फरशी : सामान्यतः जमिनीचे संरक्षण करण्यासाठी, इमारतींच्या भिंतींच्या आतील व बाहेरील बाजूस लावून त्या सुशोभित करण्यासाठी वा त्या टिकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कमीजास्त जाडीच्या, सपाट आणि विविध आकार व आकारमानांच्या निरनिराळ्या पदार्थांच्या तुकड्यांना सर्वसाधारणपणे फरशी असे म्हणतात. फरशीसाठी विविध प्रकारचे दगड (संगमरवर, शहाबादी, अग्निज खडक इ.), सिमेंट, ॲस्बेस्टस, व्हिनिल प्लॅस्टिक, लाकूड, अस्फाल्ट, विविध प्रकारची माती इ. पदार्थ वापरण्यात येतात. नैसर्गिक रीत्या मिळणारे वा खाणींतून काढण्यात येणारे दगड घडवून फरशीच्या योग्य त्या आकारात व आकारमानात आणण्यात येतात. सिमेंट-वाळू मिश्रणाच्या साहाय्याने सिमेंटच्या फरश्या तयार करण्यात येतात. मातीचे विविध प्रकार पाण्यात भिजवून त्यापासून योग्य आकाराच्या फरश्या बनवून त्या वाळवून मग भाजतात. उदा., टेराकोटा फरशी, मोझेइक (कवडी) फरशी इत्यादी. अशा फरश्यांवर काच, रबर, प्लॅस्टिक इत्यादींसारख्या पदार्थांचा थर देऊन व त्या भाजून विशिष्ट प्रकारच्या फरश्या तयार करण्यात येतात. लाकडाचा फरश्यांसारखा वापर विशिष्ट उपयोगांकरिता (उदा., नृत्यगृह, स्केटिंग इ.) पण मर्यादित प्रमाणात करण्यात येतो.

इतिहास : ईजिप्तमधील साक्कारा येथील इ. स. पू. सु. ३००० मधील पायऱ्या असलेल्या झोसर पिरॅमिडावर लहान लहान व विविध नक्षीच्या चकचकीत व निळसर फरश्या बसविलेल्या आढळतात. ह्या फरश्या मातीच्या व भाजलेल्या असून त्या दगडी भिंतीला तांब्याच्या तारेने जोडलेल्या होत्या. क्रीटमधील कलाकारांनी मातीच्या भाजलेल्या लहान विविध रंगीत नक्षीच्या फरश्यांच्या साहाय्याने इ. स. पू. १८०० च्या सुमारास मोठ्या इमारतींच्या भिंतीवर मोठे व सुंदर असे देखावे तयार केले होते. रंगीत फरश्यांसाठी सामान्यतः निळा, लाल, तपकिरी, पिवळा व काळा हे रंग वापरण्यात येत असत. काही वेळा फरश्यांची माती अपोत्थित (खोदून केलेल्या) साच्यात ओतून उठावाच्या आकृत्या असलेल्या फरश्या बनवीत व त्या जोडून देखावे वा नक्षीकाम निर्माण करीत असत. मेसोपोटेमियातील मातीच्या विटांनी बांधलेल्या देवळांच्या (झिगुरातच्या) शिखरांवर आणि राजवाड्यांवर अतिशय चकचकीत व भाजलेल्या विटा किंवा विटांसारख्या फरश्या बिट्युमेनच्या साहाय्याने बसविलेल्या होत्या. बॅबिलन येथे इ. स. पू. सहाव्या शतकातील बांधकामात फरश्यांचा उपयोग केलेला आढळतो. इ. स. पू. सहाव्या शतकातील डरायस या राजांच्या स्यूसा येथील राजवाड्यासाठी वापरण्यात आलेल्या इराणी फरश्यांवर तिरंदाज असलेले कोरीव शिल्पपट्ट असून त्या उल्लेखनीय अशा होत्या (पहा खंड २, चित्रपत्र ५२), तसेच इ. स. पू. चौथ्या शतकातील आर्टझर्क्सीस यांच्या स्यूसा येथील राजवाड्यातील जमिनीवर व भिंतीवर रंगीत फरश्यांचा वापर करून तिरंदाज व सिंह यांचे रंगीत कोरीव शिल्पपट्टयुक्त देखावे दाखविण्यात आलेले होते. रोमन लोकांचे वैशिष्ट्य हे की, ते जमिनींसाठी साध्या (चकचकीतपणा नसलेल्या) तर भिंतींसाठी चकचकीत फरश्या वापरीत. भिंतीवर ते फरश्यांच्या साहाय्याने धार्मिक देखावे तयार करीत.

मुस्लिमांनी चकचकीत फरश्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. समारा येथील इ. स. नवव्या शतकातील इमारतीमध्ये मुस्लिम लोकांनी सु. २५ सेंमी. चौरसाकृती फरश्यांभोवती लाल, हिरव्या, पिवळ्या व तपकिरी छटांच्या लांबोड्या षट्‌कोनी फरश्या वापरल्या होत्या. बाराव्या ते पंधराव्या शतकांत इराणी प्रकारच्या फरश्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. राइ, ताब्रीझ, इस्फाहान व होरामीन या शहरांतील मशिदी, सार्वजनिक इमारती व सुंदर घरे यांच्या भिंतींना विविध आकारांच्या चकचकीत फरश्या लावून ती आतून व बाहेरून झगझगीत केली होती. पुष्कळदा ह्या फरश्या पांढऱ्यावर निळसर छटेच्या वर सोनेरी करड्या रंगाच्या पण बदलत्या प्रकाशानुरूप हिरव्या, जांभळट वा लाल रंगांच्या दिसतील अशा होत्या. मोठ्या आकारमानाच्या फरश्यांवर पूर्णतया भूमितीय, पानाफुलांची वा आकृत्यांची नक्षी असे. ज्या फरश्यांमुळे मोठी नक्षी तयार होऊ शकेल अशा छोट्या फरश्याही बसविलेल्या असत. लहान एकरंगी फरश्या भूमितीय मोझेइक रूपात लावण्यात येत. [⟶ इराणी कला इस्लामी कला कुट्टिमचित्रण].

इ. स. पू. २०२ – इ. स. २२० या हॅन काळातील चीनमधील थडग्यांना मुद्रांकित वा ठसायुक्त आकृत्या असलेल्या फरश्या लावलेल्या आढळतात. इ. स. तेराव्या ते पंधराव्या शतकांतील सुंग काळात व नंतर विविध प्रकारच्या चकचकीत फरश्या इमारतीचे छत, भिंती व जमिनी यांवर लावण्यासाठी वापरण्यात येत.

यूरोपीयन चर्चमध्ये इ. स. बाराव्या शतकात जमिनीवर लावण्यासाठी फरश्याचा वापर सुरू झाला. लाल-तपकिरी फरश्यांवर मेणाच्या रंगाने (विशेषतः पिवळ्या व पांढऱ्या) रंगकाम करून उष्णतेने वा तत्सम प्रक्रियांनी पृष्ठभाग टिकाऊ करीत असत. या फरश्या अशा तऱ्हेने जोडत की, त्यामुळे तयार होणाऱ्या चित्राची पार्श्वभूमी एका रंगाची, तर तीवरील चित्रांचे रंग दुसरे असत. यूरोपमध्ये सामान्य घरांसाठी साधी मातीची भाजलेली फरशी, तर चांगल्या घरांसाठी काळ्या-पांढऱ्या संगमरवरी फरश्या बरीच शतके वापरीत असत.

स्पॅनिश वास्तुशिल्पावर इस्लामी वास्तुशिल्पाचा चांगलाच प्रभाव होता व स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर फरश्या वापरल्या जात असत. भिंतींना निळ्या-पांढऱ्या वा चकचकीत फरश्या लावीत असत. फरश्यांवर भूमितीय, पानाफुलांची सूचक वा बोधचिन्हांकित नक्षी असे. प्रबोधन काळात स्पेन व इटलीमध्ये ‘माजोलिका’ फरश्या लोकप्रिय होत्या. ह्या फरश्या मातीच्या असून त्यांवर टिन ऑक्साइडाचा अपारदर्शक व चकचकीत थर असे आणि त्यांवर सरदारांची वा संतांची चित्रे गडद निळ्या व पिवळ्या रंगांनी चितारलेली असत.


इटालियन व स्पॅनिश फरश्यांचा प्रसार उत्तर यूरोपात, विशेषतः डेल्फ्ट या डच शहरी झाला. सतराव्या शतकाच्या मध्यास डच शहरांतील घरांच्या खोल्यांतील संपूर्ण भिंतींवर डेल्फ्ट तयार येथे तयार करण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण फरश्या डच शैलीत बसविण्यात आल्या होत्या. कधीकधी प्रत्येक फरशीवर नाजुक नक्षीकाम असे, तर काही वेळा बऱ्याच फरश्या जोडून एक मोठा देखावा तयार करण्यात येई. इंग्लंड, अमेरिका व जर्मनभाषिक देशांत या फरश्यांची निर्यात होई.

आधुनिक फरशीनिर्मितीचा आधार अजूनही डेल्फ्ट फरशीनिर्मिती हाच आहे. या पद्धतीमध्ये चौरस साच्यात मऊ माती दाबत, ती व्यवस्थित करीत, नंतर लोणारी कोळशाच्या भुकटीने कागदावरील नक्षीच्या बाह्यरेखा विटेवर काढीत आणि मग रंगीत झिलईने आकृतीचे रेखन करीत. नंतर फरशीवर क्वॉर्ट (शिशाची पारदर्शक झिलई) शिंपडले जाई आणि रंग व क्वार्ट गुळगुळीत पृष्ठाच्या रूपात एकत्रित होण्यासाठी भाजत असत.

विसाव्या शतकातील फरश्या विविध रंगांच्या व नक्षीच्या तर आहेतच शिवाय त्यांचा पृष्ठभाग टिकाऊ व स्वच्छ असून त्यांची देखभाल ठेवणेही सोपे असते. स्वयंपाकगृहाच्या भिंती व जमिनी, हॉटेले व नाट्य वा चित्रपटगृहे यांचे कक्ष, दिवाणखाने, बंगल्यांची प्रवेशद्वारे, अंगणे, स्नानगृहे व पोहण्याचे तलाव, प्रयोगशाळा, रुग्णालये, भुयारी रस्ते इ. ठिकाणी अशा फरश्या वापरल्या जातात. 

प्रकार : फरश्या तयार करण्यासाठी विविध प्रकारची साधनसामग्री वापरण्यात येते. सर्वसामान्यतः दगडी, सिमेंटच्या व मृत्तिकेच्या (मातीच्या) फरश्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. इतर प्रकारच्या फरश्यांचा वापरही काही वेळा करण्यात येतो.

दगडी फरश्या : या फरश्यांचे विविध प्रकार दगडांच्या प्रकारावर अवलंबून असतात. यांमध्ये सधन घट्ट सूक्ष्मकणी बेसाल्ट दगडाची काळी फरशी गोकाक येथील पांढऱ्या तसेच आग्रा-मथुरा भागातील गुलाबी रंगाच्या वालुकाश्माची फरशी शहाबाद, तंडूर, निमच इ. ठिकाणच्या रासायनिक निक्षेपणाने (रासायनिक विक्रियेद्वारे साचल्याने) तयार झालेल्या सूक्ष्मकणी चुनखडकाची शहाबादी फरशी कडाप्पा येथील काळ्या सूक्ष्मकणी चुनखडकाची फरशी पोरबंदर येथील जैव-रासायनिक क्रियेने तयार झालेल्या पांढऱ्या चुनखडकाची फरशी व संगमरवराची फरशी इत्यादींचा समावेश होतो.

स्तरणामुळे (थरयुक्त रचनेमुळे) बऱ्याच वालुकाश्मांना आणि रासायनिक चुनखडकांमध्ये स्तरभिदुरता (थरांना अनुसरून भंगण्याचा गुणधर्म) आलेली असते. ही विभाजनतले अगदी कमी अंतरावर असली म्हणजे असे खडक पटाशीने किंवा छिन्नीने सहजपणे दुभागता येतात व त्यांच्या विस्तृत आकाराच्या चपट्या फरश्या तयार होतात. बेसाल्ट, संगमरवर, पोरबंदरी चुनखडक इत्यादींमध्ये मात्र अशी विभाजनतले नसल्यामुळे त्यांच्या कमीजास्त काठिण्यानुसार हातोडी-छिन्नीने घडवून किंवा करवतीने कापून त्यांचे फरशीच्या आकाराचे चपटे ठोकळे तयार करावे लागतात.

बेसाल्ट खडकाच्या फरश्या (लाद्या) बऱ्याच जड असतात. त्या सहजपणे हाताळता याव्यात यासाठी त्या शक्य तितक्या लहान आकारमानाच्या पण चौकोनी करतात. त्यांची जाडी सु. ७ -१० सेंमी. इतकी ठेवतात. या फरश्यांचे काठ नीट घडवून काठाचा उभा भाग वरच्या पृष्ठभागाशी गुण्यात आणतात. प्राचीन रोमन रस्ते अशा फरश्यांचे केलेले होते. भारतात अशा फरश्या देवळाच्या प्रांगणात, घाटावर, राजवाड्यात, मंडईत, जनावरांचे गोठे, अरुंद रस्ते इ. ठिकाणी वापरण्याची पद्धत होती.

पोरबंदरी व मथुरा प्रकारच्या फरश्यांची जाडी ६·७ सेंमी. इतकी ठेवतात परंतु त्यांचे आकारमान ३० X ३० सेंमी. ते ६० X २०० सेंमी. पर्यंत ठेवले जाते. या फरश्या करवतीने दगड कापून तयार करतात.

शहाबादी फरश्यांची जाडी २·५–४ सेंमी.पर्यंत ठेवतात व आकारमान १५X१५ सेंमी.पासून ६०X७५ सेंमी. पर्यंत ठेवतात. या दगडाला अनेक थर असल्याने ते थर पटाशीने अलग करतात. अशा थरांचे त्यांच्या जाडीनुसार वेगवेगळे गट पडून त्याचे ठराविक आकारमानाचे तुकडे तोडतात व दोन्ही बाजूंना टाक्या मारून त्या सारख्या जाडीच्या करतात. तसेच यांत्रिक सुरीने कापून योग्य त्या आकारमानाचे व आकाराचे तुकडे करतात.


संगमरवरी फरशीची जाडी बरीच जास्त ठेवावी लागते परंतु तिची एकच बाजू चांगली गुळगुळीत व सपाट करून वापरतात. सामान्यतः तिचे आकारमान २५ X २५ सेंमी. किंवा ३० X ६० सेंमी. ठेवतात. बेसाल्ट दगडापासून फरशी करण्याच्या पद्धतीप्रमाणेच संगमरवरी फरश्या तयार करतात परंतु त्यांचा मुख्य व दर्शनी पृष्ठभाग कठीण दगडाच्या चुऱ्याने घासून गुळगुळीत करावा लागतो. काही वेळा संगमरवर करवतीने कापून फरश्या तयार करण्यात येतात.

बहुतेक प्रकारच्या दगडी फरश्या बनविण्याची बहुतेक सर्व कामे भारतात हातानेच करण्याची वहिवाट आहे परंतु आता पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी घर्षण यंत्रे वापरतात.

मृत्तिका फरश्या : मातीपासून उत्तम प्रकाराच्या फरश्या बनविण्यासाठी फेल्स्पार सुघट्य (आकार देता येण्यासारखी) मृत्तिका, केओलीन व वाळू यांचे बारीक चूर्ण ठराविक प्रमाणात मिसळतात. पाण्याच्या साहाय्याने त्याचा घट्ट चिखल करून तो पोलादी चेंडूयुक्त चक्कीत घोटून एकजीव करतात. नंतर हा चिखल साच्यामध्ये ओतून बहि:सारण करून (मुद्रेतून घुसवून) अथवा त्यावर दाब देऊन त्याच्या कच्च्या फरश्या तयार करतात. त्या सुकवितात आणि भट्टीत सु. १,०००° से. तापमानास भाजतात. भाजलेल्या फरशीच्या वरच्या पृष्ठावर एनॅमल मिश्रणाचा लेप देतात व तो सुकल्यावर या फरशा परत भट्टीत भरून सु. १,२००° से. तापमानाला भाजतात. या तापमानाला एनॅमल मिश्रण वितळते व फरशीच्या पृष्ठभागावर पांढरा स्वच्छ काचेसारखा गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. याच पद्धतीचे विविध रंगी फरश्या तयार केल्या जातात. अशा फरश्या देवळे, दवाखाने, स्वयंपाकगृहे, स्नानगृहे, स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा इ. ठिकाणी वापरतात. वर उल्लेखिलेल्या पद्धतीशिवाय मृत्तिका फरश्या तयार करण्यासाठी इतर पद्धतींही वापरतात. 

सिमेंटच्या फरश्या : सिमेंट व वाळू यांचे ठराविक प्रमाणातील मिश्रण योग्य प्रमाणात पाणी घालून एकजीव करतात व त्याचा घट्ट असा राडा तयार करतात. हा राडा साच्यांत दाबून भरतात व सात दिवसांपर्यंत ओलसर स्थितीत ठेवतात. नंतर त्यांच्या पृष्ठभागावर कोरडे सिमेंट चोळून तो पृष्ठभाग गुळगुळीत करतात व परत ओलसर जागेत पंधरा दिवस ठेवतात व मुरू देतात. या मुदतीत फरशी चांगली वाळते, टणक होते व वापरण्यायोग्य होते. ज्या फरशीवर रंगीत काम करावयाचे असते, तिच्या पृष्ठभागावर लहान लहान उथळ खळगे ठेवतात व ते रंगांनी भरून टाकतात आणि अशा फरश्या परत ओलसर स्थितीत ठेवतात वा फरशीला जो रंग द्यावयाचा तो सिमेंटमध्येच मिसळून ओलसर फरशीवर चोळतात व ओलसर स्थितीत ठेवतात. काही विशिष्ट फरश्यांसाठी ओल्या फरश्यांवर जवसाचे तेल व मेण यांचे मिश्रण चोळून त्यांचे पृष्ठ गुळगुळीत करतात.

मोझेइक फरश्या तयार करताना सिमेंटच्या फरशीवर विविध रंगांचे बारीक बारीक ठिपके देऊन फरशी गुळगुळीत करतात. पूर्वी यासाठी कपबश्यांचे वा रंगीत काचेचे तुकडे ओल्या सिमेंटमध्ये आवश्यक त्या नक्षीमध्ये बसवीत. त्याऐवजी हल्ली फरश्यांवर असे रंगच वापरतात.

लाकडी फरश्या : मॅपल, बीच, भूर्ज (बर्च), ओक, पेकन यांसारख्या झाडांच्या कठीण लाकडापासून तसेच पिवळा पाइन, डग्लस फर, बेस्टर्न हेमलॉक यांसारख्या झाडांच्या मऊ लाकडांपासून सामान्यतः लाकडी फरश्या केल्या जातात. कठीण लाकडाच्या फरश्या वापरण्यास चांगल्या असतात कारण त्या लवकर झीजत नाहीत व त्यांवर लवकर खड्डे पडत नाहीत. दोन वा अनेक लाकडी पट्ट्या धातूच्या मेखेने वा इतर योग्य साधनांनी जोडून लाकडाचे घन ठोकळे तयार करतात. हे ठोकळे जीभ-खाचा सांध्याने जोडतात आणि खिळ्यांनी वा अस्फाल्ट आसंजकानी (चिकटविणाऱ्या द्रव्यांनी) जोड घट्ट करतात. स्तरयुक्त ठोकळे प्लायवुडच्या साहाय्याने बनवितात.

अस्फाल्टी फरश्या : ॲस्बेस्टस तंतू, खनिज रंगद्रव्ये व अक्रिय भरणद्रव्य यांचे मिश्रण व अस्फाल्ट बंधक वापरून अस्फाल्टच्या फरश्या तयार करतात. या फरश्यांचा उपयोग टणक जमिनीवर बसविण्यासाठी, तसेच कमी प्रतीच्या काँक्रीटवर बसविण्यासाठी करतात. मात्र या फरश्या बसविण्यास जमिनीत अल्पशी आर्द्रता असावी लागते.

कॉर्कच्या फरश्या : (बुचाच्या फरश्या). बूच वृक्षाच्या लाकडाचे बारीक कण फिनॉलिक किंवा इतर रेझीन बंधकाबरोबर दाबाखाली भाजून या फरश्या तयार करतात. या फरश्या जेथे शांतता व आराम आवश्यक आहे अशा जागी वापरतात. या मळू नयेत म्हणून त्यांवर संरक्षक थर असणे आवश्यक असते.

व्हिनिल प्लॅस्टिक फरश्या : व्हिनिल क्लोराइड हे रेझीन बंधक म्हणून वापरून आणि प्लॅस्टिकीकारक (लवचिकता आणणारा पदार्थ), स्थिरीकारक, अक्रिय भरण द्रव्ये व रंगद्रव्ये यांचा वापर करून या फरश्या तयार करतात. या फरश्या भारी वजनाने न झिजता चांगल्या टिकतात. तथापि त्यांच्यावर पॉलिश केलेले नसल्यास त्या खराब होतात व त्यांच्यावर ओरखडे सहज पडू शकतात. या फरश्यांवर ग्रीज, तेले, घरगुती प्रक्षालके (स्वच्छ करण्याकरिता वापरण्यात येणारे पदार्थ) किंवा विद्रावक (विरघळणारे पदार्थ) यांचा काही परिणाम होत नाही.

व्हिनिल फरश्यांच्या कच्च्या मालात ॲस्बेस्टस तंतू मिसळून विविध रंगांच्या व्हिनिल ॲस्बेस्टस फरश्या तयार करतात. या फरश्या सु. ३० सेंमी.च्या चौरसाकृती व सु. १·५६ मिमी. जाडीच्या असून त्या काहीशा लवचिक व ऊष्मामृदू (वारंवार तापविल्या तरीही मऊ होणाऱ्या व निवल्यानंतर दृढ होणाऱ्या) असतात. व्हिनिल फरश्यांपेक्षा या फरश्या टणक असतात.


फरशी बसविणे : बांधकाम करताना फरशीवर पडणारा भार व फरशीची भार सहन करण्याची शक्ती यांचा विचार करावा लागतो. जमिनीवर बसविलेल्या फरशीवर साधारणतः दर चौ.मी. क्षेत्रफळावर एक टन भार पडेल, असे मानले जाते. हा भार सहन करण्यासाठी दगडाच्या जातीप्रमाणे फरशीची जाडी किती असावी, हे दगडाच्या नमुन्यावर प्रयोग करून ठरवितात. फरशी बसविताना फरशीवर येणारा भार सर्व क्षेत्रावर सारखा वाटला जाईल अशा रीतीने फरशीच्या खालील जागा तयार करावी लागते. सामान्यतः फरशी बसविण्याच्या जागेची माती उकरून जरूरीइतका खोल खड्डा करतात. हा खड्डा कोणत्या प्रकारची फरशी बसवावयाची आहे त्यानुसार ओला मुरूम, कमी प्रतीचे काँक्रीट किंवा वाळू यांचा थर देऊन भरतात. हा थर चांगला ठोकून सपाट करतात. त्यावर दुसरा एक आवश्यक जाडीचा थर देतात. फरशीवरचे पाणी पाहिजे त्या दिशेने लवकर निघून जावे म्हणून या स्तरालाच /४० इतका ढाळ (उतार) देतात. त्यावर / सेंमी. जाडीचा सिमेंट मिश्रणाचा थर देऊन त्यावर फरश्या दाबून बसवितात व सर्व फरश्यांचे सांधे सरळ रेषेत आणतात. फरशी बसवून झाल्यावर आवश्यक तर दरजा भरून फरश्यांवर पाणी शिंपडून ओल्या पोत्यांनी वा गवताने झाकून ठेवतात.

बेसाल्टच्या लाद्या, पारबंदरी फरशी, शहाबादी फरशी, तंडूर फरशी इ. दगडी फरश्या बसविताना खालचा थर वाळूचा, खडीचा व सु. ४० मिमी. जाडीचा असतो. फरशी व थर यांमध्ये पोकळी राहणार नाही, याची काळजी घेतात. तसेच दोन फरश्यांमध्ये सु. ५ मिमी. अंतर सोडतात. सामान्यतः या फरश्या दोन कोपऱ्यांतून बसविण्यास सुरुवात करतात. खालच्या थरावर फरशी घट्ट ठेवल्यानंतर लाकडी ठोकणीने ठोकून योग्य पातळीत आणतात. एखादी फरशी खालीवर झाल्यास ती पूर्ण उचलून खालच्या थरांत भर टाकून वा काढून परत बसवितात. सांधे सिमेंटने घट्ट व सम पातळीत भरतात.

संगमरवर, तंडूर, कोटा इ. फरश्यांच्या कडा गुळगुळीत करून बसवितात. या फरश्या सांधेविरहित एकमेकींस चिकटवून व कडा मुख्य पृष्ठाशी काटकोनात राहतील अशा बसवितात.

भाजलेल्या विटांची फरसबंदी वरीलप्रमाणेच करतात पण त्या हेरिंग (मत्स्य) अस्थी पद्धतीने (विटेची लांबी खोलीच्या कर्णाच्या दिशेत व शेजारील ओळीतील लांबी दुसऱ्या कर्णाच्या दिशेत येईल अशा रीतीने) बसवितात. तसेच त्यांचे सांधे समांतर असतात. दोन विटांमध्ये १० मिमी. एवढे अंतर ठेवतात व दरजा भरतात.

मृत्तिका फरश्या दगडी फरश्यांप्रमाणेच बसवितात पण त्यासाठी खालचा थर १२-१५ मिमी. इतका जाड असतो. या फरश्या खोलीच्या मध्यापासून बसविण्यास सुरुवात करतात. त्या एकमेकींना घट्ट जोडूनच बसवितात. त्यामुळे सांधे व दरजा भरण्याची गरज उद्‌भवत नाही. जरूर तेथे फरशीच्या रंगासारख्याच सिमेंटने दरजा भरतात. नंतर यंत्राने पृष्ठभाग गुळगुळीत करतात.

कॉर्कच्या फरश्या बसविल्यानंतर त्यांचे पृष्ठभाग एका पातळीत येण्यासाठी ते वाळूने भरतात आणि मेण वा तत्सम संरक्षक थर देऊन कडा बंदिस्त करतात.

व्हिनिल-ॲस्बेस्टस फरश्या कमी प्रतीच्या काँक्रीटवर अथवा खास सिमेंटच्या साहाय्याने बसवितात किंवा भिंतीला बसविताना प्रथम प्लायवूड लावून त्यावर योग्य आसंजकाच्या साहाय्याने लावतात.

उपयोग : पाण्याच्या जोरदार प्रवाहाने जमीन वा काठ धुपू नयेत म्हणून त्या ठिकाणी दगडांची फरशी बसवितात. अशा फरश्या जोरदार प्रवाहाने हालू नयेत म्हणून पूर्वी शिश्याच्या खुंटांनी त्या जोडीत व सांधे चुन्याने भरीत असत. आता बहुतेक ठिकाणी सिमेंट-वाळूचे मिश्रण त्यासाठी वापरतात.

घरामध्ये जमिनीवर फरशी बसविली म्हणजे धूळ उडत नाही व ती सहज स्वच्छ करता येते, तसेच ती सुलभपणे धुता येते. स्वयंपाकगृह, चुलीचे ओटे, प्रयोगशाळा, स्वच्छतागृहे, स्नानगृहे इ. ठिकाणी चिनी मातीची एनॅमलयुक्त फरशी वापरली, तर तेथील जमिनी व भिंती खराब होत नाहीत व झाल्यास सहज स्वच्छ करता येतात. लहान रस्त्यांसाठी दगडांची फरशी वापरल्यास ती दीर्घ काळ टिकते व स्वच्छ करणे सोयीचे होते. मोठ्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या पादचारी मार्गांवरही दगडी व शहाबादी फरशी बसवितात.

यूरोपातील काही देश व मध्य-पूर्वेतील मुस्लिम देश येथील प्रार्थना मंदिरे, सार्वजनिक इमारती यांच्या जमिनींवर आणि भिंतीवर चिनी मातीच्या उठावदार रंगीत चित्रे असलेल्या फरश्या बसवून त्या सुशोभित करण्याची परंपरा आहे. या फरश्या सहज स्वच्छ करता येतात व बराच काळ टिकतात.

काँक्रीटची गच्ची झिपरत असल्यास तीवर फरश्या बसवितात. काही वेळा भाजलेल्या विटांचा फरशीसारखा उपयोग करतात उदा., बागेतील पाऊलवाटेवर फरसबंदीसाठी, कालव्यांतून पाणी झिरपू नये म्हणून त्यांच्या तळांवर बसविण्यासाठी. मृत्तिका मोझेइक फरश्या (सामान्यतः चकाकी नसलेल्या व २·५ – ५ सेंमी. चौरसाकृती असलेल्या) जमिनीसाठी आणि भिंतीसाठी आतून व बाहेरून वापरतात. या फरश्या चकचकीत फरश्यांइतक्या भडक रंगाच्या नसतात. यंत्रांनी बनविलेल्या व चकाकी नसलेल्या मृत्तिका फरश्या म्हणजे क्वारी फरश्या या तांबड्या व पिवळसर, १५ व २३ सेंमी.च्या चौरसाकृती असून जेथे जास्त वर्दळ असते वा जेथे रसायनांच्या क्रियेला रोध करणाऱ्या पृष्ठभागांची आवश्यकता असते तेथील जमिनींसाठी त्या वापरतात. विविध छटा असलेल्या वा कोरीवकाम असलेल्या क्वारी फरश्या सार्वजनिक ठिकाणी तसेच घरांत वापरल्या जातात. क्वारी फरश्यांप्रमाणेच आकारमान असलेल्या चकाकीरहित फरसबंदीच्या (पेव्हर) फरश्या अधिक विविध रंगांच्या असतात. चकाकीयुक्त पोकळ मृत्तिका फरश्या शाळा, रुग्णालये, रेल्वे, स्थानिक उपाहारगृहे इ. ठिकाणी विभाजक पडदीसाठी वापरण्याकरिता आकर्षक व खर्चाच्या दृष्टीने काटकसरीच्या ठरल्या आहेत.


रुग्णालयात शस्त्रक्रिया व प्रसूतीच्या खोल्यांसाठी विद्युत् वाहक मृत्तिका फरश्या काही पाश्चात्त्य देशांत वापरल्या जातात. अशा ठिकाणी निर्माण झालेल्या स्थिर विद्युत् भाराचे ठिणगीमध्ये रूपांतर होऊन खोलीमध्ये ज्वलनशील वायू पेटण्यापूर्वीच विद्युत् वाहक फरश्यांकडून तो वाहून नेला जातो.

यंत्राने दाब देऊन व सूक्ष्मकणी मातीपासून तयार केलेल्या आधुनिक चकचकीत फरश्या कठीण असून त्या लहान चौरसाकृती, आयताकृती, षट्‌कोनी वा वर्तुळाकार व साध्या रंगांच्या असतात. फरशी ओली झाल्यासही तिच्यावरून घसरून पडू नये म्हणून अशा काही फरश्यांमध्ये ॲलंडम वा कार्बोरंडमसारखे खरखरीत पदार्थ मिसळलेले असतात.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस घुमट व मेघडंबरी यांसाठी लाकडाऐवजी हलक्या आणि सपाट फरश्या वापरात आल्या. यामुळे घुमटाचा तो भाग अग्निरोधक होऊ लागला.

भारतीय उद्योग : फार पूर्वीपासून भारतात दगडी फरश्या वापरात होत्या. त्या सर्वसाधारणतः नदीचे घाट, देवळांचे सभामंडप व बाहेरील पटांगण, राजवाडे, वाहनांची जास्त रहदारी नसलेले रस्ते इत्यादींसाठी वापरत असत. या फरश्या घडवून तयार करीत. फरश्यांसाठी लागणारे दगड स्थानिक उपलब्धतेनुसार वापरीत असत.

इ. स. १५०० नंतर भारतात दिल्ली, आग्रा, जयपूर इ. मोठ्या शहरांत संगमरवरी दगडाच्या चौकोनी फरश्या राजवाडे, देवळे इत्यादींच्या जमिनी व भिंती यांना बसविण्यात येऊ लागल्या. ही पद्धत १८०० पर्यंत प्रचारात होती पण असे दगड दुर्मिळ व महाग झाल्यामुळे आणि चिनी मातीपासून उत्तम प्रकाराच्या स्वच्छ पांढऱ्या तयार फरश्या भारतात येऊ लागल्यामुळे संगमरवराचा वापर कमी झाला. जमिनीच्या व भिंतींच्या फरश्यांची निर्मिती भारतात कुटिरोद्योग म्हणून व मागणीनुसार करण्यात येई. दुसऱ्या महायुद्धापर्यंत फरशीनिर्मितीची प्रगती मंद होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर तिची जोरात प्रगती झाली. १९४५ च्या सुमारास एनॅमलयुक्त मृत्तिका फरश्या भारतात तयार होऊ लागल्या. तथापि फरशीनिर्मितीत पहिल्या पंचवार्षिक योजनेअखेर (१९५६ अखेर) मंदी आली होती. यांनतर दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनांच्या काळांत फरश्यांना मागणी आल्याने नवीन कारखाने स्थापन झाले. सर्वसाधारणपणे हे कारखाने लघू व महोत्पादक स्वरूपाचे होते. १९६० मध्ये पाच मोठे कारखाने होते व त्यांमधून ९·९४ लक्ष फरश्यांचे उत्पादन झाले. १९६५ मध्ये सात मोठे कारखाने होते व त्यांमधून ४,५७६ टन उत्पादन झाले. लहान स्वरूपाच्या उद्योगातील कारखाने पॉलिश नसलेल्या फरश्या तयार करीत. नंतरच्या तीन एकवर्षीय योजनांत व चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या दोन वर्षांत या उद्योगाची प्रगती होत गेली.

इ.स. १९७३ च्या सुमारास भारतात पाच मोठे कारखाने (उत्पादनक्षमता २१,१२० टन) एनॅमल फरश्यांचे उत्पादन करीत होते. हे कारखाने भारताच्या पश्चिम भागातच आहेत. तसेच १४६ लहान कारखाने फरश्यांची निर्मिती करीत होते. तथापि बरेच लहान कारखाने मालाच्या मागणी अभावी बंद आहेत.

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात फरश्यांची आयात बंद करण्यात आली असून भारतातून सध्या कुवेत, येमेन, मॉरिशस, बहारीन, मस्कत, सौदी अरेबिया, डेन्मार्क, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग इ. ठिकाणी फरश्यांची निर्यात करण्यात येते.

भारतीय मानक संस्थने भिंतींच्या व जमिनीच्या फरश्यांसाठी १४ मानके तयार केलेली आहेत. सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट, भावनगर या संस्थेने फरश्या तयार करण्याची उत्पादन खर्चात बचत करणारी सोरेल सिमेंट पद्धत शोधून काढली आहे. तसेच कुंभार उद्योग, श्री गांधी आश्रम, चुटमैपूर (उ. प्रदेश) व सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुडकी यांनी उत्तर भारतात उपलब्ध होणाऱ्या स्थानिक गाळाच्या मातीपासून फरश्या तयार करण्याची पद्धत शोधून काढली आहे. या फरश्या भारतीय मानकांप्रमाणे तयार करण्यात येतात आणि त्या झीज व जास्त वजनाला टिकतात, असे आढळून आले आहे.

संदर्भ :  1. C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VIII, New Delhi, 1973.

    2. Government of Maharashtra, P. W. D. Handbook, Vol. 1, Bombay, 1960.

    3. Merrit, F. S., Ed., Standard Handbook for Civil Engineers, New York, 1968.

   4. साने, य. शं. वास्तुरचना, पुणे, १९७३.

ओक, वा. रा. मिठारी, भू. चिं.