लॅकर : ज्या नैसर्गिक पदार्थाचा पातळ व टिकाऊ थर बनू शकतो असा पदार्थ बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) विद्रावकात (विरघळणाऱ्या पदार्थात) विरघळवून तयार केलेल्या विद्रावास पूर्वी लॅकर म्हणत. लाखेच्या अंगी असा गुण आहे. लाखेला इंग्रजीत लॅक किंवा शेलॅक म्हणतात आणि त्यापासून ‘लॅकर’ हा शब्द आला आहे. मिथिलेटेड स्पिरिटमध्ये लाख विरघळवून तयार करण्यात येणारे ‘फ्रेंच पॉलिश’ लॅकराचे एक परिचित उदाहरण आहे. आधुनिक काळात असे पदार्थ संश्लेषणाने (साध्या संयुगांचा वा मूलद्रव्यांचा संयोग करून कृत्रिम रीतीने) बनविता येतात. त्यांच्या विद्रावांचा समावेशही लॅकरांमध्ये होतो. 

लॅकराचा उपयोग वस्तूच्या पृष्ठभागावर लेपन करण्यासाठी होतो. लॅकर पारदर्शक व अपारदर्शक त्याचप्रमाणे हव्या त्या रंगाची करता येतात.  

वस्तूच्या पृष्ठभागाला लॅकराचे लेपन केले म्हणजे त्यातील विद्रावक उडून जातो आणि विरघळलेला पदार्थांचा पातळ थर वस्तूच्या पृष्ठभागावर बसतो. काही ठिकाणी या थराचे नंतर⇨ऑक्सिडीभवन किंवा ⇨बहुवारिकीरणही होते. तथापि थर विद्रावकात विरघळू शकतो. बनलेला थर टिकाऊ असतो व तो वस्तू सुशोभित करतो आणि हवेतील आर्द्रता आणि विक्रियाशील वायू यांपासून पृष्ठभागाचे रक्षण करतो. काही लॅकरे लावलेल्या पृष्ठभागांवर छपाई व कोरीव कामही करता येते.  

प्रकार : लॅकरे दोन प्रकारची आहेत : (१) ओरिएंटल लॅकर व (२) आधुनिक लॅकरे.  

ओरिएंटल लॅकर : हे चीन व जपान या देशांत सु. २००० वर्षांपासून माहीत आहे. हे बनविण्यासाठी टॉक्सिकोडेंड्रॉन व्हर्निसीफ्ल्यूअम (पूर्वीचे नाव ऱ्हस व्हर्निसिफेरा) या झाडाचा (याला व्हार्निश वृक्ष असे सामान्यतः म्हणतात) स्त्राव वापरला जातो. तो मिळविण्यासाठी झाडाला खाचा पाडतात व त्यातून बाहेर पडणारा दुधी रंगाचा स्त्राव गोळा करतात. तो उघडा ठेवल्यावर दाट व काळ्या रंगाचा होतो. तो थोडा घट्ट झाल्यावर कुटतात, लाकडी नळीत घालून हलवितात व हेंपच्या कापडातून गाळून घेतात. त्यानंतर मंद अग्नीवर ठेवून त्यात जादा असलेले बाष्प कमी करतात आणि हवाबंद डब्यात साठवितात. 

या पदार्थाचा प्रमुख घटक उरुशिओल हा एक हायड्रोकार्बन आहे. स्त्रावात त्याचे प्रमाण सु. ७०% आणि २०% पाणी, २०% अल्ब्युमीन व ४% बाभळीच्या डिंकासारखा एक पदार्थ असतो. या लॅकराचे पातळ पटलाच्या रूपात लेपन केल्यावर साधारण एक दिवसात वस्तूच्या पृष्ठभागावर पारदर्शक, चिवट व कठीण थर बनतो. या लॅकराचे लेपन केलेल्या वस्तूच्या पृष्ठभागावर हवेतील आर्द्रता व वातावरणातील वायू तसेच अम्ले, क्षार (अल्कली), अल्कोहॉल व उष्णता (७१° से.पर्यंत) यांचाही अनिष्ट परिणाम होत नाही. वस्तूचा पृष्ठभाग घासून चकाकी आणता येते व त्यावर नाजूक कोरीव कामही करता येते. चिनी मातीच्या वस्तू (पोर्सलीन), ब्राँझ, शिसे व पितळ यांपासून बनविलेल्या वस्तू, कफन पेटीचे झाकण व भिंती यांवर या लॅकराचे लेपन करतात. हे लॅकर वाळण्यापूर्वी त्यात विद्रावरूपातील लोह आणि सोने व इतर धातू मिसळून विविध प्रकारची लॅकरे तयार करतात. 

आधुनिक लॅकरे : ही लॅकरे लाख, रेझिने व सेल्युलोजाची संयुगे यांपासून बनविली जातात. यांना औद्योगिक लॅकरे असेही म्हणतात. 

सेल्युलोज नायट्रेट किंवा पायरॉक्सिलीन या संश्लेषित संयुगाचा प्रथम लॅकर बनविण्यासाठी उपयोग करण्यात आला. ॲलेक्झांडर पार्क्स  यांनी या संयुगाचा विद्राव कापडावर लावण्याचे एकस्व (पेटंट) १८५२ मध्ये घेतले. तथापि विद्राव कापडास लावण्याची क्रिया १९०३ मध्ये विकसित झाली. पहिल्या महायुद्धापर्यंत पितळ व चांदी यांच्या शोभेच्या वस्तू व गवताच्या टोप्या यांवर पातळ लेप देण्यासाठीच लॅकरांचा उपयोग होत असे. कारण प्रारंभी माहीत असलेली लॅकरे दाट असत. विमानावर लॅकर लावण्याचा शोध लागल्यावर निरनिराळे विद्रावक व नवीन रेझिने प्रचारात आली. त्यामुळे दाटपणा कमी असलेली व लवकर वाळणारी लॅकरे उपलब्ध झाली. लॅकरांच्या उपयोगाचे क्षेत्र त्यामुळे विस्तार पावले आणि उत्पादनातही वाढ झाली.  

उपयोग : लॅकराचे लेपन केलेला पृष्ठभाग सामान्यतः गुळगुळीत व चकचकीत असतो. तथापि विशिष्ट संयुगांचा लॅकरात समावेश करून, पृष्ठभाग कमी-अधिक खडबडीत किंवा विशिष्ट आकृतिबंधांचा आभास निर्माण करील असा बनविता येतो. कापडाला वजन यावे, त्याची बळकटी वाढावी यासाठी व चामड्याला नरमपणा यावा याकरिताही लॅकरांचा उपयोग  करतात. वस्तूला आवेष्टन म्हणून वापरावयाचे सेलोफेन, कागद, पुठ्ठा इ. पदार्थ आर्द्रतारोधी व तैलरोधी असावे लागतात. त्यासाठी या आवेष्टन पदार्थांवर लॅकर लावतात. तसेच प्लॅस्टिकवूड, वर्ख, त्वरेने वाळणारी शाई, रेनकोटासाठी वापरावयाचे प्लॅस्टिक-कापड यांच्या निर्मितीत लॅकरे वापरली जातात. रेल्वेचे डबे व मोटारगाड्या यांच्या बाह्य व आतील पृष्ठभागांसाठी लॅकरांचा वापर करण्यात येतो. 

लाकडी फर्निचरला लॅकराचा लेप दिला म्हणजे पृष्ठभाग गुळगुळीत व आपणास हवा तसा कमी अधिक चकचकीत बनविता येतो. रसायनांशी संबंध येणाऱ्या लाकडी भागांचे संरक्षण व्हावे यासाठी अस्फाल्टयुक्त किंवा क्लोरिनीकृत रबर यांचा समावेश असलेली लॅकरे वापरली जातात.  

लॅकर तयार करताना ज्याचा थर बनू शकतो असा इष्ट पदार्थ विद्रावकात विरघळवितात. या विद्रावात काही इतर पदार्थही (उदा., रंगद्रव्ये, प्लॅस्टिकीकारके, स्थिरीकारके इ.) मिश्र करावे लागतात. त्यांचा समावेश केल्याने लॅकराला स्थैर्य येते, विद्रावक उडून गेल्यावर जो थर निर्माण होतो त्याला भेगा पडत नाहीत व त्यांचा टवका उडत नाही आणि थर वस्तूवर सर्वत्र सारखा बसतो. 

वस्तूला लॅकराचे लेपन ब्रशाने किंवा फवारणी करून करता येते. वस्तू लहान असतील (उदा., हत्यारांच्या मुठी) व त्यांवर लॅकराचा जाड थर द्यावयाचा असेल, तर त्या वस्तू लॅकरामध्ये बुडवून काढतात व गरम करून वाळवितात. काही लॅकराचे लेपन केल्यावर लेप वस्तूवर पक्का बसावा यासाठी वस्तू तापवावी लागते उदा., शीतकपाटे (रेफ्रिजेरेटर). 

पहा : रंगलेप व्हार्निश. 

संदर्भ :  1. Herbert, K. Oriental Lacquer, Hudson, 1963.

            2. Parker, D. H. Principles of Surface Coating Technology, New York, 1965.

चिपळूणकर, मा. त्रिं. मिठारी, भू. चिं.