तराजू : पदार्थांचे वजन मोजण्याचे साधन परंतु वजन हे वस्तुमानाच्या समप्रमाणात असल्याने या साधनाने वस्तुमानही मोजता येते. तराजूला तागडी, ताजवा, काटा अशी इतर नावे आहेत. सर्वसामान्य तराजूत एका मजबूत व टणक धातूच्या दांडीला बरोबर मध्यावर हाताने किंवा धरण्याची किंवा टांगून ठेवण्याची व्यवस्था असते (१९२०–२५ पर्यंत भारतात लाकडाची दांडीही वापरीत असत). दांडीच्या मध्यापासून सारख्या अंतरावर असलेल्या दोन्ही टोकांस दोन सारख्या वजनाची पारडी लावण्यात येतात. ज्या पदार्थांचे किंवा वस्तूंचे वजन करावयाचे असते ती एका पारड्यात घालून दुसऱ्या पारड्यात (माहीत असलेली) प्रमाणित वजने घालतात व तराजूची दांडी क्षितिजसमांतर (बरोबर आडवी) होईपर्यंत (किंवा दांडीच्या मध्यावर एक धातूचा लहान काटा तिला काटकोनात असल्यास तो उदग्र म्हणजे बरोबर उभा होईपर्यंत) ती कमीजास्त करतात. घातलेल्या वजनांची बेरीज ही दिलेल्या वस्तूंच्या वजनाइतकी असते. एक पारडे असलेले तराजूही व्यवहारात आहेत. स्प्रिंग काटा, परिपीडन (वजन मापणाऱ्या घटकाला पीळ पडणारा) काटा ही या प्रकारची काही उदाहरणे होत. दांडीच्या तराजूचे समभुज आणि विषमभुज असे दोन प्रकार असून दुकाने, मंडया वगैरे ठिकाणच्या रोजच्या व्यवहारात समभुज जातीचा तराजू वापरला जातो. दुसऱ्या प्रकारचा तराजू मालगाडीने, बोटीने वगैरे पाठवावयाच्या मोठ्या बोजाच्या वजनासाठी वापरतात. येथे समभुज प्रकारच्या तांत्रिक व वैज्ञानिक कामांकरिता वापरण्यात येणाऱ्या तराजूचे विशेष वर्णन केले आहे. व्यापारात व इतर व्यवहारात वस्तूंचे वजन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांचे वर्णन ‘वजन यंत्रे’ या नोंदीत केले आहे.
इतिहास : तरफेचा शोध अती प्राचीन आहे व तराजू हाही फार पुरातन काळापासून प्रचारात आहे. इ. स. पू. ७००० ते ५००० वर्षांपासून तो ईजिप्तमध्ये वापरात होता असा आधार मिळतो. असा तेथील एक तराजू आ. १ मध्ये दाखविला आहे.मोहें–जो–दडो, हडप्पा या संस्कृतींच्या काळातच नव्हे, तर वैदिक काळातही तराजू वापरात होता, असे आढळून आले आहे. ख्रिस्तपूर्व काही शतके तो जगातील सर्व देशांत वापरात असावा, असे म्हणण्यास हरकत नाही. एका लाकडाच्या वा धातूच्या दांडीला तिच्या दोन्ही टोकांस भोके पाडून त्यांतून ओवलेल्या दोऱ्यांनी दोन सारख्या वजनाची पारडी टांगलेली असत व दांडीच्या बरोबर मध्यावर दोरी बांधून ती टांगून ठेवता येईल अशा रचनेचा हा पुरातन (समभुज) तराजू असे.
रोमन काळात दांडीच्या मध्यावर एक काटा उभा बसविण्यात आला व त्यामुळे तराजू समतोलात आहे की नाही, हे चटकन समजण्यास मदत झाली. गरजेप्रमाणे लहान–मोठे तराजू जरी करण्यात आले असले, तरी त्यांत कित्येक शतके महत्त्वाची अशी सुधारणा झाली नाही.
समभुज तराजू : पुरातन काळापासून चालत आलेल्या समभुज तराजूमध्ये महत्त्वाची अशी सुधारणा प्रथम अठराव्या शतकात जोझेफ ब्लॅक या रसायनशास्त्रज्ञांनी केली. तराजूच्या मध्यभागी त्यांनी प्रथमच सुरीधारा (पोलाद वा इतर कठीण पदार्थांची बनविलेली पाचर) बसविली. त्यामुळे दांडीचा टेकू जास्त काटेकोरपणे निश्चित झाला व तराजूची अचूकता वाढली. पुढे एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत अशा तराजूमध्ये सुरीधारा व तिच्या आधारासाठी अकीकाचा (ॲगेटाचा) उपयोग, दांडी वर–खाली करण्याची सोय अशासारख्या अनेक महत्त्वाच्या सुधारणा झाल्या. सध्याचा प्रयोगशाळेतील सर्वसामान्य समभुज तराजू जास्तीत जास्त २०० ग्रॅ. पर्यंत वजनाचे मापन करू शकतो व त्यात एक दशांश मिग्रॅ. पर्यंत अचूकता येऊ शकते. आता तर अशा तराजूंची वजनाच्या अचूकतेतील सूक्ष्मता एक सहस्रांश मिग्रॅ. पर्यंत (१ मायक्रोग्रॅम, μg) गेलेली आहे. असे सूक्ष्मग्राही (संवेदनशील) तराजू संशोधनकार्य चालणाऱ्या प्रयोगशाळांत मोठ्या प्रमाणात वापरात असतात. असा एक सूक्ष्मग्राही तराजू आ. २ मध्ये दाखविला आहे.
तराजूच्या भागावर हवेतील घटकांचे अनिष्ट परिणाम होऊ नयेत यासाठी तराजू चांगल्या टिकाऊ लाकडाच्या व सर्व बाजूंनी काचा बसविलेल्या पेटीत ठेवलेला असतो. पेटीच्या पुढची व दोन्ही बाजूंच्या काचा वरखाली करता येतात किंवा तेथे दारेही ठेवतात. त्यामुळे पदार्थ व वजने घालणे काढणे सोईचे होते.वजनाची प्रत्यक्ष नोंद करताना पेटीची दारे बंद असली पाहिजेत. पेटीच्या पायथ्याशी समोरील दोन्ही टोकांना पेटी क्षैतिज पातळीत आणण्यासाठी दोन स्क्रू असतात. मागील बाजूस मात्र ह्या स्क्रूंच्या उंचीएवढा धातूचा टेकू असतो. वातावरणातील दाब, तापमान व आर्द्रता अचल राहतील अशा खोलीत आणि बाह्य कंपनांचा उपद्रव होणार नाही अशा एका आधारावर ही पेटी ठेवतात. तराजूची बैठक बाहेरील स्क्रू खालीवर करून व पेटीत असलेल्या पाणसळीच्या किंवा दांडीला अडकविलेल्या ओळंब्याच्या साहाय्याने क्षितिजसमांतर करता येते. पेटीच्या तळपृष्ठावर मधोमध एक धातूचा स्तंभ बैठकीला लंब असा पक्का बसविलेला असून त्याच्या माथ्यावर अकीकाची पट्टी बसविलेली असते. तराजूच्या दांडीला बरोबर मध्यावर बसविलेली सुरीधारा या पट्टीवर टेकेल अशी रचना असते व या धारेभोवती दांडी किंचित दोलन करू शकते. पट्टीवर ठेवलेली ही सुरीधारा म्हणजे तराजूच्या दांडीचा टेकूच होय. दांडीच्या दोन्ही टोकांना धारा वर तोंड करतील अशा रीतीने दोन सुरीधारा पक्क्या बसविलेल्या असतात. धारेवर टेकतील व त्यांत पारडी अडकविता येतील अशा टांग–कड्या त्यावर ठेवलेल्या असतात. पुढच्या बाजूला दांडीच्या मध्यापासून एक लांब व टोकदार दर्शक काटा खाली टोक करून बसविलेला असतो. स्तंभाच्या पायथ्याशी एक लहान पांढरी स्वच्छ पट्टी बसविलेली असून तीवर सम–अंतराने रेखांकन केलेले असते. डावीकडून शून्यापासून रेखांकन सुरू होऊन ते विसाव्या अंकास संपते.
दांडीच्या कार्यकारी स्थितीत समतोल झाल्यानंतर जेव्हा आंदोलने थांबतील तेव्हा दर्शक काटा मधल्या (म्हणजे दहाव्या) रेघेवर स्थिर व्हावा अशी योजना असते. जेव्हा तराजू प्रत्यक्ष वापरात नसेल तेव्हा त्याच्या सुरीधारांवर विनाकारण भार पडून त्या झिजू नयेत यासाठी तराजूची दांडी व टांग–कड्या एका वेगळ्या आधारावर टेकलेल्या असतात. पारड्यात वजने किंवा वस्तू घालतानाही तराजू याच अवस्थेत ठेवणे जरूर असते नाही तर सुरीधारांना अपाय होण्याची शक्यता असते. ही तराजूची ‘आधारित स्थिती’ होय. पेटीच्या बाहेर दोन नियंत्रक मोगरे असतात. त्यांपैकी एक मोगरा फिरविला असता टांग–कड्या व दांडी यांचा आधार काढून घेतला जातो आणि टांग–कड्या आपआपल्या सुरीधारांवर टेकतात तसेच मधली सुरीधारा स्तंभावरील अकीकाच्या पट्टीवर टेकते आणि तिच्याभोवती दांडी आंदोलने करण्यास मोकळी होते. हा मोगरा उलट दिशेने फिरविला की, तराजू पुन्हा पूर्वस्थितीला येतो. ही सर्व यंत्रणा अत्यंत काटेकोरपणे केलेली असते. त्यामध्ये मुख्य हेतू हा असतो की, तराजू केव्हाही कार्यकारी स्थितीत आणला, तर सुरीधारा टांग–कड्यांना किंवा अकीकाच्या पट्टीवर ठराविक ठिकाणीच टेकाव्यात नाही तर एकाच वस्तूची पुनःपुन्हा वजने केली, तर ती एक सारखीच येणार नाहीत.
दांडीच्या वरच्या कडेवर एक पट्टी आखलेली असून तिच्यावर समांतर खाचा पाडलेल्या असतात. पेटीच्या उजव्या बाजूला वर एक लांब सळई आडवी बसविलेली असून तिच्या दुसऱ्या टोकाला एक आकडा बसविलेला असतो. त्याच्या साहाय्याने एक अगदी अल्प वजनाचा (५ मिग्रॅ. ते ५० मिग्रॅ.) वाकविलेला तारेचा तुकडा (ज्याला ‘स्वार’ असे म्हणतात) दांडीवर कोठेही ठेवता येतो. तरफेचे तत्त्व वापरून यामुळे १/१० मिग्रॅ. पर्यंतची वजने काढता येतात. त्यासाठी अशी सूक्ष्म वजने प्रत्यक्ष वापरावी लागत नाहीत.
तोलन क्रिया : प्रथम तराजूच्या पेटीचे स्क्रू जरूर तसे फिरवून तराजूची बैठक क्षितिजसमांतर करावी लागते. नंतर तराजू कार्यकारी स्थितीत आणून त्याचा विश्रामबिंदू काढतात (कार्यकारी स्थितीत तराजू असताना, दांडीची आंदोलने थांबल्यावर दर्शक काटा दर्शक पट्टीवरील ज्या क्रमांकाच्या रेघेवर स्थिर होईल तो तराजूचा विश्रामबिंदू होय). विश्रामबिंदू पट्टीच्या मध्यरेषेवर असणे सोयीचे असते. दांडीच्या दोन्ही टोकांना असलेले स्क्रू मागेपुढे करून विश्रामबिंदू डावीकडे किंवा उजवीकडे सरकविता येतो.
विश्रामबिंदू काढण्यासाठी आंदोलने प्रत्यक्ष थांबेपर्यंत वाट पाहण्याची जरूर नसते. काट्याची आंदोलने चालू असताना त्याच्या लागोपाठच्या झोक्यांची दर्शक पट्टीवरील डावीकडील तीन वाचने व उजवीकडील दोन वाचने घेतात. त्यावरून प्रत्येक बाजूच्या वाचनांचे माध्य (सरासरी) वाचन काढतात. या दोन्ही माध्यांचे माध्य म्हणजे पारडी रिकामी असतानाचा काट्याचा विश्रामबिंदू (अ) होय.
आंदोलनाची वजन पद्धत : प्रमाण वजनांच्या पेटीतील लहानात लहान वजन १ मिग्रॅ. चे असते. अशा परिस्थितीत ‘आंदोलनांची वजन पद्धत’ वापरून वजन १/१० मिग्रॅ. पर्यंत अचूक काढता येते. या पद्धतीत पारडी रिकामी असतानाचा विश्रामबिंदू अ आणि डाव्या पारड्यात वस्तू व उजव्या पारड्यात ‘य’ वजन इतके असतानाचा विश्रामबिंदू ‘आ’ काढतात. मग उजव्या पारड्यात क्ष मिग्रॅ. (= ५ मिग्रॅ.) जादा वजन टाकून पुन्हा विश्रामबिंदू ‘इ ’काढतात. क्ष मिग्रॅ.मुळे विश्रामबिंदूचे (आ–इ) = न इतके विचलन झाले.
तेव्हा १ मिग्रॅ.मुळे होणारे विचलन स= |
न |
= |
आ–इ |
होईल. |
क्ष |
क्ष |
स ला तराजूची या परिस्थितीतली ‘संवेदनशीलता’ असे म्हणतात. यावरून वस्तूचे खरे वजन व = य+ स (अ–आ) हे सूत्र वापरून काढता येईल. (अ–आ) हा फरक धन किंवा ऋण असेल, त्यानुसार व हे य पेक्षा जास्त किंवा कमी होईल.
तोलनासाठी वापरावयाची ‘प्रमाण’ वजने बिनचूक आहेत की नाहीत, हे मधून मधून पडताळून पहावे लागते.
दुबार वजन पद्धत : दांडीच्या दोन्ही भुजांच्या लांब्या अगदी तंतोतंत एकसारख्या नसल्या, तर (सामान्यतः दोन्ही लांब्या तंतोतंत समान नसतात) ही पद्धत वापरून वस्तूचे वजन बिनचूक काढता येते. प्रथम वस्तू डाव्या पारड्यात व वजने उजव्या पारड्यात घालून वस्तूचे वजन व१ वरील प्रमाणे काढतात. मग तीच वस्तू उजव्या पारड्यात घालून तिचे वजन व२ काढतात. मग वस्तूंचे खरे वजन व = √व१ × व२ या सूत्रावरून काढता येते. तरफांच्या तत्त्वावरून या सूत्राची सिद्धता सहज करता येते.
संवेदनशीलता : स ही तराजूची संवेदनशीलता दांडीच्या लांबीच्या (ल) सम प्रमाणात असून दांडीचे वजन (द) व दांडीच्या गुरुत्वमध्याचे दांडीच्या मध्यापासूनचे अंतर (म) यांच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणून
स α |
ल द.म |
तेव्हा संवेदनशीलता वाढविण्यासाठी ‘ल’ वाढवावी लागते व द आणि म कमी करावी लागतात परंतु यामुळे दांडीचा आवर्तकाल (एका आंदोलनाला लागणारा काळ) वाढतो व स्थैर्य कमी होते. तराजू वापरताना हे फार गैरसोयीचे होते, म्हणून तराजू बनविताना संवेदनशीलता, स्थैर्य व अल्प आवर्तकाल या सर्वांमध्ये तडजोड करणे अपरिहार्य होते.
दांडी बळकट असली पाहिजे, पारड्यातील वजनांमुळे ती वाकता कामा नये तसेच तापमानातील फेरफारामुळे दोन भुजांचे असमान प्रसरण वा आकुंचन होऊन तराजूची अचूकता कमी होता कामा नये यांसाठी दांडी अशा द्रव्याची करावी की, त्याचा स्थितिस्थापक गुणांक जास्त असून विशिष्ट गुरुत्व कमी असावे, त्याची विशिष्ट उष्णता व उष्णता संवाहकता जास्त असावी, त्याचप्रमाणे उष्णता प्रसरण गुणांक कमी असावा. या सर्व दृष्टींनी पाहता ॲल्युमिनियम व मॅग्नेशियम यांची किंवा तांबे आणि बेरिलियम यांची मिश्रधातू सर्वोत्कृष्ट ठरते. विविध प्रमाणात बनविलेले पितळ किंवा कासे या मिश्रधातूही मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. म्हणजे शेवटी दांडीचा आकार सुयोग्य करून बळकटी कमी न होता तिचे वजन कमी करता येते. विशिष्ट तराजूची संवेदनशीलता पारड्यातील वजनानुसार बदलते. ‘आंदोलनांच्या वजन पद्धती’त या गोष्टींची दखल घेणे आवश्यक असते.
शीघ्र तोलन योजना : तोलन जलद करता येण्यासाठी वरील तराजूत काही फेरफार करून खास तराजू बनविण्यात आले आहेत. संदमन (आंदोलनाच्या गतीला होणारा विरोध) वाढविल्यास तराजू त्वरित स्थिर स्थितीला येतो व वजने जलद करता येतात. यासाठी काही तराजूंत चुंबकीय संदमन वापरले जाते, तर काहींत हवेमुळे होणारे संदमन वाढेल अशी रचना केलेली असते. वजनाची काढघाल करण्यात बराच वेळ खर्च होतो. तो वाचविण्यासाठी एका प्रकारच्या तराजूत पेटीचे दार न उघडता वेगवेगळ्या चाव्या दाबून आपोआप वजने बदलण्याची व्यवस्था केलेली असते. दुसऱ्या तराजूत एक (सोन्याची) बारीक साखळी तराजूच्या दांडीपासून लोंबत सोडलेली असते व तिचे दुसरे टोक एका पट्टीला बसविलेले असते. ही पट्टी एका उभ्या स्तंभावर वरखाली सरकवता येते व त्यानुसार साखळीचे दांडीवर पडणारे वजन बदलते. स्तंभावर कोरलेल्या मापपट्टीवरून सरकत्या पट्टीच्या विशिष्ट स्थानामुळे (उजव्या) पारड्यात परिणामी किती वजन घातल्यासारखे होते ते समजते.
सूक्ष्ममापक तराजू : पदार्थांची वजने १ मायक्रोग्रॅम (= १०–६ ग्रॅ.) पर्यंत अचूकतेने करू शकणाऱ्या तराजूला सूक्ष्ममापक तराजू असे म्हणतात. वर वर्णन केलेल्या दांडीच्या तराजूत काही फेरफार करून सूक्ष्ममापक तराजू बनविता येतो. याची दांडी खूप हलकी असून तिची लांबी सु.१४ सेंमी. असते. सुरीधारा कुरुविंदाच्या (कोरंडमच्या) करतात. दर्शक काट्याच्या खालच्या टोकाला एक पारदर्शक मोजपट्टी बसविलेली असून ती मागच्या बाजूने प्रकाशित करून तिची प्रतिमा एका अर्धपारदर्शक पडद्यावर पाडतात. यामुळे तराजूची संवेदनक्षमता १ मायक्रोग्रॅम पर्यंत वाढू शकते.
परिपीडन तराजू : या प्रकारच्या तराजूच्या साहाय्याने वजने जलद काढता येतात कारण तो वापरताना प्रमाण वजनांची काढघाल करावी लागत नाही. या प्रकारच्या तराजूत वस्तूचे वजन एका स्थितिस्थापक तंतूला घातलेल्या पिळामुळे उत्पन्न होणाऱ्या प्रेरणेने तोलले जाते. आ. ३ मध्ये परिपीडन तराजूचे तत्त्व दाखविले आहे.
यामध्ये एक स्थितिस्थापक तंतू आडवा ताणलेला असून त्याचे एक टोक पक्के खिळवलेले असते. दुसरे टोक एका गुंडीला जोडलेले असून ही गुंडी फिरवता येते. तंतू जाड असेल तर संवेदनशीलता कमी होते. अतिसूक्ष्ममापक तराजूसाठी क्वॉर्ट्झचा अगदी बारीक तंतू वापरतात. तंतूच्या मध्यावर त्याला लंब दिशेने एक अत्यंत हलका दांडा व त्या दांड्याला एक अत्यंत छोटे पारडे लावलेले असते. या पारड्यात वस्तू टाकली असता तिच्या वजनाने पारडे खाली झुकते. मग गुंडी उलट दिशेने फिरवून पारडे पूर्वस्थितिला आणतात. या करिता गुंडी ज्या कोनातून फिरवावी लागते तो कोन मोजून त्यावरून वस्तूचे वजन काढता येते. ही पद्धत वापरून ०·००१ मायक्रोग्रॅमपर्यंत अचूक वजन करणारे तराजू तयार करण्यात आले आहेत.
काही इतर प्रकारचे तराजू : गुरुत्वाकर्षण व चुंबकीय क्षेत्र यांचे मापन करण्यासाठी खास परिपीडन तराजू वापरण्यात येतात. दर्शक काट्याची अगदी सूक्ष्म विचलने मोजण्यासाठी एका तराजूत विद्युत् धारित्राच्या (विद्युत् भार साठविण्याच्या एका साधनाच्या) तत्त्वाचा उपयोग केला आहे. धारित्राची एक तबकडी अचल असून दुसरी दर्शक काट्याला जोडलेली असते. काट्याच्या गतीनुसार या दोन तबकड्यांतील अंतर कमीअधिक होते व त्यामुळे धारित्राची धारकता कमीअधिक होते. त्यावरून काट्याचे विचलन किती झाले ते समजते व त्यावरून वजन जास्त अचूकपणे काढता येते. त्याचप्रमाणे काट्याचे विचलन मोजण्यासाठी एका तराजूत किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) द्रव्यांचाही उपयोग केलेला आहे. एखाद्या फुग्यावर सभोवतालच्या वायूमुळे किती उद्धरण प्रेरणा कार्य करते, ते तराजूच्या साहाय्याने मोजून त्यावरून त्या वायूचे विशिष्ट गुरुत्व काढता येते. हे तत्त्व वापरून निऑन वायूच्या दोन समस्थानिकांच्या (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांच्या) विशिष्ट गुरुत्वांचे गुणोत्तर काढण्यात आले.
विषमभुज तराजू : इ. स. पू. सु. ४०० वर्षांपूर्वी प्रथम विषमभुज तराजू तयार करण्यात आला. त्याला ‘बिस्मार’ म्हणत. यालाच पुढे डॅनिश स्टील यार्ड असे म्हणू लागले. या प्रकारच्या तराजूची चित्रे भारतातील इ. स. पू. ३०० वर्षे या काळातील नाण्यांवर आढळून आली आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत तो भारतात वापरला जात असे परंतु तो तितकासा बिनचूक वजने करू शकत नसे.
रोमन यार्ड (आ. ४) हा विषमभुज तराजूचा दुसरा प्रकार अद्यापही वापरला जातो. यात दांडीचा टेकू एका टोकाला जवळ असतो. याच टोकाला वजन करावयाची वस्तू टांगतात. अर्थात दांडीची ही भुजा आखूड होते व दुसरी भुजा लांब राहते. या मोठ्या भुजेवर एक लहान सरकवता येण्याजोगे वजन (स्वार) ठेवतात. या भुजेवर एक मोजपट्टी कोरलेली असते. स्वार योग्य तेथे सरकवून दांडी क्षितिजसमांतर करतात. मग मोजपट्टीवरील स्वाराच्या समोरचे वाचन त्या पदार्थांचे वजन देते. या तराजूचे कार्यही तरफेच्या तत्त्वावरच चालते. वस्तूचे वजन मोठे असले, तरी ते फक्त एक–दोन लहान वजनांनी तोलता येते, हा या तराजूचा मुख्य फायदा होय.
व्यावहारिक तोलन : व्यवहारात व व्यापारात अनेक ठिकाणी व अनेक प्रकारच्या पदार्थांची वजने करावी लागतात. सोने–चांदीसारख्या मूल्यवान वस्तूंच्या वजनासाठी जास्त बिनचूक व संवेदनशील तराजू वापरणे आवश्यक असते. वाणसामानासाठी त्या पेक्षा कमी संवेदनशील पण जास्त वजन तोलू शकणारा तराजू लागतो. जळाऊ लाकूड, कोळसा यांसारख्या पदार्थांच्या वजनासाठी त्याहीपेक्षा जास्त वजन तोलू शकणारा पण कमी संवेदनशील तराजू वापरावा लागतो. तोलावयाच्या वस्तूंच्या प्रकारानुरूप कोणत्या क्षमतेचा तराजू वापरावा, हे बहुतेक सर्व देशांत कायद्याने निश्चित करून दिलेले आहे. त्यामुळे अशा व्यवहारात फसवणूक होण्याचा धोका किमान होतो.
महाराष्ट्रात १९३२ च्या वजन–मापाच्या कायद्याने वेगवेगळ्या तोलनासाठी वापरावयाच्या तराजूंच्या गुणवत्ता निश्चित करण्यात आल्या. पुढे मेट्रिक पद्धतीची वजने अंमलात आल्यानंतर त्यानुसार या कायद्यात १९५८ साली दुरुस्त्या करण्यात आल्या [बॉम्बे वेट्स अँड मेझर्स (एन्फोर्समेंट) ॲक्ट,१९५८]. या कायद्यानुसार तराजूंचे ए, बी, सी व डी असे चार प्रमुख प्रकार करण्यात आलेले आहेत. ‘ए’ वर्गामध्ये रासायनिक व इतर शास्त्रीय कामांकरिता वापरण्यात येणारे तराजू ‘बी’ वर्गामध्ये सोने, चांदी, मूल्यवान खडे, केशर व तत्सम किंमतवान पदार्थ, औषधे, सुवासिक पदार्थ यांकरिता वापरण्यात येणारे तराजू ‘सी ’ वर्गामध्ये ॲल्युमिनियम, पितळ, तांबे, शिसे, लोखंड यांसारख्या सापेक्षतः स्वस्त धातू तसेच चहा, कॉफी, तंबाखू, सुकी फळे, धान्ये यांसारखे सापेक्षतः महाग खाद्य पदार्थ यांसाठी वापरण्यात येणारे तराजू आणि ‘डी ’वर्गामध्ये निरुपयोगी लोखंड, जळाऊ लाकूड, कोळसा, भाजीपाला यांसारख्या स्वस्त पदार्थांचे वजन करण्याकरिता वापरण्यात येणारे तराजू येतात. अशा प्रकारे विविध वर्गांत निरनिराळ्या पदार्थांनुसार वापरावयाच्या तराजूंचा समावेश करण्यात आला आहे. तराजूंच्या सुरीधारा, पारडी, दांड्या इ. भागांसाठी निरनिराळ्या वर्गांतील तराजूंसाठी योग्य पदार्थ वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. उदा., पारडी मृदू पोलाद, निष्कलंक पोलाद, पितळ, कासे किंवा कठीण लाकूड (फक्त ‘डी’ वर्गाकरिता) यांचीच बनवावीत असा दंडक आहे. सर्व तराजूंची संवेदनक्षमता व त्रुटी उद्योग संचालनालयातर्फे वेळोवेळी तपासण्यात येतात.
2. MacNevin, W. M. Analytical Balance: Its Care and Use, New York, 1959.
टोळे, मा. ग. पुरोहित, वा. ल.
“