बाष्पनशील तेले : सहज वाफ(बाष्परूप) होणाऱ्या, वनस्पतींपासून मिळणाऱ्या व विशिष्ट वास (सामान्यत: सुवास) असलेल्या तेलांना ‘बाष्पनशील तेले’ असे म्हणतात. उदा., चंदन, गवती चहा इ. सामान्य वनस्पतिज व प्राणिज तेले सुलभतेने बाष्परूप होत नाहीत, स्पर्शाला ओशट असतात आणि रासायनिक संघटनांच्या दृष्टीनेही या तेलांहून भिन्न असतात. या तेलांना ‘स्थिर तेले’ असे म्हणतात. [⟶ तेले व वसा].

गुलाब, मोगरा इत्यादींची फुले, चंदनाचे खोड, संत्र्याची साल, वेलदोड्याचे दाणे, तुळशीची पाने, चीड वृक्षाचा चीक इ. वनस्पतिज पदार्थांना जे सुवास येतात ते त्यांमध्ये असणाऱ्या काही विशिष्ट तेलांमुळे. ही तेले म्हणजे त्या त्या वनस्पतींच्या सुगंधांचे सत्व किंवा सारआहे आणि या अर्थाने त्यांना सत्त्वरूप किंवा सारभूत तेले (इसेन्शियल ऑइल्स) असे नाव देण्यात आले. पाण्याच्या वाफेबरोबर ही तेले उडून जाऊ शकतात म्हणून त्यांना बाष्पनशील तेले असेही म्हणण्यात आले. 

अस्तित्व : बाष्पनशील तेलांचे अस्तित्व वनस्पतीच्या एखाद्या विशिष्ट भागातच असते असे नाही. काहींच्या पानांत वा फुलांत, काहींच्या खोडात तर काहींच्या मुळात किंवा सर्व अवयवांतही ती आढळतात. काही झाडांच्या चिकात अथवा डिंकासारख्या उत्सर्जित (बाहेर पडणाऱ्या) पदार्थातही ती असतात. 

काही ठिकाणी ही तेले मुक्तरूपात तर काही ठिकाणी ग्लुकोजाबरोबर संयुक्तावस्थेत असतात (उदा., कडू बदाम, मोहरी) आणि एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांच्या) क्रियांनी ती मुक्तावस्थेत येतात. 

रासायनिक संघटन : बहुसंख्य बाष्पनशील तेले अनेक रासायनिक संयुगांची मिश्रणे आहेत. त्यांतील घटकांची संख्या प्रसंगी ७०-७५ इतकी मोठी असू शकते. काहींमध्ये एखादाच घटक फार मोठ्या प्रमाणात असतो. उदा.,गवती चहाच्या तेलात सिट्रॉल हे संयुग ७५ ते ८०% इतके असते. रासायनिक दृष्टीने विचार केला, तर या घटकांचे तीन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारात मोनोटर्पिने व सेस्क्विटर्पिन जातीची संयुगे येतात [⟶ टर्पिने]. मोनोटर्पिनांचे अवलयी एकवलयी व द्विवलयी आणि सेस्क्विटर्पिनांचे अवलयी, एकवलयी , द्विवलयी व त्रिवलयी हे सर्व प्रकार यामध्ये आढळतात. याशिवाय पॅराफिने, ओलेफिने व अँरोमॅटिक हायड्रोकार्बने यांचेही अस्तित्व यामध्ये असते. 

दुसऱ्या प्रकारात वरील टर्पिनांशी संबंधित अशा अल्कोहॉले, आल्डिहाइडे, कीटोने, एस्टरे व अम्ले यांचा समावेश होतो. बाष्पनशील तेलांना जे विविध वास येतात ते मुख्यत: या घटकांमुळेच. याशिवाय फिनॉले, फिनॉलिक ईथरे, अम्ले, लॅक्टोने व ऑक्साइडे या जातीची संयुगेही यात येतात. 

तिसऱ्या प्रकारची संयुगे काही अगदी थोड्या तेलांत, उदा., मोहरी, कांदा, लसूण इत्यादींच्या तेलांत आढळतात. त्यांमध्ये कार्बनी आयसोथायोसायानेटे, डायसल्फाइडे, सायनाइडे, अँथ्रानिलेटे, अमाइने, इंडॉल, स्कॅटॉल इत्यादींचा समावेश होतो. 

भौतिक व रासायनिक गुणधर्म : बहुसंख्य बाष्पनशील तेले द्रवरूप आहेत अपवादात्मक काही अर्धवट घनरूप व घनरूप आहेत. त्यांना विशिष्ट वास व काहींना स्वादही आहेत. पाण्यामध्ये ही तेले विरघळत नाहीत परंतु निर्जल अल्कोहॉल, ईथर इ. कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थात) ती विरघळतात. पाण्याच्या वाफेबरोबर ती बाष्परूपाने ऊर्ध्वपातन पावतात (वाफ होऊन अलग होतात). स्थिर तेलांप्रमाणे साध्या ऊर्ध्वपातनात त्यांचे अपघटन (घटक द्रव्य अलग होणे) होत नाही. बहुतेक सर्व तेले पाण्यापेक्षा हलकी आहेत व ती प्रकाशीय दृष्ट्या क्रियाशील [प्रतलीय ध्रुवित प्रकाश त्यांतून गेल्यास त्याचे प्रतल वळविणारी ⟶ ध्रुवणमिति] असतात.

अनेक रासायनिक संयुगे यांमध्ये मिश्ररूपांत असल्यामुळे त्यांच्या रासायनिक गुणधर्मांत विविधता आढळते. 

उत्पादन पद्धती : वनस्पतींपासून ही तेले काढण्याकरिता पुढील पद्धती उपलब्ध आहेत : (१) जलीय व बाष्पीय ऊर्ध्वपातन,(२) एनफ्लूअरेज, (३)भिजवण(मॅसरेशन),(४) संपीडन व (५) विद्रावकांच्या योगाने निष्कर्षण.


ऊर्ध्वपातन : जलीय ऊर्ध्वपातनात तेल काढावयाची वनस्पती पाण्याबरोबर उकळतात. पाण्याबरोबर बाष्पनशील तेलाचेही बाष्प होते. हे बाष्पमिश्रण वेगळे करून थंड केले म्हणजे पाणी व तेल यांचे द्रवरूप मिश्रण मिळते. त्यामध्ये तेल पाण्याच्या पृष्ठावर तरंगते व ते काढून घेतात.

बाष्पीय ऊर्ध्वपातनात वनस्पती पाण्यात न मिसळता वेगळी ठेवून तीमधून वाफ घालवितात व मिळणारे बाष्पमिश्रण वरीलप्रमाणेच थंड करून तेल जमवितात. 

दोन्ही प्रकारांत तेलाचा काही अंश ऊर्ध्वपातित मिश्रणात सूक्ष्म बिंदूंच्या रूपाने आणि विद्रुतावस्थेत (विरघळलेल्या अवस्थेत) पाण्यात राहतो, तोही काढून घेतात. 

जलीय ऊर्ध्वपातनाने मिळणारे तेल पूर्णपणे वनस्पतीत असलेले मूळचे तेलच असेल असे नाही. दीर्घकाल कढत पाण्याच्या सान्निध्यात राहिल्यामुळे तेलातील काही घटकांचे (उदा.,एस्टरांचे) कमीजास्त प्रमाणात अपघटन होऊ शकते व त्यामुळे निर्माण झालेली संयुगेही तेलात येऊ शकतात. बाष्पीय ऊर्ध्वपातनात वनस्पतींचा संबंध प्रत्यक्ष पाण्याशी न येता वाफेशी येतो. त्यामुळे या पद्धतीने मूळच्या घटकांचे अपघटन पुष्कळच कमी प्रमाणात होते आणि मिळणारे तेल मूळ तेलाशी जास्त मिळतेजुळते असते. या पद्धती वापरण्यास सोप्या असून त्यांच्याकरिता लागणारी उपकरणे साधी व स्वस्त असतात, त्यामुळे त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 

अत्तरे काढण्यासाठी जलीय किंवा बाष्पीय ऊर्ध्वपातनच वापरतात. सुगंधी पदार्थांपासून जे बाष्पमिश्रण तयार होते ते थंड होऊन जेथे द्रवरूपात साठते त्या साठवण पात्रात चंदनाचे तेल ठेवतात. त्यामध्ये सुगंधी पदार्थातील बाष्पनशील तेल विरघळते व चंदनमिश्रित तेल मिळते, हेच अत्तर होय. चंदनमिश्रित जलबाष्पमिश्रण सुगंधी पदार्थांवरून नेऊन मिळणारे बाष्पमिश्रण थंड करून अत्तर बनविण्याचीही पद्धत आहे. 

ऊर्ध्वपातनासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या उपकरणात उष्णतेकरिता विस्तव वापरतात त्यात कित्येकदा वनस्पतीचा पात्राच्या पृष्ठभागाशी संपर्क येऊन ती करपते आणि त्यामुळे तेलाचा करपट वास लागतो. याशिवाय अपघटनाने बनलेली कित्येक दुर्गंधी द्रव्ये (उदा., हायड्रोजन सल्फाइड, अँसिटाल्डिहाइड इ.) तेलात रहातात. हे दोष दूर करण्यासाठी विशोधन करावे लागते. त्याकरिता तेलाचे पुन्हा जलीय किंवा बाष्पीय अथवा निर्वात अवस्थेत ऊर्ध्वपातन करतात. 

टर्पिन व सेस्क्विटर्पिन हे घटक अतृप्त (ज्यांत दोन किंवा तीन बंधांनी जोडले गेलेले कार्बन अणू असल्यामुळे ज्यांना इतर अणू वा अणुगट जोडले जाऊ शकतात असे) असल्याने ज्या तेलांत हे घटक विपुल असतात ती टिकत नाहीत. शिवाय हे घटक विरल अल्कोहॉलमध्ये अल्प प्रमाणात विद्राव्य (विरघळणारे) असल्याने सुगंधी मिश्रणे बनविण्याकरिता अशी तेले वापरणे गैरसोयीचे असते. हे घटक तेलातून काढून टाकले म्हणजे टर्पिनरहित व सेस्क्विटर्पिनरहित तेले सिद्ध होतात. ही तेले अल्कोहॉल–विद्राव्यता व वासांची तीव्रता या दृष्टींनी मूळच्या तेलांपेक्षा सरस असतात. यांच्या उत्पादनाकरिता निर्वात स्थितीत विभाजक (भागश:) ऊर्ध्वपातन करतात. [⟶ ऊर्ध्वपातन].

एनफ्लूअरेज : ज्या तेलांना (विशेषत: फुलांतील) उच्च तापमान सोसत नाही व ज्या फुलांची सुगंध-निर्मिती फूल तोडल्यावरही काही काळ चालू असते अशा फुलांकरिता (उदा.,जाई, निशिगंध इ.) ही पद्धत उपयोगी पडते. या पद्धतीत शुद्ध केलेल्या चरबीच्या निकट सान्निध्यात फुले दीर्घकाळ ठेवतात. त्यामुळे बाष्पनशील तेल चरबीत विरघळते. नंतर ही सुगंधित चरबी (पोमेड) वेगळी काढून अल्कोहॉलामध्ये मिसळली म्हणजे बाष्पनशील तेल त्यामध्ये विरघळते.व तेलाचा अल्कोहॉली विद्राव मिळतो. हा विद्राव थंड केला म्हणजे त्यातील मेणे व सेस्क्विटर्पिने वेगळी होतात ती गाळून टाकल्यावर मिळणाऱ्या विद्रावाचे ऊर्ध्वपातन करतात. त्यामूळे अल्कोहॉल ऊर्ध्वपातित होते व केवळ सुगंधी द्रव्य (अँब्सोल्यूट) शिल्लक राहते.अशीच तेल काढण्याची एक पद्धत भारतात प्रचारात आहे. तीमध्ये चरबीऐवजी तीळ वापरतात. या तिळाच्या तेलात बाष्पनशील तेल येते.

भिजवण : या पद्धतीत उष्ण चरबी किंवा तेल वापरून फुलांचे तेल काढतात. या पद्धतीला एनफ्ल्यूअरेन पद्धतीपेक्षा वेळ कमी लागतो.

अलीकडे या दोन्ही पद्धतींचा वापर पुष्कळ कमी झाला आहे कारण विद्रावक पद्धत यांपेक्षा जास्त सोयीस्कर पडते.

संपीडन : (दाब देऊन तेल काढण्याची पद्धत). नारिंग, लिंबू इ. फळांच्या सालींत असलेले तेल काढण्याकरिता ही पद्धत वापरतात. मूळ पद्धतीत फळाची साल स्पंजाच्या दोन तुकड्यांमध्ये ठेवून तिच्यावर दाब देत. यामुळे सालीतील तेल व काही रसही स्पंजात शोषला जाई. नंतर स्पंज पिळला म्हणजे एक गढूळ मिश्रण मिळे. ते निवळू दिले म्हणजे सालीतील तेल मिळत असे. आधुनिक काळात या पद्धतीसाठी जास्त कार्यक्षम उपकरणे उपलब्ध झाली आहेत.


विद्रावकांच्या योगाने निष्कर्षण: या पद्धतीत वनस्पती व हेक्झेन, बेंझीन, अल्कोहॉल इत्यादींपैकी योग्य ते विद्रावक यांचे मिश्रण करून ते नेहमीच्या तापमानास (किंवा इष्ट त्या तापमानास) ठेवतात व अवश्य तर ढवळतात. बाष्पनशील तेल विद्रावकात विरघळते, नंतर विद्राव गाळून घेतला व त्यातील विद्रावक बाष्परूपाने उडवून दिले म्हणजे जो अवशेष राहतो त्यामध्ये बाष्पनशील तेल व वनस्पतीतील मेणे, रंगद्रव्ये इ. असतात. हा अवशेष (काँक्रीट) अल्कोहॉलामध्ये विरघळून विद्रावावर काही संस्कार केले म्हणजे शुद्ध तेलाचा अल्कोहॉली विद्राव मिळतो.फुलाकरिता विद्रावक म्हणून अल्कोहॉल चालत नाही परंतु वाळलेली पाने, साली, मुळे इत्यादींकरिता तो वापरता येतो. अल्कोहॉली विद्रावातून अल्कोहॉल काढून टाकल्यावर उरणाऱ्या अवशेषांना ‘ओलिओरेझिने’ किंवा ‘रेझिनॉइडे’ म्हणतात. त्यांचा उपयोग बाष्पनशील तेलांऐवजी अनेक ठिकाणी केला जातो. [⟶ रेझिने निष्कर्षण].

उत्पादनाची साधनसामग्री : बाष्पनशील तेलांच्या उत्पादनाकरिता पुढील साधनसामग्री मुख्यतः लागते : (१) वनस्पतिज पदार्थांचे तुकडे किंवा पीठ करण्याची यंत्रे, निर्वात निर्माण करण्याकरिता निर्वात पंप इ. यंत्रे आणि (२) तेल काढण्याच्या पद्धतीनुसार विशिष्ट उपकरणे.वनस्पतींतील तेले त्यांच्या अंतरंगातील सूक्ष्म कोशिकांत (पेशींत) असल्यामुळे ती सुकरतेने मिळावी म्हणून कोशिकांचा भंग करणे किंवा त्या अनावृत करणे आवश्यक असते म्हणून बिया, खोडे, मुळे, साली इत्यादींचे तुकडे किंवा पीठ करावे लागते. फुले व पाने जशीच्या तशी वापरता येतात. या कामासाठी उपयोगी पडणारी व वनस्पतिज पदार्थाच्या स्वरूपानुसार समाधानकारक असलेली यंत्रे उपलब्ध आहेत. निर्वात स्थितीत ऊर्ध्वपातन करण्याची आवश्यकता अनेक ठिकाणी असते. त्याकरिता कमीजास्त शक्तीचे व दीर्घकाल अखंड चालू शकतील असे विद्युत् शक्तीवर चालणारे निर्वात पंपही उपलब्ध आहेत. तेल काढण्याच्या पद्धतींनुसार लागणाऱ्या विशेष उपकरणांचे वर्णन खाली दिले आहे.

ऊर्ध्वपातन : जलीय व बाष्पीय ऊर्ध्वपातनांसाठी वापरण्यात येणारी उपकरणे सामान्यतः तांब्याच्या किंवा लोखंडी पत्र्याची केलेली असून त्यांना कथिलाचे लेपनकेलेले असते. या उपकरणाचे मुख्य चार भाग असतात : (१) ऊर्ध्वपातन पात्र, (२) त्याच्या झाकणाला जोडलेली बाष्पवाहक वक्रनलिका, (३) संघनक (बाष्पाचे द्रवीभवन करणारे पात्र) व (४) तेल साठवण पात्र (आ.१).ऊर्ध्वपातन पात्रे साधारणपणे दंडगोलाकार पिंपाच्या आकाराची असून त्यांची झाकणे वाफ निसटून जाणार नाही, अशा तऱ्हेने पक्की बसविता येतात. झाकणामध्ये क्रमशः निमुळती होत गेलेली एक वक्रनलिका असते. तिचे अरूंद तोंड संघनकाच्या एका टोकाला जोडलेले असते. संघनकाच्या दुसऱ्या टोकाला तेल साठवण पात्र जोडलेले असते.

आ. १. ऊर्ध्वपातनाचे सामान्य उपकरण : (१) ऊर्ध्वपातन पात्र, (२) वाफ आत सोडण्याचा मार्ग, (३) झाकण, (४) बाष्पवाहक वक्रनलिका, (५) संघनक, (६) संघनकात पाणी जाण्याचा मार्ग, (७) संघनकातून पाणी बाहेर पडण्याचा मार्ग, (८) तेल साठवण पात्र.

आ. २. बाष्पीय ऊर्ध्वपातन उपकरण : (१) वाफेने तापविण्याकरिता आवरण, (२) वाफ आवरणात सोडण्याचा मार्ग, (३) वाफ द्रवीभूत झाल्याने वनलेले पाणी बाहेर पडण्याचा मार्ग, (४) पाणी, (५) पाणी काढून टाकण्याकरिता तोटी, (६) छिद्रयुक्त आभासी तळ, (७) वनस्पतिज पदार्थ, (८) ऊर्ध्वपातन पात्र, (९) बाष्पवाहक वक्रनलिका, (१०) वक्रनलिकेचे संघनकास जोडण्याचे टोक.

ही पात्रे भट्टीतील विस्तवाने किंवा निराळ्या पात्रात निर्माण केलेल्या वाफेने तापविली जातात. वाफेने तापवावयाच्या उपकरणात ऊर्ध्वपातन पात्राभोवती एक पोकळ आवरण असते. त्यातून वाफ आत सोडली जाते व त्यामुळे पात्र तापते. काही उपकरणांत उष्णता देण्याकरिता पात्राच्या आत वाफेच्या नळ्या बसविलेल्या असतात.  बाष्पीय ऊर्ध्वपातनाकरिता लागणारी वाफ जेथे त्याच पात्रात बनवून वापरतात तेथे पात्रात एक छिद्रयुक्त आभासी तळ असतो. पाण्याची पातळी या तळाच्या खाली असते. वनस्पती आभासी तळावर ठेवतात. त्यामुळे वनस्पतीचा व पाण्याचा प्रत्यक्ष संबंध येत नाही. (आ. २)


जेथे दुसऱ्या पात्रात वाफ बनविलेली वापरतात तेथे ऊर्ध्वपातन पात्राच्या तळात छिद्रे असलेली वाफेची नळी बसविलेली असते व तिच्याद्वारे वनस्पतीला वाफ मिळते. एक ऊर्ध्वपातन क्रिया संपल्यावर दुसरी सुरू करण्यापूर्वी पात्राच्या तळाशी असलेले पाणी काढून टाकून ताजे पाणी भरावे लागते. त्यासाठी पाणी काढून टाकण्याची व भरण्याची व्यवस्था पात्रात केलेली असते.

 संघनक म्हणजे धातूच्या नळीचे एक वेटोळे किंवा अनेक सरळ उभ्या नळ्यांचा समुदाय असतो व त्यांच्याभोवती गार पाणी खेळविलेले असते. नळ्यांतून बाष्पमिश्रण जाऊ लागले म्हणजे सभोवारच्या पाण्यामुळे ते गार होऊन द्रवरूप बनते व संघनकाच्या खालच्या टोकाला जोडलेल्या साठवण पात्रात जमते. यात पाणी मोठ्या प्रमाणात असून तेल त्यावर तरंगत असते. ते सतत वेगळे जमा केले जाईल, अशा योजनाही उपलब्ध आहेत.

बाष्प उत्पादनाकरिता कमी बाष्पदाबाची (२.८.३.२ किग्रॅ./सेंमी.२) किंवा उच्चदाबाची (७.० किग्रॅ./सेंमी.२) बाष्पित्रे (बॉयलर) मिळतात.

 साठवण पात्रात वेगळ्या झालेल्या तेलाचा थर काढून घेतल्यावर जे पाणी उरते त्यामध्ये तेलाचा काही भाग संधारित (लोंबकळत्या) अवस्थेत असतो. शिवाय तेलातील काही अंश पाण्यात विरघळलेल्या स्थितीतही असतो. तेलाचा हा अंशही काढून घेणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी ऊर्ध्वपातनाकरिता लागणारी वाफ एकाच पात्रात बनविली जाते त्या ठिकाणी तेल काढून घेतल्यावर उरलेले पाणी पुन्हा ऊर्ध्वपातन पात्रात सोडून ऊर्ध्वपातन केल्याने हा कार्यभाग साधतो. अशी क्रिया पुनःपुन्हा व अखंड चालू राहील अशा योजनेची उपकरणेही असतात (आ. ३).

आ. ३. अखंड जलीय ऊर्ध्वपातनाची योजना असलेले उपकरण : (१) ऊर्ध्वपातन पात्र, (२) वाफ सरळ ऊर्ध्वपातन पात्रात सोडण्याचा मार्ग, (३) वाफेने तापविण्याकरिता आवरण, (४) आवरणात वाफ सोडण्याचा मार्ग, (५) वाफ द्रवीभूत होऊन तयार झालेले पाणी बाहेर पडण्याचा मार्ग, (६) पाणी काढून टाकण्याकरिता तोटी, (७) छिद्रयुक्त आभासी तळ, (८) पाणी व वनस्पतिज पदार्थ, (९) उष्णतानिरोधक पदार्थ, (१०) बाष्पवाहक वक्रनलिका, (११) नलिकायुक्त संघनक, (१२) संघनकात पाणी जाण्याचा मार्ग, (१३) संघनकातून पाणी बाहेर पडण्याचा मार्ग, (१४) तेल बाहेर पडण्याचा मार्ग, (१५) ऊर्ध्वपातित मिश्रणातील पाणी ऊर्ध्वपातन पात्रात आपोआप परत जाण्याची योजना.

जेथे बाष्पित्रामध्ये तयार केलेली वाफ वापरतात तेथे अशी सोय करता येत नाही. त्या ठिकाणी हे पाणी तसेच किंवा मिठाने संपृक्त करून (जास्तीत जास्त प्रमाणात मीठ विरघळवून) त्याचे परत ऊर्ध्वपातन करतात. पुन्हा ऊर्ध्वपातन करून तेलांश मिळविण्यास सोयीस्कर अशी पात्रेही उपलब्ध आहेत.

पाण्यातील तेलांश मिळविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे हे पाणी कार्बनी विद्रावकांबरोबर चांगले ढवळून नंतर पाणी काढून टाकणे व उरलेल्या विद्रावातील विद्रावक ऊर्ध्वपातनाने वेगळा करणे हा होय. याकरिता लागणारी सामग्री विद्रावकांच्या योगाने तेल काढण्याकरिता लागणाऱ्या सामग्रीसारखीच असते.


एन्फ्लूअरेज : या पद्धतीकरिता तावदानाच्या काचेसारख्या सपाट काचेला चारी बाजूंनी लाकडी चौकट बसवून तयार केलेली तबके वापरतात. त्यांचे आकारमान सु. ५ सेंमी. उंच, ५० सेंमी. लांब व ४० सेंमी. रुंद असे असते. तबकांच्या दोन्ही पृष्ठांना प्रथम विशुद्ध चरबीचा थर देतात, नंतर त्यामध्ये फुले ठेवून तबकांची उतरंड रचली म्हणजे फुले भरलेले अनेक हवाबंद कप्पे तयार होतात. चरबीमध्ये फुलांतील तेल विरघळते. ही फुले सु. १२ ते १८ तास ठेवल्यावर उतरंड उतरून शिळी फुले काढून ताजी भरतात. अनेकदा असे केले म्हणजे चरबी तेलाने संपृक्त होते व मग चरबीचा थर खरडून एकत्र करतात. नंतर ही चरबी अल्कोहॉलामध्ये मिसळून मिश्रण ढवळले म्हणजे चरबीतील तेल अल्कोहॉलामध्ये विरघळते. हा अल्कोहॉली विद्राव नंतर–१५° से. तापमानास थंड करतात त्यामुळे त्यात आलेले चरबी, मेण इ. आनुषंगिक पदार्थ वेगळे होतात. ते गाळून काढून टाकतात. अल्कोहॉली विद्रावातील अल्कोहॉल निर्वात ऊर्ध्वपातनाने काढून टाकले म्हणजे जो अवशेष राहतो ते बाष्पनशील तेलच मुख्यतः असते.

अल्कोहॉली विद्राव बनविण्याकरिता लागणारी ढवळण्याची सोय असलेली यंत्रसामग्री व विद्राव–१५° से. पर्यंत थंड करण्याकरिता लागणारी शीतकपाटे उपलब्ध आहेत.

संपीडन : संत्रे, लिंबू इत्यादींच्या सालीतील तेल काढण्याकरिता पूर्वीच्या स्पंज पद्धतीपेक्षा जास्त सोयीस्कर व कार्यक्षम उपकरणे आता उपलब्ध झाली आहेत. त्यांपैकी एका आधुनिक उपकरणाने फळांचा रस आणि सालीतील तेल ही एकमेकांत न मिसळता वेगवेगळी जमा करता येतात. त्यामुळे फळांचे रस तयार करणाऱ्या कारखान्यांना बाष्पनशील तेलेही मिळविणे शक्य झाले आहे.

विद्रावकांच्या योगाने निष्कर्षण : कथिलाचे लेपन केलेल्या मजबूत लोखंडी पत्र्याची बनविलेली पिपासारखी पात्रे अलीकडे या पद्धतीत वापरतात. पूर्वी तांब्याची वापरीत. यांची झाकणे घट्ट बसणारी असून तेल काढावयाचा पदार्थ विखुरलेला राहावा म्हणून पात्रात अनेक छिद्रयुक्त आभासी तळांची योजना केलेली असते. मिश्रण ढवळता यावे म्हणूनही सोय केलेही असते. पात्राच्या तळाला तोट्या असून आवश्यक तर पात्र वाफेने तापविता येईल अशीही योजना असते.

वनस्पतिज पदार्थ पात्रात भरल्यावर त्यावर विद्रावक सोडतात आणि जरूर तर मिश्रण ढवळतात व तापवितात. इष्ट काळानंतर तळातील तोट्यांनी निष्कर्ष (तेलयुक्त द्रव्य) काढून घेतात व गाळतात. पुन्हा पात्रात नवा विद्रावक सोडून याच क्रियेची पुनरावृत्ती दोनदा करतात, नंतर सर्व निष्कर्ष ऊर्ध्वपातनाने प्रथम संहत करून (विद्रावातील विरघळलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढवून) अखेरीस निर्वात ऊर्ध्वपातनाने सर्व विद्रावक काढून टाकतात. ऊर्ध्वपातित विद्रावक पुन्हा वापरता येतो. अवशेषरूपाने राहिलेल्या पदार्थात बाष्पनशील तेल व वनस्पतींतील आनुषंगिक पदार्थ असतात.

निर्वात स्थितीत विभाजक ऊर्ध्वपातन करण्याकरिता विभाजक स्तंभ, तापमापक, दावमापक व निर्वात पंप यांनी सज्ज अशी पात्रे लागतात. अशी स्वयंचलित उपकरणेही अलीकडे उपलब्ध आहेत.

विश्लेषण : बाष्पनशील तेलांचे विश्लेषण करण्यात दोन हेतू असतात : (१) तेलात भेसळ आहे की काय ते अजमावणे व (२) तेलाची प्रत कितपत उच्च आहे ते ठरविणे.

तेलाचा प्रातिनिधिक नमुना काढून तो एका स्वच्छ बाटलीत घेतात व त्याची प्राथमिक पाहणी करतात. तेलाचा रंग, गढूळपणा, घट्ट पातळपणा, तळाशी बसलेला गाळ, मेणचट पदार्थ, वेगळे झालेले पाणी यांसंबंधीची कल्पना यावरून येते.

तेलाचा वास किंवा काही ठिकाणी स्वाद घेतल्याने त्यात भेसळ आहे की काय याचा अंदाज करता येतो. वासाची तुलना करण्याकरिता गाळण कागदाच्या एका लांब पट्टीवर तेलाचे एकदोन थेंब घेतात. तशाच दुसऱ्या पट्टीवर अस्सल तेलाचे तितकेच थेंब घेऊन आलटून पालटून या दोन पट्ट्यांचा वास घेतल्याने तुलना करता येते. या परीक्षणाला तीक्ष्ण गंधज्ञानाची आणि अनुभवाची आवश्यकता असते. भेसळीचे स्वरूप कळून आले म्हणजे विशेष तऱ्हेच्या परीक्षणाने तिचे प्रमाण-निर्धारण करता येते.

तेलाची प्रत ठरविण्याकरिता अनेक भौतिक व रासायनिक गुणधर्म निश्चित केले जातात. त्यांमध्ये तेलाचे विशिष्ट गुरूत्व, प्रकाशीय चलन [किंवा घूर्णन ⟶ ध्रुवणमिति], प्रणमनांक (प्रकाशाचा निर्वातातील वेग व दिलेल्या माध्यमातील-येथे दिलेल्या तेलातील-वेग यांचे गुणोत्तर), वेगवेगळ्या विरलतेच्या अल्कोहॉलामध्ये त्याची विद्राव्यता, थिजण्याचे व वितळण्याचे तापमान, उत्कलन तापमान मर्यादा, १००° से. तापमानास राहणाऱ्या अवशेषाचे प्रमाण, प्रज्वलन तापमान (ज्या किमान तापमानाला तेलाचे बाष्प ज्योतीमुळे क्षणमात्र पेट घेते ते तापमान) इत्यादींचा समावेश होतो.

आवश्यक तेथे तेलातील अम्ले, एस्टरे, अल्कोहॉले, आल्डिहाइडे, कीटोने, फिनॉले इ. घटकांची प्रमाणेही निश्चित केली जातात. या परीक्षणांच्या मूल्यांची तुलना अस्सल तेलाच्या मूल्यांशी केली जाते. प्रमाणभूत शुद्ध तेलाचे गुणधर्म, घटकप्रमाणे व निर्धारणाच्या अधिकृत पद्धती यांसंबंधीची माहिती संदर्भ ग्रंथांत मिळते. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या तेलांसंबंधीची माहिती इसेन्शियल ऑइल्स ॲसोसिएशन (ई ओ ए) या अमेरिकन संस्थेने प्रसिद्ध केलेली आहे. याच तत्त्वावर पण भारतीय परिस्थितीचा विचार करून ठरविलेली प्रमाणे भारतीय मानक संस्थेच्या बाष्पनशील तेल विभागाने बसविली आहेत (क्र. आयएस : ३२६–१९६८). त्यांचा या कामी उपयोग होतो.

अलीकडे अवरक्त (द्दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अद्दश्य), जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) वर्णपट आणि वायुवर्णलेखन [⟶ वर्णलेखन] यांच्या साहाय्याने तेलांची शुद्धाशुद्धता ठरविणे साध्य झाले आहे. याकरिता विशेष तऱ्हेची उपकरणे वापरली जातात.


उपयोग : बाष्पनशील तेले सुगंधाकरिता, स्वादाकरिता, औषधी म्हणून आणि त्यांतील रासायनिक द्रव्ये वेगळी काढण्याकरिता उपयोगी पडतात.

चेहऱ्याला लावावयाच्या पावडरी, लेप (क्रीम), साबण, तेले, रुमालावर शिंपडण्याचे सुगंध, शँपू (केस धुण्यासाठी वापरण्यात येणारी मिश्रणे) इ. सौंदर्यप्रसाधनांत आणि दंतधावने, कीटकप्रतिवारके (किटक दूर ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ) यांमध्ये विविध बाष्पनशील तेले वापरली जातात. वातावरण प्रसन्न रहावे म्हणून वापरण्यात येणाऱ्या उदबत्या, धूप-मिश्रणे, सुगंधी फवारे इत्यादींमध्येही ती ह्याच गुणासाठी वापरली जातात.

पानपट्टीचे मसाले, जर्दा, बिस्किटे, केक, मुरंबे, लिमलेटाच्या गोळ्या, सरबते, आइसक्रीम इत्यादींमध्ये जे अर्क (इसेन्स) वापरतात त्यांसाठी बाष्पनशील तेले उपयोगी पडतात.

कित्येक नित्योपयोगी पदार्थांना मूळचा उग्र वास असतो किंवा काही काळाने त्यांना दुर्गंध सुटतो. तो झाकला जावा म्हणूनही बाष्पनशील तेले वापरतात. याची उदाहरणे म्हणजे कातडी वस्तू, कीटकनाशके, तयार केलेली खळ, सरस, डिंक, रबर, सिमेंटे, पॉलिशे इ. होत.

औषधी म्हणूनही काही तेले मलमे मर्दन लेप, गुळण्या करण्याची मिश्रणे यांसाठी वापरली जातात. निलगिरी तेल, टर्पेंटाइन, लवंगांचे तेल, बडीशेपेचा व पेपरमिंटाचा अर्क यांचा त्यांत समावेश होतो.

गवती चहाच्या तेलातील सिट्रॉल हे संयुग वेगळे काढून त्यापासून अ जीवनसत्त्व व अनेक सुगंधी पदार्थ रासायनिक क्रियांनी बनवितात. रोशा गवताच्या तेलापासून जिरॅनिऑल वेगळे करतात. त्याचप्रमाणे कॅसियाच्या तेलापासून सिनॅमिक आल्डिहाइड, सिट्रोनेलाच्या तेलापासून सिट्रॉनेलॉल, लिनॅलोएच्या तेलापासून लिनॅलूल हे घटक वेगळे करून इतर उपयुक्त रसायने बनविण्याकरिता कच्चा माल म्हणून वापरतात.

भारतीय उद्योग : अनेक सुगंधी वनस्पती भारतात पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. त्यांपासून बाष्पनशील तेले आणि इतर सुगंधी पदार्थ तयार करून इतर देशांना भारत पुरवीत असे परंतु एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारत या बाबतीत मागे पडला व येथील कच्चा माल परदेशी जाऊन त्यापासून काढलेली तेले आयात होऊ लागली. या अनिष्ट परिस्थितीची जाणीव देशाला १९०६ सालाच्या सुमारास होऊ लागली व ती सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. पहिल्या महायुद्धकाळी चंदनाचे तेल काढण्याचा कारखाना म्हैसूरला सुरू झाला व त्यातून परदेशांना पुरवठा होऊ लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परदेशांतून माल आयात करणे कठीण झाल्यामुळे या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधले गेले व बाष्पनशील तेले काढण्याच्या धंद्याची पाहणी करण्यात आली. हा धंदा संघटित नाही व तांत्रिक दृष्ट्या मागासलेला आहे असे दिसून आल्यावरून त्याची प्रगती व्हावी या हेतूने संशोधनास उत्तेजन व कच्चा माल आयात करण्याच्या सवलती देण्यात आल्या.

बाष्पनशील तेल उद्योगाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या विविध परदेशी वनस्पतींची भारतातील निरनिराळ्या भागांत लागवड करण्यासंबंधी प्रयत्न करण्यासाठी सेंट्रल मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लँट्स ऑर्गनायझेशन (सिंपो) ही संस्था स्थापन झालेली असून ती लागवडीचे प्रयोग करणे, सल्ला देणे, बी-बियाणे व रोपे पुरविणे इ. कार्ये करते.

पुण्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, डेहराडून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, कानपूरची हर्बर्ट बटलर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट व बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थांमध्ये बाष्पनशील तेले काढण्याच्या पद्धती, तेलातील ज्ञात व अज्ञात घटक, त्यांचे रासायनिक संघटन व उपयोग यांसंबंधी संशोधन करण्यास येते.

भारतात सु. २५ लहानमोठे कारखाने बाष्पनशील तेले व इतर सुगंधी माल तयार करतात. यांपैकी चार पाच कारखाने पुढारलेले असून मोठ्या प्रमाणावर निर्मिती करतात.

गुलाब, जाई, जुई, चमेली, मोगरा, कुंद, केवडा, बकुळ, पारिजात इत्यादींची अत्तरे तयार करण्याचा कुटिरोद्योग मुख्यत्त्वे कनौज, गाझीपूर, जौनपूर इ. उत्तर प्रदेशातील गावी तसेच गंजाम व पर्लाकिमिडी या ओरिसातील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतो. अत्तरे व बाष्पनशील तेले मिळून सु. सहा कोटी रूपये किंमतीचा माल दरसाल निर्माण होतो. त्यांपैकी सु. दीड कोटीचे उत्पादन उत्तर प्रदेशात होते.

चंदन, गवती चहा, रोशा गवत, वाळा, निलगिरी (यूकॅलिप्टस) व टर्पेटाइन ही महत्त्वाची तेले होत. भारतातून निर्यात होणाऱ्या तेलांची आकडेवारी कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे. ओवा, गुलाब, लिंबू, जिरॅनियम, शेपा (डिल), कापूर इत्यादींची तेलेही थोड्या प्रमाणात काढली जातात. दवणा, मरबा, तगर, ओलिबॅनम, रानतुळस, सोनचाफा, जाई, जुई इ. वनस्पतींपासून तेल काढण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू झाले आहेत.

अनेक परदेशी वनस्पतींच्या लागवडीचे प्रयत्नही चालू आहेत. हिमालय व निलगिरी येथील हवामान लव्हेंडरच्या लागवडीला पोषक आहे. त्रावणकोरमध्ये लवंगाची लागवड करण्यात आली आहे. पेपरमिंटाची लागवडही अनेक ठिकाणी सुरू झाली आहे.

धने, ओवा, वेलदोडे, मिरी, हळद, आले इ. सुगंधी पदार्थ म्हणूनच निर्यात होतात व कित्येक बाष्पनशील तेले येथील उद्योगधंद्याकरिता आयात होतात. (कोष्टक क्र. २).

कोष्टक क्र. १. बाष्पनशील तेलांची भारतीय निर्यात (एप्रिल १९७५ ते मार्च १९७६ अखेर). 

तेलाचे नाव 

किंमत (रुपये) 

तेलाचे नाव 

किंमत (रूपये) 

गवती चहा 

१,७५,२३,७६० 

वाळा 

१,८७,००० 

(लेमन ग्रास) 

 

निलगिरी 

१,६४,२३३ 

चंदन 

१,३९,९३,७७६ 

पेपरमिंट 

३२,८८० 

रोशा 

१०,३९,५२४ 

ॲनिस 

४,६३२ 

जिंजर 

५,४९,११८ 

लवंग 

१,४०९ 

   

एकूण 

३,३४,९६,३३२ 


कोष्टक क्र. २. बाष्पनशील तेलांची भारतात होणारी आयात (एप्रिल १९७५ ते मार्च १९७६ अखेर). 

तेलाचे नाव 

किंमत (रूपये) 

तेलाचे नाव 

किंमत (रूपये) 

पेपरमिंट (कॉर्न 

१७,०७,८५२ 

दालचिनी पाने 

१,८३,८४३ 

मिंट, मेथा अर्व्हेन्सिस) 

 

लिंबू (लेमन) 

१,७३,८१८ 

जिरॅनियम 

१३,९७,८९२ 

ॲनिस 

१,५८,३२६ 

पुदिना 

१३,०८,७४१ 

जायफळ 

१,५५,४५१ 

पाच 

११,९०,७७१ 

शेपा (डिल) 

१,४९,४२८ 

पेपरमिंट (मेंथा पायपेरेटा

७,९७,२३४ 

पेटिटग्रेन 

१,४१,७१८ 

लवंग 

६,६९,८७५ 

इलँग इलँग 

८५,६१५ 

लव्हेंडर 

५,६१,८४० 

कनांगा 

५३,८८४ 

बर्गमॉट 

४,३४,३८५ 

काजुपुट 

१६,४४६ 

संत्रा 

२,९६,१३४ 

कॅरावे 

४,४०६ 

   

एकूण 

१,४५,५६,४१७ 


काही महत्त्वाच्या बाष्पनशील तेलांचे गुणधर्म व उपयोग कोष्टक क्र. ३ मध्ये दिलेले आहेत. 

कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाची बाष्पनशील तेले 

तेलाचे नाव वनस्पतीचे नाव, तेल काढण्याच्या पद्धती व लागवडीचे प्रमुख प्रदेश गुणधर्म व घटक उपयोग

अगरू (अगर)

ॲक्किलॅरिया ॲगॅलोचाया वनस्पतीच्या कवक संसर्गित (बुरशी सारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीने संसर्गित) जुन्या (५०-६०वर्षांच्या) लाकडाच्या जलीय ऊर्ध्वपातनाने भूतान, खासी, गारो, नागा, काचार व सिल्हेट येथील जंगलात आसाममध्ये तेल उत्पादन.

फिकट ते करडे पिवळे तेल वा गडद अंबरी रंग श्यान (दाट) द्रव चंदनासारखा गोड वास कडू चव.

सुवासिक द्रव्यांत संमिश्र करण्यासाठी सुपारी, तंबाखू

अँजेलिका

अँजेलिका ॲर्कँगेलिका या वनस्पतीच्या शुष्क मुळांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने‘अँजेलिकारूट’ (मूळ) तेल व बियांपासून ‘अँजेलिकासीड’ (बीज) तेल बेल्जियम, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, हंगेरी इत्यादींमध्ये लागवडीत भारतात काश्मीरमध्ये लागवड. मूळची सिरियातील.

रूट तेल:मुख्य घटक फेलांड्रीन पाण्या-सारखा पांढरा वा फिकट पिवळा ते नारिंगी तपकिरी रंगाचा द्रव रंग व श्यानता मुळानुसार व तेलाच्या जुनाटपणानुसार बदलतात मिऱ्यासारखा वास.

सुवासिक द्रव्यांत मिसळण्या-साठी मुख्यत: वापर मद्या मध्ये स्वादासाठी.

   

सीड तेल:पाण्यासारखा वा फिकट पिवळा द्रव प्रवाही (पातळ, वाहणारे) तेल तीव्र भडक ताजा मिऱ्यासारखा वास तिखट व उग्र स्वाद जुनाटपणानुसार प्रकार.

अत्तरात वापरतात दंत-धावनात स्वादासाठी

ॲनिस

पिंपिनेला ॲनिसियमया वनस्पतीच्या बियांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने ही औषधी (झुडपापेक्षा लहान अल्पाय वनस्पती) मूळची पूर्वेकडील देशांतील अर्जेटिना, बल्गेरिया, चिली, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, तुर्कस्तान, रशिया इ. देशांत लागवडीत भारतात उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, ओरिसा येथे लागवड.

पाण्यासारखा पांढरा व फिकट पिवळा द्रव गोड व मंद वास मुख्य घटक अँनेथॉल (९०-९५%) संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेल्या) अँनेथॉलांमुळे याचे महत्त्व कमी झाले.

गोळ्या, खोकल्याचे औषध, इतर औषधे व बेकरी पदार्थ आणि तंबाखू यांना स्वाद येण्यासाठी मसाल्यात, डबाबंद पदार्थ, लोणची स्वादिष्ट करण्यासाठी रॉकी, ॲनिसेटे व ब्रँडी या मद्यांत.


कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाची बाष्पनशील तेले (पुढे चालू)

तेलाचे नाव 

वनस्पतीचे नाव, तेल काढण्याच्या पद्धती व प्रमुख लागवडीचे प्रदेश 

गुणधर्म व घटक 

उपयोग 

स्टार ॲनिस 

इलिसियम व्हेरमया वनस्पतीच्या ताज्या वा अर्धंवट वाळलेल्या फळापासून किंवा पानापासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने आग्नेय आशियात लागवडीत. 

प्रमुख घटक ॲनेथॉल (९०-९५%) फिकट पिवळा वा पाण्यासारखा शुभ्र द्रव विशिष्ट प्रकारचा वास, संश्लेषित अँनेथॉलमुळे वापर कमी. 

कँडी, दंतमंजन, वायुयुक्त पेये, औषधे, अल्कोहॉली पेये इ. सुवासिक करण्या साठी, तसेच साबणात. 

आले (जिंजर) 

झिंजिबर ऑफिसिनेलया वनस्पतीच्या मूलक्षोडाच्या बाष्पीयऊर्ध्वपातनाने ही मूळची भारतीय असून जमेका, इंडोचायना, भारत, श्रीलंका, प. आफ्रिका, द. चीन, द. जपान, मध्य अमेरिका इ. ठिकाणी लागवडीत. 

मुख्य घटक कॅम्फेन, फेलांड्रिन, सिनिओल, सिट्रल, बोर्निओल व झिंजिबेरीन याचा तिखटपणा जिंजेरॉल व शोगॅओल या संयुगांमुळे येतो फिकट पिवळा ते अंबर रंगी प्रवाही द्रव जितके जुने तेल व हवेशी संपर्क असेल तितकी त्याची श्यानता वाढते गरम व मसालेदार वास जास्त संहती असताना कडसर चव. 

सुवासिक द्रव्यांत संमिश्र करण्यासाठी भाजलेल्या खाद्यपदार्थात,अल्कोहॉलयुक्त पेयांत स्वादासाठी जिंजर पेयांत. 

इलँग इलँग 

कनांगा ओडोराटाप्रकारजेन्युइनाया वनस्पतीच्या फुलांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने उष्ण कटिबंधातील बेटांत (उदा., कोमोरो) लागवड व उत्पादन भारतात १७९८ मध्ये बाहेरुन आणून लावली गेली गोड वासाच्या फुलांमुळे भारतभर बागांतून आढळते. 

निरनिराळे तिसाहून अधिक घटक असून त्यांत सुवास देणारी एस्टरे, फिनॉले, फिनॉल ईथरे, बेंझिल ॲसिटेट व बेंझिल बेंझोएट ही महत्त्वाची पिवळट व तेलकट द्रव गोड वास. 

सुवासिक द्रव्यांत आणि साबणात सुवासासाठी वापरतात. 

कडू बदाम 

तेलप्रूनस ॲमिग्डॅलसप्रकारअमारा जरदाळू (प्रूनसआर्मेनियाका) चेरी (सेरॅसस जाती), प्लम (अलुबुखार,प्रूनस डोमॅस्टिका), पीच (सत्पाळू,ॲमिग्डँलस पर्सिका) या वनस्पतींच्या फळांच्या पेंडीपासून (अंशतः तेलकट) ऊर्ध्वपातनाने काढतात कडू बदामाची अमेरिका, इझ्राएल, सिरिया, तुर्कस्तान, मोरोक्को, स्पेन, फ्रान्स येथे आणि जरदाळूची अमेरिका व इझ्राएल येथे लागवड 

ॲमिग्डॅलीन या ग्लुकोसाइडाच्या स्वरुपात बेंझाल्डिहाइड हा मुख्य घटक रंगहीन द्रव तीव्र पण गोड वास. 

इतर फळांच्या सुवासात मिश्रणासाठी बेकरी पदार्थांत व मेवामिठाईत. 

कनांगा 

कनांगा ओडोराटाप्रकारमॅक्रोफायलाया वनस्पतीच्या फुलांच्या जलीय ऊर्ध्वपातनाने जावा, इंडोनेशिया येथे लागवडीत. 

यातील घटक इलँग इलँग तेलात असलेल्या घटकांप्रमाणे परंतु प्रमाण वेगळे बहुतांशी सेस्किटर्पिने, उदा., कॅडिनीन. 

साबणाच्या सुवासासाठी व सौंदर्यप्रसाधनांत. 

कॅरावे 

कॅरम कारवीया वनस्पतीच्या पिकलेल्या शुष्क व कुटलेल्या फळांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने हॉलंड, पोलंड, डेन्मार्क, रशिया,हंगेरी, युगोस्लाव्हिया, जर्मनी, स्पेन, इंग्लंड, पाकिस्तान येथे लागवडीत भारतात काश्मीरमधील टेकड्यांवर लागवड कुमाऊँ, गढवाल, चंबा येथे २,७०० ते ३,६०० मी, उंचीवर याचे उन्हाळी पीक काढतात. 

मुख्य घटक कार्व्होन (६०-६५%) व लिमोनीन दोन प्रकार : नैसर्गिक (अशुद्ध) तेल फिकट पिवळा ते करडा, प्रवाही द्रव तीव्र व विशिष्ट तेलकट वास, चव गरम (उष्ण), जळजळीत व चावरी (झोंबणारी) परिष्कृत तेल रंगहीन वा अतिफिकट पिवळे, तीव्र व तेलकट वास, स्वाद गरम, कमी गोड व जास्त चावरा (अशुद्ध तेलापेक्षा). 

राय पावात स्वादासाठी लोणची,चीज, पाव इत्यादींत स्वादासाठी जर्मन कुमेल या ब्रँडीतील मुख्य घटक मुखक्षालन द्रावात व दंतधावनात स्वाद म्हणून,तसेच काही औषधांचा असह्य वास लपविण्यासाठी. 

कॅसिया 

सिनॅगोमम कॅसियाया वनस्पतीच्या लाकूष्ठ, पाने व साली यांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने द. चीन, व्हिएटनाम व भारत (केरळ). 

मुख्य घटक सिनॅमिक आल्डिहाइड (उच्च प्रतीच्या तेलात ८०-९५%) अशुद्ध तेलकरडा द्रव तीव्र, मसालेदार उष्ण व काष्ठरेझिनासारखा वास, दालचिनीसारखा वास. 

बेंझाल्डिहाइडाबरोबर गोळ्या, बेकरी पदार्थ, मुखक्षालके इत्यादींमध्ये स्वादासाठी वापरतात. 

         

कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाची बाष्पनशील तेले (पुढे चालू) 

तेलाचे नाव 

वनस्पतीचे नाव, तेल काढण्याच्या पद्धती 

गुणधर्म व घटक 

उपयोग 

काजुपुट 

मेलॅल्युका मायनरया वनस्पतीची ताजी पाने व फांद्या यांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने रानटी अवस्थेत वाढते अमेरिकेत लागवडीत. 

मुख्य घटक सिनिओल (५०-६५%) आल्फा टर्पिनिऑल व त्याची एस्टरे रंग-हीन फिकट पिवळा, हिरवट व निळसर गाचा प्रवाही द्रव निलगिरी व कापरा- सारखा वास जळजळीत सुवासिक चव. 

सर्दि, घसा विकार, वेदना,डोकेदुखी यांवर घरगुती औषध कीटकनाशक म्हणून व डासांना प्रतिवारक म्हणून वापरतात. 

गुलाब 

रोझा सेंटिफोलियाया वनस्पतीच्या फुलांपासून जलीय व बाष्पीय ऊर्ध्वपातनाने मोरोक्कोत लागवड. रोझा दमास्केना या वनस्पतींच्या फुलापासुन जलीय व बाष्पीय ऊर्ध्वपातनाने बल्गेरिया, रशिया,तुर्कस्तान, चीन, भारत इ. ठिकाण लागवडीत. 

मुख्य घटक फिनिल एथिल अल्कोहॉल(६३%), सिट्रोनेलॉल (२२%), जिरॅ-निऑल व नेरॉल मिळून(१३%)मोरोक्कन गुलाब तेल : फिकट पिवळा वा रंगहीन द्रव गोड वास ऊर्ध्वपातनानंतरखाली राहिलेल्या विरल द्रव्यास गुलाब पाणी म्हणतात.

अत्तरे व सुवासिक द्रव्यांत.तंबाखू सुवासिक करण्यासाठी.

   

ओटो गुलाब तेल : तुर्कस्तानात तयार झालेल्या तेलास ‘अँनातोलिया गुलाब तेल’म्हणतात. फिकट पिवळा ते ऑलिव्ह पिवळट द्रव उष्ण मसालेदार वास कडू चव.

वरीलप्रमाणे.

चंदन

भारतीय : ४,००० वर्षांचा इतिहास असलेले हे तेल ‘ईस्ट इंडियन सँडलवुड ऑइल’ म्हणून ओळखले जाते.सँटॅलम आल्बमया झाडाचे खोड, मुळे यांच्या चूर्णापासून बाष्पीय ऊर्ध्व-पातनाने ३० वर्षांहून अधिक वय असलेली झाडे तेले काढण्यास योग्य जागतिक उत्पादनाच्या ७५-८०% उत्पादन भारतात तेल काढण्याचे कारखाने कर्नाटक, उत्तर प्रदेश व तमिळनाडू या राज्यांत आहेत.

मुख्य घटक आल्फा व बीटा (९०-९५%) ते पिवळा, श्यान द्रव मंद वास, लाकडी गोड वप्राणिज बाल्समासारखा कडू व रेझीन दृश्य चव.

 
 

ऑस्ट्रेलियन :यूकॅरिया स्पायकाटाया वनस्पतीच्या विद्रावक निष्कर्षणाने व बाष्पीय ऊर्ध्वपातनाने.

हे भारतीय तेलासारखेच आहे.

वरीलप्रमाणे.

चाफा

सोनचाफा (मायकेलिया चंपका), हिरवा चाफा (आर्टांबॉट्रि ओडोरॅटिसिमस), कवठी चाफा (मॅग्नोलिया ग्लँडिफ्लोरा), नाग चाफा (मेसुआ फेरिया), भुई चाफा (केंफेरिया रोटुंडा) या वनस्पतींच्या फुलांपासून व्यापारी प्रमाणावर उत्पादन.

__

अत्तरांत व सुवासिक द्रव्यांत दंतधावनात व सौंदर्यप्रसाधनांत.

जॅस्मीन

जाई(जॅस्मिनम ऑफिसिनेल), जुई (अँ. ऑरिक्युलटेम), चमेली(जॅ. ऑफिसिनेलप्रकार ग्रँडीफ्लोरम मोगरा (जॅ. सँबॅक) या वनस्पतींच्या फुलांपासून एन्फ्लूअरेज पद्धतीने काढतात इटली, फ्रान्स, मोरोक्को, ईजिप्त, भारत, फॉर्मोसा, चीन इ. प्रदेशांत लागवड व उत्पादन भारतात गाझीपूर, जौनपूर, कनौज इ. ठिकाणी उत्पादन.

बेंझिल अँसिटेट, लिनॅल्यूल व जस्मोन हे मुख्य घटक जॅस्मीन अँब्सोल्यूट हा श्यान, गडद नारिंगी द्रव वास उष्ण व गोड जॅस्मीन घन, मेणचट, लालसर नारिंगी द्रव्य वास उष्ण व मंद.

अत्तर उद्योगात, सुवासिक द्रव्यांत, साबण सुवासिक करण्यासाठी.

जायफळ

मिरिस्टिका फ्रॅथॅन्सया वनस्पतीच्या वाळलेल्या फळांच्या बाष्पीय व जलीय ऊर्ध्वपातनाने वेस्टइंडीज बेटे, ईस्ट इंडीज बेटे, भारत येथे लागवड केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणिमहाराष्ट्र येथे लागवड.

मुख्य घटक आल्फा पायनीन व कॅम्फेन (दोन्ही मिळून ८०%)फिकट पिवळा वा पाण्यासारखा प्रवाही द्रव मंद, उष्ण व मसालेदार वास.

अत्तरांत, सुवासिक द्रव्यांत, धावनांत (लोशनात), खाद्यपदार्थ उद्योगात, औषधांत.


कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाची बाष्पनशील तेले (पुढे चालू)

तेलाचे नाव

वनस्पतीचे नाव, तेल काढण्याच्या पद्धती व प्रमुख लागवडीचे प्रदेश

गुणधर्म व घटक

उपयोग

जिरॅनियम

पेलार्गानियम ग्रॅव्हिओलेन्सव पेलर्गानियमच्या इतर जातीपासून पाने व उपशाखांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने विविध जिरॅनियम तेले तयार करतात उदा., फ्रेंच, रियुनियन,आफ्रिकन, रशियन, भारतीय, मोरोक्कन इत्यादी. फ्रान्स, आफ्रिका, रशिया, इटली, स्पेन, जपान इ. ठिकाणी लागवडीत भारतात निलगिरी,अन्नमलई इ. ठिकाणी लागवड.

मुख्य घटक जिरॅनिऑल व सिट्रोनेलॉल (दोन्ही मिळून सु, ७५-८०%), पिवळटवा गडद पिवळा वा हिरवट पिवळा द्रव गोड व गुलाबासारखा वास.

गुलाबासारखा वास असणारी मिश्रणे व साबणात आणि सुवासिक द्रव्यांत.

टर्पेंटाइन

पाइनच्या पायनस लाँगिफोलिया व इतर जातींच्या झाडांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने अमेरिका, फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, स्पेन, भारत, ग्रीस इ. ठिकाणी लागवडीत.

मुख्य घटक पिनीन (सु. ७५-८०%)कॅम्फेन, सिट्रोनेलॉल, जिरॅनिऑल इ. सुवासिक घटकही आढळतात पाण्यासारखा शुभ्र, रंगहीन प्रवाही द्रव उष्ण बाल्समसदृश्य वास.

रंगलेप व डाग काढण्यासाठी कीटकनाशक, विद्रावक, त्वचेला बाहेरुन लावण्याच्या औषधांत.

डिल (शेपा)

अँनेथम ग्रॅव्हिओलेन्सया वनस्पतीच्या चूर्ण केलेल्य बियांपासून ऊर्ध्वपातनाने अमेरिका, हंगेरी, हॉलंड, भारत, इंग्लंड इ. ठिकाणी लागवडीत भारतातअँनेथम सोवाया वनस्पतीच्या बियांपासून काढतात.

मुख्य घटक कार्व्होन, डी-लिमोनीन,फेलांड्रीनफिकट पिवळे ताजे असताना रंगहीन, प्रवाही द्रव वास मंद, उष्ण व जिऱ्यासारखा चव उष्ण, अल्प भाजणारी पण गोड सुवासिक.

पाव स्वादिष्ट करण्यासाठी, लोणच्यात मसाल्यासाठी.

दालचिनी

सिनॅमोमम झेलॅनिकम या वनस्पतीच्या वाळलेल्या सालीपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने आणि अर्धवट वाळलेली पाने व काष्ठ यांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने श्रीलंका, द. भारत, इंडोनेशिया, इंडोचायना, सिशल्स बेटे, मॅलॅगॅसी (मादागास्कर), जमेका इ. ठिकाणी लागवडीत.

साल तेल : प्रमुख घटक सिनॅमिक आल्डि- हाइड, यूजेनॉल व ॲसिटोयूजेनॉल हा फिकट पिवळा ते गडद पिवळा वा करडसर पिवळा तेलकट द्रव तीक्ष्ण, उष्ण, मसालेदार गोड सुवास. पर्ण तेल: यूजेनॉल प्रमुख घटक (८०-९०%) पिवळे ते करडसर पिवळे वास मसालेदार व उष्ण

खाद्यपदार्थ, गोळ्या, पेये, बेकरी पदार्थ, औषधे, दंत-धावन सुवासिक करण्यासाठी सुवासिक द्रव्यांत यूजेनॉल व त्यापासून अनुजात (इतर संयुगे) बनविण्यासाठी खाद्यपदार्थ, पेये इ. स्वादिष्ट करण्यासाठी.

नारिंग (संत्रे)

कडू :सिट्रस ऑरॅन्टियमउपजाती अमारा या कडू नारिंगाच्या पिकलेल्या फळांच्या सालीपासून दाबाने तेल काढतात स्पेन, गिनी, वेस्ट इंडीज बेटे, इटली, ब्राझील इ. ठिकाणी तेल काढतात.

प्रवाही द्रव गडद पिवळा ते ऑलिव्ह पिवळा व फिकट करडसर पिवळा रंग वास कडवट यालाच पेटिटग्रेन तेल असे म्हणतात.

ऑरेंज सेक या मद्यात तसेच सुवासिक द्रव्यांत व लिंबू तेलात मिसळण्यासाठी.

 

गोड :सिट्रस ऑरॅन्टियम उपजातीडलसिस या गोड नारिंगाच्या सालीपासून वरीलप्रमाणेच तेल काढतात मूळ चीन-हिमालय भागातील यूरोप-अमेरिका येथे लागवड

मुख्य घटक डी-लिमोनीन (९०%) फिकट नारिंगी पिवळा वा करडसर पिवळा प्रवाही द्रव अल्को-हॉलात अविद्राव्य गोड आल्डिहाइडा सारखा वास.

सुवासिक द्रव्यांत आणि कार्व्होनच्या संश्लेषणांत आद्य वस्तू म्हणून सरबतात औषधांत, गोळ्यांत व वातयुक्त पेयांत स्वादासाठी.

निलगिरी

यूकॅलिप्टसच्यासु. ७०० जाती आहेत पण त्यांतील थोड्याच तेलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेतयूकॅलिप्टस ऑस्ट्रेलियाना, यू. सिट्रिओडोरा, यू, डाईव्हज, यू. ग्लोब्युलस, यू, ल्यूलोझायल यू.मॅकॅर्थुरी, यू. न्युमेंरोझा, यू. फेलांड्रा, यू. पॉलित्रॅक्टिया, यू. सिडरोझायलॉन, यू. स्मिथी, यू. स्टायगेरिआनाह्या वनस्पतींच्या पानांपासून व शेंड्यांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, चीन, ब्राझील, काँगो, फ्रान्स, टास्मानिया, भारत इ. ठिकाणी लागवडीत.

प्रमुख घटक सिनिओल,यू. सिट्रोओडोरा-मध्ये सिट्रोनेलाल ६५ ते ८०% व सिट्रोनेलॉल १५ ते २०% असते रंगहीन ते फिकट पिवळा प्रवाही द्रव गोड, गुलाबासारखा आल्हाददायक वास.

औषधांत, विद्रावक म्हणून खाणकामात (फेन प्लवन क्रियेत) साबणनिर्मितीत, काही सुवासिक द्रव्यांत मिसळण्यासाठी.


कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाची बाष्पनशील तेले(पुढे चालू)

तेलाचे नाव

वनस्पतीचे नाव, तेल काढण्याच्या पद्धती व प्रमुख लागवडीचे प्रदेश

गुणधर्म व घटक

उपयोग

पाच

पोगोस्टेमॉन पॅचौलीया वनस्पतीच्या वाळलेल्या पानांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने फिलिपीन्स, इंडोनेशिया, सिशल्स बेटे, मॅलॅगॅसी, ब्राझील, टांगानिका, अमेरिका इ. ठिकाणी लागवड भारतात तेल आयात करतात निलगिरी, अन्नमलई व बंगलोर येथे प्रायोगिक लागवड.

गडद नारिंगी वा करडसर नारिंगी श्यान द्रव गोड, ओषधीय, मसालेदार वास.

इतर बाष्पनशील तेलांत मिसळण्यासाठी काश्मिरात शाली सुवासिक करण्यासाठी वाळलेली पाने उपयोगात आणतात. साबण, केशपोषक (हेअर टॉनिक) द्रव्यात व तंबाखूत सुवासिक द्रव्य म्हणून वापरतात.

पुदिना

मेंथा(स्पायकॅटा (स्पिअरमिंट) या वनस्पतीच्या थोड्या वाळविलेल्या फुलांच्या व शेंड्यांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर व यूरोपमध्ये कमी प्रमाणावर लागवड.

स्पिअरमिंट : प्रमुख घटक कार्व्होन (५६%), डी-लिमोनीन, फेलांड्रीन फिकट ऑलिव्ह रंगी फिकट पिवळट प्रवाही द्रव उष्ण हिरव्या ओषधीसारखा तीक्ष्ण वास स्वाद मसालेदार, चावरा व कडू.

चघळण्याचा गोंद (च्युईंगम), दंतघावन, गोळ्या, मुखक्षालके यांमध्ये स्वादासाठी इतर बाष्पनशील तेलांत मिसळतात.

 

मे. अर्व्हेन्सिसया वनस्पतीच्या बऱ्याच प्रकारांपासून व में.पायपेंरेटा(पेपरमिंट) या ओषधी वनस्पतीपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने चीन, जपान, ब्राझील, फॉर्मोसा, अमेरिका, बल्गेरिया, हंगेरी इ. ठिकाणी लागवडीत भारतात काश्मीरमध्ये लागवड चीन व जपानकडून भारताला आयात करावी लागते.

पेपरमिंट : प्रमुख घटक मेंथॉल (७५%) फिकट पिवळा वा रंगहीन द्रव तीव्र कडवट गोड चव थंड वास.

गोळ्या, दंतधावन, मुखक्षालके इत्यादींत स्वादासाठी सुवासिक द्रव्यांत सौंदर्यप्रसाधनांत.

बर्गमॉट

सिट्रस बर्गमियाया वनस्पतीच्या फळांच्या सालीपासून संपीडनाने इटली, उ. आफ्रिका इ. भागांत लागवडीत.

प्रमुख घटक लिनॅलिल ॲसिटेट हिरवट वा ऑलिव्ह हिरवट प्रवाही द्रव गोड वास सूर्यप्रकाशाने ते पिवळे बनते.

सुवासिक द्रव्यांत गोळ्या, खाद्यपदार्थ, तंबाखू इत्यादींत स्वादासाठी.

रोशा

सिंबोपोगॉन मार्टिनीप्रकारमोतियाया गवतापासून जलीय वा बाष्पीय ऊर्ध्वपातनाने पाकिस्तान, इंडोनेशिया, कोमोरो व सिशल्स बेटे येथे लागवडीत भारतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे लागवडीत भारतातून तेल निर्यात होते.

प्रमुख घटक जिरॅनिऑल (९०%)पामऱ्योझा म्हणूनही ओळखले जाते फिकट .पिवळा वा फिकट ऑलिव्ह रंगाचा द्रवगोड व गुलाबाच्या फुलासारखा वास.

साबणउद्योगात जिरॅनिऑल निर्मितीत

लवंग

यूजेनिया कॅरियोफायलाटाया झाडाच्या वाळलेल्या कळ्यांपासून, पानांपासून जलीय ऊर्ध्वपातनाने आणि देठांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने जावा, इंडोनेशिया, मॅलॅगॅसी, झांझिबार (टांझानिया) इ. ठिकाणी लागवडीत भारतात केरळ, कर्नाटक व तमिळनाडू येथे लागवड भारताला लवंग तेलाची आयात करावी लागते.

पर्ण तेल: प्रमुख घटक कॅरिओफायलीन व यूजेनॉल गडद करडे, क्कचित जांभळट वा जांभळट करडे तेल.

देठ तेल: फिकट पिवळे ते पिवळे तेल मसाल्याचा वास यात ९० ते ९६% यूजेनॉल असते.

यूजेनॉल व व्हॅनिलीन निर्मि तीत औषधांत.

लोणची व खाद्यपदार्थांत.

लव्हेंडर

लॅव्हेंड्यूला ऑफिसिनॅलिस या वनस्पतीच्या बऱ्याच प्रकारांच्या फुलांचे शेंडे व बुडखे यांच्या बाष्पीय ऊर्ध्वपातनाने अर्जेंटिना, इटली, कॉर्सिका, ब्राझील, इंग्लंड, हंगेरी, रशिया, जपान, स्पेन, अमेरिका इ. ठिकाणी लागवडीत भारतात काश्मीरमध्ये प्रायोगिक पातळीवर लागवड.

प्रमुख घटक लिनॅलूल व लिनॅलिल ॲसिटेट शिवाय कुमारिन, अंबेलिफेरॉन इत्यादी रंगहीन वा फिकट पिवळा द्रव गोड,उत्तेजक, आल्हाददायक वास.

ओ-द-कोलोन निर्मितात, इतर सुवासिक तेलांत मिश्रणासाठी साबणात.


 कोष्टक क्र. ३. काही महत्त्वाची बाष्पनशील तेले(पुढे चालू)

तेलाचे नाव

वनस्पतीचे नाव, तेल काढण्याच्या पद्धती व प्रमुख लागवडीचे प्रदेश

गुणधर्म व घटक उपयोग
लेमनग्रास

सिंबोपोगॉन फ्लेक्सुओसस व सि. सिट्रेटसया वनस्पतींच्या पानांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने फक्त लागवड केलेल्या वनस्पतींपासून काढतात भारतात केरळमध्ये जगातील निम्मे उत्पादन होते भारतातून निर्यात केले जाते.बेल्जियन काँगो,फ्लॉरिडा, ग्वातेमाला, ब्राझील, वेस्ट इंडीज, इंडोचायना, मॅलॅगॅसी, कोमोरो बेटे इ. प्रदेशांत लागवडीत.

मुख्य घटक सिट्राल पिवळा वा अंबर रंगाचा श्यान द्रव तीव्र व चहासारखा वास तेलात किंचित जरी पाणी राहिले, तरी हवा व सूर्यप्रकाशामुळे त्यातील सिट्रालाचे अपघटन होते, त्यामुळे ते जलरहित स्थितीत ठेवावे लागते.

सिट्राल व त्यापासून आयोनोने व अ-जीवनसत्त्व यांच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून सुवासिक द्रव्यांत.

वाळा

व्हेटिव्हेरा झिझेनॉइड्सया गवताच्या मुळांपासून जलीय वा बाष्पीय ऊर्ध्वपातनाने इंडोनेशिया, श्रीलंका, फिलिपीन्स, जपान, कौंगो, जमेका, मॉरिशस इ. ठिकाणी लागवडीत

प्रमुख घटक व्हेटिव्हेरॉल आणि आल्फा व बिटा व्हेटिव्हेरॉन अंबर ते राखट करडा, ऑलिव्ह करडा वा गडद करडा श्यान द्रव गोड वास.

खास अत्तर, सुवासिक साबणांत, सुवासिक द्रव्यांत स्थिरीकारक म्हणून व वासासाठी

सिट्रोनेला

सिंबोपोगॉन विंटरियानुसया गवताच्या वाळलेल्या पानांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने जावा, चीन, ग्वातेमाला, अर्जेटिना, ब्राझील इ. ठिकाणी लागवडीत भारतात आसाम, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र इ. ठिकाणी लागवडीत.सि. नार्डंस(श्रीलंका) या गवताच्या वाळविलेल्या पानांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने श्रीलंकेत याची लागवड करतात. तेल काढण्यापूर्वी पाने वाळवतात.

श्रीलंका प्रकार : प्रमुख घटक जिरॅनिऑल (५५-६५%), सिट्रोनेलाल व सिट्रोनेलॉल पिवळा ते करडा पिवळा वा ऑलिव्ह करडा द्रव वास आल्हाददायक.

डास प्रतिवारक म्हणून साबण, कीटकनाशके, स्वच्धताकारके, जमिनीच पॉलिश सुवासिक करण्यासाठी जिरॅनिऑल निर्मितीसाठी.

सेलरी सीड (अजमोदा)

एपियम ग्रॅव्हिओलेंटसया वनस्पतीच्या बियांपासून बाष्पीय ऊर्ध्वपातनाने फ्रान्स, हॉलंड, हंगेरी, चीन, अमेरिका येथे लागवडीत भारतात पंजाब, हरियाणा भागात लागवड भारतातून बियांची निर्यात होते.

प्रमुख घटक डी-लिमोनीन (६०%) व डी-सेलिनीन (१०-१५%) तेलाचा वास सेलेनॉइक अम्ल अँनहायड्राइड (०.५%) व सेडॅनोलाइड (३%) या संयुगांमुळे आहे.

खाद्यपदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी मसाला म्हणून औषधांत आणि सुवासिक द्रव्यांत.

[अधिक माहितीसाठी अगरू अजमोदा आले गवत, रोशा गुलाब चंदन चहा, गवती चाफा, कवठी चाफा, नाग चाफा, भुई चाफा, सोन चाफा, हिरवा जाई जायफळ जुई टर्पेटाईन दालचिनी पाइन पाच पुदिना बदाम मोगरा यूकॅलिप्टस लवंग लर्व्हेडर वाळा शेपू संत्रे या नोंदीही पहाव्यात].

पहा : सुवासिक द्रव्ये सौंदर्यंप्रसाधने.

संदर्भ : 1. Arctander. S. Perfume and Flavor Materials of Natural Origin, Elizabeth, N. J., 1960.

           2. Badhwar, R. L. Rao, P.S. Sethi, H. Some Useful Aromatic Plants, Dehra Dun, 1960.

           3. Bedoukian. P. Z. Perfumery Synthetics and Isolates, Princeton, 1951.

          4. Guenther, E. The Essential Oils, 6 Vols.,Princeton, 1960.

           5. Naves, Y. R. Mazuyer. G Natural Per    fume Materials, New York, 1947.

           6. Poucher, W. A. Perfumes, Cosmetics and Soaps, 3 Vols., London, 1959.

केळकर, गो. रा. घाटे, रा. वि. मिठारी, भू. चिं.