प्लायवुड : प्रस्तुत नोंदीत लाकडाच्या पातळ चादरी (व्हिनीयर), पट्ट्या, ढलप्या, तुकडे तसेच उसाच्या चिपाडासारखे अन्यथा वाया जाणारे पदार्थ अशा कच्च्या मालापासून तयार करण्यात येणाऱ्या प्लायवुड व इतर विविध तक्त्यांची वा फलकांची (बोर्ड्सची) माहिती  दिलेली आहे.

लाकडाच्या ओंडक्यातून काढलेल्या चादरी एकमेकींवर विशिष्ट तऱ्हेने चिकटवून तयार केलेल्या (लाकडी) पत्र्याला किंवा पट्टाला (जाडा पत्र्याला) प्लायवुड म्हणतात. प्लायवुडामधील चादरींची संख्या कमीतकमी तीनपासून ते पंधरापर्यंत असते. चादरींची जाडी सामान्यतः १ मिमी.च्या आसपास असते आणि त्यानुसार पत्र्यांची जाडी ४ मिमी.पासून सु. ३० मिमी.पर्यंत असते. पत्र्यांची रुंदीही, साध्या लाकडाच्या फळ्यांच्या मानाने बरीच जास्त (१ ते १·५ मी. पर्यंतही) असते. रुंदीच्या मानाने पत्र्यांची लांबी मात्र, साध्या फळ्यांचा मानाने खूपच कमी, एक-दोन मीटर असते. परिवहनात अडचण येऊ नये म्हणून रुंदी कमी ठेवली जाते.

नैसर्गिक लाकडाशी तुलना : नैसर्गिक लाकूड हवामानातील तापमान व आर्द्रता यांतील बदलानुसार आक्रसते व फुगते. त्यात गाठी असतात व त्याचे सल सर्व ठिकाणी सरळ नसतात. तसेच त्याचे बल सलांच्या दिशेपेक्षा अन्य दिशांत कमी असते. याउलट प्लायवुडाच्या विशिष्ट प्रकारच्या रचनेमुळे त्याचे बल सर्व दिशांत जवळजवळ सारखे असते. त्याच्या रचनेमुळे हवामानातील बदलाचा प्लायवुडावर फारसा परिणाम होत नाही व त्याची मापे कायम राहतात. या गुणधर्मामुळे प्लायवुड वापरताना दिलेल्या भागाची मापे नैसर्गिक लाकडापेक्षा कमी ठेवता येतात व भागही हलका होतो. तसेच प्लायवुडाला आवश्यकतेप्रमाणे बाक देता येत असल्यामुळे (उदा., खुर्चीची बैठक) तो भाग जास्त सोईस्करपणे करता येतो. प्लायवुडाचे पृष्ठ साधारण गुळगुळीत केले, तर त्याच्यावर चित्राकृतींची छपाई करता येते.

इतिहास : ईजिप्तचे राजे तूतांखामेन (इ.स.पू.१३५०) यांच्या थडग्यात एक लाकडापासून तयार केलेला फलक सापडला व त्याची रचना प्लायवुडासारखी होती. यावरून असे अनुमान निघते की, प्राचीन ईजिप्तमधील लोकांना निरनिराळ्या पट्ट्या जोडून फळा तयार केला, तर त्या फळ्याचा सपाटपणा चांगला टिकून राहतो, हे माहीत असावे. हे ज्ञान पुढे जगभर पसरले आणि फर्निचर वगैरे बनविणारे सुतार या ज्ञानाचा उपयोगही करीत असत पण या ज्ञानाचा व्यापारी प्रमाणावर उपयोग होण्यास एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीअखेरीसच सुरुवात झाली. यांत्रिक रीत्या ओंडक्यातून चादरी काढण्याचे व प्लायवुड तयार करण्याचे कारखाने प्रथम रशियात काढले  गेले. त्यानंतर प्लायवुड तयार करण्याचा उद्योग जगात सर्वत्र, विशेषतः जेथे मोठ्या प्रमाणावर लाकूड उपलब्ध आहे अशा भागांत पसरला. प्लायवुड उत्पादक देशांत अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, रशिया व कॅनडा हे आघाडीवर असून भारताचा क्रमांक बारावा आहे.

बनविण्याची पद्धत : प्लायवुडाच्या बनावटीत तीन टप्पे असतात, ते असे : (१) झाडाच्या खोडापासून ओंडके तयार करणे, (२) चादरी बनविणे आणि (३) चादरींची रचाई अथवा जोडणी.

ओंडके तयार करणे : रानातून तोडून आणून  साठविलेल्या झाडांच्या खोडांतून व मोठ्या फांद्यांतून जरूर तितक्या लांबीचे ओंडके कापून घेताना ते शक्य तितके सरळ, गोल, गाठी नसलेले आणि कुठेही न कुजलेले असे निवडतात. ते जरूर त्या लांबीचे कापल्यावर त्यांची साल काढून टाकतात व ते गरम करण्यासाठी वाफवतात किंवा पाण्यात उकळतात.

चादरी बनविणे : अशा तऱ्हेने ओंडके तयार झाल्यावर ते यंत्रात घालून त्यांतून कापून घेण्याची क्रिया सुरू होते. चादरी काढण्याच्या तीन पद्धती आहेत (१) करवतणे, (२) तासणे (३) चक्रीय कापणे.

करवतण्याची क्रिया सामान्यतः चादरीची जाडी जेव्हा जास्त, ३-४ मिमी., असते तेव्हा वापरतात. तसेच एबनीसारख्या सुंदर व म्हणून अंत्यरूपणासाठी वापरावयाच्या किंवा पाइन (चीड, चिल) सारख्या गाठी असणाऱ्या लाकडासाठी वापरतात पण या पद्धतीचा वापर फारच थोड्या प्रमाणात केला जातो. कारण या पद्धतीत लाकूड वाया जाते. दुसऱ्या पद्धतीत ओंडका प्रथम आयती छेदाचा करतात. ओंडका यंत्राच्या टेबलावर बांधतात व टेबल पुढेमागे किंवा वरखाली असे चालताना एका मोठ्या स्थिर सुरीने त्याचे काप काढले जातात. या क्रियेत अर्थात चादरीच्या पट्ट्यापट्ट्या निघतात. सुंदर स्वाभाविक आकृति असणाऱ्या व म्हणून फर्निचरात वापरल्या जाणाऱ्या लाकडासाठी ही पद्धत वापरतात. तिसरी चक्रीय कर्तनाची पद्धत हीच जास्त वापरात असून एकंदर कामापैकी सु. ९०% काम या पद्धतीने केले जाते. या पद्धतीत लेथसारखे यंत्र वापरतात. यंत्रात ओंडका धरून तो फिरविला जातो  व तो फिरताना त्याचा एक मोठ्या जाडजूड, ओंडक्याइतक्या लांब सुरीशी संपर्क होऊन ओंडक्यातून, कागदाची गुंडाळी उलगडावी त्याप्रमाणे, चादर अव्याहत  पुढे येत राहते. ओंडका लहान होत जातो तसतशी सुरी पुढे येण्याची व्यवस्था असते.

चादरीची  रचाई : चादरी कापून घेतल्यावर त्या वाळू देतात. जरूर वाटल्यास त्यासाठी सुकविण्याचे यंत्रही वापरता येते. सुकल्यावर हव्या त्या मापांचे तुकडे कापून घेतात. त्यातील वरच्या आणि खालच्या चादरींना एका बाजूला व मध्ये जाणाऱ्या चादरींच्या दोन्ही बाजूंना आसंजक (गोंद किंवा अन्य कृत्रिम  चिकट पदार्थ) लावतात. नंतर हे तुकडे एकावर एक असे ठेवतात. ते ठेवताना लागून असलेल्या तुकड्याचे सल पहिल्याच्या विरुद्ध दिशेत धरतात. तसेच तुकड्यांची संख्या पुरेशी असल्यास त्यातील एका जोडीचे सल लांबीच्या अक्षाच्या काटकोनात एका आणि आणखी एक जोडी असेल, तर काटकोनातच पण सलदिशा विरुद्ध धरतात. रचाईतील महत्त्वाची गोष्ट ही की, प्लायवुडाची रचना त्याच्या मध्य पातळीच्या संदर्भात अगदी सममित असणे अत्यावश्यक असते. चादरींची संख्या नेहमी विषम असते.

अशा प्रकारे चादरी रचून झाल्यावर ही सगळी जोडणी एका मोठ्या द्रवीय दाबयंत्रात थंड अवस्थेत किंवा उष्णता देऊन दाबतात. तयार झालेले प्लायवुड काढून घेऊन त्याच्या दोन्ही (दर्शनी) पृष्ठांवर दाबाखालील वायूच्या साहाय्याने वेगाने वाळूचा मारा करून किंवा अन्य तऱ्हेने ती बरीचशी गुळगुळीत करतात. अशा तऱ्हेने तयार झालेले प्लायवुड मग विक्रीसाठी योग्य होते. काही वेळा काही प्रकारच्या झाडांच्या खोडात आपसूख नक्षी तयार होते. प्लायवुड बनविताना अशा नक्षी असलेल्या चादरी बाह्या पृष्ठांसाठी वापरतात. तसेच या पृष्ठांवर नक्षीच्या तुकड्यांची योग्य प्रकारे मांडणी करून सममित आकृतीही योजता येतात.


उपयोग : घरातील विभाजक पडदे (पार्टिशने), विविध प्रकारचे फर्निचर, कपाटे, पेट्या, बसगाड्या, रूळगाड्यांचे डबे, जहाजे (प्रवासी) इत्यादींत, पण मुख्यतः बंदिस्त जागेत, प्लायवुडाचा उपयोग ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे पण याही पुढची पायरी म्हणजे नवे अतिशय कार्यक्षम असे कृत्रिम आसंजक तयार झाल्याने प्लायवुड पाण्याचा संपर्क होईल अशा ठिकाणीही वापरले जाऊ लागले आहे.

विविध फलक : प्लायवुडाप्रमाणेच मिश्र लाकडाचे निरनिराळ्या प्रकारचे फलक तयार करण्यात येतात. त्यांचे पुढील तीन प्रकार आहेत : (१) ठोकळी फलक, (२) धागी फलक आणि (३) कणी (कणांचा) फलक.

ठोकळी फलक : याची रचना प्लायवुडासारखीच असते पण गाभा मात्र लाकडाच्या पट्ट्यांचा असतो. या पट्ट्या जास्तीतजास्त २५ मिमी. रुंद असून त्या अलग अलग ठेवतात किंवा एकमेकींना आसंजकाने चिकटवितात. यामुळे त्यांची एक लादीच तयार होते. गाभ्याच्या दोन्ही बाजूंना एक-एक किंवा अधिकही चादरी चिकटवितात. चादरींच्या सलांची दिशा पट्ट्यांच्या सलांच्या दिशेला काटकोन करते. ठोकळी फलकांचे गुणधर्म जवळजवळ प्लायवुडासारखेच असतात व त्यांचा उपयोग रूळगाड्यांचे डबे, बसगाड्यांची काया, जहाजे, फर्निचर, पूर्वरचित घरे वगैरेंत करण्यात येतो. अलीकडे या फलकांचे गाभे म्हणून धागी व कणी फलक यांचा वापर करू लागले आहेत. तसेच ठोकळी फलक पोकळ गाभ्याचेही करण्यात येतात. शेवटचा प्रकार उष्णतारोधी असतो. पन्हळी लाकडाचा किंवा पट्ट्यांच्या जाळीचा गाभा असलेल्या ठोकळी फलकांच्या वापरामुळे लाकडाच्या वजनात ६०% पर्यंत बचत होऊ शकते.

धागी फलक : उसाची चिपाडे, जोख्या (तागाच्या झाडाचा सालीच्या आतला भाग), गवत यांसारखे लिग्नो-सेल्युलोजी (लिग्निन व सेल्युलोज यांनी युक्त असलेले) पदार्थ पण मुख्यतः लाकूडकामातील अपशिष्ट (कचरा) यांचे धागे पूर्ण किंवा थोडेसे शुद्ध करून त्यांच्यापासून हे फलक तयार करतात. फलक बनविण्याची कृती साधारण कागद करण्याच्या पद्धतीसारखीच असते. प्रथम वरील कच्च्या मालाचा लगदा तयार करतात. लगद्यात बंधक द्रव्ये आणि फिनॉलिक रेझिने, तुरटी, अस्फाल्ट, पॅराफीन, सुकवणारी तेले हे पदार्थ घालतात. तसेच परिरक्षक व अग्निरोधक रसायने मिसळून त्याचे आयुष्य व बल वाढविणे, आर्द्रतेला रोध उत्पन्न करणे इ. गुणधर्मही फलकात आणता येतात. हा लगादा कागद तयार करण्याच्या फूर्डिनिअर यंत्रात [हेन्री फूर्डि्निअर यांनी तयार केलेल्या यंत्रांत → कागद] घालतात व या यंत्रातून अखंड चादर (जाडसा पण नरम पत्रा) बाहेर पडते. चादर याच स्थितीत वाळवली, तर ती निरोधक म्हणून वापरता येते दाबयंत्रात दाबली, तर तिचा संरचनेत वापरण्याजोगा कठीण फलक (हार्डबोर्ड) बनतो.

धागी फलक विविध घनतेचे व जाडीचे केले जातात. कमी घनतेचे फलक रोधक भिंती व छते यांसाठी तसेच ध्वनिशोषक व लाद्या (टाइल्स) म्हणूनही वापरतात. उच्च घनतेच्या म्हणजे कठीण फलकांचा उपयोग मुख्यत्वेकरून घरासाठी होतो. औष्णिक निरोधनासाठी वापरावयाच्या नीच घनतेच्या (हलक्या) फलकांची घनता साधरण ४०० किग्रॅ./मी. पेक्षा जास्त असत नाही. त्यांची नामधारी जाडी ९ मिमी. पेक्षा कमी नसते आणि त्यांची औष्णिक संवाहकता ५·६ किकॅ./ (सेकंद) (मी.)  (°से./सेंमी.) पेक्षा जास्त असत नाही. उच्च घनतेचे फलक म्हणजे कठीण फलक, यांचे तीन वर्ग केले जातात : ते म्हणजे अर्ध कठीण फलक, कठीण फलक व अधिकठिन फलक. त्यांची घनता अनुक्रमे ४८० ते ८००, ८०० ते १,२०० आणि ८०० ते १,२०० व अधिक किग्रॅ./मी. असते. अधिकठिन वर्गातील फलकांवर उत्पादन क्रियेत अधिक संस्कार करून त्यांचे बल व जलरोध हे गुण वाढविलेले असतात.

कठीण  फलकांचा घरांच्या रचनेत अधिकाधिक उपयोग केला जाऊ लागला आहे. कठीण फलकांचे संघटन एकविध (एकसारखे  असून ते अती घन असतात व त्यांची पृष्ठेही गुळगुळीत असतात. ते वाकविता येतात, त्यांत पंचाने भोके पाडता येतात व तसेच ते मुद्रेने कापताही येतात, सुतारकामाच्या नेहमीच्या हत्यारांनी त्यांच्यावर काम करता येते. घराच्या अंतर्भागात पडद्यांच्या तावदानासाठी, कपाटे, घडवंच्या, फर्निचर, दरवाजांची पृष्ठे, घरांचे बाह्य पण संरक्षित भाग इत्यादींसाठी याचा चांगला उपयोग होतो. त्यांच्या पृष्ठावर कित्येक वेळा सागवान, रोझवुड वा इतर शोभिवंत  लाकडांची नक्कल करणारी छपाईही करतात.

कणी (कणांचा) फलक : याला कपच्याचा फलक असेही म्हणतात. हा लाकडाच्या ढलप्या, लांब अरुंद तुकडे, रंधाईचा कचरा असा कच्चा माल वापरून बनवितात. नुसत्याच कपच्या किंवा अरुंद लांब तुकडे वापरतात किंवा वरील सर्व प्रकार एकत्रितही वापरतात. प्रथम या पदार्थांचे ठरविलेल्या मापांचे बारीक सारखे तुकडे करतात. मग त्यांत बंधक व थोडी खळ मिसळतात. यूरिया फॉर्माल्डिहाइड रेझिने किंवा फिनॉल फॉर्माल्डिहाइड रेझिन बंधक म्हणून वापरतात. हा लगदा तयार झाल्यावर तो पसरून त्यावर करवतण्यातला भूसाही बंधकात लावून पसरतात. हा लगदा पसरून तो एका दाबयंत्रात उष्णतेसह दाबतात. यंत्रातून तयार कणांचा-तयार कपच्यांचा–फलक बाहेर पडतो. याला बाहेरून चादरी लावलेल्या नसतात, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.

सर्वसाधारण उपयोगाच्या कणांच्या फलकाची घनता मध्यम मूल्याची (५०० ते ९०० किग्रॅ./मी.) असते. व्यवहारात त्याला पुरेशी शक्ती (बल) असल्याचेही दिसून येते. ज्या ठिकाणी कठीण फलक वापरावयाचे त्या ठिकाणी हे फलकही वापरता येतात पण या फलकांचे फुगण्याचे व आक्रसण्याचे प्रमाण बरेच असल्याने त्यांचा घराच्या बाह्य भागात उपयोग करीत नाहीत पण छपराचा खालचा भाग, घराच्या अंतर्भागातील भिंतीची  तावदाने, विभाजक भिंती, लिनोलियमच्या खाली घालण्यासाठी, जमिनीवर घालण्यासाठी, सपाट दरवाज्यांच्या गाभ्यासाठी, आतल्या संरक्षक छतासाठी वगैरे कामांत या कणांच्या फलकांचा चांगला उपयोग होतो. नीच (४०० किग्रॅ./मी. पेक्षा कमी) घनतेचे फलक निरोधक म्हणून वापरतात, तर उच्च (९०० किग्रॅ./मि. आणि अधिक) घनतेचे फलक विशेष कामासाठी वापरतात.

स्तरित लाकूड : हे पुष्कळ चादरी एकावर एक ठेवून केलेले असते पण चादरींच्या सलांची दिशा बहुतेक एकच असते. मुळात हा प्रकार विमाने व त्यांचे प्रचालक (पुढचा फिरणारा पंखा) यांसाठी विकसित करण्यात आला पण आता तो उद्देश मागे पडून हे लाकूड क्रीडा साहित्यात (उदा., बर्फावरून घसरण्यासाठी पायाला जोडावयाचे साधन-स्की, भाले), इमारतीत (स्तंभ, कैच्या, कमानी), पूल, जहाजे यांत वापरण्यात येते. खूप दाबलेले स्टार-प्लायवुड हे एक प्रकारचे स्तरित लाकूड असून त्यातील चादरींच्या सलांची दिशा ४५° असते. चादरी अर्थात बंधकाने चिकटविलेल्या असतात. या रचनेमुळे या प्रकारांचे बल सर्व दिशांत सारखे असते. दंतचक्रे, पट्ट्याच्या कप्या यांसाठी आता जाड फलकांऐवजी हेच लाकूड वापरले जाते. दाबून घनता वाढविलेले स्तरित लाकूड आता मोठाल्या विद्युत् यंत्रांत निरोधक म्हणून, तसेच कापड उद्योगात मागांचे धोटे, पिकिंग स्टिक्स वगैरेंसाठी वापरात आले असून इतर क्षेत्रांतही त्याचा प्रसार होत आहे.


भारतीय उद्योग : भारताला प्लायवुडाची पहिली ओळख चहाच्या खोक्यांच्या रूपाने झाली. चहाच्या खोक्यांकरिता ब्रिटन व इतर यूरोपीय देशांतून १९०६-०७ मध्ये २३ लाख रुपये किंमतीचे प्लायवुड आयात करण्यात आले. पहिले महायुद्ध (१९१४-१८) सुरू झाल्यानंतर प्लायवुडाची आयात कठीण झाली व त्यामुळे देशातच काही कारखाने काढण्यात आले. सुरमा व्हॅली सॉ मिल्स लि. हा कारखाना भांगबाजार (आसाम) येथे १९१७ मध्ये आणि आसाम सॉ मिल्स अँड टिंबर कं. लि. हा नामसोई (त्यावेळचा नेफा) येथे १९१८ मध्ये असे काढण्यात आले. हे दोन्ही कारखाने चहाच्या खोक्यांचे प्लायवुड बनविणारे होते. रेल्वे व घरबांधणी यांत उपयोगी पडतील असे ३ व ५ पदरी प्लायवुड बनवणारा आसाम रेल्वेज अँड ट्रेडिंग कं. लि, मार्घेरिटा हा १९२४ मध्ये स्थापन झालेला पहिला कारखाना होता. या तीनही कारखान्यांना युद्धोत्तर काळात परदेशी मालाशी स्पर्धा करावी लागत होती व त्यात सुरमा व्हॅली कंपनीचा टिकाव न लागून ती १९२७ च्या सुमारास बंद पडली पण द स्टँडर्ड फर्निचर कं. लि. हा आणखी एक कारखाना १९३७ कल्लाई (कोझिकोडेजवळ, केरळ) येथे काढण्यात आला.

यानंतर लवकरच दुसरे महायुद्ध (१९३९-४५) सुरू झाले आणि त्यामुळे व मागणीही वाढल्याने या धंद्याची भरभराट होण्यास सुरूवात झाली. परिणामतः या काळात चहाच्या खोक्यांचे प्लायवुड बनविणारे नवीन कारखानेही सुरू झाले.

स्वातंत्र्योत्तर काळात या धंद्याला परदेशी मालावरील ३० ते ३५ टक्के मूल्यानुसार संरक्षक कराचा फायदा १९४८ ते १९६० अखेरपर्यंत मिळाल्याने या धंद्याने आपले पाय घट्ट रोवले. १९५०-५१ मध्ये कारखान्यांची संख्या ४८ असून त्यांचे वार्षिक उत्पादन ६५,००,००० चौ. मी. इतके होते. पुढील दशकाअखेर कारखान्यांची संख्या ७२ झाली. या ७२ कारखान्यांपैकी ४२ ना चहाच्या खोक्यांचे व व्यापारी अशा दोन्ही प्रकारचे, २७ ना फक्त खोक्यांचे आणि ३ ना फक्त व्यापारी प्रकारचे प्लायवुड बनविण्याचे परवाने दिले गेले होते. वरील ७२ मोठ्या कारखान्यांव्यतिरिक्त लहान स्वरूपाचे ६३ कारखाने होते व ते मुख्यतः प. बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक व केरळ या राज्यांत होते.

इ. स. १९८० मध्ये भारतातील प्लायवुड कारखान्यांची संख्या १०० होती. यांपैकी ४० कारखाने मोठ्या प्रमाणावर उत्पादन करतात. याखेरीज लघु-उद्योग क्षेत्रात अनेक कारखाने आहेत. १९७७ साली ५ कोटी चौ. मी. प्लायवुडाचे उत्पादन झाले व त्यापैकी ३·५ कोटी चौ. मी. मोठ्या कारखान्यांत आणि १·५ कोटी चौ.मी. लघु-क्षेत्रातील कारखान्यांत झाले. हे उत्पादन एकूण स्थापित उत्पादनक्षमतेच्या ६०% होते. १९८०-८१ करिता ११ कोटी चौ.मी. हे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. १९६३-६४ मध्ये प्लायवुडाची निर्यात १० लक्ष रुपयांची होती व १९७४-७५ मध्ये ती ८·२९ कोटी रुपयांपर्यंत वाढली. तथापि १९७५-७६ मध्ये ती. ४·१३ कोटी रुपये इतकी कमी झाली.

कोष्टक क्र.१. भारतातील प्लायवुडाचे उत्पादन.

वर्ष 

उत्पादन (कोटी चौ.मी.) 

१९६० 

१·४९४

१९६५ 

२·२७७

१९७० 

३·२००

१९७३

४·६००

१९७७

५·०००

प्लायवुडाखेरीज भारतात तयार होणाऱ्या वस्तू म्हणजे धागी फलक [कठीण व निरोधक (नरम) फलक] आणि कणी फलक होत. धागी फलकांच्या उत्पादनाला मुंबईच्या अनिल हार्डबोर्ड्स लि. या कारखान्याने १९६० मध्ये सुरुवात केली. यानंतर बिलियापट्टम् (केरळ) येथे वेस्टर्न इंडिया हार्डबोर्ड्स लि. व कलकत्ता येथील आसाम हार्डबोर्ड्स लि. या कंपनीचा गौहाती येथे असे आणखी दोन कारखाने काढण्यात आले. या तिन्ही कारखान्यांची मिळून स्थापित वार्षिक क्षमता ४०,००० टन (६४,००० चौ. मी.) होती. यापैकी फक्त ३५ टक्केच क्षमता १९६७ मध्ये वापरली गेली. याला मुख्य कारण म्हणजे गौहातीचा कारखाना बंद पडला होता पण १९६८ मध्ये हा आकडा ४७% पर्यंत वर गेला. कठीण फलकांच्या उद्योगाच्या वाढीमुळे लाकडाच्या अपशिष्टाचा उपयोग होऊ लागला व जंगलांच्या अर्थव्यवस्थेला त्यामुळे मदत होत आहे.

कोष्टक क्र. २. प्लायवुड व त्यापासून  केलेल्या  वस्तूंची  निर्यात. 

वर्ष 

किंमत (कोटी रु.) 

१९६४-६५

०·१३

१९७२-७३ 

०·९४

१९७३-७४ 

४·३३

१९७४-७५

८·२९

१९७५-७६

४·१३

१९७६-७७

८·६६

१९७७-७८

७·५७

पहिला कणी फलकांचा कारखाना सीतापूर येथे १९५८ साली सुरू झाला. १९७० साली एकंदर आठ कारखाने असे फलक तयार करीत होते. या सर्वांची मिळून वार्षिक उत्पादनक्षमता ४५,००० टन (७२,००० चौ.मी.) होती. यांतील एकाशिवाय बाकीचे सर्व कारखाने कठीण फलकांच्या किंवा प्लायवुडाच्या कारखान्यांचा एक भाग म्हणूनच काम करीत. कणी फलकांच्या बनावटीच्या एकंदर खर्चापैकी आसंजकाचा खर्च जवळजवळ ५५% असतो. या आसंजकांची किंमत अतिशय वाढल्यामुळे कणी फलकांच्या उद्योगाच्या एकंदर उत्पादनक्षमतेच्या केवळ १७-१८% क्षमताच वापरली जाते. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेर (१९७३-७४) या फलकांचे उत्पादन ४०,००० टन अपेक्षित होते.

लाकडाचे प्रकार : चहाच्या खोक्यांकरिता वापरण्यात येणाऱ्या प्लायवुडाकरिता सामान्यतः होलौंग, होलॉक, माकई, सोनचाफा, आंबा, चिलौनी, चालन (गुर्जन), सफेद चुग्लम, लाल धूप, धूप व पल्ला या झाडांच्या लाकडाचा उपयोग करतात. शोभिवंत, प्लायवुडांकरिता रोझवुड, सागवान, अक्रोड, मॅहॉगनी, सोनचाफा, लॉरेल व पदौक या झाडांच्या लाकडाचा उपयोग करतात. विमानाकरिता वापरावयाच्या मध्यम बलाच्या प्लायवुडाकरिता रोझवुड, शिसव, अक्रोड, पल्ला, पदौक, सागवान व तिरफळ यांच्या उपयोग करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. सागरी प्लायवुडाकरिता मॅपल, बर्च, रोझवुड, शिसव, अक्रोड, पदौक, मॅहॉगनी, सागवान, रानफणस, लाल देवदारी, देवदार, पल्ला, सोनचाफा, आंबा इ. झाडांच्या लाकडाची शिफारस करण्यात आली आहे. भारतीय मानक संस्थेने विविध प्लायवुडांकरिता निरनिराळ्या झाडांची शिफारस मानक (प्रमाण) म्हणून केलेली आहे (मानक क्र. आय एस ३०३-१९६०, ३९९-१९६३, १०-१९६४ इत्यादी).

आसाममधील कारखाने तेथे विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या होलॉक, होलौंग व माकई यांच्या लाकडाचा प्रामुख्याने उपयोग करतात. उत्तर बंगालमधील कारखाने आसामातील चिलौनी व होलौंग यांच्या लाकडाचा उपयोग करतात. कलकत्त्यातील व त्याच्या आसपासचे कारखाने अंदमानातील चालन, सफेद चुग्लम व लाल धूप यांचे आणि विपुल उपलब्ध असलेले स्थानिक आंब्याचे लाकूड वापरतात. दक्षिण भारतातील कारखाने तेथे स्थानिक उपलब्ध असलेले पल्ला, धूप, गुलूम व सोनचाफा यांचे लाकूड वापरतात. लहान प्रमाणावर उत्पादन करणारे बहुतेक स्थानिक कारखाने देशात सर्वत्र उपलब्ध असलेले आंब्याचे लाकूड सरसहा वापरतात.


उत्पादनांचे  प्रकार : प्लायवुड उद्योग परवानामुक्त असून कारखानदारांनी उत्पादनांत विविधता आणली आहे व तांत्रिक प्रगतीही केली आहे. मुख्य म्हणजे चहाचे खोके बनविण्यासाठी म्हणून सुरू झालेल्या या उद्योगात खोक्यांना आता दुय्यम स्थान मिळून अधिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असलेले असे मिश्र लाकडाचे प्रकारच कारखान्यातून तयार होत आहेत. भारतातील उद्योगात तयार होणाऱ्या मालाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) चहाच्या खोक्यांचे प्लायवुड, (२) बांधणीचे प्लायवुड, (३) प्लायवुडाची लहान मोठी पिंपे, (४) काँक्रीटच्या ओतकामात आधाराकरिता वापरण्यात येणारे प्लायवुड, (५) सागरी उपयोगाचे प्लायवुड, (६) मध्यम बलाचे विमानांकरिता लागणारे प्लायवुड, (७) अत्युत्तम प्रकारची पडद्यांची तावदाने, उच्च दर्जाचे फर्निचर, रेडियो, दूरचित्रवाणी वगैरेची खोकी इ. उच्च प्रकारच्या कामात लागणारे सागवान, अक्रोड, रोझवुड इत्यादींची पृष्ठे असलेले शोभिवंत प्लायवुड, (८) जलरोधी व पाणबंद असे व्यापारी (नेहमीच्या कामाचे) व शोभिवंत असे फर्निचर, इमारती, संरक्षण व परिवहन यांत लागणारे प्लायवुड, (९) व्यापारी आणि शोभिवंत जातींचे ठोकळी फलक, (१०)  घन वा पोकळ गाभ्याचे, साधे वा शोभिवंत सपाट दरवाजे, (११) रेल्वे डब्यातील पूर्वआकारित (खुर्चीच्या) बैठका, (१२) पूर्वआकारित फर्निचराचे भाग, (१३) कापड उद्योगासाठी (मागांच्या) स्तरित लाकडाच्या पिंकिंग स्टिक्स, (१४) विजेची मोठाली यंत्रे आणि विजेची रेल्वे यांत उपयुक्त अशा विविध प्रकारच्या आणि निरनिराळ्या घनतेच्या घनीकृत लाकडाच्या चादरी, (१५) साग, अक्रोड, रोझवुड वगैरे शोभिवंत लाकडांतून काढलेल्या कापांच्या स्वरूपातील चादरी, (१६) धागी फलक (कडक आणि निरोधनाचे नरम) आणि (१७) निरनिराळ्या प्रकारचे कणी फलक.

संशोधन व विकास : प्लायवुड व तत्सम इतर उत्पादने यांचे निरीक्षण, प्रमाणीकरण व त्यांविषयीचे संशोधन करण्यासाठी प्लायवुड उद्योगाने स्वतःची प्रयोगशाळा सुरू करावी, अशी भारतीय जकात मंडळाने सूचना केली होती. या प्रयोगशाळेसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी भारत सरकारने प्लायवुड उद्योग ऐच्छिक कर समितीची स्थापना केली. निधीची पुरेशी रक्कम गोळा झाल्यावर इंडियन प्लायवुड मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च ॲसोसिएशन ही संस्था बंगलोर येथे १९६१ मध्ये स्थापन करण्यात आली. १९६३ मध्ये या संस्थेने कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या मदतीने इंडियन प्लायवुड इंडस्ट्रिज रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. या संस्थेचे कलकत्ता व आसाम येथे प्रत्येकी एकेक संशोधन केंद्र आहे.

या संस्थेत प्लायवुड उद्योगासंबंधी मूलभूत व अनुप्रयुक्त असे दोन्ही प्रकारचे संशोधन चालते. तसेच ही संस्था कारखानदारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यास मदत करते. संस्थेत जंगलांतील उपलब्ध कच्चा माल, चादरी काढण्याच्या पद्धतीत सुधारणा करणे, विविध प्रकारच्या आसंजकांची निर्मिती, हानिकारक कवक (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व कीटक इत्यादींसंबंधी संशोधन चालते. तसेच प्लायवुड वापरून तयार केलेले इमारती बांधकाम साहित्य, चहा साठविण्याची खोकी, धान्य साठविण्याच्या प्लायवुडाच्या १ क्विंटल ते ५०० टन क्षमतेच्या कणग्या, रसायने व खते साठविण्याची खोकी, सर्व भाग सुटे करता येतील असे प्लायवुड फर्निचर यांविषयी या संस्थेत यशस्वी रीत्या संशोधन करण्यात आले आहे. डेहराडून येथील वन संशोधन संस्था या उद्योगाच्या हिताच्या द्दष्टीने बंगलोर येथील संस्थेशी सहकार्य करीत आहे.

पहा : आसंजके, फर्निचर लॅमिनेट लाकूड.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Industrial Products, Part VII, New Delhi, 1971.

           2. Meyer, L. H. Plywood : What It is What It Does, New York, 1947.

           3. Perry, T. D. Modern Plywood, London, 1948.

           4. Wood, A. D. Plywoods of the World : Their Development, Manufacture and Application, Edinburgh, 1963.

ओगले, कृ. ह.