चटया : (मॅटिंग). विविध प्रकारांचे गवत, वेत, ताग, काथ्या, ताड-माड यांची पाने व तत्सम वनस्पतिजन्य पदार्थ मागावर अथवा हाताने विणून वा गुंफून तयार केलेल्या आणि प्रामुख्याने जमिनीवर आंथरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूला सामान्यतः ‘चटई’ म्हणतात. तथापि आता प्लॅस्टिकच्या पट्ट्या, धातूंच्या तारा, फोम रबर यांसारख्या पदार्थांपासून तयार करण्यात येणाऱ्या तत्सम वस्तूंनाही चटई (मॅटिंग) ही संज्ञा वापरण्यात येते. जमिनीवर आंथरण्याखेरीज टेबलखुर्च्यावरील आच्छादने, वाहनातील बैठका, पायपुसण्या, पडदे, भिंतीवरील शोभादायक वस्तू, आवेष्टन इ. विविध प्रकारे चटयांचा उपयोग करण्यात येतो.

चटया तयार करण्याचा उद्योग प्राचीन काळापासून जगातील बहुतेक देशांत चालू आहे. हिंदू लोक धार्मिक कार्यात दर्भाची चटई वापरीत असत. रानटी अवस्थेतील लोकांनाही चटया तयार करण्याची विद्या अवगत असल्याचे आढळून आले आहे.

कच्चा माल : जगातील विविध भागांत चटया तयार करण्यासाठी विविध प्रकारचा कच्चा माल वापरण्यात येतो. सर्वसाधारणः चटया तयार करण्यासाठी काथ्या, ताग, ताड-माड यांची पाने, वेत, विविध प्रकारांची गवते, प्लॅस्टिकच्या पट्ट्या, धातूंच्या तारा तसेच नैसर्गिक व मानव निर्मित तंतू यांच्या मिश्रणाने तयार केलेले धागे इ. पदार्थ वापरण्यात येतात.

बिहारमध्ये कासे गवत; राजस्थानात वाळा; बंगालमध्ये नारळ, खजूर यांची पाने, बांबू, गवत, लव्हाळा इ.; पश्चिम व दक्षिण भारतात शिंदी व माड यांचे झावळ; केरळात केवडा; तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व बंगाल या भागांत कोसा गवत (सायपेरस कोरिंबोसस ) हे पदार्थ प्रामुख्याने वापरले जातात. बांबूपासून तयार केलेल्या चटयांना बंगालमध्ये ‘डर्मा’ असे म्हणतात. दक्षिण व पश्चिम भारतात तयार होणाऱ्या शिंदी-माडाच्या झावळांच्या चटयांना ‘शेलू’ म्हणतात. मिदनापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या चटयांना ‘मसलनदास’ असे म्हणतात. ‘सीतलपट्टी’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या चटया फार गुळगुळीत असतात. कोराई गवतापासून केलेल्या चटया इतक्या मऊ असतात की, त्यांची घडी घालता येते. गुंडाळल्यास तिचा आकार फारच लहान होतो.

हलक्या प्रतीच्या लव्हाळ्यापासून जपानमध्ये ‘बिंगो-इ’ नावाच्या जाड्या-भरड्या चटया करतात. त्या ‘हानामुशिरो’ या नावाने अमेरिकेत पाठविल्या जातात. मलेशियात वेतापासून तयार केलेल्या चटया पडद्यांसाठी व भिंती सुशोभित करण्यासाठी वापरतात. चिनी गवतापासून केलेल्या चटया अमेरिकेत हौशी लोक वापरतात. अमेरिकेत पानकणिसापासून खुर्च्यांवरील बैठका तयार करतात. या चटया विद्युत्‌ विरोधक असतात. कॅलिफोर्निया व अमेरिकेच्या इतर भागांतील मूळचे रहिवाशी विशिष्ट प्रकारच्या गवतापासून (कचेरवा) चटया करीत असत. दक्षिण अमेरिकेत चटयांसाठी बोरू वापरतात. फ्लॉरिडामध्ये थॅच पाम वृक्षाच्या कोवळ्या पानांचा उपयोग चटयांसाठी करतात. न्यूझीलंडमध्ये अंबाडीपासून चटया बनवितात. हवाई बेटांत केवडा व लव्हाळा आणि फिलिपीन्स बेटात केवडा, मॅनिला हेंप व अबाका यांपासून चटया करतात.

विणकाम व रंगकाम : धाग्यापासून बनवावयाच्या चटया तयार करण्यासाठी धाग्यांचे सुतात रूपांतर करून त्यापासून जड व रूंद मागावर चटया विणता येतात. विणकामात साधी वीण वापरली जाते. या चटया ठराविक आकाराच्या बनवितात किंवा विणलेल्या चटयांचे आवश्यक त्या आकाराचे तुकडे कापतात. कापलेल्या तुकड्यांच्या कडांमध्ये दोर घालून त्या बंद करतात. विणतानाच चटयांवर नक्षी करण्यात येते किंवा नंतर त्यांवर छापली जाते.

दर्भ, वेत, लव्हाळी, बांबू इत्यादींपासून चटया करताना असे पदार्थ समान लांबीचे कापतात. असे पदार्थ जाड दोऱ्याच्या मध्ये गुंफून चटया तयार करतात. याच्या बाजूच्या दोन कडा चटयांमध्येच मुरडून मिसळतात व उरलेल्या दोन कडा दोऱ्याने बांधून घेतात. काही वेळा कडा कापडांनी शिवतात.

चटयांना रंग देण्यासाठी लोखंडी, हिरडा, बाभूळ (शेंगा), पतंग, हळद इत्यादींपासून तयार केलेले रंग वापरले जातात.

भारतीय उद्योग : कोसा गवतापासून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , केरळ, प. बंगाल या राज्यांत चटया तयार करण्यात येतात. केरळमध्ये केवडा व काथ्या यांपासून चटया तयार करतात. इतर वस्तूंपासून तयार करण्यात येणाऱ्या चटया प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत.

भारतातील चटया करण्याचा उद्योग कुटीरोद्योगाचाच आहे. काही ठिकाणी सहकारी औद्योगिक संस्था चटयांचे उत्पादन करतात. भारतातून श्रीलंका, ब्रह्मदेश, ईजिप्त, प. जर्मनी, अमेरिका इ. देशांना चटयांची निर्यात करण्यात येते.

संदर्भ :

  • Mehta, R. J. The Handicrafts and Industrial Arts of India, Bombay, 1960.

कुलकर्णी, सतीश वि.

चटयांचे विविध प्रकार