चुना : चुना हा मुख्यत्वेकरून कॅल्शियम ऑक्साइडाचा बनलेला असतो. सामान्यतः त्यात मॅग्नेशियम ऑक्साइड थोड्याफार तरी प्रमाणात असते आणि सिलिकायुक्त मृत्तिका व लोह यांची अशुद्धी अल्प प्रमाणात असते. चुनखडी भाजून चुना तयार करतात. चुनखडी (कॅल्शियम कार्बोनेट) भाजली असता तिचे विघटन होऊन तीतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू व बाष्प बाहेर निघून जातात आणि कॅल्शियम ऑक्साइड शिल्लक राहते. त्यासच चुना, कळीचा चुना, चुनकळी किंवा दाहक चुना (कॉस्टिक लाइम) असे म्हणतात.

CaCO3 + उष्णता  CaO + CO2.

CaCO3·MgCO3 + उष्णता CaO·MgO + 2CO2.

चुनखडी भाजून चुना तयार करणे ही अगदी प्राथमिक व साध्या स्वरूपाची रासायनिक विक्रिया आहे, परंतु ती व्युत्क्रमी (दोन्ही दिशांनी होणारी) असल्यामुळे तयार झालेल्या कॅल्शियम ऑक्साइडाबरोबर याच क्रियेत तयार झालेल्या कार्बन डाय-ऑक्साइडाची विक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट परत तयार होऊ शकते. हे टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी लागते. (१) चुनखडक विघटन होण्याच्या तापमानापर्यंत तापवावा लागतो, (२) हे तापमान भट्टीतील सगळ्या चुनखडीचा पूर्णपणे चुना होईल इतका वेळ टिकवून ठेवावे लागते व (३) या विक्रियेत तयार होणारा कार्बन डाय-ऑक्साइड वायू बाहेर निघून जाईल अशी व्यवस्था करावी लागते. सु. ९००–१,३०० से. या तापमानात चुनखडीच्या तुकड्यांचे त्यांच्या पृष्ठभागाकडून मध्याकडे सुरूवातीपासून हळूहळू विघटन होत जाते. तुकड्यांच्या पृष्ठाजवळच्या काही भागांचे विघटन विघटनाच्या तापमानास वा काही परिस्थितींत त्यापेक्षा थोड्या कमी तापमानास होते. मात्र तुकड्यांच्या गाभ्यापर्यंत विघटन होण्यास विघटनाच्या तापमानापेक्षाही उच्च तापमान लागते. सामान्यतः तुकड्यांचे आकारमान जितके मोठे तितक्या प्रमाणात गाभ्याचे विघटन करण्यासाठी उच्च तापमान लागते. मात्र ठराविक प्रमाणाबाहेर प्रखर उष्णतेने म्हणजे विघटनाच्या बऱ्याच वरच्या तापमानास चुनखडी भाजली, तर तीपासून कठीण किंवा पूर्ण जळलेला चुना तयार होतो. हे होत असताना चुनखडी मूळच्या आकारमानाच्या २५ ते ५० टक्के आकसते. यामुळे तयार झालेला चुना जरूरीपेक्षा अधिक घन होतो आणि त्यातील सूक्ष्म छिद्रे व भेगा अधिक संकुचित होतात. परिणामी कठीण किंवा पूर्ण भाजलेला चुना रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय होतो. तसेच अधिक उच्च तापमानास प्रखर उष्णतेत सिलिका, ॲल्युमिना, लोह इ. मलद्रव्ये वितळून त्यांची चुन्याबरोबर रासायनिक विक्रिया होऊन अनावश्यक संयुगे तयार होतात. तापमान कमी असेल, तर चुनखडीच्या तुकड्यांचे पूर्ण विघटन होत नाही व गाभ्यातील चुनखडी तशीच राहते. व्यवस्थितपणे पूर्ण भाजला गेलेला, चुनखडीचा गाभा नसलेला मऊ चुना बनविणे हे उद्दिष्ट असते. मऊ चुना सच्छिद्र व रासायनिक दृष्ट्या अधिक क्रियाशील असतो. वरील दोन्ही प्रकारच्या अनिष्ट गोष्टी टाळण्यासाठी योग्य अशा व नियंत्रित तापमानास व सर्व चुनखडीचे संपूर्ण विघटन होईल इतका काळ ती तापवावी लागते.

भट्टीमध्ये हवा खेळती राहण्याची योग्य व्यवस्था केलेली नसल्यास काही चुन्याचे परत कार्बनीभवन (कार्बनाशी संयोग होण्याची क्रिया) होऊन कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. यामुळेही चुन्याचा दर्जा कमी होतो. म्हणून चुनखडी भाजल्यावर तयार होणारा कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर घालवून देण्यासाठी व्यवस्था करावी लागते.

चुनखडीचे काही प्रकार, विशेषकरून स्फटिकी चुनखडी, हवे तसे यशस्वी रीत्या भाजता येत नाहीत. अशा चुनखडीचे तुकडे विघटनाचे तापमान पोहोचण्यापूर्वी तडतडून फुटतात व त्यांचा बारीक भुगा होतो. भाजण्यासाठी योग्य आकारमानाच्या लहान पल्ल्यातील चुनखडीचे तुकडे वापरणे योग्य ठरते. तुकड्यांच्या आकारमानाचा पल्ला मोठा असेल, उदा., १·२५ ते १५ सेंमी., तर सर्वसामान्य मध्यम आकारमानाचे तुकडे व्यवस्थित भाजले गेले असताना लहान आकारमानाचे तुकडे जरूरीपेक्षा अधिक व प्रखर भाजले जातील व मोठ्या आकारमानाचे तुकडे अर्धवट भाजले जातील. कुठल्याही एका (नियंत्रित अशा) ठराविक तापमानास भाजण्याचे प्रमाण हे चुनखडीच्या तुकड्याच्या आकारमानाशी व्यस्त प्रमाणात असते म्हणजे तुकड्यांचे आकारमान जितके कमी तितके भाजण्याचे प्रमाण अधिकाधिक होते. भाजण्याची क्रिया एकसारखी व्हावी म्हणून सध्या १० × २० सेंमी., २·५ × ५ सेंमी. आणि ०·६२५ × १·२५ सेंमी. या किंवा याहीपेक्षा नियंत्रित आकारमानाच्या पल्ल्यातील तुकडे वापरतात.

कच्चा माल : भारतात मुख्यत्वेकरून चुनखडी किंवा ⇨कंकर  भाजून कळीचा चुना तयार करतात. सागरी प्राण्यांचे कॅल्शियमयुक्त शंख-शिंपले वगैरे भाजूनही कर्नाटकाच्या काही भागात चुना तयार करतात. कंकरापासून जलीय (हायड्रॉलिक) चुना तयार होतो व रूपांतरित चुनखडकांपासून आणि सागरी शंख-शिंपले इत्यादींपासून साधा म्हणजे जल नसलेला (अजलीय) चुना तयार होतो. भारतात चुन्याचे उत्पादन सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरलेल्या रूपांतरित चुनखडकांपासून होते. एक टन चुना तयार करण्यासाठी तत्त्वतः १·७९ टन उच्च कॅल्शियमी आणि १·९० टन डोलोमाइटी चुनखडक लागतो. प्रत्यक्षात मात्र एक टन चुना तयार करण्यासाठी कमीत कमी २ टन चुनखडी लागते. याला कारण म्हणजे घर्षण होऊन धुळीच्या स्वरूपात काही माल गळून वाया जातो.

चुना बनविण्यासाठी लागणारी उष्णता : उच्च कॅल्शियमी चुनखडी विघटनाच्या तापमानापर्यंत तापविण्यासाठी, दर टनास ३·६ लक्ष किकॅ. (किलोकॅलरी) इतकी व डोलोमाइटी चुनखडीस दर टनास ३·१५ लक्ष किकॅ. इतकी उष्णता लागते. सामान्यतः चुना बनविण्यासाठी लागणारे तापमान सर्व चुनखडीचे विघटन होईपर्यंत तसेच ठेवावे लागते. अशा प्रकारे चुनखडी तापत ठेवण्यासाठी कॅल्शियमी चुनखडीस ७ लक्ष किकॅ. व डोलोमाइटासाठी ६·५५ लक्ष किकॅ. इतकी उष्णता अधिक पुरवावी लागते. याशिवाय चुना तयार करीत असताना काही उष्णता फुकट जाते, त्यासाठी अधिक उष्णता पुरवावी लागते, उदा., (१) बाष्पयुक्त चुनखडीच्या आणि कोळशाच्या बाष्पीभवनाने उष्णतेचा ऱ्हास होतो. (२) चुना बाहेर काढताना बाहेर काढलेल्या चुन्याबरोबर काही उष्णता बाहेर पडते. (३) गरम वायू व धूळ ही बाहेर निघून जातात. (४) भट्टीतून प्रारणाने (तरंगरूपी ऊर्जेच्या रूपाने) व संनयनाने (उष्ण वायू वर जाऊन त्याची जागा थंड वायूने घेतल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायु-प्रवाहाने) काही उष्णता निघून जाते. या सर्व कारणांनी तसेच भट्ट्यांचे प्रकार, त्यांची संरचना, चुनखडीच्या तुकड्यांचे आकारमान, भट्टी वापरण्याचे तंत्र या सर्वांनुसार चुना बनविण्यासाठी दर टनास सामान्यतः ८·२ — २५ किकॅ. इतकी उष्णता लागते.

रासायनिक संघटन : चुन्याचे रासायनिक संघटन ज्या प्रकारची चुनखडी भाजून तो तयार करण्यात येतो त्यावर अवलंबून असते. बहुतेक सर्व चुनखडकांत सामान्यतः मॅग्नेशियम कार्बोनेट, सिलिका, लोह व मृत्तिका हे असतात. चुना करण्यासाठी वापरलेल्या चुनखडीच्या प्रकारानुसार कळीच्या चुन्याचे कॅल्शियमी, मॅग्नेशियमी, सिलिकी व मृत्तिकी चुना असे प्रकार होतात. (१) कॅल्शियमी चुना कॅल्शियमाचे उच्च प्रमाण असणाऱ्या चुनखडीपासून तयार करतात. यात उच्च कॅल्शियमी चुना (कॅल्शियम ऑक्साइड ९० टक्क्यांहून अधिक) व कॅल्शियमी चुना (कॅल्शियम ऑक्साइड ८५ ते ९० टक्के) असे दोन प्रकार आहेत. (२) मॅग्नेशियमी चुना मॅग्नेशियमी चुनखडीपासून तयार करतात. यात २० ते ३५ टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड असते. (३) डोलोमाइटी चुन्यात मॅग्नेशियम ऑक्साइड ४० टक्क्यांच्या आसपास असते. तो डोलोमाइट भाजून तयार करतात. (४) सिलिकी चुना ५ टक्क्यांहून अधिक सिलिका असलेली राखी रंगाची चुनखडी भाजून तयार करतात. (५) मृत्तिकी चुना. यालाच जलीय चुना म्हणतात. त्यात सिलिका व ॲल्युमिना दोन्ही असतात. त्यात पाणी मिसळले असता तो घट्ट होऊन कठीण होतो. तो हलक्या दर्जाच्या सिमेंटसारखा असतो. कंकर व कॅल्शियमी टूफा भाजून मृत्तिकी चुना तयार होतो.

उत्पादन पद्धती : चुनखडी भाजून चुना तयार करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्या वापरतात. साध्या भट्ट्या माती व विटांच्या बांधलेल्या असतात. उभ्या कूपकासारख्या भट्ट्या विटांनी बांधलेल्या असतात किंवा पोलादी पट्ट्या व सळ्या यांच्या सांगाड्यांनी उभारून व आतल्या बाजूने उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) विटांनी बांधलेल्या असतात. घूर्णी (फिरत्या) भट्ट्या ओतीव लोखंडाच्या किंवा पोलादाच्या बांधलेल्या असून त्यांच्या आतल्या बाजूला १,२०० ते १,३५० से. तापमान सहन करू शकणाऱ्या उच्चतापसह विटांनी बांधकाम केलेले असते.

भारतात साध्या प्रकारच्या भट्ट्यांमध्ये चुनखडी किंवा कंकर भाजून चुन्याचे बऱ्याच प्रमाणात उत्पादन करण्यात येते. या भट्ट्यांचे आकारमान व आकार ठिकठिकाणी वेगवेगळे असतात. ते चौकोनी किंवा उभ्या वृत्तचितीच्या (दंडगोलाकार) आकाराचे असतात. त्यांची उंची चौकोनी भट्ट्यांमध्ये एक मी. ते वृत्तचितीच्या आकाराच्या भट्ट्यांमध्ये तीन मी. इतकी असते. त्यांच्यातून उत्पादन मात्र फारच कमी होते. दरमहा १० ते ८० टन चुना एका भट्टीतून तयार होतो. या भट्ट्या विटा किंवा दगड व माती यांच्या बांधलेल्या असतात. बऱ्याच वेळा त्यांचा तळ जमिनीखाली काही खोलीवर असतो. या भट्ट्यांच्या तळाच्या बाजूला हवा फुंकण्यासाठी भोके ठेवलेली असतात. या भट्ट्या गटागटाने पेटवितात.

भट्टीमध्ये चुनखडी किंवा कंकर आणि इंधन यांचे एकाआड एक असे एकावर एक थर रचतात. अगदी वरचा थर इंधनाचा असतो. चुनखडीच्या व इंधनाच्या थरांची जाडी स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळी असते. सामान्यतः चुनखडीचा प्रत्येक थर सु. २० ते ३० सेंमी. जाड असतो व इंधनाच्या थराची जाडी जर कोळसा वापरला असेल, तर चुनखडीच्या थराच्या जाडीच्या निम्मी असते व अर्धवट जळलेला दगडा कोळसा वापरला असेल, तर दोन्ही थरांची जाडी सारखीच असते. भट्टी खालच्या बाजूने पेटविण्यात येते. खालच्या भागात असणारी भोके जरूर त्या प्रमाणात झाकून किंवा उघडून भाजण्याची तीव्रता कमीजास्त करण्यात येते. कधीकधी खालच्या भोकांतून हवा आत फुंकावी लागते. जळण्याचा आणि भाजण्याच्या क्रियेला सरासरीने ७२ तास लागतात. नंतर भट्टी थंड झाल्यावर चुना खालच्या बाजूने बाहेर काढण्यात येतो. त्याची मोठाली ढेकळे व भुगा ही वेगवेगळी केली जातात. या पद्धतीने चुना तयार करणे आर्थिक दृष्ट्या सापेक्षतः स्वस्त पडत नाही, तयार होणाऱ्या चुन्याचे रासायनिक संघटन भट्टीच्या सर्व भागात अगदी एकसारखे नसते. तसेच तयार होणाऱ्या चुन्यात इंधनाची राख मिसळली जाते.

भाजली असता जिचा चुरा होत नाही अशा चुनखडीचे १० ते १५ सेंमी. आकरमानाचे तुकडे करून ते उभ्या कूपकासारख्या भट्टीमध्ये कोळसा, खनिज तेल किंवा वायू वापरून भाजतात. अशा भट्ट्यांची उंची ८ ते २५ मी. व्यास ३ ते ८ मी. असतो. अशा भट्ट्यांच्या भिंती उच्चतापसह विटांनी बांधलेल्या असतात. कोळसा व चुनखडक यांचे मिश्रण भट्टीच्या वरच्या बाजूने आत ओतण्यात येते. हे मिश्रण वरून खाली जात असताना त्यातील कोळसा पेटविला जातो. भट्टीत खालच्या बाजूने फुंकलेल्या हवेच्या झोतामुळे कोळसा अधिक प्रखरतेने जळतो. यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळे चुनखडीचे विघटन होते व चुना तयार होतो. भट्टीच्या आकारमानानुसार आणि चुना बाहेर काढण्याच्या गतीनुसार वरच्या बाजूने ओतलेल्या चुनखडीस भट्टीच्या वरच्या टोकापासून खाली तळापर्यंत येण्यास ७ ते १४ दिवस लागतात. भट्टीतील सर्वांत गरम पट्टा त्याच्या मध्यावर असतो. या पट्ट्याच्या वरच्या भागात चुना तयार होतो व या पट्ट्याच्या खालच्या भागात जात असताना तो थंड होत जातो आणि बाहेर काढण्याच्या दरवाजापाशी पोहोचेपर्यंत तो हाताळण्याइतका थंड होतो. ह्या चुन्यामध्येसुद्धा अगोदर वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणे राख मिसळलेली असते. राख टाळण्याकरिता हल्ली चुनखडी भाजण्यासाठी वायू किंवा तेल हे अधिकाधिक उपयोगात येऊ लागले आहेत. सागरी शंख-शिंपले इ. तसेच ज्या चुनखडीचे तुकडे भाजले असता त्यांचे चूर्ण होते अशा पदार्थांसाठी उभ्या कूपकांसारख्या भट्ट्या वापरणे योग्य नसते. पदार्थांमुळे उभी भट्टी तुंबून जाते आणि फार मोठ्या दाबाने हवा तीत फुंकल्याशिवाय ती पेटती ठेवता येत नाही. अशा प्रकारचे कॅल्शियमी पदार्थ घूर्णी भट्ट्यांमध्ये भाजणे सोयीचे असते.

घूर्णी भट्ट्या ओतीव लोखंडाच्या किंवा पोलादाच्या बांधलेल्या असतात. त्यांच्या आतल्या बाजूला कडेने १,२०० से. इतके तापमान सहन करू शकणाऱ्या उच्चतापसह विटांनी बांधकाम केलेले असते. या भट्ट्या ८ ते १० अंशांनी कललेल्या असतात व सरासरी ८ मिनिटांत एक फेरी या गतीने संथपणे त्या कललेल्या अक्षाभोवती फिरत असतात. तेल, वायू किंवा कुटलेला कोळसा हे पदार्थ त्यांत इंधन म्हणून वापरतात. वरच्या बाजूने चुनखडी आत ओततात व खालच्या बाजूने चुना बाहेर काढण्यात येतो. चुना बाहेर पडण्याचा खालच्या द्वाराजवळ इंधन पेटविण्यात येते व गरम वायू वरून खाली येणाऱ्या चुनखडीच्या विरुद्ध दिशेत वरच्या बाजूस वाहतात व त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या चुनखडीचा चुना तयार होतो. इंधन कमी प्रमाणात लागावे म्हणून उष्णता वाया जाऊ न देता ती थोपवून धरण्यासाठी सोयी केलेल्या असतात. आगीच्या ज्वाला कमी जास्त करून व भट्टीच्या फिरण्याच्या गतीत बदल करून भाजण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यात येते. भट्टीच्या आकारमानानुसार चुन्याचे उत्पादन होते. ८५० ते १,००० घ. सेंमी. आकारमानाच्या घूर्णी भट्टीतून २४ तासांत एक टन चुन्याचे उत्पादन होऊ शकते. घूर्णी भट्ट्या चुनखडीचे अगदी लहान आकारमानाचे तुकडे भाजण्यासाठी वापरण्यात येतात.

कॅल्शियम कार्बाइड तयार करण्यासाठी लागणारा अगदी शुद्ध चुना तयार करण्यासाठी अमेरिकेत एलरमान भर्जक (कॅल्सिनर) वापरतात. तो एकसारखा चालू ठेवता येतो.

डोर्को नावाच्या भट्टीमध्ये ६ ते ८ मेश [→ चाळणे] आकारमानाचा माल भाजता येतो. या भट्टीतील विशिष्ट प्रकारच्या संयंत्रात अगोदर तापविलेल्या भागात माल ओततात व द्रावरूप (प्रवाही) अवस्थेत तो भाजतात. नंतर चुना थंड करतात. या कामात वायू, तेल किंवा कोळसा इंधन म्हणून वापरतात. या पद्धतीने मऊ चुना तयार होतो. कागद कारखान्यात व बीटापासून साखर बनविण्याच्या कारखान्यात आणि इतर काही रासायनिक प्रक्रियांमध्ये उप-उत्पादन म्हणून अवक्षेपित होणाऱ्या (न विरघळणाऱ्या साक्याच्या स्वरूपात तयार होणाऱ्या) कॅल्शियम कार्बोनेटाचा चुना करण्यासाठी ही प्रक्रिया मुख्यत्वेकरून वापरतात.

सजलीकृत चुना : (हायड्रेटेड लाइम). कळीचा चुना पाण्यामध्ये विरवून सजलीकृत किंवा विरलेला चुना तयार करतात. चुन्याच्या सजलीभवनाच्या विक्रियेमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम यांच्या ऑक्साइडांच्या रेणूंबरोबर पाणी (हायड्रॉक्साइडाचे रेणू) समरेणवीय प्रमाणात बांधले जाते. चुन्याचे सजलीभवन ही एक ऊष्मादायी (उष्णता निर्माण होणारी) विक्रिया आहे. सजलीकृत चुना मुख्यत्वेकरून कॅल्शियम हायड्रॉक्साइडाचा बनलेला असतो. त्यात मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड आणि मॅग्नेशियम ऑक्साइड दुय्यम किंवा अल्प प्रमाणात असतात.

CaO + H2O Ca (OH)2 + उष्णता

CaO·MgO + H2O Ca (OH)2·MgO + उष्णता

CaO·MgO + 2H2O Ca(OH)2·Mg(OH)2 + उष्णता

चुन्याचे सजलीभवन होताना बऱ्याच प्रमाणात उष्णता बाहेर पडते [कॅल्शियम हायड्रॉक्साइड Ca(OH)2 होताना १५,००० कॅ./ग्रॅ. मोल आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड Mg(OH)2 होताना ८,००० ते १०,००० कॅ./ग्रॅ. मोल]. चुना काही प्रमाणात पाण्यात विद्राव्य असतो पण त्याची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) काढणे कठीण असते कारण बहुधा विद्रावण होण्यापूर्वीच चुन्याचे सजलीकरण होऊन त्याचे (कॅल्शियम) हायड्रॉक्साइड तयार होते. कॅल्शियम हायड्रॉक्साइडाच्या बाबतीत विद्रावणाची उष्णता २,७९० कॅ./ग्रॅ. मोल इतकी असते. मॅग्नेशियम ऑक्साइड जवळजवळ अविद्राव्य असल्यामुळे त्याच्या विद्रावणाची उष्णता मोजता येत नाही. सामान्य परिस्थितीत मॅग्नेशियम ऑक्साइड अगदी कमी प्रमाणात सजलीभूत होते. यामुळे सजलीकृत चुना हा कॅल्शियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड व मॅग्नेशियम ऑक्साइड यांचा बनलेला असतो. मॅग्नेशियम ऑक्साइडाचे संपूर्ण सजलीकरण करण्यासाठी दीर्घकाल किंवा उच्च दाबाखाली सजलीकरण केले असता उच्च प्रमाणात सजलीकृत डोलोमाइटी चुना तयार होतो. सूक्ष्मकणी (मायक्रॉनांच्या, १०-३ मिमी.) आकारमानाच्या सुक्या, मऊ, भुसभुशीत अशा पांढऱ्या चूर्णाच्या स्वरूपात सजलीकृत चुना बाजारात मिळतो.

सजलीकृत चुना तयार करण्यासाठी कळीचा चुना प्रथम भरडतात किंवा दळतात, मग तो पाणी व चुना यांचे प्राथमिक मिश्रण करावयाच्या पात्रात ओततात. या पात्राला सजलीकारक असे म्हणतात. सजलीकारकात पाणी व चुना ढवळून एकमेकांत मिसळतात. भरडलेल्या किंवा दळलेल्या चुन्यात हळूहळू पाणी ओतण्यात येते. सजलीकरणासाठी पाणी अगदी योग्य प्रमाणातच वापरणे फार महत्त्वाचे असते. पाणी जास्त वापरल्यास इच्छित अशा सुक्या चूर्णांच्या स्वरूपात सजलीकृत चुना तयार करणे अशक्य होते किंवा फार महाग होऊन बसते. पाणी जरूरीपेक्षा कमी वापरल्यास अपूर्ण सजलीकरण होऊन रासायनिक दृष्ट्या अस्थिर आणि कच्च्या संरचनेचा हलक्या प्रतीचा सजलीकृत चुना तयार होतो.

सजलीकरणाच्या उष्णतेमुळे जी वाफ तयार होते तिच्या स्वरूपात पाणी बाहेर निघून जाते. यामुळे तात्त्विक दृष्ट्या लागणाऱ्या म्हणजे २४.५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी सजलीकरणासाठी वापरावे लागते. कळीच्या चुन्याची क्रियाशीलता आणि चुन्याच्या कणांचे आकारमान यांनुसार सामान्यतः ५० ते ६५ टक्के पाणी वापरावे लागते. अगदी सूक्ष्मकणी चुन्याचे सजलीकरण जलद होते. योग्य प्रमाणात पाणी वापरून तयार झालेला काहीसा ओलसर विरलेला चुना नंतर मळसूत्री वाहकामध्ये सुटा, मोकळा करण्यात येतो. या ठिकाणी त्यातील भरड भाग बाजूला करण्यात येतो. यामुळे रासायनिक दृष्ट्या अधिक शुद्ध असे सूक्ष्मकणी चूर्ण वेगळे मिळते. कणांच्या सूक्ष्म आकारमानामुळे चूर्ण अधिक सुके व मोकळे होते. असा हा चूर्णरूपातील सजलीकृत चुना पुढे अधिक शुद्ध करून पिशव्यांत भरून विक्रीसाठी पाठवितात.

बाजारात मिळणाऱ्या सजलीकृत चुन्यात बरीच मलद्रव्ये असतात. मुख्यत्वेकरून सिलिका व दुय्यम ॲल्युमिना आणि लोहाचे ऑक्साइड यांच्याशी चुन्याची रासायनिक विक्रिया होऊन तयार झालेली ट्राय कॅल्शियम सिलिकेट, ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट ही त्यात असतात. उच्च जलीय चुन्यात फक्त १० ते ३५ टक्के मोकळा चुना उपलब्ध होतो. सापेक्षतः शुद्ध अशा बाजारी कळीच्या चुन्यात ८८ ते ९४ टक्के मोकळा चुना उपलब्ध असतो व त्यातील ऑक्साइडांचे (कॅल्शियम व मॅग्नेशियम ऑक्साइडांचे) एकूण प्रमाण ९२ ते ९८ टक्के असू शकते.

गुणधर्म : बाजारी कळीचा चुना आणि सजलीकृत चुना हे पांढरे, काहीसे राखी किंवा पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्यात लोहाचे ऑक्साइड अल्प प्रमाणात (मलद्रव्य) असल्यास त्यांना तांबूस छटा आलेली असते. ज्या चुनखडकापासून ते बनविलेले असतात त्या चुनखडकाचा प्रकार, संरचना, शुद्धी इत्यादींनुसार तसेच भाजण्यासाठी वापरण्यात आलेले तापमान यांवर त्यांचे विशिष्ट गुरूत्व अवलंबून असते. उच्च कॅल्शियमी चुन्याचे विशिष्ट गुरुत्व ३·२-३·४, डोलोमाइटी कळीच्या चुन्याचे ३·२-३·४, उच्च कॅल्शियमी सजलीकृत चुन्याचे २·३-२·४, डोलोमाइटी सजलीकृत चुन्याचे २·७-२·९ व दाबाखाली तयार केलेल्या चुन्याचे २·४-२·६ इतके असते.

सामान्यतः चुना अस्फटिकी आहे असे समजण्यात येते, परंतु क्ष-किरणांच्या साहाय्याने केलेल्या पाहणीत कळीचा चुना व सजलीकृत चुना हे दोन्ही गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिक असलेले) असल्याचे दिसून आले आहे. कळीच्या चुन्याची कठिनता मोस मापक्रमानुसार २ ते ४ तर सजलीकृत चुन्याची २ ते ३ इतकी असते. चुना तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चुनखडकाच्या संरचनेवर चुन्याची सच्छिद्रता अगदी कमी असते. चुना भाजून तयार झाल्यावर पुढे किती काळपर्यंत तो तापविला जातो त्यावर चुन्याचा विरण्याचा वेग, त्याची आकार्यता (इष्ट तो आकार देता येण्याची क्षमता), घनता आणि रासायनिक क्रियाशीलता हे गुणधर्म अवलंबून असतात.

कळीचा चुना व सजलीकृत चुना हे सामान्य दाब व तापमानास बरेच स्थिर असतात. कळीचा चुना कुठल्याही तापमानास स्थिर असतो, मात्र तो बऱ्याच प्रमाणात बाष्प आकर्षित करून घेतो. हवेतील बाष्पदेखील शोषून तो विरतो व त्याचे हायड्रेट (सजलीकृत चुना) तयार होते. अगदी क्रियाशील असा उच्च कॅल्शियमी चुना हा तीव्र बाष्पशोषक असतो. कॅल्शियम हायड्रेट (सजलीकृत चुना) हे बहुधा कळीच्या चुन्यापेक्षा अधिक स्थिर असते. त्यात पाणी मिसळल्यास रासायनिक बदल होत नाही, मात्र कार्बन डाय-ऑकासाइडाचे हायड्रेटात तीव्र आकर्षण व त्यामुळे त्याचे कार्बनीभवन होते. विरण्याच्या दृष्टीने डोलोमाइटी चुना उच्च कॅल्शियमी चुन्यापेक्षा कमी क्रियाशील असतो, तर पूर्ण भाजलेला डोलोमाइटी चुना बाष्पाने संतृप्त असलेल्या (बाष्पाचे कमाल प्रमाण असलेल्या) हवेत देखील अगदी जसाचा तसा स्थिर राहतो.


पूर्ण जळलेल्या चुन्याखेरीज चुन्याचे इतर सर्व प्रकार खुद्द चुनखडकापेक्षा रासायनिक दृष्ट्या अम्लाशी क्रियाशील असतात. पैकी उच्च कॅल्शियमी चुना सर्वांत जास्त क्रियाशील असतो. पाण्यामध्ये चुन्याचे आयनीभवन (विद्युत्‌ भारित अणू, रेणू वा अणुगट म्हणजे आयन तयार होणे) होते व Ca2+, Mg2+ व OH हे आयन वेगळे होऊन प्रबल असे क्षार किंवा क्षारक (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ) तयार होतात. कॅल्शियम हायड्रॉक्साइड व मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड हे दोन्ही द्वि-अम्ल क्षारक [→ अम्ले व क्षारक] असून हायड्रोक्लोरिक किंवा नायट्रिक यासारख्या तीव्र एकक्षारकीय अम्लांचे ⇨उदासिनीकरण  करण्यासाठी त्यांचा एक एकच रेणू लागतो हे पुढील समीकरणांवरून दिसून येते. सल्फ्यूरिक अम्लासारख्या द्विक्षारकीय अम्लांच्या उदासिनीकरणासाठी दोन्हींचे रेणू सारख्याच प्रमाणात लागतात.

Ca(OH)2 + 2HCl → CaCl2 + 2H2O

Mg(OH)2 + 2HNO3 → Mg(NO3)2 + 2H2O

Ca(OH)2 + H2SO4 → CaSO4 + 2H2O

कॅल्शियम ऑक्साइड आणि मॅग्नेशियम ऑक्साइड हे प्रबल क्षारक असल्यामुळे उदासिनीकरणाच्या कामासाठी ते (वजनाच्या दृष्टीने) कमी प्रमाणात असले तरी भागते.

जास्तीत जास्त विद्राव्यता असताना चुन्याच्या विद्रावाचे pH मूल्य ० से. ला १२·५ ते १३ [→ पीएच मूल्य] इतके असते. अगदी थोड्या प्रमाणात चुना विद्रावात असला, तरी pH मूल्य ११ इतके सहज मिळू शकते. चुनखडकाचे pH कमी असते. कॅल्शियम कार्बोनेटाचे ८- ९ व डोलोमाइटाचे ८·५ ते ९·२ असते.

चुन्याचे दाहकीकरण : सजल चुन्याची मुख्यत्वेकरून उच्च कॅल्शियमी चुन्याची सोडियम व लिथियम यांसारख्या मूलद्रव्यांच्या बायकार्बोनेटांबरोबर रासायनिक विक्रिया होऊन त्यांचे अन्योन्य विघटन होते व इतर हायड्रॉक्साइडे व कार्बोनेटे तयार होतात.

Na2CO3 + Ca(OH)2 → 2 NaOH + CaCO3

या विक्रियेत अवक्षेपित झालेले कॅल्शियम कार्बोनेट गाळून बाजूला काढता येते. सुकविलेला सजलीकृत चुना क्लोरिन, फ्ल्युओरिन यांसारख्या हॅलोजन वायूंचे अधिशोषण (पृष्ठभागावर होणारे शोषण) करून होयपोक्लोराइटे आणि फ्ल्युओराइडे तयार करण्यासाठी उपयोगी पडतो. चुन्याची हायड्रोजन पेरॉक्साइडाबरोबर विक्रिया होऊन काहीसे अस्थिर असे कॅल्शियम पेरॉक्साइड तयार होते. अंगार तयार होण्याच्या तापमानास चुना आणि लोह यांच्या विक्रियेमुळे डाय कॅल्शियम फेराइट तयार होते.

रासायनिक चुन्यात गंधक आणि फॉस्फरस यांची संयुगे नसावीत. धातुकर्मामध्ये वापरल्या जाणाऱ्या चुन्यात गंधक ०·०५ टक्क्यापेक्षा कमी व फॉस्फरस ०·०२ टक्क्यापेक्षा कमी असावे लागते. रासायनिक दर्जाच्या उच्च कॅल्शियमी चुन्याचे रासायनिक संघटन (टक्केवारी) पुढीलप्रमाणे असते : कॅल्शियम ऑक्साइड ९३ ते ९८, मॅग्नेशियम ऑक्साइड ०·५ – १·०, सिलिकॉन ०·२ ते २, लोहाचे ऑक्साइड ०·०५ ते ०·५ व फॉस्फरस ऑक्साइड ०·०१ ते ०·०६. चुन्यामध्ये असणाऱ्या मॅग्नेशिया, सिलिका, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट यांच्यामुळे चुन्याच्या पाण्यातील विद्राव्यतेवर परिणाम होत नाही, मात्र विद्रावण होण्याच्या गतीमध्ये फरक पडतो. चुनखडी भाजण्याच्या उच्च तापमानास चुन्यात तयार झालेली कॅल्शियमाची ॲल्युमिनोसिलिकेटे रासायनिक दृष्ट्या जवळजवळ निष्क्रिय असतात.

उपयोग : बांधकामासाठी चुना अगदी प्राचीन काळापासून वापरात आहे व या कामासाठी तो जगात सर्वत्र वापरला जातो. निरनिराळ्या बांधकामांमध्ये लागणारा संयोजक (मॉर्टर) तयार करण्यासाठी निव्वळ चुना किंवा चुना आणि पोर्टलँड सिमेंट किंवा वाळूबरोबर इतर मिश्रणात चुना वापरतात. सुका सजलीकृत चुना जसाच्या तसा कधीकधी संयोजक बनविण्याच्या यंत्रात वापरतात किंवा विरलेला चुना पाणी मिसळून वापरतात. चुन्यामुळे संयोजकाला आकार्यता येते, तसेच हवेमध्ये चुन्याचे कार्बनीभवन होत असल्यामुळे संयोजकामध्ये अधिक बल निर्माण होते. बांधकामाच्या आतल्या व बाहेरच्या बाजूला गिलावा करण्यासाठी सिमेंट व सूक्ष्मकणी वाळू यांमध्ये चुना मिसळून वापरतात. आतल्या बाजूला गिलावा करण्यासाठी सामान्यतः चुना व जिप्सम यांचे मिश्रण वापरतात. अगदी वरच्या बाजूचा म्हणजे दर्शनी गिलावा करण्यासाठी वाळूरहित फक्त चुना आणि जिप्सम यांचे मिश्रण वापरतात. स्वच्छ, एकसारख्या आकारमानाची वाळू, ६% ते १२% उच्च कॅल्शियमी सजलीकृत चुना किंवा दळलेला कळीचा चुना एकत्र मिसळून त्याच्या विटा व ठोकळे तयार करतात. कधीकधी या मिश्रणात सूक्ष्मकणी सिलिका मिसळतात. प्रथम या मिश्रणाचे साचे वापरून ठोकळे किंवा विटा तयार करतात, मग ते ऑटोक्लेव्ह नावाच्या दाबपात्रात दाब व वाफ वापरून ४ ते ८ तास भाजून काढतात. या प्रक्रियेत मजबूत असे कॅल्शियम सिलिकेट तयार होते. अशा रीतीने रशियामध्ये काँक्रीटाचे पूर्वनिर्मित ठोकळे किंवा ‘सिमेंटरहित काँक्रीट’ तयार करतात. ‘सच्छिद्र काँक्रीट’ किंवा ‘वातित काँक्रीट’ या नावांनी ओळखले जाणारे हलक्या वजनाचे कॅल्शियम सिलिकेटी काँक्रीट स्कँडीनेव्हियात वापरण्यात येते. कळीचा चुना, सूक्ष्मकणी वाळू व सिलिका-ॲल्युमिनियमाचे चूर्ण मिसळलेल्या पाण्यात एकत्र मिसळतात. चुन्याची ॲल्युमिनियमाबरोबर विक्रिया होऊन वायुयुक्त मिश्रण तयार होते. या मिश्रणाचे साच्यांमध्ये ठोकळे तयार करून ते ऑटोक्लेव्हमध्ये भाजतात. यापासून मजबूत, सच्छिद्र व जाळीदार संरचना असलेले ठोकळे व विटा तयार होतात. या पदार्थांमध्ये विद्युत व उष्णता निरोधी तसेच ध्वनिकीय गुणधर्म असतात. मायक्रोपोलाइटासारख्या अगदी हलक्या वजनाच्या विद्युत व उष्णता निरोधी पदार्थात चुना हा एक घटक असतो. हे पदार्थ चुना, पेशींपासून तयार झालेली डायाटमी (डायाटम नावाच्या एकपेशीय शैवलांच्या पेशींपासून तयार झालेली आणि सिलिकायुक्त) मृत्तिका किंवा चुना, सिलिका व ॲस्बेस्टस यांपासून तयार करतात.

मृदेचे स्थैर्य वाढविण्यासाठी व रस्त्यांचे तळ मजबूत करण्यासाठी चुना वापरण्यात येतो. मृदेत व वाळूत असणाऱ्या सिलिकेची चुन्याबरोबर विक्रिया होऊन जटिल अशी कॅल्शियम सिलिकेटे तयार होतात व त्यामुळे मृदेला कठिनता येऊन ती स्थिर होते. चुना वापरून स्थैर्य आणलेल्या सर्व रस्त्यांवर डांबरी किंवा सिमेंट काँक्रिटाचा थर वापरणे आवश्यक असते . रस्त्याचे धलपे उडू नयेत यासाठी भर म्हणून व स्थैर्य आणण्यासाठी काही डांबरी काँक्रिटामध्ये १% ते २% या प्रमाणात सबलीकृत चुना मिसळतात.

शेतमातीतील अनावश्यक अम्लेतेचे उदासिनीकरण करण्यासाठी तसेच तिच्यात कॅल्शियम व मॅग्नेशियम यांची भर घालण्यासाठी चुना व चुनखडीचे चूर्ण वापरतात. काही ठिकाणी खतांमध्ये भरीचा पदार्थ म्हणून चुनखडीचे चूर्ण किंवा चुना मिसळतात. यामुळे शेतमातीचे उदासिनीकरण होते तसेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांची भर आपोआपच घातली जाते.

चुना व चुनखडी यांचा धातुकर्मातील सर्वात अधिक उपयोग लोह आणि पोलाद यांच्या निर्मितीत होतो. क्षारकीय ऑक्सीजन परिवर्तक भट्टीत तसेच टॉमस किंवा बेसेमर परिवर्तकात कळीचा चुना वापरण्यात येतो. बॉक्साइटाचे परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून ॲल्युमिना मिळविण्यासाठी चुना व चुनखडी वापरतात. ॲल्युमिनापासून ॲल्युमिनीयम धातू मिळवितात. चुना व चुनखडी यांची बॉक्साइटातील सिलिकेशी संयुगे तयार होतात व ती बाजूला काढण्यात येतात. समुद्रजल किंवा लवणयुक्त जल यांतून पेरिक्लेज किंवा रासायनिक दृष्ट्या क्रियाशील मॅग्नेशिया तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डोव्ह प्रक्रियेत किंवा फेरोसिलिकॉन प्रक्रियेत उच्च कॅल्शियमी किंवा डोलोमाइटी चुना वापरतात. फेरोसिलिकॉनाच्या प्रक्रियेत कॅल्शियम शुद्ध धातूच्या स्वरूपात उप-उत्पादन म्हणून मिळते. काही अलोही धातुकांवर (कच्च्या स्वरूपातील धातूंवर) धातू गाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या पूर्वप्रक्रिया करताना चुना वापरतात. तांब्याच्या धातुकाच्या प्लवन (चूर्णरूप धातुकातील धातू योग्य त्या द्रवात तरंगविण्याच्या) क्रियेमध्ये योग्य इतके pH मूल्य टिकविण्यासाठी चुना वापरतात. सोने व चांदी यांच्या धातुकांच्या प्लवन क्रियेतील सायनाइडे परत मिळविण्यासाठी, तसेच या विक्रियेतील pH मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चुना मोठ्या प्रमाणात वापरतात. युरेनियमाच्या धातुकापासून युरेनियम मिळविण्याच्या प्रक्रियेत उदासिनीकरण करण्यासाठी चुना वापरतात. अलोही धातू गाळण्यासाठी व त्यांच्या परिष्करणासाठी चुना व चुनखडी अभिवाह (वितळणारी व सहज काढून घेता येणारी मळी तयार होण्यासाठी मिसळण्यात येणारा पदार्थ) म्हणून वापरतात. तांबे, शिसे, जस्त, मँगॅनीज, अँटिमनी व अल्पकार्बनी क्रोमियम यांचे अंगार बनविण्यासाठी चुना वापरतात. धातू गाळण्याच्या प्रक्रियेत तयार झालेल्या हायड्रोजन सल्फाइड व सल्फर डाय-ऑक्साइड यांचे चुन्याच्या निवळीत उदासिनीकरण करतात. निकेल धातू गाळल्यानंतर तिचे उकळत्या निवळीत अवक्षेपण करून परिष्करण करतात.

अमोनिया-सोडा या सॉल्व्हे प्रक्रियेने संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार करण्यात येणारा) सोडा ॲश (सोडियम कार्बोनेट) तयार करण्यासाठी कळीचा चुना वापरतात. एक टन सोडा ॲश तयार करण्यासाठी सु. ७ क्विंटल उच्च कॅल्शियमी चुना लागतो. अमोनिया-सोडा प्रक्रियेने दाहक सोडा (सोडियम हायड्रॉक्साइड) बनविण्यासाठी चुना लागतो. सोडियम कार्बोनेटाचे हायड्रॉक्साइडाच्या स्वरूपात दाहकीकरण करण्यासाठी चुना लागतो.

Ca(OH)2 + Na2CO3 → 2NaOH + CaCO3

लिथियम व बेरियम यांच्या कार्बोनेटांपासून हायड्रॉक्साइडे मिळविण्यासाठीही चुना वापरून दाहकीकरण करतात. कळीचा चुना आणि कोक विद्युत्‌ प्रज्योत भट्टीत एकत्र वितळवून कॅल्शियम कार्बाइड तयार करतात. कॅल्शियम कार्बाइड तयार करण्यासाठी सापेक्षतः शुद्ध चुना लागतो. यासाठी कॅल्शियम ऑक्साइड (कमीत कमी) ९२·०० %, मॅग्नेशियम ऑक्साइड (जास्तीत जास्त) १·७५%, सिलिकॉन (जास्तीत जास्त) २·००%, लोहाची व ॲल्युमिनियमाची ऑक्साइडे (जास्तीत जास्त) १ टक्का, गंधक (जास्तीत जास्त) ०·२ टक्का असलेला चुना वापरतात. भाजला असता या चुन्याची घट ४ टक्क्यांहून अधिक नसावी. कॅल्शियम कार्बाइड ॲसिटिलीन वायू तयार करण्यासाठी वापरतात. त्याचे कॅल्शियम सायनाइड या खत द्रव्यामध्येही रूपांतर करतात. सुक्या सजलीकृत चुन्यात क्लोरीन मिसळला असता चुन्याचे क्लोराइड किंवा हायटेस्ट-होयपोक्लोराइट तयार होते. हे विरंजक (रंग घालविण्यासाठी वापरण्यात येणारे) पदार्थ आहेत, विरलेल्या चुन्यामध्ये ३०-४० से. तापमानास क्लोरीन मिसळून विरंजक चूर्ण तयार करतात. यासाठी लोह, मॅग्नेशिया, मँगेनीज ऑक्साइड, सिलिकायुक्त मृत्तिका इ. मलद्रव्ये नसलेला अगदी शुद्ध चुना लागतो. चुन्याच्या निवळीत क्लोरीन शोषून घेतला जातो. या प्रक्रियेने कागदाच्या लगद्याचे विरंजन करण्यासाठी लागणारे कॅल्शियम हायपोक्लोराइट तयार होते. आर्सेनिक अम्लाची चुन्याबरोबर विक्रिया होऊन कॅल्शियम आर्सेनेट हे कीटकनाशक तयार होते. सजलीकृत चुना गंधकाबरोबर पॉलिसल्फाइडे तयार करतो. ती कवकनाशक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा नाश करणारी) असतात. मोरचुदामध्ये (कॉपर सल्फेटात) चुना विरलक किंवा भरीचा पदार्थ म्हणून वापरतात. हे मिश्रणही कवकनाशक म्हणून वापरतात. चुन्याचे (किंवा चुनखडीचे) उदासिनीकरण करून कॅल्शियमाची व मॅग्नेशियमाची नायट्रेटे, सायनाइडे, फेरोसाइनाइडे, सायट्रेटे, फॉस्फेटे, फ्ल्युओराइडे, ब्रोमाइडे इ. लवणे तयार करतात. क्रोमियमाच्या रसायनांच्या उदा., सोडियम बायक्रोमेटाच्या, शुद्धीकरणासाठी चुना वापरतात. काही देशांत खाण्याच्या मिठाचे शुद्धीकरण करण्यासाठी चुना वापरतात. एथिलीन रसायने बनविण्याच्या क्लोरोहायड्रीन प्रक्रियेत चुना व क्लोरीन वापरतात. काही रंजकद्रव्ये बनविताना मधल्या अवस्थेतील पदार्थ बनविताना मधल्या अवस्थेतील पदार्थ बनविण्यासाठी चुना उदासिनीकरण व जलीय विच्छेदन करण्यासाठी (पाण्याच्या विक्रियेने घटक द्रव्ये अलग करण्यासाठी) वापरतात. सायट्रिक अम्ल, ॲझो विरंजक द्रव्ये, काही रंग आणि औषधे यांतही चुना वापरतात.

निव्वळ चुना पाण्याचे बाष्प शोषून घेण्यासाठी वापरता येतो. तसेच क्लोरिनीकृत हायड्रोकार्बने, आल्डिहाइडे, आणि कीटोने यांत असणारे अवशिष्ट बाष्प शोषून त्याचे निर्जलीकरण करण्यासाठी कळीचा चुना वापरतात. निव्वळ चुना स्वतंत्रपणे किंवा सोडियम हायड्रॉक्साइडाबरोबर असल्यास कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतो. विषारी आणि अपायकारक वायू शोषून घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संरक्षक मुखवट्यात चुन्याचा उपयोग करतात.

पिण्याचे व औद्योगिक कारखान्यांना लागणारे पाणी शुद्ध करण्यासाठी व त्यावर संस्करण करण्यासाठी काही ठिकाणी कित्येक टन चुना लागतो. कठीण पाणी (ज्यात साबणाचा फेस होत नाही असे पाणी) मृदु करण्यासाठी चुना वापरतात. पाण्यात २४ ते ४८ तास चुना टाकून ठेवल्यास त्यातील सूक्ष्म जंतू मारले जातात आणि पाण्यातील अस्थायी कठीणपणा घालविला जातो. फिनिलयुक्त पाणी क्लोरीन वापरून स्वच्छ करता येत नाही तेथे चुना वापरून संस्करण करावे लागते. गढूळ पाण्यातील गाळ एकत्र करण्यासाठी आणि पाण्याचे pH मूल्य नियंत्रित ठेवण्यासाठी चुना, तुरटी व लोहाची काही लवणे एकत्र करून वापरतात. अम्लीय पाण्याचे उदासिनीकरण करण्यासाठी आणि पाण्यातील कार्बन डाय-ऑक्साइड काढण्यासाठी चुना वापरतात. पाण्यातील सिलिका बाजूला काढण्यासाठी डोलोमाइटी चुना वापरतात. तसेच वाहितमलातील लोह, मँगॅनीज व कार्बनी टॅनिने अवपेक्षित करण्यासाठी चुना वापरतात. वाहितमलाच्या संस्करण प्रक्रियेत चुन्याचा उपयोग pH मूल्य आवश्यक तितके टिकविण्यासाठी होतो. औद्योगिक अपशिष्टांमुळे (निरुपयोगी पदार्थांमुळे) नदी-नाले यांच्या प्रवाहातील पाणी व हवा यांचे प्रदूषण होऊ नये म्हणून सु. पन्नास निरनिराळ्या अपशिष्टांचे संस्करण करण्यासाठी चुना वापरतात. या प्रकारातील अगदी सामान्य उपयोग म्हणजे पोलाद कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सल्फ्यूरिक अम्लयुक्त पाण्याचे संस्करण हा होय. या पाण्यात लोहाची संयुगे असतात ती उच्च कॅल्शियमी चुन्याने अवक्षेपित होतात. धातूंवर विलेपन करण्याच्या व त्यांना चकाकी आणण्याच्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या सायनाइड व क्रोमयुक्त अपशिष्टातून हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी चुना वापरतात. फॉस्फेटी खतांच्या व पोलादाच्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या विषारी द्रवांचे व वायूंचे उदासिनीकरण चुन्याने करतात. औषधे आणि स्फोटक द्रव्ये यांच्या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या जटिल अशा अम्लीय अपशिष्टांचे उदासिनीकरण करण्यासाठीही चुना उपयोगी पडतो.

कागदाचा लगदा तयार करताना लागणारे कॅल्शियम बायसल्फाइट तयार करण्यासाठी चुना वापरतात. चुन्याची सफेदी (व्हायटिंग चूर्ण) कागदात भरीचा पदार्थ म्हणून व पृष्ठावर लेप देण्यासाठी वापरतात. कागदाच्या लगद्याचे विरंजन करण्यासाठी लागणारे कॅल्शियम हायपोक्लोराइट बनविण्याकरिता कळीचा चुना वापरतात. कागद कारखान्यात वापरण्यात येणारा कळीचा चुना त्या कारखान्यातच दाहकीकरणाच्या प्रक्रियेत अवक्षेपणाने तयार झालेले कॅल्शियम कार्बोनेट भाजून तयार करतात. काच कारखान्यात कॅल्शियम ऑक्साइड आणि मॅग्नेशियम ऑक्साइड मिळविण्यासाठी कच्चा माल म्हणून सूक्ष्मकणी चुनखडी किंवा कळीचा चुना वापरतात.

वीट व ऊस यांच्या साखरेचे परिष्करण करण्यासाठी चुना वापरतात. चुन्यामुळे साखरेतील मळ बाजूला होऊन साखर स्वच्छ होते. गूळ तयार करताना रसातील मळी काढण्यासाठी चुना वापरतात. सफरचंदे टिकविण्यासाठी चुन्याचे चूर्ण वापरतात. चुन्याची धूळ कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेते. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग चूर्णामध्ये मोनो-कॅल्शियम फॉस्फेट वापरतात. ते शुद्ध उच्च कॅल्शियमी चुना व फॉस्फोरिक अम्ल यांच्या विक्रियेने तयार करतात. जिलेटीन तयार करण्यासाठी चुना लागतो. खनिज तेलाच्या परिष्करणात काही ठिकाणी चुना वापरतात. कॅल्शियमाची लवणे बनविण्यासाठी चुना वापरतात. कातडी कमावताना त्यांच्यावरील केस नाहीसे करण्यासाठी व त्यांचा खडबडीतपणा नाहीसा करण्यासाठी चुना वापरतात. रंगद्रव्ये आणि ओलिओरेझिनी व्हर्निशात चुना मिसळतात. तप्त कोळशावरून हवा व पाण्याची वाफ यांचे मिश्रण नेऊन तयार करण्यात येणाऱ्या प्रोड्युसर वायूचे शुद्धीकरण करण्यासाठी काही ठिकाणी चुना लागतो. इमारतीच्या भिंतीना शुभ्र पांढऱ्या रंगाची रंगसफेदी करण्यासाठी चुना वापरतात. खाण्याच्या पानामध्ये व तंबाखूबरोबर चांगल्या प्रतीचा कळीचा चुना अल्प प्रमाणात वापरतात. चुन्याच्या पान-तंबाखूबरोबर खाण्यासाठी अशा प्रकारचा उपयोग विशेषकरून आग्नेय आशियाई देशांत करतात.

इतिहास : चुनखडीपासून मिळणारा चुना हा मानवाला प्राचीन काळापासून माहीत असलेला रासायनिक पदार्थ असून चुनखडी भाजून तीपासून चुना तयार करणे, हा अगदी जुन्यापैकी रासायनिक उद्योग आहे. पुराणवस्तू संशोधकांनी अश्मयुगातील आद्य अशा चुन्याच्या भट्ट्या शोधून काढल्या आहेत. ईजिप्तमधील काही पिरॅमिडांमध्ये ४,५०० हून अधिक वर्षांपूर्वीचा चुन्याचा गिलावा आजही सुस्थित आहे. हे पिरॅमिडदेखील न्युम्युलिटिक (सु. ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात तयार झालेल्या जाड थरातील) चुनखडक व संयोजक चुना वापरून बांधलेले आहेत. चुन्याचा गिलावा व संयोजक चुना यांचा ग्रीक, रोमन, इट्रुस्कन, अरब व मूर लोकांनी वापर केला होता. बायबलच्या जुन्या व नव्या करारांमध्ये चुन्याचा उल्लेख आहे. ऑगस्टस यांच्या काळातील व्हिट्रूव्हिअस या वास्तुविशारदांनी चुन्याचे सविस्तर असे संघटन प्रथमच नमूद केले. रोमन लोकांनी चुनखडकांचे तुकडे व जलीय चुना वापरून अनेक इमारती बांधल्या होत्या. रस्त्यांचा पाया व त्यावरील थर बांधण्यासाठीही रोमन लोकांनी चुना व चुनखडक यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला होता. प्लिनी (इ.स. २३ – ७९) यांनी चुना तयार करण्याची पद्धत व त्याचे उपयोग यांचा उल्लेख केलेला आढळतो. पंधराव्या शतकानंतर इटलीमध्ये व त्यानंतर फ्रान्स, इंग्लंड व यूरोपात इतरत्र चुन्याचा व त्याच्या गिलाव्याचा शोभेकरिता वापर रूढ झाला. चुना व त्याचे गुणधर्म यांचा पद्धतशीर अभ्यास करण्याचे श्रेय जोझेफ ब्लॅक यांना देण्यात येते. त्यांनी यासंबंधी १७५६ मध्ये एक निबंध प्रसिद्ध केला होता.

भारतीय उद्योग : भारतात चुना तयार करण्याचा उद्योग प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. बांधकामासाठी लागणारा चुना कंकर व चुनखडी लहान भट्ट्यांत भाजून देशात बहुतेक ठिकाणी तयार करतात. धरणासारख्या मोठ्या कामांसाठी लागणारा चुना आसपासचा चुनखडक व कंकर यांपासून तयार करतात. उभ्या कूपकांच्या भट्ट्या वापरून व्यापारी प्रमाणावर चुनखडी भाजून चुना तयार करण्याचा उद्योग ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, प. बंगाल व राजस्थान या राज्यांत चालतो. साखर कारखाने तसेच लोह व पोलाद यांचे प्राथमिक उत्पादन करणारे आणि सोडा ॲश, विरंजक चूर्ण, दाहक सोडा व कॅल्शियम कार्बाइड तयार करणारे कारखाने हे त्यांना लागणारा चुना स्वतःच तयार करतात. कर्नाटकातील गुंडपूर, मंगलनोर, होस दुर्ग, कासरगोड व उडिपी या तालुक्यांत चुना तयार करण्यासाठी शिंपल्यांचा उपयोग केला जातो. रामेश्वरम्, पुलिकत सरोवर येथील शिंपले व मानारच्या आखातातील प्रवाळखडक यांचा चुना तयार करण्यासाठी उपयोग करतात. भारतात १९७३ साली २·३८ लक्ष टन (किंमत २३·५ कोटी रु.) चुनखडी, ८४ हजार टन (किंमत १७·७६ लक्ष रु.) चुन्यासाठी उपयुक्त असणारे शिंपले आणि ३३१ हजार टन (किंमत २१·५७ लक्ष रु) कंकर इतके उत्पादन झाले.

पहा : काँक्रीट; चुनखडक; संयोजक; सिमेंट.

संदर्भ : 1. Boyton, R. S. Chemistry and Technology of Lime and Limestone, New York, 1966.

2. National Lime Association, Chemical Lime Facts, Washington, 1965.

अगस्ते, र. पां.; मिठारी, भू. चिं.