सिगारेट व सिगार : कागदाच्या गुंडाळीत तंबाखूचा चुरा भरुन धूम्रपानासाठी तयार केलेली वस्तू म्हणजे ‘सिगारेट’ होय. तंबाखूची पाने एकावर एक घट्ट गुंडाळून धूम्रपानासाठी तयार केलेल्या सामान्यतः दंडगोलाकार गुंडाळीला ‘सिगार’ म्हणतात. आधुनिक सिगारेटमधील तंबाखू बहुधा सिगारमधील तंबाखूपेक्षा सौम्य म्हणजे कमी कडक असते.

सिगारेट : दक्षिण अमेरिकेतील ॲझटेक लोक तंबाखूचा चुरा भरलेले पोकळ कांड किंवा तंबाखू भरलेली वेताची नळी धूम्रपानासाठी वापरीत असत. तेथे गेलेल्या स्पॅनिश समन्वेषकांनी ही धूम्रनळी १५१८ मध्ये प्रथम पाहिली. मेक्सिको, मध्य अमेरिका व दक्षिण अमेरिकेतील काही प्रदेश या ठिकाणी राहत असलेले इतर स्थानिक लोक तंबाखूचा चुरा मक्याच्या कणसाच्या सालपटात किंवा तंबाखूच्या पानासारख्या इतर वनस्पतिज पटलात गुंडाळून ती गुंडाळी धूम्रपानासाठी वापरीत असत. स्पेनमधील समन्वेषक पथकांनी सिगारेटचे हे आद्य नमुने आपल्याबरोबर न आणता सिगार या श्रीमंतांच्या ऐषआरामाच्या धूम्रपानाच्या वस्तू स्पेनमध्ये आणल्या होत्या.

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सेव्हिल (स्पेन) येथील भिकारी सिगारची टाकून दिलेली थोटके गोळा करीत आणि त्यांचा चुरा करुन तो रद्दी कागदात (स्पॅनिश शब्द पॅपॅलेट) गुंडाळून तयार केलेली गुंडाळी धूम्रपानासाठी वापरीत. अशा प्रकारे स्पेनमध्ये आद्य सिगारेट अस्तित्वात आली. गरिबांच्या या धूम्रकाड्यांना स्पॅनिश भाषेत सिगारिलो (सिगारचे लघुत्वदर्शक रुप) म्हणत. अठराव्या शतकाच्या अखेरीस सिगारेटला आदराचे स्थान प्राप्त झाले व तिचा स्पेनमध्ये प्रसार झाला. पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी सिगारेटी लेव्हँट (पूर्व भूमध्य समुद्र व इजीअन समुद्र यांच्या सीमा असलेला विशेषतः सिरिया, लेबानन व इझ्राएल यांचा भूभाग), रशिया व भारत (१६७०) येथे नेल्या. नेपोलियनबरोबरच्या युद्घांमध्ये इंग्रज व फ्रेंच सैनिकांना तिचा परिचय झाला आणि फ्रेंचांनी तिला ‘सिगारेट’ हे नाव दिले. क्रिमियाच्या युद्घात सैनिकांना तुर्किश सिगारेटी पहायला मिळाल्या. याच सुमारास अमेरिकेतही सिगारेट लोकप्रिय होत होती. थोडी तुर्किश तंबाखू असलेल्या तंबाखूच्या मिश्रणाच्या सिगारेटी अमेरिकेत पसंत केल्या जात असत. परंतु ब्रिटनमध्ये व्हर्जिनिया तंबाखू असलेल्या सिगारेटी लोकप्रिय होत्या.

सुरुवातीला सिगारेट ओढणारे लोक तसेच कारखान्यांमध्येही सिगारेटी हातांनीच वळून तयार करीत असत. कारखान्यात सिगारेट वळणे, चिकटविणे व आवेष्टित करणे या क्रिया टेबलावर करीत. १८८० मध्ये जेम्स ए. बॉनसॅक या अमेरिकी अभियंत्यांनी सिगारेट तयार करणाऱ्या यंत्राचे एकस्व (पेटंट) अमेरिकेत मिळविले. या यंत्रात कागदाच्या अखंड पट्टीवर तंबाखू पडत असे आणि नंतर ही पट्टी आपोआप गुंडाळली, चिकटविली व बंद केली जात असे. नंतर फिरत्या कर्तक सुऱ्यांनी इष्ट लांबीची सिगारेट कापली जात असे. दहा किंवा वीस सिगारेटी पातळ पुठ्ठ्याच्या किंवा जाड कागदाच्या पाकिटात आवेष्टित करुन विक्रीसाठी पाठवीत. १८८३ मध्ये हे यंत्र इंग्लंडमध्ये आयात करण्यात आले. यानंतर थोड्याच वर्षांत यूरोपमधील अनेक देशांमध्ये सिगारेटचा उद्योग विकसित झाला. कारण यंत्राने मिनिटाला हजारो सिगारेटी तयार होऊ शकतात. इंग्लंडमधील मॉलिन्स या यंत्रोत्पादकांनी सिगारेट निर्मितीमधील सर्व क्रिया करणारी ‘मॉलिन्स-२४’ नावाची पूर्णपणे स्वयंचलित यंत्रमालिका तयार केली. या यांत्रिकीकरणामुळे सिगारेटींचे उत्पादन वाढले. १९३१ मध्ये सिगारेटच्या पाकिटांवर सेलोफेनचे पारदर्शक आवेष्टन घातले जाऊ लागले. यामुळे पाकिटांचे रुप आकर्षक झाले आणि सिगारेटींचा ताजेपणा टिकून राहणे शक्य झाले. परिणामी त्या अधिक काळ साठविता येऊ लागल्या.

सिगारेटमध्ये तंबाखू वा तंबाखूंचे मिश्रण असते. त्यासाठी प्रथम तंबाखूची पाने नरम केली जातात. नंतर त्यांची प्रतवारी करतात व मध्यशीर काढून टाकतात. तंबाखू स्वादासाठी मुरवितात. तिच्यातील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तिच्यावर रसायने फवारतात. विविध प्रकारच्या तंबाखू विविध प्रमाणांत मिसळून इष्ट मिश्रण तयार करतात. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तंबाखू पिकविण्याच्या व तिच्यावर प्रक्रिया करण्याच्या सुधारित पद्घती पुढे आल्या. त्यांच्यामुळे तंबाखूतील अम्लाचे प्रमाण कमी झाले. यामुळे अशी तंबाखू असलेल्या सिगारेटी ओढणे सुकर झाले. परिणामी या काळात सिगारेटचा व्यापक प्रमाणावर प्रसार झाला. स्त्रियांनी धूम्रपान करु नये असा पूर्वग्रह वा संकेत होता. तो पहिल्या महायुद्घाच्या काळात दूर सारला गेला. परिणामी १९२१– ३० या दशकात यूरोपात व अमेरिकेत सिगारेट ओढणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत मोठी वाढ झाली. स्त्रियांसाठी अधिक बारीक, अधिक लांब व कमी कडक तंबाखूच्या सिगारेटी बनविण्यात येऊ लागल्या.

तंबाखू , स्वाद व लांबी यांच्यानुसार सिगारेटींचे प्रकार केले जातात. १९१३ पूर्वी पुढील प्रमुख प्रकार प्रचलित होते : फर्स्ट क्लास तुर्किश, स्ट्रेट तुर्किश, स्यूडो तुर्किश, स्ट्रेट व्हर्जिनिया व मिसेलिनियस. रशियात पॅपिरोसा प्रकारची सिगारेट लोकप्रिय होती. या सिगारेटमध्ये सु. एक-तृतीयांश भागातच तंबाखू भरलेली असून उरलेला भाग रिकामा असे. तंबाखूच्या मिश्रणात शर्करा, जेष्ठमध, मेंथॉल इ. स्वादकारक पदार्थ मिसळून सिगारेटींचे स्वादानुसार प्रकार केले जातात. लांबीनुसार केलेल्या प्रकारांपैकी ७० मिमी. लांबीचा सिगारेटचा रेग्युलर प्रकार सु. १९३९ पर्यंत टिकून होता. त्याच सुमारास ८५ मिमी. लांबीचा किंग-साइज प्रकार पुढे आला तर १९६६ मध्ये १०० मिमी. लांबीचा प्रकार प्रचारात आला. तुर्किश व ईजिप्शियन सिगारेटींचा आडवा छेद लंबगोलाकार असून इतरांचा वर्तुळाकार असतो.

अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, ब्राझील व ब्रिटन हे सिगारेटींचे उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत. भारतात सिगारेटनिर्मितीचा पहिला कारखाना मोंघीर (बिहार) येथे १९०३ मध्ये सुरु झाला. तो इंपिरिअल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने स्थापन केला. भारतात विविध उद्योगांचे सिगारेटनिर्मितीचे कारखाने असून त्यांमध्ये शंभराहून अधिक प्रकारच्या सिगारेटी तयार होतात.


 धूम्रपानामुळे तंबाखूच्या धूरामार्फत निकोटीन व टार यांसारखे घातक पदार्थ शरीरात जाऊन त्यांच्यामुळे आजार होतात. तसेच फुप्फुसांचा कर्करोग, हृदयविकार यांसारखे विकार किंवा आरोग्यविषयक धोके आणि धूम्रपान यांच्यामध्ये परस्परसंबंध असल्याचे सूचित करणारे पुरावे १९६१– ७० या दशकात झालेल्या संशोधनातून पुढे आले. यामुळे निकोटीन व टार कमी असलेल्या सिगारेटी यानंतरच्या दशकांत पुढे आल्या व त्या लोकप्रिय झाल्या. हे हानिकारक पदार्थ शरीरात शोषले जाऊ नयेत म्हणून किंवा त्यांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून सिगारेटसाठी गाळणीयुक्त धारक तयार करण्यात आले. नंतरच्या काळात सिगारेटच्या ओठात धरावयाच्या टोकाकडील भागात गाळणी बसविण्याची प्रथा रुढ झाली. अर्थात अशा गाळणीमुळे हानिकारक पदार्थ बऱ्याच प्रमाणात काढून टाकले जातात. काही देशांमध्ये सिगारेट ओढण्याविरुद्घ लोकमत तयार करण्याचे प्रयत्न व उपाय झाले. तसेच लोकांना याबाबतीत जागरुक करण्याच्या कायदेशीर, सनदशीर व सामाजिक चळवळी चालविण्यात आल्या. ‘धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे’ तसेच ‘तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होतो’ असे इशारे सिगारेटच्या पाकिटावर छापणे भारतामध्ये कायद्याने बंधनकारक केले आहे. भारतात १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ व्रिकी व सेवनास कायद्याने बंदी आहे. तसेच भारतासह अनेक देशांत सिगारेटींच्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. अशा रीतीने १९८० –२००० या काळात सिगारेटच्या धूम्रपानांतील आरोग्यविषयक जोखमींविषयीची जागरुकता वाढत गेली, परंतु या सर्व उपायांचा विशेष परिणाम झालेला दिसत नाही.

सिगार : क्रिस्तोफर कोलंबस व त्याच्यानंतर क्यूबा, मेक्सिको, मध्य अमेरिका व ब्राझील येथे गेलेल्या स्पॅनिश समन्वेषकांना तेथील लोक विशिष्ट प्रकारची धूम्रनळी धूम्रपानासाठी वापरीत असल्याचे आढळले. ही धूम्रनळी म्हणजे सुकलेल्या पामच्या पानात किंवा मक्याच्या कणसाच्या सालपटात आवेष्टित केलेल्या तंबाखूच्या पिळवटलेल्या पानांचा लांब जुडगा होता. ग्वातेमाला येथे इ. स. दहाव्या शतकातील किंवा त्याच्या आधीच्या काळातील मृत्पात्री आढळल्या. या मृत्पात्रींवर दोऱ्याने बांधलेली तंबाखूंच्या पानांची गुंडाळी माया व्यक्ती ओढत असल्याचे चित्र होते. ही धूम्रनळी म्हणजे मूळ सिगार होय. सिगारो हा शब्द माया भाषेतील धूम्रपान या अर्थाच्या सिकार या शब्दावरुन आला असावा. सिगारच्या ओठात धरण्यात येणाऱ्या टोकाला शीर्ष (हेड), तर पेटविण्यात येण्याऱ्या टोकाला ज्वलनाग्र (टक) म्हणतात.

स्पॅनिश समन्वेषकांनी मेक्सिकोहून परत येताना आपल्याबरोबर सिगार आणल्या होत्या. यामुळे सोळाव्या शतकात स्पेनमध्ये सिगारचा वापर सुरु झाला. तेथे सिगार हे श्रीमंतीचे प्रतीक बनले. पुढील दोनशे वर्षांत सैनिक, खलाशी व स्थलांतरित लोक यांच्याद्वारे यूरोपात आणि इतरत्र सिगारचा प्रचार व पसार झाला. कनेक्टिकट येथे १६३३ मध्ये वसाहत स्थापन झाल्यावर बहुधा लगेचच अमेरिकेतील न्यू इंग्लंडमध्ये सिगारचा वापर सुरु झाला. १८५० मध्ये इंग्लंडमध्ये सिगार बनविण्यासाठी लाकडी साचा बनविण्यात आल्याने उत्पादन दुप्पट झाले. १८८० पर्यंत हा साचा सर्वत्र वापरला जाऊ लागला. १८९१– १९०० या दशकात तंबाखूच्या पानांची मध्यशीर काढून टाकणारी व पाने सपाट करणारी यंत्रे पुढे आली. तसेच चोषण टेबलही वापरात आले. वेष्टनाचे पान कापण्यास त्याची मदत झाली आणि सिगारनिर्मितीचा घरगुती उद्योग कारखान्यांत होऊ लागला. १९१७ मध्ये रुफुस एल्. पॅटरसन यांनी सिगारनिर्मितीचे परिपूर्ण यंत्र तयार केले. त्या यंत्रात पानाचा जुडगा करुन गुंडाळला जात असे. पाचच वर्षांत सर्व सिगार उत्पादकांनी हे यंत्र वापरायला सुरुवात केली. युनिव्हर्सल टोबॅको मशिन कंपनीने प्रथम तंबाखूच्या पानांचा जुडगा तयार करणारे व नंतर अधिक चांगल्या दर्जाचे लाटन करणारे यंत्र तयार केले. त्याद्वारे जुडग्यावर वेष्टनाचे पान चढविले जाई. त्यानंतर सिगारवर सेलोफेन गुंडाळण्याची प्रयुक्ती तयार करण्यात आली. तिच्यात तासाला सरासरी ४,२०० सिगार गुंडाळण्याची क्षमता होती. सेलोफेनच्या आवरणामुळे तंबाखूचा स्वाद व वास टिकून राहतो आणि त्यातील आर्द्रतेचे प्रमाण एकसारखे राहते. हाताने करावयाची कामे यंत्राने होऊ लागल्यामुळे तंबाखूच्या पानांचे मिश्रण एकसारखे करता येऊ लागले. तंबाखूचे ज्वलनही एकसारखे होऊ लागले. १९७० पर्यंत सिगारनिर्मिती जवळजवळ पूर्णपणे स्वयंचलित रीतीने होऊ लागली. यामुळे सिगारचे उत्पादन अगदी थोड्याच कारखान्यांत एकवटले गेले.

सिगार पूर्णपणे तंबाखूच्या पानांची बनलेली असते. तंबाखूच्या सुकलेल्या पानांच्या तुकड्यांच्या जुडग्याभोवती तंबाखूचे बंधक पान घट्टपणे गुंडाळतात. जुडग्यातील पानांना भरणा पाने म्हणतात. नंतर बंधक पानाभोवती वेष्टनाचे पान मळसूत्राकार गुंडाळतात. वेष्टनाचे पान पुष्कळदा ट्रागकांथ डिंकाने चिकटवितात. भरणा पाने बंधक पानाने एकत्र धरुन ठेवली जातात. ही तीन प्रकारची पाने तीन प्रकारच्या तंबाखूची असू शकतात. वेष्टनाचे पान मात्र उच्च दर्जाचे (महाग तंबाखूचे) असते. ते चिवट, लवचिक, रेशमासारख्या पोताचे व रंगछटा एकसारखी असलेले असते. तसेच ते चांगले ज्वलनक्षमही असते. किंमती सिगारमध्ये भरणा पानांचे तुकडे वेष्टन पानांच्याच लांबीचे असतात तर स्वस्त सिगारमध्ये ते त्यापेक्षा कमी लांबीचे असतात. किमती सिगारातील बंधक व वेष्टन पाने पुनर्रचित असतात. बहुतेक सिगार यंत्राने बनवितात. परंतु किमती सिगार हाताने वळतात. सिगारची गुंडाळी सैल होऊ नये म्हणून त्यावर बाहेरुन कागदी वळी चढवितात. सिगार चांगल्या शुष्क (सापेक्ष आर्द्रता ५३–५७टक्के) व उबदार (तापमान १८-१९से.) ठिकाणी ठेवतात. सिगारची तपासणी करुन निवड करतात आणि विशिष्ट प्रकारच्या पातळ लाकडी आकर्षक पेट्यांत भरतात.


 सिगारचा रंग गडद वा काळसर फिकट तपकिरी असतो. रंगछटांनुसार सिगारचे पुढील प्रकार होतात : फिकट-क्लॅरो (CCC) मध्यम रंगछटा-कोलोरॅडो क्लॅरो (CC) गडद-कोलोरॅडो (C) आणि अतिगडद-मडुरो (M). सिगारची रंगछटा तिच्या कडकपणाची निदर्शक नसते.

सिगारचे आकार व आकारमान यांनुसारही पुढील प्रकार केले जातात : करोना– साडे पाच इंच (१३·७५ सेंमी.) लांबीच्या या सरळ आकाराच्या सिगारचे ओठांत धरावयाचे टोक गोलसर व बोथट असते पेटिट करोना किंवा करोना चिका – ५ इंच (१२·५० सेंमी.) लांब ट्रेस पेटिट करोना – इंच (११·२५ सेंमी.) लांब हाफ करोना – पावणे चार इंच (९·३८ सेंमी.) लांब लॉन्सडेल – करोनासारखा आकार व साडे सहा इंच (१६·२५ सेंमी.) लांब आयडील्स – पाणतीराच्या आकाराचा,बारीक व साडे सहा इंच (१६·२५ सेंमी.) लांब असून पेटवावयाच्या टोकाकडे निमुळता असतो ब्यूकेट – अधिक लहान, पाणतीराच्या आकाराचा आणि लाँड्रेस – पावणे पाच इंच (११·८८ सेंमी.) लांबीची सरळ सिगार. ही नावे व्यापारी नावांवरुन आली आहेत. यांशिवाय सिगारचे पुढील प्रकारही प्रसिद्घ आहेत : पॅनाटेला सिगार बारीक, दोन्ही टोकांशी उघडी व बहुधा ५ इंच (१२·५० सेंमी.) लांब असून मुळात याचे ओठात धरावयाचे टोक पेटविण्याआधी कापून टाकीत. ब्रिटनमधील व्हिफ सिगार – साडे तीन इंच (८·७५ सेंमी.) व दोन्ही टोकांना उघडी असते. ‘चिरुट’ हा सिगारचा प्रकार बारीक, दोन्ही टोके उघडी असलेला, कधीकधी किंचित निमुळता आणि बहुधा पॅनाटेलापेक्षा अधिक घट्ट व गिड्डा असतो. तंबाखूची वळकटी या अर्थाच्या ‘शुरुट्टु’ या तमिळ शब्दावरुन ‘चिरुट’ शब्द आला आहे. तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) येथील सिगार व चिरुट प्रसिद्घ आहेत.

सेव्हिल, लंडन, टँपा (फ्लॉरिडा), न्यूयॉर्क, बॉल्टिमोर (अमेरिका), मानिला (फिलिपीन्स), ॲम्स्टरडॅम, रॉटरडॅम उत्रेक्त (नेदर्लंड्स) वगैरे सिगार उत्पादनाची प्रसिद्घ केंद्रे आहेत. क्यूबातील उत्तम तंबाखू पानांपासून बनविलेला हाव्हॅना सिगार आणि मॅनिला सिगार उत्कृष्ट मानले जातात.

पहा : तंबाखू धूम्रपान निकोटीन विडी.

भिडे, शं. गो. ठाकूर, अ. ना.