तंतु, नैसर्गिक : व्यासाच्या किंवा रुंदीच्या सु. २०० पट लांब असलेल्या केसासारख्या घन वस्तूला (द्रव्याला) तंतू असे म्हणतात. निसर्गात आढळणाऱ्या अशा तंतूंना नैसर्गिक तंतू असे म्हणतात. नैसर्गिक तंतू तीन प्रकारचे आहेत : वनस्पतिजन्य, प्राणिजन्य व खनिज. सामान्यपणे काही तंतूंचाच व्यापारी उपयोग करण्यात येतो. वनस्पतिजन्य तंतू हे बीजाभोवती केसासारख्या स्वरूपात आणि खोड वा पाने यांत कोशिकांच्या (संरचनात्मक घटकांच्या) अथवा धाग्यांच्या स्वरूपात आढळतात. रासायनिक दृष्ट्या हे तंतू सेल्युलोजाचे असतात. पण काही वेळा त्यांत लिग्निने, पेक्टिने व मेणे ही नैसर्गिक स्वरूपांत कमीजास्त प्रमाणात मिसळलेली असतात. रेशीम वगळता इतर प्राणिजन्य तंतू केराटीनयुक्त असतात [⟶ केराटिने]. ॲसस्बेस्टस हा नैसर्गिक रीत्या आढळणारा व औद्योगिक दृष्टीने महत्त्वाचा असलेला एकमेव खनिज तंतू होय. अलीकडच्या काळातील कृत्रिम तंतूंच्या शोधामुळे नैसर्गिक तंतूंचे कापडनिर्मिती व औद्योगिक वापर यांतील प्रमाण कमी झाले. १९५०–७० या काळात सर्व प्रकारच्या तंतूंचे जागतिक उत्पादन १,६०० कोटी किग्रॅ. वरून २,५०० कोटी किग्रॅ, एवढे वाढले. एकूण वाढीपैकी / वाढ नैसर्गिक तंतूंच्या व / वाढ कृत्रिम तंतूंच्या उत्पादनात झाली. १९६८–६९ साली सु. ३०% कृत्रिम तंतू आणि सु. ७०% नैसर्गिक तंतू तयार झाले. नैसर्गिक तंतूंमध्ये कापसाची टक्केवारी जास्त म्हणजे सु. ४६·२% इतकी, तर सर्वांत कमी टक्केवारी रेशमाची (०·१५%) आहे.

इतिहास : सर्वांत पहिला तंतू मानवाच्या वापरात आला तो फ्लॅक्सचा (अळशीचा) होय. तो इ. स. पू. ५००० वर्षांपासून वापरात आहे. इ. स. पू. ४००० नंतर नवाश्म युगातील मानवाने लोकरीचा उपयोग केला. हे दोन्ही तंतू स्वित्झर्लंडमधील तलावांजवळ राहणाऱ्या लोकांनी प्रथम वापरले. इ. स. पू. ३००० पासून भारतात कापसाचा उपयोग करण्यात आला आणि इ. स. पू. २६४० पासून चीनमध्ये रेशीम वापरात आले. ताग (ज्यूट) रॅमी, युरेना (जंगली कापूस, वनभेंडी), हेंप इत्यादींचा उपयोग प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. पण त्यांच्या वापराबद्दलचे नक्की उल्लेख आढळत नाहीत. तथापि अथर्वसंहितेत तागाचा उल्लेख आलेला आहे. हेंप या तंतुमय वनस्पतीची सर्वप्रथम लागवड चीनमध्ये इ. स. पू. ४५०० मध्ये करण्यात आली. कापूस, फ्लॅक्स, रेशीम, ताग इत्यादींच्या ऐतिहासिक माहितीकरिता त्या विषयांवरील स्वतंत्र नोंदी पहाव्यात.

वनस्पतिजन्य तंतू : तंतू निर्मिणाऱ्या वनस्पतींच्या पानांत, खोडांत वा फळांत लांब, धाग्यासारख्या, बारीक व जाड भित्ती असलेल्या कोशिका वा ऊतके (कोशिकासमूह) असतात. दोन हजारांहून जास्त वनस्पतींच्या जातींपासून तंतू मिळतात, पण त्यांपैकी पन्नासहून कमी जातीच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. या तंतूंचा उपयोग (१) कापड, (२) दोर, (३) ब्रश व कुंचले, (४) भरण पदार्थ, (५) कागद (६) फेल्ट (नमदा) तंतू आणि (७) सेल्युलोज व इतर रासायनिक पदार्थ यांच्या निर्मितीत कच्चा माल म्हणून मुख्यत्वे करतात. बऱ्याच तंतुयुक्त वनस्पतींपासून तंतूंच्या इतकेच वा त्याहून जास्त महत्वाचे पदार्थ मिळतात. उदा., सरकीपासून तेल व पेंड नारळापासून खोबरे व खेबरेल तेल लिलिएसी कुलातील युका व लेचुगिला (घायपाताची एक जात) ह्या वनस्पतींपासून औषधे व इतर पदार्थ तयार करण्यास लागणारे सॅपोनिनासारखे महत्त्वाचे उपपदार्थ मिळतात.

फळे व बीजे यांच्यापासून मिळणारे तंतू : जास्त प्रमाणात वापरण्यात येणारा आणि विविध प्रकारे उपयोगात आणला जाणारा या प्रकारातला महत्त्वाचा तंतू म्हणजे कापूस होय. कापसाच्या झाडाला फुले येऊन त्यांपासून बनलेल्या बोंडांत कापूस तयार होतो. कापसाचा तंतू एककोशिक (एका कोशिकेचा बनलेला) व लांबट असून बीजाच्या (सरकीच्या) बाहेरच्या स्तरापासून निघतो. कापसाच्या प्रकारानुसार ह्या तंतूंची लांबी सु.१०–६२ मिमी. असून त्यांचा व्यास १२–२५ मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०·००१ मिमी.) असतो. एका सरकीपासून सु. १०,००० तंतू निघतात. बोंड पिकल्यावर तडकते त्या वेळी तंतु–कोशिका मृत असून त्यांतील बाष्प कमी होते व प्रत्येक तंतूला विशिष्ट आकार येतो. सूक्ष्मदर्शकातून पाहिल्यास हा आकार पीळ दिलेल्या फितीसारखा दिसतो. व्यापारी दृष्ट्या कापसाचे महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) सी आयलंड (द. कॅरोलायना, जॉर्जिया व फ्लॉरिडा यांच्या किनाऱ्याजवळील अटलांटिक महासागरातील बेटांवरून नाव मिळालेल्या) कापसाचे तंतू कमी व्यासाचे, लांब, बळकट व चकचकीत असतात (२) ईजिप्शियन कापूस वरीलप्रमाणेच असतो (३) अमेरिकन व ईजिप्शियन यांचा संकरज प्रकार (४) अमेरिकन कापसाचे तंतू वरील तीन्हीपेक्षा कमी बळकट, लहान व अनियमित आकाराचे असतात व (५) आशियाई कापूस भरड, तुटणारा व कमी लांबीचा असतो [⟶ कापूस].


नारळाच्या चोड्यांपासून काथ्या तयार करतात. त्याचा उपयोग हातऱ्या, चटया, दोर, ब्रश, कुंचले इ. तयार करण्यासाठी करतात [⟶ काथ्या].

यांशिवाय सफेत सावर (कॅपोक), लाल सावर, पाचोटे, सामोहू इत्यादींच्या बियांभोवती पण फळाच्या सालीपासून वाढलेले तत्सम तंतू तयार होतात. त्यांच्या गुणधर्मांनुसार त्यांचा उपयोग भरणद्रव्य म्हणून व उष्णतानिरोधक म्हणून करतात.

खोडापासून मिळणारे तंतू : द्विदलिकित वनस्पतींच्या देठांपासून वा खोडांपासून तंतू मिळतात. यांना मऊ तंतू असेही म्हणतात. खोडांच्या परिकाष्ठापासून (अंतर्सालीपासून) मिळणारे तंतू काही मीटर लांब असून ते लांबट कोशिकांचे बनलेले असतात. तंतूंच्या प्रकारानुसार त्यांच्या कोशिक १०–३० मायक्रॉन व्यासाच्या व २·५ मिमी. ते अनेक मिमी. पर्यंत लांब असतात. ह्या कोशिका एकमेकींना इतर कोशिकांनी व ऊतकांनी एकत्र बांधलेल्या असतात.

खोड किंवा देठ पाण्याने कुजवून वा रसायनांची प्रक्रिया करून तंतू वेगळे करण्यात येतात. ताग व तत्सम तंतू मिळवण्यासाठी त्यांच्या खोडांच्या जुड्या करून त्या पाण्यात ठेवतात व सूक्ष्मजंतूंद्वारे तंतूखेरीज इतर भागाचा नाश करण्यात येतो. पाण्याच्या तापमानावर व प्रकारावर आणि खोडाच्या वयावर कुजण्याचा काळ (५–२० दिवस इतका) अवलंबून असतो. साल व तंतू काष्ठमय भागापासून अलग झाल्यावर कुजण्याची क्रिया पूर्ण होते. नंतर दुसऱ्या पाण्याने हा भाग धुवून तंतू वेगळे करतात व उघड्यावर हवेत वाळवितात. ताग, फ्लॅक्स, हेंप, रॅमी, सन (सण), केनाफ (अंबाडीचा एक प्रकार), युरेना व नेटल (आग्या, खाजोटी इ.) हे प्रकारचे महत्त्वाचे तंतू होत.

ताग हा या प्रकारातील महत्त्वाचा तंतू असून कापसाच्या खालोखाल त्याचे उत्पादन आहे. भारत व बांगला देश येथे तागाचे बहुतेक सर्व उत्पादन होते. ताग स्वस्त असला तरी त्याच्या पिवळट करड्या रंगाचे विरंजन (रंग काढून टाकण्याची क्रिया) करणे कठीण असते, कारण पाण्यामुळे त्याचे अपघटन (तुकडे होण्याची क्रिया) होते. शिवाय ते कमी बळकट व भरड असतात. यामुळे त्यांचा उपयोग आवेष्टनासाठी, पोत्यासाठी, गालिचे व लिनोलियम यांच्या आधारस्तरासाठी, सुतळी व दोर तयार करण्याकरिता आणि विद्युत् निरोधनासाठी करण्यात येतो. [⟶ ताग].

फ्लॅक्सच्या तंतूंत सेल्युलोज जास्त असते. हे तंतू तागाच्या तंतूंपेक्षा बारीक, बळकट व चकचकीत असतात. विरंजन करून झगझगीत पांढरे केल्यास त्यांपासून कपड्यांचे आणि लहान–मोठ्या आच्छादक रुमालांचे कापड तयार करता येते. या तंतूंच्या बळकटपणामुळे त्यांचा उपयोग मासे पकडण्याची जाळी बनविण्यास, शिलाईच्या दोऱ्याकरिता व आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्यांकरिता (होज पाइपकरिता) करतात. ह्या तंतूंपासून तयार केलेल्या कापडास इंग्लंडमध्ये लिनन असे म्हणतात. रशिया, यूरोप, ब्रिटीश बेटे, कॅनडा, अमेरिका इ. प्रदेशांत अळशीची लागवड करतात. अळशीपासून तंतू काढावयाच्या बऱ्याच प्रक्रिया यंत्रांनी करण्यात येतात. तथापि काही प्रक्रिया अद्यापिही हातानेच केल्या जातात [⟶ अळशी फ्लॅक्स].

अतिपूर्वेकडील देशांत ⇨ रॅमीची (बंगाली नाव–कांकुरा) लागवड होते. पश्चिम गोलार्धातही त्याच्या काही जातींची लागवड करण्यात येते. ‘चिनी गवत’ या नावानेही रॅमी ओळखली जाते. रॅमीचे तंतू बळकट पण ठिसूळ असून त्यांचे विरंजन केल्यास ते शुभ्र होतात व जलद रंगविता येतात. खोडाच्या पट्ट्या काढून व त्यांवर रसायनांचे संस्कार करून उच्च प्रतीचे तंतू मिळवितात. त्यांतील चिकट पदार्थ काढून टाकल्यास मिळणारे तंतू पांढरे शुभ्र, मुलायम व रेशमासारखे असतात. या तंतूंत सेल्युलोजाचे प्रमाण बरेच असते. चीन व जपानमध्ये याचे बरेच उत्पादन केले जाते.


हेंप (गांजा कॅनबिस सटिव्हा ) ही वनस्पती जगाच्या सर्व भागांत वाढते. हेंप तंतूंचे जुडगे सु. दोन मी. लांबीचे असतात. हे तंतू बळकट असून त्यांचा रंग पिवळा ते करडा असतो. त्यांतील पेक्टीन व लिग्निन यांच्यामुळे ह्या तंतूचे विरंजन करणे अवघड जाते. हेंप तंतूंपासून मुख्यत्वे दोर व पोती करतात [⟶ हेंप].

यांशिवाय सन, अंबाडी (केनाफ), जंगली कापूस (युरेना) व आग्या, खाजोटी (नेटल) इत्यादींच्या खोडांपासून कमी प्रमाणात तंतू काढण्यात येतात. त्यांचा उपयोग दोर, पोती व गालिच्याचे अस्तर यांच्या निर्मितीसाठी करतात.

पानांपासून मिळणारे तंतू : काही एकदलिकित वनस्पतींच्या तंतूंना कठीण तंतू असे म्हणतात. ह्या तंतूंचा व्यास वर सांगितलेल्या खोडांपासून मिळणाऱ्या तंतूपेक्षा जास्त असून त्यांच्यापेक्षा हे तंतू कठीणही असतात. ह्या तंतूंचा उपययोग मुख्यतः दोर तयार करण्यासाठी करतात. अबाका (मॅनिला हेंप), सिसाल आणि हेनेक्वेन (अगेव्ह फोर्‌क्रॉयडीसघायपाताची एक जात) हे या प्रकारातील महत्त्वाचे तंतू मानतात. कँटाला, एस्पार्टो. लेटोना, मॉरिशस काबुऱ्या [⟶ गंजा, नाताल], माड, कॅरोआ, नागीन (सॅन्सेव्हेरिया), फोर्मियम [⟶ हेंप] इ. वनस्पतींच्या पानांपासूनही तंतू काढण्यात येतात.

बहुतेक पर्णतंतुयुक्त वनस्पती ह्या यूरोप खंडातील आहेत. फोर्मियम ही मूळची न्यूझीलंड येथील असून ⇨ घायपाताच्या वंशातील वनस्पतींचे मूलस्थान उत्तर मेक्सिकोमधले आहे. तथापि बहुतेक सर्व वनस्पतींची वाढ उष्ण कटिबंधातच होते. हेनेक्वेन आणि लेचुगिला या वनस्पती युकॅटनच्या व उत्तर मेक्सिकोच्या ओसाड व खडकाळ भागात वाढतात तर अबाका ही सुपीक, ओलसर पण निचऱ्याच्या जमिनीत चांगली येते. अबाका ही मुळची फिलिपीन्समधील असून सध्या तिची लागवड सुमात्रा, बोर्निओ, मध्य अमेरिका व उष्ण कटिबंधातील इतर भागांत केलेली आढळते. घायपाताच्या वंशातील जाती जरी युकॅटनमधील असल्या, तरी त्या सुपीक जमिनीत तसेच जास्त आर्द्रता असणाऱ्या आफ्रिकेच्या भागातही वाढतात. भारतात घायपातापासून वाख काढण्यात येतो व त्यापासून दोर तयार करण्यात येतात.

पाच ते वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे जगणाऱ्या वनस्पतींपासून पर्णतंतू मिळतात. घायपाताची पाने पूर्ण वाढल्यावर ती कापतात. अबाकाची पाने पूर्ण वाढल्यावर ती देठासह तोडतात. हे देठ एकावर एक अशा आवरणाच्या रचनेत (केळीच्या सोपटासारखे) असतात. ह्या आवरणांपासून सु. १–३ मी. लांबीचे तंतू वेगळे करतात. सिसाल आणि हेनेक्वेन यांची पाने जवळजवळ सारखी असतात. त्यांपासून सु.१–२ मी. लांबीचे तंतू मिळतात. ते फिकट बदामी वा करड्या रंगाचे असतात.

बहुतेक पर्णतंतू यांत्रिक पद्धतीने काढतात. पाने भिजवून व ती खरवडून तंतू काढतात. दिवसाला सु. ४·५–७·० किग्रॅ. एवढे तंतू काढणारी साधी हत्यारे त्याकरिता वापरली जातात. तसेच यांत्रिक शक्तीवर चालणारी व तासाला सु. १,३६० किग्रॅ सुकलेले तंतू काढणारी यंत्रेही वापरतात.

मेक्सिकोतील घायपात व ब्राझीलमधील कॅरोआ ह्यांसारख्या वनस्पती रानटी स्थितीत वाढतात व त्यांपासून हातांनी तंतू काढतात. सिसाल, हेनेक्वेन व अबाकासारख्या वनस्पतींची लागवड करण्यात येते व यांत्रिक पद्धतीने त्यांच्यापासून तंतू काढतात. इतर सर्व क्रिया हातांनीच करतात.


कँटाला, सिसाल, पिटा, फ्लोजा (रानटी अननस) इत्यादींची पाने तंतू काढण्यासाठी वापरण्यात येतात. त्यांचे तंतू अल्प प्रमाणात स्थानिक स्वरूपाच्या उपयोगांसाठी वापरतात. हे तंतू रंग व बळकटपणा यांबाबतीत हलक्या दर्जाचे असतात.

  

संकीर्ण तंतू : काही गवतांच्या मुळ्यांपासून आणि स्पॅनिश मॉस (टिलँड्‌सिया) सारख्या वनस्पतींच्या देठांपासूनही तंतू काढण्यात येतात. मेक्सिकोतील झॅकॅटॉन या नावाने ओळखण्यात येणारे व मुळांपासून मिळणारे तंतू ब्रशासाठी वापरतात. हे तंतू भरड, राठ व कुरळे असतात. स्पॅनिश मॉस ही वनस्पती अननसाच्या कुलातील [⟶ ब्रोमेलिएसी] आहे. तिचा उपयोग काथ्यासारखा भरणद्रव्य म्हणून फर्निचरनिर्मितीत व गाड्यांतील गाद्यांसाठी करतात.

प्राणिजन्य तंतू : प्राणिजन्य तंतूंमध्ये लोकर व रेशीम हे महत्त्वाचे तंतू आहेत. मेंढीच्या लोकरीचा उपयोग कपड्यासाठी, औद्योगिक व शोभिवंत कापडांसाठी करतात. प्राण्यांच्या केसांपासून वा फरपासून मिळणाऱ्या तंतूंत अल्पाका, अंगोरा शेळी, उंट, काश्मीरी शेळी, लामा, व्हिकुना, मिंक, ससा, बॅजर, बीव्हर इ. प्राण्यांपासून मिळणाऱ्या तंतूंचा समावेश होतो. त्यांचा उपयोग कपड्यांसाठी करतात. शेळ्यांच्या, गायी म्हशींच्या आणि घोड्यांच्या केसांचा उपयोग उशा-गाद्या भरण्यासाठी करतात. डुकरांच्या केसांचा उपयोग ब्रश, कुंचले तयार करण्यासाठी करतात. वर उल्लेख केलेल्या प्राण्यांचे केस हे त्यांच्या त्वचेपासून निघतात व त्यांचा उपयोग त्या प्राण्यांना संरक्षक आवरण म्हणून होतो. रेशीम हा प्राणिजन्य तंतू इतर प्राणिजन्य तंतूंसारखा नसून तो रेशमाच्या किड्यांच्या कोशांपासून सलग धाग्याच्या स्वरूपात तयार होतो.

मेंढीची लोकर : सर्वसामान्यपणे लोकर पाच प्रकारांची असते : (१) तलम, (२) मध्यम, (३) लांब, (४) संकरजन्य आणि (५) गालिच्याची (मिश्र). तलम लोकर मेरिनो मेंढीपासून मिळते. इंग्लिश मेंढीपासून मध्यम प्रतीची लोकर मिळते. लिंकन, रोमनी मार्श, लायसेस्टर, कॉट्सवोल्ड इ. मेढ्यांपासून लांब लोकर मिळते, कॉरिडेल, कोलंबिया, टारघी ह्या संकरज मेंढ्यांपासून मध्यम तलम प्रतीची लोकर मिळते, तर आशियाई मेंढ्यांपासून गालिच्यासाठी लागणारी लोकर मिळते.

जिवंत मेंढ्यांची लोकर कापून काढतात. क्वचित मेलेल्या वा खटिकखान्यात मारलेल्या मेंढ्यांपासूनही लोकर उपटून काढली जाते. लोकर काढल्यानंतर तंतूंची जाडी, लांबी व रंग यांनुसार तिची प्रतवारी करण्यात येते. सामान्यपणे लोकरीचे तंतू सु. १·२५ ते ३७ सेंमी. किंवा त्याहून अधिक लांब असतात व त्यांचा व्यास १०–६० मायक्रॉन एवढा असतो [⟶ मेंढी लोकर].

इतर प्राणिजन्य तंतू : अल्पाका, काश्मिरी शेळी, व्हिकुना, लामा, अंगोरा शेळी ह्यांपासून मिळणारे केस हे विशेष प्रकारचे तंतू होत. प्राण्यांच्या अंगावरून ते कापतात. नंतर लांबी व तलमपणा ह्यांनुसार त्यांची प्रतवारी करतात. हे तंतू साधारणतः करडे-काळे असतात, कारण त्यांमध्ये रंगद्रव्ये असतात. हे तंतू मूळच्या रंगातच वापरतात. गडदपणा आणण्यासाठी ते क्वचित रंगवितात. तंतूंच्या गुणधर्मांत बदल न होता ह्या तंतूंचा रंग घालविण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.

मोहेरचे (अंगोरा मेंढीचे) तंतू भरड व जास्त जाड असून ते तारेसारखे असतात. पीळ दिलेल्या लोकरीच्या धाग्यांबरोबर मोहेरचे तंतू वापरल्यास लोकरीच्या कापडाची स्थितिस्थापकता (ताणले असता मूळ स्वरूपात परत येण्याचा गुणधर्म) सुधारते. त्यामुळे अशा कापडाला घड्या पडत नाहीत. तसेच ते ताठर व घट्ट बनते. काश्मीरी शेळी, व्हिकुना व लामा यांचे तंतू तलम (कमी व्यासाचे) असून लोकरीपेक्षा ते मऊ व वाकणारे असतात. अल्पाका व उंट यांचे तंतू भरड असून लामा, काश्मीरी शेळी आणि व्हिकुना यांच्यापेक्षा ते जास्त प्रमाणात उपलब्ध असतात.


ससा व बीव्हर यांचे तंतू कापडासाठी वापरीत नाहीत. सशाच्या केसांचा उपयोग ⇨ फेल्टनिर्मितीत मोठ्या प्रमाणात करतात. बीव्हर, बॅजर, मिंक व अंगोरा शेळी यांचे केस महाग असतात. त्यांचा उपयोग प्रामुख्याने फरची वस्त्रे तयार करण्याकडे करतात [⟶ फर-२].

रेशीम : बाँबिक्स मोरी  या रेशमाच्या किड्याची अळी कोशावरण (कोकून) तयार करताना रेशमी धागा तयार करते. अळीच्या खालच्या ओठातील ग्रंथीपासून दोन भिन्न धागे तयार होतात. हे धागे फिब्राॅइनाचे असून ते तयार होत असताना त्यांवर सेरिसीन या संरक्षक डिंकाचा थर बसतो. कोशावरण तयार होण्यास तीन दिवस लागतात. नंतर अळीचे रूपांतर कोशात (प्युपात) होते. त्यापासून पतंग तयार होतो आणि तो कोशावरण फोडून बाहेर पडतो. हा पतंग अंडी घालण्याइतपत दीर्घ काळ जगतो. तो बाहेर पडताना रेशमी धागा तुटतो व त्यामुळे सलग धागा मिळू शकत नाही, म्हणून फारच थोडे किडे पतंगाच्या अवस्थेपर्यंत येऊ देतात. कोशावस्थेतील बहुतेक किड्यांचा उष्णतेने नाश करतात किंवा प्रशीतनाने (थंड करण्याने) ते अक्रिय बनवितात. यानंतर कोशावरणाचा सलग रेशमी धागा रिळावर गुंडाळून घेतात [⟶ रेशीम].

खनिज तंतू : निसर्गात आढळणाऱ्या खनिज तंतूंत ॲस्बेस्टस हा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा एकमेव तंतू होय. ॲस्बेस्टसाचे खाणकाम करताना व त्यावर पुढील प्रक्रिया करताना त्याचे तंतू मोडणार व चुरणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असते. जास्त लांबीचे तंतू असल्यास त्यांपासून तयार केलेली वस्तू उच्च दर्जाची बनते. छपराचे पन्हळी पत्रे, सपाट पत्रे, नळ्यांचे आवरण, फरशा आणि अग्निरोधी कापड तयार करण्यासाठी ॲस्बेस्टस तंतूंचा उपयोग करतात. हे तंतू ठिसूळ असल्याने त्यांत २०% पर्यंत कापसासारखे तंतू मिसळतात [⟶ ॲस्बेस्टस].

नैसर्गिक तंतूंचे गुणधर्म : रासायनिक संघटन :वनस्पतिजन्य तंतूंपैकी कापूस, फ्लॅक्स व रॅमी यांचे तंतू शुद्ध करून वापरतात. त्यांमध्ये असणारे मेण, डिंक वा लिग्निन हे पदार्थ सोडियम हायड्रॉक्साइडाच्या विरल विद्रावात तंतू उकळून वेगळे केले जातात. नंतर सोडियम हायपोक्लोराइटाने वा हायड्रोजन पेरॉक्साइडाने विरंजन करतात. ह्या क्रियेनंतर मिळणाऱ्या तंतूंत सेल्युलोजाचे प्रमाण जास्त असते. पर्णतंतूंमध्ये लिग्निन, पेक्टीन, मेण व सेल्युलोज हे पदार्थ आढळतात. या तंतूंच्या बाबतीत रंग, स्पर्शाला मऊ असणे इ. गुणधर्म औद्योगिक वापराच्या दृष्टीने महत्त्वाचे नसतात म्हणून हे तंतू नैसर्गिक स्वरूपातच वापरतात.

क्रिसोटाइल ॲस्बेस्टसामध्ये सजल मॅग्नेशियम सिलिकेट, क्रॉसिडोलाइट ॲस्बेस्टसामध्ये लोह व सोडियम सिलिकेट यांचे जटिल रेणू आणि अमोसाइटामध्ये मॅग्नेशियम सिलिकेटात लोह असलेले जटिल रेणू असतात.

वनस्पतिजन्य तंतूमध्ये सामान्यतः सेल्युलोज आढळते. कापसामध्ये त्याचे प्रमाण ८८–९६ टक्के असते, तर फ्लॅक्समध्ये त्याचे प्रमाण सु. ९० टक्के असते. फ्लॅक्स, हेंप, रॅमी ह्यांसारख्या तंतूंतील सेल्युलोज अशुद्ध असते व त्यात झायलान हा पदार्थ आढळतो. ताग, काथ्या, सफेत सावर ह्यांसारख्या तंतूंत लिग्निन असते. तंतूंमध्ये लिग्निनाचे प्रमाण जास्त असल्यास ते ठिसूळ बनतात व त्यांचा उपयोग मर्यादित स्वरूपातच होतो. सेल्युलोज रेणू एकमेकांना जोडून एक लांबलचक साखळी तयार होते. तीमध्ये दोन प्राथमिक OH गट व दोन द्वितीयक OH गट असतात. दुसऱ्या प्रकारच्या OH गटांमुळे तंतूंच्या संरचनेच्या रासायनिक क्रियाशीलतेवर नियंत्रण ठेवले जाते.


प्राणिजन्य तंतूंमध्ये उच्च रेणुभाराचे प्रथिन रेणू असतात. लोकर व तत्सम तंतूंमध्ये केराटीन हे प्रथिन असते. कार्बन व हायड्रोजन यांखेरीज लोकरीत ३-४% गंधक, १६% नायट्रोजन व ०·२% इतर अकार्बनी पदार्थ असतात. गंधकामुळे लोकरीत न आकसण्याचा गुणधर्म येतो. रेशमामध्ये ग्लायसीन, ॲलॅनीन, सेरीन व टायरोसीन ह्या चार ॲमिनो अम्लांची शृंखला असते व त्यात गंधक नसते.

तंतुबल : ताणल्यास तंतू विशिष्ट मर्यादेपर्यंत ताणला जातो व त्यांनतर तो तुटतो. या विशिष्ट मर्यादेला तंतुबल वा ताणबल असे म्हणतात. हे बल ग्रॅम/डेनियर मध्ये मोजतात (९,००० मी. लांब तंतूंच्या ग्रॅममधील वजनाला ‘डेनियर’ म्हणतात). काही नेहमीच्या तंतूंचे तंतुबल पुढीलप्रमाणे आहे : कापूस ३–६ लोकर १-२ अबाका ६–७·५ फ्लॅक्स ३–८ हेंप ६-७ ताग ३–६ रॅमी ५–८ रेशीम ३–६ नायलॉनाचे बांधकामाच्या पोलादाचे ताणबल अनुक्रमे ४–६ व ०·५–१·५ इतके आहे (सर्व आकडे ग्रॅम /डेनियर मध्ये आहेत).

  

कापसाचा तंतू बळकट असला तरी तो जास्त ताणता येत नाही. कापसाचा तंतू सु. २५ मिमी. इतका लांब असल्याने त्याच्यापासून सलग असे सूत तयार करावे लागते. कापसाच्या तंतूच्या एकूण बलापैकी सु. ६०% बल सुतात असते. त्याच्या कमी ताणबलामुळे ते ताणल्यानंतर मूळ स्थितीत येत नाही. विशिष्ट रसायनांचा संस्कार त्यावर केल्यास त्यामध्ये घडी पडण्यास विरोध करण्याचा गुणधर्म येतो.

शुष्क तंतूंपेक्षा ओलसर तंतू २० टक्क्यांनी जास्त बळकट असतात. या गुणधर्माचा उपयोग धुलाईमध्ये होतो. धुणे, वाळविणे आणि इस्त्री करणे ह्या क्रिया होताना तंतू ओलसर असल्याने या क्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या ताणास विरोध करण्याची त्यांची शक्ती वाढते. पाणी शोषून घेण्याच्या आणि उष्णतेने मऊ न होण्याच्या व न वितळण्याच्या गुणधर्मामुळे हे तंतू टॉवेलसारख्या कापडाच्या निर्मितीत वापरतात.

अळशी व रॅमी यांच्या तंतूंना वरील सर्व विवेचन लागू पडते. हे तंतू कापसापेक्षा बळकट व ठिसूळ असून कमी ताणले जातात. ज्या वेळी बळकट व कमी ताणले जाणाऱ्या कापडाची उद्योगात आवश्यकता असते त्या वेळी लिननचा उपयोग करतात. शुष्क स्थितीतील तागाचे तंतू कापसाएवढेच बळकट असतात परंतु ओलसर हवा, वाफ वा पाणी यांच्याशी तागाचा अल्पकालही संपर्क आल्यास ते कुताजत.

अबाका, सिसाल व हेनेक्वेन यांचे तंतू कठीण असून ते बळकट व चिवट आहेत पण त्यांचा व्यास मोठा असल्याने मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपयोग फक्त दोर निर्मितीसाठीच करतात. कृत्रिम तंतूंचा उपयोग दोर तयार करण्यासाठी हल्ली करण्यात येत असल्यामुळे या नैसर्गिक तंतूंचा वापर कमी झाला आहे.

लोकरीचे तंतू बळकट नाहीत, पण ताणल्यावर मूळ स्थितीत परत येण्याचा गुणधर्म त्यांत आहे. त्यामुळे लोकरीच्या कापडाला पडलेली घडी तशीच राहते, तसेच ते चुरगळत नाही. लोकरीचे तंतू नागमोडी आकाराचे असतात. त्यामुळे या तंतूंमध्ये स्प्रिंगसारखे गुणधर्म येतात व या तंतूंपासून सूत तयार केल्यावर तंतू एकमेकांना चिकटत नाहीत. लोकरीचे तूत व कापड हे मऊ, जाड व ताणल्यास मूळ स्थितीत परत येणारे असते. वजनाला हलके, मऊ व जाड असे लोकरीचे कापड उष्णता निरोधक असते. आर्द्रता, उष्णता व यांत्रिक रीत्या ढवळणे यांमुळे लोकरीचे तंतू ताणले जातात व मूळ स्थितीत येतात. या तंतूवरील खवल्यांसारख्या आच्छादनामुळे ते तंतू एकाच दिशेने एकमेकांवरून सरकू शकतात व त्यामुळे ते हळूहळू एकमेकांत गुंतून फेल्ट तयार होते [⟶ फेल्ट]. पाण्याने लोकर धुतल्यास ती आकसते म्हणून कार्बनी विद्रावकांच्या (विरघळविणाऱ्या पदार्थांच्या) सहाय्याने तिची निर्जल धुलाई करतात. इतर प्राण्यांच्या केसांनाही वरील गुणधर्म लागू पडतात.


 रेशमी तंतू नायलॉन या कृत्रिम धाग्याप्रमाणेच बळकट असून ते चिवट व ताणले जाणारे असतात. तथापि जेथे उच्च बल व ऊर्जाअधिशोषणाची (ऊर्जा समावून घेण्याची) गरज असते, त्या वेळी रेशमाऐवजी कृत्रिम तंतूंचा वापर करतात. उदा., हवाई छत्री.

ॲस्बेस्टसाचे तंतू दृढ व ठिसूळ असतात. त्यांच्या उष्णता व आगनिरोधक गुणधर्मांमुळे त्यांचा उपयोग विशिष्ट प्रकारे करतात. त्याच्या ठिसूळपणामुळे कापूस वा इतर सुतांबरोबर ॲस्बेस्टस विणून थोड्या प्रमाणात कापड तयार करतात. हल्ली काही ठिकाणी ॲकस्बेस्टसाऐवजी काचतंतू वापरतात [⟶ काच, तंतुरूप].

पाण्याचा परिणाम : ॲस्बेस्टस वगळता इतर सर्व नैसर्गिक तंतू जलाकर्षी (पाणी शोषणारे) आहेत. द्रवरूपातील व बाष्परूपातील पाणी ते शोषून घेतात. ६५% आर्द्रता व २१·१°से. तापमान या सर्वसाधारण परिस्थितीत वनस्पतिजन्य तंतूंत ६–१०% आणि प्राणिजन्य तंतूंत १०–१५% बाष्प असते. नैसर्गिक तंतूंच्या पाणी शोषून घेण्याच्या गुणधर्मामुळे त्यांच्यापासून कपड्यांकरिता वापरावयाचे सुयोग्य कापड तयार करता येते. नैसर्गिक तंतूंपासून तयार केलेले कापड शरीरावरील घाम शोषून घेते व त्यामुळे त्याचे कपडे वापरणे सुखदायक होते. बरेचसे कृत्रिम तंतू आर्द्रता शोषून घेऊ शकत नाहीत. नैसर्गिक तंतूंत असणाऱ्या आर्द्रतेमुळे थंड कोरड्या हवेत कपड्यावर स्थिर विद्युत् निर्माण होण्यास रोध होतो. त्यांच्या जलाकर्षी गुणधर्मांचा आणखी एक फायदा म्हणजे त्यांना रंग देता येतो. रंग देण्यासाठी रंजकद्रव्ये (इतर काही रसायनांसह) पाण्यात विरघळवूनच वापरतात. पाणी शोषून घेतल्यावर नैसर्गिक तंतू आणि त्यांपासून बनविलेले सूत यांचा व्यास वाढतो. अशा सुतापासून बनविलेले कापड धुतल्यावर व वाळविल्यावर आटते. संस्कार न केलेले लिननचे व कापसाचे कापड तीन धुण्यांपर्यंत अधिकाधिक आटते, त्यानंतर मात्र त्याला स्थैर्य येते. गिरणीतून कापड बाहेर येण्यापूर्वी हल्ली कापडावर ते आटणार नाही असे संस्कार करतात. रेझीन व इतर रसायने यांचे संस्करण सुती कापडावर करतात. रेशीम सोडल्यास इतर प्राणिजन्य तंतूंचे कापड वारंवार धुतले तर आटत राहते.

विवध नैसर्गिक तंतूंचे सूक्ष्मदर्शकातून दिसणारे छेद : (अ) वनस्पतिजन्य तंतू (काटच्छेद व उभा छेद) : (१) कापूस (वरचा अगदी कच्च्या कापसाचा व खालचा सामान्यतः पक्क स्थितीतील कापसाचा), (२) ताग, (३) काथ्या, (४) सफेत सावर, (५) रॅमी, (६) हेंप, (७) फ्लॅक्स, (८) सिसाल (आ) प्राणिजन्य तंतू (काटच्छेद) : (१) लोकर, (२) रेशीम (इ) खनिज तंतू : क्रिसोटाइल ॲस्ब्रेस्टस.


उष्णतेचा परिणाम : सर्व नैसर्गिक तंतू उष्णतेने वितळत नाहीत. कापसाच्या तंतूंचा १४९°से. ला, तर लोकरीचा १२९°से. ला कोळसा होण्यास सुरुवात होते. या तापमानाला ‘विघटन तापमान’ असेही म्हणतात. विघटन तापमानाखालील तापमानांत नैसर्गिक तंतूंवर उष्णतेचा परिणाम होत नाही, ते आकसत नाहीत वा अतिशय ताणले जात नाहीत. तसेच ०°से. खालील तापमानात ते कठीण, ठिसूळ आणि अनम्य होत नाहीत. सेल्युलोजयुक्त तंतू चटकन पेटतात व एकदा पेट घेतल्यावर जळतच राहतात. प्राणिजन्य तंतू व रेशमी तंतू सेल्युलोजयुक्त तंतूंपेक्षा कमी जलदतेने पेटतात. सर्व नैसर्गिक तंतू जसजसे जुने होतात व विशेषतः सूर्यप्रकाशाचा त्यांवर अधिकाधिक परिणाम होतो तसतसे ते हळूहळू पिवळट होतात व त्यांचा बळकटपणा कमी होतो.

रसायनांचा परिणाम : पेक्टीन व लिग्निनविरहीत रेशीम, प्राणिजन्य तंतू व सेल्युलोजयुक्त तंतू यांमधून अल्कोहॉले, ईथरे, एस्टरे, कीटोने इ. कार्बनी विद्रावक व निर्जल धुलाईत वापरण्यात येणारी रसायने आरपार जाऊ शकत नाहीत. खोडापासून मिळणाऱ्या कठीण तंतूंमधून लिग्निन व पेक्टीन यांचा काही अंश वरील विद्रावकांकडून वेगळा केला जातो.

सेल्युलोजयुक्त तंतूंवर क्षाराचा (अल्कलीचा) परिणाम होत नाही. पण खनिज अम्लांत हे तंतू विरघळतात किंवा खराब होतात. लोकर व तत्सम तंतूंवर अम्लांचा परिणाम होत नाही पण गरम क्षारांमध्ये ते विरघळतात वा विकृत होतात. दुर्बल अम्लांचा रेशमावर थोडा परिणाम होतो. तसेच क्षार व प्रबळ अम्ले यांचा रेशमावर परिणाम होऊन त्यांत रेशीम विरघळते. तंतूंची खराबी ही अम्लाच्या वा क्षाराच्या प्रकारावर, संहतीवर (विद्रावातील आवश्यक पदार्थांच्या प्रमाणावर) आणि तापमानावर तसेच त्यांच्याशी तंतूंचा किती काळ संपर्क येतो, यांवर अवलंबून असते.

खराबी : सर्व नैसर्गिक तंतूंवर सूक्ष्मजंतूंचा परिणाम होतो. हवेशिवाय जगणारे सूक्ष्मजंतू व कवक (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या वनस्पती) यांच्याद्वारे सेल्युलोजयुक्त तंतूंचे विघटन होते. जास्त ओलावा, उच्च तापमान व प्रकाशाचा अभाव यांमुळे सेल्युलोजयुक्त तंतूंवर भुरी येते व त्यांचे विघटन होते. मात्र अशा तंतूंवर वा कापडांवर भुरीरोधक रसायनांचा संस्कार केल्यास विघटनाची क्रिया होत नाही. सूक्ष्मजंतू व बुरशी यांच्यामुळे लोकर व रेशीम खराब होतात. रसायनांनी खराब झालेल्या लोकरीवर बुरशीचा व सूक्ष्मजंतूंचा परिणाम अधिक हातो. पतंग व विशिष्ट प्रकारचे भुंगे यांच्यामुळे प्राणिजन्य आणि वाळवी व कसर यांच्यामुळे वनस्पतिजन्य तंतू खराब होतात.

सूत : तंतूंपासून सूत तयार करण्यापूर्वी त्यांवर बऱ्याच क्रिया कराव्या लागतात. जास्तीत जास्त क्रिया कापसावर करण्यात येतात. इतर तंतूंसाठी त्यांतील काही क्रिया वगळल्या जातात. रेशमाचे तंतू मुळातच सलग व अतिशय बारीक असल्याने त्याचे १०–१२ वा अधिक तंतू एकत्र करून सूत तयार करण्यात येते.

पहा : कापड उद्योग सूत सूतकताई.

संदर्भ : 1. Cook, J. G. Handbook of textile Fibres, Watford, 1960.

           2. Editors of American Fabrics Magazine, Encyclopaedia of Textiles, Englewood Cliffs, N. J., 1960.

           3. Kaswell, E. R. Textile Fibers, Yarns and Fabrics, New York, 1963.

           4. Kirby, R. H. Vegetable Fibers : Botany, Cultivation and Utilization, New York, 1963.

           5. Preston, J. M., Ed. Fibre Science, Manchester, 1953.

 

देव, स. ग.