धूम्रकारी पदार्थ : (फ्यूमिगन्ट्स). वायुरूपात असताना जी संयुगे कीटक, सूत्रकृमी, ॲरॅक्निड, कृंतक (कुरतडून खाणारे) प्राणी, तण व कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) इ. पीडकांचा (नुकसान करणाऱ्या सूक्ष्म जीवांचा, किड्यांचा व लहान प्राण्यांचा) नाश करतात, त्यांना ही संज्ञा देतात. ती घनरूप व द्रवरूपही असतात, मात्र पीडकांना प्राणघातक होतील इतक्या प्रमाणात बाष्परूप होण्याचा व कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा गुण त्यामध्ये असावा लागतो. सर्व धूम्रकारींचा सर्व पीडकांवर सारखाच विनाशक परिणाम होत नाही म्हणून पीडकप्रकारानुरूप त्यांची निवड करावी लागते. त्याचप्रमाणे त्यांची दूरवर शिरकाव करण्याची क्षमता, ज्वालाग्राहित्व (पेट घेण्याचा गुण), किंमत, प्राणी व वनस्पती यांची सुरक्षितता आणि बीजांकुरणावर (बीजाला मोड फुटल्याच्या क्रियेवर) होणारा परिणाम यांचा विचार त्यांचा उपयोग करताना करावा लागतो. ती एकएकटी किंवा इतर संयुगांबरोबर मिसळून वापरता येतात.

हायड्रोजन सायनाइड, मिथिल ब्रोमाइड व एथिलीन ऑक्साइड ही सर्वसामान्य धूम्रकारींची आणि ऑर्थो-व पॅरा-डायक्लोरोबेंझीन आणि नॅप्थॅलीन ही घरगुती धूम्रकारींची उदाहरणे होत.

उपयोग कोठे व कसा करतात : बंदिस्त जागा व पोहोचावयास कठीण असे कानेकोपरे व फटी यांमधील पीडकांचा बंदोबस्त करण्यासाठी धूम्रकारींचा चांगला उपयोग होतो. उदा., धान्याची व खाद्य पदार्थांची गुदामे, खाद्यनिर्मितीचे कारखाने, मालाच्या वखारी, वस्तु-संग्रहालये, जहाजावरील अन्नपदार्थ भरण्याच्या जागा, यांमधील कीटक व कृंतक यांचे नियंत्रण करणे या पदार्थांमुळे साध्य होते. तसेच पादपगृहे (जेथे नियंत्रित परिस्थितीत वनस्पतींची वाढ करण्यात येते अशा बंदिस्त इमारती) व शेतजमिनी यांतील सूत्रकृमी, तण, कीटक आणि कवके व घरातील झुरळे, कसर इ. उपद्रवी कीटकांचा नाश करण्यासाठी व विक्रीकरिता पाठविण्याची वेष्टनात घातलेली फळे इत्यादींचे कीटकांपासून रक्षण व्हावे म्हणून धूम्रकारी पदार्थ वापरले जातात.

अन्नधान्यासारख्या कृषिउत्पादनांना धुरी देण्यासाठी सामान्यतः ॲक्रिलोनायट्राइल, डायक्लोरोएथिल ईथर, एथिलीन ब्रोमाइड, एथिलीन डायक्लोराइड, हायड्रोजन सायनाइड, मिथिल ब्रोमाइड, प्रोपिलीन डायक्लोराइड आणि कार्बन टेट्राक्लोराइडमिश्रित कार्बन डायसल्फाइड हे धूम्रकारी पदार्थ वापरतात. कार्बन डायसल्फाइड ज्वालाग्राही असल्यामुळे आगीचा धोका टाळण्यासाठी त्यात कार्बन टेट्राक्लोराइड मिसळतात.

पादपगृहे आणि रोपवाटिका (रोपे करण्याचे वाफे) यांसारख्या जमिनीच्या छोट्या क्षेत्रातील सूत्रकृमी, कीटक व वनस्पतींना उपद्रवकारक कवके यांचा नाश करण्यासाठी फॉर्माल्डिहाइड, मिथिल ब्रोमाइड वा क्लोरोपिक्रिन यांची वाफ वापरतात. ती बंदिस्त करण्याकरिता प्लॅस्टिकचे, कॅनव्हासचे किंवा कागदाचे आच्छादन घालतात. शिवाय ठराविक अंतरावर बिळे पाडून व त्यांत धूम्रकारी पदार्थ भरून ती बंद करतात.

शेतजमिनीसारख्या मोठ्या क्षेत्राला जलद आणि कमी खर्चात धुरी देता यावी म्हणून ट्रॅक्टरवर चालणारी अवजारे वापरतात. जमिनीत काही सेंमी. खोल धूम्रकारी पदार्थांचे अंतःक्षेपण होईल अशी योजना त्यांत असते. यासाठी द्रवरूप धूम्रकारक पदार्थ सोयीचे असतात. नेमॅगॉन (१, २–डायब्रोमो–३–क्लोरोप्रोपेन १, २ – डायक्लोरोप्रोपेन १, ३– डायक्लोरोप्रोपीन) वा डीडी मिश्रण (डायक्लोरोप्रोपीन व डायक्लोरोप्रोपेन यांचे मिश्रण), तसेच मायलोन (टेट्राहायड्रो ३, ५–डायमिथिल 2H, १, ३, ५–थायाडाझीन–२–थायोन), सोडियम N–मिथिल डायथायोकार्बामेट वा क्लोरोपिक्रिन याकरिता वापरतात.

फळांच्या वेष्टनाकरिता वापरावयाचा कागद आणि इतर साहित्य डायफिनिलयुक्त असे.

फवारा आणि भुकटी यांच्या रूपांत वापरलेल्या कित्येक कीटकनाशकांचा परिणाम धूम्रीकरणाने घडून येतो.

पहा : कवकनाशके कीटकनाशके कृंतकनाशके तण.

जमदाडे, ज. वि.