कटलरी : व्यक्तिगत व घरगुती कामांकरिता वापरण्यात येणारी चाकू, कातऱ्या, सुऱ्या, वस्तरे, चाकूंना धार लावण्याची साधने आणि खाटिक, आचारी,रंगारी इ. व्यवसायांत वापरण्यात येणाऱ्या चाकू, सुऱ्या यांसारख्या वस्तूंचा सामान्यत: कटलरी या संज्ञेत समावेश करण्यात येतो. भारतात अडकित्ता, विळा,कोयता यांसारख्या वस्तूंचाही कटलरीत समावेश होतो. चमचे, काटे, चांदी आणि इतर धातु-विलेपित (धातूंचा मुलामा दिलेल्या) वस्तू यांचाही काही देशांत कटलरी म्हणून उल्लेख करण्यात येतो.

सामान्य जिन्नस कापण्याच्या, हाताने वापरता येणाऱ्या चाकू, सुऱ्या, कातऱ्या यांसारख्या धारदार हत्यारांना कर्तक म्हणतात. कर्तक जर मृदू पोलादापासून तयार केले, तर त्यांची धार तीक्ष्ण होत नाही व ती लवकर बोथट होते. परंतु त्यासाठी जर १ ते १.३ टक्के कार्बनाचा अंश असलेल्या पोलादाचा उपयोग केला, तर कर्तकाची धार तीक्ष्ण करता येते व ती पुष्कळ दिवस टिकते. पोलादाची कठिनता त्यामधील कार्बनाच्या प्रमाणावर अवलंबून असते. पोलादाचे उत्पादन सुरू होण्यापूर्वी सर्व हत्यारे साध्या लोखंडापासून तयार करीत असत व नंतर त्याचे पृष्ठभाग कठीण करण्यासाठी पात्यावर कोळशाचा लेप लावून भट्टीमध्ये कित्येक दिवस गरम स्थितीत ठेवीत असत. या क्रियेने लोखंडाच्या पृष्ठभागाचे पोलादामध्ये रूपांतर होते. लोखंडामध्ये कार्बन घुसविण्याकरिता निरनिराळ्या देशांत विविध पध्दती प्रचारात होत्या. त्यांसंबंधी फार गुप्तता राखण्यात येत असे, त्यामुळे त्यांची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. पोलादाचे उत्पादन सुरू झाल्यावर उच्च कार्बन-अंश असलेले पोलाद कर्तकाकरिता योग्य ठरल्याने ते सर्वत्र वापरण्यात येऊ लागले.

आ. १. विविध प्रकारच्या (अ) कातर्‍या, (आ) चाकू, (इ) सुर्‍या आणि (ई) वस्तरा.

सुरुवातीच्या दिवसांत चांगल्या जातीचे कर्तक उच्च कार्बन-अंश असलेल्या पोलादाचेच बनवीत असत. हे कर्तक दिसण्यात काळसर असतात व ते न वापरता उघड्या जागेत ठेवली तर लवकर गंजतात. अगंज (स्टेनलेस) जातीचे म्हणजे १० ते १५ टक्के क्रोमियम मिसळलेले किंवा क्रोमियम व व्हॅनेडियम मिसळलेले पोलाद चांदीसारखे पांढरे दिसते व मुळीच गंजत नाही. परंतु त्याची धार कार्बन पोलादाइतकी तीक्ष्ण नसते व ती बोथट झाली, तर नुसती घासून पूर्वीइतकीही तीक्ष्ण करता येत नाही.

निर्मिती : पूर्वी कर्तकाचे पाते तयार करण्यासाठी पोलादाची चौकोनी छेदाची कांब वापरीत असत. ही कांब भट्टीमध्ये लाल होईपर्यंत तापवून ऐरणीवर हातोड्याने ठोकून तिला पाहिजे तसा आकार देत असत. या पध्दतीने ठोके मारून तयार केलेल्या पात्याची घनता वाढत असे व त्यामधील अपद्रव्ये (अनावश्यक द्रव्ये) बाहेर पडून पात्याला चांगला कठीणपणा व टणकपणा येत असे. परंतु हाताने ठोके मारताना पाते वारंवार गरम करावे लागते व बराच वेळ खर्च होतो. ही क्रिया यांत्रिक हातोड्याने केली, तर कांब एकदाच तापवून तिला पाहिजे तो आकार अगदी थोड्या वेळात देता येतो. त्यामुळे आता पुढारलेल्या देशांत कांब ठोकण्याचे काम यांत्रिक हातोड्यानेच करतात. काही ठिकाणी चौकोनी कांब न वापरता पोलादी पत्र्यातून पाहिजे त्या आकाराचा तुकडा तोडून घेतात. तो तुकडा लाल होईपर्यंत तापवून दोन भाग असलेल्या मजबूत पोलादी मुद्रेमध्ये (डायमध्ये) ठेवतात व त्यावर मोठ्या आघाती हातोड्याने एकच ठोका मारतात. या ठोक्याने मुद्रेत ठेवलेली गरम पट्टी पसरते व मुद्रेचा आकार घेते. हा आकार जवळजवळ तयार करावयाच्या कर्तकासारखाच असतो. कोणत्याही पध्दतीने घडवून तयार केलेल्या पात्यावर तीक्ष्ण धार येण्यासाठी ते उत्तम प्रतीच्या घर्षणचक्राने घासतात. कर्तकाचे पाते घासून झाल्यावर त्याला कठीण करण्यासाठी ते कार्बन पोलादाचे असल्यास ७८० से. ते ८००से. पर्यंत व अगंज पोलादाचे असल्यास ९५० से. ते १,०००से. पर्यंत तापवतात व थंड पाण्याच्या किंवा तेलाच्या कुंडात बुडवून एकदम थंड करतात. या क्रियेने ते कठीण व कडक होते. हा कडकपणा तापविण्याच्या उच्च तपमानावर अवलंबून असतो. ते तपमान कोळशाच्या भट्टीत चांगल्या प्रकारे नियमित करता येत नाही म्हणून कित्येक ठिकाणी पाते गरम करण्यासाठी ते वितळविलेल्या शिशाच्या रसात बुडवितात किंवा तपमापक बसविलेल्या विद्युत् भट्टीचा उपयोग करतात. पाते कठीण करण्याची क्रिया झाल्यानंतर त्याचा कडकपणा कमी करून ते थोडे लवचिक व टणक करण्यासाठी पुन्हा २२० से. ते ३०० से. पर्यंत तापवतात व नंतर संथपणे थंड होऊ देतात. पात्यावरचे औष्णिक उपचार संपल्यावर ते पुन्हा एकदा घासून त्याची धार साफ करतात व नंतर मूठ बसवितात. मुठीकरिता सागवानी लाकूड, प्‍लॅस्टिक, हस्तिदंत, जनावरांची शिंगे, सेल्युलॉइड किंवा चांदी, निकेल, ॲल्युमिनियम या धातूंच्या पट्ट्या वापरतात. मूठ बसविल्यानंतर तो कर्तक झिलई देणाऱ्या यंत्रावर घासून चकचकीत करतात. तयार झालेला कर्तक साठवून ठेवताना तो तेलकट कागदात गुंडाळून ठेवल्यास गंजत नाही.

कातरी : ही तयार करताना तिच्या दोन्ही भागांवर धार काढली म्हणजे ते भाग रिव्हेट मारून किंवा बोल्ट व नट बसवून जोडावे लागतात. कातरीची प्राथमिक जोडणी केल्यावर कातरीचे कातरकाम नीट तपासून पहावे लागते व जरूरीप्रमाणे दोन्ही भाग सैल करावे लागतात किंवा आवळावे लागतात. जरूर असेल तर पात्यांची पातळीही पुन्हा घासून सुधारावी लागते. कातरीची अंतिम तपासणी करणे हे फार महत्त्वाचे काम असते व ते अनुभवी कारागिराकडे सोपवितात. अगंज पोलादाच्या कातऱ्यांवर शेवटी निकेलाचे विद्युत् विलेपन (विजेच्या साहाय्याने लेप देण्याचे काम) करतात व नंतर पुन्हा कापडाने घासून चकचकीत करतात. कातऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांची लांबी ५ सेंमी. पासून ३० सेंमी. पर्यंत असते. केस कापण्याच्या, कापड कापण्याच्या, बागायती कामाच्या असे त्यांचे विशेष प्रकार आहेत. बहुतेक कातऱ्यांची पाती सरळ असतात परंतु विशेष कामाकरिता त्या वळविलेल्या किंवा नागमोडीही असतात.

चाकू : पात्यांच्या लांबीवरून चाकूंचे अनेक वर्ग करतात. खिशात ठेवण्याच्या चाकूला एकच पाते असले तर ते ५-७ सेंमी. लांब असते. दोन पाती असली तर एक लहान आणि दुसरे मोठे असते. अशा चाकूचे पाते मुठीमध्ये झाकून ठेवता येते. मुठीमध्ये झाकून ठेवलेले पाते नखाने बाहेर काढण्यासाठी पात्यावर एक खाच काढलेली असते. पाते पूर्ण उघडल्यावर काम करताना ते हलू नये म्हणून त्यावर दाब ठेवण्यासाठी मुठीमध्ये एक स्प्रिंग बसवलेली असते.

सुरी : चांगल्या सुऱ्या कार्बन पोलादाच्या किंवा क्रोम-व्हॅनेडियम पोलादाच्या बनविलेल्या असतात. त्यांची पाती चाकूपेक्षा जास्त रुंद व लांब असतात. ही पाती चाकूप्रमाणेच तयार करतात व नंतर त्यांवर लाकडाच्या किंवा धातूच्या भरीव मुठी बसवतात. स्वस्त सुऱ्या ॲल्युमिनियम किंवा पितळी पत्र्यापासूनही बनवितात परंतु त्यांना तीक्ष्ण धार नसते. जेवणाकरिता वापरावयाच्या सुऱ्यांची पाती १२ ते १५ सेंमी. पर्यंत लांब असतात.

अडकित्ता : हा बनविताना त्याचा बहुतेक भाग मृदू पोलादाचा किंवा पितळेचा करतात व नंतर कार्बन पोलादाची कर्तक पाती निराळी तयार करून योग्य जागी झाळ देऊन बसवितात [→ अडकित्ता].


वस्तरा : उत्तम प्रकारचे वस्तरे बनविताना पात्यांच्या खोलगट भागावर धार काढण्यासाठी दोन लहान घर्षणचक्रे असलेले यंत्र वापरतात या यंत्राच्या दोन्ही चक्रांच्या मधल्या जागेत पाते सरकवून त्याच्या दोन्ही बाजूंवर एकदम धार लावता येते. हे काम बरेच अवघड असते व त्याकरिता उत्तम कारागीर लागतो. [→ वस्तरे].

चमचे : हे बनविण्याकरिता अगंज पोलाद, पितळ, ॲल्युमिनियम अशा धातू किंवा प्‍लॅस्टिकचाही उपयोग करतात. पितळी चमचे ओतीव पध्दतीने तयार करतात व ते घासून साफ केल्यावर त्यांवर कल्हई करतात किंवा विद्युत् विलेपन पध्दतीने निकेलाचा थर देतात. अगंज पोलादाचे चमचे पत्र्याच्या तुकड् यापासून दाब घडवण पध्दतीने तयार करतात. नंतर निकेलाचे किंवा चांदीचे विद्युत् विलेपन करतात. अगदी स्वस्त चमचे ॲल्युमिनियमाच्या पत्र्याचे किंवा प्‍लॅस्टिकचेही करतात. दाब घडवण पध्दतीने चमचे बनविण्याच्या कृतीमधील निरनिराळे टप्पे आ. २ मध्ये दाखविले आहेत.

आ. २. दाब यंत्राने चमचा बनविण्याचे टप्पे

उत्पादन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटन हे देश कटलरी निर्मितीत अग्रेसर आहेत. जपान, फ्रान्स, स्वीडन, झेकोस्लोव्हाकिया या देशांत कटलरी कारखाने आहेत.

इंग्‍लंडमधील शेफील्ड शहर पंधराव्या शतकापासून कर्तक हत्यारे बनविण्याचे प्रसिध्द केंद्र असून ब्रिटनमधील जवळजवळ ९०टक्के उत्पादन शेफील्ड येथे होते. अमेरिकेतील कटलरी व्यवसाय यूरोपातून तेथे स्थानांतर केलेल्या लोकांनी १८३० च्या सुमारास सुरु केला. जर्मनीतील व्यवसाय झोलिंगेन येथे केंद्रित झालेला असून चौदाव्या शतकापासून हे ठिकाण कटलरीसाठी प्रसिध्द आहे. अमेरिका व जर्मनी या देशांत कर्तक तयार करण्यासाठी मुद्दाम विशेष बनावटीची यंत्रे,उत्तम प्रतीचे पोलाद व औष्णिक उपचारसाहित्य वापरतात. त्यामुळे तेथील मालाचा उच्च दर्जा सतत कायम राहतो व तो माल योग्य किंमतीत मिळतो. शेफील्ड येथील बराचसा माल मात्र अद्यापिही हाताने बनविण्यात येतो. या धंद्यात विशेषसे मानकीकरण झालेले नाही. अनेक आकारांचे व प्रकारांचे चाकू, सुरे बाजारात उपलब्ध आहेत.

भारतामध्ये अजून पाहिजे त्या प्रकारचे पोलाद सहज उपलब्ध होत नाही. हा धंदा अजून वैयक्तिक स्वरूपाचाच आहे व त्यामध्ये जुन्या रूढ क्रिया वापरल्या जातात. कच्च्या मालाकरिता जुन्या कानशीसारख्या वस्तूंचा उपयोग करतात. त्यामुळे मालाची प्रत एकसारखी ठेवता येत नाही. पंजाबमधील कर्णाल येथील अडकित्ते एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विविध आकार व बनावट यांसाठी प्रसिध्द होते. त्यांच्या मुठी पितळी असून त्यांवर विविधरंगी काचेचे तुकडे अथवा आरशाचे लहान गोल तुकडे कौशल्यपूर्ण रीतीने बसविण्यात येत. अडकित्त्यांप्रमाणेच कातऱ्यांच्या मुठीही सुशोभित करण्यात येथील कारागीर वाकबगार होते. अलीकडे मात्र जामनगरचे अडकित्ते अतिशय प्रसिध्द आहेत. चाकू व कातऱ्या बनविण्याचे काही कारखाने दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात पेण व मालवण येथे लहान कारखाने आहेत. तेथे चाकू, कातऱ्या व सुऱ्या तयार करतात. विळी व कोयता यांसारखी घरगुती हत्यारे बहुतेक सर्व शहरांत स्थानिक लोहारच तयार करतात व त्याकरिता जुन्या लोखंडी वस्तूंचा उपयोग करतात.

ओक, वा. रा. गोखले, श्री. पु.