डनलॉप, जॉन बॉइड : (५ फेब्रुवारी १८४०–२३ ऑक्टोबर १९२१). स्कॉटिश संशोधक. हवा भरून वापरावयाच्या रबरी पोकळ टायराच्या शोधाबद्दल प्रसिद्ध. त्याचा जन्म ड्रेग्‌हॉर्न (एअरशर) येथे झाला व शिक्षण एडिंबरो येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात झाले. १८६७ मध्ये पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक म्हणून ते बेलफास्टला स्थायिक झाले. त्यांच्या मुलाच्या तीनचाकी सायकलीला भरीव रबरी टायर होते. त्यांकडे त्यांचे लक्ष्य गेले व भरीव टायरांऐवजी ज्यांमध्ये हवा भरता येईल असे पोकळ रबरी टायर बनविले व चाकाला बसविले, तर खाचखळग्यांतून किंवा रस्त्यातील दगडधोंड्यांवरून जाताना हादरे जाणवणार नाहीत, अशी कल्पना त्यांना सुचली. त्यावरून १८८७ मध्ये त्यांनी तागाच्या कापडाचे वेष्टन असलेल्या पोकळ रबरी नळीपासून आपल्या मुलाच्या सायकलसाठी असे टायर प्रथम बसविले. फुटबॉलच्या पंपाने त्यात हवा भरता येत असे. त्यानंतर संपूर्ण रबराची हवा भरण्याची पोकळ नळी व रबराचा थर दिलेल्या कॅनव्हास कापडाचे तीवर बसविण्याचे स्वतंत्र आच्छादन अशी योजना असलेल्या टायराचे ब्रिटीश एकस्व (पेटंट) त्यांनी १८८८ मध्ये मिळविले. या आच्छादनाच्या कडा चाकाला चिकटवावयाच्या असत. १८९० मध्ये अशा टायरांचे औद्योगिक प्रमाणावर उत्पादन बेलफास्ट येथे नुकत्याच स्थापन केलेल्या कारखान्यात त्यांनी सुरू केले. लवकरच त्यांनी या टायरात सुधारणा केली व बाह्य आच्छादनाच्या कडांमध्ये धातूंच्या तारा समाविष्ट केल्या. त्यायोगाने टायर चाकाला चिकटविण्याऐवजी चाकाच्या कडांमध्ये बसविणे साध्य झाले. हवा भरण्याच्या पोकळ टायराची कल्पना १८४५ मध्ये आर्. डब्ल्यू. टॉमसन यांनाही सुचली होती, असे आढळून आल्यावरून वाद निर्माण झाला होता परंतु ती कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात येऊ शकली नसल्यामुळे अशा टायराच्या कल्पनेचे श्रेय डनलॉप यांच्याकडेच जाते.

बेलफास्ट, एडिंबरो, फोर्ट डनलॉप व डनलॉप रबर कंपनी, बर्मिंगहॅम येथे त्यांच्या स्मरणार्थ स्मारके उभारण्यात आली आहेत. १८९२ पासून ते डब्लिनला स्थायिक झाले व तेथेच मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.