होजियरी : काही स्त्रिया दोन सुया, धागा आणि हाताची कुशलबोटे यांच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे विणतात. हा हात--विणकामाचा सोपा प्रकार आहे. यांत्रिक-विणकामात अनेक सुया, सुईधारकआणि अनेक धागे यांच्या साहाय्याने कपडे विणतात. अशा सुयांच्या साहाय्याने विणलेल्या कपड्यांना होजियरी म्हणतात. पादत्राण किंवा बूटयामध्ये घालावयाचे पाऊल किंवा पायाचा खालचा भाग झाकण्याकरितासुयांचे विणकाम करून तयार केलेल्या कपड्यांचा, विशेषतः स्टॉकिंगे (स्त्रियांची पावले व पायांवर घट्टपणे बसणारे कपडे), तसेच पुरुष, स्त्रिया आणि मुले यांचे पायमोजे व तंग विजारी या कपड्यांचा होजियरीमध्ये समावेश होतो. ग्रेट ब्रिटनमध्ये यांत्रिक-विणकाम कपड्यांच्या सर्व प्रकारांचा होजियरीमध्ये समावेश होतो. भारतात स्त्री-पुरुषांच्या मोज्यांसह सर्व अंतर्वस्त्रांना (उदा., बनियन), तसेच काही बाह्यवस्त्रांना (उदा., टी-शर्ट, स्वेटर) सामान्यपणे होजियरी असे म्हणतात. 

 

ग्रीक कवी हीसिअड यांनी इ. स. पू. आठव्या शतकात प्राण्यांच्या केसांपासून बनविल्या जाणाऱ्या पायमोज्यांचा उल्लेख ‘पिलॉई’ असा केलेला आढळतो. भारतात फार वर्षांपूर्वीपासून पायमोजे व हातमोजे वापरण्यातयेत होते. इ. स. पू. पहिल्या शतकात बनविण्यात आलेल्या अजिंठा लेण्यांमधील भित्तिचित्रात मोजे घातलेल्या पुरुष-स्त्रियांचे चित्र रेखाटलेले आढळते. रोमन लोक (विशेषतः योद्धे) त्यांची पावले, पाय आणि घोटे लांब चामड्याच्या पट्ट्यांनी अथवा विणकाम केलेल्या कापडाने झाकत असत. दुसऱ्या शतकात प्रथम उल्लेख आलेला ऊडोन म्हणजे विणकाम केलेल्या कापडापासून, लोकर किंवा चामड्यापासून पायावर ओढून घातले जाणारे मोजे होते परंतु त्यांची स्थितिस्थापकता (लवचिकता) नाहीशी होत असे. ईजिप्शियन थडग्यांमध्ये तिसरे ते सहावे शतक या कालावधीत विणकाम केलेले पायमोजे सापडले आहेत. 

 

साधारणपणे सतराव्या शतकाच्या सुमारास हात-विणकामाचे मोजेव इतर कपडे आधुनिक रूपात उत्क्रांत झाले. १५८९ मध्ये रेव्हरंडविल्यम ली यांनी सुयांच्या साहाय्याने कापड विणण्याचे छोटे यंत्र तयार केले. राणी एलिझाबेथ पहिली हिने ली यांना पहिल्या विणकाम यंत्राचे एकस्व( पेटंट) नाकारले. कारण त्यांच्या यंत्रावर बनविलेले मोजे स्पेन-मधून आयात केलेल्या मोज्यांपेक्षा जाडेभरडे होते. ली यांनी आपल्यायंत्राचे प्रारूप सुधारून अधिक चांगले मोजे बनविले परंतु पुन्हा यंत्राचे एकस्व नाकारण्यात आले. कारण त्या यंत्राच्या वापरामुळे हाताने विणकाम करणाऱ्यांचे नुकसान झाले असते. 

 

ली यांनी बनविलेले यंत्र इतके परिपूर्ण होते की, ते अनेक शतके वापरात होते. त्या यंत्रात असणारी सर्वसामान्य तत्त्वे सर्व आधुनिक यंत्रात मूलभूत म्हणून वापरण्यात आली. त्यांच्या मूळच्या प्रतिरूपात असलेली कोचदार-स्प्रिंग सुई आजही लोकप्रिय व सर्वसामान्य स्टॉकिंगे बनविणाऱ्या यंत्रामध्ये वापरण्यात येते. १८४०–५० दरम्यान मॅथ्यू टाउनसेंड यांनीआकडा-खिटी (लॅच) सुई शोधून काढली. त्यामुळे विणकामाची गती वाढली. १८६४ मध्ये विल्यम कॉटन यांनी ली यांच्या यंत्रात बऱ्याच सुधारणा केल्या. 

 

फुल-फॅशन्ड स्टॉकिंग तयार करताना सुरुवातीला विणकाम सपाटकरून नंतर पाहिजे असलेली फॅशन किंवा आकार निर्माण केला जातअसे. घोट्याच्या येथे सुयांची संख्या कमी करून, टाचेच्या येथे सुयांची संख्या वाढवून आणि पुन्हा पावलाच्या ठिकाणी संख्या कमी करूनकापडाला आकार दिला जातो. 

 

शिवण नसलेल्या स्टॉकिंगची निर्मिती एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास वर्तुळाकार यंत्राचा वापर करून सुरू करण्यात आली. अनेक वर्षे ही स्टॉकिंगे सरळ नळीसारखे विणलेले होते, परंतु घट्ट बसणारे तसेच फुल- -फॅशन्ड अशा रूपात नव्हते. कारण यंत्राचा वापर करून वर्तुळाकार विणकामात टाके घालणे किंवा काढून टाकणे शक्य नव्हते. १९४० च्या शतकात रेयॉन धाग्यांचा शोध लागल्यानंतर ऊष्मामृदू प्लॅस्टिक गुणधर्मांमुळे विणकाम केलेल्या नळीला कायमस्वरूपी पाहिजे असा प्रकार देता येणे शक्य झाले. १९५० च्या दशकाच्या सुमारास शिवणरहित स्टॉकिंगेएवढी लोकप्रिय झाली की, जास्तीत जास्त स्त्रिया त्यांचाच वापर करीत.१९६० च्या दशकात स्टॉकिंग व घट्ट विजार एकाच वस्त्रात (पॅण्टीहोझ रूपात) विकसित करण्यात आली. पॅण्टीहोझ तळव्यांपासून कमरेपर्यंत घालता येण्याजोग्या असून त्याने तळवे, पाय व कटिभाग (नितंब) आच्छादिले जातात. वर्तुळाकार यंत्रावर तयार झालेले कपडे वृत्तचित्ती आकाराचे व बिनजोडाचे असून ते २३–५० सेंमीपर्यंत व्यासाचे असतात. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास स्त्रिया ८८% सुती, ११% लोकरी व १% रेशमी स्टॉकिंगे वापरीत होत्या. नंतरच्या ३५ वर्षांत रेशीम किंवा कृत्रिम रेशीम (रेयॉन) यांचा वाढता वापर नायलॉनच्या उगमापर्यंतराहिला. नंतर रेशीम व रेयॉनचा वापर नायलॉनमुळे बंदच झाला. 

 

होजियरीचे सूत (धागा) हे मागावरील सुतापेक्षा वेगळे असते. या सुताचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला पीळ कमी असतो. हा पीळ अधिक झाल्यास यंत्रातील सुया मोडण्याचे प्रमाण फार वाढते. यंत्रातील सुताचा आकार (डेनियर) आणि सुयांचे अंतर (गॉज) यांवर स्टॉकिंगचे वजन निर्धारित असते. डेनियर नंबर जेवढा लहान तेवढे सूक्ष्म सूत असते. फुल फॅशनेबल गॉज म्हणजे प्रत्येक ३.८ सेंमी. भागात झालेल्या सुयांच्या संख्येचा वापर होय. जेवढे गॉज जास्त तेवढे टाके (ताणे-बाणे) जवळजवळ असतात. पारदर्शीपणा व सुरेखता ही गॉज आणि डेनियरच्या संख्येवर अवलंबून असते. ६० गॉज व १५ डेनियर विणकाम हे ५१ गॉज व १५ डेनियर विणकामापेक्षा घट्ट असते. या कारणांमुळे सुताचा आकार एकच असला तरी ते विणकाम कमी पारदर्शी व कमी सुरेख असते. ६० गॉज व ३० डेनियर विणकाम ५१ गॉज व ३० डेनियर विणकामापेक्षा अधिक जड व कमी पारदर्शी असते. 

 

होजियरी विकत घेते वेळी लवचिकता, मऊपणा, घट्टपणा, घाम शोषकता आदी गुणधर्म विचारात घेतले जातात. घाम शोषकता, स्वस्त किंमत व उपलब्धता यांमुळे सुती उत्पादने सर्व स्तरांतील व वर्गांतील लोक पसंत करतात. त्यामुळे भारतात प्रामुख्याने कपाशीच्या (कापसाच्या) सुताचा वापर करून होजियरी उत्पादने बनविली जातात. 

 

होजियरीचा वापर विविध हवामानांनुसार केला जातो. विशेषतः उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर अधिक होतो. लोकरीचे बनविलेले अतिशय पातळ उबदार कपडे गेल्या काही वर्षांत वापरात आले आहेत. वजनाने अतिशय हलके असलेले हे कपडे पातळ असून थंडीरोधक असतात. 

 

भारतात होजियरी माल उत्पादन करणारी प्रमुख तीन केंद्रे आहेत : (१) लुधियाना (पंजाब), (२) कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि (३) तिरुपूर (तमिळनाडू) . सामान्यपणे पंजाबमध्ये बाह्यवस्त्रे, पश्चिम बंगालमध्ये तलम वस्त्रे आणि तमिळनाडूमध्ये भरड व मध्यम माल तयार होतो. जागतिक बाजारपेठेत भारतातून होजियरीसंबंधी अधिकाधिक निर्यात होणारे व्यापारी केंद्र तिरुपूर येथे आहे. तिरुपूर येथे अंतर्वस्त्र विणकामाचे यंत्र १९२५ मध्ये प्रथम आणण्यात आले व १९३० पर्यंत त्यात सातत्याने भर पडत राहिली. तिरुपूरला भारताचे ‘टी-शर्ट टाउन’ अशी ओळख प्राप्त झाली आहे. तिरुपूर बाजारपेठेची निर्यात १९८५ मध्ये १९ कोटी रुपये एवढी होती, ती २००७ मध्ये वाढून ११,००० कोटी रुपये एवढी झाली. तिरुपूर एक्सपोर्ट ॲसोसिएशन (TEA) नुसार २०१३-१४ मध्ये साधारण निर्यातीसंबंधी उलाढाल सु. १७,००० कोटी रुपये एवढी अपेक्षित होती. या संस्थेशिवाय साउथ इंडिया होजियरी मॅन्युफॅक्चर्स ॲसोसिएशन (SIHMA) ही प्रमुख संस्था आहे. 

वाघ, नितिन भरत