भांडी, धातूंची : स्वयंपाकाची व दैनंदिन घरगुती वापरासाठी लागणारी भांडी तसेच डब्या, डबे, पिपे, सुरया, पुष्पपात्रे यांसारखी कलाकुसरीची व शोभेची भांडी, वायुपात्रे, दुधाच्या आणि इतर खास बरण्या, टूथपेस्ट, औषधे यांसाठी लागणाऱ्या दबणाऱ्या नळ्या इत्यादींसारखी धारक पात्रे यांची माहिती या लेखात दिली आहे. लेखात प्रथम घरगुती भांड्यांची व नंतर धारक पात्रांची माहिती दिलेली असून धारक पात्रे बनविण्याच्या काही पद्धती घरगुती भांडी बनविण्याकरिताही वापरल्या जातात.

घरगुती भांडी : इतिहास : धातूची भांडी प्रथम स्वयंपाकासाठी वापरली गेली असावीत. आताची बरीच भांडी ही जुन्या भांड्यांसारखी आहेत. उदा., कढ्या, मुठीचे तवे, घागरी वगैरेंसारख्या भांड्याचे आकार विशेष बदलेले आढळत नाहीत. मात्र भांडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या प्रकारांमध्ये व रुपण पद्धतीमध्ये (धातूला इष्ट आकार देण्याच्या पद्धतीमध्ये) बदल होत गेलेले दिसतात. भांड्यांसाठी मानवाने प्रथम तांब्याचा वापर केला. नंतर कासे (ब्राँझ), पितळ व लोखंड यांची भांडी वापरात आली.काही काळ एनॅमल केलेली [सामान्यतः 

अपारदर्शक काचेचा धातूच्या पृष्ठावर एकजीव असा थर दिलेली [⟶ एनॅमल] भांडी लोकप्रिय होती. मात्र तांबे व  पितळ यांच्या भांड्यांना कल्हई करावी लागते व लोखंडाची भांडी जड असतात व ती गंजतातही. त्यामुळे हलक्या, कमी गंजणाऱ्या व उष्णतेची चांगली संवाहक असलेल्या अशा ॲल्युमिनियमाची भांडी सर्वत्र लवकरच प्रचारात आली. तदनंतर विसाव्या शतकात अगंज पोलादांच्या (स्टेनलेस स्टीलच्या) भांड्यानी तर घरगुती भांड्यांमध्ये क्रांतीच घडवून आणली आहे. कारण सर्वसाधारण अन्नपदार्थामुळे ही पोलादे गंजत नाहीत. कधीकधी अशा भांड्यांच्या तळाला तांब्याचा लेप देतात. त्यामुळे भांड्यास मिळणारी उष्णता लगेचच सर्वत्र एकसारखी पसरली जाऊन पदार्थ करपण्याची शक्यता कमी होते. अशा तऱ्हेने हल्ली अगंज पोलाद, ॲल्युमिनियम, तांबे, पितळ व लोखंड यांची भांडी सर्वसाधारणपणे वापरली जातात. शिवाय जर्मन सिल्व्हर (निकेल, तांबे व जस्त यांची मिश्रधातू), प्युटर वा ब्रिटानिया धातू (तांबे, कथिल आणि अँटिमनी यांची मिश्रधातू), हिंदालियम, घंटाधातू (तांबे, कथिल यांचे प्रमाण ७:२ असलेली मिश्रधातू), कासे, पांढरे पितळ (तांबे व जस्त यांची मिश्रधातू) इ. मिश्रधातूंची भांडीही थोड्या प्रमाणात वापरली जातात. जस्तलेपित पोलादी पत्र्यांची घमेली, बादल्या, चाळण्या इ. घरगुती भांडी वापरात असून क्रोमियम, निकेल, चांदी, सोने इ. धातूचा मुलामा दिलेली भांडीही कमीअधिक प्रमाणात वापरली जातात. पॉलिटेट्राफ्ल्युओरोएथिलीन (टेफ्लॉन) नावाच्या फ्लॅस्टिकावर बहुतके रसायनांचा परिणाम होत नाही तसेच-२७० से. ते ३८५ से. दरम्यानच्या तापमानांमध्ये याचे भौतिक गुणधर्म बदलत नाहीत. त्यामुळे स्वयंपाकाच्या भांड्यांच्या आतील बाजूंवर या फ्लॅस्टिकाचे आवरण देण्यात येते. या आवरणामुळे शिजविण्यात, तळण्यात वा भाजण्यात येणारा पदार्थ भांड्याला चिकटत नाही.

मध्य-पूर्व आशिया व यूरोप : सुमेर प्रदेशामध्ये इ. स. पू ४००० च्या सुमारास व त्यानंतरच्या काळात तांब्याची भांडी बनवीत. तांब्याचा पत्रा ठोकून तयार केलेली तस्तासाऱखी अखंड पात्रे (विशेषतः इ. स. पू. २६८६-२१६० या काळातील) ईजिप्तमध्ये सापडली आहेत.

इ.स.पू. २००० च्या सुमारास ग्रीस व इटलीमध्ये भांडी तयार करण्यासाठी सोन्या-चांदीचा वापर झाला असावा. या सुमाराचे सोन्याचे पेले ट्रॉय (ग्रीस) शहराच्या उत्खननात सापडले आहेत. सोन्या-चांदीबरोबर काशाचीही भांडी तेथे बनवीत. इ. स. पू. २००० च्या सुमाराचे मिनोअन पद्धतीचे सोन्याचे पेले, मायसिनिअन पद्धतीच्या कासे, चांदी व सोन्याच्या सुरया, तसेच सोन्याचे कप, वाडगे इ. व चांदीचे जग ग्रीसमध्ये बनवीत. सोन्याच्या पेल्यांवर उठावाचे नक्षीकाम असे.

इ.स.पू. १५००-५०० या काळातील घरगुती वापराची काशाची भांडी पर्शियाच्या लुरिस्तान भागात सापडली आहेत. ग्रीसमध्ये या काळात तयार झालेली काशाची भांडी आजही चांगल्या स्थितीत आढळतात. ग्रीसमध्ये मुख्य भाग पत्रा ठोकूनच तयार करीत व त्याला मूठ, झाकण इ. भाग डाख देऊन वा रिव्हेटाने जोडत. इ.स.पू. ३३० च्या सुमारास तेथे पत्रा ठोकून भांडी तयार करण्याची कला कळसास पोहोचली होती. भांड्यावर सुशोभन करण्यासाठी प्रथम पत्रा साच्यात ठोकीत व नंतर जोडून भांडी करीत. इट्रुस्कन लोक सामान्यतः निर्यातीसाठी भांडी बनवीत. रोमन लोकही काशाची भांडी वापरीत. रोमन साम्राज्याच्या अस्ताच्या सुमारास पितळेचा भांड्यासाठी वापर करण्यास सुरुवात झाली.

इ.स.पू पाचव्या शतकात इराणमध्ये ॲकिमेनिडकालीन विविध आकारांची सोन्या-चांदीचे पेले, लहान वाडगे, फुलदाण्या इ. भांडी सापडली आहेत. ग्रीक, इट्रुस्कन व फिनिशियन लोकांनी तयार केलेली इ.स. पू. पाचव्या शतकातील कलाकुसरयुक्त चांदीची भांडी सापडली आहेत तसेच इट्रुस्कन थडग्यात इ. स. पू. चौथ्या शतकातील चांदीची भांडी सापडली आहेत.

उठावाचे नक्षीकाम असलेली चांदीची भांडी रोममध्ये इ. स. पू. चौथ्या शतकात तयार होत. ग्रीकांनी इ. स. पहिल्या शतकात तयार केलेली चांदीची भांडी थोरले प्लिनी यांच्या काळात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात गडप झाली होती, ती आता उत्खननात सापडली आहेत. ग्रीसमधून चांदीच्या थाळ्या तयार करून बाहेर पाठवीत. या थाळ्यांवर त्यांच्या वजनांची नोंद असे. इ. स. पहिल्या शतकात रोममध्ये उठावाचे नक्षीकाम व कलाकुसर असलेली ऑगस्टीन घाटाचे पेले इ. भांडी तयार करीत. याच काळात पूर्व यूरोपियन राष्ट्रांत धार्मिक कार्यासाठी सोन्या-चांदीच्या भांड्याचा वापर करीत असत.

इ. स. २२४-६५१ या सासानिड काळातील मुठींचे व दांड्याचे चषक, बश्या, वाडगे इ. भांडी सोन्या-चांदीचे बनवीत. विविध चित्रे, देखावे इ. आधी पत्र्यांवर काढीत आणि नंतर हे पत्रे भांड्याच्या आकारात झाळून बसवीत.

आठव्या-नवव्या शतकांत काही विशिष्ट पात्रे तांबे व तिच्या मिश्रधातूंपासून तयार करीत. मीत्र तांबे व पितळ यांपासून बनविलेली पूजेची भांडी वापरण्यास चर्चेच्या पदाधिकाऱ्यांनी बंदी केली होती.

नवव्या ते बाराव्या शतकांत बायझंटिन काळात यूरोपात काशाचे पेले बनवीत, तर इस्लामी लोक काशाच्या कलाकुसरीच्या सुरया आदि भांडी बनवीत.

बाराव्या शतकापासून चवदाव्या शतकाअखेर इटलीत तांब्यावर सोनेरी मुलामा दिलेले पेले मोठ्या प्रमाणावर तयार करीत असत. धार्मिक कार्यासाठी कार्यासाठी वापरावयाची भांडी तांब्यावर सोनेरी मुलामा दिलेली, तसेच चांदीची व पितळेची असत.

तेराव्या शतकात इस्लामी राष्ट्रांत प्राणि-पक्षी यांचे चांदीचे नक्षीकाम असलेली तांब्याची भांडी तयार करीत. या भांड्यावर कलाकाराचे नाव देण्याची पद्धत आढळून येते.

बाराव्या, तेराव्या व चौदाव्या शतकांत हात धुण्यासाठी काशाच्या तस्ताचाही वापर हात धुण्यासाठी करीत. वापरण्यात येणाऱ्या सिंहाच्या (क्वचित इतर प्राण्यांच्या) आकाराच्या काशाच्या ओतीव सुरया फ्रान्स, इंग्लंड व स्कँडिनेव्हिया येथे तयार करीत. काशाच्या तस्ताचाही वापर हात धुण्यासाठी करीत. बाराव्या तेराव्या शतकांत काशाची विविध आकाराची तस्ते व वाडगे तयार करीत असत. हॅन्सेटिक पद्धतीचे वाडगे हे काशाचे व ओतीव असत. हे गोलाकर असून त्यांच्या अंतर्भागावर पुराणकालीन देखावे कोरलेले असत. पंधराव्या शतकात काशाचे वाडगे, तस्ते, फुलदाण्या, मग, जग, विविध प्रकारचे तवे इ. भांडी सुशोभित करीत असत.


प्यूटर या मिश्रधातूपासून ओतकामाने भांडी तयार करीत. सोळाव्या शतकापर्यंत याच्या भांड्यांवर नक्षीकाम करीत नसत. थाळ्या, वाडगे, जग यांचे साचे साधे असत. आधी कोरलेल्या नक्षीयुक्त तांब्याच्या साच्यात ही मिश्रधातू ओतून नर्नबर्ग येथे उठावाच्या नक्षीची भांडी करीत. थाळ्या, बश्या इ. भांडी मिश्रधातू साच्यात ओतून नंतर लेथसारख्या यंत्रावर घाशीत व ठोकून त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत करीत. क्वचित त्यांना पितळी मुठी, ठोकळे इ. भाग जोडीत व मुलामा देत. इ.स च्या सुरुवातीस दोन मुठी असलेली गोल आकाराची भांडी बनवीत असत. अशीच भांडी चौदाव्या व पंधराव्या शतकांत फ्रान्समध्ये तयार करीत असत. इ.स. १५०० च्या सुमारास धातूच्या बहुकोनी बाटल्या तयार करीत असत. याच काळात बशीसारखी बूड असलेले, गोलाकार व लांब अरुंद मानेचे जग बनवीत. तसेच पिण्याची-ओतण्याची भांडी बनविली जात. सोळाव्या शतकात पिण्याची-ओतण्याची भांडी, मूठ व बिजागरीचे झाकण असलेले मोठे कप (टँकार्ड), बश्या, वाडगे इ. भांडी प्यूटरची बनवीत.

सोळाव्या शतकात पूजेच्या भांड्यासाठी तांब्याचा वापर कमी होऊन चांदीचा वापर वाढला. इटलीत कोरीवकामयुक्त पाणी पिण्याची पात्रे व जग तांब्याचे बनवीत, तर युरोपच्या इतर भागांत त्यासाठी काशाचा वापर करीत. याच काळात इटलीत पितळेची ताटे (थाळ्या) तयार होऊ लागली. मात्र ती इस्लामी कारागिरांकडून करुन घेत असल्याने त्यांवरील कोरीवकाम इस्लामी पद्धतीचे असे. जर्मनीत पितळी पत्रा ठोकून खोल वाडगे व बश्या करीत. ती ‘न्यूरेंबर्ग ब्रास’ म्हणून ओळखली जात. यांतील नक्षी तळाच्या आतील बाजूवर असे. १५२० नंतर वाडग्यांचे आकार मोठे झाले व बश्या सपाट आकारात तयार होऊ लागल्या. पुढे प्यूटरच्या वापराने अशा भांड्याच्या अस्त झाला.

इस्लामी राष्ट्रांतून धार्मिक परंपरेनुसार सोने-चांदी वापरण्यास मज्जाव असल्याने सोन्या-चांदीचा उपयोग मर्यादित स्वरुपात होत असे. मात्र तेराव्या शतकात तयार झालेले मूठ व बिजागरीचे झाकण असलेले चांदीचे कप उपलब्ध झाले आहेत.

फ्रान्समध्ये सोन्याच्या सुरईवर सारडॉनिक्स पद्धतीचे नक्षीकाम सोळाव्या शतकात करीत. याच पद्धतीने कपही तयार करीत. झाकणाचे कप याच वेळा तयार होऊ लागले.

कोलंबाइन धाटणीचे सोन्याचे उभे डायना चषक जर्मनीत सतराव्या शतकात बनवीत. सतराव्या-अठराव्या शतकांत उठावाची नक्षी असलेल्या बश्या यूरोपातील बहुतेक राष्ट्रे प्यूटरच्या इतर भांड्याबरोबर तयार करीत. यांशिवाय मध्यम वर्गीय लोक वापरीत असलेली पावाचे व केकचे साचे, वाडगे, बादल्या, जग, विविध आकारांच्या थाळ्या इ. भांडी तांब्याची बनवीत. अठराव्या शतकात हॉलंडमध्ये पितळी मुलाम्याचे मुठी, गुंड्या असलेले तांब्याचे चहा-कॉफीचे जग तयार करीत. १७४२ मध्ये टॉमस बोल्सोव्हर यांनी तांबे व चांदी एकत्र वितळवून जास्त काळ टिकणारा ‘शेफील्ड पत्रा’ तयार केला आणि त्यापासून नित्योपयोगी भांडी मोठ्या प्रमाणावर तयार करण्यास सुरुवात केली. ही भांडी चांदीसारखी दिसत असल्याने त्यांचा वापर इंग्लंडमधील मध्यम वर्गीय लोक करीत.

एकोणिसाव्या शतकानंतर यूरोपमध्ये तांब्याचा वापर भांड्यासाठी फारच कमी होऊ लागला. याच काळात यूरोपातील बहुतेक राष्ट्रे प्यूटरची भांडी बनवीत पण पहिल्या महायुद्धामुळे जुन्या पद्धतीच्या प्यूटरच्या भांड्याचा अस्त झाला. विसाव्या शतकात अगंज पोलाद, ॲल्युमिनियम व हिंदालियम यांची नित्योपयोगी भांडी बनविण्यात येऊ लागली.

नेपाळ, तिबेट, ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएटनाम : भारताशेजारच्या या देशांत भारतीय पद्धतीच्या भांड्याचा प्रसार व प्रभाव आढळून येतो. तिबेटमध्ये तांबे व पितळ यांची भांडी बनवीत चहादाणी चांदीची करीत, तर धार्मिक कार्याची भांडी ही चिनी घाटाची व नक्षीची पण मुलभूत भारतीय स्वरुपाची असत. थायलंडमध्ये बौद्ध लोक कमळाच्या आकाराची, ठोक्याची चांदीची भांडी धार्मिक कार्यासाठी वापरीत. ब्रह्मदेशातही चांदीची ठोक्याची भांडी यासाठी वापरीत. त्यांवर मानवाकृती व वनस्पतींची उठावाची नक्षी असे. ह्या भांड्याचे साम्य दक्षिण भारतातील भांड्यांशी असल्याचे आढळून येते. सोन्याचांदीची भांडी फक्त राजघराण्यातील लोकांनाच वापरण्यास परवानगी असे.

चीन : इ. स. पू. १५००-३०० या काळात धार्मिक कार्यांसाठी वापरावयाची भांडी काशाची बनवीत असत. त्यांवरील कलाकुसर अप्रतिम असे.  

इ.स दुसऱ्या शतकाच्या अखेरीस भांड्यासाठी लोखंडाचा उपयोग करण्यात आला. ही भांडी ओतून करीत. दहाव्या ते चौदाव्या शतकात शेगड्या, कढया इ. भांडी लोखंडाची करती. थांग वंशाच्या काळात (इ.स. ६१८-९०६) चांदीची ठोक्याची भांडी कशी करावीत हे चिनी लोकांनी सासानिड पर्शियनांपासून शिकून घेतले व पुढे त्यांनी वाडगे, पेले, सुरया, तबके, बश्या इ. लहानमोठी चांदीची भांडी बनविली. युआन (१२६०-१३६८) व मिंग (१३६८-१६४४) या वंशाच्या काळात चांदीच्या सुरया, पेले, तसेच सोन्याची मोठी व समारंभाच्या वेळी वापरावयाची भांडी बनवीत. अशी भांडी मिंग राजांच्या थडग्यांत सापडली आहेत.

कोरिया : सिला व कोर्यो घराण्यांच्या काळातील सोन्या-चांदीच्या भांड्यावर पाना-फुलांचे नक्षीकाम असे. चिनी कलेचा यांवर फार मोठा परिणाम झाला होता, तरी कोरियन कलाकारांनी आपली काही वैशिष्ट्ये राखली होती.

जपान : जपानमध्ये तयार होणाऱ्या लोखंड, पितळ, सोने, चांदी इ. धातूंच्या भांड्यावर चिनी कलेचा फार मोठा परिणाम झालेला दिसतो.

अमेरिका : कोलंबस अमेरिकेला जाण्यापूर्वीच्या काळात तेथे सोने, चांदी व तांबे या धातूंचा मोठ्या प्रमाणावर तर प्लॅटिनम, कथिल व शिसे यांचा अल्प प्रमाणात भांड्यासाठी वापर होत होता. भांडी करण्याची प्रक्रिया व तंत्र तेथे फारच प्रगत झाले होते. प्लॅटिनमाचा वापर सोळाव्या शतकानंतर कित्येक वर्षांनी यूरोपमध्ये करण्यात येऊ लागला. पेले, चंचुपात्रे, बश्या, कढया इ. भांडी अमेरिकन लोक बनवीत असत.

इ. स. पू. ४००० च्या सुमारास व नंतर २००० वर्षे उत्तर अमेरिकेत तेथील सरोवरांच्या उत्तरेकडील भागात तांब्याचा वापर करण्यात येत असे, तर इ.स.पू. १०००-५०० या काळात सोन्याचा वापर प्रथम पेरुमध्ये करण्यात आला.

आफ्रिका : यूरोपियनांचा आफ्रिकेत शिरकाव होण्यापूर्वी तेथील सर्वसामान्य लोकांची भांडी लोखंडाची असत तर थोर पुढारी, राजे, धर्मगुरु, आर्दीकरिता इतर धातूंची भांडी बनवीत. धार्मिक कार्यांकरिता लागणारी भांडी काशाची करीत.


भारत : इ. स. पहिल्या शतकातील सोन्या-चांदीचे पेले तक्षशिला येथील उत्खननात सापडले आहेत. हे पेले हेलेनिस्टिक प्रकारांचे आहेत. गुप्तकाळातही (इ. स. ३२०-६४७) हेलेनिस्टिक व

आ. १. विविध प्रकारची भांडी : (अ) पूर्वीची भांडी : (१) ब्रॉंझ युगातील चंचुपात्र व कढई, (२) मायसिनी (ग्रीस) येथे सापलेला सुवर्णचषक (इ. स. पू. १६००-१५००), (३) काशाचे सिंहाकृती जलपात्र (१३ वे शतक), (४) पेरूमधील चांदीचे चंचूपात्र (इ. स. १२००-१४००), (५) शेफील्ड पत्र्याची चहादाणी (१८ वे शतक), (६) प्यूटर धातूची पाण्याची झारी (इ. स. १९००) (आ) भारतीय भांडी : (१) तमिळनाडूतील तपेले, (२) ओरिसातील पितळी घागर, (३) घंटा धातूचा तोटीचा लोटा (त्रिचूर) व वाढावयाचे भांडे (मन्नार), (४) पितळ व काशाचे मापटे (बिहार), (५) पितळ पानदान (वारणसी), (६) जयपूरची वैशिष्यपूर्ण भांडी, (७) तांब्याचे धूपदान-गुलाबदाणी (मीरत), (८) गुजरातेत मुलीला लग्नात देण्यात येणारे परंपरागत भांडे, (९) पितळ फुलदाणी (दिल्ली), (१०) एनॅमलयुक्त चांदीची सुरई (लखनौ), (११) बिदरी प्रकारची सुरई (हैदराबाद), (१२) पितळ भांडे (केरळ), (१३) धार्मिक कार्यासाठी तांब्याची घागर (अलमोडा), (१४) बिदरी प्रकारची फुलदाणी (बिदर), (१५) एनॅमलयुक्त सोन्याचा वाडगा (जयपूर), (१६) तंजावरची वैशिष्टयपूर्ण पितळी भांडी. (भांड्यांची आकारमाने मूळ प्रमाणानुसार नाहीत).

पर्शियन घाटाची भांडी तयार करीत. इ.स. तिसऱ्या-चौथ्या शतकांत भारतीय पद्धतीची नक्षी व घाट असलेल्या चांदीच्या थाळ्या व सातव्या शतकात चांदीचे वाडगे इ. भांडी बनवीत असत. सतराव्या शतकापर्यंत कासे, पितळ, तांबे, लोखंड इत्यादींची भांडी सामान्य लोकांसाठी, तर सोन्याचांदीची भांडी राजे लोकांसाठी बनवीत. भांड्याचे आकार व त्यांवरील नक्षीकाम विभागपरत्वे भिन्न होते. सोळाव्या-सतराव्या शतकांत दिल्ली व आसपासचा भाग सोन्याचांदीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध होता. एनॅमलाच्या भांड्यासाठी उत्तर भारत विशेष प्रसिद्ध होता. ठोक्याच्या भांड्यांसाठी तिरुचिरापल्ली प्रसिद्ध होते. तांब्याच्या भांड्यावर चांदीचे नक्षीकाम करण्याविषयी तंजावर प्रसिद्ध होते, तर त्रावणकोर संस्थान, म्हैसूर व विजापूर येथील भांडी ठोक्याची पण फुलांची नक्षी असलेली असत. हिंदु घाटणीची भांडी बनारस येथे बनवीत. पर्शियन, इस्लामी इ. पद्धतीचा भारतीय भांड्यांच्या घाटांवर (उदा., तस्त) थोडाफार परिणाम झाला.

भारतात रोजच्या स्वयंपाकाच्या भांड्यांशिवाय घरात वापरात असलेली अनेक शोभिवंत भांडीही धातूंची बनवितात. यांमध्ये सुरया, फुलदाण्या, तबके, पेले, रक्षापात्रे इत्यादींचा समावेश होतो. शोभिवंत आकाराबरोबरच या भांड्यांवर नक्षीकाम, मीनाकाम, रंगकाम वगैरे करण्यात येत असल्याने त्यांचे सौंदर्य वाढते.

भारतामध्येही पूर्वीपासून भांडी तांबे, पिवळ, कासे, घंटाधातू, लोखंड, चांदी यांची बनविण्यात येत असल्याचे आढळते. घंटाधांतूच्या भांड्यांचा रंग आकर्षक सोनेरी असल्याने भारतात बऱ्याच भागांत या धातूची भांडी वापरली जातात. एकेकाळी पंचधातूची (तांबे, लोखंड, जस्त, सोने व चांदी यांच्या मिश्रधातूची) भांडीही बनविली जात असत. सोन्याची भांडी आता जवळजवळ केली जात नाहीत. तथापि चांदीची ताटे, वाटया, पेले, लोटे, अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, फुलदाण्या, तबके इ. भांडी अजूनही बनविली जातात. चांदी, तांबे, पितळ इत्यादींच्या भांड्यांवर एनॅमलाचे काम केले जाते व दिल्ली, जयपूर, नाथद्वारा ही या कामाची प्रमुख केंद्रे होत.

भारताच्या सर्व भागांत पारंपरिक पद्धतीची शोभिवंत व विशेष आकारांची भांडी बनतात.

भारताच्या विविध राज्यांत भांड्याचे घाट, घडण व डौल ही वेगवेगळी असून त्यांच्यात खूप विविधता आढळते. मात्र भारतीय भांड्यांचे घाट आकर्षक व विशिष्ट असतात. कारण ती तयार करणाऱ्या कारागिरांत पिढ्यान्‌पिढ्या कारागिरीची परंपरा चालत आलेली आहे. भारतीय भांड्यांना जगभर प्रसिद्धी लाभली असून त्यांना परदेशी बाजारपेठाही मिळाल्या आहेत. हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागांत एकाच भांड्यासाठी तांबे, पिवळ व थोडे जर्मन सिल्व्हर वापरतात अशा भांड्यांना गंगाजमनी भांडी म्हणतात. उंच गळ्याची घागर वा कळशी, लोटे, वाडगे इ.भांडी गंगाजमनी प्रकारात तयार केली जातात. बीदरी भांड्यांसाठी बीदर व हैदराबाद [⟶ बीदरचे कलाकाम], तर

 मुलाम्याच्या भांड्यांसाठी मुरादाबाद ही गावे प्रसिद्ध आहेत. आंध्र प्रदेशात पेम्बार्थी व वरंगळ येथे पितळेची भांडी बनतात.

पितळी व घंटाधातूच्या भांड्यांचा उद्योग हा आसामातील महत्वाचा कुटिरोद्योग असून तो हाजो येथे केंद्रित झाला आहे. ‘होराही’ हे येथील वैशिष्टयपूर्ण भांडे असून ते तिवईवर ठेवलेल्या शंक्काकार झाकणाच्या वाडग्यासारखे असते. ते धार्मिक विर्धीत वापरतात. काहीसे असेच ‘डोनारी’ नावाचे भांडे असते. त्याला लोंबते लोलक लावलेले असतात व लग्नाच्या वेळी ते नवरीला द्यावे लागते. पाण्याचाकलश, ‘सराई’ (तिपाईवरील परात), ‘टाऊ’ (अन्न शिजविण्याचे भांडे), ‘काही’ (ताटली), खास आकाराच्या घागरी, पानाचे डबे, चाळण्या इ. भांडीही येथे बनतात.

तांब्यापितळेच्या वस्तूंचे सर्वाधिक उत्पादन उत्तर प्रदेशात होते. विविध प्रकारच्या पांढऱ्या (किंवा फिकट रंगाच्या) मिश्रधांतूची भांडीही या राज्यात तयार होतात. भारतातील धातूंच्या भांड्यांचे प्रमुख उत्पादन मुरादाबाद येथून होते. येथे विविध प्रकारच्या धातूंची व घाटांची भांडी तयार होतात. ती आकर्षक असून त्यांवरील कलाकुसर नाजूक असते. तेथे चांदीच्या व इतर मुलाम्यांची, बीदरी व चिकन प्रकारची तसेच एनॅमलची भांडी तयार होतात. याशिवाय वाराणसी (धार्मिक विधींची, पार्श्वोत्थित म्हणजे उठावाच्या नक्षीकामाची), मिर्झापूर (घरगुती), इटावा (तांब्यापितळेची), लखनौ (कलात्मक व शोभिवंत), अलमोडा (गंगाजमनी), जलेश्वर, सीतापूर, आग्रा, मैनपुरी, झांशी इ. ठिकाणीही धातूंची भांडी बनविली जातात.

 

ओरिसामध्ये घंटाधातू व पितळेची सुंदर भांडी व काशाच्या ओतीव वस्तू बनतात. तार्भा हे चांदीच्या भांड्यांसाठी (उदा., पानसुपारीचे तबक) व कटक चांदीच्या तारकामाच्या शोभिवंत पात्रांसाठी प्रसिद्ध आहे.

कर्नाटकात पुढील ठिकाणी तांबे, पितळ, कासे व घंटाधातू यांची भांडी व कलात्मक वस्तू बनतात : बंगलोर, नागमंगला, श्रवणबेळगोळ, म्हैसूर, हुबळी, बीदर, बेळगाव, गदग, मंगलोर, बंटवाल, उडिपी, वगैरे. कर्नाटकातील घंटाधातूची ‘मिल्ली’ (झाकण असलेले दुधाचे भांडे) व गुर्दानो (दूध पाजावयाचे भांडे) ही भांडी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

केरळात त्रिवेंद्रम, इरिंजलकुड, कासरगोड इ. ठिकाणी घंटाधातूची, काशाची व पितळेची साधी व ओतीव भांडी बनविली जातात. ‘उरली’ (मोठ्या तोंडाचे रुंद दुमडलेल्या वा साध्या काठाचे स्वयंपाकाचे भांडे) व ‘वार्पु’ (प्रचंड कढईसारखे सुंदर घाटाचे भांडे) ही केरळाची म्हणता येतील अशी भांडी सामान्यतः घंटाधूतीची बनवितात. यांशिवाय दागिन्याच्या गोल, चौकोनी, अष्टकोनी इ. पेट्या, तेलाचे साधे भांडे, विविध घाटांची व आरमानांची पाण्याची भांडी आणि पिळांचा खालील भाग व लांब तोटी असलेली सुरई ही केरळची वैशिष्ट्यपूर्ण भांडी आहेत.

गुजरातमध्ये भांड्यांवर एकच नक्षी (उदा. पोपट, हंस, घोडा इ.) विविध प्रकारे काढली जाते व एक आकृती दुसरीसारखी नसते. अहमदाबाद (पानांचे डबे, कंसार शेगडी), सिरोही (मोठ्या घंटा), डभोई (तांब्याचे नगारे), भूज (उठावाच्या नक्षीची भांडी), जामनगर इ. ठिकाणी घरगुती भांड्याची तर राजकोट, भूज, जामनगर, अंजार, मांडवी, कच्छ, सुरत व अहमदाबाद येथे चांदीची व चांदीच्या एनॅमलयुक्त भांड्यांची केंद्रे आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये तांब्या-पितळेची व चांदीची घरगुती व कलात्मक भांडी तयार होतात. भांड्यांवर चिनारची पाने व बदाम यांची नक्षी विशेषेकरुन काढली जाते. काश्मिरी (गुलाबी) चहा मुरविण्याचे भांडे हे तेथील वैशिष्ट्य आहे.

तमिळनाडूमध्ये घंटाधातू, पितळ व काशाची साधी व ओतीव भांडी, तसेच कलात्मक वस्तू तयार होतात. काजूची नक्षी असणारे खुजे व घागरी तसेच विविध प्रकारचे दिवे हे तमिळनाडूचे वैशिष्ट्ये आहे. यांशिवाय सहलीचे डबे, पिकदाण्या, दुधाची, पूजेची व पाण्याची भांडी इ. वस्तूही येथे बनतात. नीचओरकॉइल (जिल्हा तंजावर) जवळ आढळणाऱ्या वांडळ मातीचे साचे चांगले होतात त्यामुळे येथे घंटाधातूच्या भांड्यांच्या धंदा भरभराटीला आलेला आहे. तंजावरला एका धातूवर दुसऱ्या धातूंचे (उदा., पितळावर तांब्याचे वा चांदीचे) जडावाचे व उठावाच्या नक्षीचे काम केले जाते. मद्रास, तांबरम्, कुंभकोणम्, मदुराई इ. ठिकाणी भांडी तयार होतात.


प. बंगालमध्ये पितळेची व घंटाधातूची साधी व ओतीव भांडी तयार होतात. येथे नक्षीकामापेक्षा भांड्याचा सुंदर घाट व मजबुती यांच्याकडे लक्ष दिले जाते. भांड्यावरील नक्षीकाम येथे छिन्नीने कोरुन केले जाते. थाळ्या, करंडे, हंडे व स्वयंपाकाची विविध भांडी येथे तयार होतात. कलकत्ता, बांकुरा, आसनसोल इ. ठिकाणी भांडी बनविली जातात.

बिहारमध्ये पाटणा, हजारीबाग, डुमका, रांची, खुंती इ. ठिकाणी पितळी व घंटाधातूची भांडी तयार होतात. ओतीव भांडी, खालील भाग काळा असलेली भांडी, माशाच्या आकाराच्या कुकंवाच्या डब्या (सिंदूरदान) इ. येथील वैशिष्ट्यदर्शक भांडी आहेत.

मणिपूरमधील भांड्यांचा व्यवसाय इंफाळजवळच्या भागात केंद्रित झालेला असून घंटाधातूच्या भांड्यांसाठी मणिपूर प्रसिद्ध आहे. येथे तांब्यापितळेचीही घरगुती व शोभिवंत भांडी बनविली जातात. तिवईवर ठेवलेली, वाडग्याच्या आकाराची व गळ्याशी रूंद कडा असणारी ‘कृष्णकांती’ नावाची ताटली (तबक), दिव्यासारखे दिसणारे व झाकण असलेले ‘सेन्गा’ हे सुपारीचे भांडे ही येथील वैशिष्टयपूर्ण भांडी आहेत.

मध्य प्रदेशातील घंटाधातूची ओतीव भांडी प्रसिद्ध आहेत. बस्तर, सागर, जगदलपूर, टीकमगढ, इंदूर इ. ठिकाणी भांडी तयार होतात.

लाखेचे रोगण दिलेली पितळी भांडी (उदा., टांगते दिवे, फुलदाण्या, तबके, फळपात्रे इ.) हे राजस्थानचे वैशिष्टय आहे. शिवाय ‘बादल’ नावाची पिण्याच्या पाण्याची भांडी हेही राजस्थानी वैशिष्टय आहे. ही भांडी ॲल्युमिनियम, पितळ वा जस्त यांची असतात. पाणी थंड राहण्यासाठी भांड्याभोवती नमद्याचे आवरण (खोळ) शिवलेले असते व आटयाच्या झाकणातच पेलाही बसविण्याची सोय असते. पितळेच्या फुलदाण्या, जाळीदार दिवे, फळपात्रे, लोटे, दागिन्यांच्या पेट्या, तसेच चांदीची भांडी राजस्थानात बनवितात. जयपूर व जोधपूर ही येथील भांड्यांची प्रमुख केंद्रे आहेत.

दिल्ली (चांदी व पितळेची साधी व कलात्मक भांडी), पॉंडिचेरीतील औरुवेयर (कासे व पितळेची भांडी, दिवे इ.), कारनिकोबार (भांडी), त्रिपुरा (आगरतला, राधाकिशोरपूर येथील पितळ व घंटाधांतूची साध्या घाटाची भांडी), हरियाणा (रोहटक, जगाधारी, बहादूरगढ, गुरगाव, रेवारी येथील पितळी भांडी), हिमाचल प्रदेश (कांग्रा, कुलू व रारांग येथे दीपाच्छादने, चहादाण्या, मद्यपात्रे) व सिक्कीम (गंगटोक येथे काशाची ओतीव भांडी) या भागांतही थोड्या प्रमाणात भांडी बनविली जातात.

महाराष्ट्रामध्ये तांबे, पितळ, चांदी यांची व बीदरी प्रकारची भांडी तयार होतात. मुंबई व पुणे येथे भांड्यांवर उठावाच्या नक्षीचे काम केले जाते. पितळेची भांडी पुणे, नासिक, सांगली व उदगीर येथे तांब्याची व ऑक्सिडीभूत 

[⟶ ऑक्सिडीभवन] तांब्याची भांडी नासिक, ठाणे, मुरबाड, कल्याण व अंबरनाथ येथे आणि चांदीची भांडी (उदा., करंडे, पानदान, गुलाबदाण्या अत्तरदाण्या, वाटया, पेले, लोटे, तबके) नासिक व हुपरी येथे तयार होतात. औरंगाबादला बीदरी प्रकारची भांडी (उदा., तबके, पावडरचे डबे, रक्षापात्रे) बनतात.

कच्चा माल : बहुतेक घरगुती भांडी अक्षाच्या संदर्भात सममित असल्याने ती धातूच्या गोल चकतीपासून बनवितात. भांडी बनविण्यासाठी निरनिराळ्या व्यासांच्या चकत्या तयार मिळतात. भांड्याव

आ. २. दाब खेचणाने भांडी बनविण्याची पद्धत : (अ) खेचणपूर्व स्थिती : (१) भांड्याचा पत्रा, (२) मुद्रा, (३) दाब तबकडी, (४) दाब मुद्रक

र नक्षीकाम करावयाचे असेल, तर मुद्दाम जाड पत्रा वापरतात. सामान्य भांडी १६-३० गेज क्रमांकाच्या [⟶ धातुपत्राकाम] म्हणजे ०.४-०.६ मिमी. जाडीच्या पत्र्यापासून बनवितात. पितळेच्या भांड्यांसाठी ७०% तांबे व ३०% जस्त असलेले पितळ जास्त चांगले असले, तरी सामान्यः त्यापेक्षा स्वस्त असे ६०% तांबे व ४०% जस्त असलेले पितळ वापरतात. अगंज पोलादांमध्ये सामान्यपणे १८% निकेल व ८% क्रोमियम असलेले पोलाद वापरतात. भांड्यासाठी वापरावयाचा पत्रा चकचकीत तसेच शिवण, फट इ. दोष नसलेला व सर्वत्र सारख्या जाडीचा असावा लागतो.

निर्मिती पद्धतः भारतामध्ये व इतरत्रही घरगुती भांडी बनविण्याच्या पुढील दोन प्रमुख पद्धती होत्या व भारतात अजूनही या पद्धती बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात : (१) धातुचा पत्रा थंड अवस्थेत ठोकून अथवा तापवून व ठोकून ठोकून त्याला हवा तो आकार देऊन ‘घडीव’ भांडी बनविणे [⟶ तांबटकाम] आणि (२) धातू वा मिश्रधातूचा रस साच्यात ओतून ‘ओतीव’ भांडी बनविणे. दुसऱ्या पद्धतीत मृत्तिकेचा साचा किंवा अधिक नाजूक कामासाठी मेणाचा फर्मा वापरला जातो [⟶ ओतकाम]. पत्रा ठोकून भांडी घडविण्याची (आ) खेचणोत्तर स्थिती : (१) खेचणाने बनलेले भांडे, (२) मुद्रा, (३) दाब तबकडी, (४) दाब मुद्रक.कला भारतात फार पूर्वीच प्रगतावस्थेत पोहोचली असून अशी भांडी ओतीव भांड्यापेक्षा अधिक शोभिवंत व टिकाऊ असतात. भांडे घडविल्यावर ते तापवून एकदम थंड पाण्यात बुडवितात, त्यामुळे धातू कठीण होऊन भांड्याला मजबुती येते. चरकीवर घासून भांड्याला अंतिम चकाकी आणतात. एकाहून जास्त घटक भाग असणारी भांडी बनवावयाची झाल्यास हे घटक भाग डाखकाम करून सांधतात.

हल्ली धातूच्या पत्र्यापासून घरगुती व शोभिवंत भांड्यांची निर्मिती रूपण व पृष्ठसजावट अशा दोन पायऱ्यांनी होते. पहिल्या पायरीमध्ये भांडे दंडगोलाकृती (ताट, वाटी, फुलपात्र, भांडे) असल्यास ते खेचण मुद्रासंचात दाबून त्यापासून भांडे बनवितात [⟶ धातुरूपण]. भांड्याची खोली व्यासाच्या मानाने जास्त असल्यास लहान होत जाणाऱ्या दोन किंवा तीन खेचण मुद्रासंचांतून क्रमाने दाब खेचण करतात. भांड्यावर रेषा व इतर दोष येऊ नयेत म्हणून खेचणाचा साचा फार काळजीपूर्वक बनवावा लागतो.

आ. ३ प्रसरण परिवलन रूपण क्रियेने भांडी बनविण्याची पद्धतः (अ) परिवलन क्रियाः (१) भांडे बनविण्याचा पत्रा, (२) लाकडी वा रबरी दाब तबकडी, (३) लेथ यंत्राचा स्थिर अक्ष, (४) लेथ यंत्राचा फिरणारा अक्ष, (५) पाकळ्यांचा संरूपक, (६) परिवलनाने पत्रा वाकविण्याचे हत्यार (आ) परिवलने क्रियेने बनविलेल्या भांड्यांचे नमुने.

 बरणी, चरवी लोटी यांसारखी अरुंद गळा असलेली भांडी खेचणाने बनविता येत नाहीत. त्यासाठी प्रसरण परिवलन रूपण क्रिया वापरतात [⟶ धातुरूपण]. या क्रियेत धातूची चकती लेथसारख्या यंत्रावर फिरवतात व फिरत असतानाच ती संरूपकाच्या पृष्ठावर वाकवितात. पत्रा वळून संरूपकाचा आकार घेऊन भांडे बनते (आ.३). अरुंद गळ्यातून संरूपण बाहेर काढणे शक्य नसते म्हणून संरूपक पाकळ्यांचा बनविलेला असतो. त्यातील एक पाकळी सोडविली की, बाकीच्या बाहेर येऊन भांडे मोकळे होते.

खेचण किंवा परिवलनाने तयार झालेले भांडे प्रथम घासून त्यावरील तीक्ष्ण कडा, बर वगैरे काढून टाकतात, तर दुसऱ्या पायरीत त्यावर पृष्ठसजावट करतात. तांब्यापितळेच्या भांड्यांना त्यांवर कंगोरे वगैरे पाडावयाचे असल्यास ते पाहून घेऊन मग चक्रावर घासून चकाकी आणतात. काही वेळा मूळ धातूच्या पत्र्याचा पृष्ठभाग खराब अगर डागाळलेला असल्यास भांडे अम्लात धुवून घेऊन मग त्यांना चकाकी आणतात.

शोभेच्या भांड्यावर नक्षीकाम, विद्युत् विलेपन, मीनाकाम वगैरे प्रक्रिया करून भांडे शोभिवंत बनवितात व शेवटी पॉलिश करतात. [⟶ धातुकलाकाम विद्युत् विलेपन].

उपयोगाच्या द्दष्टीने तांब्यापितळेच्या काही भांड्यांना कल्हई करतात पण ती घरोघरी स्वतंत्रपणे करवून घेतात उत्पादनाच्या वेळी करीत नाहीत. घंटाधातू व कासे यांच्या भांड्यांना कल्हई करण्याची आवश्कता नसते.

ॲल्युमिनियमाच्या भांड्यांना स्वाभाविक अगंजपणामुळे धुणे व पॉलिश करणे यांपेक्षा निराळी पृष्ठसजावट करीत नाहीत. ॲल्युमिनियमाच्या शोभिवंत भांड्यांच्या पृष्ठभागाला धनाग्रीभवन पद्धतीने (आवश्यक ती धातूची वस्तू विद्युत् विच्छेदन घटात-विजेच्या साहाय्याने विद्रावावरील संयुगाच्या रेणुसे तुकडे करणाऱ्या घटात-धनाग्र म्हणून वापरून तिच्यावर संरक्षक वा अक्रियाशील पटल देण्याच्या पद्धताने) आकर्षण रंग देता येतात.

धारक पात्रे : बहुतेक प्रकारचा घन, द्रव अथवा वायुरूप व्यापारी माल गुदामामध्ये (नेहमीच्या किंवा उच्च दाबाला) साठवून ठेवण्यासाठी किंवा वाहनांतून दूर अंतरावर नेण्यासाठी अथवा ग्राहकाला विकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धातूच्या पत्र्याच्या पात्राला धारक पात्र म्हणतात. अशी धारक पात्रेही एक प्रकारची धातूची भांडीच होत. ही पात्रे तेले, खाद्यपदार्थ, औषधे, रंगलेप, रसायने इ. हजारो प्रकारचा माल भरण्यासाठी वापरली जातात. अशी पात्रे पुढील द्दष्टीने सोयीची ठरतातः घट्ट झाकणाच्या डब्यातील माल खराब होत नाही किंवा त्याला कीटक वा इतर प्राण्यांपासून उपद्रव पोहोचत नाही. बंद डब्यांतून तेला-तुपासारखे पदार्थ वाहून नेताना सांडत नाहीत. हवाबंद डब्यांतील खाद्यपदार्थ पुष्कळ दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत टिकू शकतात. काचेच्या, प्लॅस्टिकच्या धारकांप्रमाणे धातूची धारक पात्रे फुटत नसल्याने विषारी पदार्थ, कीटकनाशके, रसायने ह्यांच्या ने-आणीकरिता ती उपयुक्त ठरतात. रॉकेलासारखी ज्वालाग्राही रसायने धातूच्या धारकांत आगीपासून सुरक्षित राहतात. धातूच्या स्वाभाविक बलांमुळे धारक पात्रे सहसा दबत, मोडत नाहीत. त्यांच्यावर आकर्षक छपाई करता येत असल्याने मालाला चांगली किंमत येते. धातूची धारक पात्रे सहज फोडता येत नसल्याने मालाची चोरी होत नाही. पुष्कळसा माल हा धारक पात्रासहितच ग्राहकाला विकण्यात येतो म्हणून अशा डब्यामुळे मालाची किंमत वाढू नये म्हणून डबे शक्य तेवढया कमी किंमतीचे असावे लागतात आणि त्याकरिता त्यांचे उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणावर केले जाते. परिणामी असे डबे वर्तुळकार किंवा चौकोनी छेदाचे करणे सोयीचे ठरते.


कच्चा माल : बहुतेक प्रकारचे डबे बनविण्यासाठी कथिलाचा जाड मुलामा दिलेले १६ ते ३० गेज क्रमांक जाडीचे सौम्य पोलादाचे पत्रे वापरतात. काहींसाठी जस्ताचा मुलामा दिलेला पोलादी पत्रा वापरतात. या दोन्ही प्रकारच्या पत्र्यांवर उठावाची अक्षरे व आकृती काढता येतात आणि त्यांच्यावर उत्तम छपाईही करता येते. अलीकडे कथिलाच्छादित पोलादी पत्र्यांची किंमत फार वाढल्याने त्याऐवजी ॲल्युमिनियमाच्या पत्र्याचा वापर होऊ लागला आहे. पूर्वी ॲल्युमिनियमावर आकर्षक छपाई करता येत नसे पण आता योग्य रंग व शाई उपलब्ध झाल्याने ॲल्युमिनियमाचा डबे, डब्या, बरण्या इ. बनविण्यासाठी सर्रास वापर होतो. मात्र डबाबंद अन्नासाठी अजूनही कथिलाच्छादित पोलादी पत्राच वापरतात. जाड पत्र्यारासून घरगुती वापराचे टिकाऊ डबे बनविले जातात. यांशिवाय ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंचे पत्रे, शिसे व कथिल यांच्या टर्न या मिश्रघातूचा मुलामा दिलेले पोलादी टर्न पत्रे, काळे पत्रे, लाटीव किंवा लाखेचा वा एनॅमलाचा लेप दिलेले पोलादाचे पत्रे वगैरेंचाही धारक पात्रे बनविण्यासाठी वापर होतो [⟶ धातुपत्राकाम]. डांबरासारख्या द्रव्यांसाठी साधे काळे पोलादी पत्रे वापरतात. क्वचित खास रसायनांसाठी किंवा दुधासारख्या नाशवंत पदार्थासाठी अंगज पोलादाची धारक पात्रेही वापरतात.

पात्राची निवड : मालाची अवस्था, त्याचे रासायनिक गुणधर्म, माल हलविण्याविषयीचे व वाहतुकीचे कायदे, वाहनाचे स्वरुप, मालाच्या वाटेतील चढ-उताराची व्यवस्था, माल काढून घेतलेल्या रिकाम्या धारक पात्राला मिळणारी किंमत इ. सर्व गोष्ट लक्षात घेऊन माल भरावयाच्या धारक पात्राची निवड केली जाते. तसेच मागणीनुसार मालाच्या धारक पात्राचे आकारमान ठरविले जाते. दुधाचे व इतर खास धारक वगळता एकदा वापरलेले धारक पात्र उत्पादक पुन्हा नवा माल भरण्यासाठी सहसा वापरीत नाहीत व त्यामुळे रिकाम्या झालेल्या धारक पात्राला किंमत मिळत नाही.

वर्गीकरण : धारक पात्रांचे असंख्य प्रकार असले, तरी आकारमानानुसार त्यांचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करता येते. टूथपेस्ट मलम वगैरेंसाठी दबणाऱ्या नळ्या औषधे, तेले, रसायने, बिस्किटे इत्यादी करिता डब्या वा डबे इतर रसायने, डांबर वगैरेंकरिता कॅन व पिपे विषारी पदार्थ व कीटकनाशके यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घातूचा बाटल्या-बरण्या वगैरे. यांशिवाय वायु, तेल, रसायने इ. साठविण्याच्या टाक्या, साखर काखान्यातील उसाच्या रसाच्या टाक्या, पाण्याच्या टाक्या इ. मोठी तर पेट्या, बादल्या, घमेले, स्टोव्हच्या टाक्या, तबके, द्रव पदार्थ मोजण्यासाठी असलेली मापे इ. लहान धारक पात्रेच होत.

दबणाऱ्या नळ्या : मलमे, डिंकासारखे विविध आसंजक ( चिकटविणारे) पदार्थ, खाद्यपदार्थ, रंग, पॉलिश , दात घासायची पेस्ट इ. ठेवण्यासाठी धातूच्या दबणाऱ्या नळ्या वापरतात. बहिःसारणाने [⟶ धातुरुपण ] बनविलेल्या अल्युमिनियमाच्या नळ्यांपासून या नळ्या बनवितात. त्यांवर रंगीत छपाई करतात. नळीचा ठराविक लांबीचा तुकडा घेऊन त्यांच्या एका टोकावर झाकणाचा भाग दाब देऊन बसवितात. झाकणाच्या मध्यभागी एक बोंड असते व त्याला आतील माल बाहेर काढण्यासाठी भोक ठेवलेले असते. बोंडाला बाहेरुन आटे पाडलेले असतात व त्यांवर आट्याचे बहुधा प्लॅस्टिकाचे बूच बसविलेले असते. बूच लावल्यानंतर नळीच्या दुसऱ्या उघड्या टोकाच्या तोंडतून ठराविक मापाचा माल आत भरतात व हे तोंड घडी करुन बंद करतात. बुच काढून दुमडलेल्या टोकाकडुन दाबल्यास नळीतील पदार्थ बाहेर येतो परंतु हवा आत शिरत नाही व त्यामुळे आतील पदार्थ सुकत नाही. कधीकधी कथिलाचा मुलामा दिलेला शिशाचा किंवा शिसे व कथिल यांच्या मिश्रधातूचा पत्राही या नळ्यांसाठी वापरतात.

डब्या : काजळ, मलमे, बूट पॉलिश इ. लहान प्रमाणावर लागणारे पदार्थ ठेवण्यासाठी डब्या वापरतात. ॲल्युमिनियमाच्या वा कथिलाचा मुलामा दिलेल्या लोखंडी वा पोलादी किंवा ॲल्युमिनियमाच्या पातळ पत्र्याच्या डब्या बनवितात. डब्या अनेक प्रकारच्या असतात व त्यांवर छपाईही करता येते. डबी तयार करण्यासाठी पत्र्याच्या चादरीतून वाटोळा तुकडा कापून घेतात व तो मुद्रेवर ठेवून त्यावर मुद्राकारकाने दाब देऊन खेचण करतात. [⟶  धातुरुप ]. त्यामुळे वाटीसारखा मुख्य भाग तयार होतो. या वाटीच्या वरच्या बाजूस झाकण अडकविण्यासाठी कंगोरा काढतात. डबीचे झाकणही याच पद्धतीने बनवितात. मात्र खालील भाग व झाकण बनविण्यासाठी वेगवेगळ्या मापांच्या मुद्रा वापरतात. गोल डब्यांच्य तुलनेने चौकोनी डब्याचे खेचणे अवघड असते.

लहान डबे : सामान्यणे ५० ग्रॅ. ते १ किग्रॅ. पर्यंत वजनाचा माल ठेवण्यासाठी असे डबे वापरतात. ते अनेक प्रकारचे असतात न कथिलाचा मुलामा दिलेल्या २५-२६ गेज क्रमांकाच्या पोलादी पत्र्याचे

आ. ४. धातूंचे डबे बनविण्याची पद्धत : (अ) दंडगोलाकार डबा : (१) तळ, (२) बाजू, (३) तकट (सील), (४) झाकण, (५) पर्ण डबा (आ) चौकोनी डबाः (१) तळ, (२) बाजू, (३) झाकण, (४) पूर्ण डबा.

बनवितात. पत्र्यावर बाहेरच्या बाजुवर छपाईही करतात व ती सुरक्षित राहावी म्हणून तिच्यावर व्हार्निशाचा पातळ थर देतात. विशेषतः खाद्यपदार्थाच्या डब्यांच्या बाबतीत ते खराब होऊ नयेत म्हणून पत्र्याच्या आतील बाजूवर बिनविषारी व वास-स्वादरहित एनॅमल लावतात. सौंदर्यप्रसाधनांसाठी शोभिवंत तर उच्च प्रतीचा चहा,कॉफी वगैरेंसाठी मोठ्या तोंडाचे दंडगोलाकार वा चौकोनी डबे बनवितात. पत्रा हाताने वाकवून व ठोकून डबे बनवितात. वाकविलेल्या पत्र्याच्या कडा एकमेकीवर मुडपून जोड बनवितात व त्यावर डाखकाम करतात. असे डबे स्वयंचलित यंत्राने मोठ्या प्रमाणावर बनविले जातात. मिनिटाला ८०० डबे बनविणारी यंत्रेही आहेत. रंगासारख्या द्रव पदार्थासाठी वापरावयाचा डबा तयार झाल्यावर त्यात दाबाखालील हवा भरुन व पाण्यात बुडवून तो गळका आहे की काय ते तपासले जाते. काही वेळा वरच्या जाड झाकणाखाली दुसरे अगदी पातळ पत्र्याचे तकट (सील) डाख लावून बसवितात, त्यात भोक पाडून डबा निर्वात करतात व नंतर ते भोक डाखाने बंद करतात व त्यावर जाड झाकण दाबून बसवितात. असे डबे ॲल्युमिनियमाच्या व तिच्या मिश्रधातूच्या (विशेषतः ०.६ टक्के मॅग्नेशियमयुक्त) थोड्या जाड चादरीपासूनही बनवितात व ते जोडरहित असतात. या डब्यात माल भरल्यावर डब्याचे झाकण यंत्राने दाबून घट्ट बसवितात.

विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने, चहा, कॉफी, रंगलेप, रंगद्रव्ये, दुध भुकटी, बिअर इ. असंख्य प्रकारचे पदार्थ अशा डब्यांतून भरले जातात. विशेषतः खाद्यपदार्थाचा उद्योग या डब्यांमुळेच उभा राहिला आहे. अशा प्रकारे हे डबे म्हणजे आधुनिक संस्कृतीची एक खूण म्हणता येईल.

मध्यम डबे :१ ते ५ किग्रॅ. पर्यत वजनाचा माल ठेवण्यासाठी या प्रकारचे दंडगोलाकार वा चौकोनी डबे बनवितात. असे डबे दोन प्रकारचे असतात. एका डब्याचे तोंड शक्य तेवढे म्हणजे सहज हात घालता येईल एवढे मोठे ठेवतात व त्यावर झाकण बसविण्याचे कडे डाख लावून पक्के जोडतात. झाकण दाबून बसविले म्हणजे हा डबा चांगला हवाबंद होतो. हे डबे सामान्यपणे सुका माल (उदा., गोळ्या, बिस्किटे इ.) भरण्यासाठी वापरतात. दुसऱ्या प्रकारात डब्याचे तोंड अगदी लहान ठेवतात व त्याला आटयाचे बोंड जोडलेले असते. तसेच आटे असलेले झाकण बसवून डबा बंद करतात. असे डबे वंगण, तेल, खाद्य तेले, फिनॉइलसारखी रसायने वगैरेंसारखे द्रव पदार्थ ठेवण्यासाठी वापरतात. या रचनेमुळे हवा तेवढा पदार्थ ओतून घेऊन डबा पुनश्च बंद करता येतो. काही प्रकारांत डबा उचलण्यासाठी कडीचा पक्का हस्तक (मूठ) बसविलेला असतो व डब्याच्या तोंडाला बारीक तोटी (नळी) जोडलेली असते. तीमुळे डब्यातून पदार्थ ओतताना डब्यावर त्याचे ओघळ येत नाहीत.

लहान व मध्यम आकारमानाचे चौकोनी डबे बनविताना मधल्या भागासाठी पत्र्याचा एकत्र तुकडा वापरतात व त्याचा जोड एका कोपऱ्यावर आणतात.

मोठे डबे:यात २० लि.पर्यत माल मावणारे डबे येतात. प्रथम धातूच्या चादीवर पाहिजे ती अक्षरे व आकृती योग्य ठिकाणी उमटवून घेतात व जरूर तर रंगीत छपाईही करतात. छपाई पुढील क्रियांत बिघडु नये म्हणून तिच्यावर रोगण लावतात. नंतर चादरीतून मघला भाग, वरचा भाग व तळ यांचे तुकडे कापून घेतात. १८ लिटरांचे रॉकेलाचे चौकोनी डबे बनविताना मधला भाग बनविण्यासाठी दोन सारखे तुकडे वापरतात व त्यांचे जोड दोन कोपऱ्यांवर आणतात. त्यामुळे डब्याची दृढता वाढते. ज्या डब्यांचे तोंड हात घालण्यासारखे असते, त्यांच्या तोंडावरचे कडे वेगळे तयार करून वरच्या भागाला डाख लावून पक्के जोडतात. काही प्रकारांत तोंडाचे वेगळे कडे न बनविता चादरीची कडाच आत दुमडतात. वर लहान तोंड असेल, तर तेही याच वेळी जोडतात. नंतर चारही तुकड्यांच्या कडांपासून ३ ते ५ मिमी. अंतर सोडून एका बाजून बारीक टोचे मारतात व त्यांच्या रेषेवर दुमडून आकडे तयार करतात. नंतर या आकड्यांवर झिरप प्रतिबंधक लुकण लावून दोन तुकड्यांचे आकडे एकमेकांत गुंतवून दाबतात. सर्व कडांवरचा असा कच्चा जोड तयार झाला म्हणजे डाख लावून तो पक्का करतात. शेवटी डब्यात दाबाखालील हवा भरून व तो पाण्यात बुडवून जोड गळत नाही ना हे तपासतात.

रॉकेलासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा डब्यांचे तोंड अगदी लहान असते व ते एका कोपऱ्यात घेतात. माल भरल्यावर या भोकावर बरोबर बसणारी चकती डाख लावून बसवितात. असे डबे उचलून नेणे सोयीचे व्हावे म्हणून त्यांच्या वरच्या भागावर बिजागरीप्रमाणे गुंतविलेली जाड पोलादी तारेची कडी बसविलेली असते. असे डबे सामान्यपणे द्रव पदार्थ ठेवण्याची वापरतात. हात घालता येईल असे तोंड असणारे ॲल्युमिनियमाचे डबे काजू, बिस्किटे यांसारखे सुके पदार्थ, अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वापरतात. कधीकधी वरील सर्व प्रकारच्या डब्यांना बिजागरीने जोडलेली, संपूर्ण वरचा भाग उघडेल अशा तऱ्हेची झाकणेही बसविलेली असतात. अशी झाकणे आतून वा बाहेरून बसतील अशी असतात.

पिपे: सर्वसाधारण तापमानाला व दाबाला वजनदार व मोठ्या प्रमाणात पदार्थ वाहून नेण्यासाठी सुयोग्य आकाराची व आकारमानाची धारक पात्रे वापरतात. यांमध्ये पिपे, ड्रम, कॅन इत्यादींचा समावेश करतात. सामान्यपणे मध्यभागी फुगीर असणाऱ्या धारक पात्रांना पिपे व कडा सरळ उभ्या असणाऱ्यांना ड्रम म्हणतात परंतु येथे असा भेद न करता त्यांना पिपे असेच म्हटले आहे.

पिपे साधारणतः५० ते २०० लि. (कधीकधी ४०० लि. पर्यत) पदार्थ मावतील एवढी असतात. इंधन व खाद्य तेले, ग्लिसरीन, रसायने, डांबर, बिट्युमेन इ. पदार्थ भरण्यासाठी पिपे वापरली जातात. ती १८, १९, २१ किंवा २४ गेज क्रमांकाच्या पोलादी पत्र्यांपासून बनवितात. मधला भाग बनविताना पोलादी पत्र्याच्या चादरीवर मध्य भागाजवळ दोन बाहेर येणाऱ्या पन्हळी पाडून घेतात व नंतर पत्र्याला यंत्राने दंडगोलाकार देतात. या पन्हळींमुळे पिपाला मजबुती येते व ते जमिनीवरून गडगडत नेण्यासही सोयीचे होते. दंडगोलाचा जोड वितळजोडकामाने (वेल्डिंगने) जोडतात. दंडगोलाच्या दोन्ही उघड्या बाजूंवर वाटोळी झाकणे बसवितात. ती बसविण्यासाठी प्रथम घडीचे जोड बनवून नंतर वितळजोडाने पक्के करतात. काही प्रकारांत हे जोड मजबूत करण्यासाठी एक पोलादी कडेही वितळजोडाने तेथे जोडतात. एक झाकणाच्या काठाजवळ ८-१० सेंमी. व्यासाचे एक भोक पाडतात व त्याला आतल्या आट्याचे जाड कडे वितळजोडाने पक्के बसवितात. यामध्ये तशा आट्याचे बूच बसवितात. काही प्रकारांत झाकणाच्या मध्यभागाही असेच आट्याचे तोंड व त्याला बूच अशी व्यवस्था केलेली असते. पूर्ण झाकणाची पिपेही बनवितात. अशी पिपे दाट द्रव किंवा घन पदार्थ भरण्याच्या व काढण्याच्या दृष्टीने सोयीची असतात. पिपाचे जोड जलीय दाबाने तपासतात. नंतर पिपाला रंगलेप लावतात. आतील बाजू गंजू नये म्हणून मूळ पोलादी चादरीवरच सोडियम फॉस्फेटचा फवारा मारतात अथवा तिला गंजगोधी रोगण लावतात. कधीकधी जमिनीवरून गडगडत नेण्यासाठी पिपाच्या मध्यभागाजवळ बाहेरून सामान्यातः दोन सुटी कडी घालण्याची पद्धतीही आहे. अशी कडी अथवा अंग पन्हाळी उंचवटे यांमुळे पिपाचा मधला भाग व झाकणाचे जोड सुरक्षित राहतात. पिपे मजबूत असल्याने दीर्घकाळ टिकातात. वर्षाला वाहतुकीच्या सरासरी आठ फेऱ्या झाल्यास यांचे आयुष्य २० वर्षाचे असते, असे दिसून आले आहे.

डांबर भरण्याची काही पिपे सरळ दंडगोलाकार न करता मध्यभागी फुगीर अशी करतात व त्यांच्या दोन्ही टोकांजवळील भागांवर उंचवटे करतात. त्यांमुळे पिपे मजबूत होतात व रस्त्यावरून चाकासारखी गडगडत नेता येतात. या पिपाच्या एका झाकणावर २० सेंमी. व्यासाचे तोंड ठेवलेले असून ते बुचाने बंद करतात.


ज्वलनशील, संक्षारक (उदा., अम्ले) व स्फोटक पदार्थ वाहून नेण्यासाठी जाड पोलादी पत्र्याची, तर कमी ज्वलनशील, संक्षारक पदार्थ नेण्यासाठी अतिशय पातळ पोलादी पत्र्याची व एकदाच वापरावयाची पिपे (ड्रम) बनवितात. अज्वलनशील व संक्षारक नसलेले पदार्थ दूरवर वाहून नेण्यासाठी पातळ पत्र्याची पिपे फायदेशीर ठरतात. परतीचे भाडे कमी व बाजारपेठ अनुकूल असते, तेव्हा मात्र परत परत वापरता येतील अशी जाड पत्र्याची पिपे फायदेशीर ठरतात. अम्लासारख्या संक्षारक पदार्थांच्या पोलादी धारक पात्रांना आतून इपॉक्सीसारख्या रेझिनाचे लेप देतात.

थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ व कमी प्रमाणात मागणी करणारे ग्राहक यांकरिता छोटी पिपे (कॅन) वापरतात. ती सामान्यपणे सु. ४० लि. पर्यंत माल मावेल एवढी असतात. ती एकदाच वापरतात व ग्राहकाला मालाबरोबरच विकून टाकतात. ती हलकी असून सहजपणे उघडता येणारी असतात.

यांशिवाय जस्ताचा लेप दिलेल्या पोलादी पत्र्याची व ॲल्युमिनियमाच्या पत्र्याचीही निरनिराळ्या आकारमानांची दंडगोलाकार व चौकोनी पिपे बनविली जातात. ती सामान्यतः घरगुती वापरासाठी असतात. अशाच प्रकारच्या धान्याच्या कणग्याही बनवितात. घरगुती पाणी साठविण्यासाठी पितळेची व तांब्याची पिपे फार पूर्वीपासून वापरात आहेत. विशिष्ट रसायने व दुधासारखे खाद्यपदार्थ साठविण्याकरिता अगंज पोलादाची पिपे वापरतात.

वाहनावर ठेवावयाच्या टाक्या : विविध प्रकारची रसायने, पाणी (उदा. अग्निशामक गाडी) मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक करण्यासाठी अशा टाक्या फायदेशीर ठरतात. सर्वसाधारणपणे खनिज तेलाचे पदार्थ (उदा. रॉकेल, पेट्रोल), विविध प्रकारची रसायने, पाणी (उदा. अग्निशामक गाडी), दूध इ. द्रवरुप पदार्थ वाहून नेण्यासाठी या टाक्या वापरल्या जातात. त्या पोलाद, जस्तलेपित पोलाद, इपॉक्सी किंवा प्लॅस्टिकलेपित पोलाद वा अंगज पोलादाच्या (उदा., दूधासाठी) पत्र्याच्या बनविलेल्या असतात. सुमारे ३६,००० लि. माल मावेल एवढ्या त्या मोठ्या असतात. त्या मोटारगाडीवर कायमच्या बसविलेल्या असतात तसेच आगगाडीला जोडता येतील अशाही असतात. वाहन उतारावरुन जाताना किंवा जास्त वेगाने जाताना टाकीतील माल डचमळून सांडू नये म्हणून तिच्या आत धातूचे अनेक पडदे वसविलेले असतात. कधीकधी एकाच टाकीतून निरनिराळे पदार्थ वाहून नेण्यासाठी तिच्यात कप्पे पाडलेले असतात. टाकी लवकर भरता व रिकामी करता यावी म्हणून तिचे तोंड, तसेच तिच्यातून माल बाहेर काढण्यासाठी असलेले नळ व झडपा ही बरीच मोठी असतात. काही वेळा टाकीतील पदार्थ दाट असल्यास वा झाल्यास तो अधिक पातळ करण्यासाठी टाकीतच तापविणारे नळ बसविलेले असतात.

विशेषतः फार मोठ्या प्रमाणावर द्रव इंधने व पाणीही वाहून नेण्यासाठी आता टाकीची जहाजे वापरतात. त्यांच्यातील माल बाहेर काढण्यासाठी मोठे पंप जहजावर बसविलेले असतात.

जहाजावरील पेटारे : काही विशिष्ट जहाजांवरुन माल वाहून नेण्यासाठी सामान्यतः ॲल्युमिनियमाच्या पत्र्याचे पेटारे वापरले जाऊ लागले आहेत. अशा पेटाऱ्यांची मापे सामान्यपणे पुढीलप्रमाणे असतात : २.४ x २.४ x ६.१ किंवा २.४ x२.४ x ९.१ अथवा २.४ x २.४ x १२.२ मी. बहुधा जहाज कंपनीच हे पेटारे पुरविते व उत्पादक माल भरुन पेटारे गोदीत पाठवितात. तेथे यारीच्या साहाय्याने पेटारे जहाजावर योग्य जागी ठेवण्यात येतात. यामुळे हलवाहलव करण्यासाठी कमी मजूर लागतात व खर्च कमी येतो माल कमी वेळा हाताळला जातो थोड्या वेळात जास्त माल हाताळता येतो व वेळ वाचतो पेटाऱ्यात मालाची हलचाल विशेष होत नसल्याने मालाची तूटफूट कमी होते मालाची चढ-उतार लवकर होते आणि पेटारे सीलबंद असल्याने मालाची चोरी व नासधूस होत नाही.

सिलिंडर: सामान्यपणे यांना नलिका सिलिंडर म्हटले जाते व स्वयंपाकासाठी वापरला जाणारा द्रवीकृत खनिज तेल वायूचा (एलपीजी) सिलिंडर हे यांचे सर्वपरिचित उदाहरण होय. स्फोटक, तीव्र ज्वलनशील किंवा विषारी असे द्रव वा वायू यांत उच्च दाबाखाली ठेवतात. शिवाय हे काहीसे आडदांडपणे हाताळले जात असल्याने व हवामान व सभोवतालचे तापमान यांमुळे यांच्यातील मूळचा दाब दोन ते तीन पटींनी वाढण्याची शक्यता असल्याने ते मजबूत व उच्च दाब सहन करु शकतील असे बनवितात. नाहीतर स्फोट होऊन गंभीर नुकसान व जीवितहानीही होण्याची शक्यता असते. याकरिता सुरक्षा झडप बसविलेली असते. तीमुळे सिलिंडर फुटण्यापूर्वीच त्यातील पदार्थ बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होतो व पदार्थ बाहेर पडून सिलिंडर सुरक्षित राहतो. यांचे आकारमान काही किग्रॅ. पासून ते कित्येक टनांपर्यंत माल मावू शकेल एवढेही असू शकते. वाहून न्यावयाच्या पदार्थांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार सिलिंडराचा आराखडा बनविलेला असतो. असे सिलिंडर सामान्यपणे ऑक्सिजन, ॲसिटिलीन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन, सल्फर डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, अमोनिया, कार्‌बॉनिक अम्ल वायू, द्रवीकृत खनिज तेल वायू, हीलियम, आरगॉन इ. अनेक वायू दाबाखाली (वायूरुप किंवा द्रवरुप स्थितीत) साठवून ठेवण्यासाठी व वाहून नेण्यासाठी वापरतात.

सिलिंडर सामान्यपणे कमी किंवा उच्च कार्बनी अथवा मँगॅनीज पोलादाच्या जाड पत्र्याचे बनविले जातात. सिलिंडर बनविण्याची प्रत्येक क्रिया फार काळजीपूर्वक करावी लागते. याचा खालचा व वरचा अर्धा भाग अलग तयार करतात. व नंतर हे भाग वितळजोडकामाने एकमेकांना जोडतात. हे भाग तयार करताना प्रथम पत्र्याचा वाटोळा तुकडा घेतात. तो चांगला तापवून व मुद्रासंचात दाबून त्याला वाटीसारखा आकार देतात. दोन्ही अर्धे भाग जोडण्यापूर्वी खालच्या भागाच्या तोंडाजवळ आतल्या बाजूने पत्र्याचे एक कडे वितळजोड कामाने बसवितात व त्याचा अर्धा भाग खालच्या भागाच्या वर ठेवतात. या कड्याभोवती सिलिंडरचा वरचा भाग उपडा ठेवला म्हणजे तो अगदी योग्य जागी बसतो. त्यामुळे तो वितळजोडकामाने खालच्या भागाला उत्तम प्रकारे जोडता येतो. सिलिंडर उभा ठेवता यावा म्हणून त्याच्या खालील भागाला एक कड्याची बैठक जोडतात. सिलिंडरच्या माथ्याला भोक पाडतात व त्यात आटे पाडून तेथे सुरक्षा झडपेचे तोंड (पितळी) बसवितात. याशिवाय सिलिंडराच्या माथ्यावर चार उभ्या पट्ट्या जोडून त्यांवर पोलादी गजाचे कडे बसवितात. सिलिंडर उचलण्यासाठी हे कडे उपयोगी पडते व त्यामुळे सुरक्षा झटपेचे रक्षणही होते. अशा सिलिंडराचे अगदी कसून परीक्षण करतात (उदा., द्रवीकृत खनिज तेल वायूचे घरगुती वापाराचे सिलिंडर दर चौ. सेंमीला १५.५ किग्रॅ. एवढा दाब सहन करुन शकलेच पाहिजेत). अशी तपासणी झाल्यावर सिलिंडरावर पोलादी गोळ्यांचा मारा करुन त्याचा बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करतात त्यावर जस्ताचा पातळ मुलामा देतात आणि त्यावर रंगलेप फवारुन लावतात. शेवटी सुरक्षा झडप बसवितात.

घरगुती वापराचे द्रवीकृत खनिज तेल वायूचे सिलिंडर त्यात १२ ते १५ किग्रॅ. द्रवरुप वायू मावेल एवढे असतात. मात्र त्याचा सर्वसाधारण व्यास ३३१ मिमी., उंची ४८३ मिमी. आणि वजन सु. १५ किग्रॅ. असते त्यांतील वायूचा दाब ३.१ ते ३.५ किग्रॅ/चौ. सेंमी एवढाच असतो.


आ. ५. जाड भिंतीचा व एकसंघ घडणीचा, दाबाखाली वायू साठविण्याचा सिलिंडर बनविण्याची पद्धतः (१) पोलादी पिंडाचा चौकोनी तुकडा, (२) तुकडा दाबून दंडगोलाकार ठोकळा करुन घेतल्याने त्यातील अंतर्गत तंतू अरीय होतात (त्यांची रचना त्रिज्येच्या दिशेने होते), (३) दाब खेचणीने दंडगोलाकार ठोकळ्याची खोल वाटी बनवितात, (४) मुद्रा खेचणाने वाटी अधिक खोल (लांब) बनवून तिचा सिलिंडर बनवितात, (५) सिलिंडराचा उघडा गळा (तोंड) प्रसरण परिवलनाने निमुळता बनवितात, (६) निमुळत्या तोंडावर वायु-नियंत्रक झडप व तिच्यावर टोपी बसवितात.

ऑक्सिजन, ॲसिटिलीन, हायड्रोजन, क्लोरीन, कार्‌बॉनिक अम्लवायू, अमोनिया इ. वायू उच्च दाबाखाली भरुन ठेवण्यासाठी पोलादाचे कमी व्यासाचे व त्यामानाने जास्त लांबीचे सिलिंडर वापरतात. ते बनवितानाही वरीलप्रमाणेच सर्व काळजी घ्यावी लागते. ते बनविण्यासाठी कमी वा उच्च कार्बनी मँगॅनीज पोलादाची वा जरुरी प्रमाणे अगंज पोलादाची निळी वापरतात. योग्य त्या पोलादाचा पिंड घेऊन तो प्रथम साच्यात दाबून गोल करुन घेतात. नंतर मुद्रासंचात दाबून त्यापासून खोल वाटी बनवितात. नंतर योग्य अशा संरुपकात धरुन वाटी खेचणाने खोल व सिलिंडरासारखी बनवितात म्हणजे तळ बंदअसलेली लांब जाड नळी तयार होते. नळीचे वरचे उघडे तोंड प्रसरण परिवलनाने अरुंद करतात व त्यावर सिलिंडराचे झडप वगैरे असलेले तोंड दाबाखाली बसवून नंतर त्याला वितळजोड करतात. तयार झालेल्या सिलिंडरामध्ये हवा अगर पाणी भरुन त्याची दाब-कसोटी घेऊन सुरक्षितता अजमावतात. तोंडाकडील वाटीत झडप बसविण्यासाठी एक भोक पाडतात व त्यात आटे पाडून तेथे एक ठोकळा बसवितात. या ठोकळ्यात एक नियंत्रक झडप, एक दाबमापक व एक सुरक्षा झडप ही बसविलेली असतात. असे सिलिंडर उभे करुन ठेवता यावेत म्हणून काहींच्या तळाला एक वर्तुळाकार कड्याची बैठक आणि पाय व चाके असलेला लोखंडी पट्ट्यांचा पिंजरा वापरतात.

भारतीय उद्योग : यांत्रिक पद्धतीने डबे बनविण्याचा व्यवसाय भारतात १९२६ सालापासून सुरु झाला. तेव्हा मुख्यत्व रॉकेलाचे सु. १८ लि. चे चौकोनी व दंडगोलाकार डबे बनवित असत व तेल कंपन्याच ते बनवीत. १९३३ साली कलकत्ता येथे मेटेल बॉक्स कंपनी आँफ इंडिया लि. या कंपनीचा कारखाना सुरु झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सर्व प्रकारच्या डब्यांची मागणी वाढल्याने भारतात सर्व प्रकारचे डबे तयार होऊ लागले. भारतातील बहुतेक मोठ्या शहरांतून (उदा., कलकत्ता, मुबंई, मद्रास) असे कारखाने निघाले आहेत. भारतात १९४७ साली १६३ कारखाने होते व त्यांची वार्षिक उत्पादनक्षमता सु. ५३ हजार टन होती. हीच आकडेवारी १९५० साली २७८ व सु. १ लाख टन आणि १९६४ मध्ये ११८ व सु. ७ लाख टन एवढी अनुक्रमे होती. बहुतेक सर्व कारख्यान्यांतून कथिलाच्छादित पत्र्यांचे डबे, तसेच जस्तलेपित पोलादी पत्र्याची पिपे, ॲल्युमिनियमाचे डबे, तसेच काहींतून डब्या, बरण्या, दबणाऱ्या नळ्या इ. तयार होतात. सिलिंडरही थोड्या प्रमाणात तयार होतात.

पहा : आवेष्टन तांबटकाम धातुकलाकाम धातुपत्राकाम धातुरुपण धातूंचे मुलामे सोनारकाम.

संदर्भ : 1. Atkins, E. A. Practiical Sheet and Plate Worker, London, 1954.

            2. Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts Of India, New Delhi, 1975.

            3. Chattopadhya, Kamaladevi The Glory Of Indian Handicrafts, New Delhi, 1976.

            4. Lindberg R. A. Processes and Materials of Manufacture, Boston, 1964.

            5. Mehta, Rustam J. The Handicrafts and Industrial Arts of India, Bombay. 1960.

            6. Saraf, D.N. Indian Crafts-Development and Potential, New Delhi, 1982.

            7. Smith, R. Heap, H. W. Sheet Metal Technology, London, 1964.

देशमुख, य. वि., ठाकूर, अ. ना., मिठारी, भू. चिं.

अंगज पोलाद, ॲलुमिनियम, तांबे व पितळ यांची विविध प्रकारची भांडी