गाडी : रस्त्यावरून फिरत जाणाऱ्या चाकांच्या मदतीने अवजड माल किंवा माणसे सरकवीत नेण्याचे साधन. ज्या गाडीला मागच्या बाजूने रेटून पुढे सरकवितात तिला ढकलगाडी म्हणतात व ज्या गाडीला पुढच्या बाजूने ओढून नेतात तिला ओढगाडी म्हणतात. बहुतेक ढकलगाड्या माणसांच्या अंग मेहेनतीनेच चालवितात आणि बहुतेक ओढगाड्या चालविण्यासाठी बैल, रेडा, खेचर, घोडा किंवा उंट अशा माणसाळविलेल्या पशूंचा उपयोग करतात. प्रस्तुत लेखात स्वयंचलित गाड्यांचा (उदा., मोटारगाडी, ट्रॅक्टर, स्कूटर इ.) समावेश केलेला नाही. त्यांविषयी मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत.

इतिहास : गाडीचे प्राचीन स्वरूप हे जमिनीवरील घरंगळत जाणाऱ्या वाहनासारखे होते. झाडाच्या बुंध्यापासून तयार केलेल्या दंडगोलाकार भागातून एक आडवे लाकूड घालून ते जमिनीवरून घरंगळू शकेल असे गाडीचे आद्य स्वरूप होते. पुढे अशा भागापासूनच चाकाचा शोध लागला [→ चाक]. ही  चाके काठ, आरे व तुंबा अशा तीन भागांची असत. त्यावरून पुढे दोन चाकी गाड्यांचा शोध लागला. ईजिप्शियन लोकांनी अशा गाड्यांचा वापर युद्धकाळात रथ म्हणून केला. इट्रुस्कन, मायसीनीयन, क्रीट, ग्रीक, रोमन, बॅबिलोनियन, असिरियन इ. प्राचीन संस्कृतींत रथ व गाड्या यांचा वापर होता. ग्रीक व रोमन लोकांनी गाडीचा रथ म्हणूनच उपयोग केला. इंग्‍लंडमधील त्यावेळच्या चांगल्या रस्त्यांवर धावणाऱ्या चार चाकी गाडीचा उदय रोमन काळातच झाला. ग्रीक लोक शेतीसाठी जी गाडी वापरत ती आद्य स्वरूपाची होती. रोमनांनी केलेले रस्ते खराब झाल्यावरही काही जुन्या गाड्यांचे प्रकार यूरोपात वापरात होते. सोळाव्या शतकात कोच हा प्रकार वापरात आला. सतराव्या शतकातील काही शोधांमुळे गाड्या हलक्या, वापरास सुकर तसेच आरामशीर झाल्या. एकोणिसाव्या शतकात दीर्घवर्तुळाकृती स्प्रिंगच्या शोधामुळे व चांगल्या रस्त्यांमुळे गाड्या मोठ्या प्रमाणावर वापरात आल्या. बऱ्याच देशांत गाड्यांच्या शर्यती अद्यापही प्रचलित आहेत.

सिंधू संस्कृतीच्या काळात (इ. स. पू. सु. २७५० ते २२५०) हडप्पा, मोहें-जो-दडो वगैरे ठिकाणी बैलगाडीचा सर्रास उपयोग केलेला आढळतो. तेथील उत्खननात बैलगाडीचे व रथाचे अवशेष सापडले आहेत. आजही सिंध-बलुचिस्तानमध्ये वरील पद्धतीच्याच गाड्या वापरात आहेत. सिंधू संस्कृतीच्या पूर्वीसुद्धा कोटदिजी, कुल्ली वगैरे नगरांमधून बैलगाडीचा वापर होत असावा, असे तज्ञांचे मत आहे. कारण बैल व शेतीची अवजारे यांच्या अनेक मृण्मय मुद्रा तेथे उपलब्ध झाल्या आहेत. ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलातील सत्तेचाळीसावे संपूर्ण सूक्त रथप्रशस्तीचे आहे. त्याकाळी रथाला दोन, तीन किंवा मोठ्या रथाला चार चाके असत. रथाला बहुधा दोन घोडे जोडीत. गाढवे व खेचरे जोडल्याचेही उल्लेख आहेत. रामायणात व महाभारतात रथाचे उल्लेख आहेत. आठव्या शतकाच्या अखेरीपर्यंत रथांचा उपयोग हळूहळू कमी होत गेला [→ रथ]. यूरोपीय लोकांनी भारतात वसाहती स्थापन केल्यानंतर यूरोपातील गाड्यांचे विविध प्रकार (उदा., बग्गी, टांगा, व्हिक्टोरिया इ.) भारतात रूढ झाले.

रचना : प्रत्येक गाडीमध्ये सामान ठेवण्यासाठी किंवा माणसांना बसण्यासाठी जी बंदिस्त जागा असते तिला साटा म्हणतात. हा साटा चांगल्या जातीच्या लाकडी फळ्या व काही पोलादी पट्‍ट्या वापरून बनविलेला असतो. साट्याच्या बैठकीवर सपाट जागा असते व चाकाकडील दोन्ही बाजूंवर कठडे उभे केलेले असतात. साट्याचे वजन अंगावर घेऊन ते दोन चाकांमध्ये वाटून देण्यासाठी साट्याच्या खाली लांब दांड्यासारखा एक मजबूत पोलादी आस असतो. आसाने दिलेले वजन नीट सांभाळून ते जमिनीवर सोडण्यासाठी व स्वतः रस्त्यावरून फिरत जाऊन गाडीला सरकविण्यासाठी आसाच्या दोन्ही टोकांवर चाके जोडलेली  असतात. चाकांना कार्यान्वित करण्यासाठी गाडीला एक किंवा दोन दांडे जोडतात.

चांगल्या जातीच्या बहुतेक सर्व गाड्यांमध्ये चाकांना बसणारे धक्के मधल्यामधेच शोषले जाऊन साट्यापर्यंत पोहोचू नयेत म्हणून प्रत्येक चाकाजवळ एक स्प्रिंग जोडण्यात येते. साट्यामध्ये ठेवलेल्या सामानाला किंवा तेथे बसलेल्या माणसांना उन्हाचा किंवा पावसाचा उपद्रव होऊ नये म्हणून काही गाड्यांवर छत बसवितात. शहरातून वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना रात्रीच्या वेळी दोन्ही बाजूंवर दिवे लावावे लागतात व वाहतूक करण्यासाठी सुरक्षित असल्याबद्दल स्थानिक अधिकाऱ्याकडून वार्षिक परवाना घ्यावा लागतो.

गाडीच्या चाकांचे अनेक प्रकार आहेत. काही लहान चाके ओतीव  लोखंडाची असतात. त्यांना निराळी धाव बसवत नाहीत. बहुतेक मोठी चाके उत्तम प्रकारच्या लाकडापासून बनवितात व त्यांच्या परीघावर भरीव पोलादाची धाव बसवितात किंवा खाच असलेली पोलादी धाव बसवून तिच्या खाचेमध्ये भरीव रबराची धाव बसवितात. काही चाके मोटारगाडीच्या चाकाप्रमाणेच पोलादी भागापासून बनवितात व त्यांच्या परिघावर हवा भरलेली रबरी नळी व त्यावरून रबराची पोकळ धाव बसवितात. रबरी धावांमुळे गाडी चालताना फारसा आवाज होत नाही व गाडीतील साट्यावर फारसे हादरेही बसत नाहीत.

गाडीचा आस उत्तम जातीच्या पोलादापासून बनविलेला असतो. त्याच्या दोन्ही टोकांवरचा काही भाग चांगला कातून गुळगुळीत केलेला असतो, त्या भागांवर चाके बसवितात. आसाच्या दोन्ही टोकांचा काही भाग चाकाच्या तुंब्यामधून बाहेर नेलेला असतो. त्या भागात एक भोक पाडून तेथे पोलादी चावी घालतात किंवा टोकावर आटे पाडून नट बसवितात. असे केल्याने चाक आसामध्ये अडकून राहते व निसटून बाहेर जात नाही. आसाला लागून फिरणाऱ्या चाकाच्या तुंब्यातील भागाला धारवा (बेअरिंग) म्हणतात. हा भाग लवकर झिजू नये व तेथे घर्षणामुळे चाक फिरण्यास अडथळा होऊ नये म्हणून तुंब्याच्या भोकामध्ये ओतीव लोखंडाची किंवा काशाची नळी बसवितात तिला नळीचा धारवा म्हणतात. धारवा व आस यांच्यामध्ये अगदी बारीक फट असते. त्या फटीमध्ये वंगण भरले तर चाक उत्तम प्रकारे फिरते व पुष्कळ दिवस टिकते. चाकाचा व्यास जितका वाढवावा तितका गाडी ओढण्यास लागणारा प्रयास कमी होत जातो. घोडागाडीचे धारवे साध्या नळीचे न करता गोलक किंवा लाटणी जातीचे करतात  [→ धारवा]. हे धारवे नळीच्या धारव्यापेक्षा पुष्कळच जास्त कार्यक्षम असतात, त्यामुळे चाकांचे आयुष्य वाढते आणि गाडी ओढण्याचे श्रमही कमी होतात.

आस आणि साटा यांच्यामध्ये स्प्रिंग बसवितात. स्प्रिंगांचे अनेक प्रकार आहेत. साध्या गाडीमध्ये साधारणतः दुहेरी कमानीची पोलादी पट्ट्यांची स्प्रिंग बसवितात.

माणसे नेण्याच्या गाडीवर छत्रीसारखे काम करणारे छत बसवितात. छतांचे अनेक प्रकार आहेत. पण बहुतेक सर्व छतांवर उत्तम जातीचे जलरोधी मेणकापड घालतात. हे कापड हलक्या पण मजबूत लाकडाच्या चौकटीवर बसवितात.

प्रकार : ढकलगाड्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांची वर्गवारी एक चाकी, दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी अशी करता येते. एकचाकी ढकलगाडीचा एक प्रकार आ. १ मध्ये दाखविला आहे. या गाडीच्या चाकावर घट्ट रबराची धाव असते. ही गाडी पाण्याने भरलेली घागर किंवा कचरा भरलेली बादली नेण्यासाठी सोईस्कर असते.

गाड्यांचे प्रकार : (१) एक चाकाची ढकलगाडी, (२) दोन चाकांची ढकलगाडी, (३) तीन चाकांची पिंजरा पद्धतीची ढकलगाडी, (४) तिर्यक्‌ चाक : (अ) तिर्यक्‌ आस, (आ) चाक, (इ) साटा, (५) रबरी धावांची चार चाकांची हातगाडी, (६) लहान मुलांना फिरविण्याची ढकलगाडी, (७) भरीव लाकडी चाकांचा गाडा, (८) प्राचीन काळातील एक प्रकारची शिकारी गाडी, (९) बैलगाडी, (१०) उंटानी ओढावयाची रबरी टायरची गाडी, (११) दोन चाकी रिक्षा, (१२) वॅगन. 


गाड्यांचे प्रकार (पुढे चालू) : (१३) सारवट गाडी, (१४) उत्तर प्रदेशातील रथ, (१५) बडोदे पद्धतीचा टांगा, (१६) एक किंवा दोन घोड्यांनी ओढावयाचा इंग्रजी पद्धतीचा टांगा, (१७) व्हिक्टोरिया, (१८) लँडॉ, (१९) सिगराम, (२०) जुन्या राजवटीतील बग्गी, (२१) चार चाकी रथ, (२२) बर्फावरील गाडी (स्लेज).

  

आ. २. मध्ये दोन चाकांची ढकलगाडी दाखविली आहे.  रूळगाडीच्या (रेल्वेच्या ) स्थानकातील फलाटावर प्रवासी लोकांचे सामान नेण्यासाठी अशी गाडी सोईस्कर असते. या गाडीच्या चाकावर घट्ट रबराच्या धावा बसवितात. आ. ३. मध्ये लाकडे किंवा इतर कोणताही माल नेण्यासाठी वापरण्याची तीन चाकांची गाडी दाखविली आहे. या गाडीचे पुढचे चाक थोडे लहान असते, त्यामुळे गाडी वळविण्याचे काम सोपे होते. चाकांच्या धावा भरीव पोलादी पट्टीच्या असतात त्यामुळे चाके पुष्कळ दिवस टिकतात व मोठा बोजा नेऊ शकतात. कारखान्यातील गोदामात आणि स्थानकावर वापरीत असलेल्या तीन चाकी आणि चार चाकी गाड्या लहान जागेत सहज वळविता याव्यात म्हणून त्यांची पुढची चाके तिर्यक्‌ आसाला जोडलेली असतात. तिर्यक्‌ आसाचा एक प्रकार आ. ४ मध्ये दाखविला आहे. अशा तिर्यक्‌ आसाला जोडलेल्या चाकांचा उपयोग दवाखाने आणि उपाहारगृहे यांतील चाके बसविलेल्या काही टेबलांसाठीही केला जातो. आ. ५ मध्ये चार चाकांची हलक्या जातीची गाडी दाखविली आहे. या गाडीची चाके साध्या सायकलीकरिता लावण्याच्या जातीची असतात. ही गाडी हलके जिन्नस ठेवून बाजारातून फिरविण्यासाठी सोईस्कर असते.आ. ६ मध्ये लहान मुलांना फिरावयास नेण्यासाठी वापरात असलेली बाबागाडी दाखविली आहे. या गाडीला छत लावता येते व त्या छताची घडीही करता येते. साट्याच्या भागात एका बाजूला किंवा दोन्हीकडे बाके असतात व त्यावर जाड गादी असते. या गाडीला हादरे बसू नयेत म्हणून उत्तम जातीच्या स्प्रिंगा बसवितात. गाडीची चाके लहान असतात व त्यांच्या धावा भरीव रबराच्या असतात. 

आ. ७ मध्ये अगदी साध्या प्रकारची भीव लाकडी चाकांची ओढगाडी दाखविली  आहे. ती ओढण्यासाठी एक रेडा  जुंपला तरी काम भागते. काही ठिकाणी अशी गाडी खाणीतून काढलेले दगड नेण्यासाठी वापरतात. 

आ. ८ मध्ये पौराणिक काळातील शिकारीसाठी वापरण्याची गाडी दाखविली आहे. या गाडीत एकच माणूस उभा राहून गाडी चालवित असे. या गाडीला एक किंवा दोन घोडे जोडीत असत. ही गाडी मोठ्या वेगाने जाण्यासाठी मुद्दाम बळकट केलेली असे. 

आ. ९ मध्ये दोन बैलांनी ओढण्याची सामान्य गाडी दाखविली आहे तिला खटारा असे म्हणतात. एक बैलाच्या गाडीला छकडा म्हणतात. मात्र तिचे आकारमान खटाऱ्यापेक्षा लहान असते. या गाडीची चाके बरीच मोठी असतात व त्यांच्यावर भरीव पोलादाच्या पट्टीची धाव बसवितात. अशी गाडी सर्व प्रकारचा माल नेण्यासाठी किंवा माणसांना बसण्यासाठीही वापरता येते. स्प्रिंगा बसविलेली गाडी वाकड्या तिकड्या कच्च्या रस्त्यातून नेली, तर स्प्रिंगा तुटण्याची भीती असते म्हणून या जातीच्या गाडीत स्प्रिंगा बसवीत नाहीत. अशा गाडीवर पावसाळ्याच्या दिवसात कळकाच्या तट्ट्याचे छत बसवितात व त्यावरून कॅनव्हासाचे कापड घालतात. 

आ. १० मध्ये चार चाकांची, मोठ्या आकाराची, उंटांनी ओढण्याची गाडी दाखविली आहे. या प्रकारातील काही गाड्यांना मोटार गाडीला लावण्याची संपीडित (दाबाखालील) हवा भरण्याच्या धावांची आणि लाटणी धारवे असलेली चाके लावतात. त्यामुळे पुष्कळ माल भरलेली गाडी दोन उंटांना सहज ओढता येते. जेथे उंट मिळत नाहीत तेथे बैल जोडण्याची  सोयही सहज करता येते. अशा गाड्या मोठ्या शहरातील उत्तम प्रतीच्या रस्त्यावरच वापरता येतात.

आ. ११ मध्ये एक किंवा दोन माणसे बसवून सत्यावरून ओढून नेण्याची रिक्षागाडी दाखविली आहे. ही गाडी ओढण्यासाठी एक किंवा दोन माणसे लागतात. अशा गाडीची चाके मोठी असतात व त्यांच्या धावा भरीव रबराच्या असतात. चाकांचे धारवे लाटणी जातीचे असतात व स्प्रिंगा दुहेरी कमानीच्या असतात. प्रवासी बसण्याच्या जागेवर चांगल्या गाद्या असतात. अशा गाड्या उत्तम रस्ते असलेल्या काही मोठ्या शहरांतच पहावयास मिळतात.


आ. १२ मध्ये दाखविलेली चार चाकांची गाडी पूर्वी इंग्‍लंड व काही यूरोपीय देशांत वापरीत असत. अशा गाडीत १०–१५ माणसे बसवीत असत व गाडी ओढण्यासाठी दोन किंवा चार घोडे लावीत असत. ज्या देशात बर्फ पडतो तेथे छत विशेष बंदिस्त प्रकारचे व बळकट करावे लागते. या गाडीची चाके चांगली मोठी असत आणि त्यांवर भरीव पोलादी धावा बसवीत असत. त्यावेळी अशा गाड्यांना  स्प्रिंगा बसविण्याची पद्धत नव्हती. साट्याच्या आत प्रथम बरेच गवत घालून त्यावरून कापूस भरलेली जाड गादी अंथरत असत.

आ. १३ मध्ये दोन बैलांनी ओढण्याची टांग्याच्या जातीची गाडी दाखविली आहे. तिला सारवट म्हणतात. या गाडीला चांगल्या स्प्रिंगा बसवितात व मोठी चाके लावतात. चाकाची धाव भरीव रबराची असते व धारवे लाटणी पद्धतीचे असतात. गाडीच्या साट्यामध्ये दोन्ही बाजूला दोन बाके व मागच्या बाजूला एक बाक असते. त्यावर पाच माणसे आत पाय सोडून चांगल्या रीतीने बसू शकतात. गाडीचा चालक पुढच्या बाकावर बसतो. या गाडीचे छत फार उत्तम प्रकारे बनविलेले असते व कितीही जोरदार पाऊस आला, तरी पावसाचे पाणी आत जाऊ शकत नाही.

आ. १४ मध्ये एक प्रवासी आणि एक गाडी हाकणारा अशी दोन माणसे बसण्याची एका घोड्याने ओढण्याची गाडी दाखविली आहे. भाड्याने चालविण्याच्या गाड्या साध्या रचनेच्या असतात, त्यांना एक्का म्हणतात. खाजगी गाड्यांना स्वारी किंवा रथ म्हणतात. साध्या गाड्यांच्या  चाकावर पोलादी धावा बसवितात. रथाच्या चाकावर भरीव रबराची धाव बसवितात. रथाची रचना मोठ्या वेगाने जाण्यासाठी व एक्‍क्याची रचना जरा कमी वेगाने जाण्यासाठी केलेली असते. अशा गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशाला गादीवर मांडी घालून बसावे लागते.

आ. १५ मध्ये एका घोड्याने ओढण्याचा बडोदे पद्धतीचा टांगा दाखविला आहे. याच्या साट्यामध्ये दोन बाजूंवर दोन बाके असतात  व त्यावर चार माणसे मधल्या भागात पाय सोडून एकमेकांकडे तोंड करून बसतात. साट्याच्या मागच्या बाजूस दार असते, ते लावून घेतले म्हणजे आतला भाग बंदिस्त पेटीसारखा होतो. टांग्याचा चालक पुढाच्या बाकावर बसतो व त्याच्या बाजूला आणखी एक प्रवासी बसू शकतो. या टांग्याला उत्तम प्रकारच्या स्प्रिंगा व भरीव रबरी धावांची मोठी चाके लावतात. चाकांचे धारवे लाटणी जातीचे असतात. टांग्याच्या चाकांवर चिखलरोधक पट्ट्या बसविलेल्या असतात.

आ. १६ मध्ये एक किंवा दोन घोड्यांनी ओढण्याचा इंग्रजी पद्धतीचा टांगा दाखविला आहे. अशा टांग्याला घोड्यांच्या ऐवजी दोन खेचरेही जोडता येतात. या टांग्याच्या साट्याच्या मधोमध म्हणजे आसाच्या वरच्या भागावर एक आडवा कठडा असतो व त्याच्या दोन्हीकडे बाके असतात. मागच्या बाकावर दोन प्रवासी बसतात व पुढच्या बाकावर गाडीचालक व तिसरा प्रवासी  बसतो. या टांग्याची चाके बडोदे पद्धतीचीच असतात व स्प्रिंगाही त्याच प्रकारच्या असतात. या टांग्याचे छत स्वतंत्र प्रकारचे असते व ते बडोदे पद्धतीपेक्षा जास्त कार्यक्षम असते. लांब अंतरावर जाणाऱ्या टांग्याचा वेग ताशी १२ किमी. पर्यंत असतो.

आ. १७ मध्ये एका घोड्याने ओढण्याची इंग्रजी पद्धतीची चार चाकी गाडी दाखविली आहे. या प्रकारच्या गाडीला व्हिक्टोरिया म्हणतात. या गाडीची मागची चाके बरीच मोठी असतात व पुढची चाके लहान असतात. पुढच्या चाकांच्या आसावर एक विशेष पद्धतीची यांत्रिक रचना असते. तिच्यामुळे गाडी वळविण्याचे काम सोपे होते.बहुतके सर्व जातींच्या चार चाकांच्या गाड्यांवर अशी रचना बसवितात. या गाडीच्या चाकावर भरीव रबराच्या धावा असतात व धारवे लाटणी जातीचे असतात. या गाडीला चार स्प्रिंगा लागतात. गाडीच्या साट्यात मागच्या बाकावर दोन किंवा तीन माणसे बसतात व पुढच्या बाकावर आणखी दोन माणसे बसू शकतात. गाडीचा चालक पुढच्या बाजूस बसविलेल्या स्वतंत्र बाकावर बसतो. अशा गाड्या सामान्यतः भाड्याने नेण्याच्या प्रवाशांसाठी वापरतात.

आ. १८ मध्ये खासगी उपयोगाची दोन घोड्यांनी ओढण्याची चार चाकांची गाडी दाखविली आहे. तिला लँडॉ म्हणतात. या गाडीचा साटा आ. १७ मधील गाडीपेक्षा जास्त बंदिस्त प्रकारचा असतो व आतील गाद्या व इतर सामान मौल्यवान प्रकारचे असते. अशा गाडीवरचे छत दोन भागांत बसविलेले असते व ते जरूरीप्रमाणे उघडून किंवा मिटवून ठेवता येते.

आ. १९ मध्ये एक किंवा दोन घोड्यांनी ओढण्याची बंदिस्त साट्याची चार चाकांची गाडी दाखविली आहे. अशा गाडीला सिगराम म्हणतात. या गाडीच्या साट्यामध्ये दोन बाके असतात व त्यावर चार माणसे आरामात बसू शकतात. या गाडीला दोन दरवाजे व चार खिडक्याही असतात. गाडी चालू असताना दरवाजे बंद करतात व पाऊस पडत असेल तर खिडक्याही लावतात. अशा गाड्या  मुख्यतः खासगी उपयोगासाठीच बनवितात.

आ. २० मध्ये जुन्या काळातील समारंभाच्या मिरवणुकीमध्ये वापरावयाच्या गाडीचा एक नमुना दाखविला आहे.

आ. २१ मध्ये ऐतिहासिक काळातील चार चाकी रथ दाखविला आहे. पूर्वीच्या काळात स्प्रिंगा वापरण्याची कल्पना माहीत नव्हती, परंतु धक्के कमी करण्यासाठी बसण्याच्या जागेवर कापूस भरलेल्या जाड गाद्या बसवीत असत. रथाच्या चाकांची रचना अगदी साधी होती आणि त्यांच्या धावांवर धातूच्या पट्ट्या बसवीत असत. रथाचा वरचा भाग घुमटासारखा बनवीत व त्यावरून धातूचा पातळ पत्रा बसवीत असत. अशा रथाला दोन किंवा चार घोडे जोडीत असत.

पुष्कळ बर्फ पडलेल्या रस्त्यावरून चाकाची गाडी चालविता येत नाही. अशा ठिकाणी चाके नसलेली साट्यासारखी गाडी वापरावी लागते. या गाडीच्या खालच्या पृष्ठावर गुळगुळीत केलेला पातळ पोलादी पत्रा मढवितात. त्यामुळे तो साटा बर्फावरून सहज घसरतो व थोड्या शक्तीने सरकविता येतो. हा साटा ओढण्यासाठी घोडा किंवा बैल वापरता येत नाही म्हणून चार पाच मोठी कुत्री किंवा रेनडियर जोडून हा साटा ओढीत नेतात. अशा प्रकारची गाडी आ. २२ मध्ये दाखविली आहे.                

ओक,  वा. रा.