जलचिन्ह : (वॉटर मार्क). कागदाच्या आत उमटविलेल्या, कागद प्रकाशासमोर धरल्यावर दिसणाऱ्या, अर्धपारदर्शक आकृतीस ही संज्ञा लावतात.

कागद तयार करणाऱ्या कारखान्याचे किंवा व्यक्तीचे बोधचिन्ह म्हणून किंवा कागदाची प्रत व आकारमान यांचे निदर्शक म्हणून अशी चिन्हे उमटविण्याची पद्धत तेराव्या शतकात प्रथम इटलीत प्रचारात आली. पूर्वी ती निरनिराळ्या आकृतींच्या आराखड्यांच्या रूपातच फक्त असत. ती उमटविण्यासाठी धातूची तार वळवून चिन्हाचा आराखडा प्रथम बनवीत व तो कागद बनविण्यासाठी वापरावयाच्या चौकटीच्या तळाशी असलेल्या जाळीवर बसवीत. कागद बनविण्यासाठी जेव्हा कागदाचा पातळ लगदा चौकटीत ओतीत तेव्हा त्यातील पाणी जाळीतून निघून जाऊन लगद्यातील तंतू जाळीवर पसरत. ज्या ठिकाणी आराखडा असेल त्या ठिकाणी हे तंतू विरळ झाल्यामुळे आकृती उमटे. हातकागद करताना ही पद्धत वापरतात.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून छाया-प्रकाशयुक्त आकृती उमटविणे साध्य झाले. त्याकरिता प्रथम त्या आकृतीची कमीजास्त उठाव असलेली मेणाची मुद्रा बनवितात. तीवर विद्युत् प्रवाहाने धातु-निक्षेपण करून (धातूचा थर तयार करून) एकमेकांवर बसतील अशा दोन तक्त्यांचा साचा तयार करतात. या साच्यामध्ये मुद्रा घालून घट्ट विणीची पितळी जाळी दाबली म्हणजे मुद्रेच्या पृष्ठभागाच्या उठावानुसार जाळीचा पृष्ठभाग उंचसखल बनतो. नंतर ही जाळी कागद तयार करण्याच्या चौकटीच्या तळात बसवून कागदाचा पातळ लगदा तीत ओतला म्हणजे बनलेल्या कागदात छाया-प्रकाशाचा यथायोग्य तपशील असलेली आकृती उमटते.

यंत्राने कागद करण्याच्या प्रक्रियेत कागद ओलसर असताना आकृत्या काढलेले उठावाचे रूळ त्यावर फिरवून जलचिन्हे उमटविण्याचीही पद्धत आहे परंतु कित्येकदा अशा आकृती अस्पष्ट उमटतात.

रंगीत जलचिन्हेही उमटविता येतात. त्याकरिता कागद तीन थरांचा बनवून मधल्या थरात रंगीत जलचिन्ह उमटवितात. अशी चिन्हे परावर्तित प्रकाशाने दिसतील अशीही करता येतात.

चलनी नोट, कर्जरोखे, चेक इत्यादींच्या कागदात जलचिन्हे असतात. या जलचिन्हात ज्या बारीक सारीक खाचाखोचा असतात, त्यांची नक्कल करणे सोपे नसल्यामुळे बनावटीचा धोका कमी होतो व बनावट झाल्यास चटकन उघडकीस येते.

मिठारी, भू. चिं.