औद्योगिक अपशिष्ट : निरनिराळ्या प्रकारचे मोठाले कारखाने व औद्योगिक वसाहती यांतून भिन्नभिन्न रसायने, औषधे, मद्ये, कृत्रिम धागे, खते, लहानमोठी  यंत्रे, धातूंचे डबे, भांडी इ.वस्तूंचे उत्पादन होत असताना निरुपयोगी झालेला माल किंवा वस्तू म्हणजे औद्योगिक अपशिष्ट होय. उदा.,बाष्पित्रातील (बॉयलरातील) भट्टीतून निघणारा धूर  व साचणारी राख, रासायनिक कारखान्यातील निरुपयोगी अम्‍ले वा क्षारयुक्त (अम्‍लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या म्हणजे अल्‍कली पदार्थयुक्त) विद्राव, गिरणीत कापडाचे विरंजन करून (रंग नाहीसा करून) झाल्यावर टाकून द्यावयाचे क्षारयुक्त पाणी, यंत्रशालेतील यंत्रणात निघालेला धातूचा चूर किंवा एखाद्या मोठ्या कचेरीतील रद्दी कागद. ही अपशिष्टे कारखान्यात साठवून ठेवता येत नाहीत. साठवल्यास भांडी व जागा अडकून राहातात. काही अपशिष्टे प्रक्रिया चालू असतानाच बाहेर सोडूव द्यावी लागतात व ती बाहेर सोडणे हा प्रक्रियेचाच एक भाग असतो. ही अपशिष्टे वाटेल तेथे व वाटेल तेव्हा सोडता येत नाहीत, कारण तसे केल्यास आसपासच्या लोकांना, प्राण्यांना व वनस्पतींनाही उपद्रव होऊ शकतो [→ प्रदूषण]. म्हणून अशा उपद्रवी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्यासंबंधी नगर पालिका किंवा सरकारी आरोग्य खाते यांनी नियम केलेले असतात व जरूरीप्रमाणे त्यांत फेरबदलही केला जातो. भारतीय मानक संस्थेने यासंबंधी काही मानके (प्रमाणे) प्रसिद्ध केलेली आहेत. भारतात या विषयावरील संशोधनाचे कार्य नागपूर व कलकत्ता येथील सरकारी सार्वजनिक आरोग्य संस्थांत तसेच मुंबई येथील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्‍निकल इन्स्टिट्यूट येथे चालते. यांशिवाय यासंबंधी सल्ला देणाऱ्या काही खाजगी धंदेवाईक संस्थाही आहेत.

काही औद्योगिक द्रव अपशिष्टांच्या (सांडपाण्याच्या) गुणधर्मांचे, घरगुती वाहितमलाच्या (गटारात सोडलेल्या घाणीच्या) गुणधर्मांशी बरेच साम्य आढळते. परंतु बहुतेक ठिकाणी त्यांचे गुणधर्म सर्वस्वी वेगळे असल्याने औद्योगिक अपशिष्टांच्या वासलातीचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक ठरते. 

मुंबई जवळील कल्याण भागातील उल्हास नदीच्या काठावरील रंग, रेयॉन इ. रासायनिक कारखान्यांतील अम्‍ले इ. अपशिष्ट द्रव उल्हास नदीमध्ये सोडतात. १९७३ च्या उन्हाळ्यात जेव्हा नदीचे पाणी कमी झाले होते, तेव्हा ह्या अपशिष्टामुळे नदीच्या काठावरील लोकांना उपद्रव होऊ लागला व मासेही मरू लागले. यावरून अपशिष्टांच्या योग्य विल्हेवाटीला किती महत्त्व आहे हे दिसून येते. 

वर्गीकरण व पृथक्करण : अपशिष्टांचे घन, द्रव आणि वायू असे तीन स्वाभाविक वर्ग होतात. पण कारखान्यांतून वा अन्य उद्योगसंस्थांतून बाहेर पडताना ती अशा एकांगी शुद्ध स्वरूपातच असतील असे नाही. घनाबरोबर द्रव असतील व त्या द्रवातील काही  भाग बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारा) असून त्याचा वाटेत वायूही होईल. म्हणून या प्रत्येक स्वाभाविक प्रकाराचे काही उपप्रकारही होतील. तसे पाहिले तर प्रत्यक्ष व्यवहारात अपशिष्टे ही मुख्यतः मिश्र स्वरूपाचीच असतात. 

वायुरूप अपशिष्टांचे वर्गीकरण (अ) शुद्ध वायू वा बाष्प, (आ) वायू व घन पदार्थांचे मिश्रण, (इ) वायू व द्रव पदार्थांचे मिश्रण, (ई) वायू, घन व द्रव या तिघांचे मिश्रण अशा प्रकारे करता येते. शेवटच्या तीन वर्गांत वायू हाच घन व द्रव पदार्थ वाहून नेत असल्यामुळे त्यांचा वायुरूप अपशिष्टांत समावेश करतात. द्रव अपशिष्टांच्या बाबतीत जलयुक्त आणि जल नसलेले असे वर्ग करतात. जलयुक्त अपशिष्टांत पाण्याचे प्रमाण मोठे असून त्यांत कार्बनी वा अकार्बनी पदार्थ विरघळलेले असतात. द्रव अपशिष्टांचे जाळता येणारे व न जाळता याणारे असे आणखी वर्गीकरण करता येते. घन अपशिष्टांचेही जाळता येणारे व न जाळता येणारे असे वर्ग करता येतात. तसेच जमिनीकरिता भर म्हणून वापरताना त्यांचे आरोग्याच्या दृष्टीने योग्य व अयोग्य असेही  वर्गीकरण करता येते. यांशिवाय जमिनीकरिता भर म्हणून उपयोग करण्यासाठी अशा अपशिष्टांचे तुकडे पाडून वा दाबून आकारमान कमी करता येणारे वा न करता येणारे असेही वर्ग करता येतात.

अपशिष्टांची वासलात लावण्यासंबंधीचा विचार करण्यापूर्वी, जेथे जरूर असेल तेथे, त्यांची या तीन रूपांत प्रथम विभागणी करतात. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की, घन व वायू यांची वासलात लावणे द्रवांच्यापेक्षा बरेच सोपे असते. पण एकंदरीत अपशिष्टांची वासलात लावणे हे तितकेसे सोपे नसते व नवीन उद्योगाची स्थापना करताना इतर गोष्टींबरोबर अपशिष्टांच्या वासलातीच्या विचारालाही महत्त्व देणे जरूर असते. 

पूर्व संस्कार : अपशिष्टांची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीचे आता एक शास्त्रच बनत चालले आहे. शक्य तितका अपशिष्टांचा पुन्हा उपयोग करणे व उरलेल्यांची कसलेही प्रदूषण न होता (दोष उत्पन्न न करता) विल्हेवाट लावणे ही त्या शास्त्राची साध्ये आहेत. या पद्धतीतील पहिली पायरी म्हणजे अपशिष्टांचे वरील तीन प्रकारांत पृथक्करण करणे. त्यानंतर त्यांच्यावर काही प्राथमिक संस्कार करावे लागतात. 

घन : घनांची बासलात लावण्यापूर्वी फारसे काही करावे लागत नाही. पण त्यांचे दाबून गठ्ठे बांधणे व बारीकसारीक तुकडे करणे पुष्कळदा सोईचे असते. जेव्हा या अपशिष्टाची वासलातीसाठी वाहतूक करणे जरूर असते त्या वेळी या गोष्टी फायदेशीर ठरतात. बारीक तुकडे केल्यास त्यांची विल्हेवाट लावणे सोपे होते. 

द्रव : द्रवांच्या विल्हेवाटीत बऱ्याच अडचणी असतात. त्यामुळे त्यांची पूर्व तयारीही गुंतागुंतीची होते. पहिली पायरी म्हणजे त्यात जर घन पदार्थ वा वस्तू आलेल्या असतील तर द्रव जाळीतून किंवा कापडातून गाळून पाठवातात. यासाठी केंद्रोत्सारण ( केंद्रापासून दूर नेणाऱ्या प्रेरणेची) पद्धतीही वापरता येते. जर द्रवात बारीक घन कण असतील तर तो टाक्यांतून साठवून ठेवतात. असे केल्याने गुरुत्वामुळे गाळ आपोआप खाली बसतो व वर नुसता द्रव राहतो. हा द्रव मग काढून घेता येतो.

वरीलप्रमाणे द्रव मिश्रणातील घन भाग वेगळा केल्यावरही त्या द्रवावर पुढील सर्व किंवा जरूरीप्रमाणे त्यांतील काही प्रक्रिया कराव्या लागतात. 

समानुपातन : ही  प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. ज्या कारखान्यात निरनिराळ्या वेळी भिन्न प्रकारचे अपशिष्ट बाहेरपडते तेथे ते अंतिम विल्हेवाटीसाठी लगेच पुढे न पाठवता एका मोठ्या टाकीत साठवतात. सामान्यतः ही टाकी एक दिवसाचे अपशिष्ट राहील एवढी मोठी असते. असे केल्याने अपशिष्टाचे सरासरी गुणधर्म सौम्य होतात व मग तो द्रव कुठेही सोडून दिला तरी चालण्यासारखे असते. काही ठिकाणी सर्व मिश्रणात समानता (सारखेपणा) येण्यासाठी एक यांत्रिकशक्तीने फिरणारी ढवळी (रवीसारखे ढवळणारे साधन) बसवतात. 

अवसादन : जेव्हा द्रवात मध्येच लोंबकळणारे बारीक कण मोठ्या प्रमाणात असतात तेव्हा या प्रक्रियेचा चांगला उपयोग होतो. हीत अपशिष्ट द्रवाचा प्रवाह एका मोठ्या टाकीत सोडतात. त्या टाकीत मधोमध ठेवलेली, यांत्रिक शक्तीने अगदी सावकाश फिरणारी एक ढवळी असते. टाकीतला द्रव सावकाश ढवळला म्हणजे लोंबकळणारे कण तळाला लवकर बसतात व हा गाळ नळाने बाहेर जात राहील असेही करता येते. स्वच्छ झालेला द्रवही वरून सतत बाहेर सोडता येतो. 

उत्प्लवन : द्रवामध्ये जरूर तितक्या दाबाच्या हवेचे बुडबुडे सोडल्याने त्यात मिसळलेले निलंबित कलिकी कण (मध्येच लोंबकळणारे अतिसूक्ष्म कण) वर येतात. मग ते एका ठिकाणी गोळा करून द्रवातून बाहेर काढता येतात. ज्या द्रवात चरबी किंवा तेलकट पदार्थ मिसळलेले असतात त्यासाठी ही प्रक्रिया  विशेष उपयोगी पडते.


वाळू गाळण : ही प्रक्रिया अवसादन संस्कार केलेला द्रव अधिक स्वच्छ करण्यासाठी वापरतात. या क्रियेत वाळूच्या जाडशा थरातून द्रव हळूहळू झिरपू देतात. द्रव खाली जाताना त्यातील घनकण वाळूच्या थरावर अडकतात व स्वच्छ द्रव खाली उतरतो. 

ऊर्ध्वपातन : द्रव अपशिष्टात महत्त्वाची विद्रावके (ज्या द्रवांत पदार्थ विरघळतात ती ) असल्यास ती ऊर्ध्वपातनाने(पदार्थाची वाफ करून व ती थंड करून द्रव घटक पदार्थ वेगळे करण्याच्या प्रक्रियेने ) परत मिळवता येतात. ही प्रक्रिया भागशः केल्यास शुद्ध स्वरूपात त्यांची जवळजवळ १०० % पुनःप्राप्ती होते व तसेच उरलेला द्रव निरुपद्रवी बनतो. 

रेणूंची अदलाबदल : जेव्हा एकाच उद्योगातील दोन अपशिष्टांच्या रासायनिक वर्चसात (सामर्थ्यात) फरक असतो तेव्हा ही पद्धत वापरतात. या प्रक्रियेकरिता क्षैतिज (क्षितिजाला समांतर ) पातळींमध्ये ठेवलेले व दोन भाग असलेले एक मजबूत पोलादी पिंप वापरतात. या दोन भागांच्या मध्ये विशिष्ट तऱ्हेचा एक उभा पडदा असतो. प्रक्रिया चालू असताना दोन्ही बाजूंचे द्रव यांत्रिक रीतीने ढवळतात. दोन्हीकडील द्रवांच्या रासायनिक वर्चसांमधील फरकामुळे जास्त वर्चसाच्या द्रवातील रेणू पडद्यामधून जाऊन कमी वर्चसाच्या द्रवात मिसळतात व त्या द्रवातील रेणू त्याच पडद्यातून येऊन पहिल्या द्रवात मिसळतात. अशा रीतीने रेणूंची अदलाबदल करून द्रवाचे रसायनिक गुणधर्म बदलता येतात व त्याचा उपयुक्त कामासाठी वापर करता येतो. 

आयनांची अदलाबदल : काही विद्रावातील आयनांच्या (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या)रासायनिक आकर्षण शक्तीमध्ये फरक असतो. असे दोन विद्राव मिसळले तर एका विद्रावातील आयन दुसऱ्या विद्रावातील आयनांना दूर सारून त्यांची जागा घेतात व दुसऱ्या विद्रावातून निघालेले आयन पहिल्या विद्रावातील रिकाम्या जागेत येतात. ही प्रक्रिया क्रोमियम, चांदी इत्यादींचा मुलामा देण्याचा उद्योग, अम्‍लमार्जन (अम्‍लाच्या साहाय्याने पृष्ठ स्वच्छ करण्याची प्रक्रिया) इत्यादींत बाहेर पडणाऱ्या अम्‍लाच्या शुद्धीकरणासाठी उपयोगी पडते.

उदासिनीकरण : विद्रावाचे pH मूल्य [विद्रावाची अम्‍लता वा क्षारता दर्शविणारे मूल्य, → पीएच.मुल्य] जर साताच्या आसपास असेल तर त्याला उदासीन (अम्‍लीय व क्षारीय असे दोन्ही गुणधर्म नसलेला) विद्राव म्हणतात. ज्या विद्रावाचेpH मूल्य सातापेक्षा बरेच जास्त किंवा बरेच कमी असते त्यात जरूरीप्रमाणे काही अम्ल किंवा क्षार मिसळून त्याचे pH मूल्य सात करतात.  म्हणजे  तो रासायनिक दृष्ट्या निरुपद्रवी होतो. समानुपातन प्रक्रियेत असे उदासिनीकरण बऱ्याच प्रमाणात होणे शक्य असते.

सक्रियित मलद्रव प्रक्रिया : (सक्रियित म्हणजे अधिक क्रियाशील केलेली). या पद्धतीत टाकीत साठवलेला मलद्रव यंत्राने ढवळतात व त्यामध्ये संपीडित हवेचे (दाबयुक्त हवेचे) बुडबुडे सोडतात. या प्रक्रियेमुळे द्रवात लोंबकळणाऱ्या घन कणांतील सूक्ष्मजंतू झापाट्याने वाढतात व घन कणांचे लहान लहान पुंजके तयार होऊन ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागतात. या सूक्ष्मजंतूंचे कार्य म्हणजे घाण खाऊन कार्बन डाय-ऑक्साइड सोडणे. अशा तऱ्‍हेने स्वच्छ पाणी तयार होते. हे पुंजके एकत्र करून जर नव्या मलद्रवामध्येे टाकले तर पुंजक्यामध्ये वाढू लागलेले सूक्ष्मजंतू नव्या मलद्रवातील घन कणांचा नाश करतात व त्याला अगदी थोड्या वेळात स्वच्छ करतात.

पचन : या क्रियेमध्ये मलद्रवातील सूक्ष्मजंतू द्रवामध्ये लोंबकळणारे व विरघळलेले घाणीचे सूक्ष्मकण आपल्याकडे ओढतात व त्यांना पचवून नाहीसे करतात. त्याचबरोबर नायट्रेटे, सल्फेटे व कार्बन डाय-ऑक्साइड यांसारखी द्रव्ये निर्माण करतात. त्यामुळे घाण पाणी स्वच्छ होऊन त्याची उपयुक्तता वाढते.

निर्विषीकरण : सायनाइडे, क्रोमियम संयुगे यांसारखी विषारी द्रव्ये मलद्रवात मिसळलेली असली, तर द्रवाची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्यामध्ये जरूर ती रसायने मिसळून त्यांचा विषारीपणा नाहीसा करावा लागतो.

वायू : वायूंची वासलातीपूर्वीची तयारी द्रवांच्या इतकी कठीण व त्रासदायकही नसते. तरीपण त्यांच्यावर पुढील संस्कार करणे आवश्यक असते.

घन वेगळे करणे : ही पूर्व तयारीतील पहिली पायरी आहे. कोळशाचे कण धुराबरोबर बाहेर हवेत जातात. याकरिता धातूच्या जरूर त्या प्रकारच्या जाळ्या, कापड इ. गाळण्या म्हणून वापरता येतात. यानंतर पुढील गोष्टींचा विचार करावा लागतो.

संघनन : एखाद्या प्रक्रियेत बाहेर पडणारा वायू नुसते बाष्प असल्यास त्याचे तपमान त्याच्या उकळबिंदूच्या खाली नेल्यास त्याचे द्रव बनेल. मग संघनकाद्वारा (बाष्पाचे द्रवात रूपांतर करणाऱ्या उपकरणाद्वारा) त्यात असणारा एखादा मूल्यवान पदार्थ परत मिळविता येईल.पण बहुतेक ठिकाणी निष्कासित (बाहेर पडणारा) वायू हा हवा, अक्रिय वायू (रासायनिक विक्रिया करण्याची सहज प्रवृत्ती नसलेले वायू) आणि विद्रावकांची बाष्पे यांचे मिश्रणच असते. अशा बाष्पांचे वायूतील प्रमाण जर अगदी थोडे असेल तर संघनन फायदेशीर होत नाही. अशा वेळी बाष्पाचा द्रवांक (द्रव होण्याचे तापमान) पुरेसा वरचा असल्यास प्रशीतन (थंड करण्याची प्रक्रिया) व्यवहार्य ठरून विद्रावकाचा बराच भाग परत मिळविता येतो.

विद्रावक निष्कर्षण : या प्रक्रियेत सक्रियित कोळसा वापरतात. त्यामुळे विद्रावकाचे बाष्प त्यात शोषले जाते व वायूही स्वच्छ होतो. विद्रावकाची पुनःप्राप्ती ९५ टक्क्यांच्या वर होते.

दुर्गंधाचे नियंत्रण : औद्योगिक अपशिष्ट वायूंच्या विल्हेवाटीपूर्वीच्या तयारीत दुर्गंधाचे नियंत्रण ही महत्त्वाची क्रिया आहे. काही विषारी द्रव्ये अपशिष्ट वायूत जरी असली व ती बिनवासाची असली तर ती समजणे कठीण असते पण घाण येणारे वायू (उदा., हायड्रोजन सल्फाइड) मात्र माणसांना अतिशय तापदायक होतात.

दुर्गंधाच्या नियंत्रणाच्या दोन पद्धती आहेत. दुर्गंधाचा उगम ज्या पदार्थापासून होतो त्या पदार्थाचे विरलन (विरळ करणे) करून माणसांना त्रास न होईल इतकी दुर्गंधाची तीव्रता कमी करणे ही एक पद्धती. दुसऱ्या पद्धतीत घाण सोडणाऱ्या पदार्थात सौम्य वासाची विद्रावके व विक्रियक (विक्रिया करणारे पदार्थ) मिसळतात. आणखी काही दुर्गंध नियंत्रण पद्धती पुढीलप्रमाणे आहेत.

संवातन व प्रसरण : बंदिस्त जागेत येणारे दुर्गंधी वायू उंच चिमणी किंवा निष्कास पंखे यांच्या साहाय्याने संवातन करून ( हवा खेळवून) बाहेर टाकता येतात. बंदिस्त जागेच्या बाहेर गेल्यावर त्यांचे प्रसरण होते व दुर्गंधीची तीव्रता कमी होते.

अंतःशोषण : सक्रियित केलेल्या कोळशाच्या मदतीने हवेतील घाण वासाचे नियंत्रण करणे ही एक सर्वमान्य पद्धत आहे. या कोळशात जलांश असला तरीसुद्धा तो बाष्प आत साठवून ठेवू शकतो.


हवा ऑक्सिडीकरण : दुर्गंधी वायूंचे हवेत पूर्ण ऑक्सिडीकरण [ऑक्सिजनाचा समावेश करण्याची किंवा अणूतून इलेक्ट्रॉन निघून जाण्याची क्रिया, → ऑक्सिडीभवन] केल्याने वायूंची घाण जवळजवळ पूर्णपणे घालवणे शक्य असते. ऑक्सिडीभवनानंतर उद्‍भवणारे काही वायू (H2O, CO2) हे वासरहित असतात,तर काही उदा., SO2, SO₃, NO, NO2 यांना मूळच्या घाण वायूंच्यापेक्षा दुर्गंधी बरीच कमी येते. काहींच्या बाबतीत मात्र अर्धवट ऑक्सिडीकरणाने दुर्गंधीत वाढच होते, उदा., अल्कोहॉलाचे कार्‍बॉक्सिलिक अम्‍लात रूपांतर होताना.

आ. १. उत्प्रेरक संच

ऑक्सिडीकरण दोन पद्धतींनी करता येते.एक म्हणजे वायूचा ज्वालांशी सरळ संबंध आणणे व दुसरी म्हणजे उत्प्रेरकाच्या(विक्रियेत स्वतः भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाच्या) सान्निध्यात ज्वलन घडवून आणणे. पहिल्या पद्धतीत घाण वायू पेटविण्याइतके, अंदाजे ६०० ̊ ते ८०० ̊ से. तापमान असावे लागते. जळलेल्या वायूतील उष्णतेचा जर पुन्हा उपयोग केला तर ही पद्धत किफायतशीर होते. या पद्धतीने वरील तापमान२५० ̊ ते ४०० ̊ से. या सीमांत आणता येते. उत्प्रेरक पदार्थाचा वापर करताना त्याचा, दाण्यांच्या किंवा सळ्यांच्या रूपांत, थर बनवून त्यातून वायू जाऊ देतात. आणखी एक प्रकार म्हणजे पोर्सलिनाच्या गजांच्या तुकड्यावर प्लॅटिनमाच्या मिश्रधातूने सक्रियित केलेल्या  ॲल्युमिना मिश्रणाचा थर चढवतात व या गजांचा एक संच (आ.१) बनवून त्यातून वायू जाऊ देतात. अनुकूल परिस्थितीत असा संच दीर्घ काळ टिकू शकतो.

दुर्गंधीनाशासाठी योजावयाच्या ऑक्सिडीकरणाकरिता ओझोन,  परमँगॅनेटे, हायपोक्लोराइटे, क्लोरीन व क्लोरीन डाय-ऑक्साइड यांचाही उपयोग करता येतो.

हवा व द्रव धुलाई : नुसत्या हवेच्या झोताने किंवा योग्य अशा रासायनिक द्रवाच्या साहाय्याने यांत्रक रीत्या ‘धुलाई’ करून वायूंतील दुर्गंधी नाहीशी किंवा बरीच कमी तरी करता येते. एका टाकीत दुर्गंधी वायू व हवा किंवा तो द्रव सोडून तेथे क्षोभ (खळबळ) उत्पन्न होईल असे करतात. हीच धुलाई होय.

अपशिष्टाची विल्हेवाट

तीनही प्रकारच्या अपशिष्टांवर जरूर ते संस्कार केल्यावर व त्यांतून उपयुक्त भागाची प्राप्ती करून घेतल्यानंतर ती अंतिम विल्हेवाटीसाठी सिद्ध होतात.

घन अपशिष्ट : घनांची विल्हेवाट पुढील तीन प्रकारे लावता येते : ( १ ) जाळणे, ( २ ) त्यांचे कंपोस्ट बनविणे (जैव रीतींनी घटक पदार्थ वेगळे करणे व आकारमान कमी करणे) आणि (३) जमिनीला भराव घालणे. घन पदार्थ जाळल्यानंतर जी राख राहते ती भरावासाठी किंवा दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठीही  वापरता येते. अशा तऱ्‍हेने या अपशिष्टाच्या अपशिष्टाचीही (शिल्लक भागाचीही) विल्हेवाट लावणे सोपे होते. घनांचे कंपोस्ट बनविल्यावर पुढे पुन्हा त्याचे काय करावयाचे हा प्रश्न उरतोच. ते खोलगट भूभागात टाकल्यावर किंवा जमिनीच्या उद्धारासाठी (खत किंवा भर म्हणून) वापरल्यास मात्र पुढचा प्रश्न शिल्लक राहत नाही.

जाळणे : औद्योगिक घन अपशिष्ट जाळण्यासाठी भट्टी (किंवा कुंड) वापरतात. ही लोखंडी पत्र्याची बनवून तिच्या आतल्या बाजूला उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) विटा लावतात. तसेच साध्या विटांचीही ही बांधता येते. फक्त त्यांतील आतल्या विटा उच्चतापसह असणे आवश्यक असते. भट्टीला अर्थातच जरूर तेवढ्या उंचीचे धुराडे ठेवतात. नाहीतर पुन्हा हवेच्या प्रदूषणाचा धोका संभवेल. तसेच धुरातून विषारी किंवा दुर्गंधी वायूही बाहेर पडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते. या भट्ट्यांची रचना विशिष्ट प्रकारची असावी लागते. कारण जाळावयाचे घन पदार्थ लहान-मोठे, सुके-ओले, कार्बनी- अकार्बनी अशा निरनिराळ्या प्रकारचे असू शकतात. ज्वलनासाठी लागणारी हवा कचऱ्याच्या खालून (जाळीतून) शक्य तितकी कमी व विस्तवाच्या वरून बरीच जाईल असे करतात. यामुळे घन कण कमी उडतात व उडलेल्यांचे वरील हवेमुळे चांगले ज्वलन होते. शिवाय आणखी धुराच्या वाटेत एक बारीक भोकांची जाळी बासविली, तर असे कण अगदी थोड्या प्रमाणातच धुराबरोबर जातात. काही मोठ्या भट्ट्यांत पूर्ण ज्वलनासाठी एक जादा कोठीच ठेवतात. तीत  जाळाची स्वतंत्र व्यवस्था करतात व त्यामुळे ज्वलन अगदी पूर्णपणे साधले जाते.

अशा तऱ्हेने कचरा जाळताना उष्णतेचे उत्सर्जनही काही प्रमाणात होते, पण या उष्णतेचा साधारणतः उपयोग करून घेता येत नाही. एक तर कारखान्यात कचरा मोठ्या प्रमाणात निघणार नाही व दुसरे म्हणजे उष्णतेची पुनःप्राप्ती करण्यासाठी जादा साहित्य वापरावे लागेल. या साहित्याचा खर्च सामान्यतः ही पुनःप्राप्ती किफायतशीर होऊ देत नाही. मोठ्या शहरातील कचरा जाळून त्यापासून उष्णता मिळविण्याची कल्पना प्रचारात आणण्याचा प्रयत्‍न अमेरीकेत सुरू झाला आहे. या भट्ट्यांत उच्चतापसह विटा वगैरे नसून त्यांच्या बाजूंचा पाण्याशी संपर्क होईल अशी यातील मूळ कल्पना आहे. म्हणजे ही भट्टी एक प्रकारचे बाष्पित्रच होय.

बऱ्याच प्रकारच्या घन अपशिष्टांच्या बाबतीत त्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्यांचा पुन्हा उपयोग करणे शक्य असते. उदा., लोखंडी किंवा पोलादी वस्तूंचे उरलेले भाग, पत्र्यांची कात्रणे, वापरलेल्या बाटल्या किंवा रद्दी कागद. पण अनुभव असा आहे की, पोलादी तुकडे इतर सगळ्या कचऱ्यातून वेगळे काढून त्यांचे पुन्हा पोलाद करण्यापेक्षा नवीन पोलाद बनविणे स्वस्त पडते  तसेच जुन्या बाटल्या गोळा करून धुऊन वापरण्यापेक्षा नव्या घेणे स्वस्त पडते आणि तेच कागदाच्या रद्दीच्याही बाबतीत. म्हणून सध्या तरी या उपयुक्त भागांच्या पुनःप्राप्तीचा प्रयत्‍न झालेला नाही. मात्र यापुढे (निदान अमेरिकादी प्रगत देशांत) त्यांचे काय करावे हा प्रश्न सोडविण्यासाठी व तसेच प्रदूषण टाळण्यासाठी त्यांचा पुन्हा उपयोग करण्याची पाळी येणार आहे.


द्रव अपशिष्ट : पूर्वी वर्णन केलेल्या पूर्व संस्कारांपैकी जरूर त्या प्रकारच्या क्रिया द्रवावर केल्यावर ते निरुपद्रवी पाणीच उरते व मग त्याच्या विल्हेवाटीचा विचार करणे सोपे होते. पाण्याची विल्हेवाट पुढील पद्धतींनी लावता येते. ज्वलन (ऑक्सिडीकरण), खोल विहिरीत सोडणे, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नळात सोडणे किंवा मोठाली तळी, नद्या किंवा समुद्रात सोडणे.

ज्वलन : द्रवात थोड्या प्रमाणात जरी ज्वलनक्षम द्रव्ये असली तरी ही क्रिया सफल होते. कोणतेही  द्रव जरूर तेवढे तापवून एका विकीर्णकातून (तुषार बनविणाऱ्या उपकरणातून) त्याचा 

फवारा उडविला तर त्याचे बारीक कण होतात. हा फवारा जर भट्टीत सोडला तर त्या कणांचे लगेच बाष्प होते व ते धुराड्यातून बाहेर जाऊ शकते. याच क्रियेला द्रवाचे ज्वलन  किंवा ऑक्सिडीकरण म्हणतात. ज्वलनक्षम द्रव्याचे प्रमाण जास्त असले तर चांगलेच. ज्वलनक्षम द्रव्यांची उदाहरणे म्हणजे टोल्यूइन, बेंझीन, अल्कोहॉल, असिटोन, डांबर वगैरे होत. जर द्रव अपशिष्टाचे कॅलरीमूल्य कमीतकमी ४,५०० कॅ./ग्रॅ. असले, तर ही ज्वलन क्रिया स्वावलंबी होऊ शकते व ज्वलन चालू राहाण्यासाठी भट्टी निराळ्या इंधनाने तापवावी लागत नाही.

द्रवात जर हॅलोजन (क्लोरीन, ब्रोमीन इ.), अकार्बनी लवणे किंवा गंधक ही नसतील तर ही क्रिया बिनधोकपणे वापरता येते. पण वरील द्रव्ये असल्यास ज्वलनजनित वायू हवेत सोडण्यापूर्वी योग्य द्रवाने धुवावे लागतात.

खोल विहिरीत सोडणे : काही उद्योगांत वा प्रक्रियांत एखाद्या दुर्बल अम्‍लाची खूप मोठी राशी अपशिष्ट म्हणून सोडावी लागते. तसेच मुलामा देण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते तेथेही असा अपशिष्ट द्रव बाहेर पडतो. अशा द्रवातून उपयुक्त द्रव्यांची पुनः प्राप्ती करणे किंवा त्याची अपायकारकता काढून टाकण्यासाठी पूर्व संस्कार करणे, हे मोठ्या खर्चाचे व आर्थिक दृष्ट्या तोट्याचे होते. तसेच हे द्रव भुपृष्ठावरही सोडता येत नाहीत. तेव्हा ते आधीच (उदा., खनिज तेल काढताना) उपलब्ध असलेल्या कोरड्या खोलखोल विहिरीत सोडून देण्याची कल्पना पुढे आली व ती रूढही झाली. हा द्रव या विहिरीतून भूस्तराखालील पोकळ्यांत जावा लागतो व म्हणून त्याचे पंपाने अंतःक्षेपण (आत सोडणे) करावे लागते. याकरिता द्रवावरील दाबाचे मूल्य साधारण ७ ते ३५ किग्रॅ./ सेंमी.  इतके ठेवावे लागते. आ. २ मध्ये अशा तऱ्हेची व्यवस्था असलेली विहीर दाखविली  आहे. विहिरीत अंतःक्षेपणाचा वेग भूस्तराच्या रचनेवर अवलंबून राहतो, पण सामान्यतः वरील दाबांच्या सीमांत तो ५०० तो १,५०० लिटर/मि. असू शकतो.

आ. २. रिकाम्या खोल विहिरीत द्रव सोडणे : (१) अंतःक्षेपण, (२) विहिरीच्या तोंडावरील दाब-मापक, (३) अंतःक्षेपण नळाच्या बाहेरील पोकळीतील दाबमापक, (४) पोकळी भरण्याचा नळ, (५) वाळू व रेव्याचा थर आणि गोड्या पाण्याचा साठा, (६) अभेद्य खडक, (७) विहीर, (८) पोकळीबाहेरील कोश, (९) अंतःक्षेपण नळाचा आधार, (१०) अपशिष्ट द्रवाचे विसर्जन.

भूपृष्ठावर सोडणे : या पद्धतीत अंतर्भूत असलेले प्रकार म्हणजे कृत्रिम तलाव, मोठी सरोवरे, नद्या व समुद्र या ठिकाणी सोडण्यासाठी द्रवावर अर्थातच पूर्व संस्कार गृहीत आहेत. मोठ्या नदीत किंवा समुद्रात सोडताना पाणी सोडण्याच्या ठिकाणाची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. समुद्राच्या पाण्याच्या अगदी जास्तीत जास्त खालच्या पातळीच्याही खाली काही अंतरावर हा द्रव सोडला पाहिजे. तसेच तेथे समुद्राचे पाणी सतत वाहत असले पाहिजे. नदीत सोडावयाचे झाल्यास तिच्या काठावर गाव असल्यास गावाच्या खालच्या बाजूस ते सोडले पाहिजे. शक्य तर अपशिष्ट आणणाऱ्या नळाचे तोंड काठापासून जास्तीत जास्त लांब नेले पाहिजे.

खाद्यपदार्थ व कागद उद्योगातील अपशिष्ट द्रव शेतजमिनीला उपयुक्त असतात. हे पाणी मोटारीवरील टाक्यांतून नेऊन किंवा नळांनी शेताला देता येते. या पद्धतीची आर्थिक बाजू उपलब्ध पाण्याच्या राशीवर व पाणी वाहून नेण्याच्या अंतरावर अवलंबून असते. 

वायू अपशिष्ट : अपशिष्ट वायूवर शक्य तितके संस्कार केल्यानंतर एक तर ते हवेत सोडण्यालायक होतात किंवा त्यांची वासलात लावण्यासाठी एखादी खास पद्धत योजावी लागते. बहुतेक वेळा हे वायू हवेत सोडायचे असले, तरी त्यांत मुद्दाम हवा मिसळून त्यांतील द्रव्यांची सांद्रता (एकक घनफळातील प्रमाण) कमी करून मगच सोडणे हितावह असते. जेव्हा ते हवेत सोडता येत नाहीत तेव्हा ते जाळणे हाच पर्याय उरतो. वायू तीन पद्धतींनी जाळता येतात : सरळ ज्वालकातून ज्वाला होऊ देणे, तापन व उत्प्रेरण.

पहिल्या पद्धतीत अपशिष्टात हवा मिसळून ते मिश्रण ज्वालकाने पेटवितात. अपशिष्टात हवा मिसळल्यावरही जर त्यात ज्वलनक्षमता असेल तरच ही पद्धत वापरता येते. एकदा मिश्रण पेटविले की आपोआप सारखे जळत राहते. त्याला बाहेरची उष्णता द्यावी लागत नाही, म्हणजेच निराळे इंधन लागत नाही. 

कार्बनी ज्वलनक्षम द्रव्यांचे प्रमाण जर अपशिष्टात कमी असेल तर तापन पद्धती वापरतात. अशी बहुतेक द्रव्ये ५५० ̊ ते ८००० सें. तापमानाला स्वयंप्रज्वलित होतात (स्वतः पेटतात) म्हणून अपशिष्ट या तापमानापेक्षा १००  ते १५०  से. अधिक तापवितात. हे तापन दुसऱ्या इंधनाच्या साहाय्याने ज्वालकाद्वारा करतात. 

तिसरी, उत्प्रेरक वापरण्याची, पद्धती वापरल्याने ज्वलन कमी तापमानावर घडवून आणता येते, हा मुख्य फायदा आहे. उत्प्रेरक पूर्वी वर्णिलेल्या प्रकारचेच असतात. 

वायू अपशिष्ट वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने जाळताना त्यात उत्पन्न होणाऱ्या उष्णतेचा उपयोग करून घेण्याबद्दल विचार करावा लागतो. या उष्णतेचा निदान बाहेरचे इंधन व हवा तापविण्यासाठी जरी उपयोग केला तरी काही प्रमाणात तरी बचत होऊ शकते. पण एकंदरीत औद्योगिक वा शहरी अपशिष्टांची विल्हेवाट लावताना मुख्य उद्देश डोळ्यापूढे असतो, तो सार्वजनिक हिताला कोणत्याही प्रकारे बाधा होऊ नये हा. त्याला किती खर्च येतो हा त्या दृष्टीने गौण प्रश्न ठरतो. अर्थात वरील मुद्दा लक्षात घेऊनही विल्हेवाटीची पद्धती ठरविताना ती वैज्ञानिक दृष्ट्या जास्तीत जास्त कार्यक्षम अतएव कमीत कमी खर्चाची होईल याकडे लक्ष दिलेच पाहिजे. असे करताना जर त्यातून काही उत्पन्न काढता आले तर चांगलेच.

पहा : प्रदूषण वाहितमल.

संदर्भ : 1. Besselievre, E. B. The Treatment of Industrial Wastes, New York, 1969.

    2. Corey, R. C. Principles and Practice of Incineration, New York, 1969.

    3. Ross, R. D. Industrial Waste Disposal, New York, 1968.

गजेंद्रगडकर, सु. कृ. ओगले, कृ. ह.