सुई : शिवणकाम करण्याचा दोरा कापडासारख्या लवचिक पदार्थांमधून ओढून नेण्याचे हे एक साधन आहे.

इतिहास : सुईचा उपयोग फार पुरातन काळापासून चालू आहे. इ. स. पू. ३००० वर्षांपूर्वीच्या काळात स्पेन आणि उत्तर यूरोपातील प्रदेशांत कातड्याची पांघरुणे कातड्याच्याच वादीने शिवण्यासाठी हाडाच्या सुया वापरीत असत. त्यांचे दोन प्रकार होते. साध्या प्रकारच्या सुईच्या एका टोकावर आकड्यासारखी खाच पाडीत असत. ही सुई हल्ली जोडे शिवण्यासाठी वापरीत असलेल्या खाचेच्या सुईसारखी होती. दुसऱ्या प्रकारात सुईच्या मध्यभागात एक भोक पाडीत असत व दोन्ही टोके तीक्ष्ण करीत असत. बॅबिलन आणि ईजिप्तमध्ये सापडलेल्या विणकामाच्या नमुन्यावरुन तेथे इ. स. पू. २५०० वर्षांपूर्वीच्या काळात धातूच्या बारीक सुया वापरीत असत, असे दिसते. इटलीमधील पाँपेई येथील उत्खननावरुन तेथेही कापड शिवण्याच्या व शल्यकामाच्या धातूच्या सुया वापरात होत्या, असे दिसते. हल्ली प्रचारात असलेल्या पोलादी सुया प्रथम चीनमध्ये बनविण्यात येऊ लागल्या व मूर लोकांमार्फत त्यांचा यूरोपात प्रसार झाला. जर्मनीमधील न्यूरेंबर्ग हे शहर सुया करण्याबद्दल इ. स. १३७० पासून प्रसिद्घ आहे. १८८० पर्यंत सुया करण्याचे काम हातानेच करीत असत. १८९० च्या सुमारास यांत्रिक पद्घतीने सुया तयार करण्याची यंत्रे सुरू झाली व तेव्हापासून सुया मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागल्या. त्यामुळे त्या अल्प किमतीत विकता येऊ लागल्या.

आ. १. सुयांचे काही प्रकार : (अ) कापड शिवण्याची घरघुती सुई, (आ) जखमेचा भाग शिवण्याची सुई, (इ) पडदे, गालिचे, चटया,अभ्रे इत्यादींकरता वापरण्यात येणारी सुई, (ई) शिवणयंत्राची सुई, (उ) गोणपाट किंवा कांबळे जाड दोऱ्याने किंवा सुतळीने शिवताना वापरण्यात येणारे दाभण, (ऊ) लोकरीच्या विणकामाची हुक असलेली सुई.सुईची बनावट : सामान्य सुई तयार करताना रिळाभोवती गुंडाळलेल्या गोल छेदाच्या पोलादी तारेतून दोन सुया तयार करता येतील इतक्या लांबीचा तुकडा तोडून घेतात. हा तुकडा साधारण लाल होईपर्यंत तापवितात व सपाट पोलादी पाटावर ठेवून एका पोलादी लाटण्याने लाटतात. त्यामुळे हा तुकडा अगदी सरळ होतो. या तुकड्याची दोन्ही टोके एकामागून एक घर्षणचाकावर घासून तीक्ष्ण करतात. हे घर्षण चालू असताना तारेचा तुकडा त्याच्या अक्षाभोवती फिरवितात. त्यामुळे तारेचे टोक सर्व बाजूंनी एकसारखे होऊन तीक्ष्ण होते. तारेची टोके तीक्ष्ण झाल्यानंतर त्या तुकड्याच्या मध्यभागावर दाबयंत्राने दाबून तो भाग दोन्हीकडून चपटा करून तेथे दाबछिद्रण यंत्राने दोन भोके पाडतात. या दोन्ही भोकांतून एक साधी तार ओवतात व दोन भोकांमधील सुईच्या तारेचा चपटा भाग कापतात म्हणजे एकदम दोन कच्च्या सुया अलग होतात. नंतर प्रत्येक सुईच्या नेढ्याजवळचे (भोकाजवळचे) डोके घासून त्यावर गोलाई आणतात. त्यानंतर या सुया औष्णिक उपचार करून टणक करतात व घासून चकचकीत करतात. निरनिराळ्या लांबींच्या १० किंवा २५ सुया काळ्या तेलकट कागदाच्या पाकिटात ठेवून विक्रीसाठी पाठवितात. तेलकट कागदामुळे या सुया सहज गंजत नाहीत. कापडआ. २. विविध आकार असलेल्या विणकामाच्या सुयांचे प्रकार : (अ) तळापासून वर २, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १३, १५ अमेरिकी अंक असलेल्या सुया; (आ) दोन्ही बाजू टोकदार असलेल्या सुया; (इ) वर्तुळाकार सुया. हाताने शिवण्याच्या सामान्य सुया ३ — ८  सेंमी. लांब असतात. त्यांचे टोक काटयासारखे तीक्ष्ण असते. त्यामुळे या सुया कापडातील सूत न तोडता कापडात सहज घुसविता येतात. शिडाचे किंवा तंबूचे कापड शिवण्याच्या सुया जाड व जास्त लांबीच्या असतात आणि काही प्रकारांत त्यांचे पुढचे टोक चपटे करून थोडे वाकविलेले असते. जाड गोणपाट किंवा कांबळे शिवताना सुतळी किंवा जाड दोरा वापरावा लागतो. याकरिता मोठ्या नेढ्याची जाड तारेची सुई वापरतात, तिला ‘दाभण’  म्हणतात. तिची लांबी ७—१५ सेंमी. पर्यंत ठेवतात.

शिवणयंत्रामध्ये बसविण्याची सुई जरा निराळ्या प्रकारची असते. ती १ मिमी. जाड तारेपासून तयार करतात. तिची लांबी साधारण ४— ५  सेंमी. असते. तिचे खालचे टोक साध्या सुईप्रमाणेच तीक्ष्ण असते परंतु ते थंड घडवण पद्घतीने तयार करतात. या टोकाजवळच दोरा ओवण्याचे भोक असते. या सुईच्या डोक्याकडील जाड भाग एका बाजूने सपाट करतात. त्यामुळे ती सुई तिच्या धारकामध्ये ठराविक जागेवर सहज बसते व सपाट भागावर स्क्रू आवळून ती घट्ट धरता येते. या सुईच्या टोकाच्या दोन्ही बाजूंवर दोरा नेण्याच्या खाचा पाडतात.

प्राण्याच्या शरीरावर शस्त्रक्रिया केल्यानंतर कापलेल्या कातड्याचे भाग शिवण्यासाठी अर्धवर्तुळाकार सुई वापरावी लागते. अशीच सुई खुर्चीवरची गादी शिवण्यासाठीही उपयोगी पडते. ही सुई त्रिकोणी छेदाच्या कडक पोलादी तारेपासून तयार करतात. त्यामुळे ती कातड्यात सहज घुसते व तिचे टोक वळण घेऊन सहज बाहेर पडते.

जोडे शिवण्यासाठी भोक नसलेली, परंतु मेण लावलेला जाड दोरा ओढण्यासाठी खाच पाडलेल्या आकड्याची व मूठ बसविलेली मोठी सुई वापरतात. कलाबतूचे विणकाम करण्यासाठी साधारण याच जातीची, परंतु वेगळी मूठ न लावलेली सुई वापरतात. तिच्या पुढच्या टोकाजवळ दोरा ओढण्याचा आकडा असतो व सुई बोटात नीट धरता यावी म्हणून तिचा मधला भाग चपटा केलेला असतो. ही सुई ३ मिमी. जाड पोलादी तारेपासून करतात. तिची लांबी १० —१२ सेंमी. असते. तिच्यावर उत्तम प्रकारचा निकेलाचा मुलामा चढवितात. लोकरीचे विणकाम करण्यासाठी टोक केलेले जाड तारांचे सरळ तुकडे वापरतात. त्यांनाच विणकामाच्या सुया म्हणतात. या सुया १·५ मिमी. पासून ११·२५ मिमी. व्यासाच्या तारेपासून तयार करतात व त्यांची लांबी १२— १५  सेंमी. असते. बाजारात मिळणाऱ्या सुयांना त्यांच्या जाडीप्रमाणे निरनिराळे व्यास-अंक दिलेले असतात. या सुया साधारणतः रंगीत प्लॅस्टिकाच्या किंवा ॲल्युमिनियमाच्या असतात, परंतु काही प्रकारांत त्या पोलादाच्या किंवा लाकडाच्याही करतात. काही लवचिक सुया नायलॉनापासूनही करतात. त्यांच्या दोन्ही बाजूंवर टणक टोके असतात व त्या सुया वर्तुळाकार वाकविता येतात. विणकामाच्या सुयांचा व्यास व तद्‌नुरूप अंक सोबतच्या कोष्टकात दिले आहेत.

लोकर विणकामाच्या सुयांचे जाडीनुसार इंग्रजी अंक ( इं. अं. ) व अमेरिकी अंक, सोबत त्यांची लांबी. 
सुईची जाडी(व्यास मिमी.) १·५ १·७५ २·२५ २·७५ ३·२५ ३·५० ३·७५ ४·२५ ४·५० ५·२५ ५·७५ ६·५० १० ११·२५
इंग्रजी अंक १५ १४ १३ १२ ११ १० ०० ०००
अमेरिकी अंक ००० ०० १० १०·५० ११ १३ १५ १६
लांबी-(१) प्लॅस्टिक ( इं. अं. १ ते १५) : १२, १५, २५ सेंमी.

(२) ॲल्युमिनियम ( इं. अं. ० ते ८) : १२, १५, २५ सेंमी.

(३)पोलादी ( इं. अं. ८ ते १५) : १२, १५,२५ सेंमी.

(४) पोलादी ( इं. अं. १ ते ४) : ८ सेंमी.

आ. ३. द्रव औषधांचे अंतःक्षेपण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुयांच्या टोकांचे विविध प्रकारशरीरामध्ये द्रव औषधांचे अंतःक्षेपण करण्यासाठी काचेची पिचकारी वापरतात. तिच्या पुढच्या तोंडावर अगंज पोलादाची सुईसारखी बारीक ( परंतु तीक्ष्ण केलेल्या टोकाची ) नळी बसवितात. ही नळी तिरकी कापून तिला तीक्ष्ण धार आणलेली असते, या नळीलाच सुई म्हणतात. या सुईच्या मागच्या बाजूला पिचकारीवर बसविण्याचे टोपण लावलेले असते. सुयांच्या टोकांचे विविध प्रकार आ. ३ मध्ये दाखविले आहेत.

ग्रामोफोनवर ध्वनिमुद्रिका वाजविण्यासाठी जी कुणी (पिन ) वापरतात, तिला ध्वनि-पुनरुत्पादक सुई म्हणतात. या सुईचे टोक गोलाकार असून ते गुळगुळीत केलेले असते. सुरुवातीला या सुया पोलादाच्या बनवीत असत. मात्र त्या अडचणीच्या ठरू लागल्याने नंतर कृत्रिम नील रत्न व हिरा यांच्यापासून त्या बनविण्यात येऊ लागल्या.

पहा : शिवणयंत्र; सुईचे विणकाम.

ओक, वा. रा.