मणि : विविध आकारमानांच्या व आकारांच्या, निरनिराळ्या रंगांच्या पण घन व लहान वस्तूंना सामान्यतः ‘मणी’ असे म्हटले जाते. या वस्तूंना छिद्र पाडून त्यांतून तार, दोरा इ. ओवून त्यांच्या माळा, हार इ. तयार करण्यात येतात. तसेच मणी कपड्यांना शिवताही येतात. मण्यांचा वापर फार प्राचीन काळापासून कंठहार, कर्णभूषणे, नासाभूषणे इ. अलंकारांच्या स्वरूपात करण्यात येत आहे. काही मण्यांचा वापर प्राण्यांना सुशोभित करण्यासाठी करण्यात येतो. काही नैसर्गिक खनिज मण्यांचा वापर ⇨ रत्ने म्हणून करण्यात येतो. अतिप्राचीन मणी त्यांच्या निर्मितिस्थळापासून हजारो किलोमीटर दूर सुरक्षित स्थितीत सापडले आहेत. मण्यांना अद्भुणत व गूढ गुणधर्म असल्याचा समज रूढ झाल्याने त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. आजही अरबी देशांत यंत्रे, मोटारगाड्या इ. सुरळीत चालावीत म्हणून, प्राण्यांच्या सुशोभनासाठी, तसेच लहान मुले व वधू यांच्या गळ्यात ताईत म्हणून निळे मणी वापरले जातात. फार प्राचीन काळापासून व्यापारी वस्तू व पैसा (चलन) या स्वरूपांत मणी वापरले गेले आहेत. विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत कवडीचा उपयोग पैसा म्हणून भारतात, विशेषतः ग्रामीण भागात, करण्यात येत होता.

इतिहास : सर्वांत प्रथम मणी म्हणून वनस्पतीच्या बियांचा वापर करण्यात आला असावा. तथापि अतिप्राचीन कालीन प्राणिज मणी नुसतेच किंवा माळांच्या स्वरूपात उत्खननांत सापडलेले आहेत. अश्यूलीअन कालीन शंख व लहान जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) यांना भोके पाडून ओवून तयार केलेल्या माळा आणि ऑरिन्येशन व मॅग्डालीनीअन काळातील (इ.स.पू. ३०,००० – १०,००० वर्षांच्या काळातील) मणी व माळा त्यांच्या मूळ निर्मिती स्थळांपासून बऱ्याच दूर अंतरावरील उत्खननांत आढळलेल्या आहेत [⟶ अश्मयुग]. हे मणी सामान्यतः ध्रुवीय प्रदेशातील खोकडाचे सुळ्याचे दात, शॅमॉय हरणाचे दात व मानवी दात यांचे असून त्यांना भोके पाडून व ओवून माळा तयार केलेल्या होत्या.

सायबीरियातील पुराणाश्म कालीन लोक मॅमथ या प्राण्यांच्या दातांपासून कोरून द्विपाली (दोन पाळ असलेले) मणी तयार करीत असत. असे मणी व्हीनस देवतेच्या पुतळ्यावर आढळून आले आहेत. ते मणी म्हणजे नवाश्मयुगातील यूरोप, ब्रिटन व द. फ्रान्स येथे सापडलेल्या हाडांच्या वा दगडी दुधारी कुऱ्हाडीच्या आकाराच्या मण्यांचे आद्य स्वरूप असावे. नवाश्मकालात प. यूरोपात व स्वित्झर्लंडमध्ये स्टिअटाइटाचे (संगजिऱ्याच्या जड, घट्ट प्रकारचे शंखजिऱ्याचे) गोलसर मणी लोकप्रिय होते तर प. यूरोपात, विशेषतः आयर्लंडमध्ये पूर्वाश्मकालीन थडग्यांत दगड, हाडे व अंबर यांचे अरूंद भागाकडे भोके असलेले मणी सापडलेले असून ते नवाश्मकालीन स्कँडिनेव्हियात तयार झालेले होते.

इ. स. पू. ४००० च्या सुमारास स्टिअटाइटाचे दगडी मणी ईजिप्त मध्ये सापडले असून त्यांवर काचसदृश्य चकाकी आढळते पण ते मणी काचेचे नव्हते. साम्राज्यपूर्व काळापासून (इ. स. पू. सु. ३६०० ते ३२००) रोमन काळापर्यंत (इ. स. पू. ३० ते इ. स. ६४०) निळे चकचकीत मणी ईजिप्तमध्ये वापरात होते. हे मणी क्वॉर्ट्‌झाचे दोन तुकडे उष्णतेने जोडून केलेले असत व जोडताना थोडा चुना मिसळीत आणि त्यावर जाड व चकचकीत निळसर (तांब्याच्या लवणांचा) वा जांभळट – काळसर (मँगॅनिजाच्या लवणांचा) मातीचा थर दिलेला असे. असे मणी बनविण्याची कला बाराव्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. १९९१ ते १७८६) उच्चावस्थेत गेली होती. याशिवाय हिरवे फेल्स्पार, नीलाश्म (लॅपिस लॅझुली), रक्ताश्म (कार्नेलियन), हेमॅटाइट, पिरोजा (टर्क्वॉ इज), जमुनिया (ॲामेथिस्ट) इत्यादींचे मणी गोलसर आणि दंडगोलाकार इ. आकारांत वापरीत वा त्यांच्या माळा करीत. एकोणिसाव्या ते बावीसाव्या राजवंशांच्या काळात गोल व लांबट आकाराचे लाखो मणी ममीवर (रासायनिक प्रक्रिया करून जतन केलेल्या प्रेतावर) आच्छादन करण्यासाठी व प्रेतवाहकांच्या संपूर्ण वस्त्रांवर लावण्यासाठी वापरीत असत. या काळात व इ. स. पू. ६०० पर्यंत ताईताचे मणी व पदके तयार करण्यासाठी विविध वस्तूंचा वापर करीत असत.

इ. स. पू. चौथ्या सहस्त्रकाच्या शेवटी मेसोपोटेमियात सापडलेल्या मण्यांचे आकाराच्या बाबतीत सुमेरियन संस्कृतीत व सिंधू संस्कृतीत सापडलेल्या मण्यांशी साम्य दिसून येते. नीलाश्म, रक्ताश्म, मोती इत्यादींचे मणी विविध आकारांत वापरीत. तसेच गारेचा दगड (कॅल्सेडोनी), रक्ताश्म व अकीक (ॲचगेट) यांचे मणी सुमेरियन व नंतर बॅबिलोनियन लोकांत लोकप्रिय होते. अकीकाचे मणी सोन्याच्या बंधकाने जोडून तयार केलेला कंठहार (इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकाच्या सुरूवातीचा) ऊरूक येथे सापडलेला आहे. इराणी साम्राज्यातही पूर्वेकडे याच पदार्थांचा वापर मण्यांसाठी करीत. चकचकीत मातीचा थर असलेले मणी बनविण्याची कला इ. स. पू. चौथ्या सहस्त्रकाच्या अखेरीस अर व किश येथील लोकांना माहीत होती.

इ. स. पू. तिसऱ्या सहस्त्रकात सुमेरियन व सिंधू संस्कृतींत विविध आकारांचे सोन्याचे मणी प्रचारात होते. सामान्यतः त्यांचे आकार नलिकाकार, गोलाकार व टरबुजासारखे असत. तथापि दोन्ही बाजूस वनस्पतींच्या बियांसारखा आकार असलेले नलिकाकार मणी जास्त प्रचारात होते. इ. स. पू. २००० च्या सुमारास नॅस्टर्शियमाच्या बीसारखे गोलाकार मणी प्रचारात होते व बॅबिलोनियन लोकांतही ते लोकप्रिय होते आणि अँसिरियन काळापर्यंत ते वापरात होते.   

कवडीच्या आकाराचे सोन्याचे मणी ईजिप्तमध्ये बाराव्या राजवंशाच्या काळात वापरात होते. त्यांचा वापर नितंबाभोवती परिधान करण्यासाठी करीत. सपाट द्विसिंहमुखी आकाराचे सोन्याचे मणी दाशूर व लॅहून एल येथे करीत असत. असे मणी कंठहारातही वापरीत. लेबाननच्या किनाऱ्यावरील बिब्ल्स येथे आणि ईजिप्तमध्ये द्रवाच्या थेंबाच्या आकाराचे मणी आढळले आहेत.

इ. स. पू. २००० च्या सुमाराच्या ट्रॉय शहरातील सापडलेल्या खजिन्यात व लेम्नॉचस बेटावरील (ग्रीस) पॉलिओक्नी येथे द्विसमभुज चौकोनी आणि वरील दोन्ही ठिकाणी व ॲयनातोलिया (आशिया मायनर) येथील उत्खननात नलिकाकार सोन्याचे मणी सापडले आहेत. मिनोअन व मायसीनीअन लोकांनी (विशेषतः क्रीट येथील) व इजीअन लोकांनी लिली, कमल इत्यादींच्या आकारांचे मणी बनविण्यात यश मिळविले होते. ईजिप्तमध्येही असे मणी अठराव्या राजवंशाच्या काळात बनवीत असत शिवाय तेथे माशांच्या आकाराचे सोन्याचे मणी बनवीत असत.

इ. स. पू. चौथ्या सहस्त्रकात ईजिप्त, सुमेर व त्यालगतचा पूर्वेकडील भाग येथे मातीचे चकचकीत मणी करीत असत आणि इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकाच्या उत्तरार्धात यांच्या निर्मितीत बऱ्याच तांत्रिक सुधारणा झाल्या. तेथून क्रीट व मायसीनी येथे मणी पाठविले जात व तेथून दोन मार्गांनी मध्य व पश्चिम यूरोपात ते पाठविले जात, असे माहीत झाले आहे. त्यांपैकी एक मार्ग म्हणजे डॅन्यूब व ऱ्हाईन नद्यांमार्गे व दुसरा समुद्रमार्गे. द. फ्रान्समधून नदीमार्गे अटलांटिक किनाऱ्या पर्यंत असे बरेच मणी मध्य मोरेव्हियामधील औंजेट्टिझ थडग्यांत आणि इंग्लडमधील ब्राँझ युगातील वेसेक्स येथील थडग्यांत सापडले आहेत. टेल् एल् आमार्ना येथील अवशेषात लांब नलिकाकृती व खाचदार मणी आढळले असून ते इ. स. पू. १४०० च्या सुमाराचे आहेत. वेसेक्स येथे अंबराचे मणी सापडले आहेत व ते मायसीनी येथे तयार झालेले असावेत.


जरी ईजिप्तमध्ये मणी तयार करण्यासाठी काचेचा वापर पाचव्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. २४०० ते २३७५) प्रचलित होता तरी निकट पूर्वेकडील (आशियातील) देशांत इ. स. पू. दुसऱ्या सहस्त्रकाच्या उत्तरार्धातच प्रथम खरे काचेचे मणी प्रचारात आले. काचेचे मणी अठराव्या राजवंशाच्या काळात (इ. स. पू. १५७४ ते १३२०) लोकप्रिय होते. नवाश्मयुगाच्या शेवटी व ब्राँझ युगाच्या आरंभी यूरोपात काचेचे मणी वापरात आले. स्वच्छ, अपारदर्शी निळे गोलाकार मणी द. स्पेन. फ्रान्स, सिसिली बेटे व ब्रिटनी (वायव्य फ्रान्स) येथे आढळून आले आहेत. तसेच लफक्रू (आयर्लंड) येथील पूर्वाश्मकालीन थडग्यांत हिरवे मणी सापडले आहेत. दोन्ही प्रकारचे मणी मूळ कोठे तयार झाले असावेत, याविषयी माहिती उपलब्ध नाही.

नेत्रमणी हा अपारदर्शक काचेच्या मण्यांचा एक प्रकार असून या मण्यांमध्ये दुसऱ्या रंगाची वर्तुळे, ठिपके, तंतुरूप दंड इ. आकार अंतर्वेशित करून (दाबून वा घुसवून) निर्माण केलेले असतात. हे सर्व प्रकार इ.स.पू. १३०० नंतर वापरात आले. वर्तुळ अंतर्वेशित मणी यूरोपात लोकप्रिय होते. फिनिशिया व कार्थेज (पूर्व भूमध्यसामुद्रिक किनारा) येथे हे मणी मोठ्या प्रमाणात तयार करीत असत व तेथून त्यांची सार्डिनिया, ईव्हीया (बॅलिॲ रिक बेटे) व द. स्पेन येथे निर्यात होत असे. अतिशय गुंतागुंतीचे आकृतिबंध असलेले, बहुरंगी तंतुरूप दंड अंतर्वेशित असलेले मणी सिरियात तयार करीत. असे मणी इ. स. आठव्या शतकापर्यंत तयार करीत असत व तेथून त्यांची निर्यात होत असे. हे मणी तयार करण्याचे तंत्र व्हायकिंग लोकांच्या थडग्यात आढळले. इ. स. सातव्या – नवव्या शतकांतील पुष्कळच मोठ्या आकारमानाचे व गुंतगुंतीचा चौकोनी उभ्या – आडव्या रेघांचा आकृतिबंध असलेल्या मणी तयार करण्याच्या तंत्रासारखेच असावे. असे मणी यूरोपातील त्याच काळातील थडग्यांत सामान्यातः आढळलेले नाहीत पण क्रिमियातील एका थडग्यात व सिरियात अशा मण्यांचे नमुने मिळालेले आहेत.

उत्तर व दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोक दगडी तसेच पूर्ण वा अपूर्ण शंखांपासून तयार केलेले मणी वापरीत. पेरूमधील इंफा संस्कृती सोडल्यास मौल्यवान व दुर्मिळ दगडी मणी क्वचितच वापरात होते. दुधारी कुऱ्हाडीच्या आकाराचे मणी पेरूत, तर ॲसझटेक व इंका लोकांचे मणी जेडाइट व इतर रंगीत दगडांचे असून ते बेडूक, मानवी कवटी इत्यादींच्या आकारांत बनवीत असत तसेच पेरू, गियाना व हाँडुरस येथे अनेक ठिकाणी नलिकाकार सोन्याचे जाळीदार मणी सापडले आहेत.

आफ्रिकेत खनिज मणी तसेच वनस्पतिज मणी वापरत. लाल पोवळे, रक्ताश्म वा जॅस्पर यांचा वापर जास्त करून बेनिन भागात करण्यात येतो. आफ्रिकेतील शहामृगाच्या अंड्यांच्या कवचांपासून तयार केलेले मणी ग्रीस व रोम येथील उत्खननांत आढळले आहेत. रानजोंधळ्यांच्या बियांचा वापर मणी म्हणून करीत. काचेच्या मण्यांची आयात यूरोपातून करीत.

भारतात इ.स.पू. ६००० च्या नंतर मण्यांचा वापर प्रचलित होता. या काळातील सिंधू संस्कृतीत शंख, हाडे, स्थानिक दगड तसेच आयात करण्यात येणाऱ्या पिरोजा, नीलाश्म इ. दगडाचे मणी बनवीत असत. मेहगढ येथे केलेल्या उत्खननात या काळातील इतर वस्तूंबरोबर तांब्याचा गोलसर मणी आढळला आहे. इ.स.पू ५००० नंतर शंखजिऱ्यांच्या मण्यांचा वापर करण्यात येऊ लागला, तर इ.स.पू. ४००० नंतर रक्ताश्म, पिरोजा, नीलाश्म, सूर्यकांत मणी यांचा वापर करण्यात येऊ लागला. हडप्पा संस्कृतीच्या काळात याच मण्यांचा वापर करण्यात येई. त्याचबरोबर वनस्पतिज मण्यांचाही वापर करण्यात येऊ लागला.

वनस्पतिज मण्यांमध्ये तुळशीच्या खोडापासून तयार करण्यात येणारे नलिकाकार मणी, रूद्राक्षाचे बी, बेलफळ, रानजोंधळ्याचे बी इत्यादींचा वापर करीत असत तर प्राणिज मण्यांत शंख, पोवळे, मोती, कवड्या तसेच हाडे, शिंगे, दात इत्यादींपासून केलेले मणी वापरात होते. ह्या मण्यांत गूढ गुणधर्म असतो या कल्पनेने, तसेच त्यांपैकी काहींच्या औषधी गुणधर्मामुळे त्यांचा वापर करण्यात येई.

सोने, चांदी पितळ इ. धातु – मिश्रधातूंच्या मण्यांचाही वापर फार प्राचीन काळापासून भारतात करण्यात येत आहे. हे मणी भरीव व पोकळ आणि विविध आकारांत वापरण्यात येत असत. सोन्याच्या मण्यांत लाख भरून ते दागिने आदी स्वरूपात वापरीत. अद्यापही ह्या मण्यांचा वापर थोड्याफार प्रमाणात करण्यात येतो.

काचेचे मणी हे सर्व प्रकाराच्या मण्यांत जास्त व विपुल प्रमाणात वापरण्यात येतात. भारतीयांना काचेच्या मण्यांविषयीची माहिती फार पूर्वीपासून होती. यज्ञकर्मात दुर्वेष्टिका म्हणून जी वीट वापरीत तिच्या दोन्ही बाजूंना काचेचे मणी बसवीत, असा कृष्ण यजुर्वेदाच्या कपिष्टल – कंठसंहितेत (३१.९) उल्लेख आहे. शतपथ ब्राह्मण ग्रंथात (१३.२,६,८) म्हटल्याप्रमाणे अश्वमेध यज्ञात सोडण्यात येणाऱ्या घोड्याची आयाळ व शेपटीचे केस यांना विविध रंगांचे काचेचे मणी लावून घोड्यास सुशोभित करीत असत. असाच उल्लेख तैतिरीय ब्राह्मण ग्रंथांत (३,९,४,४ – ५) मिळतो. हे उल्लेख इ. स. पू. ८०० पूर्वीचे समजले जातात. चरकसंहिता (इ. स. पू. ४०० पूर्वी), महावग्ग (इ. स. पू. ३००), चूल्लकग (इ. स. पू. ३००), कौटिलीय अर्थशास्त्र (इ. स. पू. ३००)., आचारांग सूत्र (इ. स. पू. २००), औपपातिक सूत्र, हितोपदेश (इ. स. पू. ५०० ते १००) इ. ग्रंथांत काचेच्या मण्यांविषयी उल्लेख आढळतो. दख्खनच्या दक्षिण भागातील मस्की येथे इ. स. पू. १००० च्या काळातील काचेचे मणी उत्खननात सापडलेले आहेत. अलमगीरपूर, रुपार व श्रावस्ती येथे इ. स. पू. १००० – ४०० काळातील काचेचे मणी आढळले आहेत. तक्षशिला येथील भीर टेकडीच्या उत्खननात इ. स. पू. ७०० – ५०० या काळातील विविध रंगांचे मणी मिळाले आहेत. मौर्यकाळातील ’नेत्रमणी’ उज्जैन, माहेश्वर, पाटणा, पैठण इ. ठिकाणी मिळालेले आहेत. हे मणी बहुतकरून भारताबाहेरून आले असावेत. तक्षशिला येथे इ. स. पू. ५०० च्या काळातील व कौंडिण्यपूर (महाराष्ट्र) येथेही नेत्रमणी सापडले आहेत. इ. स. पू. २०० ते इ. स. २०० च्या काळातील मणी पैठण, नेवासे, तेर, कौडिण्यपूर, कोल्हापूर, कृष्णा – गोदावरी भागात, तसेच मस्की, अरिकामेडु, चांद्रवल्ली इ. ठिकाणी सापडले आहेत. उत्तर प्रदेशातील कोपिया येथे उत्खननात सापडलेला कारखान्यात (इ. स. पू. ३०० – २०० काळातील) निरनिराळ्या रंगांचे काच मणी सापडले आहेत.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीत प्लॅस्टिकचा शोध लागल्यानंतर प्लॅस्टिकचे मणी तयार करण्यात येऊ लागले. विशेषतः पॉलिस्टायरीन प्लॅस्टिकचा (स्टायरॉन ६६६) वापर मण्यांसाठी करण्यात येतो. प्लॅस्टिकचे मणी विविध रंगांच्या छटांचे, तसेच पारदर्शक व स्वच्छ असतात. पोवळे, रूद्राक्ष, हिरा, रत्ने इ. नैसर्गिक मण्यांसारखे दिसणारे प्लॅस्टिकचे मणी हल्ली बनविण्यात येतात. ते इतके हुबेहूब दिसतात की. नैसर्गिक कोणता व प्लॅस्टिकचा कोणता हे सहजपणे ओळखता येत नाही.

प्रकार : मणी ज्यापासून तयार करतात त्या पदार्थांनुसार त्यांचे मुख्यतः (१) नैसर्गिक मणी व (२) कृत्रिम मणी असे दोन प्रकार पडतात.

(१) नैसर्गिक मणी : हे (अ) वनस्पतिज, (आ) प्राणिज आणि (इ) खनिज या तीन प्रकारचे असतात.

(अ) वनस्पतिज मणी : विविध वनस्पतींची फळे, बिया, खोडे, मुळे इत्यादींपासून मणी तयार करतात. रूद्राक्षाची फळे मणी म्हणून वापरतात. वाळलेली फळे कठीण असतात व त्यांना मध्यभागी आरपार अशी छिद्रे पाडून ती मणी म्हणून वापरतात. क्वचित् त्यांना रंग देतात व चकाकी आणतात. पाच वा जादा खाचा असणारे रूद्राक्ष जास्त गुणकारी व उपयुक्त असतात असे मानतात म्हणून त्यांचा उपयोग जपमाळेसाठी करतात. बंगालमध्ये अडुळशाच्या लाकडाचे मणी तयार करतात. तुळशीच्या वाळलेल्या मुळांपासून व खोडापासून नलिकाकार मणी करतात. रानजोंधळ्याच्या बियांचा वापर फार पूर्वीपासून मणी म्हणून करण्यात येतो. तसेच बाभूळ, सुबाभूळ इत्यादींच्या बियांचाही मणी म्हणून वापर करण्यात येतो. चंदन व इतर काही वनस्पतींच्या लाकडापासून लहानमोठे मणी तयार करतात.

(आ) प्राणिज मणी : विविध प्रकारांचे शंख, शिंपले, कवड्या, हाडे, शिंगे, दात, हस्तिदंत, पोवळी, मोती इत्यादींपासून मणी तयार करतात. मोती हा आकाराने गोलसर मण्यासारखाच असून त्याला फक्त छिद्र पाडावे लागते. इतर पदार्थापासून मात्र मणी तयार करण्यास बऱ्याच प्रक्रिया वापराव्या लागतात.(इ) खनिज मणी : विविध मौल्यवान खडे, काच, ॲफलॅबॅस्टर आणि सोने, चांदी, पितळ, कथिल इ, धातु – मिश्रधातू, तसेच विशिष्ट प्रकारच्या मातीपासून मणी तयार करतात.

(२) कृत्रिम मणी : यांत प्रामुख्याने प्लॅस्टिकच्या मण्यांचा अंतर्भाव होतो. लाखेचेही मणी तयार करतात.   


उपयोग : सर्व प्रकारच्या मण्यांचा वापर हा फार प्राचीन काळापासून मानवी शरीराच्या व विविध वस्तूंच्या सुशोभनासाठी, तसेच व्यापारी वस्तू वा पैसा म्हणून, धार्मिक कार्यात जपासाठी वगैरेंसाठी करण्यात आला आहे. सुशोभनासाठी माळा, बाहुभूषणे, कर्णभूषणे इ. स्वरूपात मणी वापरतात. पाच किंवा अधिक खाचा असलेले रूद्राक्ष व पोवळे, तसेच तुळशीच्या मण्यांच्या माळा जपासाठी वापरतात. एकाआड एक रूद्राक्ष व बेलफळ यांची माळ शाक्त पंथी, तर तुळशीच्या माळा वैष्णव पंथी लोक वापरतात. लाकडापासून तयार करण्यात येणारे विविध आकाराचे मणी लहान मुलांना शिकविण्यासाठी वापरतात. कवडी हा विशिष्ट सागरी गोगलगाईच्या शंखाचा प्रकार मण्यासारख्या वापरतात, तसेच पूर्वी चलन म्हणूनही कवडीचा उपयोग करण्यात येत होता. गाई – बैल, घोडे, म्हशी इत्यादींच्या सुशोभनासाठी कवड्या अद्यापि वापरण्यात येतात. याचबरोबर काचेचे मणीही गुरांच्या सुशोभनासाठी वापरतात. उत्तर अमेरिकेतील इंडियन लोक वामपुमचे मणी (नलिकाकार कवची मणी) विनिमय माध्यम म्हणून वापरीत, तर पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावरील लोक ॲ्बॅलोनी नावाच्या सागरी गोगलगाईच्या शिंपेसारख्या चापट शंखांचा मण्यांसारखा वापर करीत.

रत्ने्, काचेचे मणी, पोवळे, रुद्राक्ष इ. मण्यांत गूढ व अद्भूत गुणधर्म असल्याचे जगातील सर्व प्राचीन संस्कृतींत समज असल्यामुळे त्यांचा वापर ताईत म्हणून, तसेच जादूचे मणी म्हणून करीत व आजही करण्यात येतो.

सोने, चांदी, मोती, पोवळे इत्यादींचे मणी दागिन्यांसाठी वापरतात. सोन्याच्या मण्यांचा वापर सौभाग्यालंकार म्हणून लाखेच्या मण्यांबरोबर करतात.

बहुतेक सर्व मणी माळा, हार, कापडांवर शिवून, ओवून वापरतात. आफ्रिकेतील रानटी टोळ्यांमध्ये प्रणयाराधनासाठी मण्यांचा वापर करत. रंगीत मण्यांचे नक्षीकाम करून मण्यांमार्फत प्रेमपत्रे पाठवीत असत. अमेरिकन इंडियनांनी मणिकामाच्या रूपात त्यांच्या दंतकथा पिढ्यान्पिढ्या पुढे चालविल्या. वस्तूंच्या देवाण – घेवाणीत मण्यांना फार महत्त्व होते, हे यूरोपियन व्यापाऱ्यांनी व वसाहतवाल्यांनी ओळखले होते.

विसाव्या शतकात मण्यांचा वापर प्रामुख्याने सुशोभनासाठी व मणिकामासाठी करण्यात येतो. सुशोभित मण्यांची कला व्हिक्टोरियन काळात कळसास पोहचली होती. सुशोभन करण्यासाठी भरपूर मण्यांचा वापर करण्याची प्रथा विसाव्या शतकाच्या सुरूवातीस नाहीशी झाली. तथापि मण्यांचे नव्या फॅशनचे प्रकार प्रथम १९२० मध्ये व पुढे १९६० मध्ये प्रचारात आले. मणिकाम व मणिसंग्रह हे छंद आजही चालू आहेत.

तयार करण्याची कृती : मोती वगळता इतर सर्व प्रकारचे मणी तयार करताना कच्च्या मालावर विविध प्रक्रिया कराव्या लागतात. छिद्रे पाडणे एवढी एकच प्रक्रिया मोत्यावर करतात. मौल्यवान खडे व रत्ने९ यांच्या बाबतीत पैलू पाडणे, आकार देणे, चकाकी आणणे, भोके पाडणे इ. क्रिया कराव्या लागतात. पोवळे, दात, हाडे इत्यादींपासून योग्य आकाराचे मणी प्रथम बनवितात व मग छिद्रे पाडतात. कवडीच्या खाचेतून दोरा ओवून त्यांच्या माळा करतात.

रूद्राक्ष वाळल्यावर त्याला छिद्र पाडतात. क्वचित चकाकी आणून रंगवितातही. रूद्राक्षाबरोबर वापरावयाची बेलफळे ही आकाराने १.२५ सेंमी. व्यासाची असून ती अगदी कोवळी असतात. वाळवून त्यांना छिद्रे पाडतात. अडुळशाच्या, चंदनाच्या तसेच इतर प्रकारच्या लाकडांच्या खोडांपासून योग्य आकाराचे मणी तयार करून छिद्रे पाडून त्यांना चकाकी आणतात. तुळशीच्या मुळाचे व खोडाचे (वाळलेल्या) योग्य आकाराचे तुकडे करतात व त्यांचे मणी तयार करतात.

काचेचे मणी तयार करण्याची पद्धत सोपी आहे. सु. १८ मिमी. जाडीची पितळेची तार घेऊन तिच्यावर विविध रंगी माती व काचेचे दंडगोल गुंडाळतात. दिव्याच्या ज्योतीवर या मातीवर व काचेवर काम करता येते. तीन छिद्रे असलेल्या ज्वालकातून मिळू शकणाऱ्या सु. १५ सेंमी. लांबीच्या ज्योतीमुळे तारेवरील काच वितळते व तिच्यात माती मिसळून एकजीव होते. तार उजव्या हातात व काच डाव्या हातात घेतात. काच वितळताच तार गोलाकार फिरवून तिच्यावर आवश्यक तेवढी काच घेतात, नंतर ती तार काचेसह लोखंडी साच्यात घालतात, फिरवितात व काचेला योग्य आकार देतात. अशा तऱ्हेने एकाच तारेवर बरेच मणी तयार करतात. योग्य प्रकारे मणी थंड झाल्यावर तारेवरून ओरबडून काढतात आणि त्यांच्या छिद्रांच्या कडा व्यवस्थित करतात.

प्लॅस्टिकचे मणी तयार करण्यासाठी प्लॅस्टिक, प्लॅस्टिकीकारक (लवचिकपणा व विस्तरणक्षमता वाढविणारे पदार्थ), रंग व इतर भरद्रव्ये यांचे मिश्रण वितळवून साच्यातून ओततात. नंतर थंड झालेल्या या मण्यांवर अंतिम संस्करण करावे लागते.

दागिन्यांत (विशेषतः मंगळसूत्र, बोरमाळ इत्यादींत) वापरण्यात येणाऱ्या सोन्याचांदीच्या मण्यांत लाख भरण्यात येते. हे मणी सोन्याच्या पत्र्यापासून तयार करतात व नंतर त्यांत लाख भरतात. ही लाख भरण्याची कृती किचकट व वेळखाऊ आहे.

भारतीय उद्योग : वनस्पतिज, प्राणिज व खनिज (रत्नेर इ.) मण्यांची निर्मिती भारतात होते. त्यांचा वापर मर्यादित आहे. दागिन्यांसाठी सोन्याचांदीचे मणीही आवश्यकतेनुसार करण्यात येतात. काचेचे व प्लॅस्टिकचे मणी मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर करावे लागतात. दुसऱ्या महायुद्धापूर्वी काचेच्या मण्यांची आयात करण्यात येई. मात्र बैलांच्या गळ्यात घालावयाचे मणी उत्तर प्रदेशात कुटिरोद्योगात बनवीत. १९५७ च्या सुमारास सु. १०० लहान कारखाने मणी तयार करीत होते. सध्या बरेच कारखाने काचेचे मणी बनवितात परंतु प्लॅस्टिकचे मणी बाजारात येऊ लागल्यापासून काचेच्या मण्यांच्या निर्मिती उद्योगावर अनिष्ट परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेशात कुटिरोद्योगात तर फिरोझाबाद (उ.प्रदेश) आणि अमृतसर (पंजाब) येथे मोठ्या प्रमाणावर काचेचे मणी तयार करण्यात येतात.

आज प्लॅस्टिकचे विविध प्रकारांचे, आकारांचे व रंगाचे मणी तयार करण्याचे अनेक कारखाने भारतात आहेत. मात्र त्यांची तपशीलवार आकडेवारी उपलब्ध नाही.

पहा : काच प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके.

संदर्भ : 1. Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975.

            2. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part IV, New Delhi 1957.

            3. Dar, S. N. Costumes of India and Pakistan, Bombay, 1969.

            4. Dhanija, Jasleen, Indian Folk Arts and Crafts, New Delhi, 1970.

कुलकर्णी, सतीश वि. मिठारी, भू. चिं.