दंतमंजन : दात स्वच्छ करण्यासाठी ब्रशाने किंवा बोटाने दातांवर घासण्याकरिता बनविलेल्या विशिष्ट पदार्थांच्या मिश्रणास दंतमंजन किंवा दंतधावन म्हणतात. ते चूर्णाच्या व पेस्टच्या (मऊ, चिकटसर पदार्थाच्या) रूपात असते. क्वचित द्रवरूप दंतमंजनही बनवितात.

अन्न खाल्ल्यावर दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र असलेले अन्नाचे कण तसेच राहू दिले, तर लाळ व उष्णता यांमुळे ते कुजू लागतात. त्यामुळे दातावर चिकट व पिवळसर रंगाचे कीट चढते आणि त्यामध्ये रोगजंतूंना थारा मिळतो. त्याचप्रमाणे पिष्टमय आणि गोड पदार्थांच्या तोंडात राहिलेल्या अंशांपासून अम्लनिर्मिती होते व त्याने दातावरील लुकणावर (एनॅमलावर) अनिष्ट परिणाम घडतो. दात किडणे, हिरड्यांतून रक्त किंवा पू येणे, तोंडाला व श्वासाला घाण वास येणे इ. व्याधी यातून उद्‌भवतात. दंतमंजनाच्या उपयोगाने त्या टळतात. कारण दात स्वच्छ असले म्हणजे रोगजंतूंना पाय रोवण्यास, तसेच अम्लनिर्मितीस अनुकूल परिस्थिती मिळत नाही आणि हिरड्याही निरोगी राहतात. दातांना अथवा हिरड्यांना अगोदरच झालेले रोग मात्र दंतमंजनाने बरे होत नाहीत.

इतिहास : वैदिक संस्कृतीच्या काळात भारतात दात स्वच्छ करण्यासाठी चूर्णाऐवजी खैर, कडुनिंब, करंज, वड इ. कडू वा तुरट चवीच्या झाडांच्या लवचिक व मृदू काड्या वापरीत. दातांनी चावून अथवा दगडाने ठेचून त्यांचे टोक नरम कुंचल्यासारखे करून त्याने दात स्वच्छ करीत. अजूनही खेडोपाडी ही पद्धत आढळते. झाडांच्या सालीत टॅनीन नावाचे जे द्रव्य असते त्याने हिरड्या आकसतात व कुंचल्यामुळे दातांच्या फटींतील अन्नकण निघून येतात.

त्यानंतरच्या काळात हिरडा, बेहेडा, आवळा, वेलची, दालचिनी इत्यादींचे चूर्ण मधात मिसळून व ते वरील कुंचल्यावर घेऊन त्याने दात घासण्याची पद्धत होती. अक्रोडाच्या सालीचाही दात घासण्यासाठी उपयोग केला जात असे.

खरखरीत चूर्णाने दात स्वच्छ करणे जास्त सोपे असते, असे दिसून आल्यावर प्रथम नुसती माती व नंतर पमीस नावाच्या दगडाची खरखरीत पूड दंतमंजन म्हणून वापरण्यास ईजिप्तमध्ये सुरुवात झाली. यांशिवाय कोळसा आणि समुद्रफेस (एक प्राणिज औषधिद्रव्य) यांच्या चूर्णांचाही वापर त्या काळी केला जात असे.

बदामाची व अक्रोडाची साल, हिरडा, बेहेडा किंवा सुपारी भाजून केलेले चूर्ण त्यात कापूर व तुरटी मिसळून आणि भाताचे तूस किंवा गोवऱ्या जाळून मिळणारी राखुंडी दंतमंजन म्हणून वापरली जात असे. तपकीर, तंबाखूची पूड आणि तंबाखू जाळून केलेली पूड (मशेरी किंवा मिश्री) आजही खेडोपाडी वापरतात. तंबाखूत निकोटीन हे अमली द्रव्य असल्यामुळे तिची पूड किंवा तपकीर वापरणे आरोग्यविघातक आहे.

इ. स. १९६४ साली लंडनमध्ये भरलेल्या दंतवैद्यकीय परिषदेत आर्. डी. इमेस्ली यांनी दात स्वच्छ करण्याच्या सूदानमधील पद्धतींची माहिती पुढीलप्रमाणे दिली. त्यांमधील पहिली पद्धत दातावरील कीट काढण्यासाठी ८०% व नंतरच्या क्रमाने कमी होत होत शेवटी ४०% उपयुक्त आहे. (१) काडी चावण्याची पद्धत (आफ्रिकेत सर्वांत अधिक वापरात असलेली), (२) बोटाला फडके गुंडाळून दात साफ करणे, (३) ब्रश व पेस्ट वापरणे, (४) एक प्रकारचा डिंकासारखा पदार्थ (लुबान) चावणे, (५) रेषा अधिक असलेले डॉम नावाचे फळ खाणे, (६) ऊस चावून खाणे, (७) संत्री खाणे. आधुनिक काळात दंतमंजने शास्त्रशुद्ध पद्धतींनी बनविली जातात.

दंतमंजनांचे घटक व त्यांची कार्ये : अपघर्षक : (खरवडून व घासून पृष्ठभाग गुळगुळीत करणारा पदार्थ). दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यांसाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले पदार्थ दंतमंजनात वापरतात. खरखरीतपणा जास्त असल्यास दातावरील लुकणास चरे पडण्याची भीती असल्यामुळे वापरावयाच्या अपघर्षकाचा खरखरीतपणा प्रत्यक्ष तपासून पाहिला जातो. त्याचप्रमाणे ते बिनविषारी व रुचिहीन असून त्यांचे कणही आवश्यक तितके बारीक असावे लागतात. अवक्षेपित (न विरघळणारे असल्याने तळाशी बसलेले) कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट, सजल ॲल्युमिना, पोटॅशियम टार्टारेट, बेंटोनाइट इ. अनेक पदार्थ या कामी उपयोगी पडतात. काळ्या दंतमंजनात कोळशाची पूड वापरतात.

दंतमंजनातील अपघर्षकामुळे बऱ्याच वेळा दंतमंजनाला अम्लता किंवा क्षारता (अल्कलिनीटी) येते. दंतमंजन अम्लधर्मी असेल, तर तोंडाला जास्त लाळ सुटते व क्षारधर्मी असेल, तर अन्नकण कुजून तयार झालेल्या अम्लांचा अम्लधर्म नाहीसा होतो. म्हणून ज्या तऱ्हेचे दंतमंजन बनवावयाचे असेल त्यानुसार अपघर्षकाची निवड करता येते. उदा., कॅल्शियम फॉस्फेटाने अम्लता व पोटॅशियम टार्टारेटाने क्षारता मिळते.

प्रक्षालक : हे मुख्यतः पेस्टमध्ये वापरले जाते. दंतमंजनाचा शिरकाव सांधिकोपऱ्यातही व्हावा आणि निघून आलेले घाणीचे कण सतत तरंगत रहावेत या उद्देशाने यांचा अंतर्भाव दंतमंजनात करतात. यासाठी वनस्पतिज तेलातील वसाम्लांपासून [⟶ वसाम्ले] बनविलेला सोडियम साबण सामान्यतः वापरतात. सोडियम लॉरिल सल्फेट हा पर्यायी साबणही [⟶ प्रक्षालके] काही ठिकाणी वापरतात.


इतर द्रव्ये : कॅल्शियम व मॅग्नेशियम परबोरेट किंवा मॅग्नेशियम पेरॉक्साइड यांचाही अंतर्भाव दंतमंजनात करतात. दंतमंजन वापरताना यांचे अपघटन (रेणूचे तुकडे पडण्याची क्रिया) होऊन ऑक्सीजन बाहेर पडतो आणि त्यामुळे जंतुनाश होण्यास व तोंडाची दुर्गंधी जाण्यास साहाय्य होते. त्याचप्रमाणे दातांना शुभ्रता येते.

याशिवाय मेंथॉल, थायमॉल, यूजेनॉल, मिथिल सॅलिसिलेट, कापूर इ. सुगंधी द्रव्ये दंतमंजनात घालतात. त्यामुळे उत्साहवर्धक स्वाद निर्माण होतो व दंतमंजनात एखादे उग्र वासाचे द्रव्य असल्यास त्याचा वास झाकला जातो. ही द्रव्ये काही प्रमाणात जंतुनाशकही आहेत.

दंतमंजन वापरणे सुखावह व्हावे म्हणून किंवा त्यातील एखाद्या घटकाची चव वाईट असल्यास ती सुसह्य व्हावी यासाठी कित्येकदा दंतमंजनात सॅकॅरीन किंवा तत्सम एखादे गोडी आणणारे द्रव्य वापरतात. दंतमंजनाला आकर्षकता यावी यासाठी त्यामध्ये रंगही वापरण्याचा प्रघात आहे. यासाठी वापरली जाणारी रंगद्रव्ये खाद्य–रंग म्हणून मान्य झालेली असावी लागतात.

पेस्टमधील घटक पायसरूपाने (तेलासारखी व पाण्यासारखी द्रव्ये एकमेकांत मिसळल्याने बनणाऱ्या दुधासारख्या किंवा लोण्यासारख्या अवस्थेत) एकत्र झालेले असतात. ते वेगळे होऊ नयेत व पेस्टचा घट्टपणा कायम रहावा यांसाठी ग्लिसरीन, प्रोपिलीन ग्लायकॉल, सॉर्बिटॉल, डिंक, अल्जिन इ. पदार्थ वापरावे लागतात. त्याचप्रमाणे किण्वनाने (सूक्ष्मजीव किंवा एंझाइमे–जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिनयुक्त पदार्थ–यांमुळे होणाऱ्या रासायनिक विक्रियेने) कार्बन डाय–ऑक्साइड तयार होण्याची शक्यता असल्यास सोडियम बेंझोएटासारखे एखादे परिरक्षक (नाश थांबविणारे द्रव्य) वापरतात.

मिश्रणात वापरावयाचे पदार्थ निवडताना ते शक्यतो रासायनिक दृष्टीने अक्रिय (सहजासहजी रासायनिक विक्रिया न होणारे) आहेत असे निवडतात किंवा तसे नसले, तरी एकमेकांशी निदान मिळतेजुळते आहेत याची खात्री करून घ्यावी लागते.

औषधी दंतमंजने : दातांना कीड लागू नये यासाठी यूरीया, जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारी) कॉपर क्लोरोफिलिने, पेनिसिलीन, फ्ल्युओराइडे इ. औषधिद्रव्यांचा घटकांत समावेश करून काही दंतमंजने बनविली जातात. यांपैकी फ्ल्युओराइड गुणकारी आहेत परंतु इतर द्रव्ये गुणकारी आहेत किंवा नाहीत यासंबंधी एकमत नाही.

काही द्रवरूप दंतमंजनेही प्रचलित आहेत परंतु त्यांचा खप फारच कमी आहे. यांमध्ये फेसाळणारी व न फेसाळणारी असे दोन प्रकार आहेत. फेस होण्याचा गुण येण्यासाठी त्यात ⇨ सॅपोनिने  किंवा ऑलिव्ह तेलाचा अथवा बदामाच्या तेलाचा साबण यांचा उपयोग करतात. स्वाद येण्यासाठी मेंथॉल, यूजेनॉल, यूकॅलिप्टॉल, मिथिल सॅलिसिलेट इ. द्रव्ये पूतिरोधक (जंतूंची वाढ थोपविणारे द्रव्य) म्हणून सॅलॉल, बेंझॉइक अम्ल आणि रंगासाठी कारमाइन, इओसीन इ. खाद्य–रंग वापरतात व त्यांचा अल्कोहॉलात विद्राव बनवितात.

उत्पादन : दंतमंजनातील सर्व घटक एकजीव होतील अशा तऱ्हेने मिसळणे आवश्यक असते. त्याकरिता विशिष्ट चूर्ण–मिश्रण–यंत्रे वापरतात. मिश्रणक्रिया चालू असताना मिश्रणाचे नमुने सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने तपासतात आणि मिश्रण पूर्णपणे एकजीव झाले आहे, अशी खात्री झाल्यावरच ते विक्रिस पाठवितात.

टूथपेस्ट तयार करण्याची प्रक्रिया यापेक्षा जास्त गुंतागुंतीची असते. त्याकरिता लागणाऱ्या यंत्रसामग्रीचे दोन भाग पडतात : (१) घटक दव्ये मिसळणे, भिजवणे, ढवळणे, तापविणे इ. क्रियांसाठी लागणारी पात्रे व उपकरणे हा एक आणि (२) पेस्ट दबणाऱ्या नळ्यांमध्ये [ कोलॅप्सिबल ट्यूब्जमध्ये ⟶ आवेष्टन] भरण्याची योजना असलेली हा दुसरा.

भारतात टूथपेस्टचे उत्पादन काही ॲलोपॅथिक औषधी व सौंदर्यप्रसाधने बनविणारे कारखाने करतात. चूर्णरूप दंतमंजनांचे उत्पादन वरील प्रकारचे कारखाने व आयुर्वेदीय औषधांचे कारखाने यांमध्येही होते.

दंतमंजनांचे कायदेशीर नियंत्रण ⇨ औषध  सौंदर्यप्रसाधन अधिनियमाखाली येते. त्यानुसार दंतमंजने दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असली पाहिजेत. भेसळ करणे, नावाची नक्कल करणे व निराळ्या नावाने ती विकणे, हे गुन्हे आहेत.

संदर्भ : 1. Grossman, L. I. Lippincott’s Handbook of Dental Practice, London, 1958.

           2. Poucher, W. A. Perfumes, Cosmectics and Soaps, London, 1959.

           3. Sagarin, E., Ed, Cosmectics : Science and Technology, New York, 1957.

           ४. छांगाणी, श्रीगोवर्धनदास शर्मा अष्टाङ्‌ग सङ्‌ग्रह, बनारस, १९४५.

पटवर्धन, सरिता अ. जोशी, लीना