कोंडा : तृणधान्ये व कडधान्ये दळताना किंवा भरडताना धान्याचे फलावरण व बीजावरण यांचे जे भरड पीठ मिळते त्यास कोंडा किंवा भुसा म्हणतात. त्यामध्ये या आवरणास चिकटलेला धान्याचा आतील भाग व अंकुर यांचे अंशही कमी जास्त प्रमाणात असतात. पिठाच्या  व डाळीच्या गिरण्यांत तो एक उप-उत्पादन म्हणून मिळतो. गहू, भात, ज्वारी, तूर, मका, हरभरा, मूग, उडीद, सातू इ. धान्यांचा कोंडा सर्वपरिचित आहे. फलावरणापासून बनलेल्या कोंड्यात सिलिका असल्यामुळे तो पचनास फारच जड असतो. भरड कोंड्यामुळे आतड्यांची जळजळ होते व कधीकधी अतिसारही होतो. कोंड्यात नायट्रोजनाचे प्रमाण जास्त असले, तरी माणसाचे खाद्य म्हणून त्याला फारसे महत्त्व नाही. तथापि त्याचा उपयोग गुरेढोरे, घोडे, डुकरे, कोंबड्या व इतर पाळीव जनावरांच्या खाद्यात भरपूर प्रमाणात होतो. गव्हाचा कोंडा डुकरांपेक्षा दुभती जनावरे आणि नांगर किंवा गाड्या ओढणाऱ्या व ओझी वाहणाऱ्या जनावरांना चांगला मानवतो. इतर खुराकात त्याचे प्रमाण ३०–४०% असल्यास त्याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. रायच्या कोंड्याचा परिणाम गव्हाच्या कोंड्यासारखाच असतो. तो फार खाऊ घातल्यास दूध कमी मिळते, पण त्यात चरबीचे प्रमाण जास्त असते. बार्लीचा कोंडा डुकरांना खाऊ घालण्यास चांगला असतो. त्यामुळे त्यांच्या चरबीची प्रत सुधारते. सातूचा कोंडा सापेक्षतः निकृष्ट असतो. तो गुरेढोरे आणि घोडे यांना चांगला मानवतो. भाताच्या कोंड्याचे पोषणमूल्य सोयाबिनाच्या कोंड्याच्या पोषणमूल्याएवढे असते. भाताच्या कोंड्यापासून एक प्रकारचे उपयुक्त तेल मिळते. असे तेल काढण्याचे कारखाने महाराष्ट्रात कुलाबा व चंद्रपूर जिल्ह्यांत आहेत. तुरीच्या कोंड्याचे दोन प्रकार बाजारात मिळतात. फलावरणापासून झालेल्या कोंड्याला फोल म्हणतात. ज्यात मुख्यतः बीजावरण व काही अंश पीठ असते त्याला चूणी म्हणतात. दोन्ही मिश्र करून दुभत्या जनावरांना चारल्यास त्यांना चांगले मानवते.

गव्हाच्या कोंड्यामध्ये ६५·५% कार्बोहायड्रेटे, १४·०% प्रथिने (ग्लायडीन व गुटेनीन), ४·४%  वसा (स्निग्ध पदार्थ), ६·१% काष्ठतंतू व १०% पाणी ही असतात. गव्हाच्या पिठाशी तुलना करता कोंड्यात कार्बोहायड्रेटे एकचतुर्थांशानी कमी, प्रथिने एक सप्तमांशाने जास्त, वसा दुपटीने व खनिज लवणे जवळजवळ चौपटीने जास्त असतात. भाताच्या कोंड्यात गव्हाच्या कोंड्यापेक्षा वसा दुप्पट असते, परंतु प्रथिने कमी असतात. त्यात सिलिकेचे प्रमाण जास्त असते. संस्कारित गव्हाच्या कोंड्याचा उपयोग ‘ब्राऊन ब्रेड’ किंवा तत्सम काही खाद्यपदार्थ (मफीनसारखे) इत्यादींमध्ये केल्यास ते जास्त चांगले बनतात. गव्हाच्या कोंड्याचा व्यापारी उपयोग वस्तू स्वच्छ करण्यासाठी, घर्षणाने वस्तूला चकाकी आणण्याकरिता, वस्तूंच्या आवेष्टनात सभोवती भरण्याकरिता, कॅलिको  कापड छपाई व रंजक प्रक्रिया यांमध्ये करतात.

जमदाडे, ज. वि.