हस्तिदंत :हत्तीच्या लांब सुळ्यातील दंतिनापासून बनलेल्या कठीण भागाला हस्तिदंत म्हणतात. हत्तींव्यतिरिक्त इतर प्राण्यांच्या सुळ्यांचा व दातांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्राण्यांच्या सुळ्यांचा वा दातांचा वापर व्यापारी दृष्ट्या कोरीव कामासाठी करता येणाऱ्या पदार्थाला हस्तिदंत म्हणता येईल. प्रजातिनिहाय सस्तन प्राण्यांतील दातांची व सुळ्यांची रासायनिक संरचना कमी-अधिक प्रमाणात सारखीच असते. ते सौंदर्य, टिकाऊपणा व कोरीव कामासाठी आवश्यक असणारी मृदुता यांसाठी मौल्यवान आहेत. सुळा हा वरचा कृंतक दात असून त्याला जबड्याच्या हाडापासून मध्यापर्यंत एक शंक्वाकार पोकळी असते.

 

आफ्रिकी हत्तींमध्ये नर व मादी या दोन्हींचे सुळे आयुष्यभर वाढत राहतात, तर भारतीय हत्तींमध्ये फक्त नराचे सुळे कायम वाढत राहतात. भारतीय मादी हत्तींमध्ये सुळे नसतात किंवा खूप छोटे असतात. हिप्पोपोटॅमस, वॉलरस, नारव्हाल, स्पर्म व्हेल (वसा-तिमी) आणि काही प्रकारच्या बोअर [→ रानडुक्कर] आणि वर्टहॉग (आफ्रिकेतील जंगली डुक्कर) यांच्या दातांना देखील हस्तिदंत समजतात. मात्र, त्यांच्या लहान आकारामुळे त्यांचे व्यावसायिक मूल्य कमी असते. हस्तिदंत सच्छिद्रअसून त्यामध्ये मेणासारखा जिलेटीनमय द्रव पदार्थ असतो. त्याच्या गुणवत्तेनुसार हस्तिदंताचे मूल्य वाढते. सुळ्यांचा वापर अन्न मिळविण्या-साठी, कोरणे, खणणे व भांडणावेळी होतो. उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील हत्ती त्यांचा आकार व गुणवत्ता यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील हस्तिदंताच्या तुलनेत पूर्व किनाऱ्यावरील हत्तींच्या सुळ्यापासून मिळणारे हस्तिदंत उत्तम दर्जाचे असते परंतु व्यापारी उत्पादनात पश्चिम किनाऱ्यावरील हस्तिदंत महत्त्वाचे ठरते. आफ्रिकेत मिळणाऱ्या हत्तींच्या सुळ्यांची लांबी सरासरी २ मी. एवढी, तर वजन सु.२३ किग्रॅ. (प्रत्येकी) एवढे असते. प्रसंगी १२० किग्रॅ. एवढ्या वजनाचेही सुळे आढळले असून त्यांची लांबी सु. ३ मी.पर्यंत होती. आशियायी हत्तींचेसुळे काहीसे लहान असतात. हत्तीचे सुळे स्तरांनुसार वाढतात. सर्वांत आतील स्तर सगळ्यात शेवटी तयार होतो. जवळपास एकतृतीयांश सुळ्याचा भाग प्राण्याच्या कवटीच्या हाडांतील खोबणीत समाविष्ट झालेला असतो. तो भाग पोकळ असतो, मात्र क्रमवार वाढत सुळ्याच्या टोकापर्यंत तो टणक व भरीव होत जातो.

 

आ. १ हत्तीच्या सुळ्याचा आकार व त्याची संरचना : (१) एनॅमल (फक्त टोकाकडील भागात), (२) दंतिन, (३) मगज पोकळी, (४) दाढा, (५) संधानक (फक्त बाह्यस्तर).हस्तिदंताचे कठीण व मृदू असे दोन मुख्य प्रकार पडतात. हत्तींपासून प्राप्त होणारे कठीण हस्तिदंत आफ्रिकेच्या पश्चिम भागातून, तर मृदूहस्तिदंत पूर्व भागातून प्राप्त होतात. कठीण हस्तिदंताचे सुळे गडद रंगाचे, बारीक व अधिक सरळ आकाराचे असतात. कठीण हस्तिदंतात आतील भागात अधिक रंग असतात आणि तो मृदू हस्तिदंतापेक्षा जास्त ठिसूळ असतो. मृदू हस्तिदंत पारदर्शी पांढऱ्या रंगाचा असून तंतुमय पोताचा असतो.

 

हस्तिदंत एक टिकाऊ पदार्थ असून तो सहजासहजी खराब होत नाही अथवा नष्ट होत नाही. तोे जळत नाही अथवा पाण्यात भिजत ठेवल्यानेही खराब होत नाही. कठीण लाकडाप्रमाणेच हस्तिदंताचे काही गुणधर्म असतात. तो चिवट असून त्याला चकाकी (पॉलिश) सुंदर रीत्या होते, तसेच लाकूडकामात वापरल्या जाणाऱ्या हत्यारांचा वापर करून त्यावर कारागिरी होऊ शकते. प्लॅस्टिक किंवा संश्लेषित पदार्थांचा शोध लागण्या-आधी आधुनिक उद्योगधंद्यांत हस्तिदंताचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. विद्युत् उपकरणे, विमाने व रडार यांमध्ये वापरावयाची खास विद्युत् साधने यांसाठी हस्तिदंत वापरले जात असत. दारांच्या मुठी, लहान हातोडे, द्युतातील फासे व बुद्धिबळातील प्यादी यांखेरीज चांदीच्या चहा-पात्रांची आसने बनविण्याकरिता हस्तिदंत वापरले जाई. तसेच शोभिवंत वस्तू व दागिने बनविण्यासाठी देखील यांचा वापर होत असे.

 

हस्तिदंत मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हत्तींची कत्तल केली जाई. १८३१ मध्ये एकट्या इंग्लंडमध्ये हस्तिदंताचा पुरवठा करण्या-साठी ४,००० हत्तींची कत्तल केली गेली. हस्तिदंत मृत प्राण्यांपासून देखील प्राप्त होत असे. रशियामध्ये हस्तिदंत मिळविण्यासाठी नामशेष झालेल्या मॅमथ या प्राण्याचे उत्खनन केले जाते. मात्र, मुख्यत्वे मारलेल्या हत्तीपासूनच हस्तिदंत मिळविला जातो.

 

अधिकतम व्यापारी हस्तिदंताचा पुरवठा आफ्रिकी देशांमधून केला जातो. मात्र, विसाव्या शतकात हत्तींची संख्या कमालीची खालावल्याने हस्तिदंत मिळणे कमी झाले आहे. १९८० मध्ये हस्तिदंतासाठी तस्करी करणाऱ्यांनी आफ्रिकेतील हत्तींची संख्या निम्म्याने कमी केली. त्यामुळे’ कन्व्हेंशन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एन्डेजर स्पीशिज’ (CITES) या संकेतानुसार १९९० मध्ये हस्तिदंताच्या व्यापारावर सार्वमताने बंदी घालण्यात आली. तरी देखील एकविसाव्या शतकात काळ्या बाजारात हस्तिदंताचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो. यूरोपात कधीकाळी तेजीत असलेली बाजारपेठ जवळपास पूर्णपणे दक्षिण आणि उत्तर आशियाकडे वळली आहे तेथील कुशल कलाकार विविध सौंदर्यपूर्ण कलाकृतींचे कोरीव काम करतात. दरम्यानच्या काळात सर्वसामान्य हस्तिदंताच्या वस्तू जसे पियानोच्या पट्ट्या आणि बिल्यर्ड्स (स्नूकर) खेळासाठी लागणारेचेंडू वेगवेगळ्या प्लॅस्टिक किंवा संश्लेषित घटकांपासून बनविण्यात येऊ लागले. [→ सेल्युलोज].


 

इतिहास : प्राचीन काळापासून ग्रीक, रोम व चीन या देशांतहस्तिदंताचा वापर ज्ञात आहे. ग्रीक व रोमन लोक मोठ्या प्रमाणावर हस्तिदंताचा वापर करून कलात्मक वस्तू , अमूल्य धार्मिक वस्तू , सुशोभित पेट्या बनवीत. शिल्पांतील विशेषतः डोळ्यांचा पांढरा भाग बनविण्यासाठी हस्तिदंताचा वापर केला जाई. प्राचीन चीनमध्ये हस्तिदंताचा वापर मोठ्या प्रमाणावर होता. झांग क्यूआन या चिनी शोधकर्त्याने पश्चिमी देशांशी संबंध निर्माण केल्यानंतर चीनमधून हस्तिदंत वस्तूंची निर्यात इ. स. पू. पहिल्या शतकापासून उत्तर रेशीममार्गावाटे सुरू झाली. दक्षिण आशियातील राजे भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा समावेश त्यांच्या चीनला जाणाऱ्या वार्षिक काफिल्यांत करीत असत. दक्षिण-पूर्व आशियातील बौद्ध संस्कृतीचे देश (म्यानमार, थायलंड, लाओस व कंबोडिया) पारंपरिक पद्धतीने पाळीव हत्तींपासून हस्तिदंत मिळवीत असत. हवाबंद बूचांसाठी किंवा झाकणांसाठी हस्तिदंताच्या पेट्या मौल्यवान समजल्या जात.

 

भारतात देखील खूप प्राचीन काळापासून हस्तिदंताचा वापर ज्ञातआहे. सिंधू संस्कृतीत (साधारणतः इ. स. पू. ३८००–३२००) हस्तिदंताचा वापर केलेला दिसतो. रेषीय मोजमापासाठी ज्या प्रमाणित पट्ट्या बनविण्यात आल्या होत्या तशी हस्तिदंताने बनविलेली मोजपट्टी लोथल (सौराष्ट्र) येथे आढळून आली आहे. सिंधू संस्कृतीत हत्तीचे चिन्ह असणाऱ्या सील (मुद्रा) मोठ्या प्रमाणात आढळल्या असल्या, तरी सिंधू संस्कृतीत हस्तिदंत ही महागडी व दुर्मिळ गोष्ट होती. हस्तिदंताचे थोडेफार तुकडे मोहें-जो-दडो येथे सापडले आहेत. रामायण-महाभारत या ग्रंथांमध्ये त्या काळात हस्तिदंत कला उत्कर्षास पोहोचल्याचे अनेक संदर्भ आहेत. उदा., रावणाच्या महालाचे खांब व खिडक्यांच्या जाळ्या हस्तिदंताचे असल्याचे म्हटले आहे (वाल्मिकी रामायण, अरण्यकांड ५५.१० ). तसेच नकुल-सहदेव हस्तिदंताच्या सिंहासनावर बसत असत (महाभारत, शांतिपर्व ४०.४).

 

प्राचीन भारतात हस्तिदंतापासून तलवारीच्या मुठी, विविध भांडी, सोंगट्या व फासे तसेच बांगड्या, फण्या, आकडे, अंजनशलाका, आरशाच्या मुठी बनवीत असत. हस्तिदंताच्या मूर्ती हा कलाकारांच्या नैपुण्याचा विषय होता. या विविध वस्तू व मूर्ती बनविणाऱ्या लोकांच्या वर्गाला ‘दंतकार’ असे म्हणत असत.

 

पूर्वी हस्तिदंताच्या व्यापाराला विशेष महत्त्व होते. नैसर्गिक मृत्यू आलेल्या हत्तीचे दात आणून देणाऱ्याला चार-पाच पण (पूर्वीचे नाणे) बक्षीस द्यावे आणि त्याच्या चोरीसाठी शहाण्णव पण दंड करावा असेकौटिल्याने सांगितले आहे (अर्थ. ७४). सदंत हत्तीला ‘दंतेला’ आणि दंतविहीन हत्तींना ‘मकुण’ असे म्हणत. हत्तीच्या दाताच्या मुळाच्या परिघाच्या दुप्पट लांबी ठेवून पुढचे दात कापावे, असे कौटिल्याने म्हटले आहे. तसेच नदीकाठच्या हत्तींचे सुळे दर अडीच वर्षांनी, तर डोंगराळ भागातील हत्तींचे सुळे दर पाच वर्षांनी कापावे, असेही म्हटले आहे. हस्तिदंताच्या वस्तू वापरणे शक्ती व ऐश्वर्याचे प्रतीक समजले गेले आहे. भारतातील विविध वस्तुसंग्रहालयातून हस्तिदंती वस्तूंच्या अभ्यासाचीसाधने उपलब्ध आहेत. ज्यावरून वस्तूंच्या कालमर्यादा आणि प्रादेशिक परंपरेच्या खुणा सांगता येतात. भारताच्या दक्षिण भागात विशेषेकरून हस्तिदंत कारागिरी होत असे.

 

हस्तिदंत पर्याय : हस्तिदंत पर्यायात नैसर्गिक व संश्लेषित ( कृत्रिम) हस्तिदंत असे दोन वर्ग आहेत. नैसर्गिक हस्तिदंतात प्राण्यांची हाडे, शिंपले, हॉर्नबिलची (धनेश पक्ष्याची) चोच आणि वनस्पतिजन्य पदार्थ ( कठीण कवच असलेले) असे पर्याय आहेत. प्लॅस्टिक हे संश्लेषित हस्तिदंत पर्याय आहे. काही संश्लेषित हस्तिदंत (संरचनेसह) पुढील-प्रमाणे आहेत : व्हिगोपास झ७१अ (पॉलिएस्टर रेझीन), डेकॉरिट २०३ व त३८४ (फिनॉलिक रेझीन), गॅलोलिथ (केसीन???पॉलिएस्टर), सेल्युलॉइड (सेल्युलोज नायट्रेट ??? कापूर), कंपॉझिट पॉलिमर (हस्तिदंत पावडर ? काठिण्यता निर्माण करणारा घटक), आयव्हराईट (केसीन ??काठिण्यता निर्माण करणारा घटक), ॲलॅब्राइट (कॅल्शियम कार्बोनेट ?? घट्ट चिकटविणारा घटक) इत्यादी.

 

हस्तिदंतासाठी गाडल्या गेलेल्या मॅमथाच्या सुळ्यांचा वापर गेल्या ३०० वर्षांपासून सुरू असून ते कायदेशीर मानले जाते. मॅमथ हस्तिदंताचा वापर सुशोभित वस्तूंच्या निर्मितीसाठी केला जातो. हे हस्तिदंत अतिशय दुर्मिळ व मौल्यवान असते. कारण मॅमथ हे अनेक लक्ष वर्षांपूर्वी नष्टझाले आहेत, तसेच त्याच्या व्यापारात कुठलीही जिवंत जाती नष्ट होण्याचा धोका नसल्यामुळे अडथळे येत नाहीत. मात्र, शास्त्रज्ञ अखंड हस्तिदंताचे तुकडे शक्यतो नापसंत करतात. संशोधकांचा असा अंदाज आहे की,सु. १० दशलक्ष मॅमथ (मॅम्युथस प्रिमिजिनियस) अजूनही सायबीरियात गाडले गेले आहेत.

 

कठीण कवच असणाऱ्या वनस्पती हस्तिदंताला पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहेत परंतु त्यांच्या छोट्या आकारामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा येतात. याला व्हेजिटेबल आयव्हरी किंवा तागुआ (वनस्पतिजन्य हस्ति-दंत) असे म्हटले जाते. ते नटपामपासून मिळविले जाते. असे नटपाम एक्वादोर, पेरू व कोलंबिया या देशांच्या वर्षावनांत सापडतात.

 

आ. २. हस्तिदंतापासून बवविलेली नाव (चीन एकोणिसावे शतक, आकार ५० सेंमी)

हत्ती व्यतिरिक्त हिप्पोपोटॅमस, वॉलरस, नारव्हाल व स्पर्म व्हेल यांसारख्या प्राण्यांच्या दातांपासून हस्तिदंत मिळवितात. तथापि, रंग व पोत यांबाबतीत हत्तीपासून मिळणारे हस्तिदंतच सरस असते. मध्ययुगीन यूरोपात जेव्हा अन्य खंडांशी व्यापार कठीण झाला व हस्तिदंत मिळणे अशक्यप्राय ठरले, तेव्हा वॉलरसांची अतोनात हत्या करण्यात आली. अकराव्या व बाराव्या शतकांत वॉलरसांच्या हस्तिदंतापासून खूप आकर्षक अशा शोभेच्या वस्तू बनविण्यात आल्या.

 

हिप्पोपोटॅमसचे दात अतिशय कठीण व ठिसूळ असते. चीन व जपानमध्ये याच्या हस्तिदंतापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तूंची खूपमोठी बाजारपेठ आहे. तेथे हस्तिदंताला पर्याय म्हणून हिप्पोपोटॅमसच्या दातांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नारव्हाल हा अपूर्व असा उत्तर ध्रुवीय देवमासा असून त्याच्यापासून उच्च गुणवत्तेचे हस्तिदंत मिळते. एस्किमो व जपानी लोकांत ते विशेष वापरले जाते. ते टिकाऊ असल्यामुळे खराब होत नाही. अनेक हत्यारांसाठी ते वापरता येते. प्राचीन काळात याचा प्रकर्षाने वापर होई.

 

हस्तिदंताचा खरेपणा तपासण्यासाठी विविध भौतिक व रासायनिक चाचण्या केल्या जातात. त्याप्रमाणे साध्या बाह्य दर्शनाने तसेच सूक्ष्म-दर्शिकीय व जंबुपार किरणांच्या साहाय्याने चाचण्या केल्या जातात.पहा : सेल्युलोज हस्तिदंतशिल्पन, भारतातील.

 

संदर्भ : 1. Edgard, O. Espinoza Mary-Jacque Mann, Identification Guide for Ivory and Ivory Substitutes, Oregon, America, 1999.

           2. Habib, Irfan, The Indus Civilization, New Delhi, 2011.

कुलकर्णी, सतीश वि. वाघ, नितिन भरत