सूत : तंतूंच्या पिंजलेल्या किंवा विंचरलेल्या पुंजक्यापासून तसेच बहुवारिकांपासून काढलेल्या एका वा अनेक तंतूंना पीळ देऊन तयार केलेल्या सलग पेडाला सूत वा धागा म्हणतात. तंतू नैसर्गिक किंवा कृत्रिम (मानवनिर्मित) असतात. हे तंतू वस्त्रनिर्मितीसाठी योग्य असे असतात [→ तंतु, कृत्रिम तंतु, नैसर्गिक]. सुयांनी किंवा मागावर विणकाम करुन वस्त्र तयार करण्यासाठी सुतांचा उपयोग होतो. वापरात आणण्याआधी तंतूंचे सूतकताईद्वारे सुतात परिवर्तन केले जाते. सुताच्या गुणधर्मांचा वस्त्राच्या दिसण्यावर, पोतावर आणि उपयोगांवर मोठा प्रभाव पडतो. कारण सुतासाठी वापरलेला तंतू , त्याच्या दर इंचामधील पिळांची संख्या (३–८०), तंतूचा व्यास व सुतातील पदर यांनुसार सुतांमध्ये खूप भिन्नता असते. सूत मऊ व चमकदार किंवा भरड (ओबडधोबड) व मंद अथवा मिश्र स्वरुपाचे असून सुताच्या या वैशिष्ट्यांनुसार वस्त्रांचे स्वरुप ठरते. अनेक तंतूंना एकत्र पीळ देऊन बनविलेला पेड, पेड न दिलेला तंतूंचा जुडगा वा गट, पीळ दिलेल्या किंवा न दिलेल्या वर्खाच्या किंवा कागदाच्या अतिशय अरुंद पट्ट्या ही सुताची काही रुपे आहेत. [ज्या द्रव्यापासून सूत काढले अथवा कातले जाते, त्या द्रव्याला तंतुद्रव्य म्हणतात. तंतुद्रव्यापासून काढलेल्या अखंड पदराला तंतू (फिलॅमेंट), तंतूच्या तुकड्याला तंतुखंड (स्टेपल) आणि त्यांपासून बनविलेल्या धाग्याला सूत (यार्न) म्हणतात ].

सूत प्रथम अपघाताने तयार झाले असावे. वेलींचे पीळ किंवा खोडाभोवतीच्या वेलींची पिळे पाहून आदिमानवाला प्रथम रज्जू (कॉर्ड) तयार करण्याची कल्पना सुचली असावी. ओबडधोबड हत्यारांचे दांडे, मुठी, सुटे भाग, झोपडीचे खांब व बहाल (तुळई) बांधण्यासाठी त्यांनी असे रज्जू वापरले असावेत. मासेमारीची जाळी, भक्ष्य पकडण्याचे फास, कोरड्याची दोरी (कातडी चाबूक) व काकडे (अडसर) यांच्यासाठीही त्यांनी रज्जू वापरला असावा. इ. स. पू. काळातील कबरस्ताने, घरे इ. ठिकाणी सूत व वस्त्रे यांचे भग्न अवशेष आणि चातीसारखी सूतकताईची साधने आढळली आहेत. [→ कापड उद्योग वस्त्रकला].

वस्त्रनिर्मितीसाठीचे तंतू : कच्चा माल : तंतू ही तंतुद्रव्याची एकके असून त्यांची लांबी त्यांच्या रुंदीपेक्षा किंवा व्यासापेक्षा किमान शंभरपट असते. सूत व वस्त्रनिर्माण यांसाठी तंतू पुरेसा लांब, बारीक, बळकट, लवचिक इ. गुण असलेला असावा लागतो. तयार होणाऱ्या वस्त्राच्या अपेक्षित उपयोगांमध्ये हे गुणधर्म टिकून राहणारे असावे लागतात. प्रत्यास्थता (स्थितिस्थापकता), सुरकुत्या पडणे, आर्द्रताशोषण, सूर्यप्रकाश व उष्णता यांबाबतीत होणारी प्रतिक्रिया तसेच तयार वस्त्रावरील संस्करण, साध्या व निर्जल धुलाईत वापरण्यात येणाऱ्या रसायनांच्या बाबतीतील क्रिया आणि कीटक व सूक्ष्मजीव यांना विरोध करण्याची क्षमता या सर्व वैशिष्ट्यांचा वस्त्राच्या उपयोगांवर (कार्यमानावर) परिणाम होतो. तंतूंच्या या गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. या गुणधर्मांद्वारे तंतूंची विविध प्रकारच्या वस्त्राची उपयुक्तता निश्चित होते.

वस्त्रनिर्मितीसाठी प्रथम वनस्पतिजन्य व प्राणिज हे नैसर्गिक तंतू उपलब्ध झाले. कापूस, लोकर, ताग, फ्लॅक्स व रेशीम या नैसर्गिक तंतूंवर दीर्घकाळ प्रयोग करण्यात आले. त्यांतून तंतू हा वस्त्रनिर्मितीचा सर्वांत समाधानकारक कच्चा माल असल्याचे लक्षात आले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी कृत्रिम तंतू निर्माण करण्यास सुरुवात झाली.१९४०–१९५० या दशकात कृत्रिम तंतूंच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. नंतर या उद्योगाचा जलदपणे विस्तार झाला. १९७०–१९८० या दशकात कृत्रिम तंतूंविषयीचे व्यापक संशोधन व विकासाचे काम झाले. कृत्रिम तंतूंच्या उत्पादनासाठी लागणारी द्रव्ये निसर्गात उपलब्ध होती. त्यांच्यावर प्रक्रिया करुन त्यांना तंतुरुप देण्यात आले. दगडी कोळसा व खनिज तेल यांच्यापासून मिळविण्यात आलेल्या रसायनांपासून तंतुद्रव्ये तयार करण्यात आली. त्यांच्यापासून विविध प्रकारचे तंतू बनविण्यात आले. ॲसिटेट, ॲक्रिलिक, पॉलिएस्टर व पॉलिथिलीन यांसारखे तसेच रेयॉनासारखे पुनर्निर्मित तंतू या गटात येतात.

यांशिवाय दूध, सोयाबीन व भुईमूग यांच्यातील प्रथिनांवर आधारलेले तंतूही तयार करण्याचे प्रयत्न झाले. काचेचे तंतूही तयार करतात, तसेच अल्पाका, अंगोरा, उंट, लामा, रॅकून, कुत्रे इ. प्राण्यांच्या केसांचाही सुतासाठी वापर होतो. मात्र हा वापर अगदी मर्यादित आहे.

तंतूंच्या उत्पादन खर्चावर परिणाम करणारे घटक : कच्च्या मालाची उपलब्धता, त्यांवरील संस्करणाचा प्रकार व राशी आणि उपयोगांतील विविधता यांच्यावर तंतूंचा उत्पादन खर्च अवलंबून असतो. नैसर्गिक तंतूंच्या उत्पादनासाठी मोठी जमीन लागते. या पिकांवर हवामानाचा परिणाम होतो. शिवाय हा कच्चा माल दीर्घ अंतरावरील वापरावयाच्या ठिकाणी वाहून न्यावा लागतो. नैसर्गिक तंतूंची गुणवत्ता व राशी सहजपणे नियंत्रित करता येत नाही. यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चात चढ-उतार होत असतात. तंतूंचे विविध गुणधर्म सुधारण्यासाठी उत्पादन प्रक्रियेतील संशोधनाची दिशा ठरवावी लागते.

कृत्रिम तंतू सर्वसाधारणपणे वापरावयाच्या ठिकाणी तयार करणे शक्य असते. त्यांच्या उत्पादनासाठी जास्त जमिनीची गरज नसते. हव्या त्या इष्ट प्रमाणात त्यांचे उत्पादन करता येते. त्यांच्यात विशिष्ट अंगभूत गुणधर्म असू शकतात. त्यांच्यापासून सूत तयार करण्यासाठी थोडी पूर्वतयारी करावी लागते. मात्र त्यांच्या उत्पादनासाठी मूळ भांडवली खर्च जास्त करावा लागतो. कारण त्यांच्या उत्पादनाची यंत्रसामग्री महाग असते. तथापि उत्पादन वाढले की, उत्पादन खर्च स्थिर राहतो किंवा कमी होतो. यामुळे तंतूची किंमत कमी होऊ शकते. कृत्रिम तंतूंचे गुणधर्म सुधारणे व विशिष्ट उपयोगांसाठी योग्य प्रकारचे कृत्रिम तंतू तयार करणे या दृष्टींनी संशोधनाची दिशा ठरविता येते.

कच्च्या तंतूंवरील संस्करण व सूतकताई : कापूस, लोकर, उर्वरित रेशीम (रेशमाचे खराब कोश, निस्तेज व खडबडीत रेशीम, रेशमाचे तुकडे व गुंडाळता न येणारे रेशीम) आणि कृत्रिम तंतुखंड पिंजतात व कधीकधी विंचरतात. यामुळे तंतू अलग व समांतर होतात. त्यातील केरकचरा व मलद्रव्ये निघून जातात. नंतर त्यांचे पेळू वा सैलसर वात तयार करतात. आधुनिक सूतगिरण्यांत ही कामे यंत्रांनी केली जातात. लोकरीचा ओशटपणा (ग्रीज) निघून जाण्यासाठी तिच्यावर संस्करण करतात. संस्करण करुन रेशमावरील सेरेसीन हा चिकट पदार्थ काढून टाकतात. तसेच फ्लॅक्सच्या (लिननच्या) तंतूंमधील सर्व मलद्रव्ये काढून टाकतात. कापसावर सूतकताईपूर्वी सर्वांत जास्त प्रक्रिया करावी लागते, तर कृत्रिम तंतूंमध्ये क्वचितच बाहेरचे इतर पदार्थ असतात.


 कृत्रिम तंतू दीर्घ लांबीचे असतात. त्यामुळे त्यांची कताई करावी लागत नाही. मात्र त्यांच्या तंतुखंडांची, तसेच हे तंतुखंड आणि विविध नैसर्गिक तंतू एकत्र मिसळून केलेल्या संमिश्र तंतुद्रव्याची सूतकताई करतात. यामुळे वैशिष्ट्यपूर्ण व एकसारख्या जाडीचे सूत मिळते. कृत्रिम तंतू एकत्र करुन त्यांना पीळ न देता त्यांचे दोर केल्यास या दोरांना ‘टो’ म्हणतात. सैलसर पिळाच्या धाग्याला ‘ट्रॅम’ म्हणतात. अशा अनेक धाग्यांना एकत्र पीळ दिला की संघटित (ऑर्गनाइझ) धागा बनतो. अधिक पिळाच्या धाग्याला ‘क्रेप’ धागा म्हणतात. तंतुखंडयुक्त द्रव्यापासून (उदा., कापूस) काढलेल्या तंतूंना घट्ट पीळ देऊन समाधानकारक लांबीचे सूत तयार होते. [ → चरखा सूतकताई].

सुताची गुंडाळी व गठ्ठे तयार करणे : उपयोगांनुसार सुताचे कांडी, चाती, लड (आटी), रीळ (स्पूल), कोन, बीम, आटी इ. रुपांत गठ्ठे तयार करतात. कांडीचा आतील भाग लाकडी, पुठ्ठ्याचा किंवा प्लॅस्टिकचा असून कातले जात असतानाच सूत त्यावर गुंडाळतात. मध्यभागी असलेल्या छिद्रामुळे कांडी, चाती वा इतर प्रयुक्तीवर सूत घट्ट बसते. रीळ दंडगोलाकार असून त्यांच्या टोकांलगत बाह्य कडा असते. शंक्वाकार गाभ्यावर सूत गुंडाळून गुंडाळीला कोन (शंकू) म्हणतात. नलिकेवर सूत गुंडाळून दंडगोलाकार गुंडा तयार होतो. आधार नसलेल्या सुताच्या गुंडाळ्या म्हणजे लडी, गुंडे वगैरे होत. धोट्यातील कांडीवर गुंडाळलेले सूत बाण्यासाठी वापरतात. लहान व निमुळती नलिका म्हणजे चाती असून तिच्यावरील सूतही सामान्यपणे बाण्यासाठी वापरतात. विणकर फाळक्यावर सूत गुंडाळून लड बनवितात. तसेच आसारीवर (फिरकीवर) गुंडाळलेले सूत कांड्यांवर गुंडाळण्यासाठी वापरतात. सुताचे बीम सु. १.८ मी. लांब व २५ सेंमी. पर्यंत व्यासाचे असून त्यांच्यावर ताण्याचे सूत गुंडाळतात. बीमचा गाभा पोलादी वा लाकडी असून सूत गुंडाळलेला बीम दंडगोलाकार दिसतो.

सुतांचे प्रकार : पदरांच्या संख्येनुसार वर्गीकरण : एकपदरी सूत  : एकपदरी सुताला थोडा पीळ दिलेला असतो, म्हणजे यात अनेक तंतू पीळ देऊन वा न देता तंतू एकत्र केलेले असतात. वर्खासारख्या द्रव्याच्या अगदी अरुंद पट्ट्याही एकपदरी असतात. कृत्रिम तंतू एकपदराच्या रुपात वापरतात. एकपदरी सुतात अनेक तंतुखंड असू शकतात व ते एकत्र धरुन ठेवले जाण्यासाठी त्यांना पीळ देतात. त्यांना घटिवत (Z) वा प्रतिघटिवत (S) पीळ देतात. विविध प्रकारची वस्त्रे तयार करण्यासाठी एकपदरी सूत सर्वाधिक वापरले जाते.

बहुपदरी सुते : यात एकपदरी सुताच्या दोन वा अधिक पेडांना पीळ दिलेला असतो. कातलेल्या सुतापासून अशा प्रकारची दुहेरी, तिहेरी इ. बहुपदरी (प्लाय) सुते तयार करतात. यातील प्रत्येक सुताला एका दिशेत पीळ दिलेला असतो आणि ती एकत्र करुन त्यांच्या जुडग्याला सामान्यपणे याच्या उलट दिशेत पीळ देतात. दोन्हींच्या पिळांची दिशा एकत्र असल्यास बहुपदरी सूत अधिक बळकट होते. अशा सुताचे वस्त्र भरड पोताचे व कमी लवचिक होते. औद्योगिक वापराचे जाड वस्त्र बळकट होण्यासाठी बहुपदरी सुते वापरतात.

रज्जू सुते : बहुपदरी सुतांना एकत्र पीळ देऊन रज्जू सुते तयार करतात. याचा शेवटचा पीळ बहुधा मूळ सुताच्या पिळाच्या विरुद्घ दिशेत देतात. केबल रज्जू सुताचे स्वरुप प्रतिघटिवत-घटिवत-प्रतिघटिवत (S-Z-S) असे असते. ही सुते रज्जू किंवा दोर म्हणून वापरतात. त्यांच्यापासून अतिशय भक्कम व जाड औद्योगिक वस्त्रे विणतात.

नाविन्यपूर्ण सुते : या सुतांमध्ये खूप विविधता असून त्यांच्यात पुढीलप्रमाणे परिणाम साधलेले असतात. वात किंवा पेळू या रुपांतील सुतांच्या रचनेत मुद्दाम छोट्या गुठळ्या ठेवतात. विविध जाडींचे कृत्रिम तंतू तयार करतानाच त्यांच्यात अशी नियोजनबद्घ असमानता ठेवतात. यासाठी कताई करताना लागोपाठ ताण घट्ट व सैल करतात. लिनन व लोकर यांसारख्या नैसर्गिक तंतूंच्या विणकामाद्वारे टि्‌वड कापड विणतात. काही रेशमी वस्त्रांत कच्च्या वा भरड रेशमातील खडबडीत पृष्ठभाग तसाच ठेवतात. त्यामुळे अंतिम वस्त्राचा भाग अनियमित होतो. उत्पादनाच्या वेळी कृत्रिम तंतूंच्या बाह्य रुपात फेरफार करुन ते खास परिणाम साधण्याच्या दृष्टीने वापरतात. उदा., सुरकुत्या असणारे वा सैलसर पाश बाहेर असलेले सूत वापरुन डौलदार वस्त्रे तयार करतात.

डौलदार सुते : कृत्रिम तंतूंची पारदर्शकता, सुळसुळीतपणा व पृष्ठभागी दिसणारे लहान तंतू ही गुणवैशिष्ट्ये कमी करण्यासाठी त्यांच्यावर टेक्शरायझिंग प्रक्रिया करतात, यामुळे ही सुते अधिक अपारदर्शक होतात त्यांचे रुप वा पोत खुलतात त्यांची आर्द्रताशोषणक्षमता व ऊब वाढते. परिणामी वस्त्राला खास रुप व पोत प्राप्त होतात. वस्त्र केसाळही दिसते. जाडसरपणामुळे सुतात हवायुक्त पोकळ्या तयार होतात. यामुळे त्याची आर्द्रताशोषणक्षमता वाढते व त्यांतील वायुवीजन अधिक चांगल्या प्रकारे होते. सुतांमध्ये तरंग, कुरळेपणा व वलयी रचना (पाश) निर्माण करता येते. हे साध्य होण्यासाठी सुतावर उष्णतेचे व रासायनिक संस्करण करतात.

ताणयुक्त सुते : याचा पीळ अगदी घट्ट असतो. उष्णतेचे संस्करण करुन पीळ उलगडतात. यामुळे सूत नागमोडी होते व ते स्प्रिंगेसारखे दिसते. स्पँडेक्स हे मुख्यतः खंडयुक्त पॉलियुरेथेनाचे अत्यंत लवचिक कृत्रिम तंतू आहेत. या सुतापासून बनविलेल्या वस्त्राचा स्पर्श रबरासारखा वाटतो. यासाठी पुष्कळदा असे इलॅस्टोमेरिक तंतू सुताचा गाभा म्हणून वापरतात. त्याच्यावर ताणरहित नैसर्गिक वा कृत्रिम तंतूचे आवरण असते. नैसर्गिक तंतूंनाही ताण देतात व गाभा म्हणून ते वापरतात. त्यांच्यावर आवरण नसले तरी चालते.

धातूची सुते : ही सुते धातूच्या कणांचा लेप दिलेल्या पॉलिएस्टरासारख्या संश्लेषित पटलाच्या पट्ट्यांपासून तयार करतात. ॲल्युमिनियम वर्खाच्या पट्ट्या अशा पटलांदरम्यान ठेवून सँडविचासारखी रचना करतात. नैसर्गिक व कृत्रिम तंतूच्या गाभ्याभोवती धातूची अतिशय पातळ पट्टी गुंडाळून जर तयार करतात. यामुळे अशा सुताचा पृष्ठभाग धातूसारखा दिसतो.


 सुतांचे उपयोगांनुसार वर्गीकरण : वस्त्रनिर्मिती सुते : वस्त्रे विणण्यासाठी ही सुते वापरतात. विणकाम करताना ताण्याच्या सुतावर अधिक ताण येतो. त्यामुळे ताण्याचे सूत सर्वसाधारणपणे अधिक बळकट असते. शिवाय घर्षणाचा परिणाम होऊ नये म्हणून ताण्याचे सूत मऊ व एकसारख्या जाडीचे असते. त्याला बाण्याच्या सुतापेक्षा अधिक घट्ट पीळ दिलेला असतो. ताण्याचे सूत ताठ राहण्यासाठी त्याला स्टार्चसारख्या द्रव्याची खळ लावतात. यामुळे विणकामात त्याच्यावर पडणाऱ्या ताणांमध्ये टिकून राहण्याएवढे ते बळकट होते. बाण्याच्या सुतावर तुलनेने कमी ताण पडत असल्याने ते काहीसे कच्चे असले तरी चालते.

एकाच वस्त्रातील ताणा व बाणा यांच्या सुतांची जाडी (व्यास) वेगवेगळी असू शकते. यामुळे वस्त्रात उठावदार रेषा निर्माण होतात. ताणा व बाणा यांच्यासाठी भिन्न प्रकारची मिश्र सुते वापरुन किंवा इतर सुतांबरोबर जर वापरुन वस्त्रामध्ये खास परिणाम घडवून आणतात. सुयांच्या यांत्रिक विणकामात वापरावयाच्या सुतांना सैलसर पीळ दिलेला असतो. कारण ही वस्त्रे मऊ असतात.

हाती विणकामाची सुते : हाताने सुयांचे विणकाम करताना साधारणपणे दोन किंवा अधिक पदरी सूत वापरतात. हे सूत वजनाला हलके ते मध्यम असून त्याचा व्यास एकसारखा असतो. जर्मनटाऊन नावाची सुते स्वेटर व ब्लँकेटे सेटलँड लोकरीचे धागे, मुलांचे उठावदार व मऊ स्वेटर, कपडे व शाली यांसाठी वापरतात. वर्स्टेड धागा म्हणजे लोकरीच्या लांब तंतुखंडापासून कातलेला धागा स्वेटरसाठी, तर झेफूर धागा वजनाला हलक्या अशा कपड्यांसाठी वापरतात.

हाताने करावयाच्या व रेशमाच्या भरतकामासाठी रेशमाचे वा रेयॉनाचे कमी पीळ दिलेले सूत   वापरतात. हातांनी करावयाच्या लोकरीच्या विणकामासाठी म्हणजे क्रोशा कामासाठी पुष्कळदा कापसाचे रज्जूसारखे सूत वापरतात. रफू करण्यासाठी सामान्यपणे सैलसर कताई केलेले सूत वापरतात.

शिवणकामाचा दोरा : हा दोरा मऊ, घट्ट पीळ दिलेला व वर्तुळाकार छेदाचा असतो. यामुळे शिवणकामात घर्षण कमी होते. दोरा पुरेसा लवचिक असल्यास शिवण चांगली येते. धुलाई व इस्त्री करताना टिकून राहण्याइतपत तो बळकट असतो. कताईनंतर सुतावर संस्करण करुन जलप्रतिसारक सुते तयार करतात व ती रिळावर गुंडाळतात. रिळावर शेवटी बहुधा सुताची लांबी दर्शविलेली असते. सुती दोरा आकुंचन पावतो, मात्र कृत्रिम धागा आकुंचन पावत नाही.

मापन पद्घती : सुताची प्रत (माप) अंकाने दर्शवितात. या अंकाने सुताची लांबी व वजन यांच्यातील परस्परसंबंध दर्शविला जातो. कापूस, लोकर, ताग यांचे सूत व शिवणकामाच्या दोऱ्यासारखे घट्ट पीळ दिलेले सूत यांची प्रत दर्शविण्यासाठी भिन्न प्रमाण पद्घती वापरतात. यामुळे त्यांच्यात एकसारखेपणा नसतो.

अप्रत्यक्ष पद्घती : या पद्घतीत एका एकक वजनाच्या सुताची लांबी अंकाने दर्शवितात. हा अंक जेवढा जास्त तेवढे सूत अधिक बारीक असते. उदा., १ पौंड वजनाच्या जाड सुताची लांबी एक पौंड बारीक सुताच्या लांबीपेक्षा कमी असते. व्यापकपणे वापरल्या जाणाऱ्या काँटिनेंटल (यूरोपीय) पद्घतीत, किग्रॅ. वजनात बसणाऱ्या सु. १,००० मी. लांबीच्या लडींची व आटींची (हँकची) संख्या या अंकाने दर्शवितात. सामान्यपणे कापूस, लोकर, लिनन इ. सुतांसाठी ही पद्घत वापरतात. मेट्रिक पद्घतीत १ ग्रॅ. वजनाच्या सुताची मीटरमधील लांबी या अंकाने दर्शवितात.

डेनियर पद्घत : ही पद्घत रेशमी व कृत्रिम तंतूंच्या सुतांसाठी वापरतात. या पद्घतीत सुताची लांबी स्थिर असते म्हणजे त्याचे वजन बदलणारे असते. ९,००० मी. लांब सुताचे ग्रॅममधील वजन डेनियर या एककाच्या अंकाने दर्शवितात. उदा., ९,००० मी. सुताचे वजन १०० ग्रॅ. भरले, तर त्याचा डेनियर अंक (D) १०० येईल. हे सूत २० डेनियर अंकाच्या सुताच्या तुलनेत बरेच जाड असेल, म्हणजे डेनियर अंक जेवढा कमी तेवढे सूत अधिक बारीक असते. यूरोपमध्ये पीळ दिलेल्या व पीळ न दिलेल्या कच्च्या अशा दोन्ही रेशमी सुतांसाठी ही पद्घत वापरतात. डेनियर हे फ्रेंच नाणे असून त्याचे वजन सु. ५० मिग्रॅ. असते.

रेशमी सुतासाठी औंस व ड्राम पद्घतीही वापरतात. औंस पद्घतीत एक औंस म्हणजे सु. २८·३ ग्रॅ. वजनाच्या रेशमी सुताची लांबी वारमध्ये (१ वार = ०·९ मी.) दिलेली असते. सामान्यपणे १ औंस वजनात सु. २०,००० वार रेशीम बसते. ड्राम पद्घतीत १,००० वार रेशमी सुताचे वजन ड्राम या एककात देतात (१ ड्राम = १/१६ औंस = १·७७१ ग्रॅ.). १,००० वार रेशमी सुताचे वजन ४ ड्राम भरल्यास त्याची प्रत वा अंक ४ ड्राम समजतात.

टेक्स पद्घत : ही पद्घत १८७३ मध्ये तयार झाली. ती तंतुखंड सुतासाठी तयार केली होती व ती तंतूंपासून बनविलेल्या सुतांसाठीही वापरतात. या पद्घतीत १ किमी. (सु.३, ३०० फूट) सुताचे वजन ग्रॅममध्ये देतात. टेक्स हे सुताच्या सूक्ष्मतेचे (बारीकपणाचे) एकक आहे. टेक्स अंक जेवढा कमी तेवढे सूत अधिक बारीक असते.

पहा : कापड उद्योग काथ्या कापूस चरखा तंतु, कृत्रिम तंतु, नैसर्गिक ताग दोरा – २ रेशीम लिनन लोकर वस्त्रे विणकाम सूतकताई.

संदर्भ : 1. Cook, J. Gordon, Handbook of Textile Fibres : Science and Technology, 2 Vols., 1984.  

    2. Happey, F. Ed., Contemporary Textile Engineering, 1982.  

    3. Hatch, K. H. Textile Science, 1993.

    4. Jerde, Judith, Encyclopaedia of Textiles, 1992.

    5. Joseph, M. L. and others, Joseph’s Introductory Textile Science, 1992.  

    6. Mark, H. F. Atlas, S. M. Cernia, E. Eds., Man-Made Fibers : Science and Technology, 3 Vols., 1967-68.

    7. Tubbs, M. C. Daniels, P. N. Eds., Textile Terms and Definitions, 1991.

    8. Wulfhorst, B. Gries, T. Veit, D. Textile Technology, 2006.

ठाकूर, अ. ना.