विडी : (बिडी). ठराविक वनस्पतींच्या पानात तंबाखू (चुरा) घालून धूम्रपानासाठी बनविलेल्या सुरळीला (गुंडाळीला) विडी म्हणतात. वीटिका (विडा) या संस्कृत शब्दावरून विडी हा शब्द आला असून व चा ब होऊन बिडी शब्द झाला आहे. विडी हे तंबाखू ओढण्याचे खास भारतीय साधन असून सर्वात स्वस्त असल्याने ते भातातील गरीब लोकांचे धुम्रपानाचे प्रमुख साधन आहे. (आयुर्वेदीय उपचारात खोरासनी ओव्यासारख्या ओंषधिद्रव्यांचा धूर ओढण्यासाठी त्यांच्या विड्या तयार करतात. बडीशेप घालूनही विड्या तयार करतात). विशिष्ट वनस्पतींची पाने, तंबाखू व सुती धागा हा विडी उद्योगातील मुख्य कच्चा माल आहे.

पान:विडीकरिता मुख्यतः तेंडू किंवा तेमरू किंवा टेमरू (डायोस्पिरॉस मेलॅनोझायलॉन) आणि टेंबुर्णी (डा. एंब्रियॉप्टेरिस) या वनस्पतींचा पाने वापरतात. ही पाने विशेषतः मध्य प्रदेशात तसेच बिहार, आंध्र प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, प.बंगाल, राजस्थान व गुजरात या राज्यांत मिळतात. महाराष्ट्रात ही मध्य प्रदेशातून आणतात, तमिळनाडूतही ही थोड्या प्रमाणात वापरतात. बुंदेलखंडात तेंडूशिवाय डा. टोमेंटोसा या जातीच्या वनस्पतींची पानेही मिळतात. कोकण व गोवा येथे काळ्या कुड्याची (राइटिया मोनोस्पर्मा) आणि आसामात सेरंगाची (कॅस्टानॉप्सिस इंडिका) पानेही विड्यांसाठी वापरतात.

तेंडूच्या पानांचा रंग किरमिजी, तांबूस हिरवा झाल्यावर व त्यांचा पोत चिवट बनल्यावर लगेच तोडलेली पाने सर्वांत चांगल्या प्रतीची असतात. अशी पाने मऊसुत व नम्य असतात मात्र त्यांच्या खालील बाजूवर जास्त लव नसावी किंवा त्यांच्या प्रमुख व दुय्यम शिरा कडक नसाव्यात. तेंडूची पाने सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यांत तोडतात. अशी तोडणी पहाटे ५-६ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच्या काळात करतात. अशा ५०-५० पानांच्या गड्ड्या बांधतात. या गड्ड्या ५ ते १० द्वस उन्हात ठेवून सुकवितात. पानांची टोके व देठ पूर्व-पश्चिम दिशेत राहतील अशा रीतीने गड्ड्या उन्हात ठेवतात. यामुळे ऊन व वारा जास्त प्रमाणात लागून पाने लवकर सुकतात. तीन दिवसांनंतर गड्डी उलटी करून ठेवतात. प.बंगालमध्ये पळसाची पाने आधी पाण्यात उकळतात. व नंतर सुकायला ठेवतात. सुकलेल्या गड्ड्यांचे लहान लहान ढीग करून त्यांवर पाणी शिंपाडतात व ते बारदानाने झाकून ठेवतात. यामुळे पाने नरम होतात आणि पोत्यात भरताना व भरल्यावर त्यांचे सहजपणे तुकडे होत नाहीत. ही पोती पातळ बारदानाची असतात व त्यांना पानभेद म्हणतात. हे पानभोद उलट सुलट करून दोन दिवस सुकवितात व मग गोदामात ठेवतात. अशी पाने दोन वर्षापर्यंत विडीसाठी वापरण्यायोग्य राहू शकतात.

तंबाखू:विडीसाठी लागणारी चांगल्या प्रतीची तंबाखू मुख्यत्वे निपाणी (कर्नाटक) व गुजरात येथे पिकते. निकोटियाना टाबॅकमनि. रश्टिका जातींची तंबाखू गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्र येथे पिकते. हिरवट रंगाची निपाणी तंबाखू व फिकट नारिंगी पिवळसर रंगाची गुजरात तंबाखू विडीसाठी अधिक पसंत केली जाते. या तंबाखूचे योग्य प्रमाणात व काळजीपूर्वक मिश्रण करतात. असे मिश्रण विडीकरिता चांगल्या दर्जाचे समजतात व सर्वच असे मिश्रण वापरतात. विडीसाठी वापरावयाच्या तंबाखूवर कोणतीही प्रक्रिया करीत नाहीत. तंबाखूची जाड व भक्कम पाने चुरून व योग्य चाळणीने चाळून विडीसाठी तंबाखू तयार करतात आणि उत्पादकांच्या मागणी नुसार निरनिराळ्या प्रमाणांतील मिश्रणे तयार करतात. वरील जातींच्या तंबाखूत पुष्कळदा बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील कमी दर्जाची तंबाखूही मिसळतात. तंबाखूंच्या मिश्रणाचे हे प्रमाण उत्पादकाच्या दृष्टीने व्यावसायिक गुपीत असते व ते इतरांना माहीत होणार नाही, याची काळजी घेतात. असे मिश्रण पोत्यात भरून साठवितात.

तंबाखूमधील निकोटिनाचे व राखेचे प्रमाण गुजरात तंबाखूत अनुक्रमे सु. ३ व १९ टक्के, निपाणी तंबाखूत ४ व १९ टक्के आणि कर्नाटकातील अन्य ठिकाणच्या तंबाखूमध्ये ४.९ व २४ टक्के असते. निकोटीन हा तंबाखूमधील सर्वांत हानिकारक घटक आहे.

विडी तयार करणे : लांबीनुसार विडीचे आखूड (५ सेंमी.), मध्यम (५.६२ सेंमी.) व लांब (७.५ सेंमी.) हे प्रकार होतात. शिवाय विड्यांची लवंगी, तोकडी फर्मास, बीचबंद, सरस इ. नावेही प्रचलित आहेत. गिऱ्हाईकाच्या पसंतीनुसार विडीची लांबी व तंबाखूचा कडकपणा उत्पादक ठरवितात आणि त्यानुसार विड्या बनवून घेतात. विडी सामान्यपणे हातांनीच बनवितात. विडी पुढील पाच प्रमुख टप्प्यांत तयार केली जाते: (१) पाने रात्रभर ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवतात. यामुळे पाने कागदाप्रमाणे मऊ व नरम होतात. (कधीकधी पान सुरीने घासून त्यावरील जाड शिरा पानाच्या पातळीत आणून ते गुळगुळीत करून घेतात). मग ते विडीच्या लांबीनुसार आयाताकार (बहुधा ७.५ × ३.७५ सेंमी.) कापतात, याकरिता बऱ्याचदा त्या आकाराचा पत्र्याचा तुकडा वापरतात. (२) कापलेल्या पानावर चिमूटभर तंबाखू निघू नये म्हणून तिची दोन्ही तोंडे बोटांनी व नखांनी पान दुमडून बंद करतात. (कधीकधी पानाचा शंकूच्या आकाराचा पुडा बनवून त्यात तंबाखू टाकतात व टोके बंद करतात). पानाची गुंडाळी उलगडू नये म्हणून चापट टोकाजवळ विशिष्ट रंगाचा सुती धागा गुंडाळून बांधतात. हजार विड्यांसाठी सामान्यपणे विडीच्या आकारमानानुंसार १९० ग्रॅम ते २७० ग्रॅम तंबाखू लागते. मग विड्यांची तराई (तपासणी) करून खराब विड्या वेगळ्या काढतात आणि चांगल्या २५ विड्यांची एक गड्डी अशा गड्ड्या धाग्याने बांधतात. (४) या गड्ड्या मोठ्या चौकोनी चाळणीत वा तबकाने विडीचे पेटणारे (गोल) टोक राहील अशा रीतीने ओळीने मांडून ठेवतात. या चाळण्या भट्टीतील कप्प्यांत ठेवून विड्या शेकतात. यामुळे पानातील पाणी निघून जाते. कधीकधी गोल टोक लाल होईपर्यंत विड्या भाजतात. (५) नंतर गड्डीवर झिल्लीचे (पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाचे) आवरण चिकटवून त्यावर लेबल लावतात. बऱ्याचदा झिल्लीवर व लेबलवर उत्पादकाचे व्यापार-चिन्ह अथवा छायाचित्र छापलेले असते. दक्षिण भारतात काही खाकी कागदात बांधून त्यावरही लेबल चिकटवितात. हे ५०० विड्यांचे पुडे पोत्यात वा पुठ्ठ्याच्या खोक्यात भरून विक्रीसाठी पाठवितात. अशा एका पोत्यात २४ ते ५० हजार विड्या असतात.

वरीलपैकी पहिली व चौथी या प्रक्रिया तुलनेने कमी कुशलतेच्या आहेत. तथापि विडीची तोंडे बंद करण्याचे काम मुलेही सरावाने करू शकतात.

पान व तंबाखू यांच्यावर विडीची गुणवत्ता अवलंबून असते. काहीशा पिवळ्या धमक पानाची, तंबाखूने गच्च भरलेली, मध्यम लांबीची व मध्यम कडक विडी सर्वसामान्यपणे पसंत पडते. कामगारांना मात्र लांब व अधिक कडक विडी आवडते.

विडी यंत्रानेही तयार करता येते. मात्र करामुळे अशा विड्या महाग पडतात. शिवाय रोजगार कमी होईल म्हणून सरकारही यंत्रावरील विडीनिर्मितीला प्रोत्साहन देत नाही.


उद्योग: प्राचीन काळी भारतात टोळी भारतात टोळी करून राहणारे लोक पानाच्या सुरळीतून तंबाखू ओढीत असत. यावरून पानात तंबाखू गुंडाळून विडी वळण्याची कल्पना पुढे आली असावी. भारतात विडीची निर्मिती केव्हा व कशी सुरू झाली याची निश्चित माहिती उपलब्ध नाही मात्र मद्रास सरकारने विडी व इतर उद्योगांतील कामगारांच्या स्थितीविषयीच्या १९४७ साली प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतातील पहिला विडी कारखाना १८८७ साली सुरू झाल्याचा उल्लेख आहे. हळूहळू हा व्यवसाय हा व्यवसाय वाढत जाऊन तो भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा उद्योग झाला आहे. या उद्योगामुळे केंद्र सरकारला आयकर, अबकारी कर इ. पोटी तर राज्य सरकारांना विक्रीकर, तेंडूच्या पानांची विक्री यांतून महसूल मिळतो. तसेच रेल्वे व रस्ता वाहतुकीद्वारेही उत्पन्न मिळते.

जगात मुख्यतः भारतात विडीचे (८५%) उत्पादन होते. सिगारेट उद्योगाशी स्पर्धा करावी लागत असली, तरी १९९३-९४ साली रोज सु. १ अब्ज विड्या खपत होत्या आणि सु. १.५ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता.

भारतातील बहुतेक प्रदेशांत लहानमोठ्या प्रमाणात विड्या तयार होतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, प. बंगाल, बिहार, ओरिसा,केरळ, गुजरात व राजस्थान या राज्यांत तुलनेने अधिक प्रमाणात विड्या तयार होतात. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांत विड्यांचा खप जास्त प्रमाणात होतो. प. बंगाल, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, तमिळनाडू व केरळ या राज्यांत मध्यम प्रमाणात, तर जम्मू व काश्मीर, आसाम व पंजाब येथे विड्या तुलनेने कमी खपतात. भारतातून विड्यांची निर्यात मुख्येत्वे सिंगापूर, मध्य पूर्व व मलेशियाला होते शिवाय म्यानमार (ब्रम्हदेश), श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, कुवेत, अमेरिका, स्वित्झर्लंड, जपान, कॅनडा इ. देशांतही थोड्या प्रमाणात विडीची निर्यात होते.

भारतात विडी उद्योगात हजारो छोटेमोठे व्यावसायिक गुंतलेले आहेत आणि विड्यांच्या हजारो व्यापार-चिन्हांची नोंदणी झालेली आहे. परिणामी व्यापारी चिन्हांची नक्कल करण्याचे प्रमाण बरेच जास्त आढळते आणि व्यापार-चिन्हांविषयीचा मोठाच प्रश्न या उद्योगापुढे असतो.

या उद्योगात बहुतेक कामे अंगावरची असल्याने बहुतेक रोजगार उक्ते काम व रोजंदारी स्वरूपाचा आहे. झिल्ली व लेबल लावण्याचे कामसुद्धा उक्ते कामाच्या पद्धतीने करतात. कधीकधी उद्योजक अडत्याला कच्चा माल देऊन त्याच्याकडील मजुरांमार्फत विड्या तयार करून घेतात. बऱ्याच वेळा कच्चा माल घरी नेऊन कारगीर घरीच विड्या तयार करून आणून देतात. विडी कामगारांमध्ये सु. ९० टक्के स्त्रिया असल्याने ही पद्धत सोयीची ठरली आहे. कारागिरांना बहुधा मजुरी रोज वा आठवड्यातून एकदा दिली जाते. सर्वसाधारण कारागीर रोज १२-१४ तास काम करून किमान एक हजार विड्या वळतो. निरनिराळ्या राज्यांतील मजुरी काही प्रमाणात वेगळी आहे. महाराष्ट्रात हजार विड्या वळण्यासाठी मजुराला २३.५० रुपये मजुरी मिळत होती (१९९३-९४). याशिवाय भविष्य निर्वाह निधी, ई. एस. आय., बोनस, पगारी रजेचे पैसे वगैरे लाभही कामगारांना मिळतात. कामगारांना वर्षातून जवळजवळ २७० दिवस काम मिळते. या उद्योगासमोरील अडाअडणींचा विचार करण्यासाठी उत्पादकांनी अखिल भारतीय विडी उद्योग संघ ही संघटना स्थापन केली आहे.

पहा:तंबाखू धूम्रपान सिगारेट व सिगार.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Parts I and IV, Delhi and New Delhi, 1948 and 1976.

ठाकूर, श्रीनिवास व. ठाकूर, अ. ना.