झाडू व ब्रश : या दोन्ही साधनांचे उपयोग सफाई करणे वा एखादा पदार्थ पसरविणे हेच असेल, तरी रचना व विशिष्ट उपयोग या दृष्टींनी त्यांचे अलग वर्णन करणे इष्ट ठरते.

झाडू : घरातील अथवा बाहेरील केरकचरा आणि बारीकसारीक गोष्टी गोळा करण्याकरिता, शेणखळा पसरण्याकरिता, अंगणासारखे मोठे भाग सारवण्याकरिता वगैरेंसाठी वापरावयाचे साधन. झाडू माडाच्या हिरांचे, शिंदीच्या पात्यांचे व एका विशिष्ट प्रकारच्या गवताचे मुख्यत्वे करतात. जमीन झाडावयाचा तो झाडू अशी सामान्य संज्ञा जरी सर्वत्र प्रचलित असली, तरी तो ज्या कच्च्या मालाचा केला असेल त्यावरून त्याला पदार्थानुसार निरनिराळी नावे पडली आहेत. तसेच महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत तो व त्याचे काही उपप्रकारही होऊन निरनिराळ्या नावांनी तो ओळखला जातो. कोकणात झाडू हिरांचेच करतात. त्याला केरसुणी किंवा वाढवण म्हणतात. देशावर हिराची केरसुणी क्वचितच वापरतात पण तेथे तिला खराटा म्हणतात. तेथे शिंदीचे झाडू जास्त वापरात आहेत. तसेच तेथे गवतापासून केलेले झाडूही वापरले जातात व त्यांना कुंचले  म्हणतात. नागपूरकडे झाडू, झाडणी व फडा ही नावे प्रचलित असून शिंदीच्या झाडूला झाडू व फडा आणि गवताच्या झाडूला झाडणी म्हणतात.

प्रकार : झाडूचे मोठे व लहान (लांब व आखूड) असे सामान्यतः दोन प्रकार असतात. वरील नावे ही नेहमीच्या मोठ्या झाडूची आहेत. लहान झाडू शिंदीचा, वाखाचा किंवा अंबाडीचा करतात. तो साधारण बसूनच वापरण्यासाठी असतो. तो नाजूक व महत्त्वाच्या गोष्टी साफ करण्यासाठी, उदा., दळण आटपल्यानंतर जात्यात शिल्लक असलेले पीठ गोळा करण्यासाठी, कपाट वा टेबल यांचे खण, देव्हारा साफ करण्यासाठी वगैंरेकरिता वापरला जातो. लहान झाडूला कुंचा (किंवा कुंचला–देशावरील संज्ञा) म्हणतात.

मोठ्या घरगुती झाडूची लांबी ७० ते १०० सेंमी. (कोकणातील वाढवण व हल्लीचा गवताचा झाडू) पर्यंत असते. कुंचा (लहान झाडू) २०–२५ सेंमी. लांबीचा असतो. मोठाल्या सभागृहासारखी दालने झाडण्यासाठी सु. १·५० मी. उंचीच्या काठीच्या टोकाला शिंदीचा रुंद तोंडाचा (पसरट) झाडू तयार करतानाच बांधतात. हा उभ्याने वापरावयाचा असतो. ह्याने काम अर्थातच लवकर होते. घरातील छतावरील आणि भिंती व छत यांच्या सांध्याजवळची उंचीवरील कोळिष्टके काढण्यासाठी वरीलप्रमाणेच काठीचा झाडू केलेला असतो, पण तो गोलसर तोंडाचा असतो. याची काठी वरीलपेक्षा जास्त लांब असते. हिराच्या केरसुण्या लहान शहरात रस्ते झाडण्यासाठी अजूनही काही ठिकाणी वापरात आहेत, पण या कामासाठी खास प्रकारचे झाडू सामान्यपणे वापरले जातात. साधारण पुरुषभर उंचीच्या काठीला (बांबूला ) हिरांचे जाडसे तुकडे लावून हे करतात. हिरांची टोके काठीला एकठिकाणी बांधून व पुढच्या बाजूला ती पसरून झाडूला त्रिकोणाचा आकार दिलेला असतो. या आकारामुळे एकाच फराट्यात रस्त्याचे मोठे क्षेत्र झाडले जाते. सफाईगार हा झाडू उभ्यानेच वापरतो. सुगीच्या दिवसातील पिकासंबंधीची कामे करण्यासाठी शेतात मोठाली खळी करतात व ती झाडण्या-सारवण्यासाठी तूरकाटीचे मोठाले झाडू देशावर करतात. झाडूचा आणखी एक प्रकार म्हणजे बारीक काठीच्या किंवा लाकडाच्या, हातात धरण्याजोग्या, लहानशा तुकड्याला एक फडके बांधून फर्निचरावरील धूळ झटकण्यासाठी केलेले साधन हा होय. त्याने खुर्च्या, टेबले, कपाटे, तसबिरी, पुतळे इत्यादींवरील धूळ उभ्याने झटकता येते. याला झटकणी म्हणतात.

मूल्यवान फर्निचर साफ करायला वरीलपेक्षा जरा जास्त लांबशा लाकडाच्या तुकड्याच्या सु.३० सेंमी. लांबीच्या भागाला पक्ष्यांची पिसे लावून सु. १० सेंमी. व्यासाची (हातात धरायला काठीचा भाग ठेवून) झटकणी केलेली असते.

यांत्रिक झाडू : मोठाल्या दालनांच्या जमिनी, दिवाणखान्यात किंवा अन्यत्र कायम घातलेल्या काथ्याच्या चटया, गालिचे न उचलता किंवा हालविता झाडण्या-साफ करण्यासाठी निर्वात कचरा चोषक [व्हॅक्युम क्लिनर ⟶ गृहोपयोगी उपकरणे] हे विजेवर चालणारे उपकरण (म्हणजे एक प्रकारचा यांत्रिक झाडूच) वापरतात. यात कचरा, धूळ इ. शोषली जाऊन साठविलीही जातात. १९२५–३० च्या सुमारास मुंबईतील (हल्लीची द. मुंबई ) मुख्य रस्ते काँक्रीटचे करण्यात आले. रस्त्याचा पृष्ठभाग एकाच पातळीत आल्यामुळे  त्यावरील कचरा यंत्राने काढला जात असे. याच कामासाठी खास बनविलेल्या मोटारीच्या मागच्या भागात सु. १·५० मी. लांब व ४० ते ५० सेंमी. व्यासाचा ब्रश ४५° बसवून मोटार सावकाश पुढे जात असता ब्रश हळूहळू गरगर फिरविला जात असे. कचरा ब्रशाच्या एका टोकाला गोळा होऊन त्याची रेषा बने. पुढील फेरीत तो आणखी पुढे जाई व अशा तऱ्हेने रस्त्याची सबंध रुंदी घेतली गेली की, माणसे तो भरून घेत असत. ही पद्धत आता बंद झाली आहे.

तयार करण्याच्या पद्धती : हिरांची केरसुणी करण्यासाठी प्रथम झावळा (माडाच्या फांद्या) तासून तिच्या पात्या सुट्या करतात. मग पात्यांच्या दोन्हीकडील पानाचा भाग काढून हीर मोकळा करतात. नंतर हीर सुरीने किंवा बारीक कोयतीने तासून पातीचा शिल्लक राहिलेला भाग काढून टाकला की, हीर साफ व बराचसा गुळगुळीत होतो. नंतर काही दिवस हीर सुकू देतात. ते सुकले की, माणसाच्या मुठीत मावतील एवढे हीर घेऊन सर्वांचे बुंधे एकाच बाजूला करून त्यांची जुडी करतात. बुंध्यांकडून साधारण ७ ते १० सेंमी. अंतर सोडून चांगल्या पण साधारण बारीक अशा सुंभाने (काथ्याच्या दोरीने) १०–१२ वळसे देऊन घट्ट बांधतात. हिरांचे शेंडे फुलून केरसुणीचा व्यास शक्य तितका मोठा होईल अशा तऱ्हेने ती बांधावी लागते. केरसुणी बांधण्याला कौशल्य लागते. दोरीचा थोडासा भाग शिल्लक ठेवून केरसुणी खुंटीला अडकविण्यासाठी तिचा फास करतात.

शिंदीचे झाडू बनविताना प्रथम पात्यांच्या पिंजोळ्या करतात. त्यांची टोके जुळवून व जरूर तितक्या घेऊन त्यांची जुडी करतात. नंतर दुसऱ्या पिंजोळ्या घेऊन त्या दोरीप्रमाणे एका टोकाला गुंडाळून त्यांची मूठ तयार करतात. मुठीचा पुढील भाग ठोकून चपटा करून त्याचे दोन भाग करतात व त्यांमधून पात्या ओवून घेऊन मुठीच्या खालच्या बाजूला घट्ट गुंडाळून बांधतात. अशा तऱ्हेने मूठ असलेला चपटा झाडू तयार होतो. हे झाडू ५०–६० सेंमी. लांब असतात.

झाडूच्या गवताला मुळापासून २०–२५ सेंमी. नुसताच देठ असतो तेथे पाने वगैरे काही नसते. या भागासकट गवताच्या काड्या कापून घेतात. अशा २०–२५ काड्यांची जुडी करून तिच्या मुठीवर दोरी किंवा पातळ पत्र्याची पट्टी घट्ट गुंडाळतात. मुळात गवताला फूल असते. गवत झोडून ते काढून टाकतात. केरसुणी मूठ धरून ६०–७० सेंमी. लांब असते.


ब्रश : कसलीही सफाई करण्यासाठी आणि पिठाच्या रूपातील जरा पातळसर किंवा पातळही पदार्थ पसरविण्यासाठी वापरावयाचे साधन. ब्रशाचे साधारणपणे दोन मुख्य भाग असतात. एक मूठ किंवा हस्तक आणि दुसरा केसाळ भाग. मूठ लाकडाची, प्लॅस्टिकची, एबोनाइटाची किंवा क्वचित धातूचीही असते. केसाळ भाग प्राण्यांच्या केसांचा, वनस्पतिजन्य तंतूंचा किंवा प्लॅस्टिक व नायलॉन यांच्या तंतूंचा करतात. काही वेळा पितळ, लोखंड इत्यादींच्या तारांचे ब्रशही तयार करतात.

मूठ : ब्रशच्या उपयोगानुसार मुठीचे निरनिराळे आकार केलेले असतात. दाढीच्या ब्रशाची मूठ आखूड, जाडशी, दंडगोल व मधे खाच केलेली किंवा तिच्यावर सहज पकड राहील अशा छेदाची असते. पूर्वी ही लाकडाची करीत पण आता सर्रास प्लॅस्टिकची करतात. तेलरंग किंवा जलरंगही लावायच्या ब्रशांची मूठ सु. १५–२० सेंमी. लांब व गोल छेदाच्या दांडीचा एक तुकडाच असतो. कपडे साफ करायचा किंवा केस दाबून बसविण्याच्या ब्रशाची मूठ सपाटच असते. मोरी घासायचा ब्रश स्वस्त असावा लागतो व त्यामुळे त्याची मूठ बहुतेक न रंधलेल्याही लाकडाची करतात. ब्रश मोठा असावा लागत असल्याने ती सपाट, पातळशा फळ्यांची करतात. दुसऱ्या प्रकाराला पाठीचा ब्रश म्हणतात. कधीकधी पाठीला जोडूनच मूठ ठेवतात. याप्रमाणे लाकडी मुठीचे हे दोन मुख्य प्रकार आहेत. विशेष कारणाने निराळे आकारही दिले जातात. दातांच्या ब्रशाची मूठ लांब चिंचोळी पण प्लॅस्टिकची असते. चित्रकलेतील ब्रशांचे हस्तक लांब व बारीक असतात आणि ते लाकडाचे केलेले असतात. घरातील गुळगुळीत जमिनीवरील किंवा गालिचावरील केर काढण्याच्या ब्रशाचा केसाळ भाग फळीत असून त्या फळीलाच हातात धरण्याजोगी मूठ लावलेली असते. सार्वजनिक इमारतींच्या मोठाल्या दालनांतील गुळगुळीत जमिनीवर मेणकापड किंवा लिनोलियम घातलेले असते. अशा ठिकाणचा केर काढण्यासाठी ७०–८० सेंमी. लांबीच्या आडव्या ब्रशाला उभी लांब काठी लावतात व उभ्याने केर पुढे ढकलता येतो.

केसाळ भाग : केसाळ भाग रानडुकरे, घोडे, गाई, बैल इ. प्राण्यांच्या, पण मुख्यतः रानडुकरांच्या केसांपासून, वनस्पतिजन्य तंतूंपासून किंवा प्लॅस्टिक व नायलॉन या कृत्रिम पदार्थांच्या तंतूंपासून बनवितात. मध्य यूरोपातील देश, सायबीरिया (रशिया) व चीन या भागांतील रानडुकरांचे केस या कामासाठी विशेष चांगले असतात. भारत, तिबेट व जपान या देशांतील जातींच्या रानडुकरांचे केसही ब्रशासाठी उपयुक्त असतात. वनस्पतिजन्य तंतूं मुख्यतः ताड, माड, साबुदाण्याचा माड व पोफळ यांपासून मिळतात. कृत्रिम तंतूंपैकी नायलॉन नरम ब्रशासाठी प्लॅस्टिक राठ ब्रशासाठी वापरतात. ब्रशाला लावलेल्या या तंतूंच्या तुकड्यांना रोम (ब्रिसल्स) म्हणतात. ब्रशाच्या कायेत रोम बसविण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत.

रोम : नेहमीच्या वापरातल्या ब्रशांचे रोम सुरुवातीला रानडुकरांच्या केसांपासून करीत असत. आता इतर प्राण्यांचेही केस वापरले जातात. रानडुकरांचे केस मुळाशी जाड असतात व टोकाकडे निमुळते होत जातात. टोकाला फणीसारखे दातेही असतात. केसाचा पृष्ठभाग साधारण खरखरीत असतो. ते मजबूत व लवचिक असतात आणि वाकवले, तर उसळी घेऊन परत सरळ होतात. या गुणांमुळे उच्च प्रतीच्या ब्रशांसाठी हेच केस वापरतात. हेच गुण इतर प्राण्यांच्या केसांत कमी-जास्त प्रमाणात असले, तर ते केसही वापरले जातात. डुकराच्या मानेवरचे केस त्यातल्या त्यात नरम असतात.

कातड्यातून केस काढून घेण्याच्या काही पद्धती आहेत. विशेष प्रचारातल्या एकीत कातडे कॅल्शियम किंवा सोडियम सल्फाइडाच्या विद्रावात मुरवतात. यामुळे केस सैल होऊन ते काढून घेणे सोपे होते. दुसऱ्या एका पद्धतीत जनावरांच्या मृत्यूनंतर लगेच कातड्यावर रेझिनाचा हात देतात. रेझीन कडक झाल्यावर केस उपटणे सोपे होते. रेझीन विरघळवले की, केस सुटे होतात. केस उपटण्यांसाठी यांत्रिक पद्धतही वापरात आहे. विरुद्ध दिशांनी आणि भिन्न परिगतींनी फिरणारे काटेरी रूळ हीत वापरतात. मानेवरील चांगल्या दर्जाचे केस सामान्यतः हातानेच काढतात.

केस काढून झाल्यानंतर ते धुवून निर्जंतुक करतात, लांबी व रंग यांवरून ते प्रकारांनुसार वेगळे केल्यावर सरळ करतात आणि एका काठीच्या तुकड्याला बांधतात. नंतर पुन्हा एकदा धुवून व स्वच्छ करून ते पुन्हा निर्जंतुक केले जातात.

ज्या इतर प्राण्यांचे केस वापरले जातात त्यांत घोडा, गायगुरे, बकरा, खार, उंट, वीझल, कोलिन्सकी, सेबल, कस्तुरी मांजर, मार्जारिका (पोलकॅट) आणि बिजू हे प्रमुख आहेत. या प्राण्यांच्या केसांवरही वरीलप्रमाणेच उपचार करावे लागतात. सेबलांचे केस सर्वांत नरम, टिकाऊ व खूप महागही असतात.

वनस्पतिजन्य तंतूंत दोन प्रकार आहेत. रासायनिक प्रक्रिया केलेले आणि नैसर्गिक वनस्पतीतील सेल्युलोजाचे विद्रावण व पुनर्जनन करून ब्रशांचे तंतू बनविता येतात. ॲसिटिक अम्लाचे कापसाचे विद्रावण करतात व मग ॲसिटोनात या विद्रावाचे विसरण (रेणू एकमेकांत मिसळू देण्याची क्रिया) होऊ देतात. विद्राव पुरेसा थिजेपर्यंत (दाट होईपर्यंत) ठेवून देतात. नंतर हा दाट लापशीसारखा विद्राव बारीक छिद्रातून दाबला की, त्याच्या बारीक तारा (तंतू) निघतात. गरम हवेत त्या लगेच घट्ट होतात. मग हव्या त्या लांबीचे रोम त्यापासून तोडून घेतात.

नैसर्गिक वनस्पतीजन्य तंतू ताड, माड, पोफळ, साबुदाण्याचा माड वगैरेंपासून मिळतात. साबुदाण्याच्या माडाच्या झावळ्यांच्या पिढ्यांपासून मिळणाऱ्या तंतूंना कितुल (कतुर) असे म्हणतात. ही झाडे भारत, श्रीलंका, बांगला देश, ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड या उष्ण कटिबंधी देशांत विपुल प्रमाणात आहेत. पण या जातीच्या तंतूंत मेक्सिकन तंतू ही प्रमुख जात असून तो मेक्सिकोत मिळतो.

कृत्रिम तंतूंपैकी प्लॅस्टिकचे तंतू आता जास्त प्रचारात आले आहेत. प्लॅस्टिकचे रोम मुळाशी जाड व टोकाशी बारीक केले की, त्यांच्यात हवी तितकी मजबुती आणि प्रत्यास्थता (दाब काढून घेतल्यावर मूळ स्थिती पुन्हा प्राप्त होणे) हे गुण येऊ शकतात. नायलॉन हे सामान्य प्लॅस्टिकपेक्षा वेगळे असून ते बरेच जास्त मजबूत असते, तसेच ते बरेच महागही असते, म्हणून काही महत्त्वाच्या ब्रशांसाठी (उदा., दाढीचे ब्रश) त्याचे तंतू वापरले जातात.


बनविण्याच्या पद्धती : ब्रशांच्या बनावटीतील मुख्य कामे म्हणजे हस्तक, मुठी वगैरे तयार करणे, रोमांची जुळणी करणे व त्यांचा झुबका करून तो हस्तकाला वा मुठीला घट्ट बसवणे ही असतात. हस्तक वा मूठ लाकडी (तेलरंगाचे, चित्रकलेचे ब्रश) असल्यास या गोष्टी तयार करून त्यांना व्हार्निश (रोगण) किंवा तेलरंग लावून साठवून ठेवतात. ब्रशाच्या आकार व आकारमानाप्रमाणे रोमांचे झुबके करून त्यांची बांधणी करतात किंवा एखाद्या साच्यात धरून ठेवतात आणि मग या झुबक्यांच्या मागच्या बाजूला गोंद, रबर मिश्रण, राळ, सरस यासारखा एखादा चिकट पदार्थ लावून तो रोमांचा झुबका एकसंध करतात ही गोष्ट फार महत्त्वाची असते कारण झुबक्यातले थोडे रोम जरी सैल पडून निघून गेले, तरी सबंध झुबकाच त्याच्या कोंदणात सैल होऊन त्यातून पडून जाईल. नंतर हा झुबका बहुतेक एका कोंदणात बसवितात. कोंदण पत्र्याचे, लाकडाचे, प्लॅस्टिकचे किंवा ओतीव धातूचेही करतात. सेबलाच्या केसांना कित्येकदा पत्र्याऐवजी पिसाच्या शिरेचे कोंदण लावतात. कोंदणात रोमांचे झुबके बसवतानाही चिकट पदार्थ वापरतात. अशा तऱ्हेने रोम कोंदणात बसल्यावर कोंदण हस्तक-मुठीला पक्के बसेल असे करतात.

काही प्रकारच्या ब्रशांत (नुसत्या पाठीच्या) कोंदणाऐवजी एक लाकडी फळीचा तुकडा वापरतात. फळीला भोके पाडून त्यांतून जरूर तितक्या रोमांच्या जुड्या दुमडून दुहेरी करून भोकाच्या मागील तोंडातून जुडीची टोके पुढे दाबतात. जुडीच्या वेलांटीतून तार ओवून घेऊन जुडी खालून ओढून घेतात. सर्व भोके भरून झाली की, त्यांवर दुसरी एक पातळ फळी तारचुकांनी बसवितात. मोरीचे ब्रश व अन्य वरकड कामाचे ब्रश अशा तऱ्हेने हाती पद्धतीने करतात.

यांत्रिक पद्धतीत प्लॅस्टिकची वा लाकडाची पाठ आणि प्लॅस्टिक वा वनस्पतिजन्य रोम यांचे ब्रश बनविण्याच्या सर्व क्रिया स्वयंचलित रीत्या केल्या जातात. एका पद्धतीत प्लॅस्टिक वा लाकडाच्या पाठीच्या अर्ध्या जाडीपर्यंत भोके पाडली जातात व त्यात रोमांची दुमडलेली जुडी दाबली जाऊन जुडीच्या वेलांटीत धातूची बारीक तार ठोकली जाते. या तऱ्हेने दात घासण्याचे किंवा एका पाठीचे ब्रश तयार करतात. काही प्लॅस्टिकचे ब्रश पाठ व रोम यांसकट एकदम साच्यात बनविले जातात. प्लॅस्टिकचे पीठ वा दाणे जरूर तितक्या वजनाचे घेऊन साच्यात भरतात. मग त्याला उष्णता व दाब देतात. त्यामुळे प्लॅस्टिक पातळसर होऊन साचा भरून टाकते व त्याची हवी ती वस्तू बनते.

बाटल्या वगैरे चिंचोळ्या वस्तू आतून साफ करण्यासाठी दोन तारांच्या पिळात बसविलेल्या नायलॉनाच्या रोमांचा ब्रश तयार करतात. तारांना जसा पीळ पडत जातो तसतसे रोम आत घातले जातात. रोम संपल्यावर पिळाची तार थोडी शिल्लक ठेवून त्याचा हस्तक करतात. तसेच हस्तकाच्या टोकाला तारेचा डोळाही करतात. त्यामुळे ब्रश खिळ्याला अडकवता येतो. अलीकडे नायलॉनाच्या बारीक दोरीचे जाळे गुंफून त्याचा भांडी घासण्याचा चोथा करतात. याला हस्तक, मूठ किंवा पाठ यातले काहीच नसते.

सुरुवातीला ब्रश हातानेच तयार करीत. हळूहळू साधी यंत्रे आली व आता ब्रश बनावटीच्या सर्व क्रिया स्वयंचलित यंत्राने होतात.

प्रकार व उपयोग : ब्रशांचे अनेक निरनिराळे प्रकार असून त्यांतील काही मुख्य पुढे दिले आहेत.

(अ) हस्तक असलेले :  यंत्रे साफ करण्याचा ब्रश राठ केसांचा किंवा कामांसाठी पितळेच्या बारीक तारांचा व लाकडी पाठीलाच जोडलेल्या हस्तकाचा असतो. कपडे साफ करावयाचा व न्हावी केस कापताना मधून मधून वापरतात ते ब्रश याच प्रकारचे असतात. भिंतीला, लाकडाला तेलरंग लावण्याचा ब्रश राठ केसांचा, पत्र्याच्या कोंदणाचा व लहान हस्तकाचा असतो. चित्रे रंगविण्याचा ब्रश काडीसारख्या लांब हस्तकाचा असतो. त्याचे कोंदण साधारणतः पत्र्याचे व केस नरम असतात. दात घासण्याचा ब्रश नायलॉनाच्या रोमांचे झुबके प्लॅस्टिकच्या हस्तकात (पाठ व हस्तक एकसंध) बसवून केलेले असतो. त्याचे नरम, मध्यम व कडक रोमाचे असे प्रकार असतात.

(आ) मूठ असलेले :  निरनिराळ्या रंगांच्या प्लॅस्टिकच्या मुठी व कोंदणे आणि नायलॉनाचे रोम असलेले ब्रश दाढीसाठी वापरतात.

(इ) फक्त पाठ असलेले :  कपडे साफ करावयाचा ब्रश लाकडी पाठीचा व मध्यम नरम केसांचा असतो केस दाबून बसविण्याच्या ब्रशाला साधारण कठीण केस योजतात. कपडे धुताना घामट मळके भाग साफ करायला प्लॅस्टिकच्या पाठीचा आणि रोमांचा ब्रश केलेला असतो. मोरी घासायच्या ब्रशाला वनस्पतिज नैसर्गिक रोम वापरलेले असतात. माणसांचे अंग घासण्याचे ब्रश प्लॅस्टिकचे करतात. जनावरांचे अंग घासण्याचे व घोड्यांना खरारा करण्याचे ब्रश काथ्याच्या रोमांचे असतात.

यांशिवाय निरनिराळ्या औद्योगिक क्रियांत कारणपरत्वे जे ब्रश वापरावे लागतात ते त्या त्या क्रियांना अनुरूप असे पण साधारणतः वरील प्रकारांच्या तत्त्वांवरच बनविलेले असतात. कापड उद्योगात कापड सफाईसाठी काथ्याच्या रोमांचे ब्रश वापरतात. सनमायका, फॉर्मायका इ. स्तरयुक्त तक्ते बनविताना मेक्सिकन तंतूंचे ब्रश वापरतात. काजळी साठण्याच्या नळ्या साफ करण्याचे ब्रश गोल असतात. मोठ्या धुराड्यांसाठी हस्तकाचे, तारांचे वा राठ केसांचे ब्रश वापरतात.

भारतीय उद्योग : भारतात दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रशांचे उत्पादन अगदी अल्प प्रमाणात होत असते. साधारण १९५० नंतर इतर उद्योगांप्रमाणे ब्रश उद्योगाची प्रगती होऊन आता मुंबई, बडोदे, दिल्ली व कलकत्ता येथे मोठे कारखाने आणि इतर काही शहरांतून लहान कारखाने आहेत. ब्रशांच्या बाबतीत भारत आता स्वयंपूर्ण आहे. मोरी धुण्याच्या ब्रशासारखे ओबडधोबड ब्रश कुटिरोद्योगात व लघुउद्योगात बनविले जातात.

गोखले. श्री. पु. ओगले, कृ. ह.