लोहेतर धातु उद्योग : लोखंड, पोलाद आणि विविध मिश्र पोलादे यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व धातू व त्यांच्या मिश्रधातू यांच्याकरिता ‘लोहेतर धातू’ ही संज्ञा वापरतात. आधुनिक औद्योगिक युगाच्या सर्व काळातच नव्हे, तर विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातही जगात लोखंड व पोलाद यांचे जेवढे उत्पादन होते, तेवढे उत्पादन अन्य सर्व धातू व त्यांच्या मिश्रधातू यांचे मिळूनही होत नाही. म्हणून त्यांना एकत्रितपणे ‘लोहेतर धातू’ या एकाच संज्ञेने संबोधिण्याची प्रथा पडली. अशा रीतीने ही संज्ञा व्यापारी किंवा औद्योगिक दृष्टीने तयार झालेली असल्याने तिला वैज्ञानिक  वा तंत्रविद्याविषयक आधार नाही. अर्थात लोहेतर धातू सापेक्षतः विरळाच आढळत असून त्यांचा वापर मोक्याचा ठरला आहे. यामुळे त्यांना लोखंड व पोलाद यांच्याएवढे महत्त्व प्राप्त झालेले आहे. लोहेतर धातू त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण धातुवैज्ञानिक गुणधर्मांमुळे लोखंड किंवा पोलादांहून भिन्न असल्याचे लक्षात येतेच शिवाय या आगळ्या गुणधर्मांमुळे त्यांचा उपयोग मोक्याचा ठरतो. अशा काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांची उदाहरणे अशी : बहुतेक लोहेतर धातू एकाच रूपात आढळतात म्हणजे त्यांची बहुरूपे नसतात. परिणामी लोखंड किंवा पोलदाप्रमीणे केवळ तापवून आणि द्रुतशीतन (झटकन थंड) करून त्या अधिक कठीण  करता येत नाहीत तसेच बहुतेक लोहेतर धातूंमधील कार्बनाचा त्यांच्यावर होणारा परिणाम हा लोखंडावर होणाऱ्या कार्बनाच्या परिणामाच्या तुलनेने फारच अल्प असतो.

साधारणपणे ॲल्युमिनियम, तांबे, जस्त, शिसे, कथिल, निकेल, मॅग्नेशियम, टिटॅनियम, कॅडमियम, अँटिमनी, सोडियम, युरेनियम, सोने, चांदी इ. धातूंचा अधिक प्रमाणात वापर होत असल्याने प्रस्तुत नोंदीत त्यांची अधिक माहिती दिली आहे. मँगॅनीज, क्रोमियम व मॉलिब्डेनम यांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते मात्र या धातू जवळजवळ पूर्णपणे मिश्र पोलादांमध्ये वापरण्यात येतात. लोहेतर धातूच्या धातूकांचा (कच्च्या रूपातील धातूंचा) आढळ, त्यांचे जगातील आणि भारतातील साठे व उत्पादन, धातुकांचे शुद्धीकरण व त्यांच्यापासून धातू मिळविण्याच्या सर्वसाधारण पद्धती, त्यांचे उपयोग तसेच जागतिक व भारतातील आकडेवारी इ. माहिती सदर नोंदीत दिलेली आहे. वाशिवाय मराठी विश्वकोशात या प्रत्येक धातूवर तसेच कासे, गनमेटल, जर्मन सिल्व्हर, नायक्रोम, पितळ, बॅबिट, मोनेल या मिश्रधातूंवर स्वतंत्र नोदी असून तेथे त्यांची आधिक तपशीलवार महिती दिलेली आहे.

इतिहास : माणसाने प्रथम वापरलेल्या धातू या लोहेतर धातू होत्या, सोने, तांबे, चांदी यांसारख्या शुद्ध धातूच्या रूपात  आढळणाऱ्या तसेच कमी तापमानाला ऑक्साइडांचे ⇨क्षपण करून मिळविता येण्यासारख्या शिसे, कथिल यांच्यासारख्या धातू माणसाने प्रथम वापरल्या.

या दृष्टीने लोहेतर धातूंचे दोन मुख्य गट करता येतात. ॲल्युमिनियम, तांबे, जस्त, शिसे, कथिल, निकेल, मँगॅनीज, मॅगनेशियम व कॅडमियम या सामान्यपणे आढळणाऱ्या धातूंचा पहिला गट करता येतो. यांच्या बाबतीत सापेक्षतः जलदपणे प्रगती होत जाऊन त्यांचे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. आधुनिक अभियांत्रिकीय उद्योगांमधील यांचे स्थान आता निश्चित झाले आहे.

विरळा आढळणाऱ्या, असाधारण व खास प्रकारचे गुणधर्म असणाऱ्या धातूंचा दुसरा गट करता येतो. यांच्या बाबतीत प्रगती सावकाशपणे होत आलेली आहे. कारण यांची धातूके अल्प प्रमाणात आढळतात त्यांचे बऱ्यापैकी मोठे साठे दुर्गम भागांत आढळले आहेत आणि धातुकांतील धातूंचे प्रमाण फारच कमी असते. यामुळे अशी धातू वा तिचे संयुग मिळविण्याकरिता  धातुक मोठ्या प्रमाणावर हाताळावे लागते व त्यावर संस्करण करतानाही हीच अडचण येते. तथापि या धातूंच्या अंगी खास प्रकारचे (ऊष्मीय, विद्युतीय, अणुकेंद्रातील मूलकणविषयक इ.) गुणधर्म असल्याने विविध प्रकारच्या विस्तृत क्षेत्रांतील त्यांचा वापर वाढत आहे. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी नवनवी तंत्रे पुढे येण्यास चालना मिळाली. रॉकेट व अणुऊर्जा  क्षेत्रांत १९७० नंतर विशेष प्रगती झाली. परिणामी प्रयोगशाळांमधून केवळ कुतुहलापोटी वापरल्या जाणाऱ्या धातूंचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला व त्यांचे उत्पादनही वाढले, अशा प्रकारे विरळपणे आढळणाऱ्या पुष्कळ लोहेतर धातूंना चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. उदा., अणुऊर्जानिर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम व झिर्कॉन वैमानिकीय अभियांत्रिकी व अवकाशविज्ञानामधील टिटॅनियम व बेरिलियम अथवा इलेक्ट्रॉनिकीमधील सिलिकॉन व जर्मनियम धातूंचा वापर.

निर्मिती : उद्योगधंद्यांतील लोहेतर धातूंचा वापर व महत्त्व वाढत गेल्याने  या धातूंचे उत्पादन वाढविण्याचे जोमाने प्रयत्न होऊ लागले. यांतून त्यांच्या निर्मितीच्या तंत्रामध्ये प्रगती होत आहे. लोहेतर धातूंच्या निर्मितीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आणि त्यांच्यात खूप फरक आहेत. शिसे, कथिल, निकेल, टिटॅनियम व अँटिमनी या धातू बहुधा उत्ताप धातुवैज्ञानिक पद्धती वापरून तयार करतात. याकरिता जास्त तापमानाची गरज असते आणि कार्बन, कार्बन मोनाझाइड, हायड्रोडन किंवा क्षारीय धातू (लिथियम, सोडियम, पोटॅशियम वैगेरे) क्षपणकारक म्हणून वापरतात. टिटॅनियमाच्या धातुंकांचे प्रथम टिटॅनियम क्लोराइडात रूपांतर करतात आणि नंतर त्याचे क्षपण करतात. इतर धातूंच्या बाबतीत क्षपणाआधी धातुकाचे धातूच्या ऑक्साइडात रूपांतर करतात. तांबे व जस्त या धातू उत्ताप धातुवैज्ञानिक पद्धतीने तसेच त्यांच्या संयुगांच्या पाण्यातील विद्रावाचे विद्युत् विच्छेदनीय क्षपण करूनही तयार करतात. जस्ताचा वितळबिंदू सापेक्षपणे कमी असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शुद्ध धातू मिळविण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत (तापवून वाष्प तयार करून व मग ते थंड करून घटक वेगळे करण्याची पद्धत) वापरतात. द्रवीभूत मॅग्नेशियम क्लोराइडाचे विद्युत् विच्छेदन करून मुख्यत्वे मॅग्नेशियम मिळवितात. ऑक्साइडांचे कार्बनाने क्षपण करूनही मॅग्नेशियम थोड्या प्रमाणात तयार करतात. बॉक्साइट या ॲल्युमिनियमाच्या अशुद्ध ऑक्साइडी धातुकापासून प्रथम ॲल्युमिना (AI₂O₃) हे शुद्ध ऑक्साइड तयार करतात. मग त्याच्या विद्युत् विच्छेदनाने ॲल्युमिनियम धातू मिळवितात.

उपयोग : कासे म्हणजे तांबे व कथिल यांची मिश्रधातू असून इतिहासपूर्व काळात कासे मुख्यत्वे हत्यारे बनविण्यासाठी वापरीत तेव्हापासून लोहेतर धातू वापरण्यात येत आहेत. पितळ ही तांबे व जस्त यांची मिश्रधातू असून पितळ व कासे यांच्या विविध प्रकारांमध्ये खास गुणधर्म येण्यासाठी अल्प प्रमाणात शिसे, बेरिलियम, अँटिमनी व मँगॅनीज या इतर धातूही मिसळीत असत. सुमारे ७०% निकेल आणि ३०% तांबे असणाऱ्या मोनेल धातूसारख्या मिश्रधातू बळकट व संक्षारणरोधी (गंजण्यास विरोध करणाऱ्या) असल्याने रसायनांच्या उत्पादनाला लागणारी सामग्री बनविण्यासाठी वापरतात. शिसे व कथिल यांच्या मिश्रधातू धारव्यांकरिता आणि डाखकामामध्ये वापरतात. विमानबांधणीसारख्या सर्व अभियांत्रिकीय संरचनात्मक कामांकरिता ॲल्यूमिनियमाच्या निरनिराळ्या मिश्रधातू वापरतात. या मिश्रधातूंत ॲल्युमिनियमाबरोबर अन्य धातू मिसळलेल्या असल्याने त्या बळकट व चिवट होतात. लोहेतर धातू लोखंड व पोलादाप्रमाणे उघड्या हवेत गंजत नाहीत. यामुळे लोखंडी वा पोलादी वस्तू गंजू नयेत म्हणून तिच्या पृष्ठभागावर एखाद्या लोहेतर धातूचा मुलामा देतात. सोने, चांदी व प्लॅटिनम या मौल्यवान धातू दागदागिन्यांप्रमाणे नाण्यांसाठीही वापरतात. मात्र धातू बळकट व्हावी व तिची झीज कमी व्हावी म्हणून या धातूंमध्ये अन्य धातू मिसळतात. उदा., सोन्यात वा चांदीत तांबे मिसळतात.

काही महत्त्वाच्या लोहेतर धातूंची उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त अशी माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.

ॲल्युमिनियम : औद्योगिक वापराच्या दृष्टीने ही सर्वांत महत्त्वाची लोहेतर धातू आहे. ॲल्युमिनियम वजनाला हलकी, न गंजणारी, उत्तम विद्युत् संवाहक अशी बहुगुणी धातू असल्याने मोक्याची धातू बनली आहे. विशेषेकरून विमानबांधणीतील ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंच्या वापराने ॲल्युमिनियम उद्योगाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.


ॲल्युमिनियम शुद्ध स्वरूपात निसर्गात आढळत नाही. ते मुख्यत्वे बॉक्साइट या धातुकापासून मिळवितात. चांगल्या प्रतीच्या बॉक्साइटात ४० ते ६०% ॲल्युमिनियम असते. शिवाय यात सिलिका व लोखंडाचे ऑक्साइड, तसेच कोठे कोठे टिटॅनियम, झिर्कोनियम, गॅलियम अथवा क्रोमियम यांची खनिजेही अल्प प्रमाणात असतात. बॉक्साइटातील इतर सर्व पदार्थ अलग करून ॲल्युमिना (AI₂O₃) हे ॲल्युमिनियमाचे ऑक्साइड वेगळे करतात. याकरिता बहुतेक ठिकाणी बेयर  पद्धती वापरतात. या पद्धतीत बॉक्साइटाचा बारीक चुरा करतात. तो चुरा चुना किंवा दाहक सोड्याच्या संहत (दाट)) विद्रावात घोळतात. यात फक्त ॲल्युमिना विरघळते. विद्राव गाळून इतर द्रव्ये वेगळी करतात. मग त्या विद्रावात ॲल्युमिनियम हायड्रेट मिसळतात. यामुळे विद्रावातील ॲल्युमिना अवक्षेपणाने (साकाखाली बसून) बाहेर पडते. नंतर  ॲल्युमिना ध्रुवून सुकवितात व चांगली भाजतात. याद्वारे ॲल्युमिन्याची पांडरी स्वच्छ पूड तयार होते. ही पूड वितळलेल्या गरम क्रायोलाइटात विरघळवितात. यागरम मिश्रणातून एकदिश विद्युत् प्रवाह पाठवितात. त्यामुळे ॲल्युमिन्याचे विच्छेदन होऊन ऋण विद्युत् अग्रावर शुद्ध ॲल्युमिनियम धातूंचा रस साचतो आणि घन विद्युत् अग्रावर ऑक्सिजन साचतो. 

 

ॲल्युमिनियम तयार करण्याच्या अशा भट्टीसाठी ५ ते ६ व्होल्ट दाबाचा ५० ते ७० हजार अँपिअर इतका मोठा एकदिश विद्युत् प्रवाह वापरतात. बहुतेक टिकाणी १०० ते १५० भट्ट्या एकसरीत जोडतात व सर्वांना मिळून ५०० ते ९०० व्होल्ट विद्युत् दाब देतात. अशा भट्टीत एक किग्रॅ. धातू तयार करण्यासाठी साधारणपणे २० किवॉ. तास विद्युत् ऊर्जा लागते. यामुळे विजेच्या टंचाइच्या काळात धातुनिर्मितीवर विपरीत परिणाम होतो.  

भट्टीत तयार होणारा ॲल्युमिनियमाचा रस बादल्यांतून ओतशाळेत नेतात व तेथे २० किग्रॅ. वजनाच्या ढेपा तयार करतात. पोलादाच्या ढेपेप्रमाणेच ही ढेप आधी चांगली तापवितात आणि लाटण यंत्रात लाटून तिच्यापासून पत्रे, गज, सळ्या, दांडे, पट्ट्या, वर्ख इ. निरनिराळे प्रकार तयार करतात. बहिःसारण पद्धतीनेही ॲल्युमिनियमाचे अनेक प्रकारचे आकार तयार करता येतात. ॲल्युमिनियमाच्या अनेक मजबूत मिश्रधातू बनवितात व त्यांचा यंत्रभाग बनविण्यासाठी उपयोग होतो. या मिश्रधातूंचे पत्रे मोठ्या प्रमाणावर विमान उद्योगात वापरतात. काही मिश्रधातूंचे ओतकाम वा घडाईही करता येते. ॲल्युमिनियम व तिच्या मिश्रधातूंच्या पत्र्यांचे जोडकाम रिव्हेट मारून किंवा वितळजोडकामाने करता येते.

भारतामध्ये बॉक्साइट अनेक ठिकाणी विपुल प्रमाणात सापडते. त्यामुळे स्थानिक गरजभागवून पुष्कळ धातुक निर्यातही करता येते. भारतातील बॉक्साइटाचा एकूण साठा २६५.३७ कोटी टन असावा. रांची व पालामाऊ (बिहार) सरगुजा व शहाडोल (मध्य प्रदेश) सालेम, मदुराई व निलगिरी (तमिळनाडू) सौराष्ट्र, कच्छ व सुरत (गुजरात) बेळगाव व कॅनरा (कर्नाटक) कालाहंडी व संबळपूर (ओरिसा) पूंच, रिआसी व उधमपूर  (जम्मू व काश्मीर) इ, प्रदेशांत बॉक्साइटाच्या खाणी आहेत. यांशिवाय आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र (रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे) या राज्यांतही बॉक्साइटाचे साठे असून तेथेही काही खाणी आहेत. १९८१ साली भारतात याचे उत्पादन १९,२२,५९३ टन व निर्यात ८४,२११ टन झाली होती.

 

भारतात १९८४ साली ॲल्युमिनियमाचे आठ प्रद्रावक (घातूगाळप्याच्या  भट्ट्या ) होते. त्यांपैकी सात खाजगी व एक सार्वजनिक क्षेत्रात होता. त्यांची एकूण उत्पादनक्षमता ३ लाख टन होती. हिराकूद (ओरिसा), अलवाये (केरळ), बेळगाव (कर्नाटक), रेणुकूट (उत्तर प्रदेश), मेत्तूर (तमिळनाडू), जेकेनगर (प. बंगाल), कोर्बा(मध्य प्रदेश) आणि कोयना येथे ॲल्युमिनियम तयार करण्याच्या या भट्ट्या आहेत.

भारतात ॲल्युमिनियम उद्योगाची सुरुवात १९४० च्या सुमारास झाली. नंतर याची वाढ झपाट्याने होऊन १९६१ साली मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले. सहाव्या पंचवार्षिक योजनेत ओरिसातील नवीन ॲल्युमिनियम प्रकल्पासाठी ९०० कोटी रूपयांची तरतूद केली होती. या प्रकल्पात वार्षिक २४ लाख टन क्षमतेची खाण, ८ लाख टन क्षमतेचे ॲल्युमिना संयंत्र आणि २.१८ लाख टन क्षमतेचा प्रद्रावक उभारण्याची योजना होती. याच्या व्यवस्थापनासाठी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी स्थापण्यात आली आहे. ॲल्युमिनियम चांगले विद्युत् संवाहक व तांब्याच्या तुलनेत पुष्कळ स्वस्त असल्याने विजेच्या तारा बनविण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होतो. शिवाय ॲल्युमिनियम गंजत नाही व वजनाला हलकी असल्याने तिचा घरगुती वापराची भांडी बनविण्यासाठीही वापर होतो. अशा रीतीने हा भारतातील एक प्रमुख लोहेतर धातू उद्योग बनला असून  ॲल्युमिनियमच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झालेला आहे. [⟶ ॲल्युमिनियम].

जस्त : ही पांढरट रंगाची धातू गंजत नाही. मुख्यत्वे स्फॅलेराइट या खनिजाने युक्त असलेल्या धातुकापासून जस्त मिळवितात. बहुतेक ठिकाणी हे धातुक शिशाच्या गॅलेना या खनिजाबरोबर मिसळलेले आढळते. राजस्थानातील  झवार पट्ट्यात (उदयपूर जिल्हा) अशा संमिश्र धातुकांचे साठे आहेत. भिलवाडा जिल्ह्यात राजपुरा-दरिवा पट्ट्यातही चांगल्या दर्जाच्या धातुकाचे साठे आहेत तसेच याच राज्यात आगुचा येथे १५% शिसे-जस्त असलेल्या  धातुकाचे ५.३ कोटी टन साठे आहेत. झवार पट्ट्यात जस्ताचे उत्पादन तेराव्या शतकापासून होत आहे. खाणीतून काढलेले धातुकाचे दगड फोडून त्यांचे क्रमाक्रमाने अधिकाधिक लहान तुकडे करतात. अखेरीस त्याचे अगदी बारीक चूर्ण तयार करतात. ते पाण्यात कालवून यंत्राने ढवळतात. हे ढवळलेले मिश्रण पंपाने एका टाकीत सोडून तेथे साठवितात. या टाकीत सोडियम सायनाइड व झिंक सल्फेट ही रसायने ठराविक प्रमाणात सोडतात आणि सर्व मिश्रण  परत ढवळतात. नंतर हे मिश्रण प्लवन (तरंगविण्याच्या क्रियेने घटक वेगळे करण्याच्या) टाक्यांत नेऊन तेथेही ढवळत ठेवतात. जस्ताचे कण शिशाच्या कणांहून हलके असल्याने ते टाकीच्या वरच्या बाजूने बाहेर पडतात. जस्ताचे हे कण दुसऱ्या प्लवन टाकीत भरून त्यांत कॉपर सल्फेट, पोटॅशियम झँथेट आणि क्रेसिलिक अम्ल विशिष्ट प्रमाणात मिसळतात. या रसायनांच्या विक्रियेमुळे पाण्यातील जस्ताचे कण खाली बसतात व तेथून ते काढून घेतात. नंतर हे मिश्रण गाळतात व सुकवितात. अशा रीतीने जस्ताच्या धातुकाचे सांद्रण तयार होते. नंतर हे सांद्रण पिंपात भरून धतू गाळवयाच्या कारखान्यात पाठवितात.

पहिल्या प्लवन टाकीत शिशाचे जड कण तळाशी साचतात. तेथून ते काढून घेतात व मग गाळून सुकवितात. अशा तऱ्हेने तयार झालेले शिशाच्या धातुकाचे सांद्रण नंतर प्रद्रावक असलेल्या ठिकाणी पाठवितात. 

जस्ताच्या धातुकाच्या सांद्रणापासून धातू मिळविण्याचे प्रद्रावक अलवाये (केरळ), देबारी (राजस्थान) व विशाखापटनम् (आंध्रप्रदेश) येथे आहेत. यांतून १९८४ साली १९,००० टन धातूचे उत्पादन झाले होते. बलारिया व देबारी (राजस्थान), विनानीपुरन (केरळ) व विशाखापटनम् येथे जस्ताचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. जस्त व शिसे यांच्याशिवाय या भट्ट्यांमधून सल्फ्यूरिक अम्ल, कॅडामियम आणि चांदी हे उपपदार्थही मिळतात. (उदा., १९७१ साली जस्ताचे उत्पादन २१,२४० टन झाले होते, तेव्हा ७७,००० टन सल्फ्यूरिक अम्ल, ७२ टन कॅडमियम आणि २ टन चांदी मिळाली होती). भारताची जस्ताची मागणी जगाच्या तुलनेत सु. २.५% असून १९४७ पूर्वी सर्व गरज आयातीने भागाविण्यात येई. १९८४ साली  देशाची ४५% गरज देशातील उत्पादनाने पूर्ण झाली होती. १९७४ साली जस्ताचे जागतिक उत्पादन ५० लाख टन झाले होते व यापैकी १३ लाख टन जस्त आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आले होते. अमेरिका, रशिया आणि जपान (प्रत्येकी सु. ७ लाख टन) तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा व जर्मनी (प्रत्येकी सु. ३ लाख टन) हे जस्ताचे प्रमुख उत्पादक देश आहेत. पोलंड, पेरू, जपान, झँबिया व झाईरे हे जस्त वा त्याचे धातुक निर्यात करणारे प्रमुख देश आहेत. [⟶जस्त]. 


 शिसे : माणसाने धातुकापासून मिळविलेली ही पहिली धातू आहे. फिकट निळसर काळपट रंगाची ही धातू शुद्ध रूपात निसर्गात अगदी क्वचित आढळते. मात्र शिशाचा अंश असलेली अनेक धातुके निरनिराळ्या ठिकाणी सापडतात. भारतात मुख्यत्वे गॅलेनायुक्त धातुकापासून शिसे मिळवितात. याशिवाय सेऱ्युसाइट, पायरोमॉर्फाइट, जॅमसोनाइट व झिंकेनाइट या खनिजांनी युक्त धातुकेही शिसे मिळविण्यासाठी उपयुक्त असतात. प्राचीन काळी मेवाड, जयपूर व बिहार या भागांत शिशाच्या अनेक भट्ट्या चालू होत्या. शिसे मिळविताना निघालेल्या मळीचे अनेक मोठे ढीग या भट्ट्यांलगत अजूनही पहावयास मिळतात. येथे चांदीयुक्त धातुकांपासून प्रथम शिसे-चांदी मिश्रधातू मिळवीत व नंतर दोन्ही वेगळ्या करीत असत. अजमीरजवळच्या तारागढ खाणीतून काढण्यात येणाऱ्या धातुकापासून दरवर्षी ५० टन शिसे मिळवीत असत. राजकीय अस्थिरतेमुळे हा उद्योग काही काळ बंद पडला. १९४७ साली मेटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने हा उद्योग पुन्हा सुरु केला. आता हा उद्योग हिंदुस्थान झिंक लि. या सरकारी कंपनीच्या ताब्यात आहे.

भारतामध्ये जस्त व शिशे यांची धातुके आंध्र प्रदेश (अग्निगुंडल),  राजस्थान (झवार), ओरिसा (सांगीपल्ली), गुजरात , महाराष्ट्र, मेघालय, तमिळनाडू, सिक्कीम या भागांत आढळली असून त्यांचे एकूण  साठे ३५.८५ कोटी टन (५० लाख टन शिसे व १.६ कोटी टन जस्त) असावेत. झवार येथील धातुकांत साधारणपणे ५.२५% शिसे, ७.२५% जस्त आणि १ टन धातुकात चांदी १०० ग्रॅ. पर्यंत असते.

झवार पट्ट्यातील खाणींतून काढलेल्या धातुकापासून शिशाच्या धातुकाचे सांद्रण कसे करतात ते वर जस्ताविषयीच्या माहितीत दिलेले आहे. हे सांद्रण बिहारमधील टुंडू येथील कारखान्यात पाठवितात. या सांद्रणात साधारणपणे ७५% शिसे, ५.६% जस्त आणि १ टनात ६०० ते ७०० ग्रॅ. चांदी असते. कारखान्यात आलेले सांद्रण एका टाकीत पसरून त्यात चुनखडी, लोहधातुक, वाळू व आधीची थोडी धातुमळी यांचे मिश्रण अभिवाह (सांद्रणाचा पातळपणा वाढविण्यासाठी व मलद्रव्ये निघून जाण्यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) म्हणून मिसळतात. या मिश्रणाचे तापपिंडन करून (चूर्ण साच्यात दाबून व तयार झालेली वस्तू भट्टीत भाजून) त्याचे लहान खडे तयार करतात. हे खडे मोठ्या झोतभट्टीत वितळवितात. हिच्यातून निघालेला शिशाचा रस शुद्धीकरण विभागाकडे पाठवितात. तेथे रसातील तांब्याचा अंश वेगळा करतात व उरलेल्या रसात थोडे जस्त मिसळून ते मिश्रण परत वितळवितात. या वेळी रसातील चांदी व जस्त यांचे एकत्रीकरण होऊन ते शिशापासून अलग करतात. अशा रीतीने अन्य धातू काढून घेतल्यावर शुद्ध शिसे परत वितळवितात व त्याच्या २० किग्रॅ. वजनाच्या विटा विक्रीसाठी तयार करतात. त्यांच्यात शिशाचे प्रमाण ९९.९९% पर्यंत असते. टुंडू येथील कारखान्याची उत्पादनक्षमता दिवासाला ५० टन एवढी आहे.

शिशाच्या भंगारापासून शिसे मिळविण्याचे  छोटे उद्योग भारतात आहेत. विशेषेकरून मोटारगाड्यांत वापण्यात येणाऱ्या संचायक विद्युत् घटमालांत वापरण्यात आलेल्या शिशाच्या पट्ट्या, तसेच शिशाच्या वस्तू बनविताना मागे उरणारे कातरण या टाकाऊ वस्तूंपासून शिसे मिळविण्यात येते. कातरण मुशींमध्ये वितळवून त्यातील मळी वेगळी करतात आणि उरलेल्या शिशाच्या शुद्ध रसाच्या २० किग्रॅ. वजनाच्या विटा बनवितात. भारतात अशा विटांपासून पत्रे नळ, गज, नळ्या इ. वस्तू बनविण्याचे काही कारखाने आहेत.

निरुपयोगी संचायक विद्युत् घटमालेतील शिशाच्या पट्ट्या काढून घेतात. मग त्यांचे बारीक तुकडे करतात व त्यात लोणारी कोळशाची पूड मिसळतात. हे मिश्रण परिवर्तक भट्टीत तापवितात. त्यामुळे कोळशाच्या मदतीने क्षपणाची क्रिया होऊन शिशाचा शुद्ध रस बनतो व तो भट्टीतून बाहेर काढून घेतात. या रसाचे हवेमुळे ऑक्सिडीभवन होऊ नये म्हणून त्यावर लगेचच लोणारी कोळशाची पूड पसरतात. लोखंडी साच्यांत भरून या रसाच्या हव्या त्या आकारमानाच्या विटा तयार करतात. अशा रीतीने भंगारापासून परत मिळविण्यात येणाऱ्या शिशाचे भारतातील उत्पन्न वाढत आहे. याद्वारे देशाची सु. २०% गरज भागविली जाते. 

चांगले विद्युतीय आणि विद्युत् रासायनिक गुणधर्म आणिं उच्च घनता ही शिशाची वैशिष्ट्ये आहेत. ध्वनी व कंपने यांना शिशे विरोध करते. ते गंजत नाही व सामान्य रसायनांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. यामुळे रासायनिक उद्योगांतील पात्रांसाठी खिसे मोठ्या प्रमाणावर वापरतात. संचायक विद्युत् घटमाला, मोटारीच्या इंधनात वापरली जाणारी प्रत्याघाती संयुगे, नळकाम, विशिष्ट केबलींचे आवरण, रंगद्रव्ये, रंगलेप वगैरेंमध्ये शिशे वापरतात. शिसे व अँटमनी यांची मिश्रधातू छपाईतील अक्षरांचे खिळे बनविण्यासाठी वापरतात. विशिष्ट प्रकारचे पितळ बनविण्यासाठीही शिसे वापरतात. डाखकामाच्या मिश्रधातूतही शिसे वापरतात.

भारतात उत्पादनक्षमतेच्या मानाने शिशाचे उत्पादन कमी होते व मागणी वाढत आहे. यामुळे शिशाची गरज आयात करून भागवावी लागते. असे असले, तरी भारतात १९८३ मध्ये दरमाणशी शिशाचा खप फक्त ७० ग्रॅ. होता तेव्हा प्रगत देशातील शिशाचा दरमणाशी खप १.३ किग्रॅ. तर विकसनशील देशांतही १५० ग्रॅ. होता. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, ग्रेट ब्रिटन व पजपान हे शिशाचे प्रमुख उत्पादक देश असून तेथे जगातील ५०% शिशाचे उत्पादन होते. रशिया, ग्रेट ब्रिटन, कॅनडा, पेरू, यूगोस्लाव्हिया व मेक्सिको हे शिशाचे प्रमुख निर्यातदार देशा आहेत. [⟶ शिसे].

मॅग्नेशियम : चांदीसारखी चकचकीत पांढरी असलेली ही धातू सर्वांत हलकी आहे. १८०८ साली हंफ्री डेव्ही यांनी धातुकापासून ही धातू पाऱ्याच्या मदतीने अलग केली. नंतर या मिश्रणातील पारा बाष्परूपात काढून टाकून शुद्ध मॅग्नेशियम धातू मिळविली. १८१८ साली ए. व्यूसी यांनी निर्जल मॅग्नेशियम क्लोराइड व पोटाशियम यांचे मिश्रण वितळवून शुद्ध मॅग्नेशियम मिळविली तर १८३३ साली मायकेल फॅराडे यांनी विद्युत् विच्छेदन पद्धतीने शुद्ध धातू बनविली. १८५२ साली रोबर्ट बन्सन यांनी सध्या प्रचारात असलेली शुद्ध धातू मिळविण्याची सुधारलेली विद्युत् विच्छेदन पद्धती शोधून काढली.

मॅग्नेशियम क्लोराइड व पर्यायाने मॅग्नेशियम धातू डोलोमाइट किंवा मॅग्नेसाइट या खनिजांनी युक्त धातुकापासून तसेच समुद्राच्या वा इतर खाऱ्या पाण्यातूनही मिळविता येते. खाऱ्या पाण्यात ०.१३% पर्यंत मॅग्नेशियम असते. खारे पाणी प्रथम मोठ्या टाकीत साठवून त्यात चुना मिसळतात. यामुळे मॅग्नेशियम तिच्या हायड्रॉक्साइडाच्या रूपात विद्रावातून अलग होते व टाकीच्या तळावर साचते. ते गाळून वेगळे करतात व चांगले सुकवितात. मग त्यात हायड्रोक्लोरिक अम्ल मिसळतात. यामुळे तयार होणारा मॅग्नेशियम क्लोराइडाचा विद्राव गाळून  मॅग्नेशियम क्लोराइड वेगळे करून चांगले सुकवितात. मग ते एका लोखंडी पात्रात गरम करून वितळवितात. या रसातून एकदिश विद्युत् प्रवाह पाठवून विद्युत् विच्छेद करतात. ऋण विद्युत अग्राशी (लोखंडी पात्र हेच ऋणाग्र असते) शुद्ध मॅग्नेशियम धातू जमा होऊन रसाच्या पृष्ठभागी तरंगत रहाते आणि धनाग्रजवळ क्लोरीन वायू जमा होतो. धनाग्रासाठी ग्रॅफाइटाच्या पट्ट्या वापरतात व या पट्ट्यांचा खालचा भाग रसात  बुडवून ठेवलेला असतो. अशा लोखंडी पात्रात १० टनांपर्यंत रस मावतो व त्याचे तापमान सु. ७००° से. असते. रसावर तरंगाणारी धातू (मॅग्नेशियम) पन्हळीतून पात्राच्या बाहेर काढतात व तिच्या छोट्या ढेपा तयार करतात.


 तापन पद्धतीत मॅग्नेशियमाच्या संयुगांचे एखादा चांगला क्षपणकारक पदार्थ वापरून क्षणप करतात. ही प्रक्रिया मॅग्नेशियमाच्या वितळबिंदूपेक्षा जास्त तापमानाला होते. यामुळे तयार होणारी मॅग्नेशियम धातू ऊर्ध्वपातनाने म्हणजे तिचे बाष्प करून पात्राबाहेर काढतात. ते वाष्प थंड करून धातूचा रस व घन विटा तयार करतात. 

डोलोमाइट वा मॅग्नेसाइटयुक्त धातुकापासूनही मॅग्नेशियम मिळवितात. एल्. एम्. पिड्जिऑन यांनी विकसित केलेली फेरोसिलिकॉन प्रक्रिया वापरून डोलोमाइटापासून मॅग्नेशियम मिळवितात. याकरिता डोलोमाइटाचा चुरा करून तो भाजतात व फेरोसिलिकॉनात मिसळतात. हे मिश्रण बकपात्राच्या भट्टीत भरतात. बकपात्र निर्वात करून तापवितात. मिश्रण चांगले तापले की, त्याच्यातील मॅग्नेशियमाचे बाष्प तयार होते. हे बाष्प एका नळीने बाहेर काढतात व थंड पत्र्यांवर ते सोडून थंड करतात. अशा रीतीने बनलेले धातूचे बारीक स्फटिक एकत्र करून वितळवितात व त्याच्या योग्य आकारमानाच्या विटा तयार करतात.

कार्बोथर्मिक पद्धती वापरून मॅग्नेसाइटापासून मॅग्नेशियम मिळविण्यात येते. या पद्धतीत मॅग्नेसाइट दळून त्याचे चूर्ण करतात व ते चांगले भाजतात. यामुळे मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होते.  मग या ऑक्साइडात पेट्रोलियम कोक मिसळतात व या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवितात. या गोळ्या विद्युत् प्रज्योत भट्टीत वितळवितात. भट्टीतून मॅग्नेशियमाचे बाष्प बाहेर पडते. नैसर्गिक इंधन वायूचा थंड झोत सोडून हे बाष्प थंड करतात. यामुळे मॅग्नेशियमाचा सहज पेटणारा चुरा तयार होतो. या चुऱ्यात थोडे तेल मिसळून त्याच्या वड्या व त्यांच्यापासून तापन पद्धतीने प्रथम मॅग्नेशियमाचे स्फटिक व नंतर विटा तयार करतात. 

तमिळनाडूत सालेमजवळील चॉकहिल्स येथिल मॅग्नेसाइटाचा साठा हा भारतातील सर्वांत मोठा साठा आहे व येथे पुष्कळ वर्षापासून खाणकाम चालू आहे. कर्नाटक व उत्तर प्रदेश (अल्मोडा व पिठोरगड जिल्हे) येथेही मॅग्नेसाइटाच्या खाणी आहेत. यांशिवाय बिहार व राजस्थानातही मॅग्नेसाइटाच्या खाणी आहेत. यांशिवाय  बिहार व राजस्थानातही मॅग्नेसाइटाचे मोठे साठे आहेत. भारतातील मॅग्नेसाइट काही प्रमाणात निर्यात करण्यात येते (उदा., १९८१ साली ४,६३,११८ टन उत्पादनापैकी ४,९६२ टन निर्यात झाली होती). यात मॅग्नेशियमाचे प्रमाण २८.७% पर्यंत आठळते. ऑस्ट्रिया, रशिया, ग्रीस, चेकोस्लोव्हाकिया, मँचूरिया व अमेरिकेचा पॅसिफिक किनारा या भागांत मॅग्नेसाइटाचे मोठे साठे आहेत.

 

डोलोमाइट या दुसऱ्या महत्त्वाच्या धातुकात मॅग्नेशियमाचे प्रमाण १३.८% पर्यंत असते. ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रिया, हंगेरी, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्पेन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथे याचे मोठे साठे आढळले आहेत. भारतात याचे साठे बिहार, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, ओरिसा, पंजाब, महाराष्ट्र (चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व यवतमाळ जिल्हे) इ. ठिकाणी आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रशिया, नॉर्वे कॅनडा, इटली, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व जपान येथे मॅग्नेशियम धातूची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. भारतात या धातूचे उत्पादन मर्यादित असून बहुतेक गरज आयातीने भागविली जाते. १९८२ साली भारतात डोलोमाइटाचे उत्पादन २१,३३,००० टन झाले होते.

मॅग्नेशियम धातू फारशी बळकट नसल्याने सुरुवातीला मुख्यत्वे शोभेच्या दारूकामात पांढऱ्या ठिणग्या निर्माण करण्यासाठी व क्षणिक चमकणाऱ्या विद्युत् दिव्याचे (फ्लॅश बल्ब) तंतू बनविण्यासाठी करीत असत. आता इतर धातू मिसळून हिच्या बळकट मिश्रधातू बनवितात. मॅग्नेशियम व ॲल्युमिनियम यांची मिश्रधातू चांगली बळकट व वजनाला हलकी असते. घरात वापरावयाची भांडी व सुवाह्य (सुटसुटीत) यंत्रसामग्री बनविण्यासाठी ती वापरतात. तिचे ओतकामही करता येते. हिच्यात मँगॅनीज मिसळून खाऱ्या पाण्यात न गंजणारी मिश्रधातू तयार करतात. विद्युत् वितळजोडकामाने या मिश्रधातूचे जोडकाम करता येते. विमान व अवकाशयान यांच्या उद्योगात अशा हलक्या मिश्रधातूंना फार महत्त्व आले आहे. विमानाच्या एंजिनाचे व पंख्याचे भाग, बैठकींचे सांगाडे, कॅमेरे व इतर सुवाह्य यंत्रसामग्रीचे भाग वगैरेंसाठी या मिश्रधातू वापरतात. या मिश्रधातू गतिज ऊर्जा चांगली शोषून घेतात. म्हणून यंत्रातील वेगाने मागेपुढे सरकणारे भाग बनविण्यासाठी त्यांचा वापर होतो. [⟶ मॅग्नेशियम].

तांबे : ही लोहेतर धातूंपैकी एक अतिशय महत्त्वाची धातू आहे. तांब्याचा चांगला स्वच्छ केलेला पृष्ठभाग चकचकीत लालसर गुलाबी दिसतो. तांबे चांगले विद्युत् व उष्णता संवाहक, जड व बळकटही आहे. हे संक्षारणाला चांगला विरोध करते व विजेच्या साहाय्याने हे बिनचूकपणे निक्षेपित करता येते यावर धातूरूपण चांगल्या प्रकारे करता येते आणि झाळकाम व डाखकाम यांनी हे जोडता येते. अन्य धातूंत मिसळल्यास मिश्रधातूला चांगले गुणधर्म प्राप्त होतात. तांबे शुद्ध रूपात अनेक ठिकाणी आढळले असून अनेक ठिकाणी याची अनेक प्रकारची धातुके आढळतात. सल्फाइड व ऑक्साइड या रूपांतील खनिजांनी युक्त असे धातुकांचे दोन मुख्य प्रकार होतात. तांब्याच्या धातुकांत निकेल, कोबाल्ट, मॉलिब्डेनम, सोने, चांदी, प्लॅटिनम, सिलिनियम, आर्सेनिक इ. मोलाची अन्य मूलद्रव्येही असतात. यामुळे अशा धातुकांपासून तांबे मिळविताना ही मौल्यवान मूलद्रव्ये उपपदार्थ म्हणून मिळतात.

धातुरूपात आढळणारे तांबे एकत्र करून त्यापासून सुऱ्या, हातोडे इ. हत्यारे बनविण्याचा उद्योग इ. स. पू. ८००० पासून चालू झाला. नंतर तांब्याचे पत्रे व भांडी बनविण्यात येऊ लागली. पुढे तांब्यात कथिल मिसळून काशाचे विविध प्रकार तयार करण्याचा उद्योग सुरू झाला.  तो ईजिप्तमधून इ. स. पू. २८०० च्या सुमारास सिनाईत पसरला. या काळात धातुके खणून काढणे, ती वितळवून शुद्ध धातू मिळविणे व तीपासून पत्रे, तारा, नळ्या इ. वस्तू बनविण्यात येऊ लागल्या. येथून या उद्योगाचा प्रसार क्रीट, सिसिली, फ्रान्स व उत्तर यूरोप येथे झाला. इ. स. पू. ३००० च्या सुमारास सायप्रसमध्ये या उद्योगाची खूप भरभराट झाली होती. तेथे तांबे मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने अनेक देशांनी सायप्रसवर ताबा मिळविण्यासाठी लढायाही केल्या. या देशावरून तांब्याला सायप्रियम म्हणत. त्यावरूनच नंतर इंग्रजीतील कॉपर हा शब्द आला. इ. स. पू. २५०० च्या सुमारास चीनमध्ये तांब्याचा उद्योग सुरू झाला होता. इ. स. पू. १७०० ते ११०० दरम्यान तेथे कासे व काशाच्या विविध कलाकृती तयार करण्यासही सुरुवात झाली.

लोखंड उद्योग सुरू झाल्यावर इत्यारांसाठी तांब्याचा वापर कमी होत गेला. मात्र तांबे गंजत नसल्याने पाण्याचे नळ, भांडी इ. बनविण्यासाठी त्याचा वापर वाढत गेला. पुढे तांब्यात जस्त, कथिल, निकेल, शिसे, ॲल्युमिनियम, मँगॅनीज इत्यादींपैकी एक किंवा अनेक धातू मिसळून विविध प्रकारच्या मिश्रधातू बनविण्यात येऊ लागल्या. त्यांचा निरनिराळ्या कामांकरिता वापर होत असे.

 

भारतातील तांब्याच्या उद्योगाची माहिती विशेष उपलब्ध नाही. मात्र ऋग्वेद काळाच्या आधीपासून येथे तांबे माहीत होते. रसार्णव या ग्रंथात ‘माक्षिक धातू’ असा तांब्याच्या धातूचा उल्लेख आढळतो. आयुर्वेदीय औषधांत तांबे वापरीत असत. राजस्थानमधील खेत्रीच्या परिसरात चुन्या काळी तांब्याचे धातुक खणून काढीत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.


 धातुकापासून तांबे मिळविण्याच्या सुकी व ओली अशा दोन मुख्य पद्धती आहेत. धातुके तापवून व वितळवून त्यापासून धातू मिळविण्याच्या पद्धतीला सुकी किंवा तापन पद्धती असे म्हणतात तर अन्य रसायनात धातुक विरघळवून त्या विद्रावापासून शुद्ध तांबे मिळविण्याच्या पद्धतीला ओली वा विद्राव पद्धती म्हणतात. सामान्यपणे सल्फाइडयुक्त धातुकासाठी सुकी व ऑक्साइडरूपातील धातुकासाठी ओली पद्धती वापरतात. या दोन्ही पद्धतींनी मिळणारे तांबे शुद्ध करण्यासाठी विद्युत् विच्छेदन पद्धती वापरतात. तापन पद्धतीने तांबे तयार करताना पहिल्या टप्प्यात वितळविलेल्या धातुकातील अन्य मलद्रव्ये मळीच्या रूपात काढून टाकतात. असे सांद्रित धातुक मोठ्या परावर्तक भट्टीत वितळवून तांबे मिळवितात. याच्या २०० किग्रॅ. वजनाच्या लाद्या बनवितात. विद्युत् विच्छेदन पद्धतीने त्यांचे शुद्धीकरण केल्यावर त्याच्या छोट्या विटा तयार करतात. तांब्याची मोड वितळवून तिच्यातील बहुतेक तांवे परत मिळविण्यात येते.

भारतात कॅल्कोपायराइट हे सल्फाइडी व ॲझुराइट हे ऑक्साइडी धातुकेही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतात. बिहार (सिंगभूम), राजस्थान (खेत्री, दरिबा, अलवर, झुनझुनू, भगोणी), आंध्र प्रदेश (खम्मम, मैलाराम, अग्निगुंडल), ईशान्य सरहद्दीलगत (रंगा खोरे), माहाराष्ट्र (पुलार, परसोरी), मध्य प्रदेश (माळंजखंड -विस्तृत व उच्च दर्जाचे साठे, बालाघाट), कर्नाटक (चिद्रदुर्ग, हसन) इ. राज्यांत तांब्याची धातुके आढळली आहेत. भारतात तांब्याच्या धातुकांचे साठे ५७.८ कोटी टन असून त्यात सरासरी १९% तांबे (६२.५६ लाख टन तांबे) असते. या धातुकांच्या सर्व खाणी, तसेच खेत्री व घाटशीला (बिहार) येथील प्रद्रावक हे द हिंदुस्थान कॉपर लिमिटेड या सरकारी कंपनीच्या अखत्यारीत आहेत.

भारतीय उद्योगातील तांब्याचे महत्त्व व मागणी वाढत आहे. मात्र देशातील तांब्याचे उत्पादन अपेक्षेएवढे होत नाही. कारण कठीण खडकांतील खाणकामाचे कौशल्य, खाणकामाची अत्याधुनिक यंत्रे व स्फोटके येथे उपलब्ध नाहीत. शिवाय धातुकांतील तांब्याचे प्रमाण कमी असून त्यांचे छोटे छोटे साठे विस्तृत क्षेत्रात विखुरलेले आहेत.  भारत सर्वस्वी आयातीवर अवलंबून नाही (उदा., १९७४ साली गरजेच्या १५% तांबे देशात बनविण्यात आले होते). अर्थात भारतातील तांब्याचा दरडोई खप १६० ग्रॅ. (१९८३) हा अन्य देशांच्या तुलनेने (उदा., जपान १,५४४ ग्रॅ.) खूप कमी आहे. अमेरिका, रशिया, कॅनडा, काँगो, चिली, झँबिया, पेरू व ऱ्होडेशिया हे तांब्याचे उत्पादन करणारे प्रमुख देश आहेत. मात्र एकूण उत्पादनापैकी निम्मेच तांबे बाजारात येते. कारण रशिया व अमेरिका हे प्रमुख उत्पादक देश तांब्याची निर्यात करीत नाहीत.

तांबे उत्तम विद्युत् संवाहक असल्याने विद्युत् यंत्रसामग्रीतील संवाहक घटक आणि विजेच्या तारा यांसाठी ते मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तांब्याच्या नळ्या यांत्रिक सामग्रीत वापरतात. घरगुती वापराची भांडी बनविण्यासाठी तांब्याप्रमाणेच त्याची पितळ ही मिश्रधातूही वापरतात. तांब्याची भांडी सामान्यपणे हाताने तांबटकाम करून बनवितात तर पितळेची भांडी यांत्रिक पद्धतीने पत्र्यावर दाब देऊन अथवा भंगाराचे ओतीव काम करून तयार करतात. [⟶ कासे तांबे पितळ].

कथिल : ही चांदीसारखी चकचकीत पांढरी व न गंजणारी धातू आहे. कथिलाचा वापर इ. स. पू. ३५०० पासून होत असून इ. स. पू. ३००० च्या सुमारास तांबे व कथिल यांच्या मिश्रणाद्वारे कासे बनविण्यात येऊ लागले. कॅसिटेराइट हे याचे प्रमुख खनिज असून ते व अन्य मलद्रव्ये असणाऱ्या धातुकापासून कथिल मिळवितात. भारतात कथिलाचे धातुक अद्यापि आढळलेले नसून कथिलाच्या बाबतीत भारत पूर्णपणे परांवलबी आहे. इंडोनेशिया, चीन, थायलंड, बोलिव्हिया, मलेरिया व रशिया येथे याच्या धातुकाचे मोठे साठे व खाणी आहेत. ग्रेट ब्रिटन व स्पेनमध्येही छोट्या प्रमाणावर यांचे खाणकाम करतात. धातुकातील मलद्रव्ये अलग करून सांद्रित धातुक मिळवितात. असे धातुक व कोळशाचा चुरा परावर्तक भट्टीत वितळतात व त्यापासून कथिलाचा रस मिळतो. या रसाच्या योग्य त्या वजडनाच्या विटा बनवितात. विटांपासून तार, गज वा चापट पट्ट्या (भांड्यांच्या कल्हईसाठी यापरण्यात येतात तशा) बनवितात. पिनँग (मलेशिया), सिंगापूर, लिव्हरपूल (इंग्लंड), होबोकेन (बेल्जियम), टेक्सस सिटी (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) येथे कथिलाच्या मोठ्या भट्ट्या आहेत. मलेशिया, रशिया, ग्रेट ब्रिटन, थायलंड, चीन व बोलिव्हिया हे कथिलाचे प्रमुख उत्पादक देश आहेत., १९७४ साली जगात २.५ लाख टन कथिलाचे उत्पादन झाले व त्यापैकी १.४७ लाख टन जगतिक बाजारपेठेत आले होते. यात मलेशियात निर्माण झालेले जवळजवळ सर्व कथिल (८८,००० टन) होते. त्या वर्षी भारताने सु. ३ हजार टन कथिल आयात केले होते.

कथिलाच्छादित म्हणजे कथिलाचा मुलामा दिलेल्या लोखंडी पत्र्याच्या मोडीपासूनही कथिल मोठ्या प्रमाणावर परत मिळवितात. या पद्धतीने दर वर्षी सु. ५ हजार टन कथिल मिळते. याकरिता असे पत्रे कातरून त्यांचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे दाहक सोड्याच्या गरम विद्रावात टाकतात. यामुळे कथिल लोखंडापासून सुटून तळाशीसाचते. हे कथिल वितळवून त्याच्या पट्ट्या बनवितात. विद्युत् विच्छेदनाद्वारे या पट्ट्यांपासून शुद्ध कथिल मिळवून त्याच्या पट्ट्या वा विटा तयार करतात. कथिल व शिसे यांच्या मिश्रणातून डाखकामाची धातू बनवितात. तांब्याच्या तारांचे सांधे आणि कथिलाच्छादित पातळ पत्र्यांचे जोडकाम करण्यासाठी मुख्यत्वे कथिल वापरतात. [⟶ कथिल].

सोने : जगात सु. ९३,००० टन सोने वापरात असून ते पुढीलप्रमाणे गुंतलेले आहे : ४५% सोने चलनविषयक संस्थांकडे, ३५% दागदागिन्यांत व अन्य औद्योगिक वापरांत आणि उरलेले २०% निरनिराळ्या प्रकारे गुंतवणूक व साठेबाजी करणाऱ्यांकडे आहे. भारतात सु. ४,७०० टन सोने दागदागिन्यांत गुंतलेले असावे.

सोन्याच्या धातुकाचा दर्जा व खाणकामाचा खर्च यांवर सोन्याची किंमत अवलंबून असते. खाणीची खोली, खाणकामाची मजुरी, हाताळाव्या लागणाऱ्या धातुकाची राशी आणि धातुकापासून सोने मिळविण्याचे तंत्र यांनुसार सोन्याची किंमत ठरते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंडोनेशिया, कॅनडा, कोलंबिया, जपान, जर्मनी, झिंबाब्वे, डोमिनिकन प्रजासत्ताक, दक्षिण आफ्रिका, पापुआ न्यू गिनी, फिलिपीन्स, ब्राझील हे सोन्याचे प्रमुख उत्पादक देश असून १९८० साली जगात सोन्याचे उत्पादन ९५५ हजार किग्रॅ. झाले होते.

 

भारतात मुख्यत्वे कोलारच्या सोन्याच्या खाणीतून सोने मिळते (वर्षाला सु. १,७०० किग्रॅ.). तेथील एकूण उत्पादन ७९० टन झाले असावे. भारतात सोन्याच्या धातुकाचे एकूण साठे सु. १४८.५ लाख टन (सु. ८१,०६० किग्रॅ. सोने) असावेत. कोलारशिवाय हुट्टी येथेही थोडे उत्पादन होते. या दोन्ही ठिकाणचे साठे १५ ते २० वर्षे पुरतील असा अंदाज १९८४ साली करण्यात आला होता. आंध्र प्रदेशातील रामगिरी क्षेत्रही महत्त्वाचे आहे. तेथील येप्पामान्ना (अनंतपूर जिल्हा) व चिंगारगुंटा (चित्तूर जिल्हा) या खाणींतील उत्पादन १९८४ साली सुरू झाले आहे. मात्र ते थोडेच आहे. सोन्याच्या धातुकांचा इतरत्र शोथ घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. बिहारमध्ये तांब्याच्या उद्योगातील अवपंकापासून (अतिसूक्ष्मकणी चिखलासारख्या राळ्यापासून) उपपदार्थ म्हणून सोने मिळविण्यात येते. [⟶ सोने].


कोष्टक क्र. १ जगातील लोहेतर धातूंच्या धातुकांचे मोठे साठे असलेले देश आणि तेथील त्या त्या धातूच्या धातुकांचे वा धातूंचे उत्पादन (१९८०)  

 

 

 

देश 

 

१ 

ॲल्यु मिनयम 

(हजार टन) 

२ 

कथिल 

(टन) 

३ 

क्रोमियम 

(हजारटन) 

४ 

चांदी 

(टन) 

५ 

जस्त  (हजारटन) 

६ 

तांबे 

(हजारटन) 

७ 

निकेल 

(टन) 

८ 

मँगॅनीज 

(हजारटन) 

९ 

मॅग्नेशियम 

(हजार टन)  

१० 

युरेनियम 

(टन) 

११ 

शिसे 

(हजारटन) 

१२ 

सोने 

(किग्रॅ) 

१३ 

अमेरिकेची  

संयुक्त संस्थाने 

२,१८६ 

– 

– 

९७४ 

३३४.९ 

– 

१३,२९३ 

– 

– 

१६,८०० 

५४९ 

२९,५०० 

अल्वेनिया

४५४

आयर्लंड

२२९

ऑस्ट्रिया

१,३१८.२

ऑस्ट्रेलिया

१०,३९१

७९२

५१८

२,२३५.१

६४,३९३

१,०३९.१

१,५६१

४०७.७

१६,९२१

इंडोनेशिया

१,२४९

३६,६२६

उत्तर कोरिया

१४०

१,८८०

१००

कॅनडा

१,०३७

८९४

७०८.४

१,९४,९४७

७,१५०

२७३.८

५०,६२०

कोलंबिया

१५,४५९

क्यूबा

३८,२३०

गाबाँ

११७.२

१,०३३

गिनी

१२,१९९

गुयाना

३३,५४०

ग्रीस

४,७५६

१३,८८०

१,५९८.२

घाना

१२१.२

१,०९८

चिली

१६०

१,०६३

६,८३६

चीन

१,५००

२९८

२००

३००

२,०००

१५५

जपान

२६८

२१८.१

३७.८४२

जमेका

१२,०५२

जर्मनी, पश्चिम

९,२९७

झँबिया

७१३.८

झाईरे

३,१५९

१२४

४५९

झिंबाब्वे

२६५.९

१५,१००

११,४४४

डोमिनिकन प्रजासत्ताक

१६,३४९

११,४९६

तुर्कस्तान

१९५.८

४९९

थायलंड

३३,६८५

दक्षिण आफ्रिका

२,४३४

१,५०२.३

२९,०३०

२,५१७.४

६,१४६

६,७५,०००

नामिबिया

४,०४२

नायजर

४,१००

नायजेरिया

२,५२७

निकाराग्वा

१,७१९

न्यू कॅलेडोनिया

८६,९७५

पापुआ न्यू गिनी

१४७

१४,५३२

पेरू

१,२०२

१,२३२

४७६.९

३६०.८

१८३.६

१,९५८

पोलंड

७६६

२१६.७

३६०.४

फिनलंड

१४७.१

१,१५४

फिलिपीन्स

१८२.५

३०४.६

२५,३८१

२०,०२५

फ्रान्स

१,९२१

२,६३४

१,०९६

बल्गेरिया

११०

बेल्जियम

९७४.२

बोट़खाना

१५,४४२

वोलिव्हिया

२७,२७१

१९६

१,५१४

ब्राझील

४,१५२

६,९३०

१३२.७

९८५

१५,९५८

ब्रिटन

३,०२८

भारत

१,७७५

१४४.२

११

३२.२

२६.८

६१८.६

३७०.६

१४.३

१,६३३

मेक्सिको

१,४७३

२३८.२

१७५.४

१६१

१४५.५

६,०९६

मोरोक्को

११८.७

म्यानमार (ब्रह्मदेश)

१,१००

यूगोस्लाव्हिया

३,१३८

१४९

२६१.९

१२१.५

३,३०४

रशिया

४,६००

१,०३०

१,४३०

७८५

१,५४,०००

३,०३९.६

२,०००

५२५

रूआंडा

१,६००

सुरिनाम

४,८९३

स्पेन

१००

१८३.२

३९०

स्वीडन

१५५

१६७.४

४,००२

हंगेरी

२,९५०

एकूण जागातिक

८८,५७१

१,९९,५००

४,२२९

१०,१२२

५,६२४.६

७९,५६३

७,३३,५४०

१०,२१८

१३,१०१

४३,९६५

३,५०८.९

९,५५,०००


चांदी : ही रुपेरी, नरम अभिजात धातू उत्तम विद्युत् व उष्णता संवाहक आहे. माणसाने सोने व तांबे यांच्यानंतर चांदी वापरायला सुरुवात केली असावी. कारण चांदीची धातुके सर्वत्र आढळत नाहीत आणि ती अन्य धातुकांमध्ये (उदा., शिशाच्या) मिसळलेली असतात. इ. स. पू. ४००० पासून चांदीचा उपयोग मुख्यत्वे दागदागिने, नाणी व वस्तुविनियमय यांच्याकरिता होत असे. आशिया मायनर व यूरोपच्या काही भागांत तिचा असा वापर करीत. धातुकांवर अग्निसंस्करण करून रोमन लोकांनी चांदी प्रथम मिळविली तर चांदीच्या मिश्रधातूतील शिसे ऑक्साइडाच्या रूपात काढून टाकण्याच्या क्युपेलीकरणाच्या क्रियेचा उल्लेख प्लिनी यांनी केलेला आढळतो (इ. स. २३-७९). ऋग्वेदामध्ये सोन्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांचाही उल्लेख आहे. तसेच मसाल्याच्या पदार्थाच्या बदल्यात स्पेनमधून चांदी भारतात येत असे.

अर्जेंटाइट (सिल्व्हर ग्लान्स), सेरार्जिराइट, पायरार्जिराइट, पॉलीबेसाइट व प्रूस्टाइट ही चांदीची प्रमुख धातुके आहेत. इतर धातूंच्या (उदा., सोने, तांबे, जस्त, शिसे) धातुकांबरोबरही चांदी आढळते. चांदीची धातुके थोड्याच भागांत आढळली असून नॉर्वे, मेक्सिको, कॅनडा, पेरू व रशिया येथे चांदीच्या धातुकांचे मोठे साठे आहेत. भारतात राजस्थानातील झवार क्षेत्रातील जस्त व शिशाच्या धातुकांबरोबर, कर्नाटकातील कोलार व हुट्टी भागातील सोन्याच्या धातुकाबरोबर आणि विहारमध्ये तांब्याच्या धातुकांबरोबर चांदी आढळते व ती उपपदार्थ म्हणून मिळविण्यात येते. हिमाचल प्रदेशात सतलज नदीच्या खोऱ्यात शुद्ध रूपातील चांदी आढळली आहे परंतु या साठ्यांचे सर्वेक्षण झालेले नाही.

क्युपेलीकरण, पारदमेल व सायनाइड  या तीन पद्धतीनी चांदी मिळविण्यात येते. क्युपेलीकरणामध्ये शिशाबरोबरच्या मिश्रधातूतील शिसे ऑक्सिडीकरणाने [⟶ ऑक्सिडीभवन] काढून टाकून चांदी मिळविण्यात येते, तर पारदमेल पद्धतीत पाऱ्याबरोबरच्या चांदीच्या मिश्रधातूचे (पारदमेलाचे) ऊर्ध्वपातन करून पारा गोळा करतात व चांदी अलग करतात. सायनाइड पद्धतीत सोडियम वा पोटॅशियम सायनाइडाच्या विरल विद्रावात ऑक्सिजनाच्या उपस्थितीत चांदीच्या धातुकाचे चूर्ण विरघळवितात. नंतर जस्ताच्या पद्धतीने चांदी घन साक्याच्या रूपात अवक्षेपित करून वेगळी करतात.

सुरुवातीला चांदी तिच्या धातुकांपासून मिळविण्यात येत असे पण या धातुकाचे साठे कमी झाल्यावर ती अन्य धातूंच्या उत्पादनाच्या वेळी उपपदार्थ म्हणून मिळविण्यात येऊ लागली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत मुख्यत्वे क्युपेलीकरणाने, तर नंतर सायनाइड पद्धतीने चांदीचे उत्पादन केले जाऊ लागले. पारदमेल पद्धती मुख्यतः मेक्सिकोमध्ये वापरतात. मेक्सिको, रशिया, पेरू, कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे चांदीचे प्रमुख उत्पादक देश आहेत. १९८८ साली जगात ४४,४३९ किग्रॅ. चांदीचे उत्पादन झाले होते. [⟶ चांदी].

कॅडमियम : ही धातू मुख्यत्वे विद्युत् विलेपनासाठी वापरतात. संचायक विद्युत् घटमाला, दंतवैद्यकात वापरण्यात येणारी मिश्रधातू, डाखकामाची मिश्रधातू, कृत्रिम दागदागिने वगैरेंमध्ये कॅडमियम वापरतात.

सापेक्षतः उत्पादन कमी असल्याने कॅडमियम महाग आहे. बहुतकरून जस्त व शिसे यांच्या धातुकांबरोबर कॅडमियमाचे सल्फाइड  (सु. ०.४%) आढळते. यामुळे  जस्ताचे उत्पादन करताना एक मूल्यवान उपपदार्थ म्हणून कॅडमियम मिळते. या पद्धतीने उदयपूर, अलवाये व विशाखापटनम् येथे कॅडमियम मिळते. १९८२-८३ साली असे सु. १२३ टन उत्पादन झाले होते. त्या वर्षी कॅडमियमाचे जागतिक उत्पादन १९,००० टन झाले होते.

कोष्टक क्र. १ मध्ये जगातील लोहेतर धातुकांचे साठे असलेले देश, तेथील धातुकांचे वा धातूंचे १९८० सालातील उत्पादन दिले आहे.

भारत : भारतातील उत्पादनाच्या दृष्टीने ॲल्युमिनियम, जस्त, शिसे व तांबे या लोहेतर धातू महत्त्वाच्या असून १९८४ साली यांच्या देशातील उत्पादनाने देशाची अनुक्रमे ६५%, ४४%, ३४% व सु. २८% गरज भागविली गेली होती. ॲल्युमिनियम, मँगॅनीज, क्रोमियम यांच्या धातुकांचे मोठे साठे भारतात आहेत. इतर लोहेतर धातूंच्या  धातुकांचे साठे व उत्पादन पुरेसे नाही. काही लोहेतर धातूंविषयीची भारतीय माहिती याआधी आलेली असून कोष्टक क्र. २ मध्ये भारतातील महत्त्वाच्या लोहेतर धातूंचे व धातुकांचे उत्पादन दिले आहे.

 

भारतात क्रोमाइटाचे एकूण साठे १३.५३ कोटी टन सावेत. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, मणिपूर, ओरिसा, तमिळनाडू व महाराष्ट्र (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा व गडचिरोली जिल्हे) येथे याचे महत्त्वाचे साठे आहेत. भारतात मँगॅनिजाच्या धातुकांचे एकूण साठे १५.८ कोटी टन असावेत आणि यांचे महत्त्वाचे साठे आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडू, बिहार, ओरिसा व राजस्थान येथे आहेत.

कोष्टक क्र. २. भारतातील महत्त्वाच्या लोहेतर धातुकांचे वा धातूचे उत्पादन (सोने व चांदी यांचे किग्रॅ.मध्ये आणि इतरांचे टनांमध्ये). 

———————————————————————————————————– 

धातुक/धातू                                                                       १९८५                                             १९८८ 

क्रोमाइट (क्रोमियम)                                                        ५,६९,०००                                        ७,५९,०००

जस्ताचे सांद्रित धातुक                                                     ८७,१७८                                            १,११,४३०

डोलोमाइट (मॅग्नेशियम)                                                २२,५६,०००                                        २२,१३,०००

तांब्याचे धातुक                                                               ४२,११,०००                                         ५३,२६,०००

बॉक्साइट (ॲल्युमिनियम)                                              २३,४१,०००                                         ३०,११,०००

मँगॅनिजाचे धातुक्                                                            १.२६,०००                                          ४,६०,०००

मॅग्नेसाइट (मॅग्नेशियम)                                                   ४,२१,०००                                          ४,६०,०००

शिशाचे सांद्रित धातुक                                                      ३५,४३३                                              ३९,८९८

चांदी                                                                                २५,५८७                                             ४४,४३९

सोने                                                                                  १,८५३                                               १,९००

  

अन्य थोड्याच लोहेतर धातूंचे लक्षणीय साठे भारतात आढळले आहेत. त्यांचे पुढील चार गट करता येतात : 

(१) टिटॅनियम व बेलिरियम यांसारख्या धातूंच्या धातुकांचे काहीसे विपुल साठे भारतात आहेत. उदा., इल्मेनाइट हे टिटॅनियमाचे खनिज पूर्व व पश्चिम किनारी भागांत मोठ्या प्रमाणावर आढळते. ओरिसा, तमिळनाडू व केरळ येथे याचे १० कोटी टनांचे साठे आहेत. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि रत्नगिरी जिल्ह्यांत हे आढळते. १९८०-८१ साली याचे १० हजार टन उत्पादन झाले होते.

(२) धातुकांचे काहीसे मर्यादित साठे असलेल्या धातू या गटात येतात. या धातुकांवर संस्करण करण्याच्या बाबतीत येथे चांगली प्रगती झाली असून येथे त्यांना मागणीही चांगली आहे. निओबियम, टँटॅलम, मॉलिब्डेनम व टंगस्टन यांचा या गटात अंतर्भाव होतो. राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र व कर्नाटक येथे टंगस्टनाच्या धातुकांचे साठे आढळले असून बिहार व नागालँडमध्येही गौण साठे सापडले आहेत. देशात याचे एकूण साठे ५.१ कोटी टन असावेत. १९८२ साली याच्या सांद्रित धातुकाचे उत्पादन ५३,५२९ किग्रॅ. झाले होते.

(३) विरळा वा अत्यल्प प्रमाणात आढळणार्यात धातू या गटात येतात. इतर धातू मिळविताना मागे राहणाऱ्या अपशिष्टांत (टाकाऊ पदार्थात) या धातूंचे चांगले एकत्रीकरण झालेले असते. उदा., ॲल्युमिनियम उद्योगात बेयर लिकरपासून गॅलियम, तर तांब्याच्या उद्योगातील अवपंकापासून सिलिनियम व टेल्युरियम मिळू शकतात.


 केरळ व तमिळनाडूच्या किनारी भागतील वाळूत मोनॅझाइट हे खनिज आढळते. मोनॅझाइटात थोरियम, युरेनियम व विरल मृत्तिका यांची ऑक्साइडे आहेत. याचे सु. १० लाख टन साठे असावेत. भारतात युरेनियमाच्या धातुकांचे सु. ८०,००० टन तर थोरियमाच्या धातुकांचे ३,६०,००० टन साठे असावेत. युरेनियम बिहारमध्ये तसेच हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेश यांच्या हिमालयी भागांत आढळते. जदुगुडा (बिहार) येथील खाणीची व्यवस्था युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी आयोगामार्फत पाहिली जाते. येथील युरेनियम संस्करण केंद्रात दिवसाला १,००० टन धातुकावर प्रक्रिया केली जाते.

(४) ज्या धातूंचे साठे देशात आढळलेले नाहीत अथवा ज्या धातू मिळविण्याचे तंत्र अवगत नाही, अशा धातू या गटात येतात. उदा., प्लॅटिनमाचे धातुक भारतात आढळलेले नाही.

लोहेतर धातूंच्या उद्योगाची भारतात १९६० नंतर वरीच प्रगती झाली. धातुकांचे भूमिगत  खणकाम, त्यांचे शुद्धीकरण, जलीय धातुवैज्ञानिक संस्करण, उत्ताप धातुवैज्ञानिक पद्धती इ. तंत्रांमध्ये चांगली प्रगती झाली असून त्यांतील प्राविण्य वा कुशलताही संपादित केली गेली आहे.

तथापि ॲल्युमिनियम व काही प्रमाणात जस्त वगळता इतर लोहेतर धातूंच्या देशातील उत्पादनात विशेष प्रगती झाली नाही. ॲल्युमिनियमा च्या बाबतीत भारताने मोठा टप्पा गाठला आहे. १९५०-५१ साली भारत गरजेच्या ७३% ॲल्युमिनियम आयात करीत असे. उलट १९७४ साली देशाची ९८% गरज देशातील उत्पादनाने भागविली जात होती. या काळात ॲल्युमिनियमाचे उत्पादन ११ हजार टनांवरून १.७ लाख टनांपर्यंत वाढले होते.  १९६७  सालापर्यंत जस्ताची गरज पूर्णपणे आयातीद्वारेच भागविली जात असे. १९७४ च्या सुमारास मात्र देशाची २०% गरज येथील उत्पादनाने भागविली जाऊ लागली.इतर लोहेतर धातूंच्या उद्योगाची प्रगती टप्प्याटप्प्याने होत आहे. सर्व प्रमुख लोहेतर धातूंची मागणी वाढत आहे. मात्र देशातील उत्पादनाद्वारे होणारा पुरवठा अपुरा असल्याने ही मागणी मोठ्या प्रमाणावर वा पूर्णपणे आयात करून पुरवावी लागते. विजेची टंचाई व तीमुळे उत्पादनक्षमता पुरेपूर वापरली न जाणे हे यामागील एक प्रमुख कारण आहे. आता लोहेतर धातूंच्या सागरातील साठ्यांकडे लक्ष गेले असून ते मिळविण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. 

भारत सरकारच्या खाण विभागाच्या अखत्यारीत सार्वजनिक क्षेत्रातील सहा उद्योग येतात. त्यांपैकी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड या प्रकल्पाच्या उभारणीचे काम चालू आहे तर मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचा संबंध खाणकाम व त्याकरिता करावे लागणारे छिद्रण यांच्याशी येतो. अन्य चार उद्योग लोहेतर धातूंशी निगडित आहेत, म्हणून त्यांची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.

(१) देशातील शिसे आणि जस्त यांच्या धातुकांचे खाणकाम व धातूंचे उत्पादन यांच्यात वाढ करण्यासाठी ‘हिंदुस्थान झिंक लिमिटेड’ या उद्योगाची जानेवारी १९६६ मध्ये स्थापना करण्यात आली. दिवसाला ५०० टन धातुकांचे उत्पादन करमारी मोखिया (राजस्थान) येथील खाण व टुंडू (बिहार) येथील वर्षाला ३,६०० टन शिसे गाळणारा प्रद्रावक यांपासून या उद्योगाचे काम सुरू झाले. १९८९ साली याच्या सात खाणी असून दिवसाला ८,७४० टन धातुक काढण्याची त्याची क्षमता होती. याचे तीन प्रद्रावक असून त्यांची वार्षिक उत्पादनक्षमता १ लाख ९ हजार टन आहे. जस्त व शिसे यांच्याशिवाय या उद्योगामार्फत उपपदार्थ म्हणून चांदी वर्षाला सु. ४८.८ टन व कॅडमियम वर्षाला सु. ३०५ टन यांचे उत्पादन केले जाते.

राजपुरा-आगुचा (भिलवाडा जिल्हा, राजस्थान) येथील शिसे-जस्ताच्या धातुकांचे प्रद्रावण करण्याकरिता चांदेरिया (चितोडगढ जिल्हा) येथे १ लाख ५ हजार टन (जस्त ७० हजार व शिसे ३५ हजार टन) वार्षिक उत्पादनक्षमतेचा प्रद्रावक उभारण्याची योजना आहे.

(२) ‘हिंदुस्थान कॉपर लिमिटेड’ हा उद्योग नोव्हेंबर १९६७ मध्ये स्थापण्यात आला. खेत्री, कोलीहान, दरिबा व राखा येथील प्रकल्पांसाठी तांब्याच्या धातुकांचे समन्वेषण, खाणकाम व प्रद्रावण करण्यासाठी हा उद्योग स्थापण्यात आला आहे. भारतात तांब्याचे उत्पादन याच्यामार्फतच होते व यासाठी सात केंद्रे उभारली आहेत. तांब्याशिवाय सोने, चांदी, सिलिनियम, टेल्युरियम व निकेल या अन्य धातूही उपपदार्थ म्हणून येथून मिळतात.

(३) ‘भारत गोल्ड माइन्स लिमिटेड’ हा सोन्याचे उत्पादन करणारा प्रमुख उद्योग आहे. कर्नाटकातील ‘हुट्टी गोल्ड माइन्स लिमिटेड’ हा असा दुसरा  उद्योग आहे. जागतील सुप्रसिद्ध कोलार खाणीतील खाणकाम १८८० साली खाजगी पातळीवर सुरू झाले. १९५६ साली तिचे राष्ट्रीयीकरण झाले. १९७२ साली स्थापलेल्या भारत गोल्ड माइन्स लिमिटेडच्या कोलार क्षेत्रात म्हैसूर, नंदी, व चँपियन रीफ या तीन खाणींचे काम चालू आहे. यांशिवाय आंध्र प्रदेशातील येप्पा मान्ना खाण या उद्योगाने हाती घेतली आहे. कोलारची खाण ही जगातील सर्वांत खोल (२,१९० मी.) खाण असावी. येथील १ टन धातुकात १९८५-८६ साली सोन्याचे प्रमाण ३.१४ ग्रॅ. होते.

(४) ‘भारत ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड’ या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या ॲल्युमिनियम उद्योगाची स्थापना २७ नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. ॲल्युमिनियमाचे प्रकल्प उभारणे, ते चालविणे व त्यांचे व्यवस्थापन पाहणे या कामांसाठी याची स्थापना झाली. याच्या मध्य प्रदेशातील कोर्वा प्रकल्पात अकरकंटक/फुटका पहाड क्षेत्रातील बॉक्साइट वापरण्यात येते. या प्रकल्पातील २ लाख टन उत्पादनक्षमतेचे संयंत्र एप्रिल १९७३ मध्ये सुरू झाले. येथील साठे विरळ झाल्याने ओरिसातील गंधमर्दन खाणीतील बॉक्साइट आता वापरतात. जेकेनगर (प. बंगाल) येथील आजारी उद्योग केंद्र १९८४ साली या उद्योगाकडे सोपविण्यात आले.

ॲल्युमिनियम व ॲल्युमिना यांच्यासाठी भुवनेश्वर येथे ७ जानेवारी १९८१ रोजी नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडची स्थापना करण्यात आली. या कंपनीमर्फत पुढील कामे केली जातात. पंचपतमाली (कोरापुट जिल्हा) खाण चालवून तेथून वर्षाला २४ लाख टन  बॉक्साइट काढणे दमनजोडी  येथे वार्षिक ८ लाख टन क्षमतेचे ॲल्युमिन्याचे संयंत्र उभारणे अंकुल (धेनकानाल जिल्हा) येथे वर्षाला २.१८ लाख टन ॲल्युमिनियम निर्माण करणारा प्रद्रावक उभारणे आणि अंगुल येथे ६,००० मेवॉ. क्षमतेचे वीजनिर्मिती केंद्र उभारणे.

या उद्योगांशिवाय सिक्कीम माइनिंग कॉर्पोरेशन या सिक्कीम व केंद्र शासन यांच्या संयुक्त प्रकल्पात भोतांग येथील बहुधातावीय धातुकावर सिक्कीममधील टांगपो येथील धातुक शुद्धीकरण संयंत्रात प्राक्रिया करतात आणि तांबे, शिसे व जस्त यांचे सांद्रित धातुक मिळविण्यात येते.

पहा : ॲल्युमिनियम कथिल कॅडमियम कासे क्रोमियम चांदी जस्त तांबे धातु – १ धातुक निक्षेप धातुकांचे शुद्धीकरण धातुविज्ञान निकेल पितळ मेंगॅनीज मॅग्नेशियम युरेनियम शिसे सोने.

ओक, वा. रा. ठाकूर, अ. ना.