सागरी अन्न : सागरी (खाऱ्या) पाण्यातील कोणताही खाद्य मासा आणि खाद्य शेलफिश यांना सागरी अन्न म्हणतात. कवच व बाह्यकंकाल असणाऱ्या अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) जलचर प्राण्यांना शेलफिश म्हणतात. ⇨ ऑयस्टर व इतर मृदुकाय प्राणी [⟶ मॉलस्का] आणि ⇨ शेवंडा (लॉब्‌स्टर) व इतर कवचधारी प्राणी ही शेलफिशांची ठळक उदाहरणे आहेत. मराठी विश्वकोशात विविध सागरी खाद्य मासे व जलचर यांच्यावर स्वतंत्र नोंदी आहेत.

इतिहासपूर्व काळापासून मानव अन्नासाठी अंशतः समुद्रावर अवलंबून राहिला आहे. जुनी किंवा आधुनिक साधने व तंत्रे वापरू न मोठे मासे पकडणे हे काम सोपे झाले आहे. त्यामुळे मोठे मासे पकडण्याकडे कल असणे स्वाभाविकच आहे. सामान्यपणे पुढील प्रकारचे जलचर मोठ्या प्रमाणावर पकडतात : कॉड, अँकोव्ही, सार्डीन, पोलॉक, हॅडॉक, हॅलिबट, विलचर्ड, ट्यू नाचे प्रकार, सामन, बॅराकुडा, रावस, बाहू, बांगडा, बोंबील, गेदर, सरंगा (पांढरा पापलेट), बोय, सुरमई, लांज, पाकट, वाम, पाल, भिंग, दडदडा, घोळ, दाढा, ढोम, वाकटी, हलवा, मागूर, तांबुसा इ. ठराविक मासे तसेच झिंगे, कोळंबी, शेवंडे, हेकरू, खाऱ्या चिंबोऱ्या, ऑयस्टर, स्क्विड, क्लॅम, अटलांटिक व पॅसिफिक शेलफिश, तिसऱ्या, करंदी, काकई, माकुळ, करारी, खेकडे, बेडूक, कासवे, देवमासे, क्रिल (छोट्या चिंबोऱ्या) इत्यादी. मोठ्या माशांच्या व इतर जलचरांच्या निर्मितीचा वेग मंद असतो आणि मानवी लोकसंख्या सतत वाढत असल्याने सागरी अन्नपुरवठ्या चा प्रश्न गंभीर होत आहे. म्हणून मत्स्योत्पादन वाढविणे आणि खाद्य मासे व जलचर यांचा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने उपयोग करून घेणे गरजेचे झाले असल्याने, त्या प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठे मांसाहारी मासे व जलचर हा एकूण सागरी अन्नातील छोटाच भाग असला, तरी त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. म्हणून माणसाचे लक्ष इतर लहान मासे व जलचर यांच्याकडे गेले आहे. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात तर विविध प्रकारच्या प्राणिप्लवकांचाही अन्न म्हणून उपयोग करण्यास सुरुवात झाली. सागरी वनस्पतींकडेही लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. सागरी तृणांचा अन्नपदार्थ, औषधी द्रव्ये, आइस्क्रिम, गोळ्या (कँडी) इत्यादींकरिता उपयोग होऊ शकतो असे आढळून आले आहे.

मत्स्यसंवर्धनाद्वारे मासे व इतर जलचर यांचे उत्पादन वाढविता येते. माशांशिवाय कालव, क्लॅम, ऑयस्टर, कोळंबी, झिंगे, बेडूक व सागरी शैवले यांच्या संवर्धनाकडेही पुष्कळच लक्ष देण्यात आले. विशेषतः शाकाहारी मृदुकाय प्राण्यांना चिकटून राहण्यासाठी लागणाऱ्या योग्य प्रकारच्या कृत्रिम आधार पृष्ठभागाची सोय उपलब्ध करून देऊन आणि त्यांचे भक्षक शत्रू व स्पर्धक जीव यांना दूर ठेवून त्यांचे संवर्धन करतात. कालव व ऑयस्टर यांची अशी शेती जपानसारख्या देशांत शेकडो वर्षांपासून केली जात आहे. जलचर प्राण्यांचे प्रजननही करतात. सागरी खंडफळीवर जलचरांप्रमाणेच खाद्य वनस्पतींची पिकेही घेतात.

सागरी जीवविज्ञान, तसेच महासागरविज्ञान यांतील काही माहितीचा खोल महासागरी मासेमारीत उपयोग करून घेण्यात आला. यांद्वारे मासेमारीची नवीन क्षेत्रे निश्चित करण्यात आली आणि पर्याप्त सागरी अन्न सतत उपलब्ध होत राहील, अशी व्यवस्था करण्यात आली. पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय सागरी प्रवाहांची वैशिष्ट्ये अभ्यासून ट्यूना माशांच्या उत्पादक क्षेत्रांचा शोध लागला. जास्त प्रमाणात मासेमारी झाल्याने काही जातींचा अधिक संहार होतो. त्यामुळे केवळ मत्स्योत्पादनच घटते असे नाही, तर पर्यावरणातील जीवजातींचा समतोल बिघडतो. हा समतोल टिकवून ठेवण्यासाठी सागरी जीवविज्ञानातील संशोधन उपयुक्त ठरले. कारण यातून आवश्यक अशा नियंत्रण करणाऱ्या जीववैज्ञानिक बाबी लक्षात आल्या. पॅसिफिक महासागरातील हॅलिबट माशांच्या संख्येत आणि पर्यायाने त्यांच्या उपलब्धतेत होणारे चढ-उतार लक्षात घेऊन एकूण मासेमारीचेच नियंत्रण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले. यामुळे या माशांची उपलब्धता हवी तेवढी राहू शकली. वायव्य अटलांटिक भागातील हॅडॉक माशांचे आकारमान नियंत्रित राहावे म्हणून मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यांमधील छिद्रांचे आकारमान कोणते असावे याचे नियम करण्यात आले. यांमुळे लहान म्हणजे कमी वयाचे मासे (वा जलचर) या छिद्रांतून निसटून जातात व त्यांची वाढ चालू राहते. यामुळे बाजारपेठेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आकारमानाचे मासे अधिक संख्येने सतत उपलब्ध होत राहतात.

जगात दरवर्षी सु. ७ ते ८ कोटी टन मत्स्योत्पादन होते. ते वाढावे म्हणून मासेमारीची तंत्रे व पद्घती, माशांवरील प्रक्रिया व संस्करण, मासे जहाजात चढविण्याच्या व उतरवून घेण्याच्या बंदरातील सोयीसुविधा यांमध्ये सुधारणा करतात. प्लवक व त्यांच्यासाठी पोषक द्रव्य आणणारे सागरी प्रवाह, समुद्रतळाची परिस्थिती, सागरी पाण्याचे भौतिकीय व रासायनिक गुणधर्म इत्यादींवर मत्स्योत्पादन अवलंबून असते. यांच्या अभ्यासाच्या आधारे मासेमारीचे योग्य क्षेत्र निवडता येते. माशांच्या सवयींचा अभ्यास करून त्यांना पकडण्याच्या पद्घतींत व साधनांत (जाळे, सापळे, आमिष आदी.) सुधारणा करतात. तसेच माशांविषयीची जीववैज्ञानिक माहिती, त्यांची अन्नाची आवड, त्यांचे शत्रू व स्पर्धक, समुद्राच्या परिस्थितीत होणारे हंगामी व दीर्घकालीन फेरबदल यांच्या आधारेही मत्स्योत्पादनात सुधारणा करतात व संभाव्य नासाडी टाळतात. शिवाय मासे व जलचर यांच्यावर पाण्यातील अल्प प्रमाणातील मूलद्रव्यांचे होणारे विपरित परिणाम अभ्यासून प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीचा अंदाज करता येतो.

कृत्रिम रीतीने अन्नपुरवठ्या ची सोय करून अपेक्षित ठिकाणी मासे येतील अशी व्यवस्था करता येते. यासाठी विपुल पोषक द्रव्ये असलेला सागरी पाण्याचा तळालगतचा थर आणि विपुल जीव असलेला या पाण्याचा वरचा थर यांचे मिश्रण करणे पुरेसे असते. पेरू देशाच्या किनाऱ्यालगत असे मिश्रण नैसर्गिक रीतीनेच होत असते आणि तेथे विपुल जीव आढळतात. अशाच प्रकारे एखाद्या सोयीस्कर ठिकाणी कृत्रिम रीतीने पाण्याचा तळालगतचा थर उफाळून वर येण्याला चालना देता आली, तर या थरांचे असे मिश्रण होऊन तेथील जीवांची संख्या वाढविता येईल.

क्रिल नावाच्या छोट्या चिंगाट्या अंटार्क्टिका खंडालगतच्या समुद्रांत मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांच्यापासून खाद्य पदार्थ तयार करणे शक्य आहे, असे दिसते. त्याचप्रमाणे या जीवांपासून प्रथिने मिळविण्याचे प्रयत्न करता येणे शक्य आहे. कारण वाहतूक, साठवण व वापर या दृष्टींनी प्रथिने सोयीस्कर असतात. काही सागरी मासे व जलचर यांच्यापासून प्रथिने मिळवितात व त्याचे औषधासह अनेक उपयोग होतात.

खाद्य मासे व जलचर पकडण्यासाठी मासेमारीत अनेक पद्घती वापरतात. नुसत्या हातांनी, जखमी करून अथवा गुंगी आणून मासे पकडतात. नसराळ्यासारखे स्थिर, खोळीसारखे ओढता येणारे (ट्रॉल), दोन्ही टोकांनी खेचावयाचे (रापण) इ. प्रकारची जाळी तसेच गळ, सापळे व इतर साधने वापरूनही मासेमारी करतात. जाळे फेकून, जाळ्यात उचलून वा गुंतवून किंवा वेष्टन पद्घती वापरूनही मासे पकडतात. मासेमारीसाठी मचवे, होड्या , नौका, जहाजे इ. वाहने वापरतात.

अन्न म्हणून वापरण्यात येणारे मासे ताज्या स्थितीत बाजारात पाठवितात. तसेच त्यांच्यावर प्रक्रिया करूनही ते बाजारपेठेत पाठविले जातात. माशांवर प्रक्रिया करण्याच्या जवळजवळ तीनशे पद्घती आहेत. यांतील गोठविणे, धुरी देणे, सुकविणे, मिठात खारविणे व हवाबंद डब्यांत भरणे या अधिक परिचित असलेल्या पद्घती आहेत.

थोडक्यात संशोधनाद्वारे मत्स्योत्पादन वाढविण्याचे प्रयत्न केले जातात. त्याकरिता माशांची सविस्तर माहिती गोळा करतात. नौका, जाळी, आमिषे व इतर साधने शास्त्रीय दृष्टीने तयार करतात ती सोयीस्कर व योग्य प्रकारची होतील, हे पाहतात. मासे अधिक काळ टिकविण्याच्या प्रकियांचा शोध घेतला जातो. शिवाय संमिश्र मत्स्यसंवर्धन, प्रवर्तित प्रजनन व संकरित मासे यांसारखे प्रयोग करून मत्स्योत्पादन वाढविण्याचे प्रयत्न करतात.

पहा : जीवविज्ञान, सागरी मत्स्यपारध मत्स्योद्योग महासागर व महासागरविज्ञान.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, Supplement Fish and Fisheries, New Delhi, 1962.

2. Idyll, C. P. The Sea Against the Hunger, New York, 1964.

3. Iverson, E. S. Farming the Edge of the Sea, London, 1968.

4. Jhingran, V. G. Fish and Fisheries of India, Delhi, 1977.

5. McKee, A. Farming of the Sea, New York, 1969.

ठाकूर, अ. ना.