बैलगाडी :  कृषिप्रधान देशांत शेतमालाची शेतातून घरापर्यंत, शहरातील बाजारपेठेत, तसेच बाजारपेठेतुन गुदामे, रेल्वे व बस स्थानके आणि बंदरे यापर्यंत, तसेच दुकानांतून ग्राहकाच्या घरापर्यंत लहान प्रमाणात कमी अंतरापर्यंतच्या मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणारे बैलासारख्या प्राण्याच्या शक्तीद्वारे ओढले जाणारे वाहन म्हणजे बैलगाडी होय. बैलगाडीचा उपयोग खेड्यांतून अद्यापही माणसांची ने-आण करण्यासाठी काही प्रमाणात करण्यात येतो. त्याचप्रमाणे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खते, अवजारे, इ. ची बाजारपेठेतुन शेतकऱ्याच्या घरापर्यंत, तसेच शेतापर्यंत वाहतूक करण्यासाठीही बैलगाडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यांशिवाय करमणुकीकरिता शर्यतीसाठीही बैलगाडीचा वापर करण्यात येतो. भारतासारख्या देशातील रस्त्यांचे स्वरूप, प्रकार, रूंदी, चढ-उतार, आदी बाबींच्या दृष्टीने पाहता बैलगाडीसारखे अन्य पर्यायी वाहन नाही. प्रादेशिक पसिस्थिती व उपलब्धता यांनुसार हे वाहन ओढण्यासाठी बैल, रेडे, उंट, खेचरे, घोडे, आदी प्राण्यांचा वापर करण्यात येतो तथापि जास्त करून बैलांचाच वापर त्यासाठी करण्यात येतो.

भारतासारख्या देशात रेल्वेमार्ग व चांगले रस्ते पुरेसे नाहीत त्यामुळे ग्रामीण भागात वाहतुकीसाठी रेल्वे, मोटार, ट्रॅक्टर, आदींचा म्हणावा तसा वापर होत नाही. कच्च्या रस्त्यांवर, दुर्गम भागातील चढ-उताराच्या वेड्यावाकड्या कच्च्या रस्त्यांवर, तसेच शेतातून बैलगाउीखेरीज वाहतुकीसाठी दुसारा पर्याय नाही. अशा भागांत व रस्त्यांवर पावसाळ्यात बैलगाडींखेरीज अन्य साधनांचा उपयोग करणे शक्य होत नाही. यांत्रिक वाहनांवरील गुंतवणूक, बिघाड, दुरूस्तीचा खर्च, आवाज, धूर प्रदुषण इ. चा बैलगाडीच्या बाबतीत त्रास उद्‌भवत नाही. तिची दुरूस्ती आदी बाबी स्थानिक पातळीवर सहज होऊ शकतात. खनिज तेलाची समस्या, त्याचा अपुरा पुरवठा व त्यांच्या वाढत्या किंमती यामुळे सध्या बैलगाडीला परत खुप महत्व येऊ लागले आहे.

भारतात १९८० मध्ये बैलगाड्यांची संख्या सु. १,३० कोटी इतकी होती व त्या खेचण्यासाठी एकूण गुंतवणूक (बैलाच्या किंमतीसह) सु. ३० अब्ज रूपयांची असून त्यातमूध सु. ४१ कोटी टन मालाची वाहतूक केली जाते. याउलट रेल्वेत सु. ५० अब्ज रूपयाची आणि मालमोटार वाहतुकीत सु.२५ अब्ज रूप्यांची गंतवनूक असून त्यामधून अनुक्रमे सु. २३ कोटी टन मालाची वाहतुक होते. बैल गाडीतील गुंतवणूक पूर्णतः खाजगी स्वरूपाची आह. मालमोटार वाहतुकीमुळे सु. २ कोटी लोकांना रोजगार मिहतो. एका बैलामुळे सु. १/२ अश्वशक्ती एवढी उर्जा मिळते. मात्र बैलगाडीची मालवाहतुकीची मर्यादा सु.८-१६ किमि. एवढी असूनही ग्रामीन भागातील सु. ९५टक्के मालाची वाहतूक बैलगाड्यतुन केली जाते.

ग्रामीण अर्थवस्थेतील बैलगाडीचे स्थान लक्षात घेता १९८०सालापर्यंतच्या पंचवार्षिक योजनांमध्ये तिला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले नव्हते.

इतिहास : बैलगाडीचा शोध कधी लागला हे निश्चित ज्ञात नाही तथापि इ. स. पू. ३५०० च्या सुमारास प्राचीन सुमेर देशात चार चाकी

आ. १. मोहें-जो-दडो येथील उत्खननास आढळलेली बैलगाडीची प्रतिकृती.


बैलगाड्यांचा वापर होत होता. अशाच तऱ्हेच्या बैलगाड्यांचा वापर ह्यानंतर सु. ५०० वर्षानंतर ऍसिरियात झाला. इ. स. पू. २५०० च्या सुमारास सिंधू खोऱ्यात व युफ्रेटीस नदीच्या परिसरात बैलगाड्यांचा वापर सुरू झाला. ह्या साऱ्या गाड्यांची चाके भरीव होती. सिंधू खोऱ्यातील. मोहें-जो-दडो व इतरत्र झालेल्या उत्खननात सापडलेल्या खेळण्यासारख्या बैलगाडीच्या पगतिकृतावरून तत्कालीन बैलगाडीची कल्पना येते. सध्या महाराष्ट्रात व इतरत्र दगड व शेतमाल वाहतूक करण्यासाठी अशा तऱ्हेच्या बैलगाड्या काही ठिकाणी वापरात आहेत, असे आढळुन आले आहे. या गाडीला `गाडा’ असे म्हटले जाते. या गाड्याच्या चाकांना लोखंडी धावा नव्हत्या. मोहें-जो-दडो काळातील गाडीची साटी (सांगाडा) दोन वक्राकृती दाड्याना तीन आडव्या दांड्या बसवून तयार करण्यात येत असे. चाके जाड, लाकडी व भरीव रचनेची असत. तीन लाकडी फळ्या एकमेकींना जोडून व नंतर कोरून चाक तयार केले जात असे.

बैलगाड्यांचा इ. स. पू. काळातच जगभर झाला होता. इ. स. पू. २००० च्या काळात दक्षिण रशिया व) क्रीट इ. स. पू. १६००च्या काळात ईजिप्त व पॅलेस्टाइन. इ. स. पू. १५०० च्या सुमारास ग्रीस. इ. स. पू. १००० च्या सुमारास इ. स. पू. ५०० च्या सुमारास ब्रिटनमध्ये बैलगाडीचा वापर सुरू झाला.

इ.स.पू. २००० च्या सुमारास जरी आरेयुक्त चाकांचा शोध लागलेला होता, तरी बहुतेक सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या बैलगाड्यांना भरीव चाकेत असत. बहुधा इ.स.पू. १५०० नंतरच्या काळात आरेयुक्त चाकांचा वापर शेतकरी करू लागले असावेत. रोमन साम्राज्य काळातील शेतकरी बहुतकरून चार चाकी बैलगाडीचा वापर शेतमाल व अवलड माल यांच्या वाहतुकीसाठी करीत असत. इ. स. पु. चौथ्या शतकात ग्रीसमधील शेतकरी शेतमालाच्या वाहतुकीसाठी दोन चाकी बैलगाड्यांचा वापर करू लागला असावा. या बैलगाड्यांची साटी फळ्यांची असून सुताराकडून बांधून घेतली जात असे किंवा विशिष्ट आकारमानाची वेताची टोपली साटी म्हणून वापरली जात असे. खेचण्यासाठी दोन बैल वा दोन खेचरे वापरीत असत.

इसवी सनाच्या दहाव्या – बाराव्या शतकाच्या कालावधीत गाडीला घोडे जुंपण्याची सोयीस्कर पद्धत निघाल्याने उत्तर युरोपात व ब्रिटनमध्ये गाडीला जोडण्यासाठी बैलांच्याऐवजी घोड्यांचा वापर हळुहळू होऊ लागला. तथापि जवळजवळ पंधराव्या शतकापर्यंत युरोपच्या बहुतेक भागातील शेतकरी शेतमालाच्या वाहतुकीसाठी चारचाकी बैलगाड्यांचा वापर करीत असत. विसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत तरी अशा बैलगाड्यांचा वापर स्पेन, इटली, सार्डिनिया, तुर्कस्थान या देशांतील शेतकरी करीत असत. काही प्रमाणात दोन चाकी बैगाड्यांचा वापर देखील युरोपमध्ये होत असे.

अमेरिकेत वसाहतीसाठी गेलेल्या सुरूवातीच्या युरोपियन लोकांनी चारचाकी बैलगाडीचा वापर केला होता. ह्या गाड्यांना चटयांची मोठी छपरी असे व गाडी ओढण्यासाठी चार ते सहा बैल जोडले जात असत. पुढे अशा गाड्यांना बैलाऐवजी घोडे जोडण्यात येऊ लागले. अशीच स्थिती अफ्रिकेतील वसाहतींमध्ये होती.

एक बैलाची गाडी (छकडा वा एक्का) इ. स. पहिल्या – दुसऱ्या शतकात इटली व चीन मध्ये प्रथम वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. तथापि दोन दांड्यांमध्ये एक बैल जुंपण्याची पद्धत युरोपमधील शेतकऱ्यांनी फारशी स्विकारली नाही मात्र अद्यापही पुर्वेकडील देशांतून ह्या एक बैलाच्या गाड्यांचा वापर करण्यात येतो.

रचना : सर्वसामान्य बैलगाडीच्या रचनेचे वर्णन खाली दिलेले आहे. मात्र या रचनेत प्रदेशानुसार आणि स्थानिक परिस्थितीनुसार विविधता आढळून येते. तसेच गाडीच्या विविध भागांची नावे निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळी वापरली जातात. खाली दिलेल्या वर्णनातील नावे केवळ वर्णनाच्या सुलभतेकरीता प्रातिनिधिक म्हणून वापरली आहेत.

दोन बैलांच्या गाडीचा मुख्य भाग म्हणजे लोखंडी कणा (आस). हा कणा चौकोनी लाकडी मोठ्या ठोकळ्यात (कणापेटीत) हालू शकणार नाही असा बसवितात. ठोकळ्यात असलेला कण्याचा भाग चौकोनी असतो, तर ठोकळ्याच्या दोन्ही बाजूंना कण्याचा बाहेर असलेला भाग गोलसर (दंडगोलाकार) असतो. ह्या गोलाकार भागाची लांबी चाकाच्या तुंब्याच्या जाडीवर व गाडीच्या लांबीवर अवलंबून असते. बाहेर आलेल्या भागाच्या दोन्ही टोकांना एक उभे छिद्र असते. या छिद्रात लोखंडी कुणी अडकविता येते,त्यामुळे चाफ कण्यातून सुटू शकत नाही. कणापेटीत कणा बसविल्यानंता तिच्या सुरक्षितेसाठी क्वचचित U या इंग्रजी अक्षराच्या आकाराची लोखंडी पट्टी नट-बोल्टच्या साहाय्याने तिच्यावर बसवितात. या कणापेटीवर गाडीची साटी जोडलेली असते. साटीच्या लांबीमुळे व कण्याच्या लांबीमुळे गाडीचा ⇨गुरूत्वमध्य चाकांमध्ये राहतो आणि त्यामुळे गाडी कोलमडत नाही. साटीची चेकट जाड लाकडांची असते. साटी ही मूळ चार लाकडांची असते. त्यांपैकी मागच्या व पुढच्या लाकडांस ‘करळी’ (किवा तरसे) म्हणतात व बाजूच्या लाकडास ‘भाल’ म्हणतात.


भालाच्या चारी कोपऱ्यांस टोकापासून थोड्या अंतरावर चार चौकोनी भोके असून त्यांत करळ्या घट्ट बसवितात. अशा प्रकारे साटीची

आ. २. बैलगाडीची रचना : (अ) साटी : (१) करळी, (२) ढकली, (३) भाल (बाजू), (४) पाते, (५) खुटले (किंवा करळे), (६) लोखंडी गज, (७) फळ्या, (८) वंगणाचा नळा, (९) वंगणाकरिता फडके बांधलेली तार (आ) पुढून दिसणारा भाग : (१) जू, (२) चौराडी गाठ, (३) खीळ (जुपणी), (४) दांडी, (५) आळदांडी, (६) कणा, (७) कुणीसाठी खाच, (८) कणापेटी, (९) माल खिळा, (१०) बुटे, (११) साटीसाठी खाच, (१२) बुटे-वेटण, (१३) पिळकावणी (इ) चाक : (१) धाव, (२) पाटा, (३) आरे, (४) तुंबा (मणी), (५) अंबवण.

चौकट तयार होते. या चौकटीत करळ्यांस समांतर अशी पण करळ्यांपेक्षा कमी जाडीची चार लाकडे भालाला घट्ट जोडलेली असतात. त्यांना ‘तरसे’ (किंवा पोट तरसे) म्हणतात. तसेच मागे व पुढे दोन नटांसारखी लोखंडी गज बोल्टांनी घट्ट बसविलेली असतात. करळ्यांमध्ये पण तरसावर लाकडी फळ्या वा बांबू (अखंड वा कांबी) बसवून बसण्यासाठी, तसेच माल ठेवण्यासाठी बैठक तयार करतात. भालाच्या वरच्या बाजूंस दोन उभ्या चौकटी असतात. त्यांना ‘बावखड’ वा ‘बावकड’ म्हणतात. भालाला समांतर अशा दोन पट्‌ट्या वावखड्याच्या वरील बाजूंस असतात, त्यांस पाते म्हणतात. काही बैलगाड्यांत भाल व पाते ही उभ्या एकाआड एक लाकडी खुटल्यांनी (किंवा करळ्यांनी) व लोखंडी गजांनी जोडलेली असतात तसेच एकाआड एक लाकडी खुटल्याचा वरील भाग पात्याच्या वर व खालील भाग भालाच्या खाली थोडासाच आणलेला असतो. त्याचा उपयोग गाडीतम माल अथवा वैरण ठेवलयावर ती कासऱ्याने अथवा चऱ्हाटाने बांधण्यात होतो. मागील खुटल्याला बांबूचा बनविलेला वंगणाचा नळा बांधलेला असतो. या नळ्यात वंगण आणि ते घालण्यास लागणारी फडके बांधलेली तार असते.एका जाड लाकडात कणा घट्ट बसेल अशी खोबण केलेली असते. या लाकडाला ‘कणापेटी’ म्हणतात. या खोवणीत कण्याचा भाग चौकोनी असून त्याला काही अंतरावर भोके असतात व खोबणीच्या बाहेरील भाग गोल व गुळगुळीत असतो. या गुळगुळीत भागांच्या टोकांना भोक असते. चाक गोल भागावर बसवितात व ते निघू नये म्हणून कण्याच्या टोकावरील भोकांत कुणी बसवितात.कणापेटीवर एक लाकडी ठोकळा असतो व त्याला ‘बुटे’ म्हणतात. ह्या ठोकळ्यास खालील बाजूस ∩ अशा आकाराच्या दोन खोबणी असतात. तसेच याच्या उलट्या आकाराच्या दोन खोवणी असतात. कणापेटीत कण्याला बुट्याच्या खोबणीतील दोन भोके असतात व कणापेटी दोन लोखंडी पाचरींनी (भाल खिळ्यांनी) घट्ट बसवितात. ह्या पाचरी बुट्याच्या खोबणीतून व कण्याच्या भोकातून आरपार जातात. बुट्याकडील पाचरीचा भाग वाकविलेले असतो. काही वेळा पाचरीऐवजी नट-बोल्ट वापरतात.

बुट्याच्या वरील बाजूस असलेल्या खोबणीत साटीचे भाल बसवितात व ते नट-बोल्टने आवळून घट्ट करतात. बुट्याच्या मधल्या भागात मध्यभागाच्या दोन्ही बाजूंस दोन भोके असून त्यांत दोन जाड बांबू बसवितात त्यांस ‘दांड्या’ म्हणतात. बुट्याच्या मागील बाजूस असलेला दांड्याचा भाग जाड असतो व तो उभ्या पाचरीने घट्ट बसवितात. करळीच्या मध्यभागात थोडी खाली जाईल अशी बांबूची आळदांडी बसवितात. खाली गेलेल्या आळदांडीच्या टोकाला एक खिळा उलटा बसवितात. पुढील गेलेल्या आळदांडीच्या टोकाला एक खिळा उलटा ठोकतात. पुढील करळीजवळ एक तारेचे कडे असते. ही तार साटी, दांड्या आणि आळदांडी यांना घट्ट बसविते. तार घट्ट बसण्यासाठी आळदांडीचा खिळा उपयोगी पडते. आळदांडी या स्थितीत व दुसऱ्या बाजूस उभी असते, ती खाली दाबतात व जेथे दांड्यांवर टेकते तेथे एक आडवे लाकूड बसवितात त्यास ‘जू’ (किंवा जोखड) म्हणतात. आळदांडी, दांड्या व जू चऱ्हाटाच्या ‘चौराडी’ (चवराडी) गाठीने बांधतात व चऱ्हाट दंडीवर फुली करून मागे नेऊन बुट्याला गुंडाळतात. त्याला ‘बुटे-वेटण’ म्हणतात. पुढील करळीच्या खाली येणारे चऱ्हाटाचे दोन्ही पदर लहान दांडूच्या साहाय्याने पिळतात. त्याला ‘पिळकावणी’ म्हणतात. जुवाचा उपयोग गाडीस बैल जोडण्यासाठी (जुंपण्यासाठी) करतात. जुवाच्या दोन्ही टोकांस काही अंतरावर दोन भोके असतात. त्यांपैकी कडेच्या भोकात उभी खुटली (लाकडी अथवा लोखंडी) बसवितात, तिला ‘जुंपणी’ असे म्हणतात. या जुंपणीमुळे बैल जुंपलेल्या स्थितीत जुवाच्या बाहेर जाऊ शकत नाही. जुवाच्या दुसऱ्या भोकामध्ये ‘आरूशा’चे (वादीचे) एक टोक बांधतात व त्याचे दुसरे टोक बैल जुंपल्यानंतर गळ्या खालून घेऊन जुंपणीस बांधतात. काही वेळा जुवाला जुंपणीऐवजी लोखंडी बारीक गोल कड्या असतात. त्यांचा उपयोग आरूशे बांधण्यासाठी करतात. काही बैलगाड्यांना आळदांडी जुवाच्या पुढे घेऊन खाली वाकवलेली असते. त्याचा उपयोग गाडी सहज उभी करण्यासाठी होतो. बैल जुंपलेल्या स्थितीत असलेल्या उंचीला गाडी उभी करण्यासाठी दोन काठ्या साखळीने जोडलेल्या असतात, त्यास ‘शिपाई’ म्हणतात. कणापेटीच्या बाहेर आलेल्या कण्याच्या भागावर चाक बसवितात. चाकाचे प्रमुख भाग म्हणजे तुंबा (मधी), आरे, पाटा व लोखंडी असून तो मृदंगासारख्या आकाराचा असतो. त्याच्या मध्यभागी कण्याच्या आकारापेक्षा मोठे छिद्र असून त्यात अंबवन (आमण) हा लोखंडाचा पोकळ भाग बसविलेला असतो. यातच कणा असतो. कणा व अंबवन यांत गाडी चालू असताना, तसेच ती स्थिर असतानाही वंगणक्रिया करता येईल एवढी जागा असते. तुंब्याच्या मध्यभागी व वरती आरे बसविण्यासाठी खोबणी असतात. या खोबण्यांत आऱ्याचे एक टोक घट्ट

 आ. ३. बौलगाड्यांचे व त्यांच्या चाकांचे काही प्रकार : (१) महाराष्ट्रातील त्रिज्यीय आऱ्यांच्या चाकांची गाडी, (२) आरेरहित भरीव चाकांची गाडी (रांची जिल्हा, बिहार), (३) त्रिज्यीय आऱ्यांच्या चाकांची गाडी (तिरुचिरापल्ली जिल्हा, तमिळनाडू), (४) त्रिज्यीय आऱ्यांचे चाक (पालघाट जिल्हा, केरळ), (५) त्रिज्यीय आऱ्यांचे चाक व कण्याला जोडलेली दांडी (जुनागड जिल्हा, गुजरात), (६) आऱ्यांच्या चार जोड्या सलेले चाक (अहमदबाद जिल्हा, गुजरात), (७) कण्याला जोडलेली वैशिष्ट्यपूर्ण दांडी (भरतपूर जिल्हा, राजस्थान), (८) आऱ्यांच्या सहा जोड्या असलेल्या चाकांची गाडी (सिंगभूम जिल्हा, बिहार), (९) लहान आकारमान, आखूड आरे व रुंद पाटा असलेले चाक (जैसलमीर जिल्हा, राजस्थान), (१०) जाड त्रिज्यीय आऱ्यांचे चाक व वर वक्राकार बैठक असलेली गाडी (चितोडगड जिल्हा, राजस्थान).

बसवितात व दुसरे टोक पाट्यात घट्ट बसवितात. पाट्याची रूंदी हा वेगवेगळ्या प्रदेशांत निरनिराळी असते. पाटा अखंड लाकडाचा बनवीत नाहीत. या पाट्यावर लोखंडी घाव बसवितात. घाव प्रथम तापवून लालभडक करतात व त्याच स्थितीत तो पाट्यावर बसवितात व लगेच त्यावर थंड पाणी ओतून ती थंड करतात. यामुळे घाव पाट्यावर घट्ट बसते. तापविण्यापूर्वी घावेचा व्यास चाकाच्या व्यासापेक्षा किंचित कमी असतो. तुब्याच्या दोन्ही तोंडास अखंड लोखंडी पट्‌ट्या सुरक्षिततेसाठी लावतात, त्यांस ‘बंद’ म्हणतात. पुढील करळीजवळ घट्ट केलेल्या तारेच्या कड्यात करळीला समांतर असा एक बांबू बसवितात, त्याला ‘ढकली’ असे म्हणतात. बैल जुंपलेल्या स्थितीत असताना तो चाकात येऊ नये म्हणून ढकलीचा उपयोग होतो. अशाच तऱ्हेचा एक बांबू मागील बाजूस असतो. तो साटीच्या खाली व चाकाजवळ असतो. पळत्या गाडीचा वा उतारास लागतेल्या गाडीचा वेग कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. छकड्याच्या जुवाला दोन्ही बाजूंना वासे वा सर (दांड्या) जुवातच घट्ट बसवितात. ह्या दांड्या साटीच्या कडेला करळीशी घट्ट बसविलेल्या असतात. छकड्याची बाकी सर्व रचना दोन बैलांच्या गाडीप्रमाणेच असते. मात्र तो आकारमानाने लहान असतो. बैलगाडीतील मालाचे, तसेच माणसांचे ऊन-पावसापासून संरक्षण होण्यासाठी बांबू ∩ अशा आकारात वाकवून बावखड्याला दोरीने घट्ट बांधतात, आणि त्यावर उपलब्धतेनुसार बांबूचा तट्‌ट्या, ताडपत्री, किंतान, प्लॅस्टिकची चारद इ. बांधतात. शर्यतीसाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीची रचना वरीलप्रमाणेच असते. मात्र ती वजनाला हलकी असते. देश वा विभागपरत्वे चाकाचा व्यास, साटीची लांबी-रूंदी यांत फरक आढळतो. हा फरक मुख्यत्वेकरून स्थानिक परिस्थिती, बैलांची उंची, भौगोलिक रचना इ. कारणांनी आढळतो. चाकांबाबत महाराष्ट्रापुरता विचार करता कोकण, चंद्रपूर, भंडारा या भागांत लहान व्यासाची चाके आढळतात. कोल्हापूर भागातील चाके सु. १५० सेंमी. व्यासाची असतात, तर साटीचा रूंदी ८० सेंमी आणि लांबी २१० सेंमी असते. सांगली व सातारा जिल्ह्यांचा दक्षिण भाग येथे चाकाचा व्यास सु. १३५ सेंमी असतो, तर पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापुर, औरंगाबाद, उस्मानाबाद या भागांत चाकाचा व्यास सु. १२० सेंमी. आणि साटीची रूंदी ७५-१०० सेंमी. व लांबी १७०-२२० सेंमी. पर्यंत असते. नायिक, खानदेश, बुलढाणा, अकोला, परभणी, या भागांतील चाकाचा व्यास सु. ११५ सेंमी., तर नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नांदेड, परभणी या भागातील चाके मध्यम उंचीची असतात. गुजरातमधील गाडीची साटी पुढे अरूंद (३० सेंमी.) व मागे रूंद (१२० सेंमी.) असते आणि साटीची लांबी २४०-३४० सेंमी पर्यंत असते. गुजरातच्या काही भागांत व कर्नाटक-आंध्रमधील गाड्यांची साट लंब आयताकृती व चाके उंच असतात. चाकांचे मुख्यत्वे तीन प्रकार आढळतात : (१) भरीव : ही अतिप्राचीन काळापासून वापरात आहेत. ही चाके आकारमानाने लहान (९०-१०० सेंमी. व्यासाची) असतात. तीन जाड फळ्या एकमेकींना जोडून व मध्यभागी फुगवट्याचा आकार आणून ही चाके करतात. यांची धाव जाड असते. बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक व उत्तर प्रदेश या राज्यांतील काही भागांत अशा बैलगाड्या आढळतात. (२) तुंबा, आरे व पाटायुक्त : यांत पाट्याच्या बाहेर धाव चढवलेली असते. आऱ्यांची संख्या १२ असते. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांत अशा चाकाच्या गाड्या आढळतात. (३) जोड आऱ्यांची चाके : उ. गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, काश्मीर, ओरिसा, बिहार, प. बंगाल, मणिपूर, अरूणाचल प्रदेश इ. राज्यांत अशा चाकांचा वापर बैलगाडीसाठी करतात. जोड वा समांतर आरेही चाकांना वापरतात. साधारणतः आऱ्यांच्या तीन जोड्या तुंब्यातून आरपार जाऊन दोन्हीकडे पाट्याला जोडतात. मात्र जोड्या समान नसतात. त्या उतरत्या जाडीच्या असतात. बाकी रचना (२) प्रमाणेच असते. उत्तर भारतातील चाकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कणा तोलून धरण्यासाठी चाकाच्या बाहेरील बाजूंस केलेली व्यवस्था. साटीला दोरांनी बांधलेला एक जाड आडवा लाकडी दांडा कण्याच्या टोकावर बसवितात. या दांड्याचे आकार विविध असतात व तो अखंड वा तुकडे जोडून तयार केलेला असतो. विकास व सुधारणा : बैलगाडी बांधण्याचे वा तयार करण्याचे काम स्थानिक सुतार व लोहार हे करीत असत. भारत, युराप-अमेरिकेत हीच परिस्थिती होती (भारतात अद्यापही बहुतेक ठिकाणी हे काम स्थानिक कारागीरच करतात). गाडीच्या बांधणीत वा रचनेत ह्या स्थानिक कारागिरांनी अनुभवाने व परंपरेने जे काही बदल घडवून आणले असतील तेवढाच विकास बैलगाडीच्या उदयानंतरच्या शेकडो वर्षाच्या काळात घडून आला. हे बदल विशेषत्वाने प्रदेशपरत्वे आकारात व रचनेत झालेले आढळून येतात. बैलांऐवजी घोड्यांचा वापर सुरू झाल्यामुळे व पुढे एकोणिसाव्या शतकात अंतर्ज्वलन-एंजिन (ज्यात आतच इंधन जाळण्याची व्यवस्था केलेली असते असे एजिन) मोठ्या प्रमाणात वापरात आल्यामुळे युरोपमध्ये बैलगाडीच्या विकासासंबंधी फारसा विचार केलार गेला नाही.

भारतात १९३० च्या सुमारास डनलॉप कंपनीने बैलगाडीसंबंधी संशोधन करून टायर व हवायुक्त रबरी कडे (ट्यूब) बसविलेलया चाकांची गाडी तयार केली. या गाडीची चाचणी घेण्यात येऊन तिचा अहवाल सप्टेंबर १९३४ च्या इंडियन ॲग्रिकल्चर अंड लाइव्हस्टॉक  या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला. तथापि त्यो वेळेची ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती व गाडीची किंमत यांमुळे या प्रकारच्या गाड्या फारशा प्रचरात येऊ शकल्या नाहीत. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या मुख्य कृषी अभियंत्यांनी धारवेयुक्त (चाक व कणा यांतील घर्षण कमी करणाऱ्या व चाकाला देणाऱ्या भागाने युक्त) या मोठ्या व्यासाच्या चाकांची जोडी बैलगाडीसाठी तयार केली व तिचा प्रचारही केला. तथापि अशी चाके फारशी उपयोगात आली नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळात इंपिरियल कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने व नंतर तिचे नामांकरण झालेल्या इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेने बैलगाडीच्या संशोधनाला प्रोत्साहन दिले होते व १९४७-४९ या काळात एक प्रकल्प पुण्याच्या अभियंत्रिकी महाविद्यालयाकडे सोपविण्यात आला होता.

जागतिक खनिज तेल समस्येमुळे १९७३ नंतर ग्रामीण भागात वाहन म्हणून बैलगाडीला परत महत्व आले आहे. तिच्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न कृषिविद्यापीठे, अभियांत्रिकी संस्था व इतर तत्सम संस्था यामधून संशोधनात्मक प्रयत्न होत आहेत.


केंद्र सरकारने बैलगाडीत सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली आहे. या समितीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (बंगलोर), सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट व केंद्रीय कृषी मंत्री यांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेला १९७५ मध्ये केंद्रीय व १९७८-७९ मध्ये केंद्रीय सरकारच्या विज्ञान व तंत्र विद्या खात्याने आणि केंद्रीय जहाज व वाहतुक मंत्रालयानेही आर्थिक साहाय्य केले. या संस्थेने देशाच्या विविध कृषिविभांगासाठी तसेच मालवाहतुकीच्या गरजेसाठी बैलगाडीच्या रचनेचे विविध नमुने तयार करण्याचे ठरविले आहे. त्यांपैकी तीन नमुने चाचणी घेण्यासाठीइतर काही संस्थांकडे दिलेले आहेत (या नमुन्यासंबंधी थोडी तपशीलवार माहिती पुढे दिली आहे). संस्थेने सर्वसाधारणतः गाडीची हालचाल सुलभ होणे, कमी वजनाचे जू, तिसऱ्या चाकाचा अंतर्भाव, सुधारित धारवे इ. महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या आहेत. सिंडिकेच बँक, स्टील ॲथोरिटी ऑफ इंडिया आणि उत्तर प्रदेश सरकार यांनीही सुधारित बैलगाडीच्या रचनेसाठी पारितोषिके जाहीर केलेली आहेत. मालवहनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रथम डनलॉप कंपनीने बैलगाडीत सुधारणा केल्या. खास तयार केलेला टायर व रबरी कडे, रूळ धारवे, सुधारित तुंबा व कणा, हलकी साटी इ. सुधारणा या कंपनीने केल्या. अशा गाड्यांची निर्मिती स्थानिक कारागिरांकडून देशाच्या निरनिराळ्या भागांत कंपनीने करून घेतली आहे. अशा गाडीमुळे मालवहनक्षमता ०.७५ टनापासून २.५ टनांपर्यंत व दैनिक उत्पन्न ४० रु. पर्यंत वाढले. अशा स्वरूपाच्या बऱ्याच गाड्या सध्या ग्रामीण व शहरी भागांत वापरात आहेत. बँका यासाठी आर्थिक मदत देण्यास तयार आहेत. ही गाडी सुधारणेतील विशेष महत्त्वाची बाब आहे.

दिल्ली, तमिळनाडू व पंजाब-हरियाणा या राज्यांच्या काही भागांत १९७६ च्या सुमारास चार चाकी गाडी वापरात आलेली असून तिची मालवहनक्षमता सु. ३-४ टन आहे. या गाड्या सामान्यतः शहरी रस्त्यांवर दिसतात. या गाडीमुळे बैलाच्या मानेवर जास्त ताण न पडता गाडीची वहनक्षमता वाढते, असे आढळून आले आहे. मीरत जिल्ह्यात पारंपरिक गाड्यांची जागा आता डनलॉप कंपनीने केलेल्या आराखड्याची सुधारित व एका रेड्याने ओढणाऱ्या गाड्यांनी घेतली आहे. या गाड्या शेतातून कारखान्यापर्यंत सु. २-३ टन मालाची (विशेषतः उसाची) एका वेळी वाहतूक करू शकतात व गुंतवणुकीच्या ४०% उत्पन्न मिळते.

फायरस्टोन कंपनीने १९७६ च्या सुमारास बैलगाडीच्या नेहमीच्या चाकावर असा भरीव रबरी टायर तयार करून बाजारात आणला. कंपनीच्या मते या टायरामुळे गाडीला बसणारे धक्के कमी होतात. बैलाची कार्यक्षमता वाढते, मालवहनक्षमतेत ५०% वाढ होते, रस्त्याची खराबी कमी होते व असा टायर तीन-चार वर्षे टिकतो. जुवापासून बैल अलग न करता कलंडविता येणारी गाडी, तीन चाकी गाडी, ग्रामीण व शहरी भागांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या, गतिरोधनासाठी सुधारित योजना इ. सुधारणा विविध व्यक्तींनी व संस्थांनी संशोधन करून सुचविल्या आहेत. ट्यूब इनव्हेस्टमेंट ऑफ इंडियाच्या ट्यूब प्रॉडक्ट्स या शाखेने सुधारित गाडी तयार केली असून तिचे उत्पादनही सुरू केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बंगलोर), द नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (मद्रास) इ. संस्थाही सुधारित गाडी तयार करण्यासाठी प्रयोग करीत आहेत.

मद्रास येथे १९७८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय पर्यटन व्यवसाय प्रदर्शनात बऱ्याच सुधारित गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यात ट्यूब प्रॉडक्ट्‌सने ३०० किग्रॅ. इतक्या कमी वजनाची एक धातूची गाडी ठेवली होती. पारंपरिक लाकडी गाडीचे वजन सु. ५००-६०० किग्रॅ. असते. धातूची गाडी एक वा दोन बैलांनी ओढता येते. तिला हवायुक्त टायर अथवा नळीचे चाक व त्यावर कठीण रबराची धाव बसविता येते. ती ३-४ टन माल वाहून नेऊ शकते व तिला त्या वेळी सु. २,२०० रु. खर्च येत होता. ही गाडी सहज सुटी करता येते व परत जोडता येते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पुणे येथील कृषि महाविद्यालयाच्या सुधारित कृषी अवजार संशोधन केंद्रातील रा. पि. सांडगे यांनी सुधारित ‘ज्योती’ बैलगाडी अभिकल्पित केली आहे. या गाडीच्या चाकाच्या पाट्यापर U आकाराची लोखंडी धाव बसवलेली असून तिच्यात जुन्या ट्रक टायरापासून तयार केलेले घन रबरी टायर नट-बोल्टने घट्ट बसवितात. याशिवाय कणा व अंबवन यांतील घर्षण कमी करण्यासाठी निमुळत्या रूळ धारव्यांचा उपयोग, वंगणक्रिया, स्वंयचलित गतिरोधकाची, तसेच ऐनवेळी हाताने वापरावयाच्या गतिरोधकाची सोय, बैलाच्या मानेवर ठेवण्यात येणाऱ्या जुवाला जाड अस्तर बसविणे इ. सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व सुधारणांमुळे गाडीची वहनक्षमता २६५% वाढली असून बैलावर कमी बोजा पडून पर्यायाने बैलाचे आयुष्य वाढते, असे आढळून आले आहे.

आ. ४. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेली ‘ज्योती’ बैलगाडी.


सांगली येथील स्कूल ऑफ ॲप्लाइड रिसर्च या संस्थेने ‘बलवान’ या सुधारित बैलगाडीचा अभिकल्प तयार केला आहे. माल व माणसे यांच्या वाहतुकीसाठी ती वापरता येते. ही गाडी संपूर्ण लोखंडाची असून चाकावर सु. २.१ सेंमी. जाडीचा घन रबरी टायर धाव म्हणून वापरलेला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या रस्त्यांवर ही गाडी वापरता येते. हिची मालवाहनक्षमता २-४ टन असून तीमधून १५-२० माणसे वाहून नेता येतात. तिला हातांनी लावता येतील असे दोन गतिरोधक बसविलेले आहेत. ही गाडी खेचताना बैलांना त्रास कमी होऊन त्यांच्या मानेवर कमी भार पडतो बैलांच्या लांबीनुसार जुवाची लांबी कमीजास्त करता येते. याखेरीज या गाडीची सोपी दुरुस्ती व सुलभ देखभाल, प्रशस्त आकारमान, दीर्घकालावधीनंतर वंगण देण्याची आवश्यकता, जास्त उत्पन्न, तसेच प्रचलित गाडीच्या १५-४०% कमी किंमत व ५ पट जास्त आयुष्य इ. वैशिष्ट्ये आहेत. या गाडीच्या अभिकल्पाबद्दल संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या जिनीव्हा येथील वर्ल्ड इंटलेक्च्युल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन या संस्थेचे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे.

याखेरीज राहुरी साखऱ कारखान्याने ऊस वाहतुकीसाठी रबरी टायरांची एक सुधारित बैलगाडी तयार केली असून तीमधून उसाची सु. २.५-३ टन वाहतुक होते. अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यांत्रिकी विभागानेही ‘एकवीरा ‘ ही सुधारित बैलगाड तयार केली आहे.

आ. ५. स्कूल ऑफ ॲप्लाइड रिसर्च (सांगली) या संस्थेने अभिकल्पित केलेली ‘बलवान’ बैलगाडी : (१) गतिरोधक, (२) चाकावरील घन रबरी धाव, (३) तुंबा, (४) गतिरोधक तरफ, (५) अतिरिक्त गतिरोधक तरफ, (६) बैलाच्या लांबीनुसार जुळणी करता येणारे जू.

बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेने ग्रामीण परिस्थितीला उपयुक्त ठरतील अशा सुधारित बैलगाड्यांचे अभिकल्प (आराखडे) तयार केले आहेत. त्यांपैकी पुढील तीन अभिकल्पांचे नमुने तयार करण्यात येऊन त्यांच्या चाचण्याही घेण्यात आल्या आहेत : (१) यात्रा बैलगाडी, (२) मलनाड बैलगाडी व (३) किसान बैलगाडी. (१) यात्रा बैलगाडी : साधारण सुधारित खेड्यात सु. २० किमी. अंतराच्या प्रवासी व १.५ टन मालाच्या वाहतुकीसाठी उपयुक्त. प्रवासी वाहतुकीसाठी काढता घालता येणाऱ्या बैठकीची व्यवस्था बसते. एकावेळी १० मोठी माणसे वा २० लहान मुले यांची वाहतूक करता येते. बैठकी काढून मालाची (विशेषतः नाजूक व नाशवंत) वाहतुक करता येते. चाकाच्या तुंब्याची रचना सायकलीच्या चाकासारखी असून त्याला लोखंडी आरे असतात. धारव्यांमुळे वाहतूक सहज व सुलभ होते. धक्काशोषक स्प्रिंगेचा असून तो जुवाला जोडलेला असतो त्यामुळे बैलांना गाडीला बसणारे हादरे जाणवत नाही. चौकट लोखंडी असून तिच्या खाली स्प्रिंगांचे धक्काशोषक असतात. काढता घालता येणारी छपरी असते. गतिरोधक पोलादी पत्र्याचे व रबरी अस्तराचे असतात. चाकांना रबरी धाव असते. वजन सु. ५०० किग्रॅ. व गाडीची किंमत परिस्थितीनुरूप ४,०००-५,५०० रु. इतकी असते. या गाडीच्या चाचण्या चालू आहेत. (२) मलनाड बैलगाडी : लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मालवाहतुकीसाठी उपयुक्त. ०.५ टनाची वाहतूक होऊ शकते. चाके बाभळीच्या लाकडाची असून तुंबा लोखंडी व दोन भागाचा असून बोल्टने जोडता येतो. चाकाला रबरी धाव असते. जू व चौकट बांबूची बसून लांब बांबूच्या टोकांवर रबर गुंडाळून त्याचा गतिरोधकासारखा वापर करतात. वजन १९५ किग्रॅ. व किंमत सु. १,५०० रुपये. या गाडीच्या चाचण्या चालू आहेत. (३) किसान बैलगाडी : मालवाहतुकीचे अवजड वाहन. प्रवासी वाहतुकही करता येते. दीड ते दोन टन माल वाहून नेला जातो. धाव लोखंडी असून तुंबा बाभळीचा व त्यातच धारवे असतात. जू लाकडी असून चौकट लाकडी पण आधारासाठी तिला व बावखड्याला लोखंडी कांबी वापरतात. गतिरोधक रबरी अस्तराचे व चाकाच्या मागे पुढे असतात. वनज ४२५ किग्रॅ., किंमत ३,५००-४,५०० रुपये. हिच्या चाचण्या घेतल्या आहेत.


आ. ६. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (बंगलोर) या संस्थेने तयार केलेल्या बैलगाड्यांचे नमुने : (अ) यात्रा गाडी : (१) धक्काशोषकासह जू. (२) पायाने दाबावयाचा गतिरोधक, (३) पूर्वताण दिलेले आरे बसविलेले पोलादी चाक, (४) वेटोळ्याच्या स्प्रिंगा बसविलेली साटी, (५) जलरोधी छप्पर, (६) मऊ गादीसह उतारूंच्या बैठकी, (७) चालकाची बैठक (आ) मलनाड गाडी : (१) बांबूचे जू, (२) बांबूची दांडी, (३) पायाने दाबावयाचा गतिरोधक, (४) रबर गुंडाळलेला बांबूचा गतिरोधक, (५) रबरी धाव बसविलेले लाकडी चाक, (६) साटीतील बाजूचे बांबू, (७) बांबूची साटी, (८) चालकाची बैठक (इ) किसान गाडी : (१) लाकडी जू, (२) जुवाला जोडलेली स्प्रिंग, (३) पायाने दाबावयाचा गतिरोधक, (४) चाकाच्या तुंब्यातील निमुळते रूळ धारवे, (५) चाकावर घासणारा गतिरोधकाचा भाग, (६) चालकाची बैठक.

यांशिवाय आणखी काही सुधारित गाड्यांचे नमुने या संस्थेने तयार केले आहेत. सुधारित नमुन्यांव्यतिरिक्त संस्थेने सुधारित गाड्यांचे चाचणी केंद्र स्थापणे, मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेणे, प्रचलित असलेल्या सुधारित गाड्या लोकप्रिय करणे इत्यादींविषयी योजना आखलेल्या आहेत. प्राण्यांकडून ओढण्यात येणाऱ्या गाड्यांचे सचित्र वर्णन देणारा एक ग्रंथ संस्थेतर्फे तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे संचालक एन्‌.एस्‌. रामस्वामी हे असून वर उल्लेखिलेल्या बैलगाड्यांचे अभिकल्प व्ही.ए.पी.नाईक यांनी तयार केलेले आहेत.  वर नमूद केलेल्या सर्व सुधारणा ह्या चाकांच्या संदर्भात आहेत. जुवाच्या बाबतीत सुधारणा करणे जरा अवघड असून अद्यापपावेतो जुवाचा समाधानकारक सुधारित अभिकल्प तयार करणे शक्य झालेले नाही. पारंपरिक जुवामुळे बैलांच्या मानेवर जास्त बोजा येतो व त्यामुळे त्यांच्या मानेवर जखमा होण्याची शक्यता असते. हा जुवाचा अभिकल्प बैलांना निर्दयकारक आहे. सपाट, सरळ व शहरी रस्त्यांवर बैलगाडीचा समतोल चाकांकडून राखला जातो व बैलांच्या मानेवर पडणारा उर्ध्व भार कमी व स्थिर असून बैल तो सहज पेलू शकतात पण ग्रामीण भागातील रस्त्यांवर गाडीतील माल व्यवस्थित रचला असला, तरी उतारावर बैलांच्या मानेवर भार वाढतो आणि चढावर गळ्यावर ताण पडतो. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.

बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे बैलगाडीसंबंधी एक देशव्यापी सर्वेक्षण करण्यात येत असून त्यामध्ये आढळून येणाऱ्या निष्कर्षावर बैलगाडीच्या रचनेत कोणत्या सुधारण करता येणे शक्य आहे, हे समजून येईल. तथापि ग्रामीण भागातील रस्ते हवायुक्त टायर बसविलेल्या बैंलगाडीला उपयुक्त नसल्याने सु. ७५% बैंलगाड्यांना असे हवायुक्त टायर बसविले गेलेले नाहीत आणी ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील काही वर्षांत हवायुक्त टायरांच्या गाड्या वापरात येण्याची शक्यता नाहीं, असे संस्थेला आढळून आले आहे.

पहा : गाडी चाक.

संदर्भ : 1. Bose. N. K., Ed., Peasant Life in India : A Study in Indian Unity and Diversity, Calcutta, 1961.            2. Ramaswamy, N. S. Bullock cart, Illustrated Weekly of India, 22nd August 1976, Bombay.            3. Ramaswamy, N. S. The Management of Animal Energy Resources and the Modernization of the Bullock Cart System, Bangalore, 1979.            4. Singer, C. and others, History of Technology, 5 Vols., Oxford, 1958.

पाटील, ल. ह. घरत, ग. के. मिठारी, भू. चिं.