विकृतिकारक पदार्थ : एथिल अल्कोहॉल, चहा, तंबाखू इ. पदार्थ खाण्याच्या दृष्टीने अयोग्य व्हावेत म्हणून त्याच्यांत मिसळण्यात येणारे रासायनिक पदार्थ.हे पदार्थ अक्रिय (विक्रिया न होणारे), घाणेरड्या चवीचे अथवा विषारी असतात. एथिल अल्कोहॉल, चहा, तंबाखू वगैरे पदार्थ खाण्यापिण्यासाठी वापरतात, तेव्हा त्यांच्यावर सीमा शुल्क अथवा उत्पादन शुल्क (अबकारी कर) यांच्यासारखे कर आकारतात.हे पदार्थ खाण्यापिण्याऐवजी उद्योगधंद्यात वापरल्यास त्यांच्यावरील असे कर माफ होतात अथवा त्याच्यांत सवलत मिळते. अशा वेळी हे पदार्थ खाण्यापिण्यालायक राहू नयेत म्हणून या करांची आकारणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलेले विकृतीकारक पदार्थ त्यांच्यात मिसळतात. अशा रीतीने हे पदार्थ अखाद्य वा अपेय बनले, तरी उद्योगधंद्यात कच्चा माल म्हणून त्यांचा वापर करता येतो आणि त्यांच्यापासून अन्य रसायने वा अनुजात बनविता येतात.

प्रमुख विकृतिकारक पदार्थांचे रासायनिक (उदा., बेंझीन. मिथिल अल्कोहॉल, ॲसिटाल्डिहाइड, ॲसिटोन बेंझॉइक अम्ल, पिरिडीन इ.) आणि नैसगिक (उदा., प्राणिज,टर्पेंटाइन रोझमेरी, सीडार इ. तेले) पदार्थ असे दोन गट करता येतात.

आदर्श विकृतिकारक पदार्थात पुढील गुणवैशिष्ट्ये असावी लागतात : (१) तो स्वस्त असावा आणि तो मिसळल्यामुळे मूळ पदार्थाची किमंत वाढू नये. (२) तो सहजपणे उपलब्ध होणारा असावा आणि त्याच्या किमतीत मोठे चढ-उतार होत नसावेत. (३) त्याच्यामुळे मूळ पदार्थांपासून अन्य पदार्थांचे उत्पादन करताना उत्पादनाच्या प्रक्रियेत व अधिकृत तपासणीत कमीत कमी अडचणी याव्यात. (४) नवीन पदार्थांच्या निर्मितीची प्रक्रिया व नंतर त्यांचा होणारा वापर त्यांच्या दृष्टीने विकृतिकारक पदार्थ संयोग्य असावा. (५) खाण्यापिण्याच्या दृष्टीने मूळ पदार्थाचा तिटकारा वाटून तो खाण्याला प्रतिबंध होईल इतका विकृतीकारक पदार्थ अनिष्ट (आक्षेपार्ह) असावा. (६) विकृतीकारक पदार्थ सूक्ष्मदर्शकाने अथवा अन्य साधनाने सहजपणे ओळखता येण्यासारखा असावा. (७) मोठ्या प्रमाणावर फायदेशीरपणे वापरता येऊ शकणाऱ्या कोणत्याही प्रक्रियेने तो सहजपणे वेगळा करता येऊ नये असे त्याचे मूळ पदार्थांशी संबंध असावेत तसेच तो अत्यल्प प्रमाणात असला, तरी सहजगत्या व हमखासपणे ओळखता येण्यासारखा असावा.

एथिल अल्कोहॉलात विकृतीकारक पदार्थात यांशिवाय पुढील गुणवैशिष्ट्ये असावी लागतात : (१) तो बाष्पनशील (बाष्परूपात उडून जाणारा) आणि अल्कोहॉल ,बेंझीन,पेट्रोल अथवा यांची मिश्रणे यांच्यात विद्राव्य (विरघळणारा) असावा. (२)विरल करून किंवा मधुरक वा स्वादकारक पदार्थ घालूनही मूळ पदार्थ खाण्यापिण्यालायक राहणार नाही इतपत अप्रिय चव वा स्वाद त्याच्यामुळे यायला हवा. (३) गाळणे, ऊर्ध्वपातन, अवक्षेपण (साकाखाली बसण्याची क्रिया) यांसारख्या सहज वापरता येणाऱ्या क्रियांनी तो अलग होणारा नसावा. (४) साठवणीत स्थिर राहणारा (न बदलणारा) व धातूच्या संपर्काचा ज्यावर परिणाम होणार नाही असा असावा, शिवाय व त्याच्या ज्वलनातून दुर्गंधीयुक्त किंवा संक्षारक (झीज करणारे व गंज आणणारे) पदार्थ निर्माण होऊ नयेत.

इंधन अथवा शक्ति-उद्‌गम म्हणून वापरण्यात येणाऱ्या पॉवर अल्कोहोलमध्ये पुढील गुण असावे लागतात : (१) इंधनाच्या सुप्त ऊर्जेत यामुळे भर पडावी. (२) तो ज्वलनातून उद्‌भवणाऱ्या पदार्थांबरोबर निघून जाणारा असावा. त्याच्यामुळे एंजिनाचे भाग गंजू नयेत व त्याचा काजळीयुक्त, चिकट किंवा रेझिनासारखा कोठलाही अवशेष मागे राहू नये. (३) त्याच्या ज्वलनातून अम्ले निर्माण होऊ नयेत (ॲसिटोनयुक्त मिथिल अल्कोहॉल विकृतिकारक म्हणून वापरल्यास त्यांच्या ज्वलनातून अँसिटिक अम्ल निर्माण होते).

एथिल अल्कोहॉल : (स्पिरीट). विकृतिकारक पदार्थ मिसळण्यात येणाऱ्या एथिल अल्कोहॉल हा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक पदार्थ आहे. विकृतिकारक घालून पिण्यास अयोग्य बनविलेल्या या अल्कोहॉल (डिनेचर्स स्पिरीट) म्हणतात. ॲसिटाल्डिहाइड, एथिल ईथर, काही औषधे, द्रव्यरूप पॉलिशे, साबण, टिंक्चर इ. अनेक पदार्थांच्या निर्मितीमध्ये वेगवेगळी द्रव्ये मिसळलेले विकृत अल्कोहॉसचे निरनिराळे प्रकार वापरतात. साधारणपणे मिथिल अल्कोहॉल, पिरिडीन, बेंझीन, केरोसीन, पॅराफीन पाइन तेल इ. एक वा अनेक पदार्थ या अल्कोहॉलात विकृतिकारक म्हणून घालतात. विशिष्ट लष्करी गरजांसाठी लागणाऱ्या ॲल्कोहॉलात ॲसिटोन किंवा व्हाइट स्पिरीट हे विकृतीकारक वापरतात. एकेकाळी वुड नॅप्थचा विकृतीकारक म्हणून वापर होत असे. पॉवर अल्कोहॉलात विकृतीकारक म्हणून केरोसिन, बेंझिन अथवा पेट्रोल घालतात. भारतात एथिल अल्कोहॉलात सामान्यणे काउचूसीन व पिरिडीन हे विकृतिकारक घालतात. या विकृतिकारकांविषयीचे काही विनिर्देश भारतीय मानक संस्थेने निश्चित केले आहेत. भारतात विकृत अल्कोहॉल परवानेधारक विक्रेत्यांमार्फत विकण्यात येते.

चहा : भारतात सामान्यतः चहात विकृतिकारक मिसळत नाहीत. टाकाऊ चहापासून थेइन व कॅफीन मिळवितात आणि अशा चहात विकृतिकारक मिसळतात. ब्रिटनमध्ये टाकाऊ चहाच्या १,००० भागात १०० भाग चुना व एक भाग हिंग हे विकृतिकारक मिसळतात. शालनाच्या परवानगीने हिंगाऐवजी नॅप्थॅलीन अथवा चुन्याऐवजी जादा हिंग वापरतात.

तंबाखू : भारतात तंबाखूतही सहसा विकृतिकारक घालीत नाहीत. तुटलेली पाने, देठ व मध्यशिरा यांसारख्या तंबाखूच्या टाकाऊ भागांचा निकोटीन, कीटकनाशके, धूम्रकारी पदार्थ इत्यादींच्या उत्पादनात वापर करतात. अशा तंबाखूच्या चूर्णाच्या ९२.५ भागांमागे दळलेल्या हरिताचे ७.५ भाग व हाडाच्या तेलाचे २.५ (किंवा अँथ्रॅसिन तेलाचे १०) भाग घालतात. तेलामुळे ही तंबाखू धूमकारी पदार्थ म्हणून वापरता येत नाही. त्रावणकोर भागात टाकाऊ तंबाखूवर माशाच्या तेलाच्या साबणाचे पाणी शिंपडून ती विकृत करतात.

मद्य : (वाइन). ॲसिटिक अम्ल निर्माण होऊन आंबूस झालेल्या अथवा बिघडलेल्या मद्यात २०% औद्योगिक व्हिनेगार वा त्याच्याशी तुल्य एवढे अँसिटिक अम्ल विकृतिकारक म्हणून मिसळतात. यामुळे त्याचे वाहन व्हिनेगारमध्ये परिवर्तन होते.

समस्थानिक : (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असणाऱ्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांना समस्थानिक म्हणतात). अण्वस्त्रांत वापरण्यालायक भंजनक्षम (ज्याच्या अणुकेंद्राचे तुकडे होऊ शकतात अशा) किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) मूलद्रव्यामध्ये जे अभंजनक्षम समस्थानिक मिसळतात त्यालाही विकृतिकारक म्हणतात. असे विकृत द्रव्य अण्वस्त्रांत वापरण्यालायक राहत नाही. कारण असा वापर करण्याआधी त्याच्यावर गुंतागुंतीच्या प्रक्रिया कराव्या लागतात.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part III, New Delhi, 1953.

2. Thorpe, J. F. Whiteley. M. A. Thorpe’s Dictionary of Applied Chemistry, Vol.III, London, 1965.

कुलकर्णी, एस्. बी.

Close Menu
Skip to content