वैज्ञानिक व औद्योगिक मानके : प्रत्येक भौतिकीय राशीसाठीचे (उदा., लांबी, वजन, काल वगैरेंचे) एकक प्रस्थापित करण्यासाठी स्वीकारलेल्या मान्यताप्राप्त संदर्भाला त्या राशीचे वैज्ञानिक मानक म्हणतात. औद्योगिक मानक म्हणजे एखाद्या वस्तूची वा सेवेची स्वीकारार्हता ठरविण्यासाठी त्या संदर्भात उपयोगात आणलेल्या वस्तूंचे वा सेवांचे आणि खुद्द संदर्भीय वस्तूच्या वा सेवेच्या विविध गुणवत्तांचे न्यूनतम प्रामाणित दर्जाच्या अनिवार्यतेची माहिती ग्रंथित केलेले प्रलेखपोषण वा संदर्भपुस्तक. मानकाशी तत्सम अन्य वस्तूची वा सेवेची तुलना संख्येचा वा चिन्हाचा उपयोग करून करता येते. वस्तूंच्या संदर्भात ही तुलना करण्यासाठी लागणारे गुणमापन व ते करण्याची प्रक्रिया ह्याचे काटेकोरपणे वर्णन मानकात विनिर्देशाच्या स्वरूपात दिलेले असते. सेवांच्या विनिर्देशात सेवा देण्यासाठी लागणारा वेळ, तत्परता, तक्रार निवारण्याची व्यवस्था, ग्राहक सुविधा इ. गोष्टींचे मापन करण्याची पद्धती व मानदंड अंतर्भूत केलेले असतात.    

मानकांचे प्रत्यक्ष पालन सुलभ व्हावे म्हणून वस्तूंचे गुणमान दर्शविण्यासाठी परिभाषा, आकृत्या, संख्या, चिन्हे, आराखडे, नकाशे वा अन्य चित्रे, तसेच सूत्रे, सिद्धांत, आलेख, सारण्या यांचा उपयोग करतात. मानक ही संकल्पना देश, काल, परिस्थिती यांनुसार बदलत असल्याने ती सापेक्ष असते.

कोणत्याही पदार्थाचे निर्देशित रीत्या परीक्षण करून निश्चित केलेले गुणधर्म ज्यात दिले आहेत अशा लेखी कागदपत्रांना त्या पदार्थाचे विनिर्देश म्हणतात. ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या पदार्थाची, उत्पादक त्याच्या उत्पादनाची व व्यापारी त्याच्याकडे विक्रिला असलेल्या वस्तूंची माहिती विनिर्देशांद्वारे प्रसृत करतो. त्यामुळे ग्राहक व विक्रेता (व्यापारी अथवा उत्पादक) यांना ज्या वस्तूची ते खरेदी वा विक्री करीत आहेत, त्या वस्तूची स्वीकारार्हता व दर्जा समजू शकतो. जर दोघात वस्तूच्या दर्जाविषयी वाद निर्माण झाला, तर त्याबाबत निर्दिष्ट पद्धतीने चाचण्या घेऊन निष्कर्ष काढण्यासाठी विनिर्देशांचा उपयोग होतो. एखाद्या वस्तूचा विनिर्देश त्या वस्तूचा उत्पादक, व्यापारी व ग्राहक या सर्वांना मान्य (स्वीकारार्ह) असेल तर प्रथमत: ते औद्योगिक मानक, नंतर राष्ट्रीय मानक ह्या स्वरूपात प्रसिद्ध होते. जर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व संबंधितांना मान्य असेल, त्याला आएसओ अथवा आयईसी या संस्थेची मान्यताही मिळू शकते.

मानक बनविण्यापूर्वी अन्वेषण करण्याची आवश्यकता असते. मानकाचा वापर होत असतानाही त्या विषयात नवीन संशोधक अव्याहत चालू असल्यामुळे मानकांमध्ये आवश्यक ते फेरफार करावे लागतात. हे फेरफार करणे शक्य व्हावे म्हणून मानकीकरणासाठी नेमलेल्या समित्या नवीन प्रगतीचा वरचेवर आढावा घेतात.

मानकांचे वर्गीकरण

मानकांचे वर्गीकरण मुख्यत: तीन भागांत करता येते. विषय, गुणविशेष आणि पातळी (दर्जा) या तीन गोष्टी जर तीन संदर्भरेषांनी आलेखावर दाखविल्या, तर त्या आलेखावर प्रत्येक मानक एक बिंदूने दर्शविता येईल. (पहा आकृती).

मानक तयार करण्याचे कार्य प्रत्येक देशात एखादी मान्यवर श्रेष्ठ अशी संस्था (बहुधा मध्यवर्ती मानक संस्था) ह्यासाठी त्या त्या क्षेत्रातील उच्च श्रेणीच्या उत्पादक व सेवादाता संस्थांतील प्रसिद्ध व जाणकार व्यक्तींचे सहकार्य घेऊन करते. सर्वानुमते मान्य अशा बाबींचाच विशिष्ट मानकांमध्ये समावेश केला जातो. काही वेळा मालाचे व उत्पादकांचे मानकीकरण करण्याचे काम त्या त्या उद्योगांशी संबंधित मानकीकरण संस्था करतात. ह्या सर्व संस्थांत समन्वय राखून राष्ट्रीय स्तरावर मानकीकरण करण्याचे कार्य सर्व उद्योगांची राष्ट्रीय शिखर संस्था करते. मानकीकरण समितीच्या सूचनांचे पालन नेहमी ऐच्छिक असते.

राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वस्तूचे मानक केलेले असेल, तर किमान त्या दर्जाच्या मालाचे उत्पादन सर्वांना करता येते. राष्ट्रीय मानकांचा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फार उपयोग होतो. कारण या मानकांमुळे त्या देशात कोणत्या दर्जाचा माल मिळतो हे आयात करणाऱ्या देशांना समजू शकते.    

इतिहास : मानकीकरण मानवाने हजारो वर्षांपासून आत्मसात केले आहे. सुमारे ५,००० ते ५,५०० वर्षांपूर्वी वजनमापे, विटा, रस्ते, शहररचना वगैरे गोष्टींमध्ये मानकीकरणाचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केलेला सिंधुसंकृतीमध्ये दिसून येतो. वजनमापे व शहररचना या दोन विषयांत तर सिंधुसंस्कृती त्या वेळच्या सुसंस्कृत राष्ट्रांत अग्रभागी होती. कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथातील कालमापन यंत्राचे (घटिकापात्राचे) वर्णन म्हणजे सूक्ष्म व यशस्वी मानकीकरणाचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे.    

देशकालमानाप्रमाणे सर्व क्षेत्रांत इतकी विविधता आली की, वजनमापांच्या, कालगणनेच्या व त्यांच्यावर आधारित शास्त्रांच्या पद्धतीतही विविधता आली. उद्योग, व्यापार व विज्ञान यांच्या वृद्धीबरोबर एकसूत्र पद्धती अस्तित्वात आल्यामुळे जुन्या मापन पद्धती मागे पडल्या. आज वजनमापांची मेट्रिक ही दशमान पद्धती सर्व ठिकाणी वापरली जात आहे. [→मेट्रिक पद्धति].    

फ्रेंच अँकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेने सर्व लोकांना सर्व काळ उपयोगी पडावी अशी ‘प्राकृतिक’ मानकांवर (म्हणजे काही नैसर्गिक राशींच्या मूल्यांवर) आधारलेली एक मापन पद्धती १७९१ मध्ये तयार केली. या पद्धतीत लांबीचे मूलभूत एकक एक मीटर धरण्यात आले. मीटरची लांबी विशिष्ट अंतरावरून ठरविण्यात आली होती. (१९८३ मध्ये मीटर म्हणजे ‘प्रकाशकिरणांनी १/२९,९७,९२,४५८ सेकंदामध्ये काटलेले अंतर असा निर्णय घेण्यात आला). एक घन डेसीमीटर घनफळ असलेल्या पाण्याच्या द्रव्यमानाची एक धातूची वृत्तचिती तयार करून तिला द्रव्यमानाचा मानक किलोग्रॅम म्हणण्यात आले. कालमापनाचे मूलभूत एकक माध्य सौर सेकंद हे प्रथम माध्य सौर दिनावरच निश्चित करण्यात आले होते. (१९६७ मध्ये कालमापनाचे नवे एकक आणवीय सेकंद म्हणून निश्चित करण्यात आले). या पद्धतीतील लांबीचे एकक मीटरवर आधारलेले असल्याने तिला मेट्रिक पद्धती हे नाव देण्यात आले, ही दशमान पद्धती आहे. [→मेट्रिक पद्धति].    

लांबी व वजनाचे एकक म्हणून प्लॅटिनम धातूचा एक मानक मीटर व एक मानक किलोग्रॅम फ्रेंच प्रजासत्ताकाच्या अभिलेखागारात असून त्यांना आर्काइव्हजचे मीटर किलोग्रॅम म्हणतात. प्रत्यक्ष मोजमापनातील काही अटळ चुकांमुळे त्यानंतरची मानके प्राकृतिक मोजमापांच्या आधारावर तयार न करता आर्काइव्हजच्या मानकांनुसार तयार करण्यात येऊ लागली. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वमान्य झालेल्या करारानुसार आर्काइव्हज मीटर व किलोग्रॅम यांच्या इतक्याच बिनचुकपणे तयार करण्यात आलेल्या मानक प्रतिकृतींना आंतरराष्ट्रीय मेट्रिक पद्धतीची मूळ मानके म्हणून १८८९मध्ये मान्यता देण्यात आली. सर्वसाधारणपणे ही वैज्ञानिक मानके गणली जातात.

औद्योगिक क्रांतीच्या काळात मापन क्रियेला गतिमानता प्राप्त करून देण्याचे काम हेन्री मॉडस्ले (१७७१–१८३१) आणि जोसेफ व्हिटवर्थ (१८०३–१८८७) यांनी केले. मॉडेस्ले यांनी केलेली क्रांतिकारक सुधारणा म्हणजे त्यांनी तयार केलेला स्क्रू सूक्ष्ममापक (मायक्रोमीटर) होय. लंडन येथील रॉयल सोसायटीच्या अधिवेशनात व्हिटवर्थ यांनी गटवार निर्मितीसंबंधीचा निबंध सादर केला. त्यामुळे या नवीन कल्पनेचा प्रसार ब्रिटनमध्ये झाला आणि यूरोपातील उद्योगांवर तिचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. आधुनिक महोत्पादन तंत्राचा शोध व काही प्रमाणात विकास एफ. डब्लू. टेलर (१८५६–१९१५) आणि एफ. बी. गिलब्रेथ (१८६८–१९२४) यांनी केला.

सुरूवातीच्या काळातील मोटारगाड्या आगोदरच मानकीकरण केलेल्या व इतर कामांकरिता उत्पादित केलेले घटक जोडून तयार केल्या जात. उत्पादन पद्धती कुशल कामगारांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होती व त्यामुळे उत्पादनाचे फारच थोडे असे. १९०६–०८ या दरम्यान मोटारगाड्यांची खूपच वाढलेली मागणी आणि कुशल कामगारांची कमतरता या कारणांनी अमेरिकेतील उत्पादकांनी संकलित उत्पादन प्रक्रिया व महोत्पादानातील नवनवीन क्लृप्त्या वापरात आणल्या. यांमुळे औद्योगिक वस्तूंचे उत्पादन इतर देशांच्या मानाने अमेरिकेत खूपच लवकर प्रस्थापित झाले. ग्राहकांच्या दृष्टीनेही मानकीकरण महत्त्वाचे आहे, कारण नव्याने बदलावयाचा सुटा भाग मूळ भागाबहुकूम असल्याने मोटारगाडीची दुरूस्ती लवकर होते व खर्चाची बचत होते. महोत्पादन पद्धती व सुट्या भागांचे मानकीकरण यांचा आधुनिक औद्योगिक उत्पादनावर फार दूरगामी परिणाम झालेला आहे. [→ मोटारगाडी उद्योग].    

इ. स. १९२१ साली करण्यात आलेल्या काल क्रिया अभ्यासामुळे जुळणी मार्गाकडे विविध भाग आणण्यासाठी वाहक पट्टे बसविण्यात आले. एखादे काम करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांतील प्रत्येक क्रियेला लागणाऱ्या वेळेचे मानकीकरण करण्यासाठी तिच्यातील टप्प्यांचे निरीक्षण, मापन व विश्लेषण करून अभ्यास करतात. संगणक-नियंत्रित विशेषित यंत्रसामग्रीच्या रूपातील स्वयंचालन अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रचारात येत आहे. या बदलामुळे उत्पादित वस्तूंचे मानकीकरण आवश्यक असणाऱ्या दृढ महोत्पादन पद्धतीच्या जागी उत्पादित वस्तूमध्ये पुष्कळ विविधता ठेवता येणारी लवचिक महोत्पादन पद्धती येत आहे.

ब्रिटिश स्टँडर्डस इन्स्टिट्यूशन : औद्योगिक मानकांचा प्रसार इंग्लंडमध्ये रेल्वे वाहतूक सुरू झाल्यानंतर (सु. १८२५) विशेषत: प्रामुख्याने होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अभियांत्रिकी उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे औद्योगिक मानकांची जरूरी अधिक तीव्रतेने भासू लागली. १९०१ मध्ये इंस्टिट्यूशन ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स या संस्थेने बांधकामांसाठी लागणाऱ्या लोखंडी तुळ्या, खांब वगैरेंच्या आकाराची मानके तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली. १९०२ मध्ये याच समितीकडे विद्युत विषयक मानके बनविण्याचे काम देण्यात आले. या व इतर समित्यांच्या कामांतून पुढे ‘ब्रिटिश स्टँडर्डस इंस्टिट्यूशन’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेची घटना, काम करण्याची पद्धती वगैरे १९०३ मध्ये ठरविण्यात आली. या संस्थेला १९२९ मध्ये सरकारी मान्यता मिळाली.

अमेरिकन स्टँडर्डस अँसोसिएशन : अमेरिकेमध्ये पाच निरनिराळ्या अभियांत्रिकी संस्थांनी १९१८ मध्ये ही संस्था स्थापन केली. ही संस्था स्वत: मानके बनवीत नाही. इतर तांत्रिकी संस्था हे काम करतात. त्या संस्थांनी तयार केलेली मानके कोणत्या पद्धतीने बनविलेली आहेत व त्यांना देशात कितपत मान्यता आहे याचा समतोल विचार करून नंतरच त्या मानकांना राष्ट्रीय मानके म्हणून अमेरिकन स्टँडर्डस अँसोसिएशन ही संस्था मान्यता देते.

भारतीय मानक संस्था : ( इंडियन स्टँडर्डस इंसिट्यूट आयएसाअय सध्याचे नाव ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डस). भारतामध्ये १९४७ पूर्वी ब्रिटिश स्टँडर्डस इंस्टिट्यूशन या संस्थेने बनविलेली मापके वापरली जात असत. यासाठी १९१९ पासून ⇨इंस्टिट्यूशन ऑफ एंजिनिअर्स (इंडिया) ही संस्था भारतीय समिती म्हणून काम करीत असे. डिसेंबर १९४० मध्ये लखनौ येथे भरलेल्या बाराव्या औद्योगिक परिषदेमध्ये मानके बनविण्यासाठी भारतीय संस्था स्थापन करण्यासंबंधी ठराव प्रथम मांडण्यात आला. सप्टेंबर१९४६ मध्ये भारत सरकारने ‘भारतीय मानक संस्था’ स्थापण्याचा निर्णय घेतला. जानेवारी १९४७ मध्ये संस्थेची घटना बनवून औपचारिक रीत्या संस्था अस्तित्वात आली.१९६२ साली तिला कायदेशीर मान्यता प्राप्त झाली. या संस्थेत राष्ट्रीय प्रयोगशाळांतील शास्त्रज्ञ, उद्योग क्षेत्रायील नावाजलेल्या व्यक्ती, ग्राहकांचे प्रतिनिधी व ग्राहक संस्थांचे प्रतिनिधी अशा विविध व्यक्ती काम करतात. या संस्थेने आतापर्यंत १७,६०० पेक्षा जास्त मानक विनिर्देश (आवश्यक प्रमाणभूत गुणधर्म) सिद्ध केले असून नवीन सिद्ध करण्याचे व जुन्यांमध्ये सुधारणा करण्याचे कार्य सतत चालू असते. विकसित देशांतील मानके स्वीकारणे, विकसनशील देशांना मानकीकरणाबाबत सल्ला, सेवा देणे, मानकांशी संबंधित माहिती प्रसृत करणे, प्रशिक्षणांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे वगैरे कामे ही संस्था करते. उत्पादित माल त्या कसोट्यांवर उतरल्यास नाममात्र शुल्क (सेवा शुल्क). भरून संस्थेच्या नावाच्या आद्यक्षरांसह (ISI) विशिष्ट क्रमांक असलेले चिन्ह वापरता येते. असा बोधचिन्हांकित माल ग्राहकाला गुणवत्तेविषयी खात्री देतो, तसेच त्यामुळे उत्पादकाची विश्वासार्हता देखील वाढू शकते. [→ भारतीय मानक संस्था].    

       भारतीय मानक संस्थेखेरीज इतर काही संस्थांचे विभागही मानकीकरणाचे काम करतात. यांपैकी प्रमुख संस्था म्हणजे ‘भारतीय रेल्वेचे अन्वेषण अभिकल्प, मानकीकरण कार्यालय’, संरक्षण मंत्रालयाचे निरनिराळे विभाग, ‘पूर्ती आणि निपटान महानिदेशालय’ आणि कृषी -व्यापार सल्लागार’ या आहेत. या संस्थांनी तयार केलेली मानके ही मुख्यत: रेल्वे, संरक्षण व इतर सरकारी विभागांसाठी लागणारे सामान खरीदण्यासाठी वापरली जातात. भारतीय मानक संस्थासुद्धा ह्या मानकांचा विचार करते. तसेच वरील संस्थांदेखील भारतीय मानक संस्थेने प्रसिद्ध केलेल्या मानकांचा वापर करतात. ‘कृषी पदार्थ (प्रत आणि चिन्हांकन) विधेयक, १९३७’ या कायद्यानुसार कृषी पदार्थांवर अँफमार्क वापरण्याची परवानगी भारत सरकार देऊ शकते. [→ अँगमार्क].

इंटरनॅशनल लेबर ऑफिस ऑर्गनायझेशन : औद्योगिक उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या कामगाराचे जीवनमान, व्यवस्थापन प्रक्रिया, कामगार प्रशिक्षण, उद्योगाच्या कारखान्याची अंतर्गत परिस्थिती म्हणजे कार्यपरिसर तसेच अपघात व आगनियंत्रण, विषारी वायू व रासायनिक दुष्परिणाम टाळणे आणि सर्व प्रकारच्या कामांत सुरक्षा अवलंबन करणे यांसंबंधी मानके तयार करण्याचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर जिनीव्हा येथे इंटरनॅशनल लेबर ऑफिस ऑर्गनायझेशन ही संस्था करते. ह्या संस्थेची स्थापना १९१९ साली झाली असून जगातील बहुतेक सर्व देश हिचे सभासद आहेत.    


इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन : (आयएसओ ISO). आंतरराष्ट्रीय पातळीवर ही संस्था मानकीकरणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. राष्ट्रीय मानक संस्था या संस्थेच्या सभासद असतात. हिचे कार्यालय जिनीव्हा येथे असून हिची स्थापना १९४७ साली झाली आहे. यापूर्वी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ नॅशनल स्टँडर्डस अँसोसिएशन (ISA) ही संस्था १९२६-४२ या कालावधीत काम करीत होती.१९४४मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ स्थापन झाल्यावर त्या संस्थेने एक समिती नेमली होती. या समितीच्या पहिल्या सभेत आयएसओची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९०६ मध्ये स्थापन झालेली इंटरनॅशनल इलेक्ट्रोटेक्निकलकमिशन (IEC) ही संस्था आयएसओच्या स्थापनेनंतर तिचा विद्युत विभाग म्हणून विद्युत विषयक मानकीकरणाचे काम करते. आयएसओ ही संस्था सभासद राष्ट्रांच्या मानकांमध्ये एकसूत्रीपणा आणते व आवश्यक त्या शिफारशी करते, तसेच आंतरराष्ट्रीय मानके प्रसिद्ध करते.

आयएसओ-९००० माला : ही मानकांची माला प्रक्रिया प्रणालींसाठी निर्मिलेली आहे. या मानकाचा उपयोग करणे हे कोणत्याही संस्थेवर बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. एखाद्या संस्थेने या मानकानुसार कार्य करण्याचे ठरविल्यास त्या संस्थेच्या कामात एक प्रकारची सुसूत्रता व शिस्त निर्माण होते. यामुळे संस्थेच्या साधनसामग्रीचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो व संस्थेचा अधिकाधिक विकास होतो. अशा प्रकारे हे मानक विकासाभिमुख असून त्याच्या अंतर्गत बरीच मानके आहेत. त्यातील महत्त्वाची मानके पुढीलप्रमाणे आहेत : (१) आयएसओ – ९०००: गुणवत्ता व्यवस्थापन व गुणवत्ता निश्चिती/निवडी याबाबत मार्गदर्शन. (२) आयएसओ -९००१ : गुणवत्ता पद्धती -अभिकल्प, विकास, उत्पादन, आस्थापन व सेवांच्या संबंधातील गुणवत्ता निश्चितीबाबत आदर्श. (३) आयएसओ -९००२ : गुणवत्ता पद्धती- उत्पादन व आस्थापना यांच्यासंबंधी गुणवत्ता निश्चितींचा आदर्श. (४) आयएसओ-९००३ : गुणवत्ता पद्धती अंतिम परीक्षण तथा चाचणीसंबंधी गुणवत्ता निश्चितीचा आदर्श. (५) आयएसओ-९००४: गुणवत्ता व्यवस्थापन व गुणवत्ता पद्धती मूलभूत तत्त्वे-मार्गदर्शन. (६) आयएसओ-९००४/२ : गुणवत्ता व्यवस्थापन व गुणवत्ता पद्धती-सेवा उद्योग-मार्गदर्शन.

वरीलपैकी आयएसओ-९०००व -९००४ ही दोन मानके सैद्धांतिक व मार्गदर्शनपर असून अन्य मानके मान्यताप्राप्त होण्यासाठी व्यवस्थापनाला नेमके काय करावे लागेल, त्याचे मार्गदर्शन करतात. कोणत्याही व्यवसायात कार्यरत असलेल्या संस्थेला त्या संस्थेच्या प्रक्रियांच्या व्यवस्थापकीय कसोट्यांना उतरल्यास आयएसओची संबंधित मानकाची मान्यता प्राप्त होऊ शकते. कोणतीही विशिष्ट संस्था स्वत:चे उत्पादन व त्याची प्रक्रिया तसेच ग्राहक व ग्राहकसेवा विचारात घेऊन आयएसओ-९००१,९००२, ९००३ व ९००४/२ पैकी कोणतेही एक मानक मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी आयएसओ या संस्थेकडे अर्ज करू शकते. प्रत्यक्षात विशिष्ट संस्थेला मानकाचे प्रमाणपत्र देण्याइतपत त्या संस्थेचा व्यवस्थापकीय प्रक्रियांचा दर्जा गुणवत्तापूर्ण आहे किंवा नाही याबाबत मान्यताप्राप्त अशा संस्थेच्या द्वारे निर्मिती प्रक्रियेचे सर्वेक्षण करून घ्यावे लागते. निर्मिती प्रक्रिया सर्वेक्षणाच्या विभिन्न कसोट्यांना उतरल्यास तशी शिफारस केली जाऊन आयएसओ या संस्थेतर्फे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र हे प्रमाणपत्र कायम स्वरूपी नसून त्याची मुदत केवळ दोन वर्षांपुरती मर्यादित स्वरूपाची असून पुनश्च तसे प्रमाणपत्र अर्ज करून घ्यावे लागते.                                

भिडे, शं. गो. करमरकर, द. वि.

उत्पादनांच्या मानकीकरणाच्या देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय कार्यात अनेक संघटना कार्यरत असतात. विशिष्ट प्रादेशिक समस्या व गरजा यांमध्ये त्या लक्ष घालतात. यूरोपीयन इकॉनॉमिक कम्युनिटी (ईईसी), इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियन (आयटीयू), इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ) अथवा जनरल अँग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड (जीएटीटी, गॅट) याचे प्रशासन यांसारख्या संघटनांचे मुख्य कार्य जरी राजकीय, आर्थिक व वैज्ञानिक स्वरूपाचे असले, तरी आपल्या कामाचा एक भाग म्हणून या संघटनांना मानकीकरणाची दखल घेणे आवश्यकच असते.  

दूरचित्रवाणी मानके : दूरचित्रवाणी प्रणालीच्या आवश्यक बाबींचे वर्णन करणाऱ्या संख्यात्मक व आलेखीय निकषांना दूरचित्रवाणी मानके म्हणतात. हे निकष सामग्रीचा अभिकल्प (आराखडा) व कार्यवाही यांना लावण्यात येतात. यामुळे या प्रणालीचे विविध भाग हे कमाल कार्यमानाला परस्पर सहकार्याने कार्य करतील याची खातरजमा होते. प्रेषक (प्रक्षेपक), कलागृह (स्टुडिओ), जालके व ग्राही हे दूरचित्रवाणी प्रणालीचे महत्त्वाचे भाग आहेत. संदेशवहनाच्या इतर प्रणाशींशी तुलना केल्यास दूरचित्रवाणी प्रणालीची निश्चित अशी खास गरज असते. कारण या प्रणालींत कुलूप-किल्ली यांच्यातील परस्परसंबंधाप्रमाणे प्रेषक व ग्राही यांचे कार्य अचुकपणे होणे गरजेचे असते. विशेषकरून कॅमेऱ्यातील प्रतिमेचे होणारे क्रमवीक्षण हे संबंधित अशा प्रत्येक ग्राहीतील क्रमवीक्षणाशी तंतोतंतपणे जुळणारे असावे लागते. हे कार्य सेकंदाच्या एककोट्यांश एवढ्या अचुक अवधीत आणि चित्राच्या तपशीलातील सापेक्ष स्थानांमधील सेंटिमीटरच्या एकशतांश एवढ्या अचूक अंतरात व्हावे लागते. कोणत्याही दूरचित्रवाणी ग्राहीकडून त्याच्या पल्ल्यात येणाऱ्या कोणत्याही प्रेषकाकडून प्रेषित होणारे कार्यक्रम हमखास ग्रहण होणे शक्य होण्यासाठी जवळपासच्या देशांच्या एका गटामध्ये या मानकांचा एकच संच लागू करण्याची प्रथा आहे. उदा., यूरोपीयन देशांसाठी एक, तर उत्तर अमेरिकेलगतच्या देशांसाठी (मेक्सिको, क्यूबा, अमेरिका, कॅनडा) दुसरा असा संच ठरविण्यात आला आहे. अर्थात या संचांमध्ये तपशीलाच्या बाबतीत भिन्नता असते. जगातील इतर प्रदेशांसाठीही अशा प्रकारे दूरचित्रवाणी मानकांचे गट तयार करण्यात येतात. त्या त्या देशातील संदेशवहन प्रणालीची जबाबदारी ज्यांच्याकडे असते अशी शासकीय अभिकरणे दूरचित्रवाणी मानके प्रस्थापित करतात आणि दूरचित्रवाणी केंद्राकडून त्यांना अनुरूप अशी कार्यवाही करून घेण्याचे कायदेशीर कामही ही अभिकरणे करतात.

दूरचित्रवाणी मानकांचे प्रेषण व वाटप असे दोन प्रकार आहेत. दूरचित्रवाणी प्रेषकांमार्फत प्रारित झालेले संकेत आणि कार्यक्रमाच्या अपेक्षित दृश्य व श्राव्य तपशीलाशी असलेला या संकेतांचा संबंध यांचे वर्णन (विवरण) प्रेषण मानकांत केलेले असते. रेडिओ वर्णपटात या प्रारित संकेतांनी कोणता भाग कशा तऱ्हेने व्यापला आहे, ते वाटप मानकांत निश्चित केलेले असते. प्रेषक, ग्राही व इतर उदगमांकडून होणारे व्यत्यय (व्यतिकरणे) असताना दूरचित्रवाणी केंद्रे किती अंतरापर्यंत समाधानकारक सेवा देतात, यावर मुख्यत्त्वे वाटप मानकांचा प्रभाव पडतो.

प्रेषक मानके : चित्र व ध्वनीचे पुनरुत्पादन यांची प्रणाली व गुणवत्ता प्रेषण मानकांद्वारे निश्चित होते. या मानकांत क्रमक्षीक्षण, विरूपण व परिवाह (चॅनल) मानके येतात.    

क्रमवीक्षण मानके : या मानकांद्वारे चित्रविषयक उत्कृष्टतेची मर्यादा निश्चित होते. क्रमवीक्षण चालू असताना चित्र किती रेषांमध्ये विच्छेदित होते वा विभागले जाते त्या रेषांची संख्या आणि चित्रांच्या रुंदीचे त्याच्या उंचीशी असलेले गुणोत्तर या मानकांद्वारे निश्चित होते. सर्वसाधारण अंतरावरून पाहणाऱ्याला समाधानकारक वाटेल असे पुरेसे रेखीव चित्र दिसण्यास पुरेशा ठरतील एवढी या रेषांची संख्या असावी लागते. विविध देशांत यासंबंधातील मानकांनी ४०५, ५२५, ६२५ व ८१९ रेषा निश्चित केल्या आहेत.    

पुनर्रचित वस्तूंना नेमकी सापेक्ष उंची व रुंदी लाभावी म्हणून चित्रांच्या रुंदीशी त्याच्या उंचीचे असलेले गुणोत्तर ग्राहींशी अनुरूप असावे लागते. सर्व जगभरात या प्रसर गुणोत्तराचे मूल्य ४·३ हे धरले जाते. प्रमाणभूत चलचित्रपटांचा कार्यक्षमपणे वापर करणे शक्य व्हावे म्हणून हे मूल्य ठरविण्यात आले आहे.

विरूपण मानके : हा प्रेषण मानकांचा दुसरा गट आहे. ध्वनी व प्रतिमा (दृश्य) माहिती अनुक्रमे त्या त्या रेडिओ वाहक संकेताद्वारे वाहून नेण्याच्या पद्धती या मानकांद्वारे निश्चित केल्या जातात. ध्वनिप्रेषणासाठी कंप्रता विरूपणाच्या तर दृश्य माहितीच्या प्रेषणासाठी अवशिष्ट उपपट्ट प्रेषण वापरून परमप्रसर विरूपणाचा उपयोग करतात. अनुरूप रंगीत दूरचित्रवाणीसाठी असलेली क्रमवीक्षण व विरूपणविषयक मानके अचुकपणे विनिर्दिष्ट करणे गरजेचे असते. यामुळे प्रेषण परिवाहांतर्गत किमान विक्षोभ (व्यत्यय) होऊन रंगीत माहिती सामावून घेणे शक्य होते. [→ विरूपण].

परिवाह मानके : दूरचित्रवाणी केंद्राच्या परिवाहांच्या कंप्रतांच्या मर्यादा (सीमा) या मानकांद्वारे विनिर्दिष्ट केल्या जातात. तसेच प्रेषित संकेत कोणत्या तऱ्हेने परिवाह व्यापतात तेही या मानकांद्वारे स्पष्ट केलेले असते. परिवाहाच्या रुंदीत कमाल दृश्य उपपट्ट कंप्रता सामावून घेतली गेली पाहिजे.

वाटप मानके : आकाशक मनोऱ्याच्या उंचीच्या संदर्भात तसेच विनिर्दिष्ट अंतरावर आवश्यक असलेल्या किंवा अनुज्ञात (अनुज्ञेय) संकेताच्या बलाच्या (तीव्रतेच्या) संदर्भात प्रेषकाच्या कमाल व किमान शक्ती या मानकांद्वारे ठरतात. मैलांमध्ये दिलेले किमान विभाजन अंतर व केंद्रांमधील परिवाहांदरम्यानचे किमान कंप्रता-अंतर (विलगीकरण) विनिर्दिष्ट केलेले असते. कारण दिलेल्या प्रदेशासाठी परिवाह ठरलेले असतात किंवा त्यांच्यात परस्परव्यतिकरण निर्माण होण्याची शक्यता असते.

प्रेषण व वाटप मानकांचे हमखास अनुपालन होण्यासाठी सामग्रीविषयक मानके शासकीय विनियमाने निर्दिष्ट केलेली असतात आणि ती योग्य सुरक्षितता घटकांसह व्यापारी संस्थांनीही स्वीकारली आहेत. [→ दूरचित्रवाणी].    

तरंगलांबी मानके : विनिर्दिष्ट उदगमांकडून उत्सर्जित झालेल्या वर्णपटीय प्रारणाच्या अचुकपणे माहीत असलेल्या तरंगलांब्या म्हणजे तरंगलांबी मानके होत. पूर्वी प्रमाण (मानक) उदगम व अभ्यासावयाचा उदगम यांच्याकडून येणारे प्रारण वर्णपटमापकाच्या फटीवर (लोलक किंवा जालक) एकमेकांवर अध्यारोपित करीत आणि मग अंतर्वेशनाचा [→ अंतर्वेशन व बहिर्वेशन] उपयोग करून प्रमाणभूत तरंगलांब्यांवरून अज्ञात तरंगलांब्या काढता येऊ शकतात. हे तंत्र उत्क्रांत होऊन त्यातून आधुनिक संगणक-नियंत्रित प्रकाशविद्युतीय आलेखन वर्णपटमापक पुढे आले. ⇨व्यतिकरणमापनाची तंत्रे वापरून याहून अनेकपट अचूकता साध्य होते. फाब्री-पेरॉ आणि मायकेलसन व्यतिकरणमापके ही यांपैकी दोन सर्वात सामान्य तंत्रे आहेत [→ व्यतिकरणमापन].

मीटरची सर्वात नवीन व्याख्या आता सेकंदात देतात. सिझियमाच्या आणवीय घड्याळापासून मिळणाऱ्या प्रारणाची तरंगलांबी ही लांबी मोजण्यासाठी वापरण्यास मान्यता देत नाहीत, कारण या तरंगलांबीला असणारे विवर्तनविषयक प्रश्न [→ विवर्तक जालक] गंभीर स्वरूपाचे आहेत. याऐवजी ज्यांच्या कंप्रता मोजण्यात आलेल्या आहेत, अशा कमी लांबीच्या तरंगलांबीचे ⇨लेसर यासाठी वापरतात. आता वर्णपटाच्या दृश्य भागातील कंप्रतांचेही मापन अतिशय अचुकतेने करणे शक्य आहे. म्हणून१९८३ साली मीटरची परत व्याख्या करण्यात आली, तेंव्हा वजने व मापे यांविषयीच्या परिषदेने तरंगलांबी मानके म्हणून वापरण्यास योग्य अशा निवडक स्थिरीकृत लेसरांच्या अतिशय अचुक तरंगलांब्याची यादीही दिली होती. आधी तरंगलांबीच्या मानकासाठी क्रिप्टॉन दिवा वापरीत. मात्र या नवीन तरंगलांब्या वापरून पूर्वीच्या पद्धतीपेक्षा सु. दहापट एवढी अधिक अचुकता साध्य होते.

पूर्वी मुख्यतः  दृश्य वर्णपटवैज्ञानिक उपयोगांसाठी पारा व लोखंड यांच्या रेषांसारख्या इतर तरंगलांबी मानकांचा वापर करीत. याचा वापर चांगल्या ठिकाणी चालूच राहील व इंटरनॅशनल अँस्ट्रॉनॉमिकल युनियनच्या अहवालात यांची सुधारित मूल्ये देण्यात आली आहेत. ही जुनी तरंगलांबी मानके कमी अचूक आहेत. मात्र ही मानके स्वस्त व वापरायला अधिक सोपी असल्याने ती उपयुक्त आहेत. अनुसंधान करावयाच्या वर्णपटीय रेषा रुंद असताना किंवा वर्णपटमापकाचे विभेदन [→ विभेदनक्षमता] कमी असताना इ. अनेक बाबतींत या कमी अचूक मानकांचा उपयोग करणे पूर्णपणे समर्थनीय ठरते. जेंव्हा सर्वात जास्त अचूकतेची गरज असते, अशा बाबतीतच लेसर तरंगलांबी मानके वापरण्याची आवश्यकता असते.    

लेसर कंप्रतामापनात १९७३ नंतर झालेल्या प्रगतीमुळे वर्णपटाच्या संपूर्ण अवरक्त भागात तरंगलांबी मानके प्रस्थापित झाली आहेत. याच्या जोडीला कंप्रतेच्या मापनातील अचूकताही वाढत गेली. कंप्रतामापनातील वाढलेल्या अचूकतेमुळे जेथे कमाल अचूकतेची गरज असते, तेथे हे तंत्र अनिवार्य झाले आहे. [→ तरंग गति].                           

ठाकूर, अ. ना.

पहा : अंशन व अंशन परीक्षण एकके व परिमाणे भारतीय मानक संस्था मेट्रिक पद्धति वजने व मापे.