रंजनक्रिया  :  ( रंगणी ,  रंगवणी). सामान्यतः तंतुमय वा पटलरूप पदार्थाला रंजकद्रव्य  [ डाय अथवा डायस्टफ ⟶  रंजक व रंजकद्रव्ये ] वा रंगद्रव्य  [ पिगमेंट ⟶  रंगद्रव्ये ] यांसारखे रंगदायी पदार्थ लावण्याच्या प्रक्रियेला किंवा कलेला रंजनक्रिया म्हणतात. या प्रक्रियेत रंजकद्रव्य या पदार्थात स्थिर  ( पक्के) केले जाते आणि शेवटी या पदार्थाचा कोणता उपयोग करावयाचा आहे त्या दृष्टीने त्याला इच्छित रंगछटा कायमची दिली जाते. खऱ्याखुऱ्या रंजनक्रियेमध्ये रंगवायच्या पदार्थाचे रेणू हे रंजकद्रव्याच्या रेणूंशी वा रेणुसमूहांशी गुंफले जातात. त्यामुळे रंजकद्रव्य हे रंगवावयाच्या पदार्थाचा एक घटक असल्यासारखे भासते. रंगद्रव्याला सामान्यपणे रंगवावयाच्या पदार्थांविषयी अशी आसक्ती नसते. उद्योगधंद्यांत किंवा व्यवहारात खऱ्याखुऱ्या रंजनक्रियेशिवाय रंग देण्याच्या इतर पद्धतींनाही रंजनक्रिया संबोधिले जाते. कापडाचे तंतू ,  प्लॅस्टिकची पटले ,  ॲ नोडाइझ्ड  ( ॲल्युमिनियम ऑक्साइडाचा लेप दिलेली) ॲल्युम्नियम ,  फर ,  लाकूड ,  कागद ,  चामडे ,  काही खाद्य पदार्थ ,  केस ,  रबद इत्यादींवर मुख्यत्वे रंजनक्रिया केली जाते. प्रस्तुत नोंदीत प्रामुख्याने कापडाच्या रंजनक्रियेचे वर्णन दिलेले आहे.

रंजकद्रव्य योग्य त्या वाहकात  ( बहुधा पाण्यात) विरघळवितात अथवा अपस्करित करतात  ( विखरून टाकण्याची क्रिया करतात)  नंतर हा विद्राव रंगवावयाच्या पदार्थाच्या संपर्कात आणून रंजनक्रिया केली जाते. संपर्कात आल्यावर रंजकद्रव्याचे पुष्कळ रेणू वा पुंज  ( कण) पदार्थाच्या पृष्ठाला चिकटू शकतात  परंतु हे चिकटलेले कण तंतूंमध्ये किंवा पटलांमध्ये स्थलांतरित होईपर्यंत रंजनक्रिया पूर्ण होत नाही. अशा प्रकारे रंजनक्रियेच्या सर्व प्रक्रियांमध्ये शेवटी रंगहीन पदार्थात रंजकद्रव्य  ( रंगदायी द्रव्य) घुसविले जाते.

इतिहास : रंजकद्रव्यांविषयीचा इतिहास ‘रंजक व रंजकद्रव्ये ’ या लेखात दिलेला आहे. ग्रीकांना रंजनक्रियेविषयी कल्पना होती कारण एरिएड्नी या ग्रीकांच्या सूतकताई व विणकाम यांच्या देवतेची माता इडॉन ही लोकर रंगविणारी होती ,  असे मानले जाते.

चित्रकला आणि अभिरंजन  ( स्टेनिंग) ह्या कला खऱ्या रंजनक्रियेपेक्षा जुन्या आहेत. तसेच त्वचा  ( उदा. ,  गोंदणे) व चामडे रंगविण्याच्या कला कापडावरील रंजनक्रियेच्या आधी बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात होत्या. पुरातत्त्वविद्येद्वारे मिळालेल्या पुराव्यांवरून इ. स. पू. ३००० च्या सुमारास भारत ,  ईजिप्त व मेसोपोटेमिया येथे रंजनक्रिया उद्योगाचा चांगलाच विस्तार झाला होता. त्या वेळी वापरल्या जाणाऱ्या रंजनक्रियेच्या पद्धती काही विशेष फरक न होता १८५० पर्यंत वापरल्या जात होत्या. त्यांपैकी काजळी ,  नीळ व ॲ लिझरीन यांचा अजूनही उद्योगधंद्यांत वापर केला जातो. [अर्थात पूर्वी नीळ व ॲ लिझरीन ही रंजकद्रव्ये अनुक्रमे नीळ  ( इंडिगोफेरा टिंक्टोरिया) व मंजिष्ठ  ( यूरोपीय मॅडर ,  रुबिया टिंक्टोरम) या वनस्पतींपासून मिळवीत. आता मात्र ही रंजकद्रव्ये डांबरापासून मिळणाऱ्या रसायनांपासून तयार करतात] .

इ. स. १८५६ साली विल्यम हेन्री पर्किन यांनी व्यापारी दृष्टीने महत्त्वाचे असलेले मॉव्ह हे पहिले कार्बनी रंजकद्रव्य प्रयोगशाळेत संश्लेषित केले व यामुळे रंजनक्रियेच्या क्रांतीला सुरुवात झाली. नंतर संश्लेषित कार्बनी रंजकद्रव्यांचा वापर वाढल्याने रंजनक्रियेच्या नवनवीन पद्धती शोधण्यात आल्या.  ( १९६० सालापर्यंत वेगवेगळी हजारो रंजकद्रव्ये निर्माण करण्यात आली व त्यांचे १३ वर्ग पाडण्यात आले).

मेसोपोटेमिया येथे सापडलेल्या रंजकद्रव्यांच्या वड्या हा रंजनक्रियेविषयीचा पहिला पुरावा होय. ग्रीक व रोमन लेखकांनीही या क्रियेचा उल्लेख केला आहे. मात्र त्यांनी तिचे तपशीलवार वर्णन केलेले नाही. ईजिप्तमधील इ. स. पू. सु. ३००० काळातील थडग्यांमध्ये आढळलेल्या चित्रांमध्ये तांबडे ,  पिवळे ,  हिरवे व निळे कपडे घातलेल्या व्यक्ती आहेत ,  तर ममींच्या अंगावरील कापड पिवळ्या रंगाने रंगविलेले असायचे  ( हा पिवळा रंग करडईपासून काढत असत). कदाचित हे कापड आयर्न बफने रंगविले जात असावे. यासाठी कापडावर प्रथम लोहाच्या लवणाच्या विद्रावाची व नंतर क्षाराची  ( अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाची  अल्कलीची) विक्रिया करण्यात येई. यामुळे कापडावर आयर्न ऑक्साइड अवक्षेपित होऊन  ( साक्याच्या रूपात साचून) कापड तपकिरी होई. अशा कापडांवर निळीने रंगविलेले पट्टेही आढळले आहेत. त्या काळात ईजिप्शियन लोक शेंदरी रंग छटा देत असत. त्यासाठी सुरुवातीला कापडावर धातवीय हायड्रॉक्साइडाच्या मदतीने रंगबंधन क्रिया करीत व नंतर कर्मिसाने रंजनक्रिया करीत. कर्मीस या खवले कीटकाच्या मादीपासून जे रंजकद्रव्य मिळविण्यात येई. इ. स. पू. ३००० पर्यंत बॅबिलोनियामध्ये लोकरीला निळा ,  लाल व हिरवा हे रंग देण्यात येत असत. नीळ व मंजिष्ठ यांचा रंजनक्रियेत उपयोग सर्व प्रथम भारतामध्ये इ. स. पू. सु. ३००० च्या आधी करण्यात आला होता. लिबियन स्त्रियांचे पायघोळ अंगरखे  ( झगे) रंगविण्यासाठी मंजिष्ठाचा वापर करण्यात येत असल्याचा उल्लेख हीरॉडोटस  ( इ. स. पू. सु. ४५०) यांनी केला आहे. मात्र नीळ व मंजिष्ठ यांच्या साहाय्याने करण्यात येणारी रंजनक्रिया अत्यंत गुंतागुंतीची ,  वेळखाऊ व महागडी होती  शिवाय ती केवळ अतिशय कुशल कारागिरांनाच करता येई. नीळ व ब्राझीलवुड  ( सिसालपिनिया प्रजातीतील काही वनस्पतींचे लाकूड) भारतातून व्हेनिसला निर्यात होत असल्याचा ११९३ सालचा उल्लेख आढळतो.

त्या काळी मोजकी नैसर्गिक रंजकद्रव्ये रंगबंधकांबरोबर कौशल्याने कापडास लावण्यात येत असत. लोखंड  ( सल्फेट ,  जांभळा) ,  तांबे  ( सल्फेट ,  निळा) ,  क्रोमियम  ( सोडियम बायक्रोमेट ,  तपकिरी) ,  ॲल्युमिनियम ( सल्फेट व ॲसिटेट ,  लाल) ,  कथिल  ( स्टॅनस क्लोराइड ,  लाल) आणि या धातूंची इतर लवणे विविध प्रकारचे रंगबंधक विद्राव बनविण्यासाठी वापरीत व प्रत्येकाचे लावण्याचे खास तंत्र होते. संश्लेषित रंजकद्रव्ये प्रचारात आल्यावर जलदपणे होणाऱ्या रंगबंधक प्रक्रिया तेवढ्या टिकून राहिल्या.

मध्ययुगीन काळात यूरोपमधील रंजनक्रियातज्ञांच्या संस्था व कंपन्या यांचे तेथील रंजनक्रिया उद्योगावर फार मोठे नियंत्रण असे. सरकारही या उद्योगांकडे लक्ष देत असे. तथापि हा मुख्यत्वे घरगुती उद्योग होता व पुष्कळदा या उद्योगासाठी तयार केलेल्या नियमांचे व कायद्यांचेही पालन होत नसे. १६७१ साली या उद्योगासाठी फ्रान्समध्ये जे. बी. कोल्‌बेर यांनी नियम तयार केले. नंतर तेच नियम यूरोपभर या उद्योगाला लागू करण्यात आले. निळीचा प्रवेश होईपर्यंत यूरोपात मुख्यत्वे वोड  ( आयसॅटीस या प्रजातीतील वनस्पतींच्या विशेषतः आयसॅटीस टिंक्टोरिया झुडपाच्या पानांपासून मिळविण्यात येणारे) हे रंजकद्रव्य वापरात होते. अठराव्या शतकात जुन्या समजुती व पद्धती मागे पडल्या व नवीन शास्त्रीय ज्ञानावर जुन्या समजुती व पद्धती मागे पडल्या व नवीन शास्त्रीय ज्ञानावर आधारलेल्या रंजनक्रियेच्या शास्त्रशुद्ध पद्धती वापरात आल्या. सी. एल्‌. बेर्‌तॉले यांच्या Elements de l’ art de la teinture ( १७९१) व बँक्राफ्‌ट यांच्या एक्स्परिमेंटल रिसर्चेस कन्सर्निंग द फिलॉसॉफी ऑफ पर्मनंट कलर्स ( १८१३) या ग्रंथांवरून याची प्रचीती येते. बँक्राफ्ट यांच्या ग्रंथात अठराव्या शतकाअखेरीपर्यंतच्या रंजकद्रव्यांचे व रंजनक्रियेच्या पद्धतीचे सार आलेले असून अजूनही या विषयावरचा हा सर्वोत्तम ग्रंथ गणला जातो.


पर्किन यांनी आपला मॉव्ह रंग खपविण्यासाठी तांत्रिक सेवा सुरू केली व ते रंजनक्रियातज्ञांकडे स्वतः जाऊन त्यांना रंजनक्रियेची माहिती करून देत. तेव्हापासून रंजनक्रिया उद्योगही रंजकद्रव्यांच्या उत्पादकांचे संशोधन आणि त्यांच्याकडून मिळणारी तांत्रिक सेवा यांवर अवलंबून राहू लागला. मॉव्ह हे क्षारकीय रंजकद्रव्य  [ ॲ मिनो गटासारखा नायट्रोजनयुक्त विशिष्ट गट असल्याने क्षारकाप्रमाणे विक्रिया करणारे रंजकद्रव्य ⟶  रंजक व रंजकद्रव्ये ] असल्याने ते सुती कापडावर बसत नाही  परंतु उलट रेशमी कापडांवर इतक्या वेगाने बसते की ,  त्याला एकसमान रंग देणे जवळजवळ अशक्य होते. हा दोष पर्किन यांनी घालवला. त्यासाठी त्यांनी रंजनक्रिया साबणाच्या विद्रावात करण्याची शिफारस केल. त्यानंतर पर्किन व आर्‌. पुलर यांनी मिळून क्षारकीय रंजकद्रव्याने सूत रंगविण्याची रंगबंधक पद्धती शोधून काढली.

इ. स. १८५८ साली पीटर ग्राइस यांनी ⇨ डायाझो संयुगांचा शोध लावला व एखाद्या अमाइनाची नायट्रस अम्लाबरोबर विक्रिया करून मिळालेल्या संयुगाचा अमाइने व फिनॉले यांच्याशी संयोग करून रंगीत ⇨  ॲझो संयुगे तयार केली. ॲ निलीन यलो हे व्यापारी तत्त्वावर १८६३ मध्ये तयार करण्यात आलेले पहिले ॲझो रंजकद्रव्य होय. १८६२ साली ई. सी. निकल्‌सन यांनी निकल्‌सन ब्ल्यू किंवा अल्कली ब्ल्यू हे पहिले अम्ल रंजकद्रव्य  [ अम्लीय गट असलेले रंजकद्रव्य ⟶  रंजक व रंजकद्रव्ये ] शोधून काढले. लोकर रंगविण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो कारण रंजनक्रिया सोपी असून रंगमेळ चांगला साधता येतो.

इ. स. १८३४ साली रुंगे यांना असे आढळले होते की ,  ॲ निलिनाचे ऑक्सिडीकरण  [⟶  ऑक्सिडीभवन ] केले असता काळा अवक्षेप मिळतो. १८६२ साली ॲ निलीन ब्लॅक या नावाने हे रंगद्रव्य कॅलिको छपाईत वापरले जाऊ लागले ,  तर १८६३ साली याच्या साहाय्याने रंजनक्रिया करण्याची पद्धती जे. लाइटफूट यांनी शोधून काढली. ॲ निलीन ब्लॅकच्या शोधामुळे अखंड रंजनक्रिया करणे शक्य झाले. १८९५ च्या सुमारास हायड्रोजन पेरॉक्साइड मोठ्या प्रमाणावर मिळू लागल्याने ऑक्सिडीकरण रंगद्रव्ये [लावल्यावर ऑक्सिडीभवनाने बनणारी रंजकद्रव्ये  ⟶ रंजक व रंजकद्रव्ये] उदयास आली. ती फर ,  केस इ. रंगविण्यासाठी वापरली जाऊ लागली. १९५० च्या सुमारास ॲ निलीन ब्लॅक पाण्यात विरघळविण्याची पद्धती शोधून काढण्यात आली.

ॲ लिझरिनाची सल्फ्यूरिक अम्लाशी विक्रिया करून ॲ लिझरीन रेड एस हे पहिले आफ्टरक्रोम रंजकद्रव्य [रंजकद्रव्य लावल्यानंतर क्रोमियम रंगबंधक लावण्याच्या रंजनक्रियेशी संबंधित असलेले रंजकद्रव्य  ⟶ रंजक व रंजकद्रव्ये] मिळविण्यात आले. या रंजकद्रव्यांची अम्ल रंजकद्रव्याच्या पद्धतीप्रमाणेच कापडावर रंजनक्रिया करण्यात येते  तिच्यामुळे रंजकद्रव्याचा पक्केपणा वाढतो. १८७१ साली ए. फोन बेयर यांनी फ्ल्युओरेझीन हे अनुस्फुरक रंजकद्रव्य  ( उच्च प्रकाशीय परावर्तनक्षमता असलेले व रंगाची तीव्रता वाढवून कापडाच्या चकमदारपणात भर टाकणारे रंजकद्रव्य) तयार केले. १८७३ साली कॅच्यू द लाव्हल हे पहिले गंधकी रंजकद्रव्य तयार करण्यात आले. गंधकी रंजकद्रव्यांमुळे कापड तपकिरी रंगात सहजपणे व स्वस्तात रंगविता येऊ लागले.

इ. स. १८८४ मध्ये पी. बोटिजर यांनी काँगो रेड हे रंजकद्रव्य शोधून काढले  हे रंजकद्रव्य सुताला सरळ लावता येते. त्याआधीची रंजकद्रव्ये लावण्यापूर्वी तंतूंवर रंगबंधक लावणे आवश्यक असे. अशी सरळ रंजकद्रव्ये  ( रंगबंधक न लावता वापरता येणारी रंजकद्रव्ये) ही   प्रमुख औद्योगिक रंजकद्रव्ये झाली. बेयर यांनी १८६८ साली निळीच्या संश्लेषणाचे काम सुरू केले होते. १८९७ नंतर संश्लेषित नीळ मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊन बाजारात आली.

तंतूमध्ये जागच्या जागी  ( अंतर्गत रचनेमध्येच) रंजकद्रव्य निर्माण करण्याची कल्पना जुनी आहे  ( उदा. ,  खनिज रंजकद्रव्य व ऍनिलीन ब्लॅक लावण्याची रंजनक्रिया रंजनक्रिया). १८८० साली टॉमस व रॉबर्ट हॉलिडे यांना ॲझो रंजकद्रव्यांच्या बाबतीत ही कल्पना सुचली. त्यासाठी नॅप्थॉलाच्या क्षारीय विद्रावात तंतू बुडवून काढून नंतर त्यावर डायाझो संयुगाची विक्रिया करण्यात येई. या पद्धतीने बनविलेले प्रमुख रंजकद्रव्य म्हणजे व्हेकॅन्सीन रेड हे होते. १९११ साली ए. झित्शर व ए. एल्‌. लास्का यांना बीटा-नॅप्थॉलापेक्षा २ ,  ३ हायड्रॉक्सिनॅप्थॉइक अम्लाच्या ॲ निलाइडला सेल्युलोजाविषयी जास्त आसक्ती असून त्यापासून अधिक पक्की रंजकद्रव्ये मिळतात ,  असे आढळून आले. ही नवीन पद्धती लवकरच सर्वत्र वापरात आली. कारण पूर्वी ज्या रंजनक्रियेस तीन आठवड्यांपर्यंत वेळ लागत असे ते काम या पद्धतीने एक दिवसात पूर्ण होऊ लागले. काहीशी वरील ॲझो इक प्रक्रियेसारखी असलेली एक पद्धती ए. जी. ग्रीन यांनी १८८७ साली शोधून काढली  या पद्धतीत प्रिम्युलिनाचा वापर करण्यात येई. १९०० मध्ये पहिले मेटॅक्रोम  ( रंगबंधक ॲझो ) रंजकद्रव्य वापरात आले. अशा रंजकद्रव्याच्या बाबतीत एकाच कुंडातून रंगबंधक व रंजकद्रव्य एकाच वेळी लावण्यात येते.

इ. स. १९०१ साली रने बोन यांनी शोधून काढलेले इंडान्‌थ्रोन हे संश्लेषित निळीनंतरचे पहिले संश्लेषित व्हॅट रंजकद्रव्य होय. नंतर इतर रंगांची अशी रंजकद्रव्ये मिळविण्यात आली. त्याच सुमारास अम्ल- ॲ लिझरीन रंग पुढे आल्याने लोकरीवरील अम्ल रंजनक्रियेच्या पक्केपणाविषयीची नवीन परिमाणे निश्चित झाली.

निळीचे ल्यूकोसल्फ्यूरिक एस्टर पाण्यात विरघळते व या विद्रावात बुडविलेले लोकरीचे व सुती तंतू हे एस्टर शोषून घेतात ,  असे एम्‌. बॅडर व सी. संडर यांना १९२२ साली आढळले. अशा तऱ्हेने रंगविलेल्या तंतूंवर एखाद्या ऑक्सिडीकारकाचे संस्करण केल्यास रंजनक्रिया अगदी एकसमान होते. निळवर छटा मिळविण्यासाठी ही रंजनक्रिया मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली व विद्राव्य केलेल्या इतर व्हॅट रंजकद्रव्यांसाठीही हे तत्त्व वापरण्यात येऊ लागले.

डायाझो संयुगांचे स्थिरीकरण करण्याच्या कामी रसायनशास्त्रज्ञांना १९२५ साली यश लाभले. यामुळे ॲझो इक रंजनक्रियेत ॲझो इक संयुग्मक घटक लावणे व नंतर ⇨डायाझोटीकरण व स्थिरीकरण केलेल्या डायाझो घटकाचे  ( यांना ‘सॉल्ट’ म्हणतात) संस्करण करणे या गोष्टीच करण्याची गरज उरली.

नायलॉन ,  पॉलिएस्टर ,  ॲ क्रिलिक व इतर कृत्रिम तंतू १९३७ नंतर वापरात आले. त्यांच्यासाठी नवीन रंजकद्रव्ये शोधावी लागली व रंजनक्रियेच्या नव्या पद्धती विकसित झाल्या. विशेषकरून बंदिस्त ,  वाताभेद्य यंत्रे वापरात आली. त्यामुळे १००० से. पेक्षा उच्च तापमानाला रंजनक्रिया करता येऊ लागली.

थॅलोसायनिनांचा शोध १९२८ साली लागला. कॉपर थॅलोसायनीन हे यांपैकी पहिले संयुग कापड रंगविण्यासाठी वापरता आले नाही  परंतु १९४७ साली एन्‌. एच्‌. हॅडॉक व सी. वूड यांनी याचे विशिष्ट क्वॉटर्नरी-अनुजात  ( त्याच्यापासून बनविलेली व चार घटकांची किंवा चार सारख्या अणूंना जोडलेली इतर संयुगे) सेल्युलोज तंतूंना पक्का रंग देण्यासाठी उपयुक्त असल्याचे शोधून काढले. नंतर बायर कंपनीने कॉपर  ( अथवा निकेल) थॅलोसायनीन तंतूमध्येच  ( जागच्या जागी) तयार केले जाईल असा मार्ग शोधून काढला.


रंजनक्रियेच्या पुढील दोन नवीन प्रमुख पद्धतींचे महत्त्व १९६५ च्या सुमारास वाढू लागले.  ( १) या पद्धतीत रंगीत वा संयोजनाने रंगीत पदार्थ बनविणाऱ्या आणि तंतुमय बहुवारिकीकरणाने  ( लहान ,  साध्या रेणूच्या संयोगाने प्रचंड रेणूचे संयुग बनवण्याच्या क्रियेने) अथवा तंतूशी आंतरक्रिया होऊन जलद स्थिरीकरण होणाऱ्या पदार्थाचा तंतूत शिरकाव करून रंजनक्रिया केली जाते.

( २) ज्या कच्च्या मालापासून कृत्रिम तंतू बनविण्यात येतात त्यातच  ( उदा. ,  रेयॉन बनविताना व्हिस्कोज विद्रावात किंवा नायलॉन तयार करताना वितळलेल्या नायलॉन लवणात) रंजकद्रव्य किंवा रंगद्रव्य टाकतात. अशा प्रकारे रंगीत तंतू तयार होतो व ह्या पद्धतीला ‘डोप रंजनक्रिया ’ म्हणतात. यासाठी पूर्वी काजळी ,  लोह ऑक्साइड यांसारखी अकार्बनी रंगद्रव्ये वापरीत  नंतर त्यांच्या जागी अधिक चकचकीत व भडक रंगछटा असलेली कार्बनी रंगद्रव्ये वापरली जाऊ लागली. कापडाला शुभ्रता आणण्यासाठी अनुस्फुरक झळाळी आणणारे शुभ्रताकारक वापरण्याची सूचना सर्वप्रथम पॉल क्राइस यांनी केली.

विसाव्या शतकाचा प्रारंभ झाल्यानंतरही बराच काळपर्यंत कापडाची रंजनक्रिया करणाऱ्या यंत्रसामगीत विशेष बदल झाले नाहीत. तथापि लाकडी पात्रांऐवजी अगंज  ( स्टेनलेस) पोलादी पात्रे आली व रंजनक्रियेचे काही प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. विसाव्या शतकात असे बदल जलदपणे होत गेले  ( रंजकद्रव्याच्या विद्रावात काढलेले कापड वितळलेल्या धातूच्या कुंडातून जाऊ द्यावे ,  असे १९०४ मध्ये सुचविण्यात आले होते. मात्र उद्योगात या तत्त्वाचा प्रत्यक्ष उपयोग तदनंतर ४० वर्षांनी करण्यात आला). १९०४ च्या सुमारास अखंड रंजनक्रिया करण्याच्या जुन्या पद्धतींना महत्त्व प्राप्त झाले. मात्र लोकरी कापडासाठी व्यापारी तत्त्वावर अशी पद्धती नव्हती. पेळू ,  कांडीवर गुंडाळलेले सूत ,  रुळांवर गुंडाळलेले ताणे  ( मागावर कापडाच्या लांबीच्या दिशेत लावण्यात येणारे सूत) यांची यांत्रिक रंजनक्रिया पद्धती हळूहळू विकसित झाली आणि पुष्कळ वर्षे ही प्रमाण प्रक्रिया होती. या प्रक्रियेत व रंजनक्रियेच्या बहुतेक यंत्रांमध्ये तदनंतर झालेल्या सुधारणा ह्या कोणतेही नवीन तत्त्व न वापरता अस्तित्वात असलेल्या संयंत्रातच होत गेल्या. पुढे रंजनक्रिया व ⇨कापडावरील अंतिम संस्करण ही एकच क्रिया बनली.

रासायनिक समतोल : कापडाची शोषणक्षमता जेवढी असते ,  तेवढेच रंजकद्रव्य त्यावर बसू शकते. कारण तापमान ,  विद्राव्यता  ( विरघळण्याची क्षमता) इत्यादींवर हा रासायनिक समतोल अवलंबून असतो.

उदा. ,  रंजकद्रव्याचा विद्राव ⇌  ( कापड)  +  पाणी  +  रंजकद्रव्य

रासायनिक समतोलात [ O] [OH]  /  [H2O]  = K  ( येथे  K  हा स्थिरांक आहे.)

हे समीकरण स्थिर असते. त्यामुळे एखाद्या घटकाची संहती  ( विद्रावातील प्रमाण) वाढवून वा कमी करून समतोल कमी जास्त करता येतो. म्हणजे एका ठराविक तापमानाला रंगछटा तीच येते. मीठ अथवा इतर विद्युत्‌ विच्छेद्य  ( विद्रावातून विद्युत्‌ प्रवाह जाऊ दिल्यास घटक अलग होणारा) पदार्थ रंजकद्रव्याच्या विद्रावात टाकल्यास समतोलाची स्थिती बदलून कापडावर जास्त रंग बसतो.

आसक्ती : रंगवावयाचा पदार्थ व रंजकद्रव्य यांच्यात विविध प्रकारचे आकर्षण असून त्याचे वर्णन करण्यासाठी आसक्ती ही स्थूल संज्ञा वापरतात. रंजकद्रव्याचे विद्युत्‌ भारित कण आणि रंगवावयाच्या पदार्थावरील विरुद्ध विद्युत्‌ भार असलेली रंजकद्रव्यस्थाने  ( स्थले) यांच्यातील परस्पर आकर्षणामुळे विविध प्रकारच्या इतर रासायनिक आकर्षणाद्वारे किंवा रंगवावयाच्या पदार्थात रंजकद्रव्याचा ⇨ घन विद्राव बनल्याने आसक्ती निर्माण होऊ शकते. आसक्ती असणारी रंजनक्रिया ही ऊष्मादायी  ( उष्णता बाहेर टाकणारी) प्रक्रिया असून ती पुढील सोप्या रीतीने दाखविता येऊ शकते  :

विद्रावातील रंजकद्रव्य+रंग न दिलेला पदार्थ+रंगीत पदार्थ+उष्णता.

थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यात रंगस्त्राव  ( रंग निघून जाण्याची क्रिया) अधिक होतो ,  ही सर्व परिचित गोष्ट या समीकरणाने स्पष्ट होते.

साहाय्यक : रंग न देणाऱ्या पण रंजनक्रियेला सहाय्य वा प्रतिबंध करणाऱ्या द्रव्यांना सहाय्यक म्हणतात. त्यांचा बहु तकरून रंजकद्रव्याच्या रेणूवर परिणाम होतो. फुगविणारी द्रव्ये  ( कारक) ही सहाय्यक असतात. त्यांच्यामुळे तंतूची संरचना तात्पुरती खुली  ( उघडी) होते. परिणामी रंजकद्रव्याचे रेणू वा कण अन्यथा दुर्गम असलेल्या रंजकद्रव्य-स्थानांमध्ये अधिक मोकळेपणाने प्रवेश करून पोहोचू शकतात. वाहक हे सामान्यतः रंजनक्रियेचा वेग वाढविणारे कारक असतात. ते रंजकद्रव्याचे कण  ( समूह) फोडतात वा विरघळवितात  त्यामुळे रंगवावयाच्या पदार्थाला शोषून घेता येऊ शकेल एवढ्या छोट्या आकारमानाचे कण तंतु-पाणी या आंतरपृष्ठापाशी येतात. कधीकधी वाहकामुळे तंतू फुगविलाही जातो. रंजनक्रियेची प्रक्रिया मंद करणाऱ्या गतिमंदकारक द्रव्यांचाही एक साहाय्यक वर्ग असून बहुधा ती कार्बनी वा अकार्बनी लवणे असतात. रंजकद्रव्याबरोबर निघून  ( उडून) जाणारे संयुग तयार करून अथवा अम्ल साहाय्यकाचे होणारे आयनीकरण  ( विद्युत्‌ भारित अणू ,  वा अणुगट निर्माण होण्याची क्रिया) कमी करून वा त्याला अडथळा आणून किंवा पुढे रंजकद्रव्य घेणार असलेली तंतूवरची अधिक क्रियाशील व अधिक सुगम अशी स्थाने तात्पुरती बळकावून गतिमंदकारक द्रव्ये रंजनक्रिया मंद करतात.

विरोध करण्याचा गुणधर्म सुधारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यूरिया-फॉर्माल्डिहाइड अथवा मेलॅमाइन रेझिने यांच्यामुळे सामान्यतः सूर्यप्रकाशाच्या परिणामांना विरोध करण्याच्या गुणधर्मावर परिणाम होतो.

 सेल्युलोज तंतू : मिठासारखा एखादा विद्युत्‌ विच्छेद्य पदार्थ साहाय्यक द्रव्य म्हणून असलेल्या सरळ रंजकद्रव्यांच्या विद्रावात बुचकळून व नंतर विद्राव उकळून सामान्यपणे रेयॉन व सुती तंतू रंगवितात.

सेल्युलोज तंतू व्हॅट रंजकद्रव्यांनी रंगविता येऊ शकतात. ही रंजकद्रव्ये सामान्यपणे अविद्राव्य अशी रंगद्रव्ये असतात. तथापि क्षार वा क्षपणकारक [ ⟶ क्षपण] याच्या प्रभावाखाली ती जलविद्राव्य होतात आणि त्यांच्यात विविध प्रकारच्या तंतूंसाठीची आसक्ती दिसून येते. रंजनक्रियेनंतर व्हॅट रंजकद्रव्ये हवेत उघडी पडल्यास अथवा ऑक्सिजन पुरविणाऱ्या रसायनांच्या संपर्कात आल्यास ती परत त्यांच्या अविद्राव्य रूपात पुनरावर्तित होतात. योग्य प्रकारे लावलेली व्हॅट रंजकद्रव्ये ही धुलाई ,  विरंजन  ( रंग घालविण्याची क्रिया) ,  सूर्यप्रकाश ,  स्वेदन  ( पृष्ठभागी आर्द्रतेचे बिंदू बनणे) यांच्या संदर्भात पक्की असतात.

सेल्युलोज तंतू तथाकथित तंतु-विक्रियाशील  ( तंतूंशी विक्रिया करणाऱ्या) रंजकद्रव्यांनी रंगविता येऊ शकतात. ही रंजकद्रव्ये सेल्युलोजाशी चिवट बंध निर्माण करतात व सेल्युलोजाचे प्रत्यक्षात वेगळ्या संयुगात रूपांतर करतात.

संश्लेषित टॅनिने वा टॅनिक अम्ल आणि टार्टार एमिटिक  ( अँटिमनी पोटॅशियम टाट्रेट  फुलावणारे ,  विषारी ,  स्फटिकी लवण) यांच्याद्वारे रंगबंधनाची क्रिया आधीच केलेल्या सेल्युलोजावर क्षारकीय रंजकद्रव्यांद्वारे रंजनक्रिया करता येऊ शकते.


  प्राणिज तंतू : लोकर ,  रेशीम ,  फर  ( नमदा) इ. प्राणिज तंतू असून त्यांच्यावरील रंजनक्रिया अशी होते  :  तंतूवरील धन विद्युत्‌ भारित गट आणि धनायनी  ( विद्रावातून विद्युत्‌ प्रवाह जाऊ दिला असता धनाग्राकडे जाणाऱ्या) रंजकद्रव्यावरील ऋण विद्युत्‌ भारित रंग गट या विक्रियाशील गटांमार्फत लवणे निर्माण होऊन रंजनक्रिया होते. एकसमान  ( संतुलित) रंजनक्रिया करणारी रंजकद्रव्ये गालिचाचे सूत ,  नमदा ,  टोप्या वगैरेंच्या रंजनक्रियेत वापरतात. असे रंजकद्रव्य तंतूवर योग्य जागी जोराने जाण्यासाठी तीव्र अम्ल सापेक्षतः मोठ्या प्रमाणात लागते. मिलिंग  ( नमद्यासाठी पक्क्या असलेल्या अम्ल) रंजकद्रव्यांना याहून कमी अम्लाची गरज असते.

  लोकरीला पक्क्या ,  उत्कृष्ट सौम्य रंगछटा द्यावयाच्या असल्यास क्रोम  ( किंवा रंगबंधक) रंजकद्रव्ये वापरतात. मेटॅक्रोम पद्धतीत रंजनक्रियेच्या सुरुवातीस क्रोम  ( सोडियम बायक्रोमेट) रंजकद्रव्याच्या कुंडात टाकतात. लोकरीवर रंजनक्रियेच्या आधी क्रोम रंगबंधकाचे संस्करण केल्यास रंजनक्रियेला क्रोमबॉटम  ( क्रोमपूर्व) आणि रंजनक्रियेच्या शेवटी क्रोम घातल्यास तिला टॉपक्रोम किंवा आफ्टरक्रोम  ( क्रोमोत्तर) रंजनक्रिया म्हणतात.

अत्यंत पक्क्या व भडक छटा हव्या असतील तेव्हा लोकरीला व्हॅट रंजकद्रव्ये व व्हॅट एस्टरेही लावतात. ल्यूको  ( श्‍वेत) व्हॅट एस्टरे ही व्हॅट रंजकद्रव्ये ज्याप्रमाणे सेल्युलोजाला लावतात ,  त्याप्रमाणेच लोकरीला लावली जातात. मात्र लोकरीच्या बाबतीत कमी तापमान ,  कमी क्षारता व अधिक प्रमाणात क्षपणकारक  ( सोडियम हायड्रोसल्फाइड) वापरतात.

   कृत्रिम तंतू : सेल्युलोज ॲसिटेट व ट्रायॲसिटेट  ( आर्नेल) तंतू विद्रावकात विद्राव्य असणाऱ्या रंजकद्रव्याच्या संधारणात  ( द्रवात लोंबकळत्या सूक्ष्म कणांच्या रूपात असलेल्या मिश्रणात) बुचकळून रंगवितात. अल्कोहोल-पाणी विद्राव किंवा विशिष्ट जलविद्राव्य अम्ल रंजकद्रव्यांचे फॉर्मिक अम्ल-पाणी यांतील विद्राव यांच्यात बुचकळूनही सेल्युलोज ॲ सिटेटाची रंजनक्रिया करता येते.

अम्ल ,  काही सरळ रंजकद्रव्ये इत्यादींनी पॉलिअमाइड तंतू लोकरीप्रमाणे रंगवितात. त्यांना सुती रंगणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतींनी व्हॅट रंजकद्रव्ये लावतात. नायलॉनला अपस्करित रंजकद्रव्ये लावण्यात येतात. ऑरलॉन ,  ॲ क्रिलान-१६ यांसारख्या ॲक्रिलिक तंतूंना फिकट रंगछटा देण्यासाठी ते उच्च तापमानाला अपस्करित  ( ॲसिटेट ) रंजकद्रव्यांनी रंगवितात. ॲ क्रिलिक तंतू ऋण विद्युत्‌ भारित असल्याने त्यांना गडद छटा देण्यासाठी ऋणायनी  ( विद्रावातून विद्युत्‌ प्रवाह जाऊ दिल्यास ऋणाग्राकडे जाणारी व धन विद्युत्‌ भारित) रंगदायीद्रव्ये सर्वांत चांगली आहेत.

ॲ क्रिलान ,  झेफ्रान ,  क्रेसलान ,  व्हेरेल यांसारखे सुधारित ॲ क्रिलिक तंतू रंगविण्यासाठी अपस्करित व क्षारक रंजकद्रव्ये तसेच नैसर्गिक तंतूंसाठी सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारी रंजकद्रव्ये वापरतात. टेरिलीन ,  कोडेल व फोरट्रेल हे पॉलिएस्टर तंतू अपस्करित रंजकद्रव्यांनी उच्च तापमानाला अथवा फुगविणारी व वाहक द्रव्ये वापरून रंगवितात. ल्यूको व्हॅट एस्टरे व गंधकी रंजकद्रव्ये यांनी उच्च तापमानाला पॉलिप्रोपिलीन तंतूंना मध्यम रंगछटा देण्यात येतात.

  रंगद्रव्य रंजनक्रिया : बंधक द्रव्यात अपस्करित केलेली रंगद्रव्ये लावून सर्व प्रकारचे तंतू रंगविता येऊ शकतात. याची परिणती येथे आसक्तीत वा खऱ्याखुऱ्या रंजनक्रियेत होत नाही.

   विद्राव ( डोप) वा कताई रंजनक्रिया : या क्रियेमध्ये दाबसारण वा बहिर्वेशन करण्याच्या आधी तनित्रातील  ( सूक्ष्म छिद्रे असलेल्या फवारणी करावयाच्या तोंडातील) रासायनिक संयुगात रंजकद्रव्य टाकतात वा मिसळतात. पॉलिप्रोपिलीन ,  नायलॉन ,  डायनेल किंवा टेरिलीन यांसारखे तंतू द्रव्याच्या वितळलेल्या रसापासून कातण्यात येतात  तेव्हा ते पुंजक्यांच्या वा जुडग्यांच्या रूपात रंगविता येतात. [ ⟶ तंतु ,  कृत्रिम] .

   रंजनक्रियेचा सिद्धांत : कापड ,  कागद ,  चामडे व फर यांवरच्या रंजनक्रियेच्या सर्वसामान्य पद्धतींमध्ये तंतू ,  विद्रावक व रंजकद्रव्य महत्त्वाचे घटक असतात.

 ( १) तंतू : एकवारिकाचे कित्येक रेणू जोडले जाऊन अधिक मोठा रेणू किंवा बहुवारिक तयार होते. सर्व तंतू अशी रेषीय  ( म्हणजे रुंदीच्या मानाने लांबी अतिशय जास्त असलेली) बहुवारिके आहेत ,  असे मानता येईल. नैसर्गिक रेशमाची व पुष्कळ कृत्रिक तंतूंची लांबी जवळजवळ अमर्यादित असते  उलट नैसर्गिक तंतूची लांबी मर्यादित असते.

तंतू अनेक छोट्या सूक्ष्मतंतूंचा म्हणजे तंतुकांचा बनलेला असतो. प्रत्येक तंतुक हा जुडग्यात एकत्र धरून ठेवलेल्या लांब ,  रेषीय बहुवारिकांचा बनलेला असतो ,  या बहुवारिकांना श्रृंखला रेणू म्हणतात. तंतुपरत्वे या शृंखला रेणूंमधील दुवे  ( जोड) भिन्नभिन्न प्रकारचे असतात. रंजनक्रिया करताना यांपैकी कोणत्याही दुव्यावर होऊ शकणारा संभाव्य रासायनिक आघात आधी विचारात यावा लागतो.

  तंतूच्या काही भागांमध्ये शृंखलांची मांडणी व्यवस्थितपणे तर काही भागांत विस्कळितपणे झालेली असू शकते. या भागांना अनुक्रमे सुव्यवस्थित किंवा अव्यवस्थित भाग म्हटले जाते. सुव्यवस्थित भाग घट्ट  ( आटोपशीर) असून त्यांच्यामुळे तंतूला बळकटी येते. उलट अव्यवस्थित भाग दुर्बळ असतात कारण यातील शृंखला पुरेशा समांतर नसतात. दुर्बल अव्यवस्थित भागांमध्ये पाण्याचे अथवा विद्रावकाचे रेणू प्रवेश करून आपल्या बरोबरचे रंजकद्रव्य तंतूच्या आत नेऊ शकतात. दुर्बल भागांचे प्रमाण जास्त असलेल्या तंतूवर रंजनक्रिया सहजपणे करता येते. काही नैसर्गिक तंतू चांगलेच सुव्यवस्थित असल्याने बळकट ,  दृढ किंवा रंजनक्रिया करण्यात अवघड असे असतात. पाण्यात किंवा द्रवामध्ये तंतू जेवढा अधिक फुगतो तेवढा तो रंगविणे अधिक सोपे असते. पाण्याचे रेणू बहुतकरून रंजकद्रव्याच्या रेणूंपेक्षा मोठे असतात व त्यामुळेच पाण्याचे रेणू रंजकद्रव्याच्या रेणूंसाठी असलेली तंतूची संरचना खुली करतात. पुष्कळ कृत्रिम तंतूंमध्ये थोडेच पाणी शोषले जाते ,  अशा तंतूंना अधिक सहजपणे रंग द्यावयाचा असल्यास ते १००० से. पेक्षा अधिक तापवून फुगविले जाणे आवश्यक असते. मानवनिर्मिती तंतू कातला जाताना तंतूभोवती एक प्रकारचे आवरण तयार होते. नैसर्गिक तंतूंचे बाह्यस्तर संरक्षक म्हणून चिवट असतात. तंतूभोवतालच्या अशा पटलाने रंजकद्रव्याचे रेणू आत जाण्याला अडसर निर्माण होतो. हा अडथळा तंतू तापवून दूर करण्यात येतो.

 ( २) विद्रावक : रंजनक्रिया बहुधा पाण्यात करण्यात येतात. रंजकद्रव्य विद्रावात विरघळते आणि त्यामुळे ते तंतूपर्यंत वा त्याच्या आत नेणे शक्य होते. विद्रावकामुळे रंजकद्रव्याचे विद्रावातील प्रमाण एकसारखे होते  तसेच त्याच्यामुळे तंतू फुगून त्यातील संरचना खुल्या होतात. पाण्यात न विरघळणारी रंगदायी द्रव्ये लावण्यासाठी किंवा पाण्याने जे तंतू सहज फुगत नाहीत असे तंतू रंगविण्यासाठी कार्बनी विद्रावक वापरतात. कार्बनी विद्रावक महाग असल्याने ते मोठ्या प्रमाणात परत मिळविता आल्यास रंजनक्रिया स्वस्त पडते. कधीकधी पाणी व कार्बनी विद्रावक यांची मिश्रणेही रंजनक्रियेत वापरतात. त्यामुळे तंतू फुगविण्यासाठी पाणी उकळण्याची गरज उरत नाही. जलरोधी तंतूंच्या बाबतीत वाहक संयुगे वापरणे ही नित्याची गोष्ट असून रंजकद्रव्य या संयुगांमध्ये पाण्यापेक्षा अधिक सहजतेने विरघळते. अशा वाहकांची तंतूभोवती गोळा होण्याची प्रवृत्ती असल्याने रंजकद्रव्याचे जादा प्रमाण असलेल्या स्थानिक विद्रावात तंतू बुडवितात. परिणामी रंजनक्रिया जलदपणे होते.


 ( ३) रंजकद्रव्य : विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश द्रव्यांकडून शोषला गेल्याने ती रंगीत दिसतात. अनुस्फुरक झळाळी आणणारी द्रव्ये ही जवळजवळ रंगहीन रंजकद्रव्ये असतात. व्यापारी रंजकद्रव्ये ही शुद्ध संयुगे नसतात कारण एका प्रमाणभूत उत्पादनाचा दर्जा देण्यासाठी त्यांच्यात विरलकारक  ( रंजकद्रव्याची संहती-प्रमाण-कमी करणारी द्रव्ये) नावाची निष्क्रिय द्रव्ये मिसळलेली असतात. बहुतेक रंजकद्रव्ये विद्रावामध्ये बहुधा मोठ्या रंगीत आयनांच्या मोठ्या पुंजक्यांच्या रूपात असतात आणि अधिक छोटे रंगहीन आयन त्यांच्या जोडीने असतात. तापमान वाढल्यास हे पुंजके तुटतात. अधिकाधिक लहान होत जाणारे हे छोटे घटकही पुष्कळ मोठे असून ते केवळ तंतूच्या फुगलेल्या दुर्बल भागातच प्रवेश करू शकतात. पुंजका जर रंजकद्रव्याच्या तीनाहून अधिक रेणूंचा बनलेला असेल ,  तर तो बहुधा असा आत शिरू शकत नाही. रंजकद्रव्य व तंतू यांना धरून ठेवणाऱ्या बंधाचा प्रकार हा त्या दोघांच्या रासायनिक स्वरूपांवर अवलंबून असतो.

   रंजनक्रियेची यंत्रे : रंजनक्रियेच्या प्रक्रियेमध्ये शक्य तेवढा कमाल समतोल साधला जाण्यासाठी आणि या मार्गाने विद्रावातील रंजकद्रव्य योग्य प्रकारे हमखास वापरले जाण्यासाठी तंतू व रंजकद्रव्याच्या विद्रावाचे कुंड  ( पात्र) यांना परस्परसापेक्ष गती असावी लागते ,  म्हणजे या दोघांची एकमेकांच्या संदर्भात हालचाल व्हावी लागते. अशा हालचालीमुळे रंजकद्रव्याच्या स्थलांतराला चालनाही मिळते व रंजकद्रव्य सर्वत्र एकसारखे विखुरले जाऊन रंग एकसारखा लावला जाण्यास मदतही होते. जर विद्राव रंग द्यावयाच्या वस्तूंमधून जाऊ दिला ,  तर अधिक क्षोभ  ( खळबळ) निर्माण होतो. उलट जर वस्तू विद्रावातून नेल्या ,  तर या वस्तूंची प्रवृत्ती रंजकद्रव्याचे स्थिर पृष्ठीय थर घेऊन जाण्याची असते. काही पद्धतीत वस्तू व विद्राव या दोन्हींना गती दिलेली असते.

  रंजकद्रव्याच्या विद्रावाचे कुंड आणि तंतू व हा विद्राव यांच्यामध्ये सापेक्ष हालचाल निर्माण करणारी प्रयुक्ती हे रंजनक्रिया यंत्रातील मूलभूत घटक होत. कुंड पुन्हा भरले जाणे आणि वस्तू कुंडात घालणे व बाहेर काढणे ही कामे करणाऱ्या प्रयुक्त्त्या यंत्रात असतात. लोखंडी सौम्य पोलादाच्या पात्रांमुळे गंजाचे डाग पडणे आणि काही रंजकद्रव्ये खराब होणे शक्य असते. अगंज पोलादी पात्राचे पृष्ठ मात्र अक्रिय  ( विक्रिया न होणारे) ,  गुळगुळीत व सहज धुता येऊ शकणारे असते. यांशिवाय या पात्रासाठी मोनेल  ( निकेल व तांबे युक्त) व इंकोनेल  ( निकेल ,  क्रोमियम व लोहयुक्त) या मिश्रधातू थोड्या प्रमाणात वापरल्या जातात. रंजनक्रियेत प्लॅस्टिकेही वाढत्या प्रमाणात वापरली जात आहेत कारण त्यांच्यावर रंजकद्रव्यांच्या बहुतेक विद्रावांची विक्रिया होत नाही. रंजकद्रव्याच्या कुंडामध्ये बहुधा सुरुवातीलाच सर्व घटक विद्रावात टाकणे योग्य नसल्याने रंजनक्रियेची प्रक्रिया चालू असताना ते टाकण्यात येतात. अशा वेळी असमान रंजनक्रिया टाळण्यासाठी विद्राव व आधारद्रव्य ते पूर्णतया वेगळे केले पाहिजे व पुष्कळ यंत्रांत तशी सोय केलेली असते.

  आधुनिक यंत्रांमध्ये भक्कम ,  स्वतंत्र विद्युत्‌ चलित्रे  ( मोटारी) असून त्यांच्यावर रंजनक्रियेच्या कारखान्यातील दमट परिस्थितीचा परिणाम होत नाही. कुंडातील विद्रावाचे अभिसरण करण्यासाठी पंप ,  पिचकाऱ्या किंवा पंखे वापरतात. विद्राव गाळण्याची योजना असते. सामान्यतः तापविण्यासाठी वाफ वापरतात. यासाठी वाफेची बंद वेटोळी किंवा उघड्या नळांतील प्रत्यक्ष वाफ वापरतात. प्रत्यक्ष वाफ वापरल्याने जोरदार क्षोभ निर्माण होतो ,  कधीकधी हा क्षोभ उपयुक्त ठरतो  पण त्यामुळे कुंडातील विद्राव विरळही होतो.

  वस्तू यंत्रात ठेवणे व त्या यंत्रातून काढून घेणे या क्रिया त्वरेने करण्यासाठी हलत्या याऱ्या व इतर साहाय्यकारी यांत्रिक साधने वापरतात. या क्रियांमध्ये पुष्कळ वेळ वाया जाण्याची शक्यता असल्याने अखंड रंजनक्रिया पद्धती जास्त पसंत केल्या जातात.

बहुतेक यंत्रांमध्ये थोड्याफार प्रमाणात स्वयंचलित नियंत्रण असते. कुंडाचे तापमान वाढविण्याच्या वेगाचा रंजनक्रियेच्या एकसारखेपणावर परिणाम होतो. ⇨तापनियंत्रकांद्वारे या प्रक्रियेचे चांगले नियंत्रण करता येऊ शकते. कुंडातील विद्रावाची अम्लता अथवा क्षारता हा पुष्कळदा रंजनक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असून त्याचेही नियमन स्वयंचलितपणे करता येऊ शकते. कुंडातील रंगदायी द्रव्याची संहती  ( प्रमाण) नोंदण्यासाठी प्रकाशकीय उपकरणे वापरता येऊ शकतात.

   रंजनक्रियेच्या पद्धती : पुढील चार रूपांमध्ये तंतू रंगविता येऊ शकतात.

  सुटे वा सैल तंतू : कताईच्या आधीचे पीळ न दिलेले सैलसर स्थितीतील तंतू रंगविल्यास रंजकद्रव्य तंतूंच्या पुंजक्यात सहजपणे घुसू शकते आणि यात येणारी असमानता ही उत्पादनाच्या नंतरच्या टप्प्यात काढून टाकण्यात येते. सैल तंतू शक्य तो सर्वाधिक साध्या साधनांचा वापर करून रंगवितात कारण रंग संपूर्णतया एकसारखा लागण्याची गरज असते. यासाठी एक गरम करता येणारे धारक पात्र वापरतात व त्यातील तंतूचा जुडगा अधूनमधून हाताने ढवळतात. मात्र तो खळबळणे अवघड असून यापेक्षा यंत्रे अधिक स्वस्त पडतात.

रंजनक्रियेच्या सुधारित पद्धतीमध्ये कुंडात सावकाश अभिसरण होत रहाते. या पुढची सुधारणा म्हणजे सुटे तंतू मध्यभागी सच्छिद्र नळ असलेल्या सच्छिद्र पात्रात ठेवतात. यामुळे तंतूचा जुडगा सहजगत्या वर उचलता येतो व यंत्रातून इतरत्र नेता येतो.

  उलट पर्यायी पद्धतीत वस्तू विद्रावातून रेटून पुढे नेल्या जाऊ शकतात. या तत्त्वानुसार कार्य करणाऱ्या यंत्राच्या एका प्रकारात चार कप्प्यांचे सच्छिद्र पिंप असून कप्प्यांत तंतू ठेवतात. हे पिंप अर्धवट बुडालेल्या स्थितीत बाहेरील रंजकद्रव्याच्या कुंडात फिरते. दुसऱ्या एका प्रकारच्या यंत्रात सुटे तंतू वरच्या व खालच्या तारेच्या निरंत पट्ट्यात रुंद धाग्यासारखे धरून ठेवलेले असून ते तापविलेल्या रंजकद्रव्य कुंडातून नेले जातात. सुट्या तंतूंच्या आणखी एका रंजनक्रियेत रंजकद्रव्याचा विद्राव एका नळीत असतो व तंतू तीतून अखंडपणे पुढे सरकत असतो  रंजकद्रव्याचे अभिसरण होण्यासाठी पंपाची योजना केलेली असते.

अर्धवट वा पूर्ण तयार कपडे ,  पायमोजे व घरगुती वापराचे लिनन कपडे यांच्यावर करण्यात येणारी रंजनक्रिया पुनर्रंजनक्रिया ही काहीशी सुट्या तंतूवर करण्यात येणाऱ्या रंजनक्रियेसारखी असते. सर्वसाधारणपणे या वस्तू विद्रावातून नेण्यात येतात व त्या नाजूक असल्यास जाळीदार पिशव्यांत ठेवतात.

  सुताची रंजनक्रिया : लड ,  ताणा अथवा चाती व शंकू  ( कोन) यांसारखे सुताचे तयार गुंडे या रूपांत सुताची रंजनक्रिया करतात. लडी कमी असल्यास सुताची रंगणी एका उघड्या लांबोडक्या पिंपात  ( व्हॅटमध्ये) करतात  या पिंपाला ‘बेक’ म्हणतात व यात वाफेने तापविण्यात येणारे पात्र असून त्याच्या माथ्यावर टेकलेल्या काठ्यांवर अथवा दांड्यांवर सूत टांगलेले असते. लडी वरचेवर फिरवून रंग एकसारखा केला जातो. रंगाची जादा भर टाकताना लडी बेकच्या वर उचलून घेण्यात येतात.

आ. १. हुसाँग यंत्र : (१) विद्युत चलित, (२) पंखा, (३) चोरकप्पा, (४) सुताच्या लडी, (५) रंजकद्रव्य कुंड, (६) टाकी, (७) लडी अडकविण्यासाठी साधन, (८) लडी वर खाली करण्यासाठी उच्चालक साधन.

फिरत्या रिळावरूनही लडी विद्रावात लोंबकळत ठेवता येतात. रिळामुळे लडी एकसारख्या फिरत राहतात व वेळोवेळी त्यांच्या फिरण्याची दिशा बदलली जाते. उष्णतेची बचत करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण बंदिस्त यंत्रातही असे फिरते रीळ वापरतात  या  यंत्रात तळाशी असलेल्या साठ्यातून गरम विद्राव पंपाने खेचून घेऊन फिरत्या लडींवर फवारण्यात येतो.

हुसाँग यंत्रात एक पात्र असून त्यामध्ये एक सच्छिद्र चोरकप्पा व त्याखाली विद्राव तापविण्यासाठी लागणारी वेटोळी बसविलेली असतात. रंजकद्रव्याच्या कुंडाच्या पात्राच्या एका टोकाला प्रवाहनियामक पट्टी बसविलेली असते. या अधिक छोट्या कक्षातील पंख्यामुळे या पट्टीखाली ,  पंख्याच्या कक्षामधून ,  या पट्टीवरून व लडीमधून या मार्गाने होणाऱ्या अभिसरणाला गती मिळते. अधिक मोठ्या कक्षातील एका वाहक साधनात अडकविलेल्या काठ्यांवरून लडी लोंबकळत असतात. हे साधन खाली आणि वर करता येते. पर्यायी पद्धतीत ताणलेल्या चौकटीत लडी पक्क्या करून ठेवता येतात आणि विद्रावाचे अभिसरण फक्त एकाच दिशेने करण्यात येते.


लडी नाडीने एकमेकींना बांधून त्यांची एक अखंड माळ तयार करता येऊ शकते. नंतर अशी माळ रूळ व दाबरूळ असलेल्या मोठ्या लांबोडक्या पात्रांच्या  ( बेकच्या) रांगेतून सलगपणे नेऊन रंजनक्रिया करण्यात येते. याच प्रकारे ताणे रंगवितात. लडींच्या कित्येक माळांची समांतर मांडणी करून एकाच वेळी अनेक माळा रंगविता येतात.

गुंड्याची रंजनक्रिया : सूत गुंडाळून बनविलेले तयार गुंडे रंगविण्यासाठी वापरण्यात येणारी रंजनक्रिया मुख्यतः या वस्तूंमधून होणाऱ्या विद्रावाच्या अभिसरणावर आधारलेली असते. आदर्श स्थितीत विद्राव आत शिरणे व रंग एकसारखा लागणे या गोष्टी साध्य करण्यासाठी गुंडे एकसारखे गुंडाळलेले असतात कारण तंतुमय जुडगा गाळण्याप्रमाणे क्रिया करतो म्हणून विद्रावामध्ये निलंबित स्वरूपांतील घन द्रव्ये नसावीत ,  तर रंजकद्रव्ये सहजपणे विरघळणारी असावीत.

निलंबित घन पदार्थ गुंड्यांमध्ये घुसू नयेत म्हणून गुंडे पिशव्यांमधून ठेवता येतात. रंगद्रव्य आत शिरण्यास साहाय्य करण्यासाठी मध्यभागी एक वाहक वापरता येऊ शकतो. शक्तिशाली पंपाचा वापर ,  निर्वाताद्वारे जादा पाणी काढून टाकणे आणि गरम हवेचा झोत आत सोडून सुकविणे या गोष्टीचा वापर करण्यात येतो. गुंड्यात विकृती निर्माण होऊ नये म्हणून कोठल्याही प्रकारच्या गुंड्याची सुकविण्याची क्रिया एकसमानपणे व सावकाशपणे करावी लागते.

ताग्याची रंजनक्रिया : ताग्यांचे अखंड रूप हे या पद्धतीने रंजनक्रिया करण्यास सुयोग असून तागे विद्रावातून नेऊन रंगविण्यात येतात. सुरकुत्या पडू न देता व रचनेला धक्का पोहोचू न देता तागा रंगविणे शक्य असले ,  तर तागे पिळ्याच्या रूपात हाताळणे शक्य असते ,  अन्यथा पन्हा ताणून धरून रंजनक्रिया करावी लागते.

आ. २. सुताच्या गुंडयांची रंजनक्रिया करणारे यंत्र : (१) रंजक द्रव्य कुंड, (२) सच्छिद्र पोकळ नळया, (३) सुताचे गुंडे, (४) दाब पात्र, (५) गुंडयाच्या बाहेरुन आतमध्ये येणारा प्रवाह येथून जातो, (६) गुंडयाच्या आतुन बाहेर जाणारा प्रवाह येथून जातो, (७) निचरा, (८) प्रवाहाची दिशा बदलणारी झडप, (९) प्रत्यक्ष काम करण्याच्या जमिनीची पातळी.

जिग यंत्रात दोन मोठे रूळ असतात  ताणलेल्या पन्ह्याच्या रूपातील कापड या रुळांवरून आलटून पालटून गुंडाळले व उलगडले जाते. कापड पात्रातील रंजकद्रव्याच्या विद्रावातून जाते  मार्गदर्शक रुळांच्या मदतीने कापड एका मोठ्या रुळाकडून दुसऱ्याकडे नेले जाते.   कापड विद्रावात बुडून राहण्याचा काळ अल्प असून बहुतेक रंजनक्रिया कापड रुळांवर असताना होते आणि त्यामुळे जास्त उष्णता गमावली जाते. यावर उपाय म्हणून पुष्कळ वेळा जिगच्या माथ्यावर झाकण घालतात. जिग यंत्र सामान्यपणे तापस्थाची नियंत्रित अशा वाफयुक्त वेटोळ्यांनी तापविण्यात येते. विद्रावातून जाताना कापडाच्या पृष्ठावरून सावकाश हलणारे द्रवाचे पटल नेले जाते  हे होताना रंजकद्रव्याच्या कुंडात रवीसारख्या साधनांद्वारे क्षोभ निर्माण करता येऊ शकतो.  ( पहा  :  खंड ३ ,  चित्रपत्र ३५).

विशेषकरून नाजूक कापडावर ताणलेल्या पन्ह्याच्या रूपात रंजनक्रिया करणारे दुसरे यंत्र म्हणजे स्टारफ्रेम हे होय. यामध्ये चौकटीत कापड मळसूत्री रूपात धरून ठेवतात. चौकटीच्या दोन मोठ्या बाजूंवर आकडे बसविलेले असतात व आकड्यांत कापडाची किनार अडकविलेली असते. अंशतः बुडविलेली ही यंत्रणा तिच्या अक्षाभोवती एका उघड्या ,  पुरेशा जुळत्या आकारमानाच्या खोलगट पात्रातून फिरविण्यात येते. वाफेच्या वेटोळ्यांच्या मदतीने कुंड गरम करण्यात येते आणि विद्राव ढवळला जाऊन रंजनक्रिया एकसमान होण्यासाठी अक्षाला फिरतानाच किंचित एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला गती देतात.

  कुंड-दाबरूळ पद्धती :  जेथे वस्तू हालत असते तेथे ही बहुधा रंजनक्रियेची सर्वोत्कृष्ट पद्धती आहे. या पद्धतीत विद्रावाची कापडभर एकसारखी वाटणी होते. यासाठी विद्रावाने संपृक्त  ( ओलेचिंब) झालेले कापड दाबरूळांमधून जाऊ देण्यात येते. त्यामुळे जादा विद्राव निपटून निघून जातो. या यंत्रात एक उथळ पात्र किंवा कुंड असून त्यात कापडाची दिशा निश्चित करणारे मार्गदर्शी रूळ असतात आणि त्यांवर दोन वा तीन दाबरूळ बसविलेले असतात. दोनपैकी एक रूळ सामान्यतः अगंज पोलादाचा व दुसरा कठीण रबराचा असतो ,  तर तीन रुळांच्या यंत्रात दोन रुळ अगंज पोलादाचे आणि तिसरा कठीण रबराचा असतो. हे रुळ बहुधा एकमेकांच्यावर अथवा कधीकधी एकमेकांशेजारी असतात.


आ. ३. कुंड-दाबरुळ पध्दतीची सर्वसाधारण प्रकारची तीन यंत्रे

( १) विद्रावातील मार्गदर्शी रुळाखालून जाणारे कापड नंतर दाब रुळांमधून जाते व त्यामुळे जादा झालेले रंजकद्रव्य निपटून काढले जाते [आ. ३  ( अ)] . ( २) दुसऱ्या प्रकारच्या यंत्रात तळाचा रूळ अंशतः विद्रावात बुडालेला असतो व जास्त वेगात असताना हा रूळ स्वतःबरोबर उचलून घेतलेला विद्राव रुळांमधून जाणाऱ्या कापडाला लावतो [आ. ३  ( आ)]. विद्रावाद्वारे सहजपणे संपृक्त न होणाऱ्या कापडासाठी तीन रुळांची यंत्रे वापरतात [आ. ३  ( इ)] .  यात कापड विद्रावाबाहेरील छोट्या मार्गदर्शी रुळाखालून खालील दोन दाबरुळांमधून जाते. नंतर मागील मार्गदर्शी रुळाखालून परत विद्रावात बुडविले जाऊन शेवटी वरच्या व मधल्या दाबरुळांतून पुन्हा एकदा पिळून काढले जाते.

  

 आ. ४. विल्यम्स-एकक श्रेणी : (१) गरम वाहिनी, (२) कोरडा संभरणतक, (३) कुंड, (४) क्षपणकारक, (५) धुलाई, (६)ऑक्सिडीभवन, (७) सीबण, (८) शुष्कक, (४ ते ६) विल्यम्स,-एकके.

  

आ. ५. विल्यम्स-एकक : (१) कापड, (२) संभरणक, (३) कुंड, (४) विद्राव पातळी, (५) वाफ, (६) निरोधक, (७) निचरा

 

 

रहाट यंत्र : ( विंच). कापड रंगविण्याच्या या सर्वांत जुन्या यंत्रात रंजकद्रव्याच्या गरम विद्रावाच्या कुंडावर एक रहाट बसविलेला असतो.  रहाट वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार असून लंबवर्तुळाकार रहाट सामान्यपणे नाजूक कापडासाठी वापरतात. कापडाचे पिळे करून त्यांची माळ करूनही ते रंगविण्यात येतात आणि यंत्राच्या रुंदीनुसार पिळ्यांची संख्या ठरते. कुंडाच्या पुढे सच्छिद्र पडदी असून तिच्यामुळे बनलेल्या कक्षात वाफेचे नळ व रंजकद्रव्ये असतात. पुष्कळदा हे यंत्र पूर्णतया बंदिस्त असते. त्यामुळे तापमान टिकून राहते व वाफेची बचत होते. परिणामी कापड तापणे आणि थंड होणे या क्रिया एकसारख्या गतीने होतात. अलीकडे या यंत्रात स्वयंचलित तापमान नियंत्रक ,  गुंतागुंत झाल्यास यंत्र आपोआप बंद करणारी यंत्रणा इ. बसवून सुधारणा करण्यात आल्या आहेत.  ( पहा  :  खंड ३ ,  चित्रपत्र ३५).

  ताग्याची अखंड रंजनक्रिया :  सुती ,  व्हिस्कोज ,  रेयॉन व पॉलिएस्टर-सुती कापडांचे तागे रंगविण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे. हिच्यामुळे श्रम ,  रसायने व रंजकद्रव्ये यांची बचत होते आणि रंग एकसारखा बसतो ,  मात्र या पद्धतीसाठी एकाच रंगाची मोठी मागणी असणे आवश्यक असते. गंधकयुक्त रंजकद्रव्ये ,  मिनरल खाकी आणि ॲनिलीन ब्लॅक या रंगांच्या बाबतीत ही पद्धती दीर्घकाळापासून वापरात आहे. या पद्धतीत ताग्यावर साबणाची प्रक्रिया करणाऱ्या व धुणाऱ्या उघड्या सोपर यंत्रांची  ( पहा  :  खंड ३ ,  चित्रपत्र ३५) रांग असते व तिच्यातून कापड नेले जाते. संपूर्ण रुंदीभर रूळ बसविलेले पात्र म्हणजे सोपर होय. या रुळांमुळे कापड विद्रावामधून नागमोडी   मार्गाने नेता येते आणि टोकाशी दाबरूळ असतो. अशी पुष्कळ प्रकारची यंत्रे वापरात असून त्यांपैकी काहींचे थोडेसे वर्णन खाली दिले आहे.  

आ. ६. अखंड रंजकक्रिया श्रेणी : कुंड-बाष्प यंत्रणा : (१) गरम वाहिणी, (२) शीतक, (३) कापडाचा प्रवेशमारेर्ग, (४) रंजकद्रव्य कुंड, (५) रसायनयुक्त कुंड, (६) बाष्पकोठी, (७) धुलाई, ऑक्सिडीकारक, साबणीकारक श्रेणी, (८) कापडाचे बहिर्गमन.

( १) रुळयुक्त कालप्रभावन यंत्र  :( एजर). हे यंत्र म्हणजे एक बाष्पकोठी असून तीत रुंदीभर असलेल्या रुळांमुळे कापड जास्तीत   जास्त नागमोडी मार्गाने नेले जाते. भिंतीतील वाफेच्या वेटोळ्यांमुळे १००० से.पेक्षा जास्त तापमान मिळते आणि   प्रत्यक्ष वाफही विविध ठिकाणी सोडता येते. गरम झालेले कापड फटीसारख्या एकाच द्वारामधून आत जाते व   बाहेर पडते. रुळांद्वारे रंजकद्रव्य व आवश्यक रसायने कापडाला लावली जातात. एका प्रकारच्या यंत्रात कापड   सावकाशपणे फिरणाऱ्या स्तंभांवरून तोरणाप्रमाणे पुढे जाते. नवीन प्रकारांत तापविण्यासाठी वाफेऐवजी विजेचा   वापर करतात आणि यंत्रामध्ये दमट ,  हवारहित परिस्थिती राखण्यात येते.


 ( २) विल्यम्स-एकक  ( संच) पद्धती  :  एका टाकीत पोकळ असे आडवे अडथळे असून या अडथळ्यांच्या दरम्यान कापड मार्गदर्शी रुळांवर नागमोडी मार्गाने नेले जाते. तापविण्यासाठी जलीय विद्राव अथवा व्हाइट ऑइल वापरतात. येथे रंजकद्रव्याचे स्थिरीकरण  ( पक्के होण्याची क्रिया) जलीय प्रावस्थेत होते. विद्राव थोडा आणि अरुंद मार्गात असतो. त्यामुळे यातून कापड जाताना त्यात पुष्कळ खळबळाट निर्माण होतो. कापडाची दिशा बदलते तेव्हा कापडात मोठ्या प्रमाणात विद्राव घुसतो. विल्यम्स-एकक एकेकटे अथवा त्यांची मालिका वापरतात. अशा संपूर्ण श्रेणीमध्ये बहुतकरून कुंड ,  शुष्कन सामग्री ,  ७ ते १० विल्यम्स-एकके अथवा ही २ एकके व ५ ते ८ धुलाई पेट्या आणि शेवटी अगंज पोलादी ,  कोरड्या पात्रांची मालिका हे घटक असतात. श्रेणीतील एककांमुळे काल ,  तापमान व विक्रियाकारकांची संहती यांचे अचूकपणे नियमन करता येते. दाबरुळांमुळे विद्राव व कापडही निकट संपर्कात येतात  ( आ. ४ व ५).

( ३) द्यू पाँ कुंड-बाष्प प्रक्रिया  :  या प्रक्रियेत नियंत्रित परिस्थितीमध्ये रंजकद्रव्याचे स्थिरीकरण करण्यासाठी वाफेचा उपयोग केला जातो. वाफेच्या कोठीत मध्याशी व तळालगत अगंज पोलादी रुळांची ओळ असते. या रुळांवरून आलटून पालटून जाताना कापडाला वाफ देण्याची क्रिया होते. वाफेचे संघनन  ( द्रवीभवन) होऊन रंगाचे ओघळ येऊ नयेत म्हणून तापमान १००0 से. पेक्षा बरेच जास्त ठेवतात. कापड पुढच्या अरुंद फटीतून आत जाते व एका जलाभेद्य छिद्रातून कोठीच्या बाहेर पडते.

खास रंजनक्रिया : मिश्रतंतुयुक्त कापडाची रंजनक्रिया : दोन वा अधिक प्रकारचे तंतू (उदा., कापूस व लोकर, व्हिस्कोज व ॲसिटेट रेयॉन) एकत्र विणून बनविलेल्या अशा कापडांवर रंजनक्रिया करण्याच्या एका पद्धतीत प्रथम प्रत्येक प्रकारचा तंतू अलग अलग रंगवून घेऊन विणकाम करतात. उलट दुसऱ्या पद्धतीत विणून घेतलेल्या कापडावर रंजनक्रिया करतात. अपेक्षित छटा देणाऱ्या रंजकद्रव्यांचे योग्य प्रकारचे मिश्रण असलेल्या कुंडात कापड रंगविणे ही सर्वांत सामान्य व स्वस्त पद्धती आहे मात्र यासाठी उत्कृष्ट कौशल्याची गरज असते.

बाटिक रंजनक्रिया : जावात ही पद्धती पूर्णत्वास गेली आहे. या पद्धतीत वितळलेल्या मेणाच्या मदतीने कापडावर प्रथम नक्षी काढतात आणि मेण घट्ट झाल्यावर रंजनक्रिया करतात. मेणाच्या ठिकाणचे कापड रंगीत होत नाही. निरनिराळे रंग वापरून ही प्रक्रिया कित्येक वेळा पुनःपुन्हा करावी लागते. ही पद्धती सावकाशपणे होणारी असली, तरी तिच्याद्वारे सुंदर नक्षी काढता येऊ शकते. [⟶ बाटिककाम].

बांधणी : या परंपरागत भारतीय प्रकारात रंजनक्रिया करण्यापूर्वी वस्त्राला प्रथम गाठी मारून घेतात व नंतर ते रंगविण्यात येते. सामान्यतः रेशमी, मलमल, सुती कापड, खादी व सॅटिन या कापडांसाठी ही पद्धती वापरतात. भारतात विशेषकरून गुजरात व राजस्थान येथे अशी वस्त्रे रंगविण्यात येतात. [⟶ बांधणी].

कापडावरील छपाई : व्यापारी दृष्ट्या हिला खूप महत्त्व आहे. यामध्ये ठराविक आकृतिबंधांच्या रूपात कापडावर रंग लावण्यात येतो. भारत व चीनमध्ये ही कला हजारो वर्षांपासून चालत आली आहे व अजूनही वापरात आहे. ठसे, कोरीव फर्मे व छपाई यंत्रे यांद्वारे ही क्रिया करतात. सुती कापडावर अधिक प्रमाणात छपाई करतात. रेयॉन व इतर संश्लेषित तंतूंच्या कापडावरही छपाई करतात, तसेच लोकरी कापडापेक्षा रेशमी कापडावर अधिक छपाई केली जाते. [⟶ कापड छपाई].

कापडाशिवाय इतर पदार्थांची रंजनक्रिया : कापडावर रंजनक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रंजकद्रव्यांची संख्या इतर पदार्थांवरील रंजनक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या रंजकद्रव्यांपेक्षा पुष्कळच जास्त आहे. कापडासाठीची रंजकद्रव्ये पुष्कळदा चामडे, कागद, ॲनोडाइझ्‌ड ॲल्युमिनियम व तत्सम पदार्थ यांच्यासाठीही निवडली जातात. तथापि या पदार्थांसाठी खास रंजकद्रव्येही आहेत.

ॲनोडाइझ्ड ॲल्युमिनियम : यासाठी विद्युतीय पद्धतीने ऑक्सिडीभवन केलेल्या पृष्ठभागांवर या ऑक्साइडाच्या लेपाविषयी असणाऱ्या रंजकद्रव्याने रंजनक्रिया करतात व ते रंजकद्रव्य पक्के होण्यासाठी पृष्ठभागावर संस्करण करतात. अशा प्रकारे ॲल्युमिनियम ऑक्साइडाचा लेप साचून रंजकद्रव्याची ॲल्युमिनियमयुक्त लवणे निर्माण झाल्याने रंजनक्रिया पूर्ण होते, असे पूर्वी मानीत असत परंतु लवण निर्मिणारे गट नसलेल्या पुष्कळ रंजकद्रव्यांनी या लेपावर रंजनक्रिया करता येते, असे आता आढळले आहे. ॲनोडाइझ्ड ॲल्युमिनियमावर कापडासाठीच्या अनेक रंजकद्रव्यांनी रंजनक्रिया करता येते तथापि याचे रंग प्रकाश व हवामान यांमुळे कापडाच्या रंगाएवढे सहज खराब होत नाहीत.

कागद : येथे सर्वसामान्यपणे द्रवरूप लगद्यातच रंजकद्रव्य टाकण्यात येते. त्याकरिता बहुधा सुतासाठीची तर प्रसंगी लोकरीसाठीची रंजकद्रव्ये व कधीकधी रंगद्रव्ये (काजळी, नीळ इ.) वापरतात. तयार कागद रुळांवरून जाऊ देऊनही रंगविण्यात येतो. येथे कागदाच्या पृष्ठाला रुळांकडून रंजकद्रव्य वा रंगीत लेप मिळत असतो. क्षारक रंजकद्रव्यांना लाकडापासून केलेल्या लगद्याविषयी चांगली आसक्ती असते. इतर रंजकद्रव्येही वापरतात. [⟶ कागद].

लाकूड : लाकडावर रंजनक्रिया करण्यासाठी सामान्यतः रंजकद्रव्याचे विद्राव (विशेषतः पाण्याशिवाय इतर विद्रावकांतील विद्राव) अथवा पाणी, विद्राव किंवा लॅकर यामध्ये अपस्करित झालेले रंजकद्रव्य वापरतात. उच्च तापमान व दाब असताना पाण्यातील विद्राव लाकडाला लावून रंजनक्रिया करतात. नुकत्याच तोडलेल्या वृक्षाच्या ओंडक्यामध्ये लांबीला अनुसरून पंपाने रंजकद्रव्याचा विद्राव आत घुसवूनही लाकूड रंगवितात. लाकडातील नैसर्गिक ओलावा आणि जीवनरस यांची जागा विद्राव घेतो.

चामडे : चामड्याची रंजनक्रिया लोकरीच्या रंजनक्रियेच्या प्रकारची आहे तथापि कातडी कमाविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे ती गुंतागुंतीची होते, तसेच रंजकद्रव्याच्या उकळत्या विद्रावाने चामड्यावर असे संस्करण करता येत नसल्याने घट्ट चामड्यात रंजकद्रव्य घुसविणे अवघड असते. व्हॅट व नॅप्थॉल वगळता सर्वसामान्यतपणे लाकडासाठीची व सुती कापडासाठीची रंजकद्रव्ये (उदा., अम्ल, सरळ) चामड्यावर कमी तापमानाला (४० ते ५० अंश से.) रंजनक्रिया करण्यासाठी वापरतात. रंजकद्रव्य पूर्णपणे खर्ची घालण्यासाठी सामान्यपणे फॉर्मिक अम्ल वापरतात. पोषाखातील हातमोजांसाठी चामड्याची फक्त वरची बाजू रंगवितात व मांसाकडील बाजू तशीच ठेवतात. लॉगवुड, फुस्टिक व क्वेर्सिट्रॉन यांसारखी नैसर्गिक रंगद्रव्येही चामडी रंगविण्यासाठी वापरतात. कमाविल्यानंतरचे चामडे आणि पुष्कळ आर्द्रता असलेले जाते कातडे कोरड्या जलविद्राव्य रंजकद्रव्याबरोबर उलटापालट करून रंगवितात. यामुळे रंजकद्रव्य अधिक आतपर्यंत पोचते, असे म्हणतात. चामडे रंगविण्यासाठी सामान्यतः किंचित अम्लीय विद्रावात रंगबंधक रंजकद्रव्ये वापरतात. केवळ पृष्ठभाग रंगविण्यासाठी विद्राव कुंचल्याने लावतात वा फवारतात. [⟶ चर्मोद्योग].

खाद्यपदार्थ व पेये : यांतही रंजकद्रव्ये मोठ्याप्रमाणात वापरली जातात. या रंजकद्रव्यांचे प्रकार, त्यांचे प्रमाण आणि त्यांच्या शुद्धतेविषयीची मानके यांच्या बाबतीत बहुतेक देशांत कडक नियम केलेले आढळतात. कृत्रिम रंगाच्या बहुतेक खाद्यपदार्थांवर प्रत्यक्षात रंजनक्रिया केलेली नसते. मॅराशिनो चेरीवर मात्र खाद्य रंजकद्रव्यांनी कित्येक तास रंजनक्रिया केली जाते. नंतर त्या धुवून स्वादकारक पाकात ठेवतात. ग्लेझ्ड सिट्रॉन, सायट्रस व कलिंगड यांच्या साली खाद्य रंजकद्रव्ययुक्त साखरेच्या पाकात दीर्घकाळ बुडवून ठेवून रंगविण्यात येतात. कवच असलेले पिस्ते भाजताना त्यांना खाद्य रंजकद्रव्याचा विद्राव लावून रंग आणतात. केशरासारखे नैसर्गिक आणि डांबरापासून बनविलेली संश्लेषित रंजकद्रव्ये खाद्यपदार्थ व पेय यांत वापरतात. [⟶ खाद्यपदार्थ उद्योग].

फर : बहुधा ऑक्सिडीभवन क्षारकांनी फर रंगवितात. अपस्करित व अम्ल रंजकद्रव्यांद्वारे फरीवर, मेंढीच्या केसाळ कातड्यांवर चमकदार वा फिकट रंग दिले जातात. रंग देण्यासाठी प्रथम फरमध्ये कार्बनी मध्यस्थ संयुगे (अमाइने) घुसवितात व नंतर पर-ऑक्साइडांनी त्यांचे ऑक्सिडीभवन करून रंगद्रव्ये (अझाइने) बनतात. पूर्ण क्रिया झालेली नसताना काहींमुळे अनिष्ट शरीरक्रियवैज्ञानिक विक्रिया होतात. म्हणून फरमध्ये विक्रिया न झालेले अमाइन नाही याची खात्री करून घेण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. तसेच फरमधील तेल व वसा (स्निग्ध पदार्थ) काढून टाकतात. [⟶ फर−२].

मानवी केस : हे एक प्रकारचे तंतूच असल्याने ते रंगविणे, कुरळे करणे व धुणे यांविषयी संशोधन करण्यात येते. केस रंगविण्याच्या प्रक्रिया सापेक्षतः कमी तापमानाला होतात. त्यामुळे केसांसाठी मोजकीच रंजकद्रव्ये उपलब्ध आहेत. केस तात्पुरते रंगविण्यासाठी वापरण्यात येणारे कलप पूर्णतया नवीन रंग देण्यासाठी लावतात. या कलपासाठी खाद्यपदार्थांसाठीची रंजकद्रव्ये (काजळीही) सायट्रिक वा मॅलिक अम्लात मिसळातात. इतर कलपांमध्ये क्षारकीय रंजकद्रव्ये व लवणे अथवा लवणांनी विरळ केलेली कापडासाठीची रंजकद्रव्ये, प्रक्षालके आणि मॅलिक, सायट्रिक व टार्टारिक अम्ले वापरतात. अधिक काळ टिकणाऱ्या व तीव्र रंजनक्रियेच्या तंत्रांत फरसाठीच्या रंजकद्रव्याच्या मध्यस्थ पदार्थांपैकी अधिक सुरक्षित निवडक द्रव्ये वापरतात. काही कलपांमध्ये मेंदी, अक्रोडाचा अर्क व धातवीय लवणे यांसारखी नैसर्गिक द्रव्येही असतात.

प्लॅस्टिक पटले व वस्तू : पुष्कळ प्लॅस्टिक द्रव्यांना रंग देण्यासाठी कापडाकरिता वापरलेल्या प्रक्रियांसारख्या प्रक्रिया वापरतात. प्लॅस्टिक तयार करतानाच रंजकद्रव्य वा रंगद्रव्य त्यात टाकतात. वरून रंग देत नाहीत. नायलॉन, सेल्युलोज ॲसिटेट, पॉलिएथिलीन, पॉलिप्रोपिलीन व पॉलिएस्टर रेझिने यांवर रंजनक्रिया करण्याकरिता तंतूंसाठी वापरण्यात येणारी रंजकद्रव्ये चालतात. पॉलिकार्बोनेट व इतर नवीन प्रकारच्या रेझिनांकरिता रंजकद्रव्ये तयार करण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यात येत आहे.

रबर : व्हल्कनीकरणापूर्वी इतर रबर रसायनांबरोबर रंगदायी द्रव्य (उदा., काजळी) कच्च्या रबरात टाकतात. चकचकीत फिकट रंगांसाठी टिटॅनियम डाय-ऑक्साइड व सुयोग्य उष्णतारोधी संश्लेषित रंजकद्रव्य घालतात. चकचकीतपणा नको असल्यास अकार्बनी रंगद्रव्ये (उदा., आयर्न ऑक्साइड, अँटिमनी सल्फाइड, कॅडमियम सेलेनाइड) वापरतात. [⟶ रबर].

संदर्भ : 1. Cockett. S. R. Hilton, K. A. Basic Chemistry of Textile Colouring and Finishing, New York, 1955.

2. Cockett. S. R. Hilton, K. A. Dyeing of Cellulosic Fibers and Related Processes, New York, 1961.

3. Hall, A. J. Handbook of Texttile Dyeing and Printing, London. 1955.

4. Johnson, K. Dyeing of Synthetic Fibers, 1974.

5. Peters, R. H.Textile Chemistry Vol. 3, The Physical Chemistry of Dyeing, Amsterdam, 1975.

6. Schmidlein, H. V. Praparation and Dyeing of Synthetic Fibers, London. 1963.

7. Simons. M. Dyes and Dyeing , 1978.

लोखंडे, हि. तु. ठाकूर, अ. ना.