खते : सूर्यप्रकाश, उष्णता, हवा, पाणी, जमिनीची (मातीची) संरचना व तीतील घटक इ. गोष्टी वनस्पतींच्या व पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत. यांपैकी सूर्यप्रकाश, हवा, पाणी, उष्णता ह्या गोष्टी वनस्पती मुळांवाटे व पानांवाटे घेऊ शकतात आणि बाकीचे काही पदार्थ मातीतून शोषून घेतात. तथापि त्यांना आवश्यक असणारे मातीमधील घटक सर्वत्र सारखे असत नाहीत. काही वेळा असे आवश्यक घटक मुद्दाम बाहेरून घ्यावे लागतात. सामान्यत: वनस्पती हे घटक मूळ स्वरूपात आहेत तसेच शोषण करू शकत नाहीत, तर हे घटक त्या इतर माध्यमाच्या द्वारे शोषतात. कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये वनस्पती हवा व पाणी यांच्यामार्फत मिळवितात. इतर सर्व आवश्यक व पोषक द्रव्ये वनस्पतींना मातीतून मिळतात. ज्या नैसर्गिक वा कृत्रिम रीत्या बनविलेल्या पदार्थांमार्फत वनस्पतींच्या वाढीस आवश्यक व पोषक असणारी रासायनिक मूलद्रव्ये दिली जातात, अशा पदार्थांना ‘खत’ ही संज्ञा दिली जाते. वनस्पतींना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या मूलद्रव्यांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही महत्त्वाची आहेत. त्यांशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, लोह, जस्त, मँगॅनीज, तांबे, मॉलिब्डेनम व क्लोरीन ही मूलद्रव्ये अल्प प्रमाणात दिली जातात.

इतिहास : शेणखत तसेच इतर प्राणिजन्य खतांचा उपयोग मानवाला प्राचीन काळापासून माहीत आहे. प्राण्यांच्या विष्ठेचा उपयोग करून चिनी लोकांनी जमिनीचा कस जवळजवळ ५,००० वर्षे टिकविला. तसेच भाजलेल्या हाडांचा खत म्हणून उपयोग चिनी लोक २,००० वर्षांपूर्वीपासून करीत आले आहेत. भारतातही शेणखत, राख, सोनखत, मृत प्राण्यांचे अवशेष इ. पदार्थांचा उपयोग खत म्हणून प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते हे कार्थेजियन लोकांना इ.स.पू. २०० पासून माहीत होते. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील इंका लोकांनी तर पक्ष्यांच्या मलमूत्रापासून तयार होणारा ⇨ग्वानो  हा पदार्थ मिळावा म्हणून पेंग्विनासारख्या पक्ष्यांना मारणे हा गुन्हा ठरविला होता. इ. स. पहिल्या शतकात रोमनांना पिकांची फेरपालट करून जमिनीचा कस राखणे, अम्लीय जमिनीला चुना देणे, भरखते देणे ह्या गोष्टी माहीत होत्या. हेल्माँट (१५७७–१६४४) या फ्लेमिश शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी द्रव्ये शोधण्यासाठी विलो वृक्षावर प्रयोग केले होते.

ग्लाउबर या जर्मन शास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या वाढीसाठी रसायनांचा वापर प्रथम सतराव्या शतकात केला. सॉल्ट पीटरचा (पोटॅशियम नायट्रेटाचा) उपयोग केल्यास पिकांची वाढ जोरात होते, असे त्यांना आढळून आले. इंग्लंडमध्ये डिग्बाय यांनाही तसेच आढळून आले. विविध ठिकाणचे पाणी वापरून वनस्पतींच्या वाढीबद्दलचे प्रयोग जॉन वुडवर्ड यांनी १६९९ मध्ये केले. वनस्पतींची वाढ ही जसजशी पाण्यातील अवसादाचे (न विरघळता साचून राहणाऱ्या पदार्थांचे) प्रमाण वाढत जाते तसतसा वनस्पतींच्या वाढीत फरक झाल्याचे आढळून येते. १७५०–१८०० या काळात रसायनशास्त्रज्ञांनी वनस्पतींच्या पोषक द्रव्यांविषयी संशोधन केले. स्विस रसायनशास्त्रज्ञ सोस्यूर यांनी १८०४ मध्ये वनस्पतींना लागणारा नायट्रोजन त्या जमिनीतून घेतात असे प्रतिपादन केले, पण त्यावेळी ते कोणीही विश्वासार्ह मानले नाही. १८३० मध्ये बूसँगो यांनी प्रयोग करून सोस्यूर यांचे संशोधन बरोबर असल्याचे प्रतिपादन केले. १८४० मध्ये फोन लीबिक यांनी वनस्पतींच्या वाढीस व पोषणास आवश्यक असणाऱ्या द्रव्यांसंबंधीची पुढील सहा नवी तत्त्वे प्रतिपादली : (१) जमिनीतील ह्यूमस (काळसर रंगाचा आणि मूळ संरचनेची काहीही चिन्हे नसलेला अतिशय अपघटित म्हणजे मूळ रेणूचे लहान तुकडे झालेला कार्बनी पदार्थ) हा पदार्थ वनस्पतीतील कार्बनाचे उगमस्थान असू शकत नाही, (२) त्या हवेतून कार्बन घेतात आणि हायड्रोजन व ऑक्सिजन पाण्यातून घेतात, (३) वनस्पती हवेतून अमोनियाच्या स्वरूपात नायट्रोजन घेतात, (४) पोषक द्रव्यांचे प्रमाण वनस्पतीच्या राखेच्या विश्लेषणाने मिळते, (५) वनस्पतींना आवश्यक असणारे खनिज पदार्थ त्या जमिनीतून घेतात आणि (६) त्यांना अत्यावश्यक असणारी मूलद्रव्ये जमिनीत उपलब्ध नसल्यास ती जमीन नापीक होते. आजही ही तत्त्वे प्रमाणित मानली जातात. फोन लीबिक यांनी पोटॅश व फॉस्फरस यांचा वनस्पती वाढीस कसा उपयोग होतो याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जॉन लॉझ आणि जोसेफ हेन्‍री गिल्बर्ट यांनी रोथम्पस्टेड (इंग्लंड) येथे १८४३ साली एक कृषिविषयक प्रयोगशाळा स्थापून तेथे त्यांनी सु. ५० वर्षे संशोधन केले. सुपरफॉस्फेटाचा शोध त्यांनीच लावला. लॉझ व गिल्बर्ट यांनी असे सिद्ध केले की, बहुतेक वनस्पती हवेतील मुक्त नायट्रोजन वापरू शकत नाहीत, त्यांना जमिनीतूनच संयुगांच्या स्वरूपात नायट्रोजन पुरवावा लागतो. शिंबावंत (शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या, लेग्युमिनोजी) कुलातील काही वनस्पती मात्र त्यांच्या मुळांवरील गाठींतील विशिष्ट सूक्ष्मजंतूंद्वारे हवेतून नायट्रोजन घेऊ शकतात, असे १८८६ साली हेलरीगेल आणि विलफोर्थ यांना आढळून आले.

तेराव्या शतकाच्या आधीपासून झाडांच्या राखेपासून पोटॅशियम व सोडियम कार्बोनेटे मिळविण्याची पद्धत प्रचारात होती. १८६० मध्ये जर्मनीत श्टासफुर्ट येथे कार्नेलाइटाच्या खाणी सापडल्यावर तेथील पोटॅशने जागतिक बाजारपेठ काबीज केली. पण दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने त्यावर निर्बंध घातल्यामुळे इतर राष्ट्रांत पोटॅशनिर्मिती सुरू झाली. १८८० नंतरच्या संशोधनाचे लक्ष्य आवश्यक जादा मूलद्रव्ये शोधून काढणे, खते देण्याची वेळ, वेग व पद्धत शोधून काढणे व खतांचे स्वरूप ठरविणे ह्यांवर केंद्रित केले.

वनस्पतिपोषक द्रव्ये : पृथ्वीच्या कवचातील तसेच वातावरणातील ज्ञात असणाऱ्या सर्व रासायनिक मूलद्रव्यांपैकी वनस्पतींच्या सर्वसामान्य वाढीसाठी आवश्यक व पोषक अशी अठरा मूलद्रव्ये माहीत आहेत. या मूलद्रव्यांपैकी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात असून वनस्पती ती हवेतून आणि पाण्यातून मिळवितात. त्या खालोखाल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व कॅल्शियम यांचे प्रमाण असून ती जमिनीतून घेतली जातात. मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, तांबे, लोह, मँगॅनीज, जस्त, सोडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम व क्लोरीन या मूलद्रव्यांचे प्रमाण अगदी अत्यल्प असून तीही जमिनीतून घेतली जातात.

नवनवीन रसायनांचा पोषक द्रव्य म्हणून वापर करण्यात येत असल्यामुळे ह्या यादीत आणखी काही मूलद्रव्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. वनस्पतींच्या पोषणासाठी अतिशय अत्यल्प प्रमाणात लागणारी मूलद्रव्ये ओळखण्याची समस्या बराच काळ दुर्लक्षित राहिली. कारण इतर ज्ञात पोषक द्रव्यांतील रसायनांत ही मूलद्रव्ये अपद्रव्यांच्या (अनावश्यक द्रव्यांच्या) स्वरूपात अस्तित्वात असत किंवा पुरेशा प्रमाणात विरघळून गेलेली असत.

वनस्पतीच्या सर्वसामान्य वाढीमध्ये ह्या मूलद्रव्यांना विशिष्ट जैव महत्त्व आहे. काही पोषक द्रव्ये वनस्पतीच्या संरचनेचा एक भाग म्हणून राहतात, तर इतर मूलद्रव्ये वाढीसाठी आवश्यक असूनही प्रत्यक्ष संरचनात्मक घटक होत नाहीत. बरीचशी अल्प प्रमाणातील मूलद्रव्ये ही वनस्पतींच्या वाढीचे नियंत्रण करणाऱ्या एंझाइमी (जीवरासायनिक विक्रिया घडविण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या विक्रियेच्या) तंत्राचे कार्य योग्य रीतीने चालण्यास मदत करतात असे दिसते.


वर उल्लेख केलेल्या मूलद्रव्यांपैकी एकाचीही जमिनीत उणीव असल्यास बाकीची मूलद्रव्ये शोषून त्यांचा योग्य उपयोग करणे वनस्पतींना जवळजवळ अशक्य होते. पोषक द्रव्ये जमिनीत विद्रावाच्या स्वरूपात असल्यासच वनस्पतींची मुळे ती शोषतात. सामान्यतः जमिनीत असणारी पोषक द्रव्ये अविद्राव्य (न विरघळलेल्या) स्थितीत असल्याने त्यांचा वनस्पतींना उपयोग करून घेता येत नाही. ही मूलद्रव्ये एकमेकांच्या संयोगाने कार्य करतात. जर एखादे मूलद्रव्य कमीजास्त झाले, तर समतोल बिघडतो व वनस्पतीच्या सर्व कार्यपद्धतीत बिघाड उत्पन्न होतो.

भारतातील शेतजमिनीत जैव पदार्थ व नायट्रोजन यांचे प्रमाण फार कमी आहे. जो नायट्रोजन आहे त्याच्या शोषणाचा वेग फारच मंद आहे. फॉस्फरसाचे प्रमाण कमी आढळते. मात्र पोटॅशाची कमतरता नाही. म्हणजे नायट्रोजन व फॉस्फरस यांनी युक्त असलेली खते पिकांना देणे आवश्यक ठरते.

खतांची गरज ठरविणे : आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या पिकांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी जमिनीची उत्पादनक्षमता, पोषक द्रव्यांचा अभाव दर्शविणारी लक्षणे, जमिनीची व वनस्पतीची परीक्षा (विश्लेषण), मृदा प्रकार, पिकांच्या वाढीसंबंधी केलेले प्रत्यक्ष शेतीतील प्रयोग ह्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते.

(१) जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याचे मानवाचे प्रयत्न फार मर्यादित आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम ही मूलद्रव्ये पिकांनी जमिनीतून काढून घेतल्यावर परत त्यांची जमिनीत भरती करणे आवश्यक असते. तसेच जमिनीची संरचना टिकविण्यासाठी तिची योग्य पद्धतींनी व योग्य वेळी मशागत करणे तसेच तिच्यामध्ये भरखते घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे न केल्यास जमिनीतून पोषक द्रव्ये आवश्यक त्या प्रमाणात पुढील पिकास मिळणार नाहीत. भारतातील जमिनीतून महत्त्वाची पिके नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम किती प्रमाणात काढून घेतात हे कोष्टक क्र. १ वरून दिसून येईल.

कोष्टक क्र. १. महत्त्वाच्या पिकांमध्ये असलेली पोषक द्रव्ये (किग्रॅ. मध्ये)

पिकाचे नाव

उत्पन्न (दर हेक्टरी)

प्रत्येक हेक्टर जमिनीतून काढून घेतलेली मूलद्रव्ये

नायट्रोजन

फॉस्फरस

पोटॅशियम

भात 

गहू 

ज्वारी 

बाजरी 

ऊस 

भुईमूग 

कापूस 

तंबाखू 

२,२४२·८० 

१,६८२·१० 

१,६८२·१० 

१,१२१·४० 

८९,७१२·०० 

२,२४२·८० 

४४८·५६ 

१,६८२·१० 

४४·८० 

६७·२० 

५६·०० 

३९·२२ 

११२·०० 

८९·७१ 

३३·६० 

१००·९२ 

३३·६० 

२८·०३ 

१६·८२ 

२०·४० 

२८·०३ 

२८·०३ 

१६·८० 

६७·२८ 

८९·७१ 

७८·४० 

१०६·५३ 

६७·२० 

२२४·०० 

५६·०६ 

४४·८० 

११२·१४ 

(२) पोषक द्रव्यांची न्यूनता दर्शविणारी लक्षणे : (पहा : कोष्टक क्र. २). काही पोषक द्रव्यांची न्यूनता दर्शविणारी लक्षणे बऱ्याच वनस्पतींमध्ये सहज दिसतात. तज्ञ व अनुभवी मनुष्य ह्या लक्षणांवरून कोणती पोषक द्रव्ये देणे आवश्यक आहे हे ठरवू शकतो. तथापि या पद्धतीत काही दोष आहेत. काही वनस्पतींत ओळखू येण्यासारखी लक्षणे कधीच दिसत नाहीत. काही वेळा लक्षण दिसण्यापूर्वीच खताचा योग्य परिणाम होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा लक्षण ओळखले जाईपर्यंत उशीर झाल्यामुळे उत्पादनातील घट थांबवणे शक्य होत नाही.

(३) मृदा परीक्षा : अनुभवी मृदा तज्ञाने काळजीपूर्वक केलेली जमिनीची प्रातिनिधिक परीक्षा व तीवरून काढलेले अनुमान हे जमिनीचा कस टिकविण्यासाठी करावयाची उपाययोजना निश्चित करण्यास फार उपयुक्त ठरते. अशा परीक्षेमुळे जमिनीच्या उत्पादनक्षमतेची मर्यादा समजते. अशा परीक्षा बरीच वर्षे केल्यास क्षमता कमीजास्त होते की तशीच राहते हेही समजते [→ मृदा].

(४) वनस्पती परीक्षा : मृदा परीक्षेमुळे जमिनीची क्षमता व घटक समजतात. पण ते घटक वनस्पतींमध्ये आवश्यक त्या प्रमाणात शोषले जातात की नाही हे समजत नाही.नाही. एखादे विशिष्ट लक्षण दिसण्यापूर्वी जर ऊतक (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहाची) परीक्षा केल्यास कोणत्या पोषक द्रव्यांचा अभाव आहे हे कळते. या परीक्षेत रासायनिक द्रव्यांच्या साहाय्याने पानांतील पोषक द्रव्ये काढून घेतात व परीक्षेमध्ये आढळून येणाऱ्या रंगांतील भिन्नतेवरून कोणत्याही विशिष्ट पोषक द्रव्याचे प्रमाण ठरविले जाते. ⇨ वर्णलेखन  पद्धतीही पोषक द्रव्यांची न्यूनता ठरविण्यासाठी वापरली जाते.

(५) मृदेचे वर्गीकरण : जगातील बऱ्याच महत्त्वाच्या जमिनींचे नकाशे तयार मिळतात. त्यांतील वर्णनावरून जमिनीची पोषण क्षमता व तीतील घटक यांची माहिती मिळते [→ मृदा].

(६) कृषिक्षेत्रातील प्रयोग : प्रत्यक्ष शेतामध्ये खते वापरून पिकांच्या वाढीविषयी केलेले प्रयोग फार महत्त्वाचे आणि उपयुक्त असतात. मोठ्या क्षेत्रात प्रयोग करणे खर्चाचे असते, त्यामुळे बऱ्याच वेळा कमी क्षेत्रात व सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) पद्धती वापरून हे प्रयोग करण्यात येतात.

खतांचे विश्लेषण, प्रत व प्रमाण : नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ह्या तीन महत्त्वाच्या मूलद्रव्यांपैकी कोणतेही एक किंवा अधिक मूलद्रव्य खतामध्ये असल्यास त्यास मिश्रखत असे म्हणतात. मिश्रखतांमधील पोषक द्रव्यांचा प्रमाणित क्रम नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम असा आहे. खतांमधील घटकांचे एकूण नायट्रोजन, उपलब्ध फॉस्फरस ॲनहायड्राइड (P2O5) व जलविद्राव्य पोटॅशियम ऑक्साइड (K2O) यांमधील शेकडा प्रमाण ह्यास खताचे विश्लेषण किंवा प्रत असे म्हणतात. उदा., १२—१२—१२. खत उद्योगात P2Oम्हणजे फॉस्फोरिक अम्ल व K2O म्हणजे पोटॅश असे  मानले जाते. ह्या संज्ञा १८८० सालापासून वापरात आहेत. काही यूरोपीय देशांत हे प्रमाण मूलद्रव्यांमध्ये दिले जाते. विशिष्ट जमिनीला आणि पिकाला देण्यात येणाऱ्या खताची शिफारस ही आवश्यक प्रमाणाच्या स्वरूपात केली जाते. हे प्रमाण नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांचे मिश्रखतांतील परस्परांशी प्रमाण असते. काही वेळा त्यात इतर पोषक द्रव्यांचे प्रमाणही दिले जाते. १९३० पर्यंत बाजारात विकली जाणारी खते घन स्वरूपातच होती. पण १९३० मध्ये निर्जल अमोनिया वायूचा खत म्हणून व १९५० मध्ये द्रवरूप मिश्रखते वापरण्यात आली.

कोष्टक क्र. २. पोषक द्रव्यांच्या न्यूनतेमुळे दिसणारी लक्षणे

पोषक द्रव्य 

न्यूनतेमुळे दिसणारी लक्षणे 

नायट्रोजन

वनस्पतीची वाढ खुंटते रंग फिक्कट पिवळा होतो पाने वनस्पतीच्या तळापासून फुटतात व त्यांच्या कडा लालसर करड्या होतात. 

 फॉस्फरस 

मुळांची वाढ खुंटते वनस्पतींचा रंग जांभळा होतो खोड तर्कूसारखे (सुताच्या चातीसारखे) होते वनस्पतीचा पक्वता काल लांबतो. 

पोटॅशियम

पानांच्या कडा करपल्यासारख्या दिसतात देठ दुर्बल होतात बिया व फळे आकसल्यासारखी दिसतात. 

 कॅल्शियम 

पानांच्या कडांवर विविध आकार दिसतातटोकाच्या कळ्या मरतात फुलांच्या पाकळ्या अकाली गळतात. 

 मॅग्नेशियम 

पाने पातळ व ठिसूळ बनतात पानांच्या कडांवरील व शिरांमधील जागेचा रंग जातो. 

गंधक 

खालची पाने रंगाने पिवळी होतात मुळे व देठ यांचा व्यास लहान होतो. 

 बोरॉन 

टोकाच्या कळ्या फिकट हिरव्या होतातमुळांवर गडद ठिपके दिसतात देठ चिंबतात. 

तांबे 

वनस्पतीचा रंग ठिकठिकाणी नष्ट होतो. लिंबू—गटातील वनस्पतींत लालसर करडा रंग दिसतो. 

लोह 

पाने पिवळी होतात पण शिरा हिरव्याच राहतात पाने वरच्या बाजूस वळतात. 

मँगॅनीज 

लक्षणे लोहाप्रमाणे पानातील मृत ऊतके गळून पडतात. 

मॉलिब्डेनम  

 

जस्त 

लक्षणे नायट्रोजनाप्रमाणे.

 

टोकाची पाने खुजी (लहान) होतात पानांना विविध आकार येऊन काही भाग मरतो कळ्या कमी होतात.


खताच्या वापरातील धोके व इजा : संशोधन व प्रयोग यांवरून काढलेले अनुमान व त्यानुसार दिलेल्या सल्ल्याप्रमाणे खताचा वापर केल्यास त्याचा जमीन, पिकांचे उत्पादन व प्रत यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. तसेच अशा पिकांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ खाण्यामुळे माणसांवर किंवा जनावरांवर वाईट परिणाम होत नाही. तथापि कधीकधी शेतकरी पिकाच्या गरजेपेक्षा जादा खत देतात त्यामुळे पिकाचे नुकसान होते व ती खाणाऱ्या मनुष्य—प्राण्यांवरही त्याचा अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते.

अननुभवी माणसाने आपल्या हिरवळीस अगर बागेतील भाजीपाल्यास खत दिले, तर त्यांवर तपकिरी किंवा करप्यासारखे ठिपके उठतात. खताचा प्रमाणाबाहेर उपयोग किंवा एका वेळेस पेरलेल्या बियांलगत किंवा वनस्पतीलगत खताची मोठी मात्रा दिल्यास काही वनस्पती मरून जातात व बाकीच्यांची वाढ खुंटते. अशा वेळी पिकाचे उत्पादन जरी घटले नाही, तरी त्याच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. उसाला प्रमाणापेक्षा जास्त नायट्रोजन दिला, तर गुळाचा रंग लालसर होतो, गोडी कमी होते व मळीचे प्रमाण वाढते. बटाट्याला प्रमाणाबाहेर नायट्रोजन व पोटॅशियम दिल्यास त्यातील शुष्क द्रव्याचे प्रमाण कमी होते. शर्करा—कंदास (शुगर बीट) नायट्रोजन जास्त प्रमाणात दिला, तर त्यातील साखरेचे प्रमाण घटते व साखरेचे निष्कर्षण (योग्य पद्धतीने साखर निराळी करणे) अवघड होते. अती नायट्रोजनामुळे तंबाखूची प्रत खालावते. तृणधान्यांची भरमसाठ वाढ होऊन ती जमिनींवर लोळतात.

गवताला त्याच्या गरजेपेक्षा जादा पोटॅशियम दिल्यास जादा शोषण केलेल्या पोटॅशियमामुळे जनावरांत पोषण—विकार होण्याची शक्यता असते. गवत व हिरव्या पालेभाज्या पक्वतेपूर्वी काढल्या, तर त्यांत सामान्यत: जादा मुक्त नायट्रेट असते. अशा पिकांना भरमसाठ नायट्रोजन दिला, तर ती खाणाऱ्या जनावरांना व बालकांना पचन-विकार होण्याची शक्यता असते.

वनस्पतींना उपयुक्त असणाऱ्या पोषक द्रव्यांनी पाणी समृद्ध झाले, तर त्याच्यावर संस्करण करणे फार अवघड होते व अशा पाण्यातील मासे मेल्याचे आढळून आले आहे. अशा पाण्याच्या तळ्यांत, प्रवाहात व इतरत्र शैवले व अन्य जल वनस्पतींची विपुल वाढ होते.

खतांचा अन्न-वनस्पतींवर होणारा परिणाम : पशुधन व मानव यांचे अन्न असलेल्या वनस्पतींवर खतांचा अनेक प्रकारे परिणाम होत असतो. (१) उत्पन्न वाढते व त्यामुळे उपलब्ध वनस्पतींचे प्रमाण वाढते, (२) जमिनीत वेगवेगळ्या जातींची पिके घेणे शक्य होते व (३) खनिजे, जीवनसत्त्वे, प्रथिने इत्यादींच्या प्रमाणानुसार वनस्पतींच्या व्यक्तिगत जातीचे रासायनिक संघटन बदलते. खनिज संघटनावर होणाऱ्या खतांच्या परिणामासंबंधी उपलब्ध असलेल्या माहितीच्या मानाने जीवनसत्त्वे, प्रथिनांची प्रत आणि हॉर्मोने [जीवरासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणारे पदार्थ,  → हॉर्मोने] यांवर होणाऱ्या परिणामासंबंधीची माहिती फारशी उपलब्ध नाही. संशोधनावरून असे निदर्शनास आले आहे की, या बाबतीत मृदा घटकांपेक्षा जलवायुमानाचे (दीर्घकालीन सरासरी हवामानाचे) घटक जास्त परिणामकारक असतात.

चरणाऱ्या जनावरांना त्यांचे खाद्य प्रत्यक्ष जमिनीतून मिळत असते त्यामुळे जमिनीची सुपीकता व खते यांच्याशी निगडीत असलेल्या पोषण उणिवा अशा जनावरांत सामान्यत: दिसून येतात. चाऱ्याच्या पिकांत फॉस्फरसाचे अत्यंत अल्प प्रमाण ही चरणाऱ्या जनावरांमध्ये सर्वत्र आढळणारी व आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची पोषण समस्या आहे. दक्षिण आफ्रिकेतील चाऱ्यात फॉस्फरस व कॅल्शियम यांच्या उणिवेमुळे जनावरांचा ‘स्टिफसीक्टी’ नावाचा रोग होतो. कोबाल्टाची उणीव जगाच्या बऱ्याच भागांत आढळते. दूध, लोणी, मांस व इतर प्राणिजन्य पदार्थ यांचा मानवाच्या आहारात भरपूर समावेश असतो, त्यामुळे खते व जमिनीची सुपीकता यांचा पशुधनाच्या उत्पादनावरील परिणाम ही महत्त्वाची बाब आहे. खते व जमिनीची सुपीकता यांचा प्रत्यक्ष परिणाम मानवापेक्षा पशुधनावर जास्त होतो. याचे कारण म्हणजे मानव बहुधा वनस्पतीची जी फळे व धान्य खातो, त्यांवर खोड व पाने यांच्यापेक्षा जमिनीच्या सुपीकतेचा त्या मानाने कमी परिणाम होतो, तर खोड व पाने हीच पशुधनाच्या आहारात जास्त प्रमाणात असतात. आयोडिनाच्या उणिवेमुळे होणारा गलगंड हा विकार हे जमीन व मानवी आरोग्य यांच्यातील प्रत्यक्ष संबंधाचे उत्तम उदाहरण होय. सूक्ष्मजंतू, गांडूळ आणि जमिनीतील इतर जीव यांवरील खताचे परिणाम हीसुद्धा महत्त्वाची बाब आहे. खतांचा योग्य प्रमाणात वापर केला तरच ती धोकादायक नसतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

खत देण्याची पद्धत : दिलेल्या खताचा भरपूर फायदा व्हावा म्हणून ते योग्य वेळी व योग्य ठिकाणी देणे आवश्यक असते. खताचे स्वरूप, जमिनीचा प्रकार व पिकाचे स्वरूप तसेच त्याची पोषण द्रव्यांची गरज यांनुसार खत देण्याची पद्धत व वेळ बदलतात. पिकाला नायट्रोजनयुक्त खतांची गरज त्याच्या वाढीच्या सर्व काळात असते. ही खते पाण्यात विद्राव्य असल्यामुळे जमिनीत लवकर मुरून जातात. म्हणून अशा खताची सर्व मात्रा एकदम न देता थोडी थोडी हप्त्याने  देतात. सुरुवातीच्या मुळांच्या विकासाच्या काळात व वाढीच्या काळात फॉस्फरसाची गरज असते. यामुळे वनस्पतीचे वजन जेव्हा तिच्या शुष्क वजनाच्या / होते त्यावेळी ती फॉस्फरसाच्या एकूण गरजेच्या / फॉस्फरस उपयोगात आणते. फॉस्फरसयुक्त खतातून पिकांना फॉस्फरसाचा पुरवठा हळू होतो. सुपरफॉस्फेटाच्या बाबतीतही ही गोष्ट चांगली प्रत्ययास येते. म्हणून फॉस्फरसयुक्त खतांची सर्व मात्रा पेरणीपूर्वी अगर लागवडीपूर्वी देतात. पोटॅशाचे वर्तन अंशत: नायट्रोजनासारखे व अंशत: फॉस्फरसासारखे असते. नायट्रोजनाप्रमाणे वाढीच्या सर्व काळात त्याचे शोषण होते. तथापि फॉस्फरसयुक्त खताप्रमाणे ते पिकाला हळू मिळते. म्हणून पेरणीच्या वेळेला अगर पूर्वी पोटॅशयुक्त खताची सर्व मात्रा देतात.

घनरूप खत देण्याची पद्धती  : विकिरण : यामध्ये सर्व खत शेतात सर्वत्र एकसारखे देतात. हे जमीन नांगरण्यापूर्वी, पेरणीपूर्वी काही काळ किंवा उभ्या पिकालाही देतात. पेरणीच्या वेळी खत देणे व उपरिवेशन असे याचे दोन प्रकार आहेत. पेरणीच्या वेळी खत देताना ते सर्वत्र एकसारखे व जमिनीत खोलवर दिले जाते. यावेळी खताची मोठी मात्रा देता येते. उभ्या पिकाला खत देण्याच्या पद्धतीस उपरिवेशन म्हणतात. विशेषत: भात, गहू इत्यादींसारख्या दाट पिकांना नायट्रोजनयुक्त खतांचे उपरिवेशन करतात. कुरणांना फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त खतांचे उपरिवेशन करतात. उपरिवेशनाच्या वेळी खत ओल्या पानांवर पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते, नाहीतर त्यामुळे करचळण (पोळण्यासारखी क्रिया) होते. ही भीती फॉस्फरसयुक्त खतापेक्षा नायट्रोजनयुक्त व पोटॅशियमयुक्त खतांच्या बाबतीत जास्त असते. न्यूझीलंड व अमेरिकेत उपरिवेशनासाठी विमानाचा उपयोग करतात.


या पद्धतीत बी, रोप आणि वाढणारी वनस्पती यांच्या ठिकाणाचा विचार न करता खत दिले जाते. यामध्ये (१) नांगराच्या तासात तळाला व अखंड पट्ट्यात खत देतात. यामुळे खत ओल्या जमिनीत पडून उन्हाळ्यात ते पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध होते. भारी चिकण जमिनीला अशा पद्धतीने खत देतात. (२) खोल जागी खत देण्याची पद्धत जपानमध्ये भाताला नायट्रोजनयुक्त खत देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. भारतातही या पद्धतीचा आता वापर करण्यात येतो. या पद्धतीमुळे मुळांच्या पट्ट्यात खत एकसारखे पसरले जाते व ते पृष्ठभागावरून जात नाही. (३) तळजमिनीत खत देण्यासाठी फार शक्तिमान यंत्राचा वापर करतात. आर्द्र व अर्धार्द्र भागातील खूप अम्लीय तळजमिनींना खत देण्यासाठी या पद्धतीची शिफारस करतात. या पद्धतीने विशेषत: फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त खते देतात. त्यामुळे मुळांचा चांगला विकास होतो.

स्थानीय खत देणे : या पद्धतीत खत जमिनीत बी किंवा वनस्पतीच्या जवळ देतात. खताची सापेक्षत: अल्प मात्रा द्यावयाची असेल तेव्हा या पद्धतीचा अवलंब करतात. या पद्धतीने फॉस्फरस व पोटॅशियम यांचे स्थिरीकरण (स्थिरावणे) कमी होते. अशा पद्धतीने खत देण्यासाठी विविध तऱ्हा वापरात आहेत. (१) खत आणि बी पेरणी : यामध्ये खत व बी एकाच वेळेस पेरतात. त्यामुळे खत व बी एकाच फणात पडतात. गहू, ज्वारी, बाजरी, कापूस इ. पिकांना या पद्धतीने फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त खते देणे सोईचे होते. परंतु या पद्धतीने खत दिल्यास पिकाच्या उगवणीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. तूर, हरभरा, घेवडा, वाटाणा या पिकांना या पद्धतीने सहसा खत देत नाहीत. (२) पट्टा पद्धती : यामध्ये अखंड किंवा खंडित पट्ट्यात बियांलगत खत देतात. आळे किंवा बांगडी व ओळ असे याचे प्रकार आहेत. जेव्हा पिकाची लागवड १ ते ३ मी. अंतरावर करतात तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूंनी किंवा बांगडी पद्धतीने खत देतात. केळी, पपई, संत्री, मोसंबी, नारळ, सफरचंद इ. पिकांना अशा प्रकारे खत देण्याची पद्धत प्रचलित आहे. ओळ पद्धतीत खत पिकांच्या दोन ओळींमध्ये अखंड पट्ट्यात देतात. ऊस, बटाटा, तंबाखू, कपाशी व भाजीपाला अशा पिकांना या पद्धतीने खत देतात. (३) पार्श्ववेशन : यामध्ये झाडांच्या ओळींमध्ये किंवा भोवती खत देतात. तसे पाहता या पद्धतीत खत देण्याच्या विविध प्रकारांचा एकत्रित समावेश होतो. बांगडी पद्धत व ओळ पद्धत हे त्यातील सामान्य प्रकार आहेत.

द्रवरूप खत देणे : प्रगत देशांत द्रवरूप खत देण्याच्या पद्धतीला बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पद्धतीचे चार प्रकार आहेत. (१) प्रारंभक विद्राव : सामान्यत: N—P2O5 — K2O यांच्या १ : २ : १ आणि १ : १ : २ प्रमाणातील विद्रावात भाजीपाल्याची रोपे बुडवून लावतात. त्यामुळे खताची अल्प मात्रा दिली जाते. तसेच पोषक द्रव्ये मुळांना लगेच मिळतात आणि त्यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे रोपांना इजा होत नाही. या पद्धतीत मजुरी वाढते व फॉस्फरसाचे स्थिरीकरण जास्त होते. (२) खताचा फवारा : या पद्धतीत खताचा फवारा पानांवर देतात. यामध्ये कोणत्याही एक किंवा अधिक पोषक द्रव्यांचा अल्प प्रमाणातील फवारा देतात. त्यामुळे ती पिकाला लवकर उपलब्ध होतात. मात्र खताचे प्रमाण जास्त झाल्यास पानांचे करचळण होण्याची भीती असते. गहू, ऊस यांसारख्या पिकांवर यूरियाचा फवारा देणे भारतात प्रचलित झाले आहे. (३) जमिनीत द्रवरूप खत देणे : खास अवजारांच्या साहाय्याने निर्जल अमोनिया आणि द्रवरूप नायट्रोजन जमिनीत घालतात. खत बियांच्या खाली सु. १० सेंमी. दिले, तर पिकाला इजा होत नाही व अमोनियाही वाया जात नाही. या पद्धतीने स्वस्त नायट्रोजनाचा वापर करण्यात येतो. अमेरिकेत ही पद्धती फार लोकप्रिय आहे. क्वीन्सलँड (ऑस्ट्रेलिया) येथे उसाला या पद्धतीने खत देतात. (४) सिंचाई – पाण्यातून खत देणे : यामध्ये पाण्यात विद्राव्य सरळ किंवा मिश्रखते पाटाच्या पाण्यात टाकतात. त्यामुळे जमिनीला खताचा विद्राव मिळतो. यासाठी जादा मजुरी लागत नाही. सामान्यत: नायट्रोजनयुक्त खते या पद्धतीने देतात.

खतांचे प्रकार : खते दोन प्रकारांची आहेत. (१) नैसर्गिक आणि (२) कृत्रिम रीत्या बनविलेली व रासायनिक. पहिल्या प्रकारात शेणखत, राख, सोनखत, कंपोस्ट, ग्वानो, वाहितमल (सांडपाणी), हिरवे खत, पेंड, रक्त, हाडे, मासे इ. खतांचा समावेश होतो. ही खते घन स्वरूपात वापरतात. दुसऱ्या प्रकारात नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त व पोटॅशियमयुक्त आणि इतर पोषक द्रव्यांनी युक्त खतांचा समावेश होतो. ही खते घन, द्रव व वायू स्वरूपांत वापरतात. शिवाय ही खते, पहिल्या प्रकारच्या खतांशी विशिष्ट प्रमाणात मिसळून मिश्रखते तयार करण्यात येतात. अशी खते दाणेदार स्वरूपातही तयार करतात.

नैसर्गिक खते : वनस्पतिजन्य पदार्थ, प्राण्यांचे मलमूत्र व शेतातील टाकाऊ पदार्थ यांच्या अपघटनाने (मूळ रेणूचे लहान तुकडे झाल्याने) तयार होणाऱ्या पदार्थांस नैसर्गिक खते किंवा भरखते असे म्हणतात. ही खते जमिनीची उत्पादकता वाढवितात. जमिनीत त्यांचे पुढे अपघटन होते व त्यामुळे सुपीकतेत वाढ व मृदेच्या संरचनेत फरक होतो. तसेच मशागतीस फायदा होतो. भरखतामुळे मृदेची जलशोषकता वाढते, तसेच मृदेची धूप होण्यास, ती उष्णतेमुळे कडक होण्यास वा तिचे पोपडे होण्यास रोध होतो. मृदेच्या पृष्ठभागावर भरखत फवारल्यास बाष्पीभवनाने होणारा आर्द्रतेचा ऱ्हास कमी होतो.

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांपासून मिळणाऱ्या व विविध संघटन असलेल्या काळसर व सापेक्षत: स्थिर असलेल्या पदार्थास ह्यूमस म्हणतात. भरखते भरपूर प्रमाणात वापरल्यास मृदेतील ह्यूमसाची पातळी कायम राखण्यास मदत होते. ह्यूमसाचे सूक्ष्मजैविक व रासायनिक विक्रियांमुळे अपघटन होऊन त्यांपासून वनस्पतींना आवश्यक अशी पोषक द्रव्ये आवश्यक त्या प्रकारात तयार होतात. मृदेतील सेंद्रीय पदार्थांमुळे सूक्ष्मजंतूंना आवश्यक असे अन्न पुरविले जाते व त्यामुळे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच त्यामुळे पोषक द्रव्ये मृदेत राखण्यास व ती पावसामुळे मुरण्यास मदत होते. भरखतांमुळे मृदेतील उष्णतेचे नियंत्रण होण्यास, वनस्पतींना अपायकारक असलेल्या पदार्थांचा विषारीपणा नष्ट करण्यास, पोषक द्रव्यांच्या स्थिरीकरणास विलंब होण्यास इ. प्रकारे मदत होते.

वनस्पतींना लागणाऱ्या एकूण नायट्रोजनापैकी आणि फॉस्फरसापैकी ९०% नायट्रोजन व ५०%फॉस्फरस त्या भरखतांतून घेतात, असे आढळून आले आहे. तसेच इतर काही पोषक द्रव्येही त्यातून मिळतात. रासायनिक खतांशी तुलना करता भरखतांतून पोषक द्रव्ये कमी प्रमाणात तसेच मृदेत त्यांचे अपघटन सुरू झाल्यावरच मिळतात.

भरखतांचे त्यांच्या वापरानुसार दोन गट पडतात. (१) मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारी. उदा., शेणखत, कंपोस्ट, सांडपाणी, हिरवे (हिरवळीचे) खत इ. ह्यांपासून पोषक द्रव्ये सापेक्षत: कमी प्रमाणात मिळतात, पण त्यांच्यामुळे ह्यूमसाचे प्रमाण वाढते. (२) संहत (आवश्यक घटकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या) स्वरूपाची भरखते. उदा., पेंड, रक्त, हाडे, मासे, ग्वानो इ. भरखतांमध्ये मिळणाऱ्या पोषक द्रव्यांचे प्रमाण कोष्टक क्र. ३ मध्ये दाखविले आहे.


शेणखत : जनावरांच्या गोठ्यातून मिळणाऱ्या शेण, जनावरांना आंथरलेले गवत, टाकाऊ चारा, मूत्र इ. अपशिष्ट (टाकाऊ) पदार्थांपासून शेणखत तयार केले जाते. काही वेळा मूत्र एखाद्या टाकीत गोळा करून नंतर इतर पदार्थांत मिसळले जाते किंवा ते शोषून घेतले जाईल अशा पदार्थांचे आच्छादन जनावरांच्या खाली घालण्यात येते. ह्या सर्व पदार्थांचे ढीग करून ते कुजवितात. अशा ढिगामध्ये सूक्ष्मजैविक क्रिया जोरदार होऊन उष्णता निर्माण होते. तसेच बरेच उष्णतास्नेही (ज्यांना वाढीसाठी ४५ ते ६५ से. तापमान लागते असे) सूक्ष्मजंतू, ॲक्टिनोमायसीटीज व इतर कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) तयार होतात. अपशिष्टात असणाऱ्या तणांच्या बियांचा ह्या उष्णतेमुळे नाश होतो. शेणखत पूर्वापार पद्धतीने तयार केले, तर त्यात पोषक द्रव्ये कमी प्रमाणात असतात. परंतु ते काळजीपूर्वक तयार केले, तर त्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाण तिपटीने देखील वाढू शकते.

शेणखतातील नायट्रोजनाचे प्रमाण जास्तीत जास्त ठेवण्याकडे व सूक्ष्मजैविक अपघटनामुळे त्याचा अमोनियाच्या स्वरूपातील क्षय कमी होण्याकडे लक्ष देणे जरूर असते. मूत्र सामान्यतः लवकर अपघटित होते. सुपरफॉस्फेटाच्या वापराने या क्षयाचे प्रमाण कमी होते. फक्त चांगले कुजलेले शेणखत शेतीसाठी वापरले जाते. असे खत पावसापासून सुरक्षित व उत्तम जमीन केलेल्या बंदिस्त व कमी आर्द्रता असलेल्या जागेत ठेवले जाते. कृत्रिम खतांच्या मानाने भारतात शेणखत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

शेणखत तयार करण्यासाठी गोठ्यातून मिळणारे सर्व पदार्थ ०·९ X ०·९  X ४·५ मी. मापाच्या खड्ड्यात पसरतात. नायट्रोजन अमोनियाच्या रूपात निघून जाऊ नये म्हणून खड्ड्यात त्यावर सुपरफॉस्फेटाचा एक थर देतात किंवा गोठ्यातील गटारात व टाक्यांत टाकतात. खड्ड्यातील सर्व पदार्थांची उंची जमिनीच्या वर अर्धा मी. झाल्यावर त्यावर मातीचा जाड थर देतात. त्यामुळे आत ओल राहते व माश्यांचा उपद्रव होत नाही. कुजण्याची क्रिया ३ ते ५ महिन्यांत पूर्ण होते. पण ह्या क्रियेत २५ –३० % सेंद्रीय पदार्थांचा ऑक्सिडीकरणाने [ →  ऑक्सिडीभवन]  नाश होतो. हे खत गडद खाकी रंगाचे, चूर्णरूपी व वासहीन असते. गोबर वायू प्रक्रियेने शेणातील वायू काढून घेतल्यावर उरलेल्या पदार्थात भरपूर नायट्रोजन असतो व ते खत म्हणून वापरण्यास फारच चांगले असते [→ गोबर वायु].

कोष्टक क्र.३. भरखतांमध्ये मिळणारी पोषक द्रव्ये व त्यांचे शेकडा प्रमाण

भरखताचे नाव

नायट्रोजन

N

फॉस्फरस

P2O5

पोटॅश

K2O

(अ) राख

१. कोळशाची राख

२. लाकडाची राख

३. चुलीमधील राख

४. गुऱ्हाळातील राख

 

०·६

०·१

०·५–१·५

०·१५

 

०·५

२·५

१·५–३·५

१·०–२·५

 

०·५

४·५

२·५–५·००

१·५–६·००

(आ) मलोत्सर्ग

१. मैला ( ताजा)

२. शेण (ताजे)

३. मेंढ्यांच्या लेंड्या

४. मानवी मूत्र

५. जनावरांचे मूत्र

 

०·८–१·५

०·५–०·८

०·५–१·००

०·५–१·००

०·८–१·५

 

०·५–१·००

०·१–०·२

०·२–०·५

०·१–०·३

अत्यल्प

 

०·२–०·५

०·३–०·५

०·३–१·०

०·२–०·३

०·५–१·०

(इ) कंपोस्ट

१. शहरातील कंपोस्ट

२.खेड्यातील कंपोस्ट

३. शेणखत

 

०·७–१·७

०·५–१·५

०·५–१·०

 

१·०–३·०

०·४–१·०

०·३–१·०

 

१·०–४·०

०·५–३·५

०·५–३·०

(ई) वाहितमल

१. प्रक्रियित साका(सुका)

२. निचरित साका (सुका)

 

५·०–६·०

२·०–२·५

 

३·०–३·५

१·०–१·२

 

०·५–०·७

०·४–०·५

(उ) पेंड

१. करंज

२. एरंड

३. सरकी

४. अळशी

 

३·९–४·०

५·५–५·६

३·९–४·०

५·५–५·६

 

०·९–१·०

१·८–१·९

१·७–१·८

१·४–१·५

 

१·२

१·०–१·१

१·७–१·८

१·२–१·३

(ऊ) हिरवे खत

१. ताग

२. कुळीथ

३. धैंचा

४. चवळी

 

०·५

१·०

०·४

०·९

 

०·३

०·२

०·१

 

०·४

०·५

०·५

(ए) (ग्वानो)

७·०–८·०

११·०–१४·०

२·०–३·०

(ऐ) रक्त (शुष्क)

१०·०–१२·०

१·०–१·५

०·६–०·८

कंपोस्ट : वनस्पती व प्राणी यांची अपशिष्टे व्यवस्थित मिसळून व अपघटित करून मिळालेल्या खत मिश्रणास कंपोस्ट असे म्हणतात. दिसावयास ते शेणखतासारखे दिसते. कंपोस्ट तयार करण्यासाठी वापरलेल्या पदार्थांच्या संघटनेवर त्याचे पोषण मूल्य अवलंबून असते. कार्बोहायड्रेटांच्या तुलनेने कंपोस्टात नायट्रोजनाचे प्रमाण कमी असते म्हणून अकार्बनी नायट्रोजनयुक्त व फॉस्फेटी खतांबरोबर मिसळून ते वापरले जाते. शेणखत भरपूर प्रमाणात मिळू शकत नाही त्या ठिकाणी कंपोस्टांचा उपयोग करण्यात येतो. पाने, पेंढा, गवत, तण, कोंडा, टरफले, तृणधान्याच्या पिकांची ताटे, घरातील केरकचरा व काहीवेळा जनावरांचे मलमूत्र अशा पदार्थांचा खेड्यांतून कंपोस्टसाठी वापर करतात, तर शहरांतून मैला व रस्त्यावरील केरकचरा त्यासाठी वापरतात.

अपशिष्टाचे सूक्ष्मजैविक क्रियेने अपघटन होऊन उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे तापमान १५ –२७ सें. पर्यंत चढते. सुरुवातीला अपशिष्टात जरूर तितका आवश्यक ओलसरपणा व खेळती हवा असणे आवश्यक असते. त्यामुळे माश्यांच्या अळ्या इत्यादींचा नाश होतो. तणांच्या बियांवरही परिणाम होतो. मूळ पदार्थांतील नायट्रोजनाच्या मोठ्या भागाचे व फॉस्फरसाच्या काही भागाचे वनस्पती घेऊ शकतील अशा स्वरूपात रूपांतर होते.

सर्व अपशिष्ट शेणखताप्रमाणेच लांब चरात थर करून भरतात. कुजण्याची क्रिया चांगली व्हावी म्हणून प्रत्येक थरावर शेणकाला पसरणे आवश्यक असते. नायट्रोजन व चरातील आर्द्रता कमी होऊ नये तसेच दुर्गंधी व माशा यांपासून त्रास होऊ नये म्हणून चर पूर्ण भरल्यावर त्यावर मातीचा थर टाकतात. अपशिष्टात नायट्रोजनयुक्त पदार्थ कमी असल्यास ढिगात सूक्ष्मजैविक क्रिया घडण्यासाठी जनावरांचे मूत्र किंवा नायट्रोजनयुक्त संयुगे मिसळतात. अगोदर कुजलेले कंपोस्ट किंवा बागेतील जमिनीवरील माती काही वेळा मिसळतात. अम्लता वाढू नये म्हणून चुना मिसळतात. सर्व ढीग न हालविता ३-४ आठवडे तसाच ठेवतात. नंतर तो ढीग वरखाली हालवून त्याचा परत ढीग करतात. कंपोस्ट ३–६ महिन्यांत तयार होते.


शहरातील केरकचरा व अपशिष्ट यांपासून खंदकात किंवा खड्ड्यात कंपोस्ट तयार करतात. जलप्रवाहात आणि दलदलीत वाढणाऱ्या त्रासदायक हायसिंथ तणापासून कंपोस्ट तयार करता येते. याकरिता हे तण गोळा करतात, उन्हात अंशत: वाळवतात व त्यात जनावरांचे मलमूत्र मिसळतात.

हिरवे खत : जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. जमिनीत लवकर तयार होणारी पिके लावून ती ठराविक वेळी नांगराने जमिनीत गाडून टाकतात. ह्यासच हिरवे खत म्हणतात. हे खत स्वस्त असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच त्यामुळे जमिनीच्या संरचनेत बदल होतो, पावसाचे पाणी जमिनीत मुरते, पाण्याचा निचरा होण्यास व जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. शिंबावंत वनस्पतींच्या पिकांमुळे लागोपाठ घेण्यात येणाऱ्या पिकांना लागणारा नायट्रोजनाचा जादा पुरवठा होतो.

हिरव्या खतासाठी शिंबावंत वनस्पती व इतर वनस्पती किंवा दोन प्रकारच्या वनस्पती वापरतात. भारतात याकरिता सामान्यत: सनताग, रानशेवरी (धैंचा), उडीद, मुगवेल, गवार, तूर, कुळीथ (हुलगा), नीळ, मसूर, वाटाणा, शेंजी, बरसीम, मेथी, लाख, ग्लिरिसिडिया इ. वनस्पती वापरतात. काही वेळा पाण्याचा निचरा कमी होण्यासाठी व जमिनीची धूप कमी करण्यासाठी लावलेल्या पिकांचा वापर हिरव्या खतांसाठी करतात. जमिनीत गाडण्याच्या वेळी पीक रसदार असावे व जमिनीत भरपूर ओल असावी म्हणजे ते चांगले कुजते. गाडल्यापासून ४–६ आठवड्यांनंतर दुसरे पीक लावतात. अशा रीतीने दर हेक्टरी १२–१५ टन हिरवे खत जमिनीत गाडले जाते व त्यामुळे ४५–९० किग्रॅ. नायट्रोजन, तसेच इतर पोषक द्रव्ये जमिनीला मिळतात.

ज्या प्रदेशात भरपूर आर्द्रता असते अशा प्रदेशातील जमिनीतच हिरवे खत करण्याची प्रथा आहे. ज्या ठिकाणी हिवाळ्यातील कडक थंडी पिकांना मानवत नाही अशा ठिकाणी हिवाळ्यात हिरवे खत करण्यात येते. समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील फळबागांत व उपवनांत हिरवे खत करतात. भात, ऊस, कापूस व इतर पिकांसाठी भारतात नेहमी हिरवे खत वापरले जाते. समुद्रकिनारी आवळी व आंबा ह्यांची पाने हिरव्या खतासाठी वापरतात.

सोनखत : जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी चीनमध्ये प्राचीन काळापासून मानवी मलमूत्र वापरले जात आहे. तेथील जमिनींना देण्यात येणाऱ्या पोषक द्रव्यांपैकी १५% मलमूत्रापासून मिळवितात असा अंदाज आहे. जपानमध्येही मलमूत्राचा खत म्हणून उपयोग करण्यात येतो. शेणखत किंवा कंपोस्ट यांपेक्षा सोनखतातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश यांचे प्रमाण जास्त असते. भारतात मैला गोळा करून तो खड्ड्यात किंव खंदकात टाकतात व त्यावर कोळसा, लाकडाचा भुस्सा, माती व कचरा टाकून ते झाकतात. सोनखतातील अवायुजीवी (मुक्त ऑक्सिजनाच्या अभावामुळे सूक्ष्मजंतूंद्वारे होणाऱ्या अपूर्ण स्वरूपातील) अपघटनाने हायड्रोजन सल्फाइडासारखे दुर्गंधीयुक्त वायू निर्माण होतात. तसेच नायट्रोजनही मोठ्या प्रमाणात निघून जातो. सोनखतामुळे माश्यांची वाढ होते. याकरिता सोनखत माश्यांपासून सुरक्षित राखणे, पिण्याच्या पाणी पुरवठ्यापासून ते दूर ठेवणे, प्रत्यक्ष उपयोगात आणण्यापूर्वी त्यातील रोगकारक जीवजंतूंचा नाश करणे इ. उपाय योजणे आवश्यक असते.

वाहितमल : शहरातील सांडपाण्यात बरीच पोषक द्रव्ये असतात. परंतु ते जसेच्या तसे जमिनीस देता येत नाही. कारण त्यामध्ये असलेले सूक्ष्मजंतू जमिनीत जातात तसेच जमिनीच्या छिद्रांमध्ये सांडपाणी अडकून छिद्रे बंद होतात आणि जमीन नापीक बनते. यासाठी सांडपाणी वापरण्यापूर्वी त्याच्यावर विशिष्ट क्रिया करणे आवश्यक असते [→ वाहितमल].

मेंढरे बसविणे : भारताच्या काही भागांत खतासाठी शेतात शेळ्यामेंढ्या बसविण्याची पद्धत आहे. सामान्यत: उन्हाळ्यातच मेंढरे बसविण्यात येतात. सु. १,००० जनावरे एक रात्रभर शेतात बसविल्यास त्या शेताला दोन टन खत दिल्यासारखे होते. शेळ्यामेंढ्यांच्या लेंड्या झटपट वाळतात. त्यामुळे त्यांमधील नायट्रोजन अमोनियाच्या रूपात निघून जात नाही. पावसाळा सुरू झाला म्हणजे या लेंड्या कुळवाने जमिनीत मिसळवून घेतात. या पद्धतीत शेळ्यामेंढ्यांनी खाल्लेल्या अनेक प्रकारच्या तणांचे बी लेंड्यातून शेतात पडून तणांची वाढ होते.

राख : भारतात अद्यापही राखेचा उपयोग खत म्हणून करण्यात येतो. गुऱ्हाळे, चुली इत्यादींमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांपासून मिळणारी राख यासाठी वापरतात. या राखेतून फॉस्फरस व पोटॅश प्रामुख्याने मिळतात. आंबा, पेरू, अननस यांसारख्या फळझाडांकरिता खत म्हणून ही राख वापरतात.

संहत स्वरूपाची भरखते : पेंड हे या प्रकारचे खत होय. जी पेंड जनावरांना अखाद्य आहे अशीच पेंड खत म्हणून वापरतात. यातून जमिनीला नायट्रोजन मिळतो. सर्वसाधारणतः पेंड दिल्यावर तिचे जमिनीत अपघटन होते व ७–१० दिवसांत पोषक द्रव्ये मिळू शकतात. मोहवाच्या पेंडीचे अपघटन होण्यास दोन महिने लागतात. घाण्याच्या पेंडीपेक्षा गिरणीतील पेंडीचे लवकर अपघटन होते. नांगरण्यापूर्वी काही दिवस आधी पेरणीच्या वेळी वा पीक उगवल्यावर पेंड दिली जाते. पेंडीपासून ४–७% नायट्रोजन मिळतो. भारतात सु. ७–८ लक्ष टन अखाद्य पेंड खतासाठी वापरतात. सर्वसाधारणतः पेंड ऊस, कापूस, भाजीपाला व फळझाडे यांसाठीच वापरली जाते. खाद्य पेंडही खत म्हणून काही वेळी वापरली जाते.

खाटीकखान्यात मारण्यात येणाऱ्या जनावरांपासून मिळणारे रक्तखत किंवा वाळलेले रक्त हे पेंडीप्रमाणेच खत म्हणून वापरतात. ते सर्व प्रकारच्या पिकांना व जमिनींना चालते. ते जमिनीत जलद मिसळते. त्यात १०–१२% नायट्रोजन व १–२% फॉस्फोरिक अम्ल असते.

हाडांचा चुरा खत म्हणून वापरल्यास फॉस्फेटे भरपूर प्रमाणात मिळतात. ताजी हाडे चुरा करून वापरल्यास त्यातील वसेमुळे (स्निग्ध पदार्थांमुळे) जमिनीमध्ये त्यांचे अपघटन होण्यास विरोध होतो. यासाठी हाडे उच्च दाबाखाली वाफारून किंवा विद्रावक–निस्सारणाने (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या साहाय्याने वेगळे करण्याच्या प्रक्रियेने) त्यातील वसा वेगळी करतात आणि नंतर हाडे दळतात. हाडांच्या चुऱ्यात नायट्रोजन असल्यामुळे तो खनिज फॉस्फेटापेक्षा खत म्हणून अधिक चांगला असतो. ज्या जमिनीत सेंद्रीय पदार्थ भरपूर आहेत अशा अम्लीय जमिनीत हाडांचा चुरा खत म्हणून वापरतात.

मत्स्यखत हे सुकविलेले मासे किंवा त्यांचा चुरा ह्या स्वरूपात वापरतात. त्यात ४–१०% नायट्रोजन व फॉस्फोरिक अम्ले असतात. ती जमिनीत जलद मिसळतात. सर्व पिकांना व जमिनीत ती वापरता येतात. काही वेळा मासे न सुकविता त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करतात व तेच ओलसर स्थितीत खत म्हणून विकले जाते. सल्फ्यूरिक अम्लामुळे माशांमधील फॉस्फेटाचे सुपरफॉस्फेट बनते व ते सडत नाहीत.

ग्वानो हे खत पक्षी, मासे इत्यादींचे अपशिष्ट असून त्याचा खत म्हणून बऱ्याच देशांत फार पूर्वीपासून उपयोग करण्यात येत आहे [→ ग्वानो].

कोंबड्यांच्या खुराड्यात कोंडा वा लाकडाचा भुस्सा पसरतात. त्यामध्येच कोंबड्या मलविसर्जन करतात. असा कोंडा किंवा भुस्सा खत म्हणून वापरला जातो. त्यामध्ये नायट्रोजन २%, फॉस्फेट १·२५% व पोटॅश ०·७५% असतात. भारतात काही ठिकाणीच असे खत गोळा करतात.


रासायनिक खते : वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या नायट्रोजन, फॉस्फोरिक अम्ल व पोटॅश ह्या पोषक द्रव्यांपैकी एक किंवा अधिक द्रव्ये ज्यांत एकवटविली आहेत आणि जी कमी प्रमाणात दिली तरी चालतात अशा खतांना रासायनिक किंवा कृत्रिम खते म्हणतात. अशी खते खास तयार करतात किंवा इतर रसायननिर्मितीत उप-उत्पादन म्हणून मिळतात किंवा नैसर्गिक पदार्थांवर प्रक्रिया करून तयार करतात. अशा खतांचे वर्गीकरण त्यांच्यात जास्त असणाऱ्या पोषक द्रव्यावरून करतात. उदा., नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त, पोटॅशयुक्त. ह्या प्रकारची खते भरखताबरोबर किंवा तशीच देतात.

नायट्रोजनयुक्त खते : वनस्पतींना लागणारा नायट्रोजन त्या जमिनीतून घेतात. हवेतील नायट्रोजन त्यांना तसाच घेता येत नाही म्हणून नायट्रोजन हा नेहमी ‘अमोनियम’, ‘नायट्रेट’ इ. स्वरूपांत द्यावा लागतो. अशा खतांची उपयुक्तता त्यांत असणाऱ्या नायट्रोजनावर अवलंबून असल्यामुळे त्यांचा दर्जा व उत्पादन नायट्रोजनामध्ये व्यक्त करण्याची प्रथा आहे. अशा खतांत इतर काही पोषक द्रव्येही आढळतात. अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट, अमोनियम-सल्फेट-नायट्रेट, यूरिया, कॅल्शियम सायनामाइड, अमोनियम क्लोराइड (नवसागर) इ. संयुगे किंवा द्रवरूप अमोनिया यांचा उपयोग खत म्हणून केला जातो.

अमोनियम सल्फेट : हे जास्त प्रमाणात वापरले जाणारे खत आहे. हे तसेच, इतर रासायनिक खतांबरोबर किंवा भरखतांबरोबर वापरले जाते. यात नायट्रोजन २०·६% असतो. हे सरळ उदासिनीकरणाने (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणारा पदार्थ म्हणजे क्षारक आणि अम्ल यांच्या विक्रियेने) किंवा जिप्सम पद्धतीने तयार करतात. पहिल्या पद्धतीत अमोनिया ५-६% सल्फ्यूरिक अम्लयुक्त संतृप्तकात (जास्तीत जास्त विक्रिया घडवून आणणाऱ्या प्रयुक्तीमध्ये) सोडतात. संतृप्तकाचे तापमान १०५ से. पर्यंत ठेवले जाते. या विक्रियेत बनलेले अमोनियम सल्फेटाचे स्फटिक वेगळे करून, वाळवून व थंड करून विक्रीस पाठवितात. जिप्समाचे साठे जेथे मोठ्या प्रमाणावर आहेत तेथे जिप्सम पद्धत वापरतात. जर्मनीमधील मेर्झबर्ग येथे ही पद्धत प्रथम वापरली म्हणून तिला मेर्झबर्ग पद्धत असेही म्हणतात. भारतात सिंद्री, अलवाये, बेलागोला येथे या पद्धतीने अमोनियम सल्फेट तयार करतात. या पद्धतीत जिप्सम दळून अमोनियम कार्बोनेटाच्या विद्रावाशी विक्रिया करतात. तिच्यात कॅल्शियम कार्बोनेट उप-उत्पादन म्हणून मिळते. हे जलद क्रियाशील खत असून ते जमिनीत शोषले जाऊन कॅल्शियम प्रतिष्ठापित (एक अणू वा रेणू काढून त्याजागी दुसरा अणू वा रेणू बसविणे) करते. त्यातील नायट्रोजनाचा ऱ्हास होत नाही. ते अम्लीय आहे. ते पेरणीच्यावेळी देण्याकरिता तसेच उपरिवेशन पद्धतीतही वापरतात.

अमोनियम नायट्रेट :  यामध्ये नायट्रोजन सु. ३५% असतो. हे बनविणे सोपे असले, तरी ते आर्द्रताशोषक व स्फोटक असल्याने त्याचा खत म्हणून उपयोग लवकर प्रचारात आला नाही. ५०–५७% नायट्रिक अम्ल अमोनियाने उदासीन केल्या अमोनियम नायट्रेट बनते. ही विक्रिया नेहमीच्या वातावरणीय दाबाखाली करतात. पण या विक्रियेमध्ये तयार होणाऱ्या वाफेचा (पाण्याचा) उपयोग करावयाचा झाल्यास दाब तिप्पट करतात. अमोनियम नायट्रेटाच्या विद्रावाचे बाष्पीकरण करून स्फटिक बनवितात. त्यावर पॅराफीन आणि रोझीन यांचे आवेष्टन करून ते चुन्याच्या चूर्णात घोळवितात. यामुळे त्याची आर्द्रता-शोषकता कमी होते. हे स्फोटक असल्यामुळे साठवण आणि हाताळणी काळजीपूर्वक करावी लागते. हे अम्लीय असून त्याच्या उदासिनीकरणास कॅल्शियम कार्बोनेट वापरतात.

 

कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट : ५०–५७% नायट्रिक अम्ल व अमोनिया यांपासून ९५% अमोनियम नायट्रेट विद्राव बनवून त्यात चुनखडीचे चूर्ण मिसळून ते कणित्रातून (कण तयार करणाऱ्या यंत्रातून) पाठवून दाणे बनवितात. ते वाळवून व थंड करून विक्रीस पाठवितात. ते नायट्रोचॉक, नायट्रोलाइमस्टोन, कॅलनायट्रो, ल्यूना सॉल्ट पीटर इ. नावांनी ओळखले जाते. ह्यात २०·५% पर्यंत नायट्रोजन असतो. ते पाण्यात विद्राव्य असून बऱ्याच पिकांकरिता वापरतात.

अमोनियम-सल्फेट-नायट्रोजन : हे अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम सल्फेट यांचे द्विलवण (दोन लवणांचे संयुक्त लवण) आहे. अमोनियम सल्फेटाच्या स्फटिकावर ९५–९८% अमोनियम नायट्रेटाचा विद्राव टाकून ते विशिष्ट मिश्रकात (मिश्रण करण्याच्या उपकरणात) नेतात. यामध्ये सल्फेटाच्या स्फटिकावर अमोनियम नायट्रेटाचा स्फटिक वाढतो. या द्विलवणात त्याचे प्रमाण १ : १ असते. नंतर ते वाळवून थंड करून प्लॅस्टिकाचे अस्तर असलेल्या पोत्यात भरून विक्रीस पाठवितात. हे ‘डबल सॉल्ट’ म्हणूनही ओळखले जाते. त्यात २६% नायट्रोजन असतो. हे खत अम्लीय असून त्याच्या उदासिनीकरणास कॅल्शियम कार्बोनेट द्यावे लागते. ते पाण्यात विद्राव्य असून त्यातून नायट्रोजनाचा ऱ्हास होत नाही. ह्याचे उत्पादन भारतात फक्त सिंद्री येथे होते.

यूरिया : भारतातील सर्व नायट्रोजनयुक्त खतांमध्ये स्वस्त असे हे कार्बनी खत होय. त्याची जमिनीवरील विक्रिया उदासीन स्वरूपाची असल्याने व त्यात ४६% नायट्रोजन असल्याने हे खत झपाट्याने लोकप्रिय झाले. यूरिया कृत्रिम रीत्या व्हलर यांनी १८२८ साली तयार केला, तरी त्याचा खत म्हणून उपयोग होण्यास सु. १०० वर्षे लागली. हल्ली यूरिया हा अमोनिया व कार्बन डाय-ऑक्साइड यांची जास्त दाबाखाली व उच्च तापमानावर विक्रिया करून बनविला जातो. ही पद्धत १८६८ मध्ये शोधण्यात आली व त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर उत्पादन जर्मनीत प्रथम करण्यात आले व १९३३ मध्ये अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास सुरुवात झाली. यूरिया तयार करण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या पद्धती उत्पादनातील दोन समस्या सोडविण्याच्या प्रयत्नामुळे प्रचारात आल्या. ज्या पात्रात ही विक्रिया केली जाते ते गंजणे ही पहिली समस्या होती. चांदी, शिसे, निष्कलंक पोलाद (स्टेनलेस स्टील), टिटॅनियम इ. धातू वापरून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न निरनिराळ्या उत्पादकांनी केला. दुसरी समस्या म्हणजे यूरियाबरोबर तयार होणारे बाययूरेट (१·५% ते ४·५%) ही होय. यूरियाचे दोन रेणू एकत्र येऊन बाययूरेट बनते. यावेळी त्यातून अमोनिया निघून जातो. हे बाययूरेट पिकांना अपायकारक असते. ह्या दोन्ही समस्या काही जपानी  उत्पादकांनी दूर केल्या व त्यामुळे या पद्धती  सध्या लोकप्रिय आहेत. ह्या पद्धतीत बाययूरेट ०·२% हून कमी तयार होते. भारतात बडोदा, गोरखपूर इ. ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.

यूरिया बनविण्यासाठी द्रव अमोनिया व कार्बन डाय–ऑक्साइड यांची १८०–२५० से. वर व १८०–२५० वा. दा. वर विक्रिया घडविली जाते. तयार झालेले पाणी बाष्पीकरणाने अलग करतात व वितळलेला यूरिया मिळतो. हा यूरिया गुठळ्यांच्या (प्रिल्स) स्वरूपात विक्रीस पाठवितात.

यूरिया जमिनीत विद्राव्य आहे, तथापि तो अमाइड स्वरूपात बऱ्याच पिकांसाठी वापरत नाहीत. यूरियाचे अपघटन होऊन अमोनिया तयार होतो व हाच अमोनिया पिकांना उपयुक्त असतो. हे अपघटन होण्यास साधारणतः एक आठवडा लागतो. यासाठी पेरणी करण्याआधी तीन चार दिवस यूरिया देतात. यूरियातून नायट्रोजनाचा ऱ्हास फारच अल्प प्रमाणात होतो. यूरिया कमी अम्लीय असून त्याच्या उदासिनीकरणासाठी कॅल्शियम कार्बोनेट कमी लागते. पीक वाढू लागल्यावर ३–६% यूरियायुक्त विद्राव फवारल्यास वाढ चांगली होते.


कॅल्शियम सायनामाइड : हे एक करड्या रंगाचे, २०–२४% नायट्रोजनयुक्त व क्षारीय (अल्कलाइन) खत आहे. सायनामाइड, L/N, लाइम-नायट्रोजन, नायट्रोलिम या नावांनीही ते ओळखले जाते. खताशिवाय त्याचा इतर कृषिक्रियांमध्येही उपयोग केला जातो. कॅल्शियम कार्बाइड व नायट्रोजन वायू यांच्यापासून हे तयार केले जाते. खत म्हणून तयार करताना त्यात ३·४% खनिज तेल मिसळतात  त्यामुळे वाऱ्याने त्याची धूळ पसरत नाही. हे खत तयार करण्यास वीज वापरावी लागत असल्यामुळे ते महाग असते. तरीही ते जगातील बऱ्याच देशांत तयार केले जाते.

अमोनियम क्‍लोराइड : यामधील अमोनियम स्वरूपातील नायट्रोजन बऱ्याच पिकांना उपयुक्त असल्याने त्याचा खत म्हणून उपयोग केला जातो. यात २५% नायट्रोजन असतो. सॉल्व्हे अमोनिया पद्धतीने दाहक (कॉस्टिक) सोडा किंवा सोडियम बायकार्बोनेट तयार करताना हे उप-उत्पादन म्हणून मिळते. भारतात बनारस व अलवाये येथे या पद्धतीने त्याचे उत्पादन करतात.

सोडियम नायट्रेट : हे सर्वांत जुने नायट्रोजनयुक्त खत असून चिली सॉल्ट पीटर या नावानेही ओळखले जाते. चिलीमध्ये ते नैसर्गिक स्थितीत मिळते, तर इतर देशांत ते अमोनियापासून संश्लेषणाने (रासायनिक विक्रियांनी कृत्रिम रीतीने) तयार करतात. भारतात चिलीहून त्याची आयात करतात.

चिलीमधील त्याच्या निक्षेपात (साठ्यात) सामान्यतः मीठ, जिप्सम, ग्लाउबर लवण (सोडियम सल्फेट), आयोडेटे, बोरेटे व माती ही अपद्रव्ये आढळतात. गरम पाण्यात निक्षेप विरघळवून ही अपद्रव्ये अलग करतात व गोठणबिंदूपर्यंत थंड करून सोडियम नायट्रेटाचे स्फटिक मिळवितात. खत म्हणून प्रत्यक्षात वापरण्यात येणाऱ्या पदार्थांत सोडियम नायट्रेट ९८% असते व त्यापासून १६% नायट्रोजन आणि काही प्रमाणात ब्रोमीन व आयोडीन मिळतात. संश्लेषण पद्धतीत अमोनियाचे ऑक्सिडीकरण करून नायट्रस ऑक्साइड वायू तयार करतात व तो वायू सोडियम कार्बोनेट विद्रावात शोषतात. ह्या विद्रावाचे ऊर्ध्वपातन (वाफ करून व मग ती  थंड करून) केल्यास सोडियम नायट्रेटाचे स्फटिक मिळतात.

सोडियम नायट्रेटातील नायट्रोजन नायट्रेटाच्या स्वरूपात असल्याने तो पिकांना लगेच उपलब्ध होतो. हे खत पाण्यात विद्राव्य असल्याने त्याचा काही प्रमाणात ऱ्हास होतो म्हणून त्याचा उपरिवेशन पद्धतीत वापर करतात. पावसाळ्यात त्याचा वापर पेरणीच्या वेळी काळजीपूर्वक करावा लागतो. रबी हंगामात त्याचा वापर बिनधोकपणे करता येतो. याच्या वापराने सु. २७% सोडियम मिळतो. शिवाय चिली निक्षेपातून मॅग्नेशियम, मँगॅनीज, बोरॉन, तांबे व जस्त ही मूलद्रव्येही अल्प प्रमाणात मिळतात.

इतर नायट्रोजनयुक्त खते : वर उल्लेखिलेल्याशिवाय अमोनिया ॲनहायड्रस (८२% नायट्रोजन), द्रवरूप अमोनिया (२५% नायट्रोजन), अमोनिया क्लोराइड-कॅल्शियम कार्बोनेट (१५% नायट्रोजन), अमोनियम नायट्रेट-अमोनिया (३७–४१% नायट्रोजन), कॅल्शियम नायट्रेट (१५·५% नायट्रोजन), कॅलुरिया (कॅल्शियम नायट्रेट-यूरिया, ३४% नायट्रोजन), यूरिया-अमोनिया विद्राव (३३·५–४५·५% नायट्रोजन), यूरिया-फॉर्माल्डिहाइड (३८% नायट्रोजन) इ. रसायनांचा वापर खत म्हणून करतात.

फॉस्फरसयुक्त खते : नायट्रोजनयुक्त खतांनंतर किंवा तितक्याच महत्त्वाच्या खतांचा म्हणजे फॉस्फरसयुक्त खतांचा क्रम लागतो. ह्या खतांमधील फॉस्फरसाचे  प्रमाण फॉस्फरस पेंटॉक्साइडामध्ये (P2O5) व्यक्त करण्यात येते. ह्या खतांमुळे वनस्पतींच्या वाढीस उत्तेजन मिळते, रोगप्रतिकारास मदत होते, रोपे जोरात येतात, लवकर व जलद बहर येतो. फॉस्फरस वनस्पतींच्या जीवद्रव्यात (पेशीतील जीवनावश्यक जटिल द्रव्यात) आढळतो. सर्व वनस्पती फॉस्फरस HPO4–– किंवा H2PO4– ह्या ऋण विद्युत् भारित आयनाच्या (विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या) स्वरूपात शोषून घेतात.

फॉस्फरसयुक्त खते ही फॉस्फेटाच्या स्वरूपातील असून ती पाण्यात विद्राव्य, अमोनियम सायट्रेटात विद्राव्य आणि पाण्यात अविद्राव्य अशा तीन प्रकारची असतात. पाण्यात विद्राव्य असणाऱ्या खतांत मोनोकॅल्शियम फॉस्फेट [CaH4(PO4)2] हे प्रमुख होय. हे सुपरफॉस्फेट, तिहेरी सुपरफॉस्फेट व अमोनियम फॉस्फेट यांमध्ये असते. मोनोअमोनियम फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट आणि मोनोपोटॅशियम फॉस्फेट हीदेखील पाण्यात विद्राव्य आहेत. पाण्यात अविद्राव्य पण अमोनियम सायट्रेटात विद्राव्य अशा फॉस्फेटात डायकॅल्शियम फॉस्फेट, धातुमळी (क्षारकीय), कॅल्शियम व पोटॅशियम मेटाफॉस्फेट, हाडांच्या चुऱ्याचा काही भाग यांचा समावेश होतो. पाण्यात अविद्राव्य अशा फॉस्फेटांत खनिज फॉस्फेट, हाडांचा चुरा यांमधील ट्रायकॅल्शियम फॉस्फेटाचा समावेश होतो.

सुपरफॉसस्फेट : सल्फ्यूरिक अम्लाची खनिज फॉस्फेटावर विक्रिया करून सुपरफॉस्फेट तयार करतात. विक्रियेनंतर तयार होणाऱ्या मोनोकॅल्शियम फॉस्फेट, जिप्सम इत्यादींच्या मिश्रणास सामान्य सुपरफॉस्फेट किंवा नुसतेच सुपरफॉस्फेट असे म्हणतात. त्यातून १६–२०% फॉस्फरस उपलब्ध होतो. ही खते ५·५ पेक्षा कमी pH [अम्लता व क्षारकता दर्शविणारे मूल्य, → पीएच मूल्य] असलेल्या अम्लीय जमिनींसाठी वापरत नाहीत. ती क्षारीय जमिनींसाठी वापरतात.

इ. स. १८४२ मध्ये लॉझ यांनी खनिज फॉस्फेट व सल्फ्यूरिक अम्ल यांच्यापासून प्रथम सुपरफॉस्फेट तयार केले. सध्या ते गुहा (डेन) पद्धतीने व दाणेदार सुपरफॉस्फेट पद्धतीने तयार करतात. गुहा पद्धतीत खनिज फॉस्फेट बारीक दळून क्षोभकयुक्त मिश्रकात नेतात. त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करतात. नंतर सर्व माल काँक्रिटाच्या प्रचंड गुहांमध्ये नेऊन ६–२४ तास ठेवून सुपरफॉस्फेट बनविण्याची विक्रिया पूर्ण करतात. नंतर तो गुदामात ८–१० आठवडे विक्रिया पूर्ण होण्यासाठी ठेवतात व मग विक्रीस पाठवितात.

दाणेदार सुपरफॉस्फेट तयार करण्यासाठी ‘ऑबरफॉस’ पद्धत प्रथम वापरली गेली. ती अद्यापिही ब्रिटन व कॅनडामध्ये वापरली जाते. इतरत्र सध्या ‘डेव्हिसन’ पद्धत वापरतात. गुहा पद्धतीतील गुहांमध्ये माल येईपर्यंत तीत व डेव्हिसन पद्धतीत साम्य आहे. डेव्हिसन पद्धतीत नंतर सर्व माल दाणे बनविण्याच्या फिरत्या यंत्रातून पाठवून तयार झालेले दाणे फिरत्या शुष्ककाने (सुकविण्याच्या उपकरणाने) सुकवितात व गुदामात ८–१० आठवडे सर्व माल विक्रिया पूर्ण होण्यासाठी ठेवतात. या पद्धतीत विक्रिया जास्त तापमानावर होत असल्यामुळे लवकर पूर्ण होते.

सुपरफॉस्फेट करड्या रंगाचे असून ते कोरडे व चूर्णरूप असते. काही वेळा ते ओलसर असून त्यास अम्लीय वास येतो. पावसापूर्वी किंवा पाणी देण्यापूर्वी सुपरफॉस्फेट दिल्यास ते जमिनीतील ओलाव्याने विद्राव्य होते. पाण्याशी संबंध आल्यावर ते वाहून जात नाही. सुपरफॉस्फेटची वाहकता मंद असल्यामुळे ते उपरिवेशन पद्धतीने देण्यास योग्य नाही.


तिहेरी सुपरफॉस्फेट : ह्यामध्ये सामान्य सुपरफॉस्फेटाच्या तिप्पट म्हणजे ४५–५०% फॉस्फरस असतो. हे खनिज फॉस्फेट व फॉस्फोरिक अम्ल यांच्या विक्रियेने तयार करतात. यामुळे जिप्सम न बनता मोनोकॅल्शियम फॉस्फेट बनते. खनिज फॉस्फेटात कार्बनी पदार्थ नसणे आवश्यक असते व फॉस्फोरिक अम्ल ६२% चे वापरतात. विक्रिया पूर्ण होण्यास ३०–४० दिवस लागतात. हे दाणेदार स्वरूपातही तयार केले जाते.

क्षारकीय धातुमळी : लोहनिर्मितीतील एक उप-उत्पादन. लोह खनिजात जो फॉस्फरस असतो तो मळीच्या स्वरूपात वेगळा करून (जटिल स्थितीत) दळून लोहविरहित करून खत म्हणून वापरतात. यूरोपमध्ये अद्यापही याचा उपयोग खत म्हणून केला जातो. जपानमध्ये मात्र १९५७-५८ पासून त्याचा वापर बंद केला आहे. धातुमळी काळसर तपकिरी चूर्णरूप असून ती जड असते. भारतात मात्र अशा धातुमळीतील फॉस्फरसाचे प्रमाण कमी असल्यामुळे (३–८%) तिचा वापर कमी आहे. सामान्यतः तीत १७–२०% फॉस्फरस असतो. धातुमळी वापरताना ती जमिनीत मिसळली गेली की नाही हे पाहणे जरूर असते.

अमोनियायुक्त सुपरफॉस्फेटे : सुपरफॉस्फेटामध्ये साधारणपणे २% मुक्त अम्ल असते. त्यामुळे पोती कुजतात, लोखंडाशी संपर्क आल्यास ते गंजते, जमिनीची अम्लता वाढते इ. दुष्परिणाम होतात. हे टाळण्यासाठी सुपरफॉस्फेट तयार झाल्यावर त्यात सजल अमोनिया मिसळून मुक्त अम्लाचे उदासिनीकरण करतात. अशा सुपरफॉस्फेटाला अमोनियायुक्त सुपरफॉस्फेट असे म्हणतात. अमोनियीकरणासाठी सजल अमोनिया वापरल्यास सुपरफॉस्फेट दाणेदार स्वरूपात मिळविता येते. साधारणपणे ४०–८०% सजल अमोनिया वापरतात. अमोनियीकरणाने सुपरफॉस्फेटामध्ये २·५–३·३% नायट्रोजन येतो. हे प्रमाण वाढविण्यासाठी सजल अमोनियात यूरिया किंवा अमोनियम नायट्रेट मिसळतात आणि नायट्रोजनाचे प्रमाण १०% पर्यंत वाढविता येते. अमोनियीकरणात अमोनिया जास्त वापरला गेला, तर विद्राव्य फॉस्फेटाचे रूपांतर अविद्राव्य फॉस्फेटात होते.

खनिज फॉस्फेट : खनिज फॉस्फेटाचा उपयोग सुपरफॉस्फेट इ. खते बनविण्यासाठी केला जातो. परंतु ते तसेच अतिसूक्ष्म चूर्णाच्या स्वरूपात खत म्हणूनही वापरले जाते. यातून २०–४०% फॉस्फरस मिळतो. अम्लीय व ह्मूमसाचे प्रमाण जास्त असलेल्या व जिच्यात फळझाडे, चहा, कॉफी यांसारखी पिके घेतात अशा जमिनींकरिता खनिज फॉस्फेट वापरतात.

कॅल्शियम मेटाफॉस्फेट : एका टाकीत फॉस्फरस जाळून त्यात खनिज फॉस्फेटाचे बारीक कण सोडून हे खत तयार केले जाते. यात ६४% फॉस्फरस असतो. यातून हायड्रोफ्ल्युओरिक अम्ल उपपदार्थ म्हणून मिळते. ह्या खताच्या निर्मितीस खर्च जास्त येतो.

ऊष्मीय फॉस्फेटे : जर्मनीत खनिज फॉस्फेट, दाहक सोडा व वाळू फिरत्या भट्टीत तापवून तापपीडित फॉस्फेट हे खत तयार करतात. हे जटिल खत असून त्यातील सो़डियम कॅल्शियम फॉस्फेट हे संयुग पाण्यात अविद्राव्य पण सायट्रेटात विद्राव्य असते.

जपान-अमेरिकेत खनिज फॉस्फेट सर्पेंटाइन किंवा ऑलिव्हीन यांच्याबरोबर विद्युत् भट्टीत वितळवून ‘थर्मोफॉस’ नावाचे खत तयार करतात. यात १९–२४% फॉस्फरस असतो. हे सायट्रेटात विद्राव्य आहे.

पोटॅशयुक्त खते :ही वनस्पतींना आवश्यक असणारी खते होत. यांतील पोटॅशियमाचे प्रमाण नेहमी पोटॅशियम ऑक्साइडामध्ये (K2O) व्यक्त केले जाते. पोटॅशयुक्त खते ही वाढणाऱ्या वनस्पतींना आवश्यक असून ऊतकांच्या चयापचयासाठीही (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक-भौतिक घडामोडींसाठीही) आवश्यक असतात. स्टार्च व शर्करा तयार करण्यासाठी आणि त्यांच्या वहनासाठी, धान्ये व गवत यांची खोडे बळकट होण्यासाठी, खराब हवेपासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, जमिनीतील नायट्रोजनाचे प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी इ. कारणांसाठीही या खतांचा उपयोग होतो.

पोटॅशियम लवणांपैकी क्लोराइड, सल्फेट व नायट्रेट ही लवणे खत म्हणून वापरली जातात. ती पाण्यात विद्राव्य असून त्यांचे वनस्पती शोषून घेऊ शकतील अशा पोटॅशियम आयनांत अपघटन होते. पृथ्वीवर पोटॅशियम हे विविध खनिजांचा भाग म्हणून सर्वत्र आढळते. बहुतेक सर्व पोटॅश खते ही सिल्व्हाइट, कार्नालाइट, कायनाइट, लँगबेनाइट, सिल्व्हॅनाइट या जलविद्राव्य खनिजांपासून आणि काही प्रमाणात लवणद्रवांपासून तयार करतात.

पोटॅशियम क्लोराइड:  हे म्युराइट ऑफ पोटॅश या नावाने विकले जाते. नेहमीचे ९८% शुद्ध पोटॅशियम क्लोराइड खत व्यवसायात ६०% म्युराइट म्हणून ओळखले जाते, तर अशुद्ध पोटॅशियम क्लोराइडला ५०% म्युराइट म्हणतात.

हे मिठासारखे दिसणारे व कडू चव नसलेले खत आहे. त्यातून ६०% पोटॅश मिळते. खनिजांपासून ते स्फटिकीकरणाने व प्लवनाने (तरंगवून) तयार करतात. ते चूर्ण स्वरूपात तसेच दाणेदार स्वरूपात तयार करतात. ते जलविद्राव्य असून जास्त प्रमाणात वापरात असणारे पोटॅशयुक्त खत आहे.

पोटॅशियम सल्फेट : या खतात ४८–५०% पोटॅश असते. हे खत पोटॅशियम क्लोराइड व सल्फ्यूरिक अम्ल यांच्या विक्रियेने, तसेच लँगबेनाइट या खनिजापासून तयार करतात. हे खत जलविद्राव्य असले, तरी ते वाहून जात नाही.

पोटॅशियम नायट्रेट : नायट्रिक अम्ल व पोटॅशियम क्लोराइड यांच्या विक्रियेने हे खत तयार करतात. हे कमी जलशोषक असल्याने त्याचा खत म्हणून वापर करतात. यात ४४% पोटॅश व १३% नायट्रोजन असतो.

इतर पोटॅशयुक्त खते : पोटॅशियम–मॅग्नेशियम सल्फेट (२५–३०% पोटॅश) हे लँगबेनाइटापासून तयार करतात. सिमेंट निर्मितीच्या भट्ट्यांतील वाया जाणारी धूळ, साखर व्यवसायात निर्माण होणारी मळी, राख, लोकर धुतल्यावर निघणारा मळ यांपासूनही पोटॅश मिळवितात.

जटिल खते : खनिज फॉस्फेटांवर नायट्रिक अम्लाची विक्रिया केल्यावर मिळणाऱ्या खतांना जटिल खते म्हणतात. ही खते फॉस्फोनायट्रिक (१६-२३-०), सल्फोनायट्रिक (१४-१४-०), कार्बोनायट्रिक (१६-१४-०), ओड्डा (२०-२०-०), पोटॅशियम सल्फेट (११-१२-१२), अमोनियम सल्फेट (१७-१३-०) इ. पद्धतींनी तयार करतात. कंसातील आकडे, त्या त्या पद्धतीने तयार होणाऱ्या खतातील नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांच्या प्रमाणाचे आहेत. ह्या सर्व पद्धतींमध्ये अम्लीकरणामुळे कॅल्शियम नायट्रेट तयार होऊ नये अशी काळजी घेतली जाते. कारण हे संयुग आर्द्रताशोषक व अस्थिर आहे. हे संयुग तयार होऊ नये म्हणून फॉस्फोरिक अम्ल, सल्फ्यूरिक अम्ल, अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट इत्यादींचा उपयोग करून कॅल्शियमाचे कॅल्शियम सल्फेट, डाय कॅल्शियम फॉस्फेट इत्यादींत रूपांतर करून त्याचे स्थिरीकरण करतात. भारतात तुर्भे येथील कारखान्यात सल्फोनायट्रिक आणि कार्बोनायट्रिक या दोन्ही पद्धतींनी जटिल खत (नायट्रोफॉस्फेट) तयार करतात.

दुय्यम पोषक द्रव्ये : नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम या तीन मूलद्रव्यांखेरीज इतर बऱ्याच मूलद्रव्यांची वनस्पतींच्या वाढीस आवश्यकता असते. ही मूलद्रव्ये कमी प्रमाणात लागत असल्याने त्यांचा समावेश असलेल्या खतांना दुय्यम मूलद्रव्ययुक्त खते म्हणतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही तीन मूलद्रव्ये दुय्यम स्वरूपाची होत. नायट्रोजनयुक्त, फॉस्फरसयुक्त आणि पोटॅशयुक्त खतांबरोबर काही वेळा ती दिली जातात.

कॅल्शियम : वनस्पतींच्या वाढीस मदत, रोग प्रतिकार, चयापचयामध्ये निर्माण होणाऱ्या अम्लांचे उदासिनीकरण करणे इत्यादींसाठी वनस्पतींना कॅल्शियम लागतो. विशेषतः शिंबावंत वनस्पतींना त्याची जरूरी असते.जमिनीची अम्लता कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डोलोमाइट, जिप्सम किंवा चुनखडी यातून तसेच सुपरफॉस्फेट, नायट्रोचॉक, नायट्रोलाइमस्टोन इ. खतांतून कॅल्शियमाचा वनस्पतींना पुरवठा होतो.


मॅग्नेशियम : हे मूलद्रव्य हरितद्रव्याचा (क्लोरोफिलाचा) एक घटक आहे. वनस्पतींमध्ये फॉस्फेटांच्या वहनास, कार्बोहायड्रेटे व न्यूक्लिओप्रथिने [ → प्रथिने] यांच्या निर्मितीस तसेच बी तयार होण्यास व त्यांचा विकास होण्यास आणि त्यात स्निग्ध पदार्थ तयार होण्यास मॅग्नेशियमाची मदत होते. नायट्रोलाइमस्टोन, सुपरफॉस्फेट इ. नायट्रोफॉस्फेटांत वापरण्यात येणाऱ्या काही स्थिरकारकांत मॅग्नेशियम अपद्रव्याच्या स्वरूपात असतो. त्यामुळे या खतांबरोबरच ते जमिनीस मिळते. जमिनीची अम्लता कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डोलोमाइटातून तसेच सल्फेट ऑफ मॅग्नेशियातून ते जमिनीस मिळते.

गंधक : याची वनस्पतीच्या श्वासोच्छ्‌वासास मदत होते. ते कमी असल्यास हरितद्रव्य तयार होण्यास वेळ लागतो व झाडे पिकट पिवळसर रंगाची दिसतात. मोहरी, कांदा, लसूण इत्यादींचे वास आणि चव गंधकावरच अवलंबून असतात. वनस्पतींमध्ये गंधक प्रथिने, ॲमिनो अम्ले, ग्लुटाथायोन, ट्रायपिटाइड इत्यादींमध्ये आढळते. गंधक जमिनीस सुपरफॉस्फेट, अमोनियम सल्फेट, जिप्सम यांच्याद्वारे तसेच मूलद्रव्याच्या स्वरूपात दिले जाते.

सूक्ष्म पोषक द्रव्ये : वर उल्लेख केलेल्या मूलद्रव्यांव्यतिरिक्त तांबे, बोरॉन, लोह, मँगॅनीज, जस्त, मॉलिब्डेनम इ. मूलद्रव्यांचीही वनस्पतींना अल्प प्रमाणात आवश्यकता असते. त्यांचा वनस्पतींना कशाप्रकारे उपयोग होतो हे निश्चित कळलेले नाही. तथापि वनस्पतींच्या वाढीचे नियमन करणाऱ्या एंझाइमांचे कार्य ह्याच्यावर अवलंबून असते असे मानले जाते. नवीन संकरित पिकांच्या बाबतीत अशा पोषक द्रव्यांची गरज अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे ती खतांद्वारे जमिनीला पुरवावी लागतात.

तांबे : याच्या कमतरतेने वनस्पतींच्या पानातील कोशिका (पेशी) तुटतात. मोरचूद (कॉपर सल्फेट) या तांब्याच्या संयुगापासून २३–३५% तांबे मिळते. ते जलविद्राव्य असून पानांवर फवारून तसेच जमिनीतून दिल्यास वरील दोष नाहीसा होतो.

जस्त : वनस्पतींच्या कोशिकांमधील ऑक्सिडीकरण कमी करणाऱ्या विक्रियेत याचा उपयोग होतो. तसेच वनस्पतींचे काही रोग कमी होतात. झिंक सल्फेट हे संयुग खत म्हणून वापरल्यास २३–३५% जस्त मिळते. ते जलविद्राव्य असून पानांवर फवारून व जमिनीतून दिले जाते.

मँगॅनीज : हे वनस्पतींमध्ये एंझाइमांबरोबर उत्प्रेरकाचे (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविणाऱ्या पदार्थाचे) कार्य करते. याच्या अभावी वनस्पतींच्या पानांतील हरितद्रव्य कमी होण्याइतपत परिस्थिती निर्माण होते. नायट्रोजनाच्या चयापचयास याचा उपयोग होतो असे मानले जाते. हे मँगॅनीज सल्फेटाच्या स्वरूपात देतात त्यामुळे २३% मँगॅनीज मिळते.

लोह : वनस्पतींतील संश्लेषण (रासायनिक विक्रियांनी शरीरात संयुगे बनणे),  ⇨क्षपण  व ऑक्सिडीकरण या विक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून याचा उपयोग होतो. क्षारीय जमिनीत लोहाचे प्रमाण कमी असते त्यावेळी हे फेरस सल्फेट (२०% लोह) किंवा फेरिक सल्फेट (१७% लोह) यांच्या मार्फत देतात.

बोरॉन : वनस्पतीत प्रथिने तयार होण्यासाठी याचा उपयोग होतो. याच्या अभावी टोकाच्या कळ्या मरतात. मुळे, गाजरे यांसारख्या पिकांचे तंतू तुटतात. हे टाकणखाराच्या (बोरॅक्स वा सोडियम बोरेट याच्या) मार्फत फवारून देतात. हे जलविद्राव्य असून त्यापासून १०·६% बोरॉन मिळते.

मॉलिब्डेनम : याच्या अभावी टोमॅटोची झाडे टिकत नाहीत. हे सुपरफॉस्फेट वा सोडियम मॉलिब्डेट व अमोनियम मॉलिब्डेट यांच्याद्वारे देतात. ही दोन्ही संयुगे जलविद्राव्य असून फवारून देतात. यातून ३७–३९% मॉलिब्डेनम मिळते.

इतर सूक्ष्म मूलद्रव्ये : वर उल्लेख केलेल्या मूलद्रव्यांशिवाय सोडियम, सिलिकॉन, क्लोरीन, ॲल्युमिनियम व कोबाल्ट ही मूलद्रव्ये वनस्पतीत आढळतात. पण त्यांची उपयुक्तता अद्यापि निश्चितपणे सिद्ध झालेली नाही. पोटॅशियम उपलब्ध नसला तर सोडियम वनस्पतींच्या वाढीस मदत करतो. पण पोटॅशियम मिळाल्यावर सोडियमाची उपयुक्तता कमी झाल्याचे आढळले. सिलिकॉनाच्या अभावी गवतांना बुरशीसारखे रोग होतात. वनस्पतीतील अँथोसायनोजेन रंगद्रव्याचा क्लोरीन एक घटक आहे. काही वनस्पतींत ॲल्युमिनियम आढळते, पण त्याचा निश्चित परिणाम माहीत नाही. कुरणातील जमिनीत कोबाल्ट अगदीच उपलब्ध नसेल, तर त्यामधील गवतावर जनावरे नीट पोसली जात नाहीत, असे दिसून आले आहे.

मिश्रखते : दोन किंवा अधिक पोषक द्रव्ययुक्त खतांच्या मिश्रणास मिश्रखते असे म्हणतात. नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश यांनी युक्त असलेल्या खत मिश्रणास ‘पूर्ण खत’ म्हणतात. अशा खतांबरोबर इतर मूलद्रव्येही देण्याची गरज असते व ती त्यातच मिसळतात.

मिश्रखतांतील घटकांचे प्रमाण हे जमीन कशी व कोणत्या प्रकाराची आहे, तीत कोणती पिके घ्यावयाची आहेत यांवर अवलंबून असते. उपयुक्ततेप्रमाणे ह्या खतांची सूत्रे ठरविली जातात. उदा., १०-६-४, २-१२-६, ०-१२-१५ इ. खतांमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम ही मूलद्रव्ये नायट्रोजन, फॉस्फरस पेंटॉक्साइड व पोटॅशियम ऑक्साइड या स्वरूपातच नसली, तरी खतातील त्यांचे प्रमाण याच स्वरूपात व्यक्त करण्याची पद्धत आहे. इतर मूलद्रव्ये त्यांबरोबर असल्यास त्यांच्या प्रमाणांचाही उल्लेख केला जातो.

मिश्रखते दोन प्रकारांनी तयार करतात, पहिल्या प्रकारात ते वापरण्यापूर्वी शेतावर तयार केले जाते. ह्यात मिश्रण सिमेंटाच्या जमिनीवर करतात व ते लगेच वापरले जाते त्यामुळे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. दुसरा प्रकार म्हणजे कारखान्यातच अगोदर तयार केलेले मिश्रण. सर्व खते शुष्क-मिश्रण संयंत्रात (यंत्र संचात) मिसळून, फॉस्फेटयुक्त व पोटॅशयुक्त खतांमध्ये अमोनिया मिसळून, सुपरफॉस्फेटयुक्त व इतर खते मिसळून इ. विविध पद्धतीच्या यंत्रांनी हे मिश्रण तयार केले जाते. मिश्रखते बनविण्यापूर्वी निरनिराळी खते योग्य प्रमाणात घेऊन एकजिनसी होईपर्यंत मिसळतात. त्यापूर्वी त्यांचे रासायनिक विश्लेषण करण्यात येऊन पाहिजे त्या मिश्रणांचे मिश्रखत बनवितात.  सर्व खते कुटून, चाळून फिरत्या मिश्रकात चांगली एकत्र करतात व नंतर पोत्यात भरून विक्रीस पाठवितात.

मिश्रखते बनविताना त्यांत विनिर्देशित प्रमाणानुसार पोषक द्रव्ययुक्त खते, मिश्रण घट्ट होऊ नये व जमिनीला प्रत्यक्ष देण्याच्या वेळी योग्य स्थितीत रहावे यांसाठी पीट, भुईमुगाची टरफले, भाताचा कोंडा यांसारखे कमी प्रतीचे जैव पदार्थ, मिश्रणातील नायट्रोजनयुक्त खत अम्लीय स्वरूपाचे असल्यास त्याच्या उदासिनीकरणासाठी डोलोमाइटी चुनखडकासारखे क्षारकीय पदार्थ तसेच मिश्रणाचे वजन आवश्यक तितके राखण्यासाठी वाळू, माती आणि राख यांसारखे अपशिष्ट पदार्थ मिसळतात.


दाणेदार खते : मिश्रखतांचा मुख्य दोष म्हणजे त्यांतील मिश्रण कित्येक वेळा एकजिनसी नसते. असे खत शेतात टाकल्यावर त्यातील घटक वेगवेगळ्या ठिकाणी पडू शकतात. तसेच ते भुकटीच्या स्वरूपात असल्याने वाऱ्याने उडून जाण्याची शक्यता असते. पेरणी यंत्रात ते अडकून कामात अडथळा येतो. हे दोष टाळण्यासाठी मिश्रखते दाणेदार स्वरूपात बनविली जातात. मिश्रखतांप्रमाणेच यूरिया, सुपरफॉस्फेट, अमोनियम सल्फेट इ. खतेही दाणेदार स्वरूपात तयार केली जातात.

नायट्राेजनयुक्त खतांसाठी वापरण्यात येणारी गुठळी पद्धती दाणेदार मिश्रखतांना उपयुक्त ठरत नाही. यासाठी निराळ्या पद्धती वापरतात. सुरुवातीस वापरली गेलेली पद्धत म्हणजे ‘ओली-सुकी’ पद्धत होय. ती प्रथम इंग्लंडमध्ये वापरली गेली. सध्या ती यूरोपमध्ये वापरली जाते. ह्या पद्धतीत पाणी किंवा वाफ वापरतात. यामुळे मिश्रखताचा गठ्ठा होतो व पुढे तो वाळवून त्याचे दाणे तयार करतात. ह्या पद्धतीने कमी प्रतीचे दाणे मिळतात व पद्धत खर्चिकही आहे.

दाणे तयार करण्याची आधुनिक पद्धती ही सापेक्षतः मोठ्या घनफळाच्या द्रव अवस्थेचा वापर करणे, कमीतकमी पाण्याचा वापर करून द्रव अवस्थेचे इष्ट ते घनफळ मिळविण्यासाठी उच्च तापमानावर विद्राव्य असलेल्या लवणांचा वापर करणे आणि द्रव व घन अवस्थांच्या प्रमाणांवर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवणे या तत्त्वांवर आधारलेली आहे. या पद्धतीत द्रव पदार्थ आणि घन पदार्थ दाणे बनविण्याच्या यंत्रात मिसळतात. येथे उच्च तापमानावर दाणे बनतात. नंतर ते सर्व चाळून वाळवितात. साठवण्यापूर्वी दाणे थंड केल्यास जास्त काळ टिकतात. दाणेदार खते विविध प्रकारांनी बनवितात, पण प्रत्येक पद्धतीत साधारणतः वरील टप्पे वापरले जातात.

काही वेळा पाण्याऐवजी सजल अमोनिया किंवा द्रवरूप नायट्रोजनयुक्त संयुगे वापरतात. यामुळे त्यातील मुक्त अम्ल उदासीन होऊन नायट्रोजनाचे प्रमाण वाढते. पण अमोनिया जास्त वापरला गेला, तर अविद्राव्य फॉस्फेटे तयार होतात.

दाणेदार खतांचा एक दोष म्हणजे त्यांतील घटक एकमेकांच्या अगदी सान्निध्यात असल्याने त्यांच्या एकमेकांशी रासायनिक विक्रिया होऊ शकतात.

द्रवरूप व वायुरूप खते : निर्जल अमोनियाचा खत म्हणून प्रथम जे. ओ. स्मिथ यांनी १९३० मध्ये वापर केला. पण त्याचा प्रत्यक्ष वापर १९५० नंतर अमेरिकेत वाढला. हा अमोनिया जमिनीत १५ सेंमी. खोल विशिष्ट यंत्राद्वारे दिला जातो.

सजल अमोनिया खत म्हणून वापरणे खर्चाचे आहे. तथापि तो निर्जल अमोनियासारखाच यंत्राद्वारे काही प्रमाणात वापरतात. सजल अमोनिया साठविण्यास व हाताळण्यास अवघड आणि खर्चिक असतो. तसेच त्यातील नायट्रोजनाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे ‘नायट्रोजन विद्राव’ या नावाने ओळखले जाणारे विद्राव वापरणे सोयीचे ठरते. ह्या विद्रावांत मुक्त अमोनिया नसतो व नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असते. या विद्रावांतील घटकांचे प्रमाण निरनिराळे असते. अशा एका प्रमुख विद्रावात अमोनियम नायट्रेट, यूरिया आणि पाणी यांचे मिश्रण असते. उच्च संहती  आणि जमिनीखाली देण्याची जरूरी  नसल्यामुळे यूरिया–अमोनियम नायट्रेट विद्राव हे खत लोकप्रिय झाले आहे. याशिवाय यूरिया आणि अमोनियम नायट्रेट यांचे पाण्यातील विद्रावही वापरतात ह्यांशिवाय द्रवरूप मिश्रखतेही तयार करतात. ही खते लहान कारखान्यांत बनवून स्थानिक रीत्या वापरतात. द्रवरूप खते फार पूर्वीपासून वापरात आहेत. पण मोठ्या प्रमाणावर ती १९५० नंतरच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान येथे वापरण्यात येऊ लागली आहेत. द्रवखते उष्ण-मिश्रण पद्धत व शीत-मिश्रण पद्धत या पद्धतींनी तयार करतात.

कोष्टक क्र. ४. खतांचा विविध देशांत होणारा वापर ( हजार टनांत) 

देश 

नायट्रोजनयुक्त 

फॉस्फरसयुक्त 

पोटॅशयुक्त 

१९६५-६६

१९६९-७०

१९६५-६६

१९६९-७०

१९६५—६६

१९६९—७०

अमेरिकेची संयुक्त संस्थाने 

४,८३२ 

६,६७९ 

३,५२२ 

४,१७७ 

२,९२२ 

३,६२४ 

ऑस्ट्रेलिया 

१७० 

१७२ 

९५३ 

८३० 

६३ 

९५ 

इटली 

४६१ 

५५० 

४५३ 

४८६ 

१६८ 

१९५ 

कॅनडा 

२१८ 

२४७ 

३३३ 

३२० 

१४२ 

१९० 

जपान 

७७५ 

८९७ 

५४६ 

६८९ 

६०७ 

६९० 

झेकोस्लोव्हाकिया 

२४६ 

४०० 

२५४ 

३१२ 

३९५ 

४७६ 

डेन्मार्क 

१९२ 

२७० 

१२७ 

१२७ 

१७५ 

१८४ 

न्यूझीलंड 

७ 

१० 

३४२ 

३४० 

१०८ 

९९ 

प.जर्मनी 

८७३ 

१,०८४ 

८१९ 

८५६ 

१,१९० 

१,१२० 

पू. जर्मनी 

४१३ 

४८७ 

३१३ 

३८९ 

५८६ 

६२४ 

पोलंड 

४३३ 

५१३ 

३५४ 

६०० 

५१६ 

१,०५० 

फ्रान्स 

८७० 

१,२४३ 

१,२५९ 

१,६८१ 

९७० 

१,२७९ 

ब्रिटन 

६८९ 

६५० 

४२२ 

४६० 

४६३ 

४६२ 

भारत 

५४० 

१,२४३ 

१३४ 

३१५ 

९० 

१५१ 

रशिया 

२,२८२ 

३,७९८ 

१,५०४ 

१,९१६ 

१,८९१ 

२,३१९ 

स्पेन 

३८५ 

६०४ 

३०५ 

४०६ 

९२ 

२२५ 

स्वीडन 

१६१ 

२०५ 

१२० 

१३९ 

१०६ 

१२९ 

जागतिक

१७,४०० 

२५,८०० 

१४,४०० 

१७,९०० 

१२,१०० 

१५,५०० 

खत निर्मिती : मोठ्या प्रमाणावर खत निर्मिती व त्यांची विक्री केव्हा सुरू झाली हे अद्यापि निश्चित माहीत झालेले नाही. तथापि २,००० वर्षांपूर्वी चिनी लोक भाजलेली हाडे खत म्हणून वापरत होते असा उल्लेख आढळला आहे. तसेच सुरुवातीचे खत व्यापारी भरखते किंवा सॉल्ट पीटर गोळा करून, वाळवून व बारीक करून विकत असावेत. १७८६ च्या सुमारास इंग्लंडमध्ये हाडे दळण्याच्या गिरण्या होत्या. १८३१ मध्ये कोलर या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञांनी हाडे सल्फ्यूरिक अम्लात बुडवून व त्यात इतर पदार्थ मिसळून संस्करित खत तयार करण्यास सुरुवात केली. ह्या पद्धतीत फोन लीबिक या जर्मन शास्त्रज्ञांनी बऱ्याच सुधारणा केल्या. ह्याच सुमारास अमेरिकेतही याच पद्धतींनी खते बनविण्यात येत होती. त्यानंतर हाडांऐवजी फॉस्फेटयुक्त खनिजे वापरून सुपरफॉस्फेट तयार करण्याच्या उद्योगाचा पाया घातला गेला. १८४९ मध्ये अमेरिकेत पहिला मिश्रखताचा कारखाना पी. एस्. चॅपल आणि विल्यम डेव्हिसन यांनी सुरू केला. विसाव्या शतकात हाडे, नैसर्गिक नायट्रोजनाचा पुरवठा व इतर नैसर्गिक कच्चा माल यांचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले व संश्लेषित खतांच्या निर्मितीकडे लक्ष वेधले गेले. खतनिर्मितीसाठी पूर्वी मजूर जास्त लागत त्यामुळे निर्मितीचा वेग कमी होता. पण संतत व अर्धसंतत प्रक्रिया आणि यांत्रिकीकरणामुळे खतनिर्मिती जलद आणि मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. अमोनियम सल्फेट व अमोनियम नायट्रेट यांचा उपयोग नायट्रोजनयुक्त खतासाठी होऊ लागला. पोटॅशियम लवणांच्या खाणकामाच्या व संस्कारांच्या पद्धतींत सुधारणा झाल्या. १९५०–६५ या काळात ह्या उद्योगात बराच बदल झाला. १९५० मध्ये जे पदार्थ कमी महत्त्वाचे गणले जात होते ते १९६५ मध्ये जास्त पोषक द्रव्ये देणारे ठरले आहेत. नवीन प्रकारची खते तयार होऊ लागली असून खत वापराचे प्रमाण बरेच वाढले आहे. निर्मिती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर व ⇨ खनिज तेल रसायनांचा कच्चा माल म्हणून उपयोग करण्यात येऊ लागला आहे.

खतनिर्मिती हा जगातील एक महत्त्वाचा उद्योगधंदा असून १९६९-७० मध्ये २,००० लक्ष टन एवढे उत्पादन झाले. त्याची कारखान्यातील किंमत ७,००० दशलक्ष डॉलर्स एवढी होती.


भारतीय उद्योग : खाजगी व सरकारी क्षेत्रांत मिळून भारतात एकूण ६० कारखान्यांत खतनिर्मिती होते. ह्यांपैकी बऱ्याच कारखान्यांत खतनिर्मिती उपपदार्थ म्हणूनच करतात. खतनिर्मिती करणाऱ्या खाजगी क्षेत्रांतील ३५ कारखान्यांपैकी ८ कारखाने नायट्रोजनयुक्त व २७ कारखाने फॉस्फरसयुक्त खते बनवितात. द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी क्षेत्रातील कंपनीचे पाच कारखाने नामरूप (आसाम), सिंद्री (बिहार), नानगल (पंजाव), तुर्भे (महाराष्ट्र) व गोरखपूर (उ. प्रदेश) येथे सुरू आहेत. दुर्गापूर (प. बंगाल) व बरौनी (बिहार) येथील कारखाने १९७३ मध्ये, तालचेर (ओरिसा) व रामगुंडम (आंध्र प्रदेश) येथील १९७५

कोष्टक क्र. ५. सरकारी व खाजगी क्षेत्रांतील खत कारखान्यांची प्रगती ( उत्पादनाचे आकडे हजार टनांत)

वर्षे

सरकारी क्षेत्र

%

खाजगी क्षेत्र

%

एकूण

कारखाने

उत्पादन

कारखाने

उत्पादन

कारखाने

उत्पादन

१९६५-६६

२१८

९३·६

१५

६·४

१३

२३३

१९६८-६९

११

४०१

७३·८

१४२

२६·२

१८

५४३

१९६९-७०

११

४१८

५८·४

२९८

४१·६

१९

७१६

१९७०-७१

८३०

१९७१-७२

९५०

मध्ये व कोर्बा (मध्य प्रदेश) येथील कारखाने १९७४ मध्ये खतनिर्मितीस सुरुवात करतील अशी योजना होती. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. च्या अलवाये (केरळ) येथील कारखान्यात खतनिर्मिती होत असून अंबलमेडू (कोचीन) येथील कारखान्यात १९७२ पासून उत्पादनास सुरुवात करण्याची योजना होती. मद्रास फर्टिलायझर्स लि. च्या मद्रास येथील कारखान्यात खतनिर्मिती चालू आहे. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्हच्या कलोड (गुजरात) येथील कारखान्यात १९७४ पासून नायट्रोजनयुक्त व कांडला येथील कारखान्यात मिश्रखते तयार करण्याची योजना होती. यांशिवाय नेव्हेली लिग्नाइट कॉर्पोरेशन, नेव्हेली (तमिळनाडू) आणि हिंदुस्थान स्टील लि. च्या भिलाई (मध्य प्रदेश), रूरकेला (ओरिसा), दुर्गापूर (प. बंगाल) व हिंदुस्थान झिंक लि. च्या देबारी (राजस्थान) येथे उप-उत्पादन म्हणून खतनिर्मिती केली जाते. राज्यसरकारी क्षेत्रात फक्त बिहार स्टेट सुपरफॉस्फेट फॅक्टरी ही धनबाद येथे खतनिर्मिती करते. नॅप्थ्यापासून खते तयार करणारे कारखाने तुर्भे, गोरखपूर, कोटा, मद्रास, गोवा, कोचीन आणि दुर्गापूर येथे असून तुतिकोरीन, मंगलोर आणि बरौनी येथे उभारण्यात येणारे कारखानेही नॅप्थ्यापासून खते तयार करणार आहेत.

कोष्टक क्र. ६. फॉस्फेटयुक्त खत उत्पादनाचे आकडे ( हजार टनांत)

वर्षे

सरकारी क्षेत्र

%

खाजगी क्षेत्र

%

एकूण

कारखाने

उत्पादन

कारखाने

उत्पादन

कारखाने

उत्पादन

१९६५-६६

२१

१८·९

२२

९०

८१·१

२८

१११

१९६८-६९

५३

२५·२

२७

१५७

७४·८

३४

२१०

१९६९-७०

४२

१८·९

२७

१८०

८१·१

३४

२२२

१९७०-७१

२२९

१९७१-७२

२९३

उत्पादन व क्षमता यांबाबतीत या धंद्याची प्रगती जलद होत आहे. एकूण मागणीपैकी ५३% पुरवठा देशातील कारखान्यांकडून होतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेत फक्ता अमोनियम सल्फेट खते तयार केली गेली. दुसऱ्या योजनेत अमोनियम सल्फेट–नायट्रेट, यूरिया, कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट ही खते तयार करण्यात आली  पण अमोनियम सल्फेटाची निर्मिती जास्त होती. तिसऱ्या योजनेत आणि नंतरच्या एकवार्षिक योजनांत यूरिया व कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट यांची निर्मिती जास्त होती.

१९६० पर्यंत नायट्रोजनयुक्त खतांची निर्मिती सरकारी क्षेत्रातच होत होती, पण १९६०-६१ मध्ये खाजगी क्षेत्रातही अशा खतांची निर्मिती होऊ लागली. त्यावेळच्या ९ कारखान्यांपैकी ६ सरकारी (क्षमता ८९,००० टन) व ३ खाजगी होते. १९६५-६६ मध्ये १३ व १९६९-७० मध्ये १९ कारखाने निर्मिती करू लागले. १९६९-७० मध्ये सरकारी कारखाने ११ होते व त्यांत एकूण उत्पादनापैकी ५८% उत्पादन होते. निर्मितीवरील नियंत्रणे उठविल्यावर खाजगी कारखाने निर्मिती करू लागले. सर्व कारखान्यांची प्रगती कोष्टक क्र. ५ मध्ये दिली आहे. नायट्रोजनयुक्त खतनिर्मिती करणाऱ्या कराखान्यांची क्षमता १९७० अखेर १३·४४ लक्ष टन इतकी होती. यापैकी ५१% क्षमता सरकारी कारखान्यांची होती.

फॉस्फेटयुक्त खतनिर्मिती खाजगी कारखाने जास्त प्रमाणात करतात. हे उत्पादन एकेरी सुपरफॉस्फेटाच्या स्वरूपात होते. कोष्टक क्र. ६ मध्ये फॉस्फेटयुक्त खत निर्मितीची आकडेवारी दिली आहे. सरकारी क्षेत्रातील फॉस्फेटयुक्त खताचे उत्पादन १९६०-६१ पेक्षा १९६८-६९ मध्ये वाढले, पण १९७०-७१ मध्ये कमी झाले. या कारखान्यांची क्षमता ४,२१,००० टन आहे.

पोटॅशियम सल्फेट आयात करावे लागते. त्याऐवजी पोटॅशियम क्लोराइड व पोटॅशियम शोएनाइट यांच्या मिश्र लवणांपासून खत निर्माण करण्याची पद्धत भावनगर येथील सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने शोधून काढली आहे. या संस्थेने कांडला येथे १,००० टन पोटॅशियम क्लोराइड व २,००० टन एप्सम लवण तयार करण्याचा भारतातील पहिला कारखाना काढला आहे.

खतनिर्मिती वाढविण्यासाठी सरकारी क्षेत्रात हल्डिया (प. बंगाल) व परादीप (ओरिसा) येथे नवीन कारखाने काढण्याचे व गोरखपूर, नानगल व कोचीन येथील कारखान्यांची वाढ करण्याचे ठरविले आहे. तर खाजगी क्षेत्रात कामठी (महाराष्ट्र), तुतिकोरिन (तमिळनाडू) मीठापूर (गुजरात), पानिपत (हरियाणा) व मंगलोर (कर्नाटक) येथे नवीन कारखाने निघणार आहेत. कोटा येथील कारखान्याची वाढ करण्यात येणार आहे.

भरखते : सोनखताची योजना तमिळनाडू, राजस्थान, पंजाब, ओरिसा व कर्नाटक ह्या राज्यांत अमलात आली आहे. या योजनेखालील ५०० हून अधिक पंचायतींना केंद्र सरकारकडून प्रत्येकी रुपये २,००० एवढे अनुदान मिळते. १९६९-७० मध्ये हिरव्या खताखाली ८५ लक्ष हेक्टर जमीन होती, तर १९७०-७१ मध्ये १०४ लक्ष हेक्टर जमीन होती.

वापर : कृषिक्षेत्राच्या प्रत्येक हेक्टरला नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांचा विविध देशांतील तुलनात्मक वापर कोष्टक क्र. ७ मध्ये दाखविला आहे.


कोष्टक क्र. ७. खताचा विविध देशांतील दर हेक्टरी वापर

देश

नायट्रोजन किग्रॅ.

फॉस्फरस किग्रॅ.

पोटॅश किग्रॅ.

एकूण किग्रॅ.

चीन (तैवान)

१८९·५८

४४·१२

६८·६३

३०२·३३

जपान

१३६·७६

१०५·१०

१०४·९५

३४६·८१

कोरिया

१२२·३४

५२·९५

३०·४६

२०४·७५

भारत

६·८७

१·६६

०·९२

९·४५

फिलिपीन्स

६·७५

४·८०

४·२६

१५·८१

भारतातील आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उ. प्रदेश, तमिळनाडू व पंजाब या पाच राज्यात ५७% हून जास्त खत वापरले जाते, तर मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश व ओरिसा ह्या राज्यांत खतवापर कमी  होतो. १९७०-७१ मध्ये आंध्र प्रदेश, केरळ व उ. प्रदेश या राज्यांत नायट्रोजनयुक्त खतवापर कमी झाला, तर आसाम व मध्य प्रदेशात ४२·९% व ४८·४% वापर वाढला. बिहार, केरळ, उ. प्रदेश ह्यांत फॉस्फेटयुक्त खतांचा वापर कमी झाला.

आयात : उत्पादन वाढू लागल्याने खतांची आयात बरीच कमी होत आहे. १९६८-६९ मध्ये रु. १४० कोटीची, १९६९-७० मध्ये रु. १३९ कोटीची तयार खते आयात करण्यात आली. पोटॅशयुक्त खते आयातच करावी लागतात.

कोष्टक क्र. ८. आयात होणाऱ्या खतांची आकडेवारी (१,००० टनांत)

वर्षे

नायट्रोजनयुक्त

फॉस्फरसयुक्त

पोटॅशयुक्त

एकूण

१९६०-६१

१७२

२५

१९७

१९६५-६६

३१०

६२

९४

४६६

१९६८-६९

८४७

१३८

२००

१,१८५

१९६९-७०

६६७

९४

१६४

९२५

१९७०-७१

४७७

३२

२२६

७३५

संशोधन : फर्टिलायझर ॲसोसिएशन ऑफ इंडिया या दिल्ली येथील संस्थेत खत उद्योगधंद्याच्या विविध समस्यांवर संशोधन करण्यात येते. संस्थेतर्फे गट चर्चा, भाषणे व संशोधनात्मक प्रबंधांची प्रसिद्धी आयोजित करण्यात येतात. फर्टिलायझर न्यूज  हे मासिक या संस्थेतर्फे प्रसिद्ध केले जाते.

द फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया : सिंद्री फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लि. व हिंदुस्थान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि., नानगल या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून १९६१ मध्ये फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सरकारी क्षेत्रातील कंपनी स्थापन करण्यात आली. या कॉर्पोरेशनच्या सिंद्री, नानगल, तुर्भे, नामरूप (आसाम) आणि गोरखपूर येथील कारखान्यांत खतनिर्मिती होत आहे. दुर्गापूर व बरौनी येथील कारखाने सुरू व्हावयाचे आहेत. नामरूप, सिंद्री, तुर्भे व गोरखपूर येथील कारखान्यांची वाढ व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. रामगुंडम, तालचेर व कोर्बा येथे कोळशापासून मिळणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करणारे कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. सर्व कारखान्यांची एकूण उत्पादनक्षमता ४२१ हजार टनांपासून २,९७१ हजार टनांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. ह्या कारखान्यांत एकूण उत्पादनापैकी ३२% नायट्रोजनयुक्त खते तयार होतात.

तयार झालेल्या खतांचे वाटप व विक्री करण्यासाठी पूर्व, उत्तर व दक्षिण-पश्चिम असे तीन विभाग करण्यात आले आहेत. या संस्थेतर्फे खतवापराची प्रात्यक्षिके करून दाखविली जातात व जमिनींचे विश्लेषण करून दिले जाते. तसेच सिंद्री येथे संस्थेची संशोधन शाखा असून तेथे खतांविषयीच्या विविध प्रश्नांसंबंधी संशोधन केले जाते. तसेच तेथे प्रशिक्षण देण्याचीही सोय करण्यात आलेली आहे.

पहा : अमोनिया नायट्रोजन पोटॅश फॉस्फोरिक अम्ले यूरिया.

संदर्भ : 1. Sauchelli, V. Chemistry and Technology of Fertilizers, New York–London, 1963.

    2. Slack, A. V. Chemistry and Technology of Fertilizers, New York, 1967.

    3. Yawalkar, K. S.  Agarwal, J. P. Manures and Fertilizers, Nagpur, 1962.

एन्. नारायण (इं.) पाटील, ह. चिं. (म.)

कारेकर, अ. न. जमदाडे, ज. वि. मिठारी, भू. चिं.