सुवासिक द्रव्ये : आल्हाददायक सुगंध असणाऱ्या द्रव्याला सुवासिक द्रव्य म्हणतात. सुवासिक द्रव्ये नैसर्गिक, संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेली) वा संमिश्र प्रकारची असतात. नैसर्गिक व कृत्रिम सुगंधी द्रव्यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करुन सुवासिक द्रव्ये तयार करतात. मुख्यतः अपेक्षित उपयोगानुसार सुवासिक द्रव्याचे संघटन निश्चित केले जाते. व्यक्तीची जीवनशैली, मनःस्थिती आणि कृती यांना उचित अशी हजारो सुवासिक द्रव्ये तयार करतात. यामुळे सुवासिक द्रव्यनिर्मिती ही एक कला बनली आहे. वनस्पतिज, प्राणिज व संश्लेषित द्रव्ये हा सुवासिक द्रव्यनिर्मितीचा मुख्य कच्चा माल आहे.

सुवासिक वनस्पतींमध्ये अगदी लहान गंधकोश असतात. त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्ये तयार होतात व साठविली जातात. ही द्रव्ये वाफेच्या रुपात उडून जाऊ शकतात, म्हणून त्यांना बाष्पनशील तेले म्हणतात. वनस्पतींची फुले, पाने, मुळे, खोड, कलिका, लाकडे, बाल्सम, गम, चीक, साल, अथवा काही पूर्ण वनस्पती यांच्यात सुवासिक बाष्पनशील तेले आढळतात. जाई, जुई, मोगरा, मालती, मदनबाण, गुलाब, केवडा, सोनचाफा, हिरवा चाफा, मरवा, दवणा, तमाल, दालचिनी, लवंग, जायफळ, केशर, चंदन, जिरॅनियम, गुच्छ, निशिगंध, लव्हेंडर, अनंत, पाच, रोझमेरी, रोशा गवत, नार्सिसस, मेंदी, रोझवुड, सीडार, फर्न, लिली, कार्नेशन, व्हॅनिला, काही ओषधी व हरिता इत्यादींपासून वनस्पतिज सुवासिक तेले मिळतात आणि ती सुवासिक द्रव्यांमध्ये वापरतात.

निर्मिती : जलीय व बाष्पीय ऊर्ध्वपातन, एन्फ्लूअरेज, भिजवण (मॅसरेशन), संपीडन (दाब देणे) व विद्रावकाच्या (विरघळविणाऱ्या पदार्थाच्या) मदतीने निष्कर्षण करणे, या पद्घतींनी वनस्पतिज भागांपासून बाष्पनशील तेले काढतात. जलीय ऊर्ध्वपातनात फुलांच्या पाकळ्यांसारखे वनस्पतिज भाग पाण्याबरोबर उकळतात. यामुळे पाण्याबरोबर बाष्पनशील तेलाचीही वाफ तयार होते. हे बाष्पमिश्रण वेगळे करुन थंड करतात. यामुळे पाणी व बाष्पनशील तेल यांचे द्रवरुप मिश्रण मिळते, त्यात तेल पाण्यावर तरंगते व ते वेगळे काढून घेतात. बाष्पीय ऊर्ध्वपातनात वनस्पतिज भागातून वाफ पाठवितात. यामुळे बनलेली बाष्पनशील तेलाची वाफ थंड होऊन द्रवरुप तेल मिळते व ते वेगळे करतात.

अत्तरे तयार करण्यासाठीही जलीय व बाष्पीय ऊर्ध्वपातन पद्घती वापरतात. या पद्घतीत सुगंधी पदार्थांपासून बनलेले बाष्पमिश्रण थंड होऊन एका साठवण पात्रात साठते. अत्तर बनविताना या साठवण पात्रात चंदनाचे तेल ठेवलेले असते. यामुळे बाष्पनशील तेल चंदनाच्या तेलात विरघळते आणि चंदनमिश्रित तेल मिळते, त्यालाच अत्तर म्हणतात. चंदन तेलमिश्रित जलबाष्पमिश्रण सुगंधी पदार्थांवरुन नेऊन मिळणारे बाष्पमिश्रण थंड करुनही अत्तर तयार होते. केवड्याच्या पिकलेल्या कणसापासून या पद्घतीने बाष्पनशील तेल मिळते. ते चंदन तेलात किंवा द्रवरुप पॅराफिनात मिसळून केवड्याचे अत्तर तयार होते.

विशेषतः फुलांमधील बाष्पनशील तेलांना उच्च तापमान सोसत नाही. तसेच जाई, निशिगंध इत्यादींची फुले तोडल्यानंतरही त्यांच्यामधील सुगंधनिर्मिती काही काळ चालू राहते. अशा फुलांपासून एन्फ्लूअरेज पद्घतीने बाष्पनशील तेल मिळवितात. या पद्घतीत शुद्घ केलेल्या चरबीच्या किंवा वसेच्या अगदी निकट सान्निध्यात फुले दीर्घकाळ ठेवतात. यामुळे फुलांतील बाष्पनशील तेल चरबीत शोषले जाऊन विरघळते आणि ग्रिजासारखी सुगंधित चरबी (पोमेड) तयार होते. ही सुगंधित चरबी वेगळी करुन एथिल अल्कोहॉलात मिसळतात. यामुळे बाष्पनशील तेल अल्कोहॉलात विरघळून अल्कोहॉली विद्राव मिळतो. हा विद्राव थंड केला की, त्यातील मेणे व सेस्क्विटर्पिने वेगळी होतात. ती गाळून वेगळी केल्यानंतर राहिलेल्या विद्रावाचे ऊर्ध्वपातन करतात, यामुळे ऊर्ध्वपातित झालेले अल्कोहॉल निघून जाते आणि केवळ सुगंधी बाष्पनशील तेल मागे राहते. भारतामध्ये या पद्घतीत चरबीऐवजी तिळाचे तेल वापरीत असत, म्हणजे बाष्पनशील तेल तिळाच्या तेलात येत असे.

भिजवण पद्घतीत उष्ण चरबी वा तेल वापरुन फुलांतील बाष्पनशील तेल काढतात. एन्फ्लूअरेज पद्घतीपेक्षा या पद्घतीला कमी वेळ लागतो. तथापि, विद्रावक निष्कर्षण पद्घतीमुळे या दोन्ही पद्घती मागे पडल्या आहेत.

संत्रे, लिंबू इ. फळांच्या सालीपासून सायट्रस तेले काढण्यासाठी संपीडन पद्घती वापरतात. पूर्वी फळांच्या साली स्पंजाच्या दोन तुकड्यांमध्ये ठेवून त्यांच्यावर दाब देत असत. यामुळे सालीतील बाष्पनशील तेल व काही रसही स्पंजात शोषला जाई. स्पंज पिळून गढूळ मिश्रण मिळत असे. ते निवळू देऊन बाष्पनशील तेल मिळत असे. हातांनी वा यांत्रिक पद्घतीने दाब देत. आधुनिक संपीडन पद्घतीत अधिक कार्यक्षम उपकरणे वापरतात.

विद्रावकांच्या मदतीने बाष्पनशील तेल मिळविण्याच्या निष्कर्षण पद्घतीत हेक्झेन, बेंझीन, पेट्रोलियम ईथर, अल्कोहॉल इत्यादींपैकी एक योग्य विद्रावक वापरतात. अशा विद्रावकात वनस्पतिज भाग मिसळतात आणि हे मिश्रण इष्ट तापमानाला काही काळ ठेवतात. आवश्यकता असल्यास ते ढवळतात. बाष्पनशील तेल या विद्रावकात विरघळते. नंतर हा विद्राव गाळतात आणि बाष्पीकरणाद्वारे त्यातील विद्रावक काढून टाकतात. उर्वरित भागात बाष्पनशील तेल, तसेच वनस्पतींमधील मेणे, रंगद्रव्ये इ. असतात. हा अवशेष अल्कोहॉलात विरघळवितात आणि मिळणाऱ्या विद्रावावर विशिष्ट संस्कार करतात. यामुळे शुद्घ बाष्पनशील तेलाचा अल्कोहॉली विद्राव मिळतो. बाष्पीकरणाद्वारे त्यातील अल्कोहॉल निघून गेल्यावर बाष्पनशील तेल मिळते. फुलांसाठी अल्कोहॉल हा विद्रावक चालत नाही. [→ बाष्पनशील तेले].

प्राणिज सुगंधी द्रव्यांमुळे सुवासिक बाष्पनशील तेलाचे बाष्पीभवन सावकाश होते. त्यामुळे सुगंध दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. म्हणून या द्रव्यांना पुष्कळदा बंधक वा स्थिरक म्हणतात. विशिष्ट प्राणिस्रावांत सुवासिक द्रव्ये असतात. ती मिसळली असता सुगंध दीर्घकाळ टिकतो. कस्तुरी मृगाच्या नरापासून कस्तुरी, बीव्हर प्राण्यापासून कॅस्टर वा कॅस्टोरियम, कस्तुरी मांजरापासून कस्तुरीसारख्या वासाचे सिव्हेट आणि स्पर्म व्हेल देवमाशापासून अँबरग्रिस ही सुगंधी द्रव्ये मिळतात.


 सुवासिक द्रव्यांच्या उद्योगात संश्लेषित द्रव्ये सर्वाधिक वापरली जातात. त्यांच्यामुळे पूर्वी माहीत नसलेले अनेक सुगंध उपलब्ध झाले आहेत. संश्लेषित सुवासिक द्रव्ये तयार करण्यासाठी खनिज तेल, रसायने, डांबर (कोल टार) व कधी कधी नैसर्गिक द्रव्ये वापरतात. काही संश्लेषित द्रव्यांचे रासायनिक संघटन नैसर्गिक द्रव्यांसारखे असले, तरी संश्लेषित द्रव्ये नैसर्गिक द्रव्यांहून वेगळी असतात. सुवासिक द्रव्यांची वाढती मागणी भागविण्यासाठी जगभर अनेक प्रकारची संश्लेषित द्रव्ये बनविण्यात येत आहेत. यामुळे या उद्योगाबरोबर त्याच्या निर्मितिक्षमतेचाही विकास होत आहे.

साठवणीत सुवासिक द्रव्यांत बदल होणार नाही किंवा ती अस्थिर होणार नाहीत, याची काळजी घेतात. तसेच त्यांचा रंग व रासायनिक संघटन बदलणार नाहीत याचीही दक्षता घेतात.

उपयोग : सुवासिक द्रव्यांचे असंख्य उपयोग आहेत. द्रव आणि अर्धद्रव रुपांत ती अंगाला व कपड्यांना लावतात. टाल्कम पावडर, धावन द्रव (लोशने), ओष्ठ शलाका, दंतधावने, दुर्गंधनाशके इ. सौंदर्यप्रसाधनांमध्ये ती वापरतात. ती साबणाच्या वड्यांमध्ये मुख्यत्वे वापरतात. तसेच धुलाईसाठीच्या चूर्णांमध्येही त्यांचा वापर होतो. जाईच्या फुलांपासून मिळणारे बाष्पनशील तेल उंची सुवासिक द्रव्ये, साबण, सौंदर्यप्रसाधने, दंतमंजन इत्यादींमध्ये व तंबाखूला स्वाद आणण्यासाठी तर जुईचे बाष्पनशील तेल अत्तरांत वापरतात. मरव्याचे बाष्पनशील तेल साबण, सुवासिक द्रव्ये, अत्तरे इत्यादींत तसेच मद्य व मिठाई यांना स्वाद यावा म्हणून वापरतात. मालतीचे मिर्टल तेल साबण व सुगंधी तेले यांत आणि स्वादकारक म्हणून वापरतात. सोन चाफ्यातील बाष्पनशील तेल अत्तरांत व सुगंधी तेलांत वापरतात. चंदनाच्या खोडाच्या गाभ्यापासून ऊर्ध्वपातनाने मिळणारे चंदनाचे तेल अत्तरांसाठी, तसेच सौंदर्यप्रसाधने, साबण, सुगंधी तेले व उदबत्त्या यांमध्ये वापरतात. भारतात चंदन तेलाच्या खालोखाल रोशा गवताच्या फुलांपासून मिळणारे बाष्पनशील तेल वापरले जाते. भारतात गुलाबाचे अत्तर बसरा व एडवर्ड या गुलाब प्रकारांपासून तयार करतात. ते खाद्यपदार्थांतही वापरले जाते. हिरव्या चाफ्याच्या फुलांतून मिळणारे बाष्पनशील तेल अत्तरांमध्ये व सुगंधी तेलात आणि दवणा, नार्सिसस व मिग्नोनेट यांच्यापासून मिळणारे बाष्पनशील तेल उच्च प्रतीच्या अत्तरांत वापरतात.

शरीराला लावण्यात येणारे ओ-द-कोलोन यासारखे सुवासिक द्रवरुप मिश्रण व प्रसाधनगृह जल यांनाही कधीकधी सुवासिक द्रव्ये म्हणतात. मात्र त्यांच्यात सुगंधी बाष्पनशील तेल २–५ टक्के इतक्या अल्प प्रमाणात असते व त्यामुळे ती स्वस्त असतात. औद्योगिक सुवासिक द्रव्येही स्वस्त असून ती रंगलेप, स्वच्छताकारक द्रव्ये इत्यादींचा अप्रिय वास घालविण्यासाठी तसेच विशिष्ट सुगंध यावा म्हणूनही वापरतात. कागदी, प्लॅस्टिक व रबरी वस्तूंवर यांचे संस्करण करतात. उदा., पावाच्या आवेष्टनाच्या कागदाला पावासारखा सुवास यावा म्हणून, तर फर्निचरवरील आच्छादावयाच्या प्लॅस्टिकला चामड्यासारखा वास यावा म्हणून त्यांचा वापर करतात. वायुकलिल फवाऱ्यांमध्येही सुवासिक द्रव्ये वापरतात.

औषधांतही सुवासिक द्रव्ये वापरतात. विशेषेकरुन स्वादकारक व उत्साहवर्धक म्हणून त्यांचा उपयोग होतो. मानसशास्त्रज्ञ, शरीरक्रियावैज्ञानिक, डॉक्टर व संशोधक मानसिक व शारीरिक वर्तनांमधील सुवासिक द्रव्यांच्या कार्यांविषयी संशोधन करतात. तसेच मस्तिष्कविज्ञानात माणसाच्या स्वास्थ्याविषयीची रहस्ये जाणून घेण्याचे एक साधन म्हणून सुवासिक द्रव्यांचा अभ्यास केला जातो.

इतिहास : प्राचीन भारतीय, चिनी, ईजिप्शियन, इझ्राएली (ज्यू), कार्थेजियन, अरब, ग्रीक व रोमन लोकांना सुवासिक द्रव्यनिर्मितीची कला अवगत होती. हिंदूंच्या धार्मिक कार्यांमध्ये चंदन व धुपासारखे पदार्थ जाळीत असत. बायबल मध्ये चंद्रसेनी धूप व हिराबोळ यांचे उल्लेख आहेत. थोडक्यात लिखित इतिहासापासून सुवासिक द्रव्यांची माहिती मिळते. प्राचीन ईजिप्शियन लोक आपल्या प्रत्येक देवतेचा विशिष्ट सुवासिक द्रव्याशी संबंध दर्शवीत. सुवासिक द्रव्यासाठी त्यांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ देवाचा सुगंध असा होता. सुवासिक द्रव्यासाठी असलेला ‘परफ्यूम’ हा इंग्रजी शब्द धुरामार्फत या अर्थाच्या लॅटिन शब्दावरुन आला आहे. पूर्वी इतरत्रही धार्मिक विधींमध्ये धूप, लाकूड इ. सुगंधी द्रव्ये जाळीत असत. त्याद्वारे आत्मे स्वर्गाकडे नेले जातात, असा समज होता. ईजिप्तमधील सत्ताधीश फेअरोच्या थडग्यात सुवासिक द्रव्ये आढळली असून ती इ. स. पू. सु. ३,००० वर्षांपूर्वीची असावीत. ईजिप्शियन लोक लाकडे व राळ (रेझिने) पाण्यात व तेलात भिजवीत आणि हा द्रव अंगाला लावीत. शव टिकविण्यासाठीही अशा द्रव्याचा ते वापर करीत. त्यांच्याकडूनच ग्रीक व रोमन लोकांना सुवासिक द्रव्यांची माहिती झाली.

मध्ययुगात लोक आपल्या परिसराविषयी अधिक जागरुक झाले. तेव्हा त्यांना सुगंधी धुराचे महत्त्व लक्षात आले कारण तेव्हा केरकचरा हलविण्याची सुविधा नसल्यामुळे घरे व रस्ते या ठिकाणी अप्रिय वास येई. त्यामुळे हा वास घालविण्यासाठी ते सुवासिक द्रव्ये वापरीत.

सतराव्या शतकात यूरोपमधील वैद्य प्लेगच्या रुग्णावर उपचार करताना मुखावर कातडी आच्छादन घालीत. या आवरणामध्ये लवंगा व दालचिनी यांसारखे मसाल्याचे पदार्थ व सुवासिक द्रव्ये ठेवीत. या द्रव्यांमुळे वैद्याचे या रोगापासून रक्षण होते, असा समज होता. या काळात इंग्लंडमधील स्त्रिया गळ्यातील लॉकेटमध्ये आणि हातातील काठीच्या मुठीत सुवासिक द्रव्य ठेवीत. घराबाहेर पडल्यावर या वस्तू नाकाजवळ नेऊन अप्रिय वास टाळण्याचा प्रयत्न करीत.

युद्घात व प्रेमात सुवासिक द्रव्ये आवश्यक मानीत. विल्यम शेक्सपिअर यांच्या क्लीओपात्रा  या नाटकातील पात्रे सुगंधित वाऱ्याने प्रेमातुर वा प्रेमविव्हळ झाल्याचे वर्णन आहे. स्वतःचे स्वास्थ आणि रणांगणावरील श्रेष्ठत्व यांच्यासाठी बरोबर डझनावारी सुवासिक द्रव्ये असल्याशिवाय नेपोलियन युद्घाला सज्ज होत नसे. अठराव्या शतकात राजे चौदावे लुई यांनी सुवासिक द्रव्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती, म्हणून त्यांना ‘परफ्यूम किंग’ म्हणत. ते अंगाला मोठ्या प्रमाणावर सुवासिक द्रव्ये लावीत असत आणि शेळीच्या दुधात सुवासिक द्रव्ये घालून त्याने आंघोळ करीत. त्या काळात कबुतरांच्या पिसांना सुवासिक द्रव्ये लावून ती समारंभाच्या जागी उडण्यासाठी सोडीत. कबुतरांचे पंख फडफडल्याने सुवासिक द्रव्यांचा सुगंध दिवाणखान्यात सर्वत्र पसरुन सुगंधी वातावरण निर्माण होत असे.

सुवासिक द्रव्यनिर्मिती ही शेकडो वर्षे मुख्यतः पौर्वात्य कला होती. बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात धर्मयुद्घांत सहभागी झालेल्या सैनिकांनी पॅलेस्टाईनमधून सुवासिक द्रव्ये इंग्लंड व फ्रान्समध्ये आणली. नंतर पंधराव्या शतकात सुवासिक द्रव्ये यूरोपभर लोकप्रिय झाली. अठराव्या शतकापासून संश्लेषित रसायनांचा सुवासिक द्रव्यांमध्येविस्तृतपणे वापर सुरु झाला. नंतर या उद्योगातील सुवासिक द्रव्यांची निर्मिती आणि गुणवत्ता नियंत्रण यांची सुविकसित तंत्रे हळूहळू पुढे आली. पूर्वीप्रमाणेच काही नैसर्गिक कच्चा माल हातांनीच गोळा करतात. उदा., जाई, जुई, गुलाब यांची फुले पहाटेपूर्वीच म्हणजे ती दवाने भिजलेली असतानाच काढून घेतात.


 भारत : सुवासिक द्रव्ये तयार करण्याची कला भारतात प्राचीन काळापासूनच अस्तित्वात आहे. त्या काळात भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांनी उंची सुवासिक द्रव्ये व अत्तरे भारतात तयार होत असल्याचे उल्लेख आपल्या प्रवासवर्णनांतून केलेले आढळतात. फुले, फळे, लाकूड, मुळे, राळ व गवते यांचा यासाठी उपयोग होत असे. प्राचीन भारतातील संस्कृत वाङ्‌मयातून सुवासिक द्रव्यांच्या निर्मिती व वापराविषयी उल्लेख असून सुवासिक द्रव निर्मिती ही महत्त्वाची व विशेष कला होती. कौटिलीय अर्थशास्त्राच्या (इ. स. पू. तिसरे शतक) सत्ताविसाव्या अध्यायात गणिका आणि रंगभूमीवर उपजीविका करणाऱ्या दासी यांना गायन व वादन यांबरोबरच सुंगध तयार करणे, या कलांचे ज्ञान करुन देणाऱ्या शिक्षकांच्या उपजीविकेची सोय सरकारी तिजोरीतून करुन द्यावी असा उल्लेख आहे. तसेच वात्स्यायनाचे कामसूत्र  (इ. स. पाचवे शतक), समरांगणसूत्रधार  (इ. स. बारावे शतक ), कर्पूरमंजिरीकथा  (इ. स. बारावे शतक) या ग्रंथांतून या कलेबरोबरच वासंतिक उत्सवाचे वर्णनही गणिकांच्या संदर्भात येते. त्यातील गणिका सर्वांगावर सुवासिक द्रव्याबरोबरच चंदनाचा लेप लावीत. सुवासिक द्रव्यांच्या वापराची पद्घत मराठे अंमलातही आढळते. राजे, पेशवे व त्यांचे सरदार-दरकदार उंची पोषाखाबरोबर सुवासिक अत्तरे व गुलाबपाणी वापरीत. याविषयीचे दाखले तत्कालीन पत्रव्यवहार व बखरींमधून मिळतात. मध्ययुगात भारतातील सुवासिक द्रव्ये ही अरबी सुवासिक द्रव्ये या नावाने यूरोपात गेली.

कनौज, कुंभकोणम्, पंढरपूर, पुणे व पाटणा ही या उद्योगाची प्रसिद्घ केंद्रे होती. मोगलांच्या काळात जौनपूर, गाझीपूर, लखनौ, दिल्ली व अलीगढ ही सुवासिक द्रव्यांची महत्त्वाची केंद्रे बनली होती. या उद्योगाला राजाश्रय मिळत असे. शेजारी देशांबरोबरच्या व्यापारामुळे या उद्योगाची भरभराट झाली होती मात्र १८५० नंतर या उद्योगाचे महत्त्व कमी होऊ लागले. कारण पाश्चात्त्य देशांत सुवासिक द्रव्यनिर्मितीसाठीच्या तंत्रविद्येत प्रगती झाली आणि त्या स्पर्धेत भारतीय उद्योग मागे पडला. तथापि, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या उद्योगाचे पुनरुज्जीवन होण्यास सुरुवात झाली. डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सुवासिक द्रव्यांविषयीचे संशोधन सुरु झाले. यांतून चंदन, गवती चहा इ. वनस्पतींपासून विविध प्रकारच्या सुगंधी तेलांचे व्यापारी उत्पादन सुरु झाले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेने १९४१ मध्ये इसेन्शियल ऑइल रिसर्च कमिटी स्थापन केली. त्यामुळे बाष्पनशील तेलांविषयीच्या पुढील संशोधनाला चालना मिळाली.जाळल्यावर मधुर सुवासिक धूर निर्माण करणाऱ्या उदबत्त्या व धूपद्रव्ये साबणात व सौंदर्यप्रसाधनांत वापरण्यात येणारी अल्कोहॉलविरहित सुगंधी द्रव्ये संहत अल्कोहॉली विद्राव, विरल अल्कोहॉली विद्राव आणि अत्तरे या प्रकारची सुवासिक द्रव्ये भारतात तयार होऊ लागली.

फुलांच्या ऊर्ध्वपातनाने मिळणारी बाष्पनशील तेले चंदन तेलाच्यापात्रात जमा करतात व त्यांच्या मिश्रणातून अत्तर तयार होते. स्वस्त अत्तरांसाठी चंदनाच्या तेलाऐवजी द्रवरुप पॅराफीन वापरतात. अत्तरातील फुलांच्या बाष्पनशील तेलाच्या प्रमाणानुसार अत्तराची गुणवत्ता व किंमत ठरते. अत्तरांची शुद्घता व गुणवत्ता घटल्यामुळे हा उद्योग मागे पडला आहे. अत्तरांचे अल्कोहॉली विद्रावही मिळतात. अत्तरे उदबत्ती, केशतेल, साबण, फाये इत्यादींमध्ये वापरतात.

भारतात गुलाब, जाई, जुई व केवडा ही अत्तरे जास्त लोकप्रिय आहेत. यांशिवाय चंपक (चाफा), खस (वाळा), हिना (मेंदी), बकुळ, पारिजातक, कदंब, केशर, आंबा, सुरंगी, अगरू इ. अत्तरेही तयार होतात. जाई, जुई अत्तर कनौज, जौनपूर, गाझीपूर व सिकंदरपूर आणि गुलाबाचे अत्तर कनौज, अलीगढ, गाझीपूर, बर्बाना व हुसयन या उत्तर प्रदेशातील गावांत तयार होते. ओडिशामध्ये गंजाम जिल्ह्यात केवड्याचे, तर पर्लाकिमेडी येथे चंपक अत्तर तयार करतात. चंदनाचे अत्तर उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये, तर हिना अत्तर लखनौ येथे तयार करतात. म्हैसूर, चेन्नई, तंजावर, पुणे, पंढरपूर, नासिक, दिल्ली व अमृतसर येथे उदबत्ती व धूपद्रव्ये तयार होतात. गुलाब, वाळा व केवडा यांच्या सुगंधाची जलेही भारतात तयार होतात. ती मिठाई, खाद्यपदार्थ, शिंपडणे इत्यादींसाठी वापरतात. ही सुगंधी जले आयुर्वेद आणि युनानी औषधांतही वापरतात.

पहा : अंबर, उदी अगरू अरगजा उदबत्ती ऊद कस्तुरी मृग केवडा केशर गवत, रोशा गुलाब चंदन चाफा, सोन चाफा, हिरवा जाई जुई तमाल दवणा दालचिनी धूप नार्सिसस पाच फ्रँकिन्सेन्स बाल्सम बाष्पनशील तेले मरवा मालती मिग्नोनेट मेंदी मोगरा वनस्पति-रसायनशास्त्र.

ठाकूर, अ. ना. दांडेगावकर, सा. ह.