अरगट: अरगट किंवा क्लॅव्हिसेप्स परप्यूरिया नावाचे कवक असून ते राय, इतर धान्ये व गवत यांवर वाढते. तृणधान्ये व गवत यांवर या कवकामुळे जो रोग उत्पन्न होतो त्यासही अरगट असे नाव आहे. हा रोग मुख्यत्वे राय व बाजरी या पिकांवर आढळतो. बाजरीवरील रोगक्लॅव्हिसेप्स मायकोकेफलिया नावाच्या कवकामुळे होतो.

या कवकामुळे कणसात व ओंबीत दाणे भरत नाहीत व त्यांच्याऐवजी लांबट, मोठी व कठीण घेवड्यासारखी वाढ होते. तिला स्क्लेरोशिया म्हणतात. वसंत ऋतूत स्क्लेरोशिया वाढून त्यापासून देठ व बीजुके तयार होतात. पक्वावस्थेतील बीजुके वाऱ्‍याने उडून किंवा कीटकांद्वारे जाऊन नव्या ठिकाणी (कणीस, गवत) रोग उत्पन्न करतात.

 

स्क्लेरोशियायुक्त कणसे खाल्ल्यामुळे मानवाला किंवा जनावरांना विषबाधा होते. या विषबाधेमुळे उद्भवणाऱ्‍या लक्षणसमूहाला अरगोटिझम म्हणतात. ही विषबाधा मानवाला अनेक शतकांपासून ज्ञात असून ती कधी कधी साथीचे स्वरूप धारण करते. १९५३, १९५५ व १९७३ या अगदी अलीकडील काळात अशी विषबाधा मोठ्या प्रमाणावर झाली होती. स्पेन, फ्रान्स व रशिया या राय पिकवणाऱ्‍या देशांतून साथी उद्भवल्या आहेत. भारतात हा रोग प्रथम दक्षिण भारतात सुरू झाला परंतु आता तो उत्तर भारतातही फैलावला आहे. रोगग्रस्त बाजरी खाण्यात आल्याने विषबाधा होते. रोगट बाजरी मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजवत ठेविल्यास रोगट दाणे वजनाने हलके असल्यामुळे तरंगून वर येतात. ते सर्व काढून टाकून तळाची बाजरी उन्हात वाळवून वापरल्यास विषबाधा टाळता येते. पिकावरील अरगट रोग पीक आलटून पालटून घेणे, निवडक बी वापरणे तसेच कवकयुक्त गवताचा नाश करणे इ. उपायांनी टाळता येतो.

 

अरगटाचा रोगोत्पादक गुण समजण्यापूर्वीपासून त्याचा प्रसूतीमध्ये औषध म्हणून उपयोग करण्यात येत होता. १५८२ च्या सुमारास लोनिटसर यांनी गर्भाशयात वेदना उत्पन्न करणारा पदार्थ म्हणून त्याचा उल्लेख केला होता. तज्ञ वैद्यांनी तो वापरण्यापूर्वी सुइणी तो वापरीत होत्या. डेसग्रन्जेस नावाच्या वैद्यांनी अरगट प्रथम औषध म्हणून वापरले. परंतु त्यांनी १८१८ पर्यंत आपले अनुभव प्रसिद्ध केले नाहीत. त्यामुळे १८०८ च्या सुमारास न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध होणाऱ्‍या मेडिकल रिपॉझिटरी या प्रकाशनात जॉन स्टर्नस यांनी लिहिलेल्या अरगटवरील लेखावरून या पदार्थाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. त्यानंतर त्याचा औषधी वापर सर्व अमेरिकेत सुरू झाला. यूरोपात मात्र तो विलंबाने सुरू झाला. कदाचित त्या पदार्थाच्या रोगोत्पादक दुर्गुणांची यूरोपीय जनतेने घेतलेली धास्ती त्यास कारणीभूत झाली असावी. औषधी वापर सर्रास सुरू झाल्यानंतरही काही दुष्परिणाम आढळून (उदा., मेलेले मूल जन्मणे) आल्यामुळे १८२४ च्या सुमारास न्यूयॉर्कच्या मेडिकल सोसायटीने चौकशी करून ते औषध फक्त प्रसूतीनंतरच द्यावे अशी सूचना केली होती.

 

अरगटवर अनेक वर्षे संशोधनकार्य चालू होते. त्याचे सर्व औषधी गुण त्यापासून मिळणाऱ्‍या रासायनिक दृष्ट्या माहीत असलेल्या पदार्थापासून उत्पन्न झाले आहेत हे आज माहीत झाले आहे. लायसर्जिक अम्‍ल मूलकेंद्रक असलेली पुष्कळ अल्कलॉइडे ही त्याचे क्रियाशील घटक आहेत. ही अल्कलॉइडे दोन प्रकारची असून ती समघटक (रासायनिक संघटन एकच पण गुणधर्म निरनिराळे असलेली संयुगे) आहेत : (१) वामवलनी व (२) दक्षिणवलनी. यांपैकी फक्त वामवलनी अल्कलॉइडांमध्येच औषधी गुण असून ती नैसर्गिक आहेत. रासायनिक प्रक्रिया करून दक्षिणवलनी अल्कलॉइडे बनवितात, परंतु औषधी दृष्ट्या ती संपूर्ण निरुपयोगी आहेत. औषधी अल्कलॉइडांपैकी अरगोटॉक्सिन औषधिशास्त्राने वर्ज्य ठरविले आहे. अरगटामीन, अरगोमेट्रीन (अरगनोव्हिन) व काही अनुजात (साध्या रासायनिक प्रक्रियांनी तयार होणारी संयुगे) औषधी वापरात आहेत. अरगोमेट्रीन गर्भाशयाच्या स्‍नायूवर टोचल्यास फार जलद परिणाम करिते. प्रसूतीनंतर गर्भाशयाचे स्‍नायू आकुंचन पावून रक्तस्राव थांबविण्याकरिता ते वापरतात. अरगटामीन टार्ट्रेट हे एक प्रकारच्या अर्धशिशीवर गुणकारी ठरले असून त्या रोगात ते प्रतिबंधक म्हणूनही वापरतात. हा रोग बराच काळपर्यंत टिकणारा असल्यामुळे औषधही दीर्घ काळ चालू ठेवावे लागते. अशा वेळी त्याचे मळमळ, उलट्या व कोथ (शरीराचा भाग सडणे) हे विषारी परिणाम लक्षात घेणे जरूर असते.

 

पहा : ॲस्कोमायसिटीज बाजरी राय समघटकता.

 

संदर्भ : 1. Goodman, L. S. Gilman, A. The Pharmacological Basis of Therapeutics, New York, 1960.

           2. Singh, R. S. Plant Diseases, New Delhi, 1968.

 

जमदाडे, ज. वि.