प्रक्षालके: वस्तू स्वच्छ करण्यासाठी साह्यकारी होणाऱ्या कोणत्याही पदार्थाला व्यापक अर्थाने प्रक्षालक म्हणता यईल परंतू रुढ अर्थाने ही संज्ञा संश्लेषणाने (कृत्रिम रीतीने) बनविलेल्या व मलिन वस्तू निर्मल करण्याचा गुण असलेल्या साबणाखेरीज इतर पदार्थांना लावली जाते. यांनाच इंग्रजीत ‘सिंथेटिक डिटर्जंट्स’ (संक्षेप रूप ‘सिन्‌डेट्‌स’), ‘सोपलेस डिटर्जंट्स’ किंवा नुसतेच ‘डिटर्जंट्स’ म्हणतात. प्रक्षालके हा पृष्ठक्रियाकारकाचा एक प्रकार आहे. [→ पृष्ठक्रियाकारके].

 अफेनद पाणी (ज्यामध्ये साबणाचा फेस न होता साका बनतो असे) व अम्ल विद्राव यांमध्ये साबण निरुपयोगी ठरतो परंतु प्रक्षालके वापरण्यात ह्या अडचणी येत नाहीत. साबण बनविण्यासाठी खाद्य तेले व मेदे (चरब्या) वापरवी लागतात पण प्रक्षालके करण्यासाठी त्यांची आवश्यकता नसते. त्यामुळे खाद्यपदार्थात उपयोग करण्यासाठी खाद्य तेलांची बचत करता येते. या कारणांमुळे दिवसेंदिवस साबणाऐवजी प्रक्षालके जास्त प्रमाणात वापरली जाऊ लागली आहेत. स्नानाकरिता मात्र अजूनही साबणच पसंत केला जातो परंतु शँपूमध्ये केस स्वच्छ करण्यासाठी प्रक्षालके वापरली जाऊ लागली आहेत.

 इतिहास : पहिल्या माहायुद्धाच्या काळी (१९१४–१८) जर्मनीस तेले व मेदे यांची चणचण जाणवली व साबण बनविणे अशक्य झाले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आयसोप्रोपिल अल्कोहॉल, नॅप्थॅलीन व सल्फ्यूरिक अम्ल यांपासून पॉलिप्रोपिल नॅप्थॅलीन सल्फोनेट बनवून जर्मनीने वेळ निभावून नेली. या वर्गाची संयुगे ‘नेकाल’ या नावाने ओळखली जातात. प्रक्षालके म्हणून ही विशेष समाधानकारक नाहीत पण कापड उद्योगातील काही प्रक्रियांसाठी ती वापरली जातात. मेदाम्लांमध्ये असणाऱ्या COOHया गटामुळे साबण (या अम्लांची सोडियम लवणे) अफेनद पाण्यात वापरता येत नाही म्हणून तो गट झाकावा व दुसरा विक्रियाशील गट वापरुन अफेनद पाण्यात वापरता येतील अशी प्रक्षालके बनवावी या उद्देशाने जे संशोधन करण्यात आले त्यातून ‘इगेपॉन’ प्रक्षालके अस्तित्त्वात आली. ओलेइक अम्लावर इसेथायॉनिक अम्लाची (HO–CH2–CH2–SO3H) विक्रिया केली म्हणजे जे सल्फॉनिक अम्ल बनते, त्याचे सोडियम लवण म्हणजे ‘इगेपॉन ए’ [C17H33COO(CH2)2·SO3Na] होय. इसेथायॉनिक अम्लाऐवजी H2N–CH2–CH2–SO3Hअम्ल वापरले म्हणजे ‘इगेपॉन टी’ [C17H33CONH (CH2)2 ·SO3Na] हे प्रक्षालक बनते.

 मेदांपासून किंवा मेदाम्लांपासून बनविलेल्या दीर्घ कार्बन शृंखला असलेल्या अल्कोहॉलांची सल्फेटे व सल्फोनेटे त्यानंतर लवकरच प्रचारात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर खनिज तेलापासून मिळणाऱ्या रासायनिक पदार्थांचा उपयोग करून मिळणाऱ्या अल्किल बेंझीन सल्फोनेटापासून बनविलेल्या प्रक्षालकांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. आजकाल वापरण्यात असलेल्या प्रक्षालकांच्या उत्पादनात निम्म्यांहून अधिक भाग यांचा असतो.

 वर्गीकरण : प्रक्षालकांचे वर्गीकरण पृष्ठक्रियाकारकांच्या वर्गीकरणाप्रमाणेच (१) धनायनी, (२) ऋणायनी व (३) आयनहीन असे केले जाते [⟶ पृष्ठक्रियाकारके].

 धनायनी प्रक्षालकांपैकी सोडियम अल्किल बेंझीन सल्फोनेट सर्वांत जास्त वापरली जातात. सल्फेटीकृत व सल्फोनीकृत अमाइडे, अमाइने, एस्टरे व ईथरे यांचा काही प्रमाणात केला जातो.

 ऋणायनी प्रक्षालके महाग पडतात. ती मुखप्रक्षालक द्रवांत (माउथ वॉशेसमध्ये) आणि प्रक्षालनापेक्षा कापडाला मऊपणा यावा यासाठी करावयाच्या कापड उद्योगातील प्रक्रियांत उपयोगी पडतात.  

आयनाहीन प्रक्षालकांच्या योगाने वस्त्रे, धातूंची भांडीकुंडी, चिनी मातीची पात्रे इत्यादींच्या पृष्ठावरील तेले व मेदयुक्त मळ लवकर सुटून येतो म्हणून त्यांचा उपयोग कापड उद्योगात आणि भांड्यांच्या यंत्रिक धुलाईत केला जातो. ही वापरताना फेस कमी होतो, हा एक फायदा आहे.

 आवश्यक गुणधर्म : एखादे संयुग प्रक्षालक म्हणून समाधानकारक ठरविण्यासाठी त्यामध्ये पुढील गुण योग्य प्रमाणात असावे लागतात. (१) आर्दीकरण : स्वच्छ करावयाचा पृष्ठभाग त्याच्या विद्रवाने सुलभतेने ओला झाला पाहिजे. (२) पायसीकरण : मलिन वस्तूच्या पृष्ठावर तेलांचा किंवा तेलकट पदार्थांचा सूक्ष्म थर असतो. हा थर पृष्ठभागापासून सोडवून त्याचे सूक्ष्म बिंदू पाण्यात पायसरूपाने [⟶ पायस] तरंगत राहतील अशी योजना करण्याचा गुण. (३) संधारण : मलिन वस्तूच्या पृष्ठावरील घनरूप मळ काढून तेथून सूक्ष्म कणांच्या रूपात प्रक्षालन द्रवात तरंगत ठेवण्याचा गुण. (४) विद्राव्यीकरण : रेणुचयाच्या [⟶ पृष्ठक्रियाकारके] अंतर्भागात मळाचे बिंदू व कण समाविष्ट करुन घेणे. 


संवर्धके : बाजारात मिळणारी बहुतेक सर्व प्रक्षालक चूर्णे व वड्या केवळ त्या प्रक्षालक संयुगाच्याच बनलेल्या नसतात त्यात अनेक पदार्थ मिसळलेले असतात. तथापि केवळ किंमत कमी व्हावी म्हणून भर घालण्यासाठीच फक्त ते वापरलेले नसतात. त्यांच्या योगाने प्रक्षालन गुणात वाढ होते म्हणून त्यांना संवर्धके म्हणतात. महत्त्वाची संवर्धके खाली दिली आहेत.

 (१) फॉस्फेटे : सोडियम ट्रायपॉलिफॉस्फेट (Na5P3O11) हे मळाच्या कणांच्या पृष्ठभागावर अधिशोषित होते व कणावर ऋण विद्युत् भार निर्माण होतो. त्यामुळे हे कण परस्परांना प्रतिसारित करतात व वेगवेगळे राहतात आणि टिकाऊ संधारण बनते. पृष्ठभागापासून सुटलेले मळाचे कण पृष्ठभागावर बसून तो पुन्हा मलिन होण्याची शक्यता नाहीशी होते. ट्रायसोडीयम ऑर्थोफॉस्फेट व ट्रेट्रासोडीयम पायरोफॉस्फेट ही संयुगे याच कारणासाठी चिनी मातीची किंवा धातूंची पात्रे, रंगलेपित कठीण पृष्ठभाग व वस्त्रे यांच्या प्रक्षालन मिश्रणात वापरली जातात. टेट्रापोटॅशियम पायरोफॉस्फेट हे द्रव्ररूप प्रक्षालन मिश्रणासाठी उपयोगी पडते.

 (२) सोडियम सिलिकेट : कठिण पृष्ठभागांवरील मळ सुटा करण्यासाठी क्षार (अम्लाशी विक्रिया झाल्यस लवण देणारा पदार्थ) सोडियम सिलिकेटाचा अंतर्भाव करतात. इतर ठिकाणी (उदा., यांत्रिक धुलाईत) यंत्राच्या धातूच्या भागाचे क्षरण (झीज) होऊ नये म्हणून ते उपयोगी पडते.

 (३) अम्ले : कठीण पृष्ठभागावरील मळ कित्येक ठिकाणी अम्लांच्या क्रियेने सुटा होतो (उदा., दूधपुरवठा योजनांतील यंत्रे, पात्रे इ.). यासाठी फॉस्फोरिक, ऑक्झॅलिक, हायड्रोक्लोरीक या अम्लांचा मिश्रणात समावेश करतात. सौदर्यप्रसाधनांत जेथे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] ७ पेक्षा कमी ठेवण्याची आवश्यकता असते अशा ठिकाणी सायट्रिक व ॲसिटिक अम्ले मिश्रणात वापरतात.

 (४) सोडियम कार्‌बॉक्सी मिथिल सेल्युलोज मिश्र केल्याने सुटे झालेले मळाचे कण वस्तूच्या पृष्ठभागावर पुन्हा बसण्यास विरोध होतो.

 (५) प्रकाशीय विरंजके किंवा प्रकाशीय दीप्तिकारके या रासायनिक पदार्थामुळे धुतलेला कपडा जास्त शुभ्र दिसतो. काही काळ वापरल्यावर पांढऱ्या कपड्यावर जी पिवळत झाक येते ती कपडा स्वच्छ झाला तरी जात नाही. प्रकाशीय दीप्तिकारके जंबुपार प्रारणाचे (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य तरंगरूपी ऊर्जेचे) शोषण करतात आणि त्याचे निळसर प्रकाशात रूपांतर करतात. त्यामुळे हा पिवळटपणा झाकला जातो. १९५० सालानंतर असे अनेक पदार्थ उपलब्ध झाले आहेत.

(६) धुतलेल्या कपड्यांना किंचित सुगंध यावा म्हणून काही सुगंधी पदार्थही अल्प प्रमाणात मिसळतात.

 (७) अगदी अलीकडे काही विशेष प्रकारच्या प्रक्षालकांत एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थांचा) समावेश करण्यात आला आहे. त्यांचा उपयोग सहजासहजी स्वच्छ न होणारे कपडे (उदा., इस्पितळातील रोग्यांच्या जखमेचे रक्त, पू, थुंकी इत्यादींमुळे डाग पडलेले कपडे व चादरी) स्वच्छ करण्यासाठी होतो.

 (८) एथिलीन डाय अमाइन टेट्राॲसिटिक अम्ल (ई डी टी ए) घरगुती धुलाईच्या प्रक्षालकात व शँपूमध्ये अल्प प्रमाणात वापरतात.

 (९) सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराइड व सोडियम सल्फेट हे पदार्थही काही मिश्रणांत घालतात.


 परिसर व प्रक्षालकांचा वापर : प्रक्षालकांच्या प्रसारामुळे आपल्या परिसरावर लक्षणीय अनिष्ट परिणाम झालेला नाही. प्रारंभी जी प्रक्षालक संयुगे वापरण्यात आली त्यांच्या फेसामुळे मैला पाण्याच्या विल्हेवाटीसाठी करावयाच्या संस्करणात अडथळा येत असे परंतु त्यानंतर कमीत कमी फेस होणारी प्रक्षालके निवडल्यामुळे तो प्रश्न सुटला आहे. आधुनिक प्रक्षालके जीववैज्ञानिक क्रियांनी अपघटन पावून (घटक द्रव्ये अलग होऊन) नष्ट होतात. प्रक्षालक वापरताना सामान्यतः त्वचेवर अनिष्ट परिणाम होत नाही परंतु त्यांच्याशी दीर्घकाल संपर्क येत असेल आणि त्वचेची प्रतिकारक्षमता प्रभावी नसेल, तर एंझाइमयुक्त प्रक्षालके वापरताना तरी रबरी हातमोजे वापरणे श्रेयस्कर असते.

 निर्मिती : अल्किलीकरण, ⇨ सल्फॉनीकरण, उदासिनीकरण (क्षारकता किंवा अम्लता नाहीशी करणारी रासायनिक प्रक्रिया), मिश्रण व शुष्कीकरण या क्रिया-प्रक्रियांचा अंतर्भाव प्रक्षालक निर्मितीत होतो. त्या खंडित व अखंडित पद्धतींनी घडवून आणल्या जातात.

 कच्चा माल व भारतीय उद्योग : डोडेसिल बेंझीन हा प्रक्षालकांच्या निर्मितीस लागणारा महत्त्वाचा पदार्थ भारतात आयात होतो. त्याचे सल्फॉनीकरण व त्या नंतरच्या प्रक्रिया येथे केल्या जातात. एथॉक्सीकरणासाठी लागणारे एथिलीन ऑक्साइड हे नॅशनल ऑर्‌गॅनिक केमिकल इंडस्ट्रीज मुंबई, एथॅनॉल अमाइने ही पी. के. वेल् आणि कंपनी मुंबई आणि इंडिया कार्बन लि. कलकत्ता हे कारखाने बनवितात. संवर्धके म्हणून उपयोगी पडणाऱ्या पदार्थांपैकी सोडियम ट्रायपॉलिफॉस्फेट ऑल्ब्राइट मोरारजी ॲंड पंडित प्रा. लि. मुंबई आणि स्टार केमिकल्स मुंबई ह्या कारखान्यांत बनविली जातात. सोडियम सिलिकेट, कार्‌बॉक्सी मिथिल सेल्युलोज आणि प्रकाशीय दीप्तिकारके भारतात बनविली जातात.

 भारतात १९५६ सालापर्यंत प्रक्षालके तयार होत नव्हती. त्या साली अहुरा केमिकल्स कं. मुंबई व स्वस्तिक ऑइल मिल्स कं. लि. मुंबई यांनी त्यांचे उत्पादन सुरू केले. १९५७ मध्ये हिंदुस्थान लिव्हर लि. मुंबई या कारखान्यातही प्रक्षालके बनू लागली. १९६१ मध्ये भारतीय कारखान्यांची उत्पादनक्षमता ७,३१५ टन होती. १९६८-६९ मध्ये ती ३०,००० टन व १९७१ मध्ये ४८,००० टन इतकी झाली. टाटा ऑईल मिल्स कं. लि., हायको प्रॉडक्टस् प्रा. लि., दाईईची करकारीया प्रा. लि., सरफॅक्टन्टस् प्रा. लि. ह्या मुंबईच्या कारखान्यांची आणि कुसुम प्रॉडक्ट्‌स लि. रिश्रा पश्चिम बंगालमधील कारखान्याची आता भर पडली आहे.

 साबणाच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे तेल खाद्यासाठी उपयोगी पडावे आणि पाम तेल व चरबी यांची आयात कमी व्हावी या उद्देशाने शासनाने प्रक्षालकांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अल्किलबेंझीन इ. कच्च्या मालाच्या आयातीस मान्यता दिली आहे. त्यामुळे या धंद्यास उत्तेजन मिळाले आहे.

 बडोदे येथील इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. या कारखान्यात प्रक्षालकांना उपयोगी अक्लिलेटे तयार करण्याची योजना आहे.

 भारतात १९६७ साली १६,४५७ टन व १९७१ मध्ये ५३,६६१ टन प्रक्षालकांचे उत्पादन झाले. १९७५ साली आणि १९७६ साली उत्पादनक्षमता अनुक्रमे १,३५,००० टन व १,५५,००० टन होती आणि प्रत्यक्ष उत्पादन अनुक्रमे ७१,७४८ टन व ७९,७२८ टन झाले. १९७१ मध्ये भारतात १४,५४० किग्रॅ. प्रक्षालकांची आयात करण्यात आली व त्या वर्षी भारतातून ३३,८३,९५६ किग्रॅ. निर्यात करण्यात आली. केन्या, एडन, गँबिया, मॉरिशस, अफगणिस्तान इ. देशांना भारतातून प्रक्षालकांची निर्यात होते.

पहा: पृष्ठक्रियाकारके. 

संदर्भ:  1. C.S.I. R The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, 1973.

           2. Davidson, A. Milwidsky. B. M. Synthetic Detergents, London, 1967.

           3. Schwartz. A. M. Perry. J. W. Berch, J. Surface-active Agents and Detergents, New York, 1958.

मिठारी, भू. चिं.