रासायनिक उद्योग : रासायनिक उद्योग म्हणजे नेमके कोणते उद्योग ठरविण्याचे काम अतिशय अवघड आहे कारण व्याख्येला आधारभूत असणाऱ्या मूलतत्त्वानुसार ती बदलेल. उदा., रसायनशास्त्राशी या ना त्या प्रकारे निगडीत असलेला व रसायने तयार करणारा उत्पादक व्यवसाय म्हणजे रायायनिक उद्योग होय, अशी व्याख्या केली तर या व्याख्येत जवळजवळ सर्व उत्पादक व्यवसाय विशेषतः ज्या उद्योगांमध्ये एका प्रकारच्या पदार्थात रासायनिक बदल घडवून दुसऱ्या भिन्न गुणधर्मांचा वा उपयोगाचा पदार्थ तयार केला जातो असे सर्व उद्योग, अंतर्भूत करावे लागतील. या व्याख्येमुळे रंजकक्रिया, विरंजनक्रिया, अंत्यरूपण, सौंदर्यप्रसाधने साबण, अन्न वा खाद्यपदार्थांवरील प्रक्रिया इ. रासायनिक प्रक्रिया उद्योगांना रासायनिक उद्योगांपासून वगळावे लागेल. याखेरीज रसायने म्हणजे काय हा प्रश्न उरतोच. सांख्यिकीय आर्थिक उद्देशाकरिता वापरण्यात येणारी रासायनिक उद्योगांची व्याख्या निरनिरळ्या देशांत वेगवेगळी करण्यात येते. संयुक्त राष्ट्रांतर्फे प्रकाशित केलेल्या मानक (प्रमाणित) आंतरराष्ट्रीय व्यापार वर्गीकरणामध्ये रसायनांच्या विभागात स्फोटक द्रव्ये व शोभेची दारू यांसारख्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तथापि मानवनिर्मित तंतू तयार करण्याकरिता लागणारा कच्चा माल इतर उत्पादांप्रमाणेच रासायनिक स्वरूपाचा असला, तरी त्यांचा या वर्गीकरणात अंतर्भाव केलेला नाही.

रासायनिक उद्योगाची व्याप्ती काही प्रमाणात तर्कशास्त्रापेक्षा ग्राहकाच्या गरजेप्रमाणे ठरलेली आहे. खनिज तेल उद्योग हा रासायनिक उद्योगापासून सामान्यतः वेगळा मानला जातो. या उद्योगाच्या प्रारंभीच्या काळात एकोणिसाव्या शतकात कच्च्या तेलावर केवळ साध्या ऊर्ध्वपातनाचे (तापवून तयार झालेले बाष्प थंड करण्याचे) संस्करण करण्यात येई. आधुनिक खनिज तेल उद्योगातील प्रक्रिया रासायनिक बदल घडवून आणतात आणि आधुनिक परिष्करण कारखान्यात तयार होणारे काही उत्पाद हे रसायनेच असतात. खनिज तेल रसायने ही संज्ञा वरील रासायनिक प्रक्रियांचे वर्णन करण्यासाठी वापरतात परंतु या प्रक्रिया कच्च्या तेलाचे प्राथमिक ऊर्ध्वपातन ज्या संयंत्रात केले जाते तेथेच करण्यात येत असल्यामुळे खनिज तेल उद्योग व रासायनिक उद्योग यांत भेद करणे अवघड होते.

धातू व मिश्रधातू या एका अर्थी रसायनेच होत कारण त्या रासायनिक पद्धतींनी मिळविण्यात येतात. धातुंचे शुध्दीकरण करण्यापूर्वी धातुकांवर (कच्च्या स्वरूपातील धातूंवर) काही वेळा रासायनिक विक्रिया कराव्या असतात. धातूंच्या शुध्दीकरणातही रासायनिक विक्रिया अंतर्भूत असतात. पोलाद, शिसे, तांबे यांसारख्या धातू वा मिश्रधातू योग्य तितक्या शुद्ध स्वरूपात तयार करता येतात व नंतर त्यांना विविध आकार देता येतात. तथापि पोलाद उद्योगासारखा उद्योग रासायनिक उद्योगाचा भाग समजला जात नाही. आधुनिक धातुविज्ञानात टिटॅनियम, टँटॅलम, टंगस्टन यांसारख्या धातू तयार करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्रक्रियांमध्ये मोठी रासायनिक कुशलता उपयोगात आणावी लागते आणि तरीसुध्दा धातू प्राथमिक म्हणूनच गणल्या जातात.

अशा प्रकारे रासायनिक उद्योगाच्या सीमा काहीशा संदिग्ध आहेत. या उद्योगाचा कच्चा माल म्हणजे दगडी कोळसा, नैसर्गिक वायू व खनिज तेल यांसारखी हायड्रोकार्बनयुक्त इंधने हवा, पाणी, मीठ, चुनखडक, गंधक वा तत्सम द्रव्ये आणि खास उत्पादांकरिता फॉस्फेटे व खनिज फ्ल्युओरस्पार यांसारखा विशिष्ट कच्चा माल होय. रासायनिक उद्योग या कच्च्या मालांचे प्राथमिक, द्वितीयक, व तृतीयक उत्पादांमध्ये रूपांतर करतो. हा भेद ग्राहकापासून उत्पाद किती दूर आहे यानुसार केला असून प्राथमिक उत्पाद सर्वांत दूर असतो. बऱ्याच वेळा उत्पाद हे रासायनिक उद्योगाच्याच दृष्टीने अंत्य उत्पाद असतात. रासायनिक उद्योगाचे उत्पाद ग्राहकापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांवर बहुधा आणखी प्रक्रिया करावी लागते, हे या उद्योगाचे वैशिष्ट्य आहे. बहुतेक रासायनिक उत्पाद बाजारात येण्यापूर्वी एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात पुढील प्रक्रिया करण्यासाठी बऱ्याच वेळा पाठवावे लागतात.

एकच उत्पाद बऱ्याचदा अनेक प्रकारे तयार करता येत असल्याने रासायनिक उद्योग हा स्वतःचाच स्पर्धक असतो. उदा., फिनॉल हे बेंझिनापासून चार निरनिराळ्या प्रक्रियांनी बनविता येते आणि ते इतर कच्च्या मालांपासूनही मिळविता येते. दाहक (कॉस्टिक) सोडा व सोडा ॲश (सोडीयम कार्बोनेट) यांच्या उत्पादन पद्धतींत उत्पादन पद्धतींत बऱ्याच वेळा मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

एकाच उत्पादाचे अनेक प्रकारे उपयोग असतात. उदा., एथिलीन ग्लायकॉलाचा सर्वांत मोठा उपयोग मोटारगाडीत प्रतिगोठणकारक म्हणून करतात पण त्याचा उपयोग द्रवीय गतिरोधकतही करतात. यावर आणखी प्रक्रिया करून मिळणारे पदार्थ समावेशके म्हणून कापड, औषधे व सौंदर्यप्रसाधने या उद्योगांत आणि पायसीकारक [⟶ पायस] म्हणून कीटकनाशके व कवकनाशके (बुरशीसारख्या वनस्पतींचा नाश करण्यासाठी वापरण्यात येणारी द्रव्ये) यांत वापरण्यात येतात. क्लोरीन वा सल्फ्यूरिक अम्ल यासारखी मूलभूत रसायने अनेक प्रकारे वापरली जातात. रासायनिक उद्योगातील अंतर्गत व निरनिराळ्या रसायनांमधीलही स्पर्धेमुळे रासायनिक उद्योगात उच्च औद्योगिकीकरण झालेल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधनाकरिता खर्च करण्यात येतो.

बहुतेक क्षेत्रांत अमेरिकेची संयुक्त संस्थाने ही रसायनांचे सर्वांत जास्त उत्पादक करतात. प. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली व इतर काही यूरोपीय देशांत, तसेच सोव्हिएट रशियात रसायनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येतो. १९६० सालानंतर काही क्षेत्रांत जपानने मोठ्या प्रमाणावरील उत्पादन करण्यात आघाडी घेतलेली आहे. १९६० नंतरच्या दशकाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणावर रासायनिक उद्योग असलेल्या देशांची क्रमवारी उपलब्ध माहितीनुसार पुढीलप्रमाणे होती : अमेरिकेची संयुक्त संस्थाने , प. जर्मनी, जपान, ब्रिटन, रशिया, फ्रान्स व इटली.

औषधनिर्मिती, कागद, काच, कीटकनाशके, कृत्रिम तंतू, खते, खनिज तेल रसायने, डांबर, पृष्ठक्रियाकारके, प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके, रंगद्रव्ये, रंगलेप, रंजक व रंजकद्रव्ये, रबर, रेझिने, सल्फ्यूरिक अम्लस,सिमेंट, सोडा ॲश, सौंदर्यप्रसाधने, स्फोटक द्रव्ये वगैरे महत्त्वाच्या रासायनिक उद्योगांवर मराठी विश्वकेशात स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत.

इतिहास व विकास : मानवाने प्राचीन काळापासून आपल्या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्या बुध्दिबळावर निसर्गातील उपलब्ध वस्तूंचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी निरनिराळे प्रयोग वा प्रयत्न केले आहेत. उदा., निसर्गात आढळणाऱ्या धातू, दगड यांसारख्या पदार्थांवर प्रक्रिया करून विविध प्रकारची हत्यारे बनविली व त्यांचा अन्न मिळविण्यासाठी (उदा., प्राण्यांची शिकार करून) व नंतर हिंस्त्र पशूंपासून संरक्षण करण्यासाठी वापर केला. झाडाची पाने, साल इत्यादींचा वस्त्रे आणि निवारा (झोपडी) यांच्यासाठी वापर केला. इतर प्राण्यांप्रमाणे आपल्या गरजा भागविण्यासाठी तात्पुरती सोय न करता माणसाने यासाठी कायमची सोय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले कारण भटके जीवन सोडून एका ठिकाणी वास्तव्य करण्याचे ठरविल्याने माणसाच्या जीवनाला स्थैर्य आले होते. नंतर लोकसंख्या व अशा वसाहतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने तद्‍विषयक गरजा पण त्याच प्रमाणात वाढत गेल्या परंतु विज्ञान व तंत्रविद्या यांच्यामध्ये त्या प्रमाणात प्रगती न झाल्याने माणसाला आपल्या सर्व गरजा भागविणे शक्य होईनासे झाले. तथापि कुंभारकाम, मद्यनिर्मिती, वस्त्रे रंगविणे, धातुकाम, काचनिर्मिती व तत्सम कामे करणाऱ्यांनी रसायनांच्या उत्पादनाला व वापराला थोड्याफार प्रमाणात चालना दिली.

मध्ययुगानंतर (इ. स. पाचव्या ते पंधराव्या शतकाअखेरच्या कालानंतर) जसजसा विज्ञान व तंत्रविद्या यांचा झपाट्याने विकास होत गेला, तसतशी संघटित उद्योग उभारण्याच्या कामात मानवाने झपाट्याने प्रगती केली. अठराव्या ते विसाव्या या शतकांत विज्ञान व तंत्रविद्या यांच्यामध्ये एवढी प्रगती झाली की, काही रासायनिक विक्रियांच्या साहाय्याने निसर्गात न आढळणारे प्लॅस्टिके, कृत्रिम तंतू, रंजकद्रव्ये इत्यादींसारखे पदार्थ निर्माण केले गेले.

रासायनिक उद्योगांमुळे खते व कीटकनाशके तयार करता येऊ लागल्याने शेतीपासून अधिक उत्पन्न मिळू लागले आणि थोड्या जमिनीतून वा कमी श्रमामध्ये अन्नधान्याचे जादा उत्पन्न होऊ लागले. रासायनिक उद्योगांमुळे कृत्रिम तंतू व संलग्न रासायनिक साधने यांची निर्मिती करणे शक्य झाल्याने उत्तम प्रतीचे कापड व त्यापासून अधिक उपयुक्त टिकाऊ कपडे तयार करणे शक्य झाले. तसेच बांधकामासाठी लागणारी लाकूड, पोलाद, काँक्रीट, काच इ. साधनसामग्री अधिक उपयुक्त व टिकाऊ करण्यासाठी निरनिराळी रसायने बनविल्याने अधिक टिकाऊ बांधकामे कमी वेळात करता येऊ लागली. अशा तऱ्हेने रासायनिक उद्योगांमुळे मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा अधिक चांगल्या प्रकारे व कमी कालावधीत भागविता येणे शक्य झाले.

औषधनिर्मिती उद्योग हा रासायनिक उद्योगांतील एक महत्त्वाचा भाग असून त्याद्वारे निरनिराळ्या रोगप्रतिबंधक लसी, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) द्रव्ये व इतर औषधी द्रव्ये बनविता येऊ लागली. यामुळे मानवाच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकल्या व त्याचे आयुर्मान वाढले. रासायनिक उद्योगात बनणारे पदार्थ पुष्कळदा रोजच्या वापराच्या वस्तूंच्या रूपात सरळ ग्राहकांपर्यंत न येता त्यांचा इतर उद्योगांतील कच्चा माल म्हणून वापर केला जातो. उदा., सल्फ्यूरिक अम्ल पोलाद कारखान्यात, सोडा ॲश काच कारखान्यात तर क्लोरीन कागद कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरतात. विशिष्ट प्रकारचे रंगलेप, प्लॅस्टिके, झिरपरोधी संयुगे, द्रवीय गतिरोधकातील द्रव, संश्लेषित (कृत्रिम) रबर, संश्लेषित धागे वगैरे उत्पादने मोटारगाडी उद्योगात कच्च्या मालाच्या रूपात वापरली जातात.

खाद्यपदार्थ व शीत पेये या उद्योगांमध्ये लागणारे नैसर्गिक व कृत्रिम रंग, स्वादकारक पदार्थ, जीवनसत्त्वे, पोषक खनिज द्रव्ये, मीठ, परिरक्षक द्रव्ये, बेकिंग चूर्ण, मधुरके (गोड चव आणणागे कृत्रिम पदार्थ), विशेष आहारद्रव्ये, तसेच कापड उद्योगात वापरले जाणारे रंग, कृत्रिम तंतू, साहाय्यक साधने, विरंजक व अंतिम संस्करणासाठी (उदा., धुवा व वापरा, चुणीरोधक, कायम घडी, अग्निरोधक, सूक्ष्मजंतुरोधक कीटकरोधक, शुभ्रता व चकाकी आणणे यांसाठी करण्यात येणाऱ्या संस्करणाकरिता) लागणारी रसायने रासायनिक उद्योगांत निर्माण केली जातात.

घरगुती व औद्योगिक वापरासाठी लागणारे पाणी पिण्यायोग्य व वापरण्यायोग्य करण्यासाठी लागणारी रसायने, अणुभट्टीत वापरले जाणारे अणुइंधन (युरेनियम), स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने उडणाऱ्या) विमानासाठी लागणारे विशिष्ट गुणधर्मांचे प्लॅस्टिक व आसंजके (चिकटणारे पदार्थ) अशा तऱ्हेचे विविध रासायनिक पदार्थ निर्मिण्याचे काम रासायनिक उद्योगात होत असते. देशाच्या प्रगतीमध्ये रासायनिक उद्योगाचे स्थान महत्त्वाचे आहे, असे थोडक्यात म्हणता येईल. वाढत्या रासायनिक उद्योगामुळे देशाच्या एकूण तंत्रवैज्ञानिक ज्ञानात वाढ होऊन देशाच्या आर्थिक भरभराटीस हातभार लागतो तसेच ग्राहकांना तंत्रवैज्ञानिक सेवा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकते. शिवाय अमेरिकेतील कंत्राटी संशोधनाचा उपयोग करून घेण्याचा जास्त प्रसार झाल्याने उद्योगांना व शासनाला वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक अडचणींवर मात करणे शक्य झाले. उदा., द्यू पाँ, या अमेरिकेतील कंपनीमधील शास्त्राज्ञांनी दहा वर्षे संशोधन करून व त्यावर २.७ कोटी डॉलर खर्च करून नायलॉन पॉलिअमाइड या कृत्रिम तंतूचा शोध लावला (१९३५). १९२३ मध्ये त्यांनी आपल्या ग्राहक कंपनीला टेट्रा एथिल लेड या प्रत्याघाती समावेशक पदार्थांच्या [⟶ अंतर्ज्वलन−एंजिन] उत्पादनात मदत केली. त्यामुळे पेट्रोलावर चालणाऱ्या मोटारगाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना बहुमोल साहाय्य झाले. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात त्यांनी विशेष रासायनिक संयंत्राचा आराखडा तयार करून अणुबाँबच्या प्रकल्पासाठी प्लु‍टोनियम तयार केले.

रासायनिक उद्योगामुळे खास तंत्रज्ञांचा समूह तयार झाला आणि त्यांची सार्वजनिक स्वरूपाच्या अडचणी (उदा., डासांचे नियंत्रण, वाहितमलावरील संस्करण व विल्हेवाट) अथवा खाजगी धंद्यातील प्रश्न (उदा., विमानातील हलक्या व आगप्रतिबंधक बैठकी वगैरे) सोडविण्यास चांगली मदत होत आहे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने : १९६० मध्ये अमेरिकेतील रासायनिक उद्योगांमध्ये सु. १३,००० कारखाने (संयंत्रे) व त्यांत सु. ६ लाख लोक काम करीत होते, तर १९७५ च्या सुमारास तेथे सु. ११,००० कंपन्या (कॉर्पोरेशन्स पैकी ३,००० हून अधिक एक एका मालकाच्या व सु. ७०० भागीदारीतील) व त्यांत दहा लाख लोक नोकरीला होते. या कंपन्यांची १९७५ च्या सुमारास ४० अब्ज डॉलर उलाढाल होती व ही रक्कम एकूण रासायनिक उद्योगाच्या ९०% होती. १९६५−७० या काळात या कंपन्यांनी नवीन संयंत्रे व साधने यांमध्ये दरवर्षी ३ अब्ज डॉलर गुंतवणूक केली आणि तितकीच रक्कम त्यांच्या विदेशातील कारखान्यांत गुंतविण्यात येत होती. तदनंतर त्यांनी दरवर्षी संशोधन व विकास यांविषयीच्या कामांवर १.५ अब्ज डॉलर खर्च केले. अशा तऱ्हेने प्रत्येक कामगारामागे तेथे २५,००० डॉलर गुंतवणूक होई. इतर उद्योगांतील कामगारांमागील गुंतवणुकीच्या मानाने ही गुंतवणूक कितीतरी जास्त होती. याचा अर्थ रासायनिक उद्योगांत यांत्रिकीकरण व स्वयंचलन यांचे प्रमाण खूप होते व याकरिता इलेक्ट्रॉनीय उपकरणे आणि नियंत्रक साधने यांचा विस्तृतपणे वापर करण्यात आला.

अशा प्रकारे १९६५−७० या काळातील वार्षिक विक्री १ अब्ज वा त्यापेक्षा अधिक डॉलर असलेल्या अमेरिकेतील रसायने व संबंधित उत्पादांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या पुढीलप्रमाणे होत्या : द्यू पाँ, प्रॉक्टर अँड गँबल, युनियन कार्बाइड, डाउ केमिकल्स, मॉन सांतो, अलाइड केमिकल्स, ओलीन माथिसन व द सेलेनीझ कॉर्पोरेशन. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात औषधनिर्मिती हा सर्वांत लाभदायक रासायनिक उद्योग ठरला व यात पुढील उत्पादक महत्त्वाचे होत : मर्क अँड कंपनी, एली लिली अँड कंपनी, फायझर अँड कंपनी, ॲबट लॅबोरेटरीज, अपजॉन कंपनी, स्मिथ क्लाइन अँड फ्रेंच लॅबोरेटरीज इत्यादी. या काळातील अमेरिकमधील खनिज तेल कंपन्या, पोलाद कारखाने आणि इतर काही यांच्यामधील रासायनिक उद्योगाविषयक विभागांना महत्त्व प्राप्त झाले होते. त्यांपैकी काही कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे होत : स्टँडर्ड ऑइल कंपनी, द ईस्टमन कोडॅक कंपनी, द युनायटेड स्टेट्स स्टील कंपनी वगैरे.

रासायनिक उद्योगामध्ये जगात अमेरिकेला अग्रगण्य स्थान मिळण्याची पुढील कारणे आहेत : तेथे नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात व सहजपणे उपलब्ध होईल अशी आहे, उदा., दगडी कोळसा, मीठ, गंधक, फॉस्फेटी खडक पोटॅश, युरेनियम, खनिज तेल, नैसर्गिक वायू, मोठी वने, मुबलक पाणी असलेल्या मोठ्या नद्या वगैरे. यांशिवाय शहरे व कारखाने यांच्या दरम्यान (राशिमालाची) वाहतूक करण्यासाठी माफक खर्चाची वाहतूक व्यवस्था व सुरुवातीच्या वसाहती उभारणारे धाडसी अभियंते यांच्यामुळेही हा उद्योग भरभराटीस आला. ब्रिटन अथवा यूरोपीय राष्ट्रांप्रमाणे अमेरिकेला दुसऱ्या महायुध्दाची प्रत्यक्ष झळ पोहोचली नाही आणि दोस्त राष्ट्रांना रसायने, दारूगोळा वगैरेंचा पुरवठा करावा लागला. यांमुळेही येथील रासायनिक उद्योगांची भरभराट होत राहिली. युद्ध काळात खनिज तेल परिष्करणातून मिळणारा वायू व नैसर्गिक वायू हा कच्चा माल वापरून येथे कृत्रिम रबर व इतर पदार्थ बनविण्यात येऊ लागले. ब्रिटनमध्ये पॉलिएथिलिनाचा व इटलीमध्ये पॉलिप्रोपिलिनाचा शोध लागला तथापि यांच्या उत्पादनामध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो.

ब्रिटन व इतर यूरोपीय देश : खऱ्या अर्थाने रासायनिक उद्योगाची सुरुवात साधारणपणे अठराव्या शतकाच्या प्रारंभी झाली, असे समजले जाते. त्या आधीचा रासायनिक उद्योग छोट्या प्रमाणावर असे अल्पस्वल्प रासायनिक ज्ञान व जास्तकरून अनुभवातून आलेले ज्ञान यांच्या आधारे तेव्हा हा उद्योग करण्यात येई. उदा., साबण, काच, कातडी कमावणे (व चीनमध्ये थोड्या प्रमाणात बंदुकीची दारू).

मिठापासून सोडा ॲश तयार करण्याची ल ब्लांन प्रक्रिया वापरणारा कारखाना फ्रान्समध्ये १७१० साली उभारण्यात आला. तेव्हापासून रासायनिक उद्योग सुरू झाला असे मानतात. या उद्योगाची सुरुवात जरी फ्रान्समध्ये झाली, तरी या पद्धतीचा प्रत्यक्ष वापर खऱ्या अर्थाने ब्रिटनमध्ये करण्यात आला. साबण, काच वगैरे बनविणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली तशी सोडा ॲशची मागणीही वाढली. यांच्या जोडीनेच सुती व लिनन कापड उद्योगाच्या वाढीमुळेही ब्रिटनमधील रासायनिक उद्योगाला चालना मिळाली. शिसे-कोठी पद्धतीने मिळविण्यात येणारे सल्फ्यूरिक अम्ल व ल ब्लांनक प्रक्रियेमध्ये तयार होणाऱ्या हायड्रोक्लोरिक अम्ला चा चार्ल्स टेनंट यांच्या विरंजक चूर्ण तयार करण्याच्या पद्धतीत होणारा उपयोग यांमुळे ब्रिटनने एकोणिसाव्या शतकांत ल ब्लांमक प्रक्रियेवर लक्ष केंद्रीत केले व परिणामी या देशाला रासायनिक उद्योगांत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. पुढे ब्रिटीश शास्त्रज्ञ सर विल्यम पर्किन यांनी पहिल्या कृत्रिम रंजकद्रव्यांच्या (ॲनिलीन) लावलेल्या शोधाचा लाभ जर्मनीने उठविला व तेथे या रंजकद्रव्य उद्योगाची वाढ विशेष झाली. १८७४ साली सॉल्व्हे प्रक्रियेचा शोध लागला व परिणामी तिच्यापेक्षा अधिक महाग असलेली ल ब्लांनक प्रक्रिया मागे पडली. ब्रिटनमध्ये मात्र ल ब्लांक प्रक्रियेवरच भर देण्यात आल्याने तो देश या उद्योगांत जर्मनीच्या मागे पडला.

जर्मनीने रंगलेप उद्योगाचा पाठपुरावा केल्याने तेथे तीव्र अम्लांची गरज भासू लागली. सल्फ्यूरिक अम्लजनिर्मितीच्या संपर्क प्रक्रियेच्या शोधामुळे ही गरज भागविणे शक्य झाले. अमोनिया व कार्बन डायऑक्साइड यांची मिठाच्या विद्रावावर विक्रिया करून सोडा ॲश आणि कॅल्शियम क्लोराइड मिळविण्यासाठी वापरली जाणारी सॉल्व्हे प्रक्रिया, दाहक सोड्याची विद्युतीय निर्मितीची पद्धती (हिच्यात निर्माण होणारा क्लोरीन वायू हा उपपदार्थ पुढे विरंजक चूर्णासाठी वापरण्यात आला) इत्यादींमुळे कापड उद्योगाचा विकास झाला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर्मनीमध्ये कार्बनी रसायनांच्या उद्योगात मोठ्या प्रमाणात संशोधक आणि विकास होऊन १९१४ साली जगातील ९८% रंगलेप व रंजकद्रव्ये आणि त्यांसाठी लागणारी कार्बनी रसायने जर्मनीत निर्माण होत होती. कार्बनी रसायनशास्त्रातील संशोधनाचा या देशाला नंतरच्या काळात मोठा फायदा झाला. उदा., कृत्रिम नीळ व ॲलिझरीन ही रंजकद्रव्ये, तसेच औषधी द्रव्ये (मुख्यत्वे ॲस्पिरीन) यांच्या निर्मितीसाठी या काळात फ्रिट्स हाबर व कार्ल बॉश यांनी अमोनियाचे संश्लेषण करण्याची (घटक मूलद्रव्यांपासून तयार करण्याची) हाबर-बॉश पद्धती विकसित केली. तिच्यामुळे अवजड रासायनिक उद्योगाचे एक नवे दालन उघडले गेले. यामुळे अमोनियम सल्फेट व नायट्रेट, नायट्रीक अम्ला, यूरिया इत्यादींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सुरुवात झाली. शिवाय श्टासफुर्ट येथील पोटॅशयुक्त लवणांचे निष्कर्षण करण्यात येऊ लागले. या गोष्टीमुळे यूरोपात रासायनिक उद्योगामाध्ये जर्मनी दीर्घकाळ प्रथम क्रमांकावरचा देश राहिला. १९६० साली ब्रिटन या जागेवर आला, तरी तेव्हा त्याचे उत्पादन अमेरिकेच्या उत्पादनाच्या १/६ पट होते तर फ्रान्सचे ब्रिटनच्या २/३ पट आणि इटलीपेक्षा ३०% अधिक होते. तेव्हा ब्रिटडनमधील रासायनिक उद्योगातील उत्पादनाचा सर्व उद्योगांच्या उत्पादनातील वाटा ७% होता.

दुसऱ्या महायुध्दानंतर जर्मनीतील मोठ्या उद्योग समूहांचे विकेंद्रीकरण होऊन लिफर कुझेन, हेक्स्ट व लुडव्हिगशाफेन या ठिकाणी नवीन, मोठे व स्वतंत्र कारखाने स्थापण्यात आले. हे कारखाने अमेरिकेतील, ब्रिटनमधील वा इटलीमधील त्यांच्यासारख्या कारखान्यांच्या मानाने लहान होते तरी त्यांचे एकूण रासायनिक उद्योगातील स्थान महत्त्वाचे होते. इतर देशांतून विकेंद्रीकरणाऐवजी लहान मोठे उद्योग एकत्रित करण्याचा कल दिसून येत होता कारण आधुनिक संश्लेषित रसायनांच्या उद्योगांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते.

प्रमुख रसायने : सल्फ्यूरिक अम्लाचे उत्पादन सर्वांत जास्त प्रमाणात होते. अमेरिकेत याचे उत्पादन १९८० मध्ये सु. ४ कोटी टन झाले होते. याच्यानंतर उतरत्या क्रमाने पुढील रसायनांचे उत्पादन होते : निर्जल अमोनिया, दाहक सोडा, क्लोरीन, सोडा ॲश, नायट्रीक व फॉस्फोरिक अम्ले. कार्बनी रसायनांमध्ये सर्वाधिक उत्पादन बेझिंनाचे (अमेरिकेत १९८० मध्ये सु. ६५ टन) होते व तदनंतर पुढील रसायनांचा क्रम लागतो : एथिल अल्कोहॉल, फॉर्माल्डिहाइड, स्टायरीन, मेथॅनॉल. कार्बनी आणि अकार्बनी रसायनांचे उत्पादन हा या उद्योगाचा महत्त्वाचा भाग असून यानंतर उलाढालीच्या दृष्टीने पुढील पदार्थांचा क्रम लागतो : कृत्रिम (संश्लेषित) पदार्थ (उदा., तंतू, प्लॅस्टिके, रबर इ.) सफाईकारक आणि प्रसाधन सामग्री (उदा.,साबण, प्रक्षालके,पॉलिशे, सौंदर्यप्रसाधने), औषधी द्रव्ये (डॉक्टरांच्या शिफारसीनेच मिळणारी एकस्व−पेटंट−प्राप्त, पशूंसाठीची) रंगलेप व संबंधित पदार्थ, खते व पीडकनाशके, संकीर्ण रसायने (उदा., सरस, जिलेटन, छपाईची शाई, काजळी, असैनिकी स्फोटक द्रव्ये वगैरे).

सल्फ्यूरिक अम्ल : देशाच्या रासायनिक उद्योगातील प्रगतीचा मापदंड म्हणून याच्या उत्पादनाकडे पाहिले जाते. सोळाव्या ते अठराव्या शतकापर्यंत याचे उत्पादन काचेच्या घंटाकार पात्रात करण्यात येई. १७४६ मध्ये जॉन रोबक यांनी शिशाच्या पत्र्याचे अस्तर असलेल्या मोठ्या कोठीत याचे उत्पादन करणे फायदेशीर असल्याचे दाखवून दिले. १७४९ मध्ये जोशुआ वार्ड सॉल्टपीटर वापरून याचे उत्पादन वाढविण्याच्या प्रक्रियेचे एकस्व घेतले. १८३१ साली इंग्लंडमध्ये याच्या उत्पादनाची संपर्क प्रक्रिया माहित होती मात्र अधिक उपयुक्त प्रक्रियेचा विकास जर्मनीमध्ये बाडिश ॲनिलीन उंड सोडाफ्राब्रिक ए.जी. या कंपनीने आणि अमेरिकेत जनरल केमिकल कंपनीमध्ये (आता ॲलाइड केमिकल कॉर्पोरेशनचा भाग असलेल्या) करण्यात आला. प्लॅटिनम वा व्हॅनेडिअम उत्प्रेरक (विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) वापरून सल्फर डायऑक्साइडपासून सल्फर ट्राय-ऑक्साइडचे होणारे उत्पादन वाढविणे, ही या प्रक्रियेतील प्रमुख विक्रिया आहे. संपर्क प्रक्रिया ही कोठी प्रक्रियेपेक्षा अधिक कार्यक्षम तर आहेच शिवाय संपर्क प्रक्रियेत उच्च संहतीचे (उच्च प्रमाण असलेले) वाफाळ सल्फ्यूरिक अम्लस तयार होऊ शकते. डांबरापासून बनविण्यात येणाऱ्या रंजकद्रव्यांच्या निर्मितीसाठी अशा अम्लाची अतिशय आवश्यकता असते. [⟶ सल्फ्यूरिक अम्लस].

कार्बनी रसायनांच्या उद्योगाचा विकास : १८५० च्या पूर्वी कार्बनी रसायनांविषयी अगदी थोडी माहिती. साबणीकरणाची क्रिया विनाहवा लाकूड जाळून लोणारी कोळसा व व ॲसिटिक अम्लय मिळविणे, आंबविलेल्या विद्रावापासून ऊर्ध्वपातनाने अल्कोहॉल बनविणे अथवा अल्कोहॉलवर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया करून भूल देण्यासाठी उपयुक्त असलेले ईथर बनविणे यांच्यापलीकडे कार्बनी रसायनउद्योगाची प्रगती तेव्हा झालेली नव्हती. मॅडर वा नीळ ही नैसर्गिक रंगकद्रव्ये कापड उद्योगात वापरली जात. नंतर या उद्योगाच्या प्रगतीला चांगलाच वेग प्राप्त झाला. दगडी कोळसा जाळून दिव्यात जाळण्यासाठी वायू तयार करण्यात येई व असे करताना डांबर मिळत असे. या डांबरावर प्रयोग करताना त्याच्या ऊर्ध्वपातलाद्वारे १८१५ साली बेंझीन मिळाले. १८४३ साली जर्मन रसायनशास्त्रज्ञ ए. डब्ल्यू. फोन होफमान यांनी अशा बेझिंनपासून मिळणारे ॲनिलीन व नैसर्गिक निळीपासून मिळणारे ॲनिलीन हे एकच रसायन असल्याचे दाखविले. अशा तऱ्हेने या डांबरापासून रंजकद्रव्ये मिळविण्यासाठी शक्यता वाढली. इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्रीमध्ये अध्यापन करीत असताना होफमान यांनी १८४५ साली डांबरपासून संश्लेषित क्विनीन मिळण्याची शक्यता वर्तविली विल्यम पर्किन यांना तसा प्रयत्न करून पहाण्यास सांगितले. आपल्या घरातील प्रयोगशाळेत प्रयोग करीत असताना पर्किन यांना चंचुपात्रामध्ये एक गढूळ अवक्षेप (न विरघळणारा साका) तयार झालेला आढळला. तो टाकून देण्याऐवजी त्यांनी त्यात आपला रुमाल बुचकळला तेव्हा रुमालाला उत्तम मॉव्ह रंग प्राप्त झाला. त्यांनी त्याचे मॉव्ह असे नामकरण करून त्या प्रक्रियेचे एकस्वही घेतले (संश्लेषित रंजकद्रव्याचे घेतलेले हे पहिले एकस्व होय) आणि १८५७ साली व्यापारी तत्त्वावर त्याचे उत्पादन सुरू केले.

पर्किन यांच्या यशामुळे इतर, विशेषतः जर्मन, शास्त्रज्ञांनी डांबरापासून मिळणाऱ्या रंजकद्रव्यांच्या संशोधनाल विशेष लक्ष घातले. १८८० पर्यंत बरीच नवी रंजकद्रव्ये शोधण्यात आली आणि १८९० पर्यंत अशा तऱ्हेने मिळविलेल्या ॲलिझरी रंजकद्रव्यामुळे नैसर्गिक मॅडर रंजकद्रव्याचा वापर संपुष्टात आला व नैसर्गिक निळीची जागा कृत्रिम निळीने घेतली. अशा रंजकद्रव्याचा कारखान अमेरिकेत प्रथम टॉमस अँड चार्ल्स हॉलिडे या कंपनीने ब्रुकलीन येथे १८६४ मध्ये सुरू केला आणि तेथे मॅजेंटा व इतर रंजकद्रव्यांचे उत्पादन करण्यात येऊ लागले. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतील अशा रंजकद्रव्यांचे सर्वांत जास्त उत्पादन करणारी शोएलकोफ ॲनिलीन अँड केमिकल कंपनी (आताची ॲलाइड केमिकल कॉर्पोरेशन) ही १८७९ साली बफालो येथे स्थापन झाली.

यापूर्वी डांबर हा दुर्गंधीयुक्त चिकट पदार्थ लाकडाच्या परिरक्षणासाठी, घरांची छपरे जलाभेद्य करण्यासाठी व रस्ते तयार करण्यासाठी वापरला जाई परंतु त्यापासून रंजकद्रव्ये व इतर महत्त्वाचे पदार्थ मिळू लागल्याने तो रासायनिक उद्योगातील महत्त्वाचा माल बनला. नंतरच्या वैज्ञानिक प्रयत्नांतून व संशोधनाद्वारे १८७९ मध्ये क्युमारीन व हेलिओट्रोप या दोन महत्त्वाच्या संश्लेषित सुवासिक द्रव्यांचा, व्हॅनिलीन या पहिल्या संश्लेषित स्वादकारक पदार्थांचा व सॅकॅरीन या कॅलरी मूल्य नसणाऱ्या पहिल्या मधुरकाचा शोध लागला. फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझील या पहिल्या संश्लेषित प्लॅस्टिक द्रव्याचा शोध वेकेलाइट कंपनीने (ही आता युनियन कार्बाइडच्या एक भाग आहे) संस्थापक लेओ एच्‍. बेकलँड यांनी १९०७ साली लावला.

इ. स. १९१० पॉल अर्लिक ह्यांनी आर्सफेनामीन उपदंशावर गुणकारी असल्याचे दाखविले. १९३२ साली प्रॉन्टोसील हे पहिले सल्फा औषध संश्लेषित करण्यात आले. १९०० च्या सुमारास पिक्रिक अम्ली व ट्रायनायट्रोटोल्यूइन ही डांबरापासून मिळणारी स्फोटक द्रव्ये लष्करी कामांसाठी वापरण्यास सुरुवात झाली.

पहिल्या महायुध्दाच्या काळापर्यंत डांबरापासून मिळणारी रयासने व स्फोटक द्रव्ये यांच्या बाबतीत जर्मनीचे पूर्ण वर्चस्व होते. त्यामुळे दारूगोळा, रंगकद्रव्ये व इतर रसायने यांच्यासाठी यूरोपीय दोस्त राष्ट्रांना अमेरिकेकडे धाव घ्यावी लागली म्हणून तेथील रायासनिक उद्योग एकदम भरभराटीला येऊन तो जागतिक पातळीवरील एक उद्योग बनला आणि त्याचे स्थान अजूनही टिकून आहे.

रस्त्यावरच्या विजेच्या दिव्यांचा प्रसार झाल्याने रस्त्यावरील दिव्यांसाठी दगडी कोळसापासून तयार करण्यात येणाऱ्या वायूचा वापर कमी होत गेला व या वायुनिर्मितीतून बनणाऱ्या डांबराचे उत्पादन कमी होऊ लागले. त्यामुळे रासायनिक उद्योगातील कच्चा माल असलेल्या डांबरासाठी इतर उद्योगांकडे वळावे लागते. याच सुमारास पोलाद उद्योगामध्ये झोत भट्टीसाठी लागणारा कोक तयार करण्यासाठी मधुकोशाकार भर्जन भट्टीचा वापर थांबविण्यात आला व त्यासाठी रसायन पुनर्प्राप्ती भट्टीची वापर सुरू झाला. या बदलामुळे वापरलेल्या दर टन दगडी कोळसापासून आधीपेक्षा जास्त कोक तर मिळू लागलाच, शिवाय बेझींन, टोल्यूइन, नॅप्थॅलिन, क्रेसोल, अमोनियम सल्फेट इ. रसायनेही मिळू लागली [⟶ कोक]. यामुळे कार्बनी रसायन उद्योगाला पूर्वीपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर कच्चा माल उपलब्ध होऊ लागला.

खनिज तेल रसायने : कोकच्या भट्ट्यांनंतर कार्बनी रसायनांच्या उद्योगाच्या मूलभूत कच्च्या मालात युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन व पिट्सषबर्गची मेलॉन इन्स्टिट्यूट यांनी मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणला. खाणीत, तसेच मोटारी व सायकली यांसाठी वापरण्यात येत असलेल्या झोत दिव्यांत वापरण्यात येणारा ॲसिटिलीन वायू तयार करण्यासाठी १९१२−२० या काळात मेलॉन इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आलेल्या संशोधनामुळे खनिज तेल व नैसर्गिक इंधन वायू यांतील हायड्रोकार्बनांवर आधारलेल्या एका पूर्ण मालिकेतील नव्या कार्बनी रसायनांचे (खनिज तेल रसायनांचे) क्षेत्र निर्माण झाले. १९२५ मध्ये दक्षिण चार्ल्सेटन (पश्चिम व्हर्जिनिया) येथे युनियन कार्बाइडने एथिलीन ग्लायकॉलाच्या उत्पादनास प्रारंभ केला आणि १९२७ मध्ये त्याजवळील ब्लेमन बेटावर याकरिता अधिक मोठे संयंत्र उभारण्यात आले. या संयंत्राचा पुढे अनेक वेळा विस्तार करण्यात आला व तेथे जगातील सर्वांत मोठा व कार्बनी रसायनांचा कारखाना बनला.

नैसर्गिक इंधन वायू व खनिज तेल यांच्यापासून डांबर आणि कोक यांच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात रसायने बनविली जातात व ह्या रसायनांमधील विविधताही अधिक आहे. अमेरिकेत उत्पादित होणारे ८० टक्के बेझींन व ९० टक्क्यापेंक्षा जास्त टोल्यूइन, झायलीन, फिनॉल, स्टायरीन ही रसायने खनिज तेल रसायनांच्या कारखान्यांत तयार होतात. खनिज तेल रसायन उद्योगामुळे रसायनांच्या संख्येतही वाढ झाली. उदा., डांबर वा कोक यांपासून मिळविता न येणारी एथिलीन, प्रोपिलीन, ब्युटाडाइन यांच्यासारखी रसायनेही खनिज तेल रसायन उद्योगामुळे बनू लागली. [⟶ खनिज तेल रसायने].

संश्लेषित रबर व प्लॅस्टिके : दुसऱ्या महायुध्दामुळे आग्नेय आशियातून नैसर्गिक रबर मिळविणे अशक्य झाले. त्यामुळे अमेरिकन शासनाने संश्लेषित रबर उद्योग चालू करण्याचे तेथील कारखानदारांना आवाहन केले. १९४३ पर्यंत म्हणजे दोन वर्षांमध्ये ७५ कोटी डॉलर खर्च करून तेथे असे २९ मोठे व २२ छोटे कारखाने उभारण्यात आले. या कारखान्यांमध्ये २०,००० अभियंते व कामगार काम करीत व या कारखान्यांतून वर्षाला ८·६ लाख टन संश्लेषित रबर निर्माण होत असे. त्यामुळे अमेरिकेची गरज तर भागलीच, शिवाय त्यामुळे दोस्त राष्ट्रानांही मदत झाली. अमेरिकमध्ये २० लाख टन संश्लेषित रबर वापरले जाते कारण पुष्कळ ठिकाणी नैसर्गिक रबरापेक्षा संश्लेषित रबर वापरणे अधिक फायद्याचे असते. यामुळे या देशात ५ लाख टनांपेक्षा कमी नैसर्गिक रबर वापरले जाते. [⟶ रबर].

प्लॅस्टिकांचे उत्पादन हा कार्बनी रसायनांच्या उद्योगातील दुसरा व महत्त्वाचा विभाग आहे. प्लॅस्टिकाचा वापर आता घरगुती स्वरूपाच्या वस्तूंसाठी सर्रास होऊ लागला आहे. प्लॅस्टिकांचे (रेझिने व बहुवारिके) पुढील प्रकार सर्वांत जास्त प्रमाणात वापरले जातात : पॉलिएथिलीन, पॉलिव्हिनिल क्लोराइड, पॉलिस्टायरीन, फिनॉलिक यूरिया, मेलॅमीन, फिनॉल फॉर्माल्डिहाइड, अल्किड व स्टायरिन सहबहुवारिके रेझिने. [⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके].

मानवनिर्मित तंतू : रासायनिक उद्योगांच्या संशोधन केंद्रात झालेल्या संशोधनातून रंजक द्रव्यांनंतर मानवाला कृत्रिम तंतू हा नवा महत्त्वाचा उपयुक्त पदार्थ उपलब्ध झाला. कापड, गालिचे, टायरमधील धागे, मच्छीमारीसाठी लागणारी जाळी इत्यादींसाठी हे तंतू वापरतात. रेयॉन, ॲसिटेट यांसारखे सेल्युलोज (सुधारित सुती-सेल्युलोज) धागे प्रथमतः लाकडाच्या लगद्यापासून बनविण्यात आले. अमेरिकेत सर्वप्रथम फिलाडेल्फिया येथील अमेरिकन व्हिस्कोज कॉर्पोरेशनने १९१४ साली रेयॉनाचा कारखाना उभारला.

सर्वांत प्रथम पूर्णतः कृत्रिम असे तंतू अधिक साध्या रेणूंपासून संश्लेषित करण्यात आले. उदा., नायलॉन−६६ हा तंतू द्यू पाँ कंपनीच्या संशोधन विभागाचे प्रमुख डब्यूंत. एच्. कारदर्स यांनी शोधून काढला आणि तो १९४० मध्ये जागतिक बाजारपेठेत आला. आता कापड उद्योगासाठी विविध प्रकारचे कृत्रिम तंतू उपलब्ध झालेले असून त्यांत ॲक्रिलिक, पॉलिएस्टर, स्पँडेक्स, पॉलिप्रोपिलिन व निरनिराळे नायलॉनांचे प्रकार यांचा समावेश होतो. पुष्कळ वेळा दोन वा अधिक प्रकारचे तंतू संमिश्रण रूपात वापरतात. अमेरिकेतील सेल्युलोजयुक्त तंतूचे उत्पादन वर्षाला सु. ३५ कोटी किग्रॅ (म्हणजे जागतिक उत्पादनाच्या २५ टक्क्यांहून जास्त), तर पूर्णतया कृत्रिम तंतूंचे तेथील उत्पादन सु. ४० कोटी किग्रॅ. (जागतिक उत्पादनाच्या ३५ टक्क्यांहून जास्त) एवढे होते. [⟶ तंतू, कृत्रिम].

संश्लेषित रबर, प्लॅस्टिके किंवा तंतू यांच्यासाठी लागणारा प्राथमिक व मध्यस्थ रूपांतील कच्चा माल हा खनिज तेल रसायनांच्या कारखान्यांतून मिळतो. उदा., संश्लेषित रबरासाठी लागणारे ब्युटाडाइन, स्टायरिन संश्लेषित रेझिनासाठी एथिलीन आणि व्हिनिल क्लोराइड व कृत्रिम तंतूंसाठी लागणारे सायक्लोहेक्झेन आणि पॅराझायलीन.

स्थिरीकृत नायट्रोजन : खनिज तेल रसायनांपासून वरील कच्च्या मालाशिवाय नायट्रोजनयुक्त खत हा महत्त्वाचा माल मिळतो. वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तीन मूलद्रव्यांपैकी नायट्रोजन हे एक आहे. हवेत नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असला, तरी या अवस्थेमध्ये त्याचा वनस्पतींना उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे नायट्रोजनाचा इतर एक-दोन मूलद्रव्यांशी रासायनिक संयोग होऊन बनलेल्या संयुगांच्या (खतांच्या) मुळांद्वारे होणाऱ्या शोषणातून वनस्पतींना नायट्रोजन मिळतो व त्याचा त्यांच्या वाढीला उपयोग होतो.

पूर्वी शेतकऱ्यांना आवश्यक तेवढ्या प्रमाणात नायट्रोजनयुक्त खते मिळत नसत व त्यामुळे धान्योत्पादन कमी होत असे. याखेरीज नैसर्गिज नायट्रेटे किंवा नायट्रीक अम्लर मोठ्या प्रमाणात औद्योगिक वा लष्करी स्फोटक द्रव्यांसाठी वापरण्यात येऊ लागल्याने नायट्रोजनयुक्त खते पुरेशा प्रमाणात मिळत नसत.

अमेरिकन सायनामाइड कंपनी हा नायट्रोजनाचे स्थिरीकरण करण्यात तांत्रिक व आर्थिक दृष्टींनी यशस्वी झालेले पहिला उद्योग होय. एफ्. एस्. वॉशबर्न यांनी १९०७ साली स्थापलेल्या या कंपनीच्या नायगार फॉल्स येथील संयंत्रात कॅल्शियम सायनामाइड बनविण्यासाठी विद्युत् भट्टी-प्रक्रिया वापरली, १९०९ साली येथील उत्पादन सुरू झाले आणि पुढील पाच वर्षांत येथील संयत्राचा आठ पटींनी विस्तार करण्यात आला.

नायट्रोजनाच्या स्थिराकरणासाठी सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी हाबर−बॉश प्रक्रिया ही बाडिश ॲनिलीन कंपनीतील जर्मन शास्त्रज्ञांनी शोधली. या प्रक्रियेमध्ये हवेतील नायट्रोजनाबरोबर हायड्रोजनाचा उच्च तापमान व दाबाला संयोग घडवून अमोनिया वायू तयार केला जातो. ही प्रक्रिया या कंपनीने आपल्या संयंत्रात १९१३ साली प्रथम वापरली. ॲलाइड केमिकल कॉर्पोरेशनने साधारण अशीच प्रक्रिया वापरून अमोनिया तयार करण्याचे संयंत्र १९२७ साली होपवेल (व्हर्जिनिया) येथे उभारले. अशा तऱ्हेने मिळविण्यात येणाऱ्या अमोनिया वायूचे इतर प्रक्रिया वापरून अमोनियम सल्फेटासारख्या खतात रूपांतर केले जाते तसेच इतर मूलद्रव्ये वापरून त्यांच्यापासून सोडियम अमोनिया फॉस्फेटासारखे पदार्थ तयार केले जातात.

सुरुवातीसुरुवातीला दाहक क्लोराइड विद्युत् विच्छेदनीय संयंत्रातून उपपदार्थ म्हणून मिळणारा हायड्रोजन वायू अशा तऱ्हेने अमोनिया बनविण्यासाठी वापरला जात असे तथापि १९२९ साली शेल केमिकल कंपनीने नैसर्गिक वायूच्या भंजनाद्वारे हायड्रोजन मिळविला आणि त्याला योग्य असे अमोनियानिर्मितीचे संयंत्र उभारले. या प्रयोगामुळे आता सर्व मोठ्या खनिज तेल कंपन्या आणि पुष्कळ नैसर्गिक वायू कंपन्यांनी अमोनिया निर्मितीचे कारखाने उभारले आहेत. [⟶ अमोनिया खते].

कोष्टक क्र. १. मूलभूत कार्बनी रसायनांचे काही प्रमुख देशांतील व भारतातील उत्पादन (१९७९)
देश एथिलीन प्रोपिलीन ॲसिटिलीन बेंझीन टोल्यूइन झायलिने मिथिल अल्कोहॉल एथिल अल्कोहॉल एथिलीन ऑक्साइड
अमेरिकेची संयुक्त संस्थाने १३,२३९ ६,४८६ १८० ५,७२९ ५,३४६ ३,३४७ ३,३६२ १४,२९७ २,५७०
पश्चिम जर्मनी ३,५४९ १,८४४ २२४ १,००७ २९९ ४९३ ८७१ १,८२१ ४३४
जपान ४,७८४ ३,११३ ३३ २,१७९ ९६२ १,३१८ ९४० २,१७९ ५९३
ब्रिटन १,२३४ ७६६ १,०५६ २९४ २,७९९
रशिया १,६४२ ७७० ३१३ ४,५४४ १,७७४ ३१,१७७
फ्रान्स २,२४८ १,१५६ १३.९ ५९५ ८४ १०३ ३५३ ८,९८३
इटली १,१८१ ६७८ १०८ ५३० ३६७ ४९३ १७२ ७८
भारत १०२.४ ५७.७ १०.४ ७८.८ १९.८ ५२.१ ३,०६० १२.१

एथिल अल्कोहॉलाचे उत्पादन हजार हेक्टोलिटरांमध्ये व इतर रसायनांचे हजार टनांमध्ये दिलेले आहे.

अलीकडच्या काळात रायासनिक उद्योग व खनिज तेल उद्योग यांचे संबंध फार जवळचे झाले आहेत. खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या पुष्कळ कंपन्यांनी विकासाची कामे करून पुष्कळशा रासायनिक प्रक्रियांत व उद्योगामध्ये लक्ष वळविले आहे तर काही रासायनिक उद्योगांनी नियमितपणे व हक्काने हायड्रोकार्बनयुक्त कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी छोटे खनिज तेल उद्योग विकत घेतले आहेत.

भारतीय उद्योग : भारतात प्राचीन काळपासून कुंभारकाम, धातुकाम, नैसर्गिक खनिजांवरील प्रक्रिया, चुनखडीपासून चुना तयार करणे, फळांच्या रसांचे मद्यनिर्मितीसाठी किण्वन करणे (आंबविणे), बाष्पनशील (बाष्प रूपाने उडून जाणाऱ्या,) तेलांचे निष्कर्षण, औषधी द्रव्ये बनविणे, विविध प्रकारची काच तयार करणे, रंगद्रव्यांचा उपयोग करणे यांसारखे रासायनिक प्रक्रियांवर अवलंबून असणारे निरनिराळे व्यवसाय अस्तित्वात होते परंतु यांपासून मिळालेल्या अनुभवजन्य ज्ञानाचा व पाश्चात्त्य देशांत प्रसृत झालेल्या ज्ञानाचा उपयोग करून संघटित रीत्या आजच्या अर्थाने रासायनिक उद्योग म्हणून या उद्योगाची उभारणी विसाव्या शतकातच झाली.

भारतातील रासायनिक उद्योगाची सुरुवात गरजेपोटी पहिल्या महायुध्दाच्या काळात झाली. ब्रिटीश शासनाला युध्दासाठी लागणारा दारूगोळा, व रसायने यांची या काळात आयात बंद झाली किंवा तिच्यात अनिश्चितता आली होती. त्यामुळे हे पदार्थ बनविण्यासाठी सरकारने कारखाने उभारले व भारतीय उद्योजकांना असे कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. मात्र रासायनिक उद्योगाची खरी वाढ दुसऱ्या महायुध्दानंतर बऱ्याच झपाट्याने झाली. भारतात या उद्योगाची सुरुवात व वाढ उशिरा झाल्याने एक मोठा फायदा झाला आणि तो म्हणजे त्या काळात इंग्लं‍ड-यूरोपमध्ये विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान वापरून येथे नवीन रासायनिक उद्योग उभारले गेले.

दुसऱ्या महायुद्ध काळात ब्रिटीश सरकारने भारतामध्ये काही संशोधन संस्था(उदा., कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च) स्थापन केल्या. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारत सरकारने विज्ञान व तंत्रविद्या यांचे महत्त्व ओळखून त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. त्यामुळे जगातील विकसनशील देशांमध्ये वैज्ञानिक विकासाची भारताची पातळी सर्वाधिक झाली असून ग्राहकोपयोगी व इतर अशा अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती भारतात होऊ लागली आणि काही वस्तूंची निर्यात होऊ लागली. उद्योग प्रणालीची क्षमता व त्यासाठी लागणारी पायाभूत यंत्रणा, स्पर्धा असतानाही मिळविण्यात आलेली परदेशी कंत्राटे, प्रसिद्ध करण्यात आलेले संशोधनपर लेख किंवा एकूण औद्योगिक पातळी यांवरून भारताने वैज्ञानिक विकासाची उच्च पातळी गाठल्याचे सिद्ध होते.

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची ३८ संशोधन केंद्रे देशभर विखुरलेली असून त्यांत चालणाऱ्या संशोधनाचा रासायनिक उद्योगांना चांगला उपयोग होतो. विकास आणि आधुनिकीकरण यांविषयीची कामे, कच्च्या मालाचे पर्यायी पदार्थ, खर्चात बचत, ऊर्जेचे संरक्षण, टाकाऊ पदार्थांचा उपयोग करून घेणे, प्रदुषणाचे नियंत्रण व दोष शोधून काढणे या बाबतींत हे कौन्सिल रासायनिक उद्योगांना मदत करते. या कौन्सिलाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून १९७७−८३ दरम्यान भारतात उभारण्यात आलेल्या ५३६ उद्योगांपैकी ४० टक्के रासायनिक उद्योग होते. त्याचप्रमाणे ज्या २९५ तंत्रज्ञानांच्या आधारे उत्पादन सुरू करण्यात आले, त्यांपैकी ४० टक्के रासायनिक उद्योगांतील होते. येथे रासायनिक उद्योगांत पुढील उद्योगांचा समावेश केला आहे : कार्बनी व अकार्बनी रसायने, औषधे व औषधी द्रव्ये, पीडकनाशके, दगडी कोळसापासून मिळणारी रसायने, संक्षारणरोधी रसायने, उत्प्रेरक, पृष्ठविलेपन द्रव्ये वगैरे.

क्लोरोसिलेन हे रसायन बनविण्याचे आशियातील पहिले संयंत्र हायको कंपनीने खरसुंदी येथे उभारले. पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने विकसित केलेल्या विशिष्ट तंत्रज्ञानावर आधारलेल्या या संयंत्राची वार्षिक उत्पानक्षमता १,००० टन असून ते उभारण्यासाठी ८ कोटी रूपये खर्च आला.

वरील कौन्सिलाने १९७० नंतर ऑर्गॅनोफॉस्फरस पीडनाशकांच्या संशोधनावर विशेष भर दिला. त्यामुळे तदनंतर त्यावर आधारलेले निरनिराळे पीडकनाशके तयार करणारे उद्योग उभारण्यात आले. उदा., नोसिल या कंपनीने १८ कोटी रूपये खर्चून सालीना ५०० टन मोनोक्रोटोफॉस निर्मिण्याचा कारखाना उभारला. जे. के. बिझनेस मशिन्सने सालीना ३०० टन एमबीसी हे कवकनाशक निर्मिण्यासाठी कारखाना उभारला. तसेच शॉ वॉलेस व मायको फार्म केमिकल्स यांचे डायमेथोएट, सुदर्शन केमिकल्सची क्विनोलफॉस, फॉस्फोमिडॉन मोनोक्रोटोफॉस, डायझिनॉन आणि एचआयएल व भारत पल्व्हरायझिंग मिल्सचे एंडोसल्फॉन या पीडकनाशकांचे उत्पादन होऊ लागले.

औषधे व औषधी द्रव्ये यांच्या निर्मितीतही वरील कौन्सिलाने विशेष लक्ष घातले. प्रथम माहीत असलेली औषधे बनविण्याच्या प्रक्रिया विकसित केल्या व त्यासंबंधी संशोधन केले. त्याचप्रमाणे औषधी वनस्पतींची शास्त्रीय दृष्टीने लागवड व वाढ केली. हैदराबाद येथील रिजनल रिसर्च लॅबोरेटरीने एन-बीटा-फिनिलएथिल अँथ्रॅनिलिक अम्ल (एंफेनामिक अम्ली) ह्या नव्या, स्टेरॉइड नसलेल्या संधिवातरोधी व शोथरोधी (दाहयुक्त सूजरोधी) औषधाविषयी संशोधन करण्यात आले. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या विशिष्ट तंत्रज्ञानाच्या आधारे ॲमिनोफायलीन व थिओफायलीन यांचे भारतात प्रथमच उत्पादन करता आले. तदनंतर सिप्ला कंपनी वरील कौन्सिलाच्या मदतीने सॅलॅब्युटॅमॉल, आयब्युप्रोफेन, व्हिनक्रिस्टाइन. व्हिनब्लास्टाइन ही औषधे तयार करीत आहे. जीवनसत्त्व ब व रूटीन तयार करण्याच्या सुधारित प्रक्रिया कौन्सिलाने विवक्षित केल्या आहेत.

उच्च प्रतीचे बीटा नॅप्थॉल व ग्लायक्झॉन निर्मितीच्या प्रक्रिया वरील कौन्सिलाने शोधून काढल्या आहेत. तसेच विद्युत् विच्छेदनशील मँगॅनीज डाय-ऑक्साइड, पोटॅशियम क्लोरेट व सिलिकेट, हायड्रॅझीन हायड्रेट ही अकार्बनी रसायने बनविण्याचे तंत्रज्ञानही या कौन्सिलाने विकसित केले आहे. यांखेरीज हे कौन्सिल संश्लेषित झिओलाइट उत्प्रेरक, पृष्ठविलेपन द्रव्ये, संक्षारणरोधी द्रव्ये, बहुवारिके व जीवतंत्रविद्या यांसाठी विशेष तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य करीत आहे.

रासायनिक उद्योगांच्या विकासासाठी शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांच्यातील सहकार्य व त्यांच्याकडून होणारे संशोधन यांची जशी आवश्यकता असते, तशीच गरज या उद्योगासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या उत्पादनक्षमतेचीही असते. १९६०−७० या काळात रासायनिक उद्योगाच्या संयंत्रासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे उत्पादन करणारे सु. ४६ उद्योजक भारतात होते. नंतर ही संख्या बरीच वाढली व काही कंपन्या संयंत्राची पूर्ण यंत्रसामग्री ‘संपूर्ण प्रकल्प उभारणी’च्या तत्त्वावरही पुरवू शकतात उदा., ग्वाल्हेर रेयॉन कंपनीने थायलंडमध्ये अशा प्रकारे संपूर्ण व्हिस्कोज संयंत्र उभारून दिले, तर मफतलाल उद्योगसमूहाने अशा तऱ्हेने इंडोनेशिया, नायजेरिया इ. देशांना कापड उद्योगाची यंत्रसामग्री पुरविली आणि कॅमलीन कंपनीने इंडोनेशियात व मलेशियात कलाकारांच्या रंगांचे उत्पादन करणारे उद्योग सहकारी तत्त्वावर उभारले. शिवाय डी.सी.एम. नोसिल यांसारखे उद्योगमसमूह संपर्क प्रक्रियेद्वारे सल्फ्यूरिक अम्ल निर्मितीचे, लार्सन अँड टूब्रो सिमेंटचे व वालचंदनगर उद्योगसमूह साखरेचे संपूर्ण संयंत्र उभारून देतात. प.जर्मनीच्या सहकार्याने राउरकेला येथे नायट्रोजनयुक्त खतांचे संयंत्र उभारण्याचे काम उत्कल मशिनरी या कंपनीने हाती घेतले आहे. अशा संपूर्ण संयंत्र उभारणाऱ्या उद्योगसमूहांशिवाय काही लहानमोठे उद्योजक दाबपात्रे उर्ध्वपातन यंत्रे, स्फटिकीकारक, निर्वात काहील, बाष्पित्र यांसारखी लहानमोठी यंत्रसामग्री बनवितात. सायमन कार्व्हज्सायरख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपन्या आपला अभिकल्प (आराखडा) व आरेख यांच्यानुसार मूळ कंत्राटाच्या २५% पेक्षा जास्त किंमतीची यंत्रसामग्री (संयंत्राचे घटक व सामग्री) या भारतीय उद्योजकाकडून बनवून घेतात.

रासायनिक उद्योगातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या प्रयत्नचा एक भाग म्हणजे हिंदुस्थान ऑर्गॅनिक केमिकल्सची (एच. ओ. सी.) १९६० मध्ये झालेली स्थापना हा होय. हिचे पहिले संयंत्र १९७१ साली रायगड जिल्ह्यातील रसायनी येथे कार्यान्वित झाले तथापि तंत्रज्ञान विकत घेण्याचे प्रयत्न १९६६ सालापासूनच करण्यात येत होते. पहिल्या टप्पात एकंदर १२ संयंत्रे उभारण्यात आली असून त्यांमध्ये रंजकद्रव्ये, रबर रसायने, औषधे, पीडकनाशके, लॅमिनेट वगैरेंच्या उत्पादनात वापरण्यात येणारी मध्यस्थ रसायने तयार करण्यास प्रारंभ झाला. दुसऱ्या संहत नायट्रीक अम्लाचे संयंत्र उभारण्यात आले, तसेच ॲनिलीन, हायड्रोजन व नायट्रोबेंझीन यांच्या संयंत्राचे दुपटीकरण करण्यात आले आणि नायट्रोक्लोरोबेंझिने व नायट्रोटोल्यूइने यांच्या उत्पादनात वाढ झाली. तिसऱ्या टप्पात कोचीन व हैदराबाद येथे वार्षिक उत्पादनक्षमता ४०,००० टन असलेली फिनॉलाची संयंत्रे उभारण्यात आली असून येथे वर्षाला २५,००० टन एवढे ॲसिटोन उपपदार्थ म्हणून मिळते. हैदराबाद येथील संयंत्रातून वर्षाला ५०० टन एवढ्या पॉलिटेट्रोफ्ल्युओरोएथिलिनाचेही उत्पादन होऊ लागले.

ही सर्व संयंत्रे उभारताना एच. ओ. सी. ने जरी परदेशी विशिष्ट तंत्रज्ञान विकत घेतले, तरी यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे सुधारित अभिकल्प, मूलभूत अभियांत्रिकीय तंत्रज्ञान, देशी व परदेशी अशी यंत्रसामग्री मिळविण्याचे काम या बाबी हळूहळू स्वतः हाताळण्याचे प्रयत्न केले. संहत नायट्रीक अम्लाचे संयंत्र आणि ॲनिलीन, नायट्रोबेंझीन व हायड्रोजन यांच्या संयंत्राचे दुपटीकरण या दुसऱ्या टप्प्यापासून ते फिनॉल संयंत्राच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंतच्या वरील बहुतेक सर्व बाबी दहा वर्षांच्या अनुभवाच्या आधारे एच. ओ. सी.ने स्वतःच्या जबाबदारीवर पार पाडल्या. तसेच मोनोक्लोरोबेंझीन व ॲसिटानिलाइड यांच्या निर्मितीचे विशिष्ट तंत्रज्ञान एका राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेकडून मिळाले मात्र संयंत्र उभारणीचे काम प्रथमच एच. ओ. सी.च्या तंत्रज्ञांनी केले. नायट्रोबेंझीन व ॲनिलीन यांविषयीचे विशिष्ट तंत्रज्ञान विदेशातून मिळविले होते परंतु आपल्या अनुभवाच्या बळावर एच. ओ. सी. ने. संयंत्र उभारतानाच सुधारणा करून नायट्रोबेंझिनाच्या संयंत्राची दर दिवसाची उत्पादनक्षमता २७ टनांवरून ५५ टनांइतकी तर ॲनिलीन संयंत्राची दर दिवसाची उत्पादनक्षमता २० टनांवरून ३० टनांपर्यंत वाढविली. हे करताना मूळ अभिकल्पात विक्रियक, एक उप-परिवर्तक, एक यांत्रिक भाता व दोन उभे संघनक (बाष्पाचे द्रवात रूपांतर करणाऱ्या प्रयुक्त्या) यांच्यासारख्या संतुलन साधन सामग्रीची भर घातली. ॲनिलीन संयंत्राच्या मूळ विदेशी अभिकल्पात उत्प्रेरक काही काळच वापरता येई परंतु येथील तंत्रज्ञांनी जागेवरच उत्प्रेरकाची पुननिर्मिती होईल अशी प्रक्रिया शोधून काढली.

एच. ओ. सी. च्या चवथ्या टप्पामध्ये स्वतःच्या संशोधन व विकासविषयक कार्यक्रमावर भर देण्यात आला. त्यामुळे परदेशी तंत्रज्ञानावरचे परावलंबन कमी होत जाऊन नवनवीन प्रक्रिया विकसित होत आहेत. उदा., मेटाॲमिनोफिनॉलाच्या निःसारणापासून (निर्मिती क्रियेत बाहेर पडणाऱ्या टाकाऊ द्रवापासून) रिसॉर्सिनॉल परत मिळविणे अथवा विविध नायट्रीकरण संयंत्रामधून होणाऱ्या निःसारणातून नायट्रो-द्रव्ये काढून टाकण्याचे विद्रावक निष्कर्षणाचे [⟶ निष्कर्षण] तंत्र.

भारतातील निरनिरळ्या महत्त्वाच्या रासायनिक उद्योगांमध्ये झालेल्या प्रगतीची कल्पना क्र. २ ते ६ वरून येईल. महाराष्ट्रात रासायनिक द्रव्यांचे १९७५−७९ या काळात झालेले उत्पादन अंदाजे पुढीलप्रमाणे होते (आकडे कोटी रूपयांत) : १९७५-७६ मध्ये १,४९७ १९७७-७८ मध्ये १,९९० १९७८-७९ मध्ये २,३४३. या काळात महाराष्ट्राचा रासायनिक उद्योगाच्या राष्ट्रीय उत्पादनातील वाटा जवळ जवळ स्थिर म्हणजे सु. ४० टक्के राहिला होता.

कोष्टक क्र. २. भारतातील रासायनिक उद्योगाची स्थिती
१९६१ १९७४-७५ १९७८-७९
कारखाने संख्या १,५१७ ३,२२१ ४,८८१
गुंतवणूक (लाख रुपये) २८,५३० २,४०,४४९ ३,९३,४३०
कर्मचारी (संख्या) १,४६,२३७ ३,२९,२३३ ४,२८,५२७
निवेश (लाख रुपये) २,३७,५९० ४,१८,९०७
उत्पादन (लाख रुपये) ३२,२८३ ३,३१,०७९ ५,७१,१५३
उत्पन्न (लाख रुपये) ६९,५४८ १,०६,८२६

 

कोष्टक क्र. ३. महत्त्वाची अकार्बनी रसायने व औषधे यांचे भारतातील उत्पादन
रसायन १९६५ १९७५ १९८३
सल्फ्यूरिक अम्‍ल (हजार टन) ६८५·२ १,३७५·५ २,०७६·०
दाहक सोडा (हजार टन) २१४·८ ४४२·७ ६०९·६
सोडा ॲश (हजार टन) ३२१·६ ५४१·४ ७५०·०
साबण (हजार टन) १६९·२ २७०·१ ३६७·२
आगकाड्या (अब्ज नग) २६७·६ १७०·४ ३३८·४
पेनिसिलीन (कोटी मेगॅ एकके) १०·३२ २५·२० ३३·३६
ॲस्पिरीन (टन) ४१८·८ १,०२८·०
स्ट्रेप्टोमायसीन (टन) १००·८ १९२·० २४७·२
जीवनसत्व क (टन) ९३·६ ३४५·०

 

कोष्टक क्र. ४. महत्त्वाच्या कृत्रिम तंतूचे भारतातील उत्पादन (टनांत)
तंतू १९७०-७१ १९७८-७९ १९८१-८२
ॲक्रिलिक १८६ १३,५९२
नायलॉन तंतू ९,३३८ १८,४३७ २३,३८०
नायलॉन औद्योगिक तंतू ४४० ८,६१८ १४,३३२
पॉलिएस्टर तंतुखंड ५,४३३ २५,३४९ २९,७०७
पॉलिएस्टर तंतू ६०२ ७,२१७ १५,४१०

 

कोष्टक क्र. ५. कार्बनी रसायने व प्लॅस्टिके यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे, तसेच संश्लेषित रबराचे भारतातील उत्पादन (टनांत)
रसायन १९७०-७१ १९७८-७९ १९८१-८२
बेंझीन ५३,१९० ९६,७७३ ८१,६६०
ब्युटाडाइन १८,१८३ १९,९५३ २२,७२०
डायएथिलीन ग्‍लायकॉल ५२७ ६०८ ३३९
एथिलीन ५९,६६८ १,१५.७७९ १,४७,७५४
मिथिल आयसोब्युटिल कीटोन १,२३६ ५४४ ४३८
आयसोप्रोपॅनॉल १,६५० २,३०६ १,८२३
थॅलिक ॲनहायड्राइड ७,९८४ २१,२०२ २४,६५१
प्रोपिलीन ५,६६३ ५६,०४८ ६७,६३८
स्टायरीन २५,४७६ १५,९६३
टोल्यूइन ८,३२५ २४,४६० २५,३६५
डायमिथिल टेरेप्थॅलेट (डीमटी) २७,०७१ २७,३१९
व्हिनिल क्लोराइड २३,९०८ ११,७६८
अल्किल बेंझीन ४,६०१ १३,९७९
कॅप्रोलॅक्टम १४,३३१ ९,९१७
प्लॅस्टिक साचेकामाची चूर्णे ६,१८३ ७,७०४ ८,४२४
पॉलिएथिलीन (कमी घनतेचे) २४,४३७ ५६,०१० ९४,२९३
पॉलिएथिलीन (जास्त घनतेचे) २१,१५३ २८,०७३ ३१,७३२
पॉलिस्टायरीन ८,९२५ १४,४७४ ७,६४२
पॉलिव्हिनिल क्लोराइड रेझिने(पीव्हीसी रेझिने) ४१,४७२ ६२,६४३ ३२,०३७
पॉलिप्रोपिलीन ८,५१५ २०,६४४
संश्लेषित रबर – स्टायरीन २९,७९१ २३,२८५ १७,३९१
पॉलिब्युटाडाइन रबर ५,२९३ ११,४८१

 

कोष्टक क्र.६. भारताची रासायनिक द्रव्यांच्या संबंधातील आयात-निर्यात (कोटी रूपयांत)
रासायनिक द्रव्य १९७६-७७ १९७८-७९ १९८१-८२
आयात
मूलद्रव्ये व घटक १३७·८ २३०·९ ४४६·५
रंजक, कातडी कमावण्याची व रंगदायी द्रव्ये १५·१ २३·३ १८·०
वैद्यकीय व औषधी द्रव्ये ४२·२ ७९·२ ७१·५
तयार खते (रासायनिक खते) १९७·७ ३७०·७ ३८८·८
प्लॅल्टिक द्रव्ये २७·३ ४६·७ १०६·१ (संश्लेषित रेझिनांसह)
निर्यात
औषधे व औषधी द्रव्ये ५४·१३ ६९·०२ ९५·४१
रंजकद्रव्ये व संबंधित मध्यस्थ रसायने ३२·१६ २९·१८ २३·४३
मूलभूत अकार्बनी व कार्बनी रसायने (कृषी रसायनांसह) २७·६२ ३३·२४ ३३·५५
सौदर्यप्रसाधने व तत्सम द्रव्ये ११·४३ १३·८३ ११९·४०
औषधी वनस्पती २८·९८ १६·७० १९·५६

 

प्रदूषण : विविध प्रकारची रसायने, खते, खनिज तेल रसायने इ. तयार करताना निरूपयोगी अशी निरनिराळ्या प्रकारची वायुरूप , द्रवरूप व घनरूप द्रव्ये निर्माण होतात. या द्रव्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत वातावरणीय व जलीय प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे नैसर्गिक समतोलावर अनिष्ट परिणाम होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन रासायनिक उद्योगांवर प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने अधिकाधिक बंधने घालण्यात येत आहेत. याकरिता राष्ट्रीय व जागतिक पातळ्यांवर सातत्याने प्रयत्नन चालू आहेत. [⟶ औद्योगिक अपशिष्ट प्रदूषण]. (चित्रपत्र ३६).

पाहा : रासायनिक अभियांत्रिकी.

संदर्भ :

  • Faith, W. L and others, Industrial Chemicals, New York, 1965.
  • Haynes, W., American Chemical Industry, 6 Vols, New York, 1954.
  • Inde, A. J., The Development of Modern Chemistry, New York, 1964.
  • Leicster , H. M., The Historical Background of Chemistry, New York, 1965.
  • Manufacturing Chemist’s Association, The Chemical Industry Facts Book, Washington, 1962.
  • Mark, H.; Standen, A., Ed., Kirk-Othmer Encyclopedia of Chemical Technology, 22 Vols., New York 1963-70.
  • Reigel F. R., Industrial Chemistry, Bombay 1959.
  • Shreve, R. N. Ed., The Chemical Process Industries, London, 1967.
  • Taylor F. S., History of Industrial Chemistry, London 1959.

लेखक : चिपळूणकर, मा. त्रिं.

मद्यनिर्मितीचे मार्गदर्शी संयंत्र
मुंबई येथील खनिज तेल परिष्करण कारखान्यातील प्रथमिक उर्ध्वपातन मनोरा व उच्च उष्मीय कार्यक्षमता असलेल्या भट्ट्या
बंगलोरजवळील औषध कारखान्यातील एक आवेष्टन विभाग
निरनिराळी अल्कोहॉले अलग करण्याच्या प्रक्रियेत वापरण्यात येणारे उंच विलगीकारक मनोरे
भिलाई पोलाद कारखान्यातील अमोनिया सल्फेट संयंत्र
सिंद्री खत कारखान्यातील यूरिया तयार करणारे संयंत्र
सिंद्री खत कारखान्यातील सल्फ्यूरिक अम्ल तयार करण्याचे संयंत्र
सागरी पाण्यातून मॅग्नेशियमाची संयुगे मिळविण्याचे संयंत्र