ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन : ध्वनीचे विविध स्वरूपांत संग्रहण करून ठेवण्याचे व कालांतराने जरूरीप्रमाणे त्यापासून मूळ ध्वनीचे पुनरुत्पादन करण्याचे तंत्र. ध्वनीचे आलेखन वा मुद्रण व पुनरुत्पादन करण्याच्या तीन निरनिराळ्या पद्धती प्रचारात आहेत : (१) दंडगोलावरील अथवा तबकडीवरील यामिकीय (ढकलणे-ओढणे यांसारख्या भौतिक प्रेरणांच्या साहाय्याने केलेले) ध्वनिमुद्रण, (२) चित्रपटाच्या फिल्मवरील प्रकाशीय ध्वनिलेखन व (३) चुंबकीय फितीवरील ध्वनिलेखन. दुसऱ्या व तिसऱ्या पद्धतीत मुद्रण म्हणजे छपाईसारखी क्रिया होत नसल्यामुळे त्यांच्याकरिता ध्वनिलेखन ही जास्त समर्पक संज्ञा वापरली आहे.

इतिहास : पुनरुत्पादनक्षम ध्वनिमुद्रण प्रथम अमेरिकेत १८७७ मध्ये टॉमस आल्वा एडिसन यांनी केले. त्यांनी कथिलाचा एक पातळ पत्रा एका दंडगोलावर गुंडाळला व एका पातळ तबकडीच्या मध्यावर बसविलेल्या सुईचे टोक या पत्र्यावर अलगद टेकून ठेवले. तबकडीवर ध्वनी पडला असता तिची त्या ध्वनीनुसार आंदोलने होत. यामुळे सुईचे टोकही वरखाली होई. याच वेळी दंडगोल हळूहळू फिरविला असता त्यावरील पत्र्यावर कमीअधिक खोलीची (मळसूत्राकार) घळ उमटे (दंडगोल ज्या दांड्यावर बसविलेला होता त्या दांड्याला आटे पाडून चक्रीय गतीबरोबरच दंडगोलाला रैखिक-सरळ रेषेत होणारी-गती देण्याचीही सोय केलेली होती). ही घळ म्हणजेच मुद्रित ध्वनी होय. या घळीच्या आरंभावर सुई ठेवून दंडगोल फिरविला की, त्या सुईचे टोक घळीतून पुन्हा जाई व घळीच्या कमीअधिक खोलीनुसार सुईचे उदग्र (उभ्या) दिशेने आंदोलन होई. ही आंदोलने सुईला जोडलेल्या तबकडीला व तिच्याकडून भोवतालच्या हवेला मिळत. अशा तऱ्हेने मुद्रित ध्वनीचे पुनरुत्पादन होई.

काही वर्षांनी चिचिस्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पद्धतीत सुधारणा करून ती अधिक कार्यक्षम केली. त्यांनी ध्वनिमुद्रणाकरिता एक मऊ मेणाचा दंडगोल वापरला. या पद्धतीच्या दंडगोलाकार ध्वनिमुद्रिका भारतात आल्या तेव्हा त्यांना ‘बांगड्या’ हे नाव पडले. अशा प्रकारच्या जुन्या नामांकित गायकांच्या ध्वनिमुद्रिका अद्यापही काही शौकिनांच्या संग्रहात आहेत.

दंडगोलाकार ध्वनिमुद्रिका बहूत्पादनास गैरसोयीच्या होत्या व त्या साठविण्यास जागाही फार लागते. या मुद्रिकेवर ध्वनी ‘उंचवटे-खड्डे’ या स्वरूपात मुद्रित केलेला असतो आणि वापरामुळे त्यांची झीज फार जलद होते.

इ. स. १८८७ मध्ये एमिल बर्लिनर या संशोधकांनी प्रथम हल्ली दिसणारी तबकडीच्या आकाराची ध्वनिमुद्रिका तयार केली. एका जस्ताच्या तबकडीवर एका विशिष्ट प्रकारच्या लाखेचा (शेलॅकचा) अगदी पातळ थर देऊन तिच्यावरून सर्पिलाकार (तबकडीच्या परिघापासून सुरू होऊन मध्याकडे वेढे घालीत जाणाऱ्या) मार्गाने ध्वनिमुद्रणकारक सुईचे टोक जाई. तिच्या मार्गावरील लाख निघून जाऊन खालच्या जस्ती तबकडीवर ध्वनि-अनुरूप ‘खड्डे-उंचवटे’ तयार होत. यावरून पुढे टणक लाखेच्या ध्वनिमुद्रिका वाजविण्यासाठी तयार करीत. टणक असल्यामुळे या मुद्रिकांचा टिकाऊपणा ‘बांगड्यां’पेक्षा खूपच जास्त वाढला. बहूत्पादनालाही हा सपाट तबकडीचा आकार जास्त अनुकूल असल्याने ‘बांगडी’ पद्धत मागे पडली. हल्ली ती फक्त श्रुतिलेखक (डिक्टॅफोन) या स्वरूपात वापरली जाते. कारण काम झाले की, मऊ दंडगोलावरील मुद्रित ध्वनी खरडून सहज काढून टाकता येतो. पुनरुत्पादनासाठी आरंभी ध्वनिमुद्रिका हातानेच फिरवीत. नंतर स्प्रिंगेच्या साहाय्याने (वेगनियंत्रकाचा उपयोग करून) विवक्षित वेगाने मुद्रिका फिरवणारी साधने प्रचारात आली. या कामासाठी हल्ली विद्युत्‌ चलित्राचाच (मोटरचा) प्रामुख्याने उपयोग करतात [→ ग्रामोफोन].

इ. स. १९०० च्या सुमारास ‘खड्डे-उंचवटे’ पद्धतीऐवजी घळीच्या बाजूंवर ध्वनिमुद्रण करण्याची ‘पार्श्व-खोदन’ पद्धती प्रचारात आली व हल्ली हीच पद्धत सर्वत्र वापरण्यात येते. १९२५ पर्यंत ध्वनिमुद्रण (व पुनरुत्पादन) यामिकीय पद्धतीने होत असे. या पद्धतीत गायक एका कर्ण्याच्या मोठ्या तोंडाशी गाणे म्हणे. त्यामुळे कर्ण्याच्या लहान तोंडाशी ठेवलेल्या पातळ तबकडीची आंदोलने होत. ही आंदोलने सुईच्या टोकाने तबकडीवर आरेखित होत. ही पद्धती गैरसोयीची असून त्यामुळे मिळणारे ध्वनिमुद्रण अत्यंत दुर्बल असे. त्याचप्रमाणे मुद्रित ध्वनी तंतोतंत मूळ ध्वनीसारखा नसे. पुढे जे. पी. मॅक्सफील्ड आणि एच्. सी. हॅरिसन यांनी विद्युतीय ध्वनिमुद्रण पद्धती प्रचारात आणली व हीच हल्लीही वापरली जाते. या पद्धतीत वर उल्लेखिलेल्या पद्धतीतील दोषांचे निराकरण करणे शक्य होते. या पद्धतीत सुयोग्य विद्युतीय छानकांचा (गाळण्यांचा) उपयोग करून त्यांनी ध्वनिमुद्रिकांच्या आवाजाचा दर्जाही अधिक चांगला केला.

ए. डब्ल्यू. ब्‍लूमलीन यांनी १९३१ साली एक घळीच्या मूर्तस्वरित (स्टिरिओफोनिक) पद्धतीच्या ध्वनिमुद्रिका वाजविण्याच्या यंत्राचे एकस्व (पेटंट) घेतले परंतु या पद्धतीच्या सूक्ष्म घळीच्या ध्वनिमुद्रिका १९५८ नंतर प्रचारात आल्या.

चलचित्रपटाला आवाजाची जोड देण्यासाठी १९२६ मध्ये ध्वनिमुद्रिकांचा वापर करण्यात आला परंतु ध्वनी व चित्र यांच्यामध्ये समकालिकत्व साधणे शक्य न झाल्याने तो प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. यासाठी प्रकाशीय ध्वनिलेखनाच्या तंत्राचा विकास १९२३ च्या सुमारास ली डी फॉरेस्ट यांनी केला. पोलादाच्या तारेवर चुंबकीय पद्धतीने ध्वनिलेखन करण्याचा पहिला प्रयोग व्ही. पाउलसन यांनी १८९८ मध्ये केला. या तंत्राचा विकास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीमध्ये मॅग्‍नेटोफोन कंपनीने केला. ध्वनिलेखनासाठी आयर्न ऑक्साइडाचा लेप दिलेल्या प्लॅस्टिकच्या फितीच्या उपयोगाची एकस्वे १९२७ साली अमेरिकेत व १९२८ साली जर्मनीत घेण्यात आली.

एकध्वनीय आणि मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण : आपण नेहमी ध्वनीचे ग्रहण करण्यासाठी दोन कानांचा उपयोग करीत असतो. यामुळे आपणाला अनेक  ध्वनि-उद्‌गमांपासून निघणारा संयुक्त ध्वनी ऐकताना त्या उद्‌गमांची परस्परसापेक्ष स्थाने व अंतरे यांचाही बोध होतो. उदा., गाणे ऐकताना गाणाऱ्याच्या डाव्या बाजूला तबला, उजवीकडे पेटी व मागे तंबोरा वाजत आहे याची प्रचिती येते. अशी वास्तव प्रचिती देऊ शकणाऱ्या ध्वनिमुद्रणाला मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण म्हणतात परंतु यासाठी आवश्यक ती गुंतागुंतीची यंत्रणा अलीकडेच उपलब्ध झाली आहे. जुन्या ध्वनिमुद्रिकांपासून मिळणारा पुनरुत्पादित सर्वच्या सर्व ध्वनी एकाच बिंदूपासून निघतो असे वाटे. अशा ध्वनिमुद्रणाला एकध्वनीय (मोनोफोनिक) पद्धतीचे ध्वनिमुद्रण असे म्हणतात.

तबकडी ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन

तबकडीवरील एकध्वनीय मुद्रणाची आधुनिक पद्धत : एडिसन यांच्या मूळच्या पद्धतीत एका मोठ्या कर्ण्याच्या तोंडाशी मुद्रित करावयाचे सर्व ध्वनी निर्माण केले जात, हे फार गैरसोयीचे होई. या ध्वनीची अत्यल्प ऊर्जा मुद्रणकारक सुईची अत्यंत अल्प स्थानांतरणेच करू शके. त्यामुळे ध्वनिमुद्रण अतिशय दुर्बल होई. त्याचबरोबर मुद्रित ध्वनींच्या कंप्रतेचा (एका सेकंदात होणाऱ्या कंपनांच्या संख्येचा) पल्ला फारच लहान होई. विशेषेकरून त्यामध्ये नीच कंप्रता फार कमी प्रमाणात मुद्रित होत आणि म्हणून या मुद्रिकांचा आवाज किंजळा (किंचाळल्यासारखा अनैसर्गिक) वाटे.

आ.१. विरूपित व अविरूपित घळींचे आकार : (अ) लाँग प्ले (दीर्घ काळ वाजणाऱ्या) ध्वनिमुद्रिकेवरील विरूपित घळी (आ) अविरूपित घळी. जाड पांढऱ्या रेषा घळीच्या भित्ती आणि बारीक पांढरी रेषा घळीचा तळ दर्शवितात.

आधुनिक विद्युतीय मुद्रण पद्धतीत या दोषांचे निराकरण केलेले आहे. या पद्धतीत मुद्रण करावयाच्या ध्वनींचे वेगवेगळ्या ⇨ ध्वनिग्राहकांच्या (मायक्रोफोन्सच्या) साहाय्याने प्रथम अनुरूप प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहात (विद्युत् संकेतात) रूपांतर केले जाते. नंतर पहिल्या टप्प्याच्या इलेक्ट्रॉनीय विवर्धकांकडून या संकेताचे अनेक पटींनी विवर्धन करण्यात येते. मग ‘मिश्रक’ नावाच्या प्रयुक्तीमध्ये हे सर्व विवर्धित विद्युत् सुयोग्य प्रमाणात एकत्र केले जातात. मिश्रणानंतर विवर्धकाच्या साहाय्याने संकेताचे अधिक विवर्धन केले जाते. त्याचबरोबर संकेताचा परमप्रसर (स्थिर स्थितीपासून होणारे कमाल विस्थापन) सुयोग्य मर्यादेत आणला जातो. त्यानंतर ‘समाकारक’ या इलेक्ट्रॉनीय साधनाच्या साहाय्याने संकेत आंतरराष्ट्रीय मंडळाने निश्चित केलेल्या ध्वनिमुद्रणाच्या अभिलक्षणाला अनुरूप केला जातो. म्हणजेच ठराविक प्रमाणात नीच कंप्रतांचे क्षीणन व उच्च कंप्रतांचे विवर्धन केले जाते. नंतर तीव्रता नियंत्रकातून हा संकेत शक्तिविवर्धकाकडे जातो. तेथे त्याची शक्ती पुरेशी वाढवून तो कर्तकातील (तबकडीवर घळी पाडणाऱ्या साधनातील) वेटोळ्याला दिला जातो. त्यामुळे कर्तकातील सूचीची मूळ ध्वनीच्या अनुरूप आंदोलने होऊ लागतात. एका स्थिर वेगाने फिरणाऱ्या मंचावर ठेवलेल्या मऊ लॅकरच्या तबकडीवर ही सूची अलगद टेकून ठेवलेली असते. तिच्या आंदोलनामुळे सर्पिलाकार घळींच्या स्वरूपात हा ध्वनी त्या तबकडीवर कोरला जातो. अशा घळीला विरूपित घळ असे म्हणतात. आ.१ (अ) मध्ये अशा विरूपित व १ (आ) मध्ये अविरूपित घळीचे आकार दाखविले आहेत.

या पद्धतीत ध्वनी हा घळींच्या बाजूवर मुद्रित केला जातो म्हणून हिला पार्श्व-खोदन पद्धत असे म्हणतात. या पद्धतीमुळे वापरामध्ये ध्वनिमुद्रिकेची झीज कमी होते व तिचे उपयुक्त आयुष्य वाढते.

ध्वनिमुद्रक : आ.२ मध्ये प्रचलित पद्धतीच्या एका ध्वनिमुद्रकाची रचना दाखविली आहे. यातील (१) हा फिरता मंच इष्ट त्या परंतु अत्यंत स्थिर वेगाने समकालिक चलित्राच्या (ज्याचा परिभ्रमण वेग त्याच्या यांत्रिक प्रदानावर अवलंबून न राहता स्थिर असतो अशा चलित्राच्या) साहाय्याने फिरत ठेवता येतो व त्याच्यावर ध्वनिमुद्रण करण्याची लॅकरची तबकडी ठेवलेली असते. तिच्यावर कर्तकाच्या सूचीचे टोक टेकून ठेवलेले असते.

चुंबकीय किंवा विद्युत् गतिकीय यापैकी कोणताही कर्तक वापरता येतो. आ. ३ मध्ये यापैकी दुसऱ्या प्रकारच्या कर्तकाचा उभा छेद दाखविला आहे.

आ.२. विद्युतीय ध्वनिमुद्रक : (१) फिरता मंच, (२) सूक्ष्मदर्शक, (३) मोजपट्टी, (४) मार्गदर्शक मळसूत्र, (५) कर्तक.

तबकडीच्या भ्रमणाबरोबर कर्तकाला हळूहळू तबकडीच्या केंद्राकडे नेणारी अरीय (त्रिज्येच्या दिशेने) गती देण्यासाठी (४) या मार्गदर्शक मळसूत्राची योजना असते. या अरीय गतीत जरूर त्याप्रमाणे फेरफार करून प्रती सेंमी. ५० ते २२० घळी पाडता येतात. ध्वनिरेखन नीट होते  की नाही हे पहाण्यासाठी (२) या सूक्ष्मदर्शकाची योजना असते. सूची घळ कोरते तेव्हा त्याबरोबर तबकडीचा बारीक धाग्यासारखा भाग कापून निघतो. तो ओढून घेण्यासाठी सूचीजवळ एक छोटी नळी बसवली असून ती निर्वात पंपाला जोडलेली असते. आकृतीत दाखविल्याप्रमाणे कर्तक तबकडीच्या पृष्ठभागाला लंब दिशेने बसविलेला असून मुद्रणीय ध्वनीमुळे कर्तक सूचीची आंदोलने तबकडीच्या अरीय दिशेने होतात व त्यामुळे पार्श्व-खोदन पद्धतीचे ध्वनिमुद्रण मिळते. या वर्णिलेल्या गतीखेरीज इतर कोणतेही धक्के वगैरेंचा तबकडी किंवा कर्तकावर काहीही परिणाम होऊ नये, अशा तऱ्हेने ध्वनिमुद्रकाची एकूण उभारणी साधलेली असते.

आ.३. विद्युत् गतिकीय पद्धतीचा कर्तक : (१) तबकडी, (२) हिऱ्याची (किंवा कृत्रिम नील-सफायर-रत्‍नाची) सूची, (३) निलंबन, (४) चुंबक, (५) चालक वेटोळे, (६) संवेदक वेटोळे, (७) दंडगोल.

कर्तक : विद्युत् गतिकीय कर्तकामध्ये (आ. ३) सूची हिऱ्यासारख्या अत्यंत टणक पदार्थाची असून तिचा आडवा छेद त्रिकोनाकृती असतो व टोक V या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे असते. ही एका आडव्या पोकळ दंडगोलाच्या खालच्या बाजूवर पक्की बसविलेली असते. दंडगोलाच्या दोन टोकांवर दोन तारेची वेटोळी गुंडाळलेली असतात आणि ही वेटोळी एका शक्तिमान चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रात क्षेत्ररेषांना लंब दिशेने येतील, अशा तऱ्हेने दंडगोलाचे निलंबन केलेले असते. वर उल्लेखिलेला ध्वनिजन्य विद्युत् संकेत शक्तिविवर्धकाकडून चालक वेटोळ्यातून पाठविला जातो. त्यामुळे (विद्युत् प्रवाहाच्या दिशेनुसार) या वेटोळ्यावर डाव्या-उजव्या दिशेने जाणाऱ्या प्रेरणा निर्माण होतात आणि त्यानुसार दंडगोलाची व सूचीची (प्रेरित) आंदोलने होतात व सूची तिच्याखालील तबकडीवर तद्‌नुरूप घळ कोरते. याच वेळी संवेदक वेटोळे आंदोलन पावते व त्यात विद्युत् प्रवाह प्रवर्तित होतो व त्याची तीव्रता दंडगोलाच्या आंदोलनजन्य वेगाच्या प्रमाणात असते. हा प्रवर्तित विद्युत् प्रवाह अंशतः परत शक्तिविवर्धकाला अशा तऱ्हेने पुरवला जातो (पुनःप्रदाय) की, दंडगोलाचा आंदोलनवेग वेगवेगळ्या ध्वनिकंप्रतांना जवळजवळ सारखाच रहावा.

कर्तन झालेली घळ खडबडीत झाली, तर त्यामुळे ध्वनिमुद्रिकेत त्याचा एक (स्सऽऽ असा आवाजरूपी) ‘गोंगाट’ निर्माण होतो. तो कमी करण्यासाठी एकतर तबकडीसाठी सुयोग्य असे माध्यम वापरावे लागते. जुन्या शेलॅकच्या ध्वनिमुद्रिकांमध्ये हा आवाज फार येई. यासाठी हल्लीच्या ध्वनिमुद्रिका व्हिनिल ॲसिटेट या प्लॅस्टिकापासून बनविलेल्या असतात. त्याचप्रमाणे कर्तन करताना घळ गुळगुळीत करूनही हा गोंगाट खूपच कमी करता येतो. यासाठी सूचीचे टोक कर्तन करताना सु. ३००° से. तापमान होईल इतके गरम ठेवण्यात येते. याकरिता एक पद्धत म्हणजे सूचीभोवती तारेचे काही वेढे गुंडाळून त्या तारेतून योग्य तीव्रतेच्या विद्युत् प्रवाह सोडणे ही आहे.

ध्वनिमुद्रिकांचे अभिलक्षण : ध्वनिमुद्रिका कोरली जाताना सूचीचे डावी-उजवीकडे होणारे विस्थापन काही विशिष्ट तऱ्हेने नियंत्रित करणे आवश्यक असते. कारण मुद्रिकेपासून पुनरुत्पादित होणाऱ्या ध्वनीची ऊर्जा घळीच्या विस्थापनामुळे सूचीच्या टोकाला मिळणाऱ्या गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. म्हणून सूचीच्या टोकाला जास्त गती मिळण्याने आवाज जास्त मोठा मिळतो परंतु घळीचे विस्थापन फार होऊ दिल्यास लागोपाठच्या घळींच्या दरम्यान जास्त अंतर ठेवावे लागेल व त्यामुळे मुद्रिका वाजण्याचा एकूण वेळ कमी होईल. नीच कंप्रतांच्या ध्वनीमुळे घळीचे विस्थापन जास्त होते म्हणून ते कमी करावे लागते, तर उच्च कंप्रतांच्या बाबतीत ते इतके कमी असते की, कृत्रिम रीत्या ते वाढवून घ्यावे लागते. १९५४ सालापर्यंत वेगवेगळे ध्वनिमुद्रिका कारखानदार हे फेरफार आपआपल्या मर्जीप्रमाणे करीत त्यामुळे त्याच्यापासून ध्वनीचे चांगले पुनरुत्पादन करताना अडचणी येत. त्यांचे निराकरण करण्यासाठी C. C. I. R. (Comite’ Consultatif International des Radiocommunications) या आंतरराष्ट्रीय संस्थेने १९५४ मध्ये ध्वनिमुद्रकांच्या उत्पादनाची (व पुनरुत्पादक साधनांची) अभिलक्षणे निश्चित केली व तीच पुढे R. I. A. A. (Recording Industry Association of America) या संस्थेने स्वीकारली. हल्लीच्या सर्व ध्वनिमुद्रिका या C. C. I. R. च्या अभिलक्षणांनुसार बनविलेल्या असतात. ही अभिलक्षणे सूचीच्या टोकाचा वेग आणि ध्वनिकंप्रता यांच्या आलेखाने व्यक्त करता येतात. जास्त खोलात न जाता येथे इतकेच म्हणणे पुरेसे आहे की, पुनरुत्पादनाचे अभिलक्षण उत्पादनाच्या अभिलक्षणाच्या बरोबर उलट प्रकारचे असावे लागते. ही अभिलक्षणे निश्चित केल्यामुळे कोणत्याही उत्पादकाने निर्माण केलेली ध्वनिमुद्रिका कोणत्याही चांगल्या पुनरुत्पादकावर वाजविली, तरी फरक पडत नाही.

ध्वनिमुद्रिकांचे प्रकार : हल्ली बाजारात चार वेगवेगळ्या प्रकारच्या ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. त्यांतील तीन प्रकारांचे आकार व इतर विशेष कोष्टकात दिले आहेत. याशिवाय प्रती मिनिट १६·६६ फेरे करणाऱ्या सूक्ष्म घळीच्या ध्वनिमुद्रिका मुख्यतः भाषणे, नाटके, धर्मग्रंथ यांच्या ध्वनिमुद्रणासाठी वापरतात. परभाषांचे उच्चार शिकणे, अंधांना पुस्तके वगैरे ‘वाचून दाखविणे’ (अंधांना वापरता येईल असा खास ग्रामोफोनही तयार करण्यात आला आहे) अशा गोष्टींसाठी यांचा उपयोग होतो. यांना पुष्कळदा ‘बोलकी पुस्तके’ ही संज्ञा देतात व वाचनालयातून त्या उपलब्ध केल्या जातात. पातळ पुठ्ठ्यावर प्लॅस्टिकचा लेप देऊन त्यावर उठाव रेखन पद्धतीने ध्वनिमुद्रण करतात. प्रगत देशांतून मालाची जाहिरात करण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. अशा मुद्रिकांच्या साहाय्याने गोष्टी ‘सांगणारी’ व चित्रांचे वर्णन करणारी पुस्तके अगदी लहान मुलांसाठी तयार करण्यात आली आहेत. अशा (७ ते १० सेंमी. व्यासाच्या) मुद्रिकांचा ‘बोलकी पोस्ट कार्डे’ म्हणूनही उपयोग केला जातो. या मुद्रिकांचा टिकाऊपणा फार थोडा असतो आणि ध्वनीचा दर्जाही फारसा उच्च नसतो. स्वयंचलित यंत्रणेने ध्वनिमुद्रिका बदलण्याची सोय असलेली यंत्रे (रेकॉर्ड चेंजर) १९४० नंतर प्रचारात आली. तथापि दीर्घकाल चालणाऱ्या ध्वनिमुद्रिका वापरात आल्यापासून ही यंत्रे मागे पडली आहेत.

ध्वनिमुद्रिकांचे प्रकार, आकार व इतर विशेष 
ध्वनिमुद्रिकेचा प्रकार  वाजण्याचा काल (मिनिटे)  परिभ्रमणाचा वेग (प्रती मिनिट फेरे)  व्यास (अंदाजे) (सेंमी.)  प्रती सेंमी. घळींची संख्या  घळीच्या वरच्या टोकाची रुंदी (मिमी.)  घळीच्या दोन बाजूंमधील कोन  पुनरुत्पादक सुईच्या टोकाची त्रिज्या (मिमी.) 
सामान्य रुंद 

घळ 

३·५  ७८ (७६·९२ ते ७८·९३)  २५  ३५ ते ५४  ०·१५  ८०° ते ९३°  ०·०५ ते ०·०७५ 
५  ७८ (७६·९२ ते ७८·९३  ३० 
सूक्ष्म घळ 

LP

(लाँग प्ले)

२५ ते २८  ३३·३३ (३२·९६ ते ३३.७०)  २५ 

३० 

६० ते १२०  ०·०५  ८०°  ते ९३°  ०·०२ ते ०·०२५ 
सूक्ष्म घळ 

EP

(एक्स्टेंडेड प्ले)

४ ते ८  ४५ (४४·४४ ते ४५·४५)  १८  ६० ते १२०  ०·०५  ८०° ते ९३°  ०·०२ ते ०·०२५ 

आ. ४. ध्वनिमुद्रिकांच्या बहूत्पादनातील विविध टप्पे : (१) लॅकरची मूळ मुद्रिका, (२) मूळ मुद्रिकेवरील एक विरूपित घळ, (३) व्यस्त प्रमाण मुद्रिका, (४) प्रमाण मुद्रिकेवरील (मूळ विरूपित घळीच्या जागी येणारा) एक उठाव, (५) माता प्रत, (६) ‘माते’वरील एक विरूपित घळ, (७) ‘माते’ पासून मिळालेली छाप मुद्रिका, (८) छाप मुद्रिकेवरील एक उठाव, (९) वरची छाप मुद्रिका, (१०) व्हिनिलाइटाची तबकडी, (११) खालची छाप मुद्रिका, (१२) तयार ध्वनिमुद्रिका (१३) तिच्यावरील विरूपित घळी.

ध्वनिमुद्रिकांचे बहूत्पादन : वरीलप्रमाणे ध्वनी आरेखित केलेली ध्वनिमुद्रिका आहे तशीच वाजविता येईल. पण तिची आयुर्मर्यादा फारच अल्प असेल. चुंबकीय फीत ध्वनिमुद्रण प्रचारात येण्यापूर्वी रेडिओ केंद्रामध्ये या प्रकारे ध्वनीचे मुद्रण व पुनरुत्पादन करीत असत.

वरील मूळ मुद्रिकेवरून मोठ्या प्रमाणावर ध्वनिमुद्रिकांच्या प्रती तयार करण्यासाठी पुढील पद्धत वापरतात. आरसे करताना काचेवर चांदी चढवितात, त्याच रासायनिक पद्धतीने प्रथम मूळ मुद्रिकेच्या पृष्ठभागावर चांदीचा अत्यंत पातळ थर चढवून त्याला विद्युत्‌ संवाहक करतात. या चांदीवर मग ⇨ विद्युत्‌ विलेपन पद्धतीने तांब्याचा थर चढवितात, यामध्ये मिमी.च्या एक दशसहस्रांश भागापर्यंत अचूकता साधणे आवश्यक असते. मग हा तांब्याचा पत्रा काढून घेतला की, त्यावर मूळ मुद्रणाची व्यस्त प्रत मिळते (व्यस्त म्हणण्याचे कारण हिच्यावर मूळच्या घळीच्या जागी उठाव येतात). या प्रतीला प्रमाणमुद्रिका (मास्टर) म्हणतात. १०० – २०० पर्यंतच ध्वनिमुद्रिका प्रती तयार करावयाच्या असतील, तर त्या या प्रमाण मुद्रिकेवरून तयार करतात. पण हजारो ध्वनिमुद्रिका प्रती तयार करण्यासाठी पुन्हा विद्युत्‌ विलेपन पद्धतीने प्रमाण मुद्रिकेवरून एक सम मुद्रिका (हिला ‘माता’ मुद्रिका म्हणतात) तयार करतात व तिच्यावरून पुन्हा विद्युत्‌ विलेपन पद्धतीने काही व्यस्त मुद्रिका तयार करतात. त्यांना ‘छाप मुद्रिका’ म्हणतात. छाप मुद्रिकेच्या मागे जाड पत्रा लावून मग तिच्यावरून प्रत्यक्ष वाजविण्याच्या मुद्रिका तयार करतात. पहिल्या पहिल्या निघणाऱ्या मुद्रिका प्रत्यक्ष वाजवून पाहून त्यांचा दर्जा नीट आहे की नाही ते पाहिले जाते. अनेक मुद्रिका तयार केल्यानंतर छाप झिजतो व मग नवी छाप मुद्रिका वापरतात.

आपण वाजवितो त्या मुद्रिकेच्या दोन्ही बाजूंवर दोन वेगळी गाणी (वा इतर कार्यक्रम) मुद्रित केलेली असतात. त्या तयार करण्यासाठी ऊष्मामृदू (तापविली असता मऊ होणारी) व्हिनिलाइटाची तबकडी प्रथम गरम करतात. मग तिच्या खालून व वरून दोन वेगळ्या गाण्यांच्या गरम केलेल्या छाप मुद्रिका ठेवून जोरात दाब दिला जातो व थंड झाल्यावर तयार मुद्रिका बाहेर काढली जाते. आ. ४ मध्ये ध्वनिमुद्रिका उत्पादनातील विविध टप्पे दाखविले आहेत.

ध्वनिमुद्रिकेपासून ध्वनीचे पुनरुत्पादन : पूर्वी ध्वनीचे पुनरुत्पादन केवळ यांत्रिक पद्धतीने केले जाई. मुद्रिका फिरत्या मंचावर ठेवून तिच्यावरील घळीत ग्रामोफोनाच्या ध्वनि-पेटिकेची सुई ठेवत. त्यामुळे त्या सुईची घळीच्या विरूपणानुसार आंदोलने होत. ही आंदोलने एका तरफेच्या साहाय्याने एका पातळ पत्र्याला दिली जात. त्यामुळे तो पत्राही तशीच आंदोलने करून त्याच्या भोवतीच्या हवेत मूळ ध्वनिअनुरूप तरंग निर्माण करी [g ग्रामोफोन]. या पद्धतीने ध्वनी अत्यंत दुर्बल येई. शिवाय त्या ध्वनीत अनेक विकृतीही येत. त्यामुळे हल्ली ध्वनीचे पुनरुत्पादन सामान्यतः विद्युतीय पद्धतीनेच करतात. या पद्धतीने आवाज हवा तेवढा लहानमोठा करता येतो. त्याचबरोबर त्याच्यातील विकृतीही विद्युतीय छानक वापरून कमी करता येतात अथवा त्यांचे पूर्णपणे निराकरणही करता येते आणि तंतोतंत मुळातल्यासारखा आवाज मिळू शकतो.

ध्वनीच्या विद्युतीय पुनरुत्पादनासाठी पहिला घटक म्हणजे उद्‌ग्राहक (पिक-अप) होय. उद्‌ग्राहकाची सुई फिरत्या ध्वनिमुद्रिकेवरील घळीत ठेवल्यास घळीच्या विरूपणानुरूप सुईच्या टोकाची डावी-उजवीकडे आंदोलने होतात. उद्‌ग्राहकाचे कार्य म्हणजे या सुईच्या आंदोलनाचे तद्‌नुरूप विद्युत्‌ संकेतात रूपांतर करणे हे होय. या दुर्बल संकेताचे प्रथम विवर्धन करून हा विवर्धित संकेत समाकारकात पाठविला जातो. समाकारक म्हणजे धारित्र आणि रोधांकांचा एक जालक असतो. ध्वनिमुद्रणाच्या अभिलक्षणाला पूरक वैशिष्ट्ये असणारा हा जालक मुद्रित ध्वनीतील विविध कंप्रतांचा समतोल पुन्हा मूळच्या ध्वनीप्रमाणे करतो. नंतर शक्तिविवर्धकाच्या साहाय्याने या समतोलित संकेताच्या शक्तीचे विवर्धन करून तो संकेत ⇨ ध्वनिक्षेपकाला दिला जातो आणि त्याच्याकडून मूळच्या ध्वनीसारखेच ध्वनितरंग हवेमध्ये निर्माण होतात. इच्छेप्रमाणे हा आवाज लहानमोठा करण्यासाठी गरिमानियंत्रक आणि ऐकणाऱ्याच्या आवडीनुसार उच्च किंवा नीच कंप्रतांना प्राधान्य देण्यासाठी स्वरनियंत्रक यांचीही विवर्धकाला जोड दिलेली असते.

आ. ५. उद्‌ग्राहकांचे काही प्रकार : (अ) चल लोह अंतरकाचा : (१) सुई, (२) सुईची भुजा, (३) वेटोळे, (४) चल लोह पट्टीका, (५) रबराचे निलंबन, (६) चुंबक, (आ) चल वेटोळे पद्धतीचा : (१) सुई, (२) सुईची भुजा, (३) चल वेटोळे, (४) रबराचे निलंबन, (५) चुंबक, (इ) चल चुंबक पद्धतीचा : (१) सुई, (२) सुईची भुजा, (३) चल चुंबक, (४) रबराचे निलंबन, (५) वेटोळे, (ई) दाबविद्युतीय : (१) सुई, (२) सुईची भुजा, (३) दाबविद्युतीय स्फटिक, (४) विद्युत्‌ अग्र, (५) स्फटिकाची पक्की बसविलेली बाजू.

उद्‌ग्राहक : पुनरुत्पादकाची सुई फिरत्या ध्वनिमुद्रिकेवरील विरूपित घळीत ठेवली असता सुईची त्या विरूपणानुसार आंदोलने होतात. या आंदोलनजन्य गतिज ऊर्जेचे विद्युत्‌ ऊर्जेत परिवर्तन करण्याचे कार्य उद्‌ग्राहक करतो, हे वर सांगितलेच आहे. ⇨ चुंबकीय आकारांतर, विद्युत्‌ चुंबकीय प्रवर्तन धारित्राच्या (विद्युत्‌ भार साठवून ठेवणाऱ्या साधनाच्या) धारकतेमधील फेरबदल, दाबविद्युत्‌ परिणाम [→ दाबविद्युत्‌] अशा विविध तत्त्वांवर कार्य करणारे उद्‌ग्राहक वापरण्यात आहेत. विशेष प्रचारात असलेल्या चार प्रकारच्या उद्‌ग्राहकांच्या रचना आ. ५ मध्ये दाखविल्या आहेत.

(अ), (आ) व (इ) या उद्‌ग्राहकांतील चल भागाला सुईच्या आंदोलनामुळे गती मिळते. तिच्यामुळे वेटोळ्यात उत्पन्न होणारी विद्युत्‌ चालक प्रेरणा (मंडलात विद्युत्‌ प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा) म्हणजेच या उद्‌ग्राहकांचा प्रदान संकेत होय. (ई) या उद्‌ग्राहकात सुईच्या आंदोलनामुळे स्फटिक पट्टी (डावी-उजवीकडे) वाकविली जाते. त्यामुळे तिच्या दोन पृष्ठांमध्ये विद्युत्‌ वर्चोभेद (विद्युत्‌ पातळ्यांमधील फरक) निर्माण होतो. हा या उद्‌ग्राहकाचा प्रदान संकेत होय. स्फटिकाच्या दोन्ही पृष्ठांवर पातळ धातूची विद्युत्‌ अग्रे लावून हा संकेत विवर्धनासाठी पुढे घेता येतो. दुसऱ्या – जास्त प्रचारात असलेल्या – पद्धतीत सूचीच्या आंदोलनांमुळे स्फटिक पट्टीचे परिपीडन (पीळ पडणे) झाल्याने तिच्या दोन बाजूंमध्ये वर्चोभेद निष्पन्न होतो. यासाठी पूर्वी रॉशेल लवणाच्या स्फटिकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करीत. प्रदान संकेत पुष्कळ सामर्थ्यवान ( ०·५ ते १ व्होल्ट) मिळतो व त्याचा दर्जाही चांगला असतो, त्यामुळे या प्रकारच्या उद्‌ग्राहकांचा खूप वापर होऊ लागला. परंतु रॉशेल लवणाचे स्फटिक हवेतील बाष्प शोषून घेऊन त्यात विरघळतात. हे टाळण्यासाठी ते हवाबंद करावे लागतात. तरीही कोठून ना कोठून त्यांच्यात बाष्पाचा संचार होतोच व त्यामुळे त्यांचे उपयुक्त आयुष्य फार कमी होते. यामुळे हल्ली बेरियम टिटॅनेट या मृदीय पदार्थाच्या (सेरॅमिकच्या) विशेष संस्करण केलेल्या स्फटिकाचा उपयोग सर्वत्र केला जातो. याची संवेदनशीलता रॉशेल लवणापेक्षा बरीच कमी (सु. निम्मी) असली, तरी उपयुक्त आयुष्य खूपच जास्त असते. अती उच्च दर्जाच्या पुनरुत्पादनांसाठी चुंबकीय उद्‌ग्राहक (अ) सारखा जास्त चांगला समजतात परंतु त्याची संवेदनशीलता (स्फटिकीय उद्‌ग्राहकाच्या तुलतेने सु. १/१०० ) खूप कमी असल्याने याच्याबरोबर एक जादा विवर्धक टप्पा वापरणे आवश्यक असते.

पुनरुत्पादन सुई : या सुईचे टोक गोलाकार असून ते गुळगुळीत केलेले असते. पूर्वीच्या काळी पुनरुत्पादक सुया पोलाद किंवा तशाच कठीण पदार्थाच्या करीत. पोलादी सुयांची झीज इतकी होते की, एक किंवा दोन ध्वनिमुद्रिका वाजविल्या की, त्या बदलाव्या लागत. त्या काढण्या-घालण्यासाठी जरूर त्या रचनेमुळे उद्‌ग्राहकांचा ध्वनिमुद्रिकेवर पडणारा भार वाढे (सु. ३० ग्रॅ.) व त्यामुळे मुद्रिकेची झीजही जलद होई. या अडचणी टाळण्यासाठी हल्ली दीर्घ काळ चालणाऱ्या कृत्रिम नील (सफायर) रत्नाच्या (सु. १०० तासांपर्यंत वाजविण्याचे आयुष्य) किंवा त्याहीपेक्षा हिऱ्याच्या (वाजविण्याची कालमर्यादा सु. १,००० तास) सुया वापरल्या जातात. त्यांच्यामुळे मुद्रिकेवर पडणारा उद्‌ग्राहकाचा भार खूप कमी करता येतो (सु. ६ ते १० ग्रॅ.) आणि त्यामुळे मुद्रिकेची झीज कमी होऊन तिचे उपयुक्त आयुष्य वाढते. सूक्ष्म घळीच्या मुद्रिकांसाठी अशा सुयांचा वापर आवश्यकच आहे.

ध्वनिमुद्रिकांची काळजी : मुद्रिकेवर धूळ वा कचरा असला, तर त्यामुळे मुद्रिका व सुई या दोहोंचीही झीज जास्त झपाट्याने होते म्हणून मुद्रिकांचे पृष्ठभाग धूलिरहित ठेवणे आवश्यक असते. मुद्रिका विद्युत्‌ निरोधक द्रव्याच्या केलेल्या असल्यामुळे त्यांच्यावर स्थैतिकीय विद्युत्‌ भार निष्पन्न होऊन हा भार धूलीकणांना आकर्षित करून घेतो. हे टाळण्याकरिता बाजारात मिळणाऱ्या विद्युत्‌ भाररोधी द्रव्याचा वापर करणे व मऊ कुंचल्याने मुद्रिका साफ करणे श्रेयस्कर असते. खराब झालेली मुद्रिका वाजविण्यासाठी चांगली सुई वापरली, तर ती सुई खराब होऊ शकते. याउलट खराब सुईने चांगल्या मुद्रिकेची खराबी होते, हेही लक्षात ठेवावे.

पुनरुत्पादनातील गोंगाट : मूळ मुद्रित केलेल्या ध्वनिखेरीज पुनरुत्पादनात उत्पन्न होणाऱ्या अवांच्छित ध्वनीला (पुनरुत्पादनातील) गोंगाट म्हणतात.

पुनरुत्पादित ध्वनीतील काही गोंगाट विवर्धकात उत्पन्न होतात (यांच्या विवरणासाठी ‘इलेक्ट्रॉन विवर्धक’ आणि ‘विद्युत् गोंगाट’ या नोंदी पहाव्यात). बाकीच्या गोंगाटाचे स्थान पुनरुत्पादक व ध्वनिमुद्रिका यांत असते. पुनरुत्पादकाच्या चलित्राच्या परिभ्रमणामुळे एक प्रकारचा घरघरीसारखा नीच कंप्रतेचा आवाज उद्‌ग्राहकाकडे दिला जातो. चलित्र व उद्‌ग्राहकाचा भुज यांची उभारणी नीटपणे करून तो किमान करता येतो. विद्युतीय छानकाच्या उपयोगानेही त्याचे निराकरण करता येते. त्याचप्रमाणे चलित्र चालविण्यासाठी वापरलेल्या प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहामुळे उद्‌ग्राहकात एक ‘हम्‌ऽऽ’ असा आवाज उत्पन्न होऊ शकतो. घटकांची मांडणी योग्य प्रकारे करून व छानक वापरून त्याचेही निराकरण करता येते.

घळीच्या कडांशी सुईच्या घर्षणामुळे उत्पन्न होणारा गोंगाट विशेष महत्त्वाचा आहे. त्याच्या निराकरणासाठी प्रथम मुद्रिका बनविण्यासाठी सुयोग्य द्रव्य वापरणे जरूर असते. शेलॅकच्या ध्वनिमुद्रिकांत हा गोंगाट व्हिनिलाइटाच्या मुद्रिकांपेक्षा जास्त (सु. २० डेसिबल) असतो. पॉलिथिलिनाच्या मुद्रिकेत तो व्हिनिलाइटापेक्षाही कमी होतो परंतु या द्रव्याच्या मुद्रिका फार महाग पडत असल्याने त्याचा फारसा वापर होत नाही. ध्वनिमुद्रणासाठी जे खास अभिलक्षण वापरले जाते त्यात १,००० हर्ट्‌झपेक्षा अधिक कंप्रतांच्या ध्वनींचे मुद्रण जास्त जोरदार केलेले असते. त्याचा हेतू गोंगाटाच्या तुलनेने मुद्रित ध्वनीची तीव्रता बरीच जास्त ठेवणे हाच असतो. त्यामुळेही गोंगाट खूप कमी होतो. सामान्यतः बऱ्याच वेळा मुद्रिका वाजविल्यानंतर गोंगाटाचे प्रमाण वाढते. ते कमी करण्यासाठी कित्येक विवर्धकांत खास विद्युतीय छानक बसविलेले असतात. हे छानक पुनरुत्पादित ध्वनीतून विशिष्ट मर्यादेपेक्षा वरच्या सर्व कंप्रता काढून टाकतात. सामान्यतः गोंगाट हा उच्च कंप्रतांनी युक्त असल्याने, या छानकांमुळे गोंगाट खूपच कमी होतो. पण त्याच्याच बरोबर त्या विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उच्च कंप्रतांचे मुद्रित ध्वनीही काढून टाकले जातात. परंतु आपल्या श्रवणेंद्रियाच्या अरेखीय प्रतिसादामुळे [→ ध्वनि] पुनरुत्पादित ध्वनी कानाला चांगला वाटतो.

फार खराब झालेल्या जुन्या दुर्मिळ ध्वनिमुद्रिकेवरील ध्वनीमधील गोंगाट काढून टाकून त्यातला वांच्छित ध्वनी मिळविणे शक्य व्हावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्यांमध्ये आर्. एम्. डॉल्बी यांची पद्धत विशेष उल्लेखनीय आहे. हिचा अवलंब करून गोंगाटाचे प्रमाण सु. १/१० इतके कमी करता येते. या पद्धतीत ध्वनिमुद्रिकेवरून प्रथम चुंबकीय फितीवर ध्वनी आलेखित करतात आणि फितीवरून त्याचे पुनरुत्पादन केले जाते.

इ. स. १९७७ च्या अखेरीला ध्वनिमुद्रिकांच्या क्षेत्रात दोन अभिनव तंत्रांची भर पडली आहे. पुस्तकांमधून चित्रपत्राप्रमाणेच ध्वनिमुद्रिकांचाही अंतर्भाव करता येतो. गायनविषयक पुस्तकांतून वेगवेगळ्या गायनांचे नमुने देणे, पक्ष्यांविषयीच्या पुस्तकांतून त्यांची कूजने ऐकण्याची सोय उपलब्ध करणे, अंधांसाठी व बालकांसाठी ‘बोलकी पुस्तके’ करणे अशा अनेक ठिकाणी पुस्तकातील ध्वनिमुद्रिका उपयुक्त होतात. अशा मुद्रिका पुस्तकांपासून अलग न करताच वाजविता याव्यात यासाठी एका जपानी कंपनीने तयार केलेल्या साधनात ध्वनिमुद्रिका स्थिर राहून तिच्या घळीतून पुनरुत्पादन सुईच योग्य त्या तऱ्हेने फिरविली जाते.

पुनरुत्पादनासाठी सुईच्या ऐवजी ⇨लेसर किरणाच्या सूक्ष्म शलाकेचा उपयोग करता येऊ लागला आहे. यामुळे मुद्रिकेची झीज अजिबात होत नाही आणि तिच्यापासून चिरकाल उत्कृष्ट दर्जाचे पुनरुत्पादन मिळू शकते.

पुनरुत्पादनातील विकृती : पुनरुत्पादित ध्वनीचा तरंगाकार बरोबर मूळ ध्वनीसारखा नसणे याला ‘विकृती’ असे म्हणतात. विकृती असणे म्हणजेच (मूळ ध्वनीनुसार) तद्‌रूपता नसणे विकृतीची कारणे समजून घेतली, तर त्यांचे निराकरण कसे करावे हेही समजते. सुमारे ५० ते १५,००० हर्ट्‌झ कंप्रता पट्ट्यामध्ये विकृतींचा (जवळजवळ पूर्ण अभाव साधला, तर त्याला उत्तम तद्‌रूपता पुनरुत्पादन असे म्हणतात.

अनुदोलन विकृती: ध्वनिमुद्रण करतेवेळी जसजसे मुद्रण पुढे जाते तसतशी कर्तक सूची अरीय दिशेने मुद्रिकेच्या मध्यबिंदूकडे जाते व सूचीची आंदोलने अरीय दिशेने होत असतात. परंतु पुनरुत्पादनाच्या वेळी जसजसे पुनरुत्पादन पुढे जाते तसतसा उद्‌ग्राहकाचा दांडा त्याच्या कीलकाभोवती हळूहळू मुद्रिकेच्या मध्याच्या दिशेने फिरत जातो आणि त्यामुळे उद्‌ग्राहकाच्या सुईच्या टोकाचा मुद्रिकेच्या मध्याकडे जाण्याचा मार्ग चापाकार होतो. परिणामी उद्‌ग्राहक सुईची आंदोलनदिशा व मूळ कर्तक सूचीची आंदोलन-दिशा यांमध्ये काही तफावत पडते. यामुळे जी विकृती निर्माण होते तिला अनुदोलन विकृती असे म्हणतात. ही विकृती संपूर्णपणे नाहीशी करता येणे शक्य नाही. परंतु ती किमान करण्यासाठी पुढील उपाय केले जातात. (अ) कीलक आणि मुद्रिकामध्य यांच्यामधील अंतरापेक्षा कीलक व पुनरुत्पादक सुई यांच्यामधील अंतर काहीसे (सु. १ ते १·५ सेंमी.) जास्त ठेवणे. (आ) उद्‌ग्राहकाच्या दांड्याला काहीसा बांक देणे (आ. ६). (इ) सुई जसजशी मध्याकडे जाईल तसतसा उद्‌ग्राहक आपोआप वळवला जाऊन ही विकृती अत्यंत कमी करणारे खास उद्‌ग्राहक दांडेही तयार करण्यात आलेले आहेत.

आ. ६. एक पुनरुत्पादक यंत्रणा : (१) पुनरुत्पादकाची पेटी, (२) फिरता मंच, (३) उद्‌ग्राहक, (४) उद्‌ग्राहकाचा अंतर्वक्र दांडा, (५) उद्‌ग्राहकाच्या दांड्याचा कीलक, (६) स्विच, (७) परिभ्रमण वेग विवेचक.

अनुरेखन व चिमटा विकृती: कर्तक सूचीचा काटछेद त्रिकोनाकृती असतो. त्यामुळे तिने कोरलेल्या घळीची रुंदी सर्वत्र एकसारखी नसते. पुनरुत्पादक सुईच्या टोकाचा आकार गोल असतो. यामुळे हे गोलाकार टोक घळीतून जाते तेव्हा ते बरोबर कर्तक सूचीच्या मूळच्या मार्गावरून जाऊ शकत नाही. यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकृतीला अनुरेखन विकृती असे म्हणतात. त्याप्रमाणे जेथे घळीची रुंदी कमी होते तेथे पुनरुत्पादक सुईचे टोक काहीसे वर उचलले जाते, उलट रुंदी जास्त होते तेथे ते खाली उतरते. यामुळेही एक विकृती निर्माण होते, तिला चिमटा विकृती असे म्हणतात. त्रिज्या जसजशी कमीकमी होत जाते तसतशी अनुरेखन विकृती वाढत जाते. म्हणून ही विकृती योग्य मर्यादेत ठेवण्यासाठी  ७८ फेरे/ मि. व ४५ फेरे / मि. मुद्रिकांमध्ये सु. ९·४ सेंमी. त्रिज्येपर्यंतच व ३३ पूर्णांक १/३ फेरे / मि. मुद्रिकांमध्ये सु. ११·९ सेंमी. त्रिज्येपर्यंतच ध्वनिमुद्रण केले जाते.

आ. ७. उद्‍ग्राहक दांड्याच्या भाराचे संतुलन : (१) उद्‍ग्राहकाचा दांडा, (२) सुई, (३) कीलक, (४) दांड्याच्या भाराचे अंशत: संतुलन करणारी स्प्रिंग.

आ. ६ मध्ये वरील सर्व गोष्टींचा अंतर्भाव केलेल्या पुनरुत्पादकाचे दिग्दर्शन केले आहे. चिमटा विकृती कमी करण्यासाठी उद्‍ग्राहक सुई एका लवचिक भुजामधून उद्‍ग्राहकाला जोडलेली असते.

उद्‍ग्राहक सुईच्या टोकावर दांड्याचा सर्वच भार पडल्यास मुद्रिका आणि सुई या दोहोंचीही झीज जास्त जलद होते. शिवाय त्यामुळे एक विकृतीही निर्माण होते परंतु हा भार विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी झाला, तर सुई मधल्याच काही घळींवरून उडी मारून एकदम पलीकडे जाते. यासाठी दांड्याचा भार संतुलक वजनाने अथवा स्प्रिंगेने योग्य प्रमाणात संतुलित करावा लागतो. आ. ७. मध्ये संतुलनाची एक पद्धत दाखविली आहे.

वॉव : ध्वनिमुद्रिकेच्या परिभ्रमण वेगात ०·१% पेक्षा जास्त फेरबदल झाला, तर एक विशिष्ट विकृती उत्पन्न होते तिला ‘वॉव’ असे म्हणतात. ही टाळण्यासाठी उच्च दर्जाचे स्थिरवेगाने फिरणारे चलित्र वापरतात. त्याचबरोबर फिरता मंच चांगला वजनदार ठेवल्यास त्याच्या निरूढीमुळे (जडत्वामुळे) चलित्राच्या वेगात लहान सहान फरक झाले, तरी मुद्रिकेच्या वेगात विशेष फरक पडत नाही. मुद्रिका थोडी वाकडी झाली, तर किंवा फिरत्या मंचाचा आस वक्र झाला, तर त्यामुळेही अशीच विकृती उत्पन्न होते.

मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिका : १९३१ मध्ये ब्लूमलीन यांनी मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिका तयार करण्यासाठी दोन पर्याय सुचविले. (१) एका पद्धतीमध्ये एकाच घळीत उदग्र पद्धतीने उजव्या कानाला ऐकू येणारा ध्वनी आणि पार्श्व-खोदन पद्धतीने डाव्या कानाला ऐकू येणारा ध्वनी मुद्रित करावा असे सुचविले होते. (२) दुसऱ्या पद्धतीत घळीच्या डाव्या बाजूवर डाव्या कानाला ऐकू येणारा ध्वनी व उजव्या बाजूवर उजव्या कानाला ऐकू येणारा ध्वनी मुद्रित करावा असे सुचविले होते. ही दोन मुद्रिते परस्परांना लंब दिशेने होत असल्यामुळे ती एकमेकांवर काहीच परिणाम करू शकत नाहीत. ४५/४५ या नावाने ओळखली जाणारी ही दुसरी पद्धत आता सर्व ध्वनिमुद्रिका कारखानदारांनी स्वीकारली आहे परंतु त्या काळात ध्वनिमुद्रिकांचा दर्जा फारसा उच्च नसल्याने मूर्तस्वरित मुद्रिकांच्या कल्पनेचा पाठपुरावा झाला नाही.

इ. स. १९५२ च्या सुमारास ई. जी. कुक यांनी ३३ पूर्णांक १/३ फेरे/मि. करणारी सूक्ष्म घळीची मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिका तयार केली. हिच्या पहिल्या अर्ध्या भागावर उजव्या कानावर पडणारा ध्वनी मुद्रित केलेला असून दुसऱ्या भागावर डाव्या कानावर पडणारा ध्वनी मुद्रित केलेला होता. पुनरूत्पादनाच्या वेळी या दोन भागांवर दोन वेगळे उद्‍ग्राहक ठेवून त्यांच्याकडून हे दोन ध्वनिपरिवाह कार्यान्वित केले जात. यासाठी फार गुंतागुंतीची रचना असलेला उद्‍ग्राहक दांडा वापरावा लागेव मुद्रिका वाजण्याचा काळही निम्मा होई (सु. १२ मिनिटे). वेगवेगळ्या ध्वनिमुद्रिकांच्या कारखान्यांतून मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिकांबद्दल संशोधन १९५३ सालापासून सुरू होते. १९५७ च्या सुमारास या सर्व कारखानदारांनी या मुद्रिका ४५/४५ पद्धतीच्या असाव्यात असे एकमताने ठरविले व १९५८ पासून त्या बाजारात विक्रीला आल्या आणि त्यामुळे लवकरच एकध्वनीय पद्धतीच्या मुद्रिका मागे पडतील असे दिसते.

अपेक्षा : या मुद्रिकांकडून पुढील अपेक्षा होत्या. (१) एखादा कार्यक्रम ऐकणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या व उजव्या कानाला त्या कार्यक्रमाचे ध्वनी जसे किंचित वेगळ्या स्वरूपात ऐकू येतात तसेच ते एकाच घळीत अलग अलग मुद्रित झालेले असावेत. (२) एकाच उद्‍ग्राहकाकडून त्याचे पुनरूत्पादन अलग अलगपणे करणे शक्य व्हावे. (३) घळीवर कोरलेल्या या दोन ध्वनींनी परस्परांवर कोणताही परिणाम करू नये. (४) शक्यतर ही मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिका साध्या एकध्वनीय पुनरुत्पादकावर समाधानकारकपणे वाजविता यावी. या सर्व अपेक्षा ४५/४५ पद्धतीच्या ध्वनिमुद्रिका पुऱ्या करतात.

आ. ८. ४५/४५ ध्वनिमुद्रिकेवरील सुईची आंदोलने : (१) मुद्रिकेच्या मध्याकडे, (२) मुद्रिकेवरील घळीची डावी बाजू, (३) घळीची उजवी बाजू, (४) उदग्र दिशा, (५) डावीकडून येणाऱ्या ध्वनीशी संलग्न कर्तक सूचीच्या आंदोलनाची दिशा, (६) उजवीकडून येणाऱ्या ध्वनीशी संलग्न सूचीच्या आंदोलनांची दिशा, (७, ८, ९) विरूपण न केलेली घळ.

४५/४५ ध्वनिमुद्रिका : विशिष्ट क्षणी ध्वनिमुद्रिकेवर जेथे पुनरुत्पादक सुई टेकते त्या बिंदूपासून मुद्रिकेच्या पृष्ठभागावर एक उदग्र रेषा काढली अशी कल्पना करा (आ. ८). डाव्या कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीचे मुद्रण घळीच्या (२) या डाव्या बाजूवर असते व तत्संबंधित सुईची आंदोलने (५) या दिशेने होत असतात. त्याचप्रमाणे उजव्या कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीचे मुद्रण (३) या उजव्या बाजूवर असून तत्संबंधित आंदोलने (४) या दिशेने होतात. (५) व (६) या आंदोलन दिशा उदग्राशी प्रत्येकी ४५ अंशांचा कोन करतात म्हणून या पद्धतीला ४५/४५ पद्धत हे नाव देण्यात आले आहे.

आ. ९. ४५/४५ पद्धतीच्या मुद्रिकेवरील घळीचे विरूपण : (अ) विरूपणापूर्वीच्या घळीचा आकार, (आ) फक्त उजव्या बाजूचे विरूपण, (इ) फक्त डाव्या बाजूचे विरूपण, (ई) कलाभेद शून्य ठेवून केलेले संयुक्त विरूपण. आंदोलन दिशा बाणांनी दाखविल्या आहेत.

या दोन दिशा एकमेकींशी ९० अंशांचा कोन करीत असल्याने या दोन आंदोलन सदिशांचा (दिशायुक्त राशींचा) परस्परांवर काहीही परिणाम होत नाही. प्रत्यक्षात मुद्रणाच्या वेळी कर्तक सूचीच्या टोकाची हालचाल या दोन सदिशांच्या निष्पन्न दिशेने होते. त्याचप्रमाणे पुनरुत्पादक सुईच्या टोकाची हालचालही या निष्पन्न सदिशाच्याच दिशेने होत असते परंतु उद्‍ग्राहकाची रचना अशी असते की, जणू काही तो या निष्पन्न सदिशाचे या ४५/४५ दिशांनी मिळणाऱ्या घटकांमध्ये वियोजन करतो [ → सदिश]. ध्वनिमुद्रण करताना अशी व्यवस्था केलेली असते की, या दोन आंदोलनांच्यामधील कलाभेद शून्य येईल. याचा परिणाम असा होतो की, ही ध्वनिमुद्रिका एकध्वनिपुनरुत्पादकाच्या साहाय्याने वाजविली, तर मिळणारा ध्वनी हा त्या दोन मूर्तस्वरित ध्वनींच्या बेरजेइतका असेल. म्हणजेच ही मुद्रिका एकध्वनी यंत्रावरही वाजवता येईल (आ. ९).

आ. १०. मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण प्रणाली : (अ) उजव्या बाजूचा परिवाह (अ) डाव्या बाजूचा परिवाह : (१) ध्वनिग्राहक, (२) विवर्धक, (३) तीव्रता नियंत्रक, (४) समाकारक, (५) शक्तिविवर्धक, (६) कर्तकाला गती देणारे वेटोळे, (७) पुन:प्रदाय वेटोळे, (८) कर्तक, (९) तबकडी, (१०) फिरता मंच, (११) चलित्र.

मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण : तबकडीवर मूर्तस्वरित ध्वनिमुद्रण करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आ. १० मध्ये दाखविली आहे. एकध्वनिमुद्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन स्वतंत्र प्रणाली – एक डाव्या बाजूसाठी व एक उजव्या बाजूसाठी – एकत्रित करून ही प्रणाली बनविली आहे. याची सर्वसामान्य कार्यपद्धती एकध्वनिमुद्रकाप्रमाणेच असली, तरी कर्तकाची रचना बरीच वेगळी असते (आ. ११). कर्तक सूची एकध्वनिमुद्रणात वापरतात तशीच असते. डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने येणाऱ्या ध्वनींमुळे सूचीची आंदोलने एकमेकांना लंब असतात.

आ. ११. मूर्तस्वरित ध्वनिमुद्रणासाठी वापरला जाणारा कर्तक : (१) चुंबक, (२) गतिदायक वेटोळे, (३) पुनःप्रदाय वेटोळे, (४) कर्तक सूची, (५) ध्वनिमुद्रिका. दोन बाजूंच्या ध्वनीमुळे होणाऱ्या आंदोलनांच्या दिशा बाणांनी दाखविल्या आहेत.

ही दोन्ही प्रकारची आंदोलने एकाच वेळी सूचीवर अध्यारोपित (एकावर दुसरे पडण्याची क्रिया) केल्यामुळे तिच्या टोकाची निष्पन्न गती बरीच जटिल (गुंतागुंतीची) होते व त्यामुळे घळीच्या दोन बाजूंवर (पूर्वी सांगितल्याप्रमाणे) दोन्ही ध्वनी आरेखित होतात [→उत्तम तद्‍रूपता ध्वनिप्रणाली].

आ. १२. मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिकेवरून ध्वनीची पुनर्निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मृदीय उद्‍ग्राहकाची रचना : (१) पुनरुत्पादक सुई, (२) सुईची भुजा, (३) जोत, (४) डाव्या बाजूच्या ध्वनीसाठी आणि (५) उजव्या बाजूच्या ध्वनीसाठी मृदीयाच्या पट्ट्या, (६) या पट्ट्या बसविण्यासाठी ठोकळा, (७) उजव्या पट्टीचे प्रदान संकेत घेण्यासाठी वाहक तारा, (८) मृदीय पट्टीवरील चांदीचा मुलामा (प्रत्येक पट्टीच्या दोन्ही बाजूंवर असा मुलामा केलेला असतो).

मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिकेवरून ध्वनीची पुननिर्मिती : यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिग्दर्शन आ. १३ मध्ये केले असून आ. १२ मध्ये त्यासाठी जरूर त्या (बेरियम टिटॅनेट या मृदीय पदार्थाच्या) उद्‍ग्राहकाची रचना दाखविली आहे. यासाठी चल वेटोळे किंवा चल चुंबक वगैरे इतर तत्त्वांवर आधारलेले उद्‍ग्राहकही वापरले जातात. या उद्‍ग्राहकाच्या सुईला उदग्र व पार्श्व अशा दोन्ही दिशांनी आंदोलनासाठी सारखीच मुक्तता असावी लागते. सुईच्या जटिल आंदोलनांचे जोतामुळे (३) दोन परस्परांना लंब घटकांत वियोजन होते व त्या घटकांमुळे (४) व (५) या मृदीय पट्ट्यांची विरूपणे होतात परंतु त्यांचा परस्परांवर काही परिणाम होत नाही.

आ. १३. मूर्तस्वरित ध्वनिमुद्रिकेवरील ध्वनीच्या पुनरुत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीचे स्वरूप : (अ) उजव्या बाजूचा परिवाह (आ) डाव्या बाजूचा परिवाह : (१) फिरता मंच, (२) ध्वनिमुद्रिका, (३) उद्‍ग्राहक, (४) विद्युत् दाब विवर्धक, (५) समाकारक, (६) संयुक्त गरिमा नियंत्रक, (७) शक्तिविवर्धक, (८) ध्वनिक्षेपक.

या विरूपणांमुळे पट्ट्यांच्या ज्या त्या पृष्ठभागावर उत्पन्न होणारे विद्युत् दाब त्यावरील चांदीच्या मुलाम्यामुळे एकत्रित केले जातात आणि वाहक तारांमधून ते विवर्धकाकडे जातात. या प्रणालीत डाव्या व उजव्या बाजूंच्या ध्वनीसाठी अलग अलग असे दोन संपूर्ण परिवाह ठेवलेले असतात. उद्‍ग्राहकाच्या दोन विभागांचे प्रदान संकेत या दोन परिवाहांकडून आवश्यक तेवढे विवर्धित केले जाऊन दोन बाजूंच्या ध्वनिक्षेपकांकरवी त्यांचे ध्वनीत रूपांतर केले जाते. दोन बाजूंच्या ध्वनींच्या गरिमांमध्ये समतोल साधण्यासाठी यात संयुक्त गरिमा नियंत्रक वापरतात. एकच गुंडी फिरविली की, दोन्ही बाजूंच्या ध्वनींमध्ये सारख्याच प्रमाणात वाढ अथवा घट होते, हे याचे वैशिष्ट्य होय.

या पुनरुत्पादकाच्या सुईच्या टोकाची त्रिज्या सु. ०·०१३ ते ०·०१८ मिमी. इतकी म्हणजे एकध्वनीय पुनरुत्पादकाच्या सुईपेक्षा काहीशी कमी असते, तरी त्याच्या साहाय्याने एकध्वनीय पद्धतीच्या मुद्रिकाही वाजवता येतात. अशा वेळी दोन्ही बाजूंचे प्रदान संकेत अनेकसरी पद्धतीने जोडले जातात व दोन्ही बाजूंच्या ध्वनिक्षेपकांतून एकच आवाज उमटतो.

पुढील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा.