व वातानुकूलन सामग्रीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारे २९ कारखाने होते. या कारखान्यांची राज्यवारी विभागणी पुढीलप्रमाणे होती : आंध्र प्रदेश १, दिल्ली ३, हरयाणा ४, मध्य प्रदेश १, महाराष्ट्र ११, तामिळनाडू २ व प. बंगाल ७.

मोठ्या कारखान्यांतून सर्व प्रकारच्या वातानुकूलनाची तशीच प्रशीतनाची यंत्रे बनविण्यात येत आहेत. लहान कारखान्यांतून प्रशीतनास तसेच वातानुकूलनास लागणारे लहान भाग, शीतकारक नळ्या, शीतकारक कपाटे व अशाच प्रकारचे लहान लहान भाग तयार होतात. घरगुती कामासाठी लागणारे प्रशीतक सु. ७० लिटरपासून २८० लिटरपर्यंत आकारमान असलेले तयार होत आहेत. तसेच दोन प्रकारची वातानुकूलनाची यंत्रे, बाटल्या व पाणी थंड करणारी यंत्रे तयार केली जात आहेत. ०·७५ ते २ टनांपर्यंत धारणक्षमता असलेले व्यापारी प्रशीतक तयार होत आहेत. १ एप्रिल १९७० रोजी भारतातील घरगुती प्रशीतक उत्पादनाची क्षमता उत्पादन क्षमता जवळजवळ ३९,००० होती. घरगुती प्रशीतक तयार करणारे ७ कारखाने आणि सर्व प्रकारची वातानुकूलनाची यंत्रे तयार करणारे ८ कारखाने होते.

कापड व अन्नपदार्थ या उद्योगांना लागणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील प्रशीतन सामग्रीची निर्मिती संपूर्णत: भारतात होत आहे पण इतर उद्योगांत म्हणजे कागद, रंजकद्रव्ये, रंग, सौंदर्यप्रसाधने, कातडी सामान, काच, खनिज तेल परिष्करण व अणुकेंद्रीय शक्ती यांच्या प्रशीतनाच्या गरजा अंशत:च पुरविल्या जात आहेत. १९७० मध्ये भारतात १८ कारखान्यांतून मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशीतनाच्या व वातानुकूलनाच्या यंत्रांची निर्मिती होत होती व त्या वेळी १४ कोटी रुपये किंमतीची सामग्री तयार करण्याची त्यांची क्षमता होती.

अन्नपदार्थ व त्यांच्या आनुषंगिक उद्योगांत मासे, अंडी, मांस, भाजीपाला, वगैरेंसाठी शीघ्र प्रशीतन करण्याकरिता लागणारी यंत्रे आणि शीतगृह संयंत्रे मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. बर्फ तयार करणारी संयंत्रे १२ मोठ्या कारखान्यांत आणि दूध व पेये थंड करण्याची सामग्री ५ कारखान्यांत तयार होते. यांशिवाय अन्नपदार्थ उद्योगासाठी लागणारी शीतन सामग्री पुणे, मुंबई व ग्वाल्हेर येथील एकूण ४ कारखान्यांत तयार होते.

भारतात १९६५ साली ३१,४३१ घरगुती प्रशीतक, ११,९१७ वातानुकूलक व ३,३९२ पाणी थंड करणारी यंत्रे तयार झाली. १९६९ साली घरगुती प्रशीतक व वातानुकूलक यांच्या बाबतीतील उत्पादन आकडेवारी अनुक्रमे ४८,६२५ व १९,९५० होती. १९७५ ते १९७८ या काळात प्रशीतक व वातानुकूलक यांच्या उत्पादनाची वार्षिक क्षमता अनुक्रमे ३,६५,००० व ४४,७८० होती आणि प्रत्यक्षातील उत्पादन अनुक्रमे १९७५-७६ मध्ये २५·३%  व १७·४ % १९७६-७७ मध्ये ३४·३% व ३८·३% आणि १९७७-७८ मध्ये ३८·४% व ४४·१% होते.

आयात व निर्यात : पहिल्या पंचवार्षिक योजनेत प्रशीतन यंत्रांसाठी व वातानुकूलनासाठी लागणाऱ्या सर्व घटक भागांची आयात करावी लागली. तिसऱ्या योजनेअखेर ही आयात ५-१० टक्क्यांपर्यंत खाली आली. १९७० साली घूर्णक संपीडक, फॉस्फर ब्राँझचे ओतकाम, अगंज (स्टेनलेस) पोलाद व इतर काही भाग आयात करावे लागत होते. अमेरिका, ब्रिटन, पश्चिम जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, फ्रान्स व जपान या देशांतून ही आयात करण्यात येत होती. १९६५-६६ मध्ये १·२६ कोटी रु., १९६७-६८ मध्ये २·५७ कोटी रु. व १९६९-७० मध्ये १·२८ कोटी रु. किंमतीची प्रशीतन आणि वातानुकूलन सामग्री आयात करण्यात आली. जलशीतक, घरगुती प्रशीतक, बर्फ तयार करणारी संयंत्रे यांची बहरीन, श्रीलंका, इंडोनेशिया, कुवेत, नायजेरिया, सुदान, थायलंड आणि इतर कित्येक आशियाई-आफ्रिकी देशांकडे भारतातून निर्यात होते. कुवेतमध्ये भारतीय सहकार्याने जलशीतकांचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्यात आलेला आहे. १९६५-६६ मध्ये ५·२४ लक्ष रु., १९६७-६८ मध्ये ३·४८ लक्ष रु. व १९६९-७० मध्ये ७०·७६ लक्ष रु. किंमतीची प्रशीतन व वातानुकूलन सामग्री निर्यात करण्यात आली.

पहा : बर्फ वातानुकूलन.

संदर्भ : 1. Althouse, A. D. Turnquist, C. H. Modern Refrigeration And Air Conditioning, Homewood, 1960.

            2. C. S. I. R. The Welth of India, Industrial Products, Part VII, New Delhi, 1971.

            3. Dossat R. J. Principles of Refrigeration, New York, 1961.

            4. Jordan, R. C. Priester, G. B. Refrigeration and Air Conditioning, London, 1957.

            5. Saha, M. N. Srivastava, B. N. A Treatise on Heat, Allahabad, 1965.

            6. Severns, W. H. Fellow J. R. Air Conditioning and Refrigeration, New York, 1958.

भिडे, र. द. सप्रे, गो. वि.