कोडीन:अफूमध्ये असणारे एक महत्त्वाचे ⇨ अल्कलॉइड. रासायनिक सूत्र C18 H21No H2o. अफूत ते अल्प प्रमाणात (०·७ -२·५%) आढळते. रॉबीके यांनी १८३२ मध्ये मॉर्फिनापासून ते प्रथम वेगळे केले. ते वर्णहीन किंवा शुभ्र स्फटिकी किंवा चूर्ण स्वरूपात मिळते. त्याची चव साधारण कडवट आहे. कोरड्या हवेत ते हळूहळू फुलारते. प्रकाशाचाही त्याच्यावर परिणाम होतो. ते विषारी आहे. वितळबिंदू १५४·९से. असून पाण्यात अल्प प्रमाणात पण अल्कोहॉल व क्लोरोफॉर्म यांमध्ये अधिक विरघळते. त्याचा अम्लीय व अल्कोहॉली विद्राव वामवलनी (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या प्रकाशाचे म्हणजे ध्रुवित प्रकाशाचे प्रतल डाव्या बाजूस वळविणारा) असतो. त्याची रेणवीय संरचना ( रेणूतील अणूंची मांडणी ) पुढीलप्रमाणे आहे.

कोडीन

मॉर्फिनाचे मिथिलीकरण करून[हायड्रोजन अणू काढून टाकून त्याऐवजी मिथिल (CH3) गटाचा समावेश करून] कोडीन तयार करतात. ह्यासाठी फिनिल ट्रायमिथिल अमोनियम सल्फेट हे मिथिलीकारक म्हणून वापरतात.

कोडिनाचे औषधी गुणधर्म मॉर्फिनासारखेच पण त्यापेक्षा सौम्य आहेत. कोडिनाची सवय लागत नाही व त्याचे दुष्परिणाम क्वचितच आढळतात. ते वेदनाहारक असून शांत झोपेसाठी देतात. सौम्य व मध्यम वेदनांवर ते ॲस्पिरीन व तत्सम औषधांपेक्षा गुणकारी पण मॉर्फिनापेक्षा कमी गुणकारी आहे. मधुमेह, खोकला इ. विकारांवरही वापरतात. खोकल्यावर दिल्यास त्याची मेंदूवर विक्रिया होऊन खोकला कमी होतो. कोरड्या व त्रासदायक खोकल्यावर ते गुणकारी आहे. इतर प्रकारच्या खोकल्यांवर दिल्यास त्याच्यामुळे त्रास होतो. दम्याच्या काही अवस्थांत ते दिल्यास अपायकारक ठरते. लहान मुलांना मोठी मात्रा दिल्यास आकडी होते. कोडिनाची वेदनाहारक मर्यादा ठराविक असते. ते घेतल्यास त्याचा परिणाम २-३ तासांपर्यंत टिकतो. मात्र वेदना जास्त होतात म्हणून जास्त प्रमाणात घेतल्यास काहीही उपयोग होत नाही. कोडीन सल्फेट, कोडीन फॉस्फेट व कोडीन हायड्रोक्लोराइड ह्या त्याच्यापासून बनविलेल्या संयुगांचा उपयोग औषध म्हणून करतात.

कुलकर्णी, स. वि.