वसाम्‍ले : ज्यांच्या संघटनांमध्ये एक कार्‌बॉक्सिल गट (-COOH) असतो, अशी ॲलिफॅटिक कार्बनी अम्‍ले. वसाम्‍ले ही वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्यातील लिपिडांमधील [सजीव कोशिकेच्या-पेशीच्या-घटकांमधील ⟶ लिपिडे] महत्त्वपूर्ण घटक असून पामिटिक, स्टिअरिक व ओलेइक ही या अम्‍लांची अधिक परिचित उदाहरणे आहेत. कार्‌बॉक्सिल गटामुळे यांना अम्‍लीय गुणधर्म प्राप्त होतो तसेच ही वसेमध्ये [⟶ तेले व वसा] संयुगांच्या रूपात आढळतात, म्हणून यांना वसाम्‍ले म्हणतात. ‘तेले व वसा’ या नोंदीत मेदांचे (वसेचे) घटक, उपयोग व भारतीय उद्योग या स्वरूपातील यांची काही माहिती मेदाम्‍ले या नावाने आलेली आहे तर ‘लिपिडे’ या नोंदीत वसाम्‍लांचे प्रकार, गुणधर्म, अनुजात वगैरेंविषयी थोडी माहिती दिलेली आहे.

सतराव्या शतकाच्या उत्तर काळात तेल व दाहक (कॉस्टिक) सोडा यांपासून साबण बनवीत. यावरून तेल हे कोणत्या तरी प्रकारचे अम्ल असावे, असे अनुमान करण्यात आले होते. साबणाचा खनिज अम्‍लांशी संयोग केल्यास मूळच्या तेलापेक्षा वेगळे पदार्थ मिळतात, असे जिऑफ्री या संशोधकांनी १७४१ च्या सुमारास दाखवून दिले होते. अल्कोहॉलात हे पदार्थ विरघळतात पण मूळ तेले (एरंडेल हा अपवाद) विरघळीत नाहीत, असेही त्यांना आढळले होते. मात्र या संशोधनाचे महत्त्व लक्षात न आल्याने त्यात पुढे प्रगती झाली नाही.

वर्ग व गुणधर्म : वसाम्‍ले एकक्षारकीय (विस्थापित करता येण्यासारखा एक हायड्रोजन अणू असलेली) असून यांचे तृप्त (सामान्य सूत्र CnH2n+1 COOH) आणि अतृप्त (सामान्य सूत्र CnH2n-2 COOH) असे वर्ग आहेत. तृप्त अम्‍लात कार्बन अणूचे सर्व बंध भरलेले असतात म्हणजे त्यांच्यात द्विबंध वा त्रिबंध (कार्बन अणू दोन वा तीन बंधांनी एकमेकांना जोडले जाऊन बनलेले बंध) नसतात. बहुतेक नैसर्गिक वसाम्‍लांत कार्बन अणूंची संख्या सम असते. तृप्त अम्‍लांची ४ पासून २६ पर्यंत कार्बन अणू असलेली श्रेणी असून ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन श्रेणीपासून [⟶ ॲलिफॅटिक संयुगे] ती मिळू शकतात. तृप्तपेक्षा अतृप्त वसाम्‍लांत हायड्रोजन अणू कमी असतात, म्हणून अतृप्त वसाम्‍लांमध्ये द्विबंध व त्रिबंध तसेच एकांतरित द्विबंध (कार्बन अणूंच्या शृंखलेत किंवा वलयात एक द्विबंध, त्यानंतर एकबंध व पुन्हा द्विबंध असे एकाआड एक असलेले द्विबंध) असतात. यामुळे ती तृप्त अम्‍लांपेक्षा अधिक क्रियाशील असतात. अतृप्त वसाम्‍लांचीही १० ते २४ पर्यंत कार्बन अणू असलेली श्रेणी आहे. श्रेणींमधील वसाम्‍लांचे गुणधर्म क्रमाक्रमाने बदलत जातात मात्र या बदलांमध्ये नियमितपणा असतोच असे नाही. कोष्टक क्र. १ मध्ये काही तृप्त तर कोष्टक क्र. २ मध्ये काही अतृप्त वसाम्‍लांचे काही गुणधर्म दिले आहेत. तृप्त वसाम्‍ले गरजेनुसार प्राण्याच्या शरीरात निर्माण होतात. तथापि अतृप्त वसाम्‍ले शरीरात तयार होत नसल्याने अन्नाद्वारे बाहेरून पुरवावी लागतात म्हणून त्यांना अत्यावश्यक वसाम्‍ले म्हणतात. (उदा., लिनोलीइक, लिनोलीनिक अम्‍ले). 

गरम अल्कोहॉल व वसांचे नेहमीचे विद्रावक यांच्यात वसाम्‍ले विरघळतात. ॲसिटिक हे चार कार्बन अणुयुक्त अम्‍ल (व्हिनेगर) पाण्यात विरघळते. सहा व आठहून अधिक कार्बन अणुयुक्त अम्‍ले पाण्यात जवळजवळ विरघळत नाहीत. बारापेक्षा कमी कार्बन अणू असलेल्यांना बाष्पनशील वसाम्‍ले म्हणतात. कारण वातावरणीय दाबाला वाफेच्या प्रवाहात त्यांचे ऊर्ध्वपातन करता येते.  

बहुतेक तृप्त वसाम्‍ले सर्वसाधारण तापमानाला (२५ से.) घनरूप, तर अतृप्त वसाम्‍ले द्रवरूप असतात. अर्थात याला काही अपावादही आहेत. वसाम्‍ले तेलकट वा मेणचट दिसतात. सर्व वसाम्‍लांतील -COOH गट हा अम्‍लाची वैशिष्ट्ये दाखविणारा गट असून त्यांची अल्कलींशी विक्रिया (उदासिनीकरण) होऊन जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) लवणे बनतात. सर्वसाधारणपणे बारा वा अधिक कार्बन अणुयुक्त वसाम्‍लांची सोडियम वा पोटॅशियम लवणे म्हणजे साबण होत. शुद्ध तृप्त वसाम्‍ले ऑक्सीजन व इतर विक्रियाकारकांना तीव्र विरोध करतात. अतृप्त वसाम्‍लांवर मात्र त्यांची विक्रीया होते. कारण अतृप्त वसाम्‍ले बरीच अस्थिर असून त्यांच्यातील अतृप्ततेच्या मात्रेनुसार ⇨ ऑक्सिडीभवनाची प्रवृत्ती वाढत जाते. अतृप्त वसाम्‍लाच्या हायड्रोजनीकरणाने तेवढेच कार्बन अणू असलेले तृप्त वसाम्‍ल मिळू शकते. वसाम्‍लातील -COOH गटातील हायड्रोजन अणूच्या वा हायड्रॉक्सिल (-OH) गटाच्या तसेच कार्बन साखळीतील हायड्रोजन अणूच्या प्रतिष्ठापनाने (त्याच्या जागी अन्य अणू वा अणुगट आल्याने) दोन तऱ्हांची संयुगे मिळू शकतात. 

आढळ : निसर्गात वसाम्‍ले मुक्त वा सुटी आढळत नाहीत. प्राणिज आणि वनस्पतिज तेले व वसा यांच्यात ती ट्रायग्लिसराइडांच्या (ग्लिसरॉलाच्या एस्टरांच्या) रूपात आढळतात. काही वसाम्‍ले मेणे व बाष्पनशील (बाष्प रूपात उडून जाणारी) तेले यांच्यात अन्य एस्टरांच्या रूपात आढळतात. टॉल तेलातही ती असतात. व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची वसाम्‍ले नैसर्गिक तेले व वसा यांपासून मिळतात. ओलेइक हे सर्वात विस्तृतपणे आढळणारे वसाम्‍ल असून भुईमूग, सूर्यफूल, ऑलिव्ह व पाम यांसारख्या वनस्पतिज तेलांत ते विपुल प्रमाणात आढळते. मानवी वसेचा जवळजवळ ४६% भाग त्याचा बनलेला असतो. पामिटिक अम्‍ल सर्व वसांमध्ये आढळते. त्या खालोखाल लॉरिक, मिरिस्टिक व स्टिअरिक ही अम्‍लेही वसांमध्ये आढळतात. काही वसा व तेलांतील वसाम्‍लांचे प्रमाणे पुढे दिले आहे : (१) लोण्यातील वसा : २९% पामिटिक, ११% स्टिअरिक व २५% ओलेइक (२) पामतेल : ४८% पामिटिक, १४% स्टिअरिक व ३८% ओलेइक (३) भुईमूग तेल : ६१% ओलेइक, ६% पामिटिक व ५% स्टिअरिक.

निर्मिती : नैसर्गिक वसांपासून जलीय विच्छेदनाने वसाम्‍ले मिळवितात आणि ही विक्रिया स्थूलपणे अशी दाखविता येते :  

                          वसा (किंवा तेल) + पाणी ⟶ वसाम्‍ले + ग्लिसरॉल. 

प्रयोगशाळेत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींनी अतिशय शुद्ध वसाम्‍ले तयार करता येतात. व्यापारी पद्धतींत मात्र वसाम्‍लांची मिश्रणे तयार होतात. कच्चा माल म्हणून विविध प्रकारची तेले (विशेषतः अखाद्य) व वसा वापरतात (उदा., अखाद्य प्राणिज वसा, माशांपासून काढलेली तेले तसेच खोबरेल, पाम तेल, सोयाबीन, सरकी, मका इ. वनस्पतिज तेले). कच्च्या मालावर प्रक्रिया करून वसांचे विच्छेदन करतात यामुळे कच्ची वसाम्‍ले व ग्लिसरॉल मिळतात. अशा रीतीने मिळणाऱ्या वसाम्‍लांच्या मिश्रणाचे आणखी विभाजन किंवा अलगीकरण व शुद्धीकरण करतात.


  कोष्टक क्र. १ काही तृप्त वसाम्‍ले आणि त्यांचे महत्त्वाचे गुणधर्म व आढळ 

अम्‍लाचे नाव 

कार्बन 

अणूंची संख्या 

सूत्रभार 

विशिष्ट 

गुरुत्व 

प्रणमनांक 

वितळबिंदू 

(से.) 

उकळबिंदू 

(से.) 

आढळ 

ब्युटिरिक 

४ 

८८.१० 

०.९५९ 

१.३५१ 

-७.९ 

१६३.५ 

लोणी 

कॅप्रॉइक 

६ 

११६.१५ 

०.९२९ 

१.४१७ 

-३.४ 

 २०५.८ 

लोणी, }खोबरेल,

पाम तेल

कॅप्रिलिक 

८ 

१४४.२१ 

०.९१० 

१.४२८ 

१६.७ 

२३९.७ 

कॅप्रिक 

१० 

१७२.२६ 

०.८९५ 

१.८१७ 

३१.६ 

 २७०.० 

लोणी, खोबरेल, पाम तेल,

} जायफळ तेल,

लॉरेल तेल. 

लॉरिक 

१२ 

२००.३१ 

०.८८३ 

१.४२३ 

४४.२ 

२९८.९ 

मिरिस्टिक 

१४ 

२२८.३६ 

०.८५८ 

१.४२७ 

५३.९ 

 ३२६.२ 

बहुतेक सर्व 

प्राणिज व 

}वनस्पती तेले ववसा

 काही मेणे 

कोकम तेल. 

पामिटिक 

१६ 

२५६.४२ 

०.८५३ 

१.४३१ 

६३.१ 

३५१.५ 

स्टिअरिक 

१८ 

२८४.४७ 

०.८४७ 

१.४३४ 

६९.६ 

३७६.१ 

ॲरॅचिडिक 

२० 

३१२.५२ 

०.८२४ 

१.४२५ 

७५.३ 

२०३-२०५ 

भुईमुगाचे व इतर वनस्पतिज तेले 

बेहेनिक 

२२ 

३४०.५७ 

०.८२२ 

१.४२७ 

७९.९ 

३०६.० 

भुईमुगाचे व 

बेनचे तेल 

लिग्नोसेरिक 

२४ 

३६८.६२ 

०.८२० 

१.४२९ 

८४.२ 

— 

भुईमुगाचे व 

काही अन्य तेले 

सेरोटिक 

२६ 

३९६.६८ 

— 

— 

८७.७ 

— 

मधमाश्यांचे, 

कार्नूबा इ. मेणे.

मोंटॅनिक 

२८ 

४२४.७३ 

— 

— 

९०.० 

— 

— 

मेलिसिक 

३० 

४५२.७८ 

— 

— 

९३.६ 

— 

मधमाश्यांचे मेण 

[प्रणमनांक-वक्रीभवनांक : प्रकाशाचा निर्वातातील वेग व वसाम्‍लातील वेग यांचे गुणोत्तर धन अम्‍लांचा प्रणमनांक वसाम्‍ल गरम करून द्रवरूप केल्यावर काढतात ब्युटिरिक, कॅप्रॉइक व कॅप्रिलिक ही अम्‍ले तेलकट द्रव आणि इतर मेणचट धन पदार्थ असतात.]

कोष्टक क्र. २. काही अतृप्त वसाम्‍ले व त्यांचे आढळ

अम्‍लाचे नाव

कार्बन अणूंची

संख्या

वितळबिंदू

(से.)

आढळ 

हायपोजिइक

१६

 

भुईमुगाचे व मक्याचे तेल. 

पामिटोलेइक

१६

-०.५ ते ०.५

कॉडलिव्हर तेल 

फायसेटोलेइक

१६

 

सागरी तेल

ओलेइक

१८

१३ ते १६

बहुतेक सर्व प्राणिज, सागरी व 

वनस्पतिज तेले 

रॅपिक

१८

 

मोहरी, रेपसीड इ. तेले. 

गॅडोलिइक

२०

 

सागरी तेले 

इरुसिक

२२

३४.७

मोहरी, रेपसीड इ. तेले.

लिनोलीइक व 

लिनोलीनिक

१८

-५ ते -५.२७

-११ ते -११.३

सर्व वनस्पतिज तेले उदा., अळशी,

करडई, सोयाबीन, टंग इत्यादी. 

ॲरॅचिडॉनिक

२०

-४९.५

लार्ड तसेच मेंदू व महत्त्वाच्या 

अवयवांतील मेदे.

क्लुपानोडॉनिक

२२

 

सागरी तेले

रिसिनोलिइक

१८

४ ते ५

एरंडेल

वसा विच्छेदनाच्या प्रक्रिया : या प्रक्रियांमध्ये पाणी उत्प्रेरकासह (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणाऱ्या पदार्थासह) वा उत्प्रेरकाविना वापरतात. या जलीय विच्छेदनाद्वारे वसेचे वसाम्‍ले व ग्लिसरॉल यांच्यात विभाजन होते.

क्षारीय (अल्कली) साबणीकरण : ही पद्धती जुनाट असून उद्योगधंद्यात वापरीत नाहीत. दाहक क्षाराबरोबर (उदा., दाहक सोडा वा पोटॅश, कळीचा चुना) उकळून वसांचे साबणात रूपांतर (साबणीकरण) करतात. हे साबण सौम्य खनिज अम्‍लाबरोबर (उदा., सल्फ्यूरिक अम्‍ल) उकळतात. यामुळे वसाम्‍ले मुक्त होतात. मग ती पृष्ठभागावरून मलईप्रमाणे काढून घेतात. 

टि्वचेल पद्धत : या पद्धतीत पृष्ठक्रियाकारक [द्रवाच्या पृष्ठभागाच्या गुणधर्मात ठसठशीत बदल घडवून आणणारा ⟶ पृष्ठक्रियाकारके] उत्प्रेरक म्हणून वापरतात. या उत्प्रेरकाला टि्वचेल विक्रियाकारक म्हणतात, कारण १८९० च्या सुमारास ई. टि्वचेल यांनी तो बनविला होता. बेंझॉलामधील ओलेइक अम्‍लाच्या विद्रावाचे सल्फॉनीकरण करून हा (सल्फोबेंझीनस्टिअरिक अम्‍ल) मिळवितात. त्यात उत्प्रेरकाप्रमाणेच पृष्ठक्रियाकारकाचेही गुणधर्म असतात.


वसा धुऊन बंदिस्त लाकडी पिपात ठेवतात. त्यात पाणी व थोडा (१%) टि्वचेल विक्रीयाकारक टाकतात. हे सर्व मिश्रण वाफेच्या साहाय्याने उकळतात. उकळताना हा विक्रियाकारक चांगला मिसळून जातो आणि पाणी व वसा यांचे पायस (एकमेकांत न मिसळणाऱ्या द्रवांपासून बनलेले दृढ मिश्रण) बनते. यामुळे जलीय विच्छेदनाला चालना मिळते. अशा रीतीने ही क्रिया २० ते ४० तासांत पूर्ण होते. विक्रिया झालेले मिश्रण मग अम्‍लीय करतात. त्यामुळे पायस भंग पावते. नंतर ते निवळू देतात. वसाम्‍लांचे मिश्रण वर तरंगू लागते. पाणी व ग्लिसरीन यांचा थर तळातून काढून घेतात व त्यातील ग्लिसरीन परत मिळवितात. नंतर वसाम्‍लांच्या मिश्रणाचे विभाजन व शुद्धीकरण करतात.

टि्वचेल पद्धती १८९८ साली शोधून काढण्यात आली व त्याच वर्षी तिचे एकस्व (पेटंट) देण्यात आले. या पद्धतीत वापरण्यात येणारी उपकरणे सापेक्षतः  स्वस्त असून ही पद्धत वापरावयाच्या दृष्टीने सोपी आहे. यामुळे वसांचे वसाम्‍ले व ग्लिसरॉल यांत विभाजन करण्याची ही प्रमाणभूत पद्धती ठरली. मात्र या पद्धतीत वसेचे जलीय विच्छेदन पूर्ण होण्यास दीर्घ कालावधी लागतो आणि या काळात ऑक्सीडीभवनामुळे वसाम्‍लांना गडद रंग येतो. तसेच या पद्धतीकरिता मोठी जागा लागते. या दोषांमुळे या पद्धतीऐवजी खाली वर्णन केलेली अखंड वसाविभाजन पद्धती वापरण्याचे प्रमाण वाढत आहे.

ऑटोक्लेव्ह विभाजन : दाबाखालील वाफ वापरून या पद्धतीत वसेचे जलीय विच्छेदन करतात. अगंज पोलादाच्या ऑटोक्लेव्हमध्ये वसा व पाणी ही अल्कधर्मी उत्प्रेरकाबरोबर (उदा., कॅल्शियम, मॅग्‍नेशियम, बेरियम वा जस्त यांचे ऑक्साइड) तापवितात. अशा ऑटोक्लेव्हमध्ये दर चौ. सेंमी.ला १०.५ किग्रॅ.पर्यंत दाबाखाली सु. आठ तासांत जलीय विच्छेदनाची क्रिया पूर्ण होते. यात हवेचा संपर्कच येत नसल्याने ऑक्सीडीभवनाचा प्रश्न येत नाही. परिणामी वसाम्‍ले जवळजवळ मूळ वसेच्या रंगाची मिळतात. काही काळ टि्वचेल पद्धतीमुळे ही पद्धती मागे पडली होती. १९४० च्या सुमारास हिला अखंड प्रक्रियेचे सुधारित स्वरूप दिल्यावर मात्र ती परत लोकप्रिय झाली.

अखंड वसाविभाजन पद्धत : या पद्धतीत सु. २०-२५ मी. उंचीचा अगंज पोलादाचा मनोरा असतो.वसा एकटी वा उत्प्रेरकासह आधी तापवून पंपाने मनोऱ्याच्या तळापर्यंत पाठवितात. त्याच वेळेस अतिशय तापलेले पाणी मनोऱ्याच्या माथ्याजवळ आणले जाते. मग वसेचा वरच्या दिशेतील व पाण्याचा उलट म्हणजे खालच्या दिशेतील असे प्रतिप्रवाह सुरू होतात. हे द्रव मध्यभागी येऊन एकमेकांत मिसळतात व जलीय विच्छेदनास चालना मिळते. यातून बनणारे ग्लिसरीनयुक्त पाणी जड असल्याने तळाशी बुडते व तेथून ते काढून घेतात. या पाण्यावर शेवटी प्रक्रिया करून ग्लिसरीन अलग करतात. मुक्त झालेली वसाम्‍ले हलकी असल्याने तरंगून वर येतात व ती मनोऱ्याच्या माथ्यालगत अखंडपणे काढून घेतली जातात. या वसाम्‍लांचे नंतर विभाजन व शुद्धीकरण करतात.

वसांचे एंझाइमी विच्छेदन : वसांचे नैसर्गिक उद्‍गम असणाऱ्या बहुसंख्य बिया (उदा., एरंडी) व कवची फळे यांच्या कोशिकाभित्तीत एंझाइमे [जीवरासायनिक विक्रियेत उत्प्रेरकाचे काम करणारी प्रथिने ⟶ एंझाइमे] असतात. त्यांना लायपेजे म्हणतात. वसांचे त्यांच्या घटकांत विच्छेदन करण्याची क्षमता त्यांच्यात असते. प्राणि-ऊतकांतही (उदा., अग्निपिंड) अशी एंझाइमे असतात त्यांच्यामुळे आंत्रमार्गात (आतड्याच्या मार्गात) ट्रायग्लिसराइडांपासून वसाम्‍ले अलग होतात. व्यावहारिक दृष्टीने एंझाइमी विच्छेदन उपयुक्त नाही कारण ४० से.ला द्रवरूप असणाऱ्या वसांच्या बाबतीतच हे उपयुक्त आहे. या पद्धतीत एकाच घनफळाचे पाणी व वसा घेऊन त्यांत ५ ते १० टक्के एरंडीची भुकटी टाकून सर्व चांगले मिसळतात. नंतर पुरेशा ॲसिटिक अम्‍लाबरोबर या मिश्रणाचे पायस बनवितात. यामुळे मिश्रण अम्लीय बनते. ही विक्रिया ३० ते ४० से. तापमानाला ४८ तास करावी लागते. अशा प्रकारे ही पद्धती वेळखाऊ तर आहेच शिवाय पाण्याबरोबर मिसळलेली काही वसाम्‍ले पायसाच्या रूपात वाया जातात.

वसाम्‍लांचे संश्लेषण : नैसर्गिक वसा हा वसाम्‍लांचा  सर्वात स्वस्त उद्‍गम आहे. मात्र वसांची टंचाई असते तेव्हा (उदा., दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जर्मनी) विशेषकरून खनिज तेल हायड्रोकार्बनांसारख्या (उदा., पॅराफिने) वसा नसलेल्या द्रव्यांपासून वसाम्‍लांचे संश्लेषण करतात (कृत्रिम रीतीने बनवितात). अशी हायड्रोकार्बने उपलब्ध नसल्यास हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साइड (पाणवायू) यांच्यापासून हायड्रोकार्बने फिशर-ट्रोप्स्क संश्लेषणाने बनवितात. अशा अशुद्ध मिश्रणाचे ऊर्ध्वपातन करून हायड्रोकार्बने अलग करतात. वीसपर्यंत कार्बन अणू असलेली हायड्रोकार्बने पोटॅशियम परमॅंगॅनेटासारख्या प्रभावी ऑक्सिडीकारकाबरोबर तापवून पेरॉक्साइडे बनवितात. मग ती ८० से. पर्यंत हवेत वा ऑक्सिजनाच्या झोतात तापवितात. ऑक्सिडीभवनासाठी मॅंगॅनीज लवणे उत्प्रेरक म्हणून वापरतात. सुमारे २४ तासांच्या विक्रियेनंतर जटिल मिश्रण मिळते. या मिश्रणाचा सु. निम्मा भाग अम्‍लीय द्रव्याचा बनलेला असतो. इष्ट अम्‍ले अल्कलींबरोबर उदासिनीकरण करून अलग करतात व साबणीकरणाच्या दृष्टीने अयोग्य साका टाकून देतात. साबणाचे खनिज अम्‍लाने अपघटन (मोठ्या रेणूचे लहान तुकडे) करून अशुद्ध वसाम्‍ले मिळतात. संश्लेषणाने शाखायुक्त व कार्बन अणूंची संख्या विषम असलेली वसाम्‍लेही बनविता येतात.

अलगीकरण व शुद्धीकरण : कच्च्या वसाम्‍लांमध्ये आखूड व दीर्घ कार्बन शृंखला असणारी, तृप्त व अतृप्त अशा विविध वसाम्‍लांचे जटिल (गुंतागुंतीचे) मिश्रण झालेले असते. यातील वसाम्‍ले विविध मार्गांनी अलग करून शुद्ध करतात.


भागशः  ऊर्ध्वपातन : रेणुभार वेगवेगळे असलेल्या वसाम्‍लांचे उकळबिंदू वेगवेगळे असतात. या गोष्टीचा या पद्धतीमध्ये उपयोग होतो. संक्षारण (गंजण्याची क्रिया) न होणाऱ्या धातूचे नेहमीसारखे परंपरागत ऊर्ध्वपातन पात्र घेऊन त्यात निर्वात ऊर्ध्वपातन करतात. यामुळे कमीत कमी तापमानाला ऊर्ध्वपातन होऊ शकते. या प्रक्रियेने लॉरिक, पामिटिक व स्टिअरिक अम्‍ले अलग करता येतात. मात्र पामिटिक व स्टिअरिक अम्‍लांपासून ओलेइक अम्‍ल वेगळे करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया सोयीची नाही. बाष्पनशील अम्‍लांपासून अबाष्पनशील अशुद्धी अलग करण्याकरिता ऊर्ध्वपातन फायदेशीर ठरते. या पद्धतीने ९०% ते ९५% आणि कधीकधी ९८ टक्क्यांपर्यंत शुद्ध वसाम्‍ले मिळतात.

भागशः  स्फटिकीकरण : वसाम्‍लांचे वितळबिंदू व विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) वेगवेगळी असतात. यामुळे द्रवरूप व घनरूप वसाम्‍ले अलग करता येतात. द्रवरूप ओलेइक अम्‍ल (तांबडे तेल) घनरूप स्टिअरिक व पामिटिक अम्‍लांपासून अलग करण्याकरिता ही पद्धती सोयीस्कर आहे. गरम करून वितळविलेले वसाम्‍लांचे मिश्रण एकदम थंड करतात. असे करताना त्यामध्ये बीज म्हणून घनरूप वसाम्‍लांचे स्फटिक टाकतात. हे मिश्रण २४–२७ से. तापमानाला कित्येक तास ठेवतात. तयार झालेले वसाम्‍लांचे स्फटिक टाकीच्या तळाशी जमतात. स्फटिकीभवनाची क्रिया पूर्ण झाल्यावर द्रवरूप अम्‍ले वा तांबडे तेल गाळून घेतात. स्टिअरिक अम्‍लाचे स्फटिक लोकरीच्या कापडात ठेवून दाबयंत्राने दाबतात व त्यांतील राहिलेले तांबडे तेल काढून टाकतात. या रीतीने स्टिअरिक अम्‍लाचे चमकदार स्फटिक मिळतात. तांबड्या तेलापासून लालसर ते पिवळ्या रंगाचे ओलेइक अम्‍ल मिळवितात.

उपयोग : विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांतील निरनिराळ्या प्रक्रिया व उत्पादने यांच्यात वसाम्‍ले वापरली जातात. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मानुसार प्रत्येक वसाम्‍लाचा वापर करतात. मात्र त्यांचे उपयोग एकसारखे आहेत. वसाम्‍लांचे साबणात सहजपणे रूपांतर होते त्यामुळे ही सर्व प्रकारच्या पायसांत (उदा., सौंदर्यप्रसाधनांतील क्रीम, पेस्ट, औषधांपैकी वेदनाहारके, रेझीन पायसे इ.) वापरतात. नैसर्गिक व कृत्रिम रबर, चर्मोद्योग, धातुउद्योग, कापड उद्योग (कापडाला चकाकी व गुळगुळीतपणा आणण्यासाठी), वंगणे, साबण, खनिज उद्योग, लोकर, खाद्य पदार्थ (काही पोषक घटक), कार्बन कागद, रंगलेप, उजळण संयुगे, मेणबत्त्या, मेणी खडू, प्रक्षालक, अमोनिया इ. उद्योगांत वसाम्‍ले वापरतात. शिवाय ती विद्रावक म्हणूनही वापरतात.

भारतीय उद्योग :  वसाम्‍ले बनविण्याचा पहिला प्रयत्‍न भारतात बिलिमोरा (गुजरात) येथे १९२० च्या सुमारास करण्यात आला. तथापि खऱ्या अर्थाने हा उद्योग नवसारी (गुजरात) येथे १९४३ साली सुरू झाला. १९६३ सालापर्यंत या उद्योगाला संरक्षण होते व भारताची गरज देशातील उत्पादनाने भागविली जाई. १९६५ साली देशात ३,५२६ टन स्टिअरिक, ५१७ टन ओलेइक व ५,५९७ टन इतर मिश्र वसाम्‍ले तयार झाली होती. नवसारी, मुंबई, कलकत्ता, मोदीनगर इ. ठिकाणी वसाम्‍लांचे मोठे कारखाने आहेत.

भारतीय मानक संस्थेने स्टिअरिक अम्‍लाकरिता आयएस १६७५–१९६० हे मानक निश्चित केले असून यानुसार याच्या चार प्रती वापरात आहेत. ऊर्ध्वपातित सर्वश्रेष्ठ (पहिली) प्रत सौंदर्यप्रसाधनाकरिता उपयुक्त असून दुसरी ऊर्ध्वपातित प्रत कापड उद्योगात, तर ऊर्ध्वपातित नसलेल्या ३ व ४ प्रती रबर उद्योगात वापरतात. ओलेइक अम्‍लासाठी आयएस १६७६-१९६० हे मानक ठरविण्यात आले असून याच्या तीन प्रती वापरात आहेत. पैकी फक्त पहिल्या प्रतीचे अम्‍ल ऊर्ध्वपातित असते.

पहा : ग्लिसरीन तेले व वसा प्रक्षालक साबण.

संदर्भ : 1. Fieser, L. F. Fieser, M. Organic Chemistry, Bombay, 1962.

           2. Markley, K. S., Ed., Fatty Acids-Their Chemistry, Properties, Production and Uses, New York, 1961.

           3. Pattison, E. S. Ed., Industrial Fatty Acids and Their Applications, New York, 1959.

कर्वे, रा. वि. ठाकूर, ना. रा.