स्कूटर : स्कूटर व स्कूटरेट ( लहान स्कूटर ) ही दोन चाकी वाहने आहेत. ⇨ मोटारसायकल या संज्ञेमध्ये एंजिनाच्या दट्ट्याचे विस्थापन ५० घ. सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मोपेड पासून ते १,२०० घ. सेंमी. विस्थापन असलेल्या अनेक सिलिंडरी दुचाकी वाहनांचा समावेश करतात. याच संज्ञेत ५० — २५० घ. सेंमी. विस्थापन क्षमतेच्या एक सिलिंडर असणार्‍या स्कूटर व मोपेड या दुचाकीही येतात. मराठी विश्वकोशा त ‘ मोटारसायकल ’ अशी स्वतंत्र नोंद आहे. येथे फक्त स्कूटर व मोपेड यांची माहिती दिली आहे.

  स्कूटरमध्ये ⇨ सायकल  व ⇨ अंतर्ज्वलन एंजिन यांच्या तत्त्वांचे एकत्रीकरण केले आहे. ती हवेने थंड होणार्‍या पेट्रोल ( किंवा डीझेल ) एंजिनाने पुरविलेल्या शक्तीवर चालते. यूरोपात अशा एंजिनाची क्षमता व सामर्थ्य दट्ट्याने विस्थापित केलेल्या घ. सेंमी. घनफळाच्या रूपात मोजतात तर अमेरिका व इतर काही देशांत ती ⇨ अश्वशक्तीच्या रूपात मोजतात. स्कूटरमध्ये ⇨ रिक्शाप्रमाणेच एंजिन, शक्तिप्रेषण, संधारण, गतिरोधक, सुकाणू वगैरे यंत्रणा असतात.

  मोटारसायकल हे अवजड दुचाकी वाहन आहे. स्कूटर व मोपेड ही मोटारसायकलीच्या तुलनेत कमी अवजड, कमी अश्वशक्तीची, वजनाला हलकी, स्वस्त व सहजपणे वळविता येणारी अशी वाहने आहेत. स्कूटर व मोपेड या वाहनांत दर्शनी महत्त्वाचा फरक म्हणजे स्कूटरच्या चाकांचा व्यास २०० — ३६० मिमी. असतो तर मोपेडची चाके यापेक्षा बरीच मोठी सायकलीसारखी असतात. स्कूटरची चाके संपीडित ( दाबलेल्या ) पोलादाची असून ती नटबोल्टाने सहज लावता व काढता येतात. पुढील आणि मागील चाके एकसारखी म्हणजे एकमेकांऐवजी वापरता येण्या-सारखी असून स्कूटरला एक जादा चाकही ( स्टेपनी ) असते. स्कूटरचे एंजिन चालकाच्या आसनाखाली, परंतु किंचित मागे असते. मोपेडचे एंजिन हस्तदंड ( हँडल बार ) व चालकाचे आसन यांच्या मधोमध साट्यात बसविलेले असते. स्कूटरची बहुतेक बनावट पोलादी पत्र्यांची, तर मोपेडची पोलादी नळांची ( नलिकांची ) असते. यामुळे स्कूटर मोपेडपेक्षा दिसायला सुंदर, आकर्षक व विविध रंगांच्या असतात. स्कूटर मुख्यतः दोन व्यक्तींसाठी बनविलेली असते तर मोपेड मुख्यत: एका व्यक्तीसाठी ( चालकासाठी ) असते. स्कूटरची गती मोपेडच्या गतीपेक्षा बरीच जास्त असून तिचे वजनही मोपेडच्या वजनापेक्षा बरेच जास्त असते. स्कूटरचा साटा जमिनीपासून कमी अंतरावर असतो. स्कूटर चालविताना चालक आपले पाय पोलादी फलाटावर ठेवू शकतो. मोपेडचा सांगाडा जमिनी-पासून बराच वर असतो. मोपेडचा चालक आपले पाय दोन पायट्यांवर ठेवतो. प्रत्येक वेळी स्कूटरचे एंजिन चालू करण्यासाठी चालक जमिनीवर उभे राहून पायाच्या चवड्याने स्कूटरला जोडलेला आरंभक पायटा जोराने झटका देऊन खाली दाबतो. मोपेडचे एंजिन चालू करण्यासाठी सायकल-प्रमाणे दोन पायटे असून यांपैकी एक पायटा चालक जमिनीवर उभे राहून एका पायाने दाबतो किंवा मोपेडच्या आसनावर बसून चालक दोन पायट्यांवर आपली पावले ठेवून पायटे फिरवितो. सुमारे १९९० सालानंतर स्कूटरचे एंजिन चालू करण्यासाठी पायट्यांऐवजी विजेच्या मदतीने वाहन चालू करता येते. त्यासाठी वाहनाच्या हस्तदंडाला एक लहान बटन बसविलेले असते. ते वापरून वाहन सुरू करता येते. वाहन चालविताना वाहकाला वार्‍याचा त्रास होऊ नये म्हणून काही वाहनांत वाहकाच्या पुढील बाजूला प्लॅस्टिकचा पारदर्शक वारानिरोधक आडोसा बसविता येतो. जेवणाचा डबा, काही पुस्तके, रेनकोट यांसारखे जुजबी सामान ठेवण्यासाठी वाहनांच्या आसनाखाली एक कप्पा असतो किंवा पेटीसारखा खण बसविलेला असतो. बहुतेक सर्व दुचाकी वाहनांत ग्राभ ( क्लच ), दंतचक्र ( गीअर ) व गतिरोधक यांच्या यंत्रणा हस्तदंडाला जोडलेल्या असतात. तसेच स्कूटरच्या बाबतीत मागील चाकाला गती देण्यासाठी तिर्यक् ( कोनीय ) शंकुचक्र ( बेव्हेल व्हील ) यंत्रणा असते. उलट मोपेडच्या बाबतीत मागील चाकाला गती देण्यासाठी पट्टाचालन किंवा शृंखलाचालन यंत्रणा वापरतात. मात्र स्कूटर व मोपेड या दोन्ही प्रकारच्या वाहनांमध्ये गती कमी-जास्त करणारी यंत्रणा जवळपास एकसारखी असते. त्यासाठी हस्तदंडाला लहान व्यासाची एक लवचिक नळी जोडलेली असून तिच्या आतमध्ये संपूर्ण लांबीची स्वतःभोवती फिरणारी लवचिक केबल असते. या यंत्रणेमार्फत वाहनाची गती नियंत्रित करता येते. बहुतेक स्कूटरमध्ये दिवे अंगभूत म्हणजे बनावटीचा भाग असतात. मोपेडच्या हस्त-दंडाच्या खाली पुढच्या चाकाच्या चिमट्याला बाहेरच्या किंवा समोरच्या बाजूला दिवा जोडलेला असतो.

आ. १. स्कूटरमधील भाग : (१) क्लच नियंत्रण तरफेसहित दंतचक्र बदल करणारी मूठ, (२) पुढील गतिरोधकाची तरफ, (३) एंजिनाचा वेग बदलण्याची मूठ, (४) दिवा चालू-बंद करणारा व हॉर्नकरिता असलेला स्विच, (५) पुढील गतिरोधक खंड, (६) पाठी-मागच्या गतिरोधकाचा पायटा, (७) पायाने गाडी सुरू करण्याचा आरंभक, (८) दंतचक्र बदलणारा भाग, (९) पाठीमागील गतिरोधक खंड, (१०) क्लच, (११) एंजिनावरील आच्छादन, (१२) कार्ब्युरेटर हवा स्वच्छ करणारा भाग, (१३) इंधन गुडदी, (१४) चोक नियंत्रण करणारी तरफ, (१५) आसन उघड-बंद करण्यासाठीचा स्विच.

कर्षण दाब किंवा कर्षण प्रेरणा, कमाल वेग प्राप्त करण्याची ( गाठण्याची ) क्षमता, स्थिर स्थितीपासून त्वरित गती प्राप्त करता येण्याची क्षमता म्हणजे गतिशीलता आणि गतिरोधनक्षमता या चार महत्त्वाच्या बाबींवर स्कूटर व मोपेड या वाहनांची कार्यक्षमता अवलंबून असते. वाहनाच्या सांगाड्याच्या वजनावर अवलंबून असणारा त्याचा स्थायी भार आणि त्याला हवेकडून होणारा विरोध हे वाहन गतिमान होण्यातील अडथळे आहेत. जड सायकल सोसाट्याच्या वार्‍यात चालविणे अवघड असते, यावरून हे लक्षात येईल. एखादे वाहन या अडथळ्यांवर ज्या प्रमाणात मात करू शकते, तेवढे ते अधिक कार्यक्षम वा सरस ठरते. वाहनाची गती किमान, कमाल, सरासरी व सामान्य या शब्दांत व्यक्त करतात. कोणतेही वाहन कमाल गतीमध्ये सतत चालविता येत नाही. कारण रस्त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांचा खडबडीतपणा, त्यांवरील चढ-उतार व वळणे आणि एंजिनाची क्षमता वा शक्ती यांवर त्याची गती अवलंबून असते. शिवाय दुचाकी वाहनांच्या बाबतीत वाहनाचे संतुलनही विचारात घ्यावे लागते. थोडक्यात दुचाकी वाहनाची कमाल गतिक्षमता त्याच्या एंजिनाच्या शक्तीवर म्हणजे संपीडन बलावर ( पर्यायाने विस्थापनावर ), तसेच त्याच्या संतुलन क्षमतेवर अवलंबून असते. कोणत्याही वाहनाला त्याचे एंजिन चालू केल्यावर लगेचच गती प्राप्त होत नाही. वाहनाला गती देण्याआधी काही वेळ एंजिन चालू ठेवतात. या अवस्थेला वाहनाच्या एंजिनाची निष्क्रिय अवस्था म्हणतात. या निष्क्रिय अवस्थेतून वाहनाला गतिशीलता प्राप्त होण्यास लागणारा वेळ फार महत्त्वाचा मानतात. याला इंग्रजीत पीक-अप ( उद्ग्रहण ) म्हणतात. वाहनाची गती वाढविण्याच्या बाबतीतही ही बाब लागू असून तिचाही संबंध एंजिनाच्या संपीडनक्षमतेशी आहे. वाहनाला गती देण्याइतकेच त्याची गती कमी करणेही महत्त्वाचे आहे. अशा रीतीने वाहनाची थांबविता येण्याची क्षमता म्हणजे गतिरोधनक्षमता होय. वाहनाचे थांबण्याच्या विशिष्ट जागेपासून अंतर आणि गती थांबण्या-साठी लागणारा वेळ यांवर त्याची गतिरोधनक्षमता अवलंबून असते. अशा प्रकारे दुचाकी वाहनाच्या निर्मितीमध्ये वरील चार बाबींचा मेळ साधणे हे त्याच्याशी निगडित असलेल्या अभियंत्यांचे काम असते.

भारतात व इतरत्र संपन्न मध्यमवर्ग निर्माण झाल्याने स्कूटर व मोपेड यांच्या मागणीत वाढ होत गेली. कारण व्यक्तिगत वाहतुकीची ही स्वस्त, विश्वसनीय व सुखदायी वाहने लोकप्रिय झाली. शिवाय या वाहनांच्या विशेषत: स्कूटरच्या कारखानदारीत वाढ होण्यास पुढील काही कारणेही आहेत: वाहनाचे कमी वजन, त्याला लागणारी कमी जागा ( रस्त्यावर लावण्यासाठी व गोदामात ठेवण्यासाठी ), वाहन हाताळण्यातील सुलभता व सहजता म्हणजे बसायला, चालवायला व उतरायला सोपे वाहन, विशिष्ट  प्रकारचे कपडे घालण्याचे बंधन नसणे म्हणजे साडी, स्कर्ट घालणार्‍या स्त्रियांनाही चालविण्यास अडचण नाही, चालकाच्या पायांना संरक्षण, वाहनाचा सुटसुटीतपणा व सुरक्षितपणे चालविता येण्याची शक्यता, माफक किंमत आणि त्यासाठी कर्ज व सुलभ मासिक हप्त्यांची सुविधा, दुरुस्ती व इंधन यांवरील माफक खर्च, विक्रीनंतरची सेवा मिळण्यात असलेली सुलभता वगैरे. यांशिवाय स्कूटर चालविण्याचा परवाना सहजपणे व कमी खर्चात मिळू शकतो. तसेच या वाहनांच्या विम्याचा हप्ताही कमी असतो. १९७३ मध्ये खनिज तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने मोठ्या मोटारगाड्यांऐवजी स्वयंचलित दुचाकी वाहन वापरण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आणि त्यामुळे या वाहनांच्या निर्मितीला फार मोठी चालना मिळाली.


 

आ. २. तिसर्‍या पिढीची (१९४६ — ६४) स्कूटर

इतिहास : साधी सायकल पायाने चालविण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रथम सायकलीवर पेट्रोल एंजिन बसवून त्याच्या साहाय्याने सायकल चालविण्याची पद्धत सुरू झाली. जर्मनीतील गोटलीप डाइमलर यांनी तयार केलेली पहिली दोन चाकी मोटारसायकल १८८५ मध्ये वापरण्यात आली. आकारमान व अश्वशक्तीनुसार तिचे विविध प्रकार पुढे आले. तिचा यूरोपात व अमेरिकेत प्रसार झाला. तथापि, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वजनाला हलके, सुटसुटीत व स्वस्त असे व्यक्तिगत दुचाकी वाहन उपलब्ध नव्हते. असे वाहन तयार करण्याचे प्रयत्न विविध देशांत चालू होते. स्कूटर म्हणता येईल अशी मोटारसायकल तयार करण्याचे प्रयत्न १९१४ सालाच्या आधीपासून होत होते. दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात स्कूटर विकसित करण्याचे प्रयत्न यूरोपात व अमेरिकेत करण्यात आले. यांतून १९४७ मध्ये इटलीत प्रथम पिॲजिओ कंपनीची व्हेस्पा आणि काही महिन्यांनंतर इनोसेंटी कंपनीची लँब्रेटा या स्कूटर बाजारात आल्या. याच सुमारास जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रिया इ. यूरोपीय देश व अमेरिका येथे स्कूटर तयार करण्याचे प्रयत्न चालू होते. अमेरिकेत यांत्रिक सायकल तयार करण्यात आली तिचे एंजिन तिच्या साट्यावर बसविले होते. तिला मोपेड म्हणत व तिची कमाल गती ताशी ६० किमी. होती. २५० — ८०० घ. सेंमी. क्षमतेची दोन सिलिंडरांचे एंजिन असलेली मॅक्सी स्कूटर पाश्चात्त्य बाजारपेठांसाठी तयार करण्यात आली, तर ५० घ. सेंमी.पेक्षा कमी विस्थापन असलेले एंजिन बसविलेली मिनी मोपेडही बनविण्यात आली. तिचे वजन ३५ — ४० किग्रॅ. होते व तिची सुटकेसएवढी घडी करून ती मोटारगाडीतून नेता येण्यासारखी होती. अशा प्रकारे मोटारसायकल, स्कूटर व मोपेड हे स्वयंचलित दुचाकी वाहनांचे प्रचलित असलेले मुख्य प्रकार आहेत. यांशिवाय काही ठिकाणी स्वयंचलित दुचाकी वाहनांसाठी पॉवर बाइक किंवा पॉवर सायकल ही नावेही प्रचलित आहेत. 

  स्कूटर व मोपेड या वाहनांच्या जागतिक इतिहासाची पहिली (१९१५ — ३०), दुसरी (१९३६ — ६८) व तिसरी (१९४६ — ६४) या  तीन पिढ्यांत विभागणी करतात. पहिल्या पिढीत १९१५ मध्ये उत्पादन सुरू झालेली मोटोपेड ही पहिली मोटार ( स्वयंचलित ) स्कूटर मानली जाते. त्याच वर्षात नंतर तयार झालेल्या ऑटोपेडचे उत्पादन लाँग आयलंड ( न्यूयॉर्क राज्य ) येथे १९१५ — २१ दरम्यान झाले तर जर्मनीत कप कंपनीने परवाना घेऊन तिचे उत्पादन १९१९ — २२ दरम्यान केले. १९१९ मध्ये स्कूटामोटा, केनिलवर्थ व रेनॉल्ड्स रुनाबाउट आणि १९२० मध्ये ग्लुसेस्टरशर एअर-क्राफ्ट कंपनीची युनिबस दुचाकी तयार होऊ लागली. दुसर्‍या पिढीत साल्सबरी मोटार ग्लाइड कंपनीने १९३६ मध्ये स्कूटर उत्पादन कॅलिफोर्नियात सुरू केले. १९३८ मध्ये या कंपनीने अधिक शक्तिशाली स्कूटर बनविली. या कंपनीने अनेक यूरोपियन उत्पादकांना परवाना देण्याचा प्रयत्न केला. या कंपनीकडून स्कूटर उत्पादनाची प्रेरणा पॉवेल, मोटास्कूट, कुशमन, रॉक-ओला इ. कंपन्यांना मिळाली. साल्सबरीचे उत्पादन १९४८ पर्यंत सुरू होते, तर कुशमन कंपनीने १९३६ — ६५ दरम्यान स्कूटर उत्पादन केले. १९६० — ६५ दरम्यान हार्ली-डेव्हिडसन टॉपर कंपनीने १६५ घ. सेंमी. क्षमतेच्या थोड्या स्कूटरचे उत्पादन केले. 

                                                                                                                                                                                                 दुसर्‍या महायुद्धानंतर जपानमधील काही विमान कंपन्यांनी विमानां-ऐवजी स्कूटर बनविण्याचा निर्णय घेतला. नाकाजिमा विमान कंपनीची भागीदारी असलेल्या फुजी सांजिओ ( सांग्यो ) उद्योगाने फुजी रॅबिट एस-१ स्कूटरचे उत्पादन जून १९४६ मध्ये सुरू केले. नंतर या वर्षात मित्सुबिशी कंपनीने तिच्या सिल्व्हर पीजन स्कूटर्समधील सी-१०  चे उत्पादन सुरू केले. मित्सुबिशीचे उत्पादन सी-१४० स्कूटर काढल्यानंतर बंद झाले तर फुजीचे उत्पादन रॅबिट एस-२११ मालिकेपर्यंत (१९६८) चालू होते.

  तिसर्‍या पिढीत इटलीतील पिॲजिओ कंपनीची व्हेस्पा स्कूटर प्रमाणभूत स्कूटर बनली व साठ वर्षे तिची ही ख्याती टिकून राहिली. एप्रिल १९४६ मध्ये कंपनीने तिचे एकस्व ( पेटंट ) घेतले. मूळ नमुना पाहिल्यावर कंपनीचे अध्यक्ष म्हणाले होते, ‘ ही गांधील माशी ( म्हणजे वास्प ) सारखी दिसते ’. या उद्गारावरून तिचे व्हेस्पा असे नाव पडले. व्हेस्पा कंपनीच्या स्कूटर सर्वांत लोकप्रिय व सर्वाधिक नक्कल झालेल्या स्कूटर ठरल्या. व्हेस्पानंतर काही महिन्यांनी १९४७ मध्ये इटलीच्या इनोसेंटी कंपनीने लँब्रेटा स्कूटर बाजारात आणली. तिच्या कारखान्याच्या लँब्रेट या मिलान-जवळील भागावरून तिचे लँब्रेटा हे नाव ठेवले. या दोन्हींमध्ये मोठी व्यापारी स्पर्धा होती.

आ. ३. आधुनिक स्कूटर

जर्मनीतील विमान कंपन्यांनीही विमानाऐवजी इतर वस्तूंचे उत्पादन सुरू केले. हीन्केल कंपनीने सायकली व मोपेड उत्पादन सुरू केले तर मेसेर्श्मिट कंपनीने शिलाई यंत्रे व मोटारगाडीचे सुटे घटक तयार करण्याबरोबर परवान्याद्वारे व्हेस्पा स्कूटरचे उत्पादनही केले (१९५४ — ६४). हीन्केल कंपनीने स्वत:च्या स्कूटरचे उत्पादन सुरू करून हीन्केल टूरिस्ट नावाची मोठी व सापेक्षत: जड स्कूटरही तयार केली. कृषी यंत्र-सामग्री तयार करणार्‍या ग्लास कंपनीने गोगो स्कूटरचे १९५१ — ५५ दरम्यान  उत्पादन केले. जर्मनीतील काही मोटारसायकल उत्पादकांनीही स्कूटरचे उत्पादन केले. एनएसयू कंपनीने परवान्याद्वारे १९५० — ५५ दरम्यान लँब्रेटा स्कूटरचे उत्पादन केले व स्वतःची प्रायमा स्कूटरही बनविली. झुंडांग कंपनीने १९६० — ७० दरम्यान लोकप्रिय बेला स्कूटरचे उत्पादन केले. मायको कंपनीने मायकोलेटा नावाच्या स्कूटरचे उत्पादन केले (१९५० — ६०). यांशिवाय डीकेडब्ल्यू हॉबी, ड्यूरकॉप डायना व टीडब्ल्यूएन या मोटारसायकल उत्पादकांनीही स्कूटर निर्मिती केली.

  ब्रिटनमधील डग्लस कंपनीने परवान्याद्वारे व्हेस्पा स्कूटरचे उत्पादन केले (१९५१ — ६१) व नंतर पाच वर्षे सुटे भाग जोडून त्या स्कूटर तयार केल्या. बीएसए डँडी व ट्रायंफ या कंपन्यांनी बीएसए डँडी-७०, बीएसए सनबीम, ट्रायंफ टिना, ट्रायंफ टायग्रेस (१९५९ — ६४) इ. स्कूटरचे उत्पादन केले. यांव्यतिरिक्त जपानमधील होंडा, सुझुकी, कावासाकी व यामाह या कंपन्या मुख्यतः  स्कूटर तयार करतात. तसेच जर्मनीतील क्विक्ली, फ्रान्समधील मोबिलेत, ब्रिटनमधील रॅली, फिलिप्स व बीएसए या कंपन्या मोपेड तयार करतात. शिवाय चेकोस्लोव्हाकियात जावा कंपनी स्कूटर बनविते. विशेषत: जपान व सुदूर पूर्व आशियात १९८० — ९० या काळात स्कूटरचे नवीन नमुने पुढे आले व लोकप्रिय झाले उदा., होंडा रुकुस स्कूटर. १९८८ मध्ये होंडा कंपनीने २५० घ. सेंमी. विस्थापन क्षमतेची मोठी हेलिक्स स्कूटर बनविली. तिला स्पाझिओ, फ्यूजन किंवा सीएन–२५० असेही म्हणतात. काहीशी अवजड असलेली ही स्कूटर आरामशीरपणे दीर्घ अंतराचा प्रवास करण्यासाठी तयार केली आहे. जवळ-जवळ सर्व प्रमुख स्कूटर उत्पादक अशा प्रकारच्या स्कूटर बनवितात. त्यांना मॅक्सी, जीटी किंवा टूरिंग स्कूटर म्हणतात. गिलेरा जीपी-८०० ही ८४० घ. सेंमी. क्षमतेची स्कूटर सर्वांत मोठी असून ती ५.७ सेकंदांमध्ये ताशी १०० किमी. गती प्राप्त करते.

  भारतात १९५५ च्या सुमारास मुंबईत ऑटोमोटिव्ह प्रॉडक्टस ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने लँब्रेटा स्कूटरचे उत्पादन सुरू केले. काही वर्षांत कामगार कलहापायी सदर कारखाना पूर्णतः बंद पडला. नंतर पुण्यालगत आकुर्डी येथे बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने स्कूटरचे उत्पादन सुरू केले. या कंपनीने १९७२ — २००९ काळात चेतक, लीजंड, सुपर व प्रिया ( औरंगाबाद ) या स्कूटरची निर्मिती केली. यांपैकी चेतक आणि लीजंड या इटालियन व्हेस्पा स्प्रिंट या स्कूटरवर बेतलेल्या होत्या. या कंपनीच्या स्कूटरची निर्यातही होत असे. ‘ एलएमएल मोटर्स ’ ही व्हेस्पाची भारता-तील दुसरी भागीदारी कंपनी असून पिॲजिओ कंपनीबरोबरच्या संयुक्त कंपनीचे उत्पादन १९८३ मध्ये सुरू झाले. एलएमएल या कंपनीने भारतीय बाजारपेठेसाठी पी-सिरीज स्कूटर तयार केल्या. मात्र ही भागीदारी १९९९ मध्ये थांबली. परंतु एलएमएल कंपनीची पी-सिरीजसारखी स्कूटर अमेरिकन बाजारपेठेत स्टेला या नावाने व इतर बाजारपेठांत अन्य नावांनी निर्यात होते. भारतात मोपेडचे उत्पादन पुणे व अहमदनगर येथे कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीमार्फत होत असे. तमिळनाडूत टी.व्ही.एस. लिमिटेड कंपनीमार्फतही मोपेड उत्पादन होते. याशिवाय भारतात स्कूटर उत्पादन करणार्‍याही अनेक देशी-विदेशी कंपन्या आहेत.

पहा : अंतर्ज्वलन एंजिन अभियांत्रिकीय उद्योग मोटारगाडी उद्योग मोटारसायकल रिक्शा.            

भिडे, शं. गो. ठाकूर, अ. ना.


गोटलीप डाइमलरकृत मोटरसायकल (१८८५) स्कूटामोटा (१९१९) रेनॉल्ड्‌स रुनाबाउट (१९१९)
हीन्केल टुरिस्ट (१९५६) कुशमन-एअरबॉर्न (१९४८) व्हेस्पा (१९४७)
लँब्रेटा (१९५६) प्रायमा (१९५७) फुजी रॅबिट (१९६०)
बजाज-चेतक (१९८६) झुडांग-बेला (१९७०) हार्ली-डेव्हिडसन टॉपर (१९६१)
होंडा लिड १२५ (२०१३) कायनेटिक किंग (मोपेड) (२०१४) व्हेस्पा (२०१४)