चरखा : कापूस, रेशीम व लोकर यांपासून सूत काढण्याचे साधन. चरख्याचा शोध कधी लागला व विकास कसा झाला, हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. भारतात ब्रिटिश अंमल येण्यापूर्वी चरखा वापरात होता. इ. स. १५०० पर्यंत चरख्याचा पुष्कळसा विकास झाला होता. तथापि त्यात महात्मा गांधींनी बऱ्याच सुधारणा केल्या. १९१८ पर्यंत देशात जे चरखे वापरात होते ते खड्या पद्धतीचे होते. १९१८ मध्ये साबरमती आश्रमात खड्या चरख्यावर सूत काढावयास शिकवीत असत. १९२१ मध्ये काँग्रेस महासमितीने २० लाख नवीन चरखे तयार करावेत असा प्रस्ताव मांडला. १९२३ मध्ये भारतीय खादी मंडळ स्थापन झाले पण चरख्याच्या रचनेत कोणतेच बदल झाले नाहीत. २२ सप्टेंबर १९२५ रोजी अखिल भारतीय चरखा संघाची पाटणा येथे स्थापना झाली. १९२३ मध्ये नवीन पद्धतीचा चरखा तयार करण्यासाठी या संघामार्फत ५,००० रु. चे बक्षिस ठेवण्यात आले पण त्यात यश आले नाही. १९२९ मध्ये गांधीजींच्या सूचनांनुसार चरखा तयार करण्यासाठी चरखा संघाने एक लाख रुपयांचे बक्षिस ठेवले. पण सूचनांनुसार चरखा बनविणे शक्य झाले नाही. किर्लोस्कर बंधूंनी एक चरखा तयार केला होता पण तो कसोटीस उतरला नाही.

चरखा वापरण्यास सुलभ होण्यासाठी त्याच्या आकारमानात बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. खड्या चरख्याचा प्रकार जो किसान चरखा त्यात सुधारणा झाली. त्यावर गांधीजी स्वतः कताई करीत. किसान चरख्याचे पेटी चरख्यात रूपांतर करण्याचे श्रेय गांधीजींनाच आहे. हे कार्य त्यांनी येरवडा तुरुंगात केले. या चरख्याला येरवडा चरखा असेही म्हणतात. खडड्या चरख्यासारखाच बांबूचा चरखा सतीशचंद्र दासगुप्त यांनी तयार केला. शाळेत मुलांना शिकविण्याकरिता तसेच प्रवासात कताई करण्यासाठी प्रवासी चरखा बनविण्यात आला पण त्याची गती किसान चरख्यापेक्षा कमी होती. सूत काढण्याची गती व त्याची मजबुती या दृष्टीने किसान चरखा उत्तम असला, तरी खेडेगावांमध्ये खडा चरखाच लोकप्रिय होता. गांधीजींच्या मृत्यूनंतरही चरख्यासंबंधी संशोधन व प्रयोग चालूच राहिले.

तमिळनाडूमधील एकंबरनाथ यांनी १९४९ मध्ये एक नवीन चरखा तयार केला. यातील चात्या गिरणीतील चात्यांसारख्याच उभ्या होत्या. एकंबरनाथ यांच्या स्मरणार्थ या चरख्यास अंबर चरखा असे नाव देण्यात आले.

आ .१ ‍पारंपरिक चरख्यांचे विविध प्रकार : (अ) खडा चरखा , (आ) किसान चरखा ,(इ) पेटी चरखा ,(ई ) बांबूचा जनता चरखा.

पारंपरिक चरखे : भारतात निरनिराळ्या भागांत विविध प्रकारचे चरखे वापरतात. त्यांपैकी खडा चरखा, किसान चरखा व पेटी चरखा हे महत्त्वाचे आहेत. खडा चरखा हा एक चातीचा असून त्याला हाताने फिरवावयाचे ४०–६० सेंमी. व्यासाचे एक चाक असते. हे चाक सुती पट्ट्याने चातीला उभे जोडलेले असते. या चरख्यातील कमी उत्पादन व मोठे आकारमान हे दोष दूर करून किसान चरखा तयार करण्यात आला. त्याला दोन चाके असून त्यांपैकी मुख्य चाक २० सेंमी. व्यासाचे व वेग वाढविणारे चाक १० सेंमी. व्यासाचे असून ही चाके एका फळीवर बसविलेली असतात. दोन सुती पट्ट्यांनी मुख्य चाक चातीशी जोडलेले असते. सूत कातताना चाके जमिनीला समांतर असतात. या चरख्याने खड्या चरख्यापेक्षा जास्त सूत निघते. पेटी चरखा एका पेटीत बसविलेला असून ती बिजागरीच्या साहाय्याने उघडता वा बंद करता येते. हा चरखा विविध आकारमानांत मिळतो. सर्वांत लहान चरखा म्हणजे प्रवासी चरखा होय.

अंबर चरखा : चरख्यांचा हा प्रकार नवीन असून त्यात चार चात्या व हाताने चालविण्यात येणारे लाकडी कताई चाक असून तीन लाकडी कप्प्या असतात. या कप्प्यांवर २, ३ व ४ खाचा असतात. प्रत्येक कप्पी मुख्य चाकाला सुती पट्ट्याने जोडलेली असते. या चरख्यातील चार चातीची कडी, पन्हळी पाडलेले चार दंडगोल, दंतचक्रांची एक जोडी, स्प्रिंगा इ. भाग धातूचे असून धातूच्या दंडगोलांवर बसविलेल्या रबरी दंडगोलांच्या चार जोड्या असतात. विविध जाडीचे व खास तयार केलेले नलिकाकृती पेळू सूतकताईसाठी वापरतात. सूत गुंडाळण्याची क्रिया स्वयंचलित असते. चाती दर मिनिटाला ७,०००–९,००० फेरे इतक्या वेगाने फिरते. कप्पीवरील एका खाचेतून दुसऱ्या खाचेवर पट्टा सरकवून सुताचा क्रमांक (आकारमान) बदलता येतो. तसाच तो पेळूचा आकार बदलूनही बदलता येतो. ह्या चरख्याशी एक पिंजण संयंत्र (धुनाई मोडिया) आणि पेळूंचे एक संयंत्र (अंबर बेलनी) संलग्न असतात. पहिल्या संयंत्रात एका खाचयुक्त कप्पीला पट्ट्याच्या साहाय्याने एक लाकडी चाक जोडलेले असते. कप्पीमुळे एक पन्हाळी दंडगोल फिरतो. यामुळे कथिलाचे आरे बसविलेल्या एका लाकडी दंडगोलाकडे रुई जाते. ज्यावेळी चाक फिरविले जाते त्यावेळी दंडगोल अतिवेगाने फिरतो व केंद्रोत्सारी (केंद्रापासून दूर ढकलणाऱ्या) प्रेरणेने तंतू बाहेर येतात व ते एका तारेच्या पेटीत पडतात. ही पेटी दंडगोलाला जोडलेली असते. बेलनी ही पोलादी दंडगोलांच्या दोन जोड्यांची बनविलेली असते. त्यांना स्प्रिंगच्या साहाय्याने भार लावलेला असतो. खालचे दंडगोल पन्हळीयुक्त असून वरचे दंडगोल रबराने आच्छादित केलेले असतात. पिंजण संयंत्राने कापूस मोकळा केल्यावर तो या दंडगोलातून बऱ्याच वेळा ओढला जाऊन त्याचे एका नसराळ्याने सैलसर सूतात रूपांतर होते व ते एका दंडगोलात गोळा करतात. हा दंडगोल मुख्य हात चाकास पट्ट्याने जोडलेल्या खाचदार कप्पीच्या फिरण्याने फिरतो. ह्या चरख्यामुळे सामान्यतः भरड व मध्यम सूत निघते. पारंपरिक चरख्यापेक्षा ह्या चरख्यावरील सूत जास्त ताणले जाणारे असून जवळजवळ चौपट सूत निघते.


आ .२. अंबर चरखा आणि त्याच्याशी संलग्न असणारी संयंत्रे : (अ) अंबर चरखा, (आ) धुनाई मोडीया, (इ) अंबर बेलनी.

वर्धा येथील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संशोधन संस्थेने आणि बऱ्याच सरंजाम कार्यालयांनी केलेल्या संशोधनामुळे अंबर चरख्याची कार्यक्षमता वाढली आहे. विशेषतः वर्धा येथील जमनालाल बजाज सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने अंबर बेलनी व अंबर चरखा यांत बरीच सुधारणा केली. तसेच अंबर चरख्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्रीज रिसर्च ॲसोसिएशन (अतिरा), मध्यवर्ती कापूस समितीची मुंबई येथील प्रयोगशाळा आणि कानपूर, सेरामपूर इ. ठिकाणच्या संशोधन संस्था यांनीही संशोधन केलेले आहे. अतिरा या संस्थेत सर्व सेवा संघाच्या सहकार्याने सर्व प्रकारच्या कापसाचा वापर करण्यासंबंधाने प्रयोग करण्यात आलेला आहेत. सर्व सेवा संघाची प्रयोग समिती कोईमतूर येथील टेक्सटूल कंपनी यांनी नवीन अंबर चरखा तयार केला आहे. त्याला सहा चात्या असून तो धातूचा तयार करण्यात आला आहे. हा चरखा सध्या कोईमतूर व राजकोट या दोन प्रकारांत वापरला जातो. १९६८-६९ अखेर १८९ केंद्रांत ४,५५५ कोईमतूर प्रकारचे अंबर चरखे वापरात होते. त्यावरील सुतापासून २०·७८ लाख चौ.मी. कापड बनविण्यात आले.

फावल्या वेळातला एक जोडधंदा म्हणून व एक ग्रामीण उद्योग म्हणून महात्मा गांधींनी चरख्याला महत्त्व दिले. शेतीचा उद्योग बारमाही चालत नसतो. शेतकरी व शेतमजूर यांना ३-४ महिने तरी विशेषसे काम नसते त्याचप्रमाणे घरकाम करणाऱ्या गरीब स्त्रियांना घरकामाव्यतिरिक्त वेळ राहतो. अशा लोकांना पोट भरण्याचा एक जोड उद्योग म्हणून हातकताईच्या कामाची आर्थिक उपयुक्तता टिकविणे जरूर आहे. खर्चवेच जाऊन ८ तास कताईने दीड ते दोन रुपये तरी प्राप्ती झाली, तरच चरखा एक उद्योगसाधन म्हणून टिकू शकेल, नाहीतर चरख्याला भवितव्य नाही.

पहा : खादी उद्योग खादी व ग्रामोद्योग आयोग.

मिठारी, भू. चिं.